श्रोतीं व्हावे समाधान। आता सांगतो उत्तम गुण॥

जेणे करिता बाणे खुण। सर्वज्ञपणाची ॥१॥

वाट पुसल्याविण जाउ नये। फळ ओळखल्याविण खाऊ नये॥

पडिली वस्तु घेऊ नये। येकायेकी॥२॥

विचारेविण बोलो नये। विवंचनेविण चालो नये॥

मर्यादेविण हालो नये। काही येक॥३॥

प्रीतीविण रुसो नये। चोरास वोळखी पुसो नये॥

रात्री पंथ क्रमु नये। येकायेकी॥४॥

जनी आर्जव तोडु नये। पापद्रव्य जोडू नये॥

पुण्यमार्ग सोडू नये। कदाकाळी॥५॥

वक्तयास खोदु नये। ऐक्यतेशी फोडू नये॥

विद्या-अभ्यास सोडू नये। काही केल्या॥६॥

तोंडाळासी भांडो नये। वाचाळासी तंडो नये॥

संतसंग खंडु नये। अंतर्यामी॥७॥

अति क्रोध करु नये। जिवलगांस खेदु नये॥

मनी वीट मानु नये। शिकवणेचा॥८॥

क्षणाक्षणा रुसो नये। लटिका पुरुषार्थ बोलो नये॥

केल्याविण सांगो नये। आपुला पराक्रमु॥९॥

आळसे सुख मानू नये। चाहाडी मनास आणू नये॥

शोधल्याविण करू नये। कार्य काही॥१०॥

सुखा आंग देऊ नये। प्रेत्न पुरुषे सांडू नये॥

कष्ट करि त्रासो नये। निरंतर॥११॥

कोणाचा उपकार घेउ नये। घेतला तरी राखो नये॥

परपीडा करु नये। विश्वासघात॥१२॥

शोच्येविण असो नये। मळिण वस्त्र नेसो नये॥

जाणारास पसो नये। कोठे जातोस म्हणऊनी॥१३॥

सत्यमार्ग सांडू नये। असत्य पंथे जाउ नये॥

कदा अभिमान घेउ नये। असत्याचा॥१४॥

अपकीर्ती ते सांडावी। सत्कीर्ती वाढवावी॥

विवेके दृढ धरावी। वाट सत्याची॥१५॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.