काय ! पेपर्स चोरीस गेले ? (नाट्यछटा)

<poem> तर काय हो ! जिवावर केवढी थोरली धोंड आहे माझ्या ! एक नाहीं दोन नाहीं, आठ तुकडयांचे दणदणीत पेपर्स ! शिवाय प्रत्येक तुकडींत चाळीस पंचेचाळीस काटी ! रोज एक गठ्ठा म्हटला, तरी दिवस पाहिजेत आठ ! अन् राहिलेत सारे चार ! - तितकेहि नाहींत ? अरे म्हणजे म्हणतां आहां काय तुम्ही ! बेडबडि तर नाहीं लागलें ! - एकवीस तारीख आज ? - छेः ! भलतेंच कांहीं तरी ! आणा पाहूं ती डायरी इकडे ! - उगीच आपलें कांहीं तरी .... अरे भाई, खरेंच कीं, हें तर वीस तारखेचें पान ! धडधडीत मीं लिहिलें आहे - हो, हो, अगदी शंकाच नको ! बापरे ! आज एकवीस तारीख, आणि उद्याला तर हें खलास व्हायला हवें ! राम राम ! प्राण खातील माझा आतां ! काय, करुं तरी काय आतां ! - हो, रात्रीचे आतां आठ वाजलेले, अन् सकाळींच उद्यां आठाला सगळे हजर करायचे ! तेव्हां काय जीव देऊं इथं ? - बरं, आता रातोरात बसून तपाशीन म्हटलें तर पोरटयांनी थोडं का हो लिहिलं आहे ! - आग लागो त्या पेपरांना ! नाहींसे कुठें होतील तर देव पावेल ! हो, आतां मी तरी .... अरे कोण तिकडे, काय बडबडतां आहां रे ? गोंगाट कसला येवढा ? - काय .... काय .... म्हणतोस विष्ण्या ? अरे ! काय सांगतो आहेस तरी काय ! पेपर्स चोरीस गेले ? चल ! कांही तरी बरळतो आहेस झालें ! गाढवा ! पेपर्स का कधीं चोरीस गेले आहेत ? - थांब, मीच उठून .... माय गॉड ! खरेंच कीं ! पार सगळेच्या सगळे गठ्ठे .... वा, वा ! फारच छान झालं ! पेपर्स चोरीस गेले ! बस, बस ! केवढा आनंद .... काय आनंद झाल आहे म्हणून सांगूं ! जा जा, पळ लवकर ! आधीं चहा ठेवायला सांग ! - आणि हें बघ विण्या ! साखर थोडी जादा ढकलायला सांग ! बस ! आज मैं तो बादशहा हूं ! - अरे ! काय, मांडलें आहेत काय तुम्ही ! इतक्या लवकर चहा आणलास ? - आधींच ठेवला होता होय ? शाबास ! हुशार आहांत रे सगळे तुम्ही ! पण काय रे ! हें सगळें स्वप्न तर नाहीं ना ? नाहीं तर .... हो बाकी लागतो आहे खराच .... हाताला चांगलाच पेला कढत लागतो आहे ! आणि वास काय झकास सुटला आहे ! रंगसुद्धां खुलून आला आहे कीं ! - थांब, बेटा विष्णु ! मला एकदां चांगला मनापासून .... अस्सा अगदीं हातपाय ताणून आ .... आळस - अरे ! का .... काय रे हें ! अरे काय माझ्या टाळक्यांत पडलें हें ! - हर हर ! हे तर पेपर्स ! आणि मघांशी चोरीस गेले ते ? - स्वप्नांतच का ? ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.