अमृतानुभव


प्रकरण तिसरें

वाचाऋण परिहार

ययांचेनि बोभाटे । आत्मयाची झोंप लोटे । 
पूर्ण तही ऋण न फिटे । जें चेणोंचि नीद कीं ॥ ३-१ ॥ 


येहवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं । 
अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ ३-२ ॥ 
देहासवे हातपाये । जाती , मनासवें इंद्रियें । 
कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ ३-३ ॥ 
ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं । 
तेवीं अविद्येचे संबंधी । आटती इया ॥ ३-४ ॥ 
मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती । 
जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ३-५ ॥ 
लवण अंगें विरे । परी स्वादें जळीं उरे । 
नीद मरोनि जागरें । जि‍इजे निदें ॥ ३-६ ॥ 
तेवीं अविद्येसवें । चौघीं वेंचती जीवें । 
तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि या ॥ ३-७ ॥ 
हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा । 
तरी हाही शिणलेवा । बोधरूपेंची ॥ ३-८ ॥ 
ये‍ऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी । 
दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ ३-९ ॥ 
जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिंवसी । 
तेचि यथा बोधेंसी । निमाली उठी ॥ ३-१० ॥ 
परि जीती ना मेली । अविद्या हे जाकळी । 
बन्धमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ ३-११ ॥ 
मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? । 
अज्ञान घरी त्राये । वा‍उगीची ॥ ३-१२ ॥ 
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें । 
येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ ३-१३ ॥ 
घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण । 
मानीत असे ते जाण । म्हणो ये की ॥ ३-१४ ॥ 
म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? । 
मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ ३-१५ ॥ 
आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें । 
म्हणीतलें असे । सदाशिवें ॥ ३-१६ ॥ 
आणि वैकुंठींचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें । 
बांधिजे हें बोलणें । बहू केलें ॥ ३-१७ ॥ 
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें । 
मानू तेही लाभे । न बोलतांही ॥ ३-१८ ॥ 
जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ । 
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ? ॥ ३-१९ ॥ 
ज्ञानें श्लाघ्यतु आले । तैं ज्ञानपण धाडिलें वांये । 
दीपवांचून दिवा न लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ ३-२० ॥ 
आपणचि आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं । 
आपणपें गिंवशी । हें कीरु होय ? ॥ ३-२१ ॥ 
परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया । 
म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ ३-२२ ॥ 
तैसा ज्ञानरूप आत्मा । द्नानेंचि आपली प्रमा । 
करीतसे सोहं मा । ऐसा बंधु ॥ ३-२३ ॥ 
जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणोनि भारी नावडे । 
ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ ३-२४ ॥ 
म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ अंगांचा । 
एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ ३-२५ ॥ 
आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु । 
करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ ३-२६ ॥ 
जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु । 
परि हो‍ऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ ३-२७ ॥ 
अंगीं लाविलिया विभूती । तैं परमाणुही झडती । 
परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥ ३-२८ ॥ 
ना वोहळला आंगीं जैसे । पाणीपणें नसे । 
तहीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ ३-२९ ॥ 
ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी । 
असे पायातळीं । रिगोनियां ॥ ३-३० ॥ 
तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें । 
आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ ३-३१ ॥ 
तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां । 
तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ ३-३२ ॥ 
म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती । 
या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥ ३-३३ ॥ 


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‍अमृतानुभवे वाचाऋणपरिहार नाम तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥