कार्यशैली

अनिल शिदोरे SS मनोविकास प्रकाशन कार्यशैली-अनिल शिदोरे © सौ. जयश्री शिदोरे मुखपृष्ठ गिरीश सहस्रबुद्धे चित्रे - अनंत कुलकर्णी प्रकाशक अरविंद घनशाम पाटकर मनोविकास प्रकाशन शक्ती टॉवर्स, ६७२, नारायण पेठ, पुणे-३० फोन - ०२०-६५२६२९५० मुंबई फोन - ०२२-६४५०३२५३ मुद्रक श्री ओम ऑफसेट वडगाव धायरी, पुणे द्वितीया आवृत्ती नोव्हेंबर २००६ मूल्य रु. १००/- अक्षरजुळणी सौ. भाग्यश्री सहस्रबुद्धे  माणूस आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःचं मन व्यक्त करत असतो. त्याची शैली' ही त्याच्या मनाचं प्रतिबिंब असते.
 'शैली'तून माणूस कळतो, उमगतो. 'शैली'तून त्याचं अंतरंग उलगडतं, मनातली आंदोलनं समजतात.
 'कार्यशैली'तून माणूस त्याच्या कामाकडे, आयुष्याकडे कसं पाहतो हे व्यक्त होतं. 'कार्यशैली' त्याच्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे. कार्यशैली' त्याच्या मनोभूमिकेचं दर्शन आहे.
 ह्या कार्यशैली'ची ऊर्जा मनाच्या खोल गाभ्यातून येते आणि म्हणून कार्यशैलीवर काम करणे म्हणजे मनाच्या जडणघडणीवर काम करणे. मन घडवणे.  'कार्यशैली' हे एक निमित्त आहे. मन ओळखणे, वृत्ती जोखणे आणि मनोवृत्ती तपासणे हे खरं काम आहे. माणूस वागतो तर असाच का वागतो. तसा का वागत नाही? माणूस असं वागताना, बोलताना त्याच्या मागे कुठल्या गोष्टी घडत असतात? अशा प्रश्नांचा शोध म्हणजे 'कार्यशैली'चा अभ्यास.
 'कार्यशैली'चा शोध म्हणून वर नाही, आत आहे. खोलवर आहे. दुसऱ्याची कार्यशैली' पाहताना आपण दुसऱ्याला नाही, स्वतःलाच तपासतो आहे.

अनिल शिदोरे

 कामाची शैली आपोआप येत नाही किंवा कामाच्या शैलीचं उसनं अवसानही आणता येत नाही. शैली अंगात भिनावी लागते, मुरावी लागते. आपल्याला कशासाठी जगायचं आहे आणि जगणं आपण कशाला म्हणतो त्यावर शैली अवलंबून असते.
 याच संदर्भात बऱ्याण्ड रसेल यांनी लिहिलेला एक उतारा नुकताच वाचनात आला. 'मी जगलो कशासाठी' या प्रश्नाचं उत्तर देताना बर्टाण्ड रसेल यांनी त्यांच्या जीवनाचं मूलभूत सूत्र सांगितलं आणि त्या सूत्रावरूनच रसेत आपलं आयुष्य कसं जगले असतील हे समोर येतं.
 रसेल म्हणतात की माझं आयुष्य ठरवणाऱ्या माझ्या मुख्य तीन प्रेरणा होत्या. पहिली म्हणजे प्रेमाची तहान, दुसरी प्रेरणा म्हणजे ज्ञानाची भूक आणि तिसरी म्हणजे माणसाला ज्या यातना भोगाव्या लागतात त्यापासून त्याला मुक्त करण्याची एक आंतरिक धडपड, प्रेम, ज्ञान आणि मानवतेची पूजा. या तीन प्रेरणांनी बर्टाण्ड रसेल यांचं आयुष्य कसं असेल ते मी ठरवलं.
 मी विचार करत राहिलो. आपल्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या? श्रीमंत होणं की ज्ञानी बनणं, कीर्ती मिळविण्याची दिगंत इच्छा की चांगलं दिसावं ही प्रेरणा, वाटलं माझ्या कार्यशैलीच्या मूळाशी या मूलभूत प्रेरणा आहेत. कार्यशैली हा एक दृश्य परिणाम आहे. पण त्याचं कारण आहे माझ्या जगण्याविषयीच्या माझ्या मूलभूत प्रेरणा.  चंद्रकांत सलग बोलत राहतो. धाड धाड एखाद्या स्टेशनवरून न थांबता स्वत:च्या गुर्मीत सुसाट वेगानं जाणारी मालगाडी असते ना तसा. मालगाडी बरं, पॅसेंजर गाड़ी नाही. कारण पॅसेंजर गांडी जाताना निदान खिडक्यांतून दिसणारे रंग आणि हलणारी जिवंत माणसं तरी दिसतात. पण चंद्रकांतची असते मालगाडी. कुठेही जिवंतपणा नाही. असते फक्त धाड धाड गती आणि आपल्या बोलण्याचा प्रवास संपवण्याची आंतरिक घाई.
 कुठेही पॉज नाही. कुठेही चढउतार नाहीत, कुठेही स्मितरेषा नाही, एखादं टाकणं टाकल्यासारखं बोलणं, चंद्रकांत कितीही चांगलं, योग्य आणि खरं बोलत असला तरी त्याच्या अशा बोलण्यामुळे तो त्याला जे म्हणायचं आहे, जे सांगायचं आहे ते पोचवूच शकत नाही.
 बोलण्यात पॉज असावेत, गती शांत आणि लोकांना समजेल अशी असावी. लोकांचा रिस्पॉन्स काय येतो हे पाहत राहण्याची सवय असावी. त्यानुसार बोलण्याची पद्धत असावी. मात्र दुर्दैवाने या कुठल्याच गोष्टीचा स्पर्श चंद्रकांतता झालेला नाही. खरं पाहता या सर्व गोष्टी त्यानं शाळेत शिकायला हव्यात. पण शाळेत लिहिण्याची परीक्षा होते, मी आता चंद्रकांतसाठी 'बोलावं कसं' हे शिकवणारी शाळा शोधतो आहे.

 विशाखा केव्हा सटकेल काही सांगता येत नाही. सकाळी आपणहून फायली घेऊन कामाचा फडशा पाडणारी विशाखा दुपारी चहा पिताना भेटलो तर तोंड वाकडं करून बसलेली. रोज लिफ्टमध्ये भेटल्यावर दिलखुलास हसून एखादा विनोद करणारी विशाखा एखादा दिवस बघतच नाही आणि तिनं बघितलं तरी हास्याची एखादी रेषापण तिच्या चेह-यावर उमटत नाही.
 मूडस्चे असे बदलते रंग हा विशाखाच्या एकूण प्रगतीतला फार मोठा अडसर आहे. आम्हा सर्वांना तिची काही खात्रीच नाही. केव्हा एखादा आगडोंब उसळून काय होईल याचा कुणाला ठावच लागत नाही. अत्यंत निसरडा मूड आणि त्याची सपशेल अनिश्चितता यानं विशाखा जिथं होती त्याच जागेवर वर्षानुवर्षे आहे.
 अर्थात विशाखाला यावर मात करता येईल. स्वतःचा मूड येताना आणि जाताना तिनं नीट जवळून ध्यान देऊन पाहायला हवा. त्याची कारणं शोधायला हवीत. वेळा तपासायला हव्यात. परिस्थितीचा काही परिणाम होतो का हे तपासायला हवं. मूडसच्या वेगवेगळ्या रंगांवर पकड ठेवता यायला हवी.

 "आम्ही इथं उत्तम जहाजं बांधू, शक्य असेल तर तशी बांधताना फायदा कमवू, अगदी आवश्यकता वाटल्यास तोटाही सहन करू, पण काहीही झालं तरी फक्त उत्तमच जहाजं बांधू."
 १९८६ साली कॉलिस बटिंगटननं आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्य असं ठरवलं होतं. जमल्यास फायदा मिळवू, प्रसंगी तोटाही सोसू पण ध्येय एकच, उत्तम, फक्त उत्तमच जहाजं बांधू, न्यूपोर्ट न्यूज शिपबिलिंग आणि ड्राय डॉक कंपनी या दोन कंपन्यांचा मालक कॉलिसनं ठरवलं की एकच ते म्हणजे उत्तम जहाजं बांधणं, फायदा आणि तोटा जे होईल ते होईल. अर्थात हे सांगण्याची बिलकूल गरज नाही की कॉलिसची कंपनी ही एक सर्वश्रेष्ठ कंपनी होती.
 कॉलिसच्या यशाचं गमक होतं एक जबरदस्त असं ध्येय असणं. मला वाटतं कुठल्याही क पनीच्या किंवा अगदी व्यक्तीच्या देखील यशाची पहिली पायरी असते जबरदस्त असं ब्रीदवाक्य. असं वाक्य किंवा असं ध्येय की ते नुसतं असण्यानं अंगात ऊर्जेचा प्रचंड असा स्रोत निर्माण होतो. सही दिशा पकडली जाते. योग्य साधनं उभी केलीच जातात आणि स्वच्छ अशी योजना समोर येते. ही उत्तम ब्रीदवाक्याची जादू आहे, किमया आहे.

 काल तीन बड्या राजकीय नेत्यांना टीव्हीवर जबरदस्त भांडताना पाहिलं, काय विषय होता माझ्या लक्षात नाही पण मनात राहिले आहेत त्या तिघांचे अस्ताव्यस्त, अक्राळविक्राळ, हिंसक चेहरे. लाऊड, बटबटीत आणि तोल सुटलेलं ते त्यांचं बडबडणं, काय आक्रस्तळेपणा!
 खरं म्हणजे ते तिघंही नेते फार मोठे नावाजलेले, प्रचंड जनसमुदाय पाठीशी असलेले यशस्वी आणि गाजलेले राज्यकर्ते, पण तसं असलं तरी त्यांना इतकं भावनाविवश होण्याचं, आरडाओरड करून बोलण्याचं काय कारण? असं करावं अशी गरज त्यांना का वाटते?
 मला वाटतं तशी लोकेच्छा आहे असं त्यांना वाटत असावं आणि म्हणून ते तसे वागत असावेत. आपल्याकडे काही समज आहेत की जे तपासायला हवेत. जे कर्कश्श, ते खरं, वसवसून, शिव्या देत आचरटासारखं बोलून मनोरंजन करणारा वक्ता तो चांगला वक्ता. जे शांतपणे, सावकाश बोलतात त्यांच्याकडे मुद्दे नसतात आणि ते कुचकामी आहेत इत्यादी.
 मला वाटतं हे तिघंही नेते आपल्याला जे आवडतं तसं करत होते. बटबटीत, कानठळ्या बसवणारं अन् मनोरंजन करणारं. DE

 मला महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्यांची गोष्ट माहीत आहे. एका निवडणुकीत त्यांना त्यांच्या अगदी जवळच्या सहकान्यांनी आणि अनुयायांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा एका महत्त्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला.
 मला दोन प्रश्न पडले. या जवळच्या सहकान्यांनी आपल्या परमप्रिय नेत्याला चुकीची माहिती देऊन आपल्याच पायावर धोंडा का पाडून घेतला? आणि दुसरा प्रश्न या नेत्याकडे ती माहिती कितपत खरी आहे, हे तपासण्याची काहीच व्यवस्था नव्हती का?
 या दोन्ही उत्तरांचा शोध घेता घेता एक गोष्ट लक्षात आली की हा नेता आणि या नेत्याचं जवळचं वर्तुळ यात प्रत्यक्ष असं खूपच मोठं अंतर आहे. हा नेता खूप बड़ा आहे. त्याचा एक दरारा आहे. त्याच्याविषयी जनमानसात आणि अनुयायांत प्रचंड मोठा दरारा आहे. त्याचा एक मानसिक दरारा आहे. आणि दडपण आहे असं म्हणता येईल. या दरान्यामुळे या नेत्याचा कुणाशी संपर्कच नाही अशी अवस्था आहे. एकटा, एकाकी आणि स्वत:च्याच मानसिक दरायाच्या तुरुंगात तो खितपत पडला आहे असंच मला वाटतं.  मोठ्या अधिकारपदावर असलेल्या सर्वांचंच हे असं असतं. त्यांच्या आसपासची माणसं अधिकारानं आणि एकूण प्रभावानं इतकी छोटी असतात की प्रमुख माणसाचा आपल्या जवळच्या सहकान्यांशी काही संवादच नसतो. आणि ही गोष्ट त्या नेत्याच्याच तेजोभंगाला कारणीभूत ठरते. स्वतःचाच प्रभाव स्वतःच्या पतनाला कारणीभूत असा तो प्रकार आहे.
 अर्थात यावर उपाय आहे. अशा उच्च पदावर असलेल्या माणसानं दोन्ही बाजूंनी अधिकाधिक संपर्क कसा होईल यावर प्रयत्न करून सुधारणा करायला पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांचंही मानसिक दरायचं वर्तुळ वाढत जाईल हे पाहायला पाहिजे. ते केलं नाही तर मात्र पतनच दुसरं- तिसरं काही नाही.

 एका ऑफिसकडे आम्ही गेले महिनाभर पाहत आहोत. अगदी जवळून तिथं काम करणारी माणसं कधी येतात आणि कधी जातात याकडे लक्ष ठेवून आहोत. तिथं एकूण सोळा माणसं काम करत आहेत आणि पूर्ण आठ तास काम करावं अशी अपेक्षा आहे. येण्याची आणि जाण्याची वेळ लवचिक आहे. कुणी आठ वाजता येतं तर कुणी दहा वाजता, पण एक गडबड आहे.
 जवळजवळ प्रत्येक जण साधारण दहा मिनिटं उशिरा येतो आणि जाण्याआधी साधारण अर्धा तास टंगळमंगळ करायला सुरुवात करतो. एक तर घरी जाण्याचे वेध लागलेले असतात आणि काम करण्याचा उत्साह किंवा शक्ती संपलेली असते. प्रत्येकी पाऊण तास गुणिले सोळा माणसं म्हणजे रोजचे संपूर्ण बारा तास. हे सर्व बारा तास त्या ऑफिसचे रोज केवळ टंगळमंगळीसाठी वाया जातात. म्हणजे दर महिन्याला सुमारे दीड पगार त्या ऑफिसकडून फुक्कट दिला जातो.
 सुमारे महिनाभर अशी पाहणी केल्यावर आम्ही दोन गोष्टी ठरवल्या. दिवस कामानं काठोकाठ भरायचा आणि पूर्ण आठ तास काम करण्याइतपत ऊर्जा सर्वांनी मिळवायची अन् टिकवायची.

८. चळवळ गुणवत्तेची


 गोष्ट आहे १९४७ सालची. आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची. दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. जपान राखेतून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता. त्या सुमारास जपानमध्ये जनगणना करण्यासाठी अमेरिकेनं एका तज्ज्ञाला जपानमध्ये पाठवलं. त्या माणसाचं किंवा तज्ज्ञाचं नाव होतं डब्ल्यू एडवर्डस् डेमिंग. त्यानं जपानमध्ये जनगणनेचं काम सुरू केलं पण त्याबरोबर त्यानं जपानच्या आर्थिक पुनर्रचनेसंदर्भातही लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्याच संदर्भात १९४९ साली त्यानं जपानी इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांसमोर एक व्याख्यान दिलं. असं म्हणतात की जपानच्या पुढच्या साऱ्या प्रगतीची बीजं त्या दिवशी तिथं पेरली गेली.
 काय विषय होता डेमिंगच्या व्याख्यानाचा? विषय होता 'गुणवत्तेचा आग्रह - एक धोरण' एकूण पन्नास वयाच्या डेमिंगनं जपान्यांना गुणवत्तेचा संदेश दिला आणि सांगितलं की गुणवत्ता राखणं आणि वाढवत नेणं यामुळं अंतिमतः खर्चाची बचत होते, चुका कमी होतात, म्हणून पुन:पुन्हा काम करण्याची गरज भासत नाही. विलंब टळतो, त्यातून होणारा मनस्ताप वाचतो, कामगारांचं किंवा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य शाबूत राहतं आणि वेळेचा व इतर साधनसामुग्रीचा अधिक चांगला उपयोग होतो. कार्यक्षमता वाढते, त्या कारखान्याला किंवा संस्थेला अधिक कामं मिळू लागतात. त्यांचा एकूण क्षेत्रावर किंवा मार्केटवर अधिक प्रभाव पडतो. अधिक लोक रुजू होतात, औद्योगिक कक्षा वाढत वाढत जातात.
 हे भाषण फारच गाजलं. त्यानं संपूर्ण जपानी औद्योगिक क्षेत्राला चालना दिली आणि १९५१ मध्ये म्हणजे हे भाषण होऊन २ वर्ष होतात तोच डेमिंग जपानमध्ये अक्षरशः हीरो ठरला. जपानमधल्या गुणवत्तेच्या चळवळीचा हीरो डब्ल्यू एडवर्डस् डेमिंग.
 गुणवत्तेचा आग्रह आणि त्याची सातत्यानं केलेली आराधना कुणाला कसं नेते आणि व्यापक पातळीवर काय क्रांती करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डेमिंगची गुणवत्ता. .

९. सहा म्हणजे सव्वासहा


 सहाच्या ठोक्याला त्या सभागृहात आम्ही फक्त याच जण होतो. फक्त पाच, प्रमुख वक्त्यानं आम्हाला सांगितलं की 'सुरू करूया आपण बाकीचे आम्ही म्हणालो की 'जरा थांबू सव्वासहापर्यंत, तो पर्यंत माणसंही जमतील पुरेशी' पण प्रमुख वक्त्यांनी फार छान सांगितलं. ते म्हणाले 'नको, असं केलं तर नेहमीच तसं करत राहावं लागेल. आपल्याला केव्हातरी सुरुवात करावीच लागेल की काहीही म्हणजे काहीही झालं तरी सार्वजनिक कार्यक्रम हे वेळेवर म्हणजे वेळेवरच सुरू होतात.
 खरं आहे. संपूर्ण वातावरणातच उशिरा येण्याची एक अक्राळविक्राळ संस्कृती हळूहळू पसरत जाते आणि सर्व कार्यक्षमतेला सुरुंग लावते. काय वाट्टेल ते झालं तरी कार्यक्रम किंवा मीटिंग जे उपस्थित असतील त्यांनी सुरू करायचीच असा पण केला पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी.
 आम्ही तो कार्यक्रम बरोबर सहाला सुरू केला. पंधरा-वीस मिनिटात हॉल भरू लागला. माझ्या लक्षात आलं. सहा म्हणजे सव्वासहा असंच काहीसं सगळ्यांनी स्वीकारलेलं दिसलं. उशिरा नावाच्या व्हायरसचं, नेमकं लक्षण तेव्हा समोर दिसलं असंच म्हणेन मी.

१०. जगण्याची जाहिरात


 त्या भल्या मोठ्या चौकात मी उभा होतो. बस एवढ्यात येईल अशी काहीच शाश्वती नव्हती. त्यामुळं त्या चौकातल्या पाट्या वाचण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता.
 समोरच युवा नेत्याच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त प्रचंड मोठा कटआऊट लावला होता. गडद आणि बटबटीत. दोन-चार मेळाव्याची बॅनर्स होती. अशी प्रचंड शीतपेयांच्या, मोबाईल फोन्सच्या मोठमोठ्या निऑनसाइन्स होत्या. सिनेमाच्या जाहिराती होत्या. फलज्योतिष, कॉम्प्युटरवरून कुंडली, एका टी. व्ही. सीरियलची आचरट जाहिरात, दुकानांचे मोठाले बोर्डस, डॉक्टर्स, चार्टर्ड अकौन्टस्च्या छोट्या काळ्या-पांढऱ्या पाट्या.
 सर्व बाजूंनी वेगवेगळ्या पाट्यांच्या गर्दीचं अक्राळविक्राळ, गलिच्छ कोलाज समोर पसरलं होतं. आपल्या सगळ्या जगण्याचीच जाहिरात झालेली. भडक आणि स्वतःचीच टिमकी वाजवीत आक्रोश करणारी चमको चकॉक संस्कृती.
 आपल्या रोजच्या साध्या, सुंदर, सोप्या, शांत जगण्याला का बरं लागते ही जाहिरात असं वाटू लागलं अन् अशीच जबरदस्त जाहिरात लेवून माझी बसही माझ्याजवळ येऊन उभी राहिली.
 काही अनुभव फारच विचित्र आणि चमत्कारिक असतात. मी आणि वसुधा एका ठिकाणी 'रिसोर्स पर्सन' म्हणून गेलो. मुंबईहून उठून तीन दिवसांची असाइनमेंट करून परत आलो. त्या गोष्टीला आज बरोबर तीन महिने होऊन गेले. त्या ठिकाणी, तिथल्या तिथं काम पूर्ण करून दिलं तरीही तीन महिन्यानंतर आजपर्यंत आमची फी तर सोडूनच द्या पण साधा प्रवासखर्चदेखील आमच्यापर्यंत पोचलेला नाही.
 हा अनुभव काही नवीन नाही. आपल्या सर्वांना असे अनुभव येत असतातच.मी विचार केला. ज्या कंपनीसाठी आम्ही काम केलं, त्यांना पैशाची कमी नव्हती. जे काम आम्ही केलं त्याचीही त्यांना नितांत आवश्यकता होती पण तातडी होती. मग असं असलं तरीही पैसे देण्याचा असा आणि इतका विलंब का?
 मला वाटलं की दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे दुसन्याला पैसे द्यावेत अशी कळकळ आपल्याला मनापासून वाटतच नाही, म्हणजे आपली वृत्तीच अशी बनली आहे की, पैसे देण्यात विलंब करण्यातच आपण आपला फायदा मानतो आणि दुसरी गोष्ट पैसे देण्यासाठी, ते सोडण्यासाठी आपल्याकडे सुसज्ज अशी यंत्रणा नाही. कारणं आणखीही असतील पण त्यानं सर्वसाधारण कार्यक्षमता ठार मारली जाते यात शंका नाही.  माधवी ऑफिसमध्ये येते तीच मुळी उगवलेला हा दिवस कसातरी ढकलायचा या हेतूनंच.
 ती येते तीच मुळी विलक्षण थकून-भागून. पहाटेपासून ती कामाला जुंपलेली असते. ऑफिसच्या पायऱ्या चढते तेव्हा केव्हा एकदा आपण खुर्चीवर जाऊन आदळतो असंच तिला वाटत असतं.मग घड्याळाकडे बघत ती काहीतरी की-बोर्ड वाजवत टी टाइमपर्यंतचा वेळ कसातरी काढते. केव्हाही तिच्या टेबलापाशी गेलं की ती कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर निरर्थक बघत बसलेली दिसते. निश्चल, मनात फक्त एकच घड्याळाचा काटा किती पुढे पळतो ते पाहणं.
 माधवी काम करत नाही. दिवस, तास, मिनिटं आणि सेकंद ढकलत असते. तिला काहीही करायचं नाही. तिला पुढं जायचं, जावंसं वाटत नाही. कामाच्या ठिकाणी तिला कुठलाही ओलावा वाटतो असं दिसत नाही. तिच्या मनात असतो फक्त रुक्ष व्यवहार. एक तारखेला मिळणाऱ्या रंगीत कागदाशी बांधलेला.
 मला माधवीकडे पाहून नेहमी वाईट वाटतं. तिला करायचं नाही पण करावं लागतं अशा कठोर आणि क्रूर वेठबिगारीत ती जगतीय असं वाटतं. चैतन्यहीन, आनंदविहीन.


 कधी कधी दु:खाच्या अन् निराशेच्या लाटांवर लाटा येतात. तेव्हा मला अब्राहम लिंकन यांची गोष्ट आठवते. खरं म्हणजे कुठली, त्याच्या जीवनातले निराशेचे एका पाठोपाठ येणारे प्रसंग आठवतात आणि त्या माणसानं त्या सर्व प्रसंगांना किती धैर्यानं तोंड दिलं असेल असं वाटत राहतं.
 पाहा ना, १८३१ साली अब्राहम लिंकन यांनी आपल्या धंद्यात जबरदस्त मार खाल्ला. जबरदस्त. १८३२ मध्ये त्यांच्याकडच्या विधानभवनाच्या निवडणुकीत त्यांनी हार पाहिली. त्याच्या दुसन्याच वर्षी म्हणजे १८३३ मध्ये पुन्हा एकदा धंद्यात नुकसान, मोठं नुकसान पाहावं लागलं. १८३६ साली लिंकन यांची प्रकृती खालावली. १८४३ साली काँग्रेसच्या निवडणुकीत पराभव झाला, १८५५ साली सिनेटच्या निवडणुकीत लिंकन यांचा धुव्वा उडाला. १८५६ साली अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लिंकन हरले. १८५८ मध्ये सिनेटी निवडणूक पुन्हा एकदा हरले, आणि मग मात्र दोनच वर्षांनी म्हणजे १८६० साली अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून गेले.  सगळं मोडून-तोडून पडेल असे सात-आठ पराभव पाहिले तरी लिंकन बधले नाहीत.प्रत्येक पराभव त्यांना शहाणं करत गेला. शिकवत गेला. पण त्या वादळातून अन् वावटळीतून लिंकन यांनी मार्ग काढला, तो एकाच गोष्टीमुळं स्वत:वरच्या दुर्दम्य विश्वासामुळं.
 स्वत:वरचा विश्वास ही कदाचित या जगातली सर्वात प्रबळ अशी ऊर्जाशक्ती असावी. माणसाची कृती, सर्व धडपड, सारे प्रयत्न आणि परिश्रम या सर्वांना ही ऊर्जा लागते, ती निर्माण होते स्वत:च्या दुर्दम्य विश्वासातूनच. आतून, खोलवरून, आपल्या सर्व असण्याला आणि आपल्या सर्व प्रयत्नांना हा दुर्दम्य विश्वासच चेतना देतो, ऊर्जा पुरवतो.
 अब्राहम लिंकन यांच्याकडे हा दुर्दम्य विश्वास होता, ज्यानं त्यांना राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान केलं, आपल्याकडं काय आहे? आहे इतका ठाम अजोड आणि दुर्दम्य विश्वास?


 एक हजार मूर्ख शब्दांपेक्षा एखादा आर्त शब्द थोर परिणाम देऊ शकतो. पॉप कॉर्नच्या मशीनमधून ताडताड उडणाऱ्या लाह्यांप्रमाणे काही माणसं नुसती बोलत राहतात, शब्द फोडत बसतात. पण ते कुठले शब्द, ती तर अक्षरामागून ठेवली जाणारी अक्षरं, वारुळातून मुंग्या फुटाव्यात आणि धरणातून पाणी कोसळावं तसं काहीसं बोलणं.
 ही माणसं अशी का बोलत असावीत, असा मी विचार करतो तेव्हा वाटतं, या माणसांची भूक असेल मान्यतेची. कुणी तरी ऐकण्याची किंवा या माणसांना वेदना असेल, कुठेतरी आत खोलवर किंवा वाटतं ही माणसं आपला खरा चेहरा लपवत असतील. या शब्दांच्या ढिगाऱ्यामागे काहीही असो, पण असं बोलणाऱ्या माणसांना काही वेदना आहे किंवा काही शल्य आहे यात कुठलीच शंका नाही. त्यानं ती माणसं त्यांच्या आतला आजार नम्रपणे समोर आणतात असंच मला वाटतं. सर्व विकार, सर्व आचार, सर्व दुःख, सर्व प्रकारच्या भावना या ज्या काही आपल्याला आहेत त्याचं प्रगटीकरण आपण आपल्या शब्दांमधून, शब्दफेकींमधून आणि देहबोलीतून देत असतो.
 ते पाहत राहणं हा माझा सध्या छंद झाला आहे. D

 संजूचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो, सर्वांनाच. सतत हसतमुख, नानाविध माहितीनं सज्ज आणि सतत विनोद अन् कोट्यांची कारंजी थुईथुई नाचत असलेली. तो येणार म्हटलं की आमच्या घरात एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. आनंदमयी चैतन्य पसरतं. सगळे जण त्याच्या येण्याची वाट पाहत असतात. संजूचं वागणंच असं लाघवी अन् स्निग्ध मैत्रीचं आहे. एक सुंदर-सहज अशी त्याची वागण्याची शैली आहे. कुणालाही मोहवून टाकणारी, कुणालाही खिळवून, अडकवून टाकणारी.
 मी त्याला नेहमी नीट निरखत असतो. तो काय बोलतो, कुठनं एवढे सारे तपशील जमवतो याचं नेहमी आश्चर्य करत असतो. त्याची वागण्याची, बोलण्याची पद्धत जवळून अभ्यासत असतो.
 आताआताशा मला त्याचा, त्याच्या मेहनतीचा अंदाज येऊ लागला आहे. तो प्रचंड वाचतो, खूप काही पाहतो, लोकांचं बरंच ऐकतो, थकत नाही, कंटाळत नाही, लोकांना भेटत राहतो, त्यातून कापूस पिंजावा तसा तो माणूस पिंजून काढतो. त्याच्या नोंदी ठेवतो. त्यातून स्वतःचं वर्तुळ विस्तारत नेतो.
 आज संजू लहान आहे. पण तो असंच दहा वर्ष करत राहिला अन् त्याला एक स्वप्न सापडलं तर तो महान सामाजिक किंवा राजकीय आश्चर्य निर्माण करेल याची मला पक्की खात्री आहे.

 माणसांकडे पाहण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे तो माणसांना आपल्या साध्यासाठी साधन म्हणून पाहण्याचा, माझी जिद्द आहे, माझं स्वप्न आहे, माझी मोठी आकांक्षा आहे आणि त्यासाठी मला माणसं लागणार आहेत म्हणून मला माणसं जोडायची आहेत. त्यांचं नेटवर्क उभं करायचं आहे, हा एक प्रकार आहे. माणसांना आपल्या गेममधल्या सोंगट्या म्हणून पाहण्याचा.
 दुसरा प्रकार आहे माणसांना साधन म्हणून न पाहता त्यांना प्रत्येकाला स्वत:चा विकास करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाचं स्वत:चं म्हणून काही साध्य आहे, असं मानण्याचा प्रत्येक माणसाला विकासाची आणि प्रगतीची संधी देण्याचा.
 आपण माणसांकडं कसं पाहतो ह्याचं दर्शन आपण काम कसं करतो त्यात दिसतंच.महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याकडे मी अनेक गुणी माणसं सड़लेली पाहिली आहेत. ती असंच त्याच्या माणसांकडे 'सोंगट्या' म्हणून पाहण्यामुळं वाटतं. त्या माणसांच्या सावलीत इतर माणसं वाढतच नसतील. पण ते खरं नाही. माणूस म्हणजे झाड नव्हे. मोठा आणि नेता माणूस आपल्या सहकाऱ्यांनाही वाढू देण्याची संधी देऊच शकणार नाही का? की गेममधल्या सोंगट्या एवढंच त्यांचं महत्त्व?

 हार्चर्ड युनिर्व्हसिटी प्रेसनं प्रकाशित केलेलं आणि हॅरी लेव्हिसननं लिहिलेलं 'एक्झिक्युटिव्ह' नावाचं एक अभ्यासू पुस्तक आहे. त्या पुस्तकात डोस्टोव्हस्की या महान लेखकाचं एक महान वाक्य आहे. डोस्टोव्हस्की म्हणतो, “एखाद्याला खरोखरच माणसातून उठवायचं तुम्ही ठरवलंत तर एकच करायचं त्याच्या कामाला कुचकामीपणाचा स्पर्श करायचा, बस्स."
 "आपण जे करतो आहोत त्याचा काही उपयोग नाही, मी नकोसाच आहे. सगळं वातावरण असं आहे की काही घडणारच नाही. काही होणारच नाही. माझा काही उपयोग नाही" अस माणसाला वाटायला लागलं की मग त्याची शक्ती आणि आकांक्षाच त्याला खायला सुरुवात करते आणि माणसाच्या आतला महत्त्वाचा सांधाच निखळतो.
 आपण पाहू या, आपण जिथं आणि ज्यांच्यासोबत काम करतो आहोत तिथं कुणाला स्वतःच्या कुचकामीपणाबद्दल खात्री नाही ना? कुणाला उपयोगशून्य वाटत नाही ना?
 मी एकदा असं पाहिलं आहे की, असं स्वतःविषयी कुचकामी आहोत असं वाटणं खूपजणांकडे आहे. कमी-जास्त प्रमाण आहे, पण आहे. व्यापक आहे आणि ते गंभीर आहे यात शंका नाही.


 रिचर्ड होत्स नावाच्या लेखकाचं एक सुंदर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. युद्धामध्ये माणसं कशी वागतात, त्यात त्यांच्या स्वभावाचे कंगोरे, छटा कशा दिसतात, याचं फार सुंदर वर्णन होत्स यांनी केलं आहे. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात की युद्धात दोन्ही असतं, हशा असतो, फार्स असतो आणि दुःखही असतं, दारुण, भीषण.
 आपलं रोजच्या जगण्यातसुद्धा असंच असतं पाहा. अहो वेगळं काय असणार आहे. युद्ध काय अन् रोजचं जगणं काय, मजेदार प्रसंग, लटका राग, प्रेम, कुणाची तरी खिल्ली, कुठंतरी असलेली घोर निराशा, पराभव, नव्या पहाटेची नवलाई, कुत्सित शब्दांच्या जखमा, सारं काही.
 फार्स आणि दारुण दुःख या दोन अवतरणात रोजचं जगणं असतं. अन् तसं असतं म्हण. ते जगण्यासारखं असतं. वेगवेगळ्या चवीचं, शेडस्चं, अन् रंगाचं. ते सगळे घेऊन, सारं स्वीकारून हसायला हवं, काम करत राहायला हवं. एखाद्या योद्ध्यासारखं, फार्स आणि दुःखाच्या अवतरणातील लढाई खेळत.


 सुनीता सटकली आहे. तिच्या हातच्या स्वयंपाकाची चव सध्या बिघडली आहे. म्हणून मी म्हणतोय असं नाही किंवा पूर्वीसारखा भरभरून बोलणारा खिदळत विनोद अन् चुटकुले सांगणारा तिचा फोन सध्या येत नाही म्हणूनही माझं म्हणणं नाहीये. ती कशीही बेंगरूळ दिसते, कशीही काहीही करत, कुठलेही सिनेमे पाहत, कुणाकडंही चकाट्या पिटत फिरत राहते. तिचा मुलगा नंदू आय.आय.टी. त गेला. मुलगी माधवी कोर्ससाठी अहमदाबादला, सुहास तिचा नवरा खूप पैसे मिळवतो,तो त्याच्या कामात सतत बिझी. काय करावं सुनीताला कळतच नाही म्हणून ती सटकली.
 तिच्या आयुष्याला काही ध्येय किंवा स्वप्नंच नाही. कुठं जायचं काही माहितीच नाही आणि म्हणून ती सटकली.
 कार्यशैली काय किंवा जीवनशैली काय, प्रश्न फक्त 'स्टाइल' चा नाही हेतू' चाही आहे. उदात्त, सत्य, मनाला प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा, "हेतू' सुनीताला हवा आहे, बस्स. पान:कार्यशैली.pdf/३१


 सगळा दिवस नेहमीसारखा सुरू झालेला. बऱ्याच दिवसांनी वसंताच्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून हिशेबाचं काम उरकायचं काढलं होतं.
 सकाळी सकाळी खरं म्हणजे कामानं सुरेख गती पकडली, पण तासा-सव्वा तासात डोकं भणभणायला लागलं. चहा घेतला तरी थांबलं नाही, जेवलो, छान जेवलो, तरी डोकं चढतच गेलं. असं डोळे आणि कानांच्या मध्ये खोलवर दुःख, दुपारी नेहमीपेक्षा डबल आणि कडक चहाही प्यालो. पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी वैतागून लवकर घरी परतलो.
 असं का व्हावं याचं कारण लगेच लक्षात आलं नाही. झोप, व्यायाम उत्तम झालेला, शिवाय आवडीचं काम म्हणून असं का व्हावं असं वाटत राहिलं.
 संध्याकाळी उशिरा डॉ. प्रधान भेटले आणि उलगडा झाला. त्यांनी पूर्ण विचारून घेतलं आणि म्हणाले, 'वसंताच्या ऑफिसजवळच्या गोंगाटाचा त्रास झाला. सतत वेगवेगळे आवाज, हॉर्स, मोठे आवाज कानावर पडले की सहज थकायला होतं.
 कामाच्या ठिकाणचा अनावश्यक आवाज कमी करण्याचं तेव्हापासून मी मनावर घेतलंय. 2 २१. सिद्धता त्या एका बैठकीची संपूर्ण सिद्धता होती. संपूर्ण आणि सुयोग्य. वेळ ठरलेली होती. एक दिवस, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच. बैठकीला कोण येणार ते ठरलेलं होतं. एकूण सोळा माणसं, कोणाचा काय रोल आहे, कोण कशासाठी येत आहे याची प्रत्येकाला सुस्पष्ट कल्पना होती. बैठकीत सर्वांनी मिळून काम करायचं हेही एकदम स्पष्ट ठरलेलं होतं. संध्याकाळी पाच वाजता एका विशिष्ट ठिकाणी पोहोचायचं आहे, म्हणजे एखादी गोष्ट साधायची आहे हे देखील स्पष्ट होतं. हॉलदेखील सिद्ध होता. उत्तम प्रकाश, खेळती हवा, दिवसभर बसता येईल अशा उत्तम खुर्सा, सरळ पण एकदम आरामदायी, प्रत्येकाच्या समोर कागद, पेन, पेन्सिल, पाण्याची व्यवस्था. दिवसभराच्या कार्यक्रमाचा सुवाच्य अक्षरात चार्ट लावलेला. उत्तम शांतता. बैठक घेणाराही सिद्ध होता. बैठकीच्या विषयाचा उत्तम अभ्यास झालेला, भरपूर तयारी केलेली, स्वतः हसतमुख, उत्तम होडी वल्हविणाऱ्या नाविकासारखा, त्यानंही आम्हा सर्वांना पूर्णपणे ओढून घेतलं. सामावून घेतलं, सिद्ध केलं आणि एक सिद्ध बैठक पार पडली. कार्यशैली । ३२


 राघवन पक्का आणि अस्सल चार्मर आहे. पुंगीवाला सापाला डोलवतो ना तसं लोकांना आपल्याभोवती डोलवणारा. आसपासच्या माणसांचं मर्म जाणणारा, दर्द ओळखणारा, आवडीनिवडी माहीत असणारा, त्यांचे मूड जाणणारा, अन् त्यानुसार आपली चाल खेळणारा. हुशार अन् चलाख- चपळ असा चार्मर राघवन्.
 राघवन कधीच तंटा घेत नाही. राघवनची कधी तक्रार नसते की राघवन कधी कुणाला उलट बोलत नाही की कुठला चकार शब्द काढत नाही. वाद टाळतोच तो. कारण वादावादीच्या तुफान वातावरणात तो त्याची मंद भुरळ अन् गुंग प्रभाव टाकूच शकत नाही.
 चार्मरची ताकद, त्याची वाणी अन् कुठल्याही बिकट परिस्थितीत तुमच्यावर गर्द मोहिनी टाकण्याची अजोड क्षमता. राघवन नेमका तसा आहे चार्मर. त्याला बाकी काही करता येत नाही. ना ड्राफ्टिंग येत की मार्केटिंगच्या युक्त्या माहीत. तो ना हार्डवर्कर, तो ना कामाला वाघ पण तरीही कपूरसाहेबांच्या केबिनमध्ये, जिथं सारं ठरतं तिथं म्हणजे तिथंच त्याचा राबता असतो. सत्तेच्या जवळ राघवन एक अस्सल वस्ताद भुलैया. आसपास बघा बरं तुमच्या आहे का एखादा चार्मर?


 काही दिवसांपूर्वी एका जाहीर मुलाखतीत एका मोठ्या कर्तबगार माणसाला एक खासगी पण छान प्रश्न विचारला. त्याला विचारलं, "तुम्ही तुमच्या बायकोची निवड कशी काय केली? तो प्रश्न विचारल्याबरोबर आम्ही सर्वांनीच कान सरसावले.
 तो मोठा माणूस उद्गारला, "जी माझ्याबरोबर कुठल्याही गावात यायला तयार आहे. कुठलेही कष्ट सोसायची तयारी आहे आणि कितीही उशिरा मी घरी आलो तरी हसतमुखानं सामोरी येऊन उत्तम चहाचा कप समोर ठेवण्याची तिची तयारी आहे, तिच्याशीच मी लग्न करेन असं मी ठरवलं होतं.
 टाळ्या पडल्या. यावर काहींना धन्यही वाटलं. काहींना त्याच्या थोरवीची आणि कर्तबगारीची कमाल वाटली. काही हसले तर काहींना त्यांच्या यशाचं गमक सापडलं असं मला दिसत होतं.
 मला त्या माणसाच्या बायकोचा चेहरा पाहायचा होता. आपला नवरा आपल्याला ओढत नेईल, तिकडे जाणान्या त्या बाईनं जे काही सोसलं असेल त्याचं दर्शन तिच्या चेह-यावर दिसतंय का ते मला पाहायचं होतं. तिथं खिन्नता आहे की समाधान. तिथं आनंद आहे की वैषम्य की तिथं काहीच नाही हे मला शोधायचं होतं.


 त्यानं गळ्यात काय दोरा घातला आहे, ह्याचं मला विलक्षण कुतूहल वाटत होतं, मी थोडं जवळ जाऊन पाहिलं तेव्हा कानात वॉकमनला असतात तसे इअर प्लग्ज होते. रंगीत. मला कळेना. कमरेवर वॉकमन नाही आणि मग नुसते कानातले प्लग्ज कसे?
 त्याला मी निरीक्षण करतो आहे याची कल्पना नव्हती पण विलक्षण एकाग्रतेनं त्याचं काम सुरू होतं. त्याचा चेहरा सांगत होता, पूर्ण तल्लीन झालेला.
 मला राहवलं नाही. मी जवळ जाऊन शुक शुक केलं. पण त्याला कळलंच नाही. मग हळूच हातानं स्पर्श केला तर तो चमकून पाहू लागला. मग मी हे कानातलं काय आहे असं विचारल्यावर म्हणतो, 'इअर प्लग्ज, काम करताना वेगवेगळे आवाज कानावर पडतात आणि लक्ष विचलित होतं. आवाजानं थकायलाही होतं. म्हणून मी हे प्लग्ज वापरतो.
 त्याचं खरं आहे. इतके वेगवेगळे आवाज आपल्या कानावर दिवसभर कारण नसताना पडत असतात. त्यांचा त्रास होतोच, त्या त्रासापासून वाचण्यासाठी इअर प्लग्ज हवेतच,


 काम करताना आपण आपल्या शक्तीचा किंवा आपल्यात असणाऱ्या ऊर्जेचा नीट वापर केला पाहिजे. खरे म्हणजे काम करतानाच कशाला पण आपल्या साऱ्या जगण्यामध्येच हा विचार असला पाहिजे, काम करणं हा भाग तसं पाहिलं तर आपल्या एकूण जीवनदृष्टीशी संबंधित आहे म्हणून.
 हुआ चिंगनी नावाच्या एका विचारवंतानं म्हटलं आहे की चांगला कार्यकर्ता येणाऱ्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेऊन त्या परिस्थितीशी तादात्म्य पावून स्वत:ची ऊर्जा टिकवतो आणि वाढवतो.
 लक्षात घ्या. येईल त्या परिस्थितीशी सुसंगत राहून अथवा तिच्याशी जमवून घेऊन विपरीत परिस्थितीत तो किंवा ती कार्यकर्ती खचून जात नाही की मानसिक ऊर्जेचं पतन ती होऊ देत नाही. यशाच्या किंवा परम आनंदाच्या क्षणी तो भावनिक-शारीरिक ऊर्जा-उधळत नाही व अपयशाच्या परिस्थितीत तो भावनिक ऊर्जा संभ्रवून टाकत नाही.
 सर्व तन्हांची ऊर्जा टिकवणं आणि वाढविणं हे आपल्या साऱ्या जीवनशैलीचंच सूत्र हवं. तसं करण्यासाठी आहार, व्यायाम आणि विश्रांती यांचा तर समतोल हवाच पण त्याचबरोबर ही ऊर्जा टिकवून अन् वाढवून आयुष्याचं करायचंय काय याचीही पुरेपूर स्पष्टता हवी.


 आपल्या कामाला गतिमानता कधी येते, माहीत आहे का? उत्तर सोपं आहे.
 आपल्याला कुठं जायचं आहे हे पक्कं माहीत असेल तर मग आपल्या कामाला गती येते,जोर येतो हे जसं एखाद्या व्यक्तीला लागू आहे तसं एखाद्या छोट्या गटाला किंवा अगदी मोठ्या आणि विस्तीर्ण पसरलेल्या औद्योगिक संघटनेलाही लागू आहे. अहो इतकंच काय पण देशालाही लागू आहे. कुठं जायचं आहे आणि कशासाठी हे माहीत हवं. ध्येय सुनिश्चित हवं.
 असं सुनिश्चित ध्येय मग आपोआप अनेक गोष्टी घडवतं.एक नेमकी रणनीती समोर ठेवतं. सुप्त अशा अनेक ऊर्जास्थळांना चालना देतं, काम करणाऱ्या प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला त्यांच्या भूमिका स्पष्ट करतं आणि त्यांना यशात भागीदार बनवतं. सर्व बाजू आणि सर्व माणसं आपल्या सर्व शक्ती एकवटतात त्या एकवटताना एकमेकांना मदत करतात, प्रोत्साहन देतात. प्रत्येकाला वाटतं आणि पटतं की तो महत्त्वाचा आहे. तर तिची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. खेळातल्या सर्वांची आयुष्यं आणि कामं यांचा मेळ बसतो. सर्वांना एक टप्पा गाठायचा आहे. एकत्र काम करण्यामध्ये विलक्षण ताल मिळतो. संघटना, गट किंवा मोठ्या औद्योगिक संस्था अद्भुत अशी कामगिरी करतात आणि तीत भाग घेणान्या सर्वांचं आयुष्य प्रकाशमान आणि मंगलमय करून टाकतात.
 सुनिश्चित आणि सुरेखित ध्येय म्हणजे जादूची कांडी आहे. पण ही जादूची कांडी अशी कुठंही झाडाला लागत नाही. ती शोधावी लागते. प्रयत्न करून, कष्ट करून मिळवावी लागते. बऱ्याच संस्था, संघटनांना किंवा प्रांत अथवा देशांना ध्येयच नसतं आणि म्हणून सारे घोटाळे होतात. नुसते पैसे मिळवणं किंवा प्रसिद्धी प्राप्त करणं हे काही ध्येय असू शकत नाही. ती अभिलाषा आहे. तेव्हा ध्येयाची - जादूची कांडी शोधायला सुरुवात करू या.


 अगदी गोड गोड बोलत, चेहरा हसतमुख ठेवत वाचायला म्हणून माझं हस्तलिखित नेऊन बाबूरावांनी ते थोडा-फार बदल करून परस्पर जेव्हा छापून टाकलं आणि ते सुद्धा स्वतःच्या नावावर त्या वेळी मला त्याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. दुसऱ्यानं मारलेल्या शिकारीवर हळूच येऊन लचका तोडून नेणारी बाबूरावांची चोरटी चाल मी पहिल्याच भेटीत अचूक हेरली होती.पण माझाही त्या शिकारीवर भरपूर ताव मारून झाल्यानं मी त्याची फिकीरच केली नाही.
 प्रश्न माझ्या शिकारीचा लचका बाबूरावांनी का तोडला हा नाही तर अशा चोरट्या बाबूरावांचा हल्ली फार सुळसुळाट वाढला आहे, हा आहे आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे समाजाला याचं काही वाटत नाही ही आहे.
 बाबूरावांची शैली कशी असते? चोरटी, दबकत, लोचट, ओंगळ, खुशमस्करी अन् खोटारडी. कीव यावी अशी परिस्थिती. चोन्या करूनच जगायची कुणावरही वेळ येणं हे वाईटच नाही का?


 आम्ही राहतो ती तशी जागा शांत आहे. थोडी आडबाजूची आहे. त्यामुळं सरसकट दूरची वाहनं तिथं ये-जा करत नाहीत. आमच्या गल्लीत येणाऱ्यांचीच फक्त वाहनं असतात.
 सुधीर समारेच्याच इमारतीत राहतो आणि त्याचं त्याच्या मुलीवर फार प्रेम आहे. त्यामुळं तो केव्हाही ऑफिसातून आला की विशिष्ट पद्धतीनं हॉर्न वाजवत वाजवतच घरापाशी येतो. तो हॉर्न वाजवायला लागला की मग त्याची मुलगी आतल्या खोलीत नाचायला लागते. सुधीरची गाडी पार्किंग लॉटमध्ये आली की मग तो एका विशिष्ट पद्धतीने हॉर्न वाजवतो आणि मग म्हणे मिकीला कळतं की आज डॅडींनी खाऊ आणलाय किंवा आणखी एका पद्धतीनं हॉर्न वाजवला की म्हणे त्याचा अर्थ चल आता पार्कात जाऊ. हे सगळं मला एकदा सुधीरनंच गमतीत सांगितलं आणि मी चाट पडलो.
 चौथ्या मजल्यावरच्या आतल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोपऱ्यातल्या बेडरूममध्ये झोपलेल्या स्वत:च्या लाडक्या मुलीला संदेश देण्याचा हा नामी प्रकार ऐकून रडावं की सुधीरच्या श्रीमुखात लगावावी हेच समजेनासं झालं आहे. पान:कार्यशैली.pdf/४३


 एखाद्या दिवशी वाटतं की त्या दिवसाचा एक तुकडा बाजूला काढून ठेवावा म्हणजे गरज वाटेल तेव्हा त्याला पिशवीतून काढून उपयोगात आणता येईल.
 प्रचंड उत्साहाचा, स्वच्छ, नितळ, आणि संपूर्ण समतोलाचा एक तुकडा. एका दिवसाचा. ऊर्जेच्या उदंड उधाणाचा त्या दिवसाचा तो मस्त, प्रसन्न दिवसाचा तुकडा.
 समोर स्वच्छ उदात्त स्वप्न उभं. त्या स्वप्नाच्या दिशेनं चालणारे, ध्येयप्राप्तीच्या वाटेनं कूच करणारे अचूक प्रयत्न, त्या दिवसाचा नकाशा नेमका ठरलेला, स्वच्छ, रेखीव असा मार्ग आखलेला, लक्ष संपूर्ण एकाग्र, एकचित्त. फक्त समोरच्या कामाकडे.
 बसण्या-उठण्यात, अन् बोलण्या-ऐकण्यात एकदम सहजता, मनस्विता, अंगात कुठंही कुठल्या पेशीमध्येही एवढसासुद्धा ताण नाही की अवघडलंपण नाही. डोळ्यात शीण नाही. हवेत जणू तरंगल्यासारखा हलकेपणा, कामातला श्रेष्ठतम आनंद, सगळ्या गोष्टीतलं शुद्ध संतुलन.
 तो दिवस आजही स्पष्ट डोळ्यांसमोर येतो. एखाद्या कुपित ठेवण्यासारखा किंवा खजिन्यासारखा.जिथं मी काही व्यग्र आहे याचा कुठला त्रास तर नाहीच पण त्याहीपेक्षा प्रत्येक क्षणामधली अन् कृतीमधली अपार ऊर्जा मला आजही उजळवून टाकते.


 'माहीत नाही' हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत, फार मार्गदर्शक आहेत आणि उच्चारायला अवघडदेखील आहेत. पण सांगू आपण ते शब्द मनापासून उच्चारायला सुरुवात केली आणि जे माहीत नाही ते माहीत नाही, असं म्हणायला सुरुवात केली की फार चांगले आणि ठोस बदल व्हायला सुरुवात होते. मनामध्ये, वृत्तीमध्ये आणि काम करण्याच्या शैलीमध्येदेखील.
 'माहीत नाही' दोनच साधे शब्द, पण एक प्रकारची वृत्ती दर्शवणारे.
 'माहीत नाही म्हटले की शोध सुरू राहतो, माहीत करून घेण्याची धडपड़ राहते.निवडणं- खुरपणं सुरू राहतं. व्यग्रता धारण केली जाते. नव्हे करावी लागते. मन मोकळं, खुलं. आणि नवं स्वीकारण्याची तयारी रहाते.
 'माहीत नाही' म्हणजे अज्ञान नव्हे, ती आहे प्रामाणिकता, सत्यता, 'माहीत नाही' म्हणजे जिज्ञासा, समज आणि संपूर्णता कुठलीही गोष्ट पूर्ण आणि सर्वस्वी माहीत नसतेच, माहीत असतं ते त्याचं फक्त प्रोफाईल.
 जेव्हा माहीत नसतं तेव्हा 'माहीत नाही म्हणायला आलं पाहिजे. तसं आलं म्हणजे अनेक प्रकारची गुंतागुंत टाळता येईल. शुद्ध, स्वच्छ आणि खुली कार्यशैली अंगीकारता येईल.


 सतत म्हणजे सतत शिकायला पाहिजे आणि नुसती काम करण्याची शैली नव्हे तर जीवनाची शैली विकसित करत न्यायला पाहिजे.
 आयुष्याच्या शेवटी असं वाटायला नको की आपण जगलोच नाही. सेवानिवृत्त होताना असं वाटायला नको की आपण काम केलंच नाही. शिकायला पाहिजे, जुन्या चुकांपासून आपण खूप शिकायला पाहिजे.
 खूप जणांचं असं होत असणार, मला नक्की माहीत आहे. जेव्हा त्यांची त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ जवळ यायला लागेल आणि ते जेव्हा मागे वळून पाहतील तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या आयुष्यातील एखादा राहून गेलेला आनंद दिसेल आणि त्यांना विलक्षण खंत वाटेल. त्यांना आठवेल काही क्षुल्लक भीतीपोटी किंवा भीड म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही आनंद किंवा काही धमाल बाजूला ठेवलेली होती, काही अगदी नगण्य, क्षुल्लक किंवा खोट्या भीतीपोटी.
 माणूस खिन्न होतो, हरतो तो असा. एखाद्या नसलेल्या गोष्टीची भीती बाळगून आयुष्याच्या अखेरीस अशी खिन्नता न यावी म्हणून आजच प्रयत्न करायला हवेत. खोट्या भीतीला तिलांजली ही द्यायलाच हवी.


 चंद्रकांतचं सिगरेट ओढून येणं मला विलक्षण त्रास देतं. बंद कॉन्फरन्स रूममध्ये तो वास मीटिंग संपेपर्यंत छळत राहतो. रागिणीच्या सेंटचं असंच आहे. सकाळी सकाळी गुडमॉर्निंग करायला येते. अन् सगळी एकाग्रता बिघडवून टाकते.
 वर्तमानपत्रातल्या बलात्काराच्या किंवा हिंसाचाराच्या बातम्या, राजकारणातला भ्रष्टाचार या गोष्टी अशाच मन विचलित आणि विस्कळीत करतात. रस्त्यावरची बेशिस्त, रहदारी, आवाज करत चालणारी लिफ्ट किंवा सपशेल खोटं बोलणारे राजकारणी अशीच मनाची शांतता घालवतात, लय बिघडवतात.
 मनाची धारणा अशी हवी की मनाची शांती बिघडताच कामा नये. आपलं आयुष्य फार मौल्यवान आहे.अनावश्यक आणि ज्या घडल्या तरी ज्यांचा परिणाम काहीच होत नाही,अशा घटनांचा ओरखडा मनावर उमटूच देऊ नये. परिणामहीन गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं.आपण आपल्या मनाची तन्मयता साधत शांतपणे दिवसाच्या प्रवाहात आपली होडी टाकावी.वल्ह्याचा रंग आवडत नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करावं.


 सांगा बरं, काय महत्त्वाचं? आज मधुकरचं बोर्डासमोर भाषण आहे, त्यानं गेले सहा महिने खूपच खपून प्लॅन तयार केला आहे, तो त्याला सर्वांसमोर ठेवायचा आहे आणि कालच नवे बूट आणले आहेत, जे त्याच्या पायाला फार चांगले बसत नाहीत, टोचतायत. सांगा पाहू, भाषण महत्त्वाचे की बूट? तर अर्थात भाषण, ज्यावर मधुकरनं सहा महिने गाढ मेहनत घेतली तीच गोष्ट अर्थात महत्त्वाची, पण सांगतो की तो बारीक टोचणारा बूट मधुकरच्या सहा महिन्यांच्या कामगिरीवर सुरेख बोळा फिरवू शकतो.
 छोट्या गोष्टी अन् मोठ्या गोष्टी. कमी महत्त्वाच्या अन् जास्त महत्त्वाच्या.मात्र छोट्या गोष्टींची ताकद अशी की त्या मोठ्या गोष्टींना सुरुंग लावू शकतात.
 रुटीनमध्ये, दैनंदिन शिस्तीमध्ये आणि नियमांमध्ये छोट्या गोष्टींचा निचरा होऊ शकतो.त्यावर उत्तरं मिळू शकतात. रोजच्या जगण्यातला अवकाश छोट्या गोष्टी निपटवून टाकू शकतो. भाषणांच्या दिवशी मधुकरनं शांतपणे आवरायला घेतलं तर बुटाची गडबड त्याच्या लक्षात येईल. सर्व लक्ष भाषणाकडंच ठेवण्याचं तो सर्वतोपरी प्रयत्न करील. पान:कार्यशैली.pdf/४९


 यशस्वी व्हायलाच हवं पण ते कुणाविषयी द्वेषभावना ठेवून नको. जिंकायला हवं ते बाष्कळ आक्रमकता ठेवून नको. यश चाखायला हवंच पण ते उर्मटपणा टाळून, यशस्वी व्हावं पण ते वेड्यावाकड्या मार्गानं नव्हे किंवा शक्तीचा, बडेजावाचा बाष्कळ वापर करूनही नव्हे.
 याचं कारण आहे की, आपण आज जरी एखाद्या शॉर्टकटनं किंवा विचित्र मार्गाचा अवलंब करून यश मिळवलं असलं तरी आपण ज्या मार्गावरून आलेलो असतो त्या मार्गावरचे काटे आपल्या अंगाला लागलेलेच असतात. आपण काम करताना ध्येयाचा आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वीकारत असणाऱ्या मार्गाचा विचार हा आपण केलाच पाहिजे.
 चुकीच्या मार्गानं यश मिळवलं तर मग जे काटे आपल्या अंगाला लागतात त्यानं आपण अधिक वृद्ध बनतो आणि आपण आपल्या यशाचा पुरा आनंदही घेऊ शकत नाही.
 जगण्याच्या संघर्षात अनेक माणसं ही चूक करतात. कुठल्याही मार्गानं ती यश मिळवतात अन् ते करता करता इतकी थकतात आणि क्षीण होतात की त्याचा आनंद ही माणसं घेऊ शकत नाहीत.
 यश मिळविताना कामाची शैली अधिक तारुण्य टिकवणारी असावी. थकवणारी नको.

 कधी कधी वाटतं की सध्या आपण शिकवण्याचा किती प्रयत्न करतो? आपल्याला कायम तयार माणसं हवीत, असं वाटतं पण माणसं घडवण्याकडं आपण किती लक्ष देतो? किती परिश्रम करतो?
 टाटुंग कंपनीचे टी. एस. लीन यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, 'एका इंग्लिश म्हणीमध्ये म्हटलं आहे तसंच मला वाटतं. कुठलाही विद्यार्थी वाईट नसतो, वाईट असू शकतात ते शिक्षक. एखाद्या कंपनीलाही तेच लागू आहे. काम करणारे लोक कधीच वाईट असू शकत नाहीत. वाईट असतात ते कंपनीचे व्यवस्थापक किंवा वाईट असतं ते कंपनीचं वातावरण.
 माणसं तयार करण्याकडं अत्यंत आवर्जून लक्ष द्यायला हवं. जसं खेळाहू तयार करण्याकडं, गायक तयार करण्याकडं, चित्रकार तयार करण्याकडं, तसं नेते तयार करण्याकडंही लक्ष द्यायला हवं. त्यासाठी परिश्रम हवेत. चिकाटी हवी. माणसं ओळखण्याची नजर हवी आणि माणसं घडवण्याच्या प्रक्रियेत सातत्य हवं.
 आज कुठेच असे प्रयत्न दिसत नाहीत. अगदी शाळांमध्येसुद्धा नाहीत. भविष्य अंधारलेलं आहे, असं यावरून म्हणायचं का?


 वसंताबरोबर मी त्याच्या घरी गेलो आणि त्यांनी खिशातून एक जुडगा काढला.'जुडगा?' मी विचार करत राहिलो. आता इतक्या किल्ल्यांमधून हा आपली योग्य ती किल्ली कशी काढेल बरं? असा विचार करत राहिलो. पण वसंतानं सराईतपणे एक किल्ली शोधली आणि लॅचला लावली. खार, खार, खार असे तीन आवाज झाले. मग त्यानं दुसरी किल्ली काढली, आणि मोठं थोरलं जे कुलूप होतं त्याला लावली. त्यानंतर बघतो तर आणखी एक कुलूप, छोटं पण स्टील रंगाचं मजबूत.
 इतका सारा सोपस्कार करून दार उघडून मग आम्ही व्हरांड्यात आलो तर व्हरांड्याच्या दाराला पुन्हा एक कुलूप. तिथनं सरकत्या लोखंडी दाराला सहावं कुलूप. मी विचारलं तर वसंता म्हणतो की सुरक्षितता बरी असते. एवढा बंदोबस्त करून गेलं की मग डोक्याला टेन्शन नसतं.
 मला स्पष्ट दिसत होतं. वसंता कितीही म्हणाला तरी असुरक्षितता त्याच्या मनात होती.कोणीही कितीही म्हटलं तरी कुलपानं त्याच्या मनातली भीती जाणं शक्य नव्हतं. त्यासाठी काही वेगळाच उपाय आवश्यक होता.


 अरोरासाहेबांच्या पिंक पेपरची मला नेहमी गंमत तर वाटतेच पण थोडंसं कुतूहलही वाटतं. आमचे जनरल मॅनेजर अरोरा हे दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र असतात. फोन्सचा ओघ चारी बाजूंनी चालू असतो. बाहेरही फिरावं लागतं. कधी टूरही असते. पण ती कुठंही असली तरी काहीही काम करत असले तरी त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये एक थोडा जाड असा 'पिंक पेपर' असतो.
 मला कुतूहल होतं म्हणून मी विचारलं तर अरोरांनी हसून तो 'पिंक पेपर' मला दाखवला आणि म्हणाले 'माझा गाईड आहे हा!'
 मी तो पेपर उत्सुकतेने पाहिला. सकाळपासूनची करावयाची कामं ओळीनं लिहिलेली तर होतीच पण प्रत्येक कामाला किती वेळ लागावा याचा साधारण अंदाजही होता. मध्ये मध्ये 'मोकळा वेळ' असंही लिहिलेलं होतं. म्हणजे तिथं आयत्या वेळी येणारी कामं घेता येतील अशी व्यवस्था होती. प्रत्येक कामासमोर त्या कामाचं उद्दिष्ट लिहिलेलं होतं.
 मला हा प्रकार फारच आवडला. दिवसाच्या गाईडचा 'पिंक पेपर'.  लुव नावाचा एक प्रख्यात 'टी मास्टर' होऊन गेला. टी मास्टर्स म्हणजे चहा करण्याचे किंवा हा बनवण्याचे तज्ज्ञ. या लुवची गोष्ट फार सुंदर आहे.
 हा तुव उत्तम चहा करण्यासाठी पाणी कुठलं वापरावं हे सांगणारा तज्ज्ञ होता. त्याने उत्तम चहा बनवण्यासाठी पाणी कुठलं वापरावं यावर एक छान पुस्तकदेखील लिहिलं होतं. त्या पुस्तकात तो म्हणतो की नानलिंग या गावाशी यांगत्से नदीच्या मध्ये असलेल्या प्रवाहाचं पाणी चहा करण्यासाठी सर्वोत्तम.
 एकदा त्याला एका भांड्यातलं पाणी प्यायला सांगितलं आणि विचारलं की हे कुठलं पाणी आहे? त्यानं पाणी प्यायलं आणि तो म्हणाला की यांगत्से नदीतलं पाणी आहे. नानलिंग गावचंच आहे पण मधल्या प्रवाहाचं नाही. किनान्याकाठचं आहे. हे ऐकल्यावर सगळेच चपापले. खरं काय असं विचारल्यावर ज्यानं आणलं तो म्हणाला, "बरोबर आहे. मी पाणी आणलं खरं मुख्य प्रवाहातून, पण नंतर जेव्हा होडी हेदकाळून पाणी सांडतं तेव्हा मी थोडं पाणी तिथल्या किनाऱ्यावरचं भरलं."
 सगळेच चकित झाले.
 सूक्ष्मता, बारकावा, नेमकेपणा, अनुभवाचं तादात्म्य, अचूकता, ज्ञान आणि आपल्या मताशी प्रामाणिकता. पान:कार्यशैली.pdf/५५  सतीश हा कामात बैल आहे असं मी म्हणते तेव्हा माझ्या मनात कुठंही उच्चनीचतेची भावना नाही. बैल जसा काम करतो तसा सतीश करतो. म्हणून फक्त म्हणालो म्हणजे असं की सतीशच्या कामाची शैली ही बैलासारखी आहे, बैलशैली.
 खाली मान घालून सतीश एकदा का सकाळी नऊ वाजता टेबलावर बसला की मग फक्त तो, त्याचा कॅलक्युलेटर मित्र आणि त्याची ती मैत्रीण आकडेमोड तिचं नाव, सरळसोट हिशेब नांगरत सतीश कामाचा फन्ना करतो. त्याला फक्त कुणीतरी काम सांगणारा किंवा सांगणारी हवी असते आणि हवं भरपूर काम. ऑफिसात काय किंवा घरी काय दोन्हीकडे सतीशची हीच पद्धत. घरी सुजाता त्याला रविवारी सकाळी कामाची यादी देऊन निवांत स्वयंपाकघरात जाते. जेवायच्या वेळेपर्यंत सगळी कामं नांगरून तयार. मधनं मधनं फक्त मोबाईलची रिंग हवी फटकारायला की झालं.
 सतीश कामाला लागला की त्याला पाऊस पडल्याचं कळत नाही की समजत नाही.खोलीतले पडदे बदलल्याचा बारकावा पकडताच येत नाही, सरळसोट नांगरता-नांगरता कडेच्या बांधावर उमललेली कळी तो पाहूच शकत नाही. बैलशैली म्हणजे सरळसोट नांगरणं, बाकी काही माहीतच नाही.

 जंगलात सर्व प्राण्यांची नेहमीप्रमाणे सभा सुरू होती. अर्थात वाघ आणि सिंह त्या सभेला नव्हते. ते नव्हते ते बरंच आहे असं वाटलं. कारण ते असताना सगळेच नुसते हो ला हो करतात,खरं कुणीच बोलत नाहीत.
 त्या दिवशी मात्र तरस भलतंच सुटलं होतं. म्हणत होतं "मी नाही घाबरत सिंहाबिहांना,अगदी त्यांच्या नाकावर टिच्चून मी त्यांनी मारलेली शिकार लंपास करून आणतो. "तरस बडबड करत चाललं होतं तेव्हा तिथनं एक माशी आपल्याच मस्तीत चालली होती. ती म्हणाली, "हे काहीच नाही. मी वाघ-सिंहाच्या दात-ओठांवरून फिरून मस्तपैकी माझा खाऊ आणते."
 हे ऐकून तरस सटकलं आणि म्हणालं, "ए, चिंटूक, त्या वाघ-सिंहाच्या तुलनेत तू इतकी गण्य आहेस की तू फुशारक्याच मारू नकोस माशे."
 माशी थबकली अन् सर्रकन फिरून म्हणाली, "हो, माहिती आहे, अहो तरसबाबू म्हणा काहीही पण मी शांत, निवांत अन् सुरक्षितपणे माझा दाणा मिळवते आणि तुम्ही मात्र चोरासारखा एखादा पळवता अन् मटकावता. मी नगण्य असेन पण चोर नाही. मी छोटी असेन पण असुरक्षित नाही.
 आपण पाहू आपण कोण? चोर की स्वाभिमानी? तरस की माशी?


 माणसांचे खूप प्रकार असतात. तसंच त्यांच्या काम करण्याच्या तन्हाही वेगवेगळ्या असतात. अगदी वेगळ्या काही माणसांकडे चिकाटी असते तर काही माणसं कार्यप्रवण असतात. त्यांना सतत काहीतरी काम लागतं आणि ते काम नसलं तर ते अस्वस्थ होतात. कामं पूर्ण करणारी काही असतात तर कामाच्या रून काम गांडुळ जमीन पोखरतं तशी काही असतात.
 मात्र काही माणसं कामं निर्माण करतात. अगदी मुळातून यांना कल्पना सुचतात, कामं दिसतात. त्यांचा अनेकांशी संपर्क असतो. त्यांचा बराचसा वेळ हा अनुभव घेण्यावर नवं समजून घेण्यासाठी जातो. त्यांना आराम लागतो. मानसिक आणि शारीरिक फिटनेस लागतो. खूप नवं अवकाश नवं सुचण्यासाठी लागतो. हे वाचतात खूप ऐकतात खूप.
 मग यांना एखादीच कल्पना सुचते, की ज्यामुळे दिशाच बदलते. प्रवाह सरकतो. कधी होत्याचं नव्हतं होतं. नुकसान टळतं. प्रचंड यश मिळतं. एकाच कल्पनेनं पाहा. तुम्ही तुमच्या आसपास ही कल्पनाशूर माणसं आहेत का? ओळखा त्यांना, सोडू नको. ते कदाचित एखादं काही सांगतील की त्यानं सारं बदलून जाईल. जपा त्यांना.


 दिल्लीहून अमृतसरला जाणारी शताब्दी म्हणजे एक कमाल ट्रेन आहे. त्या दिवशी मात्र माझा प्रवास एक अगदी वेगळ्या कारणानं अविस्मरणीय झाला. माझ्याशेजारी एक विलक्षण तेजस्वी असा माणूस बसलेला होता. शुभ्र कपडे. दाढी अन् डोळ्यात चमक. मी माझं काम करत होतो. थोडा गडबडीत होतो. लुधियानात होणाऱ्या परिसंवादात जे प्रेझेंटेशन करायचं होतं, त्याची तयारी करत होतो. मधनंच हातातली पेन्सिल खाली पडत होती. उठण्या-बसण्यात घाई होती, मनात थोडी अधीरता होती. असंच सारं चालू असताना सीटवरून उठताना माझा धक्का त्याला लागला आणि मी सॉरी असं म्हणतो न म्हणतो तोच तो हसून म्हणतो कसा "सम्हल के, आराम से, जो करना है धीरे से करो, नया अनुभव मिलेगा."
 नंतर प्रवासात आमच्या खूप म्हणजे खूपच गप्पा झाल्या.
 त्याचं म्हणणं तंतोतंत खरं होतं. अगदी सकाळी दाढी करताना किंवा बुटाच्या लेस बांधतानादेखील त्यातला मनस्वी अनुभव केवळ गती कमी करण्यात आला, येत राहिला, येत गेला.
 दिल्लीहून अमृतसरचा प्रवास म्हणूनच मी कधीच विसरणार नाही.


 एखादा दिवस असा उजाडतो की वाटतं दूर जंगलात निघून जावं किंवा स्वत:ला जमिनीत गाडून घ्यावं किंवा एकटंच कुणालाही न सांगता डोळे मिटून पडून राहावं, काहीही न करता.
 अशा दिवशी फोनची रिंग वाजली तरी दचकायला होतं, आता आणखी काय बला असं वाटतं. काही म्हणजे काहीही सुचत नाही. काही करावंसं वाटत नाही. तोंडाला चव नसल्यासारखं कामात मन लागत नाही. कुणा म्हणजे कुणालाही भेटावंसं वाटत नाही. उठवत नाही. बोलवत नाही. फोनवर थातुरमातुर उत्तरंही देता येत नाहीत
 असा दिवस एखादे वेळीस उजाडतो तेव्हा जे असेल ते काम जिथं असेल तिथं तिथल्या तिथं ठेवून द्यावं. धोक्याची घंटा वाजती आहे. तुम्हाला ताबडतोब थांबण्याची गरज आहे, असा त्याचा अर्थ आहे.
 अशा वेळेस खेचू नका, ताणू नका, थांबा, काहीही करू नका. तुमच्या मनाला विश्रांती हवी आहे, विराम हवा आहे असं समजा. थांबा, जिथे आहात तिथंच थांबा. शांत राहा-दोन-चार दिवसांसाठी. पान:कार्यशैली.pdf/६१

 तो येतो तो मुळी वादळासारखा. सुसाटत, घोंघावत, आवाज करत आणि शांत वातावरणाचा चुराडा करत. आल्या आल्या भेटल्या भेटल्या तो एक अस्सल शिवी देतो. त्याला शिवी दिल्याशिवाय सुरूच करता येत नाही.
 त्यानं शिवी हासडली की मग मी चपापून आसपास पाहतो. वरमतो. पण त्याला त्याची फिकीर नसते. तो त्याला जे वाटत असतं ते मग बकत असतो, ओकत असतो. मनातली घाण बोलण्यावाटे फेकत असतो. तो असं बोलायला लागला की त्याचा चेहराही विचित्र बनतो. विस्कटतो, भेसूर आणि राक्षसी दिसतो. तो शांत नाही. अस्वस्थ आहे. तो पोखरला गेला आहे. रागानं-असूयेनं अन्दुः खानं.
 मूळचा तो तसा खूप चांगला आहे. अस्सल आहे. पण मनाची अस्वस्थता तो अशा फूत्कारांवाटे टाकण्यानं तो आता समाजापासून तुटलेला आहे. त्याला ते माहीत नाही. पण सारेच त्याला त्यामुळं टाकतात. जवळ करत नाहीत.
 मला त्याला सांगायचंय. बऱ्याच वर्षांपासून बोलायचंय. त्याच्यातला चांगला माणूस. त्याची ओळख त्याला करून द्यायची आहे. मात्र ते कसं करावं ह्याच चिंतेमध्ये मी आहे.


 या संस्थेत मी पंचवीस वर्षांपूर्वी आलो होतो. त्या काळात भारतभर नाव असलेली ही संस्था पुन्हा बघताना एखाद्या जर्जर रोग्याला आपण पाहतो आहोत, असं वाटत होतं. पंचवीस वर्षांपूर्वी या संस्थेत नुसतं जायला मिळालं तरी आम्हाला आनंद व्हायचा. रोज कुठल्या ना कुठल्या विषयावर तिथं परिसंवाद व्हायचे. रात्र रात्र तिथं वादविवाद चालायचे आणि सतत सगळ्या वातावरणात चैतन्यमयी सळसळ असायची. ती संस्था म्हणजे सदा पेटलेला ज्ञानयज्ञच आहे असं वाटायचं.
 या संस्थेचा जन्मकाळ आणि भराभराटीचा काळ मी पाहिलेला होता. आता त्याच संस्थेला जर्जर, वठलेल्या अन् रोगी अवस्थेत पाहावं लागत आहे.
 का झालं बरं असं? कशामुळे या संस्थेला अशी अवस्था आली? त्याच संस्थेच्या प्रांगणात फिरताना मनात प्रश्न उमटत होते, फिरता फिरता जुन्या आठवणी मनात दाटून येत होत्या.
 मला जे चित्र दिसलं ते असं संस्थेच्या उच्च, भरभराटीच्या काळात संस्थेला स्वार्थी माणसं चिकटली. खुशमस्कन्यांचं राज्य सुरू झाले. गट पडले, तंटे वाढले. माणसांना कामापेक्षा एकमेकांची उणीदुणी काढण्यात रस वाटू लागला. नवी उभारी हरवली, स्वत:ला पणाला लावणारे कमी झाले, माणसं अधू झाली, बाहेरचे नवे वारे त्यांनी ओळखले नाहीत. धडाडीच्या, सळसळत्या उत्साहाला आमंत्रण देण्याऐवजी सुस्त, बद्ध नोकरशहांच्या कोरड्या, मस्तवाल हातात सूत्रं गेली. त्या सर्व हातांनी एक एक करून संस्थेची कबर खणत आणली.
 मला आठवतंय याच संस्थेच्या आवारात एका झाडाखाली रोमन साम्राज्याच्या अस्ताची कारणं आम्ही बोललो होतो. आज त्याच संस्थेचा अस्तही मी पाहतो आहे. वाटलं, एकट्या-दुकट्याच्या कार्यशैलीला उत्तम संस्थेच्या व्यवस्थेचं कोंदण मिळायला हवं. आपण सर्वांनी अशा सोनेरी संस्था आपल्या सर्वांच्या भल्यासाठी टिकवायला हव्यात.


 कित्येक कर्तबगार माणसांना राजदरबारातलं शहाणपण नसतं, वकूब नसतो. म्हणून केवळ ते मागे पडतात असा माझा समज आहे. राजदरबारातलं शहाणपण म्हणजे शिष्टाचार, मानवी संबंधांमधील खुबी आणि तरबेज जनसंपर्क.
 त्यामुळे होतं असं की फक्त गुणी माणसालाच बढती मिळते असा प्रकार होत नाही.'गुणी' पेक्षा योग्य माणसाची निवड केली जाते. त्यामुळे सध्याचा जग-व्यवहार असा आहे की चार चांगल्या गुणांबरोबर शिष्टाचाराच्या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत, तुम्हाला माणसं अचूक ओळखता आली पाहिजेत आणि उत्तम जनसंपर्काचं एक अद्भुत जाळं तुमच्याकडे असलं पाहिजे. हे करायचं असेल तर काही गोष्टी आत्मसात करायला हव्यात. उत्तम निरीक्षण क्षमता हवी. तुमचं स्वतःवर अफाट प्रेम हवं. कुणाला काय आणि का आवडतं हे तुम्हाला माहीत हवं. लोकांना तुमच्याशी बोलायला आवडावं, असं तुमचं वागणं हवं आणि हे सर्व करण्यासाठी तुमच्याकडे एक उदात्त हेतू आणि एक योजना हवी - सर्वांना पुढे नेईल अशी.


 शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ज्या ऑफिसला सुट्टी असते, अशा ऑफिसमध्ये सोमवारी सकाळी पहिल्या-वहिल्या तासाला एखादी महत्त्वाची मीटिंग लावणं किती चुकीचं आहे हे मला आज समजलं.
 खरं म्हणजे सर्व काम वेळच्या वेळी करणारं, सर्वांची कामं सुस्पष्ट असणारं आणि तुफान 'आऊटपुट' देणारं ते ऑफिस सोमवारी सकाळी साडेआठच्या ठोक्याला पूर्णपणे विस्कळीत आणि गांगरलेलं वाटलं. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही आणि कुणाकडेही दुसयांना उद्युक्त करणारी, उत्साह देणारी ऊर्जा नाही अशी अवस्था होती.
 झालं होतं असं की, ऑफिस अजून तापलेलं नव्हतं. क्रीडांगण अजून आखलेलं नव्हतं.थोडीशी कवायत करून सर्वजण उबदारलेले नव्हते. त्यामुळे मीटिंग चांगलीच फसली गेली होती. जे अपेक्षित होते ते घडू शकलं नाही.
 सर्व काही होतं. फक्त मीटिंगची वेळ चुकली; ऑफिस तापलेलं नव्हतं म्हणून गडबड झाली होती, एवढं मात्र त्या दिवशी नक्की शिकायला मिळालं.
" THIS SIDE UP


 तो त्याच्या ऑफिसचा बॉस आहे, असं त्याला ऑफिसमध्ये काम करताना पाहून कधीच वाटत नाही. म्हणजे त्याची केबिन ही बॉसची असावी तशीच आहे, मोठी आहे, झकपक आहे, त्याचे कपडेसुद्धा बॉसला शोभतील असे आहेत. पण तरीही त्याला पाहून त्याचा अंमल तिथं चालला आहे असं वाटतच नाही.
 हा आतमध्ये तुफान धुमश्चक्री करत लढत असतो आणि बाहेर मंडळी फूल टू निवांत असतात.आत हा मरमर काम करत असतो. राबत असतो आणि बाहेर मजा असते.
 असं होण्याचं कारण म्हणजे त्यानं लोकांवर काम सोपवण्याची कला आत्मसातच केलेली नाही. बरोबर जे काम करतात त्यांना त्यांची कामं नीट समजून द्यावीत. त्यानंतर त्यांचं प्रशिक्षण करावं. ज्या अडचणी येतात त्यावर त्यांच्याशी बोलावं पण काम त्यांनीच करावं, असा आग्रह धरावा, या गोष्टी तो करत नाही. सगळी कामं तो स्वत:च्याच अंगावर घेण्याचा असा आग्रह करत असतो.
 त्यामुळं तो बॉस वाटत नाही. अहो वाटत कसला नाही, तो बॉस नाहीच.


 मागे लागल्याशिवाय कामं होत नाहीत, हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. पण नुसतं वसवसाट करून, हात धुऊन लोकांच्या मागे लागल्यानं कामं होतात हेही खरं नाही.
 खरी गोष्ट आहे की, तुम्हाला लोकांकडून कामं करून घ्यायची असतील, तर तुमच्याकडे तीन विशेष गुण असलेच पाहिजेत. कोण कसा आहे, कसा नाही. कुणाची पावलं संतांची आहेत, तर कुणाची दुर्जनाची! कुणाला कामं आवडतात, कोण कुठं मोकळा असतो, कुठं सहज असतो, याचं अचूक निदान असायला पाहिजे. म्हणजे कुणाकडून काय काम सहजी करून घेता येईल हे समजू शकेल, हा झाला पहिला गुण.
 दुसरा गुण म्हणजे, योग्य शब्दांची योग्य वेळी योग्य माणसांसमोर मांडणी. उदाहरण पाहा,नाः गांधीजींचे शब्द 'चले जाव', केनेडींचं ते प्रसिद्धवाक्य : 'देश तुमच्यासाठी काय करील, हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय कराल, हे सांगा'. योग्य वेळी योग्य शब्द. माणसांना शब्द हलवतात आणि माणसं मग देश बदलतात. लोकांकडून करवून घ्यायचं असेल, तर योग्य बोलायला शिकायला पाहिजे. तसं येत नसेल, तर तसा बदल करायला पाहिजे.  तिसरा गुण म्हणजे भांडण-तंटे, रुसवे-फुगवे सोडविण्याची क्षमता. जो माणूस भांडण-तंट्यात शांत राहू शकतो आणि शांत राहून प्रश्न सोडविण्याची क्षमता ज्याच्यात असते, अशाच माणसाला अनेक लोकांकडून काम करून घेता येतं.
 आज परिस्थिती अशी आहे की, अनेक कामांसाठी आपल्याला अनेकांवर अवलंबून राहावं लागतं, पण त्यांच्याकडून काम करवून घ्यायचं तर हवी माणसं-समजण्याची कला, योग्य शब्दांची निवड करण्याचं कसब आणि भांडण-तंट्यात मार्ग काढू शकण्याची खुबी.


 गैरसमज होणारच आहेत असं समजून बोलायचं किंवा लिहायचं असं मी सध्या ठरवलेलं आहे. डेव्हिड हिल या लेखकाचं 'गेटिंड हर्ड' या नव्या कोऱ्या पुस्तकाकडे पाहून त्यातलं वाचून मी हे असं ठरवलेलं आहे.
 डेव्हिड हिल म्हणतो, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी 'एक हत्ती अन् सात आंधळ्यांसारखं' होतंच होतं, त्यामुळं आपलं म्हणणं लोकांना सुस्पष्टपणे कळावं, समजावं यासाठी एका मदिपर्यंत प्रयत्न करावेत आणि नंतर सोडून द्यावेत.
 त्यानंतर तर तो फारच मजेदार गोष्ट मांडतो. तो म्हणतो, जाऊ द्या ना, तुम्हीसुद्धा तुम्हाला जे सांगायचं आहे तेच सत्य आहे असं मुळीच समजू नये. कधी कधी तुम्हाला काय सांगायचं आहे यापेक्षा लोकांनी त्यातून काय अर्थ काढला आहे, ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. त्यातून लोक कसा आणि का विचार करतात हे तर समजतंच पण त्याबरोबर तुमच्या मांडणीमधला दम आणि मुदयामधली अर्थपूर्णता याचाही कस लागतो.
 तेव्हा काही नाही, जे भावतं तेच स्वच्छ, मोकळं मांडायचं एवढंच मी ठरवलेलं आहे.

 माझ्या मोबाईलचं बिल भरायला मी अगदी आवर्जून जातो, खरं म्हणजे पोस्टानं चेक पाठवून किंवा कुणाबरोबर तरी रोख पैसे धाडून देता येतील, पण तसं मी नाही करत. मी आवर्जून तिथे जाण्याचं कारण 'ती' आहे.
 ग्राहकांचं ऐकून घेण्यासाठी त्यांच्या शंका-कुशंकांना उत्तरं देण्यासाठी आणि बिलाचे पैसे स्वीकारण्यासाठी तिथं एक डेस्क आहे. तीन मुली तिथं झगडत असतात. आणि ही त्यांची बॉस आहे.
 प्रत्येक वेळी कुणी ना कुणीतरी बिलाविषयी तक्रार घेऊन आलेलं असतं. रागाचा शब्द वाढत असतो. तिथल्या मुलीही कावलेल्या असतात, पण 'ती' सगळ्या सगळ्याला तोंड द्यायला समर्थ असते.
 हसतमुख असते. प्रत्येक प्रश्नाला शांतपणे, ठामपणे उत्तरं देत असते आणि मनाचा तोल ती कधीही म्हणजे कधीही ढळू देत नाही, प्रत्येक वेळेला मी पाहत असतो की आत्ता तिचा तोल जाईल, मग जाईल, पण नाही. काहीही झालं तरी ती स्थिरच असते. योगिनीच ती, मोबाईल कंपनीत असली म्हणून काय झालं? पान:कार्यशैली.pdf/७३


 उन्हाळ्यात बॅगेत छत्री ठेवावीशी वाटतेच. बसमधून उतरून थोडंसं अंतर चालतानादेखील छत्रीच्या सावलीत चांगलं वाटतं म्हणून समोरच्या कपाटातली छत्री घेतली तर लक्षात आलं की त्याची एक काडी तुटलेली आहे. मी चिंतेत पडलो. काय करावं असा विचार करत राहिलो.
 तेव्हा एकदम आठवण आली. घरात दुसरी छत्री होती ती काढली. बाल्कनीत जाऊन ती उघडली तर तिचीदेखील तीच अवस्था. तिच्या तर दोन काड्या तुटलेल्या.
 मी विचारात पडलो. आता छत्री नाही तर काय करायचं, असा प्रश्न नव्हता तर दोन तुटलेल्या छत्र्या कशा काय राहिल्या असं वाटत होतं.
 दोन तुटलेल्या छत्र्या. मला आठवलं. मागच्या वर्षी एकीच्या काड्या तुटल्या म्हणून दुसरी घेतली आणि पहिली पार विसरून गेलो. आता दुसरी तुटली आणि छत्रीच नाही अशी परिस्थिती आली.
 वेळच्या वेळेस पडलेलं भोक लिंपून टाकण्याची कार्यशैली हवी. रोजच्या प्रश्नांचं उत्तर रोज, रोजच्या थकण्याला विश्रांती रोजची.

 कामाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात ते प्रामुख्यानं माणसांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे. बऱ्याचदा बाकी सर्व असतं पण माणसांचं जमत नाही म्हणून वातावरण गढूळ होतं, आणि कितीही प्रयत्न केला तरी माणसांचे जमत नाही ते नाहीच.
 या बाबतीत बोलायचं तर माणसांचे साधारण तीन प्रकार आहेत. त्यात आपण कुठे बसतो. ते पाहू या.
 पहिला प्रकार आहे पारंपरिक. जो माणूस उच्च नीती तत्त्वांना विलक्षण महत्त्व देतो आणि परंपरा, चालीरीती, वरिष्ठांना बहुमान अशा गोष्टींबाबत जागरूक असतो.
 दुसरा प्रकार आहे सहभागी. तुम्हाला जर माणसांची काळजी असेल, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तुमची शैली असेल तर तुम्ही सहभागी प्रकारात मोडता.
 तिसरा प्रकार आहे व्यक्तिवादी, व्यक्तिकेंद्री, स्वतःचं स्वातंत्र्य मानणारा, मुक्त, स्वच्छंद व्यवहारावर विश्वास असणारा. एकला चलो रे वाला माणूस. तुम्ही कुठे आहात ते पाहा. तुम्ही कदाचित थोडे हे थोडे ते असाल, पण अगदी विरुद्ध प्रकाराला तुम्ही भिडलाच तरी कामाच्या ठिकाणी ठिणग्या उडणार हे नक्कीच.


 एखादी गोष्ट हातात घट्ट धरून ठेवली की ती पडत नाही हे खरं आहे. अर्थात हे जरी वस्तूच्या बाबतीत खरं असलं तरी माणसांच्या बाबतीत याच्या अगदी उलट आहे.
 माणसं आपण कितीही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती निसटून जातात. किंबहुना आपणं जितकं घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करू तितकी ती सटकतात, अधिक वेगात. जरा आसपास नजर टाका म्हणजे मी म्हणतो आहे ते तुम्हाला पटेल.
 होतं काय की वेगवेगळ्या उपायांनी आपण माणसांना बांधू लागतो, आणि मग त्यांची कुचंबणा व्हायला सुरुवात होते. मग धरून ठेवणाऱ्याला आणि धरलेल्याला एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. धरणारा अधिक जोरानं धरू पाहतो तर धरलेला सुटण्याचा विचार करतो. धरलेला धरलेलाच राहतो पण त्याचंच मन बाहेर उडून गेलेलं असतं आणि मग मन नाही, पण माणसाचं शरीर आहे अशी अवस्था होते.
 याला एक उपाय आहे. सोडून द्या. माणूस तुमच्याकडे राहील; कारण माणसाला मुक्ती प्रिय आहे आणि म्हणून मुक्ती देणाऱ्याला तो चिकटून राहतोच, चिकटून राहीलच.


 जेवण झाल्यावर आम्ही सारे जेव्हा पुन्हा खोलीमध्ये आलो, तेव्हा सगळं वातावरण बदललेलं होतं, सगळं. लोकांचा बोलण्यातला रस कमी झालेला होता. सारे पेंगुळलेले होते. डोळ्यावर पेंग होती. उत्साह मावळलेला होता. लोकांचा न बोलण्याकडं, जे चाललंय ते चालू द्या असा मूड होता. झालेलं भरगच्च शाही जेवण सगळ्यांच्या अंगावर आणि बुद्धीवर पसरलेलं होतं, सावट आल्यासारखं.
 वाटलं जेवणानं घोटाळा केला होता. भरपूर स्वीट, आईस्क्रीम असं जेवण एखाद्या कामाच्या मीटिंगमध्ये लोक का देतात, असा प्रश्न माझ्या मनात आला.
 आपण सर्वांनीच असा ठराव करून टाकायला पाहिजे की काम करायचं असेल तर अगदी हलकं, साधं आणि बुद्धी चालू राहील असंच जेवण ठेवावं. लोकांना पर्याय देऊच नये. खूप खर्च करून, शाही खाना ठेवून कामाची वाट लावण्यापेक्षा पोळी, एखादी भाजी, फळं, सॅलड असा योग्य आहार द्यावा. राजस जेवण्याऐवजी कामाचं, कामकल्याचं जेवणच ठेवायचं, अशी फॅशनच आपण सुरू करावी.  दोन प्रकारचं नियोजन असतं. एक म्हणजे 'नियोजनाप्रमाणे सर्व होणार नाही' असं मान्य करून घोटाळा होणारच आहे, असं गृहीत धरून केलेलं नियोजन आणि दुसरं म्हणजे संपूर्ण सखोल, परिपूर्ण तयारी करून फक्त पाच टक्के घोटाळा किंवा आकस्मिक संकटांना गृहीत धरून केलेलं नियोजन. एक प्रकार म्हणजे घोटाळ्याचं नियोजन आणि दुसरा प्रकार म्हणजे 'तयारीचं नियोजन'.
 नियोजनाचे हे दोन प्रकार आहेत आणि कुठला एक प्रकार चांगला आणि एक प्रकार वाईट असं म्हणता येणार नाही, कारण हे नियोजन कुठल्या परिस्थितीत आपण करतो आहोत,ते करायला आपल्याकडे काय साधनसामग्री आहे आणि जिथे आपण लढतो तिथलं रणांगण कसं आहे. ही गोष्ट अतीव महत्त्वाची आहे. घोटाळ्याच्या नियोजन प्रकारात लढाई लागल्यावर समोर येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता आवश्यक असते, तर तयारीच्या नियोजनात प्रत्यक्ष लढाईच्या अगोदरची कवायत, समोर असणारं नेमकं उद्दिष्ट, पुरेसा वेळ आणि हातात असणान्या साधनसामग्रीचा नेमका अंदाज असणं गरजेचं. असो, कुठलाही प्रकार असला तरी मात्र नियोजन हे आवश्यक असतं यात शंकाच नाही. पान:कार्यशैली.pdf/७९

 आदिवासी भागात काम करणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की आदिवासी भाषेमध्ये, म्हणजे त्या तिथल्या आदिवासी भाषेमध्ये भविष्यकाळच नाही. भविष्यकाळच नाही म्हणजे तिथल्या व्याकरणात किंवा भाषेच्या प्रयोगात भविष्यकाळाचा वापरच नाही.
 सगळंच जगणं वर्तमानात किंवा फार तर भूतकाळात, पण भाषेला भविष्यकाळच माहीत नाही.
 मला वाटतं, आपलं काय वेगळं आहे? मी ज्या शहरात राहतो ते घाणीनं भरलेलं आहे.मोकळा, स्वच्छ आणि शुद्ध श्वास मला घेता येत नाही. रहदारी इतकी की सहज फिरायला जावं अशी परिस्थिती नाही. गाड्या चालवायलाच काय पण पार्किंगलासुद्धा जागा मिळत नाही. मुलं शाळेत जातात पण शिकत नाहीत. नळ आहे पण पाणी नाही. ज्या वयात मुलांनी खेळायचं त्या वयात मुलं काबाडकष्ट करतात.
 माझ्या देशाचं भविष्य शिकण्याऐवजी उन्हातान्हात राबत राहतं.
 माझ्याही भाषेतला भविष्यकाळ मला आता काढून टाकायला हवा. डोळ्यावर पट्टी बांधून आजच्या युगामध्ये रमायला हवं.


 छोटी छोटी पापं आपण रोज करत असतो. ती पापं अगदी छोटी असतात पण अगदी रोज, उठता बसता ती आपल्या हातून होत असतात.
 ऑफिसमधल्या कुणाचा उत्कर्ष आपल्याला बघवत नाही म्हणून मग आपण त्याच्याविषयी उगाचच खोटंनाटं बोलत राहतो. खोटं बोलतो. चोरून सिगरेटी ओढतो. रिक्षावाल्यानं चुकून एक रुपया कमी घेतला तर बोलत नाही आणि कारण नसताना मुलांच्या पाठीत धपाटा मारतो.
 अशा छोट्या छोट्या पापांचा मग आपल्याला त्रास होऊ लागतो. ही पापं आपल्याला खायला लागतात.
 खरं म्हणजे पाप ही काही विशुद्ध नैसर्गिक गोष्ट नाही. पाप निर्माण होतं आपलं लक्ष विचलित झाल्यामुळं, आपण आपली जबाबदारी विसरल्यामुळं, आळशीपणामुळं आणि शॉर्टकटनं यश मिळण्याच्या हव्यासापोटी. पाप नैसर्गिक नाही, पुण्य, चांगुलपणा नैसर्गिक आहे, सहज आहे.
 या पापांचा उगमच होणार नाही असं जगलं पाहिजे. पापाचा उद्भव एखाद्या भळभळणाऱ्या जखमेसारखा आहे. ती जखम होणारच नाही असं राहता येईल का आपल्याला ?


 चित्रीकरण चालू असताना अमर शिवदासानी जेव्हा कोसळून पडला तेव्हा तो पुन्हा आत्मविश्वासानं, नव्या उमेदीनं उभा राहील असं वाटलं नाही. आम्हा सर्वांनाच वाटलं की तो संपला. 'बर्न आऊट' झाला. अतिकाम, त्या कामाचा ताण, यशाच्या शिखरावर असल्यानं चारी बाजूंनी होत असलेली प्रचंड मागणी यानं अमरची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती कमी कमी होत असल्याचं आम्ही सारेच पाहत होतो.
 सहा महिन्यानंतर मात्र मी पाहिलं तेव्हा मला चकित व्हायला झालं. संपूर्ण नवी उमेद आणि ताकद घेऊन अमरनं दोन नवे चित्रपट करायला घेतलेले होते. हे सारं कसं झालं असं म्हटल्यावर अमर म्हणाला की त्यानं तीन पातळ्यांवर एकूण बारा गोष्टी केल्या.
 स्टुडिओत कोसळून पडल्या पडल्या थोड्या वेळानं त्यानं दीर्घ श्वसन केलं. लगेच केलेल्या कृतीतील ही पहिली गोष्ट. मग त्यानं स्वतःची समजूत काढली आणि तीन दिवसांच्या आराम सुट्टीवर निघून गेला. त्या सुट्टीत निकटच्या मित्रांबरोबर त्यानं सुंदर गप्पा मारल्या, अगदी मनसोक्त.  मग अमर म्हणाला, लगोलग करण्याच्या गोष्टीत त्यानं कामाचा व्याप कमी केला, कामाचे प्राधान्यक्रम ठरवले. शरीराची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि मन आनंदी ठेवण्याचा कटाक्ष पाळला. तिसऱ्या आणि दूरवरच्या पल्ल्याच्या दृष्टीनं अमरनं आपली स्वत:ची मूल्यव्यवस्था तपासली, घेतलेल्या जबाबदान्यांचं पुन्हा अवलोकन केलं, जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला आणि व्यक्तिगत पातळीवर स्वत:च्या क्षमता विकसित केल्या.
 मी ऐकलं आणि थक्क झालो. वाटलं अमर शिवदासानी खरं म्हणजे मेला होता. कामानं खाक झाला होता. मात्र साध्या पण महत्त्वाच्या बारा गोष्टी करून त्यानं त्याचा पुनर्जन्म करून घेतला.


 मीटिंगमध्ये एखादा विनोद झाला नाही तरी रमण फ़िदिफिदि हसे, आणि हसताना तो वाकुल्या दाखवणान्या एखाद्या माकडासारखा दिसे. दात दाखवत, नाक फुगवून आणि वर करून हसतानाचा त्याचा एक कुत्सित, टिंगलखोर भाव त्याच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसे.
 मीटिंग सुरू झाल्यापासून त्याचं हे वागणं मी पाहत होतो आणि मला सारखी डेसमंड मॉरिसची आठवण होत होती. मॉरिस हा एक उत्तम निरीक्षण करणारा प्रभावी लेखक आहे. मॅनवॉचिंग अशा नावाची त्याची पुस्तकं तर जगप्रसिद्ध आहेतच पण त्याशिवाय बी.बी.सी. वरची त्याची एक सुंदर मालिकाही आहे.
 डेसमंड मॉरिस म्हणतो की माणूस हा एक प्राणी तर आहेच पण त्याच्या देहबोलीमध्ये, हावभावामध्ये प्राण्यांच्या छटा मिसळलेल्या असतात, आणि त्या दिसतात. तेव्हा माणसाचा भाव त्या प्राण्यासारखा असतो. आज जसा रमण माकडासारखा वाकुल्या दाखवत मीटिंगमध्ये फिदफिदी हसत होता, तसा.
 माणसाचा चेहरा त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे ते दाखवतो. जसा रमण त्याचा टिंगलखोर स्वभाव दाखवत होता तसा. पान:कार्यशैली.pdf/८५


 ली आयकोका यांनी आपल्या यशाचं सूत्र तीन शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात,"माणूस, आपण जे उत्पादन करतो त्याची गुणवत्ता आणि फायदा या तीन गोष्टींवर जो लक्ष ठेवतो, तो यशस्वी होतो." तो माणूस, माल आणि मलिदा किंवा फायदा 'मा' ते माणूस, 'मा' माल, आणि 'म' मलिदा.
 ली आयकोका आणि पुढे म्हणतात की, या तीन गोष्टी साखळी पद्धतीनं येतात. माणसं जोडली ती सांभाळली आणि जोपासली की आपण जे करतो आहोत त्याची वाढ होत राहते. तशी वाढ होत राहिली आणि त्यात गुणवत्तेचा विचार आला की फायदा किंवा मलिदा मिळायला सुरुवात होते. मात्र त्याच्यावरही लक्ष ठेवावंच लागतं. फायदा कायम काहीही न करता नुसताच होत राहत नाही.
 या सर्व प्रक्रियेची किंवा चक्राची सुरुवात मात्र माणसापासूनच होते, याचं पक्कं भान ठेवलं पाहिजे. माणूस जोडायचा तो माणूस जोडायचा म्हणून. केवळ फायदा करायचा म्हणून माणूस जोडायला गेलात तर फसाल असंच आयकोका पुढे आपल्याला सांगतात.


 मोठ्या शॉपिंग मॉल' मध्ये जायला मला आवडतं पण आणि नाही पण. ते आवडतं अशासाठी,की तिथं फिरताना मला माणसांच्या कल्पनाशक्तीचा एक उत्तुंग आविष्कार दिसतो.किती वेगवेगळ्या प्रकारे जमवलेल्या वस्तू असतात. किती धमाल असते, किती सर्जनशीलता दिसत असते.
 मात्र असं असलं तरी 'शॉपिंग मॉल' मध्ये फिरणं फार आरामाचं नसतं.थोडं त्रासाचंच असतं. तो त्रास मनाला असतो; कारण तिथली प्रत्येकच गोष्ट विलक्षण आवेगानं मला घ्या, मला घ्या म्हणत तुम्हाला आव्हान देत असते आणि ठायी ठायी तुमच्या मनाला प्रश्नांच्या भेंडोळ्यात टाकत असते. त्यामुळे मला आज काहीही म्हणजे काहीही घ्यायचं नाही किंवा 'मी आज फक्त मला हवी असलेली छोटी बॅग घ्यायलाच आलो आहे' असा ठाम निश्चय केल्याशिवाय मॉलमध्ये जाणं साफ चुकीचं आहे. जीवन हे 'शॉपिंग मॉल'सारखं आहे. अद्भुत गोष्टींचं उत्तुंग प्रदर्शन. त्यामुळं तिथं फिरताना काय घ्यायचं याचा ठाम निश्चय नसेल तर तुम्ही भंजाळणार हे निश्चित.


 बरीच कामं, गुंतागुंतीची कामं एकाच दिवशी ज्यांना करावी लागतात त्यांनी त्यांच्या दिवसाचं सूक्ष्म नियोजन करणं फार आवश्यक असतं.
 सूक्ष्म नियोजन म्हणजे दिवसाच्या वेळेचं, करायच्या कामाचं, त्यासाठी लागणाऱ्या तयारीचं आणि संपूर्ण प्रक्रियेचं अत्यंत बारकाईनं केलेलं नियोजन आणि त्यानुसार केलेलं टिपण. खूप वेळा असं होतं की असं सूक्ष्म नियोजन आपल्या डोक्यात पक्कं असतं, फक्त ते कागदावर उतरवायची सवय लावली की गोष्टीत जास्त वेळ जातो, पण असं जरी असलं तरी त्याचा दिवसअखेरच्या कामाच्या फलितावर मोठा परिणाम होतो.
 सूक्ष्म नियोजन करण्याची आणि त्यानुसार टिपणं काढण्याची सवय आपली कार्यक्षमता तर वाढवतेच पण आपला दिवस अधिक नेमका होऊ शकतो.
 अशा सूक्ष्म नियोजनाची टिपणं नंतर पाहिली की मग आपल्या कार्यपद्धतीत काय सुधारणा करायला पाहिजे याचाही नेमका अंदाज येऊ शकतो.


 प्रकाशचा फोन पुन्हा पुन्हा यावा असं वाटतं आणि फोन ठेवत असताना त्यानं तो ठेवू नये असंही वाटतं. असं होण्याची कारणं दोन. एक म्हणजे प्रकाशचा अत्यंत अगत्यपूर्ण असा आवाज आणि दुसरं महत्त्वाचं कारण तो आणि त्याच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येत असलेलं तुमचं नाव. प्रत्येकाला स्वत:चं नाव विलक्षण प्रिय असतं. त्या नावासाठी माणूस काय काय करतो? जेव्हा समोरचा, बोलणारा माणूस अत्यंत अगत्यपूर्वक तुमचं नाव सारखं सारखं घेतो तेव्हा तुम्हाला खचितच बरं वाटतं. आतासुद्धा मी फोन ठेवला तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोन मिनिटांच्या आमच्या बोलण्यात त्यानं माझं पाच वेळा नाव घेतलेलं होतं, पाच वेळा. फोनवर आल्या आल्या 'हॅलो, काय म्हणतोयस' म्हणून नाव, मग काही नवं सांगताना 'अरे' म्हणून घेतलेलं नाव आणि अगदी फोन ठेवतानासुद्धा अगदी स्निग्ध आवाजात घेतलेलं आपलं नाव. नावं घेत पुन्हा पुन्हा घेत, बोलण्याची प्रकाशची पद्धत सुरेख आहे यात वादच नाही.


 करवतीला धार असेल तर लाकूड कापणं सहज आणि सोपं होतं. कमी श्रमात, कमी त्रासात, सोपं, पण करवतीचं असं असतं की एकदा धार केली की झालं असं नसतं. धार सतत करावी लागते. रोजच्या रोज.
 कामाचं असंच आहे. काम आपण करतो. माणूस. त्यामुळं माणसाचं काम सहज, विनासायास व्हायचं तर त्याला धार असायला हवी आणि ती धार सतत टिकायला हवी.
 मग धार माणसाला हवी म्हणजे नेमकी कशाकशाला हवी? तर ती धार शरीराला हवी, बुद्धीला हवी, कौशल्यांना हवी, मनाला हवी आणि वृत्तीला हवी.
 शरीराच्या धारेसाठी उत्तम व्यायाम, आहार आणि विश्रांती हवी. बुद्धीला धार लावण्यासाठी वाचन हवं, मेहनत हवी. सराव हवा. कौशल्यांना धार लावण्यासाठी वाचन हवं. मनाला धार लावण्यासाठी विरंगुळा हवा, करमणूक हवी. वृत्तीला धार लावण्यासाठी तत्त्वचिंतन हवं, तात्त्विक बैठक हवी, तसा सतत शोध हवा.
 उत्तम काम करायचं तर हा धारेचा सर्वंकष विचार हवाच हवा. पान:कार्यशैली.pdf/९१


 सात-आठ वर्षांची ती दोघं सायकलशी झटापट करत होती. मी आमच्या गॅलरीत उभा राहून पाहत होतो. एकजण सायकल मागून धरतो आणि दुसरा जोरात पॅडल मारून तोल सावरून सायकल पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे.
 त्यांची ती झटपट विलक्षण मनोहारी होती. कितीतरी वेळा ती पडत होती. पण त्यानं त्यांचा धीर खचत नव्हता की उत्साह मावळत नव्हता. त्यांचे प्रयत्न चालूच होते.
 मला वाटलं मी देखील लहानपणी असाच असणार. धडपडलो तरी पुन्हा उठणार, पुन्हा प्रयत्न करण्यासाठी. मग सध्या काय झालं आहे. पडलो तरी पुन्हा उठून प्रयत्न करण्याची माझी वृत्ती कुठं हरवली आहे? मी चटकन काही होणार नाही, काही बदलणार नाही, अशा निष्कर्षाला का येतो आहे? माझ्यातली ऊर्मी विझली का? माझ्यातले प्रयत्न संपले कार.
 माझ्या काम करण्याच्या आणि जगण्याच्यासुद्धा, पद्धतीत मला सतत बदल करत राहण्याची आवश्यकता आहे. चुकलं, पडलो तरी, धडपडलो तरी, करत राहायची शिस्त मी बाळगायलाच हवी.

 मनात आहे एक आणि आपण करतो आहोत काही भलतंच. असं झालं की काय गंमत होते ते मी आज पाहिलं. सरिता आज ऑफिसात आली तीच तिच्या घरी चाललेली सर्व चर्चा जेवणात घेऊन, तिचा मुलगा दहावीत आहे आणि तो आज ज्या क्लासमध्ये जातो आहे तो काही बरोबर नाही, असं त्यांच्याकडे सकाळी ठरलं. सरिता एक जागरूक आई असल्यानं आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी तिला होतीच.
 तिनं मग सगळ्यांना विचारायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या टेबलापाशी जाऊन, तिचं तर लक्ष नव्हतंच पण इतरांनादेखील तिनं तिच्या मनातल्या वादळात ओढलं.
 मग जो परिणाम व्हायचा तोच झाला. त्या दिवशी आमचं अकाऊंट स्टेटमेंट बनवायचं होतं. त्यात फार मोठ्या गफलती राहिल्या. सरिताकडून त्या दिवशी काही गंभीर चुका झाल्या. सरिता एकटी नाही. आमच्यामधले बरेचसे तिच्यासारखे आहेत. आपलं मनातलं वादळ दुसऱ्यांचं लक्ष विचलित करण्यापर्यंत मोकळं सोडणारे. एका वेळी एकच गोष्ट करण्याची कार्यशैली हवी. बसलो आहे तर फक्त बसावं. विचार करतो आहे तर फक्त विचार करावा. चालतो आहे तर फक्त चालावं.

 हेन्री डेव्हिड थोरोची एक कविता मला फार आवडते. त्याचं स्वैर भाषांतर असं:
 "जर एखाद्याची पावलं त्याच्या बरोबरीच्या मित्रांसोबत पडत नसतील तर, ओळखावं की त्याला दूरवरचे ढोल ऐकू येत असावेत.
 अशा वेळी त्याला त्याच्या पद्धतीनं नाचू द्यावं,
 मग ते चुकीचं असलं आणि आपल्याला आवडणारं नसलं, तरीही."
 एखादा माणूस वेगळा असतो. वेगळ्या नजरेनं जग पाहतो. कधी तो लहान असतो तर कधी अबोल. पण असतो वेगळा.
 असा वेगळा माणूस आपल्या गटात असेल तर तो ओळखावा. त्याचं ऐकावं. त्याला त्याच्या पद्धतीनं फुलू द्यावं. त्याचं वेगळेपण कदाचित आपली शिस्त किंवा आपली पठडी बिघडवेल. त्याला व्यक्त होऊ द्यावं. त्याच्या नव्या कल्पनांचा, त्याला ऐकू येणाऱ्या दूरवरच्या नादाचं दर्शन इतरांनाही व्हावं असा प्रयत्न करावा. मोकळेपणा असावा. हवा खेळती असावी.
 कदाचित असा वेगळा माणूस मूलभूत विचार देणारा असू शकतो. कदाचित.

 सध्या हे पुस्तक मी इतका कवटाळून बसलो आहे की ते पुस्तक माझा सध्याचा धर्मग्रंथ बनला आहे. दिवसभराच्या धावपळीत आणि धांदलीत मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी ते पुस्तक वाचतो, चाळतो किंवा अगदीच वेळ नसेल तर नुसता हातात घेतो. सध्या असं झालंय की ते पुस्तक नुसतं हातात घेतलं तरी मला बरं वाटत आहे. माझा सध्याचा धर्मग्रंथ. उद्या आणखी महिन्याभरानं तो राहील की नाही ते माहीत नाही पण सध्याचा तरी तो माझा धर्मग्रंथ आहे. सध्या माझा जो धर्म आहे किंवा सध्या मी जे जगतो आहे. ज्यावर चालतो आहे त्या मार्गावर मला दिशा दाखवणारा तो धर्मग्रंथ.
 तसे माझ्या आयुष्यात बरेच धर्मग्रंथ होऊन गेले. नुकतं वाचायला लागलो तेव्हाचा एक.नंतर मग शूर लढायांची वर्णनं असणारा, त्यानंतर थोडा रोमँटिक, नंतर राजकीय तत्त्वज्ञान असणारा. माझ्या त्यावेळच्या प्रवासात माझा धर्म सांगणारा ग्रंध म्हणजे धर्मग्रंथ.
 तुम्हाला तुमचा सध्याचा धर्मग्रंथ आहे? कोणता बरं?


 मंगेशचं आणि माझं एक विशिष्ट गणित आहे. तो आणि मी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असलो तरी एका प्रोजेक्टच्या आखणीमध्ये आम्हाला वारंवार भेटावं लागतं. त्यामुळं कधी तासाच्या, तर कधी अगदी अर्ध्या तासाच्या मीटिंग्ज आम्ही करतो.आम्ही नुसते कामात सहकारी आहोत असं नाही. आमच्या आवडी, आमचे छंदही सारखे आहेत. दोघांनाही पाश्चात्य संगीत आवडतं आणि भेटलो की आमचं काहीतरी बोलणं त्यावर होतंच.
 अर्थात असं असलं तरी आमच्या मीटिंग्जमध्ये एक शिस्त असते आणि त्याचं कारण एकच.ते म्हणजे मंगेशचा नेहमीचा, एक आवडता प्रश्न. तो नेहमी विचारतो आपण कशासाठी भेटतो आहोत,ते एका कागदावर लिहून आण.
 कशासाठी? या एकाच प्रश्नानं आमच्या अंगात एक आपसूक नेमकेपणा उतरतो.चर्चेला टोक येतं.चर्चेतला पसरटपणा निघून जातो. आपल्याला काय करायचं आहे ते लिहून काढल्यानं आणि तो कागद समोरच ठेवल्यानं लक्ष्य स्पष्ट असतं. आमचा वेळ कधीच वायफळ जात नाही. BE CHART 22 py T.

 मागच्याच आठवड्यात इंग्लंडमधल्या लिस्टरशायर इथं जगातल्या आजपर्यंतच्या इतिहासातल सर्वात मोठा पक्षी -निरीक्षण महोत्सव झाला. स्टलँड नावाच्या पाण्याच्या जागेजवळ लाखो लोक जमले. त्यांनी पक्षी पाहिले. मौल्यवान दुर्बिणी विकत घेतल्या. पक्षी-निरीक्षणासाठी विशेष सहली कुठे आहेत याची माहिती मिळवली आणि असंख्य व्याख्यानं ऐकली.
 सुमारे हजार-दोन हजार वर्षांपूर्वी माणूस जे सहज करत होता त्याचा आता उद्योग झाला.आधी मर मर करून पैसे मिळवायचे आणि ते पैसे घेऊन शेकडो मैलांवर जाऊन पक्षी बघण्यासाठी ते खर्च करायचे,असा उरफाटा, विचित्र उद्योग माणूस करू लागला आहे.
 आपल्या घराच्या आसपास पानांचा कचरा फार होतो म्हणून झाडे कापून फरशी टाकायची अन् मग दुर्बिणी गळ्यात लटकावून पक्षी शोधत फिरायचं. म्हणजे आधी निसर्ग मारायचा अन् मग मेलेल्या निसर्गात धुगधुगी शोधायची.
 माणूस वेडा आहे हे नक्की.  तिथं बरेचजण जमले होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले, वेगवेगळ्या स्तरांतले लोक.अगदी छोट्या गावात राहून व्यवसाय करणारे काहीजण होते तर काहीजण व्यवसायाच्या क्षेत्रात बन्याच डिण्या घेतलेले, उच्चविद्याविभूषित.
 आम्ही तीन दिवस एकत्र होतो, पण या तीन दिवसांत वेगवेगळे लोक एकमेकांत बोलतील, मिसळतील, एकमेकांच्या ओळखी करून घेतील, अशी अपेक्षा होती.
 पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही.
 का बरं घडलं नाही? संयोजकांनी प्रयत्न करूनसुद्धा विचारांचं अभिसरण किंवा परस्परांत ओळखी-पाळखी का बरं होऊ शकल्या नाहीत?
 लोकांनी घातलेले कपडे, बोलण्याची ढब किंवा शैक्षणिक-आर्थिक पार्श्वभूमी या गोष्टी तर आमच्यात दरी निर्माण करणाऱ्या होत्याच पण त्याहीपेक्षा एकमेकांमधलं प्रत्यक्ष शारीरिक अंतर म्हणजे एकमेकांपासून कमी - जास्त अंतरावर उभं राहणं, बसणं या गोष्टींनी देखील आम्ही छोट्या छोट्या गटात विभागत गेलो. एका मोठ्या वर्तुळाची छोटी छोटी वर्तुळं होत गेली. कपड्याबरहुकूम.सोयीप्रमाणं, प्रतिष्ठेप्रमाणं.
 माणसाची मूळ प्रवृत्ती छोट्या वर्तुळात जाण्याचीच असते. प्रयत्नपूर्वक त्याला छेद द्यायला हवा हे मात्र खरं.


 एखादा दिवस असा उजाडतो,की तुम्हाला वाटतं मी आज दिवसभरात जे जे करायचं ठरवलं आहे त्याची काय गरज आहे? का मी इतकी थावाधाव करतोय? कशासाठी?
 असं वाटण्यात थोडा कंटाळा असतो, थोडा तोच तो पणा फार झाल्यानं आलेला उबगही असतो. पण असं असलं तरी खूपदा त्याचं कारण आपणच आपल्या मनाला रोखठोक प्रश्न विचारत नाही हे असतं.
 असा प्रश्न विचारत नाही आणि मग दिवसाच्या प्रवाहात रुटीनच्या धारेला लागून प्रसंगाच्या भोवऱ्यात अडकत अडकत आपण पुढे पुढे जात राहतो आणि विनाकारण लांबचा प्रवास करतो.असं एखाद्या दिवशी आपल्याला वाटतं तेव्हा ओळखावं, बरेच दिवस झाले आपण आपल्या मनाला नाही भेटलो, त्याला नाही विचारलं की त्याला काय हवं अन् काय नको. आज जे आपण ठरवलं आहे त्याची गरज आहे की नाही.
 मनाला रोज एकदा तरी भेटलं पाहिजे. शांतपणे. निवांतपणे.  काल-परवा इंग्लंडमध्ये एक मजेदार शीर्षक असलेलं पुस्तक प्रकाशित झालं आहे.नाव आहे 'द बुक ऑफ युसलेस इन्फर्मेशन' म्हणजे मराठीत असं म्हणता येईल की वायफळ माहितीचे पुस्तक'.त्या पुस्तकावर परीक्षण लिहिणाऱ्यांनी म्हटलं आहे की वायफळपणामध्येसुद्धा किती अर्थपूर्णता असते हेच त्या पुस्तकानं दाखवलं आहे.
 आपल्या रोजच्या जगण्यातदेखील हेच खरं आहे.थोडी असेल पण जगण्याच्या रोजच्या धकाधकीत वायफळपणालाही जागा आहेच. प्रत्येक क्षण अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उगाचच आततायीपणा आहे. उगाचच व्यर्थ खटाटोप आहे, यात शंका नाही.
 पार्कच्या भोवती संध्याकाळच्या फेऱ्या झाल्यानंतर टवाळ मित्रांसोबत जे बोलतो ते तसंवायफळच असतं किंवा चंदूचे वडील कुठेही आणि कधीही भेटल्यावर क्रिकेटवर जे बोलतात तेही वायफळच असतं.तसंच आमच्या सोसायटीच्या गेट टुगेदरचं वा आमचं रविवार सकाळच्या फिरण्याचं.
 या सगळ्या गोष्टीतून फार काही हाताला लागत नसलं तरी त्या वायफळ गोष्टी नसतील तर जगण्याची मजाही नाही हेही खरं आहे. त्यामुळं वायफळपणालाही जागा आहे हेच खरं.


 माणसं बोलत का नाहीत? एखाद्या मीटिंगमध्ये किंवा चर्चेमध्ये अथवा गप्पांमध्ये माणसं गप्प बसून का राहतात? एखादी गोष्ट गैर घडत असली तरी माणसं मख्ख का बसतात?
 खूपदा मला वाटतं गप्प बसणाऱ्या माणसांना समजत नसावं. पण विचारावं तर ते मूर्खासारखं दिसेल म्हणून माणसं बोलत नाहीत. माणसं दमलेली असतात, थकलेली असतात म्हणूनही बोलत नाहीत. आत्मविश्वास नसतो, मनात गोंधळ असतो म्हणूनही माणसं गप्प राहतात. उत्साह नसतो,आग नसते. त्यामुळंही काय बोलावं असा प्रश्न काहींच्या मनात असतो. बोलून असा काय फरक पडणार आहे, असा निराशावाद काहींजवळ असतो आणि म्हणून माणसं मौन धारण करतात. भाग घेत नाहीत. सहभागी प्रवाहात अडथळा म्हणून राहतात.
 वाटलं, आपण एकत्र येतो विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, पण मग येतो आणि पुरेसा सहभाग देत नाही, तेव्हा आपण स्वतःला आणि बाकीच्यांना फसवतो असंच नाही का? .


 रोज नवं, काहीतरी वेगळं, रंगतदार घडावं असं वाटतं. प्रत्येक दिवस वेगळा असावा,नवा अनुभव घेऊन यावा, त्यातनं जगणं मजेचं, औत्सुक्याचं व्हावं असंही आपल्याला वाटतं, मात्र तसं होतंच असं नाही.
 रोज तशीच सकाळ, तोच बस-स्टॉप, बहुतेक तीच बस. तेच ते. तसंच ते.तसाच डबा.तीच माणसं, तसेच त्यांचे ते विनोद, नेहमीचे. त्याच फायली. तेच टेबल. पुन्हा परतण्याचा तोच रस्ता.तीच लिफ्ट. पुन्हा तेच ते, तसेच ते. खूप वेळा वाटतं, याला छेद द्यावा, काहीतरी वेगळं घडावं.ऑफिसला जाण्याचा नेहमीचा रस्ता बदलून बघा. एखादे दिवशी संपूर्ण वेगळ्या धाटणीचा पोशाख घालून पाहा. एखादं वेगळं संगीत ऐका. समोरचा एखादा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. लिफ्टऐवजी जिन्यानं जा. कॅन्टीनमध्ये डबा खाण्याऐवजी आज बाल्कनीत बसून खा.
 तोच तो पणा आयुष्याला एक साचलेपण आणतो. नाविन्यानं आयुष्य ओघवतं बनतं,प्रवाही होतं. थोडं वेगळं जगून बघा, तर खरं.


 एक सुंदर सूफी कथा आहे.फारच सुंदर.म्हटलं आहे : एक माणूस दिवे मिळण्याचं दुकान शोधत हिंडत होता.त्याला काही दुकान सापडत नव्हतं.मग कंटाळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाला त्यानं विचारलं. दिवे कुठल्या दुकानात मिळतील हो? दिवे.
 तो माणूस सरळ नव्हता.त्यानं म्हटलं.ते मी सांगतो,पण मला सांगा,की तुम्हाला दिवे पाहिजेत तरी कशाला? यावर पहिला म्हणाला, "अहो, मला असं समजलं की रात्री अंधारातसुद्धा ज्याच्या सहाय्यानं वाचता येईल असं यंत्र म्हणजे म्हणे दिवे."
 त्यावर दुसरा म्हणतो कसा "ते खरं आहे हो, पण त्या यंत्राचा आणि दिव्याचा उपयोग होण्यासाठी,म्हणजे अंधारात वाचता येण्यासाठी एका गोष्टीची विशेष आवश्यकता आहे आणि ती म्हणजे वाचता येण्याची. त्याचं काय"
 पहिला बुचकाळ्यात पडला. वाचता येणं म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हतं. पण तरीही तो दिवे शोधायला बाहेर पडला. त्याला दिवे मिळालेही. पण त्यामुळं त्याला वाचता नाही आलं.
 सर्व गोष्टी विकत नाही मिळत. काही गोष्टी कष्टानंच, श्रम करूनच मिळतात आणि त्याच गोष्टी अमूल्य असतात.

 आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्यासोबत आपले मित्रत्वाचे संबंध असावेत.हे जरी खरं असलं तरी मित्रा-मित्रांनी सुरू केलेला व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी फार यारी-दोस्ती होऊन,फार गळ्यात गळे घातले गेले तर कामं होत नाहीत असा आपला सर्वांचाच अनुभव आहे.
 योन्सी विद्यापीठातील होंगसियॉक ओ यांनी तर एकूण ११ कंपन्यांमधल्या सुमारे ६० गटांचा अत्यंत जवळून, काळजीपूर्वक अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की एकत्र काम करणाऱ्या सहकाऱ्यांसमवेत खूपच यारी-दोस्ती असेल तर गट पुरेसे वाढत नाहीत आणि फार मोठी कर्तबगारीही दाखवू शकत नाहीत.
 असं का होतं याची मीमांसा करताना होंगसियाँक ओम्हणतात की असे गट बाहेरचं फार ऐकत नाहीत. ते त्यांच्या त्यांच्यातच मश्गूल असतात, समाधानी असतात आणि मैत्री-नात्याचे संबंध गटामधील उच्च-नीचतेच्या, ज्येष्ठ-कनिष्ठतेच्या वातावरणात फार मधे मधे येतात आणि गटाला प्रभावी बनूच देत नाहीत.
 तपासा तुम्ही हे संदर्भ. पाहा, कुठे नाती-गोती-यारी-दोस्ती कामाच्या गतीच्या आड तर येत नाही?

 वसंतकाकांचा धाकटा मुलगा येणार म्हणून मी लवकर घरी आलो.आमचे काका म्हणजे कॉलेजात अर्थशास्त्राचे प्राध्यापक. खूप हुशार पण तितकेच विक्षिप्त, आत्ममग्न आणि अत्यंत मर्यादित आकांक्षा असलेले,आत्मसंतुष्ट,अल्पसंतुष्ट.
 त्यांचा मुलगा अभिजीत कॉम्प्युटर कोर्ससाठी अॅडमिशन घ्यायला येतो आहे,याचा मला आनंद झालेला. संध्याकाळी अभिजितला पाहिलं आणि आश्चर्यानं पार उडालो. अभिजित म्हणजे काकांची कॉपी होती, कॉपी.खांदे घडलेले,चेहरा उतरलेला, सदा प्रश्नचिन्ह संपूर्ण अंगभर, पूर्ण यथेच्छ निरुत्साह. जड पावलानं खांद्यावर ओझं घेऊन चालल्यासारखं चालणं.अभिजितचं नाही पण काकांच्या गावचे बरेचजण असेच आहेत. निरुत्साही, अल्पसंतुष्ट आणि काहीही करण्याची इच्छा नसणारे खंक.
 या गावातले सगळेच असे कसे? हा प्रश्न मला कायमच सतावणारा.वाटलं, तिथल्या वातावरणातच थंड, ऊर्जा खाणारं ठिकाण असावं, हवेत निरुत्साह असावा. वाटलं,अशा वातावरणातून साखळ्या तोडून बाहेर पडणंच खरं. बाकी सारं खोटं.

 माणूस टेबलापाशी बसला असेल किंवा यंत्रापाशी उभा असेल तर तो काम करतच असतो असं नाही. कदाचित तो काम कसं करावं याचा विचार करत असेल किंवा नियोजन करत असेल.कदाचित तो घरचाही विचार करत असेल किंवा एखादी घरगुती समस्या त्याला डाचत असेल.कदाचित त्याला काहीच करायचं नसेल, विश्रांती घ्यावीशी वाटत असेल किंवा आतून काही करावं अशी ऊर्जा वाटत नसेल.
 माणूस जेव्हा कामाला लागतो त्या वेळेस त्याची शक्ती, त्याचं चित्त आणि त्याचं लक्ष हे कामाकडंच लागेल याची खात्री नसते. मनाच्या आंदोलनामुळं किंवा इतर कुठल्याही कारणांमुळं काम करणारा माणूस कामाला सर्वस्व वाहू शकत नाही आणि मग निराशा पदरी येऊ शकते,आत्मविश्वास पूर्णपणे हरवू शकतो. काय करायचं ते नक्की ठरलेलं हवं.
 स्पष्ट असं.बाहेरच्या कुठल्याही गोष्टी मनात खळबळ माजवणाऱ्या नकोत.पूर्ण विश्रांती अन् सुरेख व्यायाम होऊन शरीर स्वस्थ,अन् मन शांत हवं.घाई नको,की गडबड नको.मनाची स्थिरता, शरीराची तंदुरुस्ती, पूर्ण काम माहीत असलेलं अन् लक्ष नीट पक्कं समोर.बस्स.मग आणखी काय हवं? शांत नदीच्या प्रवाहासारखं पुढं पुढे जात राहणं. एवढंच राहतं शिल्लक.


 आजचा जमाना सादरीकरणाचा जमाना आहे.तुम्ही काय बोलता आहात,काय मांडता आहात याबरोबरच तुम्ही ते कसं मांडता आहात या गोष्टीलाही विलक्षण महत्त्व आहे.
 कधी कधी तर काय' पेक्षा'कसं जास्त महत्त्वाचं ठरतं असाही आपला अनुभव आहे.त्यामुळं चांगला विचार असणाऱ्यालाही सादरीकरणाचा विशेष विचार हा करावाच लागतो.
 सादरीकरणामध्ये चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सादरीकरणाची तयारी, प्रत्यक्ष सादरीकरण आणि श्रोतृवर्गावर नियंत्रण. सादरीकरणाच्या तयारीत खालील गोष्टी येतात.
 उद्दिष्टं ठरवणं, श्रोतृवर्ग समजावून घेणं, साधनसामग्रीची जुळवाजुळव करणं, सादरीकरणाची जागा आणि ठिकाण समजावून घेणं, योग्य संशोधन करणं, आवश्यक ते साहित्य जमा करणं,सादरीकरण प्रत्यक्ष लिहून काढणं, दृकश्राव्य माध्यमं समजून घेणं आणि सराव करणं.


 एखाद्या घरात राहणारी,एका कुटुंबात असणारी माणसं बुद्धिमान असू शकतात,पण एखादं घर किंवा इमारत आणि त्या इमारतीचा परिसरच बुद्धिमान, अशी कल्पना तुम्ही पाहिली आहे का?
 कॉम्प्युटरचं एक बटण दाबल्याबरोबर फ्रीजमध्ये कुठल्या गोष्टी आहेत अन् कुठल्या नाहीत हे पाहून परस्पर दुकानात यादी पोचवली जाणं, कॉफी यंत्राच्या जवळ पोचल्याबरोबर तुम्हाला हवी तशी कॉफी बनवून देणं आणि मोबाईल फोनवरून एक बटण दाबल्याक्षणी तुम्ही घरी पोचण्याआधी तुमची खोली गार करून ठेवलेली असणं, या गोष्टी आता अगदी एक-दोन वर्षांमध्ये शक्य होणार आहेत.
 भरधाव वेगानं प्रगती करणाऱ्या तंत्रज्ञानानं आपल्या कार्यशैलीचा आणि जीवनशैलीचा संपूर्ण कायापालट करण्याचा जणू काही विडाच उचललेला आहे. त्यानं काय होणार माहीत नाही.सर्व चांगलंच होईल किंवा वाईटच असेल असं नाही. कारण तंत्रज्ञान स्वतः ठरवत नाही काय चांगलं आणि काय वाईट ते. ठरवणारे आपण असतो. असायला हवं. बुद्धिमान घर नसतं, आपण असतो.अर्थात आपण तसं ठरवलं तरच.-


 कधी कधी वाटतं की आपण सगळेच फार ढोंगी होत चाललो आहोत काय?आपण म्हणजे तुम्ही,आम्ही, मी,सगळेच.
 असं वाटायचं कारण आपण खूप वेळा जे शब्द वापरत असतो ते आणि आपल्याला जे खरोखर म्हणायचं असतं ते यात खूपच अंतर असतं. काही वेळा दुसऱ्याचा उपमर्द होऊ नये म्हणून आपण तसं बोलत असतो किंवा दुसऱ्याला उगाचच चढवून स्वार्थ साधण्यासाठी थापा मारत असतो. कधी कधी तर असं होतं की आपण जे शब्द वापरत असतो त्याचा खरा अर्थ आपल्याला माहीत नसतो. लोक बोलतात म्हणून आपणसुद्धा बोलतो. आपणही त्यांच्यात आहोत हे दाखवावं म्हणून आपण शब्द फेकत राहतो. एक खोटा, दाखवण्यासाठी बनवलेला आविर्भाव, एक धूसर खोटं आवरण,वातावरण आपण सतत बाळगत राहतो, वाढवत ठेवतो आणि मला वाटतं त्यात आपण कधी कधी चक्क गुदमरून जातो आणि मग आपण खरे कसे आहोत अन् आपण दाखवतोय काय हे पाहणं फार आवश्यक ठरतं, फारच.


 आपल्याला ज्या गोष्टी करण्याची इच्छा आहे त्या सर्वच गोष्टी फक्त आपल्यालाच करायच्या आहेत,असं समजणं बरोबर नाही.
 जरा गुंतागुंतीचं आहे, आपण थोडं नीट समजावून घेऊ.काय आहे की एखादा प्रोजेक्ट असो किंवा एखादं अगदी छोटं काम असो, आपण त्या गोष्टी करत असतो आणि त्यावर आपलंच नियंत्रण असतं. हे संपूर्ण खरं असलं तरी काही गोष्टी आपल्याही पलीकडच्या कुणीतरी करतं किंवा वेळ असेल, घटना असतील, त्या गोष्टी त्यावर परिणाम करत राहतात.
 जसं आपण विरजण लावतो म्हणजे काय तर दुधात ताकाचा थेंब टाकतो आणि मग बाकी सोडूनच देतो ना? त्यानंतर मग आपल्याला काही करावं लागतं काय? त्यानंतर त्या विरजणाच्या भांड्याकडं पाहत राहावं लागतं काय?
 ताकाचा थेंब टाकला की केव्हा त्या भांड्यावर झाकण टाकून दुसन्या कामाला लागायचं हे माहीत हवं आणि हेही समजून घ्यायला हवं काहीही मुरायला, काहीही घडायला, काहीही व्हायला फक्त आपण कधीच जबाबदार नसतो.


 'समाजाला दिशा दाखवण्यासाठी अनेकानेक दीपस्तंभांची गरज आहे'असं वादाच्या ओघात सुनीतीने म्हटलं असलं तरी आजचे आपले प्रश्न दीपस्तंभांनी सुटणार नाहीत असं माझं मत आहे.
 सुनीती भावुक आहे, कुणीतरी येऊन आपल्याला मार्ग दाखवतील अन् त्या मार्गावर आपण चालू असं तिला वाटतं.
 दीपस्तंभ दिशा दाखवतात खरे, पण तेवढं पुरेसं नाही. त्यानं कुठं जायचं हे कळेल पण त्यासाठी बोट कशी बांधायची, सर्व नाविकांना एकत्र कसं करायचं अन् बोटीचं व्यवस्थापन कसं बसवायचं याचा विचार करणारे कारभारी असण्याची नितांत आवश्यकता आहे.
 काय आहे, आपल्याकडे दीपस्तंभ खूप आहेत. नाविकही आहेत पण त्यांना जोडणाऱ्या कारभाऱ्यांची गरज आहे. आदर्श आहेतच, त्यातून निवड करण्याची गरज आहे. संघटना बांधणारे व्यवस्थापक, कारभारी यांची गरज आहे.
 नेते, संत, बुवा, बाबा, समाजभूषण आहेतच पण कारभारी कुठं आहेत? कारभारी?


 राहुल, त्याचा मित्र पंकज आणि आणखी त्यांचे दोन-चार मित्र यांना जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा मी काहीतरी संपूर्णपणे नवीन असं ऐकतो.
 आज जरा उशिरा ऑफिसवरून घरी आलो तेव्हा हे सारे मला रस्त्यातच भेटले. कुठल्याशा ब्राझिलीयन कवीचं नाव मला माहीत आहे का असं विचारत होते. मला माहीत नव्हतं पण काय रे कशासाठी असं विचारलं तेव्हा पंकज म्हणाला, “एक म्युझिकल करायचंय त्यासाठी. सध्यातरी सारी मंडळी एखादा बॅण्ड बसवण्याच्या मागे आहेत. मला आठवतं, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपले गड-किल्ले साफ करायचं त्या सर्वांनी मनावर घेतलं होतं. त्याच्याही आधी मराठी कविता एकत्र बसून वाचण्याचं त्यांचं चालू होतं. ती सगळी मुलं अतिशय चांगली आहेत. काहीतरी करावं, म्हणून त्यांची सतत धडपड चालू असते. मी त्यांचा दोस्त आहे आणि म्हणून मला त्यांच्या ऊर्मी, आकांक्षा अगदी जवळून माहीत आहेत.  तुम्ही मला विचाराल तर मला वाटतं त्यांची सारी धडपड आनंद मिळविण्यासाठी चालू आहे पण त्यांच्या पुढला तिढा असा आहे की आपण आपला आनंद कशात शोधायचा हेच त्यांना माहीत नाही.इतकंच काय, मला तर कधी कधी वाटतं आनंद म्हणजे काय याचीच त्यांना स्पष्टता नाही.
 आजदेखील असंच झालं. त्याचं हे नवीनच ऐकून मला त्यांची थोडी काळजीच वाटायला लागली.आज त्यांना बऱ्याच गोष्टी समोर दिसताहेत, वेगवेगळी आकर्षणं आहेत.
 त्यातली स्पर्धा आहे. नव्या नव्याचा हव्यास आहे पण आनंद नाही. आनंद म्हणजे काय एवढंच समजावं, हीच माझी एक तीव्र इच्छा आहे.  आज सकाळी सकाळीच रॉबर्ट फ्रॉस्टची फार वर्षांपूर्वी वाचलेली एक कविता आठवली.कविता अशी - 'मी एक गोष्ट मन अगदी घट्ट करून तुम्हाला सांगणार आहे'.
 फार फार वर्षांपूर्वीची. जंगलातून चाललो असताना एका निर्जन ठिकाणी दोन वाटा फुटल्या, आणि मी...
 त्यातली कमी मळलेली वाट घेतली आणि सांगू- त्यानंच सगळं बदलत गेलं. अगदी आतून अन् बाहेरून, सारं सारं.
 आयुष्यात चालता चालता कुठे दोन वाटा फुटतील सांगता येत नाही. जास्त मळलेली वाट काही देते आणि काही अव्हेरते. कमी मळलेली वाट अनपेक्षित धक्के देते, थरार देते आणि कमालीचा वेगळा अनुभवही पदरात घालते. एका वळणावर, एखाद्या थांब्यावर सारंच बदलतं. रॉबर्ट फ्रॉस्टनं वेगळी वाट चोखळण्यातली गंमत मांडली आहे.
 एक मात्र खरं की अशी वाट मिळविण्यासाठी जंगल मात्र तुडवायला लागतं आणि तुडवण्याआधी ते शोधावंही लागतं.


 एखादे दिवशी असं होतं की,कुठल्यातरी कारणानं आपला तोल जातो,आणि तो इतका जातो की पुढे बराच वेळ त्याचे परिणाम आपण भोगत राहतो.एखाद्या परममित्राला आपण ज्याला मित्र मानलं तो आपल्याला संपूर्ण दुरावतो.एखादे वेळी जमत आलेली बोलणी फिसकटतात.आपल्या हातून एखादा अपघात घडतो आणि अपरंपार नुकसान होतं.असा तोल जाणं ही गोष्ट फारच वाईट.या तोल जाण्याविषयी एक फार मजेशीर झेन कथा आहे.
 काय झालं, एकदा एक माणूस एका झेन गुरूकडे मार्गदर्शनासाठी गेला आणि म्हणाला,"केव्हाही तोल जाण्याची मला सवय आहे."त्यावर त्याला गुरू म्हणाला,"दाखव मग."त्यावर तो माणूस म्हणाला,"नाही,असं नाही दाखवता येणार.माझ्या नकळत अचानक माझा तोल जातो."बस्स. त्यावर गुरू म्हणाला,"मग तुझी ती सवय नाही.बाहेर काही तरी विपरीत घडतं."
 तोल जाणं ही काही अंगभूत गोष्ट नव्हे, त्यावर नियंत्रण मिळवणं व्यवस्थित अभ्यासानं शक्य आहे!  पाण्याची गंमत बघा कशी आहे ? पाणी आपण वळवू तसं वळतं. सहज बाजूला करायचं म्हटलं तरी करता येतं. पाणी कोमल आहे. त्याला रंग नाही की वास नाही. वाटतं पाण्याची अशी खास ताकद नाहीच मात्र तेच पाणी जेव्हा एकवटून येतं, एकाग्र होतं तेव्हा अभेद्य अशा महाशक्तिमान पर्वताच्या पण ठिकऱ्या उडवू शकतं, स्वत:ची अशी एक विलक्षण शक्ती पाणी उभी करू शकतं.
 कोमल पाण्याचं जर असं होत असेल तर आपण का नाही आपली स्वतःची अशी शक्ती,कामं संपन्न करण्याची ताकद उभी करू शकतं?
 जरूर उभी करू शकू,अजोड अशी काम करण्याची ताकद आपण अगदी जरूर उभी करू शकू.फक्त त्याला हवा अभ्यास,हवी मेहनत,हवं सर्व शक्ती एकवटण्याचं विशेष तंत्र,स्वत:च्या गुणांचा अचूक अंदाज आणि हवं अभेद्य खडक फोडण्याचं विलक्षण उद्दिष्ट.हवी शिस्तबद्ध कार्य- पद्धती,कार्य-शैली,हवीं नवनवी आव्हानं अंगावर घेऊन ती पूर्ण करण्याची कौशल्यं-तंत्र,पद्धती आणि शैली.


 छोट्या, बारीकसारीक गोष्टी किती गांभीर्यानं घ्यायच्या हा खरंच प्रश्न आहे. उदाहरणार्थ गाडीच्या इंजिनमधून विचित्र आवाज येतो आहे. हल्ली दर थोड्या दिवसांनी मान धरते आहे. थोडं वाचल्यानंतर कपाळाच्या मधोमध दुखतं आहे. बऱ्याच दिवसांपासून हिशेब पूर्ण करायचे राहिले आहेत.
 छोट्या गोष्टी आहेत पण गांभीर्यानं घेतल्या नाही तर मोठं संकट उभं करू शकते. गाडीच्या इंजिनमधला आवाज अपघातही घडवू शकतो. दर चार दिवसांनी निर्माण होणारा मानेचा प्रॉब्लेम मणक्याकडे लक्ष वेधणारा असू शकतो.
 गोष्टी छोट्याच असतात पण त्यांच्यामध्ये थोडं, भयानक आणि रौद्र स्वरूप करण्याचं सामर्थ्य असतं. जीवनाच्या गतीला ब्रेक लावण्याचं, अडथळे निर्माण करण्याचं काम या छोट्या गोष्टी नक्की करू शकतात. अशा छोट्या गोष्टींना नजरेआड करू नये अर्थात त्यांना फार कवटाळूही नये पण दुर्लक्ष करणं महाघातक ठरू शकतं. एवढं ध्यानात राहू दे.

 कुठल्याही सामूहिक कामाला नेता लागतोच.एखाद्या फुटबॉल संघाला लागतो,देशाला लागतो, एखाद्या छोट्या ऑफिसला लागतो किंवा मार्केटिंग सर्वे करणाऱ्या एखाद्या टीमलाही नेता लागतो.नेता बरं का.नुसता व्यवस्थापक नव्हे.नेता म्हणजे नेणारा,टीमला त्यांच्या ईप्सित ठिकाणी नेणारा नेता.
 अशा नेत्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत.एक आहे कार्यलक्ष्मी तर दुसरा आहे कार्यकर्तालक्ष्मी. पहिल्याचं सारं लक्ष कार्यावर, तर दुसऱ्या प्रकारच्या नेत्याचं सारं लक्ष कार्यकर्त्यांवर.दोन्ही प्रकारचे नेते थोर.फार मोठी कर्तबगारी गाजवणारे, पण एकमेकांत फरक असणारे.दोघांचीही शैली वेगळी,पद्धत वेगळी, परिणामही सर्वस्वी वेगळा.
 कार्यलक्ष्मी नेत्याची काही लक्षणं आहेत.जो किंवा जी वेगवेगळ्या कल्पना पेरून कामार गन आणण्याचा प्रयत्न करते,हळू आणि रडतखडत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना उत्तेजन देऊन कार्यप्रण करते,ठरलेल्या वेळेसच काम पूर्ण करण्याचा जोरदार आग्रह करते आणि सर्व सहकान्यांना ठराविक मुदतीनं भेटतेच भेटते, बोलत राहात.अशा प्रकारच्या नेत्याचा एक मोठा प्रयत्न असतो की गटामधले सारे जण त्यांच्या त्यांच्या परिसीमा गाठत राहतील.  कार्यकर्तालक्ष्मी नेता वेगळा असतो.त्यांचा सगळा भर सहकाऱ्यांना मदत करण्यावर,गटातल्या सान्यांना समान वागणून देण्यावर, सर्वांना समान संधी देण्यावर आणि अत्यंत लवचिक राहण्यावर असतो. आपल्या सहकाऱ्यांवर संपूर्ण म्हणजे संपूर्ण विश्वास टाकून त्यांना भरघोस पाठिंबा देणं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सहकान्यांना बरं वाटेल आणि त्यांना त्यांच्या कामात मजा येईल अशा गोष्टी करण्यावर या कार्यकर्तालक्ष्मी नेत्याचा भर असतो.
 कार्यलक्ष्मी आणि कार्यकर्तालक्ष्मी नेता.काही नेत्यांमध्ये दोन्हीचं मिश्रण असतं तर काही 'चिंटू' नेते ह्यातले कुठलेच गुण नसलेले अल्पायुषी नेते असतात.
 तुम्ही पाहा आसपास.तुमचा नेता कसा आहे ते आणि तुम्हीच असाल एक नेता तर तपासा मग स्वत:लाच.

 त्या ऑफिसच्या सान्या वातावरणात एक कुंद निराशा भरून राहिली आहे.तिथले लोक नुसते वेळ काढायला तिथे आले आहेत असंच त्यांच्याकडे पाहून वाटतं. कुणीतरी अंगावर कुठलं तरी ओझं दिलेलं आहे आणि काहीतरी करून कसंतरी आपलं काम आपल्याला ढकलायचं आहे असाच सर्वांचा समज आहे. हे सुद्धा तिथल्या ऑफिसमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याला समजतं.
 एका मोठ्या, देशाच्या पातळीवर काम करणाऱ्या वित्तीय संस्थेचं ते विभागीय कार्यालय आहे खरं पण त्या साऱ्यांनाच ना कुठलं उद्दिष्ट आहे, ना काम करायची आंतरिक इच्छा. असं असल्यानेच तिथलं वातावरण असं निराशेचं अन् काम टोलवाटोलवीचं आहे. कारण कितीही काम केलं तरी त्यांच्या पगारात तर काही फरक पडणार नाहीच पण समजा काम केलंच नाही तरी काही होणार नाही.
 शिक्षा नाही अन् बक्षीसही नाही, पाठीवर थाप नाही अन् रागे भरणंही नाही. तिथं साऱ्या ऑफिसला निश्चित उद्दिष्ट असायला हवं. आणि त्याचप्रमाणे हवी छोटी पण कामाच्या नेमकेपणाची प्रत्येक टेबलासाठी उद्दिष्टे, जी मोजली जाऊ शकतील, तपासता येऊ शकतील.

 एक इंच वेळ एक इंच सोन्यासारखा मौल्यवान असतो.फक्त फरक इतकाच की तो एक इंच वेळ एकदा गेला की मग मात्र तो अगदी एक इंच सोन्याचा तुकडा देऊनही पुन्हा मिळवता येत नाही. एकदा गेला की गेलाच.
 ज्याची आठवण मला दोन दिवसांपूर्वी बडोदा स्टेशनवर आली.मीटिंग संपली की बॅनर्जीबरोबर आम्ही तिघांनी जायचं आणि अहमदाबादला पोचायचं असं ठरलं होतं.भराभरा आवरून बडोदा स्टेशनवर पोचलो तेव्हा बॅनर्जी आणि बाकीची मंडळी माझी वाटच पाहत होती.मी पोचलो आणि माझ्या हातात माझं तिकीट तर ठेवण्यात आलंच पण त्याखेरीज एक कागददेखील होता आणि त्यावर लिहिलं होतं,"मीटिंगचे विषय - बडोदा आणि अहमदाबाद प्रवासात बोलण्याचे."
 माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. बॅनर्जीनी प्रवासातला इंच न इंच वाचवायचा ठरवलं होतं.विषय कुठले बोलायचे हे तर लिहिलं होतंच पण त्या प्रत्येकाला साधारण किती वेळ द्यावा हे सुद्धा लिहिलेलं होतं. वेळेचा सुरेख उपयोग ही गोष्ट तर आहेच पण त्याखेरीज चौघं एकत्र असण्याचा फायदा घेणं बॅनर्जीच्या मनात होतं.

 एकदम अचूक वेळेला अचूक भाषेत फोन करून तुम्हांला गारद करण्यात दिलराज बक्षीचा हात कुणीही धरू शकणार नाही.त्यात त्याचं नावही दिलराज,त्यामुळं अचूक टायमिंगनं तो तुमच्या 'दिल' वर राज्य करणार हे नक्कीच.
 काल सकाळी साडेनऊ वाजता माझं एक महत्त्वाचं प्रेझेन्टेशन एका मोठ्या मीटिंगमध्ये होतं. सकाळी नऊच्या सुमारास कॉन्फरन्स रूमच्या पाय-या चढताना नेमका त्याचा एस.एम.एस आला.त्यात तो म्हणतो कसा: ऐटीत सैर कर मित्रा. विजय तुझाच आहे. मी खूपच सुखावलो. दिलराजचा हात पाठीवर पडला असं वाटलं.
 वाढदिवस तो कधी म्हणजे कधी चुकत नाही.त्याला हेही माहीत आहे की पहाटे सहा वाजता मी फिरायला समुद्रावरच असणार.मला बरोबर तिथं फोन येणार. अचूक.
 दिलराजचं हे फक्त माझ्याबाबतीतच आहे, असं नाही. त्याला जगाचं भान असतं. कोण, कुठे. कुठल्या मानसिक अवस्थेत असणार याचा अचूक अभ्यास त्याचा सतत चालू असतो, आणि त्याचं हे तुमच्या मनाला साद घालण्याचं काम अखंड, अविरत चालूच असतं.


 एकांत ही महान गोष्ट आहे. एकांत बरं का. एकटेपणा नव्हे.
 एकटेपणा माणसाला विलक्षण त्रास देतो, छळतो, माणसाला खंगवतो अन् हळूहळू नष्ट करू लागतो.मात्र एकांताचं तसं नाही.एकांत माणसाला श्रीमंत करतो,समृद्ध करतो.माणसांच्या प्रचंड गर्दीतही एखादी व्यक्ती एकटी राहू शकते,पण एकांतात माणसाला जगापासून तुटल्यासारखं वाटत नाही.उलट सर्व जगाशी एक प्रकारचं अद्भुत असं नातं माणूस एकांतात निर्माण करू शकतो.
 माणसानं एकांत साजरा करायला हवा.एकांत मिळवण्यासाठी खास आणि विशेष असे प्रयत्न करायला हवेत.तसे प्रयत्न करून एकांत जोपासायला हवा.आपल्याला कुठल्या प्रकारचा एकांत आवडतो ते ओळखायला हवं.माझा मुंबईचा एक मित्र आहे.तो एखाद्या दिवशी एखादं पुस्तक घेतो आणि मुंबईहून निघणाऱ्या पहाटेच्या ट्रेनमध्ये चढतो आणि ए.सी.चेअर कारनं पुण्याला येतो.पुण्याला त्याच्या आवडीचं एक पुस्तकाचं दुकान आहे.तिथे तो एकटाच हिंडतो मग त्याच्या आवडीच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन शांतपणे जेवतो.बरोबर पुस्तक असतंच.संध्याकाळी मग ट्रेननं ए.सी.चेअर कारमध्ये बसून पुन्हा रात्री दादरला.  पुण्याचे एक उद्योजक दर रविवारी गाडी काढून आणि बरोबर ढीगभर वर्तमानपत्रं घेऊन सिंहगडावर जाऊन बसतात.चांगले तीन-चार तास वाचतात.स्वतःला भेटतात आणि आपली बॅटरी चार्ज करून घेऊन पुन्हा पुढच्या आठवड्याच्या कामांना भिडायला सज्ज होतात.एकांताचे वेगवेगळे प्रकार.
 काही जण उत्तम संगीताच्या सान्निध्यात एकांत काढतील तर काहींना निसर्गाच्या सान्निध्यात झाडांच्या सावलीत आणि झुळझुळ वाहणान्या झन्याच्या संगतीत एकांत मिळवावा असं वाटेल.प्रत्येकाच्या एकांताची तन्हा ही वेगळी असू शकेल परंतु प्रत्येकाला एकांताची गरज आहे हे मात्र अगदी नक्की. आपण आपली पद्धत ठरवावी अन् त्या पद्धतीनं एकांत साजरा करावा, एकांत उपभोगावा.सततच्या कृतीच्या गर्दीत, धावपळीत अन् ताणतणावामध्ये अशा एकांतानं विलक्षण हुशारी येते अन् उभारी येते. चित्रं काढावीत, डोंगरदन्यात फिरावं, बागकाम करावं, संगीत ऐकावं, चालावं किंवा सुतारकाम करावं. काहीही करावं पण स्वत:ची अशी एकांताची पद्धत बसवावी.एकांत साजरा करावा अन् मग भेटावं स्वत:ची ओळख करून घ्यावी स्वत:शीच.  शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीयुत मिहाली सिकनटिहाली यांनी एक महत्त्वाचा अभ्यास नुकताच पूर्ण केला.त्यांनी तासन्तास अफाट एकाग्रचित्तानं चित्र रंगवत बसणान्या आणि शिल्प बनवत राहणाऱ्या कलाकारांच्या कार्यपद्धतीचा अत्यंत सखोल असा अभ्यास केला.या मिहालीबाबूंचा एकच प्रश्न होता, की अशी काय गोष्ट असते की ज्यामुळे हे कलाकार तहान-भूक आणि आसपासचं सारं जग विसरून काम करत राहतात, तासन्तास अन दिवसेंदिवस.
 सुमारे तीन वर्ष सतत अभ्यास करून शिकागो विद्यापीठाच्या या मिहालीबाबूंनी 'प्रवाह (फ्लो)' या नावाची एक संकल्पना शोधून काढली. प्रवाह म्हणजे तुमच्या समोर असलेल्या आव्हानाचा आणि तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा सुंदर मिलाफ.असं आहे, की आपल्यालाच ज्या क्षेत्रात गती आहे, ज्या क्षेत्रात आपल्याकडे विशेष कौशल्यं आहेत, त्याच क्षेत्रात आपल्याला काही अतिउत्तुंग आव्हानं उभी राहिली तर आपण अक्षरशः सारं सारं विसरून कामाच्या प्रवाहात सर्वस्व झोकून देतो.जसं एखाद्या चित्रकाराला एखादा विषय भिडतो आणि तो विषय त्याच्या प्रतिभेला आव्हान देतो तसं.  जसं जोसेफ कॅम्पबेलनं एका ठिकाणी म्हटलं आहे की,"तुमच्या परम आनंदाचा शोध घ्या." जिथं तुमचं मन रमतं, जिथं तुम्हाला गती आहे आणि जिथं तुमच्यासमोर अतिउत्तुंग आणि अशक्य आव्हानं उभी आहेत तिथं मग पाहा तुम्ही कसे प्रवाहात सर्वस्व विसरून काम कराल ते.
 मात्र एक आहे, तुमच्यासमोर असलेलं आव्हान आणि तुमच्याकडे असलेली कौशल्यं यांचा योग्य मेळ हा हवाच.आव्हान आणि तुमच्याकडे असलेली कौशल्यं यांचा योग्य मेळ हा हवाच.आव्हानही मोठं आणि कौशल्यही भरपूर असं असेल तर प्रवाह' सापडेल.क्षुल्लक आव्हान असेल आणि सामान्य कौशल्य असेल तर उगाचच एक व्यर्थ अधीरता दिसेल.प्रचंड कौशल्य पण अगदी क्षुल्लक आव्हान असेल तर एक खोल कंटाळवाणेपण येईल.तेव्हा आव्हान आणि कौशल्य, यांचा एक अभूतपूर्व मिलाफ आपण सध्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 कामाचा एक सुंदर प्रवाह माणसाला सारं सारं विसरायला लावतो.उत्तुंग आव्हानं आणि अफाट कौशल्यांचा खजिना असा प्रवाह तुमच्यासाठी निर्माण करू शकेल,ज्यांनी तुम्ही विनासायास काम करत राहाल,उत्तुंग शिखरं काबीज करत.


 एक अप्रतिम झेन कथा आहे.
 रोकान नावाचा एक झेन साधू एका साध्याशा घरात राहून साधेपणानं जगत होता.एक दिवस रोकानच्या घरी एक चोर शिरला आणि त्यानं पाहिलं की आत चोरण्यासारखं काहीच नाही.
 रोकाननं त्याला पाहिलं आणि रोखलं.मग म्हणाला,खूप लांबून खूप आशा धरून काहीतरी मिळेल म्हणून तू आला असशील तेव्हा निराश होऊ नकोस माझे कपडे तू घेऊन जा.
 रोकाननं असं म्हटलं अन् कपडे उतरवले. चोर खूश झाला आणि तिथून हळूच सटकला.
 रोकान तसाच विवस्त्र बसलेला होता.घरात आसपास काहीही नव्हतं.त्याच्या बाहेर फक्त चांदणं पडलं होतं.चंद्र लखलखत होता,रोकान थांबला.स्वतःशीच पुटपुटला,गरीब बिचारा चोर,त्याला मला हा चंद्र देता आला असता तर?
 जीवन असंच आहे, कामाची मजाही तशीच आहे.चंद्रप्रकाशात,ज्ञानप्रकाशात,ज्ञानात,चांदण्यात.

 तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथल्या लोकांची क्षमता वाढविण्याची गरज आहे,की नाही किंवा त्यांचं मनोधैर्य उंचावण्याची गरज आहे की नाही कसं तपासणार?ते तपासण्यासाठी सात प्रश्न विचारा-
 १. लोकांना, तुमच्या सहकाऱ्यांना त्यांच्या कामात रस वाटतो आहे की नाही?
 २. गैरहजेरीचं किंवा काम सोडून जाण्याचं प्रमाण खूप आहे की नाही ?
 ३. लोकांची संस्थेविषयीची बांधीलकी कशी आहे ? टीम स्पिरीट ?
 ४. एकमेकांमधला संपर्क तगडा आहे की क्षीण ?
 ५. काम करण्याबाबत लोकांना ते करताना अभिमान वाटतो की नाही ?
 ६. अकार्यक्षमता आणि ढिसाळपणामुळे खर्च अवास्तव होतो आहे की काय ?
 ७. तुम्ही जो माल बनवता आहात किंवा तुम्ही जी सर्व्हिस देता आहात त्याची गुणवत्ता कशी आहे?
 वर लिहिलेल्या सात प्रश्नांचं विश्लेषण केलं की उत्तरं मिळतील.लोकांची क्षमता कुठे वाढवायची गरज आहे, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण आयोजित करायला पाहिजे ते देखील समजेल.


 एखाद्या सर्वांगसुंदर गाडीचं एक चाक समजा थोडंसं तिरकं लागलं असेल तर काय होईल? किंवा असं बघा की एखाद्या सुंदर लेखात एकच वाक्य खूप लांबलचक असेल तर काय होईल?तर सगळ्या रंगाचा बेरंग होऊन जाईल.
 कामाच्या व्यवस्थेचंही असंच आहे.सुंदर आणि संथ प्रवाहातला एखादा धोंडा आपण अलगद बाजूला करायला हवा किंवा त्याला व्यवस्थेला अनुरूप असं बनवायला हवं, सर्व व्यवस्थेच्या संगं न्यायला हवं.
 सर्व उत्तम असतं.काम अत्यंत सफाईदारपणे आणि चपळपणे होण्यासाठी सर्व व्यवस्था सज्ज असते.सर्व गोष्टी व्यवस्थित लागलेल्या असतात,फक्त शेजारच्या खोलीतून भांडी घासण्याचा आणि मोठ्यानं बोलण्याचा आवाज येत राहतो किंवा टीममधला एखादा माणूस हा सर्व परिस्थितीच्या अगदी उलट स्वभावाचा आणि प्रवृत्तीचा असतो आणि मग तो भाग बदलल्याशिवाय किंवा त्यात आमूलाग्र बदल केल्याशिवाय सर्वांगसुंदर व्यवस्था सर्वांगसुंदर राहत नाही.व्यवस्थेतील सर्वांना बरोबर घेऊन चालत राहायला हवं.त्यातला एखादा मिठाचा खडा सर्व पक्वान्नाची नासाडी करणार नाही,याची काळजी घ्यायला हवी.  एक फार सुंदर झेन कथा आहे.नान-इन ह्या नावाचा एक झेन गुरू जपानमध्ये राहत होता.त्याची गाठ घेण्यासाठी आणि झेन शिकण्यासाठी त्याच्याकडे एक प्राध्यापक आला.
 नाना-इननं चहा केला.एक कप ओढला आणि त्या कपात तो चहा ओतू लागला.कप भरला तरी नान-इन थांबेचना.कप भरला,बशी भरली आणि चहा टेबलावर सांडू लागला तरी नान-इनचं चहा ओतणं सुरूच राहिलं.
 त्या प्राध्यापकाला राहावेना. तो म्हणाला, "एक कप पूर्ण भरला. आणखी कितीही भरलात तरी काहीच शिरणार नाही आत."
 "या कपासारखंच तुझं आहे."नान-इन ताडकन उद्गारला."तुझ्या डोक्यात कितीही तुझ्याच बन्याच कल्पना आहेत, मतं आहेत.तो कप तू रिकामा केलाच नाहीस तर मी तुला नवीन काय शिकवू."
 आपलं सर्वांचं त्या प्राध्यापकासारखं आहे.आपल्याला ठाम कल्पना आहेत.श्रद्धा आहेत.मत-मतांतरं आहेत आणि असं असलं तरीदेखील आपण आपल्या कपात आणखी चहा ओतत राहतो.नवं नवं वाचत,शिकत राहतो.
 तो कप आधी रिकामा करण्याचं पाहायला हवं.


 लाओ त्सूच्या चार अप्रतिम ओळी आज वाचल्या.त्याच्या वचनांचा एक संग्रह म्हणजे दाओ-द-चिंग या नावाचं पुस्तक.त्या पुस्तकात लाओत्सूनं म्हटलं आहे.आता पुरे असं तुम्हाला जेव्हा समजू लागतं तेव्हा तुमच्यावर खजील होण्याची किंवा अपमानित होण्याची वेळ येत नाही.जेव्हा कुठं आणि केव्हा थांबायचं हे तुम्हाला अचूक समजतं तेव्हा तुम्ही हरणार नाही हे नक्की असतं.
 अधिक हवं, अधिक हवंच्या हावरट धडपडीत आपण आपल्याकडे जे आहे नाही ते पणाला लावतो.आपली तब्येत,आपलं स्वास्थ्य,आपलं कुटुंब जीवन,आपली मैत्री आणि सर्व काही.शहराच्या मध्य वस्तीत दोन बेडरूम्सचा आपल्याकडे फ्लॅट असतो.त्यात आपण समाधानी मात्र नसतो.आपल्याला थोडा मोठा फ्लॅट हवा असतो आणि म्हणून मग आपण धावत असतो.
 कामाचं असंच आहे.किती काम म्हणजे पुरे हे समजायला हवं आणि तसं समजलं तर तशी कृतीही व्हायला हवी.थोडं पण अधिक आनंद देणारं काम अधिक महत्त्वाचं,नाही का?


 'सकाळी सातला ये ना ऑफिसला,तिथं भेटू आणि मग प्रोजेक्ट रिपोर्टविषयी बोलू'असं प्राध्यापक नित्सुरे मला म्हणाले तेव्हा मी अवाक् झालो आणि नित्सुन्यांना मी अवाक् झाल्याचंही लगेचच समजलं.
 "आमच्या इन्स्टिट्यूटला काम करण्याची उन्हाळ्याची वेळ वेगळी असते.सकाळी सात ते दुपारी एक.अरे,उन्हाळा इतका भीषण असतो की सकाळी साडेनऊला ऑफिसमध्ये येऊन एक-दोन वाजेपर्यंत उन्हामुळं आम्ही इतके थकलेलो असतो की नंतर खरं पाहता आमचं कामच होत नाही.म्हणून दोन महिने आमची वेळ वेगळी असते."
 मला हे आवडलं.अगदी सेन्सिबल वाटलं.जिथं अगदी टोकाचं हवामान आहे अशा ठिकाणी हवामानाप्रमाणंच कामाच्या वेळा बदलायला हव्यात.अगदी घट्ट शिस्त पाळण्याऐवजी निसर्ग बदलतो त्याप्रमाणे आपणही बदलायला हवं.
 लवचिकता ही एक असाधारण गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं.
 पण निसर्ग पाहा.तिथली झाडं-झुडपं पाहा त्यांच्या लवचिकतेतच त्यांचं टिकाऊपण आहे,त्यांचं निसर्गाचं शहाणपण आहे.


 माणूस जसा त्याच्या कामात किंवा ऑफिसमध्ये वरवरच्या पदावर चढत जातो,तसा तसा तो तो लोकांचं कमी कमी ऐकू लागतो आणि जेव्हा असं होऊ लागतं तेव्हा त्या माणसाची आणि त्या कार्यालयाची अधोगती सुरू होते.
 माणसाचं असं का होत असावं? कमी ऐकण्याची प्रवृत्ती कुठनं निर्माण होत असावी? दोन कारणं असावीत. एक म्हणजे आपल्याला सारं कळतं आणि आपल्याला कुणाची जरूर नाही, असं वाटणं आणि दुसरं म्हणजे कामाची जी जबाबदारी आहे तीच पेलता न येणं, म्हणून दुस- कुणाचं ऐकणं म्हणजे वेळेचा अपव्यय असं वाटणं. सततचा ताण आणि विलक्षण अशी अधीरता मा साला कुणाचं काहीही ऐकू देत नाही आणि त्यानं स्वत:चं आणि इतरांचंही प्रचंड नुकसान होतं.
 दुसन्याचं ऐकण्याचा आपला इंडेक्स कितपत आहे हे तपासायला पाहिजे.त्यातून आपण इतरांबरोबर कसं काम करतो, इतरांना किती बरोबर घेऊन काम करतो याचा अंदाज येतो.


 अमेरिकेतल्या सिनेट बँकिंग कमिटीसमोर इसवी सन २००२ चं भाषण देताना अॅलन ग्रीनस्पॅन म्हणाले,की माणूस सध्याच फक्त हावरटासारखा सुख उपभोगतो आहे असं नाही.पूर्वी पण तो तसाच होता, आता फक्त त्याच्या हावरटपणाला जास्त संधी मिळते आहे, असं दिसतं.
 तो अमुक कपडे घालतो म्हणून मी, तिचे कपडे विशिष्ट प्रकारचे असतात म्हणून मला तसे हवेत,प्रत्येकाला गाडी हवीच,आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकानं बाहेर खायचंच,प्रत्येकाचं घर म्हणजे त्यात काही विशिष्ट गोष्टी हव्यातच.
 त्याचं बघून मी, माझं बघून ती.दिसतं असं की आपण सारेच मुळात अनुकरणवादी आहोत आणि त्याचा इतका अतिरेक झाला आहे की कुणीही मला स्वत:ला काय आवडतं आणि मी स्वतः काय केलं पाहिजे याचा विचारच करत नाही.
 वाटतं असं,की आपण समाजातल्या स्वतंत्र विचार करण्याच्या प्रवृत्तीला अत्यंत जाणीवपूर्वक खतपाणी घालायला हवं.नाहीतर मग या अनुकरणयुगात आपण आपलं स्वातंत्र्य संपूर्णपणे गमावून बसू.

 कुठल्याही कामाला नाही न म्हणणारे, कुणालाही न दुखवणारे आणि ऑफिसमध्ये कायम आनंदाचं वातावरण राहावं म्हणून काहीही करणारे म्हणजे 'खुशकरे'.
 एखादा छोटासा प्रसंग आनंदाचा आणि हलकाफुलका करण्याचं सामर्थ्य जरी या खुशकांमध्ये असलं तरी वेळेचा अपव्यय करीत, कामं पुढे पुढे ढकलत नंतर ते कोणीच करू शकणार नाही या पातळीपर्यंत आणण्याचं कसब या माणसांमध्ये असतं. या प्रकारच्या माणसांपासून अगदी सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण ही माणसं अल्पकाळापुरतं वातावरण शांत करीत असली, तरी अत्यंत महत्त्वाच्या आणि गतिशील मार्गक्रमणा करण्यात ही माणसं बाधाही आणू शकतात.
 ही माणसं भावनात्मक पातळीवर थोडी कमकुवत असतात; टीका किंवा कुणाचा रोष सहन करण्याची क्षमता यांच्याकडे बिलकूल नसते. म्हणून हो' म्हणून, 'करतो' असं सांगून वेळ मारून नेण्याचं काम ही खुशकरी माणसं करीत असतात.
 तुमच्या आसपासच्या मंडळींमध्ये अशी खुशकरी माणसं शोधा. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यांना फार इकडचं, तिकडचं काम करू देऊ नका आणि ते जे काम पूर्ण करतील त्याचं मग मात्र तोंड भरून कौतुक करा.  प्रत्येकाच्या बाबतीत एक दरी असतेच असते. सुधाकरच्या बाबतीत तर ती दरी अधिकच स्पष्ट आहे आणि मोठी आहे. ती दरी म्हणजे माहीत असणं आणि करणं यातली.
 सुधाकरला हे पक्कं माहीत आहे की त्यानं सिगरेट सोडायला हवी. त्यानं त्याच्या फिटनेसवर तर परिणाम होतोच पण त्याहीपेक्षा तो आत्मविश्वास गमावून बसतो. त्याला माहीत आहे की त्यानं वाचन वाढवायला पाहिजे, पण तो ते करत नाही. तो हेही जाणून आहे की अव्यवस्थितपणानं त्याचं प्रचंड नुकसान होतं आहे. पण तरीही त्याची परिस्थिती कळत असूनही वळत नाही अशी आहे.
 असं का व्हावं? दोन-तीन कारणं आहेत. एक म्हणजे सुधाकर सवयींचा पक्का गुलाम आहे. दुसरं असं की त्याला स्वतःशी संघर्ष करण्याची अजिबात तयारी नाही.
 माहीत असणं आणि प्रत्यक्ष करणं यातली दरी कमी करणं हा एक संघर्ष आहे, पण उत्तम जगायचं, मोठं व्हायचं तर तो संघर्ष करायलाच हवा हे सुधाकरला कळायलाच हवं.

 पॅट क्रोसच्या पुस्तकातलं एक वाक्य मनाचा छेद करून गेलं. त्यांनी लिहिलं आहे की, तुम्ही जे मिळवता त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन पूर्ण करता. पण तुमचं जीवन तुम्हाला उन्नत करायचं असेल तर तुम्ही इतरांना काय देता, हे महत्त्वाचं आहे.
 देण्यातून माणूस मोठा होतो. त्यामुळे देण्याची सवय अंगी बाणायला हवी. काहीही देण्याची, परतफेडीची किंवा दाद मिळण्याची कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण काय देऊ शकतो? चांगल्या सामाजिक कामाला पैसा तर देऊ शकतोच पण देण्यासाठी आणखीही खूप गोष्टी आहेत. कुणाला मदत करण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊ शकतो. कुणासाठी तरी कष्ट करून श्रम देऊ शकतो. कुणाचं गान्हाणं ऐकण्यासाठी कान देऊ शकतो. थकलेल्या किंवा निराश झालेल्या कुणाला रडायला, विश्रांती घ्यायला खांदा देऊ शकतो. एखाद्या चांगल्या कामासाठी माणसं जोडून देऊ शकतो. आपली भावना देऊ शकतो.
 घ्यायला लागलं की सुचत जाईल आणि सुचायला लागलं की कृती होईल. घ्यायला हवं भरपूर अन् अंतःकरणपूर्वक. पॅट क्रोसनं हे दिलं. आता आपणही इतरांना देऊ या.