इहवादी शासन/भारतांतील इहवादी शासन
भारतांतील
इहवादी शासन
मागील तीन प्रकरणांत सोव्हिएट रशिया, मुस्लिम देश व पश्चिम युरोप येथील इहवादी शासनांचा विचार केला. आता भारतांतील इहवादाचा विचार करावयाचा आहे. तो करतांना प्रथम भारताच्या प्राचीन इतिहासाकडे लक्ष जाणें अपरिहार्य आहे. पश्चिम युरोपांतील इहवादाचा विचार करतांना प्रथम आपण युरोपचा प्राचीन इतिहास पाहून ग्रीसमधील इहवादाचा परामर्श घेतला. पाश्चात्त्य इहवादाचा तेथपर्यंत आपल्याला मागोवा लागला. भारतांतील इहवादाचा परामर्श घेतांना आपल्याला तेंच धोरण अवलंबिलें पाहिजे.
त्या दृष्टीने भारताच्या प्राचीन इतिहासाकडे पाहण्यापूर्वीच एक सिद्धान्त मनांत येतो. भारताचा प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली आहे. धर्म, विद्या, कला, कृषि, व्यापार, राजनीति, पराक्रम या सर्वच क्षेत्रांत भारताने उत्कर्षाचें शिखर गाठले होतें आणि ज्या अर्थी या भूमीने असा अभ्युदय पाहिला होता त्या अर्थी येथले शासन इहवादी असलेच पाहिजे, इतकेंच नव्हे तर येथल्या जनतेवरहि इहवादाचे संस्कार झाले असलेच पाहिजेत, हा तो सिद्धान्त होय. येथपर्यंत इहवादाचें जें विवेचन केलें आहे त्यावरून इहवादाची मूलतत्त्वें व त्यांचें महत्त्व जर वाचकांनी ध्यानांत घेतलें असेल तर वरील सिद्धान्त त्यांना सहज मान्य होईल असें वाटतें.
कर्माकर्माचा निर्णय करतांना, समाजोत्कर्षाची चिंता वाहतांना, प्रत्यक्ष इतिहास, देशकाल पाहून निर्णय करावयाचे; तसे करतांना अनुभव, तर्क, अवलोकन यांचा आश्रय करावयाचा, धर्मग्रंथांतील अंध सिद्धान्ताचें वर्चस्व मनावर येऊ द्यावयाचें नाही, हा साधारणतः इहवादाचा मथितार्थ आहे आणि तो ध्यानीं घेतां इहवाद व अभ्युदय यांत दृढ कार्यकारण संबंध आहे, हा सिद्धान्त कोणत्याहि देशाच्या इतिहासांत अबाधितच राहील, यांत शंका नाही. भारताच्या प्राचीन इतिहासासंबंधी तर असे निश्चित विधान करण्यास भरपूर प्रमाणें उपलब्ध आहेत.
परिस्थित्यनुरूप बदल
भारताचा इसवीसनाच्या नवव्या-दहाव्या शतकापर्यंतचा इतिहास पाहतां एक गोष्ट स्पष्ट दिसते की, त्या काळांत अखंडपणें नवे नवे धर्मशास्त्र रचलें जात होतें. निरनिराळ्या स्मृति या धर्मशास्त्र सांगण्यासाठीच रचल्या गेल्या. पूर्वी धर्म हा शब्द कायदा, दंडविधान या अर्थी वापरला जात असे हें ध्यानांत घेतां देश काल परिस्थिति पाहूनच त्या वेळीं कायदे केले जात असत हें उघड आहे; आणि केवळ श्रुतिवचना- वरून शब्दप्रामाण्य मानून कायदा न करतां परिस्थिति पाहून दंडशास्त्राची रचना करणें, हें तर इहवादाचें प्रधान तत्त्व आहे. कृत, त्रेता, द्वापर व कलि या प्रत्येक युगांत धर्म निराळा असतो, एके काळी जो धर्म असतो तो अन्य काळीं अधर्म ठरूं शकेल, हीं वचनें प्रसिद्ध आहेत. (महा. शां. ३६. ११) मनु, बौधायन, अत्रि यांसारख्या स्मृतिग्रंथांत जागजागीं देशकालाचें महत्त्व सांगितलेले आढळते. पूर्वीच्या स्मृतिकारांचें अमकें मत मला मान्य नाही, आता काळ पालटला आहे, तेव्हा तें त्याज्य मानले पाहिजे, असेंहि अनेक स्मृतिकारांनी निर्भयपणें म्हटलेले आहे. तेव्हा धर्म हा परिवर्तनीय आहे व नवें धर्मशास्त्र रचतांना, देश-काल-परिस्थिति पाहून तें रचलें पाहिजे, हा सिद्धान्त भारतांत प्राचीन काळीं धर्मशास्त्रज्ञांना मान्य होता यांत शंका नाही.
देश-काल पाहून नवे धर्मसिद्धान्त सांगावयाचे हें तत्त्व मान्य करतांच धर्मनिर्णय हे बुद्धीने करावयाचे असतात, त्यासाठी जुन्या धर्मग्रंथांतील वचनांवर अवलंबून राहणें युक्त नाही, धर्मशास्त्रांत मनुष्यबुद्धीला अवसर असला पाहिजे, हें दुसरें तत्त्व मान्य करण्यावांचून गत्यंतरच नसतें. प्राचीन पंडितांनीं तें भारतांत मान्य केलें होतें, हें आज सर्वमान्य झालेलें आहे. धर्मशुद्धि करणाऱ्यांनी, प्रत्यक्ष अनुमान व विविध शास्त्र यांचा आश्रय करावा असें मनूने स्पष्ट म्हटलें आहे (मनु. १२. १०५). महाभारतांत जागोजागी धर्मनिर्णय करतांना बुद्धीचा अवलंब करावा, तर्काचा आश्रय करावा, केवळ शास्त्रावरून निर्णय केला तर धर्महानि होईल, असें आवर्जून सांगितलेले आहे. प्रत्यक्ष या शब्दांत भोवतालची परिस्थिति व पूर्वेतिहास यांचा समावेश होतो.
प्राचीन धर्मचिकित्सक आपले मत प्राचीन इतिहासाच्या आधारे मांडत असत, असें ठायीं ठायीं दिसून येतें. राम, इंद्र, भीष्म, अर्जुन, भीम यांच्या तोंडी श्रूयते, श्रूयते हा शब्द वारंवार येतो. त्यांत इतिहासाचा आधारच अभिप्रेत आहे, हे उघड आहे. चाणक्याने तर धर्मग्रंथ, व्यवहार (कायदा), चरित (इतिहास) व राज्यशासन हे धर्माचे चार आधार आहेत, असें सांगून यांत विरोध आल्यास 'पश्चिमः पूर्वबाधकः' असें उत्तरोत्तरप्रामाण्य मानावें असा निर्णय दिला आहे. राज्यशासनाचां निर्णय धर्मग्रंथापेक्षाहि जास्त प्रमाण, असें म्हणणारा चाणक्य किती बुद्धिप्रामाण्यवादी असला पाहिजे हें सहज ध्यानांत येईल. शासनावर धार्मिक ग्रंथांचें, त्यांतील अंधसिद्धान्ताचें मुळीच वर्चस्व असतां कामा नये, हा त्याचा अभिप्राय येथे स्पष्ट दिसतो. इहवाद याहून निराळा काय असतो ?
शब्दप्रामाण्याचें तत्त्व हेंच खरें इहवादाला घातक असें तत्त्व होय. कुराण व बायबल या ग्रंथांच्याविषयीचें अंधप्रामाण्य त्या त्या समाजांच्या अपकर्षास कसें कारण झालें होतें, हें मागील प्रकरणांत अनेक ठिकाणीं दाखवून दिलेलें आहे. उत्तरकाळांत हेंच शब्दप्रामाण्य भारतांतहि रूढ झाल्यामुळे हिंदु धर्माचीहि अपरिमित हानि झालेली आहे. पण प्राचीन काळीं असें प्रामाण्य नव्हतें.
अंधप्रामाण्याला विरोध
वेद हे हिंदु धर्माचे पूज्य ग्रंथ होत याविषयी वाद नाही. पण मीमांसा- पंथाने जें सर्वंकष प्रामाण्य वेदांच्या ठायीं मानलें तें प्राचीनांना मुळीच मान्य नव्हतें. "वेदवाक्य प्रमाण मानून त्याखेरीज दुसरें कांही नाही असें म्हणणारे लोक मूढ होत", "हे अर्जुना, वेद हे केवळ त्रैगुण्याच्या गोष्टींनी भरलेले आहेत, तूं त्रिगुणातीत हो" हीं गीता-वचनें सर्वश्रुतच आहेत. "वेदांवरून धर्माचें संपूर्ण व निर्दोष ज्ञान होऊं शकत नाही, कारण वेदांत सांगितलेल्या गोष्टी, ते वेद ज्या युगांत झाले असतील त्याच्या नंतरच्या युगांत निरुपयोगी ठरतात" असें महाभारतकारांनी म्हटलें आहे (शांति, २६०- ७). स्मृति जशा भिन्न भिन्न काळी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे वेदांतील सूक्तेंहि भिन्न भिन्न काळी रचलेलीं आहेत, यावरून तीं मानवकृतच आहेत, आणि म्हणूनच वेदांचें अपौरुषेयत्व व प्रामाण्य फोल ठरतें, हें तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'धर्मस्वरूप-निर्णय' या आपल्या ग्रंथांत दाखवून दिलें आहे. त्या काळीं पाणिनी, पतंजली, सांख्यसूत्रकार, तत्त्वचिंतामणीकार यांसारखे थोर पंडित वेदांचें सर्वंकष अंधप्रामाण्य मुळीच मानीत नव्हतें हेंहि कोकजेशास्त्री यांनी 'वेदप्रामाण्य- विचार' या प्रकरणांत स्पष्ट केलें आहे. (धर्मस्वरूप निर्णय, पृष्ठे ४८-५०).
उपनिषत्कर्ते ऋषि व भिन्न दर्शनांचे द्रष्टे मुनि यांचीहि वेदांविषयी हीच वृत्ति होती, हें आज उपलब्ध झालेल्या इतिहासावरून निश्चित दिसतें. तेव्हा भारताच्या प्राचीन वैभवाच्या काळी येथले शास्त्रवेत्ते, तत्त्ववेत्ते, धर्माचार्य व इतर थोर पंडित हे शब्दप्रामाण्याच्या विकृतीपासून मुक्त होते असें ज्या अर्थी निश्चित म्हणतां येतें, त्या अर्थी त्या काळचें वातावरण बरेंचसें इहवादी होतें याविषयी दुमत होईलसें वाटत नाही.
धर्माची परिवर्तनीयता, बुद्धीचें, विवेकाचें प्रामाण्य, शब्दप्रामाण्याचा त्याग हीं इहवादाचीं लक्षणें आहेतच; पण सर्वांत महत्त्वाचें लक्षण म्हणजे प्रवृत्तिपरता हे होय. ऐहिक जीवनांतील उत्कर्ष, समृद्धि, वैभव यांची इहवादाला दुर्दम्य आकांक्षा असते. उद्योग, व्यापार, कृषि, राज्य, साम्राज्य, विश्वविजय यांविषयीची जबरदस्त ईर्षा, स्पृहा हा इहवादाचा आत्मा होय. हा ऐहिक उत्कर्ष साधावयाचा असतो म्हणूनच कुठल्या तरी जुनाट पोथींतल्या ताडपत्रावरच्या अक्षरांची जखडबंदी पराक्रमी पुरुष मानावयाला तयार नसतो. प्राचीन भारतांतले पुरुष असे पराक्रमी होते. त्यांना विश्वविजयाची आकांक्षा होती व त्यांनी तें स्वप्न प्रत्यक्षांत आणलें होतें हें आज इतिहाससिद्ध सत्य आहे आणि ते तसे कट्टे प्रवृत्तिवादी अभ्युदयाकांक्षी असल्यामुळेच त्यांनी आपलें जीवनाचें तत्त्वज्ञानहि इहवादाच्या पायावरच उभारलें होतें हेंहि तितक्याच निश्चयाने इतिहास सांगत आहे.
त्या प्राचीन पंडितांनी धर्माच्या ज्या व्याख्या केल्या आहेत त्यांवरूनच हा विचार स्पष्ट होतो. लोकांच्या प्रभवासाठी (उत्कर्षासाठी) धर्मनियम केलेले असतात, म्हणून प्रभवसंयुक्त म्हणून जें जें कांही असेल तो धर्म होय. धर्म हा लोकयात्रेसाठीच सांगितलेला असतो. अभ्युदय व निःश्रेयस यांची प्राप्ति ज्या योगें होईल त्यालाच धर्म म्हणतात. समाजाचें धारण त्याच्या आधारें होतें म्हणून त्याला धर्म म्हणतात. ज्या धर्माने अनेकांचा घात होतो तो धर्म नसून कुमार्ग होय. म्हणून समाजहिताशीं अविरोधी अशी जी कृति तीच धर्म होऊं शकते. धर्माची उपासना का करावी हें सांगतांना, त्यापासून अर्थ- काम प्राप्त होतात म्हणून त्याचें सेवन करावें असें वेदव्यास म्हणतात. या व्याख्या पाहिल्या म्हणजे त्या रचणाऱ्या पंडितांच्या मनाचा सगळा रोख ऐहिक उत्कर्षाकडे होता, समृद्धीकडे, वैभवाकडे होता याविषयी शंका राहत नाही.
महाभारतांतील विवेचन
महाभारतांत धर्म, अर्थ व काम यांच्या महत्त्वाविषयी युधिष्ठिर, विदुर, अर्जुन, भीम यांच्यामध्ये झालेल्या वादविवादाचा वृतान्त दिलेला आहे. त्यावरून अर्जुन व भीम हे कडवे इहवादी होते, असें दिसून येतें. विदुराच्या मतें धर्म हा सर्वश्रेष्ठ असून अर्थ व काम गौण होत. त्यावर आक्षेप घेऊन अर्जुन म्हणाला, "ही कर्मभूमि आहे. येथे प्रपंचाचा उद्योग हा सर्वांत महत्त्वाचा होय. तेव्हा कृषि, गोरक्ष्य, वाणिज्य व विविध कला या समृद्धि साधनांचेंच येथे जास्त महत्त्व मानले पाहिजे. कारण त्यां पासून अर्थप्राप्ति होते आणि अर्थावांचून धर्मसाधना अशक्य आहे. अर्जुनाला महाभारतांत अर्थविशारद म्हटलें आहे. त्याने आपला पक्ष मांडतांना निक्षून सांगितलें आहे की, "इंद्रियनिग्रही वैराग्यशील पुरुष, भगवीं वस्त्रे नेसून राहणारे विद्यासंपन्न पुरुष, हेहि अर्थप्राप्तीची इच्छा धरतात, आस्तिकांना धन हवें असतें, नास्तिकांना हवें असतें. फक्त अज्ञ व मूढ लोकांनाच अर्थाचें श्रेष्ठत्व आकळत नाही."
भीमाचें मत याहिपेक्षा लक्षणीय आहे. तो म्हणतो, "धर्म, अर्थ व काम यांत काम हाच श्रेष्ठ होय. ज्याला कसलीहि कामना नाही, इच्छा नाही तो मनुष्य अर्थाची उपासना करणार नाही. एवढेच नव्हे तर धर्माचीहि करणार नाही. कशाची तरी कामना असते म्हणूनच ऋषि तप आचरतात, उपासना करतात व देह झिजवतात. कांही आकांक्षा असते, काम असतो म्हणूनच पंडित वेदांचा अभ्यास करतात. व्यापारी, शेतकरी, गोप, कलाकार हे सर्व कामप्रेरित होतात म्हणूनच उद्योग करतात. लोक समुद्रपर्यटन करतात, विदेशगमन करतात तें कांही वासना त्यांना असतात म्हणूनच. ऐहिक कामावांचून कोणी उद्योग करणार नाही; धाडस, साहस करणार नाही. म्हणून काम ही प्रपंचाची मूल प्रेरणा आहे. अर्थ व धर्म तिच्या गर्भात असतात."
धर्मापेक्षा अर्थ-काम श्रेष्ठ होत असे सांगण्याइतकें विचारस्वातंत्र्य त्या काळी होतें, इतकेंच नव्हे, तर परमेश्वर, आत्मा यांना अस्तित्वच नाही असे प्रतिपादन करणारे जे दर्शनकार होते त्यांनाहि त्यांचें तत्त्वज्ञान मांडण्याचें पूर्ण स्वातंत्र्य होतें. सांख्यदर्शनाचा प्रणेता कपिल महामुनि हा नास्तिक होता. प्रकृति व पुरुष यांचा खेळ म्हणजे हा संसार होय, यापलीकडे परमेश्वर असें कांही तत्त्व नाही असा त्याचा सिद्धान्त होता. वैशेषिक दर्शनाचा कर्ता कणाद व मीमांसा दर्शनाचा जैमिनी हेहि नास्तिकच होते. चार्वाक तर याहि पलीकडे गेला होता. परमेश्वर, आत्मा हीं तत्त्वें तो मानीत नसेच; पण वैदिकांच्या तत्त्वज्ञानांतील मौलिभूत जो कर्मसिद्धान्त तोहि तो मानीत नसे. देह हाच आत्मा होय, असें त्याचें मत होतें. वेद हे भंड, धूर्त, निशाचर यांनी रचले आहेत, असें तो म्हणे. असे असूनहि त्याला इतरांच्या बरोबरच दर्शनकार ही प्रतिष्ठा मिळाली होती. विचारस्वातंत्र्याचा हा अगदी कळस होय.
असें स्वातंत्र्य होतें म्हणूनच या दर्शनकारांना सृष्टीची घडण, तिच्या घटकांचें पृथक्करण, ज्ञानाचा अधिगम करण्याच्या पद्धति, यांविषयी आजहि थोड्याफार प्रमाणांत मान्य असलेले सिद्धान्त प्रस्थापित करतां आले. भौतिक जडसृष्टीचें पृथक्करण करून तिचे मूलभूत पंचवीस घटक आहेत, हें सांख्यांनी शोधलेलें तत्त्व आहे. वैशेषिक व न्याय यांच्या प्रणेत्यांनी अणुवाद सांगितला आहे. वाक्यार्थ निर्णयाची 'उपक्रमोपसंहारौ' इत्यादि जीं तत्त्वें मीमांसकांनी सांगितलीं तीं आजहि कायदेशास्त्रांत उपयुक्त ठरतात. न्यायदर्शनकार गौतम याने भारतीय तर्कशास्त्राची प्रस्थापना केली. सृष्टीचा असा अखंड अभ्यास त्या काळी होत असे म्हणून त्यांतून रसायन, पदार्थविज्ञान, गणित, ज्योतिष, जीवशास्त्र, वैद्यक अशी शास्त्रे उदयास आली व भरतभूमीला अपूर्व असें वैभव प्राप्त झालें.
लोकायत्त शासन
प्राचीन भारतांत लोकशाही रूढ झाली होती असे मानणारी एक विद्वानांचा पंथ आहे. डॉ. जयस्वाल हे त्यांतील अग्रणी होत. त्यांचे सिद्धान्त सर्वमान्य झाले आहेत असें नाही, पण कोणत्या ना कोणत्या दृष्टीने ज्यांना लोकायत्त शासनें असें म्हणतां येईल अशी गणराज्ये दीर्घकाळपर्यंत भारतांत होतीं, याविषयी मात्र दुमत नाही. महाभारत, चाणक्याचें अर्थशास्त्र, बौद्धांचें अवदानशतक या ग्रंथांत याविषयी भरपूर पुरावा मिळतो. शिकंदराच्या स्वारीबरोबर आलेल्या ग्रीक पंडितांनीहि याविषयी निर्वाळा दिलेला आहे. शिकंदराशी सामना देणाऱ्या कठ, सौभूती, क्षुद्रक, मालव, शिबी, पटल इत्यादि लोकसत्ताक राज्यांची त्यांनी वर्णने केलीं आहेत. त्यांवरूनं ही शासनपद्धति भारतीयांना ज्ञात होती व ती त्यांनी अनेक ठिकाणीं प्रत्यक्षांतं आणली होती, याविषयी संदेह राहत नाही. आणि जर येथे लोकायत्त गणराज्यें नांदत होतीं हें मान्य केलें तर या भूमींत त्या काळीं इहवाद अत्यंत प्रभावी होता; हें ओघानेच मान्य करावें लागतें. कारण शब्दप्रामाण्यवादी, परलोकनिष्ठ, निवृत्ति- पंथीय, मौक्षैकदृष्टि लोक प्रजासत्ताक शासन कधीहि स्थापू शकणार नाहीत, चालवूं शकणार नाहीत.
वर वर्णिलेलें जें विचारस्वातंत्र्य, जीवनाविषयीचा जो उत्साह, धर्माच्या अनेक व्याख्यांतून दिसून येणारी जी लोकवादी दृष्टि तिच्यांतूनच लोकायत्त शासनाची कल्पना उदय पावूं व पोसूं शकते. हें ध्यानांत घेतलें, तर त्या काळांत केवळ वरच्या प्रतिष्ठित विद्याविभूषित वर्गापुरताच इहवाद प्रसृत झाला होता असें नसून, तें तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत जाऊन पोचलें होतें व रुजलेंहि होतें असें म्हणावें लागतें. भारतांत व्यापारसमृद्धि, साम्राज्यसत्ता व धर्मनीतितत्त्वें यांची प्रस्थापना करूनच न थांबतां येथले कर्ते, पराक्रमी पुरुष त्या ईष्येने सर्व विश्वांत संचार करीत होते, तो त्यावांचून कदापि शक्य झाला नसता.
धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार
भारतांतील प्राचीनकाळच्या इहवादाचें मोठें लक्षण म्हणजे धर्मसहिष्णुता हें होय. विचारस्वातंत्र्य आल्याबरोबर, विशेषतः आत्मा, परमात्मा या तत्त्वांबाबत वाटेल ते विचार मांडण्यास स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर धर्मस्वातंत्र्य व धर्मसहिष्णुता अपरिहार्यपणेंच येते. प्राचीन भारतांत, कांही अपवाद वजा जातां दीर्घकालपर्यंत धर्मसहिष्णुता नांदत होती याबद्दल आता कोणालाच शंका राहिलेली नाही. अशोक, खारवेल हे बौद्ध, जैन राजे तर धर्मसहिष्णु होतेच. पण सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट हे वैदिक धर्माचे एकनिष्ठ उपासक सम्राटहि सर्वधर्मसमानत्व मानून आपल्या भिन्नधर्मीय प्रजेला पूर्ण सहिष्णुनेते वागवीत हें मशहूर आहे. सातवाहन कुळांतला गौतमीपुत्र गोब्राह्मणांचा रक्षणकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. पण बौद्धयतींना त्याने व त्याच्या प्रजाजनांनी त्यांच्या योगक्षेमासाठी अनेक देणग्या दिल्याचे दिसून येतें. महाराष्ट्रांतील कार्ले, भाजे हीं लेणीं म्हणजे त्याचीच साक्ष होय.
मलबारच्या राजांनी याच काळांत ख्रिस्ती व यहुदी लोकांना आश्रय देऊन धर्मस्वातंत्र्याचे ताम्रपटहि दिले होते. मगधाच्या गुप्त घराण्यांतील राजांनी अश्वमेध करून अखिल भारतांत साम्राज्य स्थापन केलें होतें, पण त्यांतील कांही राजांनी बुद्धाच्या मूर्तीची स्थापनाहि केली आणि बौद्धांना मठहि बांधून दिले. सम्राट् हर्ष दर पांच वर्षांनी विश्वजित यज्ञ करून त्या प्रसंगी सर्वधर्मीयांमध्ये आपल्या संपत्तीची सारखी वाटणी करून टाकीत असे. चिनी बौद्ध प्रवासी ह्यू-एन्-त्संग यानेच या महोत्सवाचें वर्णन करून ठेवलेलें आहे. उत्तरकाळांतहि भारतांतील रजपूत, मराठे आदि राजांनी हें सहिष्णुतेचें व्रत अगदी निष्ठेने पाळलें होतें. ब्रिटिश सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर भारतांत लोकशाहीच्या तत्त्वांचा विचार सुरू झाला. त्या वेळी प्राचीन भारतांतील इहवादाची कसलीहि परंपरा अतूट राहिलेली नव्हती. बुद्धिप्रामाण्य नष्ट झालें होतें, विचारस्वातंत्र्य लोपलें होतें, धर्म हा परिवर्तनीय राहिला नव्हता, लोकशाहीची परंपरा तर नामशेषहि नव्हती. पण सहिष्णुतेचा वारसा मात्र भारतीयांनी टिकवून धरला होता. आजच्या भरतपुत्रांच्या राष्ट्रीय संसाराच्या योगक्षेमासाठी हें पैतृक धन शिल्लक राहिलेलें आहे हेंहि थोडकें नाही.
बुद्धिप्रामाण्य, परिवर्तनीयता, प्रवृत्तिपरता इत्यादि इहवादी तत्त्वांच्या आश्रयाने भारताला प्राचीन काळीं जें वैभव प्राप्त झालें होतें त्याचा इसवी सनाच्या नवव्या- दहाव्या शतकापासून ऱ्हासकाल सुरू झाला व बाराव्या शतकाच्या अखेरीस त्या वैभवाला संपूर्ण ग्रहण लागलें. इहवादाचा लोप हेंच त्याचें कारण होय. आरंभी भारतांत त्या काळी वैभव होतें त्या अर्थी इहवाद असलाच पाहिजे असें म्हटलें आहे, तेव्हा वैभव लयास गेलें त्या अर्थी इहवाद लोपला असला पाहिजे हें अनुमान सहजप्राप्तच आहे आणि तें खरेंहि आहे. त्या सुमारास भारतांत अंध-धर्म-सिद्धान्तांचे वर्चस्व सर्व जीवनावर प्रस्थापित झालें.
युरोपप्रमाणे भारतांत संघटित असें धर्मशासन केव्हाच नव्हते; पण या काल- खंडांत येथे जातिभेद अत्यंत बळावला होता. त्या जातींचें शासन हें युरोपांतल्या पोपच्या धर्मशासनापेक्षाहि कडक व समर्थ असें होतें आणि या सर्व जाति पोथिनिष्ठ धर्माच्या एकनिष्ठ अनुयायी होत्या. त्यांचें शासन सर्वंकष होते; पण युरोपांत धर्मशासन असेंच अंध व मदांध असूनहि तेथे त्याला आव्हान देऊन त्याच्या सत्तेवर घाव घालणारे अतिरथी- महारथी याच शतकांत निर्माण झाले. भारतांत तसे कोणी झाले नाहीत. त्यामुळे अनेक शतकें हा देश दुर्गतिपंकांत रुतून राहिला होता.
इ. स. पूर्व ६०० ते ८०० हा चौदाशे वर्षांचा कालखंड, त्यानंतरचा इ. स. ८०० ते १८०० हा हजार वर्षांचा कालखंड आणि इ. स. १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा कालखंड- भारताच्या इतिहासांतील या तीन कालखंडांची मानवी कर्तृत्वाच्या दृष्टीने तुलना केली तर काय दिसेल ? ही तुलना केली तर इहवादाचें मूर्त दर्शन आपल्याला घडेल. पहिला कालखंड म्हणजे भारताचें सुवर्णयुग होतें. दुसरा म्हणजे तमोयुग आणि तिसरा कालखंड जरी सुवर्णयुग नाही तरी, अरुणकांति- युग निश्चितच आहे.
पहिल्या कालखंडांत रामायण-महाभारत झालें; कालिदास-भवभूति झाले, नागार्जुन, आर्यभट्ट, वराहमिहिर, लल्ल, चरक, सुश्रुत हे शास्त्रज्ञ झाले. पाणिनी, पतंजली हे याच काळांतले. कपिल, कणाद, बुद्ध, महावीर यांचा हाच काळ होय. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, गौतमीपुत्र शातकर्णी, समुद्रगुप्त, सत्याश्रय पुलकेशी, हर्ष, राष्ट्रकुट, गोविंद हे सम्राट् याच काळांत होऊन गेले. चाणक्य हा एकच राजनीतिज्ञ आपल्या डोळ्यांपुढे आज आहे. पण त्याने पूर्वीच्या नीतिशास्त्रज्ञांची पंचवीस-तीस तरी नांवें दिलेलीं आहेत; आणि भारताच्या सुवर्णयुगासंबंधी लिहितांना, हेंच पावलो- पावली दिसत असतें.
प्रत्येक क्षेत्रांतील शेकडो नांवें आज विस्मृतींत गेलीं आहेत. वेरूळ, अंजठा, खजुराहो, घारापुरी यांचे शिल्पकार कोण, तें आपल्याला माहीत नाही. जगभर फिरून भारतांत सुवर्णाच्या राशि आणून ओतणारे व्यापारी- एकाचेंहि नांव आपल्याला ठाऊक नाही. त्या काळचे तानसेन, गंधर्व, उदयशंकर, गोपीकृष्ण यांचीं नांवें आपण विसरून गेलों आहोंत. रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक, उद्योग, प्रत्येक क्षेत्रांत त्या काळीं अनेकानेक संशोधक होऊन गेले, हें आज उपलब्ध झालेल्या इतिहासावरून स्पष्ट दिसते. पण आपल्याला त्यांची माहिती नाही. तरीहि त्या काळांत या भूमींत मानवी कर्तृत्वाला सर्व क्षेत्रांत अमाप बहर आला होता, यांत आता शंकेला जागा राहिलेली नाही.
कर्तृत्वाला ओहोटी
दुसऱ्या कालखंडाच्या आरंभींच नव्या स्मृतींची रचना बंद झालेली दिसून येते. म्हणजे धर्माची परिवर्तनीयता संपली. पुढच्या काळांत फक्त निबंधकार म्हणजे स्मृतींचे भाष्यकार झाले. त्यांनी मीमांसकांची समन्वयपद्धति अवलंबून बुद्धिप्रामाण्य संपुष्टांत आणलें. देश-काल पाहून आपल्या बुद्धीने स्वतंत्र धर्मशास्त्र रचावयाचें ही धमक, ही प्रतिभा, हें बुद्धिस्वातंत्र्य या हजार वर्षांच्या काळांत भारतांत कोणीह प्रगट केलें नाही. विचारस्वातंत्र्य लोपलें, हाच याचा अर्थ होय. याच्या जोडीला निवृत्तिवाद, संन्यासवाद आला आणि ऐहिक वैभवाच्या आकांक्षाहि हळूहळू मंदावल्या व पुढे सुकून गेल्या. अर्थातच मानवी कर्तृत्व हळूहळू मंदावलें व पुढे आटून गेले. या हजार वर्षांत राजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी कांही असामान्य राज्यकर्ते निर्माण केले व भारताच्या बहुतेक प्रदेशांत ज्ञानेश्वर, तुकाराम, तुळशीदास, कबीर यांसारखे कांही सत्पुरुष उदयास आले. झाले ! हिशेब संपला. गणित, रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक, ज्योतिष हे प्रांत कोरडे दिसतात. राजनीति नाही, व्यापार नाही, उद्योग नाही, कृषि नाही; शिल्प, नृत्य, नाट्य नाही; धर्मासाठी, व्यापारासाठी, साम्राज्यासाठी परदेशगमन नाही, इतिहास- कादंबरी- काव्य नाही; कपिल नाही, पतंजली नाही, नवें युद्धतंत्र नाही; युद्धशास्त्र नाही. व्यक्तिवाद नाही, राष्ट्रवाद नाही, लोकशाही नाही, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कसलीहि क्रांति नाही, म्हणूनच राजकीय क्रांति नाही. या सर्व पुरुषार्थाचा मूल स्रोत म्हणजे विचार-स्वातंत्र्य, व्यक्तित्व, मानवत्वाची प्रतिष्ठा- तोच लोपला होता. भीमाच्या म्हणण्याप्रमाणे कामच या भूमीत नव्हता. भव्य, समृद्ध ऐहिक जीवनाची आकांक्षाच नष्ट झाली होती. कर्तृत्व येणार कोठून ?
पाश्चात्य विद्या येथे येऊन ती आकांक्षा, तो काम पुन्हा जागृत होतांच ग्रीष्माच्या अखेर वाळून भाजून गेलेल्या सह्याद्रीच्या पहाडांवर मेघवर्षाव होतांच तेथे जशी उन्मेषाची नवी विरूढि फुटते तशी कर्तृत्वाची विरूद्ध या भूमींत फुटू लागली आणि दीड वर्षांच्या आतच तिने राममोहन, दादाभाई, रानडे, टिळक, रवींद्र, शरदबाबू, प्रेमचंद, रमण, जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद्र रॉय, नारळीकर, सावरकर, आंबेडकर, सुभाषचंद्र, भगतसिंह, विवेकानंद, रामकृष्ण, अरविंद, दयानंद, राधाकृष्ण, भांडारकर, मुनशी, मुजुमदार, टाटा, बिर्ला, व्ही. शांताराम, सत्यजित रॉय, उदय- शंकर, पलुसकर, शिल्पकार करमरकर असे केवळ भारतांतच नव्हे, तर जगालाहि मान्य व्हावे असे पन्नास एक पुरुष तरी सहज निर्माण केले. केवळ भारतीय कीर्तीच्या दृष्टीने पाहिलें तर ही कर्त्या पुरुषांची नाममालिका दीड-दोनशंपर्यंत सहज जाईल. कर्तृत्वाचा भाव- अभाव, इहवादाच्या भाव- अभावाशी किती निगडित आहे, हें यावरून सहज दिसून येईल.
अविवेकी जातिसत्ता
तमोयुगांत म्हणजे दुसऱ्या कालखंडांत भारतांतील कर्तृत्वाची जी हत्या झाली, ती अंध धर्माच्या सर्वंकष सत्तेमुळेच होय. युरोपप्रमाणे येथे धर्मसत्ता संघटित नव्हती हें खरें. पण येथील समाज- जीवनावर जातिसत्ता होती आणि ती धर्मसत्तेपेक्षाहि जास्त संघटित व तितकीच मूढ, अंध, क्रूर व अविवेकी होती. पोपच्या बहिष्कारापेक्षाहि तिच्या हातचें बहिष्काराचें, वाळीत टाकण्याचें शस्त्र फार भयंकर होतें. या जातिसत्तेला धर्मपीठांचा व राजसत्तांचाहि पूर्ण पाठिंबा असे. वर निर्देशिलेल्या मराठे, शीख यांच्या कर्त्या, ध्येयवादी, पुरोगामी राजांनी या जातिसत्तेला पाठिंबा दिला नाही. त्यामुळेच त्यांना कांही अंशी ध्येयसिद्धि करतां आली. पण हे सर्व अपवाद होत. एरवी जातींचे प्रश्न न्यायासनासमोर आल्यावर 'जुने मोडूं नये' याच कायद्याने निकाल होत असे. अशा रीतीने जातिसत्ता त्या युगात सर्वगामी, सर्वंकष व समर्थ झाली होती आणि तिनेच भारतीय जीवनातील क्रान्तिवृत्ति, व्यक्तित्वाचे उन्मेष, इहाकांक्षा– सर्व सर्व खुडून टाकले.
जातींचीं बंधनें हीं त्या काळी सर्वंकष बंधने होतीं आणि तीं धर्मशास्त्राच्या किंवा वेळोवेळीं पडलेल्या रूढीच्या आधारें जारी केली जात. पोशाख, खाणेपिणें, प्रवास, परदेश निवास, विवाहादि संस्कार, देवपूजा, धर्मविधि, सर्व जातिबंधनांनी जखडलेलं असे. कोणत्या जातीने कोणती पगडी घालावी, धोतर कसें नेसावें, गंध कसें लावावें, जानवें कसें घालावें, घालावें की घालूं नये, यांविषयी कडक दंडक असत. भक्ष्याभक्ष्याचे व पेयापेयाचे तर अनंत नियम असत आणि त्यांत जरा गलती झाली की, प्रायश्चित्त घ्यावें लागे. न घेतलें तर वाळीत टाकलें जाई. जातीच्या स्पर्शास्पर्शा- बद्दल, पंक्तिभोजनाबद्दल, सावली पडणें, आवाज ऐकणें, पाहणें यांबद्दल सख्त नियम होते.
धंदा-व्यवसाय, पोटाचा उद्योग यांचे नियम म्हणजे जाति-व्यवस्थेचा प्राण होता. कोणी कोणता व्यवसाय करावयाचा हें स्मृतिकारांनी लिहून ठेविलें आहे. पुढे रूढीने त्यांत अनेक बदल झाले. आणि अनेक ठिकाणीं 'शास्त्राद् रूढिः बलीयसी' असें होई. पण तें शास्त्र किंवा ती रूढि यांचे नियम दुर्लंघ्य होते. त्यांत प्रमाद झाल्यास बहिष्कार पडे आणि बहुसंख्यांनी प्रमाद केला असला, तर तेवढ्या लोकांची नवी जात होई.
रूढींचे दंडक
शास्त्र व रूढि यांनी घातलेले दंडक पाहिले म्हणजे एक गोष्ट ध्यानांत येते की, त्या दंडकांना तर्काचा, कार्यकारणाचा, बुद्धीचा कसलाहि आधार नव्हता व नाही. याने आडवें गंध लावावें व त्याने उभे, याने त्याची सावली घेऊ नये, याच्या पंक्तीला त्याने बसूं नये, अमक्याने कांदा खाऊं नये, तमक्याने मासा खाऊं नये, या जातीने तो उद्योग करूं नये, त्या जातीने हा करूं नये, या जातीचे धर्मविधि वेदोक्ताने व्हावे, त्या जातीचे पुराणोक्ताने- या सर्व नियमांचा समाजोत्कर्षाशीं कसलाहि संबंध नाही, ती दृष्टि ठेवून हे नियम केलेलेच नाहीत. आणि यामुळेच हे नियम मानवी बुद्धीला प्रज्ञेला, मानवत्वाच्या प्रतिष्ठेला अत्यंत घातक होतात. न्या. मू. रानडे यांनी म्हटलें आहे की, "आपल्या अधःपाताचें मूलकारण म्हणजे आपणांवरची सर्व बंधनें हीं विवेक बंधनें नसून, तीं बाह्य व जड बंधने आहेत हें होय. यामुळे आपली मनें बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन, आत्मसंयम यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला आलीच नाही."
अमेरिकेंत अध्यक्ष ट्रूमन यांनी शिक्षण- पुनर्घटना समिति नेमली होती. तिने आपल्या इतिवृत्तांत म्हटलें आहे की, "व्यक्ति- जीवनाचें स्वयंसिद्ध महत्त्व व मानवी जीवनाची प्रतिष्ठा यांवरील श्रद्धा हेंच लोकसत्तेचें मूल महातत्त्व होय; आणि उच्च शिक्षणांत त्याचा प्रामुख्याने अंतर्भाव झाला पाहिजे."
व्यक्ति-जीवनावरील व मानवी प्रतिष्ठेवरील ही श्रद्धा विवेकशून्य, तर्कहीन जातिबंधनामुळे समूळ नष्ट झाली. प्राचीन काळीं समाजहितासाठी देश-काल पाहून धर्मनियम करावे असें तत्त्व होतें, हें वर सांगितलेंच आहे. समाजहित, व्यक्तीचा उत्कर्ष हा तर्काने, बुद्धीने जाणतां येतो. धर्मामुळे अर्थ- काम साधतात, असें व्यासांनी म्हटलें आहे. अर्थ-काम हे माणूस प्रत्यक्ष अनुभवूं शकतो. जातिबंधनांचें तसें नाही. त्यांनी मिळणारीं फलें अदृष्ट आहेत. तीं परलोकांत मिळावयाची असतात. स्मृति- रचना बंद झाल्यानंतर जे निबंधकार उदयास आले त्यांनी सर्वच धर्मशास्त्र अदृष्ट- फलार्थी करून टाकलें. म्हणजे मानवाने केवळ अंधपणें श्रद्धा ठेवून ते पाळलें पाहिजे. असल्या बंधनांनीच मानवी प्रतिष्ठेचा अपमान होतो, मानवी बुद्धि पंगू होते, मानवी मन नेहमी बाल, अप्रौढ असें राहतें.
रघुनाथशास्त्री कोकजे म्हणतात, "वेदांपासून चालत आलेली दृष्टार्थतेची परंपरा सोडून देऊन, सर्व धर्मक्रिया जेव्हा पारलौकिक फळाकरिता, तसेच पुरुष- बुद्धीस न कळण्याजोग्या कार्याकरितांच असल्याचें ठरविलें जाऊं लागलें तेव्हापासून धर्माच्या अवनतीस प्रारंभ झाला.
एकतेला सुरुंग
देश- काल- परिस्थिति, समाजाचा उत्कर्षापकर्ष यांचा विचार करून जर जातींची बंधने घातली असती, तर पतितांची शुद्धि व परदेशगमन यांचा निषेध धर्मशास्त्रज्ञांनी केला नसता. आठव्या शतकांत महंमद कासीम याने हजारो हिंदूंना बाटविलें होतें. पण देवल ऋषींनी नवीन स्मृति रचून त्या सर्वांना स्वधर्मात परत घेतलें. अकराव्या शतकांत या पतित- परावर्तनाला त्या वेळच्या विचारमूढ, अंध, शास्त्रीपंडितांनी बंदी केली त्यामुळे सक्तीने बाटविले गेलेले लाखो हिंदु मुस्लिमच राहिले आणि भारताची एकरूपता भंगून या समाजाची शकले झाली. पण हें दृष्ट फल झालें. त्याची चिंता धर्मशास्त्री त्या वेळी करीत नव्हते.
परदेशगमनाचें हेंच झालें. प्राचीन काळीं व्यापार, धर्मप्रसार, साम्राज्य यांसाठी हिंदु लोक जगभर पर्यटन करीत. अकराव्या शतकांत तें निषिद्ध ठरले. त्यामुळे व्यापार मुस्लिम, ख्रिस्ती यांच्या हातीं गेला, धर्मप्रसार बंद पडला व भारतांतच परकी साम्राज्ये स्थापन झाली. म्हणजे या अंध धर्मशास्त्रामुळे भारताचें सर्व वैभव लयास गेलें. इहवादाची आवश्यकता भासते ती यामुळे. समाजावरची सर्व बंधने, सर्व कायदे सर्व दंडक हे बुद्धीने, अनुभवाने, अवलोकनाने, प्रयोगाने समाजाचा उत्कर्षापकर्षं कशांत आहे तें पाहून निश्चित करणें, याचें नांव इहवाद.
परलोकवादांत हें घडत नाही. परलोक कोणी पाहिलेला नसतो, कोणाला माहीत नसतो. तेथे कशाने हिताहित होईल, हें कोणालाहि कळत नसतें. त्यामुळे तो पुढे ठेवून सांगितलेले धर्मशास्त्र संसाराच्या सर्व अंगोपांगांवर प्रभुत्व स्थापन करतें आणि मग अनर्थ होतो. युरोपांत रोम पीठाच्या बंधनांमुळे व मुस्लिम देशांत मुल्ला-मौलवींच्या बंधनांमुळे हेंच घडलें. भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा हाच अनुभव आहे. डॉ. काणे म्हणतात की, "भारतांतलें स्वराज्य नष्ट होत असतांना, धर्मशास्त्रज्ञ क्षुद्र व्रतमाहात्म्यें व प्रायश्चित्तें यांत गर्क होते. कारण त्यांना चिंता परलोकाची होती. इहलोकीच्या वैभवाची, उत्कर्षाची नव्हती." ती ज्यांना असते त्यांना असलें मूढ, अंध धर्मशास्त्र धिक्कारावेंच लागतें.
शिवछत्रपतींनी पतितशुद्धि, समुद्रपर्यटन, कलियुगांतील क्षत्रियांचें अस्तित्व, ब्राह्मणांचें जन्मसिद्ध श्रेष्ठत्व यांसंबंधीचें धर्मशास्त्र धिक्कारलें नसतें, तर स्वराज्याची स्थापना झालीच नसती. पेशवे, नाना फडणीस यांनीहि कांही वेळा तें जुनें कर्मकांड त्याज्य ठरवून स्वतंत्रपणे निर्णय दिलेले आढळतात. पण हे सर्व अपवाद होत. जातिभेद, कर्मकांडात्मक धर्म यांसंबंधी भारतांतील संतांनीहि पुरोगामी धोरण अवलंबिलें होतें. पण तें सर्व परमार्थ क्षेत्रांत. ऐहिक व्यवहारांत जातिभेद, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता यांचें समर्थनच ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांनीहि केलेलें आहे. पण ते राज्यकर्ते व हे संत यांनी केव्हा केव्हा जुन्या धर्मशास्त्रावर टीका केली असली, तरी पश्चिम युरोपांतल्याप्रमाणे येथे इहवादाचें तत्त्वज्ञान कधीहि सिद्ध झालें नाही. म्हणजे नवें धर्मशास्त्र कोणी लिहिलें नाही. मार्सिग्लिओ, पीटर डुबॉइस, इरॅसमस, वायक्लिफ यांच्याप्रमाणे इहवादाचे तत्त्ववेत्ते येथे कोणी झालेच नाहीत. त्यामुळे येथे इहवादाची प्रस्थापना होऊ शकली नाही.
विद्यापीठांचा अभाव
नवव्या शतकापासून अठराव्या शतकाअखेरपर्यंत जो दुसरा कालखंड त्यांत इहवादी तत्त्ववेत्ते निर्माण झाले नाहीत, याचें कारण असें की, या काळांत भारतामध्ये युरोपसारखी विद्यापीठें कोणी स्थापन केली नाहीत. येथे प्राचीन काळीं तक्षशीला, उज्जैनी, विक्रमशीला, नालंदा अशीं फार मोठीं विद्यापीठें होतीं. त्यांतील बहुतेक प्राचीन काळांतच नाहीशीं झालीं होतीं व राहिलेलीं मुस्लिमांनी धुळीस मिळविलीं. पुढल्या काळांत राजपूत, विजयनगर, मराठे यांनी स्वतंत्र राज्यें स्थापिलीं असलीं, तरी त्यांनी किंवा त्या राज्यांतल्या पंडितांनी भौतिक विद्येच्या अध्ययन- अध्यापनासाठी विद्यापीठें स्थापिली नाहीत.
खरें म्हणजे भारतांत तेराव्या शतकांत मुस्लिम सत्ता स्थापन होण्याआधीच तीन-चार शतकें भौतिक विद्यांच्या अध्ययनाला शब्दप्रामाण्य व निवृत्ति यांमुळे उतरती कळा लागली होती. डॉ. अ. स. आळतेकर यांनी 'एज्युकेशन इन् एन्शंट इंडिया' या आपल्या ग्रंथांत याचें अतिशय उद्बोधक विवेचन केलें आहे. ते म्हणतात, "इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या सुमारास शब्दप्रामाण्य वाढीस लागलें. शंकराचार्य, रामानुज यांना आपले सिद्धान्त उपनिषद्वाक्यांनी सिद्ध करण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागला, हें त्याचेंच द्योतक आहे. श्रुतिस्मृतींची जखडबंदी नसती, तर भारतीय तत्त्वज्ञानाची निकोप वाढ निश्चित झाली असती. आणि निबंध (टीका) वाङमय, भाष्यें यांऐवजी आपल्याला नव्या स्मृतींचा म्हणजे धर्मशास्त्राचा लाभ झाला असता. पण आता बुद्धि, तर्क यांना पूर्वीप्रमाणे मान राहिला नव्हता. त्यामुळे धर्म-मोक्ष व अर्थ-काम यांतील समतोल बिघडून इतिहास, अर्थशास्त्र, राजनीति, गणित, ज्योतिष या भौतिक विद्यांचें महत्त्व कमी होऊन धर्मशास्त्र, कर्मकांड, तत्त्वज्ञान यांवरच भर दिला जाऊं लागला. यामुळे स्वतंत्र मौलिक संशोधन हळूहळू लुप्त झालें व सृष्टिघटनांविषयीचीं मतें वेदाधारें मांडण्यांत येऊ लागली. आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त या ज्योतिर्विदांना पृथ्वी, चंद्र यांच्या छायेमुळे ग्रहण लागतात, राहू-केतूंमुळे नव्हे हें ज्ञान होते. पण पुराणांनी राहू-केतु उपपत्ति मान्य केली होती. त्यामुळे तिचें खंडन करून लोकांना सत्य सांगण्याचें धैर्य त्यांनी दाखविलें नाही. ब्रह्मगुप्ताने तर लोकाराधनाच्या वृत्तीला बळी पडून छायोपपत्तीच चूक आहे व राहू- केतूपपत्ति वेदांनी सांगितली असल्यामुळे तीच खरी आहे, असें भाष्य करून आर्यभट्टादि पंडितांवर टीका केली आहे. युरोपांत कोपरनिकस, केप्लर, ब्रुनो, गॅलिलिओ यांनी सत्य सांगण्याचें जें नीतिधैर्य दाखविलें तें या पंडितांनी दाखविलें नाही. याचा अर्थ असा की, उत्तरकाळांत अंध धर्माचें वर्चस्व या पंडितांच्या मनावर फार होतें. त्यामुळे शवविच्छेदन, वनस्पति-संशोधन हे सर्वच थांबले आणि भौतिक, ऐहिक विद्या लयाला गेल्या. नवव्या शतकापासून भारतीय विद्यापीठांतील पंडितांची सर्जनशक्ति संपली आणि ते जुन्या ग्रंथांवर टीका, भाष्ये लिहिण्यांतच धन्यता मानं लागले (२४३–२५८).
ऐहिक आकांक्षेचा लोप
तेव्हा भारतांतील विद्यापीठें तेराव्या शतकांत मुस्लिमांनी नष्ट केलीं हें जरी खरे असले, तरी त्या आधीच त्या विद्यापीठांतील विद्या नष्ट झाली होती व ती साचलेल्या विद्येच्या शुष्क चर्चेचीं पीठें होऊन बसली होती. त्यामुळे भौतिक विद्या, राजकारण, दंडविधान, इतिहास, भूगोल, ज्योतिष, गणित यांच्या अध्ययनामुळे जो एक बुद्धिजीवी वर्ग निर्माण व्हावयाचा तो भारतांत झालाच नाही. भारताच्या प्राचीन काळांत अनेक भौतिक शास्त्रे परिपक्वदशेला आलीं होतीं. जीवनाचीं सर्व अंगें समृद्ध करणें त्यांवाचून अशक्यच होतें. तेव्हा नवीं विद्यापीठें उदयास आली असती किंवा जुनी कार्यक्षम राहिली असती, तर युरोपांत ग्रीक विद्येचें जसें पुनरुज्जीवन झाले तसें भारतीय विद्येचें पुनरुज्जीवन विद्यापीठांत होऊन युरोपप्रमाणेच एक विद्यासंपन्न, बुद्धिजीवी, मध्यम वर्ग येथे उदयास आला असता व त्याने तमोयुग प्रारंभींच नष्ट करून टाकलें असतें किंवा ते निर्माणच होऊं दिलें नसतें. पण त्या सुमारास भारतीय पंडितांची ऐहिक वैभवाची आकांक्षा, त्यांचा कामच नष्ट झाला होता ! असे लोक भौतिक विद्यांची जोपासना कशाला करणार किंवा जुन्या भौतिक विद्यांचें जतन करण्याइतकी तरी रसिकता त्यांना कोठून येणार ?
हे लोक स्मृति, पुराणे, भाष्यें, निबंध असल्या धर्मग्रंथांच्या अनेक हस्तलिखित प्रती करून ठेवीत, म्हणून दीर्घकालीन मुस्लिम संहारांतूनहि त्यांतले बहुतेक ग्रंथ वांचले. पण त्यांनी भौतिक विद्येच्या ग्रंथांच्या अशा प्रती करून ठेविल्या नाहीत. कारण त्यांतून पुण्यप्राप्ति नव्हती म्हणून त्यांचें महत्त्व नव्हते. त्यामुळे तो उद्योग कोणी केला नाही. त्यामुळे ती विद्या लुप्त झाली. आणि ती गेल्यामुळे प्रबोधनयुग नाही त्यामुळे मध्यमवर्ग नाही व म्हणून अर्वाचीन युग नाही. दीर्घकाल तमोयुग !
युरोपांत रोमपीठाच्या सर्वंकष धार्मिक सत्तेला आव्हान देणारी पहिली शक्ति म्हणजे विद्यापीठे आणि दुसरी शक्ति म्हणजे राष्ट्रभावना. पण ही दुसरी शक्तीहि मध्यमवर्गावांचून निर्माण होत नाही. युरोपांत ती निष्ठा या विद्यासंपन्न मध्यम- वर्गानेच निर्माण केली. अर्वाचीन काळांत सर्व जगांत आता राष्ट्रनिष्ठा प्रभावी झाली आहे; तिच्या मागे प्रेरक शक्ति हीच आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू आदि देश गेल्या शतकाच्या आरंभी स्वतंत्र झाले. पण तेथे राष्ट्रनिष्ठा जोपासली गेली नाही. याचें कारण बुद्धिजीवी मध्यमवर्गाचा अभाव, असेंच लॉर्ड ॲक्टन यांनी दिलें आहे.
असा हा मध्यमवर्ग विद्यापीठांच्या अभावीं भारतांत निर्माण झाला नाही व त्यामुळे राष्ट्रभावनाहि उदयास आली नाही. तेराव्या-चौदाव्या शतकांत येथे आजच्या तामीळ, तेलगु, मराठी, गुजराती, बंगाली या भाषा चांगल्या प्रौढरूपाला आल्या होत्या. तेव्हा राष्ट्रीय अस्मितेने कारण येथे निर्माण झालें होतें. समर्थ रामदास स्वामींनी 'मराठा तितुका मेळवावा' हा राष्ट्रीय भावनेचा मंत्रहि दिला होता. त्या काळी येथे मध्यमवर्ग असता तर, त्याने ग्रंथ लिहून राष्ट्रीयतेचें तत्त्वज्ञान परिपुष्ट केलें असतें व युरोपांत जसे इंग्लंड, तसें भारतांत महाराष्ट्र राष्ट्रपदवीला पोचलें असतें आणि मग जातिसत्तेचा उच्छेद होण्यास तेव्हाच प्रारंभ झाला असता. किंवा राजवाडे यांनी म्हटल्याप्रमाणे शेकडो रामदास भारतांत निर्माण झाले असते, तर अखिल भारतीय राष्ट्रनिष्ठा येथे उदयास येऊन पोसली गेली असती.
नव्या ज्ञानाकडे पाठ
ब्रिटिशांच्या राज्यांत पाश्चात्त्य विद्या प्रसृत होऊन विद्यासंपन्न वर्ग येथे निर्माण होतांच ती भारतीय निष्ठा येथे शंभर वर्षांच्या आंतंच, स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याइतकी प्रबळ झाली. तसेंच सतराव्या-अठराव्या शतकांत घडलें असतें. पण राष्ट्रवाद हा इवादावांचून जन्माला येत नाही आणि इहवाद हा निवृत्तिवादी, परलोकनिष्ठ, मोक्षैकदृष्टीचे लोक, संसाराला माया म्हणणारे लोक जोपासूं शकत नाहीत. चौदाव्या- पंधराव्या शतकांत युरोपीय लोक जगभर भ्रमण करूं लागले होते, तसें भारतीयांनी केलें असतें इंग्रजी, फ्रेंच या भाषांचा अभ्यास त्यांनी केला असता, तर पुढे भारताच्या प्राचीन वैभवाच्या इतिहासाचा युरोपीयांनी केला तसा त्यांनी अभ्यास केला असता; ग्रीक विद्याहि त्यांनी हस्तगत केली असती. पण परदेशगमन करावयाचें नाही, कारण यवन-संसर्ग होऊन जात बाटते!
गेल्या शतकांत गंगाधर दीक्षित हा गृहस्थ पांच वर्षे मुंबईला राहिला होता. तो युरोपीयनांना मराठी, संस्कृत शिकवीत असे. त्यामुळे म्लेंच्छ लोकांत मिसळून तो बाटला असणारच असें धरून, पुण्याच्या ब्राह्मणांनी त्याला वाळीत टाकले. याप्रमाणे वाळीत पडण्याच्या भीतीमुळे परदेशगमनच नव्हे, तर येथल्याच इतर समाजांत मिसळणें, त्यांचा अभ्यास करणें हें हजार वर्षे भारतांत वर्ज्य झालें होतें. ज्ञानाचें एक द्वार अशा रीतीने आपणच बंद करून टाकलें होतें.
दुसरें द्वार म्हणजे छापखाना. युरोपांत प्रबोधनयुगाचा छापखाना हा आधार होता, हें मागे आपण पाहिलेंच आहे. १५५० च्या सुमारास पोर्तुगीजांनी गोव्याला छापखाना आणला होता, पण त्याच्या शाईत चरबी असते असा समज होता. कागदाच्या निर्मितींतहि असाच निषिद्ध पदार्थ लागत असे. तेव्हा छापखान्यामुळे जात निश्चितच बाटली असती. गेल्या शतकांत बाळशास्त्री जांभेकरांना 'दिग्दर्शन' हें तुपांतल्या शाईने छापलें जातें, असा खुलासा करावा लागला होता. सोळाव्या शतकांत विद्यापीठांतून बुद्धिवादी, इहप्रवण, वैभवाकांक्षी वर्ग भारतांत निर्माण झाला असता, तर त्याने हे लोकभ्रम नष्ट करून, भारतांत मुद्रणकला आणली असती आणि मग या बुद्धिजीवी वर्गाने लिहिलेले ग्रंथ जनतेपर्यंत गेले असते. आणि अवलोकन, स्वतंत्र अनुभव, प्रयोग, स्वतःचे निर्णय यांचें महत्त्व जनतेला पटून युरोपांतल्याप्रमाणे येथेह शास्त्रज्ञ निर्माण झाले असते.
भारतीयांना स्वतंत्र प्रयोगाचें महत्त्व प्राचीन काळीं निश्चित आकळलें होतें. तेराव्या शतकापर्यंतहि कोठे कोठे, अपवादात्मक का होईना, तो जिवंतपणा होता. त्या शतकांतला 'रसेंद्रचिंतामणि' या ग्रंथाचा कर्ता रामचंद्र म्हणतो, "पूर्वाचार्यांच्या प्रत्येक सिद्धान्ताचा मी स्वतः प्रयोगाने पडताळा घेतलेला आहे. प्रयोग न करतां एकहि सिद्धान्त मीं दिलेला नाही. जे प्रयोग करीत नाहीत ते रसवेत्ते नसून, नुसते नट होत." विद्यापीठें असती, तर ही प्रयोगशीलता सार्वत्रिक होऊन भारतांत विज्ञानयुग तेव्हाच निर्माण झालें असतें.
समन्वयाचा अतिरेक
पण तसें झालें नाही व त्यामुळे अंध धर्मसत्तेला आव्हान देणारी जी तिसरी शक्ति तीहि भारतांत निर्माण झाली नाही. आपल्या विवेकाने सत्य सांगितलें त्यासाठी आत्मबलिदान करणारे जे जॉन हस, ब्रूनो, लॅटिमर, क्रॅनमर यांसारखे धीर पुरुष ही तिसरी शक्ति होय. या पुरुषांनी व त्यांच्या हजारो अनुयायांनी सत्याला मुरड घालून असत्याशी तडजोड करण्याचें साफ नाकारलें होतें हें वर सांगितलें आहे. उलट अशी दर पावलाला तडजोड करणें हें भारतांतील तमोयुगांतल्या सर्वच क्षेत्रांतल्या नेत्यांचें लक्षण होतें. मीमांसकांची जी समन्वयपद्धति ती हीच होय. श्रुति, स्मृति, इतर धर्मग्रंथ यांतील वचनांमधून कितीहि परस्परविरोध असो; त्या सर्वांचा एकच अर्थ आहे, असें सांगितलें पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. आणि तमोयुगाच्या प्रारंभीं झालेल्या निबंधकारांनी या समन्वयपद्धतीचा सर्रास अवलंब करण्याचा जो परिपाठ सुरू केला तो पुढे कायमच राहिला.
त्यामुळे व्यक्तीचें व्यक्तित्व, तिने विचारपूर्वक निश्चित केलेलें मत, तिने चिंतन करून प्रस्थापिलेले सिद्धान्त याला कांही अर्थच राहिला नाही. आद्य श्रीशंकराचार्य व इतर आचार्य यांनी दहा उपनिषदें, गीता व ब्रह्मसूत्रे यांवर भाष्य लिहितांना याच घातक समन्वयपद्धतीचा अवलंब केला आहे. शतका- शतकांच्या अंतराने झालेल्या या बारा ग्रंथांत कानामात्रेपासून पूर्ण एकमत असणें संभवनीय तरी आहे काय ? पण सर्व भाष्यकारांनी त्यांतील सर्व वचनांतून तसें एकमत असल्याचें सिद्ध करून दाखविलें आहे. मात्र प्रत्येक भाष्यकाराने आपलेंच मत त्या सर्व ग्रंथांत असल्याचें सिद्ध केलें आहे !
हा अगदी अनर्थ आहे. मानवी बुद्धीचा यामुळे अगदी चोळामोळा होतो. तिला धार अशी राहतच नाही. विवेकनिष्ठ सत्याचा दृढ आग्रह यामुळे शिल्लकच राहत नाही. आणि तो न राहिल्यामुळे बुद्धिसिद्ध मताला जें सामर्थ्य यावयाचें तें येत नाही. सत्यासाठी आत्मबलिदान करण्याचें जें धैयं, तें मग कोठून निर्माण होणार ?
'असंतोषः श्रियो मूलम्' असें वेदव्यासांनी म्हटलें आहे. श्री, समृद्धि, वैभव स्वराज्य, साम्राज्य यांच्या मागे असंतोष ही मूलप्रेरणा असते. हा असंतोष, ही अतृप्ति, ही ऐहिक वैभवाची आकांक्षा जेथे नाही तेथे कोणताच पुरुषार्थ सिद्ध होत नाही. भीमाने या असंतोषालाच 'काम' असें म्हटलेलें आहे. तो नाही तेथे अर्थ तर नाहीच, पण धर्महि साधत नाही. एकंदर सर्व वैभवच त्याच्या अभावी लुप्त होतें, असें तो म्हणतो. 'संतोषो वै श्रियं हन्ति' या वचनाचा हाच अर्थ आहे.
लोकमान्य टिळकांचा गौरव करतांना, त्यांनी भारतांत असंतोष जागृत केला असें आपण म्हणतों. आपलें स्वराज्य, स्वातंत्र्य गेलें असतांनाहि या भूमींत असंतोष नव्हता असा याचा अर्थ आहे; आणि तें अक्षरशः खरें आहे. भारतांतील सर्व समाज स्वातंत्र्याच्या बाबतींतच नव्हे, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत कामहीन झाला होता. निवृत्तिवादाने, आचार्य, संत यांनी केलेल्या संसारनिंदेमुळे, मायावाद, कर्मविपाकवाद या सिद्धांतामुळे या भूमीत ऐहिक वैभवाच्या, श्री- समृद्धीच्या सर्व आकांक्षा नष्ट झाल्या होत्या. त्यांतून कोणाच्या चित्तांत तशा आकांक्षा निर्माण झाल्याच तर जातिबंधनें त्याच्या मार्गांत इतके अडथळे आणीत असत की, त्या प्रत्यक्षांत आणणें त्याला शक्यच नव्हतें. त्यामुळे 'ठेविलें अनंते तैसेंचि रहावें,' अशी येथल्या समाजाची वृत्ति झाली होती. पाश्चात्त्य विद्येमुळे भारतीयांचा काम जागृत झाला, त्यांच्या ठायीं असंतोष निर्माण झाला, म्हणूनच सर्व अंध बंधने तोडून ते कांही पुरुषार्थ साधूं शकले.
येथला शेतकरीवर्ग अनेक शतकें अल्पसंतुष्ट असा होता. सुतार, लोहार, तांबट हा येथला कारागीर. याला चाकोरीबाहेर जाऊन कांही नवें साधावें ही ईर्षाच नव्हती. अनेक पिढ्या तोच धंदा केल्यामुळे त्यांतील कौशल्य वाढत जाऊन त्याची प्रगति होते, असें म्हणतात. तसें जगांत कोठेहि घडलेलें नाही. जातींची हीं व्यवसाय-बंधनें तोडल्यावरच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांति झाली व शेतकरी, सुतार, लोहार, विणकर, चांभार हे लोक पूर्वीच्यापेक्षा दसपट सुबक व शतपटींनी विपुल माल पैदा करूं लागले. ही सर्व प्रगति प्रोटेस्टंट पंथामुळे, त्यांनी धर्मसत्तेचा जो उच्छेद केला त्यामुळे झाली हें पूर्वी सांगितलेंच आहे. त्या दृष्टीने व्यापारीवर्गाचें उदाहरण, शेतकरी व कारागीर यांच्यापेक्षा, जास्त निर्णायक आहे.
पुरुषार्थहीन व्यापारीवर्ग
भारतांतहि त्या तमोयुगांत व्यापारी होते. पण प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर युरोपांतील व्यापारीवर्ग संघटित व प्रबळ झाला आणि त्याने राजसत्तेवर वर्चस्व स्थापून सर्वं जीवनांतच क्रांति घडविली. हे व्यापारी केवळ व्यापारी नव्हते, ते राजकारणी होते, लढवय्ये होते, साम्राज्यकर्ते होते. त्या तुलनेने पाहतां भारतीय व्यापारी हा पुरुषार्थहीन दिसतो. पाश्चात्त्य व्यापाऱ्यांनी आपल्या व आपल्या देशाच्या संरक्षणाला आवश्यक तें धन निर्माण केलें, शस्त्रास्त्रे उभारली व धनोत्पादनाला अवश्य तें विज्ञान पैदा करण्यासाठी विद्यापीठांना चालना दिली. म्हणजे त्यांनी एक व्यापारी संस्कृतीच निर्माण केली. पाश्चात्त्य व हिंदी व्यापारी यांची तुलना करून आचार्यं जावडेकरांनी पाश्चात्त्य व्यापारीवर्गाची श्रेष्ठता निर्विवाद सिद्ध केली आहे. (आधुनिक भारत, पृष्ठे ५-१०).
हें विवेचन करतांना व्यापाऱ्यांनी प्रथम धर्माविरुद्ध बंड केलें, मग सरंजामदारांचा पाडाव केला आणि शेवटीं राज्यसूत्रेहि हातांत घेतली, असा क्रम जावडेकरांनी दिला आहे. त्यावरून आणि ही व्यापारी क्रांति प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांत झाली या इतिहासावरूनहि जीर्ण धर्मकल्पनांच्या उच्छेदावांचून ही क्रांति शक्य नव्हती, हें स्पष्ट होतें. भारतांत ब्रिटिश येण्यापूर्वी ही धर्मक्रांति झाली नाही, त्यामुळे येथल्या शेतकऱ्याप्रमाणेच येथला व्यापारीहि अल्पसंतुष्ट राहिला आणि शेवटीं पराभूत झाला.
येथले क्षत्रिय व येथले ब्राह्मणहि या कामहीनतेमुळेच पराभूत झाले. येथल्या परकी सत्ता बव्हंशीं हिंदु सेनापतींनीच पोसल्या आहेत. ब्रिटिश राज्याचा तर भारतीय सेना हाच सर्वाधार होता. असें असूनहि आपण राजे व्हावें, सार्वभौम सत्ता आपली असावी, ही ईर्षा त्या वर्गाला कधी वाटली नाही. शास्त्री पंडितांचा ब्राह्मणवर्ग तर या दृष्टीने अगदीच पुरुषार्थहीन दिसतो. विद्या हा खरा त्यांचा पुरुषार्थ. पण शब्दप्रामाण्याला व कर्मकांडाला त्याने आपली बुद्धि गहाण टाकली असल्यामुळे इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, अनेक भाषापांडित्य, रसायन, गणित इत्यादि शास्त्रे या विद्येचें प्राथमिक ज्ञानहि त्याने मिळविलें नाही.
रॉजर बेकन, कोपर्निकस, केपलर, डेकार्ट, न्यूटन यांना सर्व भूगोल- खगोल व्यापावा, त्याचा भेद करावा अशी भव्य आकांक्षा होती. म्हणूनच सर्व जन्मच्या जन्म त्यांनी या विद्येच्या उपासनेंत घालविले. येथल्या ब्राह्मणांना जानवें, गोमूत्र, हजामत व सोवळेंओवळें यांपलीकडे कांही दिसतच नव्हतें. यांपलीकडे ते गेले असते, तर त्यांची जात बाटली असती, मोक्ष दुरावला असता व या क्षणभंगुर मायामय जगांत त्यांना राहवें लागलें असतें !
पाश्चात्त्य विद्येचा परिणाम
पण ऐहिकाविषयीची पूर्ण लुप्त झालेली ही क्षुधा पाश्चात्त्य विद्येच्या अध्ययनामुळे एकदम खवळली आणि सर्व जगाचा ग्रास घ्यावा अशी वृत्ति येथे निर्माण झाली. येथल्या पाठशाळांतून जुनी संस्कृत विद्याच शिकवावी असा राज्यकर्त्यांचा विचार होता, पण राजा राममोहन राय यांनी बेकन, डेकार्ट यांच्यापासून प्रगत झालेली पाश्चात्त्य विद्या आम्हांला द्या असा आग्रह धरला आणि इंग्रजांनी तो मान्य केला. पण केवळ तेवढयावरच अवलंबून राहवयास आपले पंडित तयार नव्हते. कोलंबस, शिकंदर, वॉशिंग्टन, फ्रँकलिन, नेपोलियन, न्यूटन यांच्या चरित्रांबद्दल येथे पूर्वी कधी जिज्ञासा वाटली नव्हती. आता भारतीय विद्वान् लोकांनी त्यांचीं चरित्रे मातृभाषेत आणण्यास प्रारंभ केला. फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकन राज्यक्रांति यांचे इतिहास त्यांनी स्वभाषेत आणले. शास्त्रज्ञ, भूसंशोधक, तत्त्ववेत्ते, सेनापति, मुत्सद्दी यांचीं चरित्रे व त्यांचे ग्रंथ यांचीं भाषांतरें ते करूं लागले.
समर्थांनी म्हटलें आहे "नाना पिंडांची रचना । नाना भूगोल- रचना । नाना सृष्टीची रचना | कैसी ते ऐकावी ।। चंद्र-सूर्य- तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें । येकवीस स्वर्गे सप्त पाताळें । कैसी ते ऐकावी ॥ रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, नानावल्ली, नाना औषधि, धातुरसायनबुद्धि, नाना तत्वविवंचना ऐसें हें अवघेचि ऐकावें ॥ त्या काळी ही श्रवणभक्ति लोकांनी केली असती, तर पारतंत्र्य पुन्हा आलेंच नसतें, पण तसें झालें नाही. परंतु आता ही ज्ञानलालसा भारतांतल्या सर्व प्रदेशांत उद्भूत झाली आणि त्यामुळे या समाजाचा कायांकल्प झाला.
या कायाकल्पाचीं, त्या क्रांतीचीं लक्षणें आपणांस पुढे पाहवयाचीं आहेतच. येथे प्रथम मागील लेखांत सांगितल्याप्रमाणे भरतभूमींत नव्या उन्मेषाची विरुढी कशी फुटूं लागली तें पाहवयाचें आहे.
हिंदुस्थानांत १५५० सालींच पोर्तुगीजांनी छापखाना सुरू केला होता. पंण त्याचा उपयोग आर्चबिशप बास्पर डी लिओ, गार्सिया डा ओर्टा, यांसारखे मिशनरीच फक्त करीत. ख्रिस्ती धर्माचें समर्थन व हिंदु आणि मुस्लिम धर्माचें खंडन हें त्यांचे उद्दिष्ट होते. हिंदूंना कांहीच उद्दिष्ट नव्हतें. पण एकोणिसाव्या शतकांत त्यांच्या डोळ्यांपुढे अनेक उद्दिष्टें नाचूं लागतांच त्यांनी अर्वाचीन युगांतल्या या महाशक्तीची उपासना सुरू केली. त्यांना या देशांत सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सर्व प्रकारची क्रांति करावयाची होती. भारत हें एक राष्ट्र घडवावयाचें होतें. येथे लोकशाही स्थापावयाची होती. परदेशांशी व्यापार करावयाचा होता. भारतांत कारखाने काढावयाचे होते. या कार्याच्या सिद्धीसाठी छापखाना व वृत्तपत्रे हें अत्यंत प्रभावी साधन आहे, हें त्यांच्या ध्यानीं येतांच त्यांनी त्या उद्योगाला हात घातला व पन्नास- साठ वर्षांच्या आतच बंगाल हेरल्ड, सुविचार दर्पण, प्रभाकर (बंगाल), दर्पण, दिग्दर्शन, धूमकेतू, प्रभाकर, इंदुप्रकाश, केसरी, मराठा (महाराष्ट्र), दिनमणी, स्वदेश- मित्रम्, हिंदु (तामीळनाडू), विवेकवर्धिनी, इंडियन हेरल्ड, रास्तगोफ्तार, रीजनरेटर अशा सहस्रजिव्हांनी ते आपल्या असंतोषाचा उद्घोष करूं लागले.
जें छापखान्यांचें तेंच ग्रंथालयांचे. पूर्वी येथे ग्रंथालयें होतीं, पण तीं राजेमहाराजे, विद्वान्, ब्राह्मण, यांच्या घरीं आणि तीं न्याय, वेदान्त, मीमांसा, शिवलीलामृत यांनी भरलेलीं ! आता सर्व समाजाचा कायाकल्प व्हावयाचा, तर सर्व समाजाला ग्रंथालयें हवीं होतीं. आणि तीं भौतिक विद्येच्या ग्रंथांची हवीं होतीं. म्हणून ठायीं ठायीं नगर वाचन मंदिरें स्थापन होऊं लागलीं. १८४० साली नाशिकला, १८४४ सालीं पुण्याला व १८५२ साली साताऱ्याला, अशीं वाचन- मदिरें स्थापन झाली. याबरोबरच वरील उद्दिष्टे साधण्यासाठी ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, बाँबे असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, मद्रास नेटिव्ह असोसिएशन, मानवधर्मसभा, सत्यशोधक समाज, भार्गवसभा, ज्ञानप्रसारक सभा, स्टुडंटस् लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन, हिंदू युनियन क्लब, राहनुभाई मझदेस्तन अशा अनेक सभा-संस्था त्यांनी स्थापन केल्या. पूर्वी भारतांत ग्रामसंस्था सर्वत्र होत्या. आता अखिल भारत राष्ट्र हें उद्दिष्ट डोळ्यांसमोर आल्यामुळे अखिल भारतीय संस्था येथे निर्माण होऊं लागल्या.
नव्या उन्मेषाचें प्रतीक
कारखानदारी ही आकांक्षा या भूमीला सर्वस्वी नवी होती. पेशवाईच्या काळांत येथे चाकू-कात्रीपासून बंदुका तोफांपर्यंत यंत्रनिर्मित वस्तु येत होत्या. पण त्या पाहून आपण तशा निर्माण कराव्या ही बुद्धि येथील लोकांना झाली नाही. त्यांची मनें, त्यांची प्रज्ञा, त्यांची बुद्धि सर्व मेलेली होती. आता ती जिवंत होतांच जमशेटजीटाटा (१८३९–१९०४) प्रथम हाँगकाँगला गेले, मग मँचेस्टरहून यंत्रविद्या शिकून आले व १८७७ साली त्यांनी नागपूरला एम्प्रेस मिल उघडली. नंतर त्यांनी पोलादाचे कारखाने काढले व या उद्योगांना अवश्य त्या विज्ञान संशोधनासाठी बंगलोरला 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'ची स्थापना केली.
दादाभाई नौरोजींचें विविध उद्योग हें या नव्या उन्मेषाचें प्रतीक म्हणून मानावयास हरकत नाही. ते १८५५ साली इंग्लंडला गेले. त्यांना शिक्षणासाठी आधीच जावयाचें होतें. पण पारशी समाजहि हिंदूंप्रमाणे कर्मठ होता. जातां आलें नाही. ते आता गेले. तेथे तीन वर्षे ब्रिटिश राज्यकारभाराचा त्यांनी अभ्यास केला व नंतर १८५९ साली त्यांनी लिव्हरपूलला 'दादाभाई नौरोजी आणि कंपनी' ही व्यापारी कंपनी स्थापन केली. १८७३ साली 'हिंदुस्थानचे दारिद्र्य' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. १८९२ साली पार्लमेंटचे सभासद म्हणून ते निवडून आले. काँग्रसचे ते तीनदा अध्यक्ष झाले व स्वराज्याचा मंत्र त्यांनीच दिला.
जगन्नाथ शंकरशेट ही दादाभाईंचीच लहान आवृत्ति होती. बाँबे असोसिएशन, बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा या संस्था त्यांनी स्थापिल्या. भारतीयांना कलांचे शिक्षण मिळावें म्हणून पुढाकार घेऊन त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् हें महाविद्यालय उभारलें. व्यापार, कारखानदारी, वाहतूक यांचे महत्त्वहि ते जाणत होते. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचे ते जनक होते. चिंचपोकळीला त्यांच्याच प्रयत्नाने गॅस कंपनी सुरू झाली. मुंबई-ठाणें रेल्वेचे तेच पुरस्कर्ते होते. मुंबई महापालिकेचा पाया त्यांनीच घातला व तेथलें ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयहि त्यांनीच निर्माण केलें.
१८६३ साली जपानमधले पांच सामुराई सरदार समुद्रगमनबंदी मोडून युरोपला गेले. त्या वेळीं त्या कृत्याला तेथे देहान्तशासन होते. तरी ते गेले. त्या वेळीं त्यांतील दोघे पुरुष, प्रिन्स इटो व मार्क्विस इनोई, जपानच्या पुनर्रचनेत अग्रणी होते. तमोयुगांत भारतांत हें धाडस कोणीं केलें असतें, तर भारताला पारतंत्र्य आलें नसतें. पण हीं बंधनें तोडावीं एवढा प्रबळ कामच भारतीयांच्या ठायीं त्या काळी नव्हता. आता पाश्चात्त्य विद्येमुळे ती प्रेरणा जागृत होताच लोक तीं बंधनें तोडूं लागलें. राममोहन राय परदेशी गेलेच होते. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनीहि युरोपचा प्रवास केला होता. धर्म, ज्योतिष, इतिहास या शास्त्रांत स्वतंत्र संशोधन व्हावें म्हणून त्यांनी 'तत्त्वबोधिनी' नामक सभा स्थापन केली होती. वेद, उपनिषदें अपौरुषेय आहेत आणि ते प्रमाणग्रंथ मानले पाहिजेत हें त्यांना अमान्य होतें.
ब्राह्मसमाजाने ही बंधने तोडल्यामुळेच अनेक ब्राह्म निःशंकपणे परदेशी जात. सौरेंद्रमोहन टागोर हे मोठे संगीतशास्त्रज्ञ असून, १८७५ मध्येच त्यांनी फिलाडेल्फिया विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ म्युझिक' ही पदवी मिळवली होती. टाटा, दादाभाई यांची समुद्रपर्यटनें जन्मभर चालूच होतीं. पाश्चात्त्य विद्येमुळे भारतीय मन इहवादी झालें. या परदेशांतील निवासामुळे तेच संस्कार त्या मनावर होत होते. त्यामुळेच त्याचें सामर्थ्य वाढून तें अधिकाधिक कार्यक्षम होत होतें. आणि त्यामुळेच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आत्माविष्कार करावा ही प्रबल ऊर्मि त्यांच्या ठायीं निर्माण होत होती. मेलेलें मन आत्माविष्कार करूं शकत नाही आणि त्याने केलाच तर तो ठराविक चाकोरीतून तें करतें. नव्या क्षेत्रांत नवे हुंकार द्यावे हें सामर्थ्य त्याच्या ठायीं असूच शकत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तें सामर्थ्य त्याला आलें व सर्व रूढिबंधने तटातट तोडून तें उच्चघोष करूं लागलें.
पाश्चात्त्य विद्येशीं परिचय होण्याआधीच्या सात-आठशे वर्षांमध्ये भारतीय साहित्य इहवादी आविष्कार जवळ जवळ मुळीच करीत नव्हतें. इ. स. १०००-११०० च्या सुमारास हिंदी, मराठी, कानडी, गुजराती, तेलगू, तामीळ या भाषा परिपक्व दशेला आल्या होत्या, येत होत्या. पण तेथून पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या भाषांचें साहित्य परलोकाकडे, परमार्थाकडेच पाहत राहिलें होतें. धर्म-मोक्ष या पुरुषार्थांकडेच त्याची दृष्टि वळलेली होती. अर्थ- काम याविषयी त्याला कसलीहि स्पृहा नव्हती. त्यामुळे त्या क्षेत्रांतले म्हणजे ऐहिक जीवनाविषयीचे आविष्कार त्यांतून उमटत नव्हते. पण आता ती स्पृहा निर्माण झाली व साहित्यांतून तिचे हुंकार ऐकूं येऊं लागले.
बंकिमचंद्रांनी आनंदमठ, देवी चौधराणी इत्यादि कादंबऱ्या लिहून राष्ट्रीयत्वाचा संदेश दिला. सुब्रह्मण्यम् भारती हे तामीळ कवि "भारताचा विजय असो, आम्ही सर्व भारतीय एका वंशाचे, एका वर्णाचे आहों, एकरूप आहों" असा उद्घोष आपल्या काव्यांतून करू लागले. गुजरातेंत गोवर्धन त्रिपाठी यांनी 'सरस्वतीचंद्र' ही त्रिखंडात्मक कादंबरी लिहून, देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या नायक- नायिकांचीं चित्रे रेखाटलीं. लोकहितवादींनी लिहिलें आहे की, "युरोपांत स्वदेशसेवा, राष्ट्रसेवा धर्म समजतात. ती वृत्ति आपल्यांत नाही." "देशाभिमान ही वृत्ति एकंदर पौर्वात्य देशांतच नाही," असें विष्णुशास्त्री म्हणाले.
ही अशी चिकित्सा करण्याचें सामर्थ्यच भारतीय मनाला पूर्वी नव्हतें. इंग्रज हा आपल्याला पराभूत करतो तो त्याच्या तोफखान्यामुळे व कवायतीमुळे, एवढें भारतीयांना समजूं शकलें. तेंहि फार उशिरा. पण निदान समजलें तरी. पण त्या टोपीकराचें खरें सामर्थ्य त्याच्या राष्ट्रनिष्ठेत, समाजसंघटनेंत, व्यक्तिस्वातंत्र्यांत आणि भौतिक विद्येत आहे हें आकळण्याची प्रज्ञाच येथे नव्हती. कलियुगामुळे, दैवी कोपामुळे, पापाचरणामुळे आपला नाश होत आहे, असें येथले मूढ शास्त्री पंडित, आचार्य, स्वामी म्हणत बसले होते. त्यांना मुळांतच बुद्धि नव्हती असें नाही. त्यांच्या इहाकांक्षा मेल्या होत्या. त्यांना 'काम'च नव्हता. म्हणूनच इहलोकीच्या उत्कर्षापकर्षाची चिकित्सा ते करीत नव्हते. आणि भीमाने म्हटल्याप्रमाणे त्यांचे 'अर्थ- काम' तर लोपलेच, पण धर्म-मोक्षहि त्यांना दुरावले. पण आता अंतरांत इहोर्मी हेलावू लागतांच आंध्रमधील वीरेशलिंगम् पंतलू, महाराष्ट्राचे हरिभाऊ, केशवसुत, आसाम- मधील धेकियाल फुकन हे सर्व साहित्यिक त्या ऊर्मि आविष्कृत करूं लागले.
नाटकांतील आविष्कार
काव्य- कादंबरीपेक्षाहि नाटकांतला आविष्कार जास्त ठळक, स्पष्ट आणि प्रभावी असतो. भारतीयांच्या अंतरांत नव्या प्रेरणा उसळू लागल्यामुळे अखिल भारतांत सर्व प्रदेशांत नवी रंगभूमि निर्माण झाली. महाराष्ट्रांत किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांनी या नव्या प्रेरणांना मूर्त रूप दिलें. हेंच कार्य नर्मदाशंकरांनी गुजरातमध्ये, गुरजाड अप्पाराव यांनी आंध्रमध्ये व सुंदरम् पिले, संबंध मुदलियार यांनी तामीळनाडूमध्ये केलें.
इतिहास हा तर पूर्णपणें ऐहिक विषय. अर्थातच तो संत, आचार्य, शास्त्री व पंडित यांना अगदी वर्ज्य. विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे की, "आपल्या लोकांच्या मनाचा कल निवृत्तिमार्गाकडे जेवढा दृष्टीस पडतो तेवढा प्रवृत्तिमार्गाकडं नाही. जग सर्व मिथ्या आहे, 'दिसे क्षणिक सर्व हें, भरंवसा घडीचा नसे,' असे विचार ज्यांच्या मनांत घोळावयाचे, अशा लोकांस राज्यांच्या घडामोडी वगैरे गोष्टींचीं वर्णने करून नर-स्तुति गात बसण्याचा कंटाळा असल्यास काय नवल?" पण आता त्या 'नरा'कडंच भारतीयांचें लक्ष वेधल्यामुळे राम, कृष्ण या परमेश्वरी अवतारांनाहि ते 'नर' मानू लागले व त्यांचा इतिहास धुंडाळू लागले आणि त्यांनी, मानवी शक्तीने सर्व पराक्रम केले, हें सांगण्यांत त्यांना अभिमान वाटू लागला.
न्या. मू. तेलंग, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर, राजवाडे, लो. टिळक, कन्हय्यालाल मुन्शी, चिंतामणराव वैद्य, मुकर्जी, मुजुमदार यांसारखे थोर पुरुष आता या कार्यात मग्न झाले, हे घडीचा भरंवसा ज्याचा नाही त्या जीवनांतच आता भारताला गोडी वाटू लागली, याचेंच लक्षण आहे. इतिहासाप्रमाणेच गणित, रसायन, पदार्थ- विज्ञान, भाषाशास्त्र आदि विद्यांची आता भारतीय पंडित प्राचीन ऋषींप्रमाणेच उपासना करूं लागले हें त्यांच्याप्रमाणेच यांनाहि ऐहिक काम असल्याचें द्योतक होय.
'अर्थ- कामा'चा महिमा
तेव्हा भारताची गेल्या शतकांतील प्रगति हा सर्व 'अर्थ- कामा'चा महिमा आहे. हाच प्रवृत्तिधर्म होय. शास्त्रीबुवांनी म्हटल्याप्रमाणे हा धर्म पूर्वी तमोयुगांत येथे नव्हता. "या इहलोकांत जन्माला आल्याचीच मनुष्याला लाज वाटली पाहिजे" अशी शिकवण त्या युगांत त्याला दिली जात होती आणि जन्माला दुर्दैवाने आलोंच तरी स्त्रीपुत्र-आप्तेष्ट यांचा लोभ धरूं नये, असा उपदेश येथे केला जात असे. कारण काय, तर अंतकाळीं ते कोणी कामी येणार नाहीत ! म्हणजे सर्व चिंता अंतकाळची, परलोकाची. इहलोकीचा विचारच नाही. असा हा समाज इहवादी होणें तेव्हा शक्यच नव्हतें. पण आता त्याला येथे जन्मल्याची लाज वाटेनाशी झाली. स्त्री-पुत्रांबद्दल प्रेम असण्यांत त्याला अभिमान वाटू लागला. षड्रिपु हे रिपु नसून, जगाचे हितकर्ते मित्र आहेत, असें तो निःसंकोच सांगू लागला.
विष्णुशास्त्री तर म्हणाले की, "परमेश्वराने दिलेल्या या शक्तींना अनर्थावह म्हणणें हें धर्माच्या दृष्टीने पाप व न्यायाच्या दृष्टीने मूर्खत्व होय." प्रवृत्तिधर्म तो हाच. गेल्या शंभर वर्षांत राममोहन राय, रानडे, आगरकर, दयानंद, विवेकानंद, सावरकर यांनी याच धर्माचा उपदेश केला. लो. टिळकांनी गीतारहस्य लिहून हजार- बाराशे वर्षे या समाजाच्या मनावर बसलेली आचार्यप्रणीत निवृत्तिधर्माची पकड ढिली केली.
उपनिषदांत एका झाडावर बसलेल्या दोन पक्ष्यांची गोष्ट आहे. एक पक्षी संसारवृक्षाचीं फळें खाऊन दु:खी होतो, दुसरा त्यांपासून अलिप्त असल्यामुळे सुखी असतो. अरविंदवाबूंनी ही गोष्ट आता राष्ट्रीय मोक्षाच्या अर्थाने पुन्हा सांगितली. "परकी राज्य ही संसारमाया होय, त्यांतील सुखविलास खरे मानून आम्ही मोहित झालों. पण संसारवृक्षाच्या शेंड्याला बसलेला दुसरा पक्षी म्हणजे स्वराज्य- तोच आमचा अंतरात्मा आहे, हें ज्ञान आता आम्हांला झाले आहे. हें ज्ञान हीच परमेश्वरी शक्ति होय. आमचें राष्ट्र आता त्या परमेश्वरी शक्तीने भारलेले आहे आणि आमची सर्व बंधनें तुटून पडून हिंदुस्थान सर्व जगांत स्वतंत्र राष्ट्र म्हणून नांदू लागेपर्यंत त्या शक्तीला कोणी रुद्ध करूं शकणार नाही."
नवयुगाचें दर्शन
पूर्वी राम-सीता, कृष्ण-रुक्मिणी यांच्या ऐहिक चरित्रावर आध्यात्मिक रूपकें कवि चढवीत असत. आता उपनिषदांतील आध्यात्मिक रूपकांचा भारतीय नेते इहवादी अर्थ वसवूं लागले. युग पालटलें, नवें मन्वंतर आलें असा याचा निश्चित अर्थ आहे. या नव्या युगाचीं विविध लक्षणें आता पाहवयाची आहेत. 'अर्थ- कामां'च्या प्रेरणेने ब्रिटिशांच्या आधीच्या सात-आठ शतकांतहि भारतांत कर्तृत्वाचे नवे उन्मेष मधून मधून येत असत; पण युरोपांत मार्सिग्लिओ, वायक्लिफ, इरॅस्मस, लुथर यांनी इहवादाचें जें तत्त्वज्ञान सिद्ध केलें, तसें भारतांत कोणी केलें नाही. कोणीं पतितशुद्धि केली, कोणीं समुद्रपर्यटन केलें, कोणीं अस्पृश्याघरीं जेवण केलें तरी त्या कृति तेवढ्या व्यक्तींपुरत्याच राहत. तें करणें योग्य आहे, वेदस्मृति त्याच्याविरुद्ध असल्या तरी योग्य आहे, आमच्या बुद्धीच्या, विवेकाच्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणार, असा निर्धार प्रकट करून त्या नव्या आचाराच्या समर्थनार्थ कोणी ग्रंथ लिहिले नाहीत.
तत्त्वज्ञान सांगितलें गेलें तें सर्व अध्यात्माचें, मोक्षाचें परलोकाचें. इहवादाचें समर्थन लांबच राहिलें, त्याचा सर्वत्र निषेध केला जात असे. म्हणून कांही व्यक्तींनी क्वचित् कोठे आचारपरिवर्तन केलें असले, तरी समाज-मनांत परिवर्तन झालें नाही. लेख-ग्रंथ या रूपाने तात्त्विक समर्थन केल्यावांचून असें परिवर्तन घडत नाही. जनमानसांत क्रान्ति होत नाही. आता लोक निर्भयपणें तसें समर्थन करूं लागले हेंच मुळी मन्वंतराचे पहिले लक्षण होय.
इहवादाचें पहिलें तत्त्व म्हणजे बुद्धिप्रामाण्य, अनुभवप्रामाण्य, विवेकप्रामाण्य हे होय, हे मागे अनेक वेळा सांगितलेंच आहे. त्याच्याविरुद्ध तत्त्व म्हणजे शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य किंवा वेदप्रामाण्य हे होय. या शब्दप्रामाण्याने मुस्लिम देश व पाश्चात्य देश यांचा घात कसा झाला हे आपण मागे पाहिलेंच आहे. भारतांत तमोयुगामध्ये हेंच झालें किंवा या शब्दप्रामाण्यामुळेच तमोयुग आलें असें म्हणणें जास्त सयुक्तिक होईल.
एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून या घातक तत्त्वाचा उच्छेद करून बुद्धिप्रामाण्याचा अवलंब करावयाचा असा भारतीय नेत्यांनी निश्चय केलेला आपल्याला दिसतो. राजा राममोहन राय हे इतर सर्व क्षेत्रांतल्याप्रमाणे याहि बाबतींत या सर्व नेत्यांत अग्रणी होते. त्यांनी स्थापिलेला ब्राह्म समाज हा कोणत्याहि ग्रंथाला ईश्वरनिर्मित व म्हणूनच प्रमादरहित मानीत नाही. राम मोहन हे प्राचीन संस्कृतीचे अभिमानी होते आणि धर्मसुधारणेसाठी त्यांनी उपनिषदांचाच आधार घेतला होता. हिंदु समाजाचा उद्धार करण्यासाठी उपनिषदांतील वेदान्त ही 'तरफ' आहे असें त्यांना वाटे. पण म्हणून त्यांनी उपनिषदवाक्यांचें प्रामाण्य कधीच मान्य केलें नाही किंवा आद्य श्रीशंकराचार्यांप्रमाणे सर्व उपनिषदांची एकवाक्यता करून दाखविण्याचा अट्टाहास केला नाही. "परमेश्वराला वंदन करण्याचें आमचें साधन म्हणजे भूतदया, परोपकार हे होय. एखाद्या ग्रांथिक सिद्धान्तावर श्रद्धा ठेवणें हें नव्हे", असें ते नेहमी सांगत.
रानडे, भांडारकर यांचा प्रार्थनासमाजहि बुद्धिप्रामाण्यवादीच होता. भांडारकरांनी म्हटलें आहे की, आर्यसमाज वेद हे ईश्वरप्रणीत मानतो. तसें प्रार्थना अगर ब्राह्म समाज मानीत नाही. एकाच काळी व एकाच व्यक्तीला सर्व धर्म देवाने सांगितला असें होणें नाही. कारण धर्म हा नेहमी विकास पावत आहे." लोकहितवादींनी अत्यंत कडक व तीव्र शब्दांत शास्त्रप्रामाण्याचा निषेध करून बुद्धिवादाचा पुरस्कार केला आहे. ते म्हणतात, "मनूचें वचन असो, याज्ञवल्क्याचें असो, ब्रह्मदेवाचें का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असें आहे." "शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरिता रीति घातली आहे, त्यांतून जर विपरीत कांही असेल तर एकीकडे ठेविल्यास चिंता काय आहे ?"
आगरकरांचा बुद्धिवाद
लोकांना सुख व्हावें असा शब्दप्रामाण्यवादी लोकांचाहि हेतु असतो. पण त्यांना परलोकांतील सुख अभिप्रेत असतें. तो फरक स्पष्ट व्हावा म्हणून "मानवतेचें ऐहिक सुखसंवर्धन हा खरा धर्म", असें आगरकरांनी सांगितलें. आगरकरांचा बुद्धिवाद या सर्व लोकांच्या तुलनेने अत्यंत जहाल असा आहे. मनु- पाराशरादिकांचे प्रामाण्य आम्ही मानीत नाही असें सांगतांना ते म्हणतात, "एखाद्या- दुसऱ्या मनूची आणि पाराशराची कथा काय ? अशा शेकडो मनूंचे किंवा हजारो पाराशरांचे आधार दाखविलेत तरी आमच्या मूर्ख धार्मिक समजुतीस लागलेला वणवा आता विझणार नाही."
बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा याहून थोडा निराळा असा एक आणखी पक्ष आहे, सर्वत्रच तसा असतो. सर्व समाजाने हजारो वर्षे वंद्य मानलेले ग्रंथ आम्ही मानीत नाही, असें ते म्हणत नाहीत. पण त्या ग्रंथांचा आपल्या बुद्धीप्रमाणे स्वतंत्र अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असें त्यांचें म्हणणें असतें. स्वामी दयानंद, लो. टिळक, स्वामी विवेकानंद हे या पक्षांतले धर्मधुरीण होत. यांची सुधारणाबुद्धि, समाजहितबुद्धि, इतकेंच काय, पण क्रांतिवृत्तीहि वरील लोकांच्या- इतकीच तीव्र जहाल आहे. पण बहुजन समाजाला बरोबर घेऊन जावयाचें, असें त्यांचें धोरण असल्यामुळे जुना धागा एकदम तोडून टाकणें त्यांना सयुक्तिक वाटत नाही.
युरोपांत वायक्लिफ, जॉन हस, लूथर, कॅल्व्हिन यांसारखे धर्मसुधारक याच धोरणाचा अवलंब करीत हें आपण पाहिलेंच आहे. रोमचें धर्मपीठ व पोप यांचा ते धिक्कार करीत; पण बायबल मात्र वंद्य मानीत. बायबलचा अनादर त्यांनी कधीच केला नाही. त्यांच्या तुलनेने पाहतां दयानंद, विवेकानंद, टिळक, हे अगदी क्रांतिकारकच ठरतील. दयानंद व त्यांचा आर्य समाज हे पूर्णपणे वेदप्रामाण्यवादी होते हे खरें. त्यामुळे प्रार्थना व ब्राह्म या समाजांशी त्यांचें सहकार्य होऊं शकलें नाही हेंहि खरें. पण त्यांनी ज्या धार्मिक व सामाजिक सुधारणा प्रतिपादिल्या व अंमलात आणल्या त्या पाहतां, ते पूर्ण क्रांतिकारक आहेत असेंच दिसेल. जन्मनिष्ठ जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता ते मानीत नाहीत. वैयक्तिक मोक्ष हें व्यक्तीचें अंतिम उद्दिष्ट असूं नये, समाजसेवा, समाजोत्कर्ष (मानवतेचें ऐहिक सुखसंवर्धन) यांतच व्यक्तीचें हित आहे, असें स्वामी सांगत असत. इहवाद यापेक्षा निराळा काय आहे ?
स्वामी विवेकानंद तर म्हणत की, लोकभ्रम, अंधश्रद्धा, रूढींचें दास्य हे स्वीकारण्यापेक्षा तुम्ही पूर्ण नास्तिक झाला तरी चालेल. नास्तिक माणसांच्या ठायीं एक तेज असतें, रग असते. तशी या अंधप्रामाण्यवादी लोकांच्या अंगीं कधीच असणार नाही. भुकेलेल्यांना निवृत्ति, संन्यास, वैराग्य यांचा उपदेश करणाऱ्या जुन्या संन्यास- मार्गीयांवर कडक टीका करून ते म्हणतात की, "अन्नान्न करून प्राण सोडणाऱ्या कोट्यवधि लोकांच्या मुखीं अन्नाचा घास घालणे हाच खरा धर्म होय."
टिळकांनी आपल्या धर्माचें स्वरूप असेंच स्पष्ट केलें आहे. "हिंदुस्थान ही आमची मातृभूमि आणि देवता, हिंदुस्थानवासी हेंच आमचें बंधुत्वाचें नातें व त्यांची राजकीय व सामाजिक स्थिति सुधारण्याचा एकनिष्ठ प्रयत्न करणें हाच आमचा धर्म हे त्यांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. "प्रामाण्यबुद्धिः वेदेषु" अशी त्यांनी हिंदु धर्माची व्याख्या केली असली तरी त्यांच्या धर्माचें उद्दिष्ट समाजाचें ऐहिक सुखसंवर्धन हेंच होतें. शिवाय विचारस्वातंत्र्याचे ते कडवे पुरस्कर्ते होते हें आपण ध्यानांत ठेविलें पाहिजे. "जेथे विचारस्वातंत्र्य नाही तें राष्ट्र मेल्यासारखेंच होय, म्हणून तें स्वातंत्र्य नष्ट करूं पाहणारा मनुष्य राष्ट्राचा शत्रु समजला पाहिजे" हे त्यांचे उद्गार अगदी निःसंदिग्ध आहेत. (केसरी २७-८-१९०७).
महात्माजींनी बुद्धिस्वातंत्र्याचा असाच निःसंदिग्ध पुरस्कार केलेला आहे. "बुद्धीला अमान्य असलेलें व नीतीच्या विरुद्ध असलेलें कोणतेंहि धर्मतत्त्व मी त्याज्य मानतों" असें त्यांनी म्हटलें आहे. "शास्त्र-ग्रंथ-वचन, हें बुद्धिप्रणीत असतें तेव्हा तें मनुष्याला समर्थ करतें व त्याच्या मनाला उदात्तता आणतें. उलट तेंच शास्त्र जेव्हा बुद्धीला दडपून टाकतें तेव्हा तें मनुष्याच्या अधोगतीला कारण होतें. तेव्हा सत्य व बुद्धि यापलीकडे शास्त्र जाऊंच शकणार नाही. अस्पृश्यता, बालविवाह व इतर अनेक घातक रूढि यांना जें शास्त्र आधार देतें तें शास्त्र मी एका क्षणांत नष्ट करून टाकीन." यांसारखीं त्यांचीं अनेक वचनं यंग इंडियांत पाहवयास सांपडतात.
महात्माजींची अंतर्वाणीवर (आंतल्या आवाजावर) दृढश्रद्धा होती. त्यामुळे त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी कसें म्हणतां येईल अशी पुष्कळांना शंका येते. शंका खरी आहे. अंतर्वाणी बुद्धिवादांत कधीहि बसू शकणार नाही. पण महात्माजी अत्यंत कडवे व्यक्तिवादी होते. व्यक्ति हें अंतिम मूल्य असें तें मानीत, हें आपण ध्यानांत ठेवलें पाहिजे. शब्दप्रामाण्यवादी माणूस विरोधी टीका कधीहि सहन करीत नाही. पण अशी टीका सामाजिक जीवनाला अवश्य असते असें ते म्हणत व प्रतिपक्षी आणि सहकारी यांच्या ध्रुव-भिन्न मतांचाहि आपल्या स्वतःच्या मताइतकाच आदर करीत. तेव्हा महात्माजींनी ती अंतर्वाणी स्वतःच फार मर्यादित ठेवली होती, असें दिसतें. त्यामुळे त्यांची ती श्रद्धा भारताला फारशी घातक ठरली नाही. त्या मर्यादा तोडून तिचे निर्णय महात्माजींनी जेव्हा अंतिम मानले व ते समाजावर लादले तेव्हा भारताची अपरिमित हानि झाली हें मात्र मान्य केलें पाहिजे.
जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याचा त्यांनी केलेला पुरस्कार, मुस्लिमांविषयीचें त्यांचें पक्षपाती धोरण व अहिंसेवरील एकांतिक श्रद्धा ही भारताला अत्यंत घातक ठरली आहे. पण असें जरी असले तरी, प्रत्येक व्यक्तीला आपल्या विवेकाच्या बळावर विश्वातील सर्व प्रकारच्या अधिसत्तांचे निर्णय धिक्कारण्याचा पूर्ण अधिकार आहे व आपल्या विवेकाच्या आदेशाप्रमाणे उच्चार व आचारहि करण्याचें स्वातंत्र्य आहे, हा जो त्यांच्या जीवनाचा मौलिभूत सिद्धान्त तो इहवादाचा आत्माच आहे, हें आपण ध्यानांत घेतलें, तर महात्माजी बुद्धिवादाचे मोठे पुरस्कर्ते होते हें आपल्याला मान्य ओईल असें वाटतें.
व्यक्तिवाद, बुद्धिप्रामाण्य, विवेकस्वातंत्र्य, अनुभवप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा यांचें एक अत्यंत प्रभावी पुरस्कर्ते म्हणजे स्वा. सावरकर हे होत. त्यांचे जात्युच्छेदक निबंध, गाईविषयीचे निबंध, इतिहासविषयक ग्रंथ, त्यांचे वैज्ञानिक निबंध यांवरून त्यांच्या बुद्धिप्रामाण्याचा दर पावलाला प्रत्यय येत असतो. 'दोन शब्दांत दोन संस्कृति' या त्यांच्या निबंधांत त्यांच्या सर्व बुद्धिवादाचा सारार्थ आलेला आहे. प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगनिष्ठ संस्कृतीचा त्यांनी या निबंधांत केलेला पुरस्कार इहवादाच्या अभ्यासाला अतिशय उपकारक होईल. यज्ञ, शंकराचार्य, गोमाता, मनु राजर्षि, या सर्वांविषयीच्या ज्या रूढ भावना त्यांचे त्यांनी आपल्या साहित्यांत अगदी विदारण करून टाकलें आहे. आपल्या समाजाच्या उत्कर्षापकर्षाची चिकित्सा करून त्यांनी जो सप्तशृंखलांचा सिद्धान्त सांगितला आहे त्यांत इहवादी तत्त्वांचा सर्व भावार्थ आलेला आहे. त्यांचें हें सर्व विचारधन पाहतां इहवादाच्या पुरस्कर्त्यांत सावरकरांचे एक अनन्य स्थान आहे असें वाटतें.
इतिहास- चिकित्सेचें महत्त्व
पाश्चात्त्य विद्येमुळे बुद्धिप्रामाण्यांत आलें आणि त्या विद्येमुळेच भारताच्या प्राचीन इतिहासाची चिकित्सा सुरू झाली. या इतिहासचिकित्सेमुळे रूढ धर्मकल्पनांभोवतीं असलेले पावित्र्याचें गूढ वलय नष्ट होतें. सत्याच्या अग्नीत त्यांच्यांतील हीण जळून जातें आणि जनमनाला वाटत असलेला त्यांचा दरारा नाहीसा होऊन मानवी मन त्यांच्या सत्तेपासून मुक्त होतें. 'इस्लाम इन दि मॉडर्न नॅशनल स्टेट' या ग्रंथाचा कर्ता अर्विन रोझेंथॉल याने आपल्या ग्रंथांत या इतिहास- चिकित्सेचें महत्त्व पुनः पुन्हा गायिलें आहे तें यासाठीच. राष्ट्ररचनेसाठी मानवाच्या मनाची जी पूर्वतयारी अवश्य असते ती प्राचीन काळच्या घटनांची ऐतिहासिक चिकित्सा केल्यावांचून होणे शक्य नाही. म्हणून मुस्लिमांनी या चिकित्सेस सिद्ध व्हावें व तींतून निघणारे निष्कर्ष मान्य करण्याची मनाची तयारी करावी असें त्यांनी आवर्जून सांगितले आहे. गेल्या शतकांतील भारतीय पंडितांनी या ऐतिहासिक दृष्टीचा मोठ्या उत्साहाने अवलंब केला आणि आपल्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाचे निष्कर्ष लोकांच्या पुढे मांडून अंध धर्माची सत्ता ढिलावण्यास पुष्कळच साह्य केलें.
ऐतिहासिक दृष्टि प्रथम जुन्या धर्मग्रंथांचा काल नर्णय करूं पाहते. त्या कालनिर्णयामुळे रूढ, भ्रांत समजुतींना केवढा धक्का बसतो पाहा. लो. टिळकांनी इ. पू. ४५०० च्या सुमारास वेद- संहिता- रचना पूर्ण झाली असा सिद्धान्त मांडला. हा काल कोणाला मान्य असो अगर नसो, पण वेद हे मानवी दृष्टीच्या टप्प्यांतल्या कोणत्या तरी काळांत रचले गेले, हा विचारच मुळी क्रांतिकारक आहे. वेद अनादिकाला पासून आहेतच, सृष्टिनिर्मितीच्या पूर्वीहि ते होते, हा भ्रम त्यामुळे तत्काळ नष्ट होतो, त्यांचें अपौरुषेयत्व लोपतें आणि अर्थातच त्यामुळे त्यांचे प्रामाण्यहि हादरतें याच्या जोडीला वेदांतील अनेक सूक्तें स्त्रियांनी व इतर अनेक नाग, सर्प या आज शद्र गणल्या गेलेल्या जमातींच्या ऋषींनी रचली आहेत, हें समजल्यावर तर स्त्री- शूद्रादिकांना वेदाधिकार नाही इत्यादि कल्पना निरस्त होऊन भ्रांतीचीं पटलें साफ नाहीशी होतात.
कालनिर्णयाच्या प्रयत्नांतून, जुन्या अनेक धर्मग्रंथांत, उत्तरकाळच्या पंडितांनी वाटेल तशी भर टाकली आहे हें ध्यानांत येते आणि मंग त्या ग्रंथांच्या प्रामाण्याचा पाया ढासळू लागतो. महाभारत हा ग्रंथ व्यास, वैशंपायन व सौती या तिघांनी मिळून रचला आहे व त्यांतील पहिल्या व तिसऱ्या ग्रंथकारांत दीडदोन हजार वर्षांचें अंतर होतें, हें सत्य पुढे येतांच त्या ग्रंथामागची भ्रांत पुण्याई नष्ट होऊन प्राचीन काळच्या पंडितांचें विचारधन, त्या काळचा ज्ञानकोश हें त्याचें यथार्थ स्वरूप तेवढें शिल्लक राहतें. मनु असा कोणी ऐतिहासिक पुरुष नव्हता. असला तरी त्याने सध्याची मनुस्मृति रचलेली नाही, ती भृगु नांवाच्या दुसऱ्या कोण्या ऋषीने रचलेली आहे व तींतहि मागून कोणी तरी संगति विसंगति यांचा कसलाहि विचार न करतां मन मानेल तशी भर घातलेली आहे, हा विचार त्यां स्मृतीच्या प्रामाण्याला जबरदस्त धक्का देईल यांत शंका नाही. या इतिहास दृष्टीमुळे पुराणांची तर अगदी चिरफाड होते व त्याबद्दलचा आदर लोपतो. एवढेच नव्हे, तर त्यांच्या विषयी कमालीचा अनादर निर्माण होतो.
वेद, महाभारत, पुराणें यांतील देवदेवतांवर इतिहासाचीं क्ष-किरणें पडली, तर त्यांच्या भोवतालचें तेजोवलय वितळून जातें व केव्हा केव्हा या मूळ रूपाच्या दर्शनाने मनांत घृणा निर्माण होते. हर्बट स्पेन्सरच्या सिद्धान्तांच्या आधारें, 'महादेव' या देवतेची कल्पना पिशाच्च कल्पनेतून परिणत झाली आहे असा विचार आगरकरांनी मांडला आहे. इतरांनी पिशाच्च ही प्राचीन काळीं एक जमात असून, तिचा महादेव हा पुढारी होता असें म्हटलें आहे. श्रीकृष्णाविषयी असेच श्रद्धाभंग करणारे विचार इतिहास सांगतो. गीताकार श्रीकृष्ण व गोकुळांतला श्रीकृष्ण हे एक नव्हेत, येथपासून संपूर्ण गीता श्रीकृष्णाची नाही येथपर्यंत इतिहास जातो. इंद्र, वरुण यांना वेदांतच असुर म्हटलें आहे. सध्या असुर शब्दाचा जो रूढ अर्थ आहे त्याशी हें अत्यंत विसंगत आहे.
भ्रान्तिष्ट कल्पना
मनु, याज्ञवल्क्य, नारद, पराशर, देवल आदि स्मृतिकारांचे काळ समजले आणि त्यांच्या स्मृतींवर भाष्ये लिहिणारांचे काळ समजले म्हणजे सर्व स्मृति एकाच काळी झाल्या व बाह्यतः त्यांतील वचनें परस्परविरुद्ध दिसत असली, तरी त्यांचा अर्थ एकच आहे ही कल्पना किती भ्रांतिष्ट आहे हें ध्यानांत येण्यास वेळ लागणार नाही. देश-काल-परिस्थिति पाहूनच मागे नव्या नव्या स्मृति रचल्या जात होत्या, हें दिसून येऊन मनु-याज्ञवल्क्यांची त्रिकालज्ञता नाहीशी होईल, निदान शंकास्पद तरी ठरेल आणि असें झाल्यावर त्या स्मृतींवर भाष्य टीका लिहिणाऱ्या निबंधकारांनाहि जें प्रामाण्य आलेलें असतें तें टिकून राहणें कठीण होईल.
मूळ ग्रंथांबरोबर त्यांवरील टीकाहि प्रमाण मानल्या पाहिजेत या आग्रहामुळे जगांत फारच अनर्थ झालेले आहेत. बायबलचा स्वतंत्र अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हें पोपला कधीच मान्य नव्हतें. मुस्लिमांची अनेक शतकें हीच धारणा होती. मार्क्स, एंगल्स यांचा स्टॅलिनला जो अर्थ समजला तोच इतरांना समजला पाहिजे, असा सोव्हिएट रशियांत दंडक होता. आता स्टॅलिनच्या जागी कोसिजिन आला आहे, इतकेंच. इतिहासाच्या प्रकाशामुळे अंधश्रद्धेची काजळी गेली की, मूळ स्पष्ट दिसूं लागून मनुष्याची प्रज्ञा स्वतंत्र चिंतन करूं लागते आणि मूळ धर्मग्रंथांचा नुसता अर्थ लावण्याचा अधिकार जरी तिला मिळाला तरी शब्दप्रामाण्याचें, घातकत्व कांहीसें कमी होते आणि मग कालांतराने पूर्ण बुद्धिप्रामाण्य मनुष्याच्या मनाला लाभतें.
बुद्धिप्रामाण्यामुळे धर्मपरिवर्तन हें ओघानेच येतें. किंबहुना तें आलें तरच बुद्धिप्रामाण्याचा खरा उपयोग. देश-काल-परिस्थिति बदलत असते व त्याप्रमाणे धर्मशास्त्र बदलणें अवश्य असतें. पण धर्म-ग्रंथ परमेश्वरप्रणीत आहेत, त्यांचे कर्ते ऋषिमुनि हे त्रिकालज्ञ होते, त्यांनी भूत- भविष्य- वर्तमान काळासाठी तें शास्त्र सांगितलेलें आहे, त्यांत रेखामात्र सुद्धा बदल करणें हें पाप होय, अशी विचारसरणी शब्दप्रामाण्यामुळे समाजांत रूढ झालेली असते आणि त्या अंधश्रद्धेमुळेच धर्माची ऐहिक जीवनावर सर्वंकष सत्ता प्रस्थापित होते.
अधःपाताचें कारण
जातिभेद, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, बालविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्रीची प्रतिष्ठा, कर्मकांडांतील व्रतवैकल्यें, यमनियम, गंधयज्ञोपवितादि आचार, भक्ष्याभक्ष्य, सोवळें-ओवळें, शुद्धि, वेदबंदी, व्यवसायबंदी, समुद्र बंदी इत्यादि बंधनें यासंबंधीचें जें शास्त्र त्याची हिंदूंच्या जीवनावर ब्रिटिशांच्या आधी सात-आठ शतकें अशीच अंध अविवेकी सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे या समाजाचा पूर्ण अधःपात झाला होता. कोणत्याहि प्रकारचें कर्तृत्व असें त्याच्या ठायीं राहिलें नव्हतें आणि तरीहि या अंध धर्मशास्त्रामुळे आपला अधःपात होत आहे, असा विचार तत्कालीन मूढ धर्माचार्यांच्या चुकून सुद्धा मनांत येत नव्हता. पाश्चात्त्य विद्येच्या अध्ययनामुळे आपला रूढ, अंध, जड धर्म आपल्या नाशास कारण झालेला आहे, हें नवविद्यासंपन्नांच्या प्रथम ध्यानांत आलें व बुद्धीला स्वतंत्र विचार करण्याची शक्ति प्राप्त झाल्यामुळे त्या हीन धर्माचा उच्छेद करून. धर्मपरिवर्तनाच्या कार्याला त्यांनी निर्भयपणें प्रारंभ केला.
हें धर्मपरिवर्तन त्यांनी कसें व कोणत्या बाबतीत घडविलें याचें तपशिलाने वर्णन देण्याचें कारण नाही. आज तें प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आंधळ्यालाहि दिसावें इतक्या स्पष्टपणें उभे आहे. जातिभेद, अस्पृश्यता, समुद्रबंदी, सोवळें-ओवळें, जातिविशिष्ट व्यवसाय व आचार आदि ज्या बंधनांचा उल्लेख वर केला आहे त्यांतील प्रत्येक बंधन कायद्याने आता नष्ट केलेलें आहे.
रूढींचाहि प्रभाव आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. जाति-बहिष्कार हा तर ब्रिटिश अमलांतच कायद्याने दंडार्ह ठरविलेला होता. तेव्हा अंध धर्माची सत्ता आता पुष्कळच ढिली झाली आहे, असें म्हणावयास हरकत नाही. म्हणून सामाजिक परिवर्तनाचा तपशील न देतां पूर्वीचें चित्र कसें पालटलें आहे तेवढे दाखविण्या पुरत्या कांही महत्त्वाच्या घटनांचा निदश करतों.
बदलेले चित्र
राजा राममोहन राय यांनी सोळाव्या वर्षी मूर्तिपूजेचा निषेध केला व त्या पायी घर सोडलें. पुढे इंग्रज सरकारला विनंती करून सतीची चाल त्यांनी बंद करविली आणि १८३० साली समुद्रगमन करून ते परदेशाला गेले. बाळशास्त्री जांभेकर यांनी श्रीपाद शेषाद्री यास शुद्ध करून स्वधर्मात परत घेतलें. दादोबा पांडुरंग यांनी 'परमहंस मंडळी' स्थापून भिन्न जातीयांचें एकत्र खानपान सुरू केलें. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली, स्वतःच्या घरांतला हौद अस्पृश्यांना खुला करून दिला व मुलींची शाळा स्थापिली. केशवचंद्र सेन यांनी मिश्रविवाह घडवून आणण्यास प्रारंभ केला. याच वेळीं ब्राह्म समाजांतील अनेक ब्राह्मणांनी जानव्याचा त्याग केला. प्रार्थना समाजाच्या नेत्यांनी विधवाविवाह घडवून आणले व पंढरपुरास अनाथाश्रम स्थापून अनौरस संततीच्या संरक्षणाची व्यवस्था केली.
धोंडोपंत कर्वे यांनी स्वतः विधवाविवाह केला व अनाथ बालिकाश्रम स्थापून तें कार्य हातीं घेतलें. शशिपाद बंदोपाध्याय, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षि शाहू- महाराज, श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी अस्पृश्यांसाठी वसतिगृहें, शाळा व स्वतंत्र संस्था स्थापून स्पृश्यास्पृश्य पंक्तिभोजन व क्वचित् विवाह घडविले. सेवासदन संस्थेने स्त्रियांना परिचारिकांचें शिक्षण देऊन अखिल भारतांत स्त्रीला एक व्यवसाय मोकळा करून दिला. सौ. आनंदीबाई जोशी ही स्त्री एकटी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली व डॉक्टर होऊन परत आली. केरळांत एळुवा या अस्पृश्य जातीचे एक गृहस्थ नारायण गुरु यांनी संस्कृत विद्या हस्तगत करून वेद- वेदान्ताचा व योगशास्त्राचा अभ्यास केला आणि मग समाजसुधारणेच्या कार्याला प्रारंभ केला. अस्पृश्यांसाठी त्यांनी एक शिवमंदिर बांधलें. अस्पृश्य माणसाने उभारलेलें हें भारतांतलें पहिलेंच देऊळ होय. जातिहीन व वर्गहीन समाज निर्माण करण्याच्या कार्यातच त्यांनी आपले आयुष्य वेचलें. धर्मपरिवर्तनाची परिसीमा झाली डॉ. आंबेडकर घटनाकार झाले तेव्हा !
धर्मपरिवर्तनाची पूर्तता
ब्राह्मण हा जातिमात्रोपजीवी असला तरी, केवळ ब्राह्मणब्रुव असला तरी तो चालेल, पण राजाचा धर्मप्रवक्ता शूद्र कधीहि असता कामा नये, असा मनूचा दंडक होता. श्रुतिस्मृति शूद्राने नुसत्या ऐकल्या तरी त्याच्या कानांत शिशाचा रस ओतावा, असें धर्मशास्त्र होते. पण स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेने अस्पृश्य गणलेल्या जातींत जन्मलेले डॉ. भीमराव आंबेडकर यांनाच मनूच्या सिंहासनावर बसवून त्यांना भारताचें धर्मशास्त्र रचण्याची विनंती केली. धर्मपरिवर्तन येथे पूर्ण झालें.
आणि हे सर्व बुद्धिपुरस्सर झालें. न्या. मू. रानडे यांनी म्हटलें आहे की, "बुद्धिपुरस्सर सुधारणा करणें हेंच मी श्रेष्ठ कार्य मानतों. कारण बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्यावांचून स्वोन्नति होत नाही." सुधारणेचे तत्त्वज्ञान धर्मक्रांतीच्या अभ्यासाने, अवलोकनाने मांडलेले सिद्धान्त यांचे महत्त्व गेल्या लेखांत सांगितलें, त्याचा हाच अर्थ आहे.
पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे गेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतांत बुद्धिप्रामाण्य आलें, ऐहिक उत्कर्षाच्या आकांक्षा येथे निर्माण झाल्या, धर्मपरिवर्तनाला लोक सिद्ध झाले, विवेकनिष्ठेची महती त्यांस समजूं लागली आणि या सर्व कारणांनी आमचें मनुष्यत्व मुक्त झाल्यामुळेच हिदुस्थानांत राष्ट्रनिर्मिती शक्य झाली. इहवादाचें हेंच फल आहे. त्याने मनुष्यत्व मुक्त होतें.
न्या. रानडे यांनी याच फलाची अपेक्षा व्यक्त केली होती. "आमचें मनुष्यत्व मुक्त झालें पाहिजे, आमच्या आशा उसळू लागल्या पाहिजेत, सर्वांशी समबुद्धीने व्यवहार करणारी न्यायबुद्धि प्रज्वलित झाली पाहिजे. बुद्धीवर आलेले सर्व अभ्र वितळून गेलें पाहिजे आणि सर्व तटबंदीचें उल्लंघन करून आमच्या प्रेमाची गंगानदी वाहूं लागली पाहिजे; म्हणजेच हिंदुस्थानाला नवजीवन प्राप्त होईल व हा देश आपल्या परिस्थितीवर व भवितव्यावर प्रभुत्व गाजवू लागेल." गेल्या दोन लेखांत आमचें मनुष्यत्व कसें मुक्त झाले तेंच स्पष्ट करून सांगितलें आहे. मनुष्य मुक्त झाला तरच तो समाज मुक्त करूं शकतो. तोच अंध बंधनांनी बद्ध असेल, अर्थशून्य रूढींचा दास असेल, तर तो स्वदेशाला मुक्त करूं शकणार नाही. त्याच्या मानवत्वालाच प्रतिष्ठा नसेल, तर तो राष्ट्राची प्रतिष्ठा कशी सांभाळणार ?
प्रतिष्ठेचा अभाव
ब्रिटिश येण्यापूर्वी दुर्दैवाने भारतांत हजार-दीड हजार वर्षे येथल्या मानवाला प्रतिष्ठाच नव्हती. राष्ट्र या संघटनतत्त्वाचें स्पष्टीकरण मागे अनेक वेळा केलें आहे. राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर आहे, असें मानणाऱ्या व्यक्तींचा समाज म्हणजेच राष्ट्र. जेथे ही भावना नाही तेथले लोक म्हणजे राजाची प्रजा असते. ते नागरिक नसतात, व्यक्ति नसतात. भारतांत पूर्वी सर्व प्रदेशांत अशी प्रजा होती. परकीय आक्रमण कसें निवारावें, युद्धतंत्रांत कोणता फेरबदल करावा, शिक्षणाची पुनर्घटना कशी करावी, कोणत्या विषयाचे अध्ययन व्हावें, शेतीचा विकास कसा होईल, औद्योगिक उत्पादन कसे वाढेल या व असल्या राष्ट्रीय समस्यांचा विचार त्यांच्या मनाला शिवतहि नसें; कारण या विचारांचा व्याप पेलण्यास मनुष्याचें मन प्रगल्भ, समर्थ व मुक्त असणें अवश्य असतें. तसे येथे मुळीच नव्हतें.
येथल्या अस्पृश्यांची व शूद्रांची काय कहाणी होती ? त्यांच्या जीवनाला कसली प्रतिष्ठा होती ? महार, मांग, धेड हे रस्त्याने गेले तरी रस्ते विटाळत असत. त्यांची सावली सुद्धा अपवित्र होती. शूद्रांची स्थिति तितकी नाही, तरी तत्समच होती. परीट, न्हावी, कुंभार, धनगर यांची नांवेंहि उच्चारू नयेत असा वरिष्ठ वर्णाच्या घरीं दंडक होता. त्यांच्या स्पर्शाचें अन्नपाणी यांना वर्ज्य होतें. ज्यांचें सर्व जीवनच अशा रीतीने तुच्छ व अशुभ मानले जात होतें, त्यांना समाजाच्या भवितव्याची चिंता वाहण्याइतकें मानसिक सामर्थ्य लाभणें शक्य आहे काय ? हे लोक राष्ट्र या संघटनेचे घटक होऊच शकणार नाहीत. त्या घटकांकडून अगदी किमान ज्या अपेक्षा आहेत त्याच सफल होणें त्या काळांत शक्य नव्हते; आणि हेच लोक केव्हाहि बहुसंख्य असतात. असे लोक राष्ट्र घडवू शकत नाहीत.
गीतेमध्ये "माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य व शूद्र आणि अंत्यजादि ज्या पापयोनि आहेत त्यांनाहि परम गति लाभेल" असा भक्तीचा महिमा सांगितला आहे. या गीता-वचनाचा अर्थ लावतांना पापयोनि हा शब्द स्वतंत्र न घेतां, स्त्रिया, वैश्य व शूद्र यांनाच तो लावून पूर्वीच्या टीकाकारांनी त्या सर्वांनाच पापयोनि ठरविलें होतें. लो. टिळकांना हा अर्थ मान्य नाही. पण मागल्या काळी असा अर्थ भाष्यकारांनी लावला होता, हें ध्यानांत घेतलें पाहिजे.
याचा अर्थ असा की, अंत्यज व शूद्र यांच्याबरोबरच स्त्रिया व वैश्य यांच्याहि जीवनाची प्रतिष्ठा पूर्वीच्या धर्मशास्त्रज्ञांनी नष्ट केली होती. युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माने व्याजबट्टा व व्यापार करणाऱ्या वैश्यवर्गाला हीन लेखिलें होतें. त्यामुळे त्या वर्गाची अस्मिता नष्ट होऊन त्याचें कर्तृत्व लोपलें होतें. प्रोटेस्टंट पंथाने त्यांच्यावरचा हीनतेचा शिक्का काढून टाकला, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तेव्हाच युरोपांत औद्योगिक क्रांति होऊ शकली, हें मागील लेखमालिकेत सांगितलेंच आहे. भारतांत सर्वच समाजाच्या बाबतींत मध्ययुगीन धर्मशास्त्राने विपरीत धोरण अंगीकारलें होतें. स्त्रिया व वैश्य हे पापयोनि आहेत, असें ठरविल्यानंतर कलियुगांत क्षत्रियांना अस्तित्वच नाही, असा येथल्या धर्मशास्त्रज्ञांना शोध लागला. म्हणजे समाजांत नव्वद पंचाण्णव टक्के लोक शूद्र झाले, पापयोनि झाले. असा हा समाज राष्ट्र घडवू शकत नाही.
अस्मितेची हत्या
शब्दप्रामाण्याने मानवाच्या बुद्धीची हत्या होते, तर पापयोनित्वाच्या शिक्क्यामुळे त्याच्या अस्मितेचीच हत्या होते. अस्मिताशून्य माणसें राष्ट्रनिर्मिति करूं शकत नाहीत. राष्ट्र हे व्यक्तींचें असतें, नागरिकांचें असतें, मुक्त मनुष्यांचें असतें. म्हणजे ज्यांच्या मनाला कांही रंग आहे, बल आहे, सामर्थ्य आहे, तेज आहे अशांचें असतें. अशीच माणसें समाजाचें चिंतन करूं शकतात. शिरावर कांही जबाबदारी घेऊ शकतात. आत्मबलिदान करूनहि अन्यायाचा प्रतिकार करण्याचें नीतिधैर्य त्यांच्याच ठायीं असूं शकते. पण सर्व समाजालाच पापयोनि ठरवून धर्मशास्त्रज्ञांनी समाजाचें, मानवी मनाचें हें सामर्थ्य नष्ट करून टाकलें होतें; आणि ते धर्मशास्त्रज्ञ ज्ञानहीन विद्याहीन व दृष्टिशून्य असल्यामुळे ते स्वतःहि पापयोनीच झाले होते. सर्व समाजाला पापयोनि ठरवून अखिल मानवाची हत्या करणें यापेक्षा भयंकर पाप तरी कोणतें असतें ?
व्यक्तिहीन, अस्मिताशून्य मानवांचा समाज ज्याप्रमाणे राष्ट्र घडवू शकत नाही त्याचप्रमाणे अत्यंत विषम समाज, अमंगळ भेदाभेद मानणाऱ्या मानवांचा समाजहि राष्ट्र घडवू शकत नाही. राष्ट्र हें संघटनातत्त्व आहे. संघटित समाजच राष्ट्र- पदवीला जाऊं शकतो. पण संघटनेला समता अवश्य असते. "साम्याद् हि सख्यं भवति, वैषम्यान् नोपपद्यते" हें व्यास-वचन प्रसिद्धच आहे. पण समाजाचें हें साम्य हिंदुधर्मशास्त्राने जाणूनबुजून नष्ट करून टाकलें होतें. दुर्दैव असे की, धर्मशास्त्रज्ञांची ही वृत्ति प्रत्येक जातींत भिनल्यामुळे येथे प्रत्येक जात दुसऱ्या जातीला हलकी मानूं लागली होती. समाजांतील चार-पांच टवके ब्राह्मण एका बाजूला व बाकी सर्व समाज दुसऱ्या बाजूला अशी स्थिति भारतांत असती तर फारसें बिघडलें नसतें. पण तसें येथे नव्हते. येथे सर्व वर्ण, सर्व जाति, सर्व पोटजाति इतर जातींना हीन ठरविण्यांत धन्यता मानीत असत. त्यांतच त्यांना भूषण वाटत असे. कारण त्यामुळे त्या श्रेष्ठ ठरत असत !
हें श्रेष्ठत्व व तें हीनत्व हें कर्तृत्वावर, पराक्रमावर, गुणांवर अवलंबून होतें असें नव्हे. तें जन्मावर होतें, जातीवर होतें आणि त्याच्या मागे रूढि व धर्मशास्त्र सतत उभें होतें. जाणूनबुजून अशी विषमता पोसणाऱ्या असल्या धर्मशास्त्राच्या फासांतून समाज मुक्त झाल्यावांचून येथे राष्ट्र संघटना अशक्यच होती.
राष्ट्र हा संघटित समाज होय आणि समाज संघटित होणें व त्याची संघटना कायम टिकून राहणें यासाठी सर्व समाजाला सतत कांही तरी सामुदायिक, सामूहिक, सर्वसंग्राहक ध्येय असणें अवश्य असतें, पण तमोयुगांतील धर्मशास्त्राने सर्व समाजाला एक ध्येय, एक उद्दिष्ट असणें अशक्य करून ठेवलें होतें. सर्व देशांत एक ध्येय निर्माण होण्यासाठी त्या समाजांतील सर्व थरांतले, सर्व वर्गांतले, सर्व जातींतले लोक नित्य एकत्र येणें अवश्य असतें. पण तसे ते कधीहि येतां कामा नयेत, असें हिंदु धर्माचें शास्त्र होतें. चर्चमध्ये सर्व ख्रिश्चन एकत्र येतात, मशिदींत सर्व मुस्लिम एकत्र जमतात, तसे एका देवळांत सर्व हिंदु एकत्र जमूं शकत नाहीत. त्यांनी नाहीच जमावयाचें असा हिंदुधर्म (किंवा अधर्म) आहे. हिंदु देवळांत जमूं शकत नाही, भोजनासाठी नाही, व्यवसायासाठी नाही.
राजाराजांमध्ये लढाया चालू असतांना शेतकरी शांतपणे शेतीचा उद्योग करीत असत, असें भारताचें भूषण म्हणून कांही इतिहासकार सांगतात. तेव्हा देशाचें संरक्षण हेंहि सामूहिक ध्येय होतें असें नाही. बाराव्या-तेराव्या शतकापासून इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, पोलिश लोक युद्धाला जात ते इंग्लिश म्हणून, फ्रेंच, जर्मन म्हणून जात. त्याच्या आधी ख्रिश्चन म्हणून जात. त्याच्याहि आधी ग्रीक म्हणून, रोमन म्हणून जात. अशी सामुदायिक संरक्षणाची भावना, समान उद्दिष्ट, समान ध्येय हिंदु समाजांत कधीहि नव्हतें. तसें नसलेंच पाहिजे, असें धर्मशास्त्र होतें. "मराठा तितुका मिळवावा" अशी एक सांघिक भावना समर्थांनी व शिवप्रभूंनी महाराष्ट्रांत निर्माण केली होती. ती फार काळ प्रभावी नव्हती, तरी तेवढ्या समान ध्येयाच्या बळावर मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान मुक्त केला. पण अन्य प्रांतांत असें समायिक ध्येय कधीहि निर्माण झालें नाही. अखिल हिंदुसमाजांत तर कधीच नाही.
'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा' या आपल्या ग्रंथांत रघुनाथशास्त्री कोकजे यांनी या सामूहिक, सर्वसंग्राहक ध्येयाच्या अभावाचें फार उत्कृष्ट विवेचन केलें आहे. सोवळ्या-ओवळ्याच्या, अतिरिक्त पावित्र्याच्या कल्पना हेंच या अभावाचें प्रमुख कारण त्यांनी दिलें आहे. एकमेकांना पापयोनी समजणाऱ्या जाति एका ध्येयाने प्रेरित होणें कधीच शक्य नसतें. याच्या जोडीला संन्यासवाद व भागवतांचा भक्ति- मार्ग यांनी वैयक्तिक मोक्षाचें ध्येय लोकांना उपदेशिल्यामुळे सामूहिक उद्दिष्टाचा संभव अजीबात नष्ट झाला. आपल्या बायकामुलांच्या, आप्तेष्टांच्या योगक्षेमाचीसुद्धा चिंता करूं नये, अशी वृत्ति जोपासणारा समाज राष्ट्राच्या योगक्षेमाची चिंता कशी वाहणार ? राष्ट्रीय योगक्षेमाची चिंता प्रत्येक व्यक्तीने वाहिली पाहिजे ही तर राष्ट्रसंघटनेची पहिली अट आहे.
प्रेरणेची गरज
समान ध्येय, समान उद्दिष्ट याप्रमाणेच समान पूर्वपरंपरा, समान इतिहास, समान प्राचीन वैभवाचा अभिमान यांतून मिळणारी स्फूर्ति, प्रेरणा ही राष्ट्रसंघटनेला अवश्य असते. बायबल किंवा कुराण यांचा ख्रिश्चन किंवा मुस्लिमांना जसा अभिमान वाटतो तसा वेदांचा अभिमान अखिल हिंदूंना वाटेल काय ? वेद नुसते कानांनी ऐकले तरी ज्यांना जबर शिक्षा करावी असें धर्मशास्त्र सांगतें त्यांना वेदांचा अभिमान वाटणें कसें शक्य आहे ? प्राचीन इतिहासापासून स्फूर्ति कां मिळते. त्या इतिहासांतले पराक्रम ज्यांनी केले त्यांचेच रक्त माझ्या अंगांत आहे, त्यांचाच मी वारस आहें, ते पराक्रम माझेच पूर्वीचे पराक्रम आहेत, असा हंकार वाटून व्यक्तीला आत्मविश्वास निर्माण होतो, मला पुन्हा तसा पराक्रम करणें पूर्ण शक्य आहे अशी तिच्या मनाची निश्चिति होते म्हणून.
भारताच्या प्राचीन इतिहासापासून सर्व हिंदूंना अशी स्फूर्ति मिळेल काय ? पाणिनी, पतंजली, कपिल, कणाद, कुमारिलभट्ट, शंकराचार्य, मनु, याज्ञवल्क्य यांची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, प्रतिभा म्हणजे आपलीच प्रतिभा होय, त्यांचे कर्तृत्व तें माझेंच कर्तृत्व होय असा शूद्रांना, अंत्यजांना आंतून हुंकार येईल काय ? आज चोखामेळा, नामदेव, सावता माळी यांचा अभिमान धरून त्या त्या जातीचे लोक मंदिरें बांधीत आहेत, संस्था स्थापित आहेत हें कशाचें द्योतक आहे ? चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कालिदास, ज्ञानेश्वर हे पुरुष त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हें त्या लोकांनाहि बहुधा मान्य होईल. पण कर्तृत्वाची स्फूर्ति त्यांच्या स्वजातीय पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे जास्त येईल, यांत शंकाच नाही. शिवाय चंद्रगुप्त, कालिदासादि पुरुष आमच्याच रक्ताचे होते असा दावा त्यांनी सांगितला, तर वरिष्ठ समाज तो फेटाळून टाकील. मग समान इतिहास, एक-परंपरा म्हणजे काय ?
असा इतिहास, अशी परंपरा असतांच कामा नये अशी व्यवस्था मनु-याज्ञवल्क्य आदि धर्मशास्त्रज्ञांनी करून टाकलेली आहे, समाजघातक असे भेदाभेद माजविणारें हें धर्मशास्त्र धिक्कारून वेदरचनेचें श्रेय ब्राह्मण-क्षत्रियांप्रमाणे स्त्री-शूद्रांनाहि आहे, त्या प्राचीन काळीं आविक्षित मरुत्त, चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, वेदव्यास या शूद्र रक्ताच्या पुरुषांनीहि थोर पुरुषार्थ केले आहेत; तेव्हा भारताची प्राचीन परंपरा ही सर्वांची आहे, त्या वैभवाचें श्रेय सर्वांना आहे, ही संस्कृति आर्यांप्रमाणेच द्रविडांची, अनार्यांची, असुरांची, नागांचीहि आहे, ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांचीहि आहे हें इतिहास- चिकित्सेंतून निघणारे निष्कर्ष समाजांतल्या सर्व थरांना दाखवून दिले, तरच राष्ट्र- रचनेला अवश्य तीं स्फूर्तिस्थानें पुनरुज्जीवित होतील. गेल्या शतकांत अशा तऱ्हेचे प्रयत्न सुरू झाले होते. एक परंपरेचा पाया घातला जात होता म्हणूनच येथे राष्ट्राचें मंदिर उभारणें शक्य झालें. तमोयुगांतील रूढ धर्मशास्त्रालाच आपण कवटाळून बसलों असतो, तर तें कदापि शक्य झालें नसतें.
पण सुदैवाने तसें झालें नाही. तमोयुगांतील धर्माच्या नांवाखाली चालणारा तो अधर्म राममोहन राय, रानडे, दयानंद, आगरकर, विवेकानंद, टिळक, महात्माजी या थोर पुरुषांनी नष्ट करून टाकला. येथल्या मानवाच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ज्यांना त्या अधर्मशास्त्राने पापयोनि म्हटलें होतें त्यांची अस्मिता जागृत केली आणि सर्व समाजाला एका पातळीवर आणून त्याला देशभक्ति, स्वातंत्र्य, हें सर्वसंग्राहक, समान ध्येय प्राप्त करून दिलें. त्यासाठी त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या व त्यांत होणाऱ्या विचारविनिमयांतून भारताला एक सामूहिक मन निर्माण झालें आणि तें भारताची चिंता करूं लागलें.
भारताची आर्थिक लूट होत आहे, इंग्रज सरकार हे नित्य द्रव्यशोष करीत आहे, हें दादाभाईंनी सांगितलें. दारिद्र्याचा हा प्रश्न भारताच्या पुढील राजकारणांत प्रत्येकाच्या चिंतेचा विषय होऊन बसला होता. रानडे, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, लजपतराय, आगरकर, टिळक, महात्माजी, नेहरू यांसारखे सर्व नेते या प्रश्नाला अग्रस्थान देत सामूहिक मन याचा हा अर्थ आहे. या सामूहिक मनांत निर्माण होणाऱ्या विचारांना निश्चित आकार देणारी संस्था म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रसभा ही होय.
भारताच्या मागल्या इतिहासांत अशी अखिल भारतीय सभा केव्हाच निर्माण झाली नव्हती. कारण हिंदु, ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी अशा सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र येऊन करण्याजोगें कार्यच कांही त्यांना दिसलें नव्हतें; आणि दिसलें असतें तरी त्यांना सोवळ्याओवळ्यामुळे एकत्र येतां आलें नसतें. त्यांची जात बाटली असती. पंचहौद मिशन प्रकरणी ती वेळ आलीच होती. चार- एक वर्षांपूर्वी येथे विश्वहिंदु परिषद् स्थापन झाली आहे. ती तर केवळ हिंदूंची सभा आहे. त्याच वेळी माझ्या मनांत प्रश्न आला की, अशी अखिल हिंदूंची परिषद् भारताच्या इतिहासांत पूर्वी कां झाली नाही ? धर्मशास्त्राच्या प्रभावामुळे तशी परिषद् भरविणें अशक्य होतें, एका व्यासपीठावर अखिल हिंदूंना आणण्याला हिंदुधर्मशास्त्राचाच विरोध होता, हें त्याचें उत्तर आहे.
सामूहिक मनाचे चिंतन
काँग्रेस ही सामूहिक मन निर्माण करणारी सभा त्या धर्मशास्त्राची सर्वंकष सत्ता नष्ट झाल्यामुळेच निर्माण होऊ शकली. काँग्रेसप्रमाणेच अखिल भारताचे सामाजिक प्रश्न चर्चिणारी सामाजिक परिषद्, विज्ञानाचा विचार करणारी विज्ञान परिषद् इतिहास परिषद्, प्राच्यविद्या परिषद्, तत्त्वज्ञान परिषद् अशा अखिल भारतीय परिषदा निर्माण झाल्या. त्या परिषदा राजेमहाराजे, सरंजामदार, जहागीरदार, सरदार, धर्मपीठाधिष्ठित आचार्य यांच्या नव्हत्या. त्या सामान्य माणसांच्या होत्या, जनतेच्या होत्या. प्रत्येक व्यक्ति आता देशाच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहण्यास सिद्ध झाली याचेंच हे द्योतक होय. म्हणजे या देशांत आता व्यक्ति निर्माण झाल्या व त्या सामूहिक ध्येयाने प्रेरित होऊन सामूहिक मनाने चिंतन करूं लागल्या. पूर्वी हें मनहि नव्हतें.
अखिल भारतांत इंग्रज सरकारने स्थापन केलेल्या शिक्षणसंस्था, शाळा, महाशाळा यांनी सामूहिक मन निर्माण होण्यास फार साह्य झालें. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक प्रदेशांतल्या शाळा-महाशाळांतला प्रत्येक विद्यार्थी एकाच ऐहिक विषयांच्या अभ्यासक्रमांतून जाऊं लागला. इंग्लंडचा इतिहास, भारताचा इतिहास, मिल मोर्ले, स्पेन्सर, कार्लाइल यांचें तत्त्वज्ञान, फ्रेंच क्रांतीचें, अमेरिकन क्रांतीचें तत्त्वज्ञान, शेक्सपियर, मिल्टन, डिकन्स, कालिदास, भवभूति यांचें साहित्य, ॲडम स्मिथ, रिकार्डो यांचें अर्थशास्त्र, युक्लिड, न्यूटन यांचे गणित, डेव्हिस, फॅराडे यांचें विज्ञान, यांचेच संस्कार सर्वांवर सतत झाल्यामुळे अखिल भारतीय जनतेच्या मनांत देशभक्ति, समता, स्वातंत्र्य, सर्व धर्म-समानत्व, स्त्रीची दास्यविमुक्ति, गुणसिद्ध योग्यता, मानवता, अशीं समानमूल्यें निर्माण झाली.
तमोयुगांत भारतांत शिक्षणच नव्हतें ! खेड्यांतले तात्या पंतोजी काय अक्षर- ओळख, हिशेबठिशेब शिकवतील तेवढेच. ब्राह्मणांच्या कांही पाठशाळा असत; पण तेथे समाजाशी संबंध मुळीच नाहीं अशा विद्यांचें अध्यापन होत असे. वरील विद्यांपैकी तेथे कांही नव्हतें, आणि जें होतें तें सर्वांना शिकवावयाचें नव्हतें. त्यामुळे समूहमन येथे कधी निर्माण झालें नाही. आणि तें नाही म्हणजे राष्ट्रभावना नाही. पण आता शाळा-महाशाळांतून या मनाची घडण होऊं लागली.
अखिल भारतांत दिल्या जाणाऱ्या या एकरूप शिक्षणांतूनच वर निर्देशिलेले महापुरुष निर्माण होऊन सर्व समाजाला, अखिल भारतीय जनतेला, चांभार, मांग, साळी, माळी, कोष्टी, परीट, न्हावी, कुंभार, लोहार या सर्वांना जिच्यावर हक्क सांगतां येईल अशी एक समाईक परंपरा भारतांत निर्माण झाली. वर सांगितलेंच आहे की, अशी परंपरा हे राष्ट्राचें स्फूर्तिस्थान असतें, पराक्रमाची ती प्रेरणा असते. त्या अभिमानावांचून समाजाच्या अंगांत जीवन-संचार होत नाही, चैतन्य येत नाही. भारताची प्राचीन परंपरा फार थोर आहे. सर्व वर्णांना, जातींना हक्क सांगतां येईल अशी ती आहे. पण तमोयुगांतल्या अधर्मशास्त्राने बहुतेक सर्व जातींना तिच्यापासून तोडून टाकलें होतें आणि इतिहास-लेखनाच्या अभावामुळे त्या परंपरेचें स्मरण सतत जागृत ठेवणारी दुसरी पीठिका भारतांत नव्हती. त्यामुळे जनतेचें आत्मज्ञानच लोपलें.
नव्या विद्येमुळे एक तर त्या आत्मज्ञानाचें उज्जीवन झालें आणि दुसरें म्हणजे एक नवीं समाईक परंपरा निर्माण झाली. या आर्वाचीन परंपरेतील महापुरुषांना अखिल भारतीय जनतेची चिंता होती, या सर्व जनतेला ते आपली मानत असत, तिच्यासाठीच ते जगत असत, हें त्यांच्या वाणींतून, लेखणींतून, कृतींतून, पावलो- पावलीं प्रत्ययास येत होतें. "अखिल मानवतेचें सुखसंवर्धन हें आगरकरांचे ध्येय होतें. टिळक 'तेल्यातांबोळ्यांचे’ पुढारी होते. 'हिंदुस्थानवासी' हेंच बंधुत्वाचें नातें ते सांगत. स्वामी विवेकानंद, "गरीब जनता म्हणजेच परमेश्वर" असें मानीत व तिची सेवा करतांना मला नरकवास आला तरी मी तो पत्करीन, असें म्हणत. महात्माजी म्हणजे जनतेचेंच मूर्त रूप. सावरकर, आंबेडकर, पंडितजी, सुभाषचंद्र, राजेंद्रबाबू असेच भारताशी एकरूप झालेले होते. राष्ट्ररचनेला अवश्य असलेली परंपरा या महापुरुषांच्या रूपाने गेल्या शतकांत भारतीयांना लाभली म्हणूनच भारत हें जंबुद्वीप राष्ट्र- पदवीला पोचूं शकलें.
अंध, शब्दप्रामाण्यवादी, अपरिवर्तनीय धर्माची सर्वंकष सत्ता नष्ट होऊन इहवादाचा येथल्या धर्मधुरीणांनी गेल्या शतकांत आश्रय केला म्हणूनच भारतांत राष्ट्रधर्माचा उदय होऊ शकला व येथल्या नेत्यांना राष्ट्रसंघटना करता आली, हें आपण गेल्या लेखांत पाहिले. आता त्याच इहवादी तत्त्वज्ञानामुळे आपण भारतांत लोकायत्त शासन, प्रजातंत्र वा प्रजासत्ताक कसें स्थापूं शकलों, अन्यथा तें सर्वस्वीं कसें अशक्य होतें तें पाहवयाचें आहे.
मानवत्वाची प्रतिष्ठा, समता, सामूहिक चिंतन आदि जीं तत्त्वें राष्ट्ररचनेला अवश्य म्हणून वर सांगितलीं आहेत तीं तर लोकशाहीला आवश्यक आहेतच, पण शिवाय आणखीहि कांही तत्त्वांचा लोकायत्त शासन-निर्मितीसाठी अवलंब करावा लागतो. त्याच तत्त्वांचें विवरण या लेखांत करावयाचें आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट आपण ध्यानांत वागविली पाहिजे की, राष्ट्रनिष्ठा व लोकशाहीनिष्ठा या अविभाज्य नाहीत.
आज सोव्हिएट रशिया, चीन, युगोस्लाव्हिया इत्यादि साम्यवादी देशांत राष्ट्रनिष्ठा उत्कट रूपांत दिसते. पण तेथे लोकशाहीचा वासहि नाही. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इटली, जर्मनी, या राष्ट्रांची तीच स्थिति होती. इंग्लंड, फ्रान्स हे देश चौदाव्या-पंधराव्या शतकांतच राष्ट्र- पदवीला पोचलें होतें. पण तरीहि तेथे लोकशासन त्या वेळीं नव्हतें. भारतांत मात्र या दोन्ही निष्ठांची जोपासना गेल्या शतकांत एकदमच सुरू झाली. म्हणून त्यांच्या मागची तत्त्वें अभिन्न आहेत असें वाटण्याचा संभव आहे; पण तसें नाही, हें आपण जागरूकपणें लक्षांत ठेवलें पाहिजे. राष्ट्र-धर्माच्या तत्त्वज्ञानांत लोकशासनाचीं सूक्ष्म बीजें असतात व त्यांतूनच लोकशाहीचा उदय होतो हें खरें; पण हें सर्वत्र घडतेंच असें नाही. म्हणूनच आपण सावधपणे विचार केला पाहिजे.
महत्त्वाचं तत्त्व
बुद्धिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद, परिवर्तनशीलता, विवेकनिष्ठा आदि लोकशाहीच्या आद्य तत्त्वांचा आणि मानवत्वाची प्रतिष्ठा, समता इत्यादि तत्त्वांचा विचार आपण मागे केला आहे याशिवाय लोकशाहीचें राहिलेलें महत्त्वाचें तत्त्व म्हणजे 'कायद्याचें राज्य' हें होय. राजसत्तेमध्ये किंवा दंडसत्तेमध्ये कायदे केलेले असले तरी शासन हे सर्वस्वी राजाच्या किंवा दंडधराच्या लहरीवर असतें. त्यामुळे जीवितवित्ताची कोणालाच तेथे शाश्वति नसते. अशी शाश्वति देणें हें तर लोकशाहीचें मुख्य लक्षण होय.
भारतांत प्राचीन काळी कांही अपवाद वगळतां सर्वत्र राजसत्ताच होती आणि त्या काळांत कंस, जरासंध, हिरण्यकश्यपू, रावण, दुर्योधन यांसारखे अनेक मदांध राजे झाल्याचेंहि आपण वाचतो. पण ज्या वेळी राजे मदांध, जुलमी, अत्याचारी नव्हते त्या वेळींहि जुलूम, अत्त्याचार हे अपरिहार्यपणे चालूच असत. कारण त्या वेळीं कायदाच विषम व अन्यायी होता. लोकशाहींत कायद्याचें राज्य असतें याचा अर्थ कायदा हा सम असतो, कायद्याच्या दृष्टीने सर्व मानव सारखे असतात असा आहे आणि भारतामध्ये सुवर्णयुगांत सुद्धा हें तत्त्व मान्य झालेलें नव्हतें.
स्मृतिकारांनी, धर्मशास्त्रज्ञांनी बुद्धिपुरस्सरच कायदा विषम रचला होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांपैकी प्रत्येक वर्णाला कायदा भिन्न होता. एकाच अपराधासाठी या वर्णांना भिन्न भिन्न दंड वा शिक्षा त्या काळी असे. मृत्युदंड ब्राह्मणाला कधीच करूं नये असा कायदा होता. त्याने कोणताहि गुन्हा केला, तरी त्याला फटक्यांची शिक्षा नाही, त्याला बेड्या नाहीत, हद्दपारी नाही, त्याची निर्भत्सना नाही, येथपर्यंत कांही स्मृतींनी मजल नेली होती. स्त्रीवर बलात्कार हा एकच अपराध. त्यासाठी शुद्राला लिंगच्छेद ही शिक्षा. इतरांना केवळ दंडाची! वेदाध्ययन, यज्ञ, व्यवसाय, उद्योगधंदे, विवाह, शिक्षण या प्रत्येक बाबतींत भिन्न वर्णांना भिन्न कायदा होता आणि त्याचा अंमल करणें हें राजाचें कर्तव्य होतें. वर्णधर्म, जातिधर्म यांचें म्हणजे विषमतेचें रक्षण राजाने केलें पाहिजे, असें धर्मशास्त्रच होतें. ही विषमता लोकशाहीला मान्य होणें केव्हाहि शक्य नाही.
आज अमेरिकेंत निग्रो लोकांना भिन्न कायदे आहेत. पण ती लोकशाहीची विटंबना होय, असेंच सर्व पंडितांचे मत आहे. भारतांत मागल्या काळी माणसाची योग्यता ही जातीवरून न ठरवितां गुणावरून ठरावावी असा एक मतप्रवाह होता. पण एक तर तो फारसा बलवान नव्हता आणि त्याच्या पुरस्कर्त्या पंडितांनी सर्व जातींना कायदा एकच असावा, असा आग्रह कधी धरलेला नव्हता. ब्रिटिशांची सत्ता येथे स्थापित होईपर्यंत भारतांत सर्वत्र विषम कायदाच जारी होता. ब्रिटिशांनी हळूहळू तो नष्ट करून कायद्यापुढे सर्व नागरिक सारखे, हें तत्त्व रूढ केलें. भारतीय नेत्यांनीहि त्याचाच पुरस्कार केला आणि त्यामुळेच लोकशाहीचा
पाया त्यांना घालता आला.
घातक विषमता
समदंडनीति हें तत्त्व इतकें महत्त्वाचें आहे की त्यांत जरा ढिलाई झाली तर लोकशाही हादरूं लागते. पंडित नेहरूंनी नागरी कायदा केला तो फक्त हिंदूंसाठी! मुस्लिमांना त्यांनी त्यांतून वगळलें! श्रीमंत व गरीब, मंत्री व सामान्य जन यांना प्रत्यक्षांत भिन्न कायदा नाही; पण आपल्या परिजनांना न्यायपीठापासून अलग ठेवण्याची कसोशी पंडितजी करीत असत. अप्रत्यक्षपणें ही विषम दंडनीतीच होय. तीच भारताला घातक ठरली आहे.
कायद्याचें राज्य, सर्वांना समदंडनीति (कायदा) हें जसें लोकसत्तेचें एक प्रधान तत्त्व आहे त्याचप्रमाणे असा कायदा बाजूस ठेवून, त्याची अवहेलना करून कोणी अन्याय करूं लागला, तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क असणें, हेंहि महत्त्वाचें तत्त्व आहे. भारताच्या प्राचीन इतिहासांत हें फार मोठें वैगुण्य दिसून येतें. जनतेने अन्यायाचा प्रतिकार करणें, हें भारतीय समाजाला ठाऊकच नाही. सुवर्णयुग संबोधिलेल्या प्राचीन कालखंडांतहि वर निर्देशिलेली विषम दंडनीति होती.
तमोयुगांतल्याप्रमाणे तिला पराकाष्ठेचें तीव्र रूप आलें नव्हतें हें खरें; पण शूद्र, अंत्यज यांना जीवन असह्य व्हावें अशी स्थिति अनेक ठिकाणीं निश्चितच होती. ब्राह्मण हा कितीहि हीन असला, तरी त्याला वंद्य मानले पाहिजे, असा एक विचारप्रवाह त्या काळांतहि होताच. वेदविद्या व इतर भौतिक विद्या यांपासून कनिष्ठ जातीय समाज वंचितच होता. व्यवसायबंधनें त्याच्यावर होतीच. धनसंग्रहाची त्याला बंदी होती. इ. स. १००० नंतरच्या तमोयुगांत तर हीं बंधनें पराकोटीला जाऊन त्याचें जीवन नरकप्राय झालें. तरीहि शुद्र, अस्पृश्य यांपैकी एकहि व्यक्ति किंवा जाति या अन्यायाचा प्रतिकार करण्यास कधी उसळून उठली नाही! आम्ही वाटेल त्या जलाशयावर पाणी भरणार, वाटेल त्या देवळांत प्रवेश करणार, हव्या त्या विद्येचा अभ्यास आम्ही करूं व हवा तो व्यवसाय करूं, अशी जिद्द मनांत बाळगून त्यासाठी प्राणपणाने संग्राम करण्याचें नीतिधैर्य, तें आत्मबल, येथे कोणीहि प्रकट केलें नाही, हें भारताचें अत्यंत मोठे दुर्दैव होय. अशा आत्मबलावांचून, लोकशाही लांबच राहिली. पण समाजाची कोणतीहि प्रगति होणें शक्य नसतें.
आत्मबलाचा अभाव
या आत्मबलाचा संपूर्ण अभाव या समाजांत असण्याचें कारण काय? भारतीय तत्त्वज्ञानांतील कर्मसिद्धान्त हें त्याचें कारण होय. या जन्मीं मनुष्याला जें कांही सुखदुःख मिळावयाचें, त्याचा जो उत्कर्षापकर्ष व्हावयाचा तो पूर्वजन्मींच्या कर्मानुसार होत असतो, या जन्मीचें त्याचें सर्वचरित्र, भवितव्य गतजन्मीच्या कर्मानी निश्चित होत असतें, असा हा सिद्धान्त आहे. कर्मतत्त्व किंवा कर्मवाद तो हाच. यालाच दैववाद असें म्हणतात. या कर्मवादामुळे मनुष्याच्या कर्तृत्वाची सर्व उभारीच नष्ट होते. शूद्र किंवा अंत्यज या पापयोनींत जन्म आला तर तो गेल्या जन्मीच्या, पापकर्मामुळे आला, असा मनाचा निश्चित ग्रह झाल्यावर या जन्मीं कपाळी येणारा नरकवास मुकाट्याने भोगण्याखेरीज गत्यंतर नाही, अशी मनाची वृत्ति अपरिहार्यपणेंच होते आणि ती झाल्यावर अन्यायाचा प्रतिकार करण्यास अवश्य ती मनाची रंग, तें मनोवल, तें नीतिधैर्य कोठून येणार ?
या जन्मीं पुण्य करून पुढील जन्मीचा नरकवास टाळावा असें कोणाच्या मनांत येईल कदाचित्, पण तेंहि शक्य नाही. कारण 'बुद्धिः कर्मानुसारिणी !' पुण्य करण्याची या जन्मीं बुद्धि होणें हेंहि मागल्या जन्मीच्या कर्मावरच अवलंबून असतें. शिवाय वेदान्त ज्ञान मिळवून तपःसाधना करून मागल्या कर्माचें बंधन तोडावें असें हीन जातियांच्या मनांत आलें तरी उपयोग नाही; कारण तो मार्ग अनुसरण्यास त्याना धर्मशास्त्राची मनाई आहे. शूद्राला धर्म नाहीच, असा त्या धर्मशास्त्राचा सिद्धान्त आहे. दैववादाने अशी करकचून बांधून टाकलेली जनता अन्यायाचा प्रतिकार कसला करणार ?
भारताचें आणखी दुर्दैव असे की, हा कर्मसिद्धान्त येथील सर्व धर्म-पंथांनी स्वीकारलेला होता. बुद्ध, महावीर हे वैदिक धर्माविरुद्ध बंड करून उठले होते. ते निरीश्वरवादी होते. गौतमबुद्धाला तर आत्माहि मान्य नव्हता. तरीहि कर्मवादापुढे त्यांनी मान लवविली होती. न्याय, सांख्य हीं नास्तिक दर्शनें होत; पण त्यांनीहि कर्मसिद्धान्त मानलेला होता. अशा रीतीने कर्मवादाची किंवा दैववादाची सत्ता प्राचीन काळापासून सर्वंकष, सर्वगामी व अप्रतिहत अशी होती. अशा समाजांत अन्यायाला, असत्याला आव्हान देऊन सर्व विश्वाविरुद्ध एकट्या एकपणे लढा देण्यास उभे राहण्याइतकें समर्थ व्यक्तित्व एकाहि पुरुषाच्या ठायीं निर्माण झाले नसले; तर त्यांत नवल काय ?
प्रतिकारशून्य समाज
वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांसारख्या ब्राह्मण ज्योतिषशास्त्रज्ञांना प्रत्यक्ष अवलोकनाने सिद्ध झालेलें, गणितशास्त्राने मान्यता दिलेलें, सूर्य-चंद्राच्या ग्रहणाविषयीचें सत्य ठामपणे समाजाला सांगण्याचें व लोकांची पुराणोद्भव भ्रांति दूर करण्याचें धैर्य झालें नाही. "यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नादरणीयं नाचरणीयम्" हाच भेकड पाठ ते घोकीत बसले होते. त्या काळांत मधून मधून शूद्रजातीय पुरुष राजपदावर आरूढ होत. पण त्यांनीहि शूद्र जातीवर अन्याय करणारें धर्मशास्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. सत्ता हातीं असतांनाहि स्वसमाज संघटित करून त्याच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा प्रतिकार करण्याचे त्यांनी मनांतहि आणलें नाही. तेव्हा शूद्र-अंत्यजादि सामान्य जनता त्या प्रतिकारासाठी उभी ठाकली नाही यांत काय आश्चर्य ? कर्मसिद्धान्तामुळे अखिल भारतीय समाजच कसा दुबळा, दैववादी, प्रतिकारशून्य झाला होता हें यावरून दिसून येतें. असे दुबळे, नीतिधैर्यहीन लोक लोकसत्ता स्थापूं शकत नाहीत.
या कर्मसिद्धान्तांत आणखी एक हानिकारक गोष्ट अशी की, त्याची बंधनें तर्कशून्य असतात. आणि तर्कहीन, बुद्धिहीन बंधने मानवाच्या प्रतिष्ठेला बाधक ठरतात, हें मागे अनेक वेळा सांगितलें आहे. या जन्मीं एक माणूस सुखी तर एक दुःखी, एक गरीब तर एक श्रीमंत, एक बृहस्पति तर दुसरा बुद्धिहीन असें कां होतें, याचें कारण आपण सांगतों, अशी कर्मसिद्धान्ताची प्रौढी आहे. पण हें सर्व पूर्व- जन्मीच्या पाप-पुण्यामुळे होतें हें जें त्याचें उत्तर त्याला बुद्धिगम्य, तर्कसिद्ध, अनुभव- संपन्न असा कसलाहि पुरावा नाही. या जन्मीं, 'करावें तसें भरावें', या तत्त्वाप्रमाणे कधीच नियमाने कांही घडत नाही. विपरीतच अनेक वेळा घडतें. शिवाय प्रथमच, मुळारंभीं मानव जन्माला आला तेव्हा पूर्वकर्म संभवत नसल्यामुळे, तेथे भेदाभेद कां झाला, याला कर्मवादाजवळ उत्तर नाही.
असें असल्यामुळे कर्मवादाच्या आधारे घातलेली समाजबंधने हीं मानवी प्रज्ञेला, न्या. रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे, हानिकारकच ठरणार. मानवत्वाची प्रतिष्ठा हें तर लोकशाहीचें आद्य तत्त्व होय. त्यालाच बाधा करणारा कर्मसिद्धान्त समाजमनांतून नष्ट झाल्यावांचून लोकशाही यशस्वी होणें कांलत्रयीं शक्य नाही.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात रानडे, दयानंद, विवेकानंद, टिळक इत्यादि थोर पुरुषांनी बुद्धिवाद, प्रवृत्तिवाद, परिवर्तनशीलता, मानवत्वाची प्रतिष्ठा इत्यादि धर्मक्रांतीची तत्त्वें मान्य करून धर्मसुधारणेचें तत्त्व अंगीकारलें तेव्हा कर्म- सिद्धान्ताची ही काळमिठी सुटली आणि लोकशाहीला अवश्य ती मनोवृत्ति भारतांत निर्माण होऊ लागली. कर्मसिद्धान्तच या धर्मधुरीणांनी अमान्य केला असें नव्हे. पण त्याच्या अनुषंगाने येणारें दैववादाचें, जातिभेदाचें, विषमतेचें तत्त्वज्ञान मात्र त्यांनी समूळ खंडून टाकलें. दीनदलित, शूद्र, अंत्यज हे पूर्वकर्मामुळे त्या पायपयोनींत जन्मले असून या जन्मी त्यांनी श्रेष्ठ वर्णाची सेवाच केली पाहिजे व त्या पुण्याईने ते पुढील जन्मीं श्रेष्ठ जातीत जन्माला येतील तेव्हा त्यांना समाजांत उच्च प्रतिष्ठा प्राप्त होईल या जुन्या धर्मशास्त्राच्या विचाराला त्यांनी क्षणभरहि थारा दिला नाही. तसें असतें तर त्यांच्याशी बंधुत्वाचे नाते सांगून, त्यांनाच परमेश्वर मानून या थोर पुरुषांनी त्यांच्या सेवेला वाहून घेतलेच नसतें !
मुक्त मनुष्यत्व
तेव्हा मानवी संसाराचें तात्त्विक चिंतन करतांना कर्मसिद्धान्त कोणी मानतो की नाही याला महत्त्व नसून त्यावरून प्राचीन धर्मशास्त्राने सांगितलेले व्यावहारिक विचार लोक मानतात की काय व ते कितपत मानतात याला महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीने पाहतां प्राचीन धर्मशास्त्राचा समाजाला अत्यंत घातक असा हा कर्मसिद्धान्त आता भारतांत जवळजवळ कोणीच मानीत नाही, असें म्हणण्यास कांही चिंता नाही. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय-सर्व क्षेत्रांतल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यास भारतीय जनता आता सिद्ध झाली आहे. ती त्या सिद्धान्तावरील श्रद्धा लोपल्यामुळेच होय. ती श्रद्धा लोपल्यामुळेच येथलें मनुष्यत्व मुक्त झालें आहे व लोकसत्ताक शासन पेलण्याचें सामर्थ्य त्याला लाभण्याची आशा वाटू लागली आहे.
लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला विचार-उच्चार-आचाराचें जसें स्वातंत्र्य असतें तसेंच संघटन-स्वातंत्र्य असतें. म्हणजेच विरोधी पक्षालाहि सत्ताधारी पक्षाइतकीच मान्यता व प्रतिष्ठा असते. विरोधी पक्षाला मान्यता याचा अर्थ आपल्याइतकेंच दुसऱ्याचें मत, दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याचा मार्ग हा बरोबर व यशोदायी असूं शकेल व आपले मत पूर्णपणे प्रामाणिक चुकीचें व भ्रांत असूं शकेल या विचार- सरणीला मान्यता असा होतो आणि फार मोठी मानसिक क्रांति झाल्यावांचून ही मान्यता देणें समाजाला शक्य नसतें.
आपले मत, आपला पंथ, त्याचे सिद्धान्त हे पूर्णपणें किंवा अंशतः तरी चुकीचे असूं शकतील हा विचार धर्मशास्त्रकार त्रिकालदर्शी आहेत, त्यांना अंतर्ज्ञान आहे त्यांच्या मुखाने परमेश्वर बोलतो असें मानणारा समाज कधीहि स्वीकारणार नाही. प्राचीन काळी भारतांत परधर्म सहिष्णुता होती असे म्हणतात. होती हें खरें आहे. पण ती फार फार मर्यादित अर्थाने. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे परमार्थप्राप्ति करून घेण्याचा अधिकार आहे, असा त्या तत्त्वाचा अर्थ होतो. पण समाजांतील शूद्र, अंत्यज यांना हा अधिकार हिंदु धर्मशास्त्राने कधीहि दिला नव्हता. वेदाध्ययन, तप, यज्ञ यांचा अधिकार त्यांना नव्हता. तसें त्यांनी केल्यास त्यांना देहदंडाची शिक्षा शास्त्राने सांगितली होती. जातिभेद, चातुर्वर्ण्य, बालविवाह, विधवाविवाह, घटस्फोट या बाबतींत तें धर्मशास्त्र विरोधी पक्षावद्दल असेंच असहिष्णु होतें. त्यांतूनहि इ. स. १००० पर्यंत विरोधी विचार-आचारालाहि बराचसा अवसर होता. पण पुढल्या तमोयुगांत तो लुप्त होऊन सर्व समाज, प्रत्येक वर्ण, प्रत्येक जाति ही पूर्ण असहिष्णु बनली आणि जातिवर्णाचे अगदी सामान्य आचार-विचार, अत्यंत क्षुल्लक बाबतींत जरी उल्लंघिले गले तरी, नकळत उल्लंघिले गले तरी, अपराधी मनुष्याला बहिष्काराची भयानक शिक्षा भोगावी लागे. अशा स्थितीत विरोधी विचारसरणी- विरोधी तत्त्व यांना स्वमताइतकीच प्रतिष्ठा आहे, हें तत्त्व समाजाला मान्य होणें शक्यच नव्हतें. ही असहिष्णुता ख्रिस्ती समाजांतील विरोधी पक्षियांना जिवंत जळून मारीत असे ! मुस्लिम समाजांत त्यांना दगडांनी ठेचून मारीत असे आणि हिंदु समाज अशा लोकांना बहिष्कृत करून जन्मोजन्मीं मुस्लिम किंवा ख्रिस्ती होऊन राहण्याची शिक्षा देत असे.
गेल्या शतकांत राममोहन राय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, ज्योतिबा फुले, दयानंद, आगरकर, कर्वे यांचा समाजाने खूप छळ केला आणि ब्रिटिशांचें राज्य नसतें तर त्यांना हिंदु समाजांत राहतांच आलें नसतें. पण त्या वेळी हे लोक निर्माणच झाले नसते ! झाले नाहीत हें ऐतिहासिक सत्यच आहे. पाश्चात्त्य विद्येमुळे त्रिकाल ज्ञानाची भ्रांत कल्पना नष्ट झाली, धर्मग्रंथांचे अपौरुषेयत्व नष्ट झालें, मानवी बुद्धीचें अपूर्णत्व मान्य झालें, म्हणूनच विरोधी पक्षाला प्रतिष्ठा लाभू शकली.
व्यक्तीसाठी समाज
समान कायदा, त्या कायद्याचें राज्य, आत्मस्वातंत्र्य (कर्मसिद्धान्तापासून मुक्तता) व मानवाच्या अपूर्णत्वाची जाणीव या तत्त्वांच्या स्वीकारामुळेच व्यक्तीसाठी समाज का समाजासाठी व्यक्ति याबद्दल संदेह न राहतां 'व्यक्तीसाठी समाज' हा सिद्धान्त मान्य होऊं शकतो. लोकशाहीचें हें तितकेंच महत्त्वाचें तत्त्व आहे. दंड-सत्तावादी हे तत्त्व कदापि मान्य करीत नाहीत. राष्ट्रासाठी, समाजासाठी व्यक्ति असा त्यांचा सिद्धान्त असतो. त्यामुळे समाजहिताच्या नांवाखाली हजारो, लक्षावधि प्रजाजनांना ते खुशाल बळी देऊं शकतात. आणि हें समाजहित ठरवावयाचें कोणीं ? तर स्टॅलिन किंवा हिटलर यांनी ! त्यांची लहर हा कायदा असतो. मनु-याज्ञवल्क्यांप्रमाणे ते स्वतःला व त्यांचे अनुयायी त्यांना सर्वज्ञ, प्रमादातीत मानीत असतात. त्यांच्या ठायीं अपूर्णता असणें शक्यच नाही, असा त्यांच्या भक्तांचा दावा असतो. याच सिद्धान्तावर दंडसत्ता उभी असते आणि ती व्यक्तीला सर्व समाजयंत्रणेतला एक घटक असें मानीत असते.
मानवसमाजाला हें तत्त्व अत्यंत घातक असतें. त्यामुळे लोकसत्तावादी त्याचा निक्षून निषेध करीत असतात. व्यक्तीचें सुख हें अंतिम उद्दिष्ट असून त्यासाठी समाजरचना करावयाची असते, असा त्यांचा सिद्धान्त असतो. व तो कायद्याचें राज्य, आत्मस्वातंत्र्य इत्यादि उपरिनिर्दिष्ट तत्त्वांच्या आधारें, तें प्रतिपादित असतात. समाजासाठी व्यक्तीने त्याग करावा, आत्मबलिदान करावें, त्यावांचून व्यक्ति जगू शकणार नाही, हें लोकसत्तावादी पंडितांना मान्य असतें. पण हें सर्व व्यक्तीने स्वतः स्वेच्छेने करावें अशी लोकशाहींत अपेक्षा असते. व्यक्तीचें बलिदान दुसऱ्या कोणी करावयाचें नाही; आणि करावयाचें असेलच तर तें कायद्याच्या सत्तेने केलें पाहिजे असा एवढा अर्थ 'व्यक्तीसाठी समाज' या तत्त्वांत अभिप्रेत असतो आणि तो सर्व लोकशाहीला अवश्य असतो. अंध धर्मसत्ता हा अर्थ कधीच मान्य करीत नाही; कारण ती सर्वज्ञ असते.
भारतांतील वेदान्तदर्शन हें प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं परमेश्वरी अंश आहे असें मानतें. हा सिद्धान्त व्यवहारांत, प्रत्यक्षांत आणला गेला असतां तर भारत हा लोकायत्त देशांचा अग्रणी झाला असता. पण प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं चिदंश आहे, हें तत्त्व प्रतिपादणाऱ्या धर्मधुरीणांनीच लक्षावधि, कोट्यवधि लोकांना पापयोनि ठरवून, त्यांच्यांतील परमेश्वरी अंशाचा विकास कदापि होऊ द्यावयाचा नाही, असें धर्मशास्त्रांत सांगून ठेवलेलें होतें. त्या धर्मशास्त्राचा उच्छेद करून तें वेदान्त तत्त्व प्रत्यक्षांत आणण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तो अर्वाचीन युगांतील टिळक, विवेकानंदं, महात्माजी या धर्म धुरीणांनीच होय. व्यक्तीसाठी समाज हें तत्त्व त्यांना संपूर्ण मान्य असून, प्रत्येकाच्या अंतरांतील चिदंशाचा विकास व्हावा म्हणूनच त्यांनी जन्मभर कष्ट केले. 'स्वराज्य' या शब्दाचा अर्थ विशद करतांना टिळक म्हणतात, "स्व म्हणजे ज्याचा तो, किंवा एकंदर लोक, किंवा प्रजा आणि त्यांचे म्हणजे त्यांच्या सल्ल्याने चालणारें राज्य तें स्वराज्य." जर्मनी, रशिया, भारतातील संस्थानें येथे स्वकीय राजा असूनहि, तेथे 'स्वराज्य' होतें, हें टिळकांना मान्य नव्हतें. कारण प्रजासत्ताक राज्य तेंच स्वराज्य, असें त्यांचें मत होतें. 'ज्याचा तो' या शब्दांना एरवी अर्थच प्राप्त होणार नाही. समाज-संघटना टिळकांनाहि हवी होती व संघटनेत बहुमताचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे, हेंहि त्यांना मान्य होतें. पण ते म्हणतात की, "बहुमताने निर्णय झाल्यावर व्यक्तीचें विचारस्वातंत्र्य संपतें असें नाही. बहुमत आपल्या बाजूस वळवून घेण्याचा व्यक्तीचा हक्क कधीहि कोणीहि हिरावून घेऊ शकत नाही. कारण विचास्वातंत्र्य हा तर राष्ट्राचा आत्मा होय. तें जेथे नाही तें राष्ट्र मेल्यासारखेंच होय." (केसरी दि. २७-८-१९०७).
'व्यक्तीसाठी समाज' हें तत्त्व महात्माजींनी अनेक प्रकारांनी विशद करून मांडलें आहे, व्यक्ति हे ते अंतिममुल्य मानतात, हें मागे एके ठिकाणी सांगितलेंच आहे. कायद्याचें राज्य हें लोकशाहीचें तत्त्व त्यांना निश्चित मान्य आहे. पण कायदा हा अन्यायी आहे, नीतिहीन आहे असे दिसून आल्यास त्याचा शांततेच्या मार्गाने, सत्याग्रहाने भंग करण्याचा प्रत्येक व्यक्तीस हक्क आहे, असें ते म्हणतात. जें राजकीय शासनाविषयी तेंच धर्मशासनाविषयी. बुद्धीला न पटणारें विवेकाला अमान्य असणारें धर्मशासन प्रत्येक व्यक्तीने धिक्कारलेच पाहिजे ! व्यक्तीचें सुख समाजावर अवलंबून आहे, हें त्यांना मान्य आहे. पण समाजाने व्यक्तीच्या अस्मितेची जोपासना केली नाही, तर सर्व प्रगति खुंटेल असे ते बजावतात. त्या दृष्टीने ते म्हणतात की, अत्यंत उच्च पातळीवरून विचार करतां, शासनहीन समाज- व्यवस्था (अराजक) हीच आदर्श व्यवस्था होय. तेथे प्रत्येक व्यक्ति स्वयंशासन निश्चित करील. व्यवहारांत हें घडणे शक्य नाही, म्हणून समाजानें शासन स्थापिलें पाहिजे हें खरें. पण राष्ट्राचे स्वराज्य (शासन) म्हणजे व्यक्तींच्या स्वराज्यांची बेरीज आहे हे लोकांनी विसरूं नये, असें ते सांगतात.
सामान्य व्यक्तीची ही प्रतिष्ठा त्रिकालदर्शी अर्हतेला कशी सहन होणार ?
प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या इतिहासाचा मागोवा घेत घेत भारतांतील इहवादाचें विवेचन येथपर्यंत केलें. सोव्हिएट रशिया, मुस्लिम देश आणि पाश्चात्त्य राष्ट्रें यांच्या इहवादाच्या विवेचनावरून जे निष्कर्ष निघाले तेच भारतीय इहवादाच्या मंथनांतून निघतात असे आपल्याला त्यावरून दिसून येईल. इहवादावांचून कर्तृत्व नाही, महापुरुष परंपरा नाही, समाज प्रगति नाही, राष्ट्र संघटना नाही, लोकशासन नाही. प्राचीन काळीं इहवादाचा अवलंब केल्यामुळेच भारताला वैभव प्राप्त झालें. मध्यंतरी त्याच्या त्यागामुळे तमोयुग निर्माण झालें आणि गेल्या शतकांत त्याच्या तत्त्वांचे पुनरुज्जीवन झाल्यामुळेच भारताची सर्वांगीण प्रगति होऊन आपल्याला राष्ट्र संघटना, स्वातंत्र्यप्राप्ति व लोकशासनाची स्थापना यांत यश आले असा या सर्वविवेचनाचा मथितार्थ आहे.
विरोधी शक्ति
भारतांतील इहवादाच्या निरूपणाचा पूर्वार्धं येथे संपला. उभरार्धामध्ये येथल्या इहवादविरोधी शक्तींचा परामर्श घ्यावयाचा आहे. मुस्लिमांचा जमातवाद ही प्रबळ अशी विरोधी शक्ति आहे. मुस्लिम नेत्यांना इहवाद मान्य नाही, राष्ट्रवाद मान्य नाही व लोकशाही पण मान्य नाही. बहुसंख्य मुस्लिम समाज अजून शब्दप्रामाण्य, धर्माची अपरिवर्तनीयता, असाहिष्णुता, विषमता याच जीर्ण, अंध, प्रतिगामी तत्त्वांच्या सत्तेखालीच आहे. यामुळेच पाकिस्तानची निर्मिति झाली व यामुळेच भारतांत आणखी पाकिस्तानें निर्माण होण्याचा धोका आहे.
दुसरी विरोधी शक्ति म्हणजे साम्यवाद किंवा कम्युनिझम. मार्क्सवादावर किंवा खरें म्हणजे माओ, कोसिजिन यांच्यावर त्यांची, ख्रिश्चनांची जशी पोपवर, तशीच अंधश्रद्धा आहे. पांढरा कागद पोपने काळा ठरविला तर तो काळा आहे, असें आपण म्हटले पाहिजे, असें जेसुइटांचें तत्त्व आहे. कम्युनिस्टांचें तसेंच आहे. चेकोस्लोव्हाकियावर सोव्हिएट रशियाने आक्रमण केलें, पण कोसिजिन म्हणाला, तें आक्रमण नव्हे. भारतीय कम्युनिस्ट म्हणाले, ते आक्रमण नव्हे. जमातवादी मुस्लिमांप्रमाणेच कम्युनिस्ट हेहि राष्ट्रवाद जाणीत नाहीत, लोकशाही जाणीत नाहीत इहवाद जाणीत नाहीत ! तिसरी घातक शक्ति म्हणजे येथले निवडणूकनिष्ठ राजकीयपक्ष. तो जमातवाद हा साम्यवाद आणि भारतामध्ये अनेक शतके बद्धमूल झालेला जातीयवाद यांना, सत्ताप्राप्तीसाठी हे पक्ष चेतवून देऊन, स्वार्थ साधीत आहेत. त्यापायी ते राष्ट्राचा घात करतील. लोकशाहीचा बळी देतील. आणि इहवादाच्या सर्व तत्त्वांवर निखारा ठेवतील- ठेवलाच आहे !
या सर्व विरोधी शक्तींचें रूपदर्शन उत्तरार्धांत करावयाचें आहे.