त्यांना दोघांनाही आता मुंबईचा कंटाळा आला होता. तसं पहिल्यापासूनच त्यांनी ठरवलं होतं, काही वर्ष नोकरी करून पैसे साठवायचे, मग गावी परत जाऊन जमीन घ्यायची. नवससायास करून मूल झालं नव्हतं. खरं म्हणजे त्याच कारणासाठी रखमाला नवऱ्यानं मुंबईला आणलं होतं. मूल होत नाही म्हणून सासू छळायची, मुलगा सुट्टीवर आला म्हणजे दुसरं लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागायची. एकदा तो गावी आलेला असताना रखमानं डोळ्यांत पाणी आणून सांगितलं, "मला तुमच्याबरूबर मंबईला घेऊन चला. मला हितं ऱ्हायचं न्हाई." तो एका चिमुकल्या खोलीत रहात होता, तेही इतर दोघांबरोबर. त्यात ही कुठं राहणार? जेमतेम झोपण्यापुरती जागा होती. त्यात चूल, भांडीकुंडी कुठं मांडणार? संसार कसा करणार? पण रखमा काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणे तुम्ही मला घेऊन चला, मग काय होईल ते होईल. मला एकटीला इथं सोडून गेलात तर मी जीव देईन. ह्या थोराड बांध्याच्या, सुबक सावळ्या चेहऱ्याच्या बायकोवर शिवाजीचा जीव होता. ती म्हणते तसं करायला मागेपुढे पहाणार नाही असं त्याला पटलं. तिच्यावरून घरच्यांशी भांडणं करणंही त्याला शक्य नव्हतं. शेवटी त्यांचा राग पत्करून तो तिला आपल्याबरोबर घेऊन गेला.

 रखमाला वाटलं आपला नवरा किती चांगला आहे. आईच्या मनाविरुद्ध त्यानं आपल्याला इथं आणलं एवढंच नाही, पण तो दारू पीत नाही, आपल्यावर उठसूट डाफरत नाही, मारहाण करीत नाही. मग तीही त्याला खूष ठेवायला झटायची, त्याच्या आवडीचं करून घालायची, त्याला पैसे खरचायचं जड वाटायचं म्हणून ती कधीच अमुक पाहिजे म्हणून हट्ट धरायची नाही. काटकसरीनं संसार करायची.
 शिवाजीनं वेळेच्या आधीच नोकरी सोडायचं ठरवलं. मूलबाळ नसल्यामुळे पैशाला वाटा फुटल्या नाहीत. शिलकीत पडलेले पैसे आणि ग्रॅच्युइटी मिळून जमीन घ्यायला पुरेसे पैसे होते. शिवाय जमीन कसायची तर शरिराला कष्ट झेपतील अशा वयातच सुरुवात करायला हवी. असा सगळा विचार करून ती दोघं गावी आली.
 त्याचे आईबाप वारलेले होते. भाऊ बाहेरगावी नोकरीला होता. बापाची जमीन होती ती चुलतभावाच्या ताब्यात होती. शिवाजी आपल्या मनाविरुद्ध बायकोला घेऊन मुंबईला गेला, मुलगा व्हावा म्हणून दुसरं लग्न केलं नाही ह्याचा आकस मनात धरून त्याने ती जमीन मुद्दाम पुतण्याला दिली होती. तो आपणहून काही जमीन आपल्याला देणार नाही हे शिवाजीला माहीत होतं. कोर्टकचेऱ्या करायची त्याची इच्छा नव्हती. त्यातन काही पदरात पडण्याची शक्यता नव्हती. शिवाय तिथंच त्यांच्या शेजारानं रहायचं तर त्यांच्याशी वैर कशाला?
 त्यानं साताठ एकरांचा जमिनीचा तुकडा घेतला. जमीन जिराईतच होती, पण त्यानं पानाड्या आणून त्याने दाखवलेल्या ठिकाणी विहीर काढली. त्याला थोडं पाणी लागलं. त्याने थोडे गुंठे जमीन भिजत होती, त्यात भाजीपाला लावला. पाटीत माळवं भरून रखमा शेजारच्या गावात विकायला जायची. बाकीच्या रानात पिकलेली ज्वारी त्यांना वर्षभर खायला पुरायची. शेतावरच भेंडाच्या विटांचं छोटंसं कौलारू छप्पर त्यांनी बांधलं. दावणीला एक गाय, दोन शेळ्या होत्या. गाईचं दूध विकूनही बरे पैसे व्हायचे. कष्ट करून समाधानात दोघं रहात होती. मुंबईतली सगळी वर्ष त्यांनी हेच स्वप्न पहात घालवली होती.
 पण फार वर्ष हे सुख रखमाला लाभलं नाही. पायाला कुदळ लागल्याचं निमित्त होऊन शिवाजी धनुर्वाताने दगावला. रखमाला हा अनपेक्षित आघात सहन झाला नाही. ती भ्रमिष्टासारखी झाली. कुणीतरी भाकरी आणून तिला चार घास खाऊ घालावे, तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगू पहाव्या. ती सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यायची पण तिच्या मेंदूवर काही उमटतच नव्हतं. तिच्या भावानं, बहिणीनं थोडे दिवस तरी आमच्याकडे चल म्हणून बोलावलं पण तिनं सपशेल नकार दिल्यावर सुटकेचे निश्वास टाकले. ती म्हणे मी त्यांना सोडून कुठे कसं जाऊ? ती कुणाशीच फारसं काही बोलत नसे, फक्त दुसरं कुणी अवतीभवती नसलं की नवऱ्याशी मात्र बोलायची. एक दिवस त्याने तिच्या स्वप्नात येऊन सांगितलं, "रखमा ऊठ. बाहेर किती काम पडलंय. भेंडीला पाणी घ्यायचंय, कोबीची खुरपण करून खायला घालायचंय, भाजी फुलावर यायला लागली असेल ती काढून बाजारात न्यायला पायजे. तू अशी नुसती बसलीस तर कोण करणार ही सगळी कामं?"
 दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून तिनं पदर बांधला नि ती कामाला लागली. कष्टाची सवय असलेलं आपलं शरीर इतके दिवस नुसतं लोळ्यागोळ्यासारखं बसून कसं राहिलं ह्याचा तिला अचंबा वाटला. नवरा गेल्याचं दु:ख कितीही मोठं असलं तरी त्याच्यामागनं जीव दिला नाही, जगवलाच ना? मग दु:ख उगाळीत जमिनीची, पिकाची, जित्रापाची अशी हयगय आपण कशी कली? आता आपल्याला तेवढाच आधार आहे.
 तिचा पुतण्या तिला भेटायला यायचा. त्यानेच चुलत्याला अग्नी दिला होता. तो येऊन आपली विचारपूस करतो म्हणून तिला भारी कौतुक वाटायचं, चुलत्याच्या मागे चुलतीला अगदीच वाऱ्यावर सोडली नाही म्हणून. वाटायचं, माझा मुलगा असता तर त्याच्याकडे बघून मी कसेही दिवस काढले असते. पण जे नशिबातच नाही त्याच्याबद्दल दुःख करून काय उपयोग?
 ती जरा सावरलीय असं पाहून पुतण्यानं विचारलं, "काकी, आता तुमी कुठं जाणार?"
 "जानार रं कुटं? होच माजं घर न्हवं का?"
 हितं काय करणार?"
 "इक्तं दीस काय करीत व्हते? त्येच."
 एकटयाच?"
 "तर म दुसरं कोन हाय मला? मदत लागली मंजी येखादा गडी लावीन. आन अडल्यापडल्याला तुमी सारी हायताच की."  एकदा त्यानं विचारलं, "तुमाला भीती नाही वाटत एकटं रहायला?"
 "भीती कशापाई? माज्याकडं काय पैशाचं डबोलं हाय का सोनंनाणं? का मी तरणीताठी हाय की कुनीबी यिऊन माज्यावर हात टाकावा?"
 एकदा त्यानं म्हणून पाहिलं, "तुमाला एकटीला जमत नसलं तर जमीन माझ्या ताब्यात द्या. तुम्ही माझ्यापाशी रहा. तुमाला काही कमी पडणार नाही. माझी आय असती तर संभाळली नसती का मी?" रखमा जरा रागावूनच म्हणाली, "कोन म्हनतं जमत न्हाई म्हणून? माजी जमीन माजं घर सोडून मी कुटंबी जानार न्हाई."
 याच्या पुढची पायरी म्हणून त्यानं तिला पैसे देऊ केले. "जमिनीच्या बदल्यात मी थोडेफार पैसे देईन तुम्हाला. ते घेऊन तुम्ही कुठंबी रहा." रखमाला जिद्द होती पण परिस्थितीचे सगळेच घटक इतके प्रतिकूल होते की ती एकटी उभी राहून त्यांच्याविरुद्ध लढा देऊच शकली नाही.

 इतकं झाल्यावर शेवटी आपला भोळेपणा तिच्या ध्यानात आला. आपणच चुलत्याचे वारस अशी पुतण्याची ठाम खात्री होती. मस वील केलं असेल त्यानं म्हणून काय झालं? बायकोच्या नावानं कुणी जमीन ठेवतं? रक्ताच्या माणसाला जमीन ठेवायला नको?

 ती अजिबात बधत नाही असं पाहून शेवटी त्यानं नख्या काढल्या नि धमक्या द्यायला सुरुवात केली. बऱ्या बोलानं गेली नाहीस तर नेसत्या साडीनिशी हुसकून काढीन. मग मात्र तिला भीती वाटायला लागली. तिला माहीत होतं की वेळ आली तर कुणीच तिच्यापाठी उभं रहाणार नव्हतं. पोलिसात तक्रार करून काही उपयोग नव्हता आणि करणार काय? तो धमक्या देतो म्हणून? तो म्हणणार मी नाही देत. तिच्यापाशी पुरावा काय होता? तसं समोरासमोर त्याच्याशी भांडायचं बळ तिच्यात होतं. हुसकून द्यायच्या धमकावणीला ती भीत नव्हती. पण रात्री अपरात्री घरात घुसून त्याने तिला जिवे मारली तर कोण काय करणार होतं? रातोरात प्रेत पुरून टाकून तो मोकळा होईल.
 मग काय करायचं? त्यानं देऊ केलेले पैसे घेऊन निघून जायचं? पण तो देणार ती किंमत बाजारभावाच्या आसपास सुद्धा जाणार नाही हे तिला माहीत होतं. त्याहीपेक्षा ते पैसे हातात पडण्याची काहीच खात्री नव्हती. तेव्हा तिनं त्याला झुलवत ठेवून गुपचुप एका मध्यस्थाच्या करवी एक गिऱ्हाईक पाहिलं. तो एक बागाईतदार होता. तिनं त्याला भेटून परिस्थितीची कल्पना दिली. हा गुंड तुम्हाला इथं नीटपणे शेती करू देणार नाही म्हणून बजावलं. तो म्हणाला मी ते बघून घेईन, तुम्ही त्याची काळजी करू नका. माणूस सज्जन होता. बाईला जमीन विकणं भाग आहे हे माहीत असूनही त्यानं नाडलं नाही. त्याला लिफ्टची परवानगी मिळत होती तेव्हा जमिनीतून पुष्कळ उत्पन्न मिळणार होतं. त्यानं रखमाला बाजारभावानं पैसे दिले. पैसे तिच्या हातात न देता आपल्या ओळखीच्या एका ठिकाणी व्याजी लावले आणि दर महिन्याला व्याज मिळेल अशी व्यवस्था केली.
 जमीन, घर सोडून जाताना रखमाला फार दु:ख झालं. नवऱ्याच्या मागे जिनं आधार दिला ती जमीन गेली, डोक्यावरचं हक्काचं छप्पर गेलं. नवऱ्याच्या आठवणी जिथे जिवंत होत्या त्या ठिकाणाला ती कायमची अंतरली. भावाकडे जाऊन राहिली तरी ते परक्याचंच घर. तिथे आपल्या मनाप्रमाणे वागता येणार आहे थोडंच? पण शेवटी नशिबात असेल ते कोण टाळू शकणार अशी स्वत:ची समजूत घालून ती नवं आयुष्य उभं करायला लागली. फक्त रात्री एकटी असली की मनातल्या मनात नवऱ्याशी बोलायची. त्याला सांगायची, "तुमी मला चकवून माज्या आंदी गेलासा, पर माज्यावर वाइच ध्यान ठिवा."
 आधी भावजय जरा नाराज होती. पण रखमानं तिच्या कलानं वागून घरातलं बरंच काम आपल्या अंगावर घेऊन तिची कुरकुर बंद केली. शिवाय महिन्याची महिन्याला व्याजाची रक्कम येत होती ती रखमा सरळ भावाच्या हवाली करायची. त्यामुळे भावावर तिचा भार पडत नव्हता. उलट भावाच्या संसाराला हातभारच लागत होता.
 काही वर्षांनी भावाची धाकटी मुलगी लग्नाला आली. भाऊ तिला म्हणाला, "पोरीचं लग्न काढलंय तुला ठाऊकच आहे. आज पैशाची गरज आहे. नाहीतरी तू माझ्या आधारानंच रहातेस, मग तुझे पैसे मला द्यायला काय हरकत आहे?" रखमाला नाही म्हणता येईना. तिनं जमीन खरीदणाऱ्याकडनं आपली ठेव काढून आणली, भावाच्या हवाली केली. त्याच्या मुलीचं लग्न थाटात झालं. भाऊ-भावजयीनं तोंड भरून रखमाचं ऋण मानलं.
 पण लग्नासाठी कर्जही काढलं होतं त्याचे हळूहळू तगादे लागायला लागले. शिवाय आता रखमाचे नियमित येणारे पैसे बंद झाले होते. भावाची ओढाताण व्हायला लागली. रखमाच्याही प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. औषधपाण्यावर खर्च व्हायला लागला. घरकामात तिच्याने पूर्वीइतकी मदत होईना. शेवटी खायला काळ नि भुईला भार झालेल्या बहिणीला भाऊ म्हणाला, "माझा मलाच संसार जड झालाय. इतकी वर्ष मी तुला संभाळलं, इथून पुढे संभाळणं माझ्यानं होणार नाही. तू आपली दुसरीकडे जा."
 तिच्या बहिणीचा मुलगा शहरात शिकायला ठेवला होता.खोली भाड्याने घेऊन रहात होता. त्याच्या आईने विचार केला, ही म्हातारी त्याच्याजवळ राहिली तर त्याला करून घालील.खाणावळीच्या खर्चात दोघांचं पोट निघेल. शिवाय पोरगं एकटंच शहरात रहातंय, बहकेल, वाईट संगतीला लागेल. ही असली तर हिचा थोडा धाक राहील. तेव्हा रखमानं बहिणीकडे आसरा मागितला तशी बहीण म्हणाली, "माझ्या पोराजवळ राहून त्याला करून घालशील का?" रखमा कबूल झाली. तिला दुसरा मार्गच नव्हता.
 भाचा दुकानची खरेदी, भाजी-बिजी आणून द्यायचा. रखमा बसत उठत स्वैपाक, भांडी-धुणी करायची. रोज सकाळी उठताना देवाचं नाव घेत त्याला साकडं घालायची, "इट्टला, असंच काम रेटता रेटता येक दीस मला न्हेरे माज्या बाबा. न्हायतर ह्या पोराला माजा उपेग हायला न्हाई मंजी मी कुनाच्या दारात जाऊ?"