कृष्णाप्रार्थना
श्रीकृष्णे ! देवि ! तव स्मृतिनेंही जाड्यजन्य ताप सरे. तापस रेवाश्रित जो, त्याची विश्वांत धन्यता पसर. ॥१॥
सफ़ळस्वेष्टापूर्ते ! लीलादत्त्तात्मसत्सुखस्फ़ूर्ते !
साक्षान्मुकुंदमूर्ते ! त्वद्भक्तचि धन्य कलियुगीं पूर्ते. ॥२॥
श्रीमूर्ति तसी, घेसी सर्वांचें तूं महानदी नमनें.
तुज भजुनि, मानिलें सुख सुरपतिचेंही लहान दीनमनें. ॥३॥
गंगेला निवविसि तूं, भेटोनि निवावयासि आलीला.
कृष्णे ! कोणाकरवीं करविति न तुज्या, सुखार्थ ‘ आ ’, लीला. ॥४॥
कवि म्हणति, ‘ सुर पितर हो ! आलें भागास अछवि प्राशा.
तिळ कृष्णाभक्ताशा अमृतिं, न जसि विषयिं अछविप्राशा ’. ॥५॥
कृष्णे ! स्वच्छ तव यश ब्रह्मांडावरिहि चांदवा होतें.
वाहे पिशाचपतिशिर उन्मत्त तसेंचि चांद वाहो तें. ॥६॥
कृष्णे ! सुकृतकुकृत जें जीवांचें, तें तुला सकळ कळतें.
तव मन, जसें जननिचें, दु:खित देखुनि मुलास, कळकळतें. ॥७॥
तव मन, जसें सुधेतें, तुझिया पावोनि कीर्तिकणिकेतें.
आत्मस्थितितें लाहुनि, जैसा शुकदेव देवगणिकेतें. ॥८॥
दाखविजे तव तटगें तसि जसि परजीनत यमा ईशें.
या सुयशें ती चकिता, देती वर जी नता यमाई शें. ॥९॥
उतरेल कोण लोकीं तुझिया पददेवते ! यमाइ ! तुका ?
काळहि भी, मग किति गुण न धरिति परदेव ते यमाइतुका ? ॥१०॥
कृष्णे ! तुला न सोसे, जें भक्त्यनभिज्ञ याद तळमळलें.
न तुझें दीनोद्धारालस्यमळें तिळहि, पादतळ मळलें. ॥११॥
कृष्णे ! म्हणसि, ‘ प्राणी जो दुर्मति, विषयकाम अतितर, तो
सेवुनि मत्पय, मद्यश, चिर वैकुंठीं नेवोनि पतित रतो. ’ ॥१२॥
जे कलियुगीं अशुचितम, पावविले त्वां पदा शुचितमा ते.
श्रीकृष्णे ! ब्रह्मांडीं तुजचि चरित हें सदा उचित माते ! ॥१३॥
तव नामयश:क्षीर प्राशितसे भगवति ! प्रजा जी जी,
नमुनि म्हणावें लागे ती तीस सदा सुरव्रजा ‘ जी जी. ’ ॥१४॥
झालें होइलहि, तुझें, पळहि उदासीन मत्समीं न, मन.
कृष्णे ! तरि तुज करितों, अपराधी म्हणुनि वत्स मीं, नमन. ॥१५॥
जाण, प्रिय न पुरवितां मीं स्पष्ट करीन वत्स रुसवा, हें.
जाड्यघ्नचिदसिच्या, निज महिम्या स्वकरीं, नव त्सरुस वाहें. ॥१६॥
श्रीकृष्णे ! केवळ जड आहें, लोकां दिसो अजडसा, या
द्रवुनि पहा; क्षम होइल कामव्याघ्रासि हा अज डसाया. ॥१७॥
श्रीकृष्णे ! उद्धरिसी, विषयाचा धरुनि लोभ, जो माते,
विटला संसारसुखा शरणागत कां न तो भजो माते ! ? ॥१८॥
वात्सल्य तुझेंचि अतुळ, अन्यत्रहि भजुनि काय देवि ! किती ?
किति मायहि, बापहि ते ? स्वापत्य, त्यजुनि कायदे, विकिती. ॥१९॥
‘ दूरस्था किमपि न दे ’ म्हणतो, गुणदोष जल्पत, ‘ रुसा, ’ जो
तो काय तुजपुढें शतमूर्ख ? जन म्हणेल, ‘ कल्पतरु साजो. ’ ॥२०॥
पूरुसम त्वज्जलकण, दु:खित ते जीव गुर्वसुसमान,
देती स्वार्थपर सुरव्रज कृष्णे ! देवि ! तुर्वसुस मान. ॥२१॥
हरुनि विषयतृष्णेतें, कृष्णे ! तें कृष्णमूर्तियश रक्षीं.
हा भक्त रामनंदन, मंद, नत, दयार्द्रदृष्टिनें लक्षीं. ॥२२॥
कृष्णे ! व्यासादिसुकवि रोमांचाक्रांतकाय, गेयशतें
सोडुनि, तुझेंचि गाती, म्यां गावें देवि ! काय गे ! यश तें ? ॥२३॥
तव यश मानस, सद्गुण पद्म, सुकवि राजहंस, मीं अळिसा,
लघु, मलिन, तदपि, केला प्रेमरसें बद्ध, वामनें बळिसा. ॥२४॥
भलत्या प्रभुचाहि पराभग, देवासमहि, मानवा चकवी.
कृष्णे ! म्हणति, ‘ तव परा, भव दे वास, महिमा नवाच ’ कवी. ॥२५॥
माते ! कृष्णे ! न्हाते, गाते, तुज पूज्य, जेविं जामाते.
दाते होति ध्याते, ‘ हा ’ ते नच म्हणति, कथिति हें ज्ञाते. ॥२६॥
तूं विष्णुमूर्ति, गंगा विष्णुपदी, भेटलां सख्या आर्या.
आर्या परिसोनि, करा दीनोद्धाराद्भुतोचिता कार्या. ॥२७॥
मीं दीन धन्य होइन कृष्णे ! भगवति ! तुज्या कृपालेशें.
बहु कपिहि समुद्धरिले श्रीरामें सकरुणें नृपालेशें. ॥२८॥
‘ वत्सा ! उद्धरित्यें मीं, संसृतिस भिवों नको ’ असें वद, ये.
आयिक आयि ! कलियुगीं, तूंच भली प्रणतवत्सले ! सदये ! ॥२९॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |