खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने/परिशिष्ट-१ : स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक १

परिशिष्ट-१
स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक १


स्वतंत्रतेचा वेदान्त
 स्वतंत्रता म्हणजे काय? सर्व बेड्यासाखळ्या तुटल्या; सर्व गुलामगिरी संपली; स्वातंत्र्याची यात्रा सुरू झाली म्हणजे काय होते नेमके ? रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या एका कवितेत वर्णन केले आहे.

..... मने निर्भय असतील;
..... आणि माना ताठ;
..... जगाचे कप्पे कप्पे पाडणाऱ्या
 क्षुद्र भिंती कोसळलेल्या असतील;
..... शब्द सांगतील फक्त सत्यच;
..... अथक प्रयत्न पराकाष्ठा करतील
 परिपूर्णतेला स्पर्श करण्यासाठी;
..... विचारांचा शुद्ध प्रवाह
 सवयीच्या वाळवंटात जिरणार नाही;
..... मने झेपावतील
 सतत रुंदावणाऱ्या
 विचार आणि कार्य
 यांच्या क्षितिजाकडे

 मन, ज्ञान, सत्य, परिपूर्णता, विचार अशा चैतन्यमयी अ-जड शब्दात मांडलेली ही स्वतंत्रतेची गुरुदेवप्रणीत व्याख्या; त्यातील शब्दांच्या जादूनेच भारावून टाकणारी. पण रोजच्या व्यवहारात कोणती स्पष्ट जड व्यवस्था पाहिजे? तुरुंगांच्या भिंती आणि गजाआड थोर व्यक्ती आपले व्यक्तिमत्व जपू शकल्या. पारतंत्र्यातही समाज स्वातंत्र्याची स्वप्ने जपू शकतो. पण हे सारे अपवादादाखल. जड बंधने जशी संपतील तसतसे स्वातंत्र्याची क्षितिजे रुंदावू लागतात हा मुख्य नियम. “जगाचे कप्पे कप्पे करणाऱ्या क्षुद्र भिंती कोसळलेल्या असतील.” म्हणजे विचार, सेवा आणि वस्तू यांची देवघेव निर्बंधपणे होणे ही स्वतंत्रतेची महत्त्वाची अट आहे. माणसामाणसातील देवघेवीवर जेथे बंधने आहेत तेथे स्वातंत्र्य असूच शकत नाही. किंबहुना, अशा तऱ्हेची बंधने लादण्याचे सामर्थ्य बाळगणारी कोणतीही संस्था/व्यवस्था अस्तित्वात असणे हेच मुळी स्वतंत्रतेसाठी विषसमान आहे.
 देवघेवीच्या खुलेपणाचा फायदा ठगापेंढाऱ्यांनी उठवू नये यासाठी सर्व समाजाने उभी केलेली सहकारी व्यवस्था म्हणजे सरकार. म्हणून राजकीय निवडणुकांत सहकारी तत्त्वाप्रमाणे दरडोई एक मत असते. सरकार म्हणजे इसापनीतीतील 'बेडकांच्या राजा'च्या गोष्टीप्रमाणे लाकडी ठोकळा नाही आणि करकोचाही नाही. समाजाच्या आत एकाने आपले स्वत:चे स्वातंत्र्य जपावे, पण तितक्याच ठामपणे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे टाळावे. बाहेरच्या आक्रमणाच्या कोणत्याही धोक्यापासून समाजाचे संरक्षण व्हावे याकरिता तयार झालेली सरकार ही व्यवस्था आहे.
 खुलेपणाने, परस्पर संमतीने, सर्वहितेषु व्यवहार करण्याऐवजी दंडेली करू पाहणाऱ्यांना आटोक्यात ठेवणे हे सरकारचे काम. शासनाने ही जबाबदारी स्वीकारली की माणसामाणसांची संरक्षणाच्या जबाबदारीतून सुटका होते. संरक्षणाचे काम सरकारवर सोपवून माणूस इतर गोष्टींसाठी मोकळा होतो. या मोकळीकीची किंमत म्हणून तो आपल्या स्वातंत्र्याचा एक तुकडा तोडून शासनाला देतो, काही बंधने मान्य करतो. आणि नागरिकत्वाची बंधने स्वीकारण्याच्या बदल्यात नागरिक संरक्षणाच्या जबाबदारीतून सुटका मिळवतो. ही शासन संस्था आणि नागरिक यांच्यातील देवघेव आहे.
 संरक्षणाखेरीज माणसाच्या पोषण, प्रजनन इत्यादी गरजा आहेत. त्या गरजा पुऱ्या करताना जनावरांप्रमाणे एकसुरी न वागता विविध अंगांनी, रंगांनी पोषण आणि प्रजननाच्या प्रेरणा तो सांतवू आणि जोपासूही पाहातो. या सगळ्या धडपडीच्या पलीकडे पुरुषार्थाच्या सीमा गाठल्यानंतर इंद्रियांच्या बंधनातूनही मोकळे होऊन काही 'मुक्ति-मोक्ष-निर्वाण' इत्यादी साधू पाहतो. संरक्षणाखेरीज इतर क्षेत्रांकरितादेखील काही व्यवस्था लागतातच. विद्येची सरकारे, करुणेच्या संस्था, कलावंतांची मंडळे इत्यादींची बांधणी सुरक्षा- सरकारच्या धाटणीची असणार नाही हे उघड आहे. संरक्षण म्हणजे हडेलहप्पी काम. त्यात शिस्त महत्त्वाची आणि उतरंडही महत्त्वाची. संगीताच्या मैफलीत कसली आली अधिकाराची उतरंड? आणि कसली शिस्त? दुर्बल, अपंग, असहाय्य, व्याधिग्रस्त अशांच्या मदतीला शुद्ध करुणेपोटी जाणाऱ्यांना संरक्षणाच्या आणि अर्थार्जनाच्या कामी सुयोग्य असलेल्या व्यवस्था कशा चालतील?
 थोडक्यात, स्वातंत्र्याची व्यावहारिक व्याख्या काय? शासन मजबूत असावे, सामर्थ्यवान असावे. पण ही सगळी ताकद सरकारने करावयाच्या कामांसाठीच लागावी आणि सरकारचे काम कोणते, तर जे इतर कोणाही व्यक्तीला किंवा संस्थांना करणे जमत नाही ते. किमान आवश्यकच असेल ते शासनही जास्तीत जास्त विखुरलेले आणि प्रत्येक क्षेत्राच्या स्वरूपाप्रमाणे रंगरूप धारण करणारे असावे. सत्ता नाकारल्याने अराजक होईल. तेव्हा, सत्ता असावी पण किमान विखुरलेली असावी. म्हणजे माणूस स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा परिपोष आणि अधिकाधिक स्वातंत्र्याचा घेऊ शकेल याला म्हणायचे स्वातंत्र्य.
 या अशा विचारसरणीस नाव कोणते द्यावे. इंग्रजी किंवा इतर पाश्चिमात्य भाषात याला 'Liberalism' असा शब्द वापरला जातो. त्याचा मराठी अनुवाद 'उदारमतवाद' असा करता येईल. म्हणजे, स्वत:चे व्यक्तिमत्व जोपासणे आणि दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान राखणे, 'तुझा विचार मला सपशेल चुकीचा वाटतो तरीही तो चुकीचा विचार मांडण्याच्या तुझ्या अधिकाराकरिता मी प्राण पणाला लावण्यास तयार आहे.' ही 'उदारमतवादा'ची प्रवृत्ती. पण, यातून स्वतंत्रतेच्या विचाराचे एक अंगच स्पष्ट होते. अनेकांनी अधिक समर्पक नाव शोधण्यासाठी खूप खटाटोप केले, पण काही यश मिळाले नाही.
 समर्पक नाव शोधण्यात अडचण येते याचे कारण 'स्वतंत्रता' हा 'वाद' नाहीच, ती एक सम्यक् विचारसरणी आहे. कोणा माणसाच्या, समूहाच्या, समाजाच्या, वर्गाच्या, वंशाच्या, जातीच्या, लिंगाच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे 'वाद'. अनंत, अपार, असीम जगाकडे एका छोट्याशा छिद्रातून पाहिले म्हणजे जे अपुरे दर्शन होते त्यातून एक 'वाद' तयार होतो आणि त्या 'वादा'ला त्या छिद्राचे नाव मिळते. स्वतंत्रतेचा उपासकही जगाकडे त्याच्या छोट्या छिद्रातूनच पाहातो; पण आपल्या छिद्राच्या संकुचितपणाची जाणीव तो ठेवतो. आपले छिद्र अनंतकोटी छिद्रांपैकी एक आहे. ही सर्व छिद्रे सारखीच परिपूर्ण आहेत आणि सारखीच अपरिपूर्ण आहेत. एका छिद्राने दुसऱ्या छिद्रास 'काफर' म्हणण्याचे काहीच कारण नाही, ही स्वतंत्रतेची भूमिका आहे. आपल्या वाट्याला आलेले छिद्र क्षणाक्षणाने विस्तारले पाहिजे; तरच अनंताची थोडीअधिक जाणीव होईल, ही स्वतंत्रतेची निष्ठा आहे.
 ही स्वातंत्र्याची शोधयात्रा कधी संपणारी नाही. कोणा काल्पनिक, आदर्श समाजापाशी किंवा स्वर्गापाशी पोहोचून ही यात्रा थांबत नाही. स्वतंत्रतेच्या विचाराला सीमाच नाहीत. ज्याला अंत आहे त्या सांताला नाव देता येईल. ज्याला अंतच नाही त्या अनंताला नाव काय द्यावे? दार्शनिकांनी ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करताना 'हे नाही, हे नाही' म्हणजे 'नेति नेति' एवढीच व्याख्या दिली. स्वतंत्रतेची व्याख्या अशीच 'नेति नेति' आहे. आजचे हे बंधन नको, ही बेडी नको. उद्याची नवी बंधनेही आम्ही झुगारू. कोणतेही मत, कोणताही महात्मा, कोणतेही पुस्तक त्रिकालाबाधित वंद्य आणि पूज्य असूच शकत नाही. जन्माच्या अपघाताने मिळालेला कोणताही गुणावगुण दंभ मिरवण्याच्या लायक नसतो. ही स्वातंत्र्याच्या उपासकाची प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवणे, संकुचितपणाचा वाढता संकोच करणे एवढीच स्वतंत्रतेची व्याख्या देता येईल.
 याच तत्त्वाने जगाची निर्मिती झाली आणि उत्क्रांती चालली आहे; मनुष्य आणि समाज यांचा विकास घडतो आहे. स्वतंत्रता ही सर्व विश्वाच्या चलनवलनाचे सूत्र असे आजतरी दिसते आहे. उद्याचे काय सांगावे? मुक्तीची आस धरणारांना 'मुमुक्षु' असा शब्द आहे. प्रत्येक माणसाला 'मुमुक्षु' समजणाऱ्या विचाराचे नाव काय?
स्वतंत्रता देशी की विदेशी?
 स्वतंत्रता म्हणजे काय आणि तिला नाव काय द्यावे याची चर्चा वर झाली. त्याची सारी भाषाच 'वेदान्ती' भासू लागते. ही मोठी विचित्रच गोष्ट म्हणायची. कारण, या वादाचे सारे मान्यवर पुरस्कर्ते पश्चिमी देशांतील आहे. ॲडम स्मिथपासून हायेक, फॉन मिझेस, पॉपर, फिल्डमनपर्यंत सगळी नावे तिकडचीच. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना पश्चिमी आहे. याउलट, भारतीय परंपरा आई, वडील, गुरु आणि राजा यांना मानणारी आहे, पूर्वजांची पूजा करणारी आहे. तस्मात्, व्यक्तिस्वातंत्र्य हे परदेशी वाण आहे, ते भारतीय भूमीत रुजणे कठीण आहे असे आग्रहाने सांगितले जाते. “कुटुंबासाठी एका माणसाचा त्याग करावा, गावासाठी कुटुंबाचा, देशासाठी गावाचा, इत्यादी इत्यादी.” अशी भारतीय परंपरा आहे; समूह श्रेष्ठ, त्यातील सदस्य कनिष्ठ अशी येथली परंपरा आहे, असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते.
 या युक्तिवादात काही फारसे तथ्य नाही. 'आत्मानं सततम् रक्षेत् प्राणैरपि धनैरपि ।' असाही इथला आदर्श आहे. समूह हा धर्म-अर्थ-कामाचे साधन होऊ शकतो पण मोक्षाची यात्रा ज्याची त्याची ज्याने त्यानेच करायची आहे, अशीही येथील परंपरा आहे. किंबहुना, पिंड आणि ब्रह्मांड यांची एकता हा 'लोकायत' आणि वेदान्त तत्त्वज्ञानाचा पाया आहे. मुसलमानी आक्रमणातून आणि इंग्रजी सत्तेतून देश सावरू लागल्यावर मुसलमानी आणि ख्रिस्ती आदर्श स्वीकारणारे काही समाजधुरीण पुढे झाले. स्वामी दयानंद, विवेकानंद त्यांतले अग्रणी. सावरकर-गोळवलकरांनी हिंदु समाजाला समूहाचे रूप देण्यात धन्यता मानली. असे केल्यानेच मुसलमानी, ख्रिस्ती आव्हानाला तोंड देता येईल, अशी त्यांची धारणा. मुस्लिम आणि ख्रिस्त्यांच्या अंधानुकरणाने हिंदु समाजाला संघटित रूप देण्याकरिता प्रमाणग्रंथ आणि राष्ट-वाद तयार करून अथांग हिंदुसागराचे चांगले बांधबंदिस्तीचे तळे बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आजचे “हिंदुत्व'वादी त्यांचेच करंटे वारसदार!
 नव्या येणाऱ्या युगात ख्रिस्ती, मुसलमानी तोंडवळ्याच्या सामूहिकतेचा आणि सामाजिक बांधणीचा पाडाव निश्चित आहे आणि व्यक्ती व विश्व यांच्या प्रेरणा एकच मानणाऱ्या वेदांताचा विजय होत आहे हेही या अभागी 'हिंदुत्ववादी हिंदुत्वद्रोह्यांच्या लक्षात येत नाही.
 'स्वतंत्रतावादा'ची गंगोत्री मनुष्यजातीच्या इतिहासात भारतीय तत्त्वज्ञानात सापडते, इतकी ही अस्सल भारतीय संकल्पना आहे. तिलाच आज परदेशी वाण समजले जावे ही केवढी दुर्भाग्याची गोष्ट!
 पुरातन भारतीय व्यवस्था ही 'अ-राज्यवादी' आहे. माणसाच्या वेगवेगळ्या प्रज्ञांचे वेगवेगळे शासन विभागण्यात आले आहे. शस्त्राच्या साहाय्याने क्षत्रिय राज्य करतील, भिक्षा एवढाच अधिकार असलेल्या तपस्वी अशा ब्राह्मणांचा मान तेवढाच मोठा. अर्थार्जनात प्रभुत्व वैश्यांचे. राजाने धन जमवायचे, पण ते यज्ञात वाटून टाकण्याकरिता. शासनाच्या श्रमविभागणीला येथे मान्यता होती. ती विभागणी जन्माच्या अपघाताच्या आधाराने केली गेली हे आजतरी दुर्दैवी आणि विचित्र वाटते. पण, चातुर्वर्ण्याच्या चुकीच्या पायावर का होईना, शासनाची श्रमविभागणी हे भारतीय परंपरेचे वैशिष्ठ्य राहिले आहे.
 श्रमविभागणीची ही परंपरा मुसलमान आक्रमणापासून खंडित झाली. परकीय शासन अ-राज्यवादी असूच शकत नाही. आपले राज्य टिकविण्यासाठी सर्वंकष सत्ता हाती घेणे परकीय आक्रमकांना आवश्यक बनते. अ-राज्यवादाला ग्रहण मुसलमानी आक्रमणापासून लागले. इंग्रज राज्यातही ते चालू राहिले, पण इंग्रजी साहित्याच्या संपर्काने 'व्यक्ती'ला मान्यता मिळू लागली.
 गांधीजींचे सगळे आंदोलनच अ-राज्यवादावर आधारलेले होते. सरकार किमान असावे अशी अगदी टोकाची भूमिका ते मांडत. हिंदुस्थानातून इंग्रजांना काढून का टाकायचे? इंग्रज गेला म्हणजे स्वातंत्र्य मिळते असे नाही. प्रत्येकाला आपल्या अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाचा परिपोष करण्याची संधी देते ते स्वातंत्र्य. अशी स्वतंत्रता राजकीय पारतंत्र्यात जगूच शकत नाही म्हणून राजकीय स्वातंत्र्याचे महत्त्व. इंग्रजी अंमल संपविणे हा अ-राज्यवादातील पहिला टप्पा असल्याचे गांधीजी आग्रहाने सांगत.
 दुर्दैवाने, गांधीजींचा राजकीय वारसदारच अ-राज्यवादाचा हत्यारा ठरला. पारंपरिक समाज, जात, राष्ट- असल्या समूहांना दूर करून समाजवादी राष्ट-ाचे सर्वश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा नेहरूनी प्रयत्न केला. महत्त्व व्यक्तीचे नाही, सरकार महत्त्वाचे आहे; व्यक्तीच्या प्रेरणा स्वार्थी असतात; त्यांवर मात सामूहिक नियोजनानेच करता येते असली अजागळ समाजवादी मांडणी करून शिष्योत्तमाने समूहवाद जोपासला.
 समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर, पुन्हा एकदा दयानंद-विवेकानंद प्रेरणेचे हिंदुत्ववादी नवा समूहवाद, शासनवाद आणू पाहात आहेत. समाजवादाची दुर्बलता त्याच्या आर्थिक कमजोरीत होती. शासनवादाला असला आर्थिक फूटपट्ट्यांचा जाच सोसणारा नाही. राष्ट-ासाठी काय करायचे ते आम्ही राष्ट-नेते ठरविणार. त्याला रुपयापैशांच्या फूटपट्ट्या कसल्या लावता? समाजवादी समूहवादावर काही आर्थिक जबाबदाऱ्या होत्या. 'हिंदुत्वा'त समूहवाद म्हणजे निव्वळ सत्ता. त्यावर कोणते बंधन नाही; अगदी, आर्थिक अंकुशही रहात नाही. अडवानी हे या अर्थाने पंडित नेहरूचे खरे वारसदार आहेत.
 अलीकडच्या काळात समाजवादी समूहवादाला आव्हान देणारे भारतात कोणी निघालेच नाही असे नाही. लायसेन्स-परमिट-कंट-ोल राज्याविरुद्ध चक्रवर्ती राजगोपालाचारींनी बंड उभारले. नियोजनाविरुद्ध ब्रह्मानंद वकील आणि बी. आर्. शेणॉय यांसारख्यांनी सज्जड आव्हान उभे केले. शेवटी, बळीराज्याची संकल्पना मांडणारे शेतकरी आंदोलनही इथे उभे राहिले. अ-राज्यवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, व्यक्तिप्राधान्यवादी, स्वतंत्रतावादी विचारांची ही अस्सल भारतीय परंपरा आहे. हे परदेशी वाण नाही. हे वाण विलायती असल्याचा कांगावा करून त्याचा पाडाव करणे जमणार नाही.
 खरी अडचण येते ती स्वतंत्रतावाद्यांतील आंग्लविद्याविभूषित शहरी विद्वानांची. आपले पांडित्य दाखविण्याकरिता त्यांना हायेक आणि फॉन मिझेस, पॉपर अशी नावे जिभेवर खेळवण्याचा नाद आहे. त्यामुळे, स्वतंत्रतावाद काही परदेशी फंड आहे अशी समजूत पसरण्यास मदत होते.

(६ जुलै १९९६)

स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक २


निसर्गाचे कुटुंबनियोजन
 'स्वतंत्रतावाद' हे काही विलायती वाण आहे ही समजूत प्रत्यक्षात किती चुकीची आहे हे स्पष्ट झाले. अशी चुकीची समजूत होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. 'स्वतंत्रतावाद' म्हणजे बाजारपेठेवर आधारलेली व्यवस्था; 'स्वतंत्रतावाद' म्हणजे डार्विनवाद, स्वतंत्रतावाद म्हणजे इतिहासात बदनाम झालेला 'लेसे फेअर'वाद (ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे करू देणे किंवा 'अ- हस्तक्षेप'वाद); थोडक्यात, स्वतंत्रतावाद म्हणजे भांडवलवादी साम्राज्यशाहीची पहिली पायरी असाही समज होतो. हा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे. 'डार्विनवाद', 'अ-हस्तक्षेपवाद', किंवा भांडवलवाद-साम्राज्यवाद हे सारेच विलायती उपजेचे. त्यामुळे स्वतंत्रतावाद हे काही देशी पीक नाही, ते येथे रूजू शकणार नाही, भारतासारख्या देशात 'नायकप्रधान' पूर्वजांची पूजा बांधणारा विचार किंवा व्यवस्थाच मूळ धरू शकेल या समजाला पुष्टी मिळते.
तगेल तो जगेल
 स्वतंत्रतावादाविरुद्धचे हे आरोप, खरे म्हटले तर, निव्वळ शिवीगाळ आहे. डार्विनवाद म्हणजे काय? जड पदार्थातून सजीव प्राण्यांना लागणारे मूलभूत रसायन हजर झाले की सजीव प्राण्यांचे विविध प्रकार प्रजोत्पादनाच्या पिढ्यांमागून पिढ्यात संख्याशास्त्रीय नियमानेच तयार होतात. कालाच्या प्रवाहात किरणोत्सर्गी पदार्थांच्या अपघाताने काही वेळा अचानक आणि विचित्र असे बदलही होऊ शकतात. पण विविधता ही निसर्गसिद्ध आहे. जन्माला आलेल्या विविध प्राण्यांतून सगळेच टिकून राहणे अशक्य आहे. कारण, एवढ्या सगळ्यांचा भार पेलणे पृथ्वीस शक्य नाही. सर्व सजीवांच्या सर्वच इच्छांची पूर्ती करायची म्हटले तर पृथ्वी चटणीलासुद्धा पुरणार नाही. अनेकांच्या इच्छा अनेक आणि त्या पुऱ्या करण्याची साधने मात्र मर्यादित. अशा परिस्थितीला तोडगा काय?
 पहिला तोडगा निसर्गच काढतो. पृथ्वीवरील साधने संपादण्यात, वापरण्यात काही विशेष सामर्थ्य, कौशल्य दाखवणारे सजीव आपले स्वत:चे रक्षण करू शकतात, पोषण करू शकतात, प्रजोत्पादन करू शकतात. थोडक्यात, ते तगून राहू शकतात. ज्यांना हे जमत नाही ते ना स्वत:चा बचाव करू शकतात, ना पोट भरू शकतात. मग अशांची प्रजा निपजणार कशी आणि निपजली तरी टिकणार कशी? जे परिस्थितीवर मात करतात ते टिकतात, जे टिकू शकत नाहीत ते संपतात. जगण्यासाठीचा हा संघर्ष म्हणजेच निसर्ग. यात काही क्रौर्य नाही; अ आणि ब दोघेही टिकणे शक्य नाही; दोघांपैकी एकाला संपले पाहिजे. कोणी संपायचे हे निसर्ग ठरवतो. यात क्रूरता काहीच नाही. कोणी काहीही, कितीही म्हटले तरी सर्वच विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी देऊन किंवा प्रथम क्रमांक देऊन पास करणारी शिक्षणव्यवस्था असूच शकत नाही. काही एका फूटपट्टीने मोजमाप करून श्रेण्या लावण्याखेरीज गत्यंतरच नाही. पहिला आलेला विद्यार्थी सर्वात बुद्धिमान, सर्वात कष्टाळू, सर्वश्रेष्ठ असतोच असे नाही. एका काळी, एका जागी, एका फूटपट्टीने तो इतरांपेक्षा वरचढ ठरतो, एवढेच काय ते! उच्च शिक्षणासाठी प्रवेश किंवा नोकरीत प्रवेश यांच्या शक्यता मर्यादितच असणार. म्हणजे, त्यासाठी निवड करावीच लागणार आणि निवड करायची म्हटली की नाही तरी फूटपट्टी हवीच.
निसर्गाची निवड
 माणसांच्या समाजात ही निवड आपापल्या सोयीची व्हावी यासाठी सगळेचजण धडपड करतात. भटशाहीत, वरच्या समाजात जन्मला या जन्मसूचीचा फायदा घेतला जाई; सगळ्या शिक्षणाचे स्वरूप 'ब्राह्मणी' करून इतर जातीयांना मागे टाकले जाई. बहुजन समाजाचे राज्य आल्यावर त्या समाजातील लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे काढण्यासाठी 'बहुजनसमाजी साधने' वापरात आली. सामाजिक न्यायाच्या घोषात जन्मसूचीऐवजी जन्मदलिताला प्राधान्य देण्याची टूम निघाली.
 माणसाने केलेली निवड म्हटली की त्यात अशी ढवळाढवळ असतेच. पृथ्वीवरचा न्याय आणि देवाच्या दरबारातील चित्रगुप्ताचा हिशोब यात फरक राहणारच. चित्रगुप्ताचा असा काही सर्वसाकल्याने विचार करणारा हिशोब आणि अहवाल ही एक कल्पना आहे. कोणाही माणसाची अशी सर्वांगीण चाचणी होऊच शकत नाही. सर्वतोपरी परिपूर्ण अशी चाचणी माणसाला करणे अशक्य आहे. जास्तीत जास्त काय होईल? निवडीत कोणाचाही हस्तक्षेप कमीत कमी रहावा, म्हणजे जाणूनबुजून केलेली ढवळाढवळ किमान राखावी एवढेच माणसाला शक्य आहे. थोडक्यात, निसर्गाच्या निवडीपेक्षा अधिक कार्यक्षम निवड या मर्त्यलोकात तरी असंभव आहे.
 काही प्राण्यांत आईच आपल्या पिलांना खाते. पिलांची संख्या जास्त झाली, त्यांना सगळ्यांना पाजता येणार नाही, आईची ताकदच कमी पडू लागली की आपल्याच पिलावळीतील काहींचा चट्टामट्टा करणाऱ्या प्राण्यांच्या जाती अनेक आहेत. निसर्गमाता असेच काहीसे करते. जन्माला आलेले सर्व प्राणिजात आणि त्यांच्या जाति टिकून राहिल्या पाहिजेत असा पर्यावरणवादी प्रयत्न निसर्ग करताना कधी दिसत नाही. दररोज असंख्य जाती तयार कराव्या आणि दररोज असंख्य जाती नष्ट कराव्या हा निसर्गाचा खेळच आहे; त्यात दुष्टता काहीच नाही.
 असमर्थांना संपवायचे नाही म्हटले तर पर्याय एकच उरतो; तो म्हणजे समर्थांना संपविणे. समर्थांना संपविण्यास समर्थ असलेली तरसत्ता असली तर काही काळ, कदाचित, समर्थांना चेपून असमर्थांना तगवता येईल, पण हा असला 'अव्यापारेषु व्यापार' फार काळ चालणार नाही.
 गोसंवर्धन केवळ गोहत्याबंदी केल्यामुळे होत नाही. किंबहुना, सगळ्यात चांगले गोसंवर्धन करण्यासाठी गोवंशाचे कुटुंबनियोजन आणि हत्या आवश्यक आहे; हे अनुभव सांगतो. जेवढी मुले जन्माला येतील तेवढ्यांना जगू द्यायचे म्हटले तर तो भार असह्य होईल. तेव्हा, कुटुंबनियोजनाची गरज आहे हे आता सर्वसामान्यांनाही उमजू लागले आहे. आपण कुटुंबनियोजन केले नाही तर लढाया, दुष्काळ, रोगराई आणि साथी अशी हत्यारे वापरून निसर्ग आपोआप कुटुंबनियोजन करून टाकतो. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतात ‘सुयोग्य' टिकून राहतात. हा सिद्धांत निसर्गाच्या कुटुंब नियोजनाचा नियम आहे. त्यात दुष्टता कसली?
निसर्गाचे अनुकरण
 डार्विनवादाचा विचार करताना आणखी एक गैरसमज दूर केला पाहिजे. 'सुयोग्य ते' टिकतील याचा अर्थ 'दांडगे' टिकतील, दुष्टांचा विजय होईल, बलिष्ठ तेवढे जगतील असा मुळीच नाही. माणसापेक्षा; एवढेच काय; हत्ती, गेंडे, देवमासे यांच्यापेक्षाही अवाढव्य आकाराचे आणि ताकदीचे प्राणी पृथ्वीतलावरून नष्ट झाले. हरणाचे चापल्य, चित्त्याची लवचिकता, वाघाचे शौर्य, गरुडाची आकाशात झेप घेण्याची ताकद या सगळ्यांना बाजूला सारून, यातील प्रत्येक गुणात त्या त्या प्राण्यापेक्षा कितीतरी कमी असलेल्या माणसाने विजय मिळविला. विजय ताकदीचा झाला नाही. माणूस टिकून राहिला याचे कारण वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य त्याला लाभले. आपल्या बुद्धीचा उपयोग करून, पोटापाण्याच्या गरजा भागवून; साधने आणि संघटना तयार करण्याच्या त्याच्या कसबामुळे माणूस श्रेष्ठ ठरला. निसर्गात माणसाने विजय मिळवला याचे कारण निसर्गापासूनच त्याने धडा उचलला; विविधता जोपासावी आणि त्यातून 'सुयोग्या'ची निवड करावी हा निसर्गनियम माणसाने उचलला म्हणून तो टिकला आहे. आपले निवडीचे स्वातंत्र्य सतत विस्तारत ठेवण्याच्या ध्यासाने/आकांक्षेने मनुष्य श्रेष्ठ ठरला!
 डार्विनवादात 'बलिष्ठ ते टिकतात' अशी कल्पनाच नाही. स्वतंत्रता जोपासणारे टिकतात आणि बंधनापुढे मान तुकवणारे संपतात, एवढाच डार्विनवादाचा मतितार्थ आहे. स्वतंत्रतावादाला डार्विनवाद म्हणताना उपहासाचा सूर लावणाऱ्यांना डार्विन समजला नाही, स्वतंत्रतावादही समजला नाही आणि माणूस तर त्याहून समजला नाही.
 अर्थव्यवस्था म्हणजे तरी निसर्गाचाच एक टप्पा. निसर्गात जो नियम लागू तोच येथेही लागू. पृथ्वीवर माणसाला लागणारे हवा, पाणी, जमीन, अन्न, निवारा यांत हिस्सा मागू इच्छिणारे सर्व प्राणिजात उत्क्रांतीच्या प्रवाहात संपून गेले तरी टिकून राहिलेल्या माणूस जातीतील सर्वांच्या गरजा, तहान, भुका आणि इच्छा पुऱ्या करण्याससुद्धा धरती असमर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या इच्छा अनेक. त्यांचे समाधान होते ना होते तोच नव्या गरजा आणि इच्छा तयार होतात. अनंत अपार इच्छा, आकांक्षा, लालसा आणि त्या भागविण्यासाठी लागणारी पृथ्वी मात्र सीमित आणि मर्यादित. इच्छा अनेक, साधने थोडी! तेव्हा वेगवेगळ्या इच्छाआकांक्षात प्राधान्य कोणाला द्यायचे, कोणती गरज पहिल्यांदा भागवायची, कोणती नंतर याचा निर्णय केला पाहिजे. काही गरजा, इच्छा दाबून टाकल्या पाहिजेत; बाकीच्यांचे होईल तितके समाधान केले पाहिजे. त्यासाठी, उत्पादित केलेली साधने जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरली पाहिजेत. असीम इच्छा आणि सीमित साधने यांची कार्यक्षम जोडणी हाच तर अर्थशास्त्राचा विषय आहे.
स्वतंत्रतावादाचे अर्थशास्त्र - बळीराज्य
 अशी जोडणी जीवशास्त्राच्या क्षेत्रात निसर्गाने केली. अर्थशास्त्रात ते शक्य आहे काय? जी काही थोडीफार साधने असतील ती आपल्या हाती यावी किंवा आपल्या जवळच्यांच्या हाती यावी यासाठी जो तो खटाटोप करतो. काही खुळे कष्ट करून पीक काढतात, काही दुसरे घाम गाळून जगण्याची इतर साधने तयार करतात. खास हुशार आणि चलाख माणसे आपला घाम गाळण्याऐवजी दुसऱ्यांचे रक्त सांडणे पसंत करतात; दुसऱ्यांनी पिकवावे आणि तलवारीच्या, बंदुकीच्या जोरावर ते हस्तगत करावे हा त्यांचा कायमचा खाक्या. 'बळी तो कान पिळी' असे आजपर्यंत चालले. बळीचे रूप बदलले. बळीराजाला जमिनीत गाडून बलशाली पुढे सरसावले. धर्माच्या आधाराने काहींनी तलवार चालवली. काहींनी राजेशाहीच्या नावाने, काहींनी साम्राज्याच्या नावाने, काहींनी राष्ट-वादाच्या नावाने. अर्थव्यवस्थेत प्रत्येक माणसाला किंवा समाजाला त्याच्या गरजा भागवण्यापोटी काय आणि किती मिळावे याचा निर्णय आजपर्यंत तलवारीच्या धारेवर झाला. दुष्ट मातले आणि कष्ट करणारे झिजत मेले. कष्टकऱ्यांचा झेंडा उभारणाऱ्या समाजवाद्यांनी साधनांच्या वाटपाकरता पूर्वापारप्रमाणेच तलवारच वापरली; थोडी वेगळ्या शैलीने आणि धाटणीने, एवढाच काय तो फरक!
 चमत्कार असा की, या तलवारधारी क्रूरकर्त्यांचा डायनासॉरप्रमाणेच समूळ उच्छेद होण्याची वेळ आली आहे. ताकदवान असेल पण ते सुयोग्य साधन नाही. तलवारीने जगणारे समृद्ध झाले तर घाम गाळणाऱ्यांना काय उमेद राहील, त्यांनी धीर सोडला तर साधनांची विविधता जोपासली कशी जावी आणि साधनांचा उपयोग व्हावा कसा? आणि हे जमले नाही म्हणजे अर्थव्यवस्थेचा सारा डोलाराच कोसळून पडेल. अर्थशास्त्रातील तलवारीचे स्थान आता संपत आले आहे. तलवारीच्या आधाराने उभ्या राहिलेल्या धर्मसंस्था, राज्यसंस्था आता भुईसपाट होऊ लागल्या आहेत. विविधता तयार करणारा उत्पादक आणि त्याचा उपभोग घेणारा ग्राहक ही एकाच व्यक्तीची दोन अंगे आहेत. माणसाने उत्पादन करावे, ते जगासमोर ठेवावे, जगाच्या नजरेत त्याच्या या नजराण्याचे जे काही मोल असेल त्याप्रमाणे उत्पादकाला मोबदला मिळावा, यात कोणाचाच हस्तक्षेप असू नये अशी अर्थव्यवस्था 'स्वतंत्रतावाद' मानतो. यात 'बळी तो कान पिळी' नाही; यात 'बळीराज्य' आहे.
 सरकारी हस्तक्षेप नसावा खुली बाजारपेठ असावी, त्यातूनच सीमित साधनांचा असीम इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठी कार्यक्षम प्रयोग होईल, हे 'स्वतंत्रतावादा'चे फक्तः एक अंग आहे. अर्थकारण म्हणजे सगळे जीवन नाही. आयुष्यात भाकरीचे महत्त्व आहे, पण भाकरी म्हणजे आयुष्य नाही. माणसाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. आसपासचे जग न्याहाळावे; निसर्गाचा खेळ समजून घ्यावा अशी ज्ञानसंपादनाची त्याला ओढ आहे. आपल्यातील कमनशिबी गरीबगुरीबांना, अपंगांना साहाय्य करावे अशी करुणाबुद्धीही माणसात उपजूशकते. आपल्या मनातील विचार वाचेने, शब्दाने, कुंचल्याने, सरगमच्या साहाय्याने व्यक्त करावे यात त्याला परमानंद होतो. तलवारीने केवळ भाकरीचीच अर्थव्यवस्था नासवली असे नाही तर ज्ञान, करुणा, अभिव्यक्ती अशा सगळ्या क्षेत्रांचा खराबा करून टाकला. 'स्वतंत्रतावाद' म्हणजे केवळ स्पर्धेवर आधारित बाजारपेठेची व्यवस्था नाही. बाजारपेठ हे स्वतंत्रतावादाचे फक्त एक अंग आहे. येथे कोणाचेच राज्य नाही, येथे राज्य फक्त ग्राहकांचे, म्हणजे खरीखुरी लोकशाही. या भाकरीच्या क्षेत्रात, त्याखेरीजच्या प्रत्येक क्षेत्रात काही वेगळीवेगळी व्यवस्था स्वतंत्रतावाद मानतो. कायदा व सुव्यवस्था राखणारे समर्थ शासन असावे; दीनदुबळ्यांना, अपंगांना हात देणाऱ्या करुणेवर आधारलेल्या संस्था असाव्यात, कलावंतांची आपापली सरकारे असावीत, विद्वानांच्या सार्वभौम वेगळ्या पंडीतसभा असाव्यात. 'स्वतंत्रतावाद' हा विविधतेला मानणारा आहे.
प्रवाह अडणारा नाही
 स्वतंत्रतावाद म्हणजे 'लेसे फेअर', थोडक्यात, 'मन:पूतम् समाचरेत्' अशी हेटाळणी करणाऱ्यांच्या मनात एक ठाम कल्पना रुजलेली असते. 'आपोआप कोणतीच गोष्ट सुरळीतपणे होत नाही. कोणी कर्ता असेल तर काहीतरी ठीक होण्याची शक्यता आहे, एरव्ही नाही. सगळे जग सुरळीतपणे चालले आहे, कारण वर आकाशात देव आहे' असे मानणाऱ्यांचीच ही शाळा. तप्त, लालबुंद झालेला ज्वालामुखी ओतणाऱ्या पृथ्वीच्या गोळ्यातून केवळ निसर्गक्रमाने मनुष्यप्राणी आपली संस्कृती उभी करू शकतो हा चमत्कार डोळ्यासमोर असतानाही निर्मिकाची परमेश्वरी कल्पना का मांडली जाते? प्रत्यक्ष कोणी निर्मिक असला तरी तो काही आपला दावा मांडायला येणार नाही याची बालंबाल खात्री असल्याने निर्मिकाचे नाव सांगावे आणि आपल्याच हाती सत्ता घ्यावी असा हा डाव आहे.
 उरलीसुरली शिवी म्हणजे स्वतंत्रतावादा'ला भांडवलवादी म्हणणे. भांडवलवाद ही मार्क्सवाद्यांनी शंभर वर्षे वापरलेली शिवी आहे. सरकारने अर्थव्यवस्था सांभाळावी, ती बाजारपेठेवर अवलंबून ठेवली तर उत्पादन थंडावते असले बाष्कळ अर्थशास्त्र समाजवाद्यांनी मांडले. शंभर वर्षे त्यांची सद्दी चालली. समाजवादाचा डोलारा कोसळला तरी भांडवलशाही हा शिवीशब्द जनसामन्यांच्या शब्दकोशातून दूर झालेला नाही.
 वस्तुतः, 'स्वतंत्रतावाद' आणि 'भांडवलवाद' यात काही साम्य नाही; उलट 'भांडवलवाद' आणि 'समाजवाद' हे सख्खे नसले तरी चुलत, मावसभाऊ आहेत.
 मनष्यप्राण्यांची पहिली संस्कृतीस्थाने उभी राहिली ती मोठ्या नद्यांच्या वळणावरील सुपीक गाळपेराच्या जमिनीत. सुपीक जमीन, मुबलक पाणी या निसर्गाच्या आधाराने सर्वात पहिल्या मानवी समाजाच्या रचना झाल्या.
 त्यानंतर, कष्ट करणारा माणूस किंवा तलवार चालवणारा शिपाई; साधनांची मुबलकता वाढवण्यात अग्रेसर ठरले. श्रमसंस्कृती निसर्गदत्त मुबलकतेवर आधारलेल्या समाजावर मात करून गेल्या.
 यानंतर, अन्नाच्या वरकड उत्पादनातून माणसाने साधने उत्पन्न केली आणि यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, भांडवल ही राष्ट-ांची शक्तिस्थाने ठरली. या कालखंडात खुल्या बाजारपेठेवर भांडवल उभारणी करणारे समाजही झाले आणि शासनाच्या हाती सर्व सत्ता देणाऱ्या समाजवादी व्यवस्थाही झाल्या.
 'स्वतंत्रतावादा'चा पाया या तीन कालखंडांतील कोणत्याही संस्कृतीत नाही. स्वतंत्रतावादाचा कालखंड आणि व्यवस्था आताशी कोठे क्षितीजावर उदय पावत आहे. स्वतंत्रतेच्या व्यवस्थेत महत्त्व पंचमहाभूतांना नाही; श्रमाला नाही; भांडवलाला नाही; महत्त्व आहे ते या सर्वांचा संयोग घडवून आणणाऱ्या उद्योजकाला, संशोधकांना, धडाडी दाखवून उद्योगव्यापार उभे करणाऱ्यांना. 'स्वतंत्रतावाद' 'भांडवलवादी' नाही; 'उद्योजकतावादी' आहे.
 'स्वतंत्रतावाद' विलायती वाण नाही. डार्विनवादी, मन:पूतवादी, भांडवलवादी या साऱ्या परदेशी शिव्यांची खैरात त्याला लागूच पडत नाही.
स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक ३
आध्यात्मिक नव्हे, ऐहिक साधना
 स्वतंत्रता कोणा एका देशाची जायदाद नाही; मनःपूतवाद व भांडवलवाद आणि स्वतंत्रतेच्या आकांक्षांचा काही संबंध नाही हे स्पष्ट झाल्यावरही आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे स्वातंत्र्याची आकांक्षा ही काही आध्यात्मिक चैतन्यवादी प्रेरणा नाही.
स्वातंत्र्याचा अवधूती आविष्कार
 देशासाठी किंवा अन्य ध्येयासाठी गजाआड तुरुंगात कोंडलेल्या कैद्यांनी अनेक काव्यांतून आपले मनोगत व्यक्त केले आहे. आमच्या शरीराला अडकवून ठेवाल, हातपाय बेड्यांनी जखडून ठेवाल; पण आमचा आत्मा, आमचे मन जगभर भराऱ्या घेण्यास मोकळे आहेत, ते तुरुंगाच्या भिंती ओलांडून विश्वसंचार करू शकतात इत्यादी इत्यादी.
 शरीर बंधनात असले म्हणजे शरीर आणि मन यांच्यात काही द्वैत आहे असा आभास म्हणा, भास म्हणा, तयार होतो. अनेक तत्त्वज्ञांनी शरीर आणि आत्मा यांच्यातील भिन्नता आग्रहाने मांडली आहे. शरीर हे खोटे आहे, माया आहे, आभास आहे; शेंबडात माशी अडकून पडावी तसे आत्मा या मायाजालात अडकून पडला आहे; त्यातून सुटण्याची आत्म्याची धडपड आहे; एका जन्मात हे साध्य झाले नाही तर जन्मजन्माच्या तपश्चर्येने जडाच्या बंधनातून मुक्त व्हावे, मोक्ष मिळावा अशी आत्म्याची धडपड चालू असते. ही अशी अध्यात्मवादाची किंवा चैतन्यवादाची मांडणी सहस्रावधी वर्षे राहिली आहे.
 आत्मा विशुद्ध स्वरूपात सर्वज्ञ आहे; त्यावरील जड शरीराच्या आवरणाने अज्ञान तयार झाले आहे. शरीररूपी छिद्रातून सत्याचा वेध घेण्याचा प्रयत्न विफल राहणार, तेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडि-पूंच्या तावडीतून शरीराची मुक्तता केली की मोक्ष प्राप्त झाला; या अशा स्वातंत्र्यासाठीची धडपड हा सगळ्या विश्वाच्या इतिहासाचा खराखुरा अन्वयार्थ आहे ही चैतन्यवादाची मांडणी आहे. मोक्षाची धडपड आणि स्वतंत्रतावादाची धडपड यात सरेआम गल्लत झाली आहे.
 चांगले जगावे, चांगले खावे, चांगले प्यावे, मुलाबाळांचे कोडकौतुक करावे, प्रियजनांचे आराधन करावे, त्यांची मने जिंकण्यासाठी निसर्गदत्त आणि स्वकष्टार्जित सारे वैभव त्यांच्या पायांशी घालावे; मुबलकता असावी, विपुलता असावी अशी सर्वसामान्य जनांची साहजिक इच्छा असते. पण संरक्षण, पोषण आणि प्रजोत्पादन यांकरिता जगणारी माणसे म्हणजे निव्वळ शेणातले किडे; मोहपाशात आकंठ बुडालेले; यांना स्वातंत्र्याची चव कोठून कळावी? सर्व संसाराचा त्याग करून भगवी छाटी गुंडाळून हिमालयात किंवा दुसऱ्या कोणत्यातरी रम्य जागी – जिथे कंदमुळे, फळे इत्यादींवर कष्ट न करता गुजारा होईल अशा जागी रहावे म्हणजे स्वातंत्र्याचे निर्वाणमोक्ष मिळते, ब्रह्मप्राप्ती होते, विश्वाचे गूढ उलगडते असे चैतन्यवाद्यांनी मांडले.
 राजकीय, सामाजिक, आर्थिक वास्तव कसे का असेना, सन्यस्त वैराग्याला त्याचे काय देणे घेणे? खऱ्याखुऱ्या व्यक्तिगत स्वातंत्र्यमोक्षासाठी काही ऐहिक पाया आवश्यक आहे असे या अवधूतांना मान्यच नाही. नेवाशाच्या शेजारील देवगिरीच्या रामदेवरायाने काकाचा वध करून सत्ता मिळविली आणि दूरच्या दिल्लीश्वर अल्लाउद्दिनाने देवगिरीची वाताहत केली त्याचा 'योगियांच्या राजा'वर काहीसुद्धा परिणाम झाला नाही. पुणतांब्यांच्या चांगदेव महाराजांचे गर्वहरण करण्याइतके सुद्धा महत्त्व अल्लाउद्दिनाच्या स्वारीला त्यांनी दिले नाही. 'नेवाशापरतें आळंदी बरें' एवढा व्यावहारिक निर्णय मात्र त्यांनी घेतला!
 बहामनी राज्याच्या पुंडांनी वारंवार सारी गावे लुटून नेली, त्यात विक्राळ दुष्काळ पडला, तुकारामाची पहिली बायको अन्नान्न करीत मेली, पण मोक्षमार्गाच्या यात्रिकाची प्रतिक्रिया 'बाईल मेली, बरे झाले', विठोबाचे नाव घेण्यास आपण मोकळे झालो अशी होती.
 अशा तऱ्हेने योगसिद्धी प्राप्त झालेल्यांनी, त्यांना काय सर्वज्ञान झाले आणि ब्रह्म आकळीले ते आम्हा संसारी जनांसाठी सांगून ठेवले नाही. आपणच मिळविलेले ज्ञान, आपणच त्याची द्वाही फिरवायची, आपणच पेटंट घ्यायचे आणि एक दिवस निघून जायचे असा हा स्वतंत्रतेचा अवधूती आविष्कार!
सांसारिकांचा व्यवहारवाद
 असले अवधूती स्वातंत्र्य आपल्याला झेपणारे नाही, पचणारे नाही, परवडणारे नाही हे संसारी जनांना स्पष्टच होते. म्हणून त्यांनी नागड्याउघड्या, घाणीत लोळणाऱ्या, वेड्यासारखे बडबडणाऱ्या अवलियांचे कौतुक केले, पण भक्तीची तहान भागविण्याचे एक साधन या पलीकडे व्यवहाराच्या कामी त्यांचा फारसा उपयोग नाही, किंबहुना त्यांची सगळी आराध्य दैवतेही अगदीच निकामी याची त्यांना पूर्ण जाणीवही होती. देव प्रसन्न झाला तर कमाल कमाल म्हणजे तो कबीराचे शेले विणतो, कुणाची धुणी धुवून देतो, भांडी घासून देतो, दळण दळून देतो; भूतदयेपोटी सरकारी गोदामे लुटू देणाऱ्या दामाजीसाठी बादशहापुढे जोहार घालतो. पण या असल्या चमत्कारांनी रोजची भूक भागत नाही हे संसारी जनांनी बरोबर ओळखले. त्यामुळे, अवलियांना साष्टांग दंडवत घालावे आणि एरवी सगळा वेळ संसाराच्या विवंचना निपटण्यात काढावा, तो क्रम चालत राहिला.
स्वातंत्र्य-मोक्ष गल्लत
 स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्यांनी मग आपल्या भूमिकेत थोडा कावेबाजपणा केला. 'जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे' असे तुकासुद्धा म्हणाला. 'प्रपंच करावा नेटका' आणि पहिले धर्मकारण असले तरी दुसरे तरी राजकारण असावे हे रामदासांनी स्पष्ट केले. साऱ्या जगभरच्या विचारात एक मोठा बदल घडून आला. सुलतानशाहीच्या अरेरावीत माणसाने मनाचे स्वातंत्र्य प्राणपणाने जपून ठेवावे किती आणि कसे? फाटकी वस्त्रे नेसलेल्या आपल्या पत्नीच्या पदराशी लटकून पोरे भूकभूक करीत आहेत हे चित्र डोळ्यासमोर आले की 'मनस्वी पूंमान्'सुद्धा तोंडातून शब्द फुटत नसता 'देहि देहि' म्हणून भिक्षा मागायला तयार होतात. समाजातील रूढीच्या बंधनाने, आपल्या पोटच्या कोवळ्या वयातील मुलीचे कपाळ पांढरे झाल्यावर तिचे केस कापून तिला विद्रूप करून खाऊ मागण्याच्या वयातच उपासतापास करावयास लावणे भाग पडते हे टाळता येत नाही.
 राजकीय, सामाजिक, आर्थिक बेड्या तोडून जंगलात जाणे आणि हिमालयात जाणे ही क्वचित् एखाद्याची खरीखुरी मोक्षसाधना असेल; पण त्यात पळपुट्या भेकडांची सोय अधिक आहे हे स्पष्ट होऊ लागले तसतसे राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य या आध्यात्मिक स्वातंत्र्याच्या आणि मोक्षाच्या पायऱ्या आहेत, मुमुक्षूनी या पायऱ्या ओलांडल्या पाहिजेत असे आध्यात्मिकांनी म्हणायला सुरूवात केली. स्वातंत्र्य आंदोलनातील बॉम्ब खटल्यातील आरोपी अरविंद घोष मोक्षाचे खरे अधिकारी ठरतात; आणि गांधींसारखा महात्मा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मिठाची चिमूट उचलण्याचा 'अव्यापारेषु व्यापार' करायला सरसावतो; शेवटी उद्दिष्ट तेच; धार्मिकांनी, अध्यात्मिकांनी मांडलेले; शरीराच्या तुरुंगातून आत्म्याला मुक्त करण्याचे. पण मोक्ष साधनेच्या मार्गातील प्राथमिक अडचणी म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, अन्याय, जुलूम, गुलामगिरी, स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा मूलाधार आध्यात्मिक मोक्ष आहे अशी सार्वत्रिक समजूत आहे. स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालाचारी; त्यांचे निकटचे कन्हैयालाल मुन्शींसारखे सहकारी ही सर्व माणसे धार्मिक प्रवृत्तीची. याचा एक दुष्परिणाम असा झाला की स्वतंत्रतावादी तेवढे सारे पुराणमतवादी, उजव्या विचारांचे अशी एक पक्की समजूत होऊन बसली.
 ऐहिक बेड्या तोडून मोक्ष साधना करणाऱ्या मुमुक्षूनी सांसारिक गुलामगिरी तोडण्याचे प्रयत्न पूर्वअट म्हणून करावे आणि त्यांचे त्यांचे स्वतंत्रतेचे वेगळे तत्त्वज्ञान उभे करावे यात काही आपत्ती नाही; पण स्वतंत्रतेचे सर्व चाहते मोक्षमार्गीच असले पाहिजेत, किंबहुना मुमुक्षूखेरीज स्वातंत्र्याची तहान दुसऱ्या कुणाला खऱ्या अर्थाने असू शकतच नाही; असे म्हणणे अतिरेकी होते. सर्वच स्वतंत्रतावादी 'मुमुक्षू' ही उपाधी सन्माननीय पदवी म्हणून स्वीकारणार नाहीत, काहींना तर ती अभद्र शिवीही वाटण्याची शक्यता आहे.
आचरट अध्यात्म
 आत्मा म्हणजे काही चैतन्यमयी ज्योत आहे, ती शरीराच्या कपाटात कोंडलेली असते आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत ती जशीच्या तशी राहते, तीत काहीच बदल होत नाहीत, काय बदल होतील ते शरीरात होतात आणि शरीर मृत्यू पावले की हे चैतन्य उडून पुन्हा दुसऱ्या देहाच्या पिंजऱ्यात जाऊन बसते हा आचरट अध्यात्म आहे. पूर्वासूरीच्या महामुनींनी प्रतिपादन केलेल्या सूत्रांचा हा भ्रष्ट आविष्कार आहे. कर्मकांडावर आपली दिनचर्या चालावी अशा सोयीने पोटभरू धर्मव्यावसायिकांनी हेतुपूर्वक घडवून आणलेला हा गोंधळ आहे. शुद्धस्वरूपी अध्यात्माचा अर्थ असा नाहीच.
 पदार्थविज्ञान शाखेचा एक नियम असा आहे की कोणतीही वस्तू मुळातून नष्ट होत नाही, तिचे फक्त रूप बदलते. उष्णतेची आच लावली तर बर्फाचे पाणी बनते, पाण्याची वाफ बनते, वाफेलाही अधिक उष्णता दाब देता आला तर आणखी काही वेगळे रूपांतर होऊ शकेल. अवयवांना जाणवणारे रूप म्हणजे शरीर बदलले तरी अणुपरमाणू तेच राहिले. त्यांचा विस्फोट झाला तर प्रचंड संहारक शक्ती किंवा ऊर्जा प्रकट होते. अशा विस्फोटाची शक्यता बाजूला ठेवली तर अवकाश व्यापणारी वस्तू अमर असते. 'अविनाशी ते आहे, ज्याने हे सर्व व्यापले आहे' ही उपनिषदांतील आणि वेदांतील अनंत तत्त्वाची व्याख्या आहे. हे शुद्ध विज्ञान आहे. शरीराच्या कपाटात कोंडून ठेवलेल्या प्राणरूपी पक्ष्याच्या आचरट अध्यात्माला येथे काहीच वाव नाही.
स्वातंत्र्य - कष्टप्रद यात्रा
 आत्मा म्हणजे मीपण. मी एका बाजूला आणि दुसरे एका बाजूला सारे विश्व अशी धारणा. असा आत्मा अणुरेणूंपासून सूर्यमालिकांच्या समुच्चयांपर्यंत सर्व वस्तूंच्या बांधणीत असतो आणि शरीर असणे हा मीपणाच्या जाणिवेचा गुणधर्म आहे. शरीराच्या विकासाबरोबर बुद्धीचा विकास होतो, वेगवेगळ्या पातळीवरील मनांचा विकास होतो आणि या सर्वांवर मी विरुद्ध विश्व या आत्मभावनेची देखरेख असते. सम्यक् सत्याचा साक्षात्कार मायेची बंधने दूर केली म्हणजे आपोआपच होतो या कल्पनेतील बाष्कळता आता स्पष्ट होईल. सम्यक् सत्य या क्षेत्राचा अधिकारी कोणी असेल किंवा नसेल हा वादाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवावा. पण असा विश्वरूप पुरुष सोडल्यास आपण सर्व सीमीत क्षेत्रांचेच अधिकारी आहोत; आपल्याला इंद्रिये पाचसहाच, त्या इंद्रियांची झेप मर्यादित आणि त्यांचा मुख्य हेतू संरक्षण, पोषण, आणि प्रजनन; विश्वाचे अवगाहन हा नाही. देहाच्या धिक्काराने ज्ञान वाढत नाही. देहाचे सामर्थ्य आणि आवाका वाढवल्याने कदाचित् काही कणमात्र फरक पडण्याच्या संभावनेचा एक किरकोळ आशाकिरण असू शकतो. कणाकणाने, क्षणाक्षणाने ज्ञानकण जमवावेत, तर्काच्या कसोटीवर घासून पुसून त्यांचा काही अर्थ लावावा; काही अर्थ लागला तर आनंद मानावा. नवीन अनुभवातून जुन्या अर्थाचे अपुरेपण जाणवले म्हणजे पोटच्या पोराला उखळात घालून कांडण्यासारख्या वेदना सहन करून नव्याने काही अर्थ लागतो काय ते शोधण्याच्या धडपडीस लागावे. भारंभार पुरावे असले तरी आपल्या सिद्धांतांबद्दल साशंक रहावे. किरकोळ पुराव्याच्या आधाराने निश्चित मते बनवून त्यासंबंधी अंधश्रद्धा तयार करण्याचा मोह टाळावा अशी ही कष्टप्रद यात्रा कोट्यवधी वर्षे चालली. कालच्यापेक्षा आज थोडे अधिक परिपूर्ण असे सत्याचे आकलन झाले आणि त्याबरोबरच आपल्या अपुरेपणाची अधिक परिपूर्ण जाणीव झाली याचे कौतुक मानावे असा हा वस्तऱ्याच्या धारेवर चालण्याचा खडतर ज्ञानमार्ग आहे. स्वातंत्र्याची आकांक्षा ही आपापल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षेत्राचा संकोच दूर करून ते क्षेत्र थोडे अधिक व्यापक करणे यात आहे.
 या स्वातंत्र्याच्या प्रेरणेला देहाचा तिटकारा नाही, संसाराचे आणि ऐहिकतेचे वावडे नाही. विश्वभराच्या अंधारात मिणमिणती पणती घेऊन पुढे चालणाऱ्या वाटसरूची एक साहजिक इच्छा असते; हातातील ज्योत थोडी मोठी असावी, भणभणत्या वाऱ्याच्या सोसाट्याने ती हेलकावू नये, विझू नये. निदान एक पावलाचा प्रदेश तरी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दिसावा ही स्वतंत्रतावादाची वस्तूवादी प्रेरणा आहे. कोण्या काल्पनिक मोक्षाची तेथे आस नाही. स्वतंत्रतावाद विलायती नाही, मन:पूतवादी नाही भांडवलवादी नाही तसाच तो अध्यात्मवादी चैतन्यवादीही नाही.

(६ ऑगस्ट १९९६)

स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक ४

स्वतंत्रतावाद : स्टेशन नव्हे, मार्ग


बंधनांचे दास
 स्वतंत्रतावादाची सुरुवात बंधने मोकळी करण्यापासून होते; स्वतंत्रतावादाची ही नकारात्मक कल्पनाच काय ती आजच्या माणसास पेलणारी आहे. आज माहीत नसलेल्या बंधनांचा बंदोबस्त कसा करायचा ते काम उद्याच्या पिढ्यांवर पडणार आहे. पाटीलकी, देशमुखी, सावकारकी या बेड्या एका काळी प्रेमळ वाटत असत. आजही निवडणुकीत संस्थानिकांचे पुत्र सिनेमा-नटनट्यांच्या बरोबरीने मते मिळवतात. सुरक्षिततेकरिता, पोषणाकरिता आणि प्रजोत्पादनाकरिता काही बंधने आवश्यक वाटतात, उपयोगी वाटतात; सोयीची वाटतात, एवढेच नव्हे तर सुखद वाटतात. काळाच्या प्रवाहाबरोबर ही बंधनेही जड वाटू लागतील; नकोशी होतील; जाचक आणि असह्य बनतील.
 पण उद्याची बंधने सोडा, आजच जाचक आणि असह्य वाटणारी बंधनेसुद्धा तोडण्यास किंवा मोकळी करण्यास बहुतेकजण नाराज असतात. "जग कसेही, कितीही बदलले तरी मुलीच्या जातीला शिस्त ही पाहिजेच" असे म्हणणाऱ्या आया; मुले नाटकसिनेमास जाऊ लागली की बेचैन होणारे बाप; सिनेमात किंवा दूरदर्शनवर हिंसाचार सहज चालवून घेणारे पण प्रेमाचे प्रदर्शन पाहताच संतप्त होणारे प्रत्येक पिढीतील कृष्णराव मराठे सर्वत्रच आहेत. 'अश्लिल साहित्य' फार बोकाळले आहे; नवीन पिढीला काही धरबंध राहिलेला नाही; मुले विड्या, सिगरेटी, दारू पितात, वाटेल ती शृंगारिक गाणी गातात. मादक द्रव्यांचे सेवन करतात; यामुळे अनैतिकता बोकाळत आहे; आणि या सर्वांवर कायदा करून आणि त्याची कडक अंमलबजावणी करून शासनाने काही जबाबदारी पार पाडली पाहिजे असे बहुतेकांना वाटते.
 स्वस्त लोकप्रियतेसाठी लेखक किंवा कलाकार जनसामान्यांच्या भक्तीविषयांवर आणि समाजनायकांवर चिखलफेक करतात. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्यात तर चुकून एक गालबोट म्हणण्याइतकासुद्धा दोष नाही. असे म्हणून, त्यांच्याबद्दल कुणी काही लिहिले तर शासनाने काही कार्यवाही करण्याची वाटसुद्धा न पाहता लोक हातात डांबराचे डबे, दगड किंवा काठ्या घेऊन उभे राहतात. देवदेवतांच्या जीवनक्रमाविषयी मूळ ग्रंथातील वचने उद्धृत करून कोणी दोष काढले तरी त्यांच्या जीवाची शाश्वती राहत नाही. नैतिक आणि वैचारिक क्षेत्रात काही शिस्त पाहिजे, काही बंधने पाळली पाहिजेत असे सर्वांनाच वाटते. यापेक्षा वेगळे बोलणारे कुचेष्टेचा विषय होतात.
 धार्मिक, सामाजिक नीतिनियम घालून, रूढी पाडून त्यांची सामाजिक बहिष्कार, दंड अशा हत्यारांनी अंमलबजावणी करून नैतिक वैचारिक प्रथा चालू ठेवण्याचे जबरदस्त प्रयत्न पिढ्यानपिढ्या झाले, रूढी संपल्या; दुराचार बोकाळला तर सर्व समाज नष्ट होईल अशी धास्ती पदोपदी घालणारे धर्ममार्तंडही संपले. कायद्याने सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न तर शेकडो वर्षे चालू आहेत. कोणाला संमति-वयाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो; कुणाला द्विभार्या प्रतिबंधन; कुणाला सुलभ घटस्फोट; कुणाला हुंडाबळी; कुणाला दारुबंदी. जो तो आपल्या आवडीचा घोडा घेऊन विधिमंडळ किंवा लोकसभेमार्फत या विषयांवर कायदा करतो आणि कायदा संमत झाला की आपले जीविताचे सार्थक झाले असे मानतो. कायदे रूढीपरंपरांइतकेच निष्फळ आणि अकार्यक्षम ठरले आहेत. पण तरीही बंधने आवश्यक आहेत ह्या विश्वासास कोठे तडा गेलेला नाही.
 कायदेकानूंनी आणि रूढींनी एक गोष्ट साध्य होते; जे होऊ नये आणि ज्याचा प्रतिबंध व्हावा याकरिता हा सारा खटाटोप, ते थांबत तर नाहीच, उलट काही प्रमाणात आकर्षक बनते आणि त्याहीपेक्षा किफायतशीर बनते. दारू हे गरीब देशात अनर्थ घडवून आणणारे व्यसन आहे; दारूने शरीराचा ऱ्हास होतो हे सर्वांना ठाऊक आहे; पण तरीही लोक पितात. दारुबंदी झाली म्हणजे काहीजण चोरून पितात, काहीजण प्रतिष्ठेचा विषय करून पितात; आणि हातभट्टीवाल्यांपासून ते अगदी विलायती मद्ये उपलब्ध करून देणाऱ्यांपर्यंत सर्वांचा धंदा जोरदार चालतो. या एका चोरट्या धंद्यावरच लोक लखपती, करोडपती बनतात. म्हणजे, बंधनांनी आणि कायद्यांनी इच्छित हेतू साध्य होत नाही, इतकेच नाही तर जे टाळायचे तेच अधिक भरभक्कम होऊन बसते. हा सार्वत्रिक सर्वकालीन अनुभव आहे. तरी लोक बंधनांचा आग्रह धरतात.
बंधनवाद्यांची नैतिकता
 कायद्याने किंवा कृत्रिम बंधनांनी सुधारणा घडत नाहीत असे स्वतंत्रतावादी मानतात; कायदा केल्याचे दुःख नाही पण त्यामुळे कायदा मोडणारेही सबळ बनतात आणि सरकारशाहीदेखील फोफावते असे मानतात. त्यामुळे स्वतंत्रतावाद्यांना बंधने नकोत; ते उच्छृखलतेला उत्तेजन देतात; थोडक्यात, स्वतंत्रतावाद म्हणजे अनैतिकतेला पाचारण अशी अनेकांची समजूत आहे.
 जीवाची सुरुवात गर्भाशयात होते. गर्भावस्थेत आईचे सगळे शरीर गर्भाची जोपासना करण्यात लागलेले असते. आई उपाशी राहिली तरी गर्भ उपाशी रहात नाही. पोषणासाठी गर्भाशयातील ते छोटेसे बाळ काहीच प्रयत्न करत नसेल असे नाही; त्याच्या जीवाच्या मानाने ते आकांतही करत असेल. जन्माची वेळ झाली म्हणजे बाळ मोठ्या अनिच्छेने गर्भाशयाच्या बाहेर पडते. आईच्या शरीराबाहेरची सारीच परिस्थिती गर्भाशयातील सुखद उबदार सुरक्षित अवस्थेपेक्षा अगदी उलट. बहुधा या कारणानेच असावे, सर्व माणसांच्या मनात पुन्हा एकदा गर्भावस्थेचा अनुभव घेण्याची सुप्त पण प्रबळ इच्छा कायम राहात असावी. गर्भावस्थेत सगळे काही न मागता मिळाले; शैशव आईबापांच्या लाडाकोडात संपले; बालपणात गुरुजनांनी शरीराबरोबर बुद्धीचीही जोपासना करण्यात मदत केली. तारुण्य आले की गर्भावस्था संपली, आता आपण स्वतंत्रपणे आयुष्याचा अनुभव घ्यायचा आहे ही आकांक्षा बहुतेकांच्या मनात तयारच होत नाही. काही आईवडिलांच्याच छायेत वावरतात; काहींना पराक्रम गाजवण्याची इच्छा असते, पण त्यासाठी कुटुंब, जात, धर्म, राष्ट- यांच्या प्रतिष्ठेचा आधार लागतो. कुटुंबाकरिता जगणेमरणे, राष्ट्राकरिता जगणेमरणे यांतील उदात्तता पिढ्यांनी मान्य केली आहे. सर्व देशातील सर्व भाषांतील सावरकरादि प्रतिभाशाली कवींनी या भावनेला सर्व प्रभावी शब्दांत गुंफले आहे. कुटुंबापासून राष्ट्रापर्यंत समुदायभक्तीमध्ये एक मोठी सोय आहे. पराक्रमाच्या उर्मीला वाव तर मिळावा पण जीवनाचा अर्थ काय, आयुष्य कशासाठी या त्रासदायक प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी पडू नये अशी यात दुहेरी सोय आहे.
 याच प्रेरणेतून बंधनवाद्यांची नैतिकता उद्भवते. नीति म्हणजे काय? नैतिकता ती काय? या प्रश्नांची उत्तरे शोधायला लागले की सारेच निरर्थक निष्फळ वाटू लागते. अशा विफलतेत जाण्यापेक्षा पूर्वजांनी घालून दिलेले नीतिनियम आणि परंपरेने चालत आलेल्या रूढी प्राणपणाने जपाव्यात आणि सुदृढ कराव्यात अशी बंधनवाद्यांची परिस्थिती असते.
 स्वतंत्रतावाद्यांचा विचार थोडा वेगळा आहे. बंधने घालून कायदे करून रोग परवडला पण औषध नको अशी परिस्थिती तयार होते. दारूने, मादक द्रव्यांनी किंवा इतर दुराचारांनी फक्त दुराचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचेच नुकसान होते; बंदी घातल्याने सारा समाज उद्ध्वस्त होतो, ही स्वतंत्रतावादाची धारणा आहे. बंधने उठवल्याने तोटा तर होत नाही, अनेकदा फायदाच होतो. माणसाला मोकळे सोडले म्हणजे त्याची प्रवृत्ती दुराचाराकडेच वळण्याची असते ही बंधनवाद्यांची धारणा खरी नाही. कधीतरी सिनेमातले एखादे अश्लील गाणे ऐकण्यात मजा वाटते, एखादे बिभत्स अश्लिल पुस्तक वाचण्यात किंवा 'खटियावादी' नाटकसिनेमे पाहण्यात गंमत वाटते याचे कारण म्हणजे हे अनुभव दुर्मिळ आहेत. त्यातील दुर्मिळता काढून टाकली आणि चोरटेपणाचे आकर्षण संपवले तर सारीच माणसे दुष्प्रवृत्तच होतील असे मानणे म्हणजे अभिजात साहित्याचा अपमान करणे आहे. कालीदास ही काही कृत्रिमरीत्या लादलेली रुचि नाही. त्याच्या साहित्यामध्ये मनुष्याच्या अत्यंत खोल भावनांना आणि प्रवृत्तींना प्रगाढ प्रतिसाद मिळतो, जो स्वस्त साहित्याच्या आवाक्याबाहेर आहे. पूर्वी स्वीडनमध्ये अश्लिल साहित्यावर बंदी होती आणि साऱ्या बाजारपेठा अश्लिल साहित्याने भरून गेल्या होत्या. कायदा रद्द झाला आणि काही काळ हे साहित्य आणखी फोफावते आहे अशी धास्ती वाटू लागली; पण थोड्याच काळात ही बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. लोक त्याकडे बघेनासे झाले; अश्लिल साहित्यावर बंदी घालावी अशी जोरदार मागणी अश्लिल साहित्याचे लेखक आणि प्रकाशकच करू लागले.
स्वतंत्रतावाद 'ननैतिक'
 इंग्रजीत 'Immoral' आणि 'Amoral' असे दोन वेगळे शब्द आहेत. माझ्या माहितीत मराठीत हा अर्थ श्लेष साधणारे दोन वेगळे शब्द नाहीत. नीतिमत्तेच्या रूढ कल्पनांविरुद्ध जे वागतात ते अनैतिक. पण, जे अनैतिक नाहीत पण समाजातील रूढ नैतिकतेला काही मोठे अधिष्ठान आहे असे मानतही नाहीत; थोडक्यात, जे वर्तनाने नैतिक आहेत पण नैतिकतेच्या संकल्पनांना मानत नाहीत अशांसाठी मराठी सुयोग्य शब्द नाही. अशांना आपण 'ननैतिक' म्हणू. 'अनैतिकता' आणि 'ननैतिकता' यात घोटाळा होता कामा नये.
 स्वतंत्रतावाद 'अनैतिक' नाही, पण 'ननैतिक' आहे. सर्वकाळी सर्वस्थळी लागू पडेल अशी कोणतीही नैतिकता नाही. एकच नैतिक खरे - व्यक्तीच्या विकासाआड कोणतीच बंधने येऊ नयेत. फक्त, स्वातंत्र्याच्या शोधात दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर थोडेही अतिक्रमण होऊ नये ही एकच खरी नैतिकता. वयात आलेल्या दोन माणसांनी परस्परसंमतीने खाजगीत काय करावे हा समाजधारणेचा विषय नाही. नैतिकता कोणा परमेश्वराने किंवा प्रेषिताने लिहून ठेवलेली घट्ट चौकट नाही, स्वातंत्र्याप्रमाणेच नैतिकता हा देखील प्रवास आहे, स्टेशन नाही.
करुणा व कायदा-गल्लत
 बंधने असावीत अशी मागणी सनातनी करतात; अनैतिकतेचा व्यावसायिक फायदा उठवणारे करतात. अनीतिमानांना नरकयातनांची धास्ती घालून पाहिली, कायद्याने शिक्षा देऊन पाहिली, काही साध्य झाले नाही. आता करुणावादी पुढे सरसावले आहेत. दारू पिणाऱ्यांना, मादक द्रव्य सेवन करणाऱ्यांना सहानुभूति आणि उपचारांची गरज आहे; अशा भूतदयावादी विचाराने अनेकांनी जागोजाग मोठी चांगली कामे सुरू केली आहेत. भूतदया ही समाजाची एक महत्त्वाची प्रेरणा आहे. असे काम करणाऱ्यांचे कौतुकच व्हायला पाहिजे. मादक द्रव्यांच्या सेवनाने लोळपोळ झालेल्यांची सेवाशुश्रुषा करणे हे मोठे कौतुकास्पद काम आहे; पण रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी ही थोर मंडळी बंदीच्या कायद्याचा पुरस्कार करतात ही मोठी विचित्र गोष्ट आहे. करुणा दाखवणाऱ्यांनी करुणेच्या क्षेत्रात काम करावे. करुणेचे विषय जितके दिशाहीन, भरकटलेले, विवेकशून्य तितका त्यांचा करुणेवरचा आणि भूतदयेवरचा अधिकार जास्त. करुणावाद्यांनी कायद्याने बंदीची मागणी करणे म्हणजे दोन वेगळ्या प्रज्ञांची गल्लत करणे आहे.
 शैशवात, बालपणात पूर्वापार चालत आलेले, गुरुजनांनी सांगितलेले नियम आचरावेत; शिस्त पाळावी; शरीराला संयमाचा व्यायाम द्यावा; आणि ही सर्व बौद्धिक, मानसिक तयारी खुलेपणे जीवनाचे प्रयोग करण्यात वापरावी. हे प्रयोग करताना, तसे प्रयोग करणाऱ्या दुसऱ्या कुणाच्या पावलाआड आपले पाऊल पडणार नाही याची काळजी घ्यावी; हा स्वतंत्रतावाद आहे. त्यात 'अनैतिकतेला प्रोत्साहन नाही, 'ननैतिकते'च्या यात्रेचे निमंत्रण आहे.
बंधनमुक्ती - पहिली पायरी
 खुली अर्थव्यवस्था ही स्वतंत्रतेची एक प्राथमिक पायरी आहे. बाजारेपठेची व्यवस्था म्हणजे स्वतंत्रता नाही. पण ज्या समाजात माणसाला मालमत्तेचा अधिकार नाही आणि हरघडीच्या उत्पादनात, व्यापारात आणि इतर आर्थिक घडामोडीत शासनाचा कसाही वेडवाकडा हस्तक्षेप होण्याची भीति आहे तेथे स्वातंत्र्य उपजावेच कुठून?
 बाजारपेठेच्या व्यवस्थेचा एक अपरिहार्य परिणाम आहे; बाजारपेठ लोकांच्या गरजा आणि त्यांची उत्पादन-शक्ती यांचा मेळ घालून देते. सतत विस्तारणाऱ्या गरजांच्या क्षितिजांत एक एक गरजेची निकड कमी करणे; त्यासाठी लागणारे उत्पादन घटती उत्पादकता देणाऱ्या कृपण निसर्गाकडून काढून घेणे आणि निसर्गाची कृपणता ओलांडून जाण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे, ऐतखाऊंना नाउमेद करणे हे बाजारपेठेचे अंगभूत गुणधर्म आहेत. अमेरिकन धाटणीच्या भांडवलवादी व्यवस्थेत बाजारपेठेत थोडा कुठे खुलेपणा आला तर तेथील व्यापारी पेठा विविध तऱ्हांच्या मालांनी गजबजून गेल्या, उपभोग्य वस्तूंची रेलचेल झाली आणि फेरीवाल्यांपासून ते महाकाय कंपन्यांपर्यंत सारेच ग्राहकराजापुढे नाकदुऱ्या काढीत आमचा माल घ्या, आमचा माल घ्या अशा जाहिराती, विनवण्या करू लागले.
 नेमकी याउलटी परिस्थिती नियंत्रित अर्थव्यवस्थांत झाली. भांडवलदारी व्यवस्थेत फायद्याच्या अमिषाने गुंतवणुकीचे निर्णय होतात ते व्यक्तीच्या फायद्याचे असतील, पण समाजाच्या फायद्याचे कसे असणार? असा प्रश्न उभा करून, समाजाच्या फायद्याकरिता गुंतवणुकीचे निर्णय नियोजन मंडळातील ढुढ्ढाचार्यांनी करणे आवश्यक आहे आणि त्याकरिता सर्वच संपत्ती, मालमत्ता सरकारी मालकीची असली पाहिजे असे म्हणणाऱ्या समाजवादी देशात नेमके विपरीत तेच घडले. गुंतवणुकीचे निर्णय चुकीचे झाले. गरजेच्या वस्तूंचीदेखील आबदा झाली. पाव, अंडी, दूध, फळे, मांस या चैनीच्या वस्तू झाल्या. भांडवलवादात समाजाच्या उत्पादक शक्तींचा पुरेपूर वापर होत नाही या सबबीखाली उभ्या राहिलेल्या नियंत्रित व्यवस्थेत उत्पादनाचाच पार बट्याबोळ झाला.
कोरड्या पाषाणांचे ब्रह्मज्ञान
 शाळेत मुलामुलांची वादावादी होते आणि रोडकी, खुजी मुले उंच सुदृढ बांध्याच्या सवंगड्यांचीच 'पहिलवान हिरो' म्हणून कुचेष्टा करू लागतात; तसा काहीसा प्रकार बाजारपेठवादी आणि नियोजनवादी यांच्यात घडला आहे. खुरटलेल्या खुज्या वाढीचे नियोजनवादी स्वतंत्रतेच्या चाहत्यांची 'चंगळवादी' म्हणून कुचेष्टा, उपहास करू लागले आहेत.
 खुली व्यवस्था म्हणजे निव्वळ उत्पादन, कार्यक्षमता, स्पर्धा; साऱ्यांची धावपळ अधिक मिळकत कमावण्यासाठी, सारे काही बाजारपेठेसाठी; मनुष्याच्या जीवनात उपभोगाखेरीज इतरही काही महत्त्वाची मूल्ये आहेत, ती स्वतंत्रतावादी मानायलाच तयार नाहीत; केवळ उपभोगावर आधारलेली 'चंगळवादी' व्यवस्था नीतिमूल्ये बिघडवील, पर्यावरणाचा नाश करतील इत्यादि इत्यादि आरोप नियोजनवादी स्वतंत्रतावाद्यांवर करीत आहेत.
 गंमत अशी की हे आरोप करणाऱ्यात कोणी अध्यात्मवादी, गांधीवादी फारसे नाहीत. देशातील मायबहिणींना अंगभर नेसायला वस्त्र नाही म्हणून पंचा नेसणाऱ्या कोण्या महात्म्याने 'चंगळवाद' म्हणून टीका केली असती तर समजले असते. पण आधुनिक पेहराव करणारे, वीज वापरणारे, टेलिव्हिजन पाहणारे, टेलिव्हिजनच नव्हे तर पेजर आणि सेल्युलरही वापरणारे, सदानकदा गाड्यांनी धावणारे; विमानाने उडणारे, पंचतारांकित सभागृहात बसून चंगळवादी म्हणून स्वतंत्रतावाद्यांची कुचेष्टा करू लागले की मोठा विनोदच म्हणायचा! यांचा खरा विरोध उपभोगाला नाही; यांना सारे उपभोग हवे आहेत. पण ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले तर आपले महत्त्व संपून जाईल याची त्यांना धास्ती पडली आहे. उपभोगाच्या विविध वस्तू ज्यांच्या अथक परिश्रमाने तयार झाल्या; रोगराई, आजार यांच्यावर रामबाण उपाय ज्यांनी कठोर तपस्येने शोधून काढले त्यांच्याबद्दल अनादर बाळगून आणि त्यांना गुरुदक्षिणाही न देता उपभोगांची लयलूट आपल्या दारी उभी रहावी अशी ही भामटी भूमिका आहे.
 पूर्वाश्रमीच्या समाजवाद्यांना आणि साम्यवाद्यांना आता चंगळवादाचा एकदम तिटकारा आला आहे. उत्पादनवाढीचा महामार्ग खोलण्याची बढाई मारणाऱ्या मार्क्सवादाचे आपण टाळकरी आहोत हे ते विसरून जातात. संगमरवरी रेल्वे स्टेशने, लोखंडपोलादाचे प्रचंड कारखाने, शस्त्रास्त्रांची प्रचंड निर्मिती करणारी व्यवस्था दर घरटी दोन अंडी पोचवू शकत नाही याची त्यांना शरम, चिंता नाही. 'चंगळवादा'च्या विरोधाचा तो मोठा विजय झाला असे ते मानतात!
कर्म अटळ, उपभोगही अटळ
 'चंगळवाद' हा आरोप आहे तरी काय? माणसाने खा खा करू नये, मी भोगीन भोगीन अशा लालसेचा अतिरेक करू नये. कोणत्याही वस्तूचा आस्वाद हा योग्य मर्यादेत उपभोग घेतल्यानेच होतो. अतिरेक झाला तर अमृतसमान दूधसुद्धा विषप्राय होऊन जाते हे कोणीच नाकारत नाहीत. अतिरेकी उपभोगाचा सतत पाठपुरावा करणारा मूर्खच म्हटला पाहिजे. जीवनाच्या ताटात विविध चवीच्या, रुचीच्या, स्वादाच्या पदार्थांची रेलचेल आहे, त्यात मी फक्त गोड पक्वान्नच खाईन असे म्हणणारा करंटाच समजायचा, दुसरे काय?
 असे अतिरेकी प्रकार सोडले तर उपभोग कमी कसा करता येईल. भारतीय कर्मवादात एक मोठा चलाखीचा युक्तिवाद आहे. कर्म टळतच नाही. तुमची इच्छा असो, नसो, तुम्ही कर्म करीतच राहता. निदान श्वास चालू राहतो आणि शरीराचे इतर चलनवलनही चालू राहते. तेव्हा, कर्माचा संन्यास शक्य नाही असा हा युक्तिवाद आहे. उपभोगाबद्दलही तसाच युक्तिवाद करता येईल. प्रत्येक कर्म हा एक उपभोगच असतो. काही न करता एका जागी सन्यस्त वृत्तीने बसलेला तपस्वीदेखील भगव्या छाटीचातरी उपभोग घेत असतो; बैठकीचे स्थान, व्याघ्रजीन, कमंडलू, झाडाची सावली यांचातरी उपभोग घेत असतोच; हवेचा पाण्याचा आस्वाद घेत असतो आणि काही नाही तरी निदान नग्न निरुपभोगाचा आस्वाद घेत असतो. उपभोग अटळ आहे तो कुणालाच सुटलेला नाही.
उपभोगातील विविधतेसाठी
 पण बाजारपेठेच्या व्यवस्थेत उत्पादन वाढ करून उपभोग वाढवण्यासाठी धडपड चालू असते ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. धडपड उपभोग वाढवण्याची नाही. धडपड विविधता आणि विपुलता वाढवण्याची आहे. तिचा हेतू लोकांना निवडीचे अधिकाधिक स्वातंत्र्य देण्याचा आहे. क्षणोक्षणी उपभोग तर अपरिहार्यच आहे, हे जनावरांच्या बाबतीतही खरे, माणसांच्या बाबतीतही खरे. जनावरात आणि माणसात फरक काय? जनावरे निसर्गाने लादलेल्या अटी निमूटपणे मान्य करतात. निसर्गाने त्यांच्यासमोर जी विविधता ठेवली असेल त्यातूनच निवड करतात. माणूस निसर्गापलीकडे विविधता तयार करतो. निवडीची संधी जास्तीत जास्त वेळा मिळावी, प्रत्येक निवडीत अधिकाधिक पर्याय समोर मिळावेत, त्या पर्यायांचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक असावे, यासाठी ही धडपड आहे. उत्पादनवाढ उपभोग वाढवण्यासाठी नाही, जो काही उपभोग घ्यायचा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आहे.
 'चंगळवादी' याबरोबर 'पर्यावरणविनाशी' अशीही एक शिवी स्वतंत्रतावादाला त्याचे विरोधक देत असतात. समाजवादी रशियाच्या पतनानंतर समाजवादी व्यवस्थाच पर्यावरणाला किती घातक ठरली, आख्खे समुद्र प्रदुषणाने कसे खलास झाले, त्याविरुद्ध बोलण्याची कोणाची हिम्मत न झाल्याने निसर्गाचा कसा विनाश नियोजकांनी केला याचे नवे नवे पुरावे हररोज उपलब्ध होत आहेत. पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच चिंता आहे. या विषयावर बोलणारे फार, पण निसर्गाचे संरक्षण नेमके कशाने होते याबद्दल नेमके शास्त्र काहीच नाही. प्रगतीला विरोध, विकासाला विरोध करणारे स्वत:चाच पर्यावरणवादी म्हणून उदेउदे करून घेतात. निसर्गाच्या रक्षणाकरिता जागरुक जनमत हे एकच साधन आजतरी आशेचा किरण दाखवते आणि जागृत जनमत स्वतंत्र व्यवस्थेतच शक्य आहे. स्टॅलिनच्या राजवटीत जागृत जनमत कुठून यावे?
उपोद्घात -
 स्वतंत्रतावाद शेतकरी संघटनेच्या विचारसरणीचा आरंभापासून पाया राहिला आहे. नियोजन व्यवस्थेचे सर्वात क्रूर बळी शेतकरी, स्वतंत्रतावादाचा झेंडा सरसावून बाहेर पडले. जगभर त्याच्या 'बळीराज्या'ची द्वाही फिरत आहे. भारतातमात्र अजूनही स्वकर्तृत्वावर उभे राहण्याची हिम्मत नसलेले आणि सरकारी दक्षिणांना चटावलेले त्याला विरोध करू पहात आहेत. स्वतंत्रतावाद हे परदेशी वाण आहे, स्वतंत्रतावाद म्हणजे भांडवलशाही, स्वतंत्रतावाद म्हणजे चैतन्यवाद, नैतिक स्वैराचाराचा पुरस्कार आणि चंगळवादाला उत्तेजन अशा बेफाट टीका 'बळीराज्या'चे विरोधक करत आहेत. त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हरघडी येत आहे. सुशिक्षित आंग्लभाषी प्रचारकांनी असले युक्तिवाद केले म्हणजे सामान्य शेतकरी कार्यकर्ता गोंधळून जातो. त्याच्या स्वत:च्या मनातील गोंधळ संपावा आणि स्वतंत्रतावाद आणि 'बळीराज्य' यांच्या विरोधकांना मुद्देसूद आणि चोख उत्तर त्याला देता यावे यासाठी विचारांच्या वेगवेगळ्या बारकाव्यात जाऊन ही मांडणी केली; स्वतंत्रतावादाच्या पाईकांना त्याचा थोडाफार तरी उपयोग होईल अशा आशेने.

(२१ ऑगस्ट १९९६)