<poem> आशंसाष्टक (वृत्त्माल्यभारा )


तव पादसरोरुही स्वचितभ्रमराते रस चाखवूनि गोवू; ।

तुज भक्त तुजे सदैव गाती, मृग आम्ही गुणगीतसक्त होवू ॥१॥

मज वाटतसे सभाग्य मोठे, भगवद्भक्त तयात म्या जुडवे’ ।

तदधीन तुज्या यशःसुधेचा र्‍हद गंभीर, तयामधे बुडावे ॥२॥

तुज वर्णिति संत संगमुक्त प्रकृतिप्रेमळ, तद्भणी शिरावे ।

तुजिया गुणसागरात माजे मन हे सैंधव माधवा ! विरावे ॥३॥

गमते भगवज्जनप्रसंगे मज, टाकूनि गृहादिलोभ जावे ।

करुणावरुणालया मुकुंदा ! तुजला सादर सर्वदा भजावे ॥४॥

तुजला रघुनाथ रामचंद्र प्रभुजी यापरि नित्य आळवावे ।

मन चंचल हे, त्वदंघ्रिपद्मी जडता न क्षणमात्र चाळवावे ॥५॥

मन हे विषयी उडीच घाली, विष हे जाणुनि त्यावरी विटावे ।

तव कीर्ति उदार कामधेनू, तिस मी होउनि वासरू चिटावे ॥६॥

तुज एक अनेकभूतभेदी घटतोयार्क अशेपरी, पहावे ।

भजकार्पितभुक्तपादराजतुलसीदाम शिरी सदा वहावे ॥७॥

त्रिजगन्नयनप्रमोदहेतु त्वदुदारांघ्रिसरोज म्यां नमावे ।

मधुपत्व धरूनिया रमावे, स्वसुके त्या भुवनत्रयी न मावे ॥८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.