आर्य केकावली
<poem>
श्रीमत्करुणामृतघनरामस्मरणानंदित भक्तमयूरकेकावलि
श्रीरामा ! तू स्वामी अससी माज्या शिरावरी जागा; ।
आम्हांसि तुज्या पायांवाचुनि निर्भय नसे दुजा जागा ॥१॥
बहु जन्म विसरलो तुज, परि तू आम्हासि विसरला नससी ।
अंतर्बाह्य कृपाळा ! सर्वा जिवांसि वेष्टुनी अससी ॥२॥
कल्पद्रुम तू रामा ! ज्याची जसि भावना तसा फळसी; ।
भोगिति दुःखे जीव स्वगुणे तू निर्दयत्व नातळसी ॥३॥
"सत्संगती धरावी, सच्छास्त्रश्रवण आदरेचि करा," ।
म्हणसी, ’मग मी बुडतां देइन भवसागरी तुम्हांसि करा." ॥४॥
सत्योपदेशवाक्ये तुजी असी ऐकिली; परंतु मन ।
आटोपेना रामा ! म्हणुनि तुला करितसे सदा नमन ॥५॥
आता प्रभो ! दयाळा ! मज दीनावरि करूनिया करुणा ।
स्वपदाब्जी मन्मानसभृंग रमो उगउं दे कृपा अरुणा ॥६॥
नाही सहाय तुझिया नामाविण निपुण मज जगत्रितयी; ।
त्वन्नाम मित्र जेव्हा, सत्संग घडे त्रिलोकमित्र तयी ॥७॥
म्हणउनि नाम तुजे या मुखात राहो सदाहि मधुरतम, ।
रत मन जेथे मुनिचे ज्यांचे गेले समस्त दूर तम ॥८॥
उद्धरिला जो पापी पुत्रमिषे नाम घे अजामिळ तो, ।
तारी हाहि जन तसा, दंभेहि जरी पदी तुजा मिळतो ९
अपराध फार केले, परि आतां हात जोडिले स्वामी ! ।
करुनि दया तारावे; आवडि वाढो सदा तुजा नामी ॥१०॥
सेवक तुजा म्हणवितो, श्रीरामा राघवा सख्या म्हणतो; ।
होसी उदास तरि हो, होत नसे मी उदास आपण तो; ॥११॥
संसारसागरी तू तारक ऐसेचि संत वदतात; ।
वदता तदीय नामे देतो दासांस तो स्वपद तात ॥१२॥
ऐसे औदार्य तुजे प्रभुत्व करुणाकरत्व ऐकोनी ।
आलो शरण स्वामी ! जोडुनिया हस्त मस्तकी दोनी ॥१३॥
पाये मज दीनाला रामा ! लोटू नकोचि बा ! दूर ।
उद्धरिले बहु पापी, याविषयी तू रघूत्तमा ! शूर ॥१४॥
क्लेशाक्रांतस्वांत श्रीरामा ! तुज जरी न विसरेल, ।
तरि भय नसेचि काही, साराही क्लेशतापहि सरेल ॥१५॥
आम्हांसि नाम मात्र क्लेशाब्धीमाजि नाव हे ठावे; ।
गावे तेचि प्रेमे, स्वबिरुद रामा ! तुवांहि गांठावे. ॥१६॥
केवळ भजनाचिकडे जरि ठेविसि दृष्टि तरि नसे थारा, ।
आपलिया थोरपणावरि ठेउनि दृष्टि दीन हा तारा ॥१७॥
स्वामी ! आम्ही दुर्बळ, तू रघुवीरा ! समर्थ यासाटी ।
देवुनि अभय कराते ने स्वस्थानासि, शुद्ध यश थाटी ॥१८॥
धाव समर्था ! सदया ! भवपंकामाजि बुडतसे गाय ! ।
निकटस्था ! धर्मज्ञा ! कौतुक अद्यापि पाहसी काय ? ॥१९॥
करुणाघन तू माथा, जाळितसे मज मृगास भववणवा. ।
वृष्टि न करिता, होता उदास हे योग्य तूज न सकणवा ! ॥२०॥
संकट वारुनि रामा ! निजगुणकीर्तन करावया योजी ।
आपलिया थोरपणे रामा ! मजला स्वकिंकरी मोजी ॥२१॥
तू जरि न पावसी तरि पाचारू संकटांत मी कवणा ? ।
श्रवणारूढ करुनि हे विनती रक्षी मला पदप्रवणा ॥२२॥
सीतापते ! रघुपते ! विश्वपते ! भूपते ! वदान्यपते ! ।
इंद्रादिकीर्ति तुझिया कीर्तिपुढे तुच्छ सर्वथा लपते ॥२३॥
सोडविले सुर सारे रावणकारागृहांतुनी देवा ! ।
जे तत्सेव्यहि त्याची करीत होते तदाग्रहे सेवा ॥२४॥
देवस्त्रीही दासी केल्या होत्या दशानने दुष्टे ।
त्या सोडवूनि त्यांची चित्ते केली तुवांचि संतुष्टे ॥२५॥
गंधर्वी तुज गावे ते त्याणे लाविले निजस्तवना ।
तव नामधारकाते सोडविले त्वा करूनिया अवना ॥२६॥
त्वच्चरणार्चनतत्पर मुनि वनवासी दशाननत्रस्त ।
त्यास सुखविता जाला प्रभो ! तुजा अभयदानपटु हस्त ॥२७॥
त्वद्भक्त शुद्धकर्मा बिभीषण प्राज्ञ रावणे छळिला ।
येता शरण तुला, त्वा ह्रदयी स्वभुजि धरूनि आवळिला ॥२८॥
वाळीने स्त्री हरिली, मारिलही आपणासि या त्रासे ।
सुग्रीव शरण आला तुज, तो त्वां रक्षिला अनायासे ॥२९॥
ब्रह्मांदिकासि दुर्लभ पदरज ज्याचा अलभ्य तू ऐसा ।
शबरी वर्णादिगुने न बरी तिस पावलासि तू कैसा ? ॥३०॥
गुहनाम निषादपती स्वभक्तिसंपन्न त्यास बंधुपणे ।
त्वां मानिले दयाळा ! दासांचे नाशितोसि ताप पणे ॥३१॥
चरणविलोकनतत्पर वानर आप्तांत राघवा ! गणिले; ।
साधुद्वेषी जे जे कुळतरु त्यांचे समूळही खणिले ॥३२॥
गौतमपत्नी गिळिली होती जे पापतापशापाही ।
ते उद्धरिली जैसी, मज निजकरुणालवे तशा पाही ॥३३॥
रक्षोभीतीपासुनि गाधिजमख रक्षिला जसा राया ! ।
हो सिद्ध तसा संकट मज दीनाचेहि आज साराया ॥३४॥
दंडकवन खळ मर्दुनि निर्भय केले जसे प्रतापाने, ।
गतभय हा शीघ्र करी, जाला बहु विकळ विप्र तापाने ॥३५॥
आलो म्हणुनि शरण तुज, सहजदयेचाचि पूर्ण सागर तू ।
तुजविण कवणा ठायी तापोपशमार्थ आज सांग रतू ? ॥३६॥
तू बाप माय बंधू धणी सुह्रन्मित्र जानकीजाने ! ।
करुनि दया विलयाला अति सत्वर संकटास माजा ने ॥३७॥
श्रीरामा ! सुखधामा ! पावननामा ! स्वभक्तविश्रामा ! ।
कामारिगीतकीर्ते ! करुणामूर्ते ! नको त्यजू आम्हा ॥३८॥
रामा ! धाव, रघुपते ! धाव, विभो ! धाव, राघवा ! धाव; ।
कौतुक काय पहासी आळविता यापरी तुजे नाव ? ॥३९॥
नाव तुजे नावचि या संसारांभोधिला तरायासी, ।
ते ह्रदयी धरुनीही मी का अद्यापि सांग आयासी ? ॥४०॥
या दीनाने आतां पसरावा पदर सांग कोणाला ? ।
तूजा प्रताप बसला लपोन जाऊनि काय कोणाला ? ॥४१॥
जरि दास पराने हा अपराधवीण दंडिला, राजा ! ।
हे अश्र्लाघ्यचि तुजला, नृपनीति तुम्ही मनी विचारा जा ॥४२॥
तुज दीनबंधु म्हणती, म्हणउनि मी दीन मारितो हाका; ।
हा काय दीन लटिका, जे कां निजबंधुता तुम्ही टाका ? ॥४३॥
दीनास संकटी जरि सहाय होशील योग्य हे तूते; ।
आळस न करी माज्या स्वरक्षणाते सुकीर्ति हे तूते ॥४४॥
दीनाने किति सद्गुणहीनाने विनविले तुला आजी, ।
बा ! जीवदान दे गा ! प्रभो ! उपेक्षा करू नको माजी ॥४५॥
ह्रद्गत तुजला कळते ह्रदयस्था राघवा ! जगज्जनका ! ।
जन काय तत्व जाणे ! प्रभो ! उपेक्षा करूचि आज नका ॥४६॥
सर्व लाभांहुनि बहु लाभ असे त्वत्पदांबुरुहभजनी, ।
मज नीतिज्ञा ? भजतां संकट न पडो दिजेचि अशुभ जनी ॥४७॥
अन्याय लेश नसता गांजिति उद्धृत हे तुलाचि कळो; ।
किकळोनि सांगतो तुज या दुःखे न मन आमचे विकळो ॥४८॥
कळिमाजि क्षुद्र नृप प्रजेसि देती धनार्थ बहु ताप ।
पापप्रसक्त लोभी न पाहती धर्म माय की बाप ॥४९॥
तू परि सर्वांचा पति शासनकर्ता उपेक्षिसी का हे ? ।
साहे उगेचि म्हणसी, माझे बळ येथ काय ते पाहे ? ॥५०॥
खळ जे हे सत्पीडक त्यांची तुज काय राघवा ! भीड ? ।
त्वद्दास तव समक्षचि गांजिति, येणे कसी न ये चीड ?॥५१॥
सिंहासमक्ष त्याच्या बाळाला जाचितील जरि कोले, ।
तरि मग अशास पंचानन मृगपति कोण जाणता बोले ? ॥५२॥
अपराधी सेवक तरि दंडावा स्वामिनेंचि, हे युक्त ।
उक्त श्रवण करुनिया करि मजला संकटांतुनी मुक्त ॥५३॥
श्रीरामचंद्र ! राघव ! रघुवीर ! असेंचि आळवीन तुला ।
संकट वारुनि घडवी माज्या हातूनि या महाक्रतुला ॥५४॥
एकान्ती त्वन्नामें गायिन मधुरस्वरे स्थिरस्वांते ।
संकट वारुनि द्यावे हे मज वरदान जानकीकांते ॥५५॥
या संकटाबरोबर वारी लोकेषणादि अनिवार्य ।
म्हणजे हा दास तुजा जाला लोकत्रयांत कृतकार्य ॥५६॥
अन्नाच्छादन देते दुसरे बा ! कोण सांग विश्वास ।
म्हणताति ’आयुरन्नं प्रयच्छति’ प्राज्ञ, तेथ विश्वास ॥५७॥
त्वद्गुणकीर्तन करितां लज्जा हे पापिणी धरू न गळा; ।
हे ताटकांतका ! हा परमार्थ इणेंचि बुडविला सगळा ॥५८॥
तुजला धरीन ह्रदयी म्हणजे लज्जा पळेलसे वाटे, ।
दाटेल प्रेम तयी शमेल ते ताटका तसी वाटे ॥५९॥
खळ हासतील तेही सोसाया सहनशीलता द्यावी; ।
लावीन मस्तक तुज्या पदी, तुजी भक्ति आत्मविद्या वी. ॥६०॥
त्वद्गुणकीर्तन करितां स्तंभादिक अष्टभाव उपजावे, ।
जावे अनात्मधर्म क्रोधादि मनोविकार वरजावे ॥६१॥
हा काम रामराया ! पुरवावा, कल्पवृक्ष तू साचा; ।
ज्ञाता सर्वगत प्रभु आत्मा प्रिय निर्निमित्त दासाचा ॥६२॥
मन हेचि फार इच्छी की आता सेवणे तुजे पाय, ।
तुजवाचुनि इतरांच्या भजनी मजलागि होय फळ काय ? ॥६३॥
केले म्या मनुजांचे आर्जव बहु चाटुकारही जालो, ।
परि तेथ ताप पावुनि पुनरपि तुजलागि शरण मी आलो ॥६४॥
प्रमदांत पावुनीया श्रम दात क्षुद्र विचकती की जे ।
त्यांची तशाच लोकी सेवा तुजला न जाणता कीजे ॥६५॥
दुर्व्यसनी धर्मरहित निरक्षर क्षुद्र त्यासि मी नमने ।
करुनि श्रमीच जालो, आलो तुज शरण आज दीनमने ॥६६॥
रामा ! शत्रुभ्राता आला तुज शरण त्यासि राज्यपद ।
लंकेचे अर्पियेले, कोण न वंदील ते तुजेचि पद ? ॥६७॥
शरण तरी तुज यावे, नमन करावे तुलाचि सुज्ञाने, ।
गावे तुजेचि गुण, बा ! सेवावे तुजचि मादृअगज्ञाने ॥६८॥
म्हणवुनि तुमचे नामचि राम असे हे मुखी सदा राहो; ।
हा ज्ञानहीन, दीन प्रसन्न होवूनि शीघ्र तारा हो ! ॥६९॥
प्रभुजी ! तुमचे सज्जन उदारपण वर्णितात बहुसाल, ।
सालसता मत्राणी धरिता, शब्दांत सर्व गवसाल ॥७०॥
आळचि घेवुनि मी शिशु आळवितो, निष्ठुरत्व दुर वाळी; ।
आळ निवारुनि माते, आळस टाकूनि धांव, कुरवाळी ॥७१॥
पाळक तू विश्वाचा, बाळ कसा तोंड पसरितो बा ! मी ।
व्याळकराळकठिनतर काळ कसा वारिसी न हा स्वामी ? ॥७२॥
तू करुणाघन रामा ! मी चातक पसरिले असे आस्य; ।
नामामृत कण न मिळे, तरि लोकी फार होतसे हास्य ॥७३॥
विश्वैकमान्य दशरथ, कौसल्या वीरसू सती धन्या ।
तत्पुत्र तू रघुपते ! उपमा तुजला तुजी; नसे अन्या ॥७४॥
ज्ञाता तू, दाता तू, त्राता तू, वीर धीर भर्ता तू; ।
जनपीडाहर्ता तू श्रीरामा ! मुख्य विश्वकर्ता तु ॥७५॥
ब्राह्मणरक्षणसक्षण दक्षिण क्षीणसद्यशोधाम ।
जलदश्यामल कोमल कलिमलहर हरमनोज्ञ रघुराम ॥७६॥
सुरवरमुनिवरनृपवरनुतगुणगण, वरद, परमसुखसदन; ।
त्रिभुवनसनवपटुभुज भवदवभयशमन रुचिरतरवदन ॥७७॥
ऐसे गायिन तुजला, हा माजा काम पूरवी वरदा ! ।
हर दासाचे संकट रामा ! भवसिंधुमग्नजनकरदा ! ॥७८॥
स्तुति करुनि तुजी तुजला आम्ही अज्ञान काय बा ! रिझवू ? ।
गावुनि अमृतगुणांते ह्रदयीचे ताप आपुले विझवू ॥७९॥
शेषप्राचेतसमुनिपराशरव्यासनारदर्षिशुकी ।
गाता गुण पार नसे, यांच्या येतील कोण अन्य तुकी ? ॥८०॥
परि भावे गुण गाता प्रसन्न होतोस तू असे ठावे ।
जाले सज्जनसंगे, प्रेम कसे ते मनात सांठावे ? ॥८१॥
शाहणपणे न रिझसी, मूर्खपणे न खिजसी, भले म्हणती; ।
प्रेमळ भलताहि असो, करिसी त्याची स्वसेवकि गणती ॥८२॥
होसी प्रसन्न भावे, देसी सर्वस्व आपुले भजका ।
सत्संगी बसतो मी, न कळे इतुकेहि राघवा ! मज का ॥८३॥
संतांच्या वदने मी आयिकिली बा ! तुजी जयि चरिते ।
त्यजुनि विषय मन केले भरावया गुणसुधा तयीच रिते ॥८४॥
साकेतपते ! रामा ! नाकेशनुता ! त्वदीय गुण गाता ।
हाकेसरिसा येवुनि हा केवळ दीन उद्धरी आता ॥८५॥
चापशरधरा धीरा आपद्ग्रस्तासि मज नको विसरू ।
या परम संकटी मी बा ! पदर दुज्यापुढे किती पसरू? ॥८६॥
आधार तू जनाचा, बाधा हरणार एक तू दक्ष ।
साधावया यशाते बा ! धाव, तुला नमस्कृती लक्ष ॥८७॥
जळदनिभा ! बळसिंधो ! खळमथना ! सूर्यकुळमणे ! कृपण !
मी विकळ जाहलो बहु; काय तुजे लोपले दयाळुपन ? ॥८८॥
मज भणगाला वरदा ! वर जरि करुणा करूनि देशील ।
तरि मानवती सज्जनमने जयाला असेचि दे शील ॥८९॥
विश्व तुज्याठायी, तू नामी, ते नाम साधुच्याचि मुखी ।
तत्संग दे मला, मग गुंतेना मी कदापि तुच्छ सुखी ॥९०॥
लक्षापराध घडले, रक्षावे परि तुला शरण आलो; ।
दक्षाध्वहरचिंत्या ! दक्षा ! मी मग्न संकटी जालो ॥९१॥
संग धरुनि विषयांचा भंगचि मन पावले, परी न विटे; ।
साधुसमागमभेषज साधुनि देशील तरिच मोह फिटे ॥९२॥
चित्त अनावर रामा ! वित्तस्त्रीपुत्रचिंतनींचि रते ।
मधुलिप्तक्षुरधारा चाटी ते जीभ तत्क्षणी चिरते ॥९३॥
निपटुनि विषय त्यजिता सुखमुख दृष्टी पडे, झडे ताप; ।
हे सत्य अत्यबाधित तेथे संताप जे स्थळी व्याप ॥९४॥
तनुनिर्वाहापुरता संग धरुनिही अनर्थ मज घडला ।
सावध तर्ही निसरड्या मार्गी विचकूनि दात मुख पडला ॥९५॥
शुद्धचरित्रा रामा ! युद्धपटुभुजा ! प्रबुद्धसेव्यपदा ! ।
उद्धवनिधे ! दयाळा ! उद्धरि मजला, नमीन तूज सदा ॥९६॥
शर्वप्रियसच्चरिता ! सर्वजगत्पाळका ! अगा बापा ! ।
पर्वसुधकरकररुचिगर्वहरस्मितमुखा ! हरी तापा ॥९७॥
नाना भये विलोकुनि पावतसे फार फार तनु कंपा; ।
शिर ठेविले पदांवरि, उशिर न लाव, करीच अनुकंपा ॥९८॥
मन हे घातक वेडे विषयव्याळासवे करी क्रीडा ।
पीडाहि पावते, परि सावध नोहे, न ते धरी व्रीडा ॥९९॥
या कोटग्या मनाला विषयी या काय वाटते गोडी ? ।
खोडी तुज्या प्रतापावाचुनिया राघवा ! न हे सोडी ॥१००॥
बहुसंख्य चपळमर्कटकटके आज्ञेत वर्तली नीट; ।
वीट न धरशील तरी माझे मन काय तुजपुढे धीट ? ॥१०१॥
श्रीसद्मी पदपद्मी होयिल मन भृंग, दाखवुनि पाहे; ।
लब्धसुदुर्लभविषय त्यजिल कसे ? बहु सतृष्ण सकृपा ! हे ॥१०२॥
दे अभयदान देवा ! सेवारत मी तुजा विभो ! भाट; ।
त्यजिता अनादराने करीन लोकात फार बोभाट ॥१०३॥
त्वच्चरणाराधन मी जाणत नाहीच लेशही इतर; ।
नाम्चि गातो, येणे प्रसन्न होवूनि अभय तू वितर ॥१०४॥
आहे प्रसाद मजवरि म्हणुनिच वदनासि येतसे नाम ।
हे जरि मुखा न येते, होता कैचा मनासि विश्राम ? ॥१०५॥
विकळमना मी जे की वदलो त्याची करी क्षमा आर्या ! ।
जे सहनशील दक्षिण कृपाळु विश्वार्ह बुध तदाचार्या ! ॥१०६॥
दुःख न रुचे, सुख रुचे, कर्मे करिता विवेकही न रुचे ।
अमृतफळ कसे देतिल पल्लवपाणी स्वकीय विषतरुचे ? ॥१०७॥
हे सर्व सत्य तोवरि जोवरि तुज शरण पातलो नाही ।
आताथोरपणासचि आपुलिया मात्र राघवा ! पाही ॥१०८॥
गंगेला जावुनिया गावखरीचा मिळे जयी वोढा ।
तयि ते न म्हणे, 'मागे हा कमळ शिवतसे; धरा वोढा ॥१०९॥
तू करुणाघन रामा ! भक्तमयूरासि तूचि सुख देशी ।
सन्निध असोनि बापा ! न करी या किंकरासि परदेशी ॥११०॥
विश्वंभरा ! भरवसा आहे या किंकरासि फार तुजा ।
जे योग्य ते करावे दीनजनोद्धारणैकदक्षभुजा ! ॥१११॥
हा दिन रामनंदन चकोर, तू चंद्रमा रमानाथा ! ।
दे चित्तस्वास्थ्य बरे, गायीन तुज्या यशोकिता गाथा ॥११२॥
बहु गोड गुण तुजे ते ऐकावे आदरे स्वये गावे ।
यावेगळे मनोरथ नसती ते तूज काय सांगावे ? ॥११३॥
सौमित्रे ! मजविषयी तू आर्यप्रार्थना करी काही; ।
भक्ति तुजी श्रीरामी बहु कथिले सत्यशीळलोकाही ॥११४॥
श्रीभरता ! राघवपदलाभरता ! अग्रजासि तू विनवी ।
मज दीनाला रक्षुनि साधावी सद्यशे असीच नवी ॥११५॥
शत्रुघ्ना ! भगवज्जनशत्रुघन ! राघवसि हे कळवी ।
माझे भवभय सारे रामनिदेशेकरूनिया पळवी ॥११६॥
माते ! सीते ! बायी ! प्रार्थावे नृपतिला तुवा आंगे ।
सुखदुःख तुला ठावे; मजविषई उचित ते स्वये सांगे ॥११७॥
भगवद्भक्त हनुमन् । साधो ! साधो यश प्रसिद्ध तुजे ।
मजसाठी रामाचे पाय धरी निजशिरी प्रतापिभुजे ॥११८॥
आंगे रिपुबळहर्ता,बाहुबळे ब्रह्मगोळउद्धर्ता ।
तू मारुते ! पुमर्था देशी रघुवीरसेवनसमर्था ॥११९॥
अद्भुत चरित त्रिजगी लोकोद्धारार्थ करि सुखे विभु जे ।
ते त्वच्चरितसखे बा ! त्वाही केले चरित्र तेवि भुजे ॥१२०॥
बहुसंख्य चपळमर्कटकटके आज्ञेत वर्तली नीट; ।
वीट न धरशील तरी माझे मन काय तुजपुढे धीट ? ॥१०१॥
श्रीसद्मी पदपद्मी होयिल मन भृंग, दाखवुनि पाहे; ।
लब्धसुदुर्लभविषय त्यजिल कसे ? बहु सतृष्ण सकृपा ! हे ॥१०२॥
दे अभयदान देवा ! सेवारत मी तुजा विभो ! भाट; ।
त्यजिता अनादराने करीन लोकात फार बोभाट ॥१०३॥
त्वच्चरणाराधन मी जाणत नाहीच लेशही इतर; ।
नाम्चि गातो, येणे प्रसन्न होवूनि अभय तू वितर ॥१०४॥
आहे प्रसाद मजवरि म्हणुनिच वदनासि येतसे नाम ।
हे जरि मुखा न येते, होता कैचा मनासि विश्राम ? ॥१०५॥
विकळमना मी जे की वदलो त्याची करी क्षमा आर्या ! ।
जे सहनशील दक्षिण कृपाळु विश्वार्ह बुध तदाचार्या ! ॥१०६॥
दुःख न रुचे, सुख रुचे, कर्मे करिता विवेकही न रुचे ।
अमृतफळ कसे देतिल पल्लवपाणी स्वकीय विषतरुचे ? ॥१०७॥
हे सर्व सत्य तोवरि जोवरि तुज शरण पातलो नाही ।
आताथोरपणासचि आपुलिया मात्र राघवा ! पाही ॥१०८॥
गंगेला जावुनिया गावखरीचा मिळे जयी वोढा ।
तयि ते न म्हणे, 'मागे हा कमळ शिवतसे; धरा वोढा ॥१०९॥
तू करुणाघन रामा ! भक्तमयूरासि तूचि सुख देशी ।
सन्निध असोनि बापा ! न करी या किंकरासि परदेशी ॥११०॥
विश्वंभरा ! भरवसा आहे या किंकरासि फार तुजा ।
जे योग्य ते करावे दीनजनोद्धारणैकदक्षभुजा ! ॥१११॥
हा दिन रामनंदन चकोर, तू चंद्रमा रमानाथा ! ।
दे चित्तस्वास्थ्य बरे, गायीन तुज्या यशोकिता गाथा ॥११२॥
बहु गोड गुण तुजे ते ऐकावे आदरे स्वये गावे ।
यावेगळे मनोरथ नसती ते तूज काय सांगावे ? ॥११३॥
सौमित्रे ! मजविषयी तू आर्यप्रार्थना करी काही; ।
भक्ति तुजी श्रीरामी बहु कथिले सत्यशीळलोकाही ॥११४॥
श्रीभरता ! राघवपदलाभरता ! अग्रजासि तू विनवी ।
मज दीनाला रक्षुनि साधावी सद्यशे असीच नवी ॥११५॥
शत्रुघ्ना ! भगवज्जनशत्रुघन ! राघवसि हे कळवी ।
माझे भवभय सारे रामनिदेशेकरूनिया पळवी ॥११६॥
माते ! सीते ! बायी ! प्रार्थावे नृपतिला तुवा आंगे ।
सुखदुःख तुला ठावे; मजविषई उचित ते स्वये सांगे ॥११७॥
भगवद्भक्त हनुमन् । साधो ! साधो यश प्रसिद्ध तुजे ।
मजसाठी रामाचे पाय धरी निजशिरी प्रतापिभुजे ॥११८॥
आंगे रिपुबळहर्ता,बाहुबळे ब्रह्मगोळउद्धर्ता ।
तू मारुते ! पुमर्था देशी रघुवीरसेवनसमर्था ॥११९॥
अद्भुत चरित त्रिजगी लोकोद्धारार्थ करि सुखे विभु जे ।
ते त्वच्चरितसखे बा ! त्वाही केले चरित्र तेवि भुजे ॥१२०॥
मजहूनि भक्त माझा समर्थ हे आपणाच वाचविले ।
त्वा संकटी असे शुचिजनास कथुनि स्वतत्त्व सूचविले ॥१२१॥
मच्छक्तिचे स्वरक्षक भक्त भले हे, धरासुताशोध ।
त्वा केला, वाचविली, हा कुशळालागि सुचविला बोध ॥१२२॥
तू तो राघव, राघव तो तू, तुम्हात तो नसे भेद; ।
सप्रेम भक्त देयचि, विधुप्रसादी समानदृग्वेद ॥१२३॥
आयास मदुद्धरणी लेश नको, सुलघु मी सदंघ्रिरज ।
द्रोण नव्हे, अचळ नव्हे, सहस्रमित ज्यात तुल्यसिंह गज ॥१२४॥
जेथ तुम्ही तेथुनि मज पहा कृपामृत रसार्ददृष्टीने,
ह्रतनिर्मितसृष्टीने शरणागतमरुसुधौघवृष्टीने ॥१२५॥
दृष्टिमृगी हीतुमची राघवपदरागमोहिता आहे ।
मज वीतरागरंका निजसुखभरमंथरा कसी पाहे ? ॥१२६॥
मन मात्र मला अणुला स्मरो, तरो तेव्हढ्याचि तद्यत्ने; ।
अणु परमाणुचि तारू ह्रत्पदिम्चा हे किजे कुशळरत्नें ॥१२७॥
मी विषयपिंड परवश घरोघरी मर्कटांस आप्त गणी ।
ह्मणुनि तरि तुल्यभावे पाहे, न तरी त्यजी गतासुगणी ॥१२८॥
संतांसि तरी प्रेरा, जडतारक ते तुम्हाहुनी न उणे ।
भूती बहु सदयह्रदय, पावविती सहज अखिल आत्मखुणे ॥१२९॥
भूते भगवंतचि ते संतचि, परि यात किति निजी लग्न ? ।
दिसती गृहस्थवेषे, परि सम्यक्न्यासपदसुखी मग्न ॥१३०॥
कोण्ही श्रीमन्नरदशुकादिकविमुनिपराशर व्यासी ।
हरिगुणसुधाकणाही जनसिंचनि पडियले सुहव्यासी ॥१३१॥
या चातकलक्षाचे सारस्वत तेचि जीवन प्राज्य ।
इतरहि जीवन इतरा, हे भीक बरी, नको बुचे राज्य ॥१३२॥
संती पंडितपंती अंती खंतीत चित्त या धरिजे ।
की देवा सरसनिरस न पाहता सकट शरण उद्धरिजे ॥१३३॥
हेचि अविद्या लंका, तेथ अहंकार दशमुख क्षुद्र ।
याचे दहन विखंडन जडजीवोद्धरणपटु सितसमुद्र ॥१३४॥
संत भगवंत साचे, परि भगवंतापरीस हे थोर ।
हे आंगे अंधाची यष्टी होताति थोर बहु थोर ॥१३५॥
कळिमाजि पुंडरीकक्षेत्री सितपक्षकार्तिकाषाढी ।
संत अमृतरस पाजुनि ह्मणती, घे हे प्रपा, रहा, वाढी ॥१३६॥
नीलमणिद्युतिभावितपीयूषरसह्रद प्रसन्न बरा ।
ताप शमे, तृप्ति गमे, चित्त रमे, उपरमे, सुसेव्य खरा ॥१३७॥
वैकुंठचि हे विठ्ठलपदमंडित पुंडरीकसुक्षेत्र ।
तेथे हरिगुणकिर्तन, येथेही तेच साश्रुजननेत्र ॥१३८॥
वृद्ध तपस्वी पितृपदसेवन सर्वस्व पुंडरीकमुनी ।
पितृभक्ति पूर्णकाम श्रीरामा दावितो उभा करुनी ॥१३९॥
गुरुसेवा सद्विद्या पढवाया राम पातला बहुधा ।
येणे प्यालेहि सुधा सुचला हितमार्गही सुधाच बुधा ॥१४०॥
आपण सेवा घेउनि पितृचरणी जोडिली पुन्हा बेडी ।
हा पितृभक्त रघुद्वह, कृष्ण नव्हे, बुद्धि नायके वेडी ॥१४१॥
रामत्रय त्यामध्ये मध्यम तो राम मी, असे हाते ।
धरुनी नितंबबिंबा दावी खुण रामचंद्र पाहा ते ॥१४२॥
वृत्ति यदृच्छालब्धे करा, स्मरा मज, धरा तनुसि हाती ।
मग मी आळिंगाया उभाच हे सुचवितो बुधव्राती ॥१४३॥
मध्ये कर मी ह्मणता, नरलोकी सत्क्रिया समाधाने ।
करुनी अन्नोदक द्या भूती आर्ती, स्वसिद्धि या दाने ॥१४४॥
विरहे करक्रियांच्या अकर्तृता पूर्णकामता सुचवी ।
करुणोत्कंठा दीनप्रोद्धारी हे उभ्यापणी रुचवी ॥१४५॥
तू तो येथेचि उभा, अंती आम्हासि ठेविशी कोठे ? ।
तरि आपल्या सख्याला पोटी ह्मणतो न बोलता ओठे ॥१४६॥
भक्तप्रेमाचा मी परम भुकेलो असे, असे कळवी ।
कटिवरि कर ठेउनिया उभा, खरा तर्क हा, न दुर्बळ वी ॥१४७॥
विषय पहाता सादर तरि जातो ह्मणुनिया उभा रुसतो ।
हितबोधग्रहणास्तव करुणाब्धि क्षोभला मला दिसतो ॥१४८॥
मी साक्षी, या सर्वी अखंड दंडायमान, लिप्त नसे ।
शरणागतास भेटे उभाउभी कळवितो स्वतत्व असे ॥१४९॥
प्रेमळ भक्तांही मज भेटावे कडकडूनि पोटभरी ।
कटि कर ठेवुनि भीमातटी उभा शुद्धभक्त्यधीन हरी ॥१५०॥
होती कैवल्याची कळिकाळी लूट, जे असी न कधी ।
मागेहि गोप्रतारी जाली सरयूंत एकवेळ तधी ॥१५१॥
सर्वस्वदान केले पात्री, क्षेत्री स्वमूर्तिसर्वस्व ।
न सरे अनंत लुटिता, सद्धन सदधीन लुटितसे विश्व ॥१५२॥
हे इंद्रनीळमणिच्या कांतिरसाचीच वोतिली मूर्ती ।
मन तृणकण लिगटतसे, तुम्ही बरी पाहिली खरी पूर्ती ॥१५३॥
हा विठ्ठल ठक, ठकिले ठक, ठक पडले ठकासि जे हरितो ।
नामचि देतो दाउनि निजार्थ, जनसंचितार्थ संहरितो ॥१५४॥
यासहि नामा ठकडा भेटे, मग यासि ठकविले तेणे ।
सद्गुण गाय सुनिपुणे वेधियला कृष्णसारसा जेणे ॥१५५॥
ऐसे भगवत्तत्पर सदयह्रदय संत पंत भेटावे ।
ते सच्छिक्षादाते मुमुक्षुबुद्धिसि होति नेटावे ॥१५६॥
सद्धृदयवशीकरण श्रीमत्सीतानिवास या मनुने ।
त्याच्या जपी असावे निरत सदा मी सचित्त वाक्तनुने ॥१५७॥
हे भरत! सुमित्रात्मज हे सीते ! माय आयका विनती ।
शिकवा साधुजनाला कैसी शरणागते करावि नती ॥१५८॥
तुम्ही वसिष्ठगाधिजमुजिमुखसच्चरणसेवनोद्युक्त ।
गुरुजनभजन शूभ जनी शिकवा, होयीन भवभयोन्मुक्त ॥१५९॥
श्रीमंदिरइंदीवर हे भ्रमरहित प्रसिद्ध तीर्थतटी ।
वृद्धांसि गमे सरयूनिटकट उभा राम निहितपाणिकटी ॥१६०॥
अंभोदसंनिभ सुभग भाविकजन भव्यभाग्यभर भोळा ।
भासे उभा शुभाशय शयविधृतनितंबबिंब हरि डोळा ॥१६१॥
निजपदजलजभजकजन जगात बहु पूज्य हरिसि की शिव ते ।
प्रत्युत्थान दिलेसे गुरुतर्कपदा अशा मती शिवते ॥१६२॥
श्यामळ विमळज्योति स्वयंप्रभ प्रकट चित्र तम हरिते ।
करिते तर्क असा मन, पतंग शमती विलोकिता हरिते ॥१६३॥
ताप शमे, तम नाशे या तेजे, हे विलक्षण प्रकट ।
वर्णे सुनीळ उज्ज्वळ मनःपतंगासि जीववी निकट ॥१६४॥
हा अवधूत विलक्षण सपरिग्रह आणिखी उदासीन ।
याणे या सत्क्षेत्री नाम्याची सोडिलीहि दासी न ॥१६५॥
हा बाळक नंदाचा वसुदेवाचा खरा दशरथाचा ।
कोणेक विरळ याते वदती तत्वज्ञ पति अनाथांचा ॥१६६॥
हा सुमणि मनश्चुंबक, विष्टपचिंतामणी, विषघ्नमणी ।
स्पर्शमणी, अमृतमणी, सुरमणी, चूडामणी, मणींद्रधणी ॥१६७॥
हा कल्पपादपाचा रोपा लसलसित कोवळा सोपा ।
याच्या ह्रदयी आहे खोपा, घेतात हंस सुखझोपा ॥१६८॥
गोरा नंद, यशोदा गोरी, वसुदेव दशरथहि गोरा ।
तत्सुत काळा का तू । भोळेजन ठकविसी ह्रदयचोरा ॥१६९॥
काळा का हे कळले मजला, तू नीळकंठकंठमणी ।
भोळ्या शिवे दिले तुज पुंडरिकाते रिझोनि साधुपणी ॥१७०॥
तू सोय जाणसी बहू, दीनाचा सोयरा खरा सुभगा ! ।
राखिसि लाज जनाची, हे संसारात जोडिले शुभ गा ॥१७१॥
जीवोद्धारी करुणा, श्रुतिनिष्ठांचीहि भीड वागविशी ।
वेषान्तरे कळित बहुजन तारिसि, साधनी न भागविशी ॥१७२॥
तू सज्जनशुकपंजर कंजरमणंशमणिवतंसपद ।
खळशमन बळशमनशरकर हर हरह्रदयहर विरक्तपद ॥१७३॥
भक्तमयूरदयाघन तू रामा ! भवदवार्तविश्रामा ।
साष्टांग नमन तुजला भुजललितानिजजना ! गुणग्रामा ॥१७४॥
इति श्रीमत्करुणामृतघनरामस्मरणानंदितभक्तमयूरकेकावलिः
श्रीरामपदार्पितास्तु ।
श्रीराम जयराम जयजयराम|
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |