एकनाथी भागवत/समारोप
<poem> एकनाथी भागवत - समारोप ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
श्रीएकनाथकृत चिरंजीवपद (सार्थ) (साधकांस धोक्याची सूचना )
(ओव्या) चिरंजीवपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित् बोलूं निश्च्येंसीं । कळावयासी साधकां ॥१॥ येथें मुख्य पाहिजे अनुताप । त्या अनुतापाचें कैसें रुप । नित्य मरण जाणे समीप । न मनी अल्प देहसुख ॥२॥ म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो मीं विषयस्वार्थीं लाविला । थिता परमार्थ हातिंचा गेला । करी वहिला विचार हा ॥३॥ ऐसा अनुताप नित्य वाहतां । तंव वैराग्य ये तयाच्या हाता । त्या वैराग्याची कथा । ऐक आतां सांगेन ॥४॥ तें वैराग्य बहुतां परी । आहे गा हें अवधारीं । सात्त्विक-राजस-तामस त्रिप्रकारीं । योगीश्वरीं बोलिजे ॥५॥ नाहीं वेदविधि आचार । नेणे सत्कर्म साचार । कर्मधर्मीं भ्रष्टाकार । तो अपवित्र ’तामस’ ॥६॥ त्याग केला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूजा घेणें । शिष्यममता धरोनि राहणें । तें जाणणें ’राजस’ ॥७॥ हें वैराग्य राजस तामस । तें न मानेच संतांस । तेणें न भेटे कृष्ण परेश । अनर्थास मूळ तें ॥८॥ आतां वैराग्य शुद्ध ’सात्त्विक’ । जें मी जगद्वंद्य मानी यदुनायक । तें तूं सविस्तर ऐक । मनीं निष्टंक बैसावया ॥९॥ भागेच्छा विषयक । ते तो साडी सकळिक । प्रारब्धें प्राप्त होतां देख । तेथोनि निष्टंक अंग काढी ॥१०॥ कां जे विषय पांच आहेती । ते अवश्य साधकां नाडिती । म्हणोनि लागों नेदी प्रीती । कवणे रीतीं ऐक पां ॥११॥ जेणें धरिला शुद्ध परमार्थ । त्यासी जनमान हा अनर्थ । तेणें वाढे विषयस्वार्थ । ऐक नेमस्त विचार हा ॥१२॥ वैराग्य पुरुष देखोनी । त्याची स्तुति करिती जनीं । एक सन्मानें करोनी । पूजेलागोनि पैं नेती ॥१३॥ त्याचें वैराग्य कोमळ कंटक । नेट न धरीच निष्टंक । देखोनि मानस्तुति अलोलिक । भुलला देख पैं तेथें ॥१४॥ जनस्तुति लागे मधुर । म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार । आम्हांलागीं जाहला स्थिर । तेणें तो धरी फार ’शब्दगोडी’ ॥१५॥ हा पांच विषयांमाजीं प्रथम । ’शब्द’ विषयसंभ्रम । मग ’स्पर्श’ विषय सुगम । उपक्रम तो ऐसा ॥१६॥ नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक निद्रेपती । नरनारी शुश्रूषा करिती । तेणें धरी प्रीती स्पर्शाची ॥१७॥ ’रुप’ विषय कैसा गोंवीं । वस्त्रें भूषणें देती बरवीं । सौंदर्य करी जीवीं । देहीं भावी श्लाघ्यता ॥१८॥ रुप विषय ऐसा जडला । ’रस’ विषय कैसा झोंबला । जें जें आवडे तयाला । त्या त्या पदार्थाला अर्पिती ॥१९॥ ते रसगोडीकरितां । घडी न विसंबे धरी ममता । मग ’गंध’ विषय ओढिता । होय तत्त्वतां त्या कैसा ॥२०॥ आवडे सुमन चंदन । बुका केशर विलेपन । ऐसे पांचही विषय जाण । जडले संपूर्ण सन्मानें ॥२१॥ मग जे जे जन वंदिती । तेचि त्याची निंदा करिती । परी अनुताप नुपजे चित्तीं । ममता निश्चितीं पूजकांची ॥२२॥ म्हणाल ’विवेकी जो आहे । त्यासी जनमान करील काये’ । हें बोलणें मूर्खाचें पाहें । जया चाड आहे मानाची ॥२३॥ ज्ञात्यांसी प्रारब्धगतीं । मान झाला तरी नेघों न म्हणती । परी तेथेंच गुंतोनि न राहती । उदास होती तत्काळ ॥२४॥ यापरी साधकाच्या चित्ता । मानगोडी न संडे सर्वथा । जरी कृपा उपजेल भगवंता । तरी होय मागुता विरक्त ॥२५॥ तो विरक्त कैसा म्हणाल । जो मानलें सांडी स्थळ । सत्संगीं राहे निश्चळ । न करी तळमळ मानाची ॥२६॥ मांडीना स्वतंत्र फड । म्हणे अंगा येईल अहंता वाड । धरुनि जीविकेची चाड । न बोले गोड मनधरणीं ॥२७॥ नावडे प्रपंच-जनीं बैसणें । नावडे कोणासी बोलणें । नावडे योग्यता मिरवणें । बरवें खाणें नावडे ॥२८॥ नावडे लौकीक परवडी । नावडती लेणीं लुगडीं । नावडे परान्नगोडी । द्रव्यजोडी नावडे ॥२९॥ नावडे स्त्रियांत बैसणें । नावडे स्त्रियांतें पाहणें । नावडे स्त्रियांचें रगडणें । त्यांचें बोलणें नावडे ॥३०॥ नको नको स्त्रियांचा सांगात । नको नको स्त्रियांचा एकांत । नको नको स्त्रियांचा परमार्थ । करिती आघात पुरुषासी ॥३१॥ म्हाणाल ’गृहस्थ साधकें । स्त्री सांडोन जावें कें’ । येच अर्थीं उत्तर निकें । ऐक आतां सांगेन ॥३२॥ तरी स्वस्त्रियेवांचोनी । नातळावी अन्य कामिनी । कोणे स्त्रियेसी संनिधवाणी । आश्रयो झणीं न द्यावा ॥३३॥ स्वस्त्रीसही कार्यापुरतें । बोलावें स्पर्शावें निरुतें । परी आसक्त होऊनियां तेथें । सर्वथा चित्तें नसावें ॥३४॥ नरनारी शुश्रूषा करिती । भक्ति ममता उपजविती । परी शुद्ध जो परमार्थीं । तो स्त्रियांचे संगतीं न बैसे ॥३५॥ अखंड एकांतीं बैसणें । प्रमदासंगें न राहणें । जो निसंग निरभिमानें । त्यापें बैसणें सर्वदा ॥३६॥ कुटुंब-आहाराकारणें । अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणें । ऐसे स्थितीं जें वर्तणें । तें जाणणें शुद्ध वैराग्य ॥३७॥ ऐसी स्थिती नाहीं ज्यासी । तंव कृष्णप्राप्ती कैंची त्यासी । यालागीं कृष्णभक्तांसी । ऐसी स्थिती असावी ॥३८॥ या स्थितीवेगळा जाण । कृष्णीं मिळूं पाहे तो अज्ञान । तो सकळ मूर्खांचें अधिष्ठान । लटिकें तरी आण देवाची ॥३९॥ हें बोलणें माझिये मतीचें । नव्हे नव्हेचि गा साचें । कृष्णें सांगितलें उद्धवा हिताचें । तें मी साचें बोलिलों ॥४०॥ साच न मानी ज्याचें मन । तो विकल्पें न पावे कृष्णचरण । माझें काय जाईल जाण । मी तों बोलोन उतराई ॥४१॥ साधावया वैराग्य ज्ञान । मनुष्यदेहीं करावा प्रयत्नर । सांगे एका जनार्दन । आणीक यत्नय असेना ॥४२॥
ॐ तत्सत्-श्रीगोपाळकृष्णार्पणमस्तु॥
एकनाथी भागवत - श्रीएकनाथ स्तवन मयूरपंतरचित श्रीएकनाथ स्तवन - आर्या झाले वंद्य शतमखा जे गेले शरण भानुदासा जे । त्यासी साम्य पहातां, न उदारा रत्न सानुदासा जे ॥१॥ श्रीभागवतवरानें केलें यश शुद्ध एकनाथानें । येणें प्रमुदित झाला साधु जसा बाला सेवितां थानें ॥२॥ भूतदया संसारीं एकोपंतास निरुपमा घडली । जडली अंगासीच क्षांति सदा शांति तों गळां पडली ॥३॥ एकोबाची सेवा आवडली फार केशवा देवा । रोमांचित तनु झाल्या गंगा कृष्णा कलिंदजा रेवा ॥४॥ अत्यद्भुत यश हरिचें जेविं तसें एकनाथपंताचें । तें तें साचें जें जें वर्णितसे चरित वृंद संतांचें ॥५॥ भूताराधन-यज्ञीं, समदर्शी एक पर महार मला । द्रवुनि म्हणे पित्रन्नें भोज्य जगन्निंद्य परम हा रमला ॥६॥ एकोपंत जनार्दनपंताचें भजनही असीम करी । याची मति गुरुचरणीं, भक्ष्यीं घालि न मिठी असी मकरी ॥७॥ कथिती एकोबाच्या चरणाची अद्भुताचि बा शुचिता । रक्षी बाळ सतीचा तत्तनुतें भस्म करुनि आशु चिता ॥८॥ श्रीज्ञानेश्वर भेटे एकोबाला तसाचि अत्रिज गा । हें किति दास्य करि प्रभु ज्याहुनि आधार अन्य न त्रिजगा ॥९॥ ग्रंथ श्रीभागवत श्रीरामायण करी सुविस्तर ते । जरि न रचिता दयानिधि केवळ जड जीव ते कसे तरते ॥१०॥ विश्वेश्वर अविमुक्तीं, विठ्ठल पंढरपुरीं, प्रतिष्ठानीं । प्रभु एकनाथ, वरिला सर्व महिंत दैवत-प्रतिष्ठांनीं ॥११॥ संत म्हणति आठवती किति म्हणती आठवे अळंदी न । पाहुन वृंदावन तें तैसें हेंही म्हणे अलं दीन ॥१२॥ जा पैठणांत षष्ठीं तो संसारीं कधीं नव्हे कष्टी । हे स्वस्थाना नेते रक्षुनि अंधा बळा जशी यष्टी॥१३॥ भक्तासि नाथ जैसा विश्वाचा मायबाप हर पावे । साक्षात् भगवान् हा कीं, या भजतां सर्व ताप हरपावे ॥१४॥ प्रभुभक्त प्रभुरुप स्पष्ट म्हणुनि एकनाथ हा भावें । स्तविला भक्त मयूरें कीं येणें सर्व इष्ट लाभावें ॥१५॥ रामपदीं मन जडतां जडता मग काय कायमल सारा । पद सेवा भ्रम वारा भ्रमर जसा सेवितो कमलसारा ॥१६॥ हातीं न चित्त वित्तहि न धडे जपतपहि शुद्ध बुद्धि नसे । परि हरिजन हो प्रभुच्या हृदयीं तुमच्याहि वत्सलत्व वसे ॥१७॥ याहुनि अति अधिकोत्तर एकोपंतचि मनासि आवडला । जपलों बहुतापरि मी सेवाधर्म न समग्र सांपडला ॥१८॥ आणाव्या कावेडी श्रीगंगेच्या भरुनियां पाणी । ब्राह्मणजनकी मिरवी केली जेवीं अजांनिं बापांनीं ॥१९॥ ऐसी द्वादश वर्षें सेवा करि हरि अती अनंदानें । दाखविलें नाथाला जें सुख तें पाहिलें न नंदानें ॥२०॥ करि होड जोड बांधुनि कुलतारक नाथ गेहिंचें खोड । अति गोड कोडकौतुक भक्ताचें हरिचि ही जुनी खोड ॥२१॥ होतों वज्रांतरीं मी झाला मद्देह फार खोडकर । झिजवीत नाथसदनीं प्रायश्चित्तार्थ काय खोड कर ॥२२॥ श्रीएकनाथसंतचि गुरुपदरत वास ज्या प्रतिष्ठान । तिष्ठा नमुनी तत्पद देव धरी ज्या घरीं प्रतिष्ठा न ॥२३॥ निर्जररिपु जर्जर करि तो गुर्जरदेश-विप्र कामकरी । होऊनि नाथसदनीं गंधजलादिक उदंड काम करी ॥२४॥ शुकसम जेणें केले, विकार रिपु हे अनाथ संतत सा । भवसिंधुसेतु तो कां न ध्यावा एकनाथ संत तसा ॥२५॥ शुक भवनिधि तरले परि योगालावू धरोनियां पोटीं । एकोबाही तरले भवप्रस्तर दृढ धरोनिया पोटीं ॥२६॥ श्रीनाथघरीं पाणी द्वादश वर्षें भरीच कंसारी । त्या वंशासि भजावें सार्थक हें मुख्य सौख्य संसारीं ॥२७॥ मुरलि म्हणे सद्वंशज मम सम हरिला न अन्य आवडती । परि झाली मजहुनि ही प्रियकर बहु एकनाथ कावड ती ॥२८॥ झाली सुखसावडती श्रीहुनि बहु एकनाथकावड ती । आवडती स्कंधावरि वाहे ठेवी पदींच नावडता ॥२९॥ स्कंधावरि मद्वंशज स्वपदीं पद्मा अयोग्य ही नमनीं । अपुली दशा कशाला सांगूं झाले गृहांतरीं धमनी ॥३०॥ नेतां गंगोदक जरि पुशिलें तव नांव काय गा गोत । सांगे नाथसदनिंचा श्रीखंडया मीच दासवर्गांत ॥३१॥ श्रीधर मुरलीधर हीं नामें धरिलीं तये प्रसंगानें । देवत्वादि महत्त्वा विसरुनि गेलाचि विप्रसंगानें ॥३२॥ महदाश्रय साह्यानें स्कंधावरि वागवीत भूषण हें । त्रैलोक्यांतरिं मिरवी ’श्रीखंडया पाणक्या’ विशेषण हें ॥३३॥ बाह्यांतरिं संकोच त्यजिला सेवेंत एकनाथाच्या । विध्वंसिताघपुंज श्रवणीं पडतांचि हे कथा ज्याच्या ॥३४॥ वसुदेव-देवकीसी नंदयशोदा व्रजस्थ जन सगळे । सादर शुकतातानें वर्णियले भाग्यवान ते अगळे ॥३५॥ सत्यचि जे परगुण जरि मायेनें मोहिले तयालाही । श्रीनाथाच्या ठायीं मिथ्या माया पदार्थ हा नाहीं ॥३६॥ श्रीच्या करापरिसही मृदुतर भासति हरीस कणवाळू । खुपति न पदारविंदा नेतां पाणी स्वभक्त-कणावाळू ॥३७॥ श्रीसह मंचकशय्या तुच्छ करुनि हृदिं धरुनि कावडिला । शयना करीच रात्रौ काय म्हणावें ययाहि आवडिला ॥३८॥ मी कोण काय करितो ऐसें नुमजे असोनि बुद्धि वर । लक्षावधि कावडिनें रांजण भरि हरि जसाच कीं धिवर ॥३९॥ श्रीएकनाथसदनीं माधवजी सर्व काम हें करितो । स्वकरें चंदन घासी गंगेचें पाणि कावडीं भरितो ॥४०॥ गोपां किति गोपींना नेदी उदकासि आणिका वडिला । तो एकनाथसदनीं गंध उगाळूनि आणि कावडिला ॥४१॥ अद्यापि साण रांजण नाथद्वारांत असति देवाच्या । हातींचे, म्हणुनि कवी पंत मयूरेश तशि वदे वाचा ॥४२॥ आवडिनें कावडिनें प्रभुनें सदनांत वाहिलें पाणी । एकचि काय वदावें पडत्या कार्यार्थ वाहिले पाणी ॥४३॥ जपितपिसंन्याशांहुनि श्रीहरिला भक्त फार आवडतो । स्पष्ट पहा नाथगृहीं घेउनि वाहे जळाचि कावड तो ॥४४॥ पार्थाच्या अश्वांला करीतसे मी अहो खरारा जी । तत्तुल्य भक्त मिळतां त्यालाही होतसे खरा राजी ॥४५॥ शिरजोर बायकोचा शांत जसा शीण दादला वाहे । धी वर्तविते जीवा सत हो देवा सदा दला वाहे ॥४६॥
एकनाथी भागवत - नमन-श्लोक श्रीकृष्णदयार्णवरचित श्रीएकनाथमहाराजनमन-श्लोक
श्रीमद्विठ्ठलभक्तिकारणकुळीं तो ’भानुदास’ स्वयें । ज्याचा आत्मज ’चक्रपाणि’ भजनें तारी जडां निश्चयें ॥ झाला त्यासि सुपुत्र ’सूर्य’ मन हें तत्पादकंजीं रमो । त्यापासूनि जगद्गुरु प्रगटला त्या ’एकनाथा’ नमो ॥
अधिष्ठान जें तें प्रतिष्ठान देखा । तिथें जन्मला तो गुणातीत एका ॥ तयाचेनि नामें चुके जन्मव्येथा । नमस्कार माजा गुरु एकनाथा ॥१॥ नदी दिव्य गोदातटीच्या निवासी । सदा प्रीय जो सज्जनां वैष्णवांसी ॥ जयां वर्णितां प्रेम आल्हाद चित्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥२॥ स्वयें भानु जो, भानु आराधियेला । तयाचे कुळीं दीपकू दिव्य झाला ॥ हरीभक्ति लावूनि तारी समस्तां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥३॥ चरित्रें विचित्रें पवित्रें अपारें । मुढां पामरां तारिलें सूविचारें ॥ जयाचे कृपेनें समाधान चित्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥४॥ लिलाविग्रही सर्वही निर्मियेलें । जिवीं जीवना साधना योग्य केलें ॥ अनन्य युक्ति भक्ति जो मुक्तिदाता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥५॥ जयाची जगीं कीर्ति विस्तारलीसे । जयाचेनि नामें महादुःख नासे । जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥६॥ जेणें अर्चिलें द्वीजदेवांसि नेमें । जेणें तारिलें विश्व हें रामनामें ॥ सदा सेवि जो सद्गुरु मोक्षदाता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥७॥ जया नाम ना रुप ना गुण कांहीं । जया देह-वीदेहता भास नाहीं ॥ बहू तारिले हस्त ठेवूनि माथा । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥८॥ जगीं एकला सद्गुरु एकनाथु । असी बोलती सर्वही विश्व मातु ॥ जया ऊपमा हे नये एक देतां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥९॥ कवी नायकू दायकू सौख्यराशी । महाज्ञानसिंधू असे नाम ज्यासी ॥ जयाची जगीं वर्णितां कीर्ति गातां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥१०॥ अनंता गुणांचा नये वर्णितां हो । सदा दास तो श्मावर्णी पहा हो ॥ जयाचे मुखीं नाम रुचे समस्तां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥११॥ महा संत साधू प्रतिष्ठानवासी । स्मरा एकनाथा पदीं मुक्तिराशी ॥ जयाचे गृहीं कृष्णजी कार्यकर्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥१२॥
सद्भानुवंशीं कुलदीप-योगी । जनार्दनाचें निजसौख्य भोगी ॥ त्या एकनाथा स्मर एकभावें । होसी जगीं पावन तूं स्वभावें ॥१॥ श्रीएकनाथा घरिं आवडीनें । पाणी अणी श्रीहरि कावडीनें ॥ धोत्रें धुतो गंध उगाळुनीयां । पाणी अणी श्रीहरि गाळुनीयां ॥२॥ श्रीभानुदासा कुळिं एकनाथ । श्रीविष्णुमूर्ती उघडी कलींत ॥ दिसे जना मानव शुद्ध भोळा । वदे तुका विप्र अभंग लीला ॥३॥
एकनाथी भागवत - श्रीएकनाथस्तवकदशक
अथ कृष्णदयार्णवकृत श्रीएकनाथस्तवकदशक सप्रेमयुक्त घडली गुरुभक्ति साची । झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची ॥ ब्रह्मैव बोध समता निजनिर्विकारी । श्रीएकनाथ विबुधाभरणावतारी ॥१॥ पाहों त्रिदेव यवनाकृति आर्त आले । श्राद्धान्न घालुनि तयांप्रति तृप्त केलें ॥ साम्यें प्रशंसुनि वरप्रद केश शौरी । श्रीएकनाथ विबुधाभरणावतारी ॥२॥ त्वत्कीर्तिपुण्यसरिता कलिदोष नाशी । त्वत्सांप्रदाय परमामृत दे जनांसी ॥ ज्याच्या वरें जडमुढां भजनेंचि तारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥३॥ संपादिलें ऋण बहु द्विजभोजनासी । तें फेडिलें यदुविरें श्रुत सज्जनांसी ॥ केला ऋणी निजबळें भवबाधहारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥४॥ श्रीखंडिया म्हणवि कृष्णचि ब्रह्मचारी । सर्वोपचार जलवाहक तालधारी ॥ सेवासुखें विसरला स्वपदा मुरारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥५॥ श्रीकृष्णदास नमितां जडलिंग भागीं । केला उभा यम स्वयें रजनिप्रसंगीं ॥ तें युद्धकांड करवी परिपूर्ण अग्रीं । श्रीएकनाथ० ॥६॥ रामायणादि दशमांतिल रुक्मिणीचें । केलें स्वयंवर फलप्रद वाक्य ज्याचें ॥ अध्यात्मतंतु न तुटे कविताप्रकारीं । श्रीएकनाथ० ॥७॥ वाराणशींत विदुषांप्रति मान्य झाली । एकादशावरि टिका सुगमार्थ केली ॥ ब्रह्मीं स्वकर्मविनियोग जनोपकारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥८॥ ब्रह्मप्रतीति प्रगटी भजनीं द्विजांच्या । दुष्टाघरोग हरि पादरजेंचि ज्याच्या ॥ भूतीं दया भजन सर्व घटीं विचारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥९॥ देहात्मभाव निरसी जड दृश्यरोधें । जीवात्मता विसरवी स्वरुपावबोधें ॥ लक्ष्यांश जीवशिव ऐक्यपदीं स्विकारी । श्रीएकनाथ० ॥१०॥ हा एकनाथदशकस्तव नित्यभावें । वाग्देवता प्रकटितां सकलार्थ पावे ॥ त्याला जगद्गुरु दयार्णव साहकारी। श्रीएकनाथ विबुधाभरणावतारी ॥११॥
॥ इति श्री कृष्णदयार्णवविरचिते श्रीमदेकनाथस्तवनदशक संपूर्णमस्तु ॥
एकनाथी भागवत - नमनपंचकस्तोत्र
श्रीएकनाथनमनपंचकस्तोत्र प्रारंभ मूळावरी उपजतांचि समूळ माया । ग्रासूनियां भव पुढें नुरवी शमाया ॥ नाहीं नियामक तया दुसरा अनाथा । साष्टांग वंदिन दयार्णव एकनाथा ॥१॥ मूळीं गिळोनि भवसागर शुष्क ज्यानें । केला तयासि मग वाढविला अजानें ॥ तो भानुदासकुलभूषण भक्तिपंथा । साष्टांग वंदिन० ॥२॥ ज्याचे घरीं हरि करी उपचार सेवा । विप्रार्चनें करुनि मानत वासुदेवा ॥ तारी अपार जड ठेवुनि हस्त माथा । साष्टांग वंदिन० ॥३॥ भावें जनार्दन जनीं नयनीं निरीक्षी । बोधोनि हें गुज निजांकित भक्त रक्षी ॥ आर्ता समर्थ करितो निरसूनि व्यथा । साष्टांग वंदिन० ॥४॥ श्रीआदिनाथ गुरुदत्त-जनार्दनासी । ते साधिले करुनि सन्निध साधनासी ॥ केली तयावरुनि भागवताख्य गाथा । साष्टांग वंदिन दयार्णव एकनाथा ॥५॥
॥ श्रीमदेकनाथनमनपंचकस्तोत्रं संपूर्णमस्तु ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]