एका नटाची आत्महत्या (नाट्यछटा)

<poem>

ओढ ! जगा, असेल नसेल तितकी शक्ति खर्च करुन ओढ ! - हं चालूं दे ! दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें ! चालूं दे ! - आलों, आलों ! थांबा, भिऊं नका ! - अरे वेडया जगा, कां उगीच धडपडत आहेस ? हं ! नको आपल्या जिवाला त्रास करुन घेऊंस ! माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस ? काय माझें समाधान केलेंस रे तूं ? निव्वळ आरडाओरडा ! ' वाहवा, वाहवा ! भले शाबास ! खूप बहार केलीस ! ' - बेशरम ! हंसतोस काय ? - अरेरे ! तुझ्या नादीं लागून आजपर्यत या तोंडाला रंग फासला काय - नाचलों काय - रडलों - हंसलों ! - हाय ! जिवाची चेष्टा - या जिवाची विटंबना केली ! नको ! नको !! मला ओढूं नकोस !!! - काय वार्‍याचा सोसाटा हा ! जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे ! - अबब ! केवढा प्रचंड सर्प हा ! घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल ! अरे जारे ! कितीही जोरानें तूं मागें ओढलेंस, तरी मी थोडाच आतां मागें फिरणार आहे ! खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा ! चालूं दे ! - दंत खुपस ! नाहीं ! मी परत फिरणार नाही जा ! - ओरडा ! मोठमोठ्यानें आरोळ्या मारा ! टाळ्या वाजवा ! नाटकी - ढोंगीपणानें सगळें जग भरलें आहे ! अरे जगायचें तर चांगलें जगा ! नाही तर - चला दूर व्हा ! अरे नका ! माझ्या तोंडाला चुना - काजळ - फांसूं नका ! कोण ? कोण तुम्ही ? मला फाडायचें आहे ? तें कां ? मी कशानें मेलों तें पाह्यचें आहे ? सलफ्यूरिक ऍसिड ! - अहाहा ! काय गार - गार - वारा सुटला आहे हा ! जिकडे तिकडे बर्फच - बर्फ ! अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप ! - हः हः ! वेडया जगा ! माझीं आंतडी आपल्या कमरेभोंवती गुंडाळून मला मागें खेचण्यासाठीं कां इतका धडपडत आहेस ? अरेरे ! बिचारा रडकुंडीस आला आहे ! काय काय ? माझें आतां गूढ उकलणार ? अहाहा ! - उलथलें ! जग उलथून पडलें ! ओहो ! .... <poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.