<poem>

( गीतिवृत्त )

श्रीगंगे ! भागीरथि ! जाह्नवि ! तुजकारणें असो नमन. श्रम न उरों देसी तूं; स्मरतां करिसी भवव्यथाशमन. ॥१॥

श्रीगंगे ! तूं माता, श्रीगंगे ! तूं पिता, सखा, भ्राता; श्रीगंगे ! तूं सदया, श्रीगंगे ! हरिसि तूं अघव्राता. ॥२॥

कर जोडुनि विनवितसेसं मीं दी, सुदीनवत्सले ! गंगे ! वरदे ! वर दे, जेणें ! श्रीहरिहरसद्गुणींच हा रंगे. ॥३॥

स्मरदहनें विश्वेशें सरिदीश्वरि ! वाहिलीस माथां; तें तव लवहि यश नयेचि श्रीगंगे ! अन्यतीर्थपाथांतें. ॥४॥

जो स्वर्णस्तेयी, गुरुतल्पग, विप्रघ्न, पीतमद्य, जन, म्हणसि, ‘ स्मरणेंहि करो भवें तो नरकभीत मद्यजन. ’ ॥५॥

तापत्रयार्त होउनि, जो येतो शरण तूज गंगेतें, माते ! त्याचें असतें जें कांहीं पाप, सर्व भंगे तें. ॥६॥

हरिहरयशसेंचि, तुझें बहु गोड सुयश सुरपगे ! लागे. कीं तव जळकण सेवुनि, वैकुंठातें सुराप गेला गे ! ॥७॥

स्मरतो तुझिया, जो जन योजनशतदूर, पादराजीवा, त्याही सद्रति देसी, तूं दीनोद्धारसादरा, जीवा. ॥८॥

गंगे ! तव प्रवाहीं मीनमकरभेककछपाहूनी सुरपद लघु कवि मानिति, यांचा सुखलाभ अछ पाहूनी. ॥९॥

कैलासीं वैकुंठीं तव हरिहर करुनि तोय दे वसती. भाट तुझी दुर्गाही, मग न दुजी कोण होय देवसती ? ॥१०॥

अमृताची तूं वापी, म्हणसी तप्ता जनासि ‘ ये बा ! पी. ’ बहुत निवविले पापी, एक त्यजिला न काय गे ! शापी ? ॥११॥

दर्शन या दीनातें देवनदि ! द्रवुनि देचि पाव कसी ? विधुसी, ताप हराया, हो, जालाया अघासि, पावकसी. ॥१२॥

श्रीगंगे ! स्मरले तुज जे, ते केले तुवां अनघ; टाहो भक्त मयूर करितसे; निववाया यासि, तूं घनघटा हो. ॥१३॥

तुज विनविलें यथामति, गंगे ! करुणा करूनि, मज पावें. ज्ञाते म्हणति, ‘ यशातें, स्वप्राणांतेंहि तेंवि न, जपावें. ॥१४॥

जाणसि सर्वहि भगवति ! ; सति ! देखसि सर्व; सर्व आइकसी; जरि न दया करिसिल तूं, विश्वाची म्हणविसील आइ कसी ? ॥१५॥

श्रीकाळभैरवा ! तूं काशीविश्वेश्वरासि, गंगेसी, विनवीं; तव उक्ति नव्हे, इतरांची जेंवि, तेंवि भंगेसी. ॥१६॥

श्रीरामसुतमयूरें, श्रीगंगाप्रार्थनार्थ, या आर्या पाठविल्या काशीप्रति; कीं दीनांच्या जपेचि ती कार्या. ॥१७॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.