एका कामगार चळवळीचा अस्त

एका कामगार चळवळीचा अस्त


 १६ जानेवारी १९९७. रात्री दहाची वेळ. सकाळी उठून मुंबईला काही महत्त्वाच्या बैठकांकरिता जायचे होते म्हणून कागदांची जुळवाजुळव करत होतो. तेवढ्यात रघुनाथदादांचा फोन आला, "उद्याची मुंबईची बैठक होणार का? टेलिव्हिजनवर बातमी ऐकली का? डॉ. दत्ता सामंतांचा खून झाला आहे. उद्या मुंबईत बरीच गडबड असण्याची शक्यत आहे." मुंबईत एकदोन फोन केले. चौकशी केली. बैठक भायखळा म्हणजे भर कामगार वस्तीत असली तरी काही अडचण होणार नाही याची खात्री करून घेतली. ज्यांना शक्य होते, त्यांना निरोप दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता निघायचे ठरले होते, त्या ऐवजी पाचलाच निघालो.

 लोणावळ्याला वृत्तपत्रे मिळाली. सगळ्यांतच मोठी शीर्षके, फोटो, चौकटी आणि अग्रलेख घालून डॉक्टरसाहेबांच्या हत्येबद्दल मजकूर होता. प्रत्यक्ष डोक्यालाच अनेक गोळ्या लागल्यामुळे डॉक्टरीचे सर्व कसब वापरले जाऊनही चेहरा प्रचंड सुजलेला; जेमतेम ओळख पटण्यासारखा. हत्याऱ्यांबद्दल नुसत्याच वावड्या. कोणी म्हणे हे काम दाऊद इब्राहिमचे; कोणी म्हणतो अरुण गवळीचे; कोणी म्हणतो छोटा राजन. काही जणांना वाटते गिरणी मालकांनी जमिनीच्या प्रकरणी हत्या घडवून आणली असावी. डॉक्टरसाहेब खुल्या व्यवस्थेचे विरोधक; बहुराष्ट्रीय कंपन्यांचे विरोधक, तेव्हा अशा कंपन्यांच्या म्होरक्यांनीच काटा काढला असावा असा एक सूर.

 ठाण्याच्या खाडीचा पूल ओलांडला, की उजवीकडे वळणारा घाटकोपरकडे जाणारा एक रस्ता, मोठा बकाली. बाजूला दुतर्फा कचऱ्यांचे ढीग आणि झोपडपट्ट्यांच्या मधून कंटेनरांचे इमले. या रस्त्याने आज बारा वर्षांनंतर गाडी घेतली. पूर्वी अनेकदा या रस्त्याने जायचो ते दत्ता सामंतांच्या पंतरनगरमधल्या जुन्या घरी जाण्यायेण्याकरिता. त्यामुळे या रस्त्यालाच आम्ही 'डॉ. दत्ता सामंत रोड' असे नाव देऊन ठेवले होते.

 मध्ये बराच काळ लोटला, त्यामुळे पंतनगरमधले घर विचारत विचारतच शोधावे लागले. तेथे पोचलो तेव्हा ९ वाजले होते. लोक जथ्याजथ्याने तिकडे जात होते; पण अगदी आसपासच्या भागातील लोकही दैनंदिन कामाच्या घाईत लोकल पकडण्याकरिता चालले होते.

 शवयात्रा १० वाजता निघणार होती, म्हणून मी मुद्दामच इतक्या लवकर गेलो. तेथे

जमणाऱ्या लोकांत बहुतेक सर्व समाजवादी, कामगारवादी, एके काळी काँग्रेस शासनाविरुद्ध लढ्यात बरोबर आलेले, आज त्यांच्या विचारसरणीला चिकटून राहिल्याने मागे पडलेले. अशा प्रसंगीतरी त्यांच्या गाठीभेटी व्हाव्यात असे वाटत नव्हते. पंतनगरच्या घरासमोर दोनतीनशे दर्शनच्छुकांची रांग लावलेली होती. रांगेत उभे राहिलो असतो तर अर्धापाऊण तासतरी गेला असता; तेथूनच नमस्कार करून जावे अशा विचारात होतो, तेवढ्यात तेथील एका कार्यकर्त्याने मला ओळखले आणि रांग ओलांडून मला आत नेले. विनीताताई, प्रकाश, भूषण यांच्या चेहऱ्याकडे खरेच पाहवत नव्हते. दहा वर्षांपूर्वीच्या अनेक आठवणी झपाट्याने येऊन गेल्या; पण त्या सगळ्याच आता काळाच्या ओघाने विटून गेलेल्या आणि निरर्थक झालेल्या.

 डॉक्टरांची माझी पहिली गाठभेट चाकणच्या कांदा आंदोलनातच झाली. चाकणला कांद्याची पोती रस्त्यावर टाकून, आम्ही रस्ता अडवून बसलो होतो. सुरवातीला जे काही लोक रस्त्यावर अडकले, त्यांतच डॉक्टरसाहेब आणि त्यांचे सहकारी होते. मुंबईहून आंबेगाव जुन्नरकडे जाताना ते चाकणमध्ये अडकले. मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या इमारतीत उपोषण करत होतो. कार्यकर्ते डॉक्टरांना घेऊन माझ्याकडे आले. रस्त्याच्या कोंडीतून आम्हाला तरी सोडवा अशी माझ्याकडे विनंती करायला अनेक माणसं येत; त्यांची थोडी समजूत काढणे आणि रस्ता पार करून देणे हे सारखे करावेच लागत होते. डॉ. सामंत आले, नमस्कार-चमत्कार झाले, 'आपण प्रसिद्ध कामगार नेते आहोत, कामासाठी आलो आहोत, आम्हाला जाऊ द्या', अशी त्यांची विनंती असणार असा माझा होरा आणि त्यांना सोडून देण्याची सूचना कार्यकर्त्यांना देण्याच्या तयारीत मी होतो; पण डॉक्टरांनी अशी विनंती केलीच नाही. ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहते आहे ही मोठी आनंदाची आणि आशादायी गोष्ट आहे. मीही संप, आंदोलने करतो; मला आंदोलन सोडून पुढे जायचे नाही. येथे जमलेल्या शेतकऱ्यांशी दोन शब्द बोलावे एवढी इच्छा आहे."

 १९८० सालच्या काळात शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये मोठी खाई पेटलेली होती आणि त्यात तेल ओतण्याचे काम सातत्याने डावी मंडळी सतत करत असे. डावी चळवळ म्हणजे मजूर, कामगार यांची चळवळ आणि शेतकरी चळवळ म्हणजे निव्वळ गावातील धनदांडग्यांची स्वार्थी आघाडी असे सर्वसाधारण वातावरण होते. शहाद्याचे 'पुरुषोत्तम सेना' प्रकरण आणि त्याविरुद्ध डाव्यांनी केलेले आंदोलन; त्यामुळे शेतकरी समाज मोठा बदनाम झाला होता. शेतकरी म्हणजे ऊसवाले, कापूसवाले; भरपूर

सूटसबसिडी लाटणारे, वर टॅक्स भरण्याची जरूर नाही आणि आपल्या बहुसंख्येचा वापर करून राजकारणावर पगडा बसवणारा समाज अशी धारणा होती. 'डॉक्टरसाहेब काही तसले बोलतील तर उगाचीच बाचाबाची होईल. शेतकरी आंदोलनाच्या सुरवातीच्या काळात असे काही होणे बरे नाही. डाव्यांना चिखलफेक करायला आयती संधी मिळेल', असा विचार करून मी डॉक्टरसाहेबांच्या बरोबर रस्त्यावर गेलो. डॉक्टर सामंतांचा परिचय सर्वांना करून दिला. शेतकरी, शेतमजूर आणि शेतकरीकामगार या प्रश्नावर मी दिलेले ते पहिले भाषण. मग डॉक्टरसाहेब उठले; बोलण्याची शैली मोठी जोरकस. माझ्या भाषणात आकडेवारी, युक्तिवाद यामुळे एक प्राध्यापकी बोजडपणा आलेला. त्याउलट, डॉक्टरसाहेबांचे भाषण म्हणजे 'दे दणादण, दे दणादण'; मुंबईला काळ्या घोड्यापर्यंत त्यांनी लक्षावधी कामगारांचे मोर्चे नेलेले आणि डॉक्टर सामंत दिसले, की एक तालात कामगार रस्त्यावर पाय आपटून 'दे दणादण'चे कीर्तन चालू करतात हे मी ऐकले होते. बोलताना त्यांची मातृभाषा मराठी नाही असे वाटत होते; पण मोठे प्रभावाचे बोलले. 'शेतकरीकामगार यांच्यात सघर्ष नाही. भांडवलशाही जुलमाचे दोघेही बळी आहेत; कामगार आता उठला आहे. शेतकरी आता उठायला सुरवात झाली आहे. या दोन ताकदी एकत्र आल्या तर घाम गाळून जगणाऱ्यांचा उदय झाल्याखेरीज राहणार नाही.' अशी त्यांनी बाजू मांडली. शेतकरीकामगार एकजुटीच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. आम्ही त्यांना रस्ता काढून दिला. ते निघून गेले. रस्ता रोकोच्या खिंडीतून शिताफीने सुटण्याची त्यांची ही रणनीती असावी असा काहीसा भास झाला.

 १९८३ च्या नोव्हेंबरमध्ये पढरपूरला 'विठोबाला साकडे' घालायचा मेळावा घ्यायचे ठरले. ८० ते ८३ या काळात कांदा, ऊस, तंबाखू, दूध अशा अनेक विषयांवर सतत आंदोलने होत होती. धुळ्याचा जनावरांचा मोर्चाही गाजला होता. संघटनेने काहीही कार्यक्रम काढला, की त्यावर आपोआप बंदी यायची आणि त्या जिल्ह्यात प्रवेश करण्याचीही बंदी माझ्यावर लागायची. यावर उपाय म्हणून आम्ही कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने 'विठोबाला साकडे' घालायचा कार्यक्रम ठरवला; पण त्यावरही बंदी घातली गेली. साऱ्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याचीच बंदी माझ्यावर आली. शेतकरी आंदोलन चेपून टाकावे ही राज्यकर्त्यांची धडपड. पोलिसांची वागणूक बेफाम आणि अहिंसात्मक सत्याग्रही आंदोलनाच्या बेड्या आम्ही स्वत:च्याच पायात अडकवून घेतलेल्या. अशा परिस्थितीत आम्ही डॉक्टर सामंतांशी संपर्क साधला. पंढरपूरच्या कार्यक्रमाला शेतकरीकामगार असे संयुक्त रूप द्यावे असा विचार चालू झाला. शेतकरी संघटनेच्या बरोबरच

कामगार आघाडीही मंचावर असावी अशी योजना होती; पण डॉक्टर सामंतांनी मध्येच एक खोडा घातला. "शेतकरी संघटना आणि कामगार आघाडी यांचा अधिकृतरीत्या संयुक्त मोर्चा किंवा एखादा पक्ष तयार झाला पाहिजे. त्यासंबंधी सर्व तपशील कागदावर उतरवून जाहीर घोषणा झाली पाहिजे.” असा त्यांनी आग्रह धरला. आम्ही याबाबत खूप सावधगिरीने वागत होतो. इतर राज्यांतील शेतकरी आंदोलनांना राजकारणाबद्दलचे फार कठोर वावडे होते. 'बैठकीत घोषणा करायच्या आणि आठ दिवसांत घटस्फोट घ्यायचा यातून काहीच साध्य होत नाही. त्यापेक्षा, आपण एकत्र कामाला लागू; एकत्र काम करता करता एकमेकांचे विचार जास्त चांगले समजू लागतील आणि यथावकाश संघटना, आघाडी किंवा राजकीय पक्ष यांचा विचार करता येईल,' अशी आमची मांडणी. त्या काळी संघटनेचे पुण्यात जंगली महाराज रोडवर कार्यालय होते. एक दिवस डॉक्टरसाहेब सहकाऱ्यांसह मोठ्या थाटाने आले. "संयुक्त घोषणेवर सही, नाहीतर पंढरपूरच्या मेळाव्यात सहभाग नाही," अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली; मग बोलणेच खुंटले. 'साकडे मेळावा' झाला; भरघोस झाला. डॉक्टरसाहेबांनी अंग काढून घेतले. त्याचे खरे कारण राजकीय भूमिकेसंबंधी मतभेद हे मला आजही पटत नाही. कामगार आघाडीची फारशी माणसे पंढरपूरपर्यंत यायची नाहीत व संघटनेच्या जमावापुढे त्यांची उपस्थिती नगण्य होईल आणि एकूण आंदोलनात कामगार आघाडीचे स्थान दुय्यम राहील अशी त्यांना धास्ती वाटत असावी. जगभरात अनेक देशांत शेतकरीकामगार युतीचे नेतृत्व शेतकऱ्यांकडे राहू नये, कामगार अल्पसंख्य असले तरी अधिक 'झुंझार' असतात, त्यांच्याके नेतृत्व द्यावे या अहंकारापोटी कामगार नेत्यांनी संयुक्त आघाडी फोडण्याचे हे काही पहिले उदाहरण नाही.

 १९८५ मध्ये कामगार आघाडीबरोबर एकत्र काम करण्याची आणखी एक संधी आली. प्रचंड बहुमतांनी निवडून आलेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांनी कृत्रिम धाग्यांच्या वस्त्रांना सर्वतोपरी उत्तेजन देण्याचे धोरण जाहीर केले. याउलट, कापसावर मात्र निर्बंध लादून किमती पाडण्यात आल्या. संघटनेने त्याविरुद्ध मोठे आंदोलन छेडले. 'राजीवस्त्रांच्या होळ्यांचे' कार्यक्रम होऊ लागले. पुण्यामध्ये पतितपावनची मंडळी अनेक वर्षे लकडी पुला जवळ विलायती कपड्यांच्या होळीचा वार्षिक कार्यक्रम घेतात. त्यांच्या बरोबरीने आम्ही राजीवस्त्रांची मोठी होळी केली. पुण्यातले 'समाजवादी महर्षी' नाराज झाले. राजीवस्त्रांच्या होळीचा मोठा कार्यक्रम मुंबईत घेण्याचे ठरले. १२ डिसेंबर हा हुतात्मा बांबू गेनूचा स्मृतिदिन. मूळजी जेठा मार्केटातून विलायती कापडांचा ट्रक बाहेर पडत

असताना त्याच्यासमोर रस्त्यावर आडवे पडून बाबू गेनूने सत्याग्रह केला. गोऱ्या सोजरांनी ट्रक चालवून त्याच्या अंगावर घातला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात असे समोरासमोर जाणीवपूर्वक नि:शस्त्र सत्याग्रहात हौतात्म्य पत्करल्याचे हे एकमेव उदाहरण असेल.

 १२ डिसेंबर १९८५ रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर प्रचंड मेळावा घ्यायचे ठरले. मुंबईत मेळावा घ्यायचा तर मुंबईतील काही ताकदींना बरोबर घेतले पाहिजे म्हणून शिवसेना आणि कामगार आघाडी या दोघांबरोबर बोलणी सुरू झाली. मुंबईत कापड गिरण्यांचा प्रश्न त्या काळात बराच चिघळलेला होता. कामगार मोठ्या संख्येने राजीवस्त्र वापरणारे, त्यामुळे राजीवस्त्राविरुद्धचे आंदोलन मुंबईत आणि कामगारांत लोकप्रिय होणे दुरापास्तच; पण तरीही शेतकरी मुंबईत येतो आहे; तर कामगार आघाडीने त्याच्याबरोबर असलेच पाहिजे एवढ्या एकाच कल्पनेने का होईना डॉक्टरसाहेबांनी सहकार्य देण्याचे कबूल केले. मुंबईत आणि शिवाजी पार्कवर भरणाऱ्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या उपस्थितीपेक्षा कामगार आघाडीची उपस्थिती जास्त भरघोस राहील असाही त्यांचा हिशेब असावा.

 शिवसेनेला त्या वेळी काही कार्यक्रमच राहिला नव्हता. गुजराथ्यांचा द्वेष करून झाला. तामिळी, मल्याळी, उत्तर प्रदेशातील पुरभय्ये यांच्याविरुद्ध विष ओकून झाले. शिवसेना मंबईतील मराठी तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर फोफावत होती. महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी नुकत्याच जिंकल्या होत्या. महापौरपदी शिवसेनेचे छगन भुजबळ विराजमान झाले होते. 'नवाकाळ'चे खाडिलकर रशियाला जाऊन आले होते; त्यांनी 'व्यावहारिक समाजवाद' नावाचे प्रकरण मांडायला सुरवात केली होती. वेगवेगळ्या समाजांत भांडण लावण्याचा धंदा सोडून व्यावहारिक समाजवादाकडे शिवसेना वळली होती, तोपर्यंत त्यांना हिंदुत्वाचा गर्व तर सोडाच, पण आपल्या हिंदुत्वाचीही फारशी जाणीव नव्हती.

 कामगार आघाडी आणि शिवसेना दोन्हीही राजीवस्त्रांच्या बहिष्काराच्या आंदोलनात आले तर मोठे जबरदस्त आंदोलन उभे राहील अशा हिशेबाने बोलणी सुरू झाली. बाळ ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा सारा वृत्तांत स्वतंत्रपणे लिहिण्यासारखा आहे. डॉ. दत्ता सामंतांच्या स्मरणलेखात त्याने जागा अडवणे योग्य होणार नाही. ठाकरे, मनोहर जोशी यांनी राजीवस्त्रांच्या विरुद्धच्या चळवळीला पाठिंबा दिला. एकत्र काम करायला लागावे मग त्याला काय मूर्त स्वरूप देता येईल ते पाहावे असे ठरले. पण तरीही शेवटी शिवसेनेने आपले अंग काढून घेतले. शिवसेना व कामगार आघाडी यांच्यातून विस्तव जात नव्हता. दत्ता सामंत मंचावर असतील तर आम्ही तेथे येणार नाही असे ठाकऱ्यांनी

सांगितले. 'शेतकऱ्यांचा मेळावा आहे' आमच्या पाहुण्यांची यादी आम्ही ठरवणार, एका पाहुण्याने दुसऱ्याचा दुस्वास करणे शिष्टाचारास सोडून आहे, वगैरे पुष्कळ समजूत घालण्याचे प्रयत्न झाले; पण शेवटी शिवसेनेशिवायच मेळावा घ्यायचे ठरले.

 त्यावेळी अनिल गोटे संघटनेत होते. महिन्यापेक्षा जास्त काळ मुंबईत गोटे आणि त्यांचे सहकारी संघटनेच्या रीतीप्रमाणे अपार कष्ट करीत मेळाव्याचे काम करीत होते. भिंती रंगवण्याचे काम करणारी त्यांची टोळी एकवेळ जेवण, चहानाश्ता आणि हातामध्ये रंगाचे ब्रश, पांढरा रंग आणि जुने इंजिन ऑइल दिले, की काम करत राही. डॉक्टर सामंतांचे आणि गोटेंचे एकदम जमले. शिवाजी पार्कच्या मैदानावर स्टेज उभारायचे आणि लाऊड स्पीकरचे काम कामगार आघाडीच्या कुणी चारपाच लाख किंवा अशाच काही रकमेला ठरवले होते. गोटेंनी तीस हजारात हे काम करायचा प्रस्ताव आणला, तेव्हा डॉक्टरसाहेब त्यांच्या सहकाऱ्यांवर एकदम घसरले. डॉक्टरसाहेबांना राग आला म्हणजे त्यांच्या तोंडी शिव्यांच्या फैरीच्या फैरीची खैरात चाले. "एवढे समोरा समोर xxxxx मला गंडवता? या गोटेमुळे समजले. गेली इतकी वर्षे तुम्ही कितीला लुटले कुणास ठाऊक?" डॉक्टर सामंतांचा अनिल गोटेंवर मोठा लोभ जडला. "एवढा तुमचा कार्यकर्ता आम्हाला देऊन टाका" असा त्यांचा आग्रह कायम असे. माझ्याशी भेटणे, बोलणे त्यांना अवघड वाटे. गोटेंचे त्यांचे चांगले जमे. एका कोणा कामगार नेत्याने काहीतरी सूचना आणली आणि वर पुरवणी जोडली, "शरद जोशींच्या लक्षातसुद्धा यायचे नाही, तो आपला साधा सरळ माणूस !" डॉक्टर कडाडले, "तुम्हाला काही अकला आहेत का रे? गोटेसारखी माणसं जो जवळ बाळगतो तो काय असला साधा माणूस असणार?" गुंडगिरीच्या मोजमापात माझा भाव फुकटम्फाकटच वधारून गेला.

 गोटेंनी या वेळी मोठी शक्कल लढवली. महापौर छगन भुजबळ यांच्याशी सूत जमवलं. "मुंबई शहरात एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी पहिल्यांदा येणार, त्यांच्या स्वागताला जाण्याचा मान मुंबईच्या पहिल्या नागरिकाचा- महापौरांचा आहे. शिवाजी पार्कच्या मेळाव्याला पाठिंबा असो नसो, महापौराने आपले काम केलेच पाहिजे," असा त्याने युक्तिवाद केला. छगन भुजबळांना तो पटला. त्याही वेळी शिवसेनेत त्यांचा जीव घुसमटतच होता. या निमित्ताने फारसा धोका न घेता बंडाचे निशाण उभारता येईल यांची त्यांना जाणीव झाली असावी. त्यांनी यायचे कबूल केले. मोठ्या थाटात भगवा फेटा बांधून महापौराच्या झगमगाटात ते हजर झाले. शिवाजी पार्कच्या मैदानात शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा एका प्रचंड चबुतऱ्यावर उभा आहे. पुतळ्याला शोभेसा

हार गळ्यात घालणे शिडीने शक्य होत नाही. त्याकरिता फायर ब्रिगेडची क्रेन आणावी लागते. ती महानगरपालिकेकडून भाड्याने मिळते. माझ्या आठवणीप्रमाणे एक वेळचे भाडेच पंचवीसतीस हजारांचे होते. महापौर आल्यामुळे क्रेन बिनभाड्याची मिळाली आणि शेवटी प्रत्येक पदाचा काही रुबाब असतोच! छगन भुजबळ आले तेव्हा साहजिकच पत्रकारांचा गराडा तिकडे धावला; कॅमेऱ्याचे फ्लॅश त्यांच्यावरच चमकले; क्रेनमध्ये चढून पुतळ्याला हार घालण्याच्या कार्यकमात सगळ्यांचे लक्ष त्यांच्या फेट्यावरच राहिले. फक्त स्वागताचे भाषण करून त्यांनी दुसऱ्या कामाला निघून जायचे असे ठरले होते. नंतर शेतकरी संघटना व कामगार आघाडी यांचाच मेळावा दीडदोन तास चालला असता. डॉ. दत्ता सामंतांना मंचावर घेणे ठाकऱ्यांना पसंत नव्हते ते त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दत्ता सामंतांना छगन भुजबळ येणेही पंसत नसावे; पण ते त्यांनी स्पष्ट केले नाही आणि एक युक्ती केली.

 शिवाजी पार्कचे मैदान सगळे भरले होते. मुंबईच्या बाहेरून आलेले शेतकरी बहुसंख्येने होते व अपेक्षेच्या मानाने कामगार आघाडीचे लोक खूपच कमी आले होते, हेही स्पष्ट होते; पण मंचाच्या अगदी समोर महिलांच्या राखीव जागेत कामगार आघाडीच्या ४००-५०० बाया कामगार आघाडीच्या लोकांनी आणून बसवल्या होत्या. छगन भुजबळ उभे राहिले की त्या हुर्योवाडी करायला लागायच्या; घोषणा द्यायच्या. अगदी त्यांच्या मुर्दाबादच्याही घोषणा देत होत्या. छगन भुजबळ निघून जाईपर्यंत हे चालू होते. मंचावर माझ्याशेजारी बसलेल्या डॉक्टरसाहेबांना मी हा प्रकार थांबवण्याची अनेकदा विनंती केली. त्यांनीही थोडे दटावल्याचे नाटक केले; पण सगळा आधी रचलेला बनावच! काही परिणाम झाला नाही. भुजबळ नाराज होऊन गेले. शिवसेनेतून त्यांना फोडण्याचे श्रेय नंतर शरद पवारांना मिळाले; ते १२ डिसेंबर १९८७ ला अनिल गोटे यांनाच मिळाले असते.

 या काळात दोनतीन वेळा डॉक्टरसाहेबांशी चर्चा करण्याचा प्रसंग आला. एकदा मी त्यांना विचारले, "तुम्ही पगारवाढीच्या आणि बोनसच्या मागण्या करता त्या बेहिशेबी आणि काहीच्या बाही असतात असा आक्षेप आहे. आम्ही कांद्याचा भाव मागितला तर मोठ्या शास्त्रीय पद्धतीने त्याचा उत्पादनखर्च काढतो. आम्ही वापरत असलेली पद्धत कृषिमूल्य आयोगाच्या पद्धतीपेक्षाही अधिक शास्त्रीय आणि परिपूर्ण आहे असा आमचा आग्रह आहे. तुम्ही १५०० रु. ची दरमहा पगारवाढ मागितली याला आधार काय?" डॉक्टरसाहेबांनी काही हयगय न करता उत्तर दिले 'कसले हिशेब करता? हे कारखानदार सगळे खोटे हिशेब आणि ताळेबंद मांडतात. मुंबईत एकाचाही फायदा २००-३००

टक्क्यांखाली नाही. एकदा लायसेंस परमिट मिळाले की ग्राहकाला लुटायला हे XXX मोकळे. ताळेबंदात दाखवणार फायदा २० नाही तर ३० टक्क्यांचा. मला हे माहिताय, की एक दिवसदेखील कारखाना बंद ठेवणे या xxxxx ना परवडणारे नाही. त्यांनी ताळेबंद काढला, की आम्ही त्याच्यावरच हल्ला करतो. पहिल्यांदा ५०० रुपये वाढ मागितली तेव्हा मला उगाचच वाटले आपण फार मागितले; मालक मंडळी हे काही द्यायचे नाहीत आणि संप चालवणे कठीण होऊन जाईल; पण काही नाही xxxx नी पहिल्याच झटक्यात कबूल करून टाकले. मग माझीही भीड चेपत गेली आणि अशक्य वाटणाऱ्या मागण्या केल्या तरी त्या मनवून घेता येतात. कसले हिशेब आणि अर्थशास्त्र! हे xxx दिवसाढवळ्या देशाला लुटून राहिलेत. मी कामगारांकरिता त्यांच्याकडून जितकं काढून घेता येईल तितकं रपाटून काढून घेतो.'

 एकेकाळचे शोषित कामगार आता शोषक वर्गाचे भागीदार बनले आहेत. कामगारांचे संप शोषकशोषितातील संघर्ष नाही. दोन शोषकांमधील वाटणीच्या या लढाया आहेत हा मुद्दा स्पष्टपणे मांडायला मी त्यानंतरच सुरवात केली. यानंतर पुन्हा एकदा सामंतांची आणि आमची एक बैठक झाली तिचा वर्तमानपत्रात बराच गाजावाजा झाला. ती बैठक संपवून माझ्या एका भाचीच्या लग्नाला हजर राहण्याकरिता मी गेलो. माझे मेव्हणे कापड गिरणी क्षेत्रातील मोठे मान्यवर प्रस्थ होते. त्यांच्या मुलीच्या लग्नाला मुंबईतील गिरणीमालक किंवा व्यवस्थापन यांचे झाडून सारे प्रतिनिधी हजर होते. माझी ओळख करून दिल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि थोडे घाबरत घाबरतच प्रश्न विचारले, "डॉक्टर साहेबांनी कापड गिरणी कामगारांचा संप जाहीर केला आहे; तुम्ही त्यांचे मित्र आहात. अर्थशास्त्र जाणता. हे असे त्यांनी कसे काय केले? त्यांनी संप जाहीर केल्यामुळे आम्ही सगळे पेढे वाटण्याच्या मन:स्थितीत आहोत. आता गिरण्यांचा आतबट्ट्याचा धंदा राजरोसपणे आम्ही बंद करू शकू. दत्ता सामंत आज आम्हाला देवदूतांसारखे वाटताहेत. हे झाले कसे काय? ठाण्याच्या उत्तरेस असलेल्या कारखानदारीच्या क्षेत्रात आजपर्यंत सामंतांनी काम केले; ही सगळी नवीन कारखानदारी आहे, तेथे भरपूर फायदा आहे म्हणून कामगार आघाडीचे तंत्र यशस्वी झाले; पण कापड गिरण्या आधीच डबघाईला आलेल्या हे डॉक्टरसाहेबांना कोणीतरी सांगायला पाहिजे." हा एक अप्रत्यक्ष पुरावा - इतर कोणी काही म्हणाले तरी डॉक्टरसाहेबांनी गिरणी मालकांकडून पैसा घेऊन संप केला आणि गिरणी कामगारांना तोंडघशी पाडले या आरोपात काही तथ्य नाही, हे दाखवणारा.

 १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या प्रचंड सभा संघटनेने महाराष्ट्रात

भरवल्या. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवर व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर यांच्यासमवेत एक सभा झाली. त्यात मीही मंचावर होतो. जनता दलाचे सरकार दिल्लीत आल्यापासून एका नव्या अर्थशास्त्रीय चर्चेला तोंड फुटले होते. दुसरे स्वातंत्र्य आणण्याची भाषा चालू झाली होती. हे नवे पर्यायी अर्थकारण ग्रामीण व्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून चालेल असा रागरंग दिसत होता. नंतर थोड्याच काळात सगळेच उलटले. देवीलालांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली आणि ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले. हडबडून गडबडून गेलेल्या विश्वनाथ प्रताप सिंगांनी जातीय आरक्षणाचा झेंडा फडकावला आणि देश एका दरीत ढकलून दिला.

 त्या सभेला सुरवाती सुरवातीला गर्दी बरी होती. शेवटी शेवटी मैदान ओसच पडले. त्या वेळचे दलाचे कोणी दलित समाजातील नगण्य व्यक्तिमत्त्व अध्यक्ष म्हणून बोलायला उभे राहिले तेव्हा मैदानावरच्यापेक्षा मंचावरचीच संख्या अधिक अशी परिस्थिती झाली होती. मंचावर डॉक्टरसाहेब माझ्या बाजूसच बसले होते. ते सारखे चडफडत होते. "या xxx कामगारांना मी दोनदोन तीनतीन हजार रुपये पगारवाढ मिळवून दिली. xxxxx नी संपाच्या वेळी माझ्यामागे आणि मिटिंगांना शिवसेनेच्या. यांचेच संप आम्ही चालवत राहिलो हीच मोठी चूक झाली. आम्ही महाराष्ट्रभर पसरायला पाहिजे होतं. देशभर पसरायला पाहिजे होतं; कामगार चळवळीचा; डाव्या चळवळीचा फायदा या XXXXX नी घेतला. स्वत:ची घरं भरली. बिचारा खराखुरा कामगार तसाच असंघटित राहिला. आमचा सारा हिशेबच चुकला."

 कामगार युनियनची पगार, सोयीसवलती वाढवून घेण्याची चळवळ आणि तिचे समाजवादी क्रांतीतील स्थान या विषयावर भरपूर जडजंबाळ पांडित्य दाखवणारे प्रचंड लिखाण आहे. डॉक्टरसाहेब काही विद्वान मार्क्सवादी नव्हते. ट्रेड युनियन चळवळीत त्यांनी प्रवेश केला तो उत्तर मुंबईतील दगड खाणींच्या आसपासच्या झोपडपट्टीत एक डॉक्टर म्हणून. त्या कामगारांची दु:खे पाहून मन पिळवटले म्हणून ते कामगार चळवळीकडे वळले. चळवळ मोठी झाली; डॉक्टरसाहेबांचे नाव गाजले. आर.जे. मेहता, जॉर्ज फर्नांडिस आणि त्यानंतर डॉक्टरसाहेब यांनी अधिकाधिक झुंजार आणि अधिकाधिक तत्त्वशून्य कामगार चळवळ पुढे चालवली. असंघटित कामगार, शेतमजूर तसेच राहिले. प्रिमिअर, गोदरेज असल्या कंपन्यांचे कामगार सुखवस्तू बनल्यावरही कामगार क्रांतीच्या घोषणा देत राहिले. काहीतरी चुकते आहे याची डॉक्टरसाहेबांना निदान आठ वर्षे आधी जाणीव होती. फक्त सुटावे कसे ते समजत नव्हते. समाजवादाचा भुलभुलैया संपला. कामगार

क्रांतीची स्वप्ने उडून गेली; पण निव्वळ सवयीपोटी उच्चभ्रूची आंदोलने लाल झेंड्याखाली होत राहिली. जिभेला वळण पडले म्हणून शोषणमुक्तीच्या वल्गनांना उच्चार मिळत गेला.

 डॉ. दत्ता सामंत हे खरे तर एका महत्त्वाच्या कालखंडाचे नाव आहे. दहाबारा वर्षांची पोरं मुंबईच्या गिरणीत पंधरापंधरा, सोळासोळा तास काम करीत. पगार तीन आणे; रजा नाही, सुटी नाही, बदलीची सोय नाही, विश्रांती नाही, गिरणीतील मागासमोरच थकून पडणारी. या काळात ना.म.जोशी यांनी कामगार चळवळ उभी केली. श्रीपाद अमृत डांगे यांनी त्याला समाजवादी सिद्धांताचे स्वरूप दिले. 'कामगारांचा लढा पगाराकरिता नाही, पगार हे निमित्त आहे, खरे उद्दिष्ट कामगार क्रांतीचे आहे,' अशी भाषा दिली. गिरणी कामगारांनी डांग्यांनाच तोंडघशी पाडले. कामगार मैदानावर एका संध्याकाळी एक महिनाभर चाललेला गिरणी कामगारांचा संप निर्धाराने पुढे चालवण्याच्या घोषणा टाळ्यांच्या कडकडाटात देण्यात आल्या आणि दुसरे दिवशी सकाळी झाडून सारे गिरणी कामगार कामावर हजर झाले. तत्त्वनिष्ठ कामगार चळवळीचा त्याच दिवशी अंत झाला.

 कामगार चळवळ नंतर व्यावसायिक बनली. आर.जे. मेहता, जॉर्ज फर्नांडिस यांनी संघटित कामगारांच्या दंडेलशाहीचे स्वरूप कामगार चळवळीला दिले. या मालिकेतले डॉक्टर सामंत हे शेवटचे टोक. या चळवळीला आळा घालण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी शिवसेनचा राक्षस पोसला. आज तोच राक्षस काँग्रेसवाल्यांना खाऊन बसला आहे. डॉक्टरसाहेब तर निघून गेले. सुखवस्तू कामगार धर्मवादी, जातीयवादी बनले. असंघटित कामगार आणि शेतमजूरही त्याच दिशेने ओढले जात आहेत.

 कधी नव्हे इतकी एका तरुण दत्ता सामंताची गरज असताना कुणा चारपाच गुंडांनी सुपारी घेतली. सामंतांची गाडी अडवली आणि घरासमोर बेछूट गोळीबार करून एक कालखंड संपवला. कामगार विश्वातील जबरदस्त ताकद समजल्या जाणाऱ्या डॉक्टरसाहेबांना कामगार चळवळीत काय घडते आहे याची जाण आली होती, असे का होते आहे हे समजले नव्हते. आता उरलेल्या डाव्या चळवळीत समजही नाही, जाणही नाही आणि शोधण्याची इच्छाही नाही.


 

(शेतकरी संघटक, ६ फेबुवारी १९९७)