गजानन विजय/अध्याय ९
<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥
लहानावांचून मोठ्याचा । मोठेपणा न टिके साचा । पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणें नसे ॥२॥
आम्ही आहों पतित । म्हणून तुला म्हणतात । पावनकर्ता रुक्मिणीकांत । हें आतां विसरूं नको ॥३॥
परिस लोहाला सोनें करी । म्हणुनी त्याचें महत्त्व भूमीवरी । ओहोळ पोटीं घे गोदावरी । म्हणून म्हणती तीर्थ तिला ॥४॥
याचा विचार करावा । चित्तीं आपुल्या माधवा । दासगणूला हात द्यावा । बुडूं न द्यावें कोठेंही ॥५॥
असो गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर । तो कराया कीर्तनगजर । शेगांवासी पातला ॥६॥
तेथें शिवाचें मंदिर । पुरातन होतें साचार । ज्याचा केला जीर्णोध्दार । मोटे नामक सावकारें ॥७॥
अलिकडच्या श्रीमंताला । मदिराचा कंटाळा । मोटारी क्लब बायसिकला । यांचें प्रेम बहु असे ! ॥८॥
तैसा न मोटे सावकार । श्रीमंत असून भाविक फार । त्यानेंच हा जीर्णोध्दार । केला असे मंदिराचा ॥९॥
म्हणोन मोट्याचें मंदिर । वदूं लागले नारीनर । आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऎका ॥१०॥
त्या मोट्याच्या मंदिरीं । उतरले टाकळीकर कथेकरी । त्यांचा घोडा समोरी । बांधिला होता मंदिराच्या ॥११॥
घोडा अतिद्वाड होता । कोणासही मारी लाथा । समोरून कोणी येतां । त्यास चावे कुत्र्यासम ॥१२॥
तोडी चर्हाटें वरच्यावरी । स्थिर न राहे क्षणभरी । कधीं कधीं कांतारीं । त्यानें जावें पळोन ॥१३॥
खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस । आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥१४॥
लोखंडाच्या सांखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या । त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजी विसरून ॥१५॥
चर्हाटानें कसा तरी । घोडा मंदिरासामोरी । बांधूनिया कथेकरी । निजले जाऊन शय्येला ॥१६॥
रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर । दिवाभीतांचे घुत्कार । होऊं लागले वृक्षावरी ॥१७॥
टिटव्या ' टी टी ' शब्द करिती । वाघुळें भक्ष्या धुंडिती । पिंगळे बसुनि वृक्षांवरती । किलबील करूं लागले ॥१८॥
सामसुम जिकडे तिकडे । बंद झालीं कवाडें । कोठेंही ना दृष्टि पडे । एकही माणूस रस्त्यांनीं ॥१९॥
ऎशा रात्रसमयास । श्रीगजानन पुण्यपुरुष । घोडा बांधल्या ठायास । येते झाले सहजगतीं ॥२०॥
जे जे कोणी द्वाड असती । त्यांना सुधारण्याप्रती । साधुपुरुष अवतार घेती । ईशाज्ञेनें भूमीवर ॥२१॥
औषधाचें प्रयोजन । रोगा निवारण्याकारण । तेवीं द्वाडाचें द्वाडपण । साधुसंत निवारिती ॥२२॥
असो गजानन घोड्यापासी । आले रात्रसमयासी । जाऊनी निजले अति हर्षीं । चहूं पायांत घोड्याच्या ॥२३॥
मुखें भजन चाललें होतें । ' गणी गण गणांत बोते ' । या सांकेतिक भजनातें । जाणण्या कोण समर्थ हो ? ॥२४॥
त्या सूत्ररूप भजनाचा । अर्थ ऎसा वाटतो साचा । गणी या शब्दाचा । अर्थ मोजी हाच असे ॥२५॥
जीवात्मा म्हणजे गण । तो ब्रह्माहून नाहीं भिन्न । हें सुचवावया कारण । गणांत हा शब्द असे ॥२६॥
बोते हा शब्द देखा । अपभ्रंश वाटे निका । बोते हा शब्द ऎका । तेथें असावा निःसंशय ॥२७॥
बाया शब्दें करून । घेतलें पाहिजे मन । तें हें आहे सर्वनाम । शब्दाऎवजीं आलेलें ॥२८॥
म्हणजे मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य । मानूं नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ॥२९॥
' गिणगिण गिणांत बोते ' । कोणी ' गणी गण गणांत बोते , । ऎशीं आहेत दोन मतें । या भजनाविषयीं शेगांवीं ॥३०॥
त्यासी न आपुलें प्रयोजन । आपणा कथेसी कारण । महाराज निजले येऊन । चौपायांत घोड्याच्या ॥३१॥
वरील भजन मुखानें । चाललें होतें आनंदानें । वाटे या भजनरूप सांखळीनें । घोडा बांधूनीं टाकिला ॥३२॥
गोविंदबुवांच्या अंतरीं । धास्ती होती जबर खरी । म्हणून तो वरच्यावरी । उठून पाहे वारूला ॥३३॥
तो ठाण्यावरी घोडा शांत । ऎसें पडता दृष्टीप्रत । गोविंदबुवांच्या चित्तांत । अति नवल वाटलें ॥३४॥
तों आपुल्या मनीं म्हणे । हें ऎसें झालें कशानें । का कांहीं आजारानें । व्याप्त झाला घोडा हा ॥३५॥
म्हणूनी राहिला शांत । हें न काहीं कळों येत । हा ऎसा आजपर्यंत । नाहीं कधीच स्थिरावला ॥३६॥
हें काय आहे तें पहाया गेलें । तों एक माणूस दिसलें । चोहोंपायांत निजलेले । त्या द्वाड घोड्याच्या ॥३७॥
अति निकट येऊनी । पाहूं लागले निरखुनी । तों दिसले कैवल्यदानी । तेथें गोविंदबुवाला ॥३८॥
ते म्हणाले मनांत । घोडा कां झाला शांत । हें कळलें कारणासहीत । मजलागीं येधवां ॥३९॥
समर्थांच्या सहवासें । घोडा शांत झालासे । जेथें कस्तुरी तेथें नसे । दुर्गंधाला थारा कदा ॥४०॥
समर्थांच्या पायांवरी । गोविंदबुवानें अत्यादरीं । शिर ठेविलें निर्धारीं । अष्टभाव दाटले ॥४१॥
मुखें करूं लागलें स्तवन । आपण खरेच गजानन । विघ्नांचे करितसा कंदन । याचा प्रत्यय आज आला ॥४२॥
माझा घोडा द्वाड अती । सर्वही ज्याला भीती । तेथेंच आलात गुरुमूर्ती । हरण्या त्याचा द्वाडपणा ॥४३॥
ह्या घोड्याच्या अचाट खोडी । चालतां मध्येंच मारी उडी । क्षणक्षणा मागल्या झाडी । हा दुगण्या महाराजा ! ॥४४॥
मी गेलों होतों कंटाळून । म्हणूण बाजारालागून । गेलों विकाया कारण । परी न कोणी घेई या ॥४५॥
फुकटही लागलो द्याया । परी न कोणी तयार घ्याया । त्यावरी आपण केली दया । हें झालें फार बरें ॥४६॥
आम्हां कथेकर्याचें । घोडें पाहिजे गरीब साचें । घरामाजीं धनगराचें । नाहीं वाघ कामाचा ॥४७॥
ऎसा झाला प्रकार । घोडें झाले गरीब फार । जडजीवांचा उध्दार । करण्यास स्वामी अवतरले ॥४८॥
घोड्यास म्हणाले, " आतां गड्या । करूं नकोस खोड्या । त्या तेथेंच रोकड्या । द्याव्या अवघ्या सोडून ॥४९॥
तूं शिवाच्या समोरीं । याचा विचार कांहीं करी । वागत जावें बैलापरी । त्रास न देई कवणातें " ॥५०॥
ऎसें त्यासी बोलून । निघून गेले दयाघन । कृपाकटाक्षें करून । पशूही ज्यानें आकळिला ॥५१॥
असो श्रोते दुसरे दिवशीं । मळ्यांत असतां पुण्यराशी । आले गोविंदबुवा दर्शनासी । घोड्यावरी बैसून ॥५२॥
घोडा गोविंदबुवांचा । शेगांवासी ठाऊक साचा । कोश अवघ्या खोड्यांचा । भीत होते त्यासी जन ॥५३॥
तो मळ्यांत आलेला पाहून । लोक बोलले त्याकारण । गोविंदबुवा ही घेऊन । पीडा कशास येथें आला ॥५४॥
मुलें बायका मळ्यांत । आहेत पहा वावरत । तुमचा घोडा करील घात । सहज लीलेनें कवणाचा ॥५५॥
गोविंदबुवा त्यास वदले । तुमचें म्हणणें मीं ऎकिलें । माझ्या घोड्यास शहाणें केले । काल रात्रीं समर्थांनी ॥५६॥
त्यानें खोड्या दिल्या टाकून । झाला गोगलगाईसमान । आतं भ्यावयाचें कारण । कांहीं न उरलें कोणाशीं ॥५७॥
चिंचेखालीं उभा केला । टाकळीकरांनी घोडा भला । चर्हाटावांचूनी राहिला । उभा तो एक प्रहर ॥५८॥
भाजीपाला कोवळा घांस । मळ्यांत होता विशेष । परी ना लाविलें त्यास । तोंड घोड्यानें एकाही ॥५९॥
पाहा संताची केवढी शक्ति । पशूही आज्ञेंत वागती । पत्र्यांत आरंभिली स्तुती । गोविंदबुवांनीं समर्थांची ॥६०॥
श्लोक ( पृथ्वी वृत्त ) अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव-कृपें सुमार्गी वळे ॥
उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
ऎसी स्तुती करून । गेले गोविंदबुवा निघून । घोड्यास आपल्या घेऊन । टाकळी ग्रामाकारणें ॥६१॥
प्रत्येक दिनीं शेगावीं । यात्रा येई नवी नवी । कांहीं तरी धरून जीवीं । हेतु आपल्या श्रोते हो ॥६२॥
त्या यात्रेकरू मंडळींत । बाळापूरचे दोन गृहस्थ । आले कांहीं धरून हेत । समर्थांच्या दर्शना ॥६३॥
पथीं जातां एकमेकां । बोलूं लागले ऎसें देखा । पुढल्या वारीस गांजा सुका । येऊं आपण घेऊन ॥६४॥
कां कीं या गांजावर । समर्थांचे प्रेम फार । तो आपण आणिला जर । तरी कृपा होईल त्यांची ॥६५॥
लोक आणती बर्फी खवा । आपण गांजा नेऊं बरवा । गांठ धोत्रां बांधून ठेवा । ना तरी विस्मृति होईल ॥६६॥
पुढल्या वारीस दोघेजण । आले दर्शनाकारण । परि गेले विसरोन । गांजा तो आणावया ॥६७॥
शिर ठेवितां पायांवरी । आठवण त्यांना झाली खरी । कीं नाहीं आणिला बरोबरी । गांजा तो आपण ॥६८॥
आतां पुढल्या वारीसी । दुप्पट आणूं गांज्यासी । ऎसें बोलून मानसीं । दर्शन घेऊन गेले हो ॥६९॥
पुढल्या वारीस तेंच झालें । गांजा आणण्याचे विसरले । कर जोडून मात्र बसले । स्मृति नसे गांजाची ॥७०॥
तै स्वामीं म्हणाले भास्करासी । पाहा जगाची रीत कैसी । गांठ मारून धोतरासी । विसरती जिन्नस आणावया ॥७१॥
जातीनें आहेत ब्राह्मण । तेच आपुलें भाषण । करिती आपण होऊन । खोटें पहा सर्वांशीं ॥७२॥
ब्राह्मणांचे भाषण । कदा नसावें अप्रमाण । या तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ॥७३॥
द्विजें निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला । ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकले सांप्रत ॥७४॥
बेटे मनीं नवस करिती । आणि हात हालवित येथें येती । अशानें कां पूर्ण होती । त्यांच्या मनींचे मनोरथ ? ॥७५॥
बोलण्यांत पाहिजे मेळ । चित्त असावें निर्मळ । तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ॥७६॥
हे शब्द त्या दोघांसी । अती लागले मानसीं । पाहूं लागले एकमेकांसी । कुतूहल दृष्टीनें ॥७७॥
पाहा केवढें अगाध ज्ञान । आहे यांचें परिपूर्ण । हा जगत्चक्षु गजानन । सूर्यापरीच असे हो ॥७८॥
आपण नवस केला मनीं । तो जाणिला समर्थांनी । आतां येऊं घेऊनी । चला गांजा गांवांतून ॥७९॥
ऎसा विचार करून उठले । गांवांत जाऊं लागले । गांजा आणावयाला भले । तैं महाराज वदले त्या ॥८०॥
आतां शिळ्या कढीप्रत । कां हा उगा आणितां ऊत । सार नाहीं किमपि यांत । मी न हपापलो गांज्याला ॥८१॥
आतां आपण गांजाप्रत । नका जाऊं पेठेंत । मेळ हमेशा बोलण्यांत । ठेवा तुम्ही आपुल्या ॥८२॥
लबाडाचे न हेतु पुरती । ही खूणगांठ बांधा चित्तीं । तुमचें काम झाल्यावरती । मर्जी असल्या गांजा आणा ॥८३॥
पुढील आठवड्यांत तुमचें काम । होईल जा अत्युत्तम । परी कदा न चुकावा नेम । पांच वार्या येथील करा ॥८४॥
कां कीं हा येथें स्थिर । आहे मृडानीपती कर्पूरगौर । ज्याच्या कृपेनें कुबेर । जगीं झाला धनपती ॥८५॥
जा नमस्कार त्यासी करा । गांजा आणावया न विसरा । परमार्थात खोटें जरा । बोलूं नये मानवांनी ॥८६॥
ऎसा उपदेश ऎकून । महाराजांशीं वंदून । घेतलें शिवाचें दर्शन । आणी गेले बाळापुरा ॥८७॥
पुढील आठवड्यामाजी भले । काम त्यांचें फत्ते झालें । तेही गांजा घेऊन आले । शेगावांत वारीला ॥८८॥
त्या बाळापुरची दुसरी कथा । तुम्ही ऎका श्रोते आतां । बाळकृष्ण नामें होता । बाळापुरांत रामदासी ॥८९॥
कांता त्याची पुतळाबाई । परम भाविक होती पाही । दरवर्षी वारीस जाई । पायीं सज्जनगडातें ॥९०॥
पति-पत्नीचा विचार एक । पौष मासीम निघती देख । ओझ्यासाठीं घोडें एक । घेऊनिया बरोबरी ॥९१॥
कुबडी कंथा दासबोध । सवें हें सामान अति शुध्द । साधुत्वाचा नव्हता मद । तयासी कीं चढलेला ॥९२॥
मार्गी चालतां ग्रामांतरीं । प्रत्यहीं झोळी फिरवी खरी । त्या झोळीच्या भिक्षेवरी । नैवेद्य करी रामाला ॥९३॥
पौष वद्यांत बाळापूर । सोडी नवमीला साचार । असे कांता बरोबर । पुतळाबाई नाम जिचें ॥९४॥
बाळकृष्णबुवा हातीं । चंदनाच्या चिपळ्या असती । पुतळाबाई करी साथी । झांज हातीं घेऊन ॥९५॥
रघुपतीचा नामगजर । करी पंथानें निरंतर । शेगांव खामगांव मेहेकर । देऊळगांवराजा पुढें ॥९६॥
आनंदीस्वामीस जालनापुरीं । वंदुनिया जांब नगरीं । जाय तेथें मात्र करी । तीन दिवस मुक्काम ॥९७॥
कां कीं तें ठिकाण । समर्थांचे जन्मस्थान । पुढें दिवर्यास येऊन । वंदन करी गोदेला ॥९८॥
पुढें बीड आंबेजोगाईचे । मोहोरी बेलेश्वर स्वामीचे । पट्टशिष्य समर्थांचे । डोमगांवीं कल्याण ॥९९॥
नरसिंगपूर पंढरपूर । नातेपोतें शिंगणापूर । वाई आणि सातारा । असे जे गडाच्या पायथ्याशीं ॥१००॥
माघ वद्य प्रतिपदेला । तो येऊन पहुचे भला । श्रीसज्जनगडाला । नवमीच्या त्या उत्सवासी ॥१॥
यथाशक्तिप्रमाणें । ब्राह्मणभोजन करावें त्यानें । श्रीस्वामीसमर्थांकारणें । खरा खराच रामदासी ॥२॥
ऎसे रामदासी आतां । होणें कठीण सर्वथा । दासनवमीचा उत्सव होता । परत जाई त्याच मार्गें ॥३॥
ऐसा क्रम चालला । बहुत दिवस त्याचा भला । साठ वर्षें देहाला । गेलीं त्याच्या उलटुन ॥४॥
माघ वद्य द्वादशीस । सोडून सज्जनगडास । निघावें परत जावयास । त्यानें आपुल्या बाळापुरा ॥५॥
असो वद्य एकादशीसी । बसला समर्थ समाधींपासीं । आले दुःखाश्रु लोचनासी । शब्द न त्यासी बोलवे ॥६॥
हे रामदास स्वामी समर्था ! । हे गुरुराया पुण्यवंता ! । माझें शरीर थकलें आतां । वारी न पायीं होईल ॥७॥
जरी बसून वाहानातें । येऊं सज्जनगडातें । तरी तेंही कठीण देसतें । मजलागीं दयाळा ॥८॥
नेम चालला आजवर । आतां पडूं पाहे अंतर । परमार्थासी शरीर । निकोप आधीं पाहिजे ॥९॥
तरीच सर्व घडे कांहीं । हे रामदासा माझे आई । हें म्हणण्याची जरूर नाहीं । आपण सर्व जाणतसा ॥११०॥
ऐशी प्रार्थना करून । निजला शय्येस जाऊन । तों प्रभातकाळीं पडलें स्वप्न । बाळकृष्णबुवाला ॥११॥
स्व्प्नीं म्हणाले रामदास । ऐसा न होई हताश । नको येऊं येथून खास । या सज्जनगडातें ॥१२॥
माझी कृपा तुझ्यावरी । माझा उत्सव बाळापुरीं । करावा तूं आपल्या घरीं । मी येईन नवमीला ॥१३॥
तुला द्याया दर्शन । हें मानीं प्रमाण वचन । आपल्या शक्तीस पाहून । परमार्थ तो आचरावी ॥१४॥
ऐसें स्वप्न पाहिलें । बाळकृष्ण आनंदले । कांतेसह परत आले । बाळापुरास आपुल्या घरीं ॥१५॥
पुढें श्रोते दुसरे वर्षी । काय झालें माघमासीं । त्या बाळापुरासी । तें आतां अवधारा ॥१६॥
माघ वद्य प्रतिपदेस । समर्थांच्या उत्सवास । आरंभ बाळापुरास । बाळकृष्णांनीं घरीं केला ॥१७॥
दासबोधाचें वाचन । रात्रीस हरिकीर्तन । दोन प्रहरीं ब्राह्मणभोजन । धूपार्ती अस्तमानाला ॥१८॥
बाळकृष्णाच्या मनांत । विचार हाची घोळत । पाहूं कसे येतात । स्वामी समर्थ नवमीसी ॥१९॥
बाळकृष्णाच्या वचनांनी । केली गांवकर्यांनीं । आपापसांत वर्गणी । उत्सवा साह्य करावया ॥१२०॥
ऐसा थात बाळापुरा । नव दिवस झाला खरा । नववे दिवशीं दोन प्रहरा । अघटित आलें घडून ॥२१॥
श्रीगजानन साक्षात्कारी । श्रोते तया बाळापुरीं । उभे राहिले दोन प्रहरीं । नवमी तिथी लक्षून ॥२२॥
बाळकृष्णाच्या द्वारांत । रामाभिषेक चालला आंत । लोक झाले विस्मित । गजाननासी पाहूनिया ॥२३॥
म्हणूं लागले बुवासी । उठा उठा हो वेगेसी । तुमच्या दासनवमीसी । द्वारीं पातलें गजानन ॥२४॥
त्यावरी बुवा म्हणाले । गजानन आले बरें झालें । त्याही संतांचे लागले । पाय माझ्या घरासी ॥२५॥
परी आजच्या दिनीं साची । मी वाट पाहतों समर्थांची । त्या सज्जनगड निवासियाची । आतूर होऊन ये ठायां ॥२६॥
त्यांचा मसी करार आहे । मी नवमीला येईन पाहे । ती वाणी असत्य नोहे । ऐसा माझा भरवंसा ॥२७॥
इकडे स्वामी गजानन । द्वारीं उभे राहून । जय जय रघुवीर म्हणोन । श्लोक बोलुं लागले ॥२८॥
श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥ अशी वाणी ऐकतां उठली । स्वारी बाळकृष्णाची ॥२९॥
पाहाती जों येऊन द्वारीं । तों गजाननाची नग्न स्वारी । आजानुबाहु साजिरी । उभी निजानंदामध्यें ॥१३०॥
करण्या गेला नमस्कार । तों रामदास दिसले साचार । हातीं कुबडी जटाभार । रुळत होता पाठीवरी ॥३१॥
भालीं त्रिपुंड उभा साचा । होता गोपीचंदनाचा । नेसलेल्या लंगोटीचा । रंग होता हिरमुजी ॥३२॥
ऎसें रूप पाहिलें । बाळकृष्णा भरतें आलें । प्रेमाचें तें श्रोते भले । नयनी संचले आनंदाश्रु ॥३३॥
तों सवेंच दिसती गजानन । त्याच्या नेत्रांकारण । कुबडी लंगोटी कांहींच न । त्रिपुंड शिरींचा जटाभार ॥३४॥
पुनः त्यानें हताश व्हावें । तों रामदास स्वामी दिसावे । पुनः जों निरखून पाहावें । तों मागुती गजानन ॥३५॥
ऐसी स्थिती झाली खरी । सिनेमाच्या खेळापरी । घोटाळलासे अंतरी । कोडें कांहींच उमगेना ॥३६॥
मग म्हणाले गजानन । रामदासासी प्रेमें करून । नको गांगरूं देऊं मन । तुझा समर्थ मीच असे ॥३७॥
मागें बापा गडावरी । माझीच वस्ती होती खरी । आतां शेगांवाभीतरीं । राहिलों येऊन मळ्यांत ॥३८॥
तुला सज्जनगडीं दिलें वचन । कीं दासनवमीस येईन । मी बाळापुरालागून । ह्यांचे स्मरण आहे का ? ॥३९॥
त्या वचनाची पूर्तता । करण्यास येथें आलों आतां । दे सोडोन अवघी चिंता । मीच आहे रामदास ॥१४०॥
शरीररूपी वस्त्रास । तूं किंमत देतोस । आणि आत्म्याला विसरतोस । याला काय म्हणावें ? ॥४१॥
श्लोक आहे गीतेठायीं । " वासांसि जीर्णानि " तो पाही । ऎसी मुळीं ना भ्रमिष्ट होई । चाल पाटीं बसवी मला ॥४२॥
बाळकृष्णाचा धरून हात । गजानन आले घरांत । एका मोठ्या पाटीं स्थित । स्वामी गजानन जाहले ॥४३॥
बाळापुरीं पुकार झाली । गजानन आल्याची ती भली । मंडळीं धांवू लागलीं । दर्शन घ्याया पायांचे ॥४४॥
रामदासी अवघ्या दिवसभर । करीत राहिला विचार । शेवटीं रात्र होतां तीन प्रहर । स्वप्न पडलें बाळकृष्णा ॥४५॥
अरे गजानन माझीच मूर्ति । हल्लीं तुमच्या वर्हाडप्रांतीं । संशय मुळीं ना धरी चित्तीं । तो धरितां बुडशील ॥४६॥
मी तोच समजून । करी गजाननाचें पूजन । गीतेचें हें आहे वचन । " संशयात्मा विनश्यति "॥४७॥
ऐसें स्वप्न पडल्यावरी । बाळकृष्ण तोषला भारी । मस्तक ठेविलें अत्यादरीं । गजाननाचें पायांवर ॥४८॥
महाराज आपुली लीला । मी ना समर्थ जाणण्याला । तो घोटाळा उकलिला । तुम्ही स्वप्न देऊन ॥४९॥
नवमी माझी सांग झाली । न्यूनता न कांहीं उरली । अर्भकावरी कृपा केली । तेणें धन्य झालों मी ॥१५०॥
आतां कांहीं दिवस । राहा या बाळपुरास । हीच आहे मनीं आस । ती पूर्ण करा हो ॥५१॥
महाराज म्हणाले त्यावर । ऐक माझा विचार । कांहीं दिवस गेल्यावर । येईन मी बाळापुरा ॥५२॥
भोजनोत्तर निघून गेले । स्वामी शेगांवासी भले । रस्त्यानें न कोणा दिसले । क्षणांत पोंचलें शेगांवीं ॥५३॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । सुखद होवो भाविकांप्रत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५४॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति नवमो॓ऽध्यायः समाप्तः ॥ <poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]