ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी.

निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडांव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्याइजे, मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि करिजे.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.