मुख्य मेनू उघडा

<poem> जय जय श्रीशिवकाशीविश्‍वेश्‍वररुप, विश्‍वंभरा हो ओवाळुं आरती तुजप्रति काळभैरवेश्‍वरा हो ॥धृ०॥

जय जय विराट पुरुषा, विराट शक्‍तीच्या वल्लभा हो अनंत ब्रह्मांडांच्या माळा फिरवित अससी उभा हो शशिसूर्यांच्या बिंबीं तुझिया तेजांशाची प्रभा हो प्रचंड चंडप्रतापें कळिकाळाच्या वळती जिभा हो नाजळसी नाढळसी भू-जलिं अनिलीं-नीलांबरा हो ॥१॥

अद्‌भुत काया, माया, अद्‌भुत वीर्याची संपत्ती हो पाहतां भ्रमले श्रमले कमलोद्‌भव श्रीकमलापती हो तुझिया नामस्मरणें विघ्नें शतकोटी लोपतीं हो वर्णिति शंकर-पार्वति-कार्तिकस्वामी-गण-गणपती हो निज इच्छेनें करसी उत्पत्ति-स्थिति-लय संहारा हो ॥२॥

अनंत अवतारांच्या हृदयीं जपतां गुणमालिका हो मूळपीठ-नायका प्रकटे साक्षेपें महाकालिका हो श्रीअन्नपूर्णा, दुर्गा, मणिकर्णिका, गिरिबालिका हो तूंचि पुरुष-नटनारी-श्रीविधि-हरि हरतालिका हो तूं सुरतरु, भाविका, भावें ओपीसि इच्छित वरा हो ॥३॥

जटा-मुकुट, कुंडलें, त्रिपुड्र गंधाचा मळवटीं हो रत्‍नखचित पादुका शोभतीं चरणींच्या तळवटीं हो शंख त्रिशुळ, करकमळीं, सुगंध पुष्पांचे हार कंठीं हो तिष्ठसि भक्‍तांसाठी अखंड भागिरथीच्या तटीं हो विष्णुदासावरि करि करुणा काशीपुर-विहारा हो ॥४॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg