कर्तबगार स्त्रिया/बॅरनेस बर्डेट कूटस्

हिनेंच पहिल्याने गरिबांच्या झोपड्या नष्ट केल्या!


बॅरनेस बर्डेट कूटस् : ४ :


 बॅरनेस बर्डेट कूटस् या इंग्रज स्त्रीचें चरित्र खरोखरच मोठें मननीय आहे. नशिबाचा योग, स्वतःची प्रवृत्ति, थोर पुरुषांचें साहचर्य आणि उदार माणसांचें मार्गदर्शन यांचा एक मोठा मनोज्ञ मिलाफ या बाईच्या चरित्रांत झाला; आणि व्हिक्टोरिया राणीच्या खालोखाल तिला इंग्लंडांतील प्रजा मानूं लागली!
 हिचें पहिले नांव ॲजिला जॉर्जिना असें होतें. तिचा जन्म १८१३ च्या एप्रिल महिन्यांत झाला. तिसऱ्या जॉर्जच्या कारकीर्दीत सर फ्रान्सिस बर्डेट या नांवाचा जो एक उदारमतवादी मुत्सद्दी इंग्लंडांत होऊन गेला, त्याची ही शेवटची मुलगी होय. हिची आई साफिया ही इंग्लंडांतील थॉमस कूटस् या नांवाच्या एका श्रीमंत पेढीवाल्याची मुलगी होती. दोन्ही घराण्यांतील माणसें उच्च कुलांत आणि श्रीमंतींत वाढलेली असली, तरी त्यांच्या ठिकाणीं गरिबांच्या संबंधीचा जिव्हाळा विशेष असे. रिफॉर्म बिलाच्या वेळीं सामान्य लोकांच्या बाजूनें जे विशेष झगडणारे लोक होते, त्यांत तिच्या वडिलांची गणना होत असे. त्यांनी हा झगडा इतक्या त्वेषाने केला, कीं राजानें त्यांची रवानगी शेवटीं टॉवर ऑफ लंडन या इतिहासप्रसिद्ध तुरुंगांतच केली! त्यांना पकडतांना सुद्धां सरकारी पोलिसांना मोठीच मारामारी करावी लागली; आणि लोकांनीं पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला. हा सर फ्रान्सिस १८४४ मध्ये वारला; आणि थोड्याशा दिवसांत त्याची बायकोही वारली व जॉर्जिना पोरकी बनली.
 तिकडे आजोळच्या घराण्यांत एक मोठा चमत्कारिक फरक पडला. जॉर्जिनाची आजी वारली. आणि श्रीमंत पेढीवाले जे आजोबा, त्यांनीं चौऱ्यांशी वर्षांच्या वयाला एका देखण्या नटीशीं लग्न लावलें. कांहीं दिवसांनीं थॉमस कूटस् हा वृद्ध नवरदेव मरण पावला. पण या नटीवर त्याचा जीव इतका जडला होता, की पहिल्या बायकोच्या प्रजेला कांहीही न ठेवतां त्यानें आपली सर्व जिनगी या नटीच्या नांवानेंच करून टाकली. अर्थात त्याची नात जी जॉर्जिना तिला मोठाच विषाद वाटला. हा विषाद अधिकच तीव्र बनावयास आणखी एक कारण झालें.
 वृद्ध नवरदेव लवकरच मेलेले आणि नटी तर श्रीमंत बनलेली. या नटीनें ड्यूक आफ सेंट अलवान्स या सरदाराशीं पुनर्विवाह केला. म्हणजे कूटस् च्या घराण्यांतील सारा पैसा ड्यूकच्या घराण्यांत गेला! कूटस् च्या घराण्यांतील कांही माणसांनीं आतां डचेस बनलेल्या या बाईची मर्जी संपादण्यासाठीं पुष्कळ लटपटी करून पाहिल्या; परंतु कांही उपयोग झाला नाही. मात्र विशेष गोष्ट म्हणजे ही कीं, आजोबांचा पैसा आपल्याकडे यावा, म्हणून जॉर्जिनानें या बाईची कधींही मनधरणी केली नाही.
 पण दैवाचें चक्र मोठें गंमतीनें फिरत राहिलें; आणि कोणाच्या ध्यानीं ना मनीं असा एक प्रकार या डचेसनें करून टाकला. आपण मरतों असें जेव्हां तिला दिसूं लागलें, तेव्हां आपल्याकडे आलेली सारी दौलत कूटस् च्या घराण्यांतील आहे हें ओळखून, या बाईनें मृत्युपत्रांत लिहून ठेवले कीं, "माझ्या पहिल्या नवऱ्याची नात जी अँजिला बर्डेट, तिला ही सारी दौलत मिळावी. अट मात्र एवढीच कीं, बर्डेट या आपल्या आडनांवापुढें कूटस् हें आजोळचें आडनांवही तिनें जोडून द्यावे." अशा रीतीनें तेवीस वर्षांच्या वयाला अजिला जॉर्जिना बर्डेट हिला दोन कोट रुपयांचा खजिना वारस म्हणून मिळाला! खुद्द इग्लंडच्या राणीची सुद्धां खाजगी दौलत इतकी मोठी नव्हती.
 भरींत भर म्हणून आणखी एक मौजेची गोष्ट घडून आली. ड्यूक ऑफ सेन्ट अलबान्स याच्या बायकोनें पहिल्या नवऱ्याकडून आलेली दौलत त्याच्या नातीच्या नांवानें करून ठेवतांना आपल्या दुसऱ्या नवऱ्याची म्हणजे ड्यूकचीहि एक तरतूद करून ठेवली. बावन एकरभर पसरलेल्या तिच्या मिळकतींतील एका उद्यानांत एक मोठा सुंदर राजवाडा होता. हें उद्यान व हा राजवाडा तिनें ड्यूकच्या नांवाने करून टाकला. यांतून त्या ड्यूकला दर वर्षी एक लाख रुपये मिळत असत. याचा भोगवटा थोडीशी वर्षे घेतो तोंच या ड्यूकलाहि मरणानें गांठले; आणि मग, ही मिळकतही अँजिला जॉर्जिना हिलाच वारसा हक्काने मिळाली.
 नशिबाचा जोर असला म्हणजे काय घडतें तें बघा. वास्तविक पाहतां, तिचा बाप जो सर फ्रान्सिस, त्याच्यापाशीं कांहींच फारसें नव्हते; आणि म्हातारपणीं प्रेमवेडा बनलेल्या आजोबानें सारी दौलत एका नटीच्या हवाली केली होती. ही दौलत बरोबर घेऊन नटी दुसऱ्या नवऱ्याच्या घरीं गेली होती. पण मरतांना तिला सद्बुद्धि झाली; आणि इतकीं चंचल बनलेली लक्ष्मी योग्य मार्गावर येऊन, आँजिला जॉर्जिना हिला मिळाली! तेवीस वर्षांची, अत्यंत सुस्वरूप तरुण मुलगी, रहावयाला राजवाड्यासारखीं सुंदर मंदिरें, भोवताली कित्येक एकरांचें रम्य उपवन, आणि घरांत दोन कोट रुपयांचा खजिना. अर्थात् या देखाव्याकडे कोणाकोणाचें लक्ष गेलें असेल, याची कल्पना आपल्याला सहज करतां येते. पण इतिहास घडला तो मात्र निराळा!
 मोठमोठाल्या डचेसेस्, इंग्लंडचा वृद्ध मुख्य प्रधान डयूक ऑफ विलिंग्टन्, अशा सारख्या थोर स्त्रीपुरुषांची वात्सल्यबुद्धीची पाखर तिच्यावर राहूं लागलीच. पण नवलाची गोष्ट ही कीं, तेव्हां हळूहळू उदयास येऊ लागलेला इंग्लंडचा सुप्रसिद्ध कादंबरीकार जो चार्लस् डिकन्स, त्याची आणि आँजिला जॉर्जिना हिची ओळख झाली. डिकन्सचें कादंबरीवाङ्मय वाचून जॉर्जिनाच्या मनांत, समाजांतील हीन, दीन, दुःखी, दुबळी अशा लोकांविषयीं मोठीच करुणा उत्पन्न झाली होती. त्यांतच जेव्हां त्याची प्रत्यक्ष ओळख झाली; आणि तो तिच्याशीं संभाषण करूं लागला, तेव्हां या स्त्रीच्या मनाला कारुण्याची मोठीच भरती येऊ लागली; आणि आपल्याजवळ असलेल्या पैशाचा उपयोग निर्धन आणि कष्टी लोकांच्या विपत्ती नाहीशा करण्याकडेच करावा, असा निश्चय तिनें केला.
 डिकन्सला बरोबर घेऊन ही श्रीमंतीण लंडन शहरांतील दारिद्र्यानें गांजलेल्या आणि घाण व दुर्गन्धी यांचा बुजबुजाट झालेल्या पेठांतून मुद्दामच हिंडूं लागली. 'नोव्हास्कोशिया बाग' या नांवाची एक अतिशय घाणेरडी वस्ती तेव्हां लंडन शहरांत होती. ही वस्ती म्हणजे रोगाचें माहेरघरच बनलेलें असे. चिखल आणि सडके पदार्थ ही जिकडे तिकडे पसरलेलीं असत; आणि नीतिअनीतीचा कसलाही विवेक येथल्या लोकांना राहिलेला नव्हता. चोरटे, खुनी, आणि छिनाल अशा लोकांचा गजबजाट येथे झालेला असून प्रत्यक्ष पोलिसांनाही तेथें जायची भीति वाटत असे. बर्डेट कूटस् हिनें ही सगळींच्या सगळी बाग म्हणजे ह्या वस्तीची सारी जागा सरकारांतून एकदम विकत घेतली. आणि, पहिल्या सपाट्याला तेथलीं सारीं घरे पाडून टाकून चांगलें स्वच्छ मैदान बनवलें; मग या मैदानावर आधुनिक पद्धतीचे गाळे बांधून तिनें या लोकांना रहावयास दिले. पाण्याच्या तोट्या, संडास, मोऱ्या, घराघरांच्या मध्यें सोडलेली जागा, मुलांना खेळावयासाठीं राखून ठेवलेली जागा, अशी सर्व तऱ्हेची अद्ययावत् व्यवस्था तिनें केली; आणि लोक स्वच्छता ठेवतात ना, यावरही पाळत ठेवली. हे गाळे इतके चांगले बांधले आहेत, कीं घरबांधणीच्या कल्पनांत बदल होत चाललेले असले, तरी ते अजूनही आधुनिकच असल्यासारखे दिसतात!
 हें झाल्यावर डिकन्स यानें या बाईचें लक्ष दुसऱ्या एका बाबीकडे वळवलें. लंडन शहरांत अशा कितीतरी स्त्रिया होत्या, कीं ज्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेला होता. डिकन्सला वाटे कीं, या बाया मूळच्या गुन्हेगार किंवा पातकी नाहीत. त्यांच्यावर भलभलते प्रसंग गुदरल्यामुळे त्या असल्या हीन अवस्थेला येऊन पोहोचल्या आहेत. या दारुण परिस्थितींतून त्यांना सोडवावें, अशी योजना डिकन्स यानें आंखली; आणि प्रश्न स्त्रीजातीचाच असल्यामुळे बर्डेट कूटस् हिनें तो फार ईर्ष्यानें हातीं घेतला.
 या बायांना सुधारावयाचें, तर प्रथम त्यांची चांगल्या ठिकाणीं राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, हें ओळखून बर्डेट हिनें 'सदन' नांवाची एक भली मोठी इमारत बांधली. ज्या कोणा स्त्रीला पापाच्या आणि घाणीच्या कर्दमांतून बाहेर पडावयाचें असेल, तिनें या सदनांत येऊन रहावें, अशी पत्रे या स्त्रियांना डिकन्स यानें स्वतःच लिहिली. प्रत्यक्ष पत्रे लिहिण्याचें काम जरी डिकन्स यानें केलेले असले, तरी माहितगार लोकांच्या मताप्रमाणें, त्या पत्रांतला सारा मतलब बर्डेटनें सांगितलेला असे. कारण, अशा स्त्रियांचें मानसिक दुःख काय असूं शकेल, याची खरी खरी कल्पना स्त्री म्हणून, बर्डेटलाच असणें शक्य होतें. पत्रांत म्हटलेले असें कीं, 'बाई, मी तुम्हांला पत्र लिहितों; पण मी कोणी तुमच्याहून श्रेष्ठ माणूस आहे म्हणून लिहीत नाहीं. तुमच्या वर्तनाची ओळख तुम्हांला करून देऊन तुम्हांला लाजवावें, किंवा तुमच्या मनाला क्लेश उत्पन्न करावे, अशी इच्छा मला खरोखरच नाहीं. तुमच्या संबंधीची केवळ करुणाबुद्धिच माझ्या मनांत वागत असते. अशा परिस्थितींत सांपडलेल्या माझ्या बहिणीला मीं जसें लिहिलें असतें, तसेंच मी तुम्हांला लिहीत आहे. आपल्या या नगरीतील एका उदारमनस्क श्रीमंत कुमारिकेनें तुम्हांला आश्रय मिळावा, म्हणून एक सुंदरसें सदन बांधलें आहे; सध्यांच्या आपल्या गर्तेतून बाहेर पडावें, अशी इच्छा जर तुम्हांला खरोखरच होत असेल, तर तुम्ही तत्काळ या सदनांत या आणि तेथें वसति करा. तुम्ही रस्त्यावरून चाललेल्या असलांत, म्हणजे तुमच्याकडे पाहून या उदार कुमारिकेचें हृदय विदीर्ण होऊन जातें. ती तुम्हांला या सदनांत आश्रय देईल. येथें तुम्हांला कोणी वाईट-वाकटे बोलणार नाहीं. तुमच्या आजवरच्या पातकांचा उल्लेख येथें कोणी करणार नाहीं. येथें तुम्हांला कोणी हिणवणार नाही; आणि तुम्हीं पातकी स्त्रिया म्हणून तुम्हांला कोणी निराळें चोळीलुगडेंही देणार नाहीं; येथें राहणाऱ्या सर्वाना सारखेच पोशाख मिळतील. पश्चात्तापानें दग्ध होऊन तुम्हीं तेथें एकदां राहूं लागला, तरी इतर समाजापासून तुम्हांला मुद्दामच दूर दूर ठेवावें, अशाही या थोर स्त्रीची इच्छा नाहीं. हळू हळू तुम्हांला समाजांत प्रविष्ट करून घ्यावें, तुम्हांला आणि लोकांना तुमच्या पूर्वचरित्राचा विसर पडला म्हणजे, तुम्हीं वाटल्यास कोठेही दूरदेशीं जावें, आपल्या पसंतीच्या पुरुषांशीं लग्ने करावी; आणि तुम्हीं सुखानें संसार करावा, अशी या स्त्रिची इच्छा आहे."
 बाईच्या तर्फे डिकन्स यानें पाठवलेल्या या पत्रांना कितीतरी बायांनीं भराभर उत्तरें दिलीं; आणि त्या या सदनांत येऊन राहू लागल्या. या सदनाला 'युरेनिया कॉलेज' असें नांव मिळालें. आपण येथें रहात आहों; तर आतां आपण अब्रूदार स्त्रिया झालों आहों, असें या बायांना वाटू लागे; आणि मिळालेली पत वाढविण्यासाठी त्या अधिकच नेकीनें आणि सचोटीनें वागूं लागल्या. हळू हळू बर्डेटला दिसूं लागलें कीं, आपण दाखवलेले दातृत्व वांया गेलेलें नाहीं. नवे संसार उभे रहात आहेत, नवीं जोडपीं गुण्या गोविंदाने नांदत आहेत, आणि त्यांची घरे मुलाबाळांनी भरून गेलीं आहेत. 'युरेनिया कॉलेज' ची ही कल्पना एकंदर समाजालासुद्धां मोठी अद्भुत वाटली.
 एकीकडे बर्डेट हिच्या औदार्याचा आणि डिकन्सच्या मार्गदर्शनाचा असा एक विलास चालू असतांना, दुसरीकडे एका तरुण माणसाच्या मनांत एक निराळाच विकल्प उत्पन्न झाला. या माणसाचें नांव ड्यून असें होतें. याच्या मनानें घेतलें कीं, जर ही कुमारी एवढी सुंदर आहे, आणि श्रीमंत आहे, आणि जर आपलें मन तिच्यावर बसलेलें आहे, तर तिला प्रत्यक्ष मागणी घालावयास कांहींच हरकत नाहीं. 'माझें तुमच्यावर फार प्रेम आहे,' येवढेच त्यानें पत्रांत म्हटलें असतें, तर तिकडच्या पद्धतीप्रमाणें बर्डेटला विशेषसें कांहींच वाटलें नसतें. अशा प्रकारचीं अनेक पत्रे तिच्याकडे आतांपर्यंत आलेली होतीं. पण या डयूकचें, प्रेम' थोडें अनावरच झालें; आणि शिष्टाचाराची मर्यादा ओलांडून तो बर्डे टच्या भोंवतीं भोंवतीं करूं लागला. तिनें प्रथम प्रथम त्याच्याकडे लक्षच दिलें नाहीं. मग 'बाई घरांत नाहीत,' असें नोकरांकरवीं सांगण्याचा परिपाठ तिनें चालू ठेवला. इतक्यांतूनही दृष्टादृष्ट झालीच, तर ती त्याच्याकडे तिरस्कारानें पाहूं लागली. हें सारें तिने केलें; पण ड्यूनचा लघळपणा कांहीं केल्या संपेना.
 पातकी स्त्रियांना समाजांत आणून सोडण्याची योजना प्रत्यक्ष अंमलांत आणाल्यानंतर, लंडन शहराच्या दरिद्री वस्तींतील मच्छी बाजाराकडे बर्डेट हिचें लक्ष गेलें. हा बाजार अतिशय घाणेरडा असे. मक्तेदार लोक मालाची कोंडी करून गरीब लोकांना तो महागाईनें विकत. बर्डेट हिनें जवळच एक चांगलीशी जागा पाहून एक मोठा शोभिवंत, स्वच्छ आणि ऐसपैस असा मच्छीबाजार बांधला; आणि स्वतंत्र तऱ्हेनें तेथें माल आणवण्याची व्यवस्था केलीं. अशासाठीं कीं, तेथील गरीब गिऱ्हाईकाला तो स्वस्ताईनें मिळावा. गरीब लोकांना साहाय्य करण्याची बर्डेटची बुद्धि खरोखरच चांगली होती. पण मक्तेदारांनी या कामांत तिला यश मिळूं दिलें नाहीं. स्वतंत्रतणें ते तेथें मालच येऊ देईनात. आणि शेवटी तिनें हें सुरू केलेलें मार्केट केवळ रिकामें पडून राहिलें.
 लवकरच बर्डेट हिनें दहा लक्ष रुपये खर्च करून वेस्ट मिन्स्टर येथें आपल्या पित्याचे स्मारक म्हणून, एक चर्च बांधलें आणि कांहीं शाळाहि बांधल्या. या संस्थांना लागणारा सर्व खर्च बर्डेट स्वतः करीत असे. हें चर्च तर इतकें सुंदर बांधलें होतें, की लोकांनीं त्याच्याकडे बघतच रहावें. त्याचें शिल्प तर वाखाणण्यासारखें आहेच आहे; पण तेथें ठेवलेल्या पुराणकालीन कांहीं कांहीं वस्तू मुद्दाम जाऊन पहावयास हव्या, अशा योग्यतेच्या होत्या. ड्यूक ऑफ विलिंग्टन यानें स्थंडिलावर घालावयास एक भरजरी चादर दिली होती, आणि भोंवताली लावावयास गजनीचे पडदे दिले होते. श्रीरंगपट्टणावर हल्ला करून जेव्हां या ड्यूकनें टिपू सुलतानचा राजवाडा हस्तगत केला, तेव्हां जमा केलेल्या लुटींत ही भरजरी चादर आणि हे गझनीचे पडदे त्यानें तिकडे नेले होते. अशा या शोभिवंत ठिकाणीं मुलांमुलींच्या शिक्षणासाठीं बर्डेट हिनें हरतऱ्हेच्या संस्था प्रस्थापित केल्या; आणि कामकरी वर्गातील मुलां- मुलींना येथील शिक्षणाचा उत्तम उपयोग होऊं लागला. बर्डेट हिचें लक्ष अशा परोपकारांच्या कार्यात गुंतलेलें असे; पण ड्यून यानें आपली चिकाटी सोडली नाहीं. नको त्या ठिकाणीं हा दत्त म्हणून येऊन उभा राही; आणि परोक्ष रीतीनें आपली प्रीतीची मागणी तिच्या कानावर घाली. आपल्या मागचा हा ससेमिरा कसा सुटेल, असें बर्डेटला झालें होतें. परंतु तिचा कांहीं इलाज चालेना. अशा अडचणींतून बाहेर पडावयास कांहीं कायद्याचा आश्रय मिळतो कां, असेंही तिनें पाहिलें; पण याहीं काम तिची निराशा झाली.
 लवकरच लंडन शहरांत हातमाग चालविणाऱ्या कोष्ट्यांच्या धंद्याचा प्रश्न उत्पन्न झाला. हे कोष्टी रेशमी कापड विणीत असत; आणि या कापडाला गिऱ्हाईकही चांगलें असे. देशादेशांत दळणवळण वाढूं लागलें होतें. त्यामुळे लंडनची बाजारपेठ हस्तगत करावी, असें परकीय देशांतील कापडवाल्यांना वाटू लागलें. रेशमी कापडांच्या ताग्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे लंडनमध्ये येऊ लागले; व हें कापड स्वस्त मिळू लागलें. अर्थात् शहरांतील कोष्ट्यांचा धंदा एकदम बसला; आणि लवकरच त्यांना अन्नान्नदशा प्राप्त झाली. बर्डेटबाईचें लक्ष त्यांच्या दुःस्थितीकडे गेलें. ज्याला जी मदत हवी असेल, त्याला ती देण्याचें काम तिनें सुरू केलें. पोट भरण्यासाठी परदेशी जातों, असें जे म्हणाले, त्यांना तिनें वाटखर्चीला पैसे दिले. जे कुणी दुसऱ्या धंद्यांत पडूं म्हणाले, त्यांना तिनें भांडवलें दिलीं. ज्यांना घरचें कोणी नव्हतें, अशा बायकांचा आणि मुलींचा प्रश्न तर फारच बिकट बनला. पण बर्डेट हिनें या मुलींना निरनिराळ्या प्रकारचीं शिक्षण देऊन कामाला लावलें; आणि प्रौढ स्त्रियांना शिवण्या-टिपण्याचें काम गांठून दिलें. पोलिसांना आणि लष्करांतील शिपायांना खूप पैरणी लागत. या कामाचा मक्ता घेऊन या प्रौढ स्त्रियांचा प्रश्न बर्डेटनें सोडविला. जे कोणी आजारी होते, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था तिनें केली. अशा रीतीनें बेकार बनलेल्या कोष्ट्यांचा प्रश्न केवळ खाजगी रीतीनें सोडविण्यांत आला.
 १८६७ साली लंडनच्या पूर्वभागांत महामारीची साथ आली; त्याबरोबर बर्डेट हिनें नर्सेस, आरोग्य तपासनीस इत्यादिकांची नेमणूक करून या सर्व वस्तींत जंतुनाशक द्रव्यांचा सडा घालण्याची व्यवस्था केली. मिळवते पुरुष पटापट मेल्यामुळे बायकामुलें उघड पडू लागली. म्हणून तांदूळ, ॲरोरूट, मांस, साबुदाणा, निरनिराळ्या तऱ्हेचीं मद्ये, दूध, रजया, ब्लॅकेटें असें पदार्थ या वस्तींत तिनें खंडीवारी पाठवून दिले.
 इकडे बर्डेटबाईचा हा परोपकाराचा उद्योग चालूं असतां, ड्यून याच्या खेपा चालूच होत्या. शेवटी पैक्याआडक्याच्या बाबतींत त्यानें लबाडीचें कृत्य केलें. म्हणून त्याच्यावर खटला होऊन त्याला पांच वर्षांची शिक्षा झाली. बर्डेट हिला बरें हायसें वाटलें, पांच वर्षे तुरुंगांत राहिल्यानें याची प्रेमाची तहान मरून जाईल, असा अंदाज तिनें केला; पण हा भाबडा गृहस्थ पांच वर्षांनीं तुरुंगांतून सुटल्याबरोबर पुन्हां त्यानें आपला लाळघोटेपणा चालू केला. परंतु शेवटी ही बाई बघत नाहीं, असें पाहून हा कंटाळला; आणि त्यानें आपलें प्रेमाचे सुकाणूं राजघराण्यांतील एका मुलीकडे वळविले. या प्रेमवेड्याकडे हळू हळू पोलिसांचे लक्ष जाऊं लागलें; आणि शेवटी त्यांनी त्याला एका वेडेखान्यांत नेऊन ठेवलें! बर्डेट ही एवढी श्रीमंत मुलगी आणि तिला आश्रयही थोरामोठ्यांचा पण या प्रेमवेड्याचें लफडें कायद्याचा आश्रय घेऊन तिला तोडून टाकतां येईना, याचें तिला नवल वाटलें. या माणसाचा तिला फारच उपसर्ग पोंचत होता. शेवटीं अशा रीतीनें त्याचा अंत झाला.
 मुक्या प्राण्यांचा छळ सगळीकडे नेहमींच होतो. बर्डेट हिचें लक्ष या प्राण्यांच्या हालांकडे जाऊं लागलें. या प्राण्यांना कठोर रीतीनें वागविणारांचा बंदोबस्त व्हावा, म्हणून प्रस्थापित झालेल्या संस्थेत बर्डेंट आरंभींच दाखल झाली होती. या कामी लागेल तेवढा पैसा ती खर्च करीत असेंच. लहानपणापासूनच मुलामुलींच्या ठिकाणीं पशूच्या संबंधानें करुणाबुद्धि उत्पन्न व्हावी, म्हणून निरनिराळ्या शाळांत या विषयांवरील निबंधाच्या स्पर्धा तिनें चालू केल्या; आणि उत्तम निबंध लिहिणांराना मुबलक बक्षिसें तिनें देऊं केलीं. टांग्याचे घोडे, ट्रामचे घोडे यांच्याकडेही तिचे लक्ष असे. जर मालक लोक किंवा हाक्ये त्यांना निर्दयपणानें वागवूं लागले, तर त्यांच्यावर पाळत ठेवून बर्डेट त्यांचा चांगला बंदोबस्त करून टाकी.
 १८४८ सालांत आयर्लंडमध्ये फार मोठा दुष्काळ पडला. तेव्हां तिनें तिकडील मिशनऱ्यांच्या हातीं एक लाख रुपये दिले; आणि त्यांतल्या त्यांत गरीब लोकांच्या भाकरीसाठीं या रक्कमेचा व्यय व्हावा, अशी व्यवस्था तिनें केली. रशिया व तुर्कस्तान यांचें युद्ध १८७७ साली सुरू झालें; आणि डॅन्यूब खोऱ्यांत रशियाची स्वारी येऊन पोचली. हजारों तुर्की लोक जीव घेऊन पळत सुटले. त्यांची अन्नान्नदशा झाली. थंडीचा कडाका पडला, बर्फाचीं वादळें होऊं लागलीं. हजारों लोक वाटेनें अत्यंत विपन्न स्थितीत इस्तंबूल येथे दाखल झाले. बादशहानें निरनिराळया मशिदींत त्यांना जागा दिलीं, राजवाड्याचीं मोठालीं दालनें खुलीं करून दिलीं, आणि लोकांनींही आपल्या घरांत त्यांना ठेवून घेतले. बर्डेटबाईंच्या कानीं हें वर्तमान आलें; आणि ज्यांच्यावर प्रसंग आला होता, ते मुसलमान असलें तरी प्राणिमात्र तेथून सारे एकच आहे; आणि आपण जर खरेखुरे ख्रिस्ती आहोंत, तर या लोकांना मदत केली पाहिजे, असें तिनें ठरविले; आणि एक मोठा थोरला निधि तिनें जमा केला. तीन लक्ष रुपये जमा करून तिनें सुलतानाकडे पाठवून दिलें. सुदान, झुलूलॅण्ड इकडे लढाईवर गेलेल्या शिपायांच्या स्वास्थासाठीं तिनें लाखों रुपयांच्या देणग्या दिल्या. जेरुसलेम शहरांत पिण्याच्या पाण्याची नीट व्यवस्था नव्हती. म्हणून जुन्या काळीं तेथें घातलेले खापरी नळ जर शहरचे अधिकारी पुन्हां चालू करीत असतील, तर खर्चाची व्यवस्था आपण करूं, असें बाईनें तेथील अधिकाऱ्यांना कळविलें. परंतु अधिकाऱ्यांना ही कल्पना मानवली नाहीं; आणि त्यांनी बाईच्या दातृत्वाचा उपयोगही करून घेतला नाहीं.
 बर्डेट बाईची दृष्टि किती विशाल आणि सूक्ष्म होती, हें आणखी एका प्रकारणावरून दिसून येईल. १८५८ सालीं एडिंबरो येथें ग्रे नांवाचा माणूस मरण पावला. त्याचा दफनविधि झाला. पण त्याला नातेवाईक फारसे कोणी नव्हते. एक बॉबी नांवाचा विश्वासू कुत्रा मात्र होता. रोजच्या रोज हा कुत्रा आपल्या धन्याच्या गारीपाशीं येऊं बसून लागला. स्मशनांतील पहारेकऱ्यानें त्याला हांकून द्यावें, पण बॉबीनें धन्याच्या गारीपाशीं पुन्हा येऊन बसावें, असा क्रम चालू झाला. होता होता पहारेवाल्यांना त्याची कींव येऊ लागली; आणि ते त्याला भाकरी टाकू लागले ग्रेच्या खड्डयावर दगडसुद्धां बसविला नव्हता. थोड्याच दिवसांनीं सारी जमीन सपाट होऊन गेली. आणि ग्रेला कोठें पुरले आहे, हें सुद्धां कळेनासें झालें. पण बॉबीनें मात्र त्या ठिकाणाची ओळख चांगली ठेवली होती. वर्षामागे वर्ष गेलें. पण बॉबीने धन्याच्या गारीवरील पहारा कधींच सोडला नाहीं; आणि पहारेकऱ्यांनी त्याला तुकडा टाकावयाचे कधीं बंद केले नाहीं. पुढें १८६७ साली नगरपालिकेनें कुत्र्यावर कर बसविण्याचे ठरविले. अध्यक्षांच्या कानावर बॉबीची हकिगत गेली. तेव्हां त्यांनी आज्ञापत्रक काढलें कीं, बॉबीला कर माफ व्हावा! त्यांनीं कौतुकाने त्याच्या गळयांत एक चांगलासा पट्टाही घातला. वर्षानुवर्ष कुत्रा मालकापाशीं येतच राहिला. शेवटी १८७२ सालीं बॉबी मरण पावला. त्याच्या विश्वासूपणाची ही हकीगत बर्डेट हिच्या कानीं आली. तेव्हां तिनें बॉबीचा एक पंचरशी धातूचा पुतळा केला; आणि एक अतिशय सुंदर तांबड्या संगमरवरी पाषाणाचा स्तंभ उभा करून त्यावर तो बसविला. पायथ्याशीं कुत्र्यांना पाणी पिण्यासाठीं म्हणुन एक सुंदरशी पुष्करणीही बांधली. प्रो. ब्लॅकी याने त्या कुत्र्याच्या विश्वासूपणाचे आणि बर्डेटच्या रसिकपणाचे केलेलें वर्णन या स्तंभावर कोरलेले आहे.
 बर्डेट कूटस् हिच्या औदार्याची वार्ता हिक्टोरिया राणीच्या कानीं केव्हांच गेलेली होती. व्हिटोरियाला माहित होतें कीं, आपल्याजवळही जितका पैसा नाहीं तितका या बाईपाशीं आहे; आणि त्याचा उपयोग दुःखितांचा परामर्श घेण्यासाठी ती करीत आहे. तसेंच सर्व देशभर तिच्या नांवाचा जयजयकार चालू असतो, या गोष्टीचाही हिक्टोरियाच्या मनावर मोठाच परिणाम झाला; आणि म्हणून तिला बॅरनेस करण्याचे तिनें ठरविलें. ही वार्ता देशांत कळतांच राणीच्या या हेतूला सर्व संस्थांनीं आणि लोकांनी मोठ्या आनंदानें आपली पसंती दर्शविली; आणि १८७१ साली बर्डेट ही बॅरनेस (एक सर्वश्रेष्ठ मानकरी) झाली. याच वेळीं 'युवराजांच्या हस्ते 'देशांतील दोन नंबरची म्हणजे राणीच्या खालोखालची स्त्री' ही पदवी तिला बहाल करण्यांत आली. तुर्कस्तानच्या सुलतानानेंही 'मेजीदी' आणि 'शफाकत' अशा पदव्या तिला बहाल केल्या; आणि लोकही तिला लेडी कूटस् असें म्हणूं लागले. ज्या बाल्टिमोर परगण्यांतील लोकांना तिनें अनेक प्रकारच्या संकटांतून वांचविलें होतें, ते लोक तर तिला बाल्टिमोरची राणीच म्हणूं लागले. 'फ्रीडम ऑफ दी सिटी ऑफ लंडन' मिळणें हा एक मोठा बहुमान समजतात. हा बायकांना तर क्वचित् एकादे वेळी मिळतो. १८७३ सालीं गिल्डहॉलध्ये फार नामांकित समारंभ झाला; आणि बर्डेट हिला हा सन्मान प्राप्त झाला.
 बर्डेटचे मित्रही फार मोठाले लोक होते. चार्लस डिकन्स हें नांव मागें आलेलेंच आहे. थॉमस मूर हाही तिचा मित्र होता. डॉ. मोफात आणि डॉ. लिव्हिंग्स्टन हे आफ्रिका खंडाचे संशोधक मिशनरी या बाईच्या मित्रपरिवारांतीलच होते. सुदान प्रान्तांत सेनापति गॉर्डन् याचा वध झाला, हे आपल्याला माहित आहे. साम्राज्यवादी सरकारचा तो एक हस्तक म्हणून आतां त्याचें नांव अप्रिय झाले असले, तरी गॉर्डन हा मोठा उमदा आणि उदार माणूस होता. सुदान प्रान्ताकडे जेव्हां तो शेवटीं जावयास निघाला, तेव्हां बर्डेटचा निरोप घेण्यासाठी तो तिच्या घरीं कांहीं वेळ जाऊन राहिला होता. जातांना 'आपले स्मरण म्हणून मला एक लहानशीं पत्रपेटिका आपल्या हाताने द्या,' अशी विनंती त्याने बर्डेटला केली. गॉर्डनवर पुढे जेव्हां तेथील रानटी लोकांनी हल्ला केला, आणि त्याच्या छातीवर भाले रोखले, तेव्हां कोटाच्या आंवल्या अंगाला त्यानें आपल्या मैत्रिणीची ही पत्र पेटिका ठेवली होती, असें पुढें दिसून आलें. तो तिकडे गेल्यावर त्याला सर्व तऱ्हेचीं सुखसाधनें उपलब्ध व्हावीत, म्हणून बर्डेट हिनें वाटले तितका पैसा खर्च केला. त्याला पत्र पोचणे अवघड होत आहे, असें दिसतांच मोरक्को देशांतील एका हुन्नरी व्यापाऱ्याला तिनें हाताशी धरलें. वेषान्तराची विद्या याला चांगली साधली होती. तो सुदानी माणसासारखा दिसूं लागला. गॉर्डन याला लिहिलेली आपली खाजगीं पत्रें एका पेटींत घालून बर्डेट हिने या व्यापाऱ्याच्या हवाली केली; आणि तीं त्यानें सुदान प्रांतांत जाऊन गॉर्डन याला पोंचतीं केलीं. आपल्यासंबंधीं बाईच्या मनांत वागत असलेला हा आत्मभाव पाहून सेनापति गॉर्डन याला निःसंशय धन्यता वाटली असावी.
 १८८१ साली बर्डेट बाईनें आपल्या एका कृत्यानें साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्काच दिला. या वेळीं बाईंना सदुसष्ट वर्षे पूर्ण झालीं होतीं. पण त्यांनीं लग्नपत्रिका काढल्या; आणि वुइल्यम ॲश्मील बार्टलेट् यांच्याशी आपण विवाह करणार आहोत, अशी घोषणा केली. आतांपर्यंतचा सारा काळ परोपकारांत आणि धर्मकृत्यांत गेलेला; आणि वयही सदुसष्ट वर्षांचें होऊन गेलेलें; अशा वेळीं बाईंना लग्न करण्याची बुद्धि व्हावी, याचें सर्वांना नवलच वाटले; आणि कांहीं कांहीं लोकांच्या मनांतून तर बाई थोड्याशा उतरल्या. लग्न केलें हें तर एक नवल होतेंच होतें; पण दुसरें नवल हें कीं, या सदुसष्ट वर्षांच्या बाईचा नवरा बार्टलेट् हा तीस वर्षाचा तरणाबांड पोऱ्या होता! हळू हळू लोकांना बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरला; आणि बाईचें वैवाहिक जीवन फार सुखानें चालू आहे, हें कळल्यावर लोकांनाही बरें वाटू लागलें. एका वर्तमानपत्राच्या बातमीदारापाशीं बाई म्हणाल्या कीं, 'आतांपर्यंतचा माझा जन्म सुखानेंच गेला होता; पण आतांची ही माझी शेवटचीं वर्षे विशेषच सुखानें जात आहेत, असे मला वाटतें." बाईंनीं आपण होऊनच अशी जबानी दिल्यानंतर शंकेखोरांना आणि कुचुकुचूं करणारांना बोलायला जागाच उरली नाहीं. बाईचा संसार श्रीमंती थाटानें व मोठ्या सुखासमाधानानें चालू होता. घराचा थाट तर केवळ अलौकिक होता. वाडा नाना प्रकारच्या अलंकारांनी शृंगारलेला असून कलावंतांनी काढलेली चित्रे आणि बनविलेले पुतळे यांनी नटलेला होता. नाना प्रकारचे वेंचक पशुपक्षी बाईंनीं जमा केले होते. आल्यागेल्याची बडदास्त तर राजेशाही पद्धतीनें राहात होती. अशा प्रकारें जीविताची शेवटचीं सव्वीस सत्तावीस वर्षे बाईनीं फार सुखासमाधानानें घालविलीं; आणि १९०६ साली या उदार बुद्धीच्या वृद्ध स्त्रीचा अंत झाला.

● ● ●