गजाननस्तव
श्रीगजवदना देवा ! व्हायासि भवीं गतच्यथ मन, मुनी,
पुरुषार्थसिद्धिकामें, पूजिति भावें तुज प्रथम नमुनी. १
व्हावें शुचि, सेवुनि तव आंगण, पतितें, न तें सदाचराण ?
न वरावे, ध्याया तुज, कां गणपतितें नतें सदा चरण ? २
पुरुषार्थाचीं देसी प्रेमें भजकांस मोरया ! दानें
नच पसरावें मुख, जळनिधिच्या जलदासमोर, यादानें. ३
ऐकावें त्वां प्रभुनें निजवर्णन जें विनायका ! याचें
निजबाळवचन म्हणती पितृकर्ण न जेंवि नायकायाचें. ४
ब्रह्मांडाधार तुझे जरि दिसती हस्त-पाद आखुडसे,
शिखिसिंहवासुकीतें दापीच, त्वद्भयें न आख्य डसे. ५
विघ्न तुला कर जोडिते, सोडिति त्यां, जे त्वदंघ्रि आठविती
स्वजनांतरायशमना ! हरिहरहि तुला निरोप पाठविती. ६
हेरंबा ! अंबा तुज अंकीं घेती, बसोनि पर्यंकीं
हें किति ? परम प्रेमें बससी रतिजानिच्याहि अर्यंकीं. ७
तूं विद्यांचा दाता, अससि, विसावा महेश्वरा ताता,
धन्या दुर्गा माता, प्रसवुनि तुज विघ्नवारिभृद्वाता. ८
तूं सिद्धिबुद्धिभर्ता; देवा ! ब्रह्मांडसृष्टिचा कर्ता,
अमररिपूंचा हर्ता; म्हणता ब्रह्मादिकां न ये वर्ता. ९
विघ्नहरा ! सुखसेव्या ! तूं मण्यवतंस मानिसी दूर्वा
देसी श्री विद्या ती; स्पष्ट म्हणे विधिहि, ‘ हे नव्हे पूर्वा ’. १०
चिंतामणि तूंचि खरा; पर जड जनमहित सर्वथा खोटा
गुणलव यास्तव तव पदपद्मरज:स्पर्शसिद्ध तो गोटा. ११
जडकवि झाले, ध्यातां त्वज्ञ्ज्ञानांकुर, असे सुदंता ! ते
रोमांचिततनु हौनि, जन सेविति सर्व या उदंतातें. १२
वरदा ! श्रीगजतुंडा ! लाजवितें यश तुझें अमृतकुंडा
भक्तातें तव शुंडा म्हणते, ‘ ध्या मज; न आणिका धुंडा ’. १३
ध्यातां विस्मृत निजसुख वरवि, प्राचीन देव दोंदानें
केले तुंदिल, रसना वरविप्राची न दे वदों दानें. १४
तूं परमसुखसुततृप्त स्पष्ट, म्हणुनि अससि नित्य दोंदील
किति म्हणती, ‘ ब्रह्मांडें उदरीं प्रभुवर्य कां न कोंदील ? ’ १५
‘ अभिमतवरदान वरा ’ हें गंडस्थळ तुझें सदान वदे
सुरस अळिकुळास जसें, नतवृंदासहि तसें, सदा नव दे. १६
जी पंचसुरतरुद्युति. हरिसी तूं देव पंचकर तीतें
पावति दास मनें तव पदपद्मपरागसंचक रतीतें. १७
ऐकाया बहु वांछिति संतत तव भव्य कर्ण नवचपळ
म्हणुनच, तुज स्तुतिरता न गमे, नसतां स्ववर्णनवच, पळ. १८
तुजपासुनि भय काळव्याळ मरूरेश्वरा ! सदा पावे
मग कोण प्रबळ इतर ? जे त्वत्तेजें प्रभो ! न दापावे १९
त्वन्नामचि मोहातें नेतें, घेवूनि पाठ, विलयाते
करिशिल दया जयावरि, धन्य पुरुष तोचि आठविल यातें. २०
ज्याच्या शकप्रमुख त्रिदश अशेषहि शिरें पदा शिवतो
गजवदना ! स्वात्म्याहुनि बहु मानितसे तुतें सदाशिव तो. २१
रामसुत मयूर करी, नमुनि, मयूरेश्वरप्रभुस्तवन
या एकवीस आर्यादूर्वा वाहे पदीं, करो अवन. २२
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |