अस्पृश्य-विचार.



लेखक
श्रीपाद महादेव माटे, एम्. ए.


प्रकाशक
सदाशिव कृष्णराव शिंदकर,
सेक्रेटरी, वाङमय-विहार-मंडळ,
२४८ सदाशिव पेठ, पुणें.



मुद्रक,
अनंत सखाराम गोखले,
'विजय’ प्रेस, ५७० शनवार पेठ, पुणें.



सन १९२२.



किंमत १० आणे.

प्रस्तावना


 अस्पृश्यांसंबंधाने 'केसरी' पत्रांत मी जे लेख लिहिले ते, थोडी अदलाबदल करून व भर घालून, पुस्तक रूपानें प्रसिद्ध करीत आहें.
 गेलीं चार पांच वर्षे अस्पृश्यांच्या प्रत्यक्ष परिचयाने त्यांच्या एकंदर स्थितीचे जे अवलोकन करता आलें त्यावरून सुचलेले हे विचार आहेत. मी जुना शास्त्रीपंडितही नव्हे आणि नवीन पद्धतीचा समाजशास्त्रज्ञही नव्हे. अर्थात् माझ्या लिहिण्यांत विद्वत्ता कमी. पण येवढें मात्र वाटतें कीं, प्रस्तुत विषयाशी माझी कांहींशी ओळख आहे. तिच्या बळावर अस्पृश्यांचे गाऱ्हाणे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 विद्वान् लोक आणि राष्ट्रहिताचे साधक यांनीं हा निबंध वाचून कांहीं अनुकूल-प्रतिकूल लिहिलें तर या बाबतींत जें कांहीं पुढे कर्तव्य असेल त्याचे स्वरूप जास्त निश्चित व कमी विवाद्य होईल.
३३६ सदाशिव पेठ,   श्री. म. माटे.
पुणे शहर.   






अस्पृश्यविचार.


 गेल्या दोन वर्षांत अस्पृश्यतेच्या प्रश्नाला जोराने उचल मिळाली आहे. राष्ट्रीय सभेने त्याचा पुरस्कार केल्यामुळेच ही गोष्ट घडून आली हे उघड आहे. सर्व हिंदुस्थानचे लक्ष आपल्या कारभाराकडे हटकून ओढून घेणारी अशी ही संस्था असल्यामुळे तिच्या द्वारा ज्या विषयाचा पुकारा झाला त्याला महत्व चढावें हें साहजिक आहे. ज्या भाकरीचा पेंच षट्शास्त्र्यापासून तों महारापर्यंत सर्वांनाच पडला आहे त्या भाकरीचा प्रश्न सोडविण्याचे काम राष्ट्रीय सभा करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनसमूहाचा ओढा अर्थातच राजकारणाकडे आहे, आणि त्या राजकारणाचा विचार करीत असतांना त्याच्या यशासाठीं ज्या ज्या इतर गोष्टींचा विचार करणे अवश्य आलेले दिसेल त्यांचा निदान विचार करण्यास लोक पुष्कळदां मनाच्या विरुद्धसुद्धा कबूल होतील. आजपर्यंत सामाजिक परिषदा काय थोड्या भरल्या? अस्पृश्यतेसंबंधीं चर्चा, भाषण, ठराव, निषेध इत्यादि प्रकार त्या सभांतून काय थोडे झाले? पण त्यांच्याकडे बहुजनसमाजाने फारसे लक्ष दिले नाही. त्याच्या पसंतीची जी राष्ट्रीय सभा तिने या प्रश्नाचा प्रामुख्याने उल्लेख करतांच सगळीकडे एतद्विषयक हालचाल चालू झाली. असे जरी आहे तरी या हालचालीचे सर्व श्रेय काँग्रेसला अर्पण करणें हे युक्त होणार नाही. महात्मा गांधींनी या विषयासंबंधाने आपल्या भाषणांतून व लेखांतून स्पष्ट व निर्भीड चर्चा केल्यापासून इकडे लोकांचे लक्ष जास्त वेधलें आहे. जो गृहस्थ आपल्याला पसंत व जरूर त्या राजकारणाविषयीं इतकें बोलतो व करतो तोच अस्पृश्यतेसंबंधानेही सांगू लागला म्हणजे त्याचे म्हणणे खरे आहे असे वाटूं लागावें, त्या विषयाला कांहीं जातिवंत व स्वयंभू महत्त्व आहेसें पटावें व निदान स्थानमाहात्म्य म्हणून, सभागौरवासाठी म्हणून, मुग्ध नापसंतीनें ताठरलेली आपली मान बहुजनसमाजाने अलंकारिक रीत्या पसंति दाखविण्यासाठी डोलवावी हें बरोबर आहे. पसंत अस की नसो, काँग्रेस व गांधी यांनी हा विषय गळी बांधला हें खरें. आतां तो गळीं उतरावयाचा राहीला आहे. एकाद्या मोठ्या थोरल्या लोकप्रिय कंपनीने आपल्या आजपर्यंतच्या तपाचा फायदा घेऊन, अगर भावी यशाकडे व स्वार्थाकडे लक्ष देऊन, साधारणतः अप्रिय मजकुराचें चोपडे प्रसिद्ध केल्याने या चोपड्याचा प्रसार, प्रसिद्धि आणि आदर ही जशीं आपोआपच प्राप्त होतात तसाच कांहीसा प्रकार राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतेच्या केलेल्या पुकाऱ्यात झालेला आहे. तिच्या बोजामुळे लोकांनीं आदरभावाने ऐकले व राजकारण हा जो तिचा पेशा त्यांत तेढ पडतां उपयोगी नाही अशा धोरणानें तिने सदुपदेश केला. महात्मा गांधी यांनी मात्र राजकारणापेक्षांहि आपल्याला उंच वाटणाऱ्या धर्मबुद्धीनें प्रेरित होऊन या विषयाला उचल दिली.
 पण काँग्रेसनें व गांधींनी हा पुरस्कार करावयाच्या आधी आमच्या समाजाचे मन काय अगदीं स्वस्थच बसलें होतें? आमची प्रचंड लोकसंख्या ही कांहीं कांहीं प्रसंग मोठी गैरसोयीची आहे असें वाटू लागते. कारण आपत्तिनिवारणाच्या कामी एवढा मोठा डोंगर मानमोड करणारा वाटतो. पण तोच लोकसंख्येचा अफाटपणा उपययोजनेच्या, चिंतनाच्या आणि अंमलबजावणीच्या कामीं असंख्य मनांच्या असंख्य ठेवणीमुळे व सामर्थ्यामुळे कार्यात सुकरता उत्पन्न करतो, असे. बहुजनसमाज जरी या बाबतींत उदासीन आणि विरुद्ध असला तरी या अजाणिवेच्या निशेंत समाज निजलेला असतांना कोणी कोणी विचारसंयमी जागे राहिले होते; आणि मधून मधून आपल्या जागेपणाची आणि रात्रीच्या अमलाची खूण त्यांनीं झोंपमोडीबद्दल होणारी अप्रियता संपादूनसुद्धां समाजाला दिली होती. ज्या वेळीं समाज पाहत नाही, त्या वेळीं जो पाहतो, तोच पाहतो. अशा पाहणारांची संख्या कमी होती म्हणूनच सामाजिक परिषदेच्या ठरावाकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. पण कमी असो की जास्त असो, या लोकांच्या कर्तबगारीमुळे काँग्रेसला हा विषय पत्करावा लागला असे म्हटल्यास त्यांच्या कर्तबगारीच्या वर्णनापेक्षां आपण कांहीं जास्त केलें असे होत नाही. समाजानें आपली केलेली हेटाळणी, प्रतिकूल परिस्थतीमुळे वारंवार होणारा कोंडमारा, स्वतःच्या सद्धेतूसंबंधानें उत्पन्न झालेलीं अगर उपस्थित केलेला विपरीत मतें या सर्व गोष्टी मावळून जाऊन, आपल्याला ज्याची अयंत आस्था तो विषय सर्वसाधारण जनसमूहाच्यासुद्धां आदरयुक्त विचाराला पात्र झाला हे पाहून आपलें सुभाषित आपल्याच अंगीं जीर्ण होईल की काय अशी आजपर्यंत भीति बाळगणारा सुधारकवर्ग खरोखर प्रमुदित झाला असेल यांत शंका नाही. पुढील राजकारणी अवतरले म्हणजे मागचे मागे पडून, त्यांनीं अडविलेली लोकांच्या मनांतील जागा पुढिलांच्यासाठी रिकामी व्हावी, नवा सुधारक आला म्हणजे त्याच्या तेजांत मागला लपावा हा सृष्टीचा क्रमच आहे. पण सामान्य माणसाची दृष्टि जरी याप्रमाणे नित्य नवीन येणार्‍या फिल्मवर चिकटलेली असली तरी एकाद्या वस्तुची वाढ निरीक्षावयास शिकलेल्या जागरूक डोळसाला हें स्पष्ट दिसतें कीं, हा एक तऱ्हेचा श्रमविभाग चाललेला आहे. एकाद्या तत्वाच्या अगर मताच्या पूर्ण उत्कर्षाला शंभर वर्षांचा किंमत पड णार असेल, तर जसजसा मतपोष होईल तसतसा पुढाऱ्यांच्या तेजस्वितेचा उदय दिसू लागतो. पण वास्तविक ते मागल्यांच्या खांद्यावर उभे असल्यामुळेच त्यांच्यापेक्षा उंच दिसतात. ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे पूर्वी ज्या ज्या माणसांनी या प्रश्नासंबंधाने प्रयत्न केलेले असतील त्यांची योग्यता पुरतेपणी कळेल व त्यांचा गौरव करण्याची बुद्धि जागी राहील असो, तर या विषयाच्या उचलीला काँग्रेस, गांधी व सुधारक यांनी जो हातभार लावला त्याविषयी किंचिन्मात्र उल्लेख केल्यानंतर परिस्थितीच्या सपाट्याचाही उल्लेख करणे जरूर आहे.
 परिस्थितीचा वारा अस्पृश्यांना अनुकूल असा फिरूं लागला. जर्मन युद्धापासून हरतऱ्हेचे बोध मनुष्य योनीला मिळाले. स्वतःच्या हितासाठीच वास्तविक ज्यांनी युद्धे आरंभिली त्यांनी ती अनाथांकरतां व दुबळ्यांकरतां आहेत असा गवगवा केला. कारण लोकांची सहानुभूति मिळवून आपलीं मर्मे लपवावयाची होती. त्या सहानुभूतीच्या बळावर व धडधडीत खोट्या भुलथापांवर लढाई तर मारली. संकटाच्या प्रसंगी सर्व सामर्थ्यें एकवटावी म्हणून नेहमी असत्याने लडबडलेली जीभ सत्ये व उदात्त तत्वें बोलू लागली. सत्याने आणि उदात्त तत्वांनी शरण आलेल्यांना आश्रय देऊन संकटमुक्त केलें. पण मदतीला बोलावून आणलेला राजा जसा घरांतच तळ देऊन आपल्याला हवी तशी व्यवस्था करूं लागतों त्याप्रमाणे त्यांनी या मतलबखोरांच्या घरादारांची व वेलविस्ताराची व्यवस्था आपल्याकडे घेतली. स्वतंत्रता, न्याय, स्वयंनिर्णय इत्यादींना लबाडीने घरी बोलावून आणिले. पण या निष्ठुर तत्त्वांनी फसव्या लोकांवर विलक्षण सूड उगविला, त्यांच्या खुद्द घरी आणि त्यांनी बाहेर मांडलेल्या संसारांत आपलाच घुमारा सुरू केला. 'आमच्या राज्यावर सूर्य कधी मावळत नाही' या गर्वोक्ति बाधक होतीलसें झाले. कारण इतक्या विस्तृत भूपृष्ठावर उदात्त तत्त्वांचा बोलबाला लगोलग सुरू झाला. आतां दो-दो हातांनी 'दादा, जरा दमानें घ्या' म्हणावे लागत आहे. कळकाचे कुडण तेंच हयगयखोराचें सरण अशी स्थिति झाली. ही उदात्त तत्त्वांच्या प्रवेशाची आणि प्रसाराची गोष्ट अवघ्या मानव्याच्या हिताची झाली. जो तो न्यायाचा उच्चार करू लागला. आपण कोण आहों हे ध्यानात भरल्यामुळे जो तो स्वयंनिर्णय करूं लागला. सातासमुद्रापलीकडे माजलेल्या कलीला धर्मदंडाशी पुनः करकंडून बांधण्यासाठी व मनुष्ययोनि सुखी करण्यासाठी पृथ्वीवरील अवघ्या लोकांना आग्रहाने आमंत्रणे करणाऱ्यांना मोठा जाच सुरू झाला. "अहो स्वतंत्रतावाले इंग्रज, काढा स्वयंनिर्णय कोठे आहे तो" असें हिंदी लोक म्हणूं लागले. पण कवलाघरावर उभे राहून 'न्याय न्याय' म्हणून ओरडणाऱ्या हिंदी प्रजेच्या शब्दांचा प्रतिध्वनि इंग्लंडकडून येण्याच्या आधीच थेट इटनाक महार, पिरा मांग आणि परशा चांभार यांच्या घरांतून उडूं लागला; त्यांची खोपटी, रकटी बोळू लागली आणि अशा रीतीने ऑस्ट्रियन राजपुत्राचा खून अस्पृश्यांच्या पथ्यावर पडला.
 असो. वरील सर्व लिहिणे जरी मानले तरी या प्रश्नाच्या उलटसुलट बाजू पाहणे; राजकारण, धर्मकारण, तारतम्य, देवघेव इ.दृष्टींनी त्यांचा पूर्ण विचार करणे अवश्य आहे. निरनिराळी मतमतांतरे आपल्या गलबल्यासह पुढे आल्यामुळे निवड करणे पुष्कळदां फार कठीण होऊन बसते, व विषयाचा अभ्यास दूर राहून परस्परांविषयींचे गैरसमज व दुराग्रह मात्र वाढीस लागतात. असें न व्हावें म्हणून पुढील लेख लिहिला आहे. त्यांतील विधानांचा आस्थेवाईक विचार करावा अशी वाचकांना नम्र विनंति आहे.
 अस्पृश्यांच्या एकंदर स्थितीचा विचार करून त्यांच्या तक्रारीला एकच नांव द्यावयाचे म्हटलं तर तें अस्पृश्यता हें होय. सुशिक्षित महारांनी आपल्या स्थितीचे ठळक निदर्शन स्वतःला 'बहिष्कृत' हेंच विशेषण लावून केले आहे. तेव्हां त्याच्या दृष्टीनेंहि बहिष्कार अगर अस्पृश्यता हेंच त्याच्या तक्रारीचे मुख्य नांव आहे. जन्मानेच कमी समजलें जाणे इत्यादि दुसऱ्या कांहीं बाबींत, इतर ब्राह्मणेतरांबरोबरच ब्राह्मणांविरुद्ध भांडावयास त्यांना एक विस्तृत अधिष्ठान सांपडतेच, पण त्याच्या जोडीला अधिक जिकीरीचे व केवळ त्यांनाच लागू असें 'अस्पृश्यता' नांवाचे एक निराळे अधिष्ठान आहे. प्रस्तुत लेखांत या उभयतांविषयींची चर्चा व्हावयाची आहे. पण या स्वतंत्र अधिष्ठानाचेच महत्त्व जास्त आहे हे उघड आहे. अस्पृश्यतेसंबंधीं व्हािवयास लागण्याच्यापूर्वी- म्हणजे तिच्यामुळे आपले राजकारण, समाजकारण इत्यादींवर काय काय विपरीत परिणाम होत आहेत, खुद्द अस्पृश्यांना तिच्यामुळें कसकसे हाल सोसावे लागत आहेत, व शेवटी तिच्या निवारणासाठी उपाययोजना कसकशी करावी इत्यादि गोष्टींचा ऊहापोह करावयाच्या पूर्वी-अस्पृश्यतेच्या अस्तित्वाविषयी दोन शब्द लिहिणे जरूर आहे. कोणी असें म्हणेल कीं, अस्पृश्यतेच्या अस्तित्वासंबंधी शंका आहे कोणाला? जी गोष्ट धडधडीत दिसत आहे ती सिद्ध करण्याची खटपट कशाला? तर अशा वाचकांना इतकेंच कळवावयाचे आहे की, स्वतःवरून जग आपण ओळखण्याचे सौजन्य दाखवीत आहां. खेडेगांवांत आणि जुन्या मगरमिठ्या अगदीं गच्च राहिलेल्या शहरच्या भागांत जरा हिंडून पाहावें. विषयाचा प्रस्ताव करून देऊन जुन्याचे अभिमानी वावदूक कसे तडकाफडकी निकाल देत आहेत हें बाजूला उभे राहून ऐकावें म्हणजे वरील खटपट करणे जरूर आहेसे वाटू लागेल. वादविवाद केला असतांना व कोटिक्रमाचे कैचीत आपण होऊन उतरलों असतांना एकादी अप्रिय गोष्ट कबूल करण्याची आपत्ति उत्पन्न होण्यासारखी आहे असे दिसत असले तर वादाला तोंडच लागूं नये म्हणून तिचें अस्तित्वच मुळीं नाकबूल करणे हा मोठा हटकून लागू पडणारा डाव असतो; आणि चमत्कार हा की, अगदीं अडाणी माणसाला सुद्धां हा डाव करण्याचे स्थळ कोणतें हें तर्काचे विळखे माहीत नसतांना सुद्धां कळतें म्हणून अशाच्या सोयीसाठीं ही खटपट पाहिजे, नाही तर "फिर्यादीचा हांडा आम्ही आणलाच नाहीं" हा वकीलसाहेबांचा कोटिक्रम निरुत्तर समजला जावयाचा! सामाजिक बहिष्कार या लोकांना नाही म्हणावें तर ते आमच्या आजूबाजूला कोठे दिसत नाहीत हें कसें? सभागृहांत इतर अप्रबुद्ध श्रोत्यांबरोबर हे कसे ऐकत बसत नाहीत? नदीच्या पाणवठ्यावंर व विहिरीबावडीवर शेजारधर्मात घेतलेला मुसलमान दिसतो, मग हा अस्पृश्य दिसत नाहीं हे कसे? मंडईमध्ये संत्रींनारिंगें विकावयास लांकडी सिंहासनावर अधिष्ठित झालेला अस्पृश्य अगदींच कसा दिसत नाहीं? शाळेतल्या क्रमिक पुस्तकांत जणुं काय जातीजातींचे वाङमयी संमेलन करण्यासाठी 'यमुनामैना' च्या जोडीला 'फतिमामरिअम' चे धडे बिलगून लिहिलेले दिसतात, त्यांत जाधवाचा दलपतहि असतो, मग महाराचा मुलगा दिसत नाहीं हें कसे? दक्षिणमहाराष्ट्रांतील एका प्रसिद्ध देवळाच्या सभामंडपाशेजारच्या हौदावर आपला मुसलमानबंधुसुद्धां चुळा भरतांना दिसतो; पण महार दहा हातांवर उभा राहतो हें कशाचे लक्षण? धेड मामलेदार कोणीं ऐकला आहे? महार सावकाराकडे कर्ज काढावयास कोणी गेला आहे? त्यांची प्रत्यक्ष अद्वैतविचारांनीं मिष्ट झालेली गीतें द्वैत विसरून कोणी ऐकली आहेत? आणि इतकी आहे तरी 'अस्पृश्यता आहे कोठे?' असें नकारात्मक उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यांत येतें तें येतेच.
 असे प्रश्न विचारले की, अहो ! याला कारणे आहेत, असा जबाब लगोलग यावयाचा पण त्यावर प्रत्युत्तर इतकेच की, त्या कारणांनाही उत्तरें करतां येण्यासारखी आहेत, पण प्रस्तुत प्रश्न जो आहे तो हा की, अस्पृश्यता अगर बहिष्कार आहे की नाही? आणि तो आहे असे वरील प्रश्नांनी सिद्ध होते. दुसरे असे की, 'बहिष्कार नाही' असें तुम्ही म्हणून काय होणार? महार काय म्हणतो? त्याची जबानी तुमच्या विधानाच्या विरुद्ध आहे. तो म्हणतो की, सिनेमाच्या पडद्यावर उठविलेली मनुष्याच्या विविध चारित्र्याची चित्रे जशी अंधारांत बसून माणसे पाहतात तसे आम्ही दूर उभे राहून तुम्ही लोक काय वांकुल्या करीत असाल त्या अज्ञानाने पहातों यापेक्षां तुमचा आमचा विशेष संबंध काय? या बाबतीत त्यांची जबानी थोडी तरी ध्यानात घेतलीच पाहिजे. एकंदर सामाजिक जिण्यामध्ये आपला हिस्सा किती आहे हे ज्याच्या वाटणीला तो हिस्सा पडलेला असतो त्याच्याइतके चांगले दुसऱ्या कोणाला कळणार? साहेब म्हणतो, मी तुला स्वराज्याचा मलिदा कितीतरी चारीत आहे. पण भुकेने व्याकुळ झालेला देशभक्त म्हणतो, या तुझ्या 'कितीतरी' मलिद्याने माझें दाढवणहि माखत नाहीं ! तेव्हां स्वराज्याचे हक्क किती मिळाले हे जसे हिंदी देशभक्ताला विचारून ठरवावें हे युक्त, तसेच हिंदू समाजाच्या संसारांत आपला भाग काय हे महाराला विचारून ठरवावें; म्हणजे चुकीचा संभव कमी. 'मी बहिष्कृत आहे' असे जर महार म्हणत असेल तर त्याच्या बोलण्यांत सत्यांश आहे हे गृहीत धरावयास हरकत नाही. शिवाय या लोकांना बहिष्कार नाही असे म्हणणारांना एक वेंचक प्रश्न करतां येण्यासारखा आहे. आपल्या लोकप्रिय पुढाऱ्यांवर कशी एक वेडगळ आपत्ति हे लोक आणतात पाहा! अस्पृश्यता जर नसेल तर 'अस्पृश्यता काढलीच पाहिजे' असें जें कै.लोकमान्यांनी हडसूनखडसून सांगितले होते व महात्मा गांधी त्रागा करूनसुद्धा सांगतात याचा अर्थ काय? जें अस्तित्वातच नाही ते काढावयास सांगणे हा शुद्ध वेडगळपणा आहे! आणि असला वेडगळपणा अशा थोर पुरुषांच्या पदरी बांधण्याचे धाडस आपण कां करावे? सांगावयाचे तात्पर्य इतकेच की, प्रश्न डावलण्यांत मौज नाही. 'हुं' म्हटल्यानं जशी आंगठी निघत नाही तसें 'नाही' म्हटल्याने असलेला प्रश्न नसलेला होत नाही. खरा देशाभिमान व शूरपणा एकाद्या प्रश्नाकडे अचल टक लावून पाहण्यांत व त्याचे उंचसखल भाग लक्षांत भरले म्हणजे तो निकालांत काढण्यासाठी झटत राहण्यांत आहे हे एकमेकांना सांगण्याची काय जरूर आहे? असो. तर या प्रश्नाच्या सोडवणुकीस लागावे इतकेंच सांगावयाचा मतलब आहे.
 पण सदर प्रश्नाला प्रवृत्तीने व संस्कृतीने जे लोक विन्मुख असतात ते युक्तिवाद पटला तरी झटण्याची भाषा सुरू झाली की, पुनः मान मुरगळून उरफाटे होणार ते होणारच व आपली मूळची नापसंति व्यक्त करणार. कांहीं खटपट करावी असे म्हटले की "होतेच आहे, चाललेच आहे, हलके हलके काळानुरूप होतेंच आहे" असे पुढील उत्तर आहे ! हे उत्तर मात्र निराशा उत्पन्न करते. काळ इष्ट तो फरक घडवून आणील हे तर खरेच कारण तुम्ही गप्प बसलात तरी दुसऱ्यांच्या अंगांत संचरून जरूर ती घटना तो करील आणि कालाला म्हणजे खटपट करणाऱ्या नैतिक मगदुराला जशी साधेल तशी ती होईल. तुम्हांला पाहिजे तशी होणार नाही. एवढ्यासाठी त्या प्रश्नांत आपलेपणाचा ओलावा उत्पन्न करून घेतला पाहिजे. सबंध हिंदू समाजाचे भवितव्य लक्षात घेऊन जबाबदारीने खटपट केली पाहिजे; नाही तर त्याच्या म्हणजे, परंपरेनें हिंदी राष्ट्राच्या, चिरफळ्या करण्यांत ज्यांचे हित आहे ते स्वतःच्या वैभवाची जपणूक करण्यांत कर्मशूर असल्यामुळे काल त्यांना वश होऊन जिवंत ठेवील व आम्हांला प्रतिकूल होऊनच ठार मारील!
 दुसऱ्याही एका बारीक मुद्याचा जातां जातां विचार करणे जरूर आहे. या अस्पृश्यतेचे स्वरूप आणि तिचे परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. निरनिराळ्या शिवता-शिवतींची भेसळ होऊ देतां उपयोगी नाही. अस्पृश्येतर लोकांचे परस्पर संबंध पाहतां त्यांच्यांतहि मंद मंद छटा टाकणारी अस्पृश्यता असते असें दिसेल. हे लोक एकमेकांना शिवतात, पण त्यांचे घरगुती आणि वैयक्तिक व्यवहार प्राप्त झाले म्हणजे एकमेकांपासून दूर सरतात. आहाराच्या तीव्र भेदामुळे ही बारीक आणि पातळ स्वरूपाची अस्पृश्यता सर्व म्हणजे अस्पृश्येतर लोकांत आढळून येते. आहारविहाराची शुचिता जो जों जास्त तों तो इतरांपासून अलग राहण्याची प्रवृत्ति जास्त. पण या असल्या अस्पृश्यतेची महाराच्या देहाला चिकटलेल्या अस्पृश्यतेशी गल्लत करता कामा नये. ही अस्पृश्यता ऐहिक वैभवसंपादनाच्या आड येत नाही. मी या ठिकाणी कर्माच्या वांटणीसंबंधाने बोलत नसून फक्त 'विटाळा' संबंधाने बोलत आहे हे ध्यानात ठेवावे. तिच्यामुळे कोणाच्या सार्वजनिक चारित्र्याला आळा बसला आहे असे नाही. प्रस्तुत ठिकाणी मात्र माणसांत येण्याचीच चोरी म्हणजे बंदी असा अस्पृश्यतेचा परिणाम झाला आहे. तर अशा या रूढीचा ऱ्हास होणे जरूर आहे. आतां वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे या रूढीचा उच्छेद करणे कां जरूर आहे याचा विचार करावयास लागू.
 राजकारण हा आपणा सर्वांचा आवडता विषय आहे म्हणून त्याचाच थोडासा विचार प्रथम करावा हे योग्य होईल. पहिली अगदी ढळढळीत गोष्ट म्हणजे ही की, आम्ही जोपर्यंत त्यांना स्पर्शयोग्यसुद्धा समजत नाही तोपर्यंत या लोकांत स्वदेशाभिमान उत्पन्न होणे अशक्य आहे. अभिमान कशासाठी बाळगावयाचा? आणि कोणाचा बाळगावयाचा? तुमच्या देशाचा? तुमच्या देशाचा अभिमान म्हणजे काय देशांतल्या दगडमातीचा अभिमान? अभिमान दगडमातीसाठी वाटेल, पण ती तरी अभिमानास्पद असावी लागते! तिच्यावर आपले प्रतापी पुरुष वावरलेले असावे लागतात. तिच्यावर आपल्या संस्कृतीची पैदास झालेली असावी लागते. ही भूमि माझी आहे या आवेशाने लढता लढतां मेलेल्या आपल्या शूरांचे पुतळे मधून मधून तिच्यावर दिसावे लागतात. तिच्यांतील शेतवाडीवर खंडोगणीत गल्ला मालकीचा म्हणून गोळा करतां आला पाहिजे. परमेश्वरी इच्छेच्या प्रतिकूलतेची हद्द पायाला लागेपर्यंत तेथें सुखसंपत्ति व वैभव संपादितां यावे. बापाकडून कांहीं वारसा हटकून मिळणार या कल्पनेने तेथे पिढ्या अनुस्यूत होत असाव्यात. पुत्रपौत्रांना आपली कमाई खास जाऊन पोचणार या भावनेने तेथे प्रयत्नवाद बळास लागलेला असावा. त्या ठिकाणी आपल्या कर्तबगारीमुळे घरीदारी समाधानवृत्ति नांदल्याने स्त्रियांचा आपल्या ठिकाणचा प्रेमभाव द्विगुणित होत असावा. तेथें जीव कदरल्यामुळे नव्हे तर इहलोकच्या उपभोगानंतर भूतकाळांत पोहरा टाकण्याची आणि भविष्यकाळांत पतंग उडविण्याची बुद्धि होत असावी. अशी जर दगडमातीची भूमि असेल तर तिचा अभिमान. तुमच्या समाजाचा तरी महाराला कसला अभिमान? त्याने तुमच्यासाठी कां झटावे व मरावें? असे कोणते लागतेपण त्याच्याशी तुम्हीं राखले आहे की, तुम्हांला दंश झाला तर त्याला घेरी यावी आणि तुमच्या अवमानाबद्दल त्याला संताप चढावा? इतकेहि असून आज जर विचारावयास गेलांत तर मी तुमचाच आहे असे म्हणावयास तो लाजणार नाही! ही त्याची थोरवी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की, तो अशरण आहे आणि निराश्रित आहे लाथाडलांत तरी 'माईसाहेब मी तुमचाच' असें तो म्हणणार.
 ही स्थिति त्याच्या समाजाच्या दृष्टीने तर आहेच. पण एकंदर आपल्या भवितव्यतेच्या दृष्टीनेंहि मनांत उतरवून घेण्यासारखी आहे. आपण राजकारणाविषयी बोलत आहों. ज्या देशांतील पांचसहा कोटि प्रजांना स्वदेशाभिमानाची अवश्य कारणे चांचपूनसुद्धा सांपडत नाहीत, त्या देशाला आपल्या राजकारणाची चांगलीच खबरदारी घ्यावयास पाहिजे. उद्यां जर दुसरीकडे कोठे मोठी वसाहत करावयास मुबलक जागा मिळाली आणि सर्व सुखसोयी आहेत असे कळलें तर सहस्त्रावधि अस्पृश्य देशांतर करतील आणि 'करणार नाही' असे जर कोणी म्हटले तर ते अशक्य म्हणून, बाकीचे स्वकीय येथे राहणार आणि वर सांगितलेली बाब अशक्य आहे म्हणून. उगाच खरी गोष्ट चोरण्यांत काय मतलब ? पण तो येथलाच आहे, तुम्ही यावयाच्या आधींचा आहे, येथे राहण्याचा त्याचा हक्क आहे, ही त्याची जन्मभूमि आहे; मात्र त्याच्या घरीच कहर झाला आहे, हा कहर बंद करावा. हिंदुस्थानावर प्रेम करावयास सबळ कारणे त्याला दिली पाहिजेत तर तो परकी सत्तेला आपल्यासारखा विन्मुख होईल. राजकारणाच्या यशाला आपल्यांतल्या फुटीर दर्जा चांगल्या भरल्या पाहिजेत. भेदनीतीने राज्य करणे इतरांसारखेंच अथवा इतरांपेक्षा आपल्या आंग्रेज बहादरांना चांगले साधले आहे. चिलखताचा सांधा दिसे न दिसेसा असला तरी त्यावर अचूक तीर मारण्यास जो चुकत नाही तो उघड उघड भगदडावर न मारील तर मूर्ख! भेदनीतीच्या खेळाला आरंभ झालेलाच आहे. त्याच्या पदरी लोभवून टाकणारी आमिषे फार आहेत. ज्याला पूर्वीचा काही चिकटा असेल तो सहसा फसणार नाही. पण नसेल तर केवळ तद्रूपता पावेल. अजून जातिजातींची, हिंदूमुसलमानांची, भिन्न भिन्न प्रांतांतील लढवय्या लोकांची, हिमालयाच्या पहाडापलीकडील धटिंगणांची व आमची भांडणें पिकविण्याचे किती तरी हुकूम शिल्लक आहेत पण सगळ्यात जोराचा हुकूम झणजे अस्पृश्यता! त्याच्यांतून कारकूनही सांपडतील आणि शिपाईहि सांपडतील. या गोष्टी हटकून यशस्वी होतील असे मुळीच ह्मणावयाचे नाही. पण आजचे मरण उद्यांवर ढकलण्यास आणि येथील केवळ एतद्देशीय राजकारण क्षेत्रांत धुल्ला माजविण्यास ही पुरेशी सोय आहे. एखादी प्रचंड सभा पांचपन्नास माणसांना गिल्ला माजवून सहज उधळून देतां येते आणि हाता तोंडाला आलेले यश आपल्यांतील विचक्यामुळे पदरी पडेनासे होते हे ध्यानात पाहिजे. शिवाय दुसरी एक जाचणूक उत्पन्न होण्याचा संभव आहे. राजकीय हक्काची ढकलाढकली होऊ लागली आणि तीहि अस्पृश्यांच्या 'फटकूनच राहीन' या ह्मणण्याच्या बळावर; तर आपले मुसलमानबंधूहि असें ह्मणूं लागण्याचा संभव आहे की, ही तुमची भांडणे आतां आवरती घ्या, तर ती शिकवण इतरांकडून येण्याच्या आधीच आपलें घर आपण साफसूफ केलेले बरे. पण हे सगळे अगदी आजच्या संबंधाने झाले. ही भूमिका फारशी उंच नाही. वर सांगितलेली देशप्रेमाची गोष्ट मात्र अगदी भिन्न आहे. हिंदुस्थान स्वतंत्र व्हावयास पाहिजे म्हणून हा प्रश्न निकालांत निघणे जितकें जरूर आहे त्याहीपेक्षां तो स्वतंत्र झाल्यावर तसाच राहावा यासाठी जास्त जरूर आहे. महारापोरापर्यंत स्वदेशाभिमान सकारण पोंचला म्हणजे कसल्याही शत्रूला भिण्याची आम्हांला जरूरी नाही. पण स्वदेशांतच मानमरातबाने राहावयास सांपडल्यामुळे जरी देशप्रेम वाढू लागले तरी एकंदर समाजाशी एकदिल होणे अवश्य आहे. आणि हा एकदिल वरील समाजाने औदार्य दाखविल्याशिवाय व अर्थात् अस्पृश्यांनी आपल्या सुधारणा झटाझट करण्याची तत्परता दाख विल्याशिवाय होणार नाही. पण सुशिक्षित म्हणून, ज्ञानी म्हणून, कर्तबगार म्हणून आणि जबाबदार म्हणून वरील समाजाकडे जास्त काम येणार हे उघड आहे.
 अस्पृश्यतेचा सामाजिकदृष्टया विचार बहुजनसमाजाला अत्यंत अप्रिय वाटण्यासारखा आहे यात शंका नाही. राजकारणाच्या मैदानांतच आधुनिक थोर पुरुष वावरत असल्यामुळे आणि राजकारणाच्या वेदना प्रत्यही दरघरी पोचत असल्यामुळे तोच विषय सर्वतोमुखीं असावा आणि सामान्य जनसमाजालासुद्धां प्रिय वाटावा हे बरोबर आहे. इतकेच काय, पण त्याच राजकारणाच्या दृष्टीने केलेला अस्पृश्यतेचा विचार समाजाला थोडा तरी पटण्याचा संभव आहे. त्यांत एका अप्रिय त्रयस्थाशी झुंज असल्यामुळे ईर्षेचा भर वाटेल ती गोष्ट समाविष्ट करून घेतो. कोणत्याहि संकटाच्या प्रसंगी विषमभाव बाजूस ठेवावेसे वाटतात, कारण कार्यसिद्धीची निकड लागलेली असते. पण जी गोष्ट लगबग व्हावी म्हणून केली जाते ती पायाशुद्ध आणि हेतुपुरस्सर केली जाते असे वाटत नाही. विषमता घालवावयासाठी मूलतः केलेला विचार तो नसतो. काही काळपर्यंत म्हणजे कार्यसिद्धि होईपर्यंतच तो टिकून राहील अशी शंका येते. लढाईच्या वेळी ढोलगें गळ्यांत अडकवून 'दादासाहेब, काकासाहेब, तुम्ही-आम्ही एक' असें जें इंग्रज डोंबारी ओरडत होता ते त्याचे ओरडणे म्हणजे शुद्ध बाता होत्या हे युद्धानंतर विषमतेचा वेताळ पूर्वस्थळाला आला यावरून उघड दिसते. संकटें नाहींशी झाल्यावर, मारलेला अगर गति दिलेला नव्हे तर कुपीत घालून गाडलेला, झुटिंग पुनः वर मान करून चारहि खंडांत नाचूं लागला आहे, याचे कारण अगदी उघडे आहे. विषमता काढावयास इंग्रज प्रवृत्त झाला नव्हताच. आग लागलेल्या घरावर पाणी ओतावयास 'बाहेर' च्या मांगाला त्याने जवळ केले होते इतकेंच. प्रस्तुत प्रकरणीहि असेंच होण्याची भीति आहे. राजकारणातील तेढ लक्षात घेऊन अस्पृश्यतेसंबंधी अनुकूलता दाखविणे हे समयज्ञतेचे लक्षण असेल; पण त्यांत खोलपणा जरा कमी आहे असेच म्हणावे लागेल. ही बाब जातितः सामाजिक आहे, म्हणून सामाजिक दृष्ट्या विचार करून जे या प्रश्नासंबंधाने अनुकूल मत प्रदर्शित करतात त्यांची बुद्धि या विषयाच्या बुडाशी पोंचली असें ह्मणतां येईल. पण सामाजिक दृष्टीने याचा न्याय कबूल करून पत्करावयाचा म्हणजे आजपर्यंत मनाला चिकटून राहिलेल्या व म्हणूनच प्रिय वाटणाऱ्या समजुती व कल्पना सोडण्याचा प्रसंग प्राप्त होतो. अर्थात् ही गोष्ट जरा कठीणच आहे. म्हणून वर म्हटले आहे की, अस्पृश्यतेचा सामाजिक दृष्टीने केलेला विचार अत्यंत अप्रिय वाटण्यासारखा आहे.
 असो. अस्पृश्यतेची न्याय्यता ठरवितांना अगदी पहिली कल्पना जी सांगण्यांत येते ती ही की, अस्पृश्य लोकांची पूर्वपरंपरा कुलोत्पन्नतेच्या बाबींत असावी तितकी शुद्ध नाही. उच्च जातीत निघालेल्या कांहीं कुलटा स्त्रियांपासून प्रतिलोमपद्धतीने झालेली ही प्रजा आहे. केवळ धर्मग्रंथावर जे भूतकालीन माहितीसाठी अवलंबून राहतात त्यांचे असे मत असेल; पण इतिहासावर जे अधिक विश्वसतात त्यांची साक्ष अशी नाही. त्रैवर्णिक आर्यांनी आपल्या तेजाने दिपविलेली व मग दास्यकर्मात कायमची डांबलेली ही प्रजा आहे इतकाच त्यांचा अभिप्राय आहे. धर्मग्रंथांतील प्रतिलोम-उत्पांदनाच्या आरोपाविषयी फार झाले तर इतकेंच म्हणता येईल की, असली उरफाटी प्रजा ह्या दास्यकांत बांधलेल्या लोकांच्यासारखीच नीच समजली जात असे. पण वास्तविक पाहतां अस्पृश्यतेसंबंधानेच जेथे वाद चालू असेल तेथे हा कुलोत्पन्नतेचा प्रश्नच उद्भवू नये. अस्पृश्यांशी शरीरसंबंध घडवून आणावे की नाही असले प्रश्न ज्यांना उकरून काढून धोपटीत बसावयाचे असतील त्यांनी आणि त्यांच्याशी वरील उत्पत्तिवाद खुशाल करावा. आमचा मुख्य विषय अस्पृश्यता हा आहे. तेव्हां या लोकांना अस्पृश्यतेतून काढावें असें म्हणतांच जे कोणी हा उत्पत्तीचा सवाल पुढे टाकतात त्यांना इतकेंच सांगावयाचें की, हे बोलणे अप्रस्तुत आहे. आम्ही जर रक्तमिश्रणासंबंधाने चर्चा सुरू केली असती तर तुमच्या म्हणण्याचा विचार करतां आला असता.
 याच्या पुढला मुद्दा असा आहे की, हे लोक घाणेरडे धंदे करतात, गुरे फाडतात, तेव्हां त्यांना स्पर्श कसा करावा? आतां मोऱ्या, नाले उपसणे, गुरे फाडणे इत्यादि धंदे हे लोक करतात हे इतकें खरे आहे की तें नाकबूल करतांच येत नाही. पण येथे प्रत्युत्तरादाखल इतकेच विचारावयाचे की, त्यांना काय याच गोष्टी करावयाची हौस आहे? का दुसरें कांही त्यांना करता येण्यासारखें नाहीं? पण तुम्ही चार माणसांत येऊ द्याल तर की नाही? तुम्हा त्रैवर्णिकांना हे धंदे व्हावयास तर पाहिजे असतात, पण स्वतः करण्यांत मानहानि वाटते आणि हे महारामांगाचें भरताड तुम्हांला आयतेंच सामाजिक वेठीला सांपडले म्हणून ते हे धंदे करतात. त्यांना या धंद्याच्या बाहेर फिरकू देतो कोण? आधीं नाके कापावीत, जोडावयाचा यत्न केला तर जोडू देऊ नयेत आणि मग 'तुम्ही नकटे' म्हणून हिणवावे, ही नीति मतलबी थोरांना शोभते खरी! आधी शस्त्रे काढून घ्यावीत, कोणी परजू लागला तर त्याचा हात कलम करावा आणि मग "तुम्ही दुबळे स्वसंरक्षण काय माती करणार" असे म्हणत राहावे, हा दुसरीकडे राज्ये करावयास सोकावलेल्या लोकांचा धडा, अस्पृश्य लोकांच्या बाबतीत त्रैवर्णिक चांगलाच गिरवीत असतात! येथे अशी एक शास्त्रीय कोटी करण्यात येते की, "प्रत्येक समाजांत असली कामें करावयास कांहीं माणसें पाहिजेत व ती प्रत्येक समाजांत आहेतहि; मग येथील माणसांनीच एवढा बोभाटा का करावा?" यावर उत्तर अगदी सोपे आणि सरळ आहे. इतर समाजांत ही नीच कामाची वेठ अमुक एका सबंध जातीच्या माथीं मारलेली नाही. असली कामें करण्याइतपतच बुद्धि व अभिरुचि ज्यांच्या पदरी असेल तेच लोक त्या समाजांत ही कामें करतात व हा धंदा सोडून आपलें दैव काढण्याचा अन्यत्र प्रयत्न करू लागले तर फारशी अडचण त्यांना येत नाही. आपल्या येथे मात्र त्या लोकांना, कदाचित् त्यांच्यापैकी काहींना तरी निदान अधिक चांगले धंदे करता येण्यासारखे असूनसुद्धा याच गोष्टी करण्यावांचून गत्यंतर नसते.
 बोलणे येथेंहि अडले म्हणजे या प्रश्नाला विन्मुख असलेले लोक परत फिरून एका मोठ्या जबरदस्त किल्ल्याच्या आश्रयाला जातात व तेथून वादाला सुरुवात होते. ते म्हणतात, "महारमांग लोक जे हे धंदे करतात ते काय आम्ही म्हणतो म्हणून करतात? ते त्यांना "सांगितलेले" आहेत. ज्याला त्याला त्यांची कामें लावून दिलेली आहेत; त्याला आम्ही काय करावे? जो ज्या जातीत जन्माला आला असेल त्या जातीचे कर्म त्याने करीत राहावे हा आम्हां हिंदूंचा धर्मच आहे. त्या जातीत तो जन्माला का आला हे त्याने आपल्या पूर्वसंचिताला विचारावें, लोकांवर चरफडून काय होणार?" या थोड्याशा वाक्यांत आमच्या पूर्वकालीन समाजविषयक कल्पना, तत्त्वज्ञानविषयक अनुमाने, समाजशासनपद्धति इत्यादि बाबी स्पष्ट प्रतिबिंबित झालेल्या आहेत. एखाद्या ऐदी अजागळाच्या तोंडून जरी हे शब्द निघाले तरी सुद्धा ते विचारांत घेण्यासारखे आहेत; मग जबाबदार शास्त्रांनी त्यांचा जथे उच्चार केला आहे तेथे त्याची हेटाळणी करून चालावयाचे नाही. आपणच कोणी शेकोजी समाजविषयक विचार करावयास निघालो आहोत, आतांपर्यंत भक्कम कल्पनांवर उभारलेलें असें व्यवस्थित रूप समाजाला देण्याचा यत्नच झाला नाही, अशा अभिनिवेशाने या प्रश्नासंबंधाने कोणीहि लिहूं नये. वरील अवतरणचिन्हांकित वाक्यांत दोन ठळक गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत; आमची वर्णाश्रमधर्मप्रधान समाजव्यवस्था व पूर्वसंचितानुरुप प्राप्त होणारा पुनर्जन्म हे तत्वज्ञान. ज्या अनेक गोष्टींच्या बळावर हिंदूसमाज सहस्रावधि वर्षे उभा जाहे त्यांपैकी या दोन अत्यंत महत्वाच्या होत आणि याच कारणामुळे अजुनसुद्धां ज्याच्या मनावर थोडा तरी धार्मिक वाङमयाचा संस्कार झाला असेल अगर संस्कारयुक्त गृहस्थितीत ज्याची वाढ झाली असेल अशा प्रत्येक हिंदु मनुष्याचे मन या पूर्वकालीन समाजव्यवस्थेच्या- पडापड झालेल्या का होईना- पण भव्य इमारतीकडे मधून मधून गेल्याशिवाय कधीहि राहणार नाही. पृथ्वीवरील कोणतीहि समाजव्यवस्था अनंत कालपर्यत हटकून टिकून राहील असे मानणे म्हणजे मनुष्याला त्रिकालज्ञ बनविणे होय. तो त्रिकालज्ञ तर नाहीच नाही. पण भूतकालीन अनुभव आणि सद्यःकालीन गरजा यांचा मिलाफ घालून मात्र तो आपल्या समाजाची व्यवस्था करीत राहणार. पृथ्वीच्या पाठीवरील अनेक मानववंश इतिहासांत आपली नुसती नांवेंच ठेवून कालवश झालेले आम्हांस दिसतात. ते ज्या देशांत वस्ती करून असत त्या देशांत सध्यांहि त्यांच्याच नांवाचे समाज नांदत आहेत. पण हे आतांचे समाज त्या जुन्या समाजांच्या हाडामांसाचे आहेत अगर निदान त्यांनी निर्मिलेल्या संस्कृतीचे औरस वारसदार आहेत असे म्हणतां यावयाचे नाही. त्या त्या ठिकाणच्या वर्तमानकालीन समाजांना प्राचीनांची नांवें जर चालू ठेविलीच असली तर त्यांत केवळ भौगोलिक यथार्थता आहे इतकेंच समजावयाचे, पण आमच्या येथे अशी गोष्ट नाही. रक्तधारा आणि संस्कृतीचा झरा ही दोनहि जवळ जवळ निर्भेळपणे सारखी चालू आहेत. सहस्रावधि वर्षांच्या तावडी तून आपल्याला सोडवून घेऊन ज्या समाजव्यवस्था व जी तत्वज्ञानें, केवळ ग्रंथालयांत नव्हे तर समाजाच्या घरींदारी, व्यवहारांत आणि मनःप्रकृतीत कायमची रुजलेली दिसतात, त्यांच्या अंगांत कांही जातिवंत स्थैर्य आहे असे मानावयास काही हरकत नाही. टिकलेल्या हिंदूसमाजाला एवढे टिकाऊ रुप देणारे काही बंधन, नियम व तत्त्वज्ञान खास होतेच होते. पण ह्या पूर्वकालीन आधारभूत गोष्टींच्या गौरवांत मन सारखे राहू दिले तर वर्तमानकालीन जगाकडे अगदी दुर्लक्ष केल्यासारखे होते आणि म्हणून आपल्या समाजाच्या हिताची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकानें, परंपरागत गोष्टींबद्दल आदर बाळगूनसुद्धां, नवीन विचार केला तर त्यांत काय बरे वावगे होईल?
 ज्याने त्याने आपापली कर्तव्ये करावीत हे वाक्य मोठे कर्णमधुर आहे, पण त्याची अंमलबजावणी स्वतःच्या चारित्र्यांत करितांना त्यांतील मधुरता नाहीशी होते. मी हेच कर्म का करावे असें महाराने विचारले तर गीतादि ग्रंथांतील वाक्ये उद्धृत करून त्याच्या धर्मबुद्धीला आव्हान करावे आणि आपला उपदेश त्याला पटवावा अशी नीति लोक आचरतात. पण हे पांडित्य फक्त परोपदेशांतच नांदतें, ह्या गोष्टीची आठवण एकमेकांना देणे कदाचित् गैरसोयीचे असेल, पण जरूर मात्र आहे. "भगवंतांनी लावून दिलेले" ब्राह्मणाचे कर्म कोणते ब्राह्मण आचरीत आहेत? अध्ययनअध्यापनादि कर्मे जशा प्रकारें ब्राह्मण लोक सध्या करतात त्याच प्रकाराने करणे जर धर्मसंमत असेल तर धर्माला कांहींच उच्च ध्येय नाही असा त्याचा अर्थ होईल. पोट भरावे म्हणून जशा प्रकारचे ज्ञान अमुक एक प्रकारे सांगावे असे वरून सांगण्यात येईल त्याच प्रकारचे ज्ञान ब्राह्मण शिक्षक देत असतो हे एक; शिवाय कोणी लोखंडाचे दुकान घालून बोहरी होतो; कोणी शिंपी लोकांना बाजारपेठेत जागा महाग करतो, कोणी खेडेगांवांत राहून आपली वृत्ति विसरून गहाणे डुलवावयास शिकतो, आणि कदाचित् कोणी कोणी एकीकडे ब्राह्मण्याचा जळजळीत अभिमान बाळगून सुद्धा, सुधारकांना निंदून सुद्धां, उत्तम कांचेच्या कपाटांत "श्रीक्षेत्र वाईहून" आणलेले सुंदर लाल जोडे ठेवून विकावयास उभा राहतो. ज्या सेवाधर्माला म्हणजे नोकरीला धर्मग्रंथांत श्वानवृत्ति असें नांव दिले आहे तीवरच केवळ ब्राह्मणसमाज तगून आहे. हे ब्राह्मणांविषयी झाले पण जसे ब्राह्मण तसेच क्षत्रिय ही वर्णाश्रमधर्माचे मोठे अभिमानी असतात. त्यांनाहि असे विचारणे जरूर आहे की, आपल्या क्षत्रियत्वाचे काय झाले? सध्या आपल्या तरवारी कोठे आहेत. गेल्या दिवाळीत प्रस्तुत लेखक नगर जिल्ह्यांत फिरत असतां एका मराठा गृहस्थाने 'कुटेल आमारावर मराठ्यांचे लढणे' हे त्यांच्या क्षत्रियत्वांचे निदर्शक म्हणून सांगितलें! खरोखर हे उत्तर अत्यंत विषाद उत्पन्न करते. कोण, कोणासाठी, कोठे लढतो ह्या त्रिकोणाच्या पोटांत वरील विषादवृत्तीची मीमांसा सांठविलेली आहे, हे सुज्ञ वाचकांस सांगावयास नको. शिवाय आपलें जन्मजात कर्तव्य म्हणूनच जर क्षत्रिय द्वीपांतरी गेले असते तर रंगरूटें पकडण्यासाठी जुने बाजार का धुंडावे लागते? आणि मुंडण करून गोसाव्यांची रंगरूटें कां करावी लागली असती? वैश्यांचहि असेंच आहे. खाली गळलेल्या बुंदीच्या कळ्या खा-खाऊन पुष्ट झालेल्या वाढप्यापेक्षा वैश्यांची जास्त मातब्बरी नाही. वरील मजकूर कोणाला खिजविण्यासाठी लिहिला नाही. आपद्ग्रस्ताला खिजविण्यांत कोणते शौर्य? पण वस्तुस्थितीच्या यथादर्शनासाठी लिहिलेला आहे. परोपदेशाला प्रवृत्त होण्याच्या आधी आत्मशोधन थोडेसें करावें हे व्यवहारदृष्टया योग्य होईल, म्हणून तुझें काम तूं कर असें महाराला प्रतिपादण्यांत कांहींच गौरव नाही. जसे आपण बाकीचे लोक आपला संसार सुखाचा करण्यासाठी प्रसंग पडेल त्याप्रमाणे आचार करतो त्याप्रमाणेच त्याचाहि संसार सुखाचा व्हावा म्हणून, जी काही थोडी भाकरी आपल्या या हतभाग्य देशांत शिल्लक राहिली आहे तिचा हिस्सा त्याला त्याच्या योग्यतेनुरूप मिळू द्यावा हे देशबंधुत्वाच्या म्हणजे सहोदरत्वाच्या नात्याला योग्य होईल. भांडण हे आहे की, देशांतला उरलासुरला मलिदा तुम्ही त्रैवर्णिक खाता आणि अस्पृश्याला एकजात बहिष्कारामुळे संसारांत जिगजीग उत्पन्न होते. येथेंच जाता जाता हेहि सांगितले पाहिजे की, आपण त्रैवर्णिक सोयीसाठी कोणतेहि भिन्न भिन्न धंदे आचरित असलो तरी आपल्याला जन्माने मिळालेली जात गेली असे आपण मानीत नाहीं म्हणून धंद्यांत सरमिसळ झाल्याने मागोमाग जातींचाही संकर होईल असें भय जातीस जपणाऱ्या माणसांनी मुळीच बाळगू नये.
 यापुढे पुनर्जन्माविषयींहि थोडेसें अवश्य लिहिले पाहिजे. मी अस्पृश्य कां, असें महाराने विचारले तर पूर्वसुकृतानुरूप तुला ही योनि मिळाली आहे असा जबाब देण्यात येतो. आता हे पूर्वजन्मींच्या कृतीचे तत्व खरोखर अत्यंत उदात्त आहे. परंतु त्याचा उपयोग केवळ ज्या ठिकाणी व्हावयास पाहिजे त्यापेक्षा जास्त ठिकाणी केला जातो. एकाद्याने प्रयत्न केले, अंगच्या सर्व शक्ति वाढीस लाविल्या आणि त्यांच्या बळावर तो काही साध्य करूं लागला असतां जर त्याला अपयश आले, किंवा कोणी लुलाच जन्मला, घर पडून मेला, किंवा स्वतःचा कोणताहि दोष नसतां जन्मभर दुःखीच राहिला तर त्याच्या समाधानासाठी हे पूर्व-सुकृताच्या फळाचे तत्त्वज्ञान आहे. आपली शिकस्त करूनहि जर सुख पाठमोरेंच राहू लागले तर या तत्त्वज्ञानाशिवाय समाधानाला दुसरी कोणतीहि जागा नाही. परंतु जें केवळ अदृष्टाच्या अर्थशोधासाठी असावे, तें मनुष्यकृत गोष्टींच्या समर्थनार्थ उपयोगांत येऊ लागले आहे. जी गोष्ट करता आली असती किंवा टाळतां आली असती अथवा बदलतां आली असती, आणि तीहि आपल्या अंगच्या बळावर, ती "तुला जन्मानेच प्राप्त झाली आहे म्हणून भोग" असे सांगणे म्हणजे रोग का झाला हे कळत असतांना सुद्धा औषध न घेऊ देण्यासारखे आहे.
 इतर देशांत, अत्यंत गरीब कुळांतील माणसांना सुद्धा, नशीब काढण्यास आपल्याइतके प्रत्यवाय नाहीत. कोठे कोठे तर बिलकुलच नाहीत. ज्या गोष्टी त्यांच्या बुद्धीच्या आणि आवाक्याच्या बाहेरच्या असतील, त्या संबंधानें कोण काय करणार? पण तोपर्यंत तरी माणसांनी आपल्या सोयीसाठी केलेल्या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या नांवावर विकून अस्पृश्याला भोळा करून ठेवू नये. उद्या एकाद्या देशांतल्या लोकांनी आपल्या देशांतील काही बांधवांवर "खाली डोके वर पाय करून चालावे" अशी शिक्षा फर्मावली व असें कां म्हणून विचारतां हे तुझ्या मागील जन्मींच्या कृतीचे फळ आहे असे त्याला सांगण्यांत आले तर त्याने काय ते निमुटपणे सोसावे? तसेंच उद्यां जर इंग्रजांनीहि आम्हांला आमच्या मागील जन्मींच्या पापकृत्यांचीच फलरुप अवस्था आमची सध्याची स्थिति आहे, आणि म्हणून ती आम्ही निमुटपणे भोगली पाहिजे, असे सांगितले तर मग ह्या कर्मभूमीतील कर्मयोगाचे रहस्य ते काय? कर्मशूर व्हा म्हणतां काणि कर्म तर करू देत नाही यामुळे तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांची फारकत होत आहे. जन्म हा दैवायत्त राहील; पण पौरुष मात्र 'मदायत्त' आहे असे प्रत्येकास म्हणतां यावं.
 तसंच पृथ्वीवरील अवघे समाज कोणत्या तऱ्हेनें पुरुषार्थ साधीत आहेत हे पाहिले तर आमच्या देशांतील कोट्यवधि प्रजाजनांच्या अंगांतील शक्ति आणि भावना केवळ मातीच्या मोलाने जात आहेत, असे वाटते. त्यांचे जिणे म्हणजे शेरडीच्या शेपटासारखे झाले आहे. "लाजहि झाकीना आणि मशाहि वारीना!" देशांत वेभव, संपत्ति, सुखें, कलाकौशल्य आणि विद्याभिवृद्धि ही प्राप्त होण्यास देशांत असलेली कोट्यवधि माणसें वाऱ्यावर सोडून कसे चालेल! युद्ध उपास्थित झाले तेव्हां घरच्या मुलांच्याहि फौजा बनवून युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्याकडून देशाची सेवाचाकरी करून घेतली. रशियाने बायकांचीहि पलटणे केली आणि पादाक्रांत केलेल्या रशियाचा बाजार हस्तगत करावा म्हणून जर्मन लोकांनी पुरुष नव्हते म्हणून ३६००० स्त्रियांना ऐन युद्धांत अर्थशास्त्राचे शिक्षण दिले! पण आमच्या येथे पहा माणसे स्वस्त झाली! कोणी अभाळांतून बॉम्ब टाकून त्यांना जिवे मारावे आणि ही दैवाची कर्कशता ज्यांच्या वाटणीला येते त्यांनीच आपले पांच कोटी बांधव स्पर्शयोग्यहि नाहीत असे समजत रहावें!
 वरील सर्व लिहिणे अस्पृश्यांच्या चिरकालिक महत्त्वाच्या तक्रारीसंबंधाने झाले पण महाराष्ट्रांत ठिकठिकाणी हिंडून प्रस्तुत लेखकानें जे काही पाहिले त्यावरून अगदी आजच्या घटकेला अस्पृश्यांच्या काय तक्रारी आहेत, हे अगदी थोड्यांत खाली देतो. कसले का होईनात, पण जे काही जुने धंदे होते ते नवीन मनूत हळूहळू पार नाहीसे झाले आहेत आणि मुंबईसारखी ४।५ शहरें सोडली तर नवीन धंद्यांत कोठेहि शिरकाव होत नाही अशी कुचंबणा चांभारांशिवाय बाकीच्या अस्पृश्यांची होत आहे असें स्थूलमानाने म्हणता येईल. एका संस्थानांत तर "यःकश्चित् पोलीस शिपायाची नोकरी सुद्धा आम्हांला देत नाहीत" अशी तक्रार महारांनी केली. एके गांवीं सडका झाडणाऱ्या महारणीला २॥ रुपयांचा मासिक तनखा देण्यांत येतो असे कळले. दुसऱ्या एके ठिकाणी सबंध दिवस काम करून ५ आण्याची मोळी विकल्यावर घरच्या बाळंतीण बायकोला आणि दोन कच्च्याबच्यांना कसे तोंड दाखवावे ह्या विचाराने लाजलेला महार भेटला. दुसऱ्या एके ठिकाणी सरकारीच पण अगदी अळणी अंमलदारापर्यंतचे अधिकारी सुद्धां लांकडे फोडावयास कांहीं एक मोबदला न देतां बोलावतात आणि नित्यप्रसंग त्यांच्याशीच असल्यामुळे जाणे भाग पडते, अशी तक्रार महारांनी केली. एके गांवीं शेतकरी लोक ठरावांपेक्षा जास्त कामें सांगतात आणि ती केली नाहीत म्हणून बलुतें देत नाहीत अशी तक्रार या लोकांनी केली. कांहीं कांही गांवी पाण्यासाठी ३।३ तास आक्रंदन करावे लागते; आणि वडार बेरडहि ज्या ठिकाणी पाणी भरु शकतात, तेथे आम्हांस पाणी भरू देत नाहीत म्हणून घाणेरडे ओढे खोडे धुंडावे लागतात, अशी तक्रार ऐकू आली. एके ठिकाणी घोड्यावर बसून गांवांत फिरण्यास महारास सामाजिक रीत्या प्रत्यवाय आहे असे कळले. या तक्रारींची याद पुष्कळ मोठी देता येईल. एकंदरीत तक्रारींत अज्ञानजन्य अतिशयोक्तीचा कांहीं थोडा भाग असेल. पण तो वगळून सुद्धां अस्पृश्याला त्याचे जिणें अधिक सुखाचे करण्याला बाकीच्या प्रजेइतकीहि संधि नसल्यामुळे त्यांना हाल सोसावे लागतात, हे खरे आहे. एकाच सार्वजनिक वरवंट्याखाली आपण सगळेच सांपडलो आहोत; परंतु हा एक त्रैवर्णिकांच्या हातचा पोटवरवंटाहि त्याला डोक्यावर फिरवून घ्यावा लागत आहे त्यामुळे तो अत्यंत उद्विग्न होतो. आणि अशा उद्विग्नतेच्या काळी ज्या सुंदर धर्मतरुच्या गार छायाखाली त्याच्या संतप्त जीवात्म्याला विसावा मिळावा, तो धर्म त्याला तूं नीच आहेस असे सांगतो आणि धर्माचा उपदेष्टा गुरु त्याच्या जिवाला समाधानाचे भातुकें पोंचविण्याच्याएवजी सावलीच्याही विटाळाच्या भीतीने दहा कदमांवरून दूर पळतो.
 वास्तविक पहातां धर्म केवढे उपकार करतो पहा. समाजाचे धारण करून आपल्या पोटांतील प्रत्येक माणसाला जितकें जास्त सुख देता येईल तितके देण्याची खटपट करतो; अंगावर आलेल्या अस्मानी संकटांची कारणे त्याला पूर्वसंचितात शोधावयास लावून भविष्यत्काल सद्गुणाच्या जोरावर सुखाचा करता येईल अशी शिकवण तो त्याला देतो; आणि त्याचा जीव दारिद्याद्र्याने ओशाळला किंवा अवमानाने चिडून गेला तर जवळ जाऊन त्याला गोंजारून आणि धीर देऊन नित्य नवीन उगवणारी 'उद्यां' आजच्यापेक्षा खरोखरच जास्त आनंदाची येईल असा विश्वास त्याच्या ठिकाणी उत्पन्न करतो. पण धर्माची ही सगळी कर्तबगारी अस्पृश्यांच्या बाबतींत शून्यच असते. 'समाजव्यवस्था, समाजव्यवस्था' म्हणजे त्रैवर्णिकांच्या सुखसोयींची दक्षता ती राहावी म्हणून ज्या गुणांच्या बळावर इहलोकोंची यात्रा त्याला अधिक सुखाची करतां आली असती त्या गुणांच्या प्रसराला अवसर न देणे हाच धर्म झाला आहे. पूर्वसंचितानेच तूं 'नीच' योनीत जन्माला आला आहेस असे त्याला सांगून धर्म त्याच्या मनोबलाची अर्धीअधिक हत्त्या करतो आणि सद्विचार, सदाचार, ज्ञान इत्यादींच्या सान्निध्यापासून त्याला दूर ठेवतो. अर्थात् तो अनीति, अमंगल विचार, दुष्ट वासना आणि मलिन वाणी अशा कर्दमांत वाढतो. मरणोत्तरकालाविषयी बेफिकीर होऊन इहलोकच्या आचारांत बेफाम बनतो. त्याने धर्म ऐकावा कोठे आणि शिकावा कोठे? ज्या मंदिरांत धर्मावर प्रवचनें चालावयाची, प्राचीन थोर विभूतींच्या सुरस आणि उत्साहवर्धक कथा ऐकावयास सांपडावयाच्या, आणि साधुसंतांच्या प्रेमळ वाणीचा रंग लुटावयास मिळावयाचा, त्या मंदिरापासून त्याला मोठ्या अदबीने आणि भयाने दूर सरावे लागते. आश्रमव्यवस्थेत त्रैवर्णिकांना संस्कारयुक्त जीवित लाभते आणि त्यांच्या पारमार्थिक कल्याणाची काळजी वाहिली जाते. अस्पृश्याला दोनहि गोष्टींना मुकावे लागते. साधुसंतांनी धर्म त्याच्या घरीदारी पोचविला असला तर ती गोष्ट आश्रमव्यवस्थेनें गौरवासाठी आपल्याकडे ओढून घ्यावी. पण तिने ती योजना बुद्धिपुरस्पर केली असे कधीही म्हणता येणार नाही.
 असो; अशा प्रकारे धर्मापासून फलित होणाऱ्या सर्व हितापासून अस्पृश्य कायमचाच दुरावलेला राहिला आहे. अर्थात् कशाप्रकारच्या पूजाअर्चेकडे त्याचे मन वळलें असेल आणि मनुष्याला सहज अशी जी धर्मबुद्धि तिला कसला व्यवसाय त्याने प्राप्त करून दिला असेल हे सहज अनुमानितां येण्यासारखे आहे. त्याचे देव म्हणजे मरीआई, जाखाई, जोखाई, तुकाई, म्हसोबा, बिरोबा फार झाले तर खंडोबा, ढेगू, मेगू अशासारखी अक्राळविक्राळ, भेसूर, शेंदूर माखलेली, कोंबडी मागणारी, शिरा ताणल्याने अंगांत येणारी, वेताळाच्या प्रकृतीची आणि झुटिंगाच्या हट्टाची मंडळी आहेत. यांची पूजा म्हणजे पूज्य वस्तूच्या थोर गुणाबद्दल वाटणाऱ्या आदराचे प्रदर्शन नव्हे, तर भेडसावणाऱ्या सावल्यांना लांच चारण्याचा प्रयत्न आहे. तिने अस्पृश्याच्या जिवाला शांति आणि आनंद लाभत नाहीत तर नाकेदाराला जकात दिल्यासारखे वाटते इतकेंच. संसाराच्या व्यापांतून बाहेर ओढून काढून त्याचे मन आपल्या गोड आणि मऊ वेष्टनात, काही वेळ का होईना, पण अडकवून ठेवील असें उदात्त तत्त्व या पूजेत नाही. थोर विभूतीच्या गुणोत्कर्षाचा, गोलाने चढत जाणाऱ्या पायऱ्यांचा, म्हणजे ध्येय दाखविणारा आणि वाटाड्याचेंहि काम करणारा, सुंदर मनोरा या पूजेत अस्पृश्याला दिसत नाही. आणि सर्वांच्याहि वर, चारापाणी मिळविण्याच्या खटपटीत असतांना आणि भिन्न भिन्न प्रवृत्तींच्या माणसांशी प्रसंग आले असतांना, झोक जाऊन जी पातकें आपल्या हातून घडतात त्यांच्या रुखरुखीने पोखरलेले आणि मरणाच्या दटावणीने घाबरलेलें आपलें मन, 'मामेकं शरणं व्रज म्हणजे मी तुझा त्राता बनेन' या परमेश्वरी आश्वासनाने निर्धास्त होऊन जसें विसावा पावतें, तसा काहीहि प्रकार मरीआईच्या पूजनांत अस्पृश्याला होत नाही. पेंढार येणार म्हणून आवई उठली म्हणजे जसा दाणागोटा गोळा करून त्याच्या तोंडा वर टाकावयाचा, तसा जरीमरीला 'अंड्यांचा गुडघ्याइतका ढीग' वहावयाचा इतकाच त्याचा अर्थ. अशा प्रकारच्या थोरांच्या हयगयींत सांपडल्यामुळे अस्पृश्याच्या मनाची वाढ कधीहि पूर्ण होत नाही. आणि ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन धूर्तानी 'तूं हलकटच, तूं हलकटच' असे वारंवार म्हटल्याने त्याला खरोखरीच असा वहीम येतो की, आपण हलकटच आहो! असल्या मनोदास्यांतून त्याची सुटका जो जो करील तो तो त्या अस्पृश्याचा उपकारकर्ता. या हीन मनस्कतेच्या जोडीला मागील भागांत सांगितलेली धंद्यांची नागवणूक आणून बसवा, म्हणजे महार लोक ख्रिस्ती का होतात याची कारणे एकदम कळतील.
 ख्रिस्ती मिशनरी आपले मठ स्थापीत सुटला म्हणजे सहाजिकच मोठे वैषम्य वाटते. अज्ञानाचा खच जेथे जास्त आणि दुष्काळाची कृपाहि जेथें जाडी, तेथें मिशनऱ्यांच्या कामांचा झपाटा फार. पण भाकरी मिळेनाशी झाली आणि मनाला विशेषसा मागचा ओढा नसला म्हणजे धर्मांतर करण्याकडे प्रवृत्ति व्हावी यांत काय नवल? एक वर्ष पाऊस पडला नाही की अन्नान्नदशा व्हावी या गोष्टींचे श्रेय अर्थात् आपल्या दयाळ् राज्यकर्त्यांकडून हिसकून घेण्याचा कोणाचा अधिकार असणार? पण स्वराज्याचा अभाव हे एक महाकारण प्रत्येक ठिकाणी सांगून सुटका करून घेणे इष्ट नाही आणि आपण सर्वत्र तसें करीतहि नाही. दुष्काळ पडल्याबरोबर आमचे शंकराचार्य जर दुष्काळाच्या प्रांती गेले, घरोघर हिंडले, वर्गण्या, देणग्या, पुड्या, एकत्र करून धर्मरक्षणाला सरसावले तर ख्रिस्ती मिशनऱ्यांचा पाड काय लागला आहे? त्यांचे प्रयत्न कुंठित करण्याला आपले प्रयत्न काय होत आहेत? आपल्या दरिद्रीपणामुळे ज्या प्रमाणावर हे प्रयत्न व्हावयास पाहिजेत त्या प्रमाणावर व्हावयाचे नाहीत हे उघड आहे. पण अल्पस्वल्पावरून सुद्धा आपली जागरूकता व हेतु ही सिद्ध होतील, हे निर्विवाद आहे. संकटाच्या प्रसंगी जर वांचवावयास जावयाचे नाही तर मग केव्हां? संबंध हिंदुस्तानांत प्रतिवर्षी सवा लाख हिंदू ख्रिस्ती होतात असा हिशेब आहे, पण दक्षिणहिंदुस्तानांत ख्रिस्ती करण्याचा तडाखा फार यशस्वी होत असतो. आपल्याकडे अगदी सर्कतवांटणीने जरी प्रमाण आले नाही. तरी गांवोगांव जे ख्रिस्त्यांचे मठ दिसतात ते निचेष्ट आहेत असे कधीहि मानतां यावयाचे नाही. त्यांचे पोखरणे चालूच असते. नगर जिल्ह्याकडे जाऊन पाहावे म्हणजे पसरत चाललेल्या धर्मांतराची बाब नीट ध्यानात येईल. काही थोड्याच वर्षांत दुष्काळांच्या मेहरबानीने आणि आमच्या उपेक्षेने सध्या लाखांनी मोजतां येण्यासारखी खिस्ती प्रजा कोटीवर खास जाईल. इंग्लंड व अमेरिका इकडचे पाद्री लोक कोट्यवधि रुपयांचा फंड उभारून हिंदुस्तानात येणार असून खेड्यापाड्यांतून सुद्धा आपल्या शाळा, मठ, दवाखाने सुरू करणार आहेत अशी बातमी एक वर्षापूर्वी वाचल्याचे वाचकांना स्मरत असेल. ही गोष्ट अशक्य नाही. शिसारी येण्याइतकी संपत्ति कांहीं ऐद्यांच्या हाती तिकडे जमा होत असते; ती धर्मकृत्यांत खर्चीवयास ते केव्हांहि तत्परच असणार. आणि ही ख्रिस्ती भिक्षुकांची स्वारी ख्रिस्ती राजाच्या आश्रयाखाली एकदां का सुरू झाली म्हणजे दोन ठिकाणी विभागलेला हा हिंदुस्थान देश एकंदर तीन ठिकाणी फाटणार असा त्याचा सरळ अर्थ होईल. एक कोटि ख्रिस्ती प्रजा म्हणजे एक मोठा जबरदस्त लोढणा होऊन बसणार आहे. धर्माचा समानपणा हा पुष्कळदां एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेलाहि मागे टाकतो हे डोळे उघडून पाहणारास सहज दिसण्यासारखे आहे. मनाने या ख्रिस्ती लोकांचा ओढा ख्रिस्ती राज्यकर्त्याकडे राहीलच राहील; व राहत नाहीसा दिसला तर हरहुन्नर करून राज्य टिकवू पाहणारा अधिकारी आपल्या हातांतील शेंकडों उपकारांचा वर्षाव त्यांच्यावर करून हा ओढा उत्पन्न करील. इतपत पराक्रम त्यांच्या अंगी खास आहे.
 आतां हे सगळे झालेले व होतकरू ख्रिस्ती आपल्याकडे तरी बव्हंशी अस्पृश्य वर्गातलेच आहेत यात शंका नाही. इतर जातीतली सावजे पाद्री लोकांना थोडी गवसतात, कारण त्यांना धर्मज्ञान आहे; पूर्वीचा इतिहास आणि संस्कृति यांचे बंधन आहे; आणि दुष्काळाच्या पहिल्या ढांगेतच ते आक्रमिले जात नाहीत. अस्पृश्यांचे असें नाही. सगळा काच त्याला एकदम उत्पन्न होतो आणि जवळ घेणारा स्वकीय कोणी नाही अशी स्थिति असते. पाद्री उपकार करतो ते ठळक डोळ्यांत भरण्यासारखे आणि अंगी लागण्यासारखेच असतात. तो कुडती देतो; अन्न देतो; औषध देतो; अमेरिकेतून येऊन महिना दहावीस हजारांचा गल्ला गोळा करतां येण्यासारखी, अश्विनीकुमारांना लाजविणारी विद्या अंगी असतां पोटापुरतेच घेऊन सहस्रावधि व्याधिग्रस्तांची पीडा दूर करतो, आणि त्यांना पुनः बायकापोरांत आणून सोडतो. असा माणूस ज्या धर्माचा उपदेश करील त्यापासून सुद्धां परावृत्त राहावे असा पीळ बहिष्कृताला कसा राहील! आमच्या येथे पहा! तापाच्या साथीमध्ये आचार्यांनी पुढे होऊन शहरांतले डाक्टर वैद्य गोळा करून काही सामुदायिक यत्न केला तर काय होणार नाही? पण त्यांच्या म्हणजे डाक्टर वैद्यांच्या धर्मबुद्धीला धर्मगुरु हटकीतच नाहीत. अर्थात् साथी म्हणजे प्रत्यक्ष वैदूंची सुद्धां पोळी पिकण्याची हुल्लड बनून जाते. अशा अनास्थेमुळे आमच्या धर्मात वजाबाकी झपाट्याने चालू आहे. ही जों जो अशीच चालत राहील तों तों हिंदुस्थानांत एक निराळा गट उत्पन्न होत आहेसे समजावें. कितीही माना वांकड्या करून राष्ट्रभाव आळविला तरी राष्ट्राच्या चतुःसीमेच्या टोपणाहून विशाल असे हे धर्माचे टोपण आहेसें कबूल करावे लागेल. मुसल मानाला युरोपांतून झोडपून बाहेर काढण्याची ख्रिस्त्यांची उत्सुकता आणि राजकारस्थानी मुत्सद्यांची तिला संमति या गोष्टी जर एकादी जाणीव मनांत आणून कोंबीत असल्या तर ती हीच की, अजून तरी राष्ट्रभावनेपेक्षां धर्मभावना अधिक शिरजोर ठरण्याचा काळ गेला नाही. तेव्हा शहाण्याहून शहाणे होण्याची हौस न बाळगलेली बरी. अस्पृश्य लोकांना आपल्या उपेक्षेने आपण जाणूनबुजून पाद्री लोकांच्या तावडीत देत आहोत व घरच्या घरी एक नवीन तिढा उत्पन्न करीत आहोत. आपल्या संस्कृतीची रक्षक होण्यासारखी प्रजा फुकाफुकी गमावणे हे पढत मूर्खाचे लक्षण आहे. पण तो अस्पृश्य तरी आमच्या संस्कृतीचा रक्षक केव्हां बनेल! जेव्हां त्याला तिच्या कक्षेत घ्याल तेव्हां! तिचे सर्व तऱ्हेचे फायदे त्याच्या वाट्याला येतील तेव्हां. त्याला जर तुम्ही संस्कृत केले नाही तर तो वाटेल त्या नव्या मताला मिळणार आणि वाटेल त्याच्या गोड हाकेला 'ओ' ह्मणणार.
 असो. ही आपत्ति लक्षात घेऊन या लोकांना ख्रिस्ती न होऊ देणे जसें जरूर आहे तसेंच धर्मांतर केलेल्यांना परत आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न होणे जरूर आहे. 'मी ख्रिस्ती होणार' जसें अवमानाने त्रस्त झालेला अस्पृश्य म्हणाला तर काही लोक उदासीन अवाजाने 'जा हो जा' असे म्हणतात. पण यांत जितका त्रागा दिसतो तितकी काळजी दिसत नाही. शक्य ते सर्व प्रयत्न त्याला ठेवून घेण्यासाठी केले आणि मग जर तो आडमुठेपणाने 'ख्रिस्ती होणार' असे म्हणू लागला तर त्या वेळची ही भाषा आहे. आधींची नाही. पण अस्पृश्य इतका आडमुठा नाही. नाही नाही म्हटले तरी अगदी झिरझिरीत का होईना पण त्याच्या समाजावर हिंदुत्वाचेच पांघरुण आहे. तेच जर जास्त उबदार झाले तर त्याला काय नको आहे? तो आपल्यांतच वागत आलेला नाही? तर तसा प्रयत्न करावा आणि मग रागवावें. असो. जे आधींच खिस्ती झाले आहेत त्यांना परत आणणे जरूर आहे आणि अशा तऱ्हेचा प्रयत्न जरी धर्मगुरुंनी केला नाही तरी कै. वैद्यांनी केलेला आपणा सर्वांना माहीत आहे, व त्यांच्या बंधूंनीहि तो चालू ठेवला आहे. हा प्रयत्नहि पूर्ण यशस्वी होण्यास अस्पृश्यतानिवारणाची जरूर आहे. कारण ख्रिस्ती झालेल्या महाराला आपण स्पृश्य कोटीत आलो आहो, इतरांशी हस्तांदोलनाला योग्य झालो आहों ही जाणीव उत्पन्न झालेली असते. पण पुनः जर हिंदुत्वांत गेलो तर संस्कृतीच्या कुंचलीने माझें कपाळ पुसून काढतील आणि अस्पृश्य छाप वाचून हा अस्पृश्य रे अस्पृश्य म्हणून पुनः येरे माझ्या मागल्या करावयास लोक चुकावयाचे नाहीत, असा वहिम त्याला येत राहील यांत शंका नाही. तेव्हां त्याला परत बोलवितांना त्याच्या मनांतील या बारीक शंकेला जागा उरूं देतां कामा नये. त्याला आपण हिंदुसमाजांतले अधिकृत घटक आहों अशी भावना उत्पन्न होईसें दिलदारपणा आपण दाखविले पाहिजे. धर्मापासून प्राप्त होणारे नैतिक फायदे आपण त्याला मिळू दिले पाहिजेत. कोणी कोणी असें समाधान सांगतात की, ते घाणेरडे असतात तेव्हां त्यांना धर्ममंदिरांत कसे घ्यावे? वास्तविक पाहता ही गोष्ट स्वच्छतेच्या मुद्यावरच अडली आहे असे वाटत नाही पण तसे जर खरोखरच असेल तर धर्मगुरूंनी तसे सांगावे की, अमुक एक डिग्रीची स्वच्छता असली तर तुम्हांस आंत घेऊ. गोव्याकडील अगदी घाणेऱ्या व केवळ 'लंगोटी व पंखा'च नेहमी घालणाऱ्या ख्रिस्ती कामाठ्याला सुद्धा स्वच्छ होऊन डगलापट्टा घालून चर्चमध्ये जातां येते. तसें आचार्यांनी यांना सांगावे की, तुम्हास आंत घेण्यास तुमच्या घाणेरडेपणाखेरीज दुसरा कोणताहि प्रत्यवाय नाही. असें धर्मगुरु म्हणावयास कबूल आहेत का पहा आणि मग स्वच्छतेचा मुद्दा पुढे आणा. मुसलमान किंवा ख्रिस्ती निदान देवळाच्या प्राकारांत जेथपर्यंत येऊ शकतो तेथपर्यंतहि अस्पृश्य येऊ शकत नाही, असे म्हटले म्हणजे राज्यकर्ते विष्णूचेच अवतार असतात असे म्हणावयाचे. पुजारी जेव्हां एकाद्या साहेबाला ही मूर्ति अशी आहे आणि ती तशी आहे असे माना हालवून सांगावयास लागतो तेव्हां त्याला या उत्तराशिवाय दुसरें न सुचणेच रास्त आहे. पण हे असले लोक आपलें दास्य लपविण्यासाठी तत्त्वज्ञानाची फरपट काढतात आणि दास्य चिरंतन करतात येवढाच या उत्तराचा अर्थ आहे. जो कोणी मानगुटीस बसेल तो विष्णू अवतार! असली उत्तरे मिळतात म्हणून त्यांचा उल्लेख करावासा वाटतो इतकेंच, बाकी त्याची किंमत काय आहे हे कोणालाहि कळण्यासारखे आहे.
 असो; याप्रमाणे राजकारण, समाजकारण, आणि धर्मकारण या तिन्ही ठिकाणी अस्पृश्याच्या काय काय तक्रारी आहेत त्या आतांपर्यंत दिग्दर्शनरूप थोडयांत मांडिल्या आहेत. राजकारणांत देशाभिमानाला सबळ कारण नाही, समाजकारणांत खडखडीत बहिष्कार असून सुखाची वाटणी नाही आणि धर्मकारणांत त्याच बहिष्काराची परमावधि असून ज्ञान व शांति यांचा लाभ नाही. अशी ही तक्रार थोडक्यांत आहे. आतां हिंदुसमाजातर्फे काय म्हणतां येण्यासारखें आहे, महाराची दृष्टि कशी असावयास पाहिजे या संबंधी काय म्हणतां येते तें पाहू.
 सध्या पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे लोक इतर वर्णीयांच्या बाबतींत जसा आचार करीत आहेत तशाच प्रकारचा आचार त्रैवर्णिक आर्यांनी फार पुरातन काळी मूळ एतद्देशीयलोकांच्या बाबतीत केला. सुपीक प्रदेश आपल्या ताब्यांत घ्यावेत, हरतऱ्हेच्या संपत्ति तेथें उत्पन्न कराव्या, आपण भोगाव्या व थोडा वाईटपणा पदरी आला तरी तो पतकरून आपल्या पुढील प्रजांच्या उपभोगासाठी मोठ्या दक्षतेने त्या जपून ठेवाव्या, अन्य वर्णीयांशी लग्नसंबंध करू नयेत, इतकेच काय पण त्यांचा शेजारधर्महि योग्य मानूं नये, प्रसंग पडल्यास त्यांना शासन करावे आणि त्यांनी नमतें घ्यावयाचें मनांत आणल्यास फार झाले तर आपल्या सेवाचाकरीची जबाबदारी त्यांजवर सोपवावी, पण इतर सामाजिक आणि राजकीय हक्क व सवलती, संस्कृतीचा समानपणा स्थापीत न करतील इतक्या प्रमाणांत द्याव्यात, असा वर्तनक्रम हल्लींच्या मोठमोठ्या वसाहती अंगिकारीत आहेत. प्राचीन आर्यांनी हीच गोष्ट केली. ज्या जमातींनी सारखें खडाष्टकच ठेविलें त्यांना सरसकट झोडपीत नेऊन कोठे तरी मोठाल्या अरण्यांत अगर पहाडांत नेऊन घातले. जे कोणी अधिक जुळते घेतातसें दिसले त्यांना आपल्या सामाजिक जुळणींत गुंतवून टाकले. त्यांना संपत्ति व वैभव ही प्राप्त करून घेण्याच्या ज्या काही मर्यादा होत्या त्यांच्या आंत घेतले नाही. पण आपली सेवाचाकरीही व्हावी आणि त्यांनाहि चंदीचारा मिळावा अशा तऱ्हेचा कांहींसा सलोखा केला. ही गोष्ट 'ग्राम' ही संस्था नीट पहावी म्हणजे ध्यानात येईल. हल्लींची वाहतुकीची साधनें उत्पन्न होण्याच्या आधी व भाकरीच्या शोधार्थ दाही दिशा येरझारा करणे भाग पडण्यापूर्वी प्रत्येक गांव म्हणजे स्वतःपुरता पूर्ण असा एक सुटा घटक असे. त्यांतील नारूकारूंची व इतर धंदेविशिष्ट जातींची व्यवस्थाही एका बुद्धिपुरस्सर केलेल्या योजनेची दर्शक असे. जसे इतर धंदेवाले तसे या योजनेंत महार, मांग, ढोर, चांभार हे लोक बहुतकरून सांपडावयाचेच. जे लोक त्यांच्याशी सर्वथैव फटकून राहिले आणि मग ढळढळीत गुन्हेगार जातींत मोडू लागले ते आपल्याला गांवगन्ना दिसावयाचे नाहीत; पण वर लिहिलेल्या जातींपैकी बहुतेक प्रत्येक जात समाजाच्या घटनेत कायमची गुंतून गेलेली दिसेल. 'गांव तेथें महारवाडा' या म्हणीचा इतर काहीं उपयोग असला तरी प्रत्येक गांवांत महारवाडा असतोच असतो हा वाच्यार्थ तीवरून स्पष्ट होतो.
 सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कोळी, भिल्ल, गोंड इत्यादिकांप्रमाणे सुसंस्कृत आर्यांपासून फाटून न राहतां या जाती राष्ट्रीय जीविताच्या दृष्टीने आर्यांशी इतरांपेक्षा अधिक जवळ आल्या आणि कोणता का दर्जा होईना, पण तो पतकरून त्यांनी जेत्या लोकांशी एक तऱ्हेचे लागतेपण उत्पन्न केले हे निःसंशय आहे. त्यांच्या वृत्तीची सोयही आर्यांनी खास केली होती. महार लोकांचे एकंदर ५२ हक्क आहेत असे त्यांच्यांतील माहितगार ह्मणतात. या हक्कांपैकी कांहींचा उल्लेख करून त्यांचा नीतिदृष्टया विचार पुढे करीन. सध्या इतकेंच लक्षात ठेवावयाचें की, चरितार्थाचे हटकून साधन असें महारांच्या पदरी काही तरी एक होतेच होते. पण रंगद्वेषाचा प्रभाव सद्यःकाली जसा दृष्टीस पडतो त्यापेक्षा कमी वाईट पूर्वीच्या काळी होता असें ह्मणवत नाही. "आमच्याशी लढावयाचे असेल तर लढा आणि मरून जा. फटकून राहावयाचे असेल तर आमच्यापासून स्पष्टपणे पृथक राहा. आमच्या शेजारास यावे असें ह्मणणे असेल तर या, आम्हासही नोकर चाकर हवेतच आहेत, तुम्हांला पोटभर खावयास देऊ पण एवढे मात्र खडखडीत ध्यानात ठेवा की, आमच्याशी बरोबरीचे नाते आम्ही तुम्हांस केव्हांहि लावू देणार नाही, आणि वैभवाचे वांटेकरीहि होऊ देणार नाही" हा वरचढ संस्कृतीच्या लोकांचा खालच्या लोकांना नेहमींचा रोकडा जबाब आहे. पण वाईटांत चांगले इतकेच की, सबंध जमातीच्या जमाती जिवंत राहू शकल्या. ही काही सामान्य महत्वाची गोष्ट नव्हे. जेथे वंशच्या वंश हळूहळू अल्पसंख्य होत होत कायमचे लुप्त व्हावयाचे तेथे जिवानिशी राहतां आलं हा काही सामान्य फायदा नव्हे. अनेक मानववंशांच्या चाललेल्या झटापटींत आणि त्यांच्या हितसंबंधांच्या गल्लतीत कोणा लोकांचे भाग्य कसे उदयास येईल हे खरोखरच अतर्क्य आहे! सध्याचा मनु तरी असा दिसतो की, सहस्रावधि वर्षे लोकांच्या सुखाकडे आणि वैभवाकंडे केवळ दुरून पाहत बसावे आणि आपण व आपली मुलेंलेकरे यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत अवमान आणि लाचारवृत्ति यांच्या घाणेऱ्या चिखलात रुतलेलें राहावें, अशा या दास्याच्या अवस्थेतून या मांगमहारादींचा उद्धार व्हावा. ही भाग्योदयाची वेळ ज्या त्रैवर्णिकांच्या विरोधसंगतीत त्यांना लाधली त्या त्रैवर्णिकांचे, इतिहासाच्या मोठ्या दृष्टीनें, अस्पृश्यांनी आभारच मानले पाहिजेत. मी या ठिकाणी भिन्न भिन्न मानववंशांच्या ज्या हालचाली आणि घडामोडी भूपृष्ठावर चालतात त्यांचा हिशेब म्हणून उंच भूमिकेवरून लिहीत आहे; अगदी आजच्या वादाला या किंवा त्या पक्षाला जमवून घेण्यासाठी लिहीत नाही. या मुद्याचे विवेचन शांतपणे वाचणे स्वाभिमान बळावलेल्या महारसुशिक्षितांस अशक्य आहे हे मी जाणून आहे. पण हा भूतकालीन गोष्टींचा आढावा आहे आणि त्या दृष्टीने त्याची किंमत ठरवावयाची आहे.
 दुसरे असे की, ज्या त्रैवर्णिकांवर अस्पृश्यांनी कहर केला त्याच त्रैवार्णिकांत भागवतधर्माचा संप्रदाय थेट महारवाड्यांत नेऊन पोचणारे विशाल अंतःकरणाचे संत-महंत उत्पन्न झाले. सर्व धर्मज्ञान अवघड संस्कृतांत आणि "दूर उभा राहा" असे म्हणणाऱ्या गुरुजींच्या मुखीं असा प्रकार होता. पण महाराष्ट्रसंतांनी "संस्कृतातेहि पैजा जिंके" अशा मराठी भाषेत आणि सर्वांना मनमुराद लाभेल अशा बालबोध पद्धतीने तें देशभर खैरातून टाकले. इतकें की, जातोजात संत पैदा झाले आणि सामाजिक दृष्ट्या दूर ठेवलेल्यांनाहि संत म्हणून मान मिळू लागला. त्याचा अर्थ असा की, अस्पृश्य जातींना अभिमान वाटेशी एकेक विभूति त्यांच्यांत उत्पन्न झाली. चोखामेळा आणि रोहिदास याच पवित्र पुरातन नांवांभोवती त्या त्या जातीचे लोक गोळा होत आहेत. ज्या जातींना इतिहास, सामाजिक दर्जा आणि धर्मज्ञान यांचा पाठपुरावा आहे त्यांच्या विभूति या तीनहि प्रदेशांत सांपडतात. पण महार-चांभारांना या गोष्टी लाभल्या नाहीत. त्यांना भागवतधर्माचे एकच ठिकाण गुणोत्कर्षाला मिळाले आणि त्या ठिकाणी त्यांना विभूति प्राप्त झाल्या. पण हे ठिकाण मिळवून देण्याचे काम त्रैवर्णिक संतांनी केले हे विसरता कामा नये. आपला भूतकाळ म्हणजे कोरा कागद आहे असेंच महार-चांभारांनी वाटू देऊ नये. 'सर्व गोष्टींचा परित्याग करून मला शरण ये' म्हणणाऱ्याच्या राज्यांतील अमीर-उमराव त्यांच्या पूर्वकालांत होऊन गेलेले आहेत आणि ही परिस्थिति पूर्वग्रह झिंजाडून देऊन दीनांना जवळ करणाऱ्या संतांनी उत्पन्न केली ही गोष्ट अस्पृश्य व तदितर यांनी अवश्य ध्यानात ठेवावी.
 शिवाय त्रैवर्णिकांच्या दुसऱ्या एका चळवळीचा फायदा अस्पृश्यांना आपोआपच मिळणार आहे. प्रस्तुतच्या राजकीय चळवळीचे कष्ट खरोखर त्रैवर्णिकच करीत आहेत. मनानें, बुद्धीने व शरीराने जे जे काही करणे जरूर आहे तें तें सर्व अस्पृश्येतर लोकच करीत आहेत कोणी कोणत्याहि मताचा असो, त्याच्या प्रयत्नाचा रोख स्वराज्याचे हक्क संपादण्याकडे आहे हे उघड आहे. पण त्या मिळणाऱ्या भावी स्वराज्याचे फायदे त्रैवर्णिकच घेणार आहेत असा कोणी लटका समज करून घेऊ नये. देशांत कारखाने व उद्योगधंदे सुरू झाले व भाकरी स्वस्त झाली तर ती म्हणजे केवळ त्रैवर्णिकांनाच होणार आहे असे मानण्यांत वादांतली आढी आणि पीळ दिसेल, पण त्याबरोबरच यथातथ्य ज्ञानाचा जाणूनबुजून केलेला विपर्यासहि दिसेल. एवढी इंग्रजसरकारच्या राज्याची प्रचंड दगडबंद इमारत पण तीहि गदगंदा हालविण्यास देशभक्तांनी कमी केलें नाहीं; इतकी की, रखवालदार भय्या कांहींसा घाबरल्यासारखा सुद्धा दिसतो ! हे सर्व पराक्रम हिंदूंपैकी अस्पृश्येतरांनीच केलेले आहेत. या पराक्रमाचे वांटेकरी होण्याइतपत परिस्थिति त्यांना इतरांनी अनुकूल ठेविली असती तर अस्पृश्यांनीहि कांहीं कार्यभार शिरावर घेतला असता यांत संशय नाही. पण आपला प्रस्तुतचा मुद्दा इतकाच आहे की,अस्पृश्यांची तदितरांशी कसल्या प्रकारची नाती आहेत हे पहावें. अस्पृश्यांची कड घेऊन जे काय यथामति लिहिता येण्यासारखे होतें तें थोडक्यांत पण स्वच्छपणे लिहिल्यावर इतर समाजाकडे कोणत्या लागेबांध्याच्या दृष्टीने त्याला पाहतां येईल हे पाहण्याचा यत्न केला आहे. त्रैवर्णिक झगडत असले तरी त्या झगड्याकडे आपलेपणाची दृष्टी ठेवूनसुद्धा अस्पृश्याने दक्ष राहिले पाहिचे हे उघड आहे.
 अस्पृश्यांनी आपल्या वैगुण्यांकडेही नीट लक्ष पोचविले पाहिजे. उठल्यासुटल्या सरकाराला शिव्या देतांना थोडें आत्मनिरीक्षण करीत जा म्हणून जे गांधींनी लोकांना बजाविलें तें अस्पृश्यांनी आत्मशुद्धीच्या दृष्टीने ध्यानात ठेवावे. अस्पृश्यास्पृश्यांत बारीकसारीक किती तरी भेद आहेत. सर्व अस्पृश्यांचा मिळून एक गठ्ठा मानणे चूक आहे. इतरांकडून न शिवले जाणे ही एकच काय ती बाब त्यांना सामान्य आहे. लग्नसंबंध तर दूरच राहो, पण त्यांच्या त्यांच्यांत अन्नोदकव्यवहारहि होत नाहीत. महार आपल्याला सर्वांहून श्रेष्ठ समजतो. कांही काही ठिकाणी महाराचा वरचष्मा उगाच आहे असें चांभार समजतात, पण स्वतःला मात्र ते ढोराहून वरचे धरतात. मांग हा एकादे वेळी महारापेक्षा कमी असल्याची कबुली जरा कुरकुरतच देतो. गुरे ओढणे, ती फाडणे, कातडी धुणे, कमावणे, जोडे शिवणे इत्यादि धंद्यांचे कमीअधिक महत्त्व, स्वच्छतेचे मान, तसेंच मेलेल्या गुरांच्या मांसाचा खाण्याकडे उपयोग करणे न करणे या बाबी लक्षांत घेतल्या म्हणजे या निरनिराळ्या लोकांच्या उच्चनीचपणाचा हिशेब कोणालाहि सहज करता येण्यासारखा आहे. पण पुष्कळदां हा हिशेब चुकेल. खजिन्याची बिनबोभाट ने-आण करून राजपुरुषांच्या विश्वासास पात्र झालेला, गांवकीच्या दरबारांत पाटील-कुळकर्ण्याच्या खालोखाल मान सांगणारा आणि क्वचित् रणमैदानाचीहि हवा पाहिलेला महार सहजच आपल्याला चांभारापेक्षा श्रेष्ठ समजतो. पण सर्वच चांभार हे त्याचे श्रेष्ठत्व कबूल करणार नाहीत. स्वच्छतेच्या दृष्टीने दोऱ्या वळणारा मांग इतरांहून श्रेष्ठ असावा, पण तो "भाजी" खाणारा असल्यामुळे कमी समजला जातो. महाराच्या देवळाच्या आवारांत सुद्धा मांग येऊ शकत नाही. आणि चमत्कारिक वाटेल पण परटापेक्षा आपल्याला श्रेष्ठ मानणारे महार कोठे कोठे भेटतील ! शहरांत दारूचे व्यसन या लोकांना अतिशय असते. आणि महार दारुड्याची दारू न पिण्याबद्दल केलेली आर्जवें फार वाया जातात अशी व्हॉलंटिअर्सची तक्रार आहे. शहरांत पानस्वातंत्र्य फार; तसेंच सिनेमांतील उघडींनागडी चित्रे पाहावयाचा नादहि मोठा आणि श्रीमंतांनी आणि खावंदांनी खेळावयाच्या रेसेच्या हैदोसाची चटकहि मोठी. या गोष्टींनी शहरांतील अस्पृश्यांच्या मनाची धुळधाण उडवून दिली असते. कांहीं कांहीं खेडेगांवचे मांग व रामोशी चोऱ्यादरवड्याबद्दल मुलुखभर कीर्ति कमवून राहिले आहेत! अशी जरी हकीकत असली तरी शुद्धीवर राहिलेले अस्पृश्य काही थोडे नाहीत. आपली स्थिति, आपली आपत्ति पाहून खेद आणि दुःख यांनी भरून गेलेले अस्पृश्य आपल्याला पुष्कळ भेटतील. शहरांत जागेची फार जिगजीग असल्यामुळे स्वच्छतेचे मान पाहिजे असून सुद्धां पुरेसे ठेवता येत नाही. खेडेगांवची हीच प्रजा पाहिली म्हणजे आनंद होतो. घरें स्वच्छ, माणसें चालीरीतीची आणि क्वचित् भारदस्तहि दृष्टीस पडतील. त्यांना पाहून अस्पृश्यतानिवारणाची जरूरी का आहे हे मनांत अधिक ठसते, आणि समाजाने मनांत आणले तर वाटतो तितका हा प्रश्न अवघड नाहींसेंहि क्षणभर वाटते. असो. वर जी वैगुण्ये म्हणून दाखविली आहेत त्यांचा अस्पृश्यांनी नीट विचार करावा. आपल्याला वाईट म्हणणाऱ्याचा राग यावा हे साहजिक आहे तसा तो आला तरी चालेल, पण त्यांनी कामाला लागावे. अस्पृश्यता घालविण्यासाठी जे काही यत्न होत आहेत व होतील त्यांना अनुकूल भूमि तयार करणे हे ज्यांच्या कपाळी ती आजवर लिहिली आहे त्यांचेच मुख्य कर्तव्य आहे. हे करीत असतांना इतर समाजांशी असलेले आपलें अंतर ज्या कृत्याने वाढेल असे कोणतेंहि कृत्य करण्याच्या मोहास अस्पृश्यांनी बळी पडूं नये, यांत त्यांचे खरें हित आहे.
 या पुढे अस्पृश्यांपैकी मुख्य जातींच्या उत्पत्तीची, चालीरीतींची व धंद्याविषयींची थोडीशी माहिती द्यावयाची आहे. अस्पृश्य जातींच्या उत्पत्तीविषयी मागे एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे. परंतु त्या वेळचें 'प्रस्तुत' निराळे असल्यामुळे त्यांच्या उत्पत्तीच्या केवळ उल्लेखापलीकडे विशेष काही लिहिलें नाहीं; असो. महार, मांग, ढोर, चांभार, व रामोशी या जातींविषयींच लिहावयाचे आहे, कारण मुख्य अस्पृश्य जाति याच होत. निरनिराळ्या जमातींची कितीहि गल्लत झाली असली तरी व्यक्तिव्यक्तीच्या नाकाडोक्याच्या आकारांवरून, ती कोणत्या मानववंशांत हटकून जाऊन पडते, आम्ही सांगू शकतों असें म्हणणाऱ्या आधुनिक शास्त्रांचा असा अभिप्राय आहे की, अस्पृश्यांपैकी बहुतेक जाति अनार्य आहेत. सिंधूपासून गंगेपर्यंत सर्व नद्यांच्या कांठच्या समृद्धीवर उत्तम जोगावलेले आणि विजयाची वेदकालीन ईर्ष्या अंगी पुरी बाळगून असलेले युयुत्सु जसजसे खाली खाली उतरूं लागले, तसतसे त्यांच्या उग्र दर्पामुळे आणि स्वसंरक्षणाच्या सहज इच्छेमुळे हे अनार्य लोक हटूं लागून दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयाला गेले असावेत असे अनुमान आहे. आर्य तर विशाल मनाचे आणि साधनसंपन्न; त्यांच्यापुढे यांनी कसे टिकावे ? जो जो सासुरवास जास्त होऊ लागला आणि जीवितच संशयांत सांपडू लागले. तो तों हे पहाडी मुलूख आणि निबिड अरण्ये यांत वस्ती करूं लागले व पुढे या नवीन जोमदार लोकांनी कसलाहि पसारा मुलूखभर पसरला तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपले स्वतंत्र जिणे संभाळून राहिले. भिल्ल, कोळी, गोंड इत्यादि लोकांविषयी केलेले हे अनुमान पायाशुद्ध आहे असे म्हणवत नाही. कारण आर्यांचा उपसर्ग पोचण्याच्या आधी हे जमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत असत असे जेव्हां इतर पुराव्यांवरून सिद्ध होईल तेव्हांच हे अनुमान खरे मानतां येईल. नाहीं तर जेथे जेथें रानटी लोक सांपडतील तेथे तेथे ते शेजारच्या सुधारलेल्या लोकांकडून हाकलले गेले असा सिद्धांत फलित व्हावयाचा. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, वरील जातींचे लोक आर्यांच्या उपद्रवामुळे नाही, तर आधीपासूनच रानवट व डोंगरकरी असण्याचा संभव आहे.
 असो. हे अनुमान खरे असले तरी प्रस्तुत लेखांतील विषयभूत जातींच्या कुलपरंपरेचा त्यांत खुलासा होत नाही. पण महार, मांग इत्यादि लोकांविषयीहि आधुनिक शास्त्रांचा असाच सिद्धांत आहे की, हे लोक अनार्यच होत अर्थात् आर्यांच्या वसाहती आपल्या प्रांतांत फैलावण्याच्या पूर्वीपासूनहि हे लोक सपाट मैदानांत राहत असत, व जमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत. जमिनीचे मालक तेच होते, व आर्यांकडून जिंकले गेल्यानंतर त्यांना उपरेपणा प्राप्त झाला. कोणी म्हणतात, ह्या जाति द्रविडियन मानववंशापैकी आहेत. कसेहि असो, ते आर्यवंशीय नव्हेत, याविषयी सर्वांचे एकमत आहे. आपल्या जुन्या शास्त्रकारांच्या जातकुळी देण्याच्या पद्धतीने पाहिले असता हे लोक संकर जातींपैकी आहेत. पण ही प्रतिलोम प्रजा संख्येने इतकी अफाट केव्हां व कशी झाली हे त्या पद्धतीवरून नीट कळत नाही. ह्या पद्धतींत श्रेष्ठ-कनिष्ठ जातींच्या गुणाकाराची नुसती कोष्टके आहेत. अमुक जात कशी झाली असे विचारतांच, एका ठराविक कोष्टकावर बोट ठेवावयाचें व तिची जातकुळी त्या कोष्टकांत दिलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठ जातीच्या नांवाशी भिडवावयाची असा हा प्रघात आहे. शास्त्राविषयी आदर असून सुद्धा ह्या पद्धतींतील शास्त्रीयता न पटेशी व अविश्वास्य वाटते. शिवाय इतिहास आणि वर उल्लेखिलेले शीर्षमापनाचे आधुनिक शास्त्र यांच्या जबानीनंतर तर आपली जुनी पद्धत अगदी टाकाऊ वाटते. असो. आपली धर्मशास्त्रे व आधुनिक शास्त्रे यांना बाजूला ठेवून त्या त्या लोकांच्या आपापल्या उत्पत्तीविषयी काय कल्पना आहेत हे पाहिले तर निरनिराळे विचार मनांत उत्पन्न होतात. आणि अति दूरच्या भूतकाळांत दिसणाऱ्या अंधारांतील अस्पष्ट आकृतींवरून आर्यसंस्कृति, व आर्य येथे येण्याच्या आधी चालू असलेली संस्कृति, यांचा परस्परांवर काय परिणाम झाला असेल याविषयी अनेक अनुमाने मनांत उद्भवतात. स्वतःच्या उत्पत्तीविषयींच्या त्यांच्या कल्पना जशा, तशा, त्यांच्या चालीरीती व धंदा याविषयीच्या हकीकतीहि मोठ्या बोधकारक आहेत म्हणून त्या होता होई तो आटपशीरपणाने खाली देतो.
 रामोशी हे काही ठिकाणी अस्पृश्य समजले जातात व काही ठिकाणी स्पृश्य मानले जातात; कांही माहितगार रामोशांचे असे म्हणणे आहे की आपण कोठेच अस्पृश्य समजलों जात नाही. त्यांचा संबंध जमीन कसणाऱ्या कुणबी लोकांशी बराच येत असल्यामुळे व रखवालीची वगैरे कामें त्यांच्याकडेच असल्यामुळे शिवताशिवतीचा प्रसंग अर्थातच जास्त पडतो. दाशरथी रामचंद्र दंडकारण्यांत असतांना आम्ही त्याची सेवा फार एकनिष्ठपणे केली, सीतादेवीला बंधमुक्त करून इकडून परत जातांना, आमच्यापैकी पुष्कळांना त्याने अयोध्येस बरोबर नेले, व आमचा विश्वासूपणा लक्षात घेऊन आम्हांस रखवालीचे काम सांगितले; त्याने आम्हांवर बापासारखे प्रेम केले व म्हणून आम्ही आमच्या जातीला 'रामवंशी' म्हणजे रामोशी असें नांव घेतले असा स्वतःच्या पूर्वपीठिकेचा इतिहास रामोशी लोक सांगतात. इतक्या उंच नांवाशी आपला संबंध घडून आल्यामुळे पुष्कळांनी मांसाशनहि वर्ज केले. त्यांना रामभक्त असे म्हणतात. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या हद्दीवरील बेरडांशी यांचा पुष्कळच सारखवटपणा आहे व म्हणून या दोघांची कुलपरंपरा एकच असावी असें कांहींचे मत आहे. अर्थात् या उभयतांनाहि हे एककुलत्व पसंत नसेल. रामोश्यांचे बांदाट्टे, बेरड, हळणे, कडू, मांग इत्यादि पोटविभाग असून त्या प्रत्येकाचे पुनः चव्हाण व जाधव असे बारीक भाग आहेत. मराठा-कुणबिणीशी लग्ने झाल्यामुळे कडू नांवाची जात, व मांगिणीशी झाल्यामुळे मांग रामोशी ही जात उत्पन्न झाली असे म्हणतात. पूर्वीच्या राज्यांत यांच्याकडे किल्लेदाराचे काम असे. लग्ने वगैरे चालविण्यास देशस्थ ब्राह्मण कोठे कोठे जातो. इतर समारंभ व संस्कार जंगम लोकहि चालवितात. यांच्याच जातींतील गुरु "गोसावी" हे होत.
 मांग लोकांचा मूळ पुरुष यमऋषि. त्याला सात मुलगे. पैकी कर्कमुनीला दोन मुलगे झाले. यांपैकी पहिल्याने शंकराची गाय खाली म्हणून त्याला, 'तू महार हो' असा शंकराने शाप दिला, व दुसऱ्याने प्रत्यक्ष जरी खाल्ली नाही, तरी त्याच्या अंगावर त्या मेलेल्या गायीच्या रक्ताचा शिडकाव झालेला होता म्हणून त्याला 'तूं मांग हो' असा शाप दिला. असो. ह्या कथेचा अर्थ कांहीं असो, चेहरेपट्टी व रंग यांवरून हेहि आर्यांची वसाहत होण्याच्या पूर्वीचे येथील रहिवासी होते. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजराथ या तीनहि प्रांतांत यांची वस्ती आहे, पण रोटीबेटी-व्यवहार मात्र चालू नाही. ह्या लहानशा जातीचे सुद्धा बेटीव्यवहाराला बंद असे पंचवीस पोटविभाग आहेत. त्यांच्यापैकी काहीं आडनांवेंहि ध्यानात ठेवण्यासारखी आहेत- आपटे, भिसे, चव्हाण, धोंगडे, गाइकवाड, जाधव, जगताप, जोगदंड, कांबळे, लोंढे, मोहिते, मोरे, नांदे, पवार, साठे, शिंदे इत्यादि. यांचा मुख्य धंदा नाडे, चऱ्हाटें करण्याचा आहे.
 ढोरांपैकी बरेचसे लिंगायत आहेत. बुधलेकरी, बुंदेलखंडी, हिंदुस्थानी, कर्नाटकी, खेतरपुडी, लिंगायत इत्यादि पोटविभाग असून त्यांच्यांत रोटीबेटीव्यवहार बंद आहेत. यांच्यापैकीहि कांहीं आडनांवें मनोरंजक वाटतील-- बोराडे, गाइकवाड, होळकर, इंगळे, कदम, मानकर, साळुके, शिंदे इत्यादि. जितकी आडनावे तितकी देवके असून एकाच देवकांत लग्नसंबंध होत नाहीत. कातडें कमावणे हा त्यांचा मुख्य धंदा असून कमावलेल्या कातड्याच्या बाजारांत मांडण्यासारख्या चिजा तयार करणे हे कामहि काही लोक करतात. यामध्ये पुष्कळजण वारकरी आहेत. त्यांच्या जातीचाच स्वतंत्र असा गुरु म्हटला म्हणजे "कानफाट्या गोसावी" हा आहे, व तो आपली वार्षिक दक्षिणा आपल्या शिष्यशाखेकडून नियमितपणे उकळतो.
 आपला मूळ पुरुष एक शिवभक्त होता असें चांभारांचे म्हणणे आहे. कोणी कोणी हा मूळपुरुषत्वाचा अधिकार मार्कंडेय ऋषीला देतात व बाकीच्या अस्पृश्यांतच हे मोडत असल्याने व बाकीचे अस्पृश्य अनार्य असल्यामुळे या लोकांनाहि सामान्यतः मूळ अनार्य प्रजेपासून उत्पन्न झालेल्या लोकांत मोडण्यात येते. पण हे लोक आर्य प्रजेपैकी असावेत असे आधुनिक शोधकांचे म्हणणे आहे. रंगाने हे लोक बाकीच्या अस्पृश्यांपेक्षां उजळ असतात व त्यांच्या तील स्त्रियांना सुंदर वर्ण व रूपसंपदा ही लक्षात येण्याइतपत चांगली लाभलेली असतात, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. चर्मकाराचा धंदा अगदी जुन्या वैदिक वाङ्मयांत व बुद्धपूर्व वाङ्मयांतहि उल्लेखिलेला आढळतो. त्या काळी या धंद्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. खुद्द राजे लोकांपाशीहि ओळख होण्याइतपत व संघट्टण घडण्याइतपत या धंद्यांतील पुढाऱ्यांना राजदरबारी आणि समाजांत मान असे. पुढे अंगी निष्प्रभता उत्पन्न करणारी बुद्धाची अहिंसा सगळीकडे पिकल्यावर जो तो असल्या धंद्यासंबंधाने खंती मानूं लागला, व तो धंदा करणारे लोक कमी प्रतीचे मानले जाऊ लागले. हळूहळू त्यांच्या विषयींचा तिटकारा वाढत जाऊन बाकीच्या अनार्याप्रमाणे त्यांनाहि बहिष्कृत व्हावे लागले. चांभार आर्यकुलोद्भव आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुढील गोष्टींचा निर्देश करण्यांत येतो. इतर अस्पृश्यांत जी नाही ती प्रेते जाळण्याची चाल त्यांच्यांत आहे; तसेच मृतांच्या अस्थि पवित्र नद्यांत टाकण्याची चालहि त्यांच्यांत आहे. शिवाय श्राद्धपक्ष करून हे लोक ब्राह्मणाला दक्षिणा देतात व गोमांस अत्यंत निंद्य समजतात. असो. एखादी जात अनार्य म्हटल्याने ती अगदी कुचकामाची ठरते असा काही नियम नाही. पण शौर्य, पराक्रम. विद्याभिरुचि, कलाकौशल्याची वाढ, परमार्थज्ञान इत्यादि बाबतींत इतिहासाला आठवण नाही तेव्हांपासून तहत आतांपर्यंत ज्या आर्यवंशजांनी अमर असा नांवलौकिक मिळविला त्यांपैकी आपण आहोत असे वाटून चांभाराच्या रक्ताला हुरूपाने उसळी मिळाली तर त्यांत काय नवल? एखाद्या जातीच्या उत्पत्तीच्या ज्या निरनिराळ्या उपपत्त्या अडाणी व कदाचित् लुच्च्या लोकांनी बसविलेल्या असतात त्या सर्वांची एकवाक्यता कधीच घडून यावयाची नाही, व या उपपत्ति जो जो जुन्या तों तो त्यांच्याविषयी शंकाकुशंका फार; कारण त्या बुद्धीला ग्राह्य वाटेनाशा होतात. वर दिलेली चांभारांच्या उत्पत्तीची हकीकत आधुनिक पद्धतीच्या शोधकांनी दिलेली आहे; असो. मराठी चांभारांचे अहिर, चेवळी, दाभोळी, घाटी, हरळी, कोंकणी इत्यादि भाग असून त्यांचे एकमेकांशी विवाहसंबंध होत नाहीत.
 त्यांतल्या त्यांत हरळी व दाभोळी हे स्वतःला चेवळी जातीपेक्षा श्रेष्ठ समजतात; कारण चेवळी जात हलक्या जातीचे जोडे नीट करते आणि मुर्दाड मांस खाते. यांच्यापैकीहि काही आडनावें ध्यानात ठेवण्यासारखी आहेत- भागवत, चव्हाण, देशमुख, देवरे, जाधव, कबाडे, कदम, काळे, पवार, सोनावणे, वाघ, शिंदे, सातपुते इत्यादि. यांचे धार्मिक विधि बहुशः ब्राह्मणच चालवितात. नगराकडे स्मशानविधीला यांना जंगम लोक लागतात.
 शेवटी अस्पृश्यांपैकी प्रमुख जातीची म्हणजे महारांची हकीकत द्यावयाची. ह्याच्या उत्पत्तीच्या कथा निरनिराळ्या तीनचार आहेत. कोणी महार समजतात की, ब्रम्ह्याच्या तळव्यापासून स्वरूप सोमाजी महार निघाला त्याची प्रजा म्हणजे अंत्यजाची. कोणी म्हणतात, बेलाच्या पानावरील थेंबाचें पार्वतीने बालक केले, त्याने गाय मारून खाल्ली तेव्हां शिवाने शाप दिला की तूं 'महार हो.' तिसरे कोणी समजतात की, सोमाच्या म्हणजे चंद्राच्या डाव्या डोळ्यांतून आपण पडलो. हा चंद्र शिवाच्या मस्तकावर आहे हे सांगणे नकोच. हे सोमवंशी महार झाले. शेवटी काहींचें असें मत आहे की, गाईनें आपल्या चार मुलांना असे विचारिलें की, मी मेल्ये तर तुम्ही काय कराल? पहिले तिघे म्हणाले, आम्ही तुझी पूजा करूं; पण चवथा म्हणाला की, मी उपजण्याच्यापूर्वी तूं जस मला आपल्या पोटांत ठेवले होतेस तसे मी तुला माझ्या पोटांत ठेवीन, म्हणजे मी तुला मटकावून टाकीन! अर्थात् याचा हा 'महा आहार' पाहून त्याला महार हे नाव देण्यांत आले, असे कोणी समजतात. पण ही केवळ शब्दावर कोटी आहे हे उघड उघड दिसते. काहीं विद्वानांच्या मतें 'मृताहारी' म्हणजे मुर्दाड मांस खाणारे या शब्दावरून 'महार' शब्द निघालेला असावा.
 असो. अशा या महारांच्या जातींचे बेटीव्यवहाराला बंद असे पन्नासाहून जास्त विभाग आहेत. महार या शब्दालाच निरनिराळ्या कारणांनी पुढील पर्याय शब्द उत्पन्न झालेले आहेत- अंत्यज, अतिशूद्र, भूमिपुत्र, धरणीचे पूत, भूयाळ, चोखामेळा, धेड, डोंब, हुलसाव, काठीवाले, मेहेतर, मिराशी, परवारी, तराळ, थोरल्या घरचे, वेसकर इत्यादि. भिन्न भिन्न कारणांनी काही चमत्कारिक पोटजातीहि उत्पन्न झाल्या आहेत--जसे गोपाळ महार म्हणजे महारांतील तापसी; मुरळी महार म्हणजे खंडोबाला सोडलेल्या मुलींची प्रजा; गवशी महार म्हणजे व्यभिचारोत्पन्न महार प्रजा; जोगती महार म्हणजे यल्लम्माच्या भगत प्रजा, इत्यादि. सर्व महाराष्ट्रभर महार लोक पसरलेले असून प्रत्येक जिल्ह्यांतील महारांचे दोनपासून अठरापर्यंत पोटविभाग पडलेले सांपडतात. यांच्यापैकी कांहीं शेलकी आडनावे पुढे दिली आहेत-- भालेराव, चव्हाण, वाघमारे, वर्तक, यादव, दिवे, गायकवाड, गरुड, जाधव, जोशी, कदम, काळे, लकडे, लोखंडे, मोहिते, मोरे, शिंदे, शिरके, तांबे, इ० लग्ने वगैरे चालविण्यास ब्राह्मण जातो. वैष्णव, शैव, कबीरपंथी, नाथपंथी इत्यादि मतसांप्रदाय असून गुरु, साधू, पंडित, गोसावी, मेंढेजोशी इत्यादि यांना धर्म शिकवितात. महारांचे धंदे म्हटले म्हणजे खजिन्याची नेआण करणे, अधिकाऱ्यांची वेठ करणे, कर भरणाऱ्यांना चावडीवर बोलावून आणणे, गांवकुसवाकडे पाहणे, रस्ते झाडणे आणि गांवशिवाराची हद्द ध्यानात ठेवणे. या सर्व कामांसाठी अल्पसा मोबदला पैशाच्या रूपाने, व बराचसा जमिनीच्या रूपाने मिळतो. शिवाय सध्या बव्हंशी बुडालेले पण परंपरेला माहीत असलेले, असे ५२ हक्क महाराला आहेत; पैकी काही खाली देतो.
 (१) उसाच्या फडाचा भाग (२) वेशीवरचे उतारे (३) होळीवरचा नैवेद्य (४) बेंदराच्या दिवशी धान्य (५) जनावराची कातडी (६) हात शेकणे म्हणजे गुऱ्हाळाच्या चुलवणाखाली जाळ घालण्याबद्दल (७) घरटक्का (८) प्रेतासाठी खड्डे खणण्याबद्दल पैसा (९) खळ्यावरचा दाणा (१०) पेवतळचा दाणा (११) चौरंगावरचे तांदूळ (१२) रखवालीसाठी वहाणांचा जोड (१३) लग्नाची ओटीदक्षणा (१४) मळणीची ओटी (१५) नवरानवरीची ओंवाळणी (१६) मढेपडे (१७) आषाढीकार्तिकी प्रतिपदेस खेड्याभोवती दोरा गुंडाळण्याबद्दल (१८) रानसोडवण म्हणजे पिके कापून गंज करतांना कणसे मिळावयाची (१९) लगीनटक्का इत्यादि.
 वर अस्पृश्यांपैकी बहुतेकांच्या शास्त्रीय व अशास्त्रीय कल्पना, तसेच त्यांच्या चालीरीति व धंदे याविषयींची वाचनांत आलेली माहिती थोडक्यांत दिली आहे. ज्यांना ही पसंत अगर कबूल नसेल त्यांनी ती मानूं नये. चवकशाने अथवा अभ्यासाने 'खरी' असेल ती मिळवावी व तिची अधिक विश्वास्यता दाखवावी म्हणजे लोकतीच जास्त मानूं लागतील, हे उघड आहे, असो, या दिलेल्या हकीकतीवरून काय अनुमाने निघतात तें आतां पाहूं.
 वर निरनिराळ्या अस्पृश्य जातीतील आडनावांपैकी काही नांव मुद्दामच दिली आहेत. त्यांची मनोरंजकता त्यांच्या उपयुक्ततेमुळे भासमान होते. त्या नांवांत कोंकणस्थ, देशस्थ, प्रभु, मराठे इत्यादि श्रेष्ठ जातीतील आडनांवांपैकी किती तरी आढळतात. ही नांवे लावणारे अस्पृश्य जर अनार्य तर ती त्यांनी कोठून आणिली? काही नांवांच्या व्युत्पत्तीवरून ती त्यांची मुळचीच होती या अनुमानाला बाध येतो, कारण आर्यांच्या प्राचीन इतिहासांतील कित्येक नांवांची ती विकृत रूपे आहेत हे इतिहासज्ञांस सांगणे नकोच. मग ती जर त्यांची मूळची नव्हेत तर ती त्यांनी विजेत्या आर्यांकडून घेतली असावीत असा तर्क आपोआप होतो. आर्यांचा लोट जो जों देशभर पसरूं लागला तो तो द्रविडवंशीय असोत अगर त्यांच्याहि पूर्वीचे असोत, मूळचे लोक हतप्रभ होऊ लागले. वसाहतखोर लोक मूळच्या मालकांना गचांडी देतांना सध्या जसे सर्वत्र दिसून येते तसेंच तेव्हां झाले असले पाहिजे. आपल्या गुणांच्या बळावर पहिल्या माणसांकडून त्यांच्या जमिनी या नवीनांनी हिसकून घेतल्या आणि समतेवर हक्क कधीहि न सांगतील इतक्या बेताने त्यांना आपल्या पदरी नोकरीचाकरीस ठेवले. एकदां धनी असलेल्या पण आतां नोकरीचे दास्य पत्करलेल्या लोकांना लवकरच नामांतर करावें लागलें. जो ज्याच्या शेतवाडीवर नोकरीस राहिला त्याच्याच नांवानें विकू लागला. वास्तविक पाहतां हे केवळ अनुमान आहे. पण ते करावयास मागील लेखांत महार शब्दास जे पर्याय शव्द दिले आहेत त्यांवरून आधार मिळतो. महारांना 'भूमिपुत्र' अथवा 'धरणीचे पूत' अशी नांवे आहेत, त्यावरून ते स्वतःस या भूमीचे औरस पुत्र समजतात हे उघड आहे. 'मिराशी' या नांवावरून येथील जमिनीचा मूळ हक्क त्यांचा होता असा बोध होतो. 'थोरल्या घरचे' या नांवावरूनहि पुरातनत्वामुळे या भूमीवर वडीलपणाने मालकी हक्क सांगणारे असा अर्थ सूचित होतो. एतावता काय की, त्याच्या जमिनी ओरबाडल्या जाण्याच्या आधी तो येथील मालक होता. पण मालकाचा चाकर झाल्यावर त्याला नामशेषत्वहि उरले नाही, आणि त्याचे जिणे केवळ उपरे बनून आर्यांच्या कारभारांत कायमचे लोपून गेले.
 आडनांवांवरून केवळ अनुमान काय म्हणून म्हणतां येते तें पाहिल्यावर त्यांच्या उत्पत्तिकथांवरून काय अनुमाने निघतात ती पाहूं. मागील हकीकतीवरून असे दिसून येईल की, रामोशाशिवाय इतर सर्व अस्पृश्य आपल्या उत्पत्तीचा संबंध कसा ना कसा तरी शिवाच्या नांवाशी लावतात. कोणी म्हणतो, आम्ही बिल्वदळांतील थेंबांतून निघालो. दुसरा म्हणतो, शिवाच्या मस्तकावरील चंद्रापासून निघालों. तिसरा म्हणतो, मी शिवाच्या आसपासचाच, पण गोहत्त्येचा गुन्हा हातून घडला त्यामुळे मांगपणा अगर महारपणा जन्माला लागला; बाकी मी त्याच्या भोवतालच्यापैकीच. आणखी एकाचे म्हणणे की, आम्ही शिवाच्या परम भक्तापासून उत्पन्न झालो. एकंदरीने काय की या सर्व कथांतून आपला संबंध शिवाशी लावण्याची त्यांची बुद्धि स्पष्ट दृगोचर होते. ही गोष्ट खरोखरच फार आशाजनक आहे. जे लोक शिवाशी आपला संबंध जडविण्याच्या कामी इतकी आतुरता दाखवितात ते अति प्राचीन काळी केवळ शिवालाच आपलें मुख्य दैवत मानीत असतील अशी कल्पना यावरून मनांत येते. आतां आर्यपूर्व काळांत येथील लोकांचे काय व्याप होते; त्याच्या भाषा, व्यवहार, राज्यपद्धति, उदरभरणाची साधनें कशी होती; ते कोणाला देव मानीत; बाहेरून आलेल्या शूर तेजस्वी व रूपसुंदर अशा आर्यांना आपल्यांत समाविष्ट करून घेण्याचा वकूब त्यांच्या अंगी काही बाबतीत तरी होता की नाही इत्यादि बाबीसंबंधानें इतिहास निश्चयाने असें कांहींच सांगत नसल्यामुळे या दोन विषम संस्कृतींचा परस्परसान्निध्यांत संख्यसंबंध आणि ऋणानुबंध कितपत झाला यासंबंधानें हमखास असे विधान करणे थोडे धाडसाचे वाटेल. पण विस्मृतीच्या या दाट जंगलाच्या झालरीवर शोधकांनी जो साधारण का होईना पण उजेड पाडला आहे त्याच्या आश्रयाने आंत जाण्याला पुसट पुसट पाऊलवाटा दिसतात. त्यांवरून जावयाचे म्हटले तर तत्कालीन अनार्य प्रजेंत शिवाला दैवत मानण्याची बुद्धि असावी असें अनुमान करावेसं वाटते. 'जसे भक्त तसे त्यांचे देव' या म्हणीतील स्वारस्य येथे चांगले प्रत्ययास येऊन लोकांवरून दैवतांविषयी अनुमान करण्यांत चूक होणार नाहीसे वाटते. रामायणमहाभारतादि ग्रंथांत या दोन लोकांच्या एकमेकांशी झालेल्या चकमकींची जी कथांतर्गत वर्णने आहेत त्यावरून अनार्यांची स्वरूपें, त्यांच्या प्रवृत्ति याविषयी बरीच माहिती मिळते व तीवरून पाहतां भक्त व दैवत यांच्यांतील ताळमेळ अनुमानप्रवर्तक होतो.
 शिवाचे ध्यान व परिवार ही मोठी बोधक आहेत. त्याच्या गळ्यांत 'नररुंडमाला' आहे आणि त्याच्याभोवती 'भूत-पिशाच्च ' इत्यादींचा मेळा आहे. विशाल नेत्र, गोरापान रंग, उंच नाक आणि बुद्धिवैभव इत्यादींनी युक्त अशा आपल्या रूपाशी मूळच्या लोकांची रूपडी तोलून पाहून स्वतःला ' नर ' शब्दाने व तदितरांना ' वा-नर ' म्हणजे ' कदाचित माणूस ' शब्दाने आर्यांनी संबोधिले असावे. विजेत्या रूपसंपन्नांनी जित अशा रूपहीनांना तिरस्कारव्यंजक नांवे द्यावीत हे साहजिक आहे. मग त्या जितांच्या अंगी काही चांगले गुण असोत वा नसोत. आतां या ' नरां ' नी चोहोकडे कबजा घेण्याचे काम सुरू केल्यावर प्रत्येक ठिकाणी त्यांना कोपराने खणण्यासारखी मऊ जमीन सांपडली असेल असें नाही. कितीहि असंस्कृत असले तरी या ' भूतपिशाच्चवानरांच्या ' अंगी झगडण्याचे सामर्थ्य असलेच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या शत्रूच्या घोर कत्तली करून विजयोत्साहाचे चिन्ह म्हणून ' नरां ' च्या मुंडक्यांची माळ आपल्या दैवताला वाहिली असेल अगर त्यांच्या पुढाऱ्याने आपल्या गळ्यात बेहोष आनंदाच्या भरांत ती घालून नृत्य केलें असेल. उपऱ्या उपटसुंभांची दाणादाण करणारा असा हा पुढारी त्यांना प्रिय अथवा दैवतसम वाटावा यांत काय नवल ? शत्रूच्या मुंडक्यांचे बुरुज बांधणे आणि त्यांची उडविलेली डोकी भाल्यावरून मिरविणे हे आधुनिक इतिहासांतील प्रकार वाचले म्हणजे तितक्या भूतकाळी शत्रूच्या रुंडमाला धारण करण्याची हौस शूरांना असेल यात शंका नाही.
 हा प्रकार इतका झाला की, नररुंडमाला ही शिवाची निशाणी झाली. त्याचा वेष तर डोंगरी तिरंदाजीला अनुरूप आहे. वाघ, सिंह व हत्ती अशा हिंस्त्र अथवा धिप्पाड पशुंना सहज गारद करून त्यांची विशाल व उबदार चामडी म्हणजे 'चर्में' त्याने आपल्या पुष्ट बाहूंवर टाकून दिली आहेत. त्याच्या भक्तमंडळाचा म्होरक्या अथवा त्याचा पट्टशिष्य म्हणजे आर्यांचा कट्टा दुष्मन् जो रावण तो होय. त्याचे या भक्तावरील प्रेम पुराणप्रसिद्ध आहे. संतापाच्या भरांत शिवाने आपला लिंगच्छेद करून सरोवरांत दडी मारल्यावर आपल्या दैवताची उरलेली खूण या पराक्रमी भक्ताने जपून ठेवण्यासाठी आपल्या दक्षिण दिशेकडील घराकडे नेली आणि त्याची पूजा मनोभावे सुरू केली. ही पूजा दक्षिणभागाला सर्वत्र पसरली आणि लिंगपूजा आर्यांनी अनार्यांपासून घेतली हा तर विद्वानांचा सिद्धांत आहे! युरोपियन वसाहतवाल्यांच्या कदाचित् उघड्या झालेल्या मजेदार तांबूस वर्णाच्या मनगटाकडे पाहून काळ्या रानटी स्त्रिया एकमेकींकडे साश्चर्य पाहूं लागल्या हे वाचले म्हणजे, दुर्दैवामुळे रानावनांत भटकावे लागलेल्या भीमाचे आणि रामाचें तें नयनमनोहर आणि शिवाय राजतेजाने झळकणारे रूप पाहून हिडिंबा आणि शूर्पणखा या रानटी स्त्रियांना अभिलाषबुद्धि उत्पन्न व्हावी हे साहजिक दिसते. पण अनार्य स्त्रियांना जसा आर्य पुरुषांचा तसा अनार्य पुरुषांना आर्य स्त्रियांचा मोह पडत असला पाहिजे. दुर्बलांना केवळ इच्छा करण्यापलीकडे काहीच करता येत नसेल; पण रावणासारखे जे जाडे पराक्रमी त्यांनी ठिकठिकाणच्या सुंदर स्त्रिया आपल्या अंतःपुरांत सामील केल्या. हे रावणासारख्या धटिंगण भक्ताला सहजच शोभले. पण शिव हा भक्तापेक्षां आधिक गुणाढ्य असेल आणि हिमालयाच्या आसपासच्या वस्तीने गौरवर्णहि असेल. त्याला हिमालयांतील आर्य दक्षाची कन्या पार्वती भाळली. शिव असेल गुणी, बिनविशोभित; पण म्हणून आर्य दक्षाला हे कसे आवडावें ! हाबसाणाचा राजा उत्तरेकडे राहून कांही उजळला म्हणून त्याला भाळलेली आपली पोर जर्मन सम्राट् काय जवळ करील ? दक्षाने पार्वतीला माहेरसुद्धा दूर केलें. लग्नकार्यातसुद्धा तो तिला मूळ धाडीना, जामातांना निमंत्रण तर दूरच राहिले. फुणकारा लागलेल्या स्वाभिमानाने शिव वेडावून गेला आणि त्याने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. अनार्य लोकांनी आर्यांच्या यज्ञावर नजर राखून त्यांचा विध्वंस केल्याच्या तक्रारी ब्राह्मणांनी आपल्या राजकडे नेल्याच्या कथा पुराणभर पसरल्या आहेत. यज्ञविध्वंस ही खणखणित खूण शिवस्वरूप यथार्थ दाखविते. शिवाचे मुख्य शत्रु म्हणजे काम आणि क्रोध. भक्तराजाच्या ठिकाणी त्याच गोष्टींचे वास्तव्य. क्रोध असा अनावर की, एकदां सेवा चुकली की अरिष्ट ओढवावयाचें ! आणि कामाविषयीं तर लिहावयासच नको. शेवटी चिक्कू बापाचा मुलगा उधळ्या निघावा त्याप्रमाणे बापाचा हा कैफी लंपटपणा पाहून वडील मुलाने शिसारी खाल्ली आणि 'मला जी स्त्री पाहील ती सप्तजन्मी विधवा होईल' असा शाप उच्चारून तो भुईआड तोंड करून राहिला ! वरील प्रवृत्तीचा इतका गडद रंग मनाला असणे हे मनाच्या उंचीचे मापक असते. अनार्यांनी आपला देव असाच रंगविला.
 पण हे कसेहि असले तरी शिव म्हणजे 'नरां' ना मोठ्या वचकांत ठेवणारा अनार्यपक्षपाती होता यांत शंका नाही. दोन प्रकारचे लोक शेजारी शेजारी आल्यावर आणि कोणीच कायमचा नष्ट होण्यासारखा नाही हे ठरल्यावर पहिल्या वैरभावाचा जोर नरम पडूं लागला; आणि एकमेकांशिवाय गत्यंतर नाही असें राष्ट्रीय संसारांत
दिसू लागले. अर्थात् देवघेवीशिवाय शेजारधर्म कधीहि संभवत नसल्यामुळे ती सुरू झाली, सामान्य लोकांनी लिंगपूजा कालेकरून पतकरली आणि वेदांतील रुद्रकल्पना शिवाशी संलग्न करण्यांत आली. ही देवघव इतकी झाली की, शिव मोठा की विष्णु मोठा असेंहि तंडण सुरू झाले ! पण सर्व उदात्त कल्पना एक ठिकाणीच भेटतात ही अत्यंत विशाल तत्वभावना रूढ होऊन तोही तंटा मिटला. पण इतके झाले तरी शिवाची संहारबुद्धि नरांच्या मनांत रुतून बसली होती तीमुळे शेवटी प्रळयाचे आणि संहारकाच काम त्रयीपैकी महेशाकडेच राहिले. शिवालाहि आर्यकुलोद्भव रामचंद्राच्या चरिताने शांति प्राप्त झाली आणि लोकांनीहि शिवस्वरूप सर्वत्र पूजनीय मानले, ते इतकें की आज अवघ्या भरतखंडांत यात्रेचें आदिस्थान जी काशी त्या ठिकाणी शिवाचे लिंग आहे. उंच उंच टेकड्यांचर शिवाची लिंगे स्थापन करून हिंदु लोक त्यांची पूजा आज सहस्रावधि वर्षे करीत आहेत. सर्व पुराणकथांचा आणि तत्सम वाङ्मयाचा निर्झर शिवाच्या निर्मल वाणीतून उमटला आहे. आणि औदार्य, धीरोदात्तता, गांभीर्य, ऋजुता इत्यादि गुणांचे निवासस्थान म्हणून त्याची आराधना सर्वत्र होत आहे. अनार्यांच्या देवतेचा आर्यांवर हा केवढा विजय ! उभय लोकांच्या धार्मिक कल्पनांच्या दोरकाचा ग्रंथी म्हणजेच हे शिवलिंग होय. बाहेरच्या जड संसारांत ज्याप्रमाणे, त्याप्रमाणेच या अवश्य आणि केवळ कल्पनागम्य मुलखांत आर्यांनी आणि अनार्यांनी हातात हात घातले व शेजारधर्म कायमचा पतकरला. आपण हिंदु लोक धर्मकल्पनांत अथवा देवताकल्पनांत अत्याग्रहखोर नाही. आपल्या अंगी संग्रहक्षमता फार आहे. भूतकालाकडे तोंड करून कालाची ही विशाल नदी पाहिली म्हणजे तिला शेकडों वाकणे दिसतात. पिराची पूजा घेतली, राम रहिम एक असा उपदेश केला, बुद्धाला अवतार
ठरविले, आहिंसा घरांत घेतली, नागपूजा स्वीकारली, लिंगपूजा मानली असे परत जातां जातां वर सांगितलेल्या विस्मृतीच्या अरण्यांत कालनदीच्या काठी शिवमंदिरांत त्याच्याच साक्षाने आर्य व अनार्य यांची दिलजमाई होतांना दिसली. हरिभक्तांनी या लोकांना वर ओढले. त्याच्या आधी रामानुजासारख्यांनी देवळाची द्वारे त्यांना खुली केली, व त्याहि मागें शिवपूजा उभयतांनी मानून एकीचे बीज घातले; असा हा अत्यंत मंगल प्रसंग आहे. तो मनांत कल्पून त्यावर वाङ्मयाचा मोहोर कितीहि वाहिला तरी पुरा पडणार नाही असे त्याचे महत्त्व आहे.
 उभय लोकांना समानाधिष्ठान काय असेल ते शोधावे हे माझे मनोगत चाणाक्षांना सहज दिसण्यासारखे आहे. या बाबतींत रा.चिंतामणराव वैद्यांच्या उपसंहारांतील १२ व्या प्रकरणांपैकी शिव व विष्णु हा भाग अवश्य वाचावा. आम्ही त्यांचा शिव घेतला व आमचा विष्णु-विठु विठोबा त्यांना, अर्धवट का होईना, दिला अशी ही देवघेव आहे.
 आता उरल्यासुरल्या शंका-कुशंकांना उत्तरे देऊन उपसंहारभूत चार विचार लिहून आटपते घेतों.
 पुष्कळांना असे वाटते की, हे अस्पृश्यतानिवारणाचे खेकटे आपण होऊन तुम्ही कां पिकवीत बसता ? याला दोन उत्तरें आहेत. एक-केवळं आम्ही पिकवितो हे खोटें आहे. पिकविले असते तरी वहावेचेच काम झाले असते; पण खुद्द अस्पृश्यांना आपली हीन स्थिति कळत नाही असें आक्षेपकांना वाटते काय ? स्वतः ते ओरडत उठलेच आहेत. दुसरे असे की, ते उठत नसले आणि आम्ही आहों तेच बरे आहो असे जरी त्यांना वाटत आहेसे मानले तरीसुद्धा आम्ही त्यांना आपण होऊन उठविले पाहिजे. कारण असलें मनोदौर्बल्य राष्ट्राच्या नवीकरणाच्या आड येईल. त्यांना
स्वाभिमान शिकविलाच पाहिजे. पुष्कळ गांव-पुढाऱ्यांच्या पुढे या विषयाचा पाढा वाचला म्हणजे ते उद्गारतात, ' खरे आहे, पण समाज तयार नाही.' समाजाच्या बिनतयारीवर सगळा डाव कोलवून देणे मोठे सोयीचे असते. पण त्यांनी इतकेंच ध्यानात घ्यावे की, हा मुद्दा राजकीय चळवळीच्या वेळी आपण पुढे आणतों का, आणि एखाद्याने आणला तर त्याची संभावना आपण कशी काय करतो? तयारी नाही असा वहीम असला तर आपण तयारीच्या मागे लागतो. तसेंच येथे. आपल्याला ' खरे आहे ' असे वाटत असल्यास समाजाला ती शिकवण सुरू करावी. नाही तर समाजाने म्हणावें, पुढारी बोलत नाहीत आणि पुढाऱ्यांनी म्हणावें, समाज तयार नाही. म्हणजे या चक्रांतून सुटावयासच नको. कोणी म्हणतात 'हे लोक मोठे घाणेरडे असतात. जवळ कसे करावेत ?' येथेहि वरचेच चक्र लागू आहे. दूर ठेवले म्हणून घाणेरे का घाणेरे म्हणून दूर ठेवलें ? जरा चार माणसांत घ्या आणि मग बघा तसेच घाणेरडे राहतात का? ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे की, त्यांच्यांतील प्रतिष्ठित माणसें चांगल्या संगतीत खात्रीने अधिक स्वच्छ होतात. कोणाची अशी तक्रार आहे की, हे लोक, म्हणजे त्यांच्यांतले बोलके, भारी शिव्या देतात. होय, हे खरे आहे. पण असें ध्यानांत व्यावयास पाहिजे की, त्यांच्या स्थितीत आपण असतो तर कसे काय केलें असतें? चाकावर बांधले जाऊन फटके बसत असलेल्या एका कैद्याचे किंचाळणे ऐकून शेजारी उभे राहिलेले एक सतारमास्तर म्हणाले, 'बाबा, तुझे हाल कबूल आहेत. पण तुझे किंचाळणे मोठे कर्कश लागते' तसाच हा प्रकार आहे. असे वाटते की, हालांतून काढण्याच्या कामाला आपण लागलो तर त्यांच्या शिव्या बंद होतील, कारण त्यांना तितपत कळते, निदान कळावे. असो. कोणा तात्विकांचा युक्तिवाद असा आहे की, यांना राष्ट्रीय चळ वळीत गोवून टाकावेत म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न आपोआपच सुटेल. या कोटीवर मागे एके ठिकाणी उत्तर आले आहे.पण नवीन हवेंच असल तर बर्कच्या शब्दांनी अस्पृश्याला असे म्हणता येईल की, आमच्या मनांत जर दशप्रीति उत्पन्न करावयाची असेल तर आमचा देश अगोदर प्रीतियोग्य झाला पाहिजे. स्वदेशप्रेम उत्पन्न होण्यासारखी स्थिति अस्पृश्यांच्या बाबतीत अजून नाही, ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यांच्या दैन्याचे वर्णन केले म्हणजे कोणी म्हणतात की, कित्येक वरिष्ठ लोकांपेक्षा त्यांची सांपत्तिक स्थिति चांगली आहे. असे असेल तर ' इतपत चांगल्या माणसांना सुद्धा दूर ठेवणे सामाजिक दृष्ट्या परवडतें ना !' असे परत विचरता येण्यासारखें आहे. कोणी कोणी त्यांना ' साहेबाच्या बशा चाटणारे ' म्हणून हेटाळतात. हे तर जखमेंत मीठ भरण्यासारखे निर्दयपणाचे आहे. पोट प्रत्येकाला आहे. आणि त्याची खळगी भरण्यासाठी जिवाची काय कुतरओढ होत आहे ती वरील आक्षेपकाच्या वाटणीला आली नाही असे दिसंते. ह लोक सरकारशी मिसळतात ' म्हणून कोणाचा घुस्सा आहे. याला उत्तम तोडगा म्हणजे त्यांना आपल्यांत घेणे येवढाच आहे. ' ते अमुक एक प्रकारच्या पिसाटांची भाषणे चविष्टपणाने ऐकतात ' असाहि आरोप आहे. यावर इतकेच म्हणता येईल की, तुमचीहि भाषणे त्यांना ऐकवा, ते माणसांतून उठलेले नाहीत, सद्विचार कानी पडल्यास त्यांना तो आवडत नाही असे मानणे चूक आहे, त्यांची आणि तुमची कधीच गांठ पडत नाही. अर्थात् ज्यांची पडते त्यांचे ते ऐकतात. मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तुझ्याशी कोणी बोलला तर मला कसेसे वाटेल असे म्हणून कसे चालेल ? तात्पर्य काय की, अशी उडवाउडव करून चालावयाचे नाही. ज्याला ज्याला राष्ट्रहिताची आणि धर्मकल्पनेची जाणीव असेल व त्याने जबाबदारीने या प्रश्नाचा विचार करावा आणि अस्पृश्यता काढावी.
 अस्पृश्यांना आमच्या धर्मात खसखशीतपणे अंतर्भूत केले पाहिजे. डॉ. कुर्तकोटी यांनी गेल्या दोन हिंदुधर्मपरिषदांत जे यश संपादिले आहे ते उमेदकारक आहे. ठराव पास झाले, पण आता पुढील विनंति ही की, या ठरावाला अनुरूप उपदेश करणारे प्रचारक श्रींनी चोहोकडे धाडले पाहिजेत. हक्क दिल्याच्या गौरवांत परिस्थितीचा पेंच ओळखल्याचे श्रेय आहे, पण त्याप्रमाणे घडवून आणण्यासाठी आपण होऊन यत्न केल्याने ती गोष्ट धर्मासाठी मनापासून पाहिजे असा अर्थ होईल. ' तुम्ही जन्मानें नीच आहांत ' हा उपदेश बंद करण्याचे आज्ञापत्र श्रींनी काढले पाहिजे. या सर्व कामांतील अवघडपणा माहीत असूनसुद्धां श्रींच्या कर्तबगारीकडे पाहून तें त्यांजपुढे मांडावेसे वाटते. तसेंच भागवत-धर्मियांनी आपली कोंडाळी फोडली पाहिजेत, व खरोखरीची धार्मिक उदारबुद्धि दाखविली पाहिजे. या बाबतीत त्यांच्याइतका अधिकार आज दुसऱ्या कोणालाहि नाही. औदायांत भागवतांच्यावर सरशी आजपर्यंत कोणी केली आहे ? शैवांनी एक सुप्रसिद्ध शिवाचे देवालय व भागवतांनी पंढरीचे देवालय कायम करून तेथें या लोकांना दर्शनासाठी तरी आज आंत घ्यावे. ऐक्यवर्धनाला या ठिकाणासारखी अत्यंत पवित्र जागा दुसरी कोणती कल्पिता येईल ? निराळी देवळे बांधावयाची कल्पना पुष्कळ दिवसांची आहे, पण त्रैवर्णिकांच्या धर्मबुद्धीवर अजून इतपत विश्वास आहे की, ते अजून औदार्य स्वीकारतील. असे वाटते. नुसत्या शंकराचायांच्या आज्ञापत्राला कोण विचारतो? हे युग एकानें बोलून सगळ्यांनी ऐकावयाचे असे नाही. सगळ्यांनी बोलावयाचे आहे. सर्वांनी पाठिंबा दिला तर आचार्याचे काम सुकर होईल. निराळे देवालय बांधणे म्हणजे त्रैवर्णिकांच्या हट्टाचे स्मारकच होणार ! म्हणून पुनः त्यांच्या धर्मबुद्धीला भीड घालावीशी वाटते. आधींच धर्म पुरेसा विदीर्ण झालेला नाहीं काय कीं त्याची आणखी ओढाओढ करावी? इतक्यानेंहि भागेना तर मग बारा वाटा मोकळ्या आहेतच; जें झेपेल तें करण्यांत येईल. ' देऊळ, धर्म ' असे शब्द बोलले म्हणजे सुशिक्षित, उघड किंवा झाकून, तिरस्कारानें हंसतो. पण असल्या लोकांचा एक अगदी पातळ पापुद्रा आहे. खरा विराट समाज पंढरपूर, आळंदी अशा ठिकाणीं जमतो. तेथील अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवला म्हणजे समाजानें सोडविला असा अर्थ होईल. सुशिक्षित काय बेफिकीर आहे. महार देवळांत आला काय किंवा न आला काय तो ही गोष्ट तितपतच मानतो, म्हणून ज्यांना त्या स्थलाचे महत्व आहे त्यांनी हा प्रश्न सोडविला म्हणजे तो सुटला असा अर्थ होईल.

 अस्पृश्यांना इतकेंच सांगावयाचें कीं, समाजापासून आधींच असलेलें अंतर ज्या ज्या कृत्यांनीं जास्त होईल तीं तीं होतां होईतों त्यांच्या हातून न झालेली बरी. इतर कोणल्याहि आश्रयाच्या अभावी त्यांनी सरकारच्या पदरीं जाऊन पडावें हे अगदीं साहजिक आहे.पण तेथे असतांना सुद्धां आपल्याला स्वतःच्या समाजातच चिरकाल नांदावयाचें आहे हें त्यांनीं विसरतां उपयोगी नाहीं साहेब काय आज आहे उद्यां नाही; या काळाच्या उलथापालथीत असा प्रकार केव्हांना केव्हां ठेवलेलाच आहे. तसेंच स्वराज्यार्थ होत असलेल्या झगड्याचा फायदा त्यांना निश्चयानें होणार आहे.त्यांनी जागरूकता मात्र अखंड ठेवली पाहिजे. अस्पृश्यांचें हितच जर सरकारास साधावयाचे असते तर निदान चांभारांना आणि मांगांना त्याच्या विद्या आधुनेिक पद्धतीने शिकवून परदेशी जात असलेला कोट्यवधि खजिना त्यांच्याघरात घालता आला असता. पण तो सर्व पैसा युरोपीय मांगाचांभारांच्या घरी जात आहे. असो. देवळांत जबरदस्तीने शिरण्याचा मोह त्यांनी आवरला पाहिजे. येथे काही शक्तीचे प्रदर्शन नाही. जबरीने गेलांत तर तें स्थल अपवित्र झालेसें समजून इतर लोक तेथे जाण्याचे बंद करतील, किंवा तुम्हाला बाहेर काढून पुनः शुद्धिसंस्करणे करतील; म्हणजे काय की, तुम्ही पुनः दूरच्या दूरच. पण ' आम्हांला आंत घ्या ' हा लकडा मात्र निकडीने लवता येईल तितका लावावा. कारण ही मागणीच अशी आहे की, न देणारा मनच्या मनांत सारखा ओशाळा राहील. अस्पृश्यांची नांवें शिवीवाचक झाली आहेत. ती त्या अर्थाने समाजानें अतःपर उपयोजू नयेत. पण अस्पृश्यांनीही आपल्या सत्प्रवृत्तीने व गोड वाणीने समाजाच्या या प्रयत्नाला मदत केली पाहिजे. एखाद्याला अमुक एक गोष्ट तूं कर म्हणून पुनः पुनः सांगितले तर कार्यातीचे उदात्तपणा आव्हान त्याच्या उदार भावनांना पोंचून तो तें कार्य करूं लागेल; पण हे जसें एक प्रेरक कारण होते तसें तूं न करशील तर पेंचांत सांपडशील ' असे त्याला पटवून देणे हेहि एक दुसरे कारण होते. अस्पृश्यतरांना एक पेंच पडणार आहे. यापुढे सगळे राज्य संख्येवर रचले जाणार आहे. ज्या ज्या मानाने संख्येचें बळ एखाद्या समाजाचे जास्त त्या त्या मानाने राज्यशकट हांकण्याचा अधिकार त्याला जास्त असे होणार आहे. या दृष्टीने वाचकांनी एकंदर जातीच्या संख्येचे आंकडे नीट ध्यानात घ्यावे. आपल्या प्रांताला ३२||| लक्ष मराठा आहे, २४||| लक्ष कुणबी, २० लक्ष कोळी, १४||| लक्ष महार ३ लक्षांवरचांभार, २||| लक्ष मांग , १८४ हजार बेरड, १०२ हजार वडार, ९३ हजार भंगी, ९१ हजार कातकरी अशी प्रजा आहे. नुसता धनगर जवळपास ८|| लक्ष आहे. ब्राह्मण १०६७ हजार असून कोकणस्थ अवघा ११० हजार आहे ! पारशांपेक्षां कातकरी जास्त आणि रामोशी सारस्वतांपेक्षा थोड्याशा हजारानी कमी. कोंकणस्थांना राज्यसूत्र कित्येक वर्षे ज्या कारणांनी चालविता आली त्याच कारणांनी साहेब राज्य करतो. प्रजा अजाण आहे. त्या सर्वांना उठविले पाहिजे. हा भिन्न भिन्न लोकांचा रगाडा एकराष्ट्र कसा करता येईल ? प्रस्तुत फक्त अस्पृश्यांवरच दृष्टि ठेवून विचार कर्तव्य आहे. लोकांचे एकीकरण, भौगोलिक हितैक्य, संस्कृतीचा समानपणा, रक्तसंबंध, आणि परस्परावलंबन यांनी संभवते. अस्पृश्यांशी स्पृश्यांचे भौगोलिक हितैक्य आहे. हिंदुस्थानांत फार जाति आहेत; पण त्यांची वाटणी, ऑस्ट्रियांतल्या भिन्न भिन्न जातींच्या वाटणी प्रमाणे प्रांतवार न होता, म्हणजे आसामांत सगळे ब्राह्मण, मद्रासेकडे सगळे धेड, अशी न होता, प्रत्येक गांवांत हरजातींचे लोक आहेत असे दिसेल. त्या सर्वांचा मिळून एक गांव होत असल्याकारणाने अगदी शेवटपर्यंत वस्तीच्या दृष्टीने हितैक्य आहिसे दिसेल. ही आशेला जागा आहे. सांस्कृतिक दृष्ट्या पाहतां, भाषा बह्वंशी एक आहे, वाङ्मय कांहीसे त्यांनी उचलले आहे. पूर्वपीठिका मात्र त्यांच्या आपल्या एक नाहीत. पण त्यांचा अंतर्भाव समाजाच्या जुळणीत सांपत्तिक दृष्ट्या झालेला असून, धर्मात भागवत संप्रदाय ही सामान्य भूमिका उभयतांना आहे. रक्तसंबंधाने एकी होणे संभवनीय नाही. शेवटी परस्परावलंबनाने घडणारी एकी शिल्लक उरत. ही संवय आधींपासून आहे. रक्त्तसंबंधाची एकी ज़र संभवत नाही तर शेवटच्या इलाजाचा अवलंब जोराने केला पाहिजे. आम्ही तुम्हाला हवे आहोत, तुम्ही आम्हांला हवे आहांत हा भाव बळाला लावला पाहिजे. सुशिक्षितांनी अस्पृश्यांच्या हरतऱ्हेने उपयोगी पडावे. नवीन गोष्ट सुरू करावयाची म्हटली म्हणजे आपण झुलू लोकांसारखे म्हणजे असंस्कृतांसारखे करूं लागतो. परकीयांनी सांगितलेली साधने उचलतो. तसे न करतां गंजलेली हत्यारे पाजळावीत व अस्पृश्यांना शिक्षण द्यावे. नुसत्या साक्षरतेवर थांबू नये. सद्विचार ऐकवावा व चांगल्या वाचनाची गोडी लावावी दुसरें, युरोपियन संस्कृतीचा उडालेला बोजवारा झाडून सर्व प्रजांच्या कानी घालावा. पण यांत देशाभिमानाचे वेडे वारे नसावें. अभ्यास आणि निश्चितपणा असावा. तिसरें, त्यांच्या स्वभावाचे दैन्य काढावे. तू जन्मानें नीच आहेस असे सांगू नये. त्याने माणूस दिनावतें, मान ताठर करून वर पाहूं शकत नाही. साहेबांचे दास्य करणाराचा तो दास बनतो, मग परक्यापुढे स्वाभिमानाने मान तो कशी उंचावील ? आपलें धर्मज्ञान त्याला द्यावे, आपल्या संस्कृतीत त्याला मिसळून घेऊन तिचा अभिमानी म्हणून रक्षिता बनवावा. ज्याला गमविण्यासारखे काहीच नसतें तो पुष्कळदां नवीन मतांना लवकर वश होतो. विपरीत मते परद्वीपांत चालू आहेत इकडे काळजीपूर्वक लक्ष पाहिजे. चौथे, धंद्याचा बोज वाढवावा. त्याला इतर सर्व बाबतींत मोठेपणा इतरांइतका दिला तर त्याने धंद्याची लाज बाळगू नये. मग तुम्ही त्यांना त्याच घाणेरड्या धंद्यांत ठेवू इच्छितां असा आपल्यावर कारण नसतां आरोप येईल, अशी सूचना या ठिकाणी आपल्याला यश चिंतणारा करील हे खरे आहे. पण भीति वाटते ती ही की, चढाओढीची झटापट सुरू झाली म्हणजे अधिक बुद्धिवान जाति व पैकेवाले अन्य जातीय, या माणसांनी अर्धवट टाकलेले धंदे भराभर पकडतील आणि ही बापडी मिळती भाकरी गमावील. ज्या महारेत्यादीनां जुना कोणताच धंदा उरला नाही, त्यांनी अर्थात् वाटेल ते करावे. असो. क्षत्रिय व ब्राह्मण कितीहि भांडले तरी पूर्वसंस्कृतीचे पाये उभयतांनी भरले असल्यामुळे एकी होईल म्हणून याहि बाबतीत अस्पृश्यांचा नवीन इतिहास व त्यांचे नवीन मन्वंतर सुरू होतांना स्पृश्यांनी त्यांना स्वकीय करून घेण्यासाठी त्यांच्याशी आपली नावें सलग्न करून घ्यावीत. त्यांना आतुरता उत्पन्न झाली आहे. थोडी असली तर लवकरच फार होईल. या आतुरतेच्या प्रसंगी जो उपयोगी पडेल तो प्रेमाचा विषय होईल. हे उघड आहे. शेवटी, तो महद्भाग्याचा प्रसंग केव्हाही अवतरो, त्यांना श्रीविठ्ठलस्वरूप दाखवावे व हिंदुस्थानचा राष्ट्रपुरुष सर्व सामर्थ्यानिशी उभा करावा."
 माहिती पूर्ण व्हावी म्हणून या लोकांच्या वस्तीचे जिल्हावार आंकडे व इतर प्रमुख जातीचे आंकडे पुढे एकत्र दिले आहेत. आंकड्यावरून तौलनिक ज्ञान होऊन विषयाचें खरें महत्व ध्यानांत भरेल. ज्या वाचकांनी हा लेख वाचण्याचा अनुग्रह मजवर केला असेल त्यांचे स्वतःवर व अस्पृश्यांवर सुद्धा फारच उपकार झाले आहेत. माझी काही विधाने चुकीची व अनुमाने धाडसाची असण्याचा पूर्ण संभव आहे. तोल संभाळण्याचा यत्न करून सुद्धां तो न राहिला असण्याचाही संभव आहे; कारण बोलूनचालून माझा ओढा अस्पृश्यांकडचा आहे. विद्वानांनी आणि विचारवंतांनी या विषयांत लक्ष घातले असते तर मला माझें अज्ञान व विचाराचा कोतेपणा समाजापुढे पसरून मांडण्याचा प्रसंग चुकवितां आला असता. पण माझे म्हणणे ठाकूनठोकून नीट करण्याचा यत्न आतां कोणी ज्ञानी माणसांनी केला तर खऱ्या ज्ञानी विचारवंतांना बोलावयास लावल्याचे श्रेय मला लाभेल.
 

 


परिशिष्ट.


विदग्ध वाङ्मय-पुस्तक २ रें,




'अल्ला हो अकबर,कर्तव्य जागृति'

इत्यादि कादंबऱ्यांचे कर्ते

प्रो. ना. सी. फडके, एम. ए.

कृत

कुलाब्याची दांडी!

ही सामाजिक कादंबरी लवकरच प्रसिद्ध होईल.

८ आणे प्रवेश फी भरून कायम ग्राहक होणारांस
पाऊणपट किंमत.

से. वाङ्मय-विहार-मंडळ, पुणे.