आकाश संवाद
(भाषण व मुलाखत संग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in
दुसरी आवृत्ती २०१८
© डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com
मुखपृष्ठ
गौरीश सोनार
अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर
मूल्य ₹१५०१५०/-
ही आकाश भाषिते ध्वनिमुद्रित व प्रक्षेपित
करणाच्या सांगली आणि कोल्हापूर
आकाशवाणी केंद्र संचालक, कार्यक्रम निर्माते
आणि ती ऐकणाच्या श्रोत्यांनाही सस्नेह
अर्पण...!
‘आकाश संवाद'ची पहिली आवृत्ती स्पर्श प्रकाशन, राजापूर जि. रत्नागिरीचे माझे स्नेही व प्रसिद्ध बालसाहित्यिक श्री. मदन हजेरी यांनी काढली होती. दुसरी आवृत्ती अक्षर दालन, कोल्हापूरचे अमेय जोशी काढत आहेत. नव्या आवृत्तीस कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्री. श्रीपाद कहाळेकर यांनी माझ्या घेतलेल्या तीन मुलाखतींचा समावेश नव्याने करणयत आला आहे. त्यामुळे मजकुरात नुसती ती भर नि वाढ नसून नव्या विषयांचा नवा विचार म्हणून त्यांचे महत्त्व आहे. नवा मजकूर वाचकांना भावेल असे वाटल्यावरून तो सुधारित आवृत्तीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ‘आकाश संवाद'चे स्वरूप केवळ भाषण संग्रह न राहता आता ते भाषण व मुलाखत संग्रह झाले आहे.
दूरदर्शनचा प्रभाव दृक्-श्राव्य माध्यम म्हणून वाढत, विस्तारत असला तरी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाच्या धारावाहिक कथा व कार्यक्रम हे मूल्य विचार रुजवितात असे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी श्रव्य माध्यम म्हणून मूल्यवत्ता टिकवून आहे. त्यामुळेच श्रोत्यांना संस्कार नि दृष्टी देण्याची भूमिका टिकून आहे.
श्राव्य भाषणे लिखित रूपात सादर करायची ती अधिक गांभीर्याने विचार कृतीत उतरावे म्हणून. ऐकण्याचा प्रभाव अल्पकालिक असतो. लिखित वारंवार संदर्भसाठी, पुनर्विचारासाठी उपयोगी पडते. ‘आकाश संवाद'चा खटाटोप त्याच एका उद्देशाने केला आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे
सन १९६0 सालचा तो काळ असेल. मी कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये शिकत होतो. तिथला आमचा सारा परिपाठ हा रेडिओ टाइम' असायचा. म्हणजे रेडिओवर सकाळी सिग्नेचर ट्यून सुरू झाली की आम्ही उठायचो. सकाळी सातच्या बातम्यापर्यंत मुखमार्जन, प्रातर्विधी, स्नान इ. आटोपून आम्ही कवायत, प्रार्थनेसाठी जमत असू. आठच्या बातम्या लागल्या की आम्हास अभ्यासास बसावे लागे. दहाचा कार्यक्रम संपला की भोजन. अकरा वाजता शाहू मिलचा भोंगा होत असे. मग आम्ही शाळेस जात असू. सायंकाळी शाळेतून आलो की सहावाजता बातम्या सुरू झाल्या की आमची सायंप्रार्थना, हजेरी इ. चाले. सातच्या प्रादेशिक बातम्या व त्यानंतरचे बाजारभाव ऐकत आमचे सायंभोजन होत असे. रात्री आठच्या बातम्यांना अभ्यासास बसावे लागे ते रात्री दहाची गाणी लागेपर्यंत. मध्ये बुधवार एक तासाचा अपवाद असायचा. बिनाका गीतमालेचा अमीन सयानीचा आवाज एक गारूड होतं. शिवाय ‘पहिले पायदान का गीत' त्याची ओढ, पैज, चर्चा सारे चालायचे. तो काळच असा होता की सा-या समाजाचे घड्याळ रेडिओ होते.
रेडिओचे कार्यक्रम, भक्तिगीतं, देशभक्तीपर गीते, मुलाखती, भाषणे, कृषी वार्ता, महिला जगत, रजनीगंधा, शास्त्रीय संगीत, वाद्यांची जुगलबंदी, राष्ट्रीय चर्चा, बातम्या, विविध भारती, बेला के फूल, लोकसंगीत, श्रुतिका, युववाणी या सर्वांनी पिढ्या घडवण्याचं काम केले. दूरदर्शन आले, वाहिन्या आल्या तरी माझ्या कानांशी जडलेली रेडिओची मैत्री अजून दूर झालेली नाही. असे का व्हावे? एक तर हा श्रवण संस्काराचा अभाव असावा. मी पाळण्यात पडून असतानाही म्हणे आमच्या आश्रमाच्या मुलांच्या वॉर्डात रेडिओ सुरू असायचा. त्याची म्हणे आम्हाला इतकी सवय असायची की तो लागल्याशिवाय आम्ही झोपत नसू म्हणे. ती सवय आज वयाच्या ६७ व्या वर्षीही टिकून आहे. ‘शमा ए गझल' ऐकल्याशिवाय वा रजनीगंधा ऐकल्याशिवाय झोप येत नाही व मग डोळे किलकिले होऊ लागतात. 'मॉर्निग मंत्रा' वा 'भक्तिसंगीत कानावर पडावेच लागते. रेडिओ माझा एकांतपणाचा सोबती होय. मला एकटे राहायला, विचार करायला, वाचायला, रेडिओ ऐकायला मनस्वी आवडते. माझे एक न्यूरो सर्जन मित्र आहेत. त्यांना गुंतागुंतीचे ऑपरेशन करताना रेडिओ लागतो. ही काय किमया आहे रेडिओची? तर तो एक अंतर संवाद आहे. पण तो जुळून येण्यासाठी तुमच्यात एकतानता हवी व एकाग्रताही!
अशा रेडिओवर मी लहानपणी भाषण ऐकत असे वा 'बालसखा' कार्यक्रम ऐकत असे. शालेय कार्यक्रम ऐकायचो तेव्हा आपलाही आवाज असा ऐकता यावा, भाषण करावे, नाटक करावे, आपली कुणीतरी मुलाखत घ्यावी असे वाटायचे... पण ते एक बाल स्वप्नरंजन होते. त्याला मूर्त स्वरूप आले ते १९८२ ला. त्याचे असे झाले, मी पीएच्. डी. होऊन कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो होतो. शिवाजी विद्यापीठात एम. ए. ला हिंदी शिकवत असे. मी ज्या महावीर कॉलेजमध्ये नोकरीस होतो तिथले प्रा. वैजनाथ महाजन हे मराठीचे प्राध्यापक नुकतेच सांगलीस गेले होते. सांगली आकाशवाणीचा एक कार्यक्रम कोल्हापूरला होता. त्याच वेळी केशवराव भोसले नाट्यगृहात ज्ञानपीठ विजेते साहित्यिक शिवराम कारंथ एका हिंदी नाटक विषयक इतिहास ग्रंथ प्रकाशनार्थ आलेले. तो कार्यक्रम ऐकण्यासाठी सांगली आकाशवाणीचे तत्कालीन संचालक हरिश्चंद्र जाधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पात प्रा. वैजनाथ महाराज यांनी हरिश्चंद्र जाधव यांना माझ्या परिचय करून दिला आणि म्हणाले की, “तुम्हास वक्ता पाहिजे होता ना? हा घ्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा. साहित्य, समाज कोणताही विषय यांना द्या. ते चांगले भाषण करतील." त्या वेळी सांगली आकाशवाणीवरून ‘धर्म आणि एकात्मता' विषयावरील व्याख्यानमाला सुरू होती. हरिश्चंद्र जाधव म्हणाले, “तुम्ही ‘महानुभाव पंथ आणि एकात्मता' विषयावर भाषण लिहून पाठवा. आपण ते लावू.' आज मला चांगले आठवते की, मी हिंदीचा प्राध्यापक असल्याने मला महानुभाव पंथ, चक्रधर स्वामी, लीळा चरित्र याबद्दल त्या क्षणीतरी भाषण देण्यइतकी माहिती नव्हती. पण रेडिओवर भाषण करण्याची मिळालेली संधी सोडायची नाही ठरवून भाषण तयार केलं. पाठवले. त्यांचे काँटॅक्ट लेटर आले आणि मी ध्वनिमुद्रणासाठी थेट तुंगच्या प्रक्षेपण केंद्रावर धडकलो. तिथे गेल्यावर कळले की आकाशवाणी केंद्र मार्केट यार्डच्या एका गोडाऊनमध्ये आहे. केंद्र तरी कसले, एक छोटी खोली. टेबलावर स्पूलचा टेपरेकॉर्डर. बाहेर ट्रकचे हॉर्न वाजायचे. खिडक्या लावून रेकॉर्डिंग पार पडले. वेलणकर नावाचे गृहस्थ होते रेकॉर्डिंगला. खोपडे म्हणून सहायक होते. त्यांना माझे हे पहिले भाषण असूनही आवडले. त्यांनी एक प्रत मागून घेतली. ते भाषण त्यांनी दहिसाथ, अमरावतीहून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक विश्वमंगल'च्या दिवाळी अंकात (४ नोव्हेंबर १९८२) प्रसिद्धही केले. रेडिओच्या भाषणाला मानधन असते, पण भाषण प्रकाशित झाल्यावर ते मिळते, हे या भाषणाने मला दिलेले शहाणपण व पहिली बौद्धिक कमाईपण! आणखी धक्का म्हणजे भाषणाचे पुन:प्रक्षेपणही झाले.
या तिहेरी सुखद धक्क्यांनी मला आत्मविश्वास दिला नि मी रेडिओ स्टार' होऊन गेलो. मराठी, हिंदी अशी पन्नास एक भाषणे मी सहज दिली असतील. त्यात 'चिंतन'क्षम छोटी भाषणे होती. बारा-पंधरा मिनिटांची दीर्घ भाषणेही. काही भाषणे तर मी ध्वनिमुद्रण न करता थेट दिली. भारतरत्न भीमसेन जोशी यांचे बंधू हम्पीहोली त्या वेळी सांगली आकाशवाणी केंद्राचे संचालक म्हणून होते आणि सुभाष तपासे कार्यक्रम अधिकारी. त्यांनी माझी अनेक थेट भाषणे प्रक्षेपित करून जो विश्वास दाखवला व माझ्या वक्तृत्वाला दाद दिली त्याचे हे कृतज्ञता स्मरण!
मी रेडिओवरून साहित्य, भाषा, सामाजिक प्रश्न इ. संबंधी भाषणे दिली. रेडिओवरची भाषणे म्हणजे वैचारिक लेखच असतात. विषय आकाशवाणी देते. विचार करायला पुरेसा वेळ असतो. मी वाचून, विचार करून भाषणे तयार करायचो. माझी भाषणे कधीच संपादित झाली नाही. काना, मात्रा, वेलांटीचा फरक न होता सारी भाषणे प्रक्षेपित झाली. त्यातून माझा एक श्रोतृवर्ग तयार झाला. 'सप्रेम नमस्कार' कार्यक्रमात अनेक श्रोते अभिप्राय पाठवत. आकाशवाणीत गेलो की ते वाचण्यास मिळायचे. रेडिओचे सारे अधिकारी, संचालक, अभियंता ऋजू व्यक्तिमत्त्वाचे होते. अनिल कोरे, प्रतिमा सप्रे, गोविंद गोडबोले, रियाज शेख, रागिणी वाळके, शरणकुमार लिंबाळे, शैला व दत्ता सरदेशमुख, वामन काळे, श्रीपाद कहाळेकर, सुजाता कहाळेकर, बेनीमाधव बोरकार, श्रीमती मृदुला देसाई, श्रीमती सुनीता पटवर्धन, श्रीमती रुस्तम गोखले, जयंत एरंडे असे कितीतरी अधिकारी आले, गेले पण स्नेह, सद्भाव, प्रेम यातून लक्षात आले की आकाशवाणीची म्हणून एक संस्कृती आहे. शिष्टाचार आहे. चेक घेताना रेव्हेन्यू तिकिट लागायचे. जवळ नसायचं. कोणीतरी खिशातून, पाकिटातून काढून द्यायचा. पैसे देताना निघून घ्यायचं टाळायचे. ‘अतिथी देवो भव' ब्रीद न घेताही ही मंडळी ध्वनिमुद्रणाआधी किंवा नंतर (ते स्टुडिओ रिकामा असण्या/नसण्यावर अवलंबून असायचे!) चहा पाजायचीच. हा इथला बहुधा अलिखित नियम होता. (निदान माझ्यापुरता तरी!)
या भाषणांनी मला भरपूर दिले. अभ्यास, वाचन, भाषण, लेखन, रचना, उच्चारण, वाचन गती, ध्वनिक्षेपकावर बोलणे, चढउतार, पानांचे अलगद बदल; सारे कौशल्य रेडिओनं दिल्यानं मी चांगला वक्ता होऊ शकलो. माझ्या लेखी आकाशवाणी केंद्रे ही 'वक्ता दशसहस्त्रेषु' घडविणाच्या दुर्मीळ पाठशाळाच होत. मराठी साहित्यिक रेडिओवर आला नाही, गायक रेडिओवर गायला नाही तर त्याला लोकमान्यता, राजमान्यता लाभत नाही हे आकाशवाणी केंद्रांनी वर्षानुवर्षे जपल्या जोपासलेल्या संचिताचेच फलित व प्रमाणपत्र होय.
‘आकाश संवाद' या माझ्या आकाशवाणीवरील भाषण संग्रहात प्रक्षेपित भाषणांपैकी निवडक २१ भाषणांचा अंतर्भाव आहे. यात चिंतनीय व दीर्घभाषणे आहेत. काही हिंदी भाषणांची मराठी भाषांतरेही आहेत. हा भाषण संग्रह विषय वैविध्याने नटलेला आहे. समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले, महाराष्ट्र माउली साने गुरुजी, क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे, महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर, संत कबीर यांच्या जीवन, कार्य व विचारांची माहिती यातून तुम्हास मिळेल. आपल्या समाजात अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वृद्ध यांचे अनेक प्रश्न समस्या आहेत. अनाथ मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसन क्षेत्रात मी दोन दशके सक्रिय होतो. त्या काळातील प्रश्नांचे स्वरूप, ते सोडविण्याचे उपाय या अंगाने या भाषणातून सर्वांगीण विचार झाला आहे. हिंदी व मराठी या दोन्ही भाषा संस्कृत भाषेतून विकसित झाल्या. दोन्हीत शब्द साधर्म्य आहे, तसे परंपरांचंही. दोन्ही भाषा एकमेकींमुळे समृद्ध झाल्या आहेत. त्यांच्या परस्परपूरक योगदानाचा विचार काही भाषणांतून पुढे येतो. या शिवाय विज्ञान, विवेक, प्रार्थना, इच्छाशक्ती, संस्कार, कुटुंब स्वास्थ्य, पिढीतील अंतर, बालकांचे हक्क, निष्काम कर्मयोग इ. सारख्या जीवनस्पर्शी व जीवनोपयोगी विषयांवर मार्गदर्शनपर भाष्य करताना सदरची भाषणे तुम्हास आढळतील. एकप्रकारे ही भाषणे माणसाच्या सर्व जीवन, विचार व व्यवहाराला वेढतात. त्यावरून त्यांची जीवनोपयोगी दृष्टीही स्पष्ट होते.
एकविसावे शतक सुरू होऊन एक तपाचा काळ लोटला आहे. हे शतक माहिती व तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. या शतकाने रेडिओ, दूरध्वनी, मोबाईल, संगणक, इंटरनेट, टी. व्ही. चॅनल्स, सिनेमा, वृत्तपत्रे, ग्रंथ, नियतकालिके इत्यादींच्या द्वारे मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे गारूड समाजमनावर घातले
आहे. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, संस्कृतीचे सपाटीकरण, ज्ञानभाषेचा विकास इ. अनेक प्रकारे मनुष्य जीवन गतीने केव्हा नि कसे बदलले कळलेसुद्धा नाही. या रेट्यात सर्वाधिक हादरा, धक्का बसला असेल तर तो भाषा, साहित्य आणि संस्कृतीस. ‘संस्कार संजीवनीचे वरदान' शीर्षक भाषणात या सर्व परिस्थितीचा ऊहापोह करून संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ते तुम्ही मुळातूनच अशासाठी वाचले पाहिजे की यात संस्कार घडण, परिणाम, मूल्य इ. बद्दल विस्ताराने विचार करण्यात आला आहे.
औद्योगिकीरणाचा परिणाम म्हणून जगभर नागरीकरण घडून आले. नगरे, महानगरे म्हणजे सर्व साधन, सोयीची आगरे बनली. उलटपक्षी खेडी कधी काळी स्वयंपूर्ण होती. ती प्रत्येक गोष्टीसाठी शहराकडे धावू लागली. एकत्र कुटुंब पद्धती लयास जाऊन त्याची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विसाव्या शतकात तर केवळ स्वतंत्र राहण्यास मिळते या एकाच आकर्षणाने शिकलेले तरुण शहरी गेले व खेडे तुटले. पण हा क्षणिक मोह भविष्याचा शाप बनला. ते तरुण जेव्हा वृद्ध झाले तेव्हा त्यांची स्थिती धोब्याच्या कुत्र्यापेक्षा कमी शोचनीय नव्हती... 'न घर का, न घाट का स्थितीने वृद्धाश्रमांना जन्म दिला. 'संध्याछाया भिवविती हृदया' भाषणात ही शोकांतिका वाचक, श्रोत्यांना अंतर्मुख करते. अशी भाषणे तुम्हास नागरीकरणाबाबत पुनर्विचार, पुनर्रचना इत्यादीस उद्युक्त करतील असा मला विश्वास वाटतो. “आजी आजोबांशी मैत्री' सारखे भाषण या तुटलेल्या जीवांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल.
वर्तमान समाजात दोन घटक अनाथ झाले आहेत. - बालके व वृद्ध. ज्या अवस्थेत डोळ्यांत तेल घालून संगोपन करायची गरज असते नेमक्या त्याच वेळी या दोन्ही अवस्था समाजात उपेक्षितांचे जिणे जगत आहेत. भरल्या घरात मुलं अनाथ आहेत. समृद्ध घरात वृद्ध उपेक्षित जीवन कंठत आहेत. शिकलेले
आई-वडील घरी बसणं कमीपणाचे मानून दुहेरी मिळकतीमागे धावत आहेत. प्रत्येकास कांचनमृग, मिडास व्हायचे आहे. या धुंदीत त्यांची मुले पाळणाघरात मोठी होत आहेत. प्रेम सोडून त्यांना सर्व काही असणे म्हणजे प्राणवायूशिवाय जगणं! वृद्धांना आया, दाया आहेत. हितगुज करणारे, मायेने हात फिरवणारे कोणी नाही. त्यांच्याकडे पाहण्यास या गतिमान युगात कुणास उसंत नाही. हे आपल्या समाज अस्वास्थ्याचे दर्शन होय! ‘बालकांचे हक्क' ‘अनाथांचा अंत्योदय' सारखी भाषणे याचे भान देतील. यासाठी गरज आहे, ‘इच्छाशक्ती' सामाजिक आणि प्रगल्भ करण्याची, इच्छाशक्तीचा समाजशास्त्रीय व मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार व विकास न झाल्याने समाजात नवनवी अरिष्टे निर्माण होत असल्याची जाणीव या भाषणातून तुम्हास होईल, तर वर्तमान प्रश्न व समस्यांची सोडवणूक करण्याची जादूची कांडीच तुमच्या हाती येईल, पण ही भाषणे वाचणे व त्यानुसार कृती करणे ही त्याची पूर्वअट आहे, हे आपणास विसरून चालणार नाही.
आज आपण भौतिक समृद्धीच्या एका नव्या मायाजालात जगत आहोत. १९४७ साली भारत स्वतंत्र होताना महात्मा गांधींनी रामराज्याची कल्पना केली होती. अगदी तसे जरी नसले, तरी भारतीय समाजाचे सन १९४७ चे चित्र व आजची स्थिती यात भौतिक समृद्धी उंचावली आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. पण गरीब-श्रीमंतांमधील दरी मात्र आपणास दूर करता आली नाही, हे मान्यच करावे लागेल. श्रीमंत अधिक श्रीमंत झालेत आणि गरीब अधिक गरीब. ही विषमता जागतिकीकरणामुळे आणखी जीवघेणी बनत आहे. पैसा परमेश्वर मानू लागलेल्या समाजास मूल्यांचे देणे-घेणे राहिलेले नाही. रोज मूल्ये रसातळास जाताना आपण पाहात आहोत. हे सारे कांचनमृग होण्याच्या वेडातून घडते आहे. माणसाचा क्रौंचवध होतो आहे, ययाति होतो आहे, संस्कार व मूल्यांची अमृतेवल सुकते आहे व भ्रष्टाचाराची जंगले, विषवृक्ष फोफावत आहेत. ही भाषणे तुम्हास प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या या वास्तवाप्रती जागृत करून नव्या विधायक जीवन मांडणीसाठी प्रवृत्त करतील तर हा ‘आकाश संवाद' नव्या युगाचा ‘हृदय संवाद' बनेल. हे हृदयीचे ते हृदयी' घालण्याच्या ध्यासातून संबोधिलेली ही आकाश भाषिते तुम्ही सेवावी, विचारावी, आचरावी ही प्रार्थना!
- डॉ. सुनीलकुमार लवटे
भाषणे
१. संस्कार संजीवनीचे वरदान/१५
२. संध्याछाया भिवविती हृदया...!/२०
३. इच्छाशक्ती वापरूया/२५
४. आजी-आजोबांशी मैत्री/३०
५. माणुसकीचा गहिवर : साने गुरूजी/३४
६. कालची आणि आजची दिवाळी/४०
७. पिढीतील अंतर आणि कौटुंबिक स्वास्थ्य/४५
८. क्रांतिकारी मंगल पांडे/४९
९. महात्मा जोतिबा फुले : जीवन व कार्य/५४
१०. स्वातंत्र्याच्या चार दशकातील राष्ट्रभाषा हिंदीचा विकास/५९
११. बाल गुन्हेगारी : एक सामाजिक समस्या/६३
१२. हिंदी भाषेचा मराठी साहित्यावरील परिणाम/६७
१३. श्री चक्रधर स्वामींची समता/७१
१४. महानुभाव पंथ आणि एकात्मता/७५
१५. संत कबीरांचा आचार धर्म/७९
१६. सणांमागील सामाजिक जाणीव/८१
१७. बालकांचे हक्क/८३
१८. सण आणि सांप्रदायिक सद्भाव/८५
१९. अनाथांचा अंत्योदय/८७
२0. राष्ट्रभाषेचे महत्त्व/८९
२१. निष्काम कर्मयोग/९१
२२. विवेक व विज्ञानाची गुढी ऊंच करूया/९३
२३. प्रार्थना/९५
मुलाखती
१. जतन साक्षरता/१०१
२. नवे शिक्षण, नवे शिक्षक/१११
३. भारतीय भाषा व साहित्य/१२१
• प्रक्षेपण सूची/१३०
संस्कार संजीवनीचे वरदान
माणूस घडतो कसा? याचा मी शोध घेतो आहे. ते समजणं मोठं कठीण आहे, याची आता मला खात्री झाली आहे. माणसाच्या घडणीत संस्कारांचा वाटा सिंहाचा असतो खरा! पण या संस्कार संजीवनीचे स्वरूप गुंतागुंतीचं असतं अशी माझी धारणा झाली आहे. तुम्हाला सांगू का? एखादा माणूस असं म्हणू लागला की, “संस्कार बालपणात दिले गेले पाहिजे' “उमलत्या वयात संस्काराचे असाधारण महत्त्व असते." मला त्याचे हसू येते. लक्षात येतं की संस्काराचे खरे रूप त्यास कळलेलेच नाही.
माझ्या मते, संस्कार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार बालपणात होतात तसे वानप्रस्थातही. पण हे मात्र खरे की संस्कार बालपणी झाले तर दीर्घजीवी तसेच दीर्घपरिणामी ठरतात. संस्कार म्हणजे मूल्यसंवर्धन. अपेक्षित वर्तन परिवर्तनार्थ केलेले प्रयत्न म्हणजे संस्कार. सभोवतालचं वातावरण, सभोवारच्या व्यक्ती, आपले विचार, आपलं वाचन, जीवनाचा अनुभव, निरीक्षण या सर्वांतून संस्कार आकार घेत असतात. प्रत्येक पूर्वपिढी ही उत्तरपिढी अधिक चांगली व्हावी म्हणून धडपडत असते.
पूर्वी संस्कारांचा संबंध धर्म - कर्माशी होता. त्या काळी कर्मकांडांतून संस्कार होतात असा समज होता. प्राचीन काळी वयाच्या प्रत्येक पायरीचे धार्मिक संस्कार होते. पुढे त्यास कर्मकांडाचे रूप आले. कर्मामागील विचार, व्यवहार मागे पडला. कोणत्याही यांत्रिक पद्धतीच्या कार्यानी संस्कार होत नसतात, हे हळूहळू लोकांच्या लक्षात आलं. संस्कारास संजीवनी मानण्यात येतं ते त्याच्यातील सजीवपणामुळेच! संस्कार हा ठोकताळा नाही. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीची घडण, वृत्ती, स्वभाव लक्षात घेऊन संस्काराची बांधणी, रचना होणे महत्त्वाचे असते. आपले आजचे जीवन मोठे धकाधकीचे झाले आहे. या गतीच्या जगात पालकांना आपल्या पाल्याकडे पाहण्यास वेळ उरलेला नाही. परिणामी या पिढीची मुले माध्यमांची ताबेदार झाली आहेत. अशा स्थितीत चांगल्या संस्कारांचे महत्त्व ठळक होते आहे. पालक धास्तावलेले आहेत नि मुले भांबावलेली आहेत. अशा काळात संस्कार संजीवनीचे वरदान समजून घेणे आवश्यकच नाही तर अनिवार्य होऊन बसले आहे.
माणसावर संस्कार जन्मभर होत असतात पण उमलत्या वयात झालेल्या संस्कारामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मोलाची मदत होत असते. बालपणी आपण जे वळण लावू ते जन्मभराचे बाळकडू बनते. साधारणपणे वयाची १२ ते २० वर्षे ही संस्काराची मानण्यात येतात. कुमार, किशोर व तरुण या अवस्था संस्काराच्या पेरणी व रुजवण्याच्या असतात. आई हे संस्काराचे सर्वाधिक संवेदनक्षम असे माध्यम आईचा प्रभाव माणूस जन्मभर वागवतो. आई संवेदना देते. बाबा दिशा दाखवतात. भाऊ-बहीण हे सहजीवनाचे सर्वाधिक जवळचे साथीदर होत. मोठे भाऊ-बहीण अनुकरणास उपयोगी, लहान भाऊ-बहिणींमुळे आपली समज विकसित होण्यास साहाय्य होते. घर हे सामाजिक संस्काराची प्राथमिक प्रयोगशाळा असते. इथले सारे शिकवणे, संस्करण अनौपचारिक असते आणि म्हणून ते अधिक प्रभावीही असते. जीवन कितीही गतिशील, यंत्रमय झाले तरी घरातील संस्कार संजीवनीचा उद्देश आपण जपायला हवा. घर संस्काराचा गाभारा असतो.
नंतर येते ती शाळा. तेथील शिक्षक हे प्रत्येक नव्या पिढीचे खरे शिल्पकार! माणसाला समज येत गेली की पालकांपेक्षा त्याच्यावरील शिक्षकाची मोहिनी परिणामकारक होत राहते. घरापेक्षा जगाची जाण देणारा, प्रत्येक नवी गोष्ट शिकवणारा शिक्षक माणसाचे डोळे उघडतो. माणसाला तो डोळे देतो. डोळस बनवणाच्या शिक्षकांना कोण बरे विसरू शकेल? मला तर माझ्या सर्व आयुष्यावर शिक्षकांची पडलेली विलक्षण मोहिनी आजही अमोल वाटते. ज्ञान, विज्ञान, वाचन, व्यवहार, आचार, उच्चार, अर्थ या सा-यांचा शिक्षक करत असलेला संस्कार असतो ना त्याला तोड नसते, म्हणून शिक्षक अविस्मरणीय असतात.
मग संस्कारात समाजाची भागीदारी सुरू होते. विशेषतः तारुण्यानंतरच्या काळात परिणामक्षम संस्कार घडविणारे केंद्र म्हणजे समाज! समाज हा एक असा संस्कार शिक्षक आहे की ती स्वत: कधीच काहीच शिकवत नाही. तुम्ही स्वतः त्याच्याकडून शिकायचे असतं. अनुभव, निरीक्षण, व्यवहार, शिष्टाचार आपणास समाज शिकवतो. आयुष्यभराची अनुभवाची शिदोरी देणारा समाज हा माणसाच्या उत्तर आयुष्याचा मोठा भागीदार असतो.
संस्कार अनेक प्रकारचे असतात. ते शारीरिक असतात तसेच भावनिकही असतात. वळणाचा संबंध शारीरिक संस्काराशी असतो. हस्ताक्षर चांगले होणे, शिस्त लागणे, कामाची पद्धत, व्यवहारातील रीतीभाती या साच्या शारीरिक संस्कारातून येतात. कुमार, किशोर वय हे वळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मानसिक संस्कार सर्वाधिक संवेदनक्षम असतात बरे का! वाचन, विचार, ज्ञान ही त्याची साधने असतात. अनुकरण हे केवळ शारीरिक असत नाही, ते मानसिकही असते. मानसिक संस्काराचा प्रारंभ कळत्या वयात सुरू होतो. आपण जसे प्रौढ, प्रगल्भ होऊ तसे मानसिक संस्कार प्रौढ होतात. जीवनमूल्ये, आदर्श जीवनाचे ध्येय हे सारे विकसित होते ते मानसिक संस्कारातून. मित्रांनो, भावनिक संस्कार मोठे तरल असतात! प्रेम, प्रणय, सहवास, संपर्क, संवादातून भावनिक संस्कारांची जडणघडण अधिक प्रभावीपणे होते. ज्याला चांगले मित्र, मैत्रिणी मिळतात त्याचे भावविश्व अधिक निखळ होते. मानसिक व भावनिक संस्कारांच्या सीमारेषा तशा पुसट असतात. मानसिक संस्कारांचा संबंध बुद्धीशी असतो तर भावनिक संस्काराचा हृदयाशी. शारीरिक जडणघडण करणारे आई-वडील, शिक्षक निवडण्याचं स्वातंत्र्य आपणास नसते. ते एका अर्थाने लादलेले असतात. पण मित्र मात्र लाभत असतात. ते आपण निवडतो. कळत्या वयात चांगले-वाईट याचे पारख प्रथम नसते. माणूस ठेचा खातो, पण ठेचातून शिकतात ते शहाणे होतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या म्हणीत दडलेला शहाणपणाचा संस्कार जो समजून घेतो त्याचे जीवन यशस्वी होतं. आयुष्याच्या या वळणावर चांगले मित्र मिळणं एक वरदान ठरतं.
माणसावर होणारे संस्कार बाह्य असतात. संस्कारास मिळणाच्या आंतरिक प्रतिसादावर जीवनाची सफलता अवलंबून असते. ब-याचदा आपण असे पाहतो की एकाच घरातील, एकाच वातावरणात वाढलेली दोन मुले भिन्न प्रवृत्तीची, प्रकृतीची आणि स्वभावाची असतात. माणसाच्या घडणीत शारीरिक आंतरक्रियांचे महत्त्व आपण समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील शारीरिक आंतरक्रिया मोठ्या गुंतागुंतीच्या असतात. जे पालक, शिक्षक या वयात मुलांना समजून घेतात, त्यांच्यात अनुकूल बदल घडविण्याची क्रिया सुलभ होते. मुलांचे चोच्यामाच्या करणे, मुलींनी प्रेम करणे अशा नाजूक प्रसंगी जे पालक, शिक्षक संवादाची कुंकर घालू शकतात, त्यांच्याच हाती मुले लागतात. हेच असते संस्कार संजीवनीचे वरदान! या वयात शिक्षक, पालकांना मुलांचे मित्र होता आले पाहिजे.
संस्कारांचा महत्त्वाचा संबंध असतो तो जीवनमूल्यांशी आणि जीवन आदर्शाशीही! संस्कार म्हणजे सद्गुणांचा विकास, परस्परांशी प्रेमाने वागावे. गरजवंतांची सेवा करावी. आपले वागणे सभ्य असावे. असं नुसते शिकवून या गोष्टी रुजत नसतात. ‘आधी केले नि मग सांगितले.' सारखी उपचार पद्धती. संस्कारांपेक्षा कृतिशील वस्तुपाठ हे अधिक उपयोगी ठरतात. आपल्या मुलांनी मोठ्यांच्या पाया पडावे असे आपणास वाटत असेल तर आपण घरातील व घरात येणाच्या थोरामोठ्यांच्या पाया स्वतः पडण्याचा रिवाज ठेवावा. मग मुले आपोआप त्याचे अनुकरण करतात. या ऊपर एखादा मुलगा पाया पडला नाही तर व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आदर करण्याचा उदारपणाही आपल्या अंगी असायला हवा. जे पालक, शिक्षक व्यक्तिगत स्वातंत्र्याची बूज ठेवून प्रयत्न करतात त्यांची पाल्ये अधिक संस्कारशील, संस्कारसमृद्ध होतात. जीवनात असे कितीतरी सद्गुण आहेत की ते सांगण्यापेक्षा कृतीतून पाझरणे अधिक परिणामकारक ठरते, असा सार्वजनिक अनुभव आहे. सहकार्य, परोपकार, सहिष्णुता, सहानुभूती, नम्रता, कृतज्ञता, दातृत्व, क्षमाशीलता, संयम अशा अनेक गुणांबद्दल विस्ताराने सांगणे शक्य आहे. पण या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगल्यावाईटातील फरकाचा संस्कार देणे. काय चांगले याच्या कसोट्या एकदा का माणसास उमजल्या की मग तुमचे कार्य संपले. समज व जाणिवांचा विकास हा संस्कार संजीवनीच्या वरदानातूनच शक्य होतो.
एकविसावे शतक हे संस्काराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. माणूस यांत्रिक होतो आहे. जीवनाच्या रोज वाढणाच्या गतीने स्वत:कडे पाहण्याची पण फुरसत काळाने ठेवलेली नाही. ज्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत ते भौतिक समृद्धीनी वेढलेले आहे. संस्काराची पारंपरिक साधने गतीने मागं पडत आहेत. मानवी संबंध क्षीण होत आहेत. दुसरीकडे यंत्रांची घेरेबंदी मजबूत होते आहे. ज्या काळात मनुष्य यंत्रमुक्त होता तेव्हा माणूस हेच संस्काराचे सबळ साधन होते. मधल्या काळात साहित्य, संस्कृती, चरित्रांनी प्रभावी संस्कार साधनांची भूमिका बजावली. आज संपर्क साधने ही संस्काराची सर्वाधिक संवेदनक्षम साधने म्हणून विकसित होत आहेत. साधने स्वत: म्हणून निषेधार्ह नाहीत आणि नसतात. आजची माध्यमे या साधनांचा जहरी प्रयोग करत आहेत. रोज अस्तित्वात येणा-या वाहिन्या लोकशिक्षणापेक्षा लोकरंजनासच अधिक वाहिलेल्या दिसतात. हिस्ट्री, डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफी, अॅनिमल प्लॅनेटसारख्या वाहिन्या निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, पर्यटन, इतिहास, भूतदया इत्यादीचे प्रभावी संस्कार करतात. पूर्वी वृत्तवाहिन्यांचे संस्कार मूल्य होते. आजच्या परस्परांतील जीवघेण्या स्पर्धात वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी हे मूल्य गमावलं असं चित्र आहे. नाही म्हणायला आकाशवाणी, दूरदर्शनसारखी माध्यमं स्वायत्त झाली तरी विवेक व शुचिता सांभाळून आहेत. वाचन संस्कृती जोपासायचे, भाषाशुद्धी विवेक जागवायचे कार्य वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या प्रभावीपणे करू शकतात. संस्कार संजीवनीचे वरदान ठरण्याचे सामर्थ्य या सर्वात आहे. या शतकात त्या अंगांनी प्रसार माध्यमांचा विकास झाला तर हे शतक संस्काराच्या दृष्टीने गतिशील व प्रभावी ठरेल. यंत्रातील शक्तीची बरोबरी मनुष्य कधीच करू शकणार नाही. पण यंत्राचा विवेक वापर ही सर्वस्वी माणसाच्या अखत्यारीतील बाब आहे. म्हणून यंत्र, माध्यमे विकासाची साधने म्हणूनच विकसित व्हायला हवीत. एकविसाव्या शतकातील माणूस संस्कारसमृद्ध व्हायचा असेल तर समाजात विवेकाचा जागर होत राहिला पाहिले. असा जागरच संस्कार संजीवनीचे वरदान ठरू शकेल. संध्याछाया भिवविती हृदया...!
संध्याछाया आहे म्हातारपणाचं प्रतीक! संध्याकाळच्या वेळेस सूर्य पश्चिमेकडे वळतो. सूर्य पश्चिमेकडे जसा कलत जाईल तसा आपल्या सावल्या लांब होऊ लागतात. लांब सावल्या भयावह असतात. वीज गेली की आपण घरी दिवे लावतो. दिवे लावले की आपण जर दिव्याजवळ असू तर आपली मोठी सावली भिंतीवर पडते. अगदी दुप्पट, चौपट मोठी सावली पाहून घाबरायला होतं! म्हातारपणी म्हणे, माणसाच्या मनात मृत्यूची सावली अशीच सतत दबा धरून बसलेली असते. ती सावली संध्याछायेसारखी मोठी असते. म्हणून ‘संध्याछाया भिवविती हृदया' असे एका कवीने म्हणून ठेवलेय.
पण तुम्हाला खरे सांगू का? आता संध्याछाया पूर्वीसारखी आपणास भीती दाखवत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारणच उरले नाही. मला तर ‘संध्याछाया' आता ‘शुभछाया' वाटू लागली आहे. माणसाचे बालपण जसे मुंगी साखरेचा रवा' असते, तसे संध्याछायेचं जीवनही ‘अमृतकुंभ' बनते आहे. पूर्वी लोक म्हातारपणास घाबरायचे, ते आबाळ होण्याच्या भयाने. आता परिस्थिती किती तरी पालटली आहे. पूर्वी चाळिशी उलटली की लोक मानसिकदृष्ट्या वृद्ध होऊ लागायचे. तो काळ किती मागे पडला. त्या काळात सोळा-अठरा वयात लग्ने व्हायची. पंचविशीपूर्वी मुले होऊन जायची. चाळिशीत माणूस आजोबा व्हायचा. आता आजोबा होणे पन्नाशीच्या पुढे घडते. त्यामुळे चाळिशीचे भय दूर पळालेय. आता चाळिशी ‘वसंत ऋतू' होऊ पाहतो आहे.
हल्ली आपल्या आहारात सुधारणा झाली आहे. आरोग्य सुविधा वाढल्यात. आपलं आर्थिक मान उंचावलेय. दीर्घजीवी औषधे आलीत. पूर्वी इतकी मुला बाळांची जबाबदारी वृद्धांवर राहिली नाही. त्यामुळे संध्याछायेचे भय मनातून काढून टाकायला हवे. त्यासाठी विकारी मनोवृत्ती टाळून मन ‘आनंद घन' बनवायला हवे. ‘दहा गेले पाच राहिले' असा विचार आपण करू लागलो की जीवनावर निराशेचे मळभ धरू लागते. उलटपक्षी ‘हत्ती गेला नि शेपूटच राहिलेय' असा आशावाद मनी बाळगायला हवा. मग हत्तीचे बळ येते आणि अशक्य ते शक्य होऊन जाते. 'रिकामे मन भुताचे घर' असते खरे! पण संध्याछायेत आपण आपलं मन जर सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवले तर पहा वेळ कसा जातो, ते कळणार सुद्धा नाही. वाचन, घरकाम, बागकाम, नातवांचे करणे, भाषण ऐकणे, छोट्या मोठ्या सामाजिक कामात, संस्थेत गुंतून राहण्याने ‘सार्थक्याचं सुख' संध्याछायेस पळवून लावते.
काळ बदलाचे किती फायदे असतात म्हणून सांगू? पूर्वी घरी वडिलांना बाबा, आप्पा, नाना, काका म्हटलं जायचे. काही घरात एका वडिलांना ‘साहेब' म्हटल्याचंही मी ऐकलेय. आता अहो बाबाचा 'ए डॅड' झालाय! त्यामुळे वयातले, नात्यातले अंतर कमी होऊन मित्रत्व निर्माण होऊ पाहतेय! त्यामुळे अकारण असलेले पोक्तपण हळूहळू गळू लागलेय. तीच गोष्ट कपड्यांची. कपडे आता सर्वांचे सारखे होऊ लागलेत. बाजारात मी जातो तेव्हा पाहतो ‘सब साइज' कपडे आलेले पाहतो. विकणारा सहज म्हणत असतो ‘बाप भी पहने और बेटा भी!' पूर्वी आपण अकारण छोट्या छोट्या गोष्टीतून प्रौढपण जपायचो. आता वय विसरून केल्या जाणा-या मैत्री संबंधामुळे मानसिक संध्याछाया जवळपास फिरकतही नाही. धाकटी पाती’ नि “थोरली पाती' असा भेद आता उरला नाही.
संध्याछायेची पारंपरिक लक्षणेही काळाच्या ओघात बदलली आहेत. पूर्वी चाळिशीनंतर केस पिकायचे. आता केस पिकण्याचा नि वयाचा संबंध राहिलाच नाही मुळी. अधिकांश लोकांचे केस आता ऐन तिशीतच पिकू लागलेत. माझे एक मित्र आहेत त्यांचा मेंदी विकायचा पूर्वापार धंदा आहे. ते सांगतात पूर्वी मेंदी सणावारास विकली जायची. आता घरोघरी महिन्याच्या सामानाच्या यादीत डाय, मेंदी, शांपू या वस्तूंना अढळपद मिळून गेलंय. एका घरात तर मी एकदा रविवारी घरातील सर्व जण एकमेकांस डाय, मेंदी लावतानाचे छान दृश्य पाहिलं. हे काय होते? माझ्या दृष्टीने संध्याछायेवर विजय मिळवण्याची ती नित्याची रंगीत तालीमच होती. पार्लर, हेअर ड्रेसर्समध्येही कितीतरी स्त्रिया, मुली, तरुण, वृद्ध केस काळे करून मन तरुण ठेवत असतात. 'मन चंगा तो कटौती में गंगा' असे हिंदीतले सुभाषित आता नित्याचं होऊन बसलंय.
माझ्या परिचयाचे एक वृद्ध जोडपे आहे. आजोबा एका उद्योगात होते. आजी शिक्षिका होत्या. दोघे आपापल्या नोकरीधंद्यातून निवृत्त झाले. त्या दोघांना रोज सकाळी मिळून पोहायला जाताना मी पाहतो. ते नऊला येऊन सकस आहार घेतात. एका शैक्षणिक संस्थेत जाऊन आपणास जमेल, झेपेल ती जबाबदारी उचलतात. गावात भाषण, गाणे काही असले की जोडी पहिल्या रांगेत आसनस्थ असते. आजींची पूर्वी लांबसडक वेणी होती. त्या पाचवारी नेसायच्या. आज त्या चक्क चुडीदार घालतात. बॉयकट केलाय त्यांनी. आजोबा टी शर्ट, ट्राऊझर, कधी बर्मुडासुद्धा घालतात. मला त्यांची मुले, सुनाच वृद्ध वाटतात. संध्याछायेचा असा 'वसंतोत्सव' माझ्या मनात हेवा निर्माण करतो. आपणही संध्याछायेचं असे स्वागत करायला शिकले पाहिजे.
संध्याछाया छोट्या करणे आपल्या हातात आहे. वृद्धावस्थेचे आशंकित भय मनातून टाकले पाहिजे. इंग्रजीत संध्याछायेचं मार्मिक वर्णन करणारे एक छोटे वाक्य आहे. त्यात म्हटलेय, "Fear is the dark room, where only negatives are developed." भीती अशा अंधारी खोली आहे की तिथे छायेचाच विकास होतो. अशा अंधार कोठडीतून आपण स्वत:स मुक्त ठेवले पाहिजे. हिंदी कवि दिनकर म्हणतात की, ‘बुढापे की आँखो में प्रकाश और मुट्ठी में आकाश होता है।' एका लेखकास एकंदी नव्वदीतला एक जगप्रवासी भेटला होता. तो गेली चाळीस वर्षं पायास टकळी लावून फिरत होता. लेखकांनी त्याला विचारले की मलातर ऐशीतच अंधूक दिसू लागलेय. तुला अंधूक दिसू लागले तर? तो प्रवासी म्हणाला, जोवर मी फिरत राहीन मला दिसतच राहणार. फिरण्याने तुमची दृष्टी विकसित होत राहते. टाळ कुटत घरी-दारी बसणारी माणसे नि तो प्रवासी, या प्रवाशापासून ‘कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला' सारख्या कवीवचनांचा अर्थ मला साधार समजतो. संध्याछायेत अशी किती तरी प्रकाश किरणे नवे प्रदेश दाखवात. 'विश्व आहे सुकाळ देशी, अभाग्याशी दुर्भिक्ष' न्यायाने आपण सुकाळाचा, विश्वदेशाचा शोध घेत रहायला हवा.
संध्याछायेचे जीवन म्हणजे असतो अनुभव, शहाणपण, कौशल्याचा अमृतकुंभ! तो केवळ हृदयाशी कवटाळून ठेवून काय उपयोग? आपल्या अनुभव संचिताचा उपयोग समाजास व्हायला हवा. आज संध्याछायेतील तांडे, थवे मी सकाळ-संध्याकाळ न्याहाळत असतो. वय झाले म्हणून त्यांना वृद्ध म्हणायचे, अन्यथा असतात धडधाकट. मी कधीतरी त्यांच्या गप्पा वळचणीत बसून ऐकतो तेव्हा त्यांच्या मनाची ‘हिरवाई’ माझ्या लक्षात येते. रोजच्या वर्तमानपत्रातील एखाद्या घटनेवरचे त्यांचं चर्वितचर्वण, त्यातील त्यांचा अभिनिवेश तरुणांना लाजवणारा असतो. हास्यक्लब, योगवर्ग, अभ्यास सभा, अशातील त्यांची अनुपस्थिती मला नेहमी काळजीत टाकणारी वाटत असते. त्या ऐवजी ‘वृद्धावस्था म्हणजे शहाणपणाचा अधिकोष' मानून आपले शहाणपण विधायकरित्या वृद्धिंगत करणे, ते समाजोपयोगी बनवणे आपण जर अंगी बाणवून घेतले तर संध्याछाया छोट्या होतील, मृत्यूच्या आर्त प्रतीक्षेच्या जीवघेण्या यातनेतून ते स्वत:स मुक्त करू शकतील व भोवतालचं जगही ते सुखपूर्ण करू शकतील!
पूर्वी संध्याछायेचे जीवन दयेचं जीवन होते. आता स्थिती पालटू लागली आहे, ती उभयपक्षी सामंजस्यामुळे. पूर्वी घरातील वडीलधा-यांना मिळकतीचा, मिळवलेल्याचा अहंकार असायचा. आता नाही म्हटले तरी प्रत्येकास ‘स्व त्व, ‘सत्व' जाणवू लागलेय. त्यामुळे माणसाचे परावलंबन कमी होऊ लागलेय. जगण्याच्या भाबडेपणाची जागा व्यवहार घेत आहे. त्यामुळे संध्याछायेत आपण लुटतो, फसवलो, लुबाडलो गेलो असे वाटण्याची उदाहरणे कमी होऊ लागलीत. घरे केवळ राहण्याच्या खोल्या न होता ते परस्पर प्रेम करायचं ठिकाण बनले पाहिजे, याची जाणीव मूळ धरू लागली आहे. 'वृद्धाश्रमात जाऊन स्क्रैप होऊन पडून राहण्यापेक्षा आपले घरच परस्परांचे ‘आधारश्रम कसे बनतील याचा विचार मूळ धरू पहातो आहे. नव्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे घरोघरी स्वेच्छानिवृत्तधारक अॅसेटस् होत आहेत. कधीकाळी वृद्ध म्हणजे जोखीम, जबाबदारी, ओझे वाटायचं. आता स्वेच्छानिवृत्तीचा सुवर्णहस्त (Golden Shake hand) घरोघरी नव्या वैभवाची आंदोलने निर्माण करतो आहे.
जीवनाची इतिकर्तव्यता समजून संध्याछाया काळात लोक पूर्वी आध्यात्मिक व्हायचे. शिक्षण नसायचे, वाचायची सवय, आवड नसायची, छंद नसायचे. त्या काळात वाती वळत प्रवचन ऐकणे, टाळ कुटणे, भजन करणे, चारधाम, अष्टविनायक यात्रा करणे हीच संध्याछायेची साधने होती. आज शिक्षण, वाचन, छंद, प्रवास, सामाजिक सहभाग इ. वृत्तीमुळे संध्याछायेचा काल पूर्वीइतका खायला उठत नाही. जी माणसे संध्याछायेस 'राहून गेलेले भोगायचं म्हणत कला, क्रीडा, संगीत, साहित्य इ. चा आस्वाद घेत राहतात, त्यांना संध्याछाया वरदान ठरताना मी पहातो. संध्याछायेचा काळ आज ‘आत्मशोधाचे पर्व' झाले आहे. लोक या काळात स्वस्थपणे आपल्या पूर्व जीवनाचा आढावा घेतात. भविष्याच्या नियोजनाबद्दल ते पूर्वजांपेक्षा अधिक चिकित्सक, चोखंदळ असतात. माझे एका शिक्षक दांपत्यास मी पाहतो अन् लक्षात येते की अरे, वृद्धत्व वरदान आहे. दीर्घायुषी जीवनाची कुंजी ही आपल्या मनोधारणेत असते, ‘मनात जागा असली की घरात जागा असते' या सूत्राचा शोध ज्यांना लागला ती मंडळी सदैव तरुण राहतात. माझ्या परिचयाचे वृद्ध पिता-पुत्र संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक संघात एकमेकांची छान टोपी उडवताना मी पाहतो, तेव्हा लक्षात येते की संध्याछाया आता आनंदपर्वणी होते आहे. मला याची कल्पना आहे की असे सुखी उत्तरायुष्य सान्यांच्या वाट्यास येत नाही. आलेले नाही. पण येऊ शकते, होऊ शकतं असा आशावाद मला हेतुतः जागवायचा आहे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' असा ध्यास आपण सर्वांनी मनी-मानसी रुजवला तर हे अशक्य नक्कीच नाही. संध्याछाया एका अर्थाने मिटण्याचे पर्व. ज्यांना पुस्तक मिटण्याच्या सहजतेनं आयुष्य, जीवन मिटवता आले ते भाग्यवान खरेच. त्यांचे जीवन आपण तपासू लागलो की लक्षात येते त्यांच्या यशस्वितेचे सारे गमक त्यांच्या मनोवृत्तीत सामावलेलं असतं. माझ्या मित्राचे वडील गतवर्षीच निवर्तले. जीवनभर राजासारखे राहिले. उतारवयात कार्यरत राहिले. नव्वदावा वाढदिवस कृष्णछाया घेऊन आला. कॅन्सरचे निदान झाले. त्यांनी उपचार न करण्याचा निर्णय घेतला. पैसा, साधने सर्व असताना घरच्यांना त्रास नको म्हणून स्वेच्छा आहार नियंत्रित केला. काही दिवसातच ते झोपेत निवर्तले.
संध्याछायेत स्वेच्छामरणाचे सुख मिळवणे हे योगीपण होय. ती असते कठोर जीवनसाधनेची फलश्रुती! असे जीवन जगता येणं म्हणजे संध्याछायेवर विजय मिळवणे. स्वत: सुखी राहू. दुस-यास सुखी करू. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयः' हे सुभाषित हेच तर शिकवते!! इच्छाशक्ती वापरूया
इच्छाशक्तीचा वापर ही आपल्या रोजच्या जीवनातील गोष्ट होय. आपल्या प्रत्येक कृतीमागे इच्छाशक्तीचे बळ असते. इच्छाशक्ती ही सर्वसाधारण संज्ञा होय. तिचा वैज्ञानिक विचार आणि अभ्यास झाला आहे. आजच्या व्यवस्थापन युगात इच्छाशक्तीस असाधारण महत्त्व आले आहे. इच्छाशक्तीत पर्वत उलथून टाकण्याइतकी प्रचंड शक्ती असते. जीवनाच्या सर्व क्षेत्रावर तिचा प्रभाव असतो. ‘इच्छा तिथे मार्ग' अशा आशयाची इंग्रजी उक्ती आहे. ती आपल्या सर्व जीवनाचे गूढ उकलते. अशक्य ते शक्य करिता सायास' या संत वचनात प्रयत्नामागील इच्छेचे बळच स्पष्ट झालं आहे. आपण इच्छा शक्ती वापरली तरच बदल होतात, मात्र तिचा वापर विधायक व्हायला हवा.
इच्छाशक्तीचा अधिक खोलवर विचार प्रथम मानसशास्त्रात करण्यात आला आहे. मानसशास्त्रानुसार इच्छाशक्तीचा संबंध प्रेरणेशी आहे. प्रथम व्यक्ती अथवा समुदायाच्या मनात काही करण्याची, होण्याची ऊर्मी निर्माण होते. त्या इच्छेमागे मन:प्रेरणा कार्यरत असते. यातून मग निश्चय निर्माण होतो. निश्चय हे एक प्रकारचे जीवनलक्ष्य असते. व्यक्ती किंवा समूह मग त्या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. तो प्रयत्न सहज असत नाही. साध्य हे कुणालाच लीलया हाती येत नाही. त्यासाठी संघर्ष अटळ आणि अनिवार्य असतो. लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण जो प्रामाणिक संघर्ष करतो त्यातून मग कृतीला एकप्रकारचे अधिष्ठान प्राप्त होते. ही कृती मनातील सर्व किल्मिष दूर करते. भय, आशंकांचे त्यातून निराकरण होते. नंतर आपणास मार्ग सापडतो. मार्ग सापडणे म्हणजेच इच्छापूर्तीचा आनंद होय. जीवनात आपणास जर ध्येय साध्य करायचे असेल तर मनात तीव्र इच्छाशक्ती हवी आणि प्रयत्नांवर दृढ विश्वासही हवा.
आपल्या व्यक्तिगत जीवनातील सारे यश-अपयश हे इच्छाशक्तीवर अवलंबून असते. मनात केवळ इच्छा निर्माण होणे पुरेसे असत नाही. इच्छाशक्तीच्या वापराची वृत्ती आपणात असायला हवी. असेल हरी तर देईल खाटल्यावरी' असा दैववाद एक प्रकारची अकर्मण्यताच असते. अशा दैववादी वृत्तीतून आळस, भय, निष्क्रियता, निराशा यासारखे दोष निर्माण होताता. म्हणून आपण मनामध्ये सतत वैध आणि विधायक अशा इच्छा कशा निर्माण होतील, हे पाहायला हवे. त्यानुसार आपण कृती करायला हवी. तीव्र इच्छा आणि पराकाष्ठेचे प्रयत्न यांचा संगम झाला की मग जीवन सार्थकी लागण्यास वेळ लागत नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' म्हणण्यात हाच भाव आहे. शिवाजी महाराजांनी तीव्र इच्छेच्या बळावरच महाराष्ट्र धर्म रुजवला. आर्किमिडीजचं जीवनही हेच सांगते. इच्छेच्या बळावर असाध्य रोगातून उठलेली माणसे आपण पाहतो. बेचिराख जपानचे उदाहरण हे जाज्वल्य इच्छाशक्ती वापराचे अनुकरणीय उदाहरण होय! इस्त्रायलसारखा देश वाळूतून वेळू निर्माण करतो, देशाचे नंदनवन बनवतो, ते इच्छाशक्तीच्या वापरामुळेच ना?
व्यक्तिगत जीवनाप्रमाणे आपला समाज, समुदाय, समूह जीवनाशीदेखील इच्छाशक्तीचा घनिष्ठ संबंध आहे. जगात कितीतरी जाती-जमातींच्या प्रगतीचा इतिहास एका अर्थाने त्यांच्या इच्छाशक्तीच्या वापराचे फलितच म्हणावे लागेल. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर गेल्या शतकातील स्वतंत्र झालेल्या देशांचे देता येईल. भारतही त्यापैकीच एक होय. महात्मा गांधींनी विविध चळवळीतून जनमानसात स्वातंत्र्याची इच्छा जागवली. जनतेस कृतीप्रवण केले. जनता पेटून उठली. यावत्चंद्र दिवाकरौ'ची दर्पोक्ती करणाच्या ब्रिटिशांना 'याचि देही याचि डोळा' युनियन जॅकचे अवरोहण पहावे लागले. नेल्सन मंडेलांनी दिलेला लढा हा इच्छाशक्ती वापराचा आणखी एक वस्तुपाठच ना? समाजात कधी काळी वेठबिगारी होती. दास म्हणून माणसास विकले जायचे. स्त्रीस केवळ भोग्य मानले जायचे. या सर्व पीडित समुदायात सर्वोदय घडून आला, तो त्यांच्या सामुदायिक इच्छाशक्तीच्या वापरामुळेच. व्यक्तीत काय किंवा समुदायात काय प्रथम इच्छाशक्ती जागावी लागते. कधी ती जागवावी सुद्धा लागते. पण एकदा का तिचं महत्त्व समजलं की मग काम फत्ते समजावं.
अलीकडे मानसशास्त्र नि समाजशास्त्र समूहमनाचा मोठा अभ्यास करू लागलंय. या मानव्यशास्त्रांनी सगळ्या जडणघडणीमागे इच्छाशक्ती कार्यरत असल्याचे प्रयोगांती सिद्ध केलेय. समूहमनामध्ये सर्वाधिक शक्तिशाली इच्छा असते. त्या इच्छाशक्तीत हजारो बॉम्बची ताकद सामावलेली असते. त्या इच्छाशक्तीचा आपण वापर कसा करतो हे महत्त्वाचे. २००१ साली अमेरिकेवर झालेला विमान हल्ला हे इच्छावापराचेच प्रतीक, लादेनने विघातक वापर केला, तर बुशनी स्वदेशी विधायक वापर करून पुनर्बाधणी करून दाखवली. आपणास माकड बनवायचा की माणूस हे ठरवणं महत्त्वाचे आहे.
सामूहिक इच्छाशक्तीच्या वापराचं नवं तंत्र अलीकडच्या काळात जपाननी विकसित केले आहे. त्या देशातील एखादी छोटी कंपनीसुद्धा सामूहिक इच्छाशक्ती वापराच्या तंत्रावरच पाहता-पाहता जागतिक होते. मनुष्यबळ विकासाचे एक नवं शास्त्र आता विकसित होऊ पाहतेय. त्याची सारी उभारणी इच्छाशक्तीवर आधारली आहे. जपानमध्ये नोकरीस घेताना ज्या अनेक चाचण्या घेतल्या जातात, त्यात प्रमुख भर इच्छाशक्तीवर असतो. नोकरीत सतत कार्य करण्याची. अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याची इच्छाशक्ती जागी ठेवण्यावर भर दिला जातो. 'आयएसओ' सारखी आंतरराष्ट्रीय मानकं निश्चित करण्यात आली आहेत. त्याची महत्त्वाची कसोटी सामूहिक इच्छाशक्ती' मानण्यात आली आहे. व्यवस्थापन शास्त्रात प्रारंभी ‘टीमवर्क' वर भर दिला जायचा. आता ते ‘फॅमिली फिलिंग' शब्दाचा वापर करतात. आपले घर, कुटुंब इच्छाशक्तीवर उभे असते. नवरा-बायकोतील अद्वैत समान इच्छाशक्तीवर टिकते. पुढे मुले, बाळे नि कुटुंब मिळून 'घर' बनते तेही इच्छाशक्तीवर. कमी-अधिक इच्छाशक्ती असलेल्या घर, संस्था, कार्यालय, कारखाने नि देशातच संघर्ष, मतभेद असतात. ‘समान शीले व्यसनेषु सख्यं' सारखी सुभाषिते आपणास समानधर्मी इच्छाशक्तीचंच महत्त्व पटवतात.
धर्मशास्त्रसुद्धा इच्छेचे गोडवे गाते. माणसाचे मन विषय वासनेत गुंतलेले असते. कामेच्छा ही व्यक्तिगत जीवनातील सर्वाधिक शक्तिशाली प्रेरणा मानली जाते. धर्मशास्त्र तिच्या उदात्तीकरणाबद्दल आपणास समजावतं. काम ही विषय इच्छा मानली गेली आहे. धर्म आपणास ऊर्ध्वगामी बनवतो, म्हणजे व्यक्तिगत इच्छेचे सामाजिक उन्नयन करतो. मनुष्य अंतर्मुख असतो. तो जोवर आपल्या इच्छा ‘स्व' केंद्रित ठेवतो तोवर तो अधोगामी असतो. इच्छा ‘परहिताय' होणे म्हणजे मनुष्य विकास, परहित हाच परम धर्म होय. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सरसारखे षड्रिपू धर्म आणि नीतीशास्त्रात विषय इच्छा असल्याने निषेधार्ह मानल्या गेल्या आहेत. जग उभारायचं तर इच्छाशक्तीचा बहिर्गामी विस्तार व्हायला हवा. केंद्रोत्सारी इच्छा उच्चप्रतीची असते. कारण तीत अणुविभाजनासारखी गुणाकारीय शक्ती सामावलेली असते. म्हणून आपण आपल्या व्यक्तिगत इच्छांचे सामाजिक उन्नयन आणि वापर करण्याची वृत्ती जोपासायला हवी. धर्मकारणाप्रमाणे समाजकारण, राजकारणातही इच्छाशक्ती वापराचे महत्त्व मानलं गेले आहे. कोणताही प्रश्न अथवा समस्या सोडवायची तर तशी इच्छाशक्ती असावी लागते. अलीकडे ‘पोलिटिकल विल' शब्द वारंवार वापरला जातो. विशेषतः एखाद्या राज्य अथवा देशाच्या कल्याणकारी असण्यासंबंधी धोरण व कृती कार्यक्रमांवर राजकीय इच्छाशक्तीचा मोठा प्रभाव असतो. आज सर्वत्र जागतिकीरणाचे वारे वाहात आहेत. ते राजकीय इच्छाशक्तीचेच अपत्य होय. देशाची धोरणे ही त्या देशाचे नेतृत्व करणाच्या सरकारच्या इच्छेच्या वापराचीच ती फलश्रुती असते. पूर्वी ‘राजा बोले, दल हले' म्हटले जायचे. त्या काळात राजेच्छा प्रमाण मानली जायची. महाराष्ट्रातील इतर संस्थानांच्या तुलनेने कोल्हापूर संस्थान पुरोगामी होते. कारण इथल्या राजर्षी छत्रपती शाहूंच्या इच्छा पुरोगामी होत्या. भारतात संगणक क्रांती आली ती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या संगणकीय विकास शक्तीमुळे, इच्छेमुळे. रशियात विकेंद्रित लोकशाही आली ती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्या लोकशाही इच्छाशक्तीमुळे.
विज्ञानात लागलेले सारे शोध त्या वैज्ञानिकांच्या इच्छा नि प्रयत्न सातत्याचेच फलित ना? चाकाचा शोध हा माणसाच्या गतीच्या इच्छेतून लागला नि जगाचा नकाशा बदलून गेला. विज्ञान कधी वरदान ठरतं तर कधी शाप. हे सारे आपण इच्छेचा वापर कसा करतो त्याचाच तो परिणाम असतो. इच्छा ही बाटलीत बंद केलेल्या राक्षसासारखी सुप्त परंतु प्रज्वलनशील असते. तिचे अधिक काळ दमन करून ही चालत नाही. इच्छादमन हे विध्वंसास आमंत्रण असतं. वाट मोकळी करून देणे हा त्यावरचा रामबाण उपाय असतो. अणुमुळे बॉम्बही तयार होतो नि वीजपण. साच्या शोधांची जननी इच्छा असते. द्राक्षातील बी नाहीसे झाले ते छोट्या इच्छेमुळे, पण त्यामागे शास्त्रज्ञांच्या भगीरथ प्रयत्नांची गंगा होती हे आपणास विसरता येणार नाही. पुष्कळ विमानाच्या कल्पनेतून जंबोजेट जन्मले. आपल्या साच्या परिकथा, जादुकळा ह्या माणसाच्या सुप्त इच्छांचेच प्रकट आविष्कार होत. विकासाच्या गतीमागे इच्छेचे घड्याळ सतत टिकटिक करत राहते, हे आपण लक्षात ठेवायला हवे. “कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला' ही काव्यपंक्ती आपणास इच्छासातत्याची महिमाच सांगत असते. इच्छाशक्तीचा वापर दुसरे-तिसरे काही नसून जीवन सातत्यच आहे.
मरणप्राय माणसास शेवटची इच्छा, हवे नको विचारलं जातं. फाशीपूर्वी अपराध्यास अंतिम इच्छा विचारली जाते. मृत माणसास इच्छाभोजनाचा नैवद्य दिला जातो. या आपल्या साच्या कृती व व्यवहारातून आपण इच्छाशक्तीचे महत्त्वच मान्य करत असतो. म्हणून इच्छाशक्ती वापराबद्दल माणसाने अधिक चोखंदळ रहायला हवं.
आज आपला देश ज्या एका भीषण परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे, ते पाहता मला इच्छाशक्ती वापराच्या आपल्या पारंपरिक पद्धतीची पुनर्रचना, पुनर्बाधणी, पुनर्माडणी करावीशी वाटते. प्रत्येक माणसाने आपल्या व्यक्तिगत इच्छेच्या जागी समाज इच्छेस महत्त्व द्यायला हवे. इच्छेचा वापर धर्माच्या संदर्भात ‘बाबा वाक्यं प्रमाणं' सारख्या अंधश्रद्धेनी करून चालणार नाही. ‘समाज धारेय इति धर्मः' अशी धर्माची सामाजिक व्याख्या शिरोधार्य मानण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘नहीं गोध्रा, नहीं गोहत्ती, भारत माँ यही हमारी मिट्टी असं जोवर आम्ही अंतर्मनातून म्हणणार नाही तोवर देशावरील मळभ दूर होणार नाही. जपान, इस्त्रालयसारख्या देशाच्या विकासाचे वस्तुपाठ आपण गिरवले तर आपण इच्छाशक्ती वापर आधुनिक पद्धतीने केला असे समजण्यात येईल. पोखरण आपल्यावर लादलेले संकट असेल, पण तुर्भे आपण स्वीकारलेले स्वप्न वाटायला हवे! ‘मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना' सारख्या ओळी आपल्या इच्छांचे आदर्श झाले पाहिजे. आपल्या सामाजिक, राजकीय जीवनातील विसंगती दूर करणे हा आता आपल्या इच्छाशक्तीच्या प्राधान्याचा कार्यक्रम व्हायला हवा. जपानची वस्तू वापरण्याची आपली वृत्ती जाऊन जपानची कार्य संस्कृती आपल्या इच्छेचे प्रतीक झाली पाहिजे. पाटीच टाकू या पण ती भरून टाकू या' इतकी छोटी व्यक्तिगत इच्छाही या देशात संपूर्ण क्रांती घडून आणू शकेल असे मला वाटते. या तर, आपण सर्व जण इच्छाशक्तीस सामूहिक रूप देऊ, तिचा चेहरा विधायक बनवू. तिचे धड राष्ट्रीय कसे होईल ते पाहू. तिचे पाय आंतरराष्ट्रीय गतीने कसे नाचतील ते पाहू. असे झाले तरच एकविसाव्या शतकात आपण तरू शकू. इच्छाशक्ती वापराचे नवे तंत्र, नवा मंत्रच या देशास नवी ओळख देऊ शकेल. देशाने माझ्यासाठी काय केले विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो अशी पृच्छा, इच्छा जागवणे, वापरणे यातच आपले नि देशाचे हित सामावलेले आहे. आजी-आजोबांशी मैत्री
हिंदी कथा साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा. जीवनाचे सर्वांगी चित्रण या साहित्यात आढळते. हिंदीत उषा प्रियंवदा नावाच्या एक कथालेखिका आहेत. त्यांची एक कथा प्रसिद्ध आहे. ‘वापसी' तिचे नाव. ‘वापसी' म्हणजे घरी परतणे. या कथेचे नायक आहेत एक आजोबा. गजाधरबाबू त्यांचे नाव. ते स्टेशनमास्तर होते. सारे जीवन बदलत गेले. पण आपल्या कुटुंबाला त्यांनी कधी नोकरीच्या बदलीची झळ लागू नाही दिली. गजाधरबाबूंचे एक स्वप्न होते. निवृत्त व्हायचे नि मुला-नातवांत उत्तरायुष्य कंठायचे. त्यांनी घर बांधले. मुला-मुलींना शिकवले. लग्ने केली. संसार थाटून दिला. निवृत्त होऊन घरी आले तर त्यांच्या लक्षात आले की घरात ते उपरे आहेत. अडगळ आहेत. एका छोट्या नोकरीचे निमित्त करून ते घर सोडून आल्या पावली परतले. भारतीय घरातील आजी-आजोबाही. तसे पाहिले तर म्हातारपण हे दुसरे बालपणच असते म्हणे! हे लक्षात घेऊन मुले, सुना, नातवंडांनी त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांच्याशी मैत्री करायला हवी. फार माफक अपेक्षा असतात त्यांच्या त्यांना हवी असते आपुलकी. प्रेमाचा संवाद. थोडेसे त्यांच्याकडे पाहणे! आणि खरं तर त्यांचं अस्तित्व आदरपूर्वक मान्य करणे! पण आपण तेही नाही करत. परिणाम आजी आजोबा आपल्याच घरात पाहुणे बनून जातात. हे त्वरित थांबायला हवे. त्यासाठी गरज आहे, आपली भूमिका बदलायची. आपण त्यांच्यात आपले प्रतिबिंब पहायला हवे. आपणही उद्या आजी-आजोबा होणारच ना? आपणाला आजी-आजोबा झाल्यावर लोकांनी कसे वागवावे वस्तुपाठ आपण आपल्या आचरणाने घालून द्यायला हवा.
आज जगभर आरोग्य सुविधा वाढल्यात. तुलनेने आहार चांगला झालाय. सरासरी स्वास्थ्यही उंचावलेय आपले. त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य वाढलेय. पूर्वीच्या तुलनेत आजी-आजोबांची संख्या वाढली. पण दुसरीकडे एकत्र कुटुंबाची जागा विभक्त घरांनी घेतली आहे. आपले शिक्षणमान उंचावले. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघेही नोकरी व्यवसाय करू लागलेत. खेड्यात पण असेच चित्र दिसू लागलेय. त्यामुळे आजी-आजोबांकडे, त्यांच्या अपेक्षा नि गरजांकडे पाहायला वेळ उरला नाही. व्यक्तिस्वातंत्र्य विकसित झाले. त्याचा दुष्परिणाम झालाय. 'तुझे तुला आणि माझे मला' असा विभाजनवाद प्रत्येक व्यक्तीत रुजलाय. या सगळ्या बदलामुळे आजी, आजोबा एकटे पडले नाही तर वय वाढेल तसे त्यांचे परावलंबित्व वाढते आहे. घर खायला उठतं त्यांना. वेळ जाता जात नाही. अधू दृष्टी, कमी ऐकू येणे, सांधे धरणे, अपचन अशा अनेक कारणांनी लहान बाळासारखी त्यांची काळजी करणे, त्यांच्याशी मैत्री करणे, बंधुभाव जोपासणे आवश्यक होऊन बसलय.
आजी-आजोबांशी मैत्री सर्वांनी करायला हवी. मुलांनी आपले जन्मदाते म्हणून अत्यंत कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहायला हवे. आदर ठेवायला हवा. त्यांचं मन राखायला हवे. दुखलं-खुपलं पहावे. त्यांच्या स्वभाव दोषांचा बाऊ करू नये. त्यांना समजून घ्यावे. नातवांना पण हीच शिकवण द्यायला हवी. ब-याच घरात नातवंडांचा पाश तोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा पाश जोपासायला हवा. ही दोघांची गरज असते. नातवंडे आजी-आजोबांकडे चांगली रमतात. संस्कारित होतात. प्रेम मिळते त्यांना. समाजाने पण आजी, आजोबांकडे अधिक उदारपणे पहायला हवे. आजी-आजोबांचे पिकलेले केस हे त्यांच्या अनुभवजन्य शहाणपणाचे प्रतीक असते. त्यांच्या ज्ञान, अनुभव व कौशल्याचा फायदा करून घेण्याची योजना हवी. आपणाकडे आजी, आजोबांची फुरसत हे वरदान ठरू शकते. निवृत्त शिक्षक, डॉक्टर, वकील, कितीतरी उपकारक सल्ला व सेवा देऊ शकतात. शासनाने पण कल्याण व विकासाच्या योजना आखून घराघरांतील आजी, आजोबांची काळजी घेण्याचे धोरण स्वीकारायला हवे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी आपणापुढे
आजी, आजोबांच्या सुविधांचा आदर्श ठेवला आहे. हे देश म्हणजे वृद्धजनांचे स्वर्गच होत. भौतिक समृद्धीबरोबर आजी-आजोबांना भावनेचा ओलावा पण लाभायला हवा. आजी-आजोबांच्या भावना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी मैत्रीसारखे दुसरे साधन नाही.
त्यासाठी आपणास आजी, आजोबांच्या मनाची ठेवण समजून घ्यायला हवी. त्यांचा स्वभाव ओळखायला हवा. त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्यायला हव्यात. हे करताना आजी, आजोबांनी हट्टी स्वभाव सोडायला हवा. वाढत्या वयाचं वास्तव मनापासून स्वीकारायला हवे. शिंग मोडून वासरात शिरायची वृत्ती सोडून द्यायला हवी. साध्या समाधानाचा अमृतकुंभ मनोवृत्ती भरते म्हणतात. 'मन चंगा तो कटौती में गंगा' हे लक्षात घेतले पाहिजे.
आजी-आजोबांचे वय वाढेल तसे विकार वाढतात. परावलंबीपणा वाढतो. अशा वेळी घरातील सर्वांनी त्यांच्यासाठी वेळ द्यायला हवा. त्यांची सोबत करायला हवी. त्यांच्या औषधाच्या वेळा पाळाव्यात. वाचून दाखवणं, फिरायला नेणे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना गुंतवणे असे प्रयत्न करणे म्हणजेच त्यांच्याशी मैत्री करणं होय. आपले असे वागणे त्यांच्या जीवनातील पोकळी भरून काढेल. त्यांचे आयुष्य वाढवेल. घर वा वृद्धाश्रम त्यांना तुरुंग वाटता कामा नये. आजी, आजोबा उतारवयात आत्मविश्वास गमावतात. अशा वेळी आपण त्यांना धीर द्यायला हवा. ती त्यांची खरी गरज असते. त्यांचा वेळ जावा म्हणून काळजी घ्यायला हवी. त्यांना मनोरंजन साधने पुरवणे, मनाप्रमाणे खाऊ घालणे, त्यांच्या छोट्या छोट्या इच्छांचा आदर व पूर्तता करणे अशातूनच पिढीतील अंतर, संघर्ष कमी व्हायला मदत होते. त्यांच्या अपेक्षा माफक असतात. त्यांची पूर्तता करायला हवी. आपले कोणीतरी आहे. आपली कोणीतरी काळजी घेते हा दिलासा त्यांना पुरेसा असतो.
असे सांगितले जाते की माणसाचा साठाव्या वर्षीचा चेहरा ही त्याच्या आयुष्याची, व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख. प्रसन्न चेह-याचे, उमद्या मनाचे आजी, आजोबा हे घरातील सौजन्यपूर्ण वातावरणाचे साक्षीदार असतात. ज्या घरात आजी आजोबा अडगळ म्हणून जगत असतात त्या घराचे सौख्यही अडगळीत पडते म्हणे! अडगळीचे आयुष्य आजी, आजोबांना देणे म्हणजे रोज मरणयातना देणे असते! यासारखा करंटेपणा दुसरा कोणता असूच शकत नाही. घरातील आजी, आजोबा हे आपलं वैभव म्हणून जोपासायला हवे. त्यांच्याबरोबर मैत्री करण्याने आपल्या जगण्यातील सार्थकता, समाधान वाढते.
आजी-आजोबा होणे ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही. वाढत्या वयाबरोबर माणसाच्या स्वभाव, वृत्ती, अपेक्षांत फरक पडत असतो. हा काळ तुलनेने हट्ट, आग्रह, अहंकाराचा काळ होय. ते समजून घेऊन घरातल्यांनी नमतं घेऊन, समजून घेऊन पुढे जायला हवे. यामुळे आपण त्यांचे आयुष्यच नाही वाढवत तर समाधान ही वाढवत असतो. या सर्वांसाठी घरातल्या जाणत्या मंडळींनी उदार व्हायला हवे. आजी आजोबा म्हणजे कालच्या तारखेचे वर्तमानपत्र. रद्दीसारखे त्यांच्याकडे तुच्छतेने पाहण, हेटाळणे केवळ असंस्कृतपणाचं लक्षण समजले पाहिजे. आजी-आजोबा आपल्या उद्याच्या जीवनाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या अनुभवाचा ठेवा आपणास किती तरी संभाव्य संकटांपासून वाचवू शकतो. आजी-आजोबा हे आपल्या पूर्व पिढ्यांचे संचित असते. संस्कार, परंपरा, ज्ञान, रीतिरिवाज, लोकसाहित्य यांचा तो सतत वहाणारा झरा असतो. हे पूर्व संचित आपल्या हाती तेव्हाच लागेल, जेव्हा त्यांच्याशी आपला मैत्रीपूर्ण संवाद राहील. मला आठवतं. माझी आई शिकलेली नव्हती. पण प्रसंगानुरूप इतक्या म्हणी नि वाक्यप्रचार ती वापरायची की तिच्या जिभेवर नाचणाच्या त्या शहाणपणाचा मला अचंभा वाटायचा. आणि खरे सांगायचे तर हेवाही वाटायचा. आपले सारे शिकणे, पदव्या तिच्या त्या हजरजबाबी दृष्टान्तांपुढे कोत्या वाटायच्या. आजी, आजोबांच्यात अनेक पिढ्यांचे शहाणपण संपृक्त असते. त्यांचा आदर नि मैत्री करायची, ती या अमोल ठेव्याच्या जपणुकीसाठी!
आजो-आजोबा मला लाभले नाहीत. ज्यांना लाभले ती मंडळी जेव्हा त्यांना हेटाळताना पाहतो तेव्हा मनस्वी दु:ख होते. ते दु:ख असते पिढीच्या अदूरर्शितेचे. “दैव देते नि कर्म नेते' म्हणतात ते अशा वेळी प्रकर्षाने खरे वाटायला लागते. आजी, आजोबा जिवाचे मैत्र झाले तर तुम्हास त्यांच्या बटव्यातील जीवन संजीवनी जडीबुटीही मिळेल व संस्कार संदुकीतील जडजवाहीरपण! माणुसकीचा गहिवर : साने गुरुजी
साने गुरुजी समग्र लेखक होते. कथा, कादंबरी, चरित्रे, निबंध, कविता, पत्रे अशा सर्व प्रकारचे त्यांनी लेखन केले. अनुवाद, संपादन क्षेत्रातील त्यांचे लेखन लक्षणीय आहे. सुमारे ११५ ग्रंथांचे ते लेखक होते. पण त्यांचा मूळ पिंड कथाकाराचाच दिसून येतो. साने गुरुजी वृत्तीने देशप्रेमी होते, व्यवसायाने शिक्षक होते, पण आचार नि विचारांच्या पातळीवर त्यांचे जीवन सतत माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेले असायचे. ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।' म्हणणा-या या कवी/कथाकाराच्या साच्या लेखनाचे अधिष्ठान माणुसकी हेच होते. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, नैतिकता इत्यादी जीवनमूल्यांवर साने गुरुजींची अपार श्रद्धा होती. मूल्यांचा झपाट्याने व्हास होणा-या आजच्या काळात गुरुजींचे साहित्य म्हणजे अंधाच्या गाभा-यात शांत तेवणारा नंदादीपच. त्यांचे सारे साहित्य आपणास संस्कारगर्भ दिसून येते.
साने गुरुजींनी विपुल कथात्मक साहित्य लिहिले. इंग्रजीत ज्याला सामान्यपणे ‘फिक्शन' संबोधले जाते अशा कथा, कादंबरी, आत्मकथा प्रकारचे साहित्य लिहिण्यात गुरुजींचा हातखंडा होता. कथा निरूपणाची गुरुजींची शैली संस्कार रुजवू पहाणाच्या संवेदनशील शिक्षकासारखी उपदेशात्मक असायची. १९३० ते १९५० या दोन दशकात त्यांनी प्रामुख्याने लेखन केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणांना त्यांनी आपल्या भाषणांनी देश स्वातंत्र्यासाठी पेटवून उठवले! त्याच गुरुजींच्या लेखणीने स्वातंत्र्योत्तर भारताची पहिली पिढी ध्येयवादी व आदर्श बनवली.
'श्यामची आई' ही साने गुरुजींची आत्मकथनपर कादंबरी. ही कादंबरी सांस्कारिक अर्थाने अनेक पिढ्यांची आई झाली. असे श्रेष्ठत्व फारच कमी साहित्यकृतींना लाभते. गुरुजींच्याच शब्दात सांगायचे तर ही रचना म्हणजे ‘तीर्थोटली' होय. बेचाळीस भागात तिची रचना आहे. म्हटले तर बेचाळीस कथात्मक प्रसंगांचा हा संग्रह. आपणाद्वारे (स्वत:द्वारे) परबोधाची तळमळ या कादंबरीत आहेत. यातील प्रत्येक प्रसंग वाचकास माणुसकीच्या दिव्यत्वाकडे घेऊन जातो. पायाला माती लागू नये म्हणून जपतोस ना, तसाच मनालाही घाण लागू नये म्हणून जप' असे सांगणारी ही कादंबरी बालवयातच पावित्र्य रुजविताना दिसते. कुटुंब, नाती, सदाचार, आदर्श अशा कितीतरी पैलूंचे चित्रण करणारी ‘श्यामची आई' (साच्या महाराष्ट्राची आई होताना दिसते. या कादंबरीने) सर्वांनी श्यामप्रमाणे सुधारावे. गोरगरीब, दलित पीडित जनतेची सेवा करावी म्हणून मानवी समाजाच्या उत्कर्षाची दिलेली शिकवण म्हणजे माणूस मोठा करणारी धडपड होय.
तीन खंडांत लिहिलेल्या 'श्याम' या रचनेत कथा आणि चरित्राचा सुंदर मिलाफ आढळतो. ही तीन कथात्मक पुस्तके म्हणजे बाल्य, किशोर व तारुण्य अवस्थेतून जाणा-या पिढीची जीवन मार्गदर्शिकाच होय. यातील पहिला खंड जीवन घडणीचा आहे. दुसरा जीवन कलहाचा, धडपडीचा तर तिसरा जीवन विकासाचा. साने गुरुजींच्या कथात्मक कृतीमागे पिढी घडविण्याच्या ध्यासाचे विस्मरण झाले, असे कधी होत नाही. किंबहुना, मनुष्य घडणीची तळमळ या साच्या लेखनाचे उगमस्थानच होय. या त्रिखंडात्मक आत्मपर कादंब-यांतून येणारा ‘श्याम' हा कादंबरीचा केवळ नायक राहात नाही. तो उगवत्या पिढीचा प्रेरक आदर्श बनतो. ‘उद्याचे माणुसकीचे जग गहिवराने भरलेले पहायचे असेल तर त्याची रुजवण आजच व्हायला हवी' असा द्रष्टा विचार साने गुरुजींच्या या रचनेमागे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
रचनेच्या घाटाने ज्यांना कादंबरी अथवा कादंबरिका म्हणता येतील अशा पंधरा रचना साने गुरुजींनी लिहिल्या. ‘धडपडणारी मुले' ही दोन भागात लिहिलेली कादंबरी. आज महाराष्ट्रात प्रा. ग. प्र. प्रधान, बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. बाबा आढाव प्रभृती समाजसेवकांची घडण या साहित्य कथाकृतीनी केली. ‘आस्तिक' ही त्यांची पौराणिक कथानकावर आधारलेली कादंबरी. केवळ पौराणिक कथानक उगाळायचे म्हणून ही कादंबरी खचितच त्यांनी लिहिली नाही. आपल्या या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी मानवी जीवनाविषयीची आस्तिकताच स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, 'मनुष्यातील सत्प्रवृत्तींवर विश्वास ठेवून मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करावयास जे झटतात तेच खरे आस्तिक. या विचारातून मानवी जीवन सत्प्रवृत्त करण्याची गुरुजींची धडपड स्पष्ट होते. ‘प्रिय भारत देश सर्व धर्मांच्या व संस्कृतींच्या मानवास एकत्र नांदवून दाखवतील' अशा आशेने लिहिलेली कादंबरी. यात आर्य व नागांच्या ऐक्याद्वारे गुरुजी भारतीय एकात्मताच सूचित करतात. साने गुरुजींनी ‘आस्तिक'मध्ये कथा रूपकाचं मानवीकरण केले आहे. ही कादंबरी गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात लिहिली. तत्कालीन जातीय दंग्यांचा संदर्भ ‘आस्तिक'च्या रचनेमागे आहे. वि. स. खांडेकरांनी म्हटल्याप्रमाणे ही कथानकप्रधान कादंबरी नसून तत्त्वप्रधान कथा आहे. या शिवाय गुरुजींनी ‘दीनबंधू'सारख्या अनेक कादंब-या लिहिल्या. या सर्व कथाकृतीत मनुष्य जीवन अधिक सुंदर, पवित्र व सत्यप्रिय व्हावे असा आशावाद स्पष्ट केला गेला आहे. या कादंब-यांनी मराठी साहित्याच्या भावसौंदर्यात मोलाची भर घातली आहे.
साने गुरुजी जसे कादंबरीकार होते तसे सिद्धहस्त कथाकारही होते. ‘विश्राम’ ‘सोनसाखळी’ ‘मुलांसाठी फुले', अमोल गोष्टी, ‘सुंदर कथा', 'मोरी गाय’, ‘दु:खी’, ‘चित्रा नि चारू' हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. या शिवास त्यांनी दहा भागात गोड गोष्टी लिहिल्या. “आवडत्या गोष्टी'चे सहा भागही प्रसिद्ध आहेत. सुमारे ३० कथासंग्रह लिहून साने गुरुजींनी मराठी बालवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. यापैकी ‘विश्राम' अशा चार गोष्टी आहेत. या साच्या बोधकथा होत. ‘मोलकरीण' शिक्षित पिढीस आई-वडिलांविषयी ऋणाईताची भावना शिकविते. 'शशी'मध्ये गुरुजी बालशिक्षणाच्या कृत्रिमतेवर प्रहार करतात. 'विश्राम' कथेवर समाजवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या साच्या कथांत तंत्रापेक्षा मंत्राकडे लेखकाचे अधिक लक्ष आहे. भरलेले हृदय रिकामे होईपर्यंत लिहिण्याचे झपाटलेपण प्रतिबिंबित करणा-या या कथा आहेत. अत्यंत सोप्या भाषेत उत्कट माणुसकीची शिकवण देणाच्या या कथांचे आपले असे महत्त्व आहे. सहजता व साधेपणा हा गुरुजींच्या कथा लेखनाचा मोठा गुण. 'सोनसाखळीची गोष्ट' ज्यांनी वाचली वा ऐकली असेल त्यांना याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही. सोनसाखळी गोड स्वभावाची मुलगी होती. सावत्र आई तिचा खूप छळ करायची. बाबा मात्र खूप प्रेम करायचे. ते एकदा परगावी गेले असता सावत्र आई छळ करून मारून टाकते. तिचे तुकडे करून जमिनीत पुरते. कळू नये म्हणून पुरलेल्या जागेवर डाळिंबाचे झाड लावते. बाबांची सोनसाखळीशी परतभेट होतच नाही. काही दिवसांनी झाडाला एक सुंदर डाळिंब लागते. बाबा ते तोडून कापू लागतात तोच आतून आवाज येतो. हळू कापा. मी आत आहे.' सोनसाखळी आपली सारी शोककथा बाबांना सांगते. बाबा चिडून आईस मारू लागतात तर ती क्षमा करा म्हणून विनविते. कुणी आपल्या वाटेवर काटे भले पसरो. आपण फुले पसरावित सारखा क्षमाशीलतेचा संस्कार देणारी ही कथा माणुसकीचा गहिवर अधिक गडद करते. ‘चित्रा आणि चारू' या कथेतही असंच. या कथेतला गुंडही माणूस म्हणून पुढे येतो. 'सती' कथेच्या प्रस्तावनेत साने गुरुजी स्पष्ट कबुलीच देतात की, “मला खलनायकाची कल्पनाच करता येत नाही. असा टोकाचा ध्येयवाद संत प्रवृत्तीचे कथाकार साने गुरुजीच जपू शकतात. आपण सारे भाऊ' मधील ‘कृष्णनाथ' म्हणजे साने गुरुजींमधील अव्यक्त साहसी पुरुषाचे उदात्तीकरण होय. गुरुजींनी आपल्या कथातून जीवनाच्या कट्रतेस नेहमीच फाटा दिला. जीवन कसे आहे यापेक्षा ते कसे असावे यावर त्यांचा अधिक भर असायचा. त्यांच्या कथा मानवी सहिष्णुतेच्या संवर्धनार्थ समर्पित अशा रचना होत.
साने गुरुजींच्या कथा आणि कादंब-यांचा एकत्रित अभ्यास केला की त्यातील अद्वैत स्पष्ट होते. या कथात्मक साहित्यामागे नवा भारत, समाजशील भारत उभा करायचे स्वप्न होते. देश घडणीचं एक आदर्श आणि आशादायी चित्र अथवा स्वप्न त्यांच्यापुढे असायचे. त्यांच्या कथात्मक साहित्यावर प्राचीन संतांचा निरूपणासारखा शैलीगत प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. गुरुजींमधील कथाकार हा बहुश्रुत होता. गुरुजींनी देश-विदेशी साहित्य वाचले होते. भारतातील विविध भाषांतील साहित्याची त्यांना जाण होती. तमिळ, बंगाली साहित्य त्यांनी अभ्यासले होते. तिरुवल्लूवराच्या ‘कुरल'चा त्यांनी केलेला अनुवाद वाचला की हे लक्षात येते. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीतून जन्मतं. ते प्रयत्नसाध्य लेखन नसते. न राहून ते लिहिले जाते. मग त्या साहित्यात मातीचा गंध आपसूकच येतो. साने गुरुजींच्या समग्र कथासाहित्यात अलंकार, म्हणी, उखाणे, वाक्यप्रचार, श्लोक, अभंग, ओव्या येतात. कारण ते समाजशील कथाकार होते. लोकांच्यात कथा रुजायच्या तर ह्या त्यांच्या जीवन परंपरेतून यायला हव्या असं भान असलेले कथाकार म्हणून साने गुरुजींकडे पहावं लागेल. त्यांच्या कथात तोच तोपणा असतो. पण त्यांचे संदर्भ प्रत्येकवेळी वेगळे असतात, उद्देशही वेगळा असतो. त्यांनीच स्पष्ट केल्याप्रमाणे ‘झाडाला येणारी पालवी असते ती. तीच पण नवी.
साने गुरुजींच्या समग्र जीवन व लेखनाचे सार ‘मेणाहून मऊ व दगडाहून कठोर' असं दुहेरी असते. त्यांच्या कथात बुडति हे जन पहावे ना डोळा' आशयाची धडपड असते. समस्त मनुष्यजातीचा सर्वोदयाची तळमळ त्यांच्या कथात्मक साहित्यात जागोजागी दिसते. सत्याचा शोध व जीवन विवेचन ही त्यांच्या कथा प्रवासाची दिशा असते. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' अशा सहजतेने त्यांच्या कथांची रचना असते. साने गुरुजी श्रेष्ठ दर्जाचे कथाकथन करायचे, लोककथाही लिहायचे. गुरुजींचं कथालेखन कथाकथन (Stpru telling) शैलीचे असते. त्यामुळे त्या वाचक व श्रोत्यांशी सहज नाते जुळवू शकतात. अशी प्रचंड ताकद घेऊन आलेल्या त्यांच्या कथात्मक साहित्याची सारी शक्ती आणि क्षमता ही त्यांच्या आशयात सामावलेली असते. साने गुरुजींच्या कथात्मक साहित्याची मोहिनी पिढ्यानपिढ्यात राहते, याचे कारण त्यांच्या विचार व आचारात असलेली सुसंगती होय. आधी केले नि मग सांगितले.' असं त्यांचे सारे जीवन असल्याने ते कथांमध्ये अकृत्रिमरित्या उतरलेले दिसते.
साने गुरुजी कथाकार म्हणून श्रेष्ठ ठरतात ते केवळ वाङ्मयीन निकषांवर, त्यांनी यशस्वी कथा, कादंब-या लिहिल्या म्हणून नव्हे. त्यांचे श्रेष्ठत्व हे पिढी दर पिढी वाढत गेलेले दिसते. त्यांच्या कथा साहित्यानी केवळ वाचकांना प्रभावित केले नाही. त्यांनी लेखक घडवले. साने गुरुजींच्या नंतरच्या पिढ्यांनी गुरुजींच्या कथादर्शाचा वसा जपला. ते लेखकांना प्रभावित करणारे लेखक होते. अणू विघटन शक्तीप्रमाणे त्यांच्या लेखनातील आशय पुढील पिढ्यांत द्विगुणित होत राहिला आहे. आजच्या स्वार्थी जगातही लोक मानवता जपू, जोपासू इच्छितात. याचे सारे श्रेय साने गुरुजींच्या मानवतावादी कथारचनांनाच द्यावे लागेल.
जे आहे ते वर्णन करणे म्हणजे वास्तवाचे चित्रण होय. त्यासाठी निरीक्षण आवश्यक असते. जसे असावे असे वाटते ते चित्रित करणे आदर्श चित्रण होय. त्यासाठी प्रज्ञा, कल्पना व चिंतनशीलता आवश्यक असते. गुरुजींच्या कथा लेखनात हे दोन्ही गुण दिसतात. ह्या अर्थाने त्यांचे कथात्मक साहित्य हे आदर्शोन्मुखी वास्तव साहित्य होय. हा जीवनाचा भावानुवाद होय. काही लोकांनी भाबडेपणा म्हणून त्याची टोपी उडवली तरी त्या लेखनाचे जीवनमूल्य कधी कमी झाले नाही. गांधीजींची हेटाळणी का कमी झाली? अक्षर साहित्य हे नेहमी काळाच्या कसोटीवर खरे उतरत असते म्हणतात. सात दशकांचा दीर्घकाळ लोटला तरी लोकांना ते वाचावे, विचार करावे असे वाटते यातच त्याचे कालजयीपण सिद्ध होते. गांधीवादावर गुरुजींची श्रद्धा होती. त्याचे प्रतिबिंब गुरुजींच्या साहित्यातील अहिंसा, हळवेपणा, प्रेम, करुणादी गुणात दिसून येतो. आज आपले सारे जीवन भोगवादी व आत्मकेंद्री बनत असताना तर त्यांच्या कथात्मक साहित्याची महती प्रकर्षाने गरज म्हणून पुढे येते.
मातृत्वात सामावलेले, आपसूक असलेले मांगल्य हे साने गुरुजींच्या कथांचं आणखी एक व्यवच्छेदक लखण होय. प्रौढत्वी निज शैशवास जपण्यातील निष्पापता त्यांच्या साहित्यात मनुष्य जीवनाला अतूटरित्या जोडते. साने गुरुजींच्या पुरुष हृदयात मातृत्वाचे बेमालूम कलम झाल्याची प्रचिती देणाच्या त्यांच्या कथा अनुभवणे हा ब्रह्मानंद असतो. कवितेत जसा मुखडा असतो, गायक तो आळवत श्रोत्यांमध्ये रुजवतो. साने गुरुजीदेखील आपल्या कथा साहित्यात माणुसकीच्या गहिवराचा मुखडा घेऊन येतात व रुजवत राहतात. त्यांच्या रुजवणीची वाचणाच्या कल्पनाही येत नाही. बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणाच्या कुशल शल्यविशारदाचे कौशल्य घेऊन येणा-या गुरुजींच्या कथांचे व्रण मात्र चिरस्थायी असतात ते त्यातील अक्षर मानव मूल्यांमुळेच. कालची आणि आजची दिवाळी
‘दिवाळी सण हा मोठा, नाही आनंदा तोटा' असे सुरेख वर्णन लाभलेला उत्सव म्हणजे दीपावली! त्याची आपण सर्वच मोठ्या आतुरतेने वाट पहात असतो. असे असते काय या सणात? बाल नि अबालवृद्ध सा-यांना किती ओढ असते या आनंद पर्वाची! आपल्या देशात हा सण सर्वाधिक उत्साहाने साजरा केला जातो. देशातील सर्व प्रांतांत तो वेगवेगळ्या रूपात साजरा होतो. या सणामागे हजारो वर्षांची परंपरा आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भ आहेत. आपला देश शेतीप्रधान आहे. शेतात पिके डुलू लागतात. शेतकरी आनंदी होतो. सुगीचे दिवस म्हणून तर शेतक-यास आनंद पर्वणीचे असतात. सुगीच्या ऐन बहरात हा सण येतो. आश्विन व कार्तिक महिन्याच्या संधिकाळात येणारा हा सांस्कृतिक उत्सव होय. शदर ऋतूच्या मध्यास सारा निसर्ग नवचैतन्याने न्हाऊन निघालेला असतो. सृष्टीचक्राचा फेर बदलतो तो याच सणाने. पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल देणारा हा सण आहे. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून दीर्घ दिवसांचे आनंददायी सत्र सुरू होते, त्याचा आनंद व्यक्त करणारा हा उत्सव होय. राम । चौदा वर्षांचा वनवास संपवून परत आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा स्वागतोत्सव म्हणजे दिवाळी! सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दीपोत्सव! सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याभिषेकाचा तर हा आनंद सोहळा! धन्वंतरीचा जन्मोत्सव म्हणजे दीपावली! सर्व तहेच्या अमंगळाचा नाश होऊन मांगल्य वर्धनाची प्रार्थना करणारा हा सण खरं तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समृद्धीची कामना करणारा लोकोत्सवच होय.
दिवाळी हा सर्वाधिक मोठा सण आहे. तो पाच दिवसांपर्यंत चालतो. पहिल्या दिवशी ‘धनत्रयोदशी' असते. यमराजास प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लोक दिवे लावतात. आश्विन वद्य त्रयोदशी दिवशी जे लोक दीपदान करतात त्यांना अपमृत्यू येत नाही अशी पारंपरिक कल्पना आहे. हा दिवस खरं तर दुस-यासाठी मागण्याचा, काही करण्याचा दिवस होय.
दुसरा दिवस ‘नरक चतुर्दशी' म्हणून साजरा केला जातो. आश्विन वद्य चतुर्दशी दिवशी भगवान श्रीकृष्णाने जुलमी नरकासुराचा वध केला. नरकासुराने बंदी केलेल्या सोळा सहस्त्र कन्यांना श्रीकृष्णाने मुक्त केले ते याच दिवशी. या दिवशी जो मंगल स्नान करील त्याला नरक पीडा होणार नाही असा वर कृष्णाने नरकासुरास दिला होता. म्हणून लोक या दिवशी पहाटे मंगल स्नान करून नरकापासून मुक्तीची कामना करतात.
दिवाळीच्या तिस-या दिवशी अमावस्या' असते. या दिवशी नंतर आश्विन संपून कार्तिक महिना सुरू होतो. मोठा दिवस सुरू होतो तो याच दिवसानंतर, जीवनाच्या उज्ज्वल पर्वाची पहाट या दिवसापासून होते. म्हणून लोक ‘लक्ष्मीपूजन' करतात. या दिवशी दौत, वही पुजून काही लोक ‘सरस्वतीपूजन ही करतात.
चौथा दिवस दिवाळी पाडवा' म्हणून ओळखला जातो. यास ‘बलिप्रतिपदा ही म्हणतात. विष्णूने वामनावतार घेऊन बळीला पाताळात धाडले तो हा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रमी संवत्सर सुरू होते. बळीराजाने देवांना वेठीला धरले होते म्हणून विष्णूने त्याची हत्या केली, पण तो प्रजाहितदक्ष व दानशूर राजा होता. 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' अशी लोक या दिवशी प्रार्थना करतात.
दीपावलीचा पाचवा दिवस ‘भाऊबीजेचा' असतो. खरे तर हा स्वतंत्र सण आहे. दिवाळीस जोडून येतो म्हणून तो दिवाळीचाच एक भाग झाला आहे.
ही कालची दिवाळी आपल्या प्रत्येक सणामागे घटना, प्रसंग आणि कथांची परंपरा आहे. आपला कोणताच सण निरुद्देश्य नाही. भारत हा ‘संस्कृती संकर' देश आहे. या देशात अनेक लोक आले. आर्य, अनार्य, हूण, कुशाण, डच, फ्रेंच, पोर्तुगाल, मोगल, तुर्क, पठाण अशा अनेक जाती, धर्म, पंथ, देशांचे लोक आपल्या देशात आले. काहींनी इथे संस्कृती विकसित केली. काहींनी साम्राज्य विस्तार केला. काही धर्म प्रसारासाठी आले. काहींनी व्यापार केला. या सर्व आघातात आपण आपल्या धर्म, संस्कृती आणि सणांची परंपरा अखंड ठेवली. सणांच्या अखंडित परंपरेमागे केवळ धर्म, जात, संस्कृतीचा अभिमान नाही. खरे तर आपला प्रत्येक सण हा तर संस्कार आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसामागे मांगल्य, समृद्धी, सदाचार, दान, परोपकारासारखी मूल्ये रुजविण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो. या सणामागील कथा किती खन्या आणि खोट्या हे आपण क्षणभर विसरून जाऊ. आपण या सणामागील भावना समजून घेणे गरजेचे आहे.
कालची दिवाळी हा सण होता. या सणास इतर सणांसारखेच दिखाव्याचे स्वरूप आले आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव समाज प्रबोधनाचा उपक्रम होता. दिखावा आणि देखाव्यात त्याचे समाजमूल्य हरवून गेले. थोड्या फार फरकाने दिवाळी कालची राहिली नाही. कालच्या दिवाळीत साधेपणा, मांगल्य भरलेले होते. आजची दिवाळी भपक्यात आणि आतषबाजीत जेरबंद झाली आहे. कालच्या दिवाळी मागील आजचे संदर्भ शोधून आपण डोळसपणे ती साजरी केली पाहिजे.
धनत्रयोदशीचा दिवस आज केवळ अभ्यंग स्नानाचा एक उपचार बनला आहे. या दिवसाचे खरे सामाजिक महत्त्व आपण विसरूनच गेलो आहोत. या दिवशी आपण दुसन्यासाठी काही मागावे, करावे अशी कल्पना आहे. मनुष्य रोज स्वत:साठीच मागत जगत असतो. या दिवशीचा संस्कार ‘परोपकाराय जीवनम्' असा आहे. समाजात आपल्या आजूबाजूला कितीतरी गरीब, गरजू लोक असतात. आपण तूप खाताना शेजा-याला तेल तरी मिळते का हे आपण पहायला हवे. समाजातील अनाथ, अंध, अपंगांसाठी काम करणाच्या किती तरी संस्था आहेत. त्यांना आपल्या घासातील घास देण्याचा ‘कृतिसंकल्प दिन म्हणून धनत्रयोदशीकडे आपण पाहायला हवं. या दिवशी दुस-याला अपमृत्यू येऊ नये म्हणून दीपदानाचा वर यमराजाने आपल्या दूतांना दिला, धन्वंतरीचा जन्म याच दिवशी असतो. या सर्वांमागे मानवी जीवन ‘मृत्युंजय' करण्याची कल्पना आपण विसरून चालणार नाही. आरोग्याचे अनेक संकल्प या दिवशी करून वर्षभरात आपण ते अमलात आणायला हवेत. धनत्रयोदशी परधन संपन्न करण्याचा उत्सव आहे हे विसरता कामा नये.
तीच गोष्ट नरक चतुर्दशीची. या दिवशी कृष्णाने नरकासुरास यमसदनास धाडले. एका जुलमी, अत्याचारी असुराचा नाश झाल्याचा आनंद म्हणून ही चतुर्दशी आपण साजरी करतो. आज आपले राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व त-हेचे जीवन नाना नरकांनी व्यापून टाकलेय. समाजाच्या सर्व दिशा अंधारल्यासारखी स्थिती आहे. हर दिशेची प्रवेशद्वारे नरकासुरांनी कवेत घेतली आहेत. अनैतिकता, भ्रष्टाचार, मूल्यहीनता, बेपर्वाई, हिंसा, जातीय भेद, धार्मिक संकुचितता, पक्षीय स्वार्थ, फसवणूक एक की दोन! आपलं आजचं जीवन केवळ रौद्र झालेय. हे सारे नरकासुर भस्मासुर नि रक्तबीजासारखे अजेय असल्याचे समाजभय वाढत आहे. हे वाढते समाजभय मित्रांनो! कुणी देवदूत येऊन दूर करणार नाही. नरकासुराच्या हत्येसाठी कृष्णजन्माची वाट पहात आपण आयुष्य काढत राहिलो तर नरकासुराने आपणास कधी गिळले ते समजणारसुद्धा नाही. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग आवतीभोवतीचे नरकासुर गाडून टाकण्यात घालवायला हवे. सामाजिक स्वास्थ्यासाठी आता हे अटळ आणि अनिवार्य आहे.
एक काळ असा होता की भारत हा सरस्वतीचा प्रदेश मानला जायचा. ऋषी मुनींच्या जप तपाची सुदीर्घ परंपरा हे या देशाचं वैभव होते. या देशात लक्ष्मी व सरस्वती एकत्र नि त्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाले तर गुण्यागोविंदाने नांदत होत्या. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अपवादात्मक घरातच दौत आणि वही लेखनाची पूजा पहायला मिळते. लक्ष्मी उपासक, धनलोभी झालेल्या समाजास सरस्वतीचे झालेले विस्मरण अधिक चिंतादायक झाले आहे. कधी काळी पुस्तकांनी भरलेल्या अलमाच्या आता चैनीच्या वस्तूची प्रदर्शने झालीत. भौतिक सुखाच्या मागे धावणारे आपण सारे, भविष्यात जेव्हा एकाकी होतो तेव्हा चंचल लक्ष्मीने आपली साथ सोडलेली असते. सरस्वतीचा वरदहस्त व वास्तव्य नसलेलं घर स्मशानापेक्षा भयावह असतं, हे। आपण समजून घ्यायला हवं. 'आश्विन आमावस्या' आपणास 'तमसो मा ज्योतिर्मय'चा संदेश देते. तो आपण कधी समजूनच घेतला नाही. सोनेरी, रुपेरी प्रकाशात आपले डोळे इतके दिपून गेलेत की शाश्वत सुखाचा शोध आपण विसरूनच गेलो आहोत. लक्ष्मीपूजनादिवशी सरस्वती पूजनाचा रिवाज पुन्हा सुरू व्हायला हवा.
'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' म्हणून आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. अनारोग्य, दु:ख दूर व्हावे आणि लोककल्याणकारी राज्य यावे म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस. सुराज्याच्या नववर्षाच्या प्रारंभाची आकांक्षा बाळगणारा हा दिवस. प्रत्यक्षात स्वातंत्र्याच्या गेल्या पन्नास वर्षांत दानी, परोपकारी, प्रजाहितदक्ष बळीराजा आपणास लाभलाच नाही. मित्रांनो! स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांच्या विभिन्न प्रयोगानंतर आता मात्र आपण जागे व्हायला हवं! राज्यकर्त्यांना दुषण देऊन आपणास हात झटकता येणार नाहीत. देश उभारणीच्या यज्ञात प्रत्येक नागरिकाच्या विवेकशील समिधा जोवर पडणार नाहीत तोवर बळीराजाचे राज्य येणे अवघड. नैराश्य आणते इडा पीडा, उत्साह आणतो विवेकाचे राज्य. कालच्या दिवाळीचा आजचा संदर्भ सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' म्हणणारा कवीही मित्रांनो! दीपोत्सवाचेच महत्त्व सांगतो. आज दिवाळी हा संदर्भ हरवलेला केवळ एक जोश झाला आहे. ऋण काढून सण करताना आपण कधी भविष्याचा विचार करत नाही. फटाके उडवत असताना आपण हे विसरतो की ते तयार करताना अनेक बालमजुरांचे सोनेरी बालपण उद्ध्वस्त झालंय! प्रत्येक सणांचे आता आपण सांस्कृतिक पुनर्मूल्यांकन करायला हवे! पूर्वी आपण निरक्षर होतो. आता साक्षर नि सुशिक्षित होऊ लागलेले आपण. आपणास कधी काळी केवळ चामडी डोळे होते. आता आपणास दृष्टी आलीय. सणांकडे पाहण्याचा प्रगत व नवा दृष्टिकोन आपण जोपासायला हवा. स्वातंत्र्याची गेली पन्नास वर्षे आपण अशीच घालवली. पुढील काळ तरी सुकर करू. साता उत्तराची सणांची ही कहाणी तो वर सुफळ संपूर्ण होणार नाही, जोवर आपण जुन्या सणांचे नवे संदर्भ शोधणार नाही.
कोई न होगा भूखा, नंगा।
सारा देश होगा भला, चंगा।।
कुटुंब हा आपल्या समाजाचा मूलभूत घटक आहे. त्याला समाजाचे हृदयही म्हटले जाते. मानवाच्या प्रारंभिक काळापासून समाजात कुटुंबसंस्था अस्तित्वात आहे. हे खरे आहे की, कालपरत्वे कुटुंबाचे स्वरूप बदलत आले आहे. विवाह, रक्तसंबंध, दत्तकविधान, नातीगोती, वास्तव्य अशा कितीतरी अंगांनी कुटुंब आकार घेत असते. अलीकडे पती, पत्नी व त्यांची अपत्ये यांच्या परीघातच कुटुंब सामावलेले दिसते. मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास आपण पाहू लागलो तर पूर्वी कुटुंब ही व्यापक कल्पना होती. टोळ्या, गट, गाव यांना कुटुंबाचे रूप असायचे. सार्वत्रिकपणे व सार्वकालिकपणे कुटुंबाचे जे रूप प्रचलित आहे त्यात विवाह बंधनांनी बांधलेल्या स्त्री-पुरुष संबंधाने अपत्यांसह साकारलेला गट म्हणजे कुटुंब. या कुटुंबाची विशिष्ट कार्ये परंपरेने निश्चित केलेली आहेत. संगोपन, संस्कार, शिक्षण, स्वावलंबन, मनोरंजन व पुनर्वसन अशा कितीतरी अंगांनी माणसाची घडण होत असते. एका अर्थाने समाजशील माणूस घडवणारी ती प्रयोगशाळाच असते. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची अशी परंपरा नि प्रतिष्ठा असते. कुटुंबाचे समाजातील स्थान हे या परंपरा आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते. प्रत्येकास कुटुंबाची ओढ असते, कारण कुटुंबच माणसास मानसिक व शारीरिक स्वास्थ्य देत असते. माणसाच्या अनेक दैनिक गरजांची परिपूर्ती होते ती कुटुंबामुळेच.
कौटुंबिक स्वास्थ्य हा सामाजिक आरोग्य व शांतीचा पाया मानला गेला आहे. ज्या देशात कुटुंब स्वास्थ्याचा गंभीरपणे विचार केला जातो ते देश प्रगती करतात, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्या देशात पूर्वी संयुक्त कुटुंबे होती. आजोबापासून ते नातवापर्यंतच्या किती तरी पिढ्यांची कुटुंबे एका घरात गुण्यागोविंदाने राहात असत. अशा घरात वडीलधा-यांचा आदर केला जायचा. अंध, अपंग, विधवा, परित्यक्तांना अभय असायचे. संपत्ती, हक्क, जबाबदाच्या सर्व समान असायच्या. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असा अलिखित संकेत पाळणाच्या या कुटुंबाचे स्वास्थ्य खरोखरच दृष्ट लागण्यासारखे असायचे. पण अलीकडच्या काळात आर्थिक संघर्ष, औद्योगिकीरण, नागरीकरण, विवाह संस्थेतील स्थित्यंतर, व्यक्तिवाद, स्वातंत्र्य अशा अनेकविध कारणांनी संयुक्त कुटुंबे लोप पावत चालली आहेत. जगभर सर्वत्र विभक्त कुटुंबाचा पुरस्कार केला जातो आहे. असे असले, तरी भारतासारख्या विकसनशील देशात अजूनही आई वडील, त्यांची अपत्ये व अपत्यांची कुटुंबे अशा दोन-तीन पिढ्यांची कुटुंबे एकत्र राहतात. तिथे पिढीतील अंतरामुळे कौटुंबिक स्वास्थ्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. या प्रश्नाचे आर्थिक, सामाजिक असे अनेक पैलू असून आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्षांच्या (१९९४) निमित्ताने का असेना, त्यावर विचार करणे गरजेचे झाले आहे.
एकाच कुटुंबात राहणा-या दोन पिढ्यांमध्ये सरासरी वीस वर्षांचे अंतर असते. वीस वर्षांचा काळ समाज परिवर्तनाच्या संदर्भात अल्प असला, तरी कुटुंबाच्या स्वरूपात मात्र तो मूलभूत बदल घडवून आणणारा असतो. शिक्षण, राहणीमान, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, जीवन संघर्ष, विकास व उत्पादन साधने या संदर्भात दोन पिढ्यांतील फरक आणि अंतर हे दोहोत फारकत निर्माण करू शकेल इतके असते. पिढीतील वैचारिक व दृष्टिगत अंतरामुळे समाजात बदल होतात हे खरे, पण नेमक्या या अंतराचाच परिणाम गृहस्वास्थ्यावर होत असतो, हे मान्य करायलाच हवे.
आजच्या आपल्या जीवनातील बदलाचे निरीक्षण करताना आपणास असे लक्षात येते की, एकाच कुटुंबात जिथे दोन पिढ्या एकत्र राहतात तेथील वडील पिढी ही तरुण पिढीस मागास वाटत असते. वडील पिढीचे अल्प शिक्षण, साधनांची मर्यादा, पूर्वसुरींच्या संस्कारांमुळे जगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वृत्ती, राहणीतील साधेपणा, या नि अशा कितीतरी गोष्टी तरुण पिढीला जाचक वाटत असतात. याचे एकमेव कारण जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातच मूलभूत फरक असतो. पूर्व पिढी समर्पणाचे आवाहन करत असताना नवी पिढी मात्र उपभोगाच्या मागे पळत असल्याचे चित्र सार्वत्रिकपणे दिसून येते. या अंतरामुळे परस्पर सामंजस्य अभावानेच दिसून येते. व्यक्तिवाद, स्वातंत्र्य, भौतिक समृद्धीचा हव्यास, चंगळवाद इत्यादीसारख्या नवमतवादी फरकामुळे आज कौटुंबिक स्वास्थ्य हरवून गेले आहे. पिढीतील अंतरामुळे हरवलेल्या कुटुंब स्वास्थ्याचा विचार दोन पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. अंतराचा पूर्वपिढी संदर्भातील प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो स्वतःच्या पिढीसंदर्भातही महत्त्वाचा आहे. मुला-मुलींच्या नव्या पिढीचे आई-वडिलांच्या जुन्या पिढीशी जे मतभेद आहेत, ते केवळ वैचारिक नाहीत तर ते दैनिक जीवनातील अनेक छोट्या छोट्या प्रश्नांच्या संदर्भातही दिसून येतात. मुलाचे लाड करायचे की नाही, मुलाला कोणत्या शाळेत घालायचे यापासून ते मूल व सुनेने सिनेमाला जावे की नको, सुनेने साडी। नेसावी का कमीज कुर्ता घालावा यापर्यंत हे मतभेद असतात. जिथे तिथे आता व्यक्तिस्वातंत्र्य मान्य झाल्याने नवी पिढी आग्रही राहते. परिणामी, वडील पिढीचा अनादर, उपेक्षा, त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य हरवणे असे गंभीर प्रश्न आता घरोघरी दिसून येतात. आई-वडिलांच्या भौतिक गरजांची पूर्ती केली की आपली जबाबदारी संपली असे मानणारी मोठी नवी पिढी समाजात सर्वत्र दिसते. आपल्या आई-वडिलांची मानसिक व भावनिक भूक दुर्दैवाने नवी पिढी विचारात घेत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या पिढीची होणारी कुतरओढ हा आज खरा चिंतेचा विषय आहे. पण आई-वडिलांना स्वतंत्र घर देणे, अगदीच मोठा प्रश्न असेल आई-वडील वृद्ध, अपंग असतील तर त्यांची सोय वृद्धाश्रमात करणे यातच इतिकर्तव्यता मानणाच्या पिढीने फिरून अंतर्मुख होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पिढीतील अंतराचे पूर्वपिढीवर होणा-या परिणामांइतकेच गंभीर परिणाम आज वर्तमान तरुण पिढीवर होत आहेत व त्याचा कुटुंब स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होतो आहे. वडीलधाच्या माणसांचे वर्चस्व व धाक न राहिल्याने पुरुष वर्गात स्वेच्छाचारी वृत्ती बळावते आहे. व्यसनांचे वाढते प्रमाण हेच सांगते. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलांकडे पाहण्यास आज वेळ नसल्याच्या तक्रारी ऐकू येऊ लागल्या आहेत. पाळणाघरात वाढणारी नवी पिढी कोणते संस्कार घेऊन विकसित होणार आहे? चंगळवादी संस्काराने आपण मानवी संबंधांनाच छेद तर देत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरावर आपले कुटुंब सुख अवलंबून आहे. परस्पर व उपेक्षाही भूमितीच्या पटीने वाढत निघाल्याने समाजातील कुटुंबे ही विध्वंसाच्या निद्रिस्त ज्वालामुखी विवरावर बसल्यासारखी स्थिती आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून जो बदल आपणास कुटुंब व्यवस्थेत अभिप्रेत आहे त्याची सुरुवात कुटुंबापासूनच व्हायला हवी. त्यासाठी आपल्या घरात काही संस्कार व परंपरा आपण जाणीवपूर्वक जपल्या, जोपासल्या पाहिजेत. वडील माणसांचा आदर अगोदर स्वतः करायला शिकले पाहिजे. बच्याच घरात आजी-आजोबांना नमस्कार करा म्हणून दरडावणारे आईवडील नमस्कार करताना मुलांना दिसत नाहीत. वडील माणसांची सेवा शुश्रूषा, हवं नको विचारणं यातून कितीतरी आपलेपणा निर्माण होत असतो. असे प्रसंग नव्या पिढीने कर्तव्यपूर्ती व संस्कार रुजवणीची संधी मानून स्वीकारायला हवे. नव्या पिढीच्या राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी भिन्न असणे गैर नाही. त्यात आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना पूर्व पिढीच्या सवयींची जपणूक करण्याचे भान आपण ठेवायला हवे. नातेसंबंधांचा गतीने होणारा -हास हा आजच्या कौटुंबिक अस्वास्थ्याचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या मुलांना आजी, आजोबा, काका, मामा, मावशी याची घरं आपल्या छोट्या छोट्या स्वार्थ आणि मतभेदांमुळे पारखी करतो आहोत याचे भान । ठेवायला हवे. प्रसंगी व्यक्तिगत मतांना मुरड घालून मुलांसाठी, आई-वडिलांसाठी हे सर्व जपायला हवं. कौटुंबिक स्वास्थ्य हे नेहमीच त्याग, समर्पण, आस्था, बंधुभाव, कर्तव्यपरायणता इत्यादींवर अवलंबून असते. नवमतवाद, स्वातंत्र्य, उपभोग वृत्ती यांच्या जोरावर आपण आपले कुटुंब ‘घर' करणारा का ‘लॉजिंग/ बोर्डिंग' हा खरा प्रश्न आहे. ज्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने आपण संयुक्त कुटुंबे नाकारून विभक्त झालो तेथील कुटुंब स्वास्थ्य हरवल्याने निर्माण झालेले मानवी संबंधाचे प्रश्न आपण डोळसपणे अभ्यासून आपल्यात बदल घडवून आणले पाहिजे. पिढीतील अंतर हे कुटुंब स्वास्थ्य हरवणारे कारण न होता कुटुंब स्वास्थ्य वाढवणारे वरदान व्हायला हवे. “हम दो हमारे दो'ची घोषणा नियोजनासंदर्भात योग्य असली तरी घरासंदर्भात ‘हम सब एक है' हाच आपला मूलमंत्र व्हायला हवा. तरच आपण हे विश्वचि माझे घर पर्यंतची मजल मारू शकू. क्रांतिकारी मंगल पांडे
कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्याच्या स्वतंत्र होण्याची कहाणी नेहमी अपूर्णतःच लिहिली जाते. विसावे शतक जगाच्या इतिहासात स्वातंत्र्याचा संदेश घेऊन आले. या शतकात जितके देश दास्यतेच्या शृंखलेतून मुक्त झाले तितके किंबहुना एखाद्याच शतकात झाले असतील. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांचा उदय याच शतकात झाला. लोकतंत्रात्मक राज्यसत्तेचा पाया याच शतकात पक्का झाला. महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेलांसारख्या अनेक स्वतंत्रता सेनानींनी विशाल जनसभा, मोर्चे, घेराव, प्रदर्शनासारख्या सत्याग्रहांद्वारे अन्यायी राज्यसत्तेविरुद्ध जनसमुदाय उभा केला. ‘‘जनता आयी है, सिंहासन खाली करो" यासारखे नारे याच शतकात बुलंद झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही देशाला स्वातंत्र्य हे शांतीपूर्ण मार्गाने कधीच मिळालेले नाही. स्वातंत्र्यासाठी भूमिगत आंदोलन, बंड, क्रांती, बॉम्ब विस्फोट, हत्याकांडाचे उपाय अवलंबिले गेलेच. भारताच्या स्वातंत्र्यासाठी विचार केला तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, हिंसात्मक आणि अहिंसात्मक हे दोन्ही मार्ग समांतर आणि समानपणे हाताळले गेले. दोन्हींचा परिणाम कमी-अधिक रूपाने झाला आणि देश स्वतंत्र झाला. या अगोदर आपल्या देशबांधवांना शंभर वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत इंग्रजी सत्तेविरुद्ध अखंडपणे संघर्ष करावा लागला. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात सन १८५७ पासून मानली जाते. हे तेच वर्ष आहे, जेव्हा इंग्रजी सत्तेविरुद्ध एका साहसी शिपायाने बंडाचा पहिला झेंडा फडकावला होता. त्याचे बंड म्हणजे काय होते? वर्षानुवर्षे दबलेल्या ज्वालामुखीचा स्फोट होता तो! त्याने इंग्रजी सत्तेला फक्त ललकारलेच नाही, तर आपल्या असीम धाडसाने घाबरवून सोडले. त्या स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे क्रांतिकारी मंगल पांडे. स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला बळी आणि होय, देशाचा पहिला हुतात्मा। एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात भारतवर्षाच्या चारी बाजूला इंग्रजी सत्ता आणि सैन्याचा दबदबा होता. त्या वेळी इंग्रजी सत्तेत हिंदुस्थानी सैनिकसुद्धा असत. पण त्यांचे काम इंग्रजांच्या इशा-यावर नाचणे असे. हिंदुस्थानी शिपायांच्या आज्ञा पालनाविषयी ते पूर्ण परिचित होते. नंतरच्या काळात इंग्रजांनी हिंदुस्थानी शिपायांविरुद्ध दमन आणि अत्याचाराची नीती अवलंबिली. विशेषतः भारतीयांत स्वातंत्र्याची मुळे जोर धरू लागल्यानंतर तर या नीतीधर्म, जातीपातीचा भेद यासारख्या तत्त्वांना साधन म्हणून वापरणे सुरू केले. हिंदुस्थानीयांचा अनादर करणे, हिंदू-इस्लामबद्दल बोलून एकमेकांबद्दलचा मनात तिरस्कार निर्माण करणे, ख्रिस्ती धर्माच्या प्रसार आणि प्रसाराला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी आता रोजच्याच झाल्या होत्या. याचा परिणाम असा झाला की इंग्रजी सेनेत असणाच्या हिंदुस्थानी शिपायांचा क्रोध आणि बदल्याची आग भडकू लागली. हिंदू शिपायांना कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यास बंदी करण्यात आली. त्या वेळी हिंदू लोक समुद्रपार करण्यास पाप समजत होते. हे बघून मुद्दाम हिंदुस्थानी पलटणींना जहाजाने विदेशी पाठवू लागले. बंदुकांना लागणाच्या काडतुसांना चरबी लावण्याची गोष्ट आता जुनी झाली होती. या सगळ्याविरुद्ध पहिला विरोध बराकपूर छावणीच्या पस्तिसाव्या पलटणचा बहादूर शिपाई मंगल पांडेने केला.
मंगल पांडे जवान शिपाई होता. स्वभावाने सरळ दिसणारा हा शिपाई होता मात्र स्वाभिमानी. जन्माने ब्राह्मण असणारा मंगल पांडे धर्मपरायण होता. त्याच्या धर्मनिष्ठेबाबत छावणीतील सगळे परिचित होते. एवढेच नव्हे इंग्रजसुद्धा. २९ मार्च, १८५७ ची गोष्ट आहे. त्या दिवशी छावणीत कानोकानी ही बातमी पसरली की, पलटणीला जाणूनबुजून धर्मभ्रष्ट केले जात आहे. त्या वेळी सैन्यात ब्राऊन बेस बंदुका वापरत. आता त्यांच्याऐवजी एनफिल्ड बंदुका वापरायला देण्याची शक्यता होती. बंदुका छावणीत आणल्यादेखील होत्या. त्यासाठी वापरल्या जाणा-या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावली आहे ही गोष्ट वणव्यासारखी पसरली. या बातमीने मंगल पांडेसारख्या धर्मप्रिय शिपायाच्या डोळ्यांतून आग भडकणे स्वाभाविकच होते. हिच ती वेळ होती, जेव्हा सैन्यात झाशी, बिठूर, ग्वाल्हेर इ. ठिकाणाहून बंडाचे निरोप मिळत होते. त्या वेळी प्लासीच्या लीढाईची शताब्दी साजरी केली जाणार होती. २१ जून, १८५७ पूर्वी इंग्रजी सत्तेला नष्ट करण्याचा निश्चय केला गेला होता. यासाठी ३१ मेचा मुहूर्तसुद्धा निश्चित झाला होता. पण देश आणि वचनाचा पक्का शिपाई मंगल पांडे आपल्या उसळत्या रक्ताला आवरू शकला नाही. त्याने संपूर्ण छावणीत चक्कर टाकून बंड करण्याची घोषणा केली. देश स्वातंत्र्याच्या नशेने वेडा झालेला मंगल पांडे बंदूक घेऊन इंग्रजांशी दोन हात करण्याचे
आवाहन करू लागला. या धाडसाने संपूर्ण छावणी आश्चर्यचकित झाली. इंग्रजांना काहीच सुचेना. मारो फिरंगी को' अशी घोषणा करत एकटा मंगल पांडेच काय तो ओरडत राहिला. बाकी सगळे फक्त बघतच राहिले. त्या वेळी त्याच्या या असीम साहसाला इतर साथीदारांचे समर्थन मिळाले असते तर कदाचित देशाच्या स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागली नसती. पण नियतीला कदाचित हे मंजूर नसावे.
मंगल पांडेने इंग्रज अधिकारी ह्यूसनला आपल्या गोळीचा शिकार बनविला. ह्यूसन धारातीर्थी पडला. इंग्रजी सत्तेचे पतन सुरू झाले. ह्यूसनला मरणासन्न अवस्थेत बघून इंग्रजांचे भडकून उठणे स्वाभाविक होते. लेफ्टनंट बकने मंगल पांडेला आव्हान केले. त्याला शरण येण्यास सांगितले. जीवदानाचे आश्वासनसुद्धा दिले. पण मंगल पांडे वचनासाठी मरणारा, तत्त्वांचा पक्का शिपाई होता. त्याच्यासाठी जीवदानाच्या भिकेपेक्षा आपल्या मातृभूमीची हाक महत्त्वाची होती. त्याने लेफ्टनंट बकलासुद्धा गोळीने उडविले. मंगल पांडेच्या या अचाट धाडसाने इंग्रज चिंतित झाले. पूर्ण पलटणींचा धाक दाखवून कर्नल व्हीलरने पुन्हा त्याला शरण यायचे आवाहन केले. परंतु मंगल पांडेवर देशाला स्वातंत्र करण्याची, त्याचप्रमाणे इंग्रजांचा कोणत्याही परिस्थितीत बदला घेण्याची भावना तीव्र झाली होती. त्यांच्या देशनिष्ठेने फलटणीतील हिंदुस्थानी शिपायांत देशप्रेमाची भावना जागृत झाली. त्यांनी इंग्रजांना परत फिरण्यास सांगितले. ते एका आवाजात गरजले. “खबरदार, जर मंगल पांडेला हात लावला तर. जो हात उचलेल त्याचे हात वेगळे केले जातील. त्यांच्या आम्ही केसालासुद्धा हात लावू देणार नाही." हे ऐकून कर्नल व्हीलर दोन पावले मागे वळला. त्याने मंगल पांडेला अटक करण्याची आज्ञा केली. पण कुणीही त्याचे ऐकले नाही. या पराजयानंतर आता पाळी होती, जनरल हियर्सची. इंग्रजी सैन्याच्या आणखी तुकड्या आणल्या गेल्या. पस्तिसाव्या पलटणीच्या सगळ्या हिंदुस्थानी सैनिकांना घेरले गेले तेव्हा कुठे मंगल पांडे त्यांच्या हाताला लागला. पण तोसुद्धा जखमी अवस्थेत असताना! अपमानित होऊन इंग्रजांचा कैदी होण्याच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. जनरल हियर्सवर रोखलेली बंदूक त्याने आपल्याकडे वळविली आणि ट्रिगर दाबला. पाहता पाहता मंगल पांडे जमिनीवर पडला. रक्ताने माखलेला आणि बेशुद्ध मंगल मिळूनसुद्धा इंग्रज त्याला हात लावण्यास घाबरू लागले. भीती होती, जर पुन्हा उठला तर! सर्व इंग्रज आता त्याला घाबरू लागले होते. नंतर औषधपाणी देऊन त्याच्यावर उपचार केले जाऊ लागले. थोड्याच दिवसांनी तो बरा झाला. पण आता इंग्रजांनी त्याच्यावर कोर्टमार्शल करण्यास सुरुवात केली. विचारपूस झाली. साक्षीदार सादर केले गेले. आरोप लावले गेले. त्याच्याकडून जबाब मिळविण्यासाठी वेगवेगळे उपाय केले गेले, पण त्याने हु का चू केले नाही. त्याने एकच पालुपद लावले होते, “हा माझा स्वतःचाच निर्णय होता! हे ना कटकारस्थान आहे ना अन्य काही! माझ्या देशाला आणि मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी उचललेले हे निर्णायक पाऊल आहे आणि याचा मला जरासुद्धा पश्चात्ताप झालेला नाही." नंतर राजद्रोह, बंड, हत्यांच्या आरोपाखाली त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. ८ वाजता एका सरोवराकाठी बनविल्या गेलेल्या वधस्तंभावर त्याला फाशी दिली गेली. मंगल पांडे हुतात्मा झाला. स्वातंत्र्याची मंगलज्योत पेटली गेली.
क्रांतिकारी मंगल पांडेच्या बलिदानाने या पिढीत स्वतंत्र्याचा मूलमंत्र जागृत झाला. त्याच्या बलिदानानंतर कितीतरी देशप्रेमी, शिपाई, सैनिक हुतात्मे झाले. तेव्हापासून या देशातील प्रत्येक आई आपल्या मुलांना मंगल पांडेच्या बलिदानाची अमर कहाणी ऐकवू लागली. फासावर लटकणाच्या मंगल पांडेला बघून सगळ्या हिंदुस्थानी शिपायांनी इंग्रजांविरुद्ध मुठी आवळल्या. सामूहिक बंडाची परंपरा सुरू झाली. देशातील छोट्या-मोठ्या राजा, महाराजांनी संघटित होऊन इंग्रजांचा बदला घेण्याची शपथ घेतली. बराकपूर छावणीत तरी मंगल पांडेची प्रत्येक वस्तू अमर झाली. त्याच्या राहिलेल्या वस्तू आता पूजेच्या योग्य झाल्या. प्रत्येक विद्रोही स्वतःला मंगल पांडे बनविण्याचे स्वप्न बघू लागला. या बलिदानानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, शहीद भगतसिंहसारख्या अनेक सुवीरांनी प्राणाची बाजी लावून देशाला स्वतंत्र केले.
क्रांतिकारी मंगल पांडेच्या बलिदानाचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांविरुद्ध डोळे वर करून बघण्याची हिम्मत या अगोदर कुणीच केली नव्हती. त्याने असे धाडस पहिल्यांदा दाखवले. या साहसाने देश आणि मातृभूमीसाठी प्राणाची आहती देण्याची इच्छा बाळगणाच्यांच्या मनात आशेची ज्योत प्रज्वलित झाली. हे होऊ शकते, असा आशावाद मंगल पांडेनेच सर्व भारतीयांच्यात जागृत केला. त्याने किती इंग्रजांना मृत्यूच्या दारात पोहोचवलं, ही गोष्ट गौण मानली गेली पाहिजे. महत्त्व या गोष्टीला आहे की इंग्रज पराजित होऊ शकतात, त्यांना मारले जाऊ शकते, असा विश्वास त्यानेच पहिल्यांदा निर्माण केला. म्हणूनच जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची कथा आठवली जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मंगल पांडेची आठवण काढली जाते. रामधारी सिंह 'दिनकरांच्याच शब्दात सांगायचे तर, म्हणावं लागेल
वज्र की दीवार जब भी टूटती है
नींव की यह वेदना, विकराल बनकर छूटती है।
दौडता है दर्द कि तलवार बनकर
पत्थरों के पेटसे, नरसिंह ले अवतार।
काँपती है, वज्र की दीवार।
महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन म्हणजे नेता आणि महात्म्यांच्या कार्याचे पुनरावलोकन करण्याचा दिवस. महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जीवनकार्याचे विहंगमावलोकन करणे निश्चित प्रेरक ठरेल.
एकोणिसावे शतक सुधारणा आणि जागृती घेऊन आले. या काळात आपल्या देशात धर्म, जात, रूढी, परंपरा, शिक्षण इत्यादी बाबतीत जी जागृती झाली ती क्वचितच कुठल्या काळात झाली असेल. महाराष्ट्राच्या संदर्भातच जर विचार केला तर हा काळ सुधारकांचाच काळ सिद्ध होतो. या शतकात महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या कितीतरी समाजसुधारकांनी आपल्या क्रांतिकारी आणि आक्रमक बनविण्याचे श्रेय महात्मा फुल्यांनाही दिले पाहिजे. या काळातील इतर सुधारकांनी एका विशिष्ट मर्यादित क्षेत्रातच सुधारणा केल्या. पण महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षण, बाल विवाह, पुनर्विवाह, केशवपन, स्पृश्य-अस्पृश्य, धर्मांधता इत्यादी विभिन्न प्रश्नांच्या संदर्भात व्याख्यान, लेखन, जनजागृती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कृतिशील उपक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला.
महात्मा फुल्यांनी १९४८ साली आपल्या सामाजिक कार्याचा प्रारंभ केला. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सामाजिक कार्याशी चिकटून राहिले. आपण त्यांच्या जीवनकार्याला दोन भागात विभाजित करू शकतो. सन १८४८ पासून १८६५ पर्यंत त्यांनी स्त्रियांच्या आणि दलितांच्या संदर्भात विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा पूर्वार्ध हा शैक्षणिक कार्याचा काळ होता. उत्तरार्धात सन १८६५ पासून १८९० पर्यंत त्यांनी जातिप्रथा, धर्मांधता, विवाह पद्धती, विषमता इत्यादींच्या संदर्भात जनजागृती करून समाजाला पुरोगामी बनविले.
महात्मा फुले यांनी सन १८४८ मध्ये स्त्री शिक्षणापासून आपल्या सामाजिक जीवनास प्रारंभ केला. त्या वेळी स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार आहे, हे मान्य नव्हते. पण फुले यांचा विचार होता की जोपर्यंत स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत संपूर्ण समाज शिक्षित होणार नाही. समाजाला पुरोगामी बनविण्यासाठी स्त्रीचं फक्त शिक्षित होणं आवश्यकच नाही तर अनिवार्यसुद्धा आहे, हे समजून त्यांनी सन १८४८ मध्ये पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या कन्या विद्यालयाचा प्रारंभ केला. या कार्याची प्रेरणा त्यांना ख्रिश्चन मिशनच्यांकडून मिळाली. ही शाळा उघडण्यापूर्वी त्यांनी ख्रिश्चन मिशनच्यांच्या अनेक संस्थांच्या प्रशालांचा अभ्यास केला. त्यांच्या या प्रयत्नांस सनातनी लोकांनी यश येऊ न देण्याचा शक्य होईल तितका प्रयत्न केला. पण महात्मा फुले जरासुद्धा डगमगले नाहीत. त्यांनी दलित मुलींसाठी उघडलेल्या या शाळेत शिकविण्याची जबाबदारी आपली पत्नी सौ. सावित्रीदेवींच्यावर सोपविली. त्या स्वतः अशिक्षित होत्या. पण फुल्यांनी त्यांना शिकवून शिकविण्यास योग्य बनविले. फुल्यांच्या विचारानुसार शिक्षण हा प्रगतीचा मूलभूत पाया आहे. शिक्षणाचं असाधारण महत्त्व स्पष्ट करीत त्यांनी आपला ग्रंथ ‘शेतक-यांचा आसूड' मध्ये म्हटलं आहे की,
विद्येविना मती गेली
मतिविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले
आपल्या या धारणेनुसार पुढे त्यांनी सन १८५१ मध्ये आणखी दोन शाळा उघडल्या. एकोणिसाव्या शतकात शिक्षणाचा प्रसार म्हणजेच एक कठीण कार्य होतं. या कार्यासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. समाजातील अभिजात वर्गाच्या हातात सगळी आर्थिक साधने होती. त्यांचा दलित आणि स्त्री शिक्षणाला जबरदस्त विरोध होता. अशा स्थितीत महात्मा फुले यांनी ज्या चिकाटीने शिक्षणाचा मंत्र जागृत केला, तो पाहून इंग्रजसुद्धा प्रभावित झाले. तत्कालीन इंग्रज शिक्षणाधिकारी मेजर कॅडीने त्यांचे सार्वजनिक अभिनंदन केले.
तो हा काळ होता तेव्हा स्त्रियांना आणि दलितांना कमी लेखले जाई. स्त्रीदास्यता ही महात्मा फुल्यांसाठी चिंता आणि चिंतनाचा विषय बनली होती. त्या वेळी बालविवाहाची प्रथा होती. पुन्हा पुन्हा पसरणाच्या सांसर्गिक आजारांमुळे आपल्या माता-भगिनी तरुणावस्थेतच विधवा बनत होत्या. त्या वेळी विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहाचा प्रश्नच नव्हता. अशा स्त्रियांना केशवपनाच्या प्रथेला बळी पडावे लागत होते. तारुण्यसुलभ कामवासनेच्या प्रलोभनाला बळी पडून अनेक अविवाहित व विधवा स्त्रिया गर्भवती बनत होत्या. समाजाच्या उपेक्षेच्या भीतीने गर्भपातासाठी शक्य ते प्रयत्न केले जात होते. नवजात शिशूची निघृण हत्या बघून महात्मा फुल्यांच्या काळजात कळ उठत होती. त्यांनी या अनौरस आणि अनाथ, नवजात बालकांच्या हत्येला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने सन १८३६ मध्ये ‘बाल हत्या प्रतिबंधक गृह’ उघडले. या संस्थेत त्यांना आश्रय दिला जाऊ लागला. मग त्यांना झालेल्या अनाथ आणि अनौरस मुलांच्या पालनपोषणाची समस्या उभी राहिली. महात्मा फुले यांनी अशा अनाथ मुलांना दत्तक घेण्याच्या कार्याला सुरुवात केली. लोकांना या समस्येबद्दल जागृत करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतः विधवा बाईच्या एका मुलाला दत्तक घेतलं. महात्मा फुले यांच्या साच्या समाजसुधारणा उपक्रमांची ही विशेषता होती की कोणत्याही गोष्टीला ते विचार, व्याख्यान आणि लेखनाच्या सीमेपर्यंतच पाहात नव्हते. प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी ते भावनिक एकात्मतेच्या पुढे जाऊन व्यक्तिगत स्तरावर त्यासाठी कृतिशील होत होते. स्त्री शिक्षणाचा प्रारंभ त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षित करून केला. तीच गोष्ट अनाथ मुलांना सनाथ करण्याची.
केशवपन प्रथेचा विरोध करण्यासाठी त्यांनी नाभिक लोकांना एकत्रित करून त्यांना संपही करावयास लावला. प्रबोधन कार्यासाठी त्यांनी संगठन आणि संघर्षाच्या सर्व साधनांचा वापर केला. विधवा स्त्रियांची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी १८६५ मध्ये पुनर्विवाहाचे आयोजन करून लोकांमध्ये त्यांच्याविषयी आस्था निर्माण केली.
स्त्री दास्यतेबरोबराच ते दलितांच्या विभिन्न समस्येविषयी नेहमी सतर्क राहात. दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी हजारो मैल चालत जावे लागे. ते प्रत्येक समस्येच्या समाधानाची सुरुवात स्वतः सोडवूनच करीत. फुल्यांनी आपल्या घरचा हौद दलितांना खुला केला. आज महाराष्ट्रात जो 'एक गाव, एक पाणवठा' उपक्रम चालू आहे, त्याचं बीज महात्मा फुल्यांच्या या उपक्रमातून दिसून येतं. एकोणिसाव्या शतकात शिवाशिवीचे नियम कडक होते. अशा वेळी त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एक अपूर्व, अनोखे असे धाडस होतं.
महात्मा फुले स्वतः समाज सुधारणेच्या विविध कार्यात व्यस्त राहात होते. अशा कार्यात व्यस्त राहणाच्या इतर समाजसुधारकांच्या विषयी ते नेहमी आदराची भावना बाळगत होते. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वतींच्या विषयी त्यांची भावना काहीशी अशीच होती. जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा त्यांनी मोठी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले. अशा प्रकारच्या स्वागतासाठी रूढीवादी लोकांचा विरोध होता. त्यावरून ते उदारमतवादी होते याचाच परिचय मिळतो. 'गाढवाचं प्रदर्शन' असं म्हणून रूढीवादी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, पण ते जरासुद्धा विचलित झाले नाहीत. आर्य समाजाच्या प्रगतीशील तत्त्वांचा प्रचार करून समाजात नवजागरण आणण्यासाठी त्यांनी हा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
सन १८७६ पासून १८८२ पर्यंतच्या कालावधीत ते पुणे नगरपरिषदेचे नगरसेवक होते. नगरपरिषद म्हणजे सुधारणेचे प्रभावी साधन आहे असे ते मानत होते. आणि आपल्या या विचारामुळेच त्यांनी या नियुक्तीचा स्वीकार केला होता. दलितांच्या वस्तीत नागरी सोयी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी मनापासून खूप प्रयत्न केला. त्या वेळी नगर पालिकेच्या निधीतील खूप मोठा वाटा इंग्रज अधिका-यांच्या समारंभावर खर्च होत होता. महात्मा फुल्यांनी अशा प्रथेचा विरोध करून आणि नगरपालिकेला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
महात्मा फुले समाजात मूलभूत परिवर्तन आणू पाहात होते. एकोणिसाव्या शतकातील समाज धर्मावर विश्वास ठेवणारा होता. जाती-धर्माचे नियम कडक होते. रीतीरिवाजाचे खूप प्रस्थ होते. समाजात मूर्तिपूजेला महत्त्वाचं स्थान होतं. ब्राह्मणांच्या इशा-यावर पौर्णिमा आणि अमावस्या ठरत होती. कर्मकांडाचं पालन करणं ही पद्धतच होती. संपूर्ण समाज त-हेत-हेच्या अंधविश्वासाने व्यापला होता. धर्म आणि ब्राह्मणांच्या बंधनात गुंतून गुलाम बनलेल्या अशा या अशिक्षित लोकांना महात्मा फुले मुक्त करू पाहात होते. हाच हेतू बाळगून त्यांनी सन १८७३ मध्ये ‘सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या अगोदर आपल्या येथे आर्य समाज, प्रार्थना समाजासारख्या प्रगतीशील संगठनाची स्थापना केली. या अगोदर आपल्या येथे आर्य समाज, प्रार्थना समाजासारख्या प्रगतीशील संगठनाची स्थापना झाली होती. देवाच्या आणि भक्तांमध्ये पंडित, पुरोहितांची आवश्यकता नसते असे ते मानीत होते. तत्कालीन पंडित-पुजारी अडाणी लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा उठवत आहेत, हे बघून महात्मा फुल्यांनी पूजा पाठ, विवाह इत्यादीच्या सोप्या-सुलभ उपचार पद्धतीचे समर्थन केलं. त्या वेळी संस्कृत ही पूजापाठाची भाषा होती. तिच्याऐवजी त्यांनी बोलीभाषेचाच उपयोग करून ब्राह्मणांशिवाय विधीचे अनेक उपाय सांगितले. सत्यशोधक समाजाद्वारे एकीकडे त्यांनी धर्मश्रद्ध अडाणी आणि अशिक्षित लोकांना मुक्त केले तेच दुसरीकडे जमीनदार आणि सावकाराच्या तडाख्यातून शेतक-यांना. तत्कालीन शेतकरी, कष्टकरी इत्यादींची स्थिती वेठबिगार मंजूरांपेक्षा कमी नव्हती. चोवीस तास ते जमीनदार आणि सावकारांचे गुलामच होते. पिकावर पहिला अधिकार जमीनदार आणि सावकारांचा असायचा. रक्त, घाम गाळूनसुद्धा त्यांना शिल्लक राहिलेल्यावर गुजराण करावी लागे. आजोबांचे कर्ज नातवाने फेडायचे, तेही फक्त व्याज. मूळ मुद्दल पिढ्यानपिढ्या तसंच राहिले जायचे. बिचारे शेतकरी घरदारसुद्धा जमीनदार सावकाराच्या जवळ गहाण ठेवत होते. शेतकरी, कामगारांची ही दयानीय अवस्था बघून महात्मा फुले यांना खूप वाईट वाटत होते. शेतक-यांच्या ह्या दयनीय अवस्थेचे चित्रण त्यांनी शेतक-यांचा आसूड' ह्या शीर्षक ग्रंथात अत्यंत मार्मिकपणे चित्रित केले आहे. आपल्या सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठाद्वारे त्यांनी शेतक-यांच्या अधिकारांविषयी जनतेला जागृत केले. या समाजाद्वारे शिक्षणाला सर्वसुलभ बनविण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे एक ऐतिहासिक कार्य आहे. आज शिक्षणाचा जो सार्वत्रिक प्रचार दिसून येतो, त्याचं श्रेय महात्मा फुल्यांच्या जीवन कार्यालाच द्यावं लागेल.
महात्मा फुले यांच्या जीवन कार्याच्या विहंगमावलोकनावरून स्पष्ट होत की आधुनिक महाराष्ट्राच्या मूलभूत सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात त्यांची नेहमी आठवण काढली जाईल. स्त्री मुक्ती, दलितोद्वार, शिक्षण प्रसार इत्यादी क्षेत्रात त्यांनी पुरोगामी दृष्टिकोनाची स्थापना केली. विषमता, रूढी प्रामाण्य इत्यादीला दैवी अधिष्ठान देणाच्या धर्मसत्तेविरुद्ध त्यांनी संघर्ष आणि संघठनाद्वारे आवाज उठविला. दलित आणि पीडित जनतेला स्वाभाविक मानवी अधिकार देऊन त्यांचे जीवन सुलभ बनविले. नवशिक्षित बहुजन समाजाला त्यांनी
आपल्या कर्तव्याविषयी जागरूक केले. समाजातील सगळ्यात दरिद्री वर्गाबरोबर त्यांनी आपले नाते कायम केले. पीडित आणि दलित वर्गाबरोबर असणा-या त्यांच्या कृतिशील सहानुभूतीतच त्यांचे मोठेपण अंतर्भूत आहे. स्वातंत्र्याच्या चार दशकातील : राष्ट्रभाषा हिंदीचा विकास
आपल्याला माहीतच आहे की आपला देश १९४७ साली स्वतंत्र झाला. बघता बघताच आपल्या स्वातंत्र्याने सात दशकांचा दीर्घ पल्ला ओलांडला आहे. कोणत्याही गोष्टीच्या मूल्यांकनासाठी सत्तर वर्षांचा काळ खूप मोठा असतो. अशा स्थितीत स्वातंत्र्याच्या नंतरच्या गेल्या सत्तर वर्षांत राष्ट्रभाषेच्या रूपात हिंदीने विकासाची जी पावले उचलली आहेत, त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केले पाहिजे. राष्ट्रभाषा म्हणजे प्रत्येक देशाचा असा मानदंड असतो, ज्यावर देशातील प्रत्येक नागरिक अभिमान बाळगतो. राष्ट्रभाषेशिवाय स्वतंत्र तसेच समृद्ध राष्ट्राची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. आयरिश कवी थॉमस डेविसने म्हटले आहे की, “राष्ट्रभाषेची समृद्धी ही देशाच्या सीमा रक्षणापेक्षा अधिक महत्त्वाची असते. त्याच्या विचारांच्या गांभीर्याकडे आपण क्वचितच लक्ष दिलेले आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. घटनेनुसार हिंदी आमची राजभाषा आहे. पण राजभाषा म्हणून हिंदीचा जो विकास व्हायला पाहिजे, तो गेल्या चाळीस वर्षांत आम्ही अजूनही करू शकलेलो नाही. राष्ट्रभाषा, राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्हासारख्या मानदंडाच्या प्रतीबद्दल आम्ही देशाला विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाहतो आहोत. भाषावाद, प्रांतवाद, सांप्रदायिकता, जातीवादासारख्या असामाजिक तत्त्वांनी आम्हाला अगदी जखडून ठेवले आहे. अशा स्थितीत एकांत्मतेची किल्ली असणाच्या राष्ट्रभाषेला आपण मजबूत केले पाहिजे. भाषेत देशाला जोडण्याची आणि पुढे नेण्याची शक्ती असते. याचा स्वीकार करून आपण राष्ट्रभाषेला मजबूत करण्याचा प्रयत्न अवश्य केला आहे. आम्ही वृत्तपत्राद्वारे, प्रसार माध्यमे, साहित्य, लोकभाषा यासारख्या अनेक मार्गांनी याचा प्रचार आणि प्रसार केला; पण राष्ट्रभाषेचा विकास म्हणजे मुळात एक स्वकेंद्रित मानसिक प्रक्रिया आहे. राजकीय प्रसारांमुळे कोणतीही भाषा ख-या अर्थाने ना राजभाषा होऊ शकते ना राष्ट्रभाषा. लोक जेव्हा तिचा मनापासून स्वीकार करतील तेव्हाच हे शक्य होईल.
घटनेनुसार भारतातील विभिन्न प्रांतांतील पाच बोलीभाषा म्हणजे आमची राष्ट्रभाषा आहे. त्यांच्याशी संपर्क स्थापित करण्याच्या तसेच त्यांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने आम्ही हिंदीला एक वेगळेच स्थान दिलेले आहे. आमची अशी धारणा आहे की राजभाषा हळूहळू मजबूत होईल. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच कच्छपासून कोलकात्यापर्यंतचे सर्व जण भाषा भाषी हिंदीचा वापर करायला लागले तर आपोआप ती राष्ट्रभाषा बनेल. आपले सरकार या संदर्भात हळूहळू का असेना, प्रयत्न करत आहे. आज बँका, विमा कंपन्या, पोस्ट, मंत्रालय, राजदूतावासासारख्या सर्व शासकीय क्षेत्रांत तसेच कार्यालयात राजभाषा हिंदीचं महत्त्व वाढत आहे. राजभाषेचा वापर अधिक व्हावा म्हणून सरकारने अनेक उपाय केले आहेत. सर्व प्रपत्र, विवरणपत्र, प्रतिवेदना हिंदीतच आणले आहेत. सरकारने आता हिच्या व्यापक प्रसारासाठी प्रसार माध्यमांद्वारे लोकप्रचार अभियान हातात घेतले पाहिजे.
ही आनंदाची तसेच अभिमानाची गोष्ट आहे की स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ७० वर्षांत हिंदी आमच्या देशाची ‘आंतरभारती' भाषा बनली आहे. आज आसामी, उडिया, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम, तमिळ, पंजाबी, काश्मीरी या सगळ्या भाषांमध्ये विचार आणि साहित्याची जी देवाणघेवाण होते ही हिंदीद्वारेच. मल्याळी न येणारा काश्मिरी आणि पंजाबी न येणारा बंगाली नागरिक त्या अपरिचित भाषेच्या साहित्याला हिंदीच्या माध्यमानेच जाणतो. ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, केंद्रीय हिंदी निदेशालयासारख्या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने आज भारतीय भाषेतील अभिजात साहित्याने हिंदीत रूपांतर झालेले आहे. अनेक प्रकारचे कोश, संदर्भ ग्रंथ, पारिभाषिक शब्द, ज्ञान-विज्ञानाचे मौलिक ग्रंथ आज हिंदीत उपलब्ध आहेत. सर्वसाधारण माणूससुद्धा आज इंग्रजीच्या कुबड्यांशिवाय देश-विदेशाची सर्व माहिती जनभाषा हिंदीद्वारे प्राप्त करू शकतो. शासकीय पत्रव्यवहार हिंदीतून होऊ लागला आहे. सगळ्या बातम्या, जाहिराती, राष्ट्रीय प्रसारण हिंदीतूनच होऊ लागले आहे. शिक्षणाच्या सगळ्या पातळ्यांवर हिंदीचा अभ्यास, शिक्षण तसेच संशोधन सुरू आहे. हिंदीतील टंकलेखन यंत्र, संगणक, टेलेक्ससारख्या सुविधा आज उपलब्ध आहेत. दूरदर्शनने तर मुलांपासून म्हाता-यांपर्यंत हिंदी शिकवायचे काम केले आहे. एवढ्या सर्व प्रयत्नांनंतरही आमच्या देशात एका राष्ट्रीय अभिमान व कर्तव्याच्या भावनेने ज्या प्रमाणात हिंदीचा वापर अपेक्षित होता तो अजूनही होत नाही.
तसे पाहिले तर हिंदी आज केवळ भारताची भाषा राहिलेली नाही. तिचं स्वरूप आज विश्वभाषेचे बनले आहे. जगात सगळ्यात जास्त प्रचलित आणि बोलणान्यांची संख्या या दोन्ही निष्कर्षांवर हिंदी जगाची तिसरी भाषा आहे. आज जगाच्या जवळजवळ सगळ्या विद्यापीठांमध्ये हिंदीचा अभ्यास, शिक्षण तसेच संशोधन होऊ लागले आहे. जगाच्या अनेक देशांतील आकाशवाणी व दूरदर्शनाच्या प्रसारणात भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी कार्यक्रमांचे प्रक्षेपण होऊ लागलं आहे. मॉरिशस, त्रिनिदाद, सुरीनाम, फिजी इ. देशांनी हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले आहे. जपान, रशिया, झेकोस्लोव्हाकिया, क्यूबा, नेपाळ, चीन इ. देशात हिंदी वृत्तपत्रे, नियतकालिके तसेच पुस्तके इत्यादींचे प्रकाशन होऊ लागले आहे. विश्व हिंदी संमेलनांच्या विराट आयोजनांमुळे हिंदीचं विश्वभाषा रूप स्पष्ट झालं आहे.
कोणत्याही भाषेचे वैभव दोन प्रकारचे असते. एक भौतिक आणि दुसरं आध्यात्मिक, गेल्या चाळीस वर्षांत निःसंशय हिंदी भाषा भौतिक दृष्टीने संपन्न बनली आहे. आता भविष्यात आपल्याला तिला आध्यात्मिक दृष्टीने संपन्न करावयाचे आहे. आगामी दशकात आपल्याला हे बघायचं आहे की कशा प्रकारे हिंदी आध्यात्मिक दृष्टीने मजबूत होईल, कशा त-हेने ती अधिक लोकांद्वारे स्वीकारली जाईल. हे आपल्या पिढीचे उत्तरदायित्व आहे. हे आपण निभावले पाहिजे. हिंदीच्या आजच्या विकसित रूपामागे आपल्या पूर्वजांची १५०० वर्षांची मेहनत आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रकारच्या वादळी वाच्यातून या नावेला वाचवून आणले आहे. तिला सांभाळणे हे आपलं कर्तव्यच आहे. नाहीतर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.
आपल्याला माहीतच आहे की इतिहास म्हणजे उपदेशांचे भांडार आहे. त्यातून आपण योग्य ते घेतलं पाहिजे. जगातील अनेक देशांचा भाषा इतिहास आपल्यासमोर आहे. जगाच असे अनेक देश आहेत की ज्यांनी राष्ट्रभाषेच्या जोरावर आपल्या देशाला मजबूत आणि समृद्ध बनविले आहे. जपानलाच घ्या. दुस-या महायुद्धानंतर तो देश म्हणजे राखेचा ढीग होता. पण जपानी माणसात राष्ट्राभिमानाचा पाया इतका पक्का आहे की, गेल्या ५० वर्षांत तो देश जगातील सर्वांत शक्तिशाली देश बनला आहे. आज सगळे जग आधुनिक तंत्रज्ञानासाठी जपानच्या तोंडाकडे आऽ वासून बघते आहे. जपानी लोक आपले सारे तंत्रज्ञान जपानीतूनच जगाला देतात. हा आहे त्यांचा राष्ट्राभिमान! जपानच्या सर्व विमानतळांवर लिहलेले असते. आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो, जर तुम्हाला जपानी येत असेल तर." तीच गोष्ट इस्त्रायलची. हा देश आपल्यानंतर स्वतंत्र झाला. जेव्हा तो स्वतंत्र झाला तेव्हा त्याच्याजवळ ना भाषा होती ना लिपी. राष्ट्राभिमानी इस्रायलींनी आपल्या बोलीभाषा ‘हिब्रू'लाच राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले. आज इस्त्रायलचे डॉक्टर, इंजीनियर, तंत्रज्ञ, वैज्ञानिक सगळे हिब्रूतच शिक्षण घेत आहेत. तेथे आधुनिक तंत्रज्ञानासाठी इंग्रजी अनिवार्य नाही. मग आपण काय म्हणून इंग्रजीच्या कुबड्या बाळगतो आहोत? हा विचार करायची आता वेळ आली आहे. विदेशी भाषेची जी एक मानसिक गुलामगिरी आपल्या इथे आहे तिला आपण मुळापासून उपटून टाकली पाहिजे. फ्रान्स, जर्मन, चीन, रशियासारखे देश इंग्रजी शिवाय स्वतःला समृद्ध बनवू शकतात मग आपणच काय म्हणून तिच्यापाठी लागलो आहोत? भाषेची आध्यात्मिक समृद्धी आपणच आणू शकतो. हिंदीला मनापासून, राष्ट्रीय कर्तव्य मानून स्वीकारा आणि मग बघा, त्यासाठी कोणत्याही अध्यादेशाची आवश्यकताच राहणार नाही. कोणतीही लोकभाषा तेव्हाच राष्ट्रभाषा होऊ शकते जेव्हा बोलताना लोक तिचा वापर करू लागतात.
राष्ट्रभाषा हिंदीला ख-या अर्थाने राष्ट्रभाषेचे पद बहाल करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपल्या रोजच्या व्यवहाराच्या भाषेच्या रूपात आपण हिंदीचा वापर केला पाहिजे. आपले प्रत्येक सार्वजनिक समारंभ, उत्सव इत्यादींचे संचालन हिंदीत केले पाहिजे. आपले कार्यकर्ते, नगरपरिषदेचे सदस्य, आमदार, संसद सदस्य, मंत्री या सगळ्या सार्वजनिक कार्यकर्त्यांनी हिंदी बोलायला शिकले पाहिजे. हिंदीइतकी सोपी दुसरी कोणतीही भाषा नाही. आपले राष्ट्रीय प्रक्षेपण व प्रसारण हिंदीत झाले पाहिजे. आपल्या कार्यालयांची भाषा हिंदी झाली पाहिजे. आपल्या देशातील लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हिंदीचा वापर केला पाहिजे. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांनीही हिंदीला ख-या अर्थाने राष्ट्रभाषा बनवू शकू.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भारताच्या सुराज्याचं जे स्वप्न पाहिले होते त्यात हिंदीचा समावेश होता. आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही ही गोष्ट नेहमी त्यांना खटकत होती. ते म्हणत असते, “राष्ट्रभाषा नसल्याने माझा देश मुका राहिला आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांनंतरसुद्धा आपण आपल्या देशाला राष्ट्रीय वाणी देऊ शकलेलो नाही. ही त्रुटी पूर्ण करण्यासाठी आता आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की येणा-या १० वर्षांत आम्ही आपल्या राष्ट्रभाषेला इतकी आध्यात्मिक समृद्धी बहाल करू की ज्यामुळे स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती आणि हिंदीत साजरी करू शकू. ती अशी सुवर्ण जयंती होईल ज्यात आसेतु हिमालय हिंदी आमचा श्वास असेल आणि प्राणसुद्धा! विभिन्नतेने नटलेल्या भारतवर्षाला एकतेच्या शृंखलेने बांधण्याचे सामर्थ्य असणा-या या भाषेच्या विकासाच्या संदर्भात आपल्याला पाहिलं पाहिजे की राजनैतिक स्वार्थासाठी कोणी याचा गैरफायदा तर उठवत नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून आज एक प्रतिज्ञा करू या की हिंदी माझी जननी असेल, वाचा असेल, जीवन असेल आणि प्राणसुद्धा! बाल गुन्हेगारी : एक सामाजिक समस्या
आपल्या समाजात अपराधाची वृत्ती प्राचीन काळापासून दिसून येते. माणसाची एक सवय म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. समाजशास्त्रीय मतानुसार गुन्ह्याचा आणि वयाचा काहीही संबंध नसतो. गुन्हा मोठी माणसेच करतात असं नाही. मुलेसुद्धा अपराधी असू शकतात आणि असतातसुद्धा. पण मुलांना अपराधी मानण्याचे आमचे विचार आता काळाच्या ओघात मागे पडले आहेत. एकविसाव्या शतकात आपल्या सामाजिक जीवनात खूप बदल होत असल्याचे आपण पहातच आहात. त्यांचा आपण जवळून अनुभवसुद्धा घेतला आहे. या बदलामुळेच आपले सर्व ज्ञान, विज्ञान विकसित झाले आहे. समाजशास्त्र, मनोविज्ञान, अपराध विज्ञान, आचरण विज्ञानासारखी अनेक शास्त्र गतिमान झाली आहेत. यांच्या नवीन विचारसरणीनुसार मुलांना गुन्हेगार मानणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. वयाच्या सातव्या वर्षांपूर्वी मुले जी वर्तणूक करतात ती फक्त त्यांच्या अज्ञानामुळे. म्हणूनच आजकाल त्यांच्या बालसुलभ व्यवहारांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहिले जाते. बाल अपराधाची सामाजिक समस्या आता समस्या राहिलेली नाही.
आपण समाजात लहान मुलांना चोरी, दंगे, धोपे, काळा बाजार, काळे धंदे करताना जसे पाहतो तसेच त्यांना वाममार्गी झालेलेसुद्धा अनुभवतो. मुलांच्या हातून घडणा-या या वाईट गोष्टी म्हणजे वाईट संगतीचाच परिणाम असतो. कधी त्यांना मोठी माणसे आपल्या स्वार्थासाठी प्रोत्साहित करताना सुद्धा दिसतात. अशा सर्व वाममार्गी, उपेक्षित मुलांना सदाचारी बनवणारी एका कायदेशीर व्यवस्था आपण केली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या सुरुवातीच्या काळात ही व्यवस्था या मुलांपासून रक्षण करण्यासाठी निर्माण केली होती. आता काळ बदलला आहे. आज मुलांच्या कल्याणाची आणि न्यायाची चिंता या सर्वांमागे आहे. बाल गुन्हेगारी तसेच बाल गुन्हेगारांच्या बाबतीत गंभीरपणे विचार करण्याची ही क्रिया एकोणिसाव्या शतकापासून सुरू झाली. युरोपियन देशात या सामाजिक समस्येबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जागृती झाली. या संदर्भात इंग्लंडमध्ये खूप प्रगती झाली. ब्रिटिशांकरवीच आपल्या देशात त्या वेळी बाल गुन्हेगारांच्या चिकित्सेला सुरुवात झाली. सन १८५0 मध्ये या संदर्भात भारतवर्षात पहिला कायदा पास झाला. बांगला, मुंबई, मद्राससारख्या तत्कालीन प्रदेशातसुद्धा असे प्रादेशिक कायदे अमलात आणले गेले होते. आज बालगुन्हेगारी, अनाथ, निराधार मुलांची सुरक्षा आणि पालनपोषण ही राष्ट्रीय जबाबदारी मानली गेली आहे. या संदर्भात सन १९८६ मध्ये ‘बाल न्याय अधिनियम' कायदा राष्ट्रीय पातळीवर अमलात आणला गेला आहे. या कायद्याची स्थापना तसेच अंमलामुळे या अगोदरचे सर्व प्रादेशिक कायदे रद्द केले गेले आहेत. बाल न्याय अधिनियमामुळे बाल गुन्हेगारी तसेच त्यांचे संरक्षण व विकासाच्या एका उदार नीतीची सुरुवात झाली आहे. पाहू या, भविष्यात ही नीती कुठपर्यंत सफल होते?
समाजात जेव्हा मुलांना गुन्हा करताना पाहिले जाते, तेव्हा पोलीस त्यांना आपल्या ताब्यात घेतात. कायदेशीर विचारपूस केल्यानंतर त्यांना निरीक्षण गृहात ठेवले जाते. हे सर्व करत असताना आज मुलांशी पोलिस आणि न्याय व्यवस्थेची वागणूक इतर प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे असत नाही, ते त्यांच्याशी त्यांच्या हितचिंतकाप्रमाणे वागतात. निरीक्षण गृहातील अधिकारी तसेच कर्मचारीसुद्धा त्यांच्याशी आपलेपणाने वागून त्यांच्यात आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढवतात. न्यायाधीश त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करतात, निरीक्षण गृह, बालगृहासारख्या संस्थात.
एक काळ असा होता की या संस्था म्हणजे तुरुंगाच्या काळ्या कोठड्याच होत्या. मुलांना प्रौढ गुन्हेगारांबरोबर ठेवलं जात होते. निरीक्षण संस्थांमध्ये त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या यंत्रणेतून जावे लागे. पण आज स्थितीत खूप परिवर्तन झाले आहे. या सर्व संस्था आता संस्काराच्या शाळाच झाल्या आहेत. या सर्व संस्था 'घरे' बनविली जात आहेत.
बाल गुन्हेगारांच्या अनेक समस्या आहेत. मुले जन्मतः गुन्हेगार असत नाहीत. परिस्थितीमुळे त्यांना गुन्हेगार बनणे भाग पडते. मुले गुन्हेगार बनण्याची अनेक कारणे आहेत. अधिकांश मुले वाईट संगतीचे बळी असतात. आई, वडिलांचे अतिशय प्रेम तसेच आंधळा विश्वाससुद्धा त्यांना गुन्हेगार बनवित असतो. कधी कधी काळे धंदे करणारे त्यांच्या निष्पापतेचा गैरफायदा घेत असलेले दिसून येतात. दारिद्रय, गरिबी, अज्ञानासारखी तत्त्वेसुद्धा त्यांना या गर्तेत ढकलण्यास पुरेशी असतात. आज त्यांना सुधारण्याची, सन्मार्गी लावण्याची सर्व व्यवस्था आहेत. असा प्रयत्न अत्यंत गंभीरपणाने होत आहे. पण आज या मुलांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खरे प्रयत्न संस्थांनी नाही, समाजाने करावयाचे आहेत.
बाल गुन्हेगारांच्या पालन पोषण आणि त्यांच्या पुनर्वसनाचे काम करणा-या या संस्थांकडे समाजाचा, आपल्या सगळ्यांचा अनुदार दृष्टिकोन चिंतेचा विषय बनला आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या गावात असणा-या या मुलांची देखभाल करणाच्या रिमांड होम, अनाथाश्रमाच्या संस्थांना तुम्ही कधी भेट दिलीत का? या संस्थांना आपली मदत आहे या सर्व प्रश्नांबद्दल आपले उत्तर नकारात्मक आहे. जोपर्यंत आपण या उत्तरांना होकारात्मक बनवित नाही तोपर्यंत या मुलांच्या स्थितीत काहीही परिवर्तन येणार नाही. दुर्भाग्याने, माणसाची खरी पारख आणि ओळख करणाच्या या संस्था एखाद्या हरिजन वस्तीसारख्या उपेक्षित राहिल्या आहेत. बदलत्या सामाजिक रचनेमुळे हरिजनांच्या वस्त्या गावात आल्या, पण या संस्था अजूनही अहिल्येच्या शिळेप्रमाणे उपेक्षित आणि अस्पर्श राहिल्या आहेत. गुन्हेगार मुलांच्या उद्धारासाठी आज संस्थांपेक्षा आपल्यासारख्या संवेदनशील राम मनाच्या सज्जनांची आणि सीतेसारख्या संयमी अशा देवीची आवश्यकता आहे की ज्या वनवासाच्या दुःखाचा अनुभव करून त्यापासून वाचण्याची व वाचवण्याची ज्यांच्यात जिद्द आहे. आज अपराधी आणि अनाथ मुलांना वेगवेगळ्या उपायांनी आपलेसे करण्याची जास्त आवश्यकता आहे. मनापासून स्वीकार केला तर त्यांना आपलेसे करण्याची क्रिया वेगात व्हायला पाहिजे. आपल्या मनात एक गैरसमज निर्माण झाला आहे. जरा विचार करा, शेवटी सरकार म्हणजे कोण? तुमच्या आणि माझ्याशिवाय सरकार थोडंच पूर्ण होणार आहे? सरकारात असणारा आपला वाटा आपण जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत सरकारची कोणतीही योजना ना कार्यान्वित होईल ना सफल.
आज या बालगुन्हेगारांच्या बाबतीत सरकार खूप काही करत आहे. आता आपण पाऊल उचलले पाहिजे. आपल्याला अशा मुलांच्या खच्या पुनर्वसनासाठी कुठल्याही नोकरीपेक्षा आपल्या मनातील रिकामी जागा त्यांना दिली पाहिजे. अशा प्रयत्नांनीच त्यांची उपेक्षा दूर होईल. त्यांच्यात आत्मबल येईल, त्यांच्यात आत्मसन्मान जागृत होईल आणि मग बघा ते स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही.
योगायोगाने वयाच्या दहाव्या वर्षी मी बाल गुन्हेगारांच्या संपर्कात आलो. होय आणि तेही बाल गुन्हेगार नसताना. तेव्हापासून गेल्या तीस वर्षांपर्यंत बाल गुन्हेगारांच्या बरोबर कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांच्या संपर्कात आहे. निवासी, हितचिंतक त्यासारख्या माझ्या अनेक भूमिका आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की एका अर्थाने बाल गुन्हेगारांची कोणतीच समस्या असत नाही. ख-या अर्थाने ही समस्या समाजाची आहे. आई-वडील, मित्र, हितचिंतक, परिवार आणि परिस्थिती त्यांना बाल गुन्हेगार होण्याला विवश करतात. त्यांना गुन्हेगारीच्या कलंक आणि किल्मिषापासून वाचविण्यासाठी तसेच त्यांना सर्वसामान्य मूल बनविण्याचे सर्व प्रयत्न त्याच लोकांनी केले पाहिजेत जी त्यांना गुन्हेगार आणि उपेक्षित बनवितात.
“मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत," असे मानणाच्या बालकप्रेमी जनतेलाही हे विसरता येणार नाही की दक्षिण आशिया क्षेत्रीय संघटन अर्थात, (सार्क) च्या देशांनी; ज्याच्यात आपला भारताचा देखील समावेश आहे, त्यांनी ‘बालिका वर्ष' (१९९०) च्या रूपात साजरे केले आहे. गुन्हेगार फक्त मुलेच असतात असे नाही तर मुलीसुद्धा असतात. अल्पवयात वेश्या व्यवसाय करणे, सिनेमा तिकिटांचा काळा बाजार, अंमली पदार्थांचा व्यापार करणे इत्यादी सारख्या अनेक प्रकारांनी मुली गुन्हेगारी जगाच्या शिकार होतात. आपल्या इथे अशा मुलींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप अनुदार आहे. सीता निष्कलंक असेल, पण तिने अग्निपरीक्षा ही दिलीच पाहिजे. समाजाची ही पारंपरिक धारणा या निष्पाप मुलींशी नेहमी अन्यायाने वागत आली आहे. ही धारणासुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे. मुलगा नादान निघाला तरीसुद्धा त्याला पुरुष मानले जाते, पण मुलीच्या नादानीला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. या व्यवस्थेला कोण बदलेल? कोणी देवदूत येऊन हे काम करणार नाही. हे काम आमचं आहे. आपल्यालाच हे पार पाडलं पाहिजे. हिंदी भाषेचा मराठी साहित्यावरील परिणाम
संस्कृत ही भारतीय भाषांची जननी भाषा म्हणून सर्व परिचित आहे. तिची थोरवी गाताना पंडितांनी तिला 'देववाणी' म्हणून गौरविले आहे. अशा एका समृद्ध भाषेपासून हिंदी व मराठी या भाषा भगिनींचा जन्म झाला आहे. जुळ्या बहिणींमध्ये दिसून येणारे साम्य या दोन्ही भाषांत आपणास पहावयास मिळते. या दोन्ही भाषांची लिपी देवनागरी आहे. दोन्ही भाषांत जवळ जवळ ४0% शब्द समान आहेत. दोन्ही भाषा व साहित्याचा विकास एकाच गतीने आणि समांतरपणे होत आला आहे. परस्पर समानतेच्या अशा किती तरी खुणा हिंदीमराठीत दिसून येतात. या दोन्ही भाषांतील समानतेमुळे आणि दृढ़ संबंधांमुळे मराठी भाषिकांनी हिंदी साहित्यात व हिंदी भाषिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. ही साहित्यिक देवाणघेवाण इसवी सनाच्या तेराव्या शतकात सुरू झाली. विशेष आनंदाची गोष्ट अशी की ही आदान प्रदान प्रक्रिया आजही तितक्याच उदारतेने व अखंडपणे सुरू आहे.
जेव्हा कोणत्याही दोन भाषांत परस्पर संबंध निर्माण होतात तेव्हा एका भाषेचा परिणाम दुस-या भाषेवर होणे क्रमप्राप्त असते. हिंदी-मराठी भाषांच्या निकट संबंधांमुळे मराठी भाषेचा हिंदी साहित्यावर व हिंदी भाषेचा मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचे अभ्यासाअंती दिसून येते. मराठी साहित्यावरील हिंदी भाषेच्या परिणामाचा प्रारंभ संत नामदेवापासून सुरू झाला. आरंभी फक्त काव्य प्रांतापुरताच मर्यादित असलेला परिणाम साहित्य विकासाच्या रुंदावलेल्या कक्षेमुळे गद्यावरही झाला. परिणाम व प्रभावाची ही प्रक्रिया भाषा व साहित्याच्या गतिमानतेबरोबर आपोआप प्रगत होत राहात असते.
इ. स. १३०० ते १७00 या काळातील हिंदी मराठी साहित्य हे प्रामुख्याने भक्तिपर साहित्य म्हणून ओळखले जाते. या काळात मराठीत नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ या संत कवींनी अभंग, पदे, गौळणी, श्लोक लिहिले तर तिकडे हिंदीमध्ये कबीरदास, तुलसीदास व सूरदासांनी मराठीतील संत कवींप्रमाणे मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये भक्तिपर पदे लिहिली आहेत. मराठी भाषी संतकवी भागवत धर्माच्या प्रसारार्थ उत्तरेकडे भ्रमण करायचे. उत्तर प्रांतात त्यांचे दीर्घकाल वास्तव्यही असायचे. परिणामी, त्यांच्या आचार विचारांवर व पर्यायाने साहित्यावर हिंदी भाषा व साहित्याचा परिणाम व्हायचा. संत एकनाथांनी लिहिलेल्या ‘भावार्थ रामायणा'वर हिंदी रामभक्त सगुण कवी संत तुलसीदास रचित 'रामचरित मानस'चा प्रभाव आहे, तर तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगांवर संत कबीराचा. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर सामावल्याचे वर्णन करताना कबीरांनी एके ठिकाणी म्हटले आहे.
कस्तुरी कुंडली बसै, मृग हुँदै बन माहि।
ऐसे घटि घटि राम है, दुनिया देखे नाहि।।
कबीरांच्या या विचारांचा प्रभाव तुकारामाच्या अभंगात स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणतात,
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास।
असे ज्याचा त्यास नसे ठावा।।
हिंदी भाषेचा असाच परिणाम समर्थ रामदास, सेना महाराज, शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर, शहाबाबा, चक्रपाणी यळंबरकर, महादजी शिंदे इत्यादी मराठी प्राचीन कवींवर हा दिसून येतो. मराठी संत कवी त्रिस्थळी यात्रेच्या निमित्ताने सतत हिंदी भाषेच्या संपर्कात आल्याने एकंदर प्राचीन साहित्यावरच हिंदीचा प्रभाव झाल्याचे दिसून येते. जवळ जवळ सर्वच मराठी संत कवींनी हिंदीमध्ये भक्तिपदे रचली आहेत, ही गोष्ट हिंदी भाषेच्या मराठीवरील ठळक परिणामाचेच द्योतक आहे.
प्राचीन काव्याप्रमाणेच मराठीतील आधुनिक काव्यावरही हिंदी भाषा व साहित्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांगणात रूढ झालेले गझल, रूबायांसारखे काव्य प्रकार हे मराठीला हिंदी भाषा नि साहित्याचे लाभलेले वरदानच म्हणावे लागेल. गझल व रूबाई हे काव्य प्रकार तसे मूळ अरबी फारसीतील. पण हे काव्य प्रकार मराठीत रूढ झाले ते हिंदी माध्यमांमुळेच. हे काव्य प्रकार मराठीत आणण्याचे ऐतिहासिक कार्य कविवर्य माधव ज्युलियन यांनी केले. त्यांनी उमर खय्यामच्या रूबायांचा मराठी अनुवाद करून या काव्य प्रकाराची ओळख मराठी भाषिकास करून दिली. असाच प्रयत्न डॉ. तारा भवाळकर यांनी अगदी अलीकडे हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाले' तील रूबायांचा मराठी अनुवाद करून केला आहे. रूबाई हा काव्य प्रकार मराठीत आला, तरी तो फारसा रुळल्याचे मात्र दिसून येत नाही. पण माधव ज्युलियनांनी मराठीत 'गज्जलांजली'च्या रूपाने आणलेली गझल केवळ रुजलीच नव्हे, तर आजच्या मराठी काव्यातील तो सर्वांत लोकप्रिय काव्यप्रकार म्हणून ओळखला जातो आहे. मंगेश पाडगावकर, सुरेश भटांसारख्या कवी श्रेष्ठांनी या काव्य प्रकारात प्रतिष्ठा दिली. हा काव्य प्रकार ‘रंग माझा वेगळा ‘एल्गार' सारख्या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहामुळे मराठी वाचकांच्या जिभेवर खेळू लागला आहे. 'गझलनामा' सारखी पुस्तके मराठीत येऊ घातली आहेत. मराठी रूबाई व गझल यांचे स्वतंत्र मराठी रूप आज धारण होते आहे हे विसरून चालणार नाही. बहर, काफिया, रदीफ अलामत या सर्व बाबी मराठी गझलमध्ये जशाच्या तशा स्वीकारण्यात आल्या आहेत ही गोष्ट हिंदी उर्दू प्रभावाचीच निदर्शक नव्हे का?
काव्याप्रमाणेच मराठी कथा, कादंबरी, नाटक, इतिहास, पत्रकारिता या सारख्या गद्य साहित्यावरही हिंदी भाषेचा वेळोवेळी प्रभाव पडत आला आहे. पण हा प्रभाव काव्याइतका स्पष्ट नाही हे मान्य करायला हवे. हिंदी मराठीतील कथा, कादंब-यांचा विकास स्वातंत्र्यपूर्ण काळात एकाच पठडीत झाला असल्याने व दोहोत विषय, समस्या, विचार इत्यादींचे साम्य असल्याने हा विकास समांतर होत राहिल्याचे दिसून येते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी भाषेस लाभलेला राष्ट्रभाषेचा दर्जा व हिंदी चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या सारख्या व्यापक प्रसार माध्यमांचे लाभलेले वरदान इत्यादींमुळे हिंदी साहित्याचा विकास झपाट्याने झाला. नाटकाचा अपवाद वगळता कथा, कादंबरी, ललित निबंध, शब्दचित्रे, आठवणी, जीवन चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी साहित्य मराठीपेक्षा प्रभावी बनले आहे. अलीकडे हिंदी साहित्याचा मराठीत होणार वाढता अनुवाद हिंदी भाषेच्या मराठीतील परिणामच सूचित करतो. मोहन राकेश लिखित ‘आधे अधुरे', शंकर शेष लिखित ‘घरौंदा', 'एक और द्रोणाचार्य, ‘खजुराहो का शिल्पी' या नाटकांचे अनुवाद, तसेच प्रेमचंदांची गोदान, यशपालांच्या मनुष्य के रूप व श्रीलाल शुक्लांच्या रागदरबारी या कादंब-यांचे मराठीत झालेले अनुवाद या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहेत. आज हिंदीतील साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, दूरदर्शन इत्यादीसाठी समर्पित असलेली नियतकालिके, हिंदीत मोठ्या प्रमाणात निघतात. मराठीत निघणाच्या वृत्तपत्र व नियतकालिकांतून प्रकाशित होणा-या कला, क्रीडा, चित्रपट इत्यादींवरील समीक्षात्मक लेखांवर हिंदी नियतकालिकांचा असलेला प्रभाव सहज पाहता येण्यासारखा आहे. वरील विषयांना वाहिलेली मराठी नियतकालिके बच्याचदा हिंदी नियकालिकांची मराठी आवृती वाटावी इतकी अनुवादित व अनुकरणीय असतात. मराठी साहित्यावरील हिंदी भाषेच्या प्रभाव व परिणामाचे विहंगमावलोकन करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की मराठी भाषा व साहित्यावर प्रारंभापासूनच हिंदी भाषेचा फार मोठा पगडा बसला आहे. अलीकडच्या काळात हिंदीस लाभलेला शासकीय वरदहस्त, चित्रपट, दूरदर्शनमुळे जनमानसात या भाषेची रुजलेली बीजे, महानगरीय जीवनात हिंदीच्या रोजच्या व्यवहारातील सर्रास वापर इत्यादीमुळे हिंदी केवळ अपुरी राहिली नसून ते एक राष्ट्रीय विचार माध्यम बनले आहे. एके काळी केवळ उत्तर प्रांतांची भाषा असे हिंदीचे रूप आहे. आज या राष्ट्रीय विचार बनलेल्या भाषेचा मराठीवरच काय पण समग्र भारतीय भाषांतील साहित्यावर मोठा पगडा आहे व दिवसेंदिवस तो काळाची गरज म्हणून वाढतच जाणार आहे. कोणतीही भाषा अथवा साहित्य स्वबळावर वाढते आणि विकसित होत असते हे जरी खरे असले, तरी त्या भाषेतील आशय गहनता ही संपर्क भाषातून येत असते हे नाकारून कसे चालेल? या प्रसंगी ज्ञानदेवांचे विचार आठवल्यावाचून राहात नाहीत. त्यांनी म्हटले होते, ‘‘संतहो, मी हे सारस्वताचे गोड झाड लावतो आहे. तुम्ही त्याची फळे प्रेमाने तोडून घ्या. कृष्णार्जुनाच्या संवादाच्या प्रमेयांची उद्याने ‘इथे मराठीचित्रे नगरी लावून मी इथे ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन." मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ आणण्यासाठी, तिच्या ‘अमृतातेही पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आणण्यासाठी हिंदीसारख्या भाषा भगिनीच्या निकट साहचर्याची व संपर्काची गरज आहे. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीनुसार मराठी, हिंदी भाषा भगिनी उदारतेने आदान-प्रदानाची ही प्रक्रिया भविष्य काळातही अखंडपणे चालू ठेवतील तर निश्चितच त्या साच्या विश्वाला प्रभावी साहित्याचा अमोल ठेवा देऊ शकतील. श्री चक्रधर स्वामींची समता
महाराष्ट्र हा जसा पाषाणांचा देश आहे तसाच तो पाषाणास पाझर फोडणाच्या संतांचाही देश आहे. रेड्यामुखी वेद वदविण्याची असाधारण किमया ज्ञानदेवांसारखा प्राचीन मराठी संतच करू शकतो. प्राचीन मराठी संतांनी धर्म नि भक्तीचे पारंपरिक स्वरूप अंधश्रद्ध वृत्तीने कधीच जोपासले नाही. समाज धोरेति धर्मः' अशी धर्माची व्यापक व्याख्या शिरोधार्य मानून त्यांनी समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन म्हणून भक्तीचा स्वीकार केला. महाराष्ट्रात आर्यांनी सुरू केलेल्या यज्ञप्रधान वैदिक परंपरेपासून जितके प्राचीन संत होऊन गेले, त्या सर्वांनी भक्तीचे वैश्विक स्वरूप अंगीकारले होते. मराठी संतांच्या या उदारमतवादी धोरणामुळे अन्यत्र दिसून येणारे सांप्रदायिक संघर्ष महाराष्ट्रात अपवादानेच दिसून येतात. नाथ, महानुभव, दत्त नि वारकरी संप्रदायातील अग्रणी संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, तुकाराम, चक्रधर या सर्वांनी भक्तीचे सर्वसमावेशक रूप प्रस्थापित केले. परिणामतः महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे वारे विकल्परहित समाज रचनेचा पुकारा प्रभावीपणे करू शकले हे आपणास नाकारता येणार नाही. या प्राचीन संत परंपरेत महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींचे धर्म चिंतन व्यवच्छेदक मानावे लागेल. परमेश्वराच्या वास्तव स्वरूपाची ओळख करून देऊन जनमानसास मोक्षाचा खरा मार्ग मिळवून देण्याचा श्री चक्रधर स्वामींनी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न हे त्यांचे अवतारकार्य मानले जाते नि ते खरेही आहे. चातुर्वर्ण्य विरोध, स्त्रीस मोक्षाचा मार्ग खुला करणे, हरिजनांना साधनेची कवाडे खुली करणे ही नि अशी किती तरी उदाहरणे श्री चक्रधरांना समकालीन संतांच्या पाश्र्वभूमीवर समतेचा खरा उद्गाता म्हणून सिद्ध करायला पुरेशी आहे.
श्री चक्रधर स्वामींनी आपल्या पंथीय अनुयायांसाठी ‘असतिपरि' शीर्षकांतर्गत आचार धर्माचे जे निरूपण केले आहे ते पाहिले की चक्रधर हे समानतेने पुरस्कर्ते होते हे कळायला वेळ लागत नाही. त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा निःसंदिग्ध शब्दात केलेला विरोध या संदर्भात पाहण्यासारखा आहे. महानुभावी साधकाने भिक्षा कशी मागावी या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी चातुर्वर्ण्य चरद मैक्ष्यमः या शास्त्रासि अनुसरिजे' अशी आज्ञा करून हेच स्पष्ट केले आहे की। साधकाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या सर्व वर्णाच्या घरी भिक्षा मागावी. त्यात त्याने हा ब्राह्मण, हा शूद्र असा भेदभाव करू नये. त्या काळात लोक पाणीही ठराविक वर्षांच्या घरचेच पीत असत. विशिष्ट वर्णाच्या घरचे पाणी पिणे हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील एक नीती तत्त्वच होते. चक्रधरांनी या संदर्भात ही आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे. “तुम्हा बोडी गंगा समानचि हो आवी की गा" हे त्यांचे संतवचन हेच सांगते की कोणत्याही वर्णाच्या घरी अन्न खायला जशी हरकत नाही तशीच कोणत्याही वर्णाचे घरी पाणी प्यायलाही हरकत नाही. इथले पाणी पवित्र आणि तिथले पाणी अपवित्र असा भेद साधकाने मानता कामा नये. साधकाच्या दृष्टीने पाणी गंगेचे असो की डबक्यातले, ते सारख्याच योग्यतेचे आहे. त्याने दोहोच्या ठिकाणी समानता मानली पाहिजे असे सांगून चक्रधरानी समतेचे समर्थनच केले आहे. चक्रधरांचे समग्र जीवन हे आचार विचारांच्या समन्वयाचे आदर्श उदाहरण आहे. चातुर्वर्ण्य विरोधाचा ते उपदेश करून थांबले नाही. “आधी केले नि मग सांगितले." या उक्तीनुसार त्यांनी मातंगाच्या हातून प्रसाद सेवन केला होता नि हरिजनाच्या घरी भोजनही केले होते या गोष्टी सर्वश्रुत आहेत.
श्रेष्ठांनी कनिष्ठांशी अत्यंत प्रीतीपूर्वक वर्तन करण्याची चक्रधरांनी दिलेली शिकवण हे समतेचे आणखी एक ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल. उद्धवदेव नि विदुराच्या भेटीचा दृष्टांत देऊन त्यांनी सर्वांशी प्रेमपूर्वक संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला आहे. श्रेष्ठ जर कनिष्ठांशी प्रेमपूर्ण व्यवहार करतील तर कनिष्ठास परमेश्वर भेटीचा आनंद होईल असे सांगून त्यांनी प्रीतीपूर्वक वर्तनाचे महत्त्व विशद केले आहे. या सृष्टीतलावर एकत्र झालेले सर्व जण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. त्यामुळे त्या सर्वांचा धर्म ही एक आहे. एकु देवो, एकु धर्म, तया परस्पर परमप्रीती हो आवी की" असे म्हणत चक्रधरांनी धार्मिक एकात्मतेकडे, समानतेकडेच अंगुलीनिर्देश केला आहे. या सृष्टीत देव, धर्म या सर्वच कल्पना एकात्म असल्यामुळे मानवाचे एकमेकांशी असलेले आचरणही एकात्म नि समानतेचे असले पाहिजे हा चक्रधरांचा आग्रह त्यांना वैश्विक पातळीवर विराजमान करतो. मनुष्याने एकमेकांवर प्रेम करावे पण या प्रेमात आपार बुद्धी नसावी हे देखील सांगायला चक्रधर विसरले नाहीत. नामदेवाची सेवा करण्याच्या संदर्भात महदाइसेला चक्रधर म्हणतात. “बाई : परम प्रीती कीजे।. परि विशिष्ट बुद्धी न कीजे।' सहज नि सोप्या शब्दांत जीवनाचा महान संदेश देण्याची हातोटी केवळ चक्रधरांमध्येच आपल्याला दिसून येईल. विशिष्ट बुद्धी हे विषमतेचे उगमस्थान आहे हे मर्म चक्रधरांनी बरोबर ओळखले होते. विशिष्टता ही आत्मीयता आहे नि तिच्यामुळे आपपर भेद वृत्ती उदयाला येते म्हणून सर्वांशी समान प्रेमपूर्ण वर्तन करण्याची शिकवण जेव्हा चक्रधर देतात तेव्हा त्यामागे समतेची स्थापना करण्याचाच आग्रह असतो, हे वेगळे सांगायला नको.
श्री चक्रधर स्वामींचे अवतारकार्य हे बाराव्या तेराव्या शतकातले. या काळात एकीकडे चातुर्वण्र्याच्या आधारावर जशी विषमतेची बीजे पेरली जात तशीच ती स्त्री-पुरुष भेदाच्या आधारेही पेरली जात असत. चक्रधर हे सर्व प्रकारच्या विषमतेविरोधी बंडाचा झेंडा उभारणारे संत होत. आपल्या विचारबंध या ग्रंथात उत्तम म्हणजे ब्राह्मण अन् अधम म्हणजे मातंग' या वृथा कल्पनांचा जसा त्यांनी विरोध केला आहे तसा 'लीळा चरित्रात त्यांनी स्त्री-पुरुष भेदाचाही केला आहे. त्या काळी शूद्राप्रमाणे स्त्रीसही साधना करण्याची अनुमती नव्हती. चक्रधर स्त्री शूद्रादिकांना इतरांबरोबर आपल्या पंथात प्रवेश देऊन थांबले नाहीत, तर त्यांना इतरजनांबरोबर मोक्षाचा अधिकार बहाल केला. धर्म नि भवतीस पुरुषाची मिरासदारी करू पाहणा-या पुरुषप्रधान विचार चिंतनास चक्रधरांनी सुरुंग लागला. स्त्री रजःस्वला होते म्हणून ती अपवित्र असते अशा बुरसटलेल्या विचारांना चक्रधरांनी कधीच थारा दिला नाही. ते भक्तीत बाह्य शुचित्वापेक्षा आंतरिक शुचित्वास अधिक महत्त्व देत. आपली शिष्या महदाइसेला रजस्वला स्थितीत विटाळ पाळण्याची आवश्यकता नसल्याने सांगताना ते म्हणतात. “मनिचे अभिलास निवर्तले, तरि शुचि अशुचि ये दोन्ही नाहीकी गा एका।" हे त्यांचे विचार स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कारातूनच निर्माण झाल्याचे दिसून येतात. ज्या काळात स्त्रीस घराचा उंबरा ओलांडायचेसुद्धा स्वातंत्र्य नव्हते अशा काळात स्त्री समानतेसंबंधातील चक्रधरांचे हे विचार क्रांतिकारकच म्हणावे लागतील.
दैनंदिन जीवनातील मनुष्याच्या आचरणात येणारे छोटे-मोठे प्रसंग हे कधी कधी विषम आचरणाचे अधिष्ठान असते हे लक्षात घेऊन चक्रधरांनी लोकांना समबुद्धीने वर्तन करण्याची शिकवण दिली आहे. त्यांनी निरूपण केलेल्या आचार धर्मात छोट्या छोट्या गोष्टीतूनही समानतेची बीजे दृढमूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. “तुम्ही चतुर्विद्या भूतग्रामा समय देवावे असे म्हणत सर्व प्राणीमात्रांविषयी समभाव ठेवण्याचाच उपदेश केला आहे. साधकाने सगळ्या प्राणिमात्रांना अभय द्यावे, त्यांचे भीतीपासून संरक्षण करावे. आपल्या शारीरिक क्रियेने व वाचिक शब्दांनीच नव्हे, तर नुसत्या दर्शनानेही किडामुंगीला भीती वाटू नये याची काळजी घ्यावी, सर्व प्राणिमात्रांना शारीरिक, मानसिक व वाचिक हिंसेपासून सुरक्षित ठेवण्याचा त्यांनी केलेला उपदेश ‘सर्वठायी समानत्व' शोधण्याच्या वृत्तीचेच निदर्शक आहे. साधकाने हा दुःख देणारा किंवा हा पूजा करणारा असा भेद करता कामा नये असे चक्रधर नेहमी सांगत. त्यांच्या लेखी दोघेही समान असत. ते एके ठिकाणी म्हणतात, “तुम्हा मारिता पूजिता समानचि होआवी की गा।" ज्याच्या अंगी विरक्ती पूर्णपणे बाणली आहे अशा साधकाने मानापमान, निंदा-स्तुती, लाभालाभ हे सगळे समान मानले पाहिजे असे सांगण्यामागे चक्रधरांची समवृत्तीच कारण होती.
श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या या आचार धर्माचे समग्र मूल्यांकन केल्यावर एक गोष्ट जाणवते की, त्यांनी त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीत ज्या अनेक गोष्टी दुष्ट नि कालबाह्य होत्या. त्यावर प्रहार करून त्या जागी नवा विचारप्रवाह निर्माण केला. प्रबोधन हे खण्डन-मण्डनाचे समन्वित रूप आहे हे लक्षात घेतल्यावर आपणास असे दिसून येते की चक्रधरांनी आपला आचारधर्म हा समाज प्रबोधनासाठीच निरूपित केला होता. धर्म नि भक्तीद्वारे समाज विकासाचे ध्येय ठेवणारे श्री चक्रधर स्वामी हे जसे संत होते तसेच ते समतेचे पुरस्कर्ते नि समाज प्रबोधकही होते.
प्राचीन मराठी संतांनी आपल्या विचार नि वाङ्मयाद्वारे जे सामाजिक उत्थानाचे महत्कार्य केले त्यात श्री स्वामींचे कार्य हे आगळी गुण वैशिष्ट्ये घेऊन आपल्यासमोर येते. चक्रधर जसे सर्वज्ञ होते तसेच ते स्वप्रज्ञही होते. ईश्वर, धर्म, भक्ती, समाज, भूतदया, मानवता यांसारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी केलेले भाष्य हे सर्वथा परंपरेवर प्रहार करणारे नि मूलगामी होते. धर्म ही। अफूची गोळी हे खरे आहे, पण तिचा जर विधायक उपयोग करून घेतला तर तिच्यासारखी समाज सुधारणेची रामबाण मुळी दुसरी कोणतीही असणार नाही याचे पुरे भान चक्रधरांना असल्याचे पदोपदी जाणवते. चक्रधर कवी, संत, पंथ संस्थापक होते हे नाकारता येणार नाही. साधक, अनुयायी यांच्या आचरणासंदर्भात चक्रधरांनी केलेले विस्तृत विवेचन विचारांपेक्षा आचाराचे महत्त्व विशद करते. धर्म म्हणजे आदर्श नीतीतत्त्वांचा संग्रह. पण ही नीतितत्त्वे ब-याचदा शाब्दिक नि वाचिक स्तरावर सुरक्षित असतात. चक्रधरांनी शाब्दिक नि वाचिक तत्त्वांचा काथ्याकूट करण्यापेक्षा वर्तन, परिवर्तनावर भर दिला. चक्रधरांचे द्रष्टेपण सिद्ध होते ते इथेच. वेद पठण, नामस्मरण, पूजाअर्चा सारख्या कर्मकाण्डाला शह देऊन मानवी मूल्ये जोपासणारी समतेची शिकवण देऊन चक्रधरांनी महाराष्ट्रास पुरोगामी बनवले आहे. प्राचीन मराठी संतांच्या प्रबोधन परंपरेत चक्रधरांची समता एक व्यवच्छेदक व्यक्तिमत्त्व घेऊन पुढे येते, यातच चक्रधरांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे. महानुभाव पंथ आणि एकात्मता
महानुभव पंथ हा हिंदू धर्मात प्रचलित असलेला एक संप्रदाय होय. जनसामान्य त्यास मानभाव पंथ या नावाने ओळखतात. महानुभव शब्दास काहीशा कुत्सित दृष्टीने पाहण्याच्या तत्कालीन प्रवृत्तीमुळे मानभाव' शब्द रूढ झाला. खरं तर महानुभाव पंथ हा प्रचलित सर्व धर्म, संप्रदायांपेक्षा अत्यंत उदारवादी, समतावादी असा धर्म पंथ होय. संस्कृत पंडितांनी महानुभाव शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले आहे की, “महान अनुभवः तेजः बलं वा यस्य स महानुभावाः' अर्थात मोठा अनुभाव म्हणजेच मोठे तेज किंवा बल ज्याचे असा तो महानुभाव. महानुभाव शब्द श्रेष्ठ, बलशाली पुरुषाचे विशेषण म्हणून वापरण्यात येतो. पंथास असे नाव देण्यामागे संस्थापक श्री चक्रधरांची पंथांचे आगळेपण सिद्ध करण्याचीच भावना असावी हे उघड आहे.
इसवी सनाच्या तेराव्या शतकात वहाड प्रांतात चक्रधरांनी स्थापन केलेला हा पंथ आरंभापासूनच एक समृद्ध पंथ म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या लोकाभिमुख वृत्तीमुळे या पंथाने अल्पावधीतच पंजाब, मध्य प्रांत, सरहद्द प्रांत, काश्मीरपर्यंत पाय पसरले. तेराशे व सोळाशे शतकाच्या तीनशे वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ काळात या पंथाने आपली मोहिनी टिकवून धरली. त्याचे सर्व श्रेय पंथाच्या एकात्म वृत्तीस द्यावे लागेल. तेराव्या शतकाचा काळ हा धर्म नि पंथांचा सुकाळ असलेला काळ होता. हिंदू, मुसलमान, जैन, बौद्ध इत्यादी सर्व धर्मात छोटे छोटे पंथ आकार घेत होते. धार्मिक, कट्टरतेविरुद्ध धार्मिक उदारतेच्या संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून हे छोटे छोटे पंथ साकारत होते. महानुभाव पंथाचा उदयही काहीशा अशाच परिस्थितीत झाला.
शंकराचार्यांनी अद्वैतवादी धर्मचिंतनाची प्रतिष्ठापना करण्याला तीन चारशे वर्षे लोटली होती. या तीन-चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत धर्माच्या सप्त स्वरूपाचे जवळपास विस्मरण झाले होते. धर्माच्या नावावर प्रस्थापित झालेली समाजरचना आतून बाहेरून पोखरून निघाल्यासारखी झाली होती. अनेक प्रकारची दैवते, व्रतवैकल्ये, मंत्र तंत्र इत्यादीचे साम्राज्य समाजात सर्वत्र पसरले होते. धर्माच्या नावावर अधर्म घडत होता. जनसामान्यांची धर्मावर असलेली श्रद्धा नष्टप्राय होण्याचा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत सामान्य जनतेस ख-या ईश्वर भक्तीचे, खच्या धर्माचे स्वरूप समजावून देणे आवश्यक झाले होते. हे ऐतिहासिक, कार्य महानुभाव पंथाने केले. खच्या भक्तिभावनेचे जनसामान्यांत बीजारोपण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या या पंथाचे स्वरूप प्रचलित सर्व संप्रदायांपेक्षा वेगळे होते हे ओघाने आलेच.
तत्कालीन हिंदू धर्मात प्रचलित असलेले अधिकांश पंथ नि संप्रदाय चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे होते. जातीयता पाळणे हा शिष्टाचाराचा भाग समजण्यात येत होता. धर्मकार्यात स्त्रीस अपात्र मानण्यात येत होते. धर्मकृत्यात कर्मकाण्डास असाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. या नि अशा अनेक गोष्टींमुळे धर्माच्या नावावर माणसाचे मनुष्यत्व हिरावून घेण्यात आले होते. अशा समाजात महान अनुभाव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम महानुभाव पंथाने केले. समाजाची ही स्थिती पाहून या पंथाने आपला असा वेगळा
आचारधर्म निर्माण केला. हा आचारधर्म म्हणजे धर्माद्वारे सामाजिक, धार्मिक, भावनिक एकात्मता निर्मिण्याचा महान यज्ञच होय.
पंथसंस्थापक श्रीचक्रधरांनी महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानात आचारधर्मास असाधारण महत्त्व दिले आहे. आचारधर्मांतर्गत असणारे विविध नीती नियम पहाता हा पंथ केवळ धर्म संप्रदाय नसून तो एक समाज रचनेचा नवा विचार आहे हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. ‘समाज धारेय इति धर्मः' अशी धर्माची जी व्याख्या करण्यात येते त्याचे भान महानुभव पंथाने ठेवल्याचे पदोपदी जाणवते. ईश्वर, ईश्वर प्राप्तीचे मार्ग, मोक्ष, माया इत्यादी गूढ धर्मचिंतनात रममाण होण्यापेक्षा धर्माच्या सहज स्वरूपाचे निरूपण करणे या पंथाने श्रेयस्कर मानले. धर्म, जात, ईश्वर इत्यादी सर्व तत्त्वांना एकात्मतेच्या दृढ बंधनाने बांधून त्याद्वारे समतावादी मानवसमाज निर्मिण्याचा या पंथाने केलेला प्रयत्न अल्प असला, तरी आरंभाच्या दृष्टीने महत्त्वाचा खचितच मानावा लागेल.
आचार धर्मांतर्गत या संप्रदायाने आपल्या सर्व अनुयायांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेत असलेली आपपर भेद वृत्ती विसरून सर्वाठायी समानता शोधण्याची दिलेली शिकवण या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. भिक्षुकाने कुणाच्या घरी भिक्षा मागावी या प्रश्नाचे निरूपण करताना श्रीचक्रधरांनी म्हटले आहे की, “चातुर्वर्ण्यचरदभैक्षमः या शास्त्रासि अनुसरिजे' याचा अर्थ असा की चारही वर्णांच्या घरी भिक्षा करावी असे जे शास्त्र आहे ते साधकाने अनुसरावे. श्रीचक्रधर केवळ शिकवण देऊन थांबले नाहीत तर आपल्या आचरणाने त्यांनी हा नवा आचारधर्म अनुयायात दृढमूल केला. मातंगाच्या हातचा प्रसाद खाणे, हरिजनाघरी भोजन इत्यादी अनेक प्रसंग उदाहरण म्हणून सांगता येतील.
महानुभाव संप्रदाय केवळ चातुर्वण्र्य विरोधी होता म्हणून तो एकात्मवादी होतो असे नाही. स्त्री संबंधी या पंथाने स्वीकारलेले धोरण सामाजिक, धार्मिक नि भावनात्मक एकात्मतेच्या संदर्भात ही एकात्मता नि समतेचा पुरस्कार करणारे होते असे दिसून येते. स्त्री रजःस्वला होते असे कारण पुढे करून तिला सर्व क्षेत्रांतून अस्पर्श ठेवण्याचा प्रघात महानुभाव पंथाने मोडला. पूर्वी स्त्रीस यज्ञादी धर्मकृत्यात अपात्र समजण्यात येत होते. संन्यास घेण्याचा तिला अधिकार नव्हता. तिला मोक्षही न मिळण्याची व्यवस्था धर्मकृत्यात होती. स्त्रीस समानता देऊन तिला मनुष्यत्व प्रदान करण्याचे क्रांतीकार्य महानुभाव पंथाने केले. स्त्रीस संन्यास घेण्याची या पंथाने मुभा दिली. हा पंथ बाह्य पावित्र्यापेक्षा अंतः पावित्र्यास महत्त्व देणारा असल्याने त्याने स्त्रीच्या अपावित्र्याची कल्पना झुगारून देऊन तिला समाजात धर्मकृत्यात मानाचे समानतेचे स्थान दिले व आपली एकात्म वृत्ती सिद्ध केली.
महानुभाव पंथाने आपल्या तत्त्वज्ञानात ‘असती परी' शीर्षकांतर्गत वर्णिलेले अनेक नीति नियम म्हणजे धार्मिक, सामाजिक व भावनिक एकात्मता निर्मिण्याचे सोपानच. त्यागाची आवश्यकता, विषयसंबंध त्याज्य, अहंतेचा त्याग, कनिष्ठांशी प्रेमपूर्वक वर्तन, एकत्र स्थानपान, अहिंसा वृत्ती, इतरांना अभय देण्याचे आश्वासन, समता इ. आचार नियम करून या पंथाने आपल्या अनुयायांना सर्व समावेशक वृत्तीचा अंगीकार करण्याचाच जणू उपदेश केला आहे. महानुभाव पंथ हा एक धर्म पंथ असल्याने त्याने ईश्वर, जीवस्वरूप, प्रपंच, अवतार, क्रियापक, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग इत्यादीचे विस्तृत विवेचन केले आहे. असे असले, तरी कुठेही त्याने आपली एकात्मवृत्ती सोडली नाही. त्याच्या या आगळ्या वैशिष्ट्यामुळेच तो अल्प काळात सर्वत्र प्रसारित झाला नि विरोधात टिकूनही राहिला.
धर्म नि एकात्मता यांचा इतका जाणीवपूर्वक विचार करणारा धर्मपंथ आपणास अभावानेच सापडेल. तत्कालीन सर्व धर्म नि संप्रदाय आपला धर्म, आपले अनुयायी, आपली धर्मपीठे इत्यादीच्या संकीर्ण विचारात गुरफटलेले होते. या पाश्र्वभूमीवर या पंथाने स्वीकारलेली लोकाभिमुख वृत्ती निश्चितच क्रांतिकारी म्हणता येईल. हिंदू धर्मांतर्गत जे विभिन्न संप्रदाय त्या काळी प्रचलित होते त्यांची सहिष्णुता संदिग्ध होती. त्यांच्यात विश्वव्यापक वृत्तीचा अभाव होता. या विभिन्न पंथात असलेल्या संकुचित, अनुदान वृत्तीमुळे वर्ग विशेषाचे समाजावरील प्राबल्य वाढत चालले होते. परिणामी विदेशी धर्मांना आमंत्रण मिळाले. सर्व धर्म नि समाजनाशाच्या उदारवादी, समतावादी धोरण स्वीकारून औरंगजेबासारख्या कर्मठ धर्मप्रसारकापासूनही आपल्या पंथाचे रक्षण केले. धर्म संघर्षाच्या अत्यंत प्रतिकूल काळात महानुभाव पंथाने सर्वसमावेशक असे जे एकात्मवादी धोरण स्वीकारले ते त्याच्या दूरदृष्टीचे जसे द्योतक आहे तसेच ते त्याच्या एकात्मवृत्तीचे ठळक लक्षणही आहे, नि म्हणूनच धर्म नि एकात्मता यांचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा महानुभाव पंथाने या संदर्भात केलेले कार्य आपल्या पहिल्यांदा लक्षात येते. महानुभाव पंथ बदलत्या काळात निष्प्रभ झाला, ही वस्तुस्थिती आहे. असे असले, तरी विभिन्नतेने विनटलेल्या या देशास अभिन्नतेच्या सूत्राने बांधून एकात्म ठेवण्याचे आरंभिक श्रेय जर कुणाला द्यावयाचे झाले तर ते महानुभाव पंथासच द्यावे लागेल, हे वेगळे सांगायला नको. संत कबीरांचा आचार धर्म
हिंदीतील सुविख्यात संत कवी कबीरदास यांनी सुमारे सहा शतके उलटली तरी त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि प्रेरक वाटतात. संत म्हटला की देव, धर्म या गोष्टी आपसूक येतात, पण संत कबीरांनी आपल्या काव्याद्वारे तत्कालीन रूढीग्रस्त समाजात प्रागतिक बनवले. पुरोगामी संतकवी म्हणून कबीरांचे आगळे महत्त्व आहे.
कबीरांनी आपल्या काव्यातून जो आचारधर्म व्यक्त केला त्यात परंपरा आणि रूढीस स्थान नाही. दगडाच्या देवास पुजण्यापेक्षा ते जात्याची पूजा करणे पसंत करतात. कारण जाते धान्याचे पीठ करून देते. जातीपातीच्या समाजातील भिंती त्यांना अमान्य होत्या. श्रेष्ठ-कनिष्ठपणा त्यांना मान्य नव्हता. जो ईश्वराची भक्ती करतो तो ईश्वरप्रिय होतो असे ते सांगत. मंदिर, मशीद असे धर्मभेदही त्यांना मान्य नव्हते. पंडित, मौलवींनी धर्माच्या नावावर पाडलेल्या रीतिरिवाजांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. माळ जपण्यापेक्षा मन जपण्याची शिकवण कबीरांनी दिली ती आजही तितकीच सार्ध वाटते.
‘कथनी तजि करनी करै, विषसे अमृत होय' म्हणणारे कबीर ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे' या समर्थांच्या शिकवणीची आठवण करून देतात. साधुता ही दाढी, मिश्या वाढवून आणि भगवी वस्त्रे नेसून सिद्ध होत नसते. ते साधुता हे आंतरिक शुद्धतेचे प्रतिबिंब मानत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या षड्रिपूंपासून मानवाने स्वतःच मुक्त ठेवले पाहिजे. विकारमुक्त जीवनच सार्थक ठरते, अशी त्यांची धारणा होती. कनक आणि कामिनीच्या मोहापासून माणसाने चार हात दूरच राहायला हवे, हे त्यांनी आग्रहाने स्पष्ट केले
आहे. स्त्रीच्या सावलीने भुजंग तो आंधळा होतो तिथे माणसाचे काय? असा प्रश्न करणारे कबीर आचरण शुद्धतेचेच समर्थन करतात. 'जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ छिमा तहाँ आप’'सारख्या वचनातून कबीरांनी दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला आहे. ब-याचदा माणसे खूप बोलत राहतात. करत काहीच नाही. असे बोलणे ते निरर्थक मानायचे. जी वाचाळता तुमचं स्वतःचे हृदय भेदू शकत नाही ती काय कामाची असा प्रतिप्रश्न करून कबीरांनी विचार युक्त आचाराचा महिमाच स्पष्ट केला आहे.
आचार सब जग मिला, मिला विचारी न कोय' म्हणून कबीरांनी समाजाची वैचारिक दिवाळखोरीच वेशीवर टांगली आहे. विवेकशील जीवन हेच माणसास अन्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवत असते आणि म्हणून माणसाने विवेक जाणीवपूर्वक जोपासला पाहिजे, असे कबीर अनेकदा बजावतात.
कबीरांनी आपल्या समग्र काव्यातून मानव जीवन अधिक समृद्ध, शुद्ध व्हावे म्हणून प्रयत्न केला. देव, धर्माची नवी व्याख्या समाजापुढे मांडून आचरण शुद्धता म्हणजेच धर्म असे आग्रही प्रतिपादन केले. कबीरांनी आपल्या काव्यातून स्पष्ट केलेला आचारधर्मच समाजास तारू शकेल असे वाटते. कबीरांचे संत माहात्म्य हे त्यांच्यातील भक्तापेक्षा समाजसुधारक व मानव उद्धारकात सामावलेलं आहे.
कबीरा सोई पीर है, जो जाने पर पीर' म्हणणारे कबीर समाजातील सर्व अमंगल, दुःख दूर करण्याचा ध्यास घेतलेले सुधारक म्हणून आपल्यापुढे येतात. सणांमागील सामाजिक जाणीव
भारत विभिन्नतेने नटलेला देश आहे. आपल्या देशांत विविध धर्म, जाती, भाषा, पंथ आहेत. आपल्या देशात या विभिन्नतेमुळे सण व उत्सवांना तोटा नाही. तीनशे पासष्ट दिवसात सण, उत्सव, व्रत, यात्रा, मुहूर्त नसलेला दिवस सापडणे दुर्मीळ. व्रत/वैकल्ये सांगणारी कॅलेंडरे पहा. रिकामा दिवस मिळणे कठीण. सणांची विपुलता आपल्या देशाचे सांस्कृतिक वैभव आहे. या वैभवामुळेच आपल्या देशात धार्मिक बंधुभाव व सहिष्णुता वाढीस लागली. आपल्या पूर्वजांनी केलेली सणांची योजना पाहिली की त्याच्या दूरदृष्टीचा नि विज्ञाननिष्ठेचा प्रत्यय येतो. मुळात सण, व्रत आणि वैकल्ये ही सामाजिक गरजेतून निर्माण झाली. बदलत्या काळात ती कर्मकांडे बनली हा भाग वेगळा.
बकरी ईद सणच पहा ना. बकरी ईद या शब्दाचा अर्थच मुळी बलिदानाचा उत्सव! पूर्वी आपले मुसलमान बांधवही या वेळी उपवास करायचे. पुढे त्याचे रूपांतर सणात झाले. या दिवशी आपले सर्व मुसलमान बांधव शुचिर्भूत होऊन नवे कपडे परिधान करतात. ईदगाहवर जाऊन नमाज पढतात. नंतर सर्व जण गळामिठी घालून ईद मुबारक' म्हणून शुभेच्छा देतात. त्यानंतर दिल्या जाणा-या बळीचा एका हिस्सा ते गरिबांना वाटतात. वरकरणी आनंद उत्सवाचे प्रतीक असलेल्या या सणात फार मोठा सामाजिक आशय भरलेला तुम्हास दिसून येईल. स्वत:ची सुख दु:खे विसरून लोक जेव्हा प्रार्थनास्थळी येतात, तेव्हा ते स्वत्व विसरून एक होतात. दुस-याला शुभेच्छा देत आपल्यातील मांगल्य व उदारतेचे प्रदर्शन करतात. आपल्या घासातील घास गरिबांना वाटून ते त्यागमय जीवन जगतात. सर्व धर्मातील विविध सणात दडलेला सामाजिक आशय शोधून जर आपण त्याप्रमाणे वागू लागलो तर आपल्या सामाजिक जीवनास लागलेले निराशेचे ग्रहण सुटण्यास वेळ लाकणार नाही. कोणताही सण आणि समारंभ हे आपल्यातील सामाजिक जाणीव समृद्ध करण्याचे साधन असते. रक्षाबंधनाच्या दिवशी अनाथाश्रमातील बालकांना राखी बांधायची आणि मग वर्षभर त्यांच्या व्यथा, वेदनांकडे ढुंकूनही पाहायचं नाही. आपल्या अशा आचरणाने आपण त्या सणाचा आशयच हरवून बसत असतो. उपवासासारखे व्रत खरे तर आपल्यातील शुद्धता, पावित्र्य यांचा विकास करण्याच्या हेतूने सुरू झाले. 'उप' म्हणजे जवळ आणि ‘वास' म्हणजे राहणे. परमेश्वराजवळ रहाणे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपण आपले मन व शरीर शुद्ध ठेवू. यासाठी मंदिर, मशीद नि प्रार्थनागृहात जाणे आवश्यक नसते. आपण जेथे जातो ते प्रसन्न वातावरणाचा मनावर अनुकूल परिणाम व्हावा व परिणामी आपले मन मांगल्याने भरून यावे म्हणून पण प्रत्यक्षात असे होते का? होत नसल्यास ते का होत नाही? याचा आपण शोध घ्यायला हवा. माणसाने सतत आत्मशोध घेत राहिले पाहिजे. आत्मशोधामुळे माणसात स्वत:चे, दोष, मर्यादा माहीत होतात. त्यांचे परिमार्जन करणे हाच उपवासाचा खरा हेतू असतो. त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले सारे उपवास ‘आहार' केंद्रित केले आहेत, ते खरे तर ‘आचार' केंद्रित व्हायला हवे.
आपण सर्व सणांना ऐश्वर्य प्रदर्शनाचे माध्यम म्हणून वापरू लागलो आहोत. ऐश्वर्य असणे नि त्याच्या उपभोगाची संधी मिळणे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत भाग्य नि भाकिताचा भाग आहे. पण खरं तर ती कष्टाची परिणती होय. पण त्याचे प्रदर्शन विवेकानेच व्हायला हवे. संत एकनाथांची कथा या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी आहे. कुत्र्याने भाकरी पळवल्यावर त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन धावणा-या या संत प्रवृत्त महामानवाने आपत्तीतही परमार्थ शोधण्याची दिव्य दृष्टी आपणास दिली. सण असो की संकट, जीवनातील प्रत्येक क्षण हा परमार्थ कारणी लावायला आपण शिकलो पाहिजे. परमार्थात त्याग नि दानाच्या उदारतेबरोबर भोक्त्याच्या संतोषाचे सुख सामावलेले असते, हे लक्षात ठेवून आपण प्रत्येक सण हा दुर्बलांचे दैन्य दूर सारण्यासाठी मिळालेली एक मंगल संधी मानून तिचा उपयोग केला पाहिजे. आपण असे वागू लागलो तर अनेक सामाजिक समस्या समूळ उपटून टाकल्यासारखे होईल. बालकांचे हक्क
विसावे शतक हे हक्कांचे शतक मानले जाते. या शतकात विविध घटकांच्या हक्कांना मान्यता मिळाली. हरिजन, मजूर, स्त्रिया इत्यादी दुर्बल समजल्या जाणा-या वर्गांना त्यांच्या न्याय्य हक्कांना मान्यता मिळाली ती याच शतकात. समाज नागरिकत्व, समान हक्क, समान मजुरी, समान दर्जा इत्यादी शब्दांना याच शतकांनी प्रतिष्ठा दिली. असे असले, तरी अद्याप अनेक हक्क असे आहेत की त्यांना समाजात हवे तितके महत्त्व दिले गेले नाही. एकविसावे शतक जर आपणास कर्तव्यपूर्तीचे शतक म्हणून साजरे करायचे असेल तर आता बालक हक्कांना न्याय दिला पाहिजे.
“मुले ही देवाघरची फुले आहेत. आजची बालके उद्याची जबाबदार नागरिक असतात.' “मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत. या सर्व सुभाषितांना सार्थक बनवायचे असेल तर बालक हक्कांना न्याय दिला पाहिजे. बालक हक्कांना न्याय देणे म्हणजे मुलांना त्यांचे स्वराज्य बहाल करणेच होय. सन १९२४ साली जीनिव्हामध्ये एक परिषद झाली होती. या परिषदेत बालक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली. गतकालात बालक हक्कांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक परिषदा, परिसंवाद झाले. आंतर राष्ट्रीय बालक वर्षही साजरे करण्यात आले. पण बालकांच्या हक्कांना अद्याप आपण ख-या अर्थाने मान्यता दिली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
0 ते १६ वयोगटातील बालकांची संख्या ही जगाच्या लोकसंख्येचा १२ वा हिस्सा आहे. भारताच्या सुमारे ७० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ७ कोटी मुलेच आहेत. जगातील सर्व बालकांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुखी व समृद्ध जीवन बहाल करण्याच्या उद्देशाने बालक हक्काच्या जाहीरनाम्यात मान्यता देण्यात आली आहे. मानवी हक्कांच्या वैश्विक मान्यतेनुसार प्रत्येक मनुष्य हा सर्व हक्क व स्वातंत्र्ये मिळविण्यास पात्र आहे. जात, धर्म, वर्ण, लिंग, भाषा, राजकीय वा अन्य मतप्रणाली, आर्थिक स्थिती, जन्मजात दर्जा या पैकी कशाचाही विचार न करता प्रत्येक बालकाचे काही जन्मजात हक्क आहेत. शारीरिक व मानसिक दुर्बलता लक्षात घेऊन बालवयात त्यांची अधिक काळजी व जपणूक करावी लागते. जन्मापूर्वी व जन्मानंतर सुरक्षेचा बालकांचा हक्क सर्वमान्य असला, तरी त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. बालकांना समृद्ध बालपण बहाल करण्यात समाजाचे कल्याण सामावलेले असते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
कोणत्याही कसोटीचा विचार न करता बालकांना सर्व हक्क मिळणे गरजेचे आहे. शारीरिक, मानसिक, नैतिक, आध्यात्मिक व सामाजिक विकासाची संधी आणि सुविधा मिळणे हा बालकाचा जन्मजात हक्क आहे. जन्मतः त्याला नाव व राष्ट्रीयत्व मिळविण्याचा हक्क आहे. त्याला सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ मिळायला हवेत. शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या अपंग असलेल्या बालकांच्या विशेष काळजी व जपणूकीची सोय व्हायला हवी. बालकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सुसंवादी विकासासाठी त्याला प्रेम व सलोखा मिळायला हवा. विशेष परिस्थितीचा अपवाद वगळता त्याची मातेपासून फारकत होता कामा नये. त्यांना सक्तीचे मोफत शिक्षण मिळायला हवे. क्रूरता, पिळवणूक दुर्लक्ष या सर्वांपासून त्याला संरक्षण मिळाले पाहिजे. जातीय धार्मिक इत्यादी भेदभाव निर्माण करणाच्या प्रवृत्तीपासून संरक्षण मिळणे हा बालकाचा हक्क आहे. या नि अशा किती तरी हक्कांचा उल्लेख करता येईल. यापैकी आपण किती हक्कांची काळजी करतो हा खरा प्रश्न आहे?
युरोपमधील अनेक देशात बालकांच्या या हक्कांची पायमल्ली केल्यास तो दखलपात्र गुन्हा समजला जातो. जन्मदात्या आई-वडिलांनी देखील मुलांना मारता कामा नये. अशा परिस्थितीत शेजारी पोलिसात फिर्याद देतो व बाल अपराध नोंदवला जाऊन आता आपल्याकडे निर्माण व्हायला हवी. भारतासारख्या संवेदनशील देशात एक कोटी मुले अनाथ आहेत. त्यांच्या संगोपनाची पुरेशी व्यवस्था अद्याप आपण करू शकलो नाही. अनाथाश्रम आणि बालगृहे सुरू करून आपण जर इतिकर्तव्यता मानत असू तर त्यासारखी शरमेची गोष्ट दुसरी कोणती असू शकणार नाही. अनाथ, निराधार, दारिद्रयरेषेखालील मुले, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी यांची अपत्ये, शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेली मुले या सर्वांना संगोपन, सुरक्षा, संस्कार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे व तो त्यांना मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. बालकांच्या हक्कांची उपेक्षा होत असल्याने सर्व राष्ट्र अपराधी सिद्ध होते आहे याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. सण आणि सांप्रदायिक सद्भाव
आपल्याकडे कोणत्याही नव्या गोष्टीचे स्वागत आपण मोठ्या उत्साहाने करत असतो. घरात मुलाचा जन्म होणे, सुनेचे घरातील आगमन, वास्तुशांती, नववर्षाचे स्वागत असे कितीतरी प्रसंग आपल्या आनंदास उधाण आणणारे असतात. आजचा मोहरम सण हा पूर्वी मुसलमानी वर्षाचा प्रथम दिन म्हणून साजरा केला जायचा. पण पुढे हसन व हुसेनची स्मृती म्हणून तो साजरा केला जाऊ लागला. आपल्याकडे सर्व सण नि उत्सव हे सांप्रदायिक सद्भावाचे प्रतीक बनत चालले आहेत. गणेशोत्सव, मोहरम, नाताळ या सणांची ओळख एका धर्म विशेषाचे सण म्हणून आता राहिली नाही. अकबर मोहल्ल्यात गणेश मंडळ स्थापन होते आणि देशपांडे गल्लीतून ताबूताची मिरवणूक निघते हे दृश्य आपल्यातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक जसे आहे तसेच ते सांप्रदायिक सद्भावाचे द्योतकही आहे.
आजच्या भारताचे वर्णन करत असताना असे सांगितले जाते की, हा देश सांप्रदायिकतेच्या ज्वालामुखीवर वसलेला देश आहे. असे वर्णन करणाच्या विदेशी विद्वानांनी खरा भारत अजून ओळखलेला नाही. या देशास महाभारताची परंपरा आहे. आपसात भांडताना आम्ही शंभर नि पाच असू, पण परक्यांशी लढताना आम्ही ‘एकशेपाच' असतो हा आमचा इतिहास आहे. या इतिहासामागे आमचे दृढमूल झालेले सांस्कृतिक संस्कार आहेत. आपल्या देशातील विभिन्नतेत सामावलेली अभिन्नता अभंग आहे ती या सांस्कृतिक ठेव्यामुळेच.
संस्कृतीचा हा अमोल ठेवा आपण जपायला हवा. आपल्याकडे धर्म, सण, भाषा, साहित्य, चालीरीती या सर्वांत आदान-प्रदान होत असते. सण एक असतो, पण तो विविध रीतीने साजरा केला जातो. दस-यासारखा सण महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे साजरा होतो तर कर्नाटकात त्याचे स्वरूप दिवाळीचे असते. शेतात आलेल्या नव्या धान्याची पूजा भारतातील सर्व प्रांतांत होत असते. पूजा विधी वेगवेगळा असला, तरी धरणीमातेची करुणा भाकण्याचा व तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव एकच असतो. भारतीय संस्कृती म्हणून ओळखल्या जाणा-या भाषा, धर्म, विचार, प्रथा सर्वांमध्ये आपणास कृतज्ञता, विनम्रता, दया इत्यादी गुण सामावलेले असतात. हे सर्व गुण घरगुती व सांस्कृतिक सण-समारंभाच्या निमित्ताने संस्काराच्या रूपाने नव्या पिढीस दिले जात असतात. या सर्वांमागे सांस्कृतिक ठेव्याच्या जपणुकीचा ध्यास असतो.
भारतीय संस्कृतीतील या सद्भावांमुळेच आपण स्वत:ला अमुक जाती, धर्म वा राज्याचा न मानता भारतीय मानत असतो. या भारतीयत्वामुळेच आपल्यात राष्ट्रीय एकात्म भाव आणि सांप्रदायिक सद्भाव टिकून राहिला आहे. आज देशात ठिकठिकाणी होणारे दंगे, अत्याचार, हत्या यामुळे या सांस्कृतिक ठेव्यास जबर धक्का बसणार की काय अशी शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. देश ज्या अडचणीच्या स्थितीतून आज मार्गक्रमण करीत आहे ते पाहता आपली सांस्कृतिक घडण अधिक जाणीवपूर्वक करण्याची गरज निर्माण झाली आहे. सण आणि उत्सवांचा वापर या दृष्टीने आज व्हायला हवा.
देशाचे हे सारे चित्र पाहिले की लो. टिळकांनी सार्वजनिक उत्सव का सुरू केले याचे कोडे उमजायला लागते. माणूस सार्वजनिक जीवनात वावरायला लागला की त्याची आत्मकेंद्रितता हळूहळू लोप पावू लागते. सार्वजनिक जीवनात पारंपरिकता किती थोतांड आहे याची जाणीव होऊ लागते. सार्वजनिक कार्याचा जर सर्वांत मोठा भाग कोणता असेल तर दुसन्यासाठी जगण्यास ते आपणास शिकवत असते. समृद्धी आली की मनुष्य आत्मरत होतो. परोपकाराय जीवनम्' चा ध्येयवाद अशा लोकांच्या गळी कधी उतरतच नाही आणि म्हणून परस्पर वैर, परस्पर अविश्वास सार्वजनिकरित्या व सर्वधर्मीय बांधवांना घेऊन ते साजरे केले पाहिजे.
दैनंदिन जीवन आणि सण समारंभात एक मूलभूत फरक असतो तो हा की या दिवशी मनुष्य दिनक्रम सोडून अथवा परिपाठापक्षा वेगळ्या वातावरणात जात असतो. हे वातावरण परिवर्तन व नव्या गोष्टीचा स्वीकार यास अनुकूल असते. अनेक नवे संकल्प आपण सोडतो ते सणावारादिवशीच. मांगल्याचा शुभारंभ ही परिवर्तनाची नांदी असते. मानवी जीवनातील विकासात म्हणूनच सणांचे आगळे स्थान व महत्त्व असते. सण म्हणजे माणूस जोडायचे व माणूसपण वृद्धिंगण करायचे मंगलपर्व असते. अनाथांचा अंत्योदय
महारथी कर्ण हा पौरुषाचे प्रतीक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. कर्ण हा कुंतीचा विवाहाआधी जन्मलेला मुलगा. अनौरस पुत्र म्हणून सर्वांनी त्याची हेटाळणी केली. जात, पात नसलेल्या या कर्णाला द्वंद्वयुद्ध खेळण्याचाही साधा अधिकार नव्हता. पण कर्ण मोठा हिमतीचा. “जन्मा येणे दैवा हाती, व्यर्थचि कुल थोरवी' म्हणत त्याने स्वसामर्थ्य व पुरुषार्थाच्या बळावर अंगदेशचा राजा होऊन दाखवलं. एक अनौरस मुलगा, त्याला योग्य संधी मिळाली आणि तो अनौरसाचा अंगराज झाला. आपल्या समाजात कर्णासारखी अनौरस बालके प्रत्यही जन्मत आहेत. अनाथ, निराधार बालकांना विकासाची सर्व ती संधी उपलब्ध व्हायला हवी. पण आजचे चित्र मात्र विदीर्ण करणारे आहे.
समाजात अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था अनाथ, निराधारांना आश्रय देऊन त्यांचे जीवन फुलवण्याचा प्रयत्न करताहेत. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे ‘‘पुष्कळशा कळ्या ह्या किडीच खाऊन जातात. या बालकांच्या भविष्याची स्थिती याहून वेगळी नाही. आज समाजाच्या दयेवर पोसणारं त्यांचे जीवन अधिक मुक्त व समृद्ध व्हायला हवे. “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे' म्हणत अनाथ, निराधारांबद्दल समाज निष्क्रिय राहिला, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या गावात आसपास असलेल्या अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्थांत आपण कधी डोकावले तर आहे का, असा मनाशी प्रश्न करा. उत्तर काय येईल. ब-याच सामाजिक प्रश्नात आपली भूमी ही बघ्याचीच राहिली आहे.
हे सर्व चित्र बदलायला हवं. प्रत्येक चांगल्या बदलाची सुरुवात स्वत:पासून नको का करायला? गावकुसाबाहेरील वस्तीसारख्या अस्पृश्य राहिलेल्या अनाथाश्रमासारख्या संस्था आपल्या संवेदनांनी ओथंबल्या पाहिजेत. आपलं वर्तुळातलं छोटं सुखपूर्ण जीवन सोडून आपण दुस-याचे दु:ख अनुभवायला शिकले पाहिजे. अनाथ मुले दत्तक घेणे, अनाथ मुलींशी लग्न करणे, अनाथांना नोक-या देणे अशा किती तरी गोष्टी आपल्याला सहज करता येतील. पण आपण नेहमीच शॉर्टकट शोधता असतो. अनाथाश्रमात जाऊन मिठाई वाटली की धन्यता मानणारे किती तरी लोक आहेत. अशा प्रकारची दया दाखवून काय उपयोग? निराधारांना दयेपेक्षा धीराची, पैशापेक्षा प्रेमाची गरज असते हे आपण जाणून घ्यायला हवे. आपले समाजमन अधिक उदार व्हायला हवे असेल तर अनाथ, निराधार मुला-मुलींबद्दल त्यांचे संगोपन, पुनर्वसन करणाच्या संस्थांबद्दल आपण आशा दाखवायला हवी. त्यांच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. तरच कर्णाप्रमाणे पुरुषार्थी जीवन जगण्याची त्यांना संधी मिळू शकेल. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले" ही संत तुकारामांची शिकवण हा आपला आचारधर्म बनला पाहिजे. तरच ख-या अर्थाने अनाथ, निराधारांसारखे रंजले गांजलेले आपले होतील, सनाथ होतील. विनोबांनी सर्वोदयाची सांगितलेली कल्पना हीच आहे. “सर्वेपि सुखिनः सन्तु' हा आपल्या जीवनाचा आदर्श आहे. अनाथ, निराधार सुखी झाल्याशिवाय सर्वोदय होणार नाही. सर्वोदय हा नव्या जगाचा खरा सूर्योदय आहे. एकविसाव्या शतकाचे ते मागणे आहे. राष्ट्रभाषेचे महत्त्व
कोणतेही राष्ट्र घ्या. त्याला स्वत:चा राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा, राष्ट्रचिन्ह असते. त्याशिवाय ते पूर्ण राष्ट्र होऊच शकत नाही. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज या गोष्टीवर एकमत झाले, पण राष्ट्रभाषेचा प्रश्न आपण भाषा भिन्नतेमुळे सोडवू शकलो नाही. म्हणून गांधीजी नेहमी म्हणायचे, ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र राँगा है।" राष्ट्रभाषा नसल्याने माझा देश मुका राहिला आहे. देशाला बोलकं करण्यासाठी, त्याला आपल्या भाषेत बोलतं करण्यासाठी गांधीजींनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा म्हणून सुचविले, पण त्या वेळी हिंदी हवी तितकी समृद्ध झाली नव्हती म्हणून तिला संपर्क भाषेचा दर्जा देण्यात आला. ती अधिक समृद्ध व्हावी म्हणून प्रयत्न होत आहेत. पण भाषेचा विकास ही एक मानसिक प्रक्रिया आहे. आपण जोवर मनापासून तिचा स्वीकार करणार नाही, तोवर तिचा विकास केवळ अशक्यच म्हणावा लागेल.
परकीय भाषेची गुलामगिरी हे दुसरे पारतंत्र्यच असते. त्यातून आपण मुक्त व्हायला हवे. इंग्लंडच्या सीमेपासून अवघ्या तीस मैल अंतरावर असलेला फ्रान्स पहा. फ्रेंच लोक सर्रास आपली भाषा वापरतात. राष्ट्रभाषेचा इतका अभिमान आहे त्यांना की तुम्ही कोणत्याही भाषेत बोला, ते तुमच्याशी फ्रेंचमध्येच बोलतील.
हिंदी ही आपल्या विभिन्नतेने नटलेल्या देशात एकात्मता आणणारी एकमेव भाषा आहे. तिचा आपण दैनंदिन जीवनात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वापर केला पाहिजे. राष्ट्रभाषा ही सरकारी आदेशाने विकसित होणार नाही. आपण भाषिक गुलामगिरीतून मुक्त होऊन तिला आत्मसात करायला हवे. आज दूरदर्शन, आकाशवाणीसारखी प्रभावी माध्यमे राष्ट्रभाषेच्या विकासासाठी समर्पित झाली आहेत. महात्मा गांधींच्या स्वप्नातील खरा भारत जर आपणास साकार करायला असेल तर हिंदीचा प्रचार व प्रसार व्हायला हवा. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेपोटी भाषिक दास्यता जोपासण्यात काय अर्थ आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू सर्वांनी कल्पिलेला भारत राष्ट्रभाषेच्या स्वप्नपूर्तीशिवाय पूर्ण होणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. राष्ट्र हे त्या राष्ट्राच्या जनतेतील राष्ट्रभावनेवर बळकट होत असतं. अशी बळकटी येत असते राष्ट्रभाषेने. भाषा एक झाल्याशिवाय भाव एक होत नाही व राष्ट्र एक व्हायचे तर एक राष्ट्रभाषा हवी. ती समृद्ध करणे आपले कर्तव्य आहे. निष्काम कर्मयोग
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचान' हे गीतेतील वचन सर्वाच्या परिचयाचे आहे. या वचनांद्वारे गीतेने आपणास निष्काम कर्मयोगाची शिकवण दिली आहे. माणसाने आपले प्रत्येक काम हे कर्तव्य म्हणून करायला हवे. फळाची अपेक्षा न धरता कार्य करत रहाण्याच्या वृत्तीलाच निष्काम कर्मयोग म्हणतात. निष्काम कर्मयोगाबद्दल विवेचन करताना विनोबांनी आपल्या ‘‘गीता प्रवचन"मध्ये म्हटले आहे की कर्तव्य बुद्धी ही आक्रोडाचे झाड लावण्यासारखी असायला हवी. आक्रोडाचे झाड लावणारा हा कधी आपल्याला आक्रोड खायला मिळतील म्हणून झाड लावत नसतो. आक्रोडाचे झाड लावल्यानंतर फळ खायलाच मुळी पंचवीस वर्षे लागत असतात. लावणाच्याला क्वचितच फळ मिळते. पण आपले पूर्वज पहा. त्यांनी पुढच्या पिढीला अक्रोड मिळावे म्हणून ही झाडे लावली.
व्यक्तिगत वा सामाजिक जीवनात आपली भूमिका ही अशीच असायला हवी. प्रत्येक वेळी जर आपण कमीशनचाच विचार करायला लागलो तर आपले मीशन पूर्ण कसे होणार? आपल्या जीवनाचे छोटे वर्तुळ रूंद करून परिघाबाहेर आपण डोकवायला शिकले पाहिजे. मी आणि माझे घर हा संकुचित विचार सोडून देऊन त्याच पलीकडचे ऊंच जग न्हाहाळायला आपण शिकले पाहिजे. जगणे या कल्पनेत दुस-यासाठी जगणे अभिप्रेत असते ते आपण सोणीस्करपणे विसरत चाललो आहोत.
आज आपले सारे सामाजिक जीवन अरूंद होत आहे. प्रत्येक गोष्टीत मला या पासून काय मिळणार असा हिशोब लावायला लागलो तर सामाजिक कार्य रहाणारच नाही. म.फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाह महाराजांसारखी माणसे मोठी झाली ती निष्काम कर्मयोगामुळेच. महात्मा फुल्यांनी आपल्या घरचा हौद हरिजनांना खुला केला पण परिणती राष्ट्रातली सर्व जलाशये सर्वाना खुली होण्यात झाली. निष्काम कर्मयोगाचा परिणाम हा अणू विभाजनाच्या प्रक्रियेसारखा नेहमी पसरणारा आहे. आपले समाज जीवन हे अधिक उदार व व्यापक व्हावं असं जर आपणास मनस्वी वाटत असेल तर त्याची सुरवात स्वत:पासून व्हायला हवी. सदाचार स्वत:पासून सुरू व्हायला हवा. समाज जीवन निष्काम कर्मयोगानी फुलायला हवे असे जर आपणास वाटत असेल तर त्याची सुरवात स्वत:पासून नको का व्हायला? तसे झाले तर समाज जीवनास लागलेले मतलबाचे ग्रहण क्षणार्धात सुटेल व सर्वत्र मांगल्याचा प्रकाश पसरेल. गीतेत वर्णिलेल्या निष्काम कर्मयोगाची आज आपणास खरी गरज आहे. स्वार्थाने घेरलेले समाज जीवन त्याशिवाय ख-या अर्थाने मुक्त होणार नाही. गीतेतील निष्काम कर्मयोगाला समाज जीवनात पर्याय असत नाही, याची पक्की खुणगाठ आपण बांधायला हवी. विवेक व विज्ञानाची गुढी ऊंच करूया
एकविसावे शतक हे विज्ञानाचे, तसेच ते विवेकाचेही आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट माणसानी तर्क, बुद्धी व व्यवहार्यतेच्या कसोटीवर पारखून घ्यायला हवी. पूर्वी मनुष्य अडाणी होता. तो अनुभवानी शहाणा झाला. त्याच्या शहाणपणानी त्याला दोन गोष्टी शिकवल्या. त्या म्हणजे योग्य काय? नि अयोग्य काय? जे हिताचं ते योग्य, अहिताचं ते अयोग्य. माणूस चांगला व्हावा म्हणून त्याने समाजात धर्म, नीती, देव, भूत, प्रत इत्यादी कल्पनांनी निर्मिती केली. या सर्व कल्पनाच आहेत हे एकदा तुम्हाला कळालं की त्याची भीती जाते, व्यर्थपणाही लक्षात येतो.
पूर्वी पाऊस पडला नाही की माणूस देवांना पाण्यात बुडवून ठेवायचा. आज कोणी असे करत नाही. कारण पाऊस प्रार्थनेनी नाही तर निसर्ग बदलानी पडतो हे त्याला विज्ञानानी समजावले. तसेच मूल-बाळ होण्याचं. कुणा बुवा, भटजीकडे जावून, व्रत वैकल्ये करुन न होणारं मूल जन्मत नाही. मूल व्हायचे तर स्त्री पुरुष संबंध हवा. तो कृत्रिम रेतनानी पण होतो हे माणसाला कळून चुकलं. मांजर आडवे गेले म्हणून शकून अपशकून मानणारा काळ मागे पडला. ८0 किलो मिटरच्या गतीत मला रोज मरणारी (आडवी जाणारी!) मांजरे दिसतात. पूर्वी अशी ती मरत नसेत. मांजर मेले म्हणून प्रायश्चित घ्यायला काशीला जायचा काळ संपला.
असे भरपूर छोटे छोटे बदल होऊन जीवनातील अंधश्रद्धा कमी झाल्या, मोडीत निघाल्या हे जरी खरे असले तरी काही नव्या अंधश्रद्धा मतलबी लोग नव्याने रूजवू पहात आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे आनंदी वस्तू. तुळस इथं लावा, माठ इथं ठेवा, प्रवेश करा म्हणून सांगणारे नवे अंधश्रद्धा प्रचारक होत. त्यांच्या भूलथापांना, बळी पडता नये. अंगात येणे, देव धुपारे करणे, भानामती हे सर्रास दिसून येणारे प्रसंग केवळ अज्ञान व अकारण भयातून निर्माण होतात. बुध्दीच्या कसोटीवर अनुभवजन्य नाही ते नाकारणे म्हणजे विवेकाचं, विज्ञानाचे जीवन जगणे. कोणताही खरा देव वा धर्म शिकवत नाही. विषमता निर्माण करत नाही हे लक्षात आले की स्त्रीला मशिदीत असो वा मंदिराच्या गाभा-यात असो प्रवेश नसणं म्हणजे स्त्रीचं ‘माणूसपण' नाकारणं हे कळायला वेळ लागत नाही.
खरेदीला पाडवा, अक्षयतृतीया, गुरूपुष्पामृत योग कशाला हवा? पैसे असली, गरज असली की खरेदी करायची. खडे लाभतात, बाधतात हे तर शुद्ध थोतांड आहे. ज्योतिष ही त्यातलीच गोष्ट. परवा मी एक बातमी वाचली. सर्व पंचागकर्त एकत्र येऊन त्यांनी मुहूर्त, तिथितील विसंगती दूर करून एकच तिथि, सण, मुहर्त करायचा निर्णय घेतला. यात विज्ञानाकडे जाण्याचा कल आहे. कालचक्र शास्त्र आहे. ते अक्षांश, रेखांश, पृथ्वी परिक्रमा, चंद्रोदय, सूर्यास्त या वैज्ञानिक तथ्यावर ते आधारित असायला पाहिजे. विसंगती म्हणजे शंकेस वाव हे विज्ञान सत्य त्यांना गवसले. चोरी झाली की पूर्वी लोक ब्राह्मणाकडे जात. तो दिशा सूचवायचा. संकेत द्यायचा. आता लोक पोलिसात जातात. पोलीस श्वानपथक घेऊन येते. स्पर्शाचा वास, ठसे, डी.एन.ए. यातून शोधशास्त्र विकसित झालं व ज्योतिषशास्त्र मागे पडलं.
या जगात इष्ट घडले ते सदाचारानी, अनिष्ट जन्मत ते दुराचारानी. हे आजच्या काळात शिकलेल्या माणसाला कळू लागलं आहे. तरी देवळातली गर्दी कमी होत नाही? मशिद, चर्च अजूनही आपल्या समाजात मूळ धरून आहे याचं कारण जीवनातले सर्व व्यवहार का? कसे? या विवेक बुद्धी व तर्क निकषांवर आपण पारखून पहात नाही म्हणून. मानसिक दुर्बलता माणसास बयाचदा अगतिक करते. अगतिकता अंधश्रद्धेस जन्म देते. म्हणून माणसानी रोजचे व्यवहार विवेक, विज्ञान, बुद्धी, तर्क, व्यवहार्यता इत्यादी कसोट्यांवर करायची जीवन शैली विकसित केली पाहिजे. हा विचार हिच नव्या विचाराची गुढी होय. झोका ऊंचच का? गुढी ऊंचच का? कारण ते आपल्या उन्नती व उत्कर्षाचे परमबिंदू होत. नव विचार हा देखील विकासाचा परमबिंदू होय. तो विज्ञान व विवेकानीच गाढता येतो. सर्व अंधश्रद्धांचे निर्मूलन म्हणजेच निर्मल समाज निर्मिती होय. प्रार्थना
प्रार्थना ही नैमित्तिक क्रिया होय. ती नियमित करू लागलात की तिला कर्मकांडाचं रूप येतं. मग धार्मिक कर्मकाण्ड नि प्रार्थनेत माझ्या लेखी फरक उरत नाही. प्रार्थना मुळात दुर्बलतेचा उद्गार होय. तिचा जन्म व्यक्तिगत असहाय्यतेतून होतो. तिच्या विकासाची अंतिम परिणती सामुदायिक कल्याण भावना होय. प्रार्थना स्वसंवाद आहे. तिचे प्रकटीकरण सामुदायिक अथवा व्यक्तिगत प्रदर्शनाचा भाग होय. प्रार्थना व्यापक असायला हवी. ती अंतर्मुख करणारी स्वहिताय, तद्वतच परहिताय प्रक्रिया होय. असं झालं तरच ती उपयुक्त क्रिया ठरेल. प्रार्थना अशक्त, पराधीन स्थितीत शोधलेला आंतरिक, मानसिक आधार होय.
प्रार्थना आधारासाठी करायची. तिच्यामुळे जगण्याचं बळ येतं. मनाचं दौर्बल्य दूर करण्याची तिच्यात शक्ती असते. प्रार्थना खरं तर स्वत:तील आधार शक्तीचा जगण्याच्या, चांगलं जगण्याच्या ऊर्मीतून घेतलेला स्वबळाचा संचय नि शोध होय. प्रार्थनेतून बाह्य बळ मिळतं यावर माझा विश्वास नाही. असा विश्वास ठेवणे म्हणजे एकापरीने भूत, प्रेत, परमेश्वर, दैवसारख्या भ्रामक तत्त्वांवर विश्वास ठेवणेच होय.
अंतर्मनातील ऊर्मीच्या शोधाची प्रार्थना गद्यमय असते. पद्यमय प्रार्थना म्हणजे अंतर्मनातील रंजक रूप. प्रार्थना दुर्बल सबलाकडे करतो. निरपेक्ष प्रार्थनाही कवी कल्पना आहे. प्रार्थनेस जात, धर्म, पंथ यांचा संबंध जोडणे थोतांड होय. प्रार्थनेचा नि धर्माचा संबंध असतच नाही मुळी. मुळात धर्म ही आचार कल्पना होय. प्रार्थना हा विचार आहे. धर्म प्रार्थनेचं प्रकट रूप होय. निधर्मात प्रार्थना असतच नाही मुळी. निधर्मिता हीच व्यापक विश्वधर्म रूप मानव कल्याणाची अंतिम परिणती होय. ती तशी असायला हवी. धर्म हा आचार मानला तर त्यांच्या मुळाशी विचाराची प्रेरणा, प्रार्थना, प्रक्रिया असावी लागते. आचारधर्माचे निर्धारण, संवर्धन हे विचारातून होते.
प्रार्थना दुर्बलतेतून निर्माण होणारी सबलतेच्या आकांक्षेची कृती उत्सुक साधना होय. तिला साधना म्हणण्यापेक्षा इच्छा म्हणणे अधिक सयुक्तिक व्हावे.साधनेत एक प्रकारचे कर्मकांड, नियमितता, सातत्य अपेक्षित असते.
प्रार्थना अंतर्मन संवाद असल्याने विचार, चिंतन, मनन यापलीकडे कोणताच कर्म उपचार अभिप्रेत नाही. कोणताही कर्मोपचार कर्मकांडच मानायला हवा. प्रार्थनेस वेळेच्या निश्चिततेची गरज नसते. प्रार्थना विशिष्ट मन:स्थितीची प्रतिविक्षिप्त क्रिया असल्याने व मन:स्थितीची विशिष्ट वेळ, पूर्वकल्पना नसल्याने प्रार्थनेची विशिष्ट वेळ, पूर्वकल्पना नसल्याने प्रार्थनेची विशिष्ट वेळ निश्चित करणे म्हणजे तिला कर्मकांड बनवणे होय. आसन, उपचार, प्रतिमा पूजन, उदबत्त्या, धूप घालणे, ताल, चाल, संगीत, प्रकाश योजना हे सारे बाह्य उपचार होत. प्रार्थना एकांतात साधलेला मौन स्वसंवाद होय. बाह्योपचार अशा संवादास अनुकूल वातावरण निर्माण करतात, पण त्यांचा प्रभाव बाह्य असल्याने तो कृत्रिमच शिवाय प्रासंगिकही राहतो.
सामुदायिक प्रार्थना हा सामुदायिक असाह्यता, दुर्बलतेचा सामुदायिक आविष्कार होय. आविष्कार हा अभिनयच. अनुभूती नि अभिव्यक्तीत जे अंतर असते तेच मन:स्थितीच्या प्रकटीकरणात, व्यक्तिगत प्रार्थना स्वत:साठी असू शकते. तशी समुदाय, समाज, देश, जग इत्यादीसाठीही. सामुदायिक प्रार्थना व्यक्तीसाठीही असू शकते.
प्रकट प्रार्थना हे कर्मकांडच. तो विकास प्रक्रियेचा आवश्यक घटक कसा होऊ शकेल? झाला तरी परिणाम प्रासंगिक असेल. गोध्रातील दंगली शमल्या म्हणून सामुदायिक प्रार्थना केली तर गोध्रातील दंगल शमेलही पण परत जातीय दंगल उसळणार नाही याची शाश्वती देता येत नाही. उत्स्फूर्त प्रार्थनेतून परिवर्तन शक्य. मात्र तो अंतर्मनाचा उद्गार हवा.
स्फूर्तिगीते, सामुदायिक प्रेरणागीते ही प्रार्थनेचीच भावंडे होत. ती वातावरण निर्माण करू शकतील, परिवर्तन नाही. त्यांचा उद्देश वातावरण निर्मिती हाच असतो.
त्यांच्या सातत्यातून मनोभूमिका निर्माण होण्यास साहाय्य होते खरे, पण तो बाह्योपचारच असतो, हे विसरून चालायचे नाही. म्हणून परिवर्तनोत्सुक सारे प्रयत्न अंतर्मन घडणीवर केंद्रित हवे. प्रार्थनेच्या अपेक्षित परिणामांसाठी निवड, चाल, वाद्यमेळ इत्यादीपेक्षा मनोभूमिका, अंतर्मनाचा निश्चय महत्त्वाचा. जीवनविषयांशी प्रार्थनेला जोडून तिचा उद्देश विधायक बनवता येतो. कृती रचनात्मक, सर्जनात्मक बनणे महत्त्वाचे.
प्रार्थना अर्थ समजून म्हणत राहण्याने मनोभूमिका बनण्यास मदत होते. प्रकट प्रार्थनेचा उपयोग तेवढाच. पण त्यातही हळूहळू कर्मकांड येते व परिणामशून्यता येते. जाणीव करून देणे इतपत प्रार्थना कार्य करू शकेल, पण प्रार्थनेचं समर्थन कर्मकांडाचंच समर्थन होय, हे विसरून चालणार नाही.
कुटुंबात दैनंदिन जीवनात प्रार्थना स्वीकारणे म्हणजे चोर मार्गाने देवपूजा मानणेच होय. प्रार्थना स्वीकारली की आरत्या, स्तुती, भक्तिगीते कशी वेगळी ठरतात? या साच्यामागे कर्मकांडी मानसिकताच मग काम करू लागेल. पूजा पाठ, प्रार्थना नियमित करणारे नियमित भ्रष्टाचार करत राहतातच हे आपण पाहतो. अंतर्व्यवहार, अंतर्विचार बदलणे म्हणजे वर्तन परिवर्तन, त्यावर भर हवा. उपचारापेक्षा रचना बदलावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.
संस्कारशील वयात घडण होत असताना प्रार्थना, नमाज, पठण या क्रिया विशेष प्रकारची मनोभूमिका तयार करतात. पण त्याचा सर्वांवर समान परिणाम थोडाच होतो. शाळेत समान संस्कार ग्रहण करणारे विद्यार्थी मग भिन्न व्यवहारी का होतात? वृत्ती विकास म्हणजे शिक्षण. प्रार्थना हे त्याचं साधन होऊ शकेल, पण बाह्य नि प्रासंगिक. चिरंजीवी साध्य वृत्ती विकासच हवं. पूर्व प्राथमिक ते बारावी हे संस्कार वय. त्यात मर्यादित रूपात परिणाम शक्य. वृध्दवस्थेत परत प्रार्थनानुगामी माणसं मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यात उपरती भाव असतो. तो साक्षात्कार नसतो साक्षात्कार, बोध या प्रक्रिया खप्या. त्या स्वशोधातून येतात. स्वशोधाचे शिक्षण प्रशिक्षण, मन्वन्तर घडवून आणायला हवे. प्रार्थना कोणती, कुठे, कशी म्हटली जाते याला फार कमी महत्त्व असतं अशी माझी धारणा.
प्रार्थनांचा अर्थ उलडून सांगायला हवा. तो सांगण्यावर भर दिला जात नाही. कारण आपलं शिक्षण हे साधन केंद्रित झालय. शिक्षणातील साध्य आपण हरवलंय हे मान्य करायला हवं.
प्रार्थना ही गद्यमय असते तशी पद्यमय. तिचं खरं रूप गद्यमय असतं. तिचा आशय अध्यापन, अवांतर अध्ययन यांच्याशी जोडला जातोय असे नाही. गेला तर त्याचं महत्त्व संदर्भाचं राहतं. संदर्भ परीक्षा, स्पर्धा, समारंभ, मेळावे, संमेलने सर्वांतच उपयुक्त असतात. प्रार्थनेचा सुनियोजित वापर धर्म, शिक्षण, प्रसारकार्य, राष्ट्र उभारणी, चळवळ, विचार प्रचार, पंथ प्रसार इत्यादीमध्ये सर्रास केला गेला आहे. संत, महात्मे, नेते यांनीही आपल्या उद्देश प्राप्तीसाठी प्रार्थनेचा उपयोग केला नि काही अंशी तो झालाही. अगदी राजकारणातही त्याचा उपयोग झाल्याचे दिसून येते. पण ते श्रेय प्रार्थना शक्तीपेक्षा लोकात असलेल्या पारंपरिक श्रद्धा नि प्रार्थना शक्तीपेक्षा लोकांत असलेल्या पारंपरिक श्रद्धा नि आचरणास द्यावे लागेल. झुडीचं मानसशास्त्र अशा कर्मकांड्चा सर्रास वापर करतं व ईप्सित साध्य करतं. प्रार्थनेचा असा वापर लांब पल्ल्याच्या षड्यंत्राचाच भाग असतो. प्रार्थनेच्या सुनियोजित वापराच्या तंत्रांनी सारे धर्मग्रंथ भरले आहेत. त्याचा सुनियोजित वापर सर्व काळात संत, नेते, महात्मे, बाबा, भगवान म्हणविणाच्या सर्वानी केला आहे. वापरात महात्मा गांधी, आचार्य विनोबांनी जी दृष्टी व तंत्र वापरले तेच भगवान रजनीशांनी. एकाला बरोबर नि दुस-याला चूक म्हणणे तुमच्या सापेक्षी नि साक्षेपी विचारांवरच ठरते ना? खलिल जिब्राननी प्रॉफेटमध्ये, महात्मा गांधींनी आपल्या सायंप्रार्थनेतून, विनोबांनी गीता प्रवचनातून, भगवान रजनीशांनी आपल्या समग्र लेखनातून ते अनेकदा स्पष्ट केलंय. ही सारी बाबागिरीच होय.
वरील विवेचन व विश्लेषण हेच प्रार्थनेबद्दल माझं मत नि अनुभव. माझ्याकडे ‘तुकाराम गाथा’, ‘नामदेव गाथा', 'ज्ञानेश्वर', 'दासबोध', 'बायबल', ‘कुराण', 'कबीरबानी’, ‘गुरूग्रंथ साहब', 'रामचरितमानस', 'सूरसागर', मीरा पदावली', 'भ्रमरगीत सार’, ‘विनय पत्रिका', 'प्रार्थना समाजाचा', ‘भजन संग्रह', ‘प्रॉफेट' आहे. हे सारे प्रार्थना संग्रहच नाहीत का? ते माझ्या संग्रहासाठी आहेत. तुम्हास संदर्भासाठी जरूर देता येतील.
‘ब्लू साँग्ज'बद्दल मला काही माहीत नाही. त्यांचे वाचनही नाही. संग्रह तर नाहीच. आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे महत्त्व जाणतो इतकेच.
मी ज्या संस्थेत कार्य केले तिथे ते कर्मकांड, संस्कार, शिक्षण साधन म्हणून वापरले जायचे. त्याचा उपयोग अंतर्मुख वृत्ती असलेल्यांच्या बाबतीत दिसून आला. अन्यथा ही ती मंडळी विवेक विकासानंतर सन्मार्गी, सदाचारी झाली असती असे वाटते. अपराध्यात उपरती जन्मते ती प्रार्थनेपेक्षा पश्चात्तापाने अंतर्विकास, आत्मभान असतो. प्रार्थना तशीच हवी.
• मुलाखतकार : श्रीपाद कहाळेकर, कार्यक्रम अधिकारी,
आकाशवाणी केंद्र, कोल्हापूर
निवेदन
व्यक्तीच्या आदर्श संकल्पना पुढच्या पिढीपर्यंत जाव्यात या दृष्टीने स्मृती संग्रहालय ही संकल्पना सातत्याने जोपासणारे आणि त्याच बरोबर मोठमोठ्या साहित्यिकांच्या बाबतीमध्ये ही संग्रहालये, लोकांना कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतील यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करणारे आपले कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे आज आपल्याबरोबर आहेत. स्मृती संग्रहालयाची संकल्पना नेमकी कशी आली, त्यामागची नेमकी कारणे काय होती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, त्यांच्याशी बातचीत करूया.
संबोधन - सर नमस्कार!
प्रतिसाद- नमस्कार !
प्रश्न - मला एक सांगा की मुळात माणसे स्मृतीमधून दूर जातात. काही काळ लोटल्यानंतर असे म्हणतात. पण हा काळ दूर लोटू नये म्हणून प्रयत्नशील आहात. सातत्याने ही माणसं पुढच्या पिढीपुढे उभी रहावीत म्हणून तुम्ही प्रयत्न करता आहात. याच्या मागची कारणे काय आहेत ?
उत्तर - एक मला असे दिसते की, माणसाचे मन जसे चंचल असते, तसा काळ हाही चंचल असतो. आपण नेहमी म्हणतो की काळ कुणासाठी थांबत नाही. काळ कुणासाठी थांबत नाही हे खरे आहे पण काळ आपल्याबरोबर काळ पण घेऊन जात असतो. माणूस आणि निसर्गात जर मूलभूत स्वरूपाचा फरक कोणता असेल तर तो हाच आहे की निसर्गात रोज बदल होतात, निसर्ग स्वतः काही जपत नाही. माणसात रोज बदल होतात पण माणसाला जतन, वारसा, संस्कृती, संस्कार, जाणीव अशी काही कौशल्ये व घटक माणसास लाभले आहेत, त्यामुळे मनुष्य निसर्गापेक्षा सतत वेगळा ठरत आला आहे. माणसाच्या अश्मयुगीन कालखंडापासून ते आजपर्यंत आपण पहायला गेलो तर माणसामध्ये आणि माणसाने निर्माण केलेल्या समाजामध्ये केवढे बदल झाले? माणसातला एक साधा बदल की चार पायावर चालणारा मनुष्य दोन पायावर चालू लागला. यामध्ये हजारो वर्षांचा स्थित्यंतराचा इतिहास सामावलेला आहे. आज आपल्याकडे व्हिडिओ शुटिंगची जी व्यवस्था आहे, ती त्याकाळात नव्हती. माणूस हळूहळू उभारला की एकदम ताठ झाला हे शुटिंग झाले असते तर कळाले असते की तो कसा उभारला. आज स्थिती अशी आहे की एकीकडे आपल्याकडे साधनांची सद्दी आहे, समृद्धी आहे पण साधनांचा द्रष्टा वापर आपण करत नाही. म्हणजे मी एक साधी गोष्ट सांगतो की रोजचे वृत्तपत्र. असे सांगितले जाते की रोजचे वर्तमानपत्र म्हणजे कालचा इतिहास असतो. आता काल आणि आजमध्ये चोवीस तासाचे अंतर असते. प्रत्येक चोवीस तासात नवनव्या घटना घडत असतात म्हणून तर रोज नवे वर्तमानपत्र आपणास वाचावयास मिळत असते. घटनाच घडल्या नसत्या तर रोज वर्तमानपत्रात छापायचे काय असा प्रश्न निर्माण झाला असता. असे रोज घडणारे ते सर्व वर्तमानपत्राच्या रूपाने आपल्या घरी येते - एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत येते आणि ३१ तारखेला आपण हा सारा इतिहास रद्दीत घालतो.
माणसाला सुशिक्षित कसे म्हणायचे? माणसाला सुसंस्कृत कसे म्हणायचे? याच्या मी ठरवलेल्या काही गोष्टी आहेत. मी ‘शिक्षित’ आणि ‘सुशिक्षित यामध्ये आणखी एक वर्गाचे वर्गीकरण केले आहे. तो वर्ग आहे ‘स्वशिक्षित'. तीन प्रकारची माणसे असतात. शिक्षित असतात, ती नुसती मिळवायला शिकतात. सुशिक्षित असतात, ते फक्त स्वतःकडे बघतात. स्वशिक्षित। असतात, ते स्वतःपलिकडे बघतात. ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या पलिकडे पाहिलंय - मग ते साहित्यिक असोत, ते समाजसुधारक असोत, ते राजकारणी असू देत, ते वैज्ञानिक असू देत, समाजशास्त्रज्ञ असू देत. इतिहासकार असू देत - त्यांनी स्वतःच्या पलीकडे पाहिले म्हणून आज आपल्याला एक विस्तारित नि विकसित जग दिसते. विकासाच्या पाऊलखुणा काळाबरोबर नामशेष होत असतात. मी साध्या गोष्टी तुम्हाला सांगीन. आपण केव्हातरी आपल्या स्वतःच्या घरी पाटावर बसायचो आणि आता डायनिंग टेबलावर जेवतो. पाट ते डायनिंग टेबल या विकासातल्या पाऊलखुणा आज आपल्या घरी आपण जपल्यात का? म्हणजे आज घरात पाटपण नसतो. पूजेसाठी शेजारच्या घरातून तो आणायला लागतो. अशी आपल्या घरची स्थिती आहे. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्या खिशाला असलेले पेन. पेन एकेकाळी सगळ्यात विकसित असे साधन होते. ते आता आऊटडेटेड साधन झालंय. आता तुमच्या खिशात पेनड्राईव्ह असावा लागतो. ही जी विकासाची बदलती परिमाणे आहेत ती ज्या समाजामध्ये जतन केली जातात, जोपासली जातात तो समाज स्वशिक्षित, सुसंस्कृत, प्रगल्भ मानला जातो.
प्रश्न - सर, विचार करत असताना सर्वसाधारण व्यक्तीचा असा समज आहे की पूर्वी साहित्य नव्हते, लेखनाची साधने नव्हती, शैली नव्हती, मौखिक पद्धतीने आपण ज्ञानाचे संक्रमण एका पिढीकडून दुस-या पिढीकडे करत असायचो. पण आता ही सगळी साधने उपलब्ध झाली आहेत. पण या सर्व साधनांचा संग्रह नि विस्तार आपल्या घरामध्ये करत बसलो तर यासाठी आपणास कित्येक घरे लागतील नाही का?
उत्तर - विस्ताराची गोष्ट अशी सांगेन की आता तर ज्या एकविसाव्या शतकात आपण जगत आहोत तिथे खरे म्हणजे १x१ मिलीमीटरमध्ये सगळे जग सामावून घ्यायची कला आपण आत्मसात केली आहे. विस्तार भयापोटी आपण पुरातन वस्तू जपत नाही हे खोटे आहे. खरे हे आहे की आपणात जतनाची जाणीव नाही. एक साधा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो. तुमच्या जीवनातल्या किती गोष्टी तुम्ही जपल्यात? तुमचे वय पन्नास वर्षे आहे असा माझा अंदाज आहे. गेल्या पन्नास वर्षातल्या व्यक्तिगत जीवनातल्या पाऊलखुणा तुम्ही जपल्या आहेत का? गतायुष्य जपलं आहे का?
प्रश्न - गतायुष्य न जपण्यामागे माझे अज्ञान आहे की दुर्लक्ष ?
उत्तर - खरं उत्तर द्यायचे तर मी सांगेन की जाणीवांचा अभाव जतन साक्षरता ही एक जाणीव आहे आणि ती माणसाने सहेतुक जोपासायला हवी. साधी गोष्ट आहे की माझे हस्ताक्षर. मला आठवते की मी शिक्षक झालो नि विद्याथ्र्यांच्या गृहपाठाच्या विद्याथ्र्यांचे हस्ताक्षर सुवाच्च नव्हते. कुत्र्या-मांजराचे पाय असे त्या विद्याथ्र्यांचे हस्ताक्षर होतं. मला खाली शेरा लिहायचा होता की ‘हस्ताक्षर सुवाच्च असावे'. माझं हस्ताक्षर तो शेरा लिहिण्याइतकं सुवाच्च नव्हतं. मी त्या दिवशी तो शेरा लिहिला नाही. महिन्यानंतर लिहिला. दरम्यानच्या काळात मी माझे हस्ताक्षर सुधारले. त्या विद्यार्थ्याच्या वहीवर तो शेरा लिहिण्याच्या जाणीवेने मी जसे माझं हस्ताक्षर सुधारले. मी असं पाहतो की माझ्या जुन्या हस्ताक्षरांचे कोणते नमुने आहेत? तर माझ्याकडे असलेले सर्वांत जुने हस्ताक्षर आठवी इयत्तेतलं आहे. माझ्या प्रगतीपुस्तकातील मार्क उतरून काढलेला एक कागद माझ्या संग्रही आहे. तो माझा सर्वात जुना जतन केलेला कागद. सोळाव्या वर्षी मला जतन करायची जाणीव झाली. पण सोळा वर्षांपूर्वीचा इतिहास, नोंदी, पुरावे माझ्या संग्रही नाहीत. असे प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाकडे पहायला लागला तर इतिहास जपला जाईल. अलीकडच्या काळात एक गोष्ट चांगली झाली की नवी सुशिक्षित पिढी आहे. ती आपल्या मुलांचे अंतर सारं जपू लागली आहे. म्हणजे आता शाळेतून प्रगती-पुस्तक, ग्रुप फोटो, त्याची ई कॉपी मिळते. त्यामुळे जतन सुरू झाले पण ते व्यक्तिगत पातळीवरच. सामाजिक पातळीवर जतनाचा संस्कार आपणाकडे नाही. त्यामुळे आपण कितीही गोष्टी गमावत, हरवत आहोत.
प्रश्न - सर, एकीकडे सामाजिक जाणीवेचा अभाव म्हणू या याला. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खूप मोठ्या संख्येनं माणसांची ये-जा होती. या गोष्टी कदाचित याला कारणीभूत असाव्यात. पण समाजाच्या दृष्टीने यामुळे मोठे नुकसान झाले असेल ना?
उत्तर - झाले म्हणजे झालेच. मी ज्या व्यक्तींची वस्तुसंग्रहालये उभारली त्या लोकांच्या साध्या साध्या गोष्टी माझ्या हाती आल्या नाहीत. नाशिकच्या मुक्त विद्यापीठात मी यशवंतराव चव्हाण साहेबांचे वस्तुसंग्रहालय उभे केले. मला त्यांचा मृत्यू दाखला नाही मिळू शकला. अशा गोष्टी जपायची साक्षरता आपण समाजात विकसित केली पाहिजे. हा खरे म्हणजे आपल्या लोकशिक्षणाचा आणि जे औपचारिक शिक्षण घेतो त्याचा अविभाज्य भाग आहे, असायलाही हवा. मला नेहमी असं दिसतं की कोणत्या देशांमध्ये असे जतन होते. मला आठवतो तो एक प्रसंग. मी फ्रान्स-जर्मनी महामार्गावरून प्रवास करत होतो. युरोपातील महामार्ग नाकासारखे सरळ असतात. मला एका ठिकाणी मात्र वळण दिसलं. या दोन देशांदरम्यानच्या हायवेवर. मी जिज्ञासेने पाहिलं की वळण कशासाठी होतं? तर माझ्या असं लक्षात आले की ह्या हायवेवर प्राचीन ग्रीक संस्कृतीतलं पाणी पुरवठा केंद्र होतं. विहिरीतले पाणी गुरुत्वाकर्षणानी त्या ठिकाणच्या शहराला पुरवलं जायचं. आपल्या कोल्हापूरला पण अशाच पद्धतीनी - सायफन, गुरुत्वाकर्षणानी कळंबा तलावाचे पाणी पुरवले जायचे. कमानी होत्या. त्यावरून पाटानी पाणी खजिन्यात यायचे. आजही त्या कमानी आहेत. तशा तिथेही कमानी होत्या. ती पाणी पुरवठ्याची योजना जपायची. म्हणून रस्ता वळवला होता. एक वळण देऊन, नियमाला अपवाद करून त्यांनी वारसा जपला.
प्रश्न - आठवण जपण्यासाठी वळण घेतले तर...
उत्तर - त्यांनी प्राचीन पाणी पुरवठा योजनेचे जतन केले. आज हायड्रॉलिक पद्धतीनी पाणी पुरवठा केला जातो. आपणाला आज जर पाणी पुरवठ्याचा इतिहास लिहायचा झाला तर ती योजना कामी येते.
प्रश्न - आठवण म्हणून त्यांनी ती योजना जपली का?
उत्तर - नुसती आठवण नाही. इतिहास जपला. पाणी पुरवठ्याचा इतिहास सुरू होतो गुरुत्वाकर्षणापासून. एका छोट्या गोष्टीचा आपण इतिहास जपण्याची साक्षरता आपण जेव्हा आपल्या मनामध्ये जपतो, तेव्हाच ख-या अर्थाने जतन साक्षरता समाजात रुजते.
प्रश्न - सर, आपण प्रक्रियेचा जेव्हा विचार करतो - तो अगदी शालेय जीवनापासून ... तुम्ही असं यापूर्वी तीन गटातली वर्गवारी सांगितली. शिक्षित, सुशिक्षित नि स्वशिक्षित - ज्यांनी दुस-यांसाठी काही केले, स्वतःची चौकट सोडून... मला सांगा ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हटलं जातं... शालेय स्तरावर एखाद्या मुला-विद्याथ्र्यात वेगळेपण आहे, याची जाणीव फक्त त्याच्या शिक्षकाला नि पालकांना होऊ शकते. ही जाणीव जतन करण्यासाठी प्रयत्न होताना, करताना नेमके काय करणे अपेक्षित असते?
उत्तर - मला असं वाटते की आई-वडिलांनी जन्मापासून मुलांच्या छोट्या छोट्या वस्तू जपल्या पाहिजेत. मी माझे एक छोटे उदाहरण सांगतो. माझ्या मुलाचा पहिला दात पडला. तो त्याने माझ्याकडे आणून दिला. मी एका छोट्या डबीत तो जपून ठेवला आहे. तुम्ही म्हणाल की तो काय महंमद पैगंबर होणार आहे का? त्यांचा केस जपून ठेवलाय, तसा तुम्ही तुमच्या मुलाचा दात जपून ठेवलाय. प्रश्न दात नि केसाचा नाही. प्रश्न आहे माणसाच्या विकासाचा. विकास जपणे ही प्रक्रिया प्रत्येक पातळीवर, अवस्थेत जपण्याची गोष्ट आहे. मी साधे साधे प्रश्न लोकांना विचारतो की तुमचा पहिला फोटो तुमच्याकडे आहे का? तुमचं पहिले हस्ताक्षर आहे का? तुमचे पहिले झबले आहे का? तुम्ही ओढलेल्या पहिल्या सिगरेटचे थोट्रक जपले आहे का? तुम्ही लिहिले पहिलं पत्र तुम्हाला आठवते का? माणसाच्या जीवनात पहिल्या गोष्टींचे असाधारण महत्त्व असते. ज्याला आपण माणसाचं कॅटलाइटिक इव्होल्युशन (Catalytic Evolution) म्हणतो... एक काहीतरी निमित्त होतं नि माणसाच्या जीनात उत्क्रांती होते... भूक लागते नि मग भूकेचं महत्त्व कळते. मग स्वतःचं पोट भरलं तरी दुस-याच्या भुकेचा विचार करू लागतो. कारण त्याला भुकेचे महत्त्व उमगलेलं असते, जाणीव झालेली असते. तसे समाजातील छोट्या छोट्या विकासाच्या पाऊलखुणा आपण जपत गेल्या पाहिजेत. म्हणजे एक साधी गोष्ट आपण पहातो की एकेकाळी धुळपाटी होती. आता आजच्या पिढीला धुळपाटी असा शब्द सांगितला तर ते एवढा मोठा आऽऽ वासतील की विचारायची सोय नाही. या धुळपाटीचं वर्णन एस्. एम्. जोशींची आत्मकथा ‘मी एस्. एम्.' मध्ये आहे. 'मला कोकणात असताना धुळपाटीवर बसवलं त्यात त्यांनी धुळपाटीचे वर्णन केलेय. काय वर्णन आहे? तर एक पेटी असायची. त्या पेटीत वाळू किंवा माती भरलेली असायची. मुलांना त्या वाळू वा मातीवर अक्षरं गिरवायला शिकवले जायचे. अक्षरं गिरवून झाली की ती वाळू, माती सपाट/प्लेन केली जायची. परत बोटांनी अक्षरं त्यावर गिरवायची. ही माणसाच्या लेखन विकासाची पहिली पायरी होय. ती गेली नि स्लेट पाटी आली. म्हणजे दगडी पाटी, पेन्सिलनी आपण स्लेटवर लिह, गिरवू लागलो. पेन्सिल गेली. आता डॉट आले. डॉट गेले. आता डिजिटल स्लेट आली. स्लेट ते डिजिटल पाटी असा लेखन विकास आपण जपायचा की नाही? धुळपाटी ते डिजिटल बोर्ड/स्लेट आपण जपलं पाहिजे.
प्रश्न - सर, तुम्ही हे स्वतः केले आणि समाजानंही ते करावे अशी तुमची अपेक्षा आहे. मला वाटतं ९९% लोकांचं आपल्या वरील प्रश्नांची उत्तरे नाही अशीच असतील. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाही, त्या वस्तूही आमच्या संग्रही नाहीत.
उत्तर - त्याचं कारण आपल्या शिक्षणानी या गोष्टी आपणास शिकवलेल्या नाहीत. आपण इतिहास शिकलो पण इतिहास म्हणजे काय ते नाही शिकलो. खरं इतिहास म्हणजे जतन अशी मी त्याची व्याख्या करत आलो आहे. लोक विचारतील की तुम्ही म्हणता तसे सर्व जपायचं म्हटले तर विकास कसा होणार? तर रिप्लिका करता येतात, रूपांतर करून वस्तू जपता येतात. जुन्या वस्तुंची नवी मांडणी करता येते. म्हणजे पाटाचा डायनिंग टेबल आला. पण पाट जपला तर विकासाच्या पाऊलखुणा उमजणार. प्रश्न - तर एकीकडे या सर्व गोष्टी जतन करण्यासाठी पहिले क्षेत्र म्हणून साहित्य निवडलं. वि. स. खांडेकरांपासून त्याची सुरुवात झाली. मला असे सांगा की पहिल्यापासून यात कोणत्या अडचणी आल्या, जाणवल्या?
उत्तर - वि. स. खांडेकरांचे म्युझियम आम्ही करायला घेतले आणि असे लक्षात आलं की ज्या वस्तू मिळणं आम्हाला अपेक्षित होतं त्या वस्तू उपलब्ध असून काही अपरिहार्य कारणामुळे मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे आमचे पहिले म्युझियम प्रतिकृतींचे झाले. नंतर आम्हास मूळ वस्तू मिळाल्या. प्रतिकृती तयार करणे हीपण एक मोठी गोष्ट असते. नाशिकच्या मुक्त विद्यापीठात आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचे म्युझियम केले. तिथे यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या जन्मगावचं जन्मघर - त्याची प्रतिकृती आम्ही उभारली आहे. देवराष्ट्र गाव नाशकात उभारणं शक्य नाही पण त्याचा आभास निर्माण करता येतो. वस्तुसंग्रहालये गतकाळास सजीव करण्याचा प्रयत्न करत असतात. गतकाळ पकडणे म्हणजे वस्तुसंग्रहालय निर्मिणे असे आम्ही मानतो. तो पकडत असताना प्रेक्षकांना त्या काळात कसे नेता येईल हे आम्ही पहात असतो. गतकाळातील वस्तू, पोषाख, छायाचित्रे, कागदपत्रे, इत्यादीद्वारे आपण काळ जिवंत करतो. यशवंतराव चव्हाण यांनी आपली लग्नपत्रिका सन १९४१ मध्ये छापली होती. पूर्वीच्या सर्व लग्नपत्रिका काढून पहा. त्यावर लिहिलेले असते... बिरोबा प्रसन्न, महालक्ष्मी प्रसन्न असे काहीबाही लिहिलेले असते. यशवंतराव चव्हाण यांच्या लग्नपत्रिकेवर त्याजागी 'वंदे मातरम्' छापलेलं आहे, आता हा संस्कार आहे की नाही? एक अठरा-वीस वर्षांचा तरुण बेचाळीसच्या लढ्यामध्ये आपल्या लग्नपत्रिकेवर 'वंदे मातरम् लिहितो. स्वातंत्र्याची इतकी वर्षे उलटल्यानंतरही आपण 'वंदे मातरम्' वर ज्या प्रकारची चर्चा करतो, ती यशवंतराव चव्हाण यांनी ज्या राष्ट्रीय भावनेने 'वंदे मातरम्' छापले होते, त्या भावनेची चर्चा नाहीये 'वंदे मातरम्'ची चर्चा देशप्रेमाशी संबंधित आहे, तिथे त्या भावनेशी ती जोडायला हवी. अभिनिवेशापोटी। कुणाला कनिष्ठ, कुणाला वरिष्ठ, कुणाला देशप्रेमी, कुणाला देशद्रोही ठरवणं अयोग्य. जतनशास्त्र आपणास राष्ट्रप्रेमाकडे घेऊन जातं. हा संस्कार आहे. वस्तुसंग्रहालये थडगी किंवा स्मारके नव्हेत. ती बदलत्या काळात नव्या पिढीस प्रेरणा देणारी ऊर्जा स्त्रोत होत अशी माझी धारणा आहे. साधी एक गोष्ट सांगतो. आम्ही पहिले म्युझियम वि. स. खांडेकरांचे केले. खांडेकरांच्याच शाळेतील विद्याथ्र्यांना... आंतरभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ते पहिल्यांदा दाखवलं. ओपन केलं. मला चांगले आठवतं की विद्यार्थी म्युझियम पाहून आले. जिना उतरता उतरता मी एका मुलाला विचारलं की, “म्युझियम पाहून काय वाटले? विद्यार्थी उत्स्फूर्तपणे म्हणाला, “लेखक व्हावेसे वाटले. मला वाटतं ती प्रतिक्रिया आमच्या म्युझियमच्या यशाची पावती आहे. तुम्हाला ज्या प्रकारचा समाज निर्माण करायचा आहे तशी ऊर्जा केंद्रे तुम्ही निर्माण करायला हवीत. अशी संग्रहालयं, स्मृती स्थानं ऊर्जा केंद्र हवीत, ती नवं निर्मिती केंद्र बनायला हवीत. बार्शीला मला आठवते की कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे स्मृती संग्रहालय उभारले. पाहून आलेल्या मुलीला विचारलं की काय वाटले तुला म्युझियम पाहन? तर ती म्हटली, 'मला मामा व्हायचंय!' मुलीला मामा व्हावंसं वाटणं... एक समाज सेवक व्हावंसं वाटणं महत्त्वाचं. परवाचीच गोष्ट सांगतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या म्युझियमचे उद्घाटन करण्यासाठीच्या प्रसंगी अनेक राजकीय लोक उपस्थित होते... अनेक आमदार, खासदार उपस्थित होते असे मोकळेपणाने सांगायला हरकत नाही. मी नाव नाही सांगत पण त्यातले एक लोकप्रतिनिधी मला म्हणाले,
तुम्ही म्युझियम केलेत पण आमची झोप उडवलीत हो." म्युझियम झोप उडवायचं कामही करतं.
प्रश्न - म्हणजे म्युझियम उभारल्याचं सार्थकच झाले?
उत्तर - सार्थक झालं. म्युझियम तुम्हाला अंतर्मुख करतात, म्युझियम तुम्हाला जगण्याची दिशा देतात, म्युझियम समाजात आदर्श प्रस्थापित करतात, म्हणून मला असे वाटते की आपण आपल्या पूर्वजांच्या सर्व पाऊलखुणा आपण घरोघरी जपणार नाही तोवर जुन्या गोष्टींचं जतन, संवर्धन होणार नाही. घरपण म्युझियम का नको असायला? पाटावरवंटा जपू नका पण कधीकाळी माझी आजी पाटावरवंट्यावर वाटायची तिच्या कष्टाची जाणीव जपली तर मला वेळ नाही म्हणून मी पुरणपोळी करणार नाही अशी गृहिणी मग म्हणणार नाही आणि ते क्षम्य असणार नाही.
प्रश्न - म्हणजे खरी दृष्टी व्यापक करण्याचं कार्य म्युझियम करतात का?
उत्तर - हो, हे कार्य शिक्षणातून, समाज शिक्षणातून व्हायला पाहिजे, लोक शिक्षणातून व्हायला पाहिजे, तर मग हा संस्कार आपण लोकशिक्षणातून देऊ शकू. याची गरज माणसाची समृद्धी जशी वाढेल तशी ती अधिक महत्त्वाची, अनिवार्य होईल. समृद्धी मागचे कष्ट, समृद्धी मागचा संघर्ष म्युझियम जपत असतात. प्रश्न - सर, हे झालं गतकाळाबद्दल. पण भविष्यकाळात पण तुम्ही वेगवेगळी म्युझियम करणार आहात, करत आहात त्याबद्दल सांगाल का?
उत्तर - शिरोड्याला आम्ही वि. स. खांडेकरांचं आणखी एक म्युझियम बनवत आहोत. तिथे शिरोड्यातील १८ वर्षांचा खांडेकरांचा काळ, कार्य आम्ही मूर्त करणार आहोत. खांडेकर आणि कोकण' असं त्या म्युझियमचं सूत्र असणार आहे. कोकण हा विषय का पुढे आला ते मी तुम्हाला सांगतो. कोकणामध्ये आजही प्रचंड दारिद्रय आहे, रेल्वे आली तरी. कोकणात अजून प्रचंड अंधश्रद्धा आहेत. कोकणात अजून शिक्षणाचा व्हावा तितका प्रसार झालेला नाही. सन १९२० च्या दरम्यान वि. स. खांडेकरांसारखा एक ध्येयवादी शिक्षक सावंतवाडी ते शिरोडा हे अंतर दर आठवड्याला पायी चालून जाऊन शिकवायचं काम करायचा. नुसतं ते शिकवायचं काम नाही करायचे. अज्ञान, दारिद्रय, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून प्रयत्न करायचे. मुलांच्या पोटात पेज तरी पडावी म्हणून धडपडायचे. साधारणपणे शंभर वर्षापूर्वी एक शिक्षक संवेदनशीलपणे विचार करतो. मग शिरोड्यासारख्या आडवळणी गावी ट्युटोरियल हायस्कूलसारखी शाळा उभारते. आज शंभर वर्षांनी मी जेव्हा त्या शाळेकडे पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्याकाळचा ध्येयवाद, जो त्या काळात शिक्षकांमध्ये होता तो आज राहिलेला नाही. एके काळी शिक्षकांबद्दल समाज जीवनात किती प्रचंड विश्वास होता. या वस्तुसंग्रहालयात आम्ही ट्युटोरियल हायस्कूलचे शिक्षकांचे मस्टर लावलेले
आहे. त्याकाळात विश्वास ही गोष्ट किती प्रचंड होती. हेडमास्तर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांची हजेरी भरत. शिक्षक मस्टरवर सही करत नसत. हेडमास्तरांवर विश्वास. तो ‘ए’ मांडेल नाही तर 'पी'. अॅबसेंट, प्रेझेंट मुख्याध्यापक मांडायचे. एका सामाजिक संस्थेच्या प्रमुखावरच्या विश्वासावरचे हे प्रतीक! आता आपण थम इंप्रेशन घेणारी बायोमेट्रिक यंत्र, मशिन्स लावलीत. त्यातही लांड्या लबाड्या करणारे शिक्षक, कर्मचारी आपणास भेटतात. समाज जीवनातील सर्वात मोठा पहारा, पारदर्शिता स्वतःची, स्वआचरण महत्त्वाचे. माणसाने स्वतःवरचा पहारा सोडला. डिजिटल एजमधील पारदर्शितेचा अभाव पाहिला की माझ्या लक्षात येते की समृद्धी साधनांनी येत नाही, समृद्धी येते ती साध्याने नि विश्वासाने. साध्य हीच साधना. तीच गोष्ट मोठी. आज आपण साधनांमागे । लागलोत. सन २०१६ मध्ये मागे वळून पाहताना आपण गतकालातील आदर्शाचा पुनर्विचार केला पाहिजे, मूल्यांचा विचार केला पाहिजे. ती जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही जाणीव वस्तुसंग्रहालये निर्माण करतात. निवेदक - ही जाणीव तर सर निश्चितच समाजामध्ये निर्माण होईल. ठीक
आहे, मागचा इतिहास सोडला तर आजपासून आपण इतिहासाला जपायला सुरुवात करूया. नक्कीच तुम्ही जे उपक्रम करत आहात, राबवत आहात त्याला अनेक लोक पुढे येऊन साहाय्य करतील.
डॉ. लवटे - एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, लक्षात आणून द्यायची आहे, ती अशी की आम्ही जी संग्रहालये उभारलीत ती इंटरनेटवर ‘यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यावर लोक जितक्या अधिक संख्येने पाहतात, भेट देतात, तेवढे प्रत्यक्षात लोक पहात नाहीत. म्युझियम प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट असल्याने लोकांनी म्युझियम्सना भेटी दिल्या पाहिजेत.
निवेदक - प्रत्यक्षसुद्धा लोक म्युझियम पहातील. लवटे सर, तुम्ही येथे आलात, संस्कृती जतन करण्याचे सर्वात मोठे साधन तुम्ही सांगितले. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे सर्व करू शकतो. इतिहास जर खरा जपायचा असेल तर या पद्धतीचा अवलंब होणे आवश्यक आहे. आपण आज इथे आलात, त्याबद्दल आभार!
• आकाशवाणी कोल्हापूर
• ८ एप्रिल, २०१६
• सकाळी ९.३० वा.
• मुलाखतकार : श्रीपाद कहाळेकर
निवेदन/प्रस्तावना
देशाचा इतिहास व स्वातंत्र्याचा लढा आपण अभ्यासला तर त्यामध्ये समाजसुधारकांनी मुख्यतः भर दिला होता तो शिक्षणावर आणि या शिक्षणाच्या बाबतीमध्ये परिस्थितीची स्थित्यंतरे आपल्या समाजानी अनुभवली आणि त्यामध्ये आजही बदल होताना आपण बघतो. मुळात विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा जर आपण विचार केला तर या शिक्षण पद्धतीमध्ये आज आमूलाग्र बदल करण्याची गरज या विषयातील अभ्यासक सातत्याने मांडताना दिसतात. पण यासंदर्भात पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांना जाणवत असते. याच विषयाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या विषयातले गांभीर्य जाणून जनतेने तातडीने का समजून घेतले पाहिजे हे त्यांच्याच शब्दात ऐकूया.
प्रश्न : लवटे सर, नमस्कार, मुळात मला एक सांगा, आपण म्हणतो की शिक्षणात खूप स्थित्यंतरे झाली आहेत आणि अजूनही दर क्षणाला यामध्ये बदल होताना आपण पाहतो.
उत्तर : हे खरं आहे.
प्रश्न : नेमकी आजच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे?
उत्तर : शिक्षणात काय स्थित्यंतरे झाली हे जाणून घेण्यापूर्वी आपण हे समजून घेतले पाहिजे की स्थित्यंतरे नेमकी कोणत्या क्षेत्रात नि कशा प्रकारची झाली ते लक्षात घेऊया. आज आपल्या आसपास जे सगळे जग आपण बघतो आहे ते जर आपण विद्याथ्र्यांच्या नजरेतून बघू लागलो तर असे दिसते की आपण जी प्रौढ पिढी आहो, ती प्रौढ पिढी विद्याथ्र्यांच्या भावविश्वाकडे त्यांच्या दृष्टीने पाहात नाही हे आपल्या शिक्षणाचे खरे शल्य आहे. त्यामुळे तुमच्या असे लक्षात येईल की वर्गात येणारी दरवर्षाची नवी पिढी ही अंकीय साक्षर (Digital Literate) आहे. म्हणजे उपजतच मुलांना ती वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक साधनांशी (Gadgets) खेळत असल्याने त्यांना व्हिडिओ गेम्स कसे खेळायचे, टी.व्ही. सुरू-बंद कसा करायचा, कॉम्प्युटर, मोबाईल ऑन-ऑफ कसा करायचा हे आपोआप कळते. त्याचा दिवसातील एकंदर कालखंड पाहिला तर तुमच्या असे लक्षात येईल की साधारणपणे सहा ते आठ तास ते या इलेक्ट्रॉनिक जगात असतात. त्यांचे खेळ, त्यांचा विचार, त्यांचे भावविश्व, त्यांची स्वप्ने सारे या जगाचे नि या जगातले असते. आजची सकाळचीच एक गोष्ट सांगतो. माझी नात मला सांगत होती, की ‘आजोबा, मी आज स्वप्नामध्ये इलेक्ट्रॉनिक गाडीने अवकाशात गेले. आता इलेक्ट्रॉनिक गाडीनी अवकाशात जाणारी पिढी, तिला जर आपण कोळशाच्या गाडीचे इंजिन शिकवायला लागलो तर आपण किती कालबाह्य शिकवतो, हे साध्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.
प्रश्न : लवटे सर, तुम्ही म्हणालात की आपली पिढी, आपल्या पूर्वीची पंतोजी पिढी, नंतर घरातल्या कत्र्या माणसांच्या धाकाखाली वाढलेली, शिकलेली पिढी आणि त्या पार्श्वभूमीवर मुलांचे भावविश्व जपण्याचा विषय तुम्ही उपस्थित केलात. मला सांगा की मुळात मागच्या पिढीला असे भावविश्व नव्हते का?
उत्तर : होते. प्रत्येक पिढीला स्वतःचे भावविश्व असते. प्रत्येक पिढीचे भावविश्व भिन्न असते. पूर्वीच्या पिढीचे भावविश्व अत्यंत मर्यादित होते. आत्ताच्या पिढीचे जे भावविश्व आहे, ते अमर्याद आहे. Sky is the limit. असे त्याचे स्वरूप आहे. पूर्वीच्या पिढीचे लोक सातासमुद्रापलिकडच्या गप्पा करायचे. आज मुलं ग्रहापलिकडच्या, परग्रहाच्या गप्पा करायला लागलीत. म्हणजे त्यांचे जे भावविश्व आहे, ते पृथ्वीतलावरचे राहिलेले नाही. ते उपजतच मंगळावर जाऊ लागलेत. चंद्राची गोष्ट ते प्लॉट घेणे, घर बांधणे अशा रूपात करतात. असे भावविश्व घेऊन आलेली आत्ताची पिढी आपल्या तुलनेनी, पूर्वपिढीच्या पार्श्वभूमीवर ख-या अर्थाने वैश्विक आहे, असे माझे म्हणणे आहे. प्रश्न : या वैश्विक पिढीला शिकवत असताना खूप मोठी जबाबदारी शिक्षक वर्गावर आली आहे. ख-या अर्थाने मुळात शिक्षणाचा झालेला विस्तार, विकास, आजचे प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थी यांची सांगड बसते की बसत नाही?
उत्तर : बसते हे खरे आहे. भारत सरकारने याच वर्षी - २०१६ साली आपले नवं राष्ट्रीय धोरण जाहीर केलंय. त्या नव्या शिक्षण धोरणामध्ये ज्या तीन-चार महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत, सांगितल्या आहेत. त्याकडे मला श्रोत्यांचे लक्ष वेधायचंय आणि शिक्षकांचे पण. भारत सरकार वेगवेगळ्या पद्धतीनी आपल्या देशाला जागतिक व्यासपीठावर न्यायला लागलं आहे. वर्तमान भारत सरकारची अशी इच्छा आहे की आपले शिक्षणदेखील जागतिक दर्जाचे झाले पाहिजे. म्हणून या नव्या धोरणामध्ये 'Internationalization of Education' या शीर्षकाचा स्वतंत्र परिच्छेद, चॅप्टर आहे. म्हणजे आपल्या भारतीय शिक्षणाचे आंतर्राष्ट्रीयकरण करण्याची योजना आहे. शिक्षणाचे आंतर्राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर आज जागतिक पातळीवर जे शिक्षणात प्रगत देश आहेत, ते ज्या पद्धतीने शिक्षण आपल्या देशात विद्याथ्र्यांना देतात, त्या पद्धतीचे शिक्षण आता आपल्याला द्यायचं आहे. एक साधी गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो. जगामध्ये लहान मुलांना चार-पाच विषयांच्या पलिकडे शिकवले जात नाही. आपल्याकडे हायस्कूलला मुले किती विषय शिकतात हे बघितले तर आपल्या हातापायांची बोटे पुरणार नाहीत इतके विषय आपण त्यांच्या बोकांडी मारतो. ‘बोकांडी' हा शब्द मी मुद्दाम अशासाठी वापरतो की हे विषय त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या माथी मारले जातात. जगात अलिकडे असे सांगितले जाते की कमी विषय मुलांना शिकवा मात्र सूक्ष्मतेने ते शिकवले गेले पाहिजे. आपण भाराभर शिकवतो नि प्रत्यक्षात काहीच सरळ शिकवत नाही अशी आपल्या शिक्षणाची खिचडी झाली आहे. जगामध्ये अलिकडे गणित, इंग्रजी, विज्ञान या तीन विषयाची साक्षरता प्रमाण मानली जाते. त्याचे कारण असे की वर्तमान जीवनामध्ये हे तीन विषय जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून राहिलेले आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना नि नव्या पिढीला या तीन विषयात जर तज्ज्ञ करू शकलात तर ती जगावर राज्य करू शकेल; अशी धारणा त्यामागे आहे.
प्रश्न : सर, एकीकडे तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा
आपल्या देशामध्ये टिकावा, त्या पद्धतीचे शिक्षण आपल्या विद्याथ्र्यांना मिळावे म्हणून कमीत कमी विषयांमध्ये पारंगत व्हावेत या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत. पण दुसरी एक खंत लक्षात घेतली पाहिजे. आपण असे पाहतो - तुम्हीत सातत्याने महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षकांबरोबर काम केले आहे, विद्यापीठ स्तरावर ही तुम्ही अध्यापन केले आहे, मला सांगा की आपल्याकडे विद्या वाचस्पती म्हणजे पीएच.डी. पदवी विद्याथ्र्यांना प्राप्त होते, तेव्हा असे म्हटलं जातं (कदाचित गंमतीने म्हटले जात असेल) की अशा विद्याथ्र्याला त्या विषयाचे सूक्ष्म ज्ञान (मायक्रो नॉलेज) प्राप्त होतं. पण त्याच विषयातल्या इतर प्रश्नांचे भान, ज्ञान, त्याची उकल या विद्याथ्र्यांकडून होत नाही. अशीच परिस्थिती या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वा जागतिक शिक्षणाने निर्माण होणार नाही का?
उत्तर : दोन गोष्टी आहेत. एकीकडे भारत महासत्ता होणार असे आपण मानतो. पूर्वी केव्हातरी भारताबद्दल असं सांगितलं जायचं की ‘भारत हा अविकसित देश आहे', “भारत हा विकसनशील देश आहे' अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारतात नुकतेच आले होते. त्यानी आपल्या भारताला संरक्षणाचा भागीदार देश म्हटले होते, तशी मान्यताही अमेरिकेने भारताला दिली. एकीकडे जागतिक पातळीवर राज्य करायला सरसावलेले आहात. जागतिक नेतृत्व करण्याची तुमची मनीषा निश्चित आहे. आणि क्षमताही आहे. त्या क्षमतांचा विकास तुम्हाला शिक्षणाच्या द्वारेच करावा लागेल. जगात शिक्षणाची विकासाची जी मॉडेल्स आहेत, ज्या नव्या क्षमता मान्य आहेत, त्या नव्या युगाच्या तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना द्याव्याच लागतील.
प्रश्न : या क्षमता जर आपल्या विद्याथ्र्यांना द्यायच्या तर सध्या उपलब्ध असलेली शिक्षण पद्धती, शिक्षण देणा-या संस्था यांचा जर विचार केला तर शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात झालेले व्यावसायिकरण नको का विचारात घ्यायला?
उत्तर : ही आपल्या शिक्षणाची खरी गंभीर समस्या आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला असे वाटते की डॉक्टर जसा महाग व्हायला लागला तसे शिक्षणातील डॉक्टरही महाग व्हायला लागलेत. म्हणजे मी असे म्हणतो की Doctors of Bottles जसे महाग होऊ लागले तसे Doctor of Books ही! म्हणजे आपले जगणे जसे महाग झालं, तसं शिक्षणही! अशा परिस्थितीत जगातल्या देशांनी जे मार्ग चोखाळलेले आहेत त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. सिंगापूरसारखा छोटा देश आहे. तो शिक्षण मोफत' देत नाही, पण ‘माफक दरात शिक्षण देतो. मी असे म्हणणार नाही की एकविसाव्या शतकात शिक्षण मोफत झाले पाहिजे पण ते माफक नक्की असायला हवं या मताचा मी आहे. ते करणं शक्यही आहे. विशेषतः ज्या खासगी शिक्षण संस्था आहेत, विनाअनुदानित शिक्षण संस्था आहेत, ती आपली खरी ‘दुखती रग' आहे. आपल्या शिक्षणाचे खरे शल्य जर कोणते असेल तर ते हे. एकीकडे खासगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणणं आणि दुसरीकडे विनाअनुदानित शिक्षणाचा दर्जा वाढवणे, खरे म्हणजे शासकीय शिक्षणाचा दर्जा उंचावणे. आपण असं पाहतो की जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या शाळा ओस पडताहेत. त्याचं कारण केवळ गुणवत्ता अभाव हे नाही. समाजाची बदलती मानसिकतापण त्याचं एक कारण आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्या घरी कामाला एक बाई येते, जिला स्थूल रूपानी आपण मोलकरीण म्हणतो. ती जून महिन्यात तीन हजार रुपये मागू लागली. मला अॅडव्हान्स द्या म्हणून. “कशाला पाहिजेत पैसे? म्हणून विचारले तर म्हणाली, “माझ्या नातीला मला इंग्लिश मेडियमला घालायचे आहे. तिची फी देण्यासाठी हवे आहेत. आता बालवाडीला जर तीन हजार रूपये फी लागत असेल तर शिक्षण मोफत तर राहू द्या, ‘माफक तरी म्हणता येईल काय? एका कामकरी स्त्रीला इतके पैसे प्राथमिक शिक्षणासाठी मोजावे लागणे हे तिच्यासाठी तरी आभाळ न पेलणारी गोष्ट होय. चांगल्या शिक्षणाच्या संधी सामान्य वर्गाला जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत आपण आपले शासन अथवा सरकार कल्याणकारी राज्य (Welfare State) आहे, असे म्हणू शकणार नाही. आपण शिक्षणाचा हक्क दिला आहे खरा पण गुणवत्तेची हमी दिली का? ‘हक्क’ आणि ‘हमी' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. केव्हातरी सरकारने हक्कानंतर हमीचा विचार केला पाहिजे.
प्रश्न : सर, तुम्ही शिक्षणाच्या हक्काबद्दल म्हणालात, स्वातंत्र्यपूर्व काळात गुजरातेत बडोद्याया सयाजीराव गायकवाड यांनी आणि त्यानंतर कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी पण आपल्या राज्याच्या उत्पन्नाच्या ६% हून अधिक खर्च शिक्षणावर केला. आज आपण शिक्षणाच्या सोयी नि संधी उपलब्ध करून देत असताना - अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत - या सगळ्यांसाठी आपण तेवढी तरतूद करू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर : या नव्या धोरणामध्ये (२०१६) शासनाने स्पष्ट ग्वाही दिलेली आहे की ज्या सुधारणा आम्ही करू इच्छितो त्यासाठी ६% आर्थिक तरतूद करू नि तितका खर्च करू. आजचा आपला शिक्षणावरील खर्च ३.५ ते ४% आहे. २% जरी खर्च आपण शिक्षणावर वाढवला तरी आपले शिक्षण ‘माफक' करणे शक्य आहे, असे माझे स्थूल आकलन आहे, धारणा आहे. प्रश्न : दुसरीकडे शासनाने असा एक महत्त्वाकांक्षी निर्णयही घेतला आहे की ज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे, अशा व्यक्तींच्या मुलांना शिक्षणाची मोफत सोय करून देण्यात आली आहे त्याबद्दल काही सांगू शकाल का?
उत्तर - मोफत शिक्षणाची घोषणा नि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठे अंतर आहे. मला असे वाटते की इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण एका अर्थाने मोफत झाले आहे. पण महाविद्यालयीन आणि विशेषतः व्यावसायिक शिक्षण मात्र मोफत झालंय असं म्हणता येणार नाही. शासन मुलींची फी भरते असे सांगितले जाते, शासन अल्पसंख्यांकांची फी भरतं असं सांगितले जाते, शिष्यवृत्त्या दिल्या असं सांगितलं जातं पण एका गरीब घरातल्या मुलीला मेडिकलला जायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तिला शिक्षण घेता येत नाही अशी वस्तुस्थिती आहे.
प्रश्न : पण आता ६ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा वाढवली आहे ना? उत्तर : किती विद्याथ्र्यांना उच्च शिक्षणासाठी पण ही सोय उपलब्ध आहे? त्याची एक टक्केवारी ठरलेली आहे ना? सरसकट सर्व विद्याथ्र्यांना ही सवलत दिली का असा मुद्दा रहातो. जोपर्यंत सरकार सरसकट ६ लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्याथ्र्यांना जात, धर्म, पंथाचा विचार न करता अशी सवलत देत नाही, तोवर आपले शिक्षण सार्वत्रिक मोफत शिक्षण झाले असे म्हणता येणार नाही. प्रश्न : सर, एकीकडे आपण शिक्षण माफक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा केली पण मग गुणवत्तेच्या हमीचे काय? उत्तर : शुल्काची माफकता...
प्रश्न : गुणवत्तेचे काय? या संदर्भात गुरुजनांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे, त्याबद्दल काय म्हणाल?
उत्तर : हे ऐकणाच्या सर्वच शिक्षक श्रोत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आपल्या पुढे बसलेली विद्याथ्र्यांची जी पिढी आहे, ती संगणक साक्षर आहे. मी तर असे म्हणेन की ती केवळ संगणक साक्षर नाही तर संगणक तज्ज्ञ पिढीपण आहे. त्या पिढीमध्ये उपजत अंकीय साक्षरतेची कौशल्ये विकसित होताना दिसतात. मी मोबाईलवर एखादा संदेश ज्या सफाईदार टंकित करू शकत नाही, तो ते अत्यंत बेमालूमपणे करतात. माझ्या नातवंडांची जी पिढी आहे ती जे मॅसेजिंग करते - कट, फॉरवर्ड, पेस्ट ही जी नव्या तंत्रज्ञानाची जी कौशल्ये आहेत ती या पिढीत उपजत दहापट अधिक असल्याने या पिढीस आपण केव्हातरी कागदी शिक्षणाकडून (Printed Education) अंकीय शिक्षणाकडे (Digital/Vertual Edcuation) जर आपण १२-१२ वर्षे अभ्यासक्रम बदलत नसू, तर पिढी बरबाद करत असू तर शिक्षण नि काळ, काम, वेगाचा विचार व्हायला हवा. जगभर ज्या ज्या देशांमध्ये गुणवत्ता आहे, फिनलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, कॅनडा, जपानसारखे जे देश आहेत त्यांचा अभ्यास आणि अनुकरण केले पाहिजे. सिंगापूरसारखा देश घ्या. तिथे शिक्षकांसाठी ‘गोल्डन शेकहँड' सारखी योजना आहे. तेथील शासन प्रत्येक विद्याशाखेत (फॅकल्टी) पहिल्या दहा क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याचे आमंत्रण देतं. ते विद्याथ्र्याने स्वीकारले की प्रशिक्षण काळातच त्याला शिक्षकांच्या वेतनाच्या ६० टक्के इतकी घसघशीत शिष्यवृत्ती, विद्यावेतन मिळते. चार वर्षांचे त्याचे जे शिक्षण प्रशिक्षण आहे, ते इतके कठोर नि कठीण (Rigorous) आहे की तो जगातला आदर्श शिक्षक ठरतोच. आपल्याकडे डी.एड. आणि बी.एड.ला जी मुले प्रवेश घेऊ इच्छितात ती सुमार असतात. आता तर तीही प्रवेश घेऊ इच्छित नाहीत. कारण शिक्षकाची नोकरी मिळवायला १०-१५ लाख रूपये मोजावे लागत असतील तर कोण शिक्षक होणार? अशी एक नव्या शिक्षकाची नवी समस्या तयार झाली आहे.
प्रश्न : पण आता शासनाने शिक्षक निवडीची एकच परीक्षा घेऊन भरती करायचे ठरवले आहे ना?
उत्तर : हो, केंद्रीय निवड पद्धतीने आता शिक्षकांची निवड होणार आहे हे खरं आहे. पण शिक्षक निवडीचे अधिकार जोवर शिक्षण संस्था नि संस्था चालक यांच्याकडे राहणार तोवर गुणवत्ताप्रधान शिक्षक कसे नियुक्त होणार? जोवर टेबलाखाली व्यवहार होत राहाणार तोवर टेबलावर गुणवत्ता कशी दिसणार?
प्रश्न : सर, एकीकडे जसे तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञानाचा विचार केला तर मुले ही तंत्रज्ञान कौशल्ये स्वीकारण्यासंदर्भात खूप पुढे गेली आहेत नि त्यामानाने आपली शिक्षण पद्धती बरीच मागे आहे. मला एक सांगा की तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक गोष्ट अशी आपण म्हणतो की ही शिक्षक पिढी तयार होण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात काय बदल केले पाहिजे?
उत्तर : पहा ना, आज आपण दफ्तराच्या ओझ्याची चिंता करतो. का नाही भारताने विद्यार्थ्याला लॅपटॉप द्यायचा? म्हणजे असं की दफ्तराच्या किंमतीत लॅपटॉप येतो हे किती जण जाणतात? केव्हा तरी आपण अभ्यास केला पाहिजे की दफ्तराच्या किंमतीत सिंप्युटर, टॅबस् घेणे शक्य आहे. मग अशी जर आपण नवी साधने दिली तर मग दफ्तरांच्या ओझ्याचे प्रश्न सुटतील. घरामधला विद्यार्थ्यांचा टॅब शाळेतल्या टॅब किंवा लॅपटॉपशी जोडणे शक्य आहे, पाटीवरचे ओझे वाचेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटाइज एज्युकेशनचा प्रारंभ होईल. एकीकडे आपण ‘डिजिटल इंडिया'चे स्वप्न पाहतो, कॅशलेस व्यवहारांच्या गप्पा करतो, त्या गप्पांना ख-या अर्थाने केव्हा अर्थ येईल? मला असे वाटते की डिजिटाइज शिक्षणानेच ते शक्य होईल.
प्रश्न : डिजिटल शिक्षण घेत असताना किंवा तंत्रज्ञानाचा वापर करत असताना या मुलांना कला, संगीत, इतिहास, वाणिज्य हे सगळे विसरून जाणार का?
उत्तर - नाही, असं नाहीये. विद्यार्थी विद्यार्थी जसा मोठा होईल तसं त्याला विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. ते सर्वच देशांनी दिलेले आहे. प्रत्येक देशाच्या विकासाला कलाकार, तत्वज्ञ, संगीतकार, इतिहासकारांची गरज असतेच. आम्ही अलीकडे विज्ञानाची विभागणी Hard Sciences अणि Soft Sciences मध्ये करू लागलो आहोत. Physics ची जितकी गरज आहे तितकीच मानसशास्त्राचीही आहे. हे कोणीच नाकारणार नाही. पण कोणते विषय कोणत्या वयाला शिकवायचे याचे तारतम्य जगाने ठेवलेले आहे. इकॉनॉमिक्स महत्त्वाचे खरे. म्हणून ते इयत्ता ५ वीला नाही शिकवता येणार. ते तुम्हाला विद्यार्थ्यांची थोडी समज विकसित झाल्यावर इयत्ता ९वी, १० वीलाच शिकवले पाहिजे. मानसशास्त्रही आवश्यकच आहे पण ते पदवी स्तरावरच शिकवणे इष्ट. जगाने विषयांची काठिण्यपातळी (Difficulty Level) लक्षात घेऊन आपले अभ्यासक्रम तयार केले आहेत. तशा प्रकारचे अभ्यासक्रम आपण बनवायला हवेत. तसे अभ्यासक्रम मुलांच्या कलाने शिकवू लागलो तर हे शक्य आहे, पण भारतातल्या १% विद्यार्थ्यांची पण कल चाचणी (Aptitude Test) घेऊन त्यानुसार त्यांना शिकवले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत आपणाला मुलाचा कल कळणार नाही तोपर्यंत त्याच्या आवडीचं शिक्षण कसं नि केव्हा देणार? त्यामुळे केव्हा तरी प्राथमिक शाळांच्यामध्ये कलचाचणी अनिवार्य करायला हवी. प्राथमिक शाळात जसा शिक्षक अनिवार्य तसा समुपदेशक (Counsellor) अनिवार्य केला पाहिजे. प्राथमिक शाळांमध्ये आहारतज्ज्ञ (Dietician) नेमला पाहिजे. शिवाय मानसशास्त्रज्ञ नेमले पाहिजे. मी तीस-चाळीस एक वर्ष कॉलेजमध्ये, शाळेमध्ये होतो. त्याकाळात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीचे असे एकही झेंडावंदन
आठवत नाही की ज्यावेळी एखादी तरी मुलगी चक्कर येऊन पडली नाही. एन.सी.सी.च्या एक दोन मुली चक्कर येऊन पडायच्याच. तुम्ही जेव्हा मुलींच्या आरोग्याची तपासणी करायला लागाल तर तुम्हास मुलींमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी दिसेल, त्या अमिबिक आढळतील. मुलींच्या खाण्याकडे, त्यांच्या सकस आहाराकडे आपण लक्ष देणार नाही तोवर आपली ५0% पिढी कुपोषित (Malnourished) रहाणार आहे, हे केव्हातरी आपण मान्य करायला हवे. यासाठी प्राथमिक स्तरावरच लक्ष केंद्रित करायला हवे. आजही बालवाडी, प्राथमिक शाळातील मुला-मुलींचे डबे उघडून पहा, त्यात तुम्हास तफावत आढळल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्न : तुम्ही या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आदर्श (Ideal) शिक्षणाच्या बाबतीत खूप महत्त्वाच्या असल्याने चपखल बसू शकतात. पण चाळीस वर्षाच्या शिक्षणातील तुमचा अनुभव लक्षात घेतला तर पुढच्या पन्नास वर्षात या गोष्टी होऊ शकतील असे तुम्हाला वाटतं? तुम्ही आशावादीही आहात?
उत्तर : मी आशावादी नक्की आहे. त्याचं कारण असं की कोणतंही शासन असो वा समाज असो तो नेहमीच नव्याचा स्वीकार करत आला आहे. एक साधी गोष्ट आहे, आपल्या देशात सर्वत्र मातृभाषी वा प्रांतभाषी शाळांचं स्थित्यंतर (Switch overing), हस्तांतरण हे इंग्रजी माध्यमाकडे होते आहे. हा जागतिकीकरणाचा प्रभाव आहे, हे खरे आहे. प्रत्येकास असं वाटू लागलं आहे की माझ्या मुलास जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. यात काहीच गैर नाही. हे भारतीय समाज जागृतीचे फार मोठे व्यवच्छेदक लक्षण आहे. प्रश्न असा आहे की स्वप्न आणि सत्य यात अंतर राहिल्याने आपण केव्हातरी स्वप्नांना सत्याची वाट करून दिली पाहिजे.
समारोप : निश्चितपणे ही स्वप्नं सत्यात उतरतील, शिक्षणाचा दर्जा जागतिक होईल, जागतिक स्पर्धेला नव्हे तर जागतिक महत्त्वाकांक्षेने आपण आपले शिक्षण विकसित करू शकू हा जो आशावाद तुम्ही दाखवलात, खरोखर या पुढच्या काळात विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी म्हणून सर्वांनी सज्ज होण्याची गरज तुम्ही प्रतिपादली. आणि त्यादृष्टीने वाटचाल चालू आहे. नक्कीच याबाबत आपणास लवकरात लवकर यश येईल अशी आशा करूयात. आपण इथे आलात आणि आपले विचार व्यक्त केलेत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नमस्कार! डॉ. लवटे : या सगळ्या पालकांना त्यांच्या मुलांच्या स्वप्नांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद!
• प्रक्षेपण : १३ डिसेंबर, २०१६
• रात्री ९.३० वा
• आकाशवाणी केंद्र, कोल्हापूर
• मुलाखतकार : श्रीपाद कहाळेकर
निवेदन/प्रस्तावना
संपूर्ण भारताचा आपण विचार केला, तर या ठिकाणी नांदणारी जी संस्कृती आहे ती भाषा, धर्म, जात, रूढी, परंपरांनी वैविध्यपूर्ण असली तरी तिला एकत्र ठेवण्याचे कसब वेगवेगळ्या साहित्य कृतीमधून मिळाले आहे.
डॉ. लवटे - त्याला आता आंतरभारती संस्कृती असे म्हणतात. तर या संस्कृतीच्या बाबतीत स्वतः एक भारतीय भाषा व साहित्य अनुवाद, परिचय, समीक्षेच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे आपल्या कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटेजी आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारूया.
अभिवादन - लवटे सर, नमस्कार!
प्रतिसाद : नमस्कार ! प्रश्न - लवटे सर, तसे पाहिले तर विश्वामध्ये असलेले साहित्य माणसाचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी वापरायचं ठरवले तर खरोखर समृद्धी येईल असे आपणास वाटते का? आणि हे होताना दिसतय का?
उत्तर - हे दिसत नाही याचे कारण असे आहे की गेल्या शतकामध्ये जर्मन साहित्यावर गटे यांनी एक कल्पना मांडली होती. त्या कल्पनेला त्यांनी ‘विश्वसाहित्य' (Welteterature) अशी संज्ञा दिली होती. ती संकल्पना भारताचे एक व्यापक रूप होते. आपण जग समजून घेऊ लागलो तर लक्षात येते की जग सात खंडांमध्ये विभागलेले आहे. ते म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, यूरोप व ऑस्ट्रेलिया. या सर्व खंडांमध्ये जे शेकडो देश आहेत, त्या प्रत्येकाची स्वतःची भाषा, लिपी, साहित्य, संस्कृती आहे. शिवाय पोषाख, रीतिरिवाज, खानपान परंपरा आहेत. निसर्ग जितका वैविध्यपूर्ण आहे, तसे संस्कृतीच्या संदर्भात जगही वैविध्यपूर्ण आहे. मला भारत फिरत असताना नेहमी असं जाणवतं की भारत ही जगाची छोटी प्रतिकृती आहे.
प्रश्न - विविधतेतून एकता हीच का?
उत्तर - गटेनी ही मूळ संकल्पना मांडली होती. गटेकडून प्रेरणा घेऊन कवींद्र रवींद्रनाथ टागोर यांनी 'विश्वभारती'ची संकल्पना मांडली होती. विसाव्या शतकाच्या प्रारंभी त्यांनी ही कल्पना शांती निकेतन, विश्वभारती विद्यापीठाच्या स्वरूपात साकारली. त्यांनाही असे वाटायचे की भारत एकात्म व्हायचा तर भारतातील सर्व भाषा, साहित्य, कला, लिपी, संस्कृती यांचा अभ्यास व्हायला हवा. जेव्हा त्यांनी शांती निकेतनची स्थापना केली तेव्हा किंवा विश्वभारती सुरू केली तेव्हा त्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये सगळ्या कला, संगीत, भाषा, साहित्य शिकविण्याची व्यवस्था केली होती. त्या त्या क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांनी आपल्या विश्वभारतीत आणलं होतं. साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर हिंदीचा चांगला शिक्षक पाहिजे म्हणून त्यांनी डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांना आणले होते. अशी एक दृष्टी घेऊन त्यांनी काम केले. पुढे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रात साने गुरुजींनी ‘आंतरभारती'ची संकल्पना विशद केली होती.
प्रश्न - आंतरभारती'च्या माध्यमातून साने गुरुजींनी जे प्रयत्न केले ते विस्ताराने सांगाल का?
उत्तर - आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला वाढ दिवस होता १५ ऑगस्ट, १९४८ ला. त्या दिवशी साने गुरुजींनी साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्या आपल्या साप्ताहिकामध्ये त्यांनी एक सदरच सुरू केले होते. त्याचं नाव होतं ‘प्रांतभारती'. पुढे मग स्वातंत्र्यानंतर आपण भाषावर प्रांत रचनेचे धोरण स्वीकारले. तेव्हा प्रांत विचार त्यांना संकुचित वाटू लागला. या संकल्पनेला व्यापक नाव देण्याच्या उद्देशाने साने गुरुजींनी ‘आंतरभारती' शब्दाचा वापर केला. त्याची व्यापकला इतकी होती की कर्नाटकात आण गुजरातमध्ये 'आंतरभारती केंद्र सुरू झाले. या साने गुरुजींनी भारतभर प्रसार केला. इतकेच नव्हे तर साने गुरुजींनी त्या वेळी अनेक भाषांतील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित केली होती. स्वतः साने गुरुजींनी तुरुंगात असताना तमीळ कवी तिरुवल्लुवर यांचे ‘कुरल' नामक काव्याचा मराठीमध्ये अनुवाद केला होता. इंग्रजीतील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांनी मराठी भाषिकांना करुन दिला आहे. त्यांची अशी धारण होती की जोवर आपण अन्य भाषा शिकत नाही, अन्य भाषी साहित्य वाचत नाही, तोवर भारत एकात्म होणार नाही.
प्रश्न - सर, मला एक सांगा की मुळात भाषा बंदिस्त स्वरूपामध्ये असते. जसं आपण गडेंचा उल्लेख केला तसा संस्कृत भाषेच्या बाबतीत भारतात सुरुवात त्या अनुवादित गोष्टींची होण्याऐवजी इतर देशात त्याचे तात्काळ अनुवाद करण्याचा प्रयत्न केला गेला. तसा आपणाकडे झाल्याचे दिसते का?
उत्तर - आजही संस्कृत जगातल्या अनेक विद्यापीठात शिकवली जाते. हिंदी जगातल्या १२५ विद्यापीठांमधून शिकवली जाते. आपण आपल्या भाषा व साहित्याचा जितका गंभीर अभ्यास करत नाही त्यापेक्षा अधिक गांभीर्याने तो परदेशात केला जातो. मी एक छोटं उदाहरण आपणास देईन. सन १९९०च्या मे मध्ये फ्रान्स-भारत मैत्री कार्यक्रमांतर्गत फ्रान्सला होतो. तिथं मेट्झ नावाच्या छोट्या गावात एक विद्यापीठ होते. तिथे भारत विद्येचा (इंडॉलॉजी) स्वतंत्र विभाग होता. त्या विभागात एक जर्मन प्राध्यापक संस्कृत शिकवत होते. त्यांनी मला भारतीय म्हणून संस्कृतबद्दल जे प्रश्न विचारले होते, तुमची सर्वांची क्षमा मागून हे सांगेन की मला त्या प्रश्नांची उत्तरे नाही देता आली. आपल्याकडे ‘घर की मुर्गी, दाल बराबर'चा जो भाव आहे, तो आपल्या भाषा व साहित्यसंदर्भात पुरेपूर लागू पडतो. आपण मराठी भाषी असलो तरी मराठी भाषेचे सगळेच आपणाला माहीत असते असे नाही. भारतीय भाषा आणि साहित्याचा आपला पट व्यापक आहे. असे जर कुणी ठरवलं की सगळ्या भारतीय भाषानि साहित्याच्या अभ्यास करीन तर ती अशक्य कोटीतील गोष्ट आहे. प्रश्न - सर, तुम्ही भारतीय भाषांचा अभ्यास केलाय, आकडेवारीच्या अंगाने काय सांगाल?
उत्तर - आपल्या देशात २९ राज्ये आहेत. ६ केंद्रशासित प्रदेश आहेत. या साधारणपणे ३५ घटक राज्य सदृश्य प्रांतांमधून अनेकविध भाषा, बोली बोलल्या जातात. सन २०११ च्या जनगणनेनुसार असे लक्षात आले आहे की सन १९६० पासूनच्या ५० वर्षात भाषा नि बोलींचा वापर न झाल्याने २१० भाषा लुप्त झाल्यात. भाषा व साहित्याचा विचार करताना हे लक्षात घ्यायला हवं की जी आपली भाषा अथवा बोली असेल तिच्या वापराबाबत आपण दक्ष राहायला हवे. आपली बोली कितीही छोटी असो ती आपण जपायला हवी. ती सतत बोलत राहिली पाहिजे. जगामध्ये फिरत असताना मला वर्तमानपत्रात कधीतरी अशा बातम्या नजरेस पडतात. मला आठवते की १९९६मध्ये मी जपानमध्ये होतो. तिथल्या वर्तमानपत्रात एक छोटी बातमी मला आढळली. बातमीत एका गृहस्थाचा फोटो होता नि लिहिले होते की अमुक बोली भाषेचा शेवटचा शिलेदार हरपला. त्याच्याबरोबर त्याची बोलीपण मेली. भाषा, बोली नि साहित्याचं अस्तित्व वापरावर टिकून असते. आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आहेत कुसुमाग्रज, ‘स्वातंत्र्याची विनवणी' शीर्षकाची त्यांची एक कविता आहे. त्यात त्यांच्या दोन ओळी आहेत.
‘भाषा मरता, देशही मरतो.
संस्कृतीचा मग दिवा विझे'
प्रश्न - एवढे महत्त्व आपणास कुसुमाग्रजांच्या या ओळीतून दिसते. मला सांगा की भाषा व साहित्याचे जतन करण्यासाठी आपल्या देशाते कुठल्या स्तरावर नि कसे प्रयत्न सुरू आहेत?
उत्तर - सध्या भारतात या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांचे श्रेय आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना द्यावे लागेल. जसं महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती जतनाचे श्रेय आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना जातं, तसेच भारतीय भाषा नि साहित्य संवर्धनाचं श्रेय नेहरूंकडे जातं. देश स्वतंत्र झाल्यानंतर सन १९५०-५५ च्या दरम्यान त्यांनी असा विचार मांडला होता की आपणाला जर एकात्म भारत निर्माण करायचा असेल तर आपणास भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक एकता निर्माण केली पाहिजे. म्हणून त्यांनी त्या काळात दोन संस्थांची स्थापना केली होती. एक साहित्य अकादमी आणि दुसरी संस्था आजही भारतातील उत्कृष्ट साहित्य भाषांतरिल करून ते सर्व भारतीय भाषांमधून उपलब्ध करून देतात. विशेषतः साहित्य अकादमी प्रतिवर्षी भारतीय राज्यघटनेने राजभाषा म्हणून मान्य केलेल्या २२ भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतींना पुरस्कार देऊन गौरविते. तेव्हा त्या २२ भाषांतील पुरस्कृत प्रत्येक साहित्य कृतींचा २२ भाषात अनुवाद करून घेऊन ते प्रकाशित करते. त्यामुळे स्थापनेपासून मुख्य भाषांना सरासरी ५० पुरस्कार गृहित धरले तरी किती रचना होतात पहा. दुर्दैव असे आहे की व्यासंगाने आपण त्यांचे वाचन व अभ्यास करत नाही.
प्रश्न - अनुवादित साहित्याच्या बाबतीत लोकांच्या पुढे अनुवादाचं योग्य स्वरूप आणि तेही तात्काळ मिळण्यासाठी म्हणून आपण जे नवीन तंत्रज्ञान शिकतो आहोत त्या नवीन तंत्रज्ञानामध्ये उदाहरणार्थ 'गुगल'सारख्या सर्च इंजिनवर सर्व प्रमुख भारतीय भाषांच्या अनुवाद सुविधा उपलब्ध आहेत. पण तो अनुवाद वाचकांना भावतोच असे नाही. या परिस्थितीबद्दल आपण काय सांगाल?
उत्तर - या बाबतीत साहित्य अकादमीनी आणि नॅशनल बुक ट्रस्टनी एक काम केले आहे की त्यांची जी प्रकाशने आहेत ती आपल्या संकेत स्थळावर ईबुक अथवा पीडीएफच्या रूपात उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला आहे. ती आपण इंटरनेटवर वाचू शकतो, डाऊनलोड करून त्याची मुद्रित प्रत मिळवू शकतो. ही सर्व पुस्तके प्रमाण भाषेत आहेत नि त्यांची भाषांतरे प्रमाणित आहेत. आणखी एक काम अलीकडच्या काळात नॅशनल डिजिटल लायब्ररी (NDL) ने केले आहे. घटनामान्य २२ भाषातील उत्कृष्ट पुस्तके या ग्रंथालयाच्या संकेत स्थळावर वाचनासाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे २ लक्ष पुस्तके या घडीस वाचायला उपलब्ध आहेत. ही सर्व पुस्तके एकही पैसा खर्च न करता तुम्ही वाचू शकता, प्रत काढून घेऊ शकता. वाचन आता सोपे झाले आहे. पण वाचनाचा आळस वाढला आहे. वाचन दुर्मिळ नाही झाले. दोन लक्ष पुस्तके हाती येण्यात पुस्तकांची दुर्मिळता उरतेच कोठे? परत एकदा आपण वाचन संस्कृती विकासासाठी कंबर कसली पाहिजे. वाचन वेड, वाढावं म्हणून प्रयत्न व्हायला हवेत. ते प्रयत्न शाळांनीच केले पाहिजे. कारण वाचन संस्कार तिथे होतो. मला चांगले आठवते की मी इयत्ता ११वीला असताना आम्हाला इंग्रजीची दोन पाठ्यपुस्तके होती. एक होते रिडर नि दुसरे होते रॅपिड रिडर. रॅपिड रिडरची कल्पना अशी की विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकाचे स्थूल वाचन करावं. त्यावर प्रश्नही स्थूलच असत. फक्त पाहिले जायचे की तुम्ही ते वाचलय का? कांदबरीचा नायक कोण? कांदबरीची कथा कोणत्या देशाची आहे? असे जुजबी प्रश्न विचारून तुम्ही ते वाचले का हे पाहिले जायचं. इयत्ता ५ वीपासून स्थूल वाचनार्थ आपण पुस्तक देऊ लागू तर वाचनाचा छंद नव्या पिढीस जडेल. हा प्रयोग मराठी, हिंदी, इंग्रजी असा गैभाषिकही करता येईल. आपण जी भाषा सूत्र अभ्यासक्रमात स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने हे करता येणे शक्य आहे. एकविसावे शतक बहुभाषी आहे. एककाळ असा होता की लोक मानत की इंग्रजी ज्ञानभाषा आहे. असं आता काही राहिलेले नाही.
प्रश्न - पण सर, दुसरा एक महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो तो असा की तुमच्या पिढीपर्यंत खूप चांगल्या साहित्य कृती लोकांच्यापर्यंत आल्या. खेदाने म्हणावे लागते की तेवढ्या ताकतीच्या साहित्य कृती या दशकात पाहायला मिळत नाही. याबाबत तुमचं मत काय?
उत्तर - मला नाही असं वाटत. मला अजूनही असे वाटतं की मराठीत सकस लिहिलं जातं, हिंदी, बंगालीत सकस लिहिले जाते. नाही तर असं पहा की साहित्य आकादमीचे पुरस्कारच जाहीर करता आले नसते. साहित्य अकादमीचे जे पुरस्कार जाहीर होतात ते मान्य, अभिजात, सकस कृतीशिवाय जाहिरच होत नाहीत. साहित्य अकादमीच्या आजवरच्या निकालावरून तुम्ही नुसती नजर फिरवली तरी तुमच्या लक्षात येईल की एखाद्या भाषेत सकस कृती नसेल तर त्यावर्षी त्या भाषेला तो पुरस्कार दिला जात नाही.
प्रश्न - मग हे साहित्य सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं काय अपेक्षित आहे?
उत्तर - लक्षात असं येतं माझ्या की आपला चोखंदळपणा वाढला पाहिजे. शासनानी अलीकडच्या काळात ग्रंथालयांना अनुवाद बंद करायचा सपाटा लावलाय. ही अत्यंत दुःखद अशी गोष्ट आहे. ज्या देशामध्ये साहित्य, भाषा आणि संस्कृती विकसित असते तोच देश सुसंस्कृत मानला जातो. परत एकदा आपल्या शासनानी या सर्वांचा पुनर्विचार करायला हवा. शाळांचे अनुदान दिवसेंदिवस कमी होऊ लागलंय, सार्वत्रिक शिक्षण व सार्वत्रिक वाचन हा आपला कृतिकार्यक्रम व्हायला हवा. अलीकडच्याच काळात महाराष्ट्र शासनानी महाबळेश्वर आणि पाचगणमध्ये असलेल्या भिलार गावी ‘पुस्तकांचा गाव उभा केलाय. कल्पना काय आहे त्यामागे? लोकांनी जावे नि मनस्वी पुस्तके वाचावीत. ही फार सुंदर कल्पना आहे. हे ऑन द वे' नावाचे असेच गाव इंग्लंडमध्ये आहे. त्या धर्तीवर हे उभे केलेय. २६ छोट्या छोट्या कुटीसहश्य घरांमधून ग्रंथालयं विकसित केलीय. प्रत्येक घरात नव्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळतं. एका घरात कादंबरी तर दुसच्या घरात काव्य! तिस-या घरात आत्मकथा तर चौथ्या घरात तत्त्वज्ञान वाचायला मिळेल. समाधीसारखं वाचायच्या सोयी आता शासनाने केल्या आहेत. पर्यटकांनीपण केवळ देवधर्मामागचे पर्यटन सोडून शैक्षणिक, सांस्कृतिक, संग्रहालय पर्यटन, सामाजिक उपक्रमांचे पर्यटन असे पर्यटनाचे जे नवे प्रगल्भ प्रकार आहेत ते रूढ व्हायला हवेत. अलीकडे असं मानलं जाते की 'Seeing is reading' पहाणपण वाचनच आहे. म्हणजे एक साधी गोष्ट पहाना, ‘सुजाणांना माणसं वाचता येतात' असे मानले जाते ना? मग का नाही पुस्तके वाचायची? असा प्रश्न आपणास पडायला हवा. आपण का नाही सुजाण व्हायचे?
प्रश्न - सर, तुम्ही वाचनालयांच्या स्थितीबद्दल म्हणालात की अनुदान आखडलंय परंतु विद्यापीठ स्तर असेल किंवा महाविद्यालयीन स्तर असेल वाचनालयामध्ये प्रवेश करणारा विद्यार्थी किंवा जो वाचक म्हणून वाचनालयात जातो, तो सर्व गोष्टी तिथे सुखरुपपणे हाताळू शकतो असं वाटतं का तुम्हाला?
उत्तर - हो. आता सर्व ग्रंथालयातून मुक्तद्वार योजना Open Access System ची अंमलबजावणी झालेली आहे. प्रश्न आहे तो आपले पाय तिकडे लीलया वळत नाहीत. आपल्या जीवनाचे प्राधान्यक्रम Priorties बदलले आहेत. एकविसावे शतक हे भौतिक संपन्नतेनचे शतक मानले जाते. हे शतक बौद्धिकतेचा शाप घेऊन जन्माला आलेले आहे. आपण त्यावर खल करायला हवा. नव्या पिढीत वाचनाची सवय लावण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. आता जी आपल्या नातवंडांची पिढी आहे, त्यांच्या हातात आपण मोबाईल दिला. मोबाईलवर आपण त्यांना गेम डाऊनलोड करून देतो. पण याच मोबाईल्समध्ये पुस्तके पण डाऊनलोड करता येतात. याच मोबाईलवर टॉकिंग बुक्स देता येतात. याच मोबाईलवर परिकथा देता येतात, चांदोबा वाचायला देता येतो. आपण तसा द्रष्टा वापर नाही करत मोबाईल्सचा दृष्टी ठेवून साधनांचा वापर याचा अभाव आपल्याकडे आहे. ती प्रगल्भता आपण जोपासायला हवी.
प्रश्न - म्हणजे सुसंस्कृतपणा वाढवायचा असेल तर वाचनाच्या संस्काराकडे महत्त्वा देण्याची गरज आहे, असेच तुम्हाला सुचवायचे, सांगायचे आहे ना?
उत्तर - वाचन हे मुळात अनुकरणाने मुलांमध्ये रुजते. मोठ्या लोकांचे वाचन बंद झाले आहे. त्यामुळे लहान लोकांचं वाचन आखूड झाले आहे. मोठ्यांनी परत एकदा वाचनाचा परिपाठ सुरू केला पाहिजे.
उत्तर - सर, तर निश्चितपणे वाचताना चालना मिळेल अशी आपण आशा करूया. आपण इथे आला. “भारतीय भाषा आणि साहित्य' जास्तीत जास्त किंवा इतर भाषांमधील साहित्य सर्वाच्यापर्यंत पोहोचावे. अनुवादित साहित्याचं महत्त्व तुम्ही इथे सांगितलेत. ख-या अर्थाने वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. निश्चितपणे आपणास असे म्हणता येईल की भाषा आणि साहित्य याची सांगड या पद्धतीने आपल्याला घालता येईल. सर, तुम्ही एक पुस्तक नुकतेच त्या दृष्टीने लिहीले आहे - ‘भारतीय भाषा व साहित्य' नावाने लिहिलं आहे. त्यात आपण हाच दृष्टिकोन मांडला आहे का?
उत्तर' - भारतीय घटनेने ज्या २२ भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिली आहे, त्या भाषा, साहित्य नि लिपींचा परिचय यात करून देण्यात आला आहे. या पुस्तकात यांचा परिचय अशा अंगाने करून देण्यात आला आहे की त्यातला कोणत्याही भाषेवरील लेख तुम्ही वाचाल तर तुम्हास त्या भाषेची सर्वांगीण माहिती, उत्कृष्ट साहित्य मिळेल व तुम्हाला नवी जिज्ञासा निर्माण होईल. प्रश्न - सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे रॅपिड रिडर आहे तर...
उत्तर - हो, हे रॅपिड लँग्वेज रिडर' आहे. सर्व भाषा परिचय पुस्तक आहे हे! समरोप - या पुस्तकाचा लाभ घेऊन इतर भाषांमधील जे समृद्ध साहित्य आहे, ते वाचण्याचा प्रयत्न सर्व सामान्यपणे आपण करूया तरच तुमचा हा उपक्रम ख-या अर्थाने यशस्वी होईल.
डॉ. लवटे - मला त्याची आशा आहे नि खात्रीपण!
निवेदक - सर, निश्चितपणे त्याला यश येईल. आज तुम्ही येथे आलात आणि ‘भारतीय भाषा व साहित्य' बद्दल माहिती दिली त्याबद्दल आभार.
नमस्कार!
धन्यवाद!!
• प्रक्षेपण : ११ नोव्हेंबर २०१७
• रात्री ८.१५ वा
• आकाशवाणी केंद्र, कोल्हापूर
________________
केंद्र «
प्रक्षेपण सूची अ. भाषणाचा आकाशवाणी दिनांक प्रक्षेपण क्र. विषय वेळ भाषणे संस्कार संजीवनीचे कोल्हापूर - वरदान संध्याछाया भिवविती कोल्हापूर ३० सप्टेंबर सकाळी हृदया २00२ ७.४५ ३. इच्छाशक्ती वापरूया कोल्हापूर २ मे, ०२ दु. २.३० ४. आजी-आजोबांशी मैत्री कोल्हापूर १६ ऑ. सकाळी २0 0 0 ७.४५ साने गुरूजी : सांगली २२ मार्च, सायं. माणुसकीचा गहिवर । १९९९ ४.१५ ६. कालची आणि आजची कोल्हापूर १८ ऑक्टो. रा. ८.१५ दिवाळी १९९८ पिढीतील अंतर आणि सांगली ५ नोव्हेंबर रा. ९.१५ कौटुंबिक स्वास्थ्य ८. क्रांतीकारी मंगल पांडे सांगली २६ मे, रा. ८.३० ९. महात्मा ज्योतिबा फुले : सांगली २७ नोव्हेंबर सकाळी जीवन व कार्य १९८८ ९.00 १०. स्वातंत्र्याच्या चार | सांगली १३ सप्टेंबर सकाळी दशकातील हिंदीचा विकास १९८७ ९.0 0 ११. बालगुन्हेगारी : एक सांगली ३0 मार्च रात्री सामाजिक समस्या । १९९० ८.३० १२. हिंदी भाषेचा मराठी। | सांगली २४ जुलै, रात्री साहित्यावरील परिणाम १९८५ ८.१५ १३. श्री चक्रधर स्वामींची सांगली १७ नोव्हेंबर रात्री समानता १९८३ ८.१५ १४. महानुभाव पंथ आणि सांगली ३ नोव्हेंबर सकाळी एकात्मता १९८२ ६.५०
. आकाश संवाद/१३० ________________
चिंतन १५. संत कबीराचा सांगली आचारधर्म । १६. बालकांचे हक्क कोल्हापूर १७. सण आणि सांगली सांप्रदायिक सद्भाव । १८. अनाथांचा अंत्योदय सांगली ११ डिसेंबर १९९४ |६ ऑगस्ट १९८७ ७ मे, १९८६ २१ मे, १९८६ सकाळी ६.५0 रात्री ८.१५ सकाळी ६.५० सकाळी ६.५० सकाळी ६.५० सकाळी ६.५० सकाळी ६.५0। १९. निष्काम कर्मयोग सांगली सांगली एप्रिल, २०. विवेक व विज्ञानाची गुढी २१. प्रार्थना | सांगली २०१२ १५ मे, २0 0२ १३ ऑगस्ट १९८७ । आगस्ट सकाळी २२. सणांमागील सांगली सामाजिक जाणीव । २३. राष्ट्रभाषेचे महत्त्व सांगली ७ मे, ६.५० सकाळी ६.५० १९८६ मुलाखती १. जतन साक्षरता कोल्हापूर २. शिक्षणाची नवी कोल्हापूर दिशा ३. भारतीय साहित्याचा कोल्हापूर ८ एप्रिल, २०१६ १३ डिसेंबर २०१६ ११ नोव्हेंबर २०१७ सकाळी ९.३० रात्री ९.३० रात्री ८.१५ प्रसार आकाश संवाद/१३१ डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा
१. | खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन) |
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती | |
२. | भारतीय साहित्यिक (समीक्षा) |
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती | |
३. | सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह) |
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती | |
४. | वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती | |
५. | एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती | |
६. | कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२०० /तिसरी आवृत्ती | |
७. | प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती | |
८. | दुःखहरण (वंचित कथासंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती | |
९. | निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१०. | शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती | |
११. | आकाश संवाद (भाषण संग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती | |
१२. | आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह) |
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती | |
१३. | एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१४. | समकालीन साहित्यिक (समीक्षा) |
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१५. | महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती |
१६. | वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१७. | नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती | |
१८. | भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा) |
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती | |
१९. | मराठी वंचित साहित्य (समीक्षा) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती | |
२०. | साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती | |
२१. | माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती | |
२२. | वेचलेली फुले (समीक्षा) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती | |
२३. | सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती | |
२४. | वाचावे असे काही (समीक्षा) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती | |
२५. | प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती | |
२६. | जाणिवांची आरास (स्फुट संग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती | |
आगामी | |
● | भारतीय भाषा (समीक्षा) |
● | भारतीय साहित्य (समीक्षा) |
● | भारतीय लिपी (समीक्षा) |
● | वाचन (सैद्धान्तिक) |
* | वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन |
◼◼