उगवाईच्या दारीचा...


उगवाईच्या दारीचा
दिवा बांधून पदरी
पाणी भरल्या डोळ्यांनी
सांज फिरली माघारी...

अंधारल्या बारा वाटा
बुझलेल्या खाणाखुणा
साथ भरल्या ओटीची
आत प्रकाशाची वेणा..

जासवंदी भांगावर
आभाळाचा मोतीचूर
दूर...दूरच्या रानात
थिरकती सोळा मोर...

सोळा मोरांच्या कहाण्या
दशदिशा वाऱ्यावरी
उरी गोंदवून डोळे
सांज फिरली माघारी...

काळ्या मातीच्या देहाचा
झुरे काठोकाठ प्राण
सीताईच्या शपथांनी
आजवेरी उरे त्राण...

याच त्राणावर भोळ्या
उभी युगे अठ्ठावीस
अंधाराला देत मिठी
आटवीत श्वास. श्वास..

पापणीच्या फटीतून
काल उजेडाची चिरी
दीठ लावूनिया गेली
कोण माळीण बोहरी?

पाठ देऊन वाऱ्याले
सांज उभी भुईवर
उगवाईच्या दिशेने
कधी उघडेल दार?

गंगाजमनी शेला


इघुरल्या पदराला
दांड कितीक घातले
नसीबाचे नऊ गिऱ्हे
माज्या वंटीला बांधले...

लेक जलमाला आली
घोर बापाले लागला
पाच पोरीचा उताडा
बांधू कोनाचे गाठीला ?...

नक्को साळा नक्को पाटी
काय कराचं लिहिनं?
बाया बापड्यांचं माये
चुली म्होरं शानपन !...

गाय दावनीला बरी
हवा मंडप येलीले
मांग...म्होरं नगं पाहू
ठीव नदर भुईले...

तुळसीचं बाळरोप
दुज्या अंगनी रोवलं
मूळ..माती इसरूनी
मंजुळांनी डवरलं

वैसाखाच्या वनव्याला
घेत्ये पदरी बांधून
इवलाल्या पानांवर
देत्ये श्रावन गोंदून...

दोन रंग दोन पोत
सुई दोऱ्यानं ववीले
गंगाजमनी ह्यो शेला
नावं नई ठिऊ त्याले


कविता माझ्या..तुझ्या

१.
आम्हीच असे बेदर्द
की,
शेकडो ऋतु छपरावरून
उडून जाताना पाहिले.
पानगळीचेही दिवस असतात.
पण
धुळीतली पाने
देठासकट गळताना
रेषा रेषांतून जपलेली...पसरलेली
झुळझुळती स्वप्नं
फांद्याफांद्यातून पेरून जातात
तेवढही
कळू नाही का ग
तुला नि मला?..?
२.
पदराआड झाकून
कुंतीवाण वाटावं
तसा
आम्ही
एकमेकींना दिलाय वसा
गांधारीच्या
आंधळ्या रात्रींचा
...
त्या दिवशी भेटलेली
ती
उंबऱ्यातून परतणाऱ्या माझा
हात दाबीत कुणकुणली
देवा शपथ सांगते ताई
लोभीबाईनं
दागिन्यांचा डबा
चारचारदा उघडून बघावा
तशी
दिवसाकाठी
चारचारदा निरी खोलून बसले
आल्यागेल्यांसमोर
पन
आई
येकालाच द्येव मानून
कुंकू ल्येते.
...
खोटं वाटतं ? हा बघा फोटू...
फोटो, पोलक्याच्या घामानं
पिवळकुटलेला, कुजलेला..
आणि
ही दुसरी कान्ता
"ताई, कोरटानं काडीमोड दिली
म्हनून काय झालं?
द्येवाबामनासमूर
त्याच्या नावानंच कुंकू ल्याले ना?
बापाचं नग..
त्येचच नाव लिवा
माझ्या म्होरं..."
...
किती वर्षे अजून
खुरट्या पानांचे उत्सव
आणि
मातीत हाराकिरी करणाऱ्या
रामाच्या सीतेचे कौतुक ?
३.
प्रत्येक दिवशीचा सूर्य
माझ्यासाठी घेऊन येतो
एक
अबोध दूरावा.
अगदी शेजारी झोपलेला तू
शेकडो... हजारो वर्षांनी
दूर असावास
तसा.
...
हाडामासा पल्याड पसरली
गावं शोधताना
पायात टोचत राहातात
मैलोनमैल तुडवलेल्या वाळूची
वखवखलेली राने...
फाटतच जातात
केळीची कोवळी पाने.
...
आताशा
मीही वाट पहाते
मावळत्या सूर्याची
एकदा अंधारात
लख्ख न्हायल्या शिवाय
नवे सूर्यबिंब
कपाळावर
कसे रेखता येणार ?...?






फुलताना

श्वास.. श्वास कोंदाटले
प्राण झुरे काठोकाठ
कशी आवरू ग सये
ओठातली गंधलाट?

पान..पान पुसटले
देठ झाले मुके..मुके
कशी आवरू ग सये
डोळ्यातले दाट धुके?

सांज दाटुनिया येता
दूर..दूर..गेले गाव
फुलताना विसरले
मूळ..मातीचेही नाव..

गझल गजाआडची

चांदण्याचा थवा
डोळियातून आज
 संथ झुले वरती
 रात्र रात्र जागती
सांगाती थंड रुंद
त्या रात्री अधूरीच
 भिंतींची साथ
 राहियली बात
प्रश्न खुळे छेडती
हसताना कोंडले
 चिमण्या ओठांचे
 पाऊस डोळ्यांचे
गजाआड माती परी
दूरातुन जडवितो
 मनमयूर मुक्त
 निखळता स्वरान्त
मिटू..मिटू डोळे अन्
मनातून मोहरती
 विझू विझू वाती
 मग्न.. भग्न गती


सजल वसंत

आयुष्य टांगले उलटे
अंगणात मेढी वरती
उतरती उन्हे वळताना
ओंजळीत उरली माती

भरतीचे अवघे पाणी
उंबऱ्यात अडुनी फुटले
मी मुक्या कळ्या फुलतीच्या
पदरात झाकुनी जगले

पर्णासम गळले आसू
निष्पर्ण उभी दारात
वेणांतुन फुलेल केव्हा
पर्णांकित सजल वसंत

सुगी

जवसाच्या पानांवर
निळं आभाळ झुकलं
काळ्या वावरात सये
वाजे कोनाचं पाऊल?

पानी पिऊन तर्राट
हुबा ऊस दावी धाक
हर्बऱ्याचे कवळे रान
तुह्या पदराने झाक !

कोऱ्या अंगाच्या गंधानं
हुब्या झाडात सळ् सळ्
जित्त्या दांडाच्या पाण्यानं
भिजे कोनाचं पातळ ?

आली हुर्ड्यात जवार
होटी दुधाळ चांदनं
पिक्क्या बोरीच्या रानात
सोन्यामोत्यांचं झुल्लनं...

गळाभर सोन ठुशा
ओंब्या लोंब्याची झिळ्-मिळं
केळीपानांच्या आडंला
कोनी नाहून घेतलं....

बाभळीच्या बांधावर
सांज उतरून आली
वल्या मातीच्या लोन्यात
पाय टाकून बैसली...

तिच्या गळा घालुनिया
कोन गुपित बोललं ?
नाही ऱ्हाईले पावनी
हितं काळीज गुंतलं !!!

दूर होई साजणा

चांदण्याचा पूर आता
दूर होई साजणा
 लागला रे ओसरू
 वस्त्र दे मज सावरु
या उजेडा सांगती
अन् तुझ्या माझ्या व्यथांची
सोहळ्याचे स्वप्न मिटवून
 रीत होईल जागती
 चूड होइल पेटती...
 ये जगाची लय धरू
सोनलाटांतून मिटली
केवड्याचा गंध सोसून
भर दुपारी चांदण्याचे
 चांदण्यांची अक्षरे
 हो जुईची लक्तरे
 स्वप्न पाहत मोहरू
उधळुनी सोळा कळा
बाभळीचे स्वप्न रेखित
तृप्तीने अतृप्त होऊन
 अंधार लेऊन रेशमी
 या इथे येईन मी
 वाट मज देई धरू


पळस रानी रंगले

कवळुनी आभाळ पिवळे
मी तुझ्या ओठातला
 पळस रानी रंगले
 अंगार पिऊनी बहरले
मी मुक्या रानात माझी
पंख मिटवुन शब्द सारे
 सात गाणी पेरली
 कोटरातुन कोंदले
गळून गेलेल्या फुलांची
वाळक्या फांद्यातले का
 याद कुठली पाखरा?
 प्राण आजच बहकले !!
उतरतीच्या सावल्यांनी
सावळे अंधार कवळून
 पेटविल्या दशदिशा
 चन्द्र भाळी गोंदले

ऋतूसंग झेलले

सरले ऋतू फुलांचे
वाटेवरी तुझ्या रे
 जाणार तू पहाटे
 मी प्राण पसरिले
जखमा इथे फुलांना
सजवून कंटकांनी
 पाने धुळीत गळती
 फुलदान मिरविले
वाहून जाय पाणी
दगडी चिरे विटांनी
 पाने धुळीत गळती
 इतिहास मढविले
वार्ता दहा दिशांना
गंधार्त पाखरांनी
 कोणी दिले निरोप
 आभाळ बहकले
जडशीळ पावलांना
वाटेतल्या धुळीने
 घालू नकोस शपथा
 ऋतु संग झेलले


ठेव भरून रांजण

चांदण्याचे गंध काल
अंगणात पेरलेले
आभाळाचे रंग काल
काळजात झेललेले...
काल.. आजच्या क्षणांचे
रुणझुणते पैंजण
उद्या परवाच्या साठी
ठेव भरून रांजण...




साता जल्माचं दळण


एका मांडीन दळते
हात लावा शेजी बाई
 साता जल्मांचं दळण
 तवा संपेल गिऱ्हाण...
सीतामाईच्या रामानं
घरीदारीच्या रामानं
 धडा घालुनिया दिला
 तंतोतंत गिरविला...
फाटलेल्या पदरांनी
टाकलेल्या सीताईंची
 कसे झाकू लवकुश ?
 हरविली भुईकुस...
सोनियाच्या भावलीला
हाडामासाची बाईल
 राम तुम्ही दिला मान
 तिचं तुडविलं मन...
तवा पासुनी संपेना
शेजीबाई आता पाहू
 साता जल्मांचं दळण
 नव्या रामाच सपन...


सये उजेडाची रेघ

माये आभाळाचा रंग
आज भोर निळा...निळा
आजवेरी डोळा माझ्या
कृष्ण भारला सावळा...

भिजलेले निळे ऊन
गाभ्यातून गह्यरले
माझ्या डोळियात नवे
कोनी सपन पेरिले ?

माये राधियेचे डोळे
त्यात गुलबासी कावा
माये आभाळी भरारे
कंठ फुटलेला रावा...

माये माझिया दाराची
कडी कोनी उकलली..
सये उजेडाची रेघ
घुसळून आत आली..


मी एक बाई

मी माय
मी भैन
मी बायको
मी येक बाई.

मी येक बाई
दीस उगोल्यापासून
हात पाय अन् जीव वढील
तेवढे कष्ट उपसणारी,
कष्ट,
कंदी शेताभातात
कंदी रानावनात
कंदी घरघरत्या कारखान्यात.

तर, मी एक बाई.
चिंद्यापांध्यात बांधलेली माझी अब्रू लुटली गेली तवा,
हीच काळी माय व्हती साक्षीला.
माज्या वंटीत शिगोशिग भरल्याता शिव्या
कंदी आईला तर कंदी माईला.
हरेक घर
हरेक झोपडी
माझ्यासाठी काळकोठडी.
पन आज
माझ्या चुलीतून उगोलाय
नवा सूर्व्य.
मला बी कळलंया
की दुसऱ्याच्या दुखऱ्या काळजावर
फुकरल्या बिगर
माज्या दुकाचं गठुडं मला फेकता येनार नाय.
अरं,
ज्याची माय दासी
त्याले मुक्ती मिळंल कसी ?
माज्या भावांनो
माज्या लेकरांनो
माज भांडान
नवऱ्या संग न्हाई
की
वाऱ्यासंग न्हाई
बापासंग न्हाई
की
सापासंग न्हाई.
आज मला जाब इचारायचाय
त्या धरमवाल्यांना
ज्यांनी धरमाची पवित्र गानी गात गात
आमची डोकी छाटून
हातांना गुलाम केलं
....
अरं माज्या लेकरा,
तुज्या मायला आता मानूस म्हणून
जगायचं हाय
मानूस म्हनून
जगायचं हाय.
(फिलीपिनी कवितेचे स्वैर रूपान्तर)

प्रिय...

प्रिय,
त्या झाडांच्या
पानांची सळ्-सळ्
अजुनही
श्वासागणिक झुळझुळतेय.
त्या झाडांचं नाव
माहित नाही मला
पण
हेमंतातल्या पानगळीसाठी
हरेक क्षण राखून ठेवलाय मी !!

प्रिय,
दूर...दूर जाणारं प्रत्येक गाव
ओल्या फांदीवरून गळणारं
हर एक पान
उदास सायंकाळी मलूलणारं
एकेक शिरीष फूल
तसंच
तुझं नावही
दूर...दूर.. वहात गेलेलं.!

प्रिय,
चालता चालता
केवढं अंतर पडलं तुझ्यामाझ्यात !
अरे!
बळकुळीची फुलं
सुकली तरी गंध देतात,
म्हणून उन्हात का वाळत घालतात ?

प्रिय,
आता सारीच पानं
विकून टाकली आहेत.
एवढंच सांग
पुढच्या जन्मी तरी दिवसा भेटशीलना ? ?

वळणावर वळताना

वळताना वळणाशी
एकदाच तुटलेले
 पाहू नको मागे
 छेडू नको धागे
एकदाच सोसवेल
नको असे कुरवाळू
 जीवघेणी कळ
 ओलेते वळ
पतझडीत वाहती
वळवसरींनी नको
 एकदाच पाने
 पेटवूस राने
खुडन फूल जा खुशाल
माझे मज ठेवुन जा
 चोरु नको बोटे
 मखमाली काटे
वळणावर वळताना
अडखळून जागेवर
 चढव नवा साज
 लागो मज ठेच


तू नि मी...

तू अस्वस्थ
भळभळती जखम
सोसणाऱ्या
अश्वत्थाम्यासारखा!
अरे,
अवघा एक बिंदू निखळला
तर
तू एवढा खिळखिळा ?
अस्तित्वाचे रंग हरवलेल्या
आभाळा सारखा !!!
एक
बंदा रूपया
एक पै उणावली तर
निष्पर्ण
आणि
एकाकी?
....
मी तर प्रत्येकक्षणी
एकेक बिंदू हरवत
जगत्येय..
किती म्हणून मोजू
हरवलेले हुंदके ?
पण
आम्ही स्वतःला
हरवतच जगायचं असतं
हा धडा
हजारो वर्षांपासून
आईच्या गर्भातच
शिकलोय
....
हाती उरलेले भूतकाळातले
बसंती क्षण
उराशी कवटाळित
उद्याचे
सस्मित स्वागत करण्याची
सस्टेनेबल 'उर्जा'
तुला
'सी यू अगेन' म्हणण्याची
निर्भयता
नक्कीच देईल मला !!

कोण दे आमंत्रण

त्या स्वरांच्या जीवघेण्या लक्ष हाका वेढिती
दूर पुरल्या चांदण्या रक्तातुनी वेल्हाळती


आत्मरंगी रंगल्या रानी अचानक वादळे
उतरत्या पाण्यातुनी वणवे फुलांचे पेटले


दिवसकलुनी सांजधारा दाटल्या माथ्यावरी
परतिच्या वाटेवरी का मातवीसी वैखरी ?


दूरच्या दूरात झुलते सायलीची वेलण
वठुनी गेलेल्या ऋतूंना कोण दे आमंत्रण


सोलुनी सुख राजवर्खी आतले विष प्राशिले
आज का वळणावरी आयुष्य अवघे पेटले

आज...

विस्तवातही होती
विस्तवात आज फक्त
 रूणझुणती धारा
 राख अन् निखारा...
श्वासांतुन शिरीषगंध
पोखरले शब्द आज
 थिरकते बहार
 श्वासांना भार...
तेव्हाचे दिवस कसे
उतरत्या उन्हांचाही
 सावनी उन्हाचे
 आज डंख जाचे
स्वप्नांची चळत उभी
ओंजळीत आज फक्त
 रस्त्यावर होती
 रखरखती माती...

सुन्न

सुन्न कोनफळी आभाळ
आतल्या आत सळाळणारं
कोसळण्याचा उन्मेषही हरवून गेलेलं...!
अशा आभाळाकडे पाहून,
बहरणारी झाडंही
कुचकं हसून पानं ढाळतात
नव्या पालवीचे चाळ झुमकावीत...
....
तेव्हा ,
अगदी दूरात उभं असलेलं
निष्पर्ण
वठलेलं झाड
मात्र,
गालात हळूच हसतं
आज नाहीतर उद्या...
कोसळणं हा तर
धर्म आहे आभाळाचा
पण
वठण्याचा सुन्न किनारा
फक्त
झाडांसाठीच!

काळ येथे रुंधला

मुक्त- नग्ना होऊनी मी
बीज पेरून तू निराळा
 प्राशिली उर्जा तुझी
 दशदिशांना पांगला..
अंकुरांच्या स्पंदनांने
बांधुनी माझ्या दिशा
 श्वास गर्भी उसळते
 तू भरारून मोकळा...
झोपल्या ज्वालामुखी सम
शत युगांनी काल माझा
 ओठ मिटवून कुंथले
 प्राण कोणी उकलला ?...
कोंडलेल्या विषकढांनी
त्याच रंगाला भुलोनी
 जाहले मी सावळी
 मेघ झम झम बरसला...
बीज चेतून बहकले अन्
उधळुनी सोळा कळा
 विश्व बघण्या झेपले
 मेघ मीही झेलला...
सूर्यदग्धा...मेघ मग्ना
कोण माझा ? मी कुणाची ?
 कोणती मी नेमकी ?
 ...काळ येथे रुंधला...

समर्पित जीवने

अक्षरांना अर्थ देऊन श्वास पेरित चालणे
अमृता वोल्हाविती ही समर्पित जीवने...


पारिजाताने लवावे हृदय जैसे कोमळ
दुःखितांच्या वेदनांचे चुंबुनी ओले वळ
वाहत्या सरितेपरी तीर फूलवित वाहणे...


जहर शब्दांचे पचवुनी हास्य ओठी गोंदले
कर्मयोगी पावलांशी कंटकांची हो फुले
पेटत्या ज्वालेपरी पंख पसरून सांजणे...


ईश्वराची साक्ष येथे लक्ष लवती मस्तके
स्वेदयात्री हे भिकारी मानवैभव या फिके
ज्यातिने ज्योतीस उजळित जन्मवेरी चालणे...

गाणे तिच्याच साठी....

गुणगुण गाणे ओठावरती, तुझिया फुलून यावे
निश्वासांचे ओझे फेकून जीवन उमलून जाये ॥धृ॥


हे हात कोवळे, ओझ्याखाली दबले
हे केस मोकळे, तेलाविण झाले जाळे
माथ्यावरचे ऊन बाभळी क्षणभर उतरून यावे... १


ही अनाथ माती, अनवाणी पायाखाली
त्या उजाड राती, स्वप्नांविण मिटल्या डोळी
हसण्यासाठी चार क्षणांचे अंगण तुला मिळावे ...२


हे श्वास उद्याचे फुलण्या आधी खुडले
आईचे दुखरे डोळे पंखातून क्षण फडफडले
या मातीच्या फुटव्यांसाठी आभाळाने गाव ....३


हे झाड कुणाचे ? माती की आभाळाचे ?
हे झाड उद्याचे पालवत्या पानफुलांचे
या विश्वाच्या आईसाठी प्राण इथे पेराव ....४

२८ ऑगस्ट १९९५ ची पहाट,
बिजिंगच्या दिशेची..


गच्च अंधाराच्या पंखावरून उडताना
आगीनगाडीच्या धुरा सारखा
अंधार
मागे..मागे
घरंगळून पडत गेला.
बहुदा,
रावणाच्या खांद्यावर बसून
उडणाऱ्या सीतेने
मागे फेकलेल्या
आकंठ दागिन्यांसारखा....


तर,
मैत्रिणी मीरे
तू
त्याही वाटेवर भेटलीस.
न थांबता
न थकता
न वाकता
चालणारी तू...
अंगभर पहेनकर 'धीरज का घागरा'
आणि
'सचकी ओढनी'
'अनदेख्यो' प्रदेशाची
वाट चालणारी
नवी दिशा शोधणारी

तू...
मीरे,
घनदाट आभाळाचा
हात धरून घुमणाऱ्या
माझ्या ज्ञानूला
रूणझुणत्या वाऱ्याच्या नितळ आरशात
दिसली होती
स्वतः अैवजी
विराणी राधा.
आणि आज?
मलाही उमजलं नाही
की
तुझा
निर्भय धीराचा
घूॅंमर घागरा
आणि
नीडर सत्याची तलम ओढणी
माझ्याही अंगभरून
कधी भिरभिरायला लागली ते !!!


मैत्रिणी मीरे,
तू...मी... नोरती.. भंवरी... साबिया
किंकरी.. झरिना... नर्गिस..जया
अशा शेकडो... हजारो
न पाहिलेल्या प्रदेशाच्या
पाऊलवाटेने धावणाऱ्या...
...

या क्षणी
पापणीतून उगवलीय
नीरव.. स्वयंभू पहाट
जी
भर बाजारात
डोईवरचा पदर
खांद्यावर घेणाऱ्या
जनाईला सापडली होती
...
उठा बायांनो उठा
आवरा झरा झरा
बिजींगच्या धावपट्टीवर
इमायनानबी
पाय टेकलेत
उतरा माय उतरा...
...
तर,
रावणाच्या
उजव्या पायाचा अंगठा
कैकयीच्या
आज्ञेने
मनभरून...
चित्रफलकावर रेखणाऱ्या
भवभूतीच्या सीते,
आज
मीही मानणार आहे आभार
रावणाचे
....



एरवी
एकवीस..पंचवीस..तिसाव्या शतकातूनही
अंधाराच्या पंखावरून
वहात राहिलो असतो
'रामनाम' जपत-

भंवरीबाई...

बीजींगच्या वाटेवर
तुझ्या हातात हात गुंफले
नि
पुन्हा एकदा कडकडून भेटलीस
भवरीबाई तू.


तेव्हापसवर
वर्तमानपत्रांच्या
मथळ्यातून
आणि
धुसमुसत्या शब्दागारातून
मस्तकात सणसणत फिरली होतीस
गोफणगुंडा फिरवीत.


त्या विभोर सायंकाळी
मात्र
कृष्णतुळशीच्या रंगातून
मिणमिणत्या पहाट - डोळ्यातून
अंगभर जाणवलीस
तनामनात भंवरलीस
आणि
बीजींगची वाट कशी
पायाखाली आल्यागत वाटली.
...
आज
पुन्हा

दोन महिन्यानंतर ...?..?
पुन्हा एकदा तू
वर्तमानपत्रांच्या काळ्या अक्षरातून...
....
मीरेच्या पायात रुतणारी वाळू
तुझ्याही पायाखाली.
विषाचा पेलाही तोच.
फक्त
समोर ठेवणारे हात
नि चेहेरे
बदलेले
....
वाटलं होतं
धीरज का घागरा
नि
सचकी ओढनी
पेहनल्यावर तरी
मीरेच्या स्वप्नातला
तो देश
तुला... मला..तिला सापडेल
पण,
भंवरीदेवी,
गड उतरून
जमिनीवर पाय ठेवणाऱ्या
मीरेला.. भवरी,सिसीलिया
कमला..नझमा..हमीदा, मी नि तिला
तो देश
कोणत्या का होइना शतकात गवसेल ना...?

पाऊस (१)

चहू अंगानी... अंगानी
दाट आभाळ झेपलं
काळ्या मातीच्या कवेत
रूप माईना सावळं... चहुअंगानी !!

लाख धारांचे...धारांचे
कसे सोसावे कहार ?
काळ्या रेसमी पोतात
जडविले निळेमोर... चहुअंगानी !!

रान मोरांचे...मोरांचे
लाख डोळ्यंचे पिसार
हुब्या अंगात...अंगात
वल्या गंधाचे शहार... चहुअंगानी !!

खिन थांबल्या...थांबल्या
जित्या रगताच्या लाटा
भर रानात अवेळी
कोनी ठकविल्या वाटा ?.... चहुअंगानी !!

पाऊस (२)

माझ्या मनाची कवाडं
आज कोनी मोकलली?
झिमझिमत्या सरीनं
भुई वलीकंच झाली...

अंग..अंग गह्यरलं
जसं शहारलं रान
अंधाराच्या वाटेवर
कोनी अंथरलं ऊन ?

झणानत्या वाऱ्यासंगे
देह झुंजून शिणला
थेंबा थेंबी निथळून
जीव पैंजणांचा झाला...

माझ्या मनाची कवाडं
घेती आभाळ सामोरी
गाठ...गाठ सुटताना
भरू आले प्राणभरी...!!!

अरे पावसा.. पावसा

कोनी क्येलं रे चेटूक
जीव झाला येडा पिसा
किती झुंजशील बाप्पा
अरे पावसा...पावसा...

थळथळलेली शेतं
रान झालं मुकं..मुकं
मान मोडुनिया हुबं
पान लागलेलं पिक

ऊन वाहिसनी ग्येलं
सूर्य गेला कुन्या देसा?...

हुबी पान्यात लेकुरे
माय झाली कसनुशी
फाटलेल्या आभायाला
चार टाके घालू कसी?

इघुरल्या पदराचा
तुला घालते आडोसा.....

कशी तुही येडी माया
माय धुपावून गेली
बाळ कनसांची काया
मुकेपणी खरचली

वल्या वढाळ मायेचा
कसा धरावा भरोसा ?...

किती घालशील येढे ?
किती ओढशील फेर?
ऊर फुटेतो सोशीन
तुह्या पावलांचा जोर

उभी ठाकले कधींची
मले माझाच भरोसा...

येक ध्यानामंदी ठेव
तुज्या थकलेल्या जीवा
माझ्या मांडीचा विसावा...
अरे पावसा पावसा

संग

न्हात्याधुत्या मातीचे
भांग कोनी रेखिले ?
मोतियांचे गजरे
वर कोनी माळले ?

न्हात्याधुत्या मातीचा
भरजरी नखरा
बिलवरी कशिदा
काढियला पदरा!!

न्हात्याधुत्या मातीचे
अंग अंग चेतले
कंवारिण कळीचे
गंध कोनी झेलले ?

न्हान्याधुत्या मातीचा
शिणगार साजिंदा
सावळिया रूपाले
भुलला वो गोईंदा !!

न्हात्याधुत्या मातीचे
आवतन कोनाले ?
कोनी केलं चेटूक ?
कोनी रंग चोरले ?

न्हात्याधुत्या मातीनं
देखियलं सपन
हरभऱ्या काकना
हळदीचा सुकून !!

न्हात्याधुत्या मातीचे
भाळ कोनी गोंदले ?
नादावले आभाळ
काठावर झुकले !!!

खुणाविते चन्द्रावळ...

हिरवळ हिरवळ
रेशमाच्या जावळाची
अगंभर सळसळ..

हिरवळ हिरवळ
पाखरांच्या पंखावर
थरथरते आभाळ...

हिरवळ हिरवळ
बाभळीच्या दिवाळीची
पितांबरी झुळझुळ...

हिरवळ हिरवळ
काळजात कालविते
विषभरे काळेजळ...

हिरवळ हिरवळ
डोळाभर तुडुंबली
दहादिशांची ओंजळ...

हिरवळ हिरवळ
काजळाच्या डोळियांची
खुणाविते चन्द्रावळ...

घर

आपणच आपल्या घरात
'आश्रित' होतो
तेव्हा
'घर' या शब्दकोशातील
शब्दांचा अर्थ शोधित
रानोमाळ भटकावे लागते
वनवासी होऊन.
आणि
अचानक भेटतो
तो म्हातारा
'घर देता का घर?'
म्हणत
दारोदारी वणवणणारा...
...
थकून भागून
कधीतरी
बाभळींच्या सावलीत
निवान्त झोपलेला
आणि
अचानक ओंजळीत येतं
स्वप्नातलं घर
कधीच न हरवणारं..

कोण वाजवी पैंजण ?

आज वारा चेतावला
जीव झाला जाईजुई
अंगभरून झुरते
देवघरात समई...

अस्सा वारा चेतावला
शिरिषाचे डोळे जड
पायतळी पानोपानी
आठवांचे फाटे शीड...

चेतावला वारा वारा
प्राणभरी काठोकाठ
फांदीफांदीला फुटवा
डोळा उघडतो देठ...

आज वारा चेतावला
नुरे पदराचे भान
दक्षिणेच्या दारातुन
कोण वाजवी पैंजण ?...?

थिजणारी पाने आणि अपंग स्वप्ने


तुझ्या घनगर्द
सावळ्या पाठीचे रसरशीत
ताजे पान
अथांग उन्हाळे हिवाळे झोलून
आतल्या आत
थिजत चाललेय.
माझे उत्फुल्ल गुबरे गाल
त्यावर टेकीत
हजारो चांदण्या रेखण्याचा
माझा छंद मात्र
अजूनहीं थकलेला नाही.
....
पण
या आताच्या उत्तररात्री, मलाही उमगलेय
उल्कापाताचे सत्य,
आणि
पुनर्जन्माच्या साखळीचे अपंग स्वप्न
जे हरेकाच्या मनात उगवतेच
हरळीगत !
....
शेवटी एकाच कॅसेटच्या दोन बाजू
आतल्या आत थिजणारी पाने
आणि
पुनर्जन्माची अपंग स्वप्ने...

नवा गणराज

कुणी सांगितलं तुला
की
देव्हाऱ्यातला चंदनी गणपती
मी विकलाय म्हणून ?
अष्टभोगांनी तृप्तावलेले
ते भाद्रपदी दिवस
आणि
जळत्या कापरासारखी
घरभर दरवळणारी तू
....
आई ग Ѕ
मीही
तुझ्या गणराया शेजारी मांडलाय
नवा गणराज.
गणराज,
मातीच्या माणसांना
जागवीत जाणारा
गणांचा पती
आणि
त्याच्या समोर उभी आहे
मी
जळत्या कापरागत
उजळत जाणारी...

अशा फूलभेटी साठी

पुरे अशी डोळाभेट
बोलही होतील मुके
तुझ्या माझ्या दुराव्याचे
पाणावेल दाट धुके

अशा फूलभेटी साठी
कळी फुलणे सोसेल
सुकलेल्या मंजुळांची
मूळ...माती ओलावेल

तुझ्या श्वासांचे स्वस्तिक
माझ्या उगवत्या दारी
आकाशाचे आश्वासन
दाटे धरणीच्या उरी

प्रीतीगाथा गोंदवली
जरी अंगअंगावर
तुझ्यासाठी फाडली मी
पदराची उभी चीर.

दोन सवाल.. (कै. अनामिकेचे)


आत्मा चालला उपासी
दूर दूरच्या गावाले
माय मातीच्या कानात
दोन सवाल पुशिले

गाठगाठ पदराला
वल्या वढाळ वळखी
माती मातीला मिळता
पुढे निघाली पालखी

पालखीत कोन राणा ?
त्याले काय रूप रंग?
कुन्या जातीचा पालव
आता डुईवर सांग... !

कुकवाच देनं..घेनं
काया मन्यांचा वायदा
परदेसी पराईण
तिले कोनाचा कायदा ?..?

काया मातीची वाकळ
आता मागंच फिटली
आभायाच्या अंतरात
येक जखम गोंदली.. !!!

वेडगाणे

एक आहे झाड माझे
त्याच झाडाच्या उराशी
 पावसानी पेटणारे
 गुंफले मी वेडगाणे
एक आहे गाव माझे
त्याच गावाच्या शिवेला
 सावल्यांनी सांजणारे
 बांधले मी वेडगाणे
एक माझा सूर साधा
त्या सुरांच्या सांगती
 उजळताना कापणारा
 छेडले मी वेडगाणे
एक माझी मीच...मीही
श्वास उसवित धावताना
 दो तिरांना कळवणारी
 संपलेले वेडगाणे
मी: १९९१...९४...२००१...३००३ वगैरे


आज
मी एक बाईच!
सर्व दिशातून...अष्टकोनातून
मला निरखणाऱ्यांसाठी,
होय तुझ्यासाठीही.
मी
एक मुक्त आदर्श स्त्री...
वगैरे...! वगैरे.....!
पण,
सकीना.. अनु...मंगल...सायरा
विजू...काशी...कान्ता...लोरा
यांच्या सारखीच मीही.
'पुरुषार्थाशी' झुंजणारी
आणि तरीही
भुईतून वर डोकावणाऱ्या
कोंभा सारखी
मोकळ्या आकाशाला झेलणारी !!!

तो पर्यंत...


सप्त पाताळात पोचलेल्या
वैराण मुळांच्या गर्भातून
माझ्या खांद्याफांद्यापर्यंत
सळसळत येते
ती कीड.
आणि कातरली जातात
पानांचीही स्वप्ने.
फुलायचे दिवसही
माना मोडून कलतात
सावनी उन्हात.
मग,
माझा सारंगाचा बुंधा
स्वतःलाच जोजावतो
मर्तिकाची सुरेल गाणी गात
आणि
वेड्या ,
माझ्या लाडक्या वेड्याऽऽ
तू खुशाल मागतो आहेस
या विराट
विकल निष्पर्ण वृक्षाखाली उभा राहून
फळं
ईव्हने चाखलेली ?
आता अेवढं तरी कर.
सरळ उचलून घे

व्हाईट हाऊसमधल्या
दालनातला तो
रक्तवर्णी फोनचा
विषगर्भ
आंबट आकडा.
मग,
अंधाराच्या आदीम कल्लोळात ...
बुडून जाऊदेत सारेच आदिबंध.
...
पुन्हा एकदा
सुस्नात पहाटेसारखी
'ईव्ह' होऊन येईन मी
पण,
ज्ञानवृक्षाचे फळ
चाखण्या आधी
चिमणीच्या दातांनी
भरवीन
पहिला घास
तुला.
हो...तुला !!!
मग कदाचित्
उसंत मिळेल
वर्तमानपत्रातल्या अक्षरांना
माणसांच्या बातम्या छापण्याची
...
तो पर्यंत...!!!

घड्याळ

जेव्हा
लाखोंच्या श्वासांची स्पंदने
टाकतात उस्कटवून...
तेव्हा
चित्रगुप्ताच्या भिंतीवरचे घड्याळही
उताणे पडते
जमिनीवर विस्कटून.
३० सप्टेंबर १९९३ ची पहाट
तीन वाजून ५६ मीनटे...
...
आज वर्ष उलटून गेलय.
प्रचंड महापूर वाहून जावा तसे
वाहणारे क्षण... प्रसंग... माणसे.... शब्द...
संस्था.. आश्वासने .. वाहने.. पुढारी.. नटनट्या
वगैरे वगैरे !!!
इन्द्राच्या प्रशासनात
रूळलेला चित्रगुप्त वाट पहातोय
एखाद्या 'एनजीओ' ची
कालचे घड्याळ
पुन्हा एकदा
भिंतीवर चालते करण्यासाठी !

पुन्हा जन्माला येतेय सीता...


संत्र्याची साल सोलावी
तसे
कपडे सोलून काढताना
खरंच का तुला सापडले मी ?
मनूने पहिली स्मृती लिहीली
त्याच रात्री
तू फोडून टाकलेस पडदे
तुझ्या
क्षकिरणांकित नजरेवरचे.
...
बिच्चारा खोमेनी
अजूनही चादर कवटाळून बसलाय.
त्याला काय माहित
अंगभर गुंडाळलेल्या वस्त्रांआड असतात
गव्हाळ रेशमी मांड्या
आणि
घनदाट छातीचे सुगंधी फुलोर
...
क्रौंच पक्षांच्या आक्रंदनाने
कळवळणारा वाल्मिकी
त्यालाही दिसली
आयतस्तनी जानकी !!
...

रावणाच्या अभिलाषेचा
गंध धुवून काढण्यासाठी
तू
लोटलंस मला अग्नीच्या
मगरमिठीत !!
....
माझ्या कातडीचे लिलाव
चौरस्त्यावर मांडलेस
वयाचे हिशेब मांडीत.
आणि तरीही
प्रत्येक जन्मात
सात जन्मांचे वायदे करून
तुझ्याच अंगणात बहरले
जन्मोजन्मी
तुळस होऊन.
पण आज,
तळाशी पुरलेली
व्यासांची आर्द्र हाक जागी झालीय
"हे भाविनी
हे अग्निकन्ये
हे मनस्विनी !!!"
आणि
दगडी वृंदावनाचे चिरे फोडून
पुन्हा एकदा जन्माला येतेय
'भूमिकन्या' सीता
नवे रामायण लिहीण्यासाठी...

चैतन्याचे सैंधवी झाड


फक्त
माझ्याच
गर्भाशयातून उगवलेले
ते सैंधवी चैतन्याचे
उत्फुल्ल हिरवे झाड
कधी पासून
मातीत माथा खुपसून बसलेय ?
काही अंदाज ?
बहुदा
ईव्हने जीवन-वृक्षाचे पहिले फळ चाखले
किंवा
कुंतीने नाळ कापलेले बाळ
मुका घेऊन
टोपलीतून गंगेल सोडले
किंवा
एकवस्त्रा दौपदीने भर सभेत भीष्माला
सवाल सोडले
तेव्हा पासून ??
अर्थात हे सारे अंदाजच.
...
'बीज-पेरक' सूर्यपुत्रांच्या साम्राज्यात
हे अंदाज बांधण्याची मुभा
आज
एकवीसाव्या शतकात प्रवेशताना मिळतेय,
हेही नसे थोडके !!
अगदी आत्ताच्या वर्तमानपत्रात

फारच बरी बातमी
क्लोनिंगची.
मग
कदाचित
एकतिसाच्या शतकात प्रवेशताना
ते सैंधवी चैतन्याचे झाड
थेट माथ्यापर्यंत बुडून गेलेले असेल
मातीत
रामपत्नी सीतामाई सारखे.
...
आणि
मग उद्या
त्या सैंधवी चैतन्य-वृक्षाची बातच नस्से !!
क्लोनिंग किरणांतून उगवत राहतील
कोटीकोटी सूर्यपुत्र
....
मग परवा
कदाचित
एकावन्नाव्या शतकात
धांडोळावे लागेल
'स्त्री-सूक्त'
आणि तेरवा
दगडी प्रकाशाच्या पिरॅमिडसमधून
सापडतील
अक्षरे
अमृता, शहाबानो, ग्रेस किंवा भंवरीबाईच्या
रक्ताने लडबडलेली.
....

कुणी सांगावे ?..?
मग,
पुन्हा एकदा उत्खनन
सिंधू संस्कृतीचे
सूर्य संस्कृतीच्या अधिपत्याखाली !!!

गझल माझ्या मुक्तीची

अंधार सोसण्याची
निष्पंख पाखरांनी
 सांगू नये कहाणी
 गाऊ नयेत गाणी
चुनडीत बांधलेल्या
हाटात मांडलेल्या
निस्पंद रान अवघे
सूर्यास्त जाहल्याची
 गाथा उदासवाण्या
 ओल्या कबंध-वेणा
 पानात पेटताना
 आळवू नये विराणी
जन्मोत्सवी कळांनी
वक्षातल्या दुधाचे
शब्दात धुमसणाऱ्या
उधळून वाहनारे
 आभाळ गोंदवीले
 विकले रतीब सगळे
 वाऱ्यास कोंडताना
 आडवू नयेच पाणी
होऊन नग्नरेखा
भेगाळल्या करांनी
आकाश भोगण्याचा
पंखासवे फुटोनी
 फेडून वस्त्र हिरवे
 सोलून गर्भ हळवे
 उन्मेष थाटताना
 यावी पहाट गाणी
निर्धार

या मातीच्या हृदयामधली स्वप्ने करु साकार
सामान्यांच्या जगण्यासाठी एक नवा आधार
हा अमुचा निर्धार ॥

ग्रीष्म झळांनी करपून गेली
धरणीच्या हृदयातील गाणी
पर्णहीन झाडांच्या ओठी
मुक्या नभांची सुन्न कहाणी

भगीरथाचे हात हजारो
देतील नवा आकार
मातीच्या ओठातून फुटतील
प्रतिभेचे ओंकार ...   

श्रमलक्ष्मीची इथे प्रतिष्ठा
समानतेवर जीवन निष्ठा
कवेत घेऊन दिगंत जाऊ
नव्या दिशांनी शोधित वाटा

खडकावरती उगेल नवती
आम्हा आर ना पार
आभाळातून झेपत येईल
उन्मेषाची धार ....   

माणुसकीची इथे लावणी
सौहार्दाची सत्व पेरणी
हृदयामध्ये राम रहिम अन्
ओठावरती कबीरवाणी

महावीर येशू गांधीचा
सत्याचा आधार
बुध्दाच्या करूणेने भिजली
हृदये अपरंपार    

गीत नवे...

गीत नवे मंत्र नवे क्षितीज मोकळे
स्वप्नांना फुटले हे पाय कोवळे...


स्वेदाचा वेद नवा मुक्त स्वरे गाऊया
सूर नवा ताल नवा शब्द नवा झेलुया
रूप नवे रंग नवे छंद आगळे....


मंत्र नवा अैक्याचा उच्च नीच ना कोणी
अश्रुंनी मिटवुया कर्तुके पुराणी
इथे..तिथे..दूर...जवळ शब्द मावळे...


ध्येयधुंद प्राणांचे गीत नवे गाताना
रंग..गंध स्वप्नांचे श्रमातुनी फुलताना
तनामनावर तरंग स्फूर्तीचा झुले...

मी वो कोन्या नसीबाची?

त्यांनी इच्यारलं माले
कोनाच्या तू नसीबाची
नवऱ्याच्या की बापाच्या
कुना कुनाच्या हिश्याची?

बीज पेरनाऱ्याची की
आभाळाच्या भरूशाची?
त्यांनी इच्यारलं माले
कोनाच्या तू नसीबाची

कंदी बापाची दावन
नवऱ्याचं पायतन
पोरावांच्या अंगनात
बिन मोलाचं लोढनं

त्यांनी इचारलं माले
कोनाच्या तू नसीबाची
नवऱ्याच्या की बापाच्या
पोरावांच्या हिसेबाची ?
....
बीज पेरनाऱ्यानं ग s
पीक खुडूनिया नेलं
बिन भरोशाची माया
ढग दावूनिया गेलं

तुझी तुलेच सोबत
करपल्या काळजाची
मीच इचारलं मले
कोनाच्या मी नसीबाची ?
....


गुलबासाच्या फुलाले
कोनी दिला लाल रंग ?
जाईजुईच्या फुलाले
रसमाचं गोरं अंग ?

फळ कोनी रसाळले ?
दाने दुधानं भरले ?
रानचाफ्याच्या कुपीत
गंध भरूनिया दिले ?
....
बीज वाऱ्यानं आनीलं
आभाळाची वली माया
न्हाई झेलली भुईनं
कोन निर्मिल ही काया ?
कोन निर्मिल ही माया ?

वाऱ्या पावसाच्या संग
तुही संगत मोलाची
माही संगत मोलाची
तू वो तुज्या नसीबाची
मी वो माझ्या नसीबाची !!!

  शैशव-चाहूल :
१९५७ ते १९५९ या काळातील कविता





चाहूल...

अनुभूतीचा गंध गारवा
मनासं माझ्या झुरवत जाई
स्पर्शातून बहरे गुलमोहर
धुंद.. धुंद मन थरकत जाई

त्या धुंदीची नशा आगळी
नशेत लपली व्यथा वेगळी
व्यथेत असते एकच जाणीव
ओलांडून मी आले शैशव

छोरी...

गाभुळल्या चिंचेची ग
चिमणीच्या दातांनी अन्
 चव आहे ओठावर
 उष्टावली कैरी कोर
सोनेरी केसांचा दंगा
अवखळ पाण्यातला
 अजूनही सतावतो
 खोटेपणा का डाचतो ?
उन्हातल्या उनाडक्या
मारातली अर्धांगी तू
 बागेतली चोर कैरी
 आठवते वेडी छोरी
जग आता पलटले
परी तुझ्या ओठी गातो
 यौवनाची होशी राणी
 भिजलेली झिम्मागाणी...
शोध

सदाचीच मी सदा धुंडते
अनोळखी तळ त्या डोहाचा
संगत घेऊन दीप रूपेरी
पापणीतल्या निळ्या क्षणांचा

अंधाराच्या कणाकणातून
झिरपत असते माझे मीपण
मलाच नसते जाणीव माझी
माझ्या भवती माझे रिंगण

सदाचीच मी सदा धुंडते
अनोखी तळ त्या डोहाचा
माझ्यातील मी असते डोईच
कसा दिसावा तळ माझा मज ?

चिमणी

भिजलेल्या पंखातली
सुकवित गार ओल
थरथर सावरीत
चिमण्या जीवाचा तोल...

चिमणाच जीव भोळा
चिमणेच मऊ पंख
आभाळाच्या फांदीवर
सावरिते ओला डंख

रांगत्या उन्हाच्या बटा
कधी मधी उडाव्यात
भिजलेल्या चिमणींचे
पंख जरा सुकावेत....

चल गाठाया क्षितीज

तुझे सुख माझे सुख
दोन वेलींचा हिंदोळा
उमलत्या कळीवर
थेंब दवाचा गोठला...

हलताना झुलताना
झाली निरंग वेदना
आभाळाच्या अंतराला
हात लागता लागेना

झुकल्या मनाचा तोल
सावरता आवरेना
भुईच्या प्राणाचे मोल
हाती मागता येईना

तुझे सुख माझे सुख
दोन वेलींचा हिंदोळा
चल गाठाया क्षितीज
क्षण केव्हाचा थांबला



संध्या

कशास संध्ये मिरविसी तोरा
'सौंदर्याची मी सम्राज्ञी !!'
कशास संध्ये धुंद होऊनी
गासी गीते तव सुषमेची...

कशास मिरविसी डौल उगा हा
उमलविते मी कळ्या पाकळ्या
कशास संध्ये डौल मिरविसी
'प्रीतीची मी मादक राणी'

नकोस संध्ये मिरवूस नोरा
उदरी तव ग काळ निशाणी
भयाण कातर काळरात्रीची
असंख्य पापांची तू जननी...



आज...

रात्र चांदणी मलूल झाली
उदासवाणी आज पौर्णिमा
प्रातीसुधेच्या मधुर प्राशनी
आज न रंगे लाल रक्तिमा...

वास्तवलेला...यांत्रिकतेला
फितूर झाली कविची प्रतिमा
करवंदीच्या जाळीमागे
अश्रू ढाळी आज चन्द्रमा...



झिम्मा

अजून घुमतो मनात झिम्मा
खळखळते अन् कांचापाणी
उनाडक्यातील मजा चोरटी
घालित पिंगा दावी निशाणी...

वळचणीतली जमाडीजम्मत
चिंचेवरचा गाभूळ टवका
खुल्या दिलांची निरंग संगत
रंगत असते चुकवित धाका...

पाझरेतल्या मणीथेंबांचा
स्पर्श गारवा हुकवित.. चुकवित
रंगखड्यांच्या गूढ गुहांची
गुप्त वाट अन शोधित... शोधित...

शब्द परवली अजून तेथे
तिथेच मीपण झिंगझिंगते
बालमनाच्या वळचणीतली
चिमणी आठव रंगरंगती....

ओलसर वाळूतून

ओलसर वाळुतून
उभारले घरकूल
वाळूवर उमटली
चिंब भिजली पावलं...

ढासळले घरकूल
आज पावले वाळली
यौवनाच्या चाहुलीत
जवळिक दुरावली