गांव-गाडा/फसगत
गांवमुकादमी उर्फ वतनी ग्रामव्यवस्थेचा वरवर विचार केला तरी एकत्र कुटुंबव्यवस्थेची आठवण झाल्यावांचून रहात नाही. एकत्र कुटुंबांतील बायकामुलांसुद्धां झाडून सारी निदान बहुतेक माणसें जर अंग मोडून काम करणारी, आजें दुजें न पाहणारी, एकदिलाची, शहाणी, व दक्ष असली तर एकत्र कुटुंबव्यवस्थेसारखी व्यक्तीचे, त्यांनी बनलेल्या कुटुंबाचे, व एकंदर समाजाचे, हित साधणारी दुसरी संस्था क्वचितच दाखविता येईल. एकटा मनुष्य कोठे कोठे डोके देईल ? रोजच्या व्यवहारांत देखील त्याला दुसऱ्याचे साह्य घेतले पाहिजे. मग प्रपंच चालविण्यास किंवा प्रपंचासाठी साध्य तो धंदा करण्यास त्याला मदत व सहकार्य पाहिजे हे स्वयंसिद्ध आहे. लाकडाच्या तंगडीचें व कुबडीचें नेट घेऊन चालणारापेक्षा ज्याचे हातपाय आंगचेच आहेत तो किततरी सुखाने, अवसानाने व जलद चालतो ? त्याचप्रमाणे आपली सपिंड नात्यागोत्याची, लाभावीण प्रीति करणारी, जातिवंत कनवळ्याची माणसे दूर करून धंद्यांतील सामान्य हितापेक्षा ज्यांचा दुसरा संबंध नाही अशा माणसांच्या बळावर धंदा करणे धोक्याचे म्हणून तोट्याचे आहे हे कोणीही कबूल करील. हजारों वर्षांपासून आमच्यांत हुन्नरी लोक प्रचंड कारखानदार नसून घरच्याघरी आटोपसर धंदा करणारे झाले आहेत; आणि आम्ही मजुरांच्या पुरवठ्याचा बिकट प्रश्न एकत्र कुटुंबव्यवस्थेच्या जोरावर बराचसा सोडविला आहे. वांटणी झाली म्हणजे सर्व वांटणीदार चाकर न राहतां मालक होतात, आणि एक तर मालकीची सर्व जोखीम त्यांच्यावर पडून त्यांना जरूर तितकी अंगमेहनत होत नाहीं, अगर मालकाचे वारे त्यांच्या अंगांत शिरून त्यांना स्वतः राबण्यापेक्षा हुकमत चालविण्याची जास्त हौस वाटते; व अशा प्रकारे अंगमेहनतीला घरची माणसे अपुरी पडली म्हणजे बाहेरची लावणे भाग पडते. एवंच मजुरांचा प्रश्न उपस्थित होतो. जुनें गेलें आणि नवें हाती आले नाही, म्हणून सध्या खेड्यांत काय किंवा शहरांत काय मजुरांच्या तुटवड्याची तीव्रता कशी जाणवत आहे हे सर्वश्रुत आहे. मजुरी अगर अंगमेहनत चुकविण्याची व दुसऱ्याकडून ती करून घेण्याची प्रवृत्ति वाटण्यावरोबरच, किंबहुना त्यांपूर्वी व त्यांपेक्षा जास्त प्रमाणावर अलीकडे बळावत चालली आहे. तिजमुळे अल्पशा रोजावर ‘काम द्या, काम द्या ' म्हणणारी माणसें ज्या देशांत रेलचेल आढळत, तेथेच आता 'मजूर नाही काय करावें, हे काम पडून राहिले, त्यांत मजुरीने कांहीं हातीं लागू दिले नाही' अशी हाकाहाक ऐकू येते. एकत्र कुटुंब म्हणजे सेव्यसेवकभावाचा सर्वतोपरी अत्यंत सुखकर व उत्तेजक म्हणून स्पृहणीय संगम होय. वाटणीपूर्वी-एक(कर्ता)मालक आणि बाकी चाकर-असे जरी नाते असते, तरी कुटुंबाच्या लाभालाभांत सर्वांचेच हिताहित प्रत्यक्ष असल्यामुळे मालक तोच चाकर आणि चाकर तोच मालक असें आशापूर्ण व जबाबदार ममत्व यच्चयावत् कुटुंबीयांमध्ये निर्माण होते. परंतु हे विसरून घरची बहुतेक माणसें कामाची आंच न धरितां कुचराई, चालढकल करूं लागली, त्यांच्या मनांत प्रतारणेचा प्रवेश झाला, व ती आपल्या पोळीवरच तूप ओढूं लागली, अवश्य तितकें ज्ञान त्यांमध्ये नसले, 'जाईल तर सर्वांचे जाईल, माझें एकट्याचे त्यांत कितीसें जाणार, गळफांस लागला तर कर्त्याचे नरडीला, आपल्यापर्यंत येतो कोण,' अशी एकमेकांविषयीं व कुटुंबाच्या समायिक हिताविषयी बेपर्वाई सुरू झाली, तर एकत्र कुटुंबाची काय गति होते ? एकीकडे त्यांतली मैंद, चुकारतट्ट व खुशालचेंडू मंडळी सावलीत व आरामांत दिवस काढते; तर दुसरीकडे त्यांतले जे मेहनती, शहाणे स्त्रीपुरुष असतात, त्यांना हाडांची काडे आणि रक्ताचे पाणी करावे लागते; कमी पडेल तेथे त्यांनाच उडी घालून खांदा द्यावा लागतो, व प्रसंगानुसार खर्च करून कुटुंबाचें नांव राखावे लागते, आणि कुटुंबीयांची गैरसोय, हाल दूर करावे लागतात. इतके करून पुनः भार ना उपकार. 'आमचेच होते म्हणून आमच्यासाठी धांवले ह्यांत जगविरहित काय केलें, सावध इसमांनी कुतंगळांना आपंगिलें म्हणून काय झालें,' असले तर्कट चालविण्याला सर्व बैठे तयार असतात; आणि अखेर वांटणीची वेळ आली म्हणजे समसमान हिस्सा न घेतां, 'आम्ही अडाणी, आमच्याने काम होत नाही,' असें रडगाणे गाऊन खर्च व कर्ज दुसऱ्यांवर ढकलून रुसून फुगून ते जास्त हिस्सा उपटण्याला टपलेले असतात. जेव्हां आपला व्यवहार आपल्या आपल्यांतच होता, परप्रांतीय व परदेशीय लोकांशी आपला नानाविध संबंध जडला नव्हता, तोपर्यंत जेथला दाणा तेथेच राहून कणसुकाळ होता, माणसांचें घर सुटत नसे, व दूरवर कोणी जात नसे. त्यामुळे एकमेकांचे एकमेकांना अगत्य पडे, व घरच्या, गांवच्या लोकांची दहशत सर्वांना वाटून जो तो काही तरी मर्यादेनें राही. तेव्हां साध्या भोळ्या घरकोंड्या काळांत हा एकत्र कुटुंबव्यवस्थेचा पांगूळ गाडा ओढणे फारसें जाणवले नाही. आतां तशी स्थिति उरली नाही, आणि पूर्वीपेक्षा जो तो अज्ञानाने म्हणा, अनुकरणाने म्हणा, किंवा चिथावणीने म्हणा, आपल्यापुरते पाहूं लागला आहे. धाकट्या भावाला थोरल्या भावांतून फोडून त्याला दौलत मिळवून देतो, अशा थापेवर खोटा भरणा दाखवून त्याच्या मिळकतीची पोकळीस्त खरेदी करून वांटणी झाल्यावर ती पोकळिस्त खरेदीदारांनी खुशाल गिळंकृत करून 'जोग्यांनी जोडलें, आणि कुत्र्यांनी तोडलें' अशा प्रकारचे दाखले शेंकड्यांनी मोजता येतील. हे एक उदाहरण झालें, व ह्यावरून दुसरी सहज ताडतां येतील. तात्पर्य, एकत्र कुटुंबव्यवस्थेचा काळ गेला. आयबछुपायी करून आतां पूर्वीप्रमाणे तिला सर्रास चिकटू म्हटले तर कुटुंबांत आळशी, बेजबाबदार लोक जास्त निघून घरच्या दारच्या आपमतलब्यांचे आयतें साधते व साधेल; आणि ' मेहनती दिलगीर व चोरटे हुशार' अशांतली आपल्या समाजाची स्थिति होईल. एकत्र कुटुंबव्यवस्थेचे आद्य हेतु पुढे ठेवून अलबत चाला, मनुष्य परिपूर्ण प्राणी नाही हे ध्यानात धरून कुटुंबीयांची कसूर क्षम्य मर्यादेत आहे तोपर्यंत ती मनांत आणू नका, त्यांना कळकळीने हात द्या, जिव्हाळ्याच्या स्वकीयांना विनाकारण डावलून परकीयांना जवळ करूं नका, आणि एका दिव्याखाली दहाजण इमानेंइतबारें आनंदाने नांदा. पण केवळ स्वकीय आहेत म्हणून त्यांना निरुद्योगी ठेवून त्यांचा भार युगेच्या युगें वाहण्याने व त्यांच्या दुर्गुणांवर पांघरूण घालीत राहण्याने नुसती कुटुंबहानिच होते असें नाहीं तर समाजावनतिही होते, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा.
गांवगाडा म्हणजे एकंदर गांवचे एकत्र कुटुंब; त्यांत कुणबी हा कारभारी, स्थायिक वतनदार हे कुटुंबीय, आणि फिरस्ते सोयरे किंवा इष्टमित्र असा घाट दिसून येतो. वेळी अवेळी परदेशस्थ-प्रवाशी आमच्या गांवगाड्याचे फार स्तुतिपाठ गात आले आहेत, आणि त्यावरून आम्ही आपली अशी समज करून घेतों की, एका काळी आमचा गांवगाडा म्हणजे मानवी चातुर्याची पराकाष्ठा होती; आणि आतां इनामदार, वतनदार, जातधंदे, वतनें नाहीशी होत चालल्यामुळे त्यांत बिघाड झाला आहे. गांवमुकादमानीत कांहीं वतनदारांची योजना सरबराईकडे असे. कोणी पांथस्थ आला तर त्याची बरदास्त गांवखर्चाने होई. त्याला शिधापाणी द्यावयाचे, व घोडे, गाडी, म्याना, वाटाडे, भोई वगैरे देऊन आपले हद्दीतून त्याची रवानगी करावयाची हा धारा असे. गांवचे उत्पन्न बहुतेक सर्वांना वांटले जात असे, व गांवांतच अनाथ-अपंगांच्या अन्नवस्त्राची सोय लागे. तेव्हां 'दामाशिवाय काम नाही' अशा देशांतल्या पांथस्थांना फुकटच्या पाहुणचाराचे ढेकर देतांना आमचा गांवगाडा स्पृहणीय दिसला, तर त्यांत आश्चर्य तें कोणते ? 'उपर खूप बने, अंदर राम जाने.' गांवकींतील काम व दाम ह्यांचा त्यांनी जरा हिशेब पाहिला असता तर त्यांना असे आढळून आले असते की, गांवचा सर्व भार कुणब्याने आपल्या माथीं मारून घेतला व अडाण्यांच्या कामाचा हिशेब न घेता तो त्यांचा योगक्षेम चालवीत आहे, आणि काम केलें केलें, न केलें न केले, अशा बेजबाबदारीने ते कुणब्याच्या जिवावर दिवस काढीत आहेत. एकत्र कुटुंबांतील कर्ते स्त्रीपुरुष व त्यांच्या छत्राखालचे नातलग ह्यांचा जो संबंध तोच कुणबी आणि अडाणी ह्यांचा होता व आहे. एकत्र कुटुंबांत नाहीं म्हणण्याला जिव्हाळ्याची, आंतड्याकातड्याची माणसें तरी असतात. गांवगाड्यांतील खुंटांत फूट पाडण्यास कुटुंबभेद, जातिभेद, हितभेद वगैरे किती तरी स्फोटक कारणे आहेत. घटकाभर असें मानलें कीं, गांव वसविणारे कुणबी आणि त्यांचे अडाणी सहकारी अगदी जिवास जीव देणारे होते, तरी हा भाव त्यांच्या वंशजांत किती पिढ्या, किती शतकें टिकणार हे गांवगाड्याच्या अभिमान्यांनीच प्रांजळपणे ठरवावें. 'तुझें तें माझें आणि माझें तें तुझें' ह्या भावनेच्या आंखावर गांवगाडा भरला, आणि कुणबी व अडाणी ह्यांची शेत-उत्पन्नांत सरकत ठरली. ही भावना जसजशी कमजोर होईल किंवा युगांतराने कुणब्याला अडाण्यांचा उपयोग कामकमतरतेमुळे, कसबकमतरतेमुळे किंवा कामकुचराईमुळे जसजसा कमी होईल तसतशी ही सरकत तुटली पाहिजे, किंवा तिची आणेवारी तरी फिरली पाहिजे. स्वराज्यांत गांवच्या दरएक बाबतीत जरी सबंध गांव एकजथ्याने जबाबदार धरला जात असे, तरी त्यांत जे कोणी धेंडे असतील ते पुढे होऊन सर्व भार भिडस्त कुणब्यावर घालून गांवची जबाबदारी पार पाडीत. 'गांवापुढे कोठे जावे' असे म्हणून तो स्वस्थ बसे. आणि त्याला कोणी बोल बोलू देत नसे. कधी असेंही होई की, राजाधिकारी, धर्माधिकारी किंवा बंडखोर एखाद्या गांवकऱ्याबद्दल किंवा सबंध गांवाबद्दल गुन्हेगारी अगर लूट गांवच्या पुढाऱ्यांपासून घेत, आणि इतर हिस्सेरशीनें त्याची भरपाई करीत. पण 'राखील तो चाखील ' ह्या वहिवाटीप्रमाणे पुढाईतांच्या पदराला खार न लागतां अशा बाबतीत त्यांचा उलट लाग लागे. त्याचप्रमाणे कांहीं गांवकीचा खर्च निघाला तर तो यथान्याय सर्वच देत, असें घडत नव्हते. संभावितावर त्याचा भार पडावयाचा आणि कलभांड निसटून जावयाचे, असली त्याची हिस्सेरशी सामान्यतः होत असे. कुणबी आणि अडाणी ह्यांच्या बोजांची वाटणी बहुधा कुणब्याला प्रतिकूल होत असे. त्याचे उत्पन्न ढोळेफोड असल्यामुळे त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून देऊन बहुधा अलाय-बलाय अडाणी त्याच्यावर लोटीत. वतनदारांकडे नजर फेंकल्यास हाच नमुना दिसेल. पाळीप्रमाणे पाटील किंवा कुळकर्ण्यांची नेमणूक होते, आणि नेमलेला पाटील किंवा कुळकर्णी वाकबगार नसला तर नातलग म्हणून काहीएक मोबदला न घेतां त्याचे काम त्याच्या हुषार भाऊबंदास ओढावे लागते, आणि त्याजवर पांघरूण घालावे लागते. पाटीलकुळकर्ण्यांची जबाबदारी नेमलेले इसमावर तरी असते. महारजागल्यांची जबाबदारी समस्त महारजागल्यांवर असते. त्यामुळे त्यांपैकी जे विशेष कुचर असतात, त्यांचा घाव जे सालस व भिऊन वागणारे असतात, त्यांना सोसावा लागतो. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी हे असाम्या वांटून घेतात. तथापि त्यांमध्ये जे विशेष तरबेज असतात त्यांच्याकडे त्यांच्या गैरहुषार भाऊबंदाच्या असाम्या जातात, आणि आपले काम नीटनेटके करून घेतात. त्याबद्दल त्यांना पूर्ण मोबदला मिळतो किंवा त्या त्यांच्या असाम्या होतात असे नाही. भाऊबंदकी पेशामुळे त्यांना तसे करता येत नाही. गांवच्या परगांवच्या कोणाही असामीला ते साफ सांगतात की, आम्ही जर आज दुसऱ्याचे वतनावर पाय दिला तर तोही आमच्यावर देईल. मात्र अशा कुळांच्या शेतांत गेल्यास ती त्यांना ठराविक बलुत्याचा काही अंश देतात. कारण मामूल बलुतें-आलुतें त्यांना आपल्या वाट्याच्या कारूनारूंला दिलेच पाहिजे. बहुतेक गांवांना लोहार, सुतार, चांभार, मांग असतांनाही घिसाडी, शिकलकर, कंजारी, कुंचीवाले ह्यांच्या टोळ्यांच्या टोळ्या गांवगन्ना हिंडतात, आणि वर लिहिलेल्या बलुतदारांचे जातधंदे करून आपले पोट भरतात. ह्या वस्तुस्थितीवरून हे उघड होते की, बलुत्यापरी बलुते घेऊन बलुतदार आपली जबाबदारी न ओळखतां कामाची हेळसांड करतात; आणि असामीदारांना आपली गरज त्रयस्थाला पैसे अगर धान्य देऊन भागवून घ्यावी लागते. नावाजलेले कुंभार, न्हावी, परीट आसपासच्या गांवांत गिऱ्हाईकी करून धान्य अगर पैसे कमावतात. तेव्हां कामासंबंधाने पहातां कारूनारूंच्या अडाणीपणामुळे, कुचराईमुळे, अगर व्यापारवृद्धीमुळे त्यांचे कुणबीकीचे काम कमी पडले तरी त्यांच्या बलुत्याअलुत्याचा जो मामूल धारा पडला त्याबरहुकूम ते तें चापून घेतात; आणि आपले काम वेळेवर किंवा चांगले होण्यासाठी कुणब्यांना आपल्या असामीदारांखेरीज गांवच्या किंवा बिछाइती कारागिरांना धान्य अगर पैसे द्यावे लागतात. मुख्य मुद्दा असा आहे की, पूर्वग्रहविरहित मनाने विचार केला तर असें कबूल करणे भाग आहे की, जातधंद्यावर उभारलेल्या वतनपद्धतींत दामाची, कामाची आणि जबाबदारीची वाटणी, समतोल झाली नाही, आणि कधी काळी झाली असल्यास ती गांवगाड्यांत तशी राहिली नाही. तिचें पारडे केव्हांच झुकलें आणि म्हणून खेड्यांतील बहुजनसमाज जो कुणबी त्याला नाहक्क बुडावे लागते.
वतनपद्धतीने वतनदारांची मूळ कामें व हक्क त्यांच्याकडे अव्याहत सर्वांशी चालू राहिले असते तरी म्हटले असते की, 'ताटांत सांडलें काय आणि वाटीत सांडलें काय एकच.' पण तसेंही झाले नाही. समाईक जबाबदारीची समतोल वाटणी न झाल्यामुळे 'बाराभाईंच्या खेती'प्रमाणे वतनदारांची दक्षता कमी होऊन ते स्वहितालासुद्धा पुरते जागले नाहीत. गांवगाड्याचा उपाध्याय ग्रामजोशी व तो ब्राह्मण असतो. सर्व शास्त्रांचे अध्ययन, अध्यापन करण्याचा ब्राह्मणधर्म असल्यामुळे ब्राह्मण सरस्वतीचे कट्टे उपासक झाले. लोक त्यांना प्रतिभूदेव मानीत असल्यामुळे स्वतःचे ज्ञान आणि समाजाचा पाठिंबा ह्यांच्या जोरावर बाकीच्या जातीप्रमाणे ते बहुशा अक्षरशत्रु राहिले नाहीत. तेव्हां शिक्षणाने येणाऱ्या ज्ञानामुळे त्यांनी आपली उपाध्यायवृत्ति अछेद्य ठेवण्याला आणि तिची किफायत दुसऱ्या जातींच्या घरांत जाऊ न देण्याला कांहीं हरकत नव्हती. परंतु त्यांच्या हातून असे झाले आहे काय ? पाश्चात्यज्ञानरवीच्या प्रकाशाने पाऊलवाट दिसूं लागून जातिजातींत नवीन निर्माण होणारे आधुनिक उपाध्याय वगळले तरी प्रत्येक जातीने व धर्माने ब्राह्मणाच्या वृत्तीचे मागेच तुकडे करून ते आपण तोंडात टाकल्याचे दिसून येते. ब्राह्मणाच्या काय आणि कोणाच्याही काय वतनाचा लचका काढण्याला तो काढणाऱ्याला रग, ओघ किंवा हिकमत असली पाहिजे, हे सांगणे नको. 'गोमा गणेश पितळी दरवाजा' हा मार्ग आमच्या स्वराज्याप्रमाणे स्वधर्मालाही लागू पडतो. करामत लढवील त्या 'नराला' आम्ही तेव्हांच 'नारायण' करतो. नखाला माती न लागू देतां देवाच्या नांवावर षोडशोपचार भोगण्याचा धंदा म्हटला म्हणजे तो उपाध्येपणाचा होय; ही गोष्ट सर्व जातींच्या गळी उतरली, आणि हिकमती ब्राह्मणेतरांनी निरनिराळ्या देवतांचे व भक्तांचें स्तोम माजवून उपाध्यायपण पटकविण्याला आरंभ केला. कालांतराने त्यांचे निरनिराळे संप्रदाय ठरून अमुक देवाची अर्चाही अमुक जातीने अगर पंथाने करावी अशी वहिवाट पडली. शिवाची पूजा गुरव, गोसावी, जंगम ह्यांनी; विष्णु, हनुमानाची पूजा बैराग्यांनीं; देवीची पूजा भुत्ये, आराधी, गोंधळी, हिजडे ह्यांनीं; बहिरवाची भराडी, कुणबी, माळी ह्यांनीं; खंडोबाची वाघ्यामुरळ्यांनी; मरेआईची महारामांगांनीं; कृष्णाची मानभवांनीं; कान्होबाची मुसलमानांनी कमाविली. राशीनच्या देवीच्या देवळांत देवीपर्यंत मुसलमान जहागिरदार जातात, आपल्या हाताने प्रसाद अंगारा देतात व देवळांत आपला हक्क उगवतात. पिरासंबंधाने ब्राह्मणापासून तो यच्चयावत् सर्व हिंदूचे उपाध्यपण मुसलमानांनी पटकाविले. हिदु हिजड्यांचा मागता मुसलमान मुंढ्या आणि हिजडे व कसबिणींचा गुरु सवागी (सौभाग्य देणारा) फकीर झाला. (सवागी फकीर आपले स्वतःच्या हातांत हिरव्या बांगड्या भरतात आणि यच्चयावत् कसबिणींकडून दर पलंगामागे कमीत कमी सवा रुपया दक्षिणा घेतात.) आमच्यांतल्या तेहतीस कोटी देवांची व अगणित साधूंच्या समाधींची पूजा सर्वत्र ब्राह्मण किंवा वर वर्णन केलेल्या वर्गाकडेच आहे असा प्रकार नाही. स्थानपरत्वे ती ब्राह्मणांपासून तो भिल्ल, कोळी, रामोशी, महार मांग मानभाव, मुसलमान यांचेकडेही आहे. या स्थाईक उपाध्यायांशिवाय तिरमल, पांगूळ, वासुदेव, कानफाटे, सुपहलवे, गोसावी, बैरागी, मानभव, फकीर वगैरे फिरस्ते उपाध्याय व भिक्षुक निराळे. सारांश, असा एकही धर्म किंवा ज्ञाति नाहीं की जी हिंदूंच्या उपाध्येपणांत व भिक्षुकात घुसली नाही. दरएक जातीचे भिक्षुक प्राचीन काळापासून वंशपरंपरेचे
पुजारी किंवा उपाध्ये, म्हणजे वतनदार बनले आहेत. दर गांवीं असल्या वतनदारांचे व्यक्तिशः उत्पन्न साधारणतः ग्रामजोशाइतके तरी असते. ब्राह्मण ग्रामोपाध्यायांचे उत्पन्न व ब्राह्मणेतर भिक्षुकांचे उत्पन्न अशी वेगळाली काढली तर ब्राह्मणांपेक्षा इतर जातींचे भिक्षुक हिंदूंचा विशेषतः कुणब्यांचा पैसा कितीतरी पटीने ओढतात, अशी खात्री झाल्यावांचून राहाणार नाही. ब्राह्मणवृत्तीकडून वैश्यवृत्तीकडे वळल्यास असें दिसून येते की, दक्षिण प्रांतीं वतनदार शेट्ये, महाजन, नाईक वगैरेंच्या वृत्तीवर लिंगायत, मारवाडी, गुजराती ह्यांनी जे हल्ले चढविले ते त्यांना उलटवितां आले नाहीत, आणि आज रोहिल्यांनी सर्वांना मागे टाकले आहे. लोहार, सुतार, चांभार, या वतनदार कारूंची कामें घिसाडी, शिकलकर, बुरूड, कटारी, मोची वगैरे करतात, आणि जो पैसा वर लिहिलेल्या कारूंच्या घरांत जावयाचा तो ते ओढीत आहेत असें नजरेस येते. भिल्ल, कोळी, रामोशी, महार, मांग, नाईकवाडी, हवालदार वगैरे वतनदार हे पूर्वी गांवचे लष्कर व पोलीस होते. त्यांनी चोर, दंडेल, भटकणारे ह्यांच्यापासून गांवाचे रक्षण करावयाचे. ते त्यांच्याकडून न झाल्यामुळे अनेक परस्थ भिल्ल नाईक, तडवी ( मुसलमान भिल्ल ), ठोके, तोडागिरासिये, व भटकणाऱ्या चोर जाती गांवच्या वतनदार बनल्या; आणि जें उत्पन्न गांवकरी ग्रामरक्षकांना मिळावयाचें तें दुर्जनांना व बंडखोरांना मिळू लागले. इतकी उदाहरणे पुरी आहेत. अशी अवस्था होण्याचे मुख्य कारण हे असावे की, अडाणी वतनदारांना वाटले की, कोणताही बोजा पहिल्याने कुणब्यावर पडणार, व आपल्याला काही दिनचर्येची फिकीर नाही. दुसरे कारण असे दिसते की वतनदारांत जूट व तिने येणारी संघशक्ति राहिली नाही, त्यामुळे त्यांना एका मुसंडीने आपल्या व एकमेकांच्या वृत्तीवरचे मारे परतविता आले नाहीत. तिसरें कारण, काम येवो अथवा न येवो व ते कारू अगर नारू करो अथवा न करो त्यांच्या पोटापाण्याची निचिंती असल्यामुळे त्यांचें ज्ञान मंदावत गेलें; आणि वतनदारांच्या प्रकारांत अपरिमित भरती झाल्याच्या योगाने पहिल्याने कुणब्याचे व मागाहून आपले स्वतःचे किती नुकसान आहे ह्याचे धोरण त्यांना राहिले नाही. काहीं असो, एवढे मात्र खरें कीं, गांव-गाडा मुस्तकीम राखण्यासाठी आम्ही हा जो वतनदारांचा कोट रचला, आणि दुसऱ्याचा आंत रिघाव होऊ द्यावयाचा नाही असा बेत केला, तो सर्व ढासळला.
गांवगाड्याला याप्रमाणे फटी पडत गेल्या आणि त्यांत निष्कारण कोंदाकोंदी व घुसडाघुसड पुष्कळ झाली. तसेच त्याला मूलभूत जी एकत्र कुटुंबव्यवस्था तिच्यांतही ओघानेच द्वैत शिरले. सर्व सपिंड आप्तांनी एकजुटीने उद्योग करावा; मिळालें तें एके ठिकाणी करावे आणि सर्वांनी सुखासमाधानाने एकत्र राहून त्याचा उपभोग घ्यावा; हा मूळचा कयास. परंत आमच्या वांटण्यांना निबंध नाही. पैपर्यंत जंगमाची वाटणी आणि वीतभर तुकड्यापर्यंत स्थावराची वाटणी होते. एकत्र कुटुंबव्यवस्थेमुळे कुटुंबांत रिकामटेकडे पुष्कळ झाले; आणि जात, धर्म, वतन ह्यांनी कामें परोपरीनें वांटून टाकल्यामुळे गांवांत बहुतेक अडाण्यांना पुरतेंसें काम राहिले नाही. त्यामुळे गृहकलह, कलागती व कपटी मसलती ह्यांना चांगला अवसर मिळाला. पूर्वी मुख्य वाटण्या वतनाच्या किंवा स्थावराच्या होत. त्या जितक्या जास्ती होतील तितकें कारूनारूंना अधिक आय मिळणार. गांवगाडा व कुटुंबव्यवस्था अखंड व अभेद्य चालविण्यासाठी जातिभेदाच्या अनुरोधानें वतनें अस्तित्वात आली. सर्वांचा ग्रह असा ठाम झाला की, वतनदारांचे हित-अनहित परस्परांशी व कुणब्यांशी जखडून टाकलें म्हणजे त्यांच्याकडून अयोग्य भेदाला मदत होणार नाही. परंतु जग इतकें सात्विक नाहीं, ब मनुष्यस्वभाव चंचल असतो, हे आम्ही विसरलो. 'जिकडे घुगऱ्या तिकडे उदय उदय.' तेव्हां ज्या पक्षाकडून जास्त नफा त्या पक्षाला बहुतेक वतनदार मिळत; आणि घर फोडीत. जे. डी. मेनप्रभृति युरोपियन ग्रंथकारांचा असा तर्क आहे की, जितक्या वाटण्या जास्ती तितकी श्राद्धे जास्ती झोडण्याला मिळतील, म्हणून घरभेद होण्यास मुख्य कारण ब्राह्मण झाले. किफायतीवरच जर हा कार्यकारणभाव ठेवावयाचा असेल
तर, विभक्त कुटुंबांतून ब्राह्मणांपेक्षा इतर कारूंना पुष्कळ अधिक बलुतें मिळते. ब्राह्मणाच्या बलुत्यास किंवा दक्षिणेस टंगळमंगळ केली तर चालते, पण इतरांशी तसे करून चालत नाही. काम अडते किंवा नुकसान होते. हा फरक लक्षात ठेवला तर वाटण्या होण्याला जास्त उत्तेजन ब्राह्मणेतर कारूनारूंकडूनच मिळाले असले पाहिजे असें बोलणाराचें तोंड धरवणार नाही. कोणाच्या आपमतलबानें वांटण्यांना प्रोत्साहन मिळाले हा प्रश्न गौण आहे. शेत राखण्यासाठी कुपाटी केली व तिने शेत खाल्ले की काय असें विचारल्यास होच म्हणावे लागेल. एकत्र-कुटुंबव्यवस्था कधीही मोडूं नये म्हणून वतनदार गोळा केले, आणि त्यांच्याकडून स्वार्थामुळे ह्या आद्य हेतूचे पालन झाले नाही, हे वतनांच्या आणि वांटण्यांच्या घडामोडी व त्यांत वतनदारांनी दाखविलेली पक्षांधता ह्यांवरून सहज सिद्ध होण्यासारखे आहे. एकत्र कुटुंब-व्यवस्थेचें मूळ आमच्यांत व्यक्तिशः व समुच्चयानें हरएक बाबींत अगदी पाताळापर्यंत गेलें होते. एकत्र राहण्याने एकमेकांची एकमेकांना अतिशय माया लागते; व स्वकीय दुर्गुणी असला तरी त्याला सांवरून धरणे, त्याचे उणे पडून देणे हा आपला धर्म आहे असे लोक समजतात. वांटणी करण्याने कर्त्याचा नादानपणा दिसतो, व कुळाचें नांव जाते, असे सर्वजण मानतात. ह्या व अशाच इतर कारणांमुळे आमच्यांत फार वांटण्या झाल्या नाहीत. सबब कितीही रखडपट्टी झाली तरी एकवट रहावे असे अजून देखील आम्हांस वाटते, व डोळ्यावर कातडे ओढून आमची कुटुंबें एकत्र राहिली आहेत, ह्याचें श्रेय वतनपद्धतीकडे किंवा जातिभेदाकडे फारसें येत नाही.
वतन संपादन करणारे गुणाढ्य असले पाहिजेत, ह्याबद्दल वाद नाही; आणि पुत्रवात्सल्याने त्यांना असेंही वाटले असावें की आपले सर्व गुण यावच्चंद्रदिवाकरौ आपल्या संततीत अबाधितपणाने उतरतील व वाढतील. पण त्यांची ही आशा सृष्टिनियमाविरुद्ध आहे असे मानवी अनुभव सांगतो. गुणोत्कर्षाला महत्त्वाकांक्षा लागते, आणि महत्त्वाकांक्षेला चढ़ाओढीचा लकडा व बक्षिसाचे आमिष लागते. निव्वळ विद्येसाठी विद्या
आणि गुणासाठीं गुण कमावणारा म्हणजे नांवासाठीं मरणारा अवतारी पुरुष विरळा. जात व वतन ह्यांचा आणि चढाओढीचा पुरता दावा आहे. आपली भाकर आपल्याला वंशपरंपरेनें मिळणार, ती कोणी काढून घेत नाहीं, अशी मनाची खात्री पटल्यावर आपला हात, आपलीं हत्यारें, आपला स्वभाव, सुधारण्याची खटपट व दगदग कोण करतो ? बरें, मेहनत करून कसब संपादिलें आणि सुधारणा केली, तरी मामूल वहिवाटीपेक्षां गुणांप्रमाणें जास्त बलुतें देऊन गुणांचें चीज कोण करणार ? अंधेर नगरी बेबंद राजा, टका शेर भाजा और टका शेर खाजा या दोहऱ्यांत वतनी पद्धतीच्या मेहनतान्याचें चांगलें वर्णन आहे. दुनियेभर निरखाच्या बाबतींत लोक वहिवाटीलाच धरून बसतात, आणि मामूलपेक्षां कोणी जास्त मागू लागला तर विचार न करितां ते रागावतात. युरोपियन बुटाला लोक ५|६ रुपये देण्यास कुरकुरत नाहींत. पण कातडें महाग झाल्यामुळे गोविंदा चांभारानें जोड्याबद्दल अनादि काळापासून चालत आलेल्या किंमतीपेक्षां चार दोन आणे जास्त मागितले कीं लोक लागले त्याची निर्भत्सना करण्याला,कां तर दोघेही वतनदार, ह्याचा परिणाम कसबी लोक आणि त्यांचे धनी या दोघांनाही म्हणजे सर्वदेशाला अनिष्ट झाला आहे. कलाकुसरी वाढेल तर माणसांच्या सुखांत भर पडेल. ती वाढविण्याला कसबी लोकांना लकडा व आमिष नसल्यामुळे आमचे ज्ञानाला रुणा लागला, आणि प्रत्येक पिढी असें गाणें गात राहिली कीं वडिलांचें हरएक बाबींत ज्ञान, सामर्थ्य, अधिकार कोणीकडे? आतांच्या दिवसांत तसे पुरुष राहिले आहेत कोठं ? पुराणुांतल्या कथा खऱ्या मानल्या तर अशी कबुली द्यावी लागेल कीं, आमचे कौशल्याला व शक्तीला एकसारखी उतरती कळा लागली, आणि ह्याचें कारण जातिधर्मात व वतन पद्धतीत मनुष्याचा आळशीपणा, आशाळूपणा, आपमतलबीपणा वगैरे हीन गुणांचा पुरता हिशेब धरला नाही, हें असावें. गतकुळी पड जमिनीची कोणी निगा करीत नसल्यानें ज्याप्रमाणें तिच्यांत एकादें झाड चुकून वाढतें, पण बाकी सर्व मूठ मूठ वीत वीत उंचीचीं झुडपें दिसतात; त्याप्रमाणे दैन्य व अपेष्टा पत्करून चढाओढ नसतां केवळ उपजत अंगस्वभावाने ज्यांनी गुण संपादन करून कीर्ति मिळविली असे हरीचे लाल वतनदार कसबी लोकांमध्ये फार थोडे निघाले. आम्हांला कोठे जावयाचे आहे राजधानीत? वडिलांची वाकळ खाऊन खेड्यांत भरावयाचे, वडील काय कमी शहाणे होते ? जेवढी शक्य तेवढी चतुराई व सुधारणा त्यांनी करून ठेविली आहे, त्यांनी पोटापुरतें शिकविलें तेवढें बस्स आहे, असे म्हणणारे बहुतेक निघाले व निघतात. त्यांना वाडवडिलांचें चातुर्यसुद्धा जतन करण्याची मारामार पडली, तर नवीन कोठून येणार ? त्यामुळे झाले काय की आमची शेती, तिची आउतें, आमचे सामानसुमान आणि कसबी वतनदारांची हत्यारे ही हजारों वर्ष जशीच्या तशी राहिलीं, किंबहुना ती एकसारखी कमकस होत गेली; पण त्यात सुधारणा म्हणून झाली नाही हे मात्र खात्रीने सांगता येईल. ही अधोगति येथेच थांबती तरी बरें होतें. आमच्यांत सुधारणा झाली नाही इतकेच नव्हे तर दुसऱ्यांनी केलेली सुधारणा हस्तगत करण्याची ही मारामार हाऊन बसली. सुधारलेले नांगर, पंप, शेतकरी कां घेत नाहीत व श्रीमंत होत नाहीत ह्या गोष्टीचा आम्ही डोके खाजवून खाजवून विचार करतो. पैसा कोणाला नको आहे! पण शेतकरी विचार करतात की, ह्या सनंगांचा खिळा निघाला तर तो बसविण्याची पात्रता गांवच्या वतनदार मिस्तरीत नाहीं; तेव्हां उठल्या बसल्या कोठे जा मुंबईस ? त्यांत असली पात्रता नसली तरी त्याचे बलुते कमी पडत नाही. मग त्याने तरी ती अंगी आणण्याची यातायात कां करावी ? ज्या शक्तीचा किंवा अवयवांचा प्राणी उपयोग करीत नाहीं ता शक्ति व ते अवयव केवळ निरुपयोगाने लोप पावतात, असा सिद्धांत आहे, तेव्हां हजारों वर्षे जर आम्ही आपली कल्पना चालविली नाही, तर ती लुप्त झाली; आणि आमच्यांमध्ये नवीन शोध, क्लुुप्त्या, योजना बहुतकाळ झाल्या नाहीत व होत नाहीत, आणि दुसऱ्याने केलेल्या सुधारणांचं आकलन व ग्रहण आमचेकडून होत नाही, ह्यांत नवल मानण्यासारखें कांहीं नाहीं. घाण्याभोवती जसा डोळे बांधून बैल एकसारखा फिरतो, त्याप्रमाणे जातकसबी लोक वडिलांनी दाखविलेल्या वाटांनीं चालत
आले आहेत. सुधारणा घडून येण्यास व्यक्तिवैचित्र्यास पूर्ण वाव पाहिजे. तो संप्रदाय-प्रधान वतनी पद्धतींत कसा मिळावा ? वडिलांनी जे हत्यार पांच बोटांनी धरलें तें जर कोणी तीन बोटांनी धरूं लागला तर बाकीचे त्याचा उपहास करतील, इतकेच नव्हे तर त्याला पाण्यांत पाहून वेळेला जातीबाहेर टाकतील, अशी वतनी कसब्यांची स्थिति आहे. मातकामाला वड्डरांची हत्यारे चांगली. असें सर्वजण पाहतात. परंतु इतर जातींचे लोक मातकाम परंपरेच्या निकामी हत्यारांनी करतात. सरण डोक्यावरच महारांनी वाहिले पाहिजे, अशी रूढि आहे. तेच दुसऱ्या जातींच्या गरीब मजुरांनी किंवा गाडीत घालून नेलें तर वाहतूक कमी पडेल. पण तसे करता येत नाही. दोन शिंवांशेजारच्या गांवांत आणि घराशेजारच्या घरांत भिन्न रूढि दिसते, आणि ती पिढ्यानपिढ्या पाळावी लागते. तिच्याविरुद्ध चालतां कामा नये. जातिधर्मानें हिंदी समाजाला रूढीचे गुलाम केलें व वतनपद्धतीने हा दोष जुलूम वाढविला. सर्कस व जादूगिरीचे उदाहरण घेऊ. गोपाळ, कोल्हाटी, ह्या कसरती जाती, वाघ अस्वलांचा खेळ करणारे दरवेशी, बैलांचा खेळ करणारे तिरमल, व माकडांचा खेळ करणारे कुंचीवाले, चित्तर वगैरे पाखरांचा खेळ करणारे फांसपारधी, नाग, धामीण, व नजरबंदीचा खेळ करणारे मदारी व मांगगारोडी ह्या आमच्यांतल्या सर्कस व जादूगिरी करणाऱ्या वतनदार जाती होत. ह्यांशिवाय मराठे, मुसलमान, चाबुकस्वारीचे काम करतात. विचार करा की, व्यक्तिवैचित्र्याला पूर्ण मुभा असती, तर युरोपियन सर्कसची सर्व कामें करण्यास ह्यांना कितीसे अधिक श्रम करावे लागले असते ? पण ती नसल्यामळे यरोपियन व एतद्देशीय सर्कसवाले खोऱ्यांनी पैसे ओढतात. आणि हे गांवोंगांव खळी मागत व चोरीत हिंडतात. आमच्या घरांतला पैसा परप्रांती किंवा परमुलखी खेचणासऱ्या कोणत्याही कला घ्या. त्या आमच्यांत नाहीत, असें नाही. त्या आमच्यांत आहेत. पण निःस्नेह वतनी पद्धतींत व कोंदट जातिधर्मात व्यक्तिगुणाचा परिपोष हजारों वर्षे न झाल्यामुळे आमच्यांत त्या अगदी निकृष्ट व जर्जर
स्वरूपांत आहेत, आणि इतर राष्ट्रांमध्ये चढाओढ व योग्य मोबदला ह्यांनी त्यांचा परिपोष केल्यामुळे त्यांना जोमदार व मोहक स्वरूप प्राप्त झालें आहे असे दिसून येईल.
गांवगाडयाची भरती करण्यामध्ये असा प्रधान हेतु स्पष्ट दिसून येतो की, सर्व प्रकारच्या हुन्नरी लोकांना स्थावरामध्ये गुरफटून घेऊन, व गांवांत वंशपरंपरेचे उत्पन्न मिळण्याची त्यांची तरतूद करून देऊन ज्याचे त्याचे अखंड लक्ष आपापल्या कलेकडे लावावें म्हणजे गुणपोषण व गुणवृद्धि साधेल, आणि त्यांचा फायदा गांवाला मिळेल. वतनवृत्ति देऊन गांवगाड्याने सर्व हुन्नऱ्यांना निर्धास्त केलें खरें, पण आद्य हेतूप्रमाणे ते चालतात किंवा नाही ह्याची चाळणा करण्याचे सोडून दिले. ह्या हलगर्जीपणामुळे कामकऱ्याकडे लक्ष न पुरविणाऱ्या धन्याचे चाकर ज्याप्रमाणे काम न करता आपला रोज मात्र खरा करतात, तशी गांवगाड्याची अवस्था झाली, व खेड्यांतले हुन्नरी बहुतेक कवडीमोल झाले. आपल्या कसबांत ज्यांला डोके काढतां आलें त्यांच्या गुणांचे चीज गांवांत होईनासे होऊन ते गांव सोडून द्रव्यार्जनासाठी परगांवी जाऊ लागले. 'ज्या गांवीं भरेल पोटाचा दरा तो गांव बरा.' पूर्वीच्या अमदानीत आताप्रमाणे व्यापाराचा फैलाव नव्हता, तेव्हां चांगले कसबी बहुतेक राजधान्यांत लोटत. तेथे त्यांना राजाश्रय व महदाश्रय मिळे. ह्या वैश्ययुगांत राजाश्रयाची जागा व्यापाऱ्यांनी पटकावल्यामळे आतां खेड्यांतले चुणचुणीत व खणखणीत लोक शहरचा रस्ता सुधरतात, व ज्याच्या अंगी विशेष वकूब नाही, असेच लोक खेड्यांत राहून आपला प्रपंच करतात. वतनाच्या आमिषाने खेड्यांत कसबी लोक डांभून ठेवून कसब जतन करण्याचा व ते वाढविण्याचा जो आद्य हेतु तो कदीमपासूनच नष्ट झाल्या सारखा आहे. कर्तव्यो महदाश्रयः ह्या तत्त्वाचे अवलंबन करून पाटील कुळकर्णी ग्रामजोशी ह्यांनी शहरें पाहिली. सोनार, सुतार, लोहार, कासार, कुंभार, चांभार, महार, मांग वगैरे सर्वांनी हाच पंथ धरला. खेडे सोडलेल्या लोकांना जास्त पैसा मिळतो एवढे मात्र खेड्यांत राहिलेल्या
लोकांना चटकन दिसते, पण त्यांची करामत-मेहनत मात्र पुरती दिसत नाही. खेड्यांत राहून त्यांच्या बरोबरीने आपली किफायत कशी होईल, ह्या विवंचनेत ते सदैव चूर असतात. खेड्यांत राहूनही गुणश्रेष्ठत्वानें मनुष्य भरभराटीस येईल. परंतु फार काळापासून खेड्यांत तळावर गळाठा राहत आला आहे. त्यांच्यांत सद्गुण यावेत कसे व कोठून ? गोकळ अष्टमीच्या सुमारास काही ठिकाणी उंच लटकावलेली दही-हंडी फोडण्याचा उत्सव होत असतो. तेथे चढून जाऊन दहीहंडी पहिल्याने फोडण्याचा मान मिळण्यासाठी पुष्कळ तरुण लोक धडपड करतात. ती अशीः-जो पुढे चढून जाऊ लागतो, त्याला खाली ओढून दुसरा वर जाऊ लागतो. याचप्रमाणे तिसरा चवथा पांचवा करतो, आणि अखेर सर्वांना खाली आणून चढून जाण्याचें ज्याला साधतें, तो सदरहू मान पटकावतो. हाच नमुना खेड्यांतले लोकांचा दिसून येतो. सर्व कारूनारूंमध्ये आपसांत भांडणे चालू असून हा त्याचे घर घ्यायाला पाहतो, व तो याचें घर घ्यायाला पाहतो. त्यांची भाऊबंदकी इतरांनाही भोवते. गांवांत तट पडून दुष्टावा सुरू होतो, आणि परगोटांतल्या लोकांच्या आगळिकी चालतात. ह्यांत त्यांचा सर्व काळ जाऊन ते आपापली कामें नीट व वक्तशीर करीत नाहीत. ज्यांचे काम न केले तर उत्पन्न बुडेल अशी भीति असते, तेवढ्यांचेच काम कारूनारू करतात, आणि गरीब बिनबोभाट्यांच्या असाम्यांना धाब्यावर बसवितात. अगोदरच कसब कमी, त्यांत चांगले कसबी शहरांत जातात, आणि राहिलेल्या गळंग्यांत आळस चुकारपणा ह्यांची भर पडल्यावर-खेड्याचा ज्ञानप्रवाह कसा जिवंत राहणार ? तो केव्हांच आटला आणि आमच्या पूर्वजांनी किती दिवसांपूर्वी तरी आम्हांस बजावून ठेवलें कीं यदीच्छसि मूर्खत्वं ग्रामे वस दिनत्रयं । नवीनस्यागमोनास्ति श्रुतपूर्वं विनश्यति ॥ तळ्यामध्ये खडा टाकला म्हणजे जरी पहिले वर्तुळ खड्याभोंवतीं होते, तरी त्याच्याभोंवतीं दुसरें, त्याच्या भोंवतीं तिसरे असें होतां होतां अखेर सर्व तळ्याभर वर्तुळे होतात. तीच स्थिति समाजाची आहे. समाजाच्या
निरनिराळ्या अवयवांतील गुणावगुण सर्व समाजभर पसरतात. 'आपलेच ओठ आणि आपलेच दांत' व 'तोंड दाबून बुक्कयांचा मार' असली तक्रार झाडून सर्व जातींचे व सर्व धंद्यांचे गांवढेकरी परस्परांविरुद्ध करतात. ज्यांना पोटभर काळी आहे, असे कुणबी थोडे. तितकी नसणारे फार. अशांमध्ये ज्यांना जास्त प्राप्ति मिळण्याचा संभव आहे, ते गांव सोडतात, आणि बाताबेताच्या अकलेचे गांवीं राहतात. आपणांला जरी ते खेड्यांच्या इतर लोकांप्रमाणे साधे, भोळे, भाबडे, आर्जवी, बावळट व कमअकली दिसले तरी त्यांच्या विशिष्ट कसबात तें त्याप्रमाणेच दगलबाजी करतात. आणि भाऊबंदी पेशाने (मत्सराने) त्याना पूर्ण पछाडले आहे. सारांश, फुकटखाउपणाचे सर्व अवगुण अडाण्यांत जसे शिरले तसे अखेर ते कुणब्यामध्येही उतरले. चौकोनी चिरा बनविण्यासारखी परिस्थिति जातिधर्माने व वतनी पद्धतीने गुदमरली म्हणून कुणबी व अडाणी ह्यांचे सर्वसामान्य ज्ञान अगदी शून्यावर यऊन बसले. तसेच अनेक शतकांच्या गुलामगिरीमळे दुसऱ्याच्या पागोट्यावर नजर ठेवण्याची खोड त्यांना लागली. आणि स्वाभिमान व प्रामाणिकपणा नष्ट झाला. शेतकऱ्यांचे दावे आपसांत तोडण्यासारखे लवाद गावमुनसफ खेड्यांत मिळत नाहींत ते ह्यामुळेच. हा त्यांचा दोष नव्हे. जातिधर्म व त्याचे अपत्य वतनपद्धति ह्यांचा हा दोष आहे. साध्याभोळ्या समाजापुरतेच का होईनात, पण तितके सुद्धा समाजिक व वैय्यक्तिक गुण असणारे सुधे लोक खेड्यांत आढळत नाहीत. तेंव्हा वतनपद्धतीची चाळणा करून गुणश्रेष्ठ लोकांना त्यांच्या गुणाप्रमाणे
शक्य तितकी किफायत खेड्यांत होईल, अशी परिस्थिति निर्माण केल्याशिवाय खेडी ऊर्जितावस्थेस येणे अशक्य दिसतें.
इतकं असूनही वतनपद्धति जर स्वस्त असती तर अजूनदेखील तिला ओव्या गायल्या असत्या. पण तशांतलाही प्रकार नाही. वतनदार पाटील-कुळकर्णी ह्यांचे काम सरकारला थोडेसें स्वस्त पडत असलें, तरी त्यांजकडून वेळच्या वेळी पाहिजे तसें काम बिलकुल होत नाही. म्हणून
मुदतशीर, चांगले व खरें काम करणारे लोक त्यांच्या जागी आले तर त्यांत एकंदर जनतेचा व सरकारचा निरंतरचा फायदा होईल. महारजागल्यांचा रयतेला आतां तादृश उपयोग नसतांना ते फुकट पोसावे लागतात; आणि त्यांनी जे काळीपांढरी राखण मामूलप्रमाणे करावयाचें तें सिंधी, कोल्हाटी वगैरेंकडून मोलाने करून घ्यावे लागते. कारूनारू जें काम करतात, तें रोकडीने केले असतां किती बचत होईल, ह्याबद्दल बलुतें-आलुतें ह्या प्रकरणामध्ये माहिती दिली आहेच.साधारणतः नवीन सनंगें करण्याला जितका खर्च येतो, तितक्या किंमतीचे मुख्य बलुतें कारूनारूंना डागडुजीप्रीत्यर्थ वर्षानुवर्ष द्यावे लागते. रोखीने हजामत केली तर दर डोकीला खेड्यांत सरासरीने सहा ते दहा आणे साल पडते; पण त्याच कामासाठी न्हाव्याला बलुतें रुपया सवा रुपयावर द्यावे लागते. एका गृहस्थाने आपले गड्याला सुतारकी लोहारकी शिकविली. त्याला ही कामें बलुत्यापेक्षा फार स्वस्त पडतात असे कळते. कारूनारू चालढकल व चाळवण्या करतात तेंखेरीज. रोखीने कोणी कुऱ्हाड करण्यास किंवा हजामत करण्यास किंवा आसूड सांधण्यास आला तर लोहार, सुतार, न्हावी, चांभार असाम्यांचे काम एकीकडे सारून रोकडीच्या गिऱ्हाइकाचे अगोदर करतील. कारूनारू आपल्या असाम्यांचे व गांवकीचें जें काम करतात त्याला 'गांवगुंडकी' किंवा 'बोभाटा' म्हणतात. त्यांचे आपापल्या कामांत किती लक्ष असते, व त्याची योग्यता ते किती समजतात, हे या शब्दांवरून सिद्ध होते. गांवगुंडकी म्हणजे फसवेगिरी आणि बोभाटा म्हणजे तक्रार. तेव्हां ज्या कामावर आपले पिडयानुपिढ्या पोट चालतें, तें मन लावून काळजीकाट्यानें न करतां तक्रार न होण्यापुरते करावयाचें अशी त्यांची पिढीजाद समजूत आहे. किरकोळ बाबतींत कोण तक्रार करतो ? त्यामुळे त्यांचे आयतेच साधते. आणखी असे आहे की, सर्व कारूनारू आपापल्या कामांत बहुधा तरबेज नसतात, आणि असाम्यांची पिढ्यानपिढ्या रखडपट्टी व उधळपट्टी चालते. कुग्रामवस्ती नको म्हणतात ती एवढ्यासाठीच. पैसा व श्रम ह्यांत कमी पडत नाही.
उलट सरसकट हिशेब जुळविला तर अधिकच पडते अशी खात्री होईल. पण मोबदला मात्र कारूनारूंकडून अगदीं खोटा व महागाचा मिळतो. त्यांना सध्या जी प्राप्ति होते ती त्यांच्या अकलेच्या, उद्योगाच्या मानाने बरीच अधिक आहे. ह्याला प्रत्यंतर, हक्क सोडून रोखीने काम करण्याला एकही वतनदार कबूल नाही. लोहार, सुतार, चांभार, न्हावी वगैरे बलुतें सोडण्याला नाकबूल आहेत. त्याचप्रमाणे पाटीलकुलकर्णी (दुमाला गांवचे) व महार जागले. दुष्काळापासून कुणबी खरकला तो सांवरत नाही. कारूनारुंची स्थिति कुणब्यापेक्षां पुष्कळ बरी आहे, इतकेच नव्हे तर त्यांपैकी कित्येकजण सावकारी करून आहेत. सावकारांना विचारतां पाटीलकुळकर्ण्यांंशिवाय कारूनारू क्वचित् कर्जबाजारी आहेत असे समजते. दुष्काळांत सुद्धा कुणब्याइतकी त्यांची गाळण झाली नाही. दिसतांना आपल्याला , महारांची इतकी केविलवाणी स्थिति दिसतेना ? पण एकंदरीत कुणब्यापेक्षां ते पुष्कळ हात राखून आहेत. सन १९०५-०६, १९११-१२ सालच्या दुष्काळांत सरकारी जंगलांतलें गवत कापण्याला माणूस मिळेना; व महारमांग कांहीं केल्या गांव सोडून तिकड़े जाईनात. पूर्वी एंजिनियर खात्याकडे, महारमांग कामकऱ्यांची गर्दी असे. आतां त्या खात्याच्या कारकुनांना गांठचा विसार देऊन महारवाड्यांत जोडे फाडावे लागतात तरी पुरेसे रोजंदार मिळत नाहीत. जनावरांच्या हाडकाकातड्याला किंमत आल्यापासून महार गांवोगांव सुधारलेले दिसतात. ढोरामागे हाडकें चरबी व कातडे ह्यांचे सरासरी वीस पंचवीस रुपये येतात. तरी त्यांना वास्तविक मिळावा तितका नफा मिळत नाहीं; कारण हाडकें, कातडी, तरवडाची साल ह्यांचा पेठेचा बाजारभाव त्यांना माहीत नसतो. ज्याप्रमाणे रस पिणारा पिऊन जातो आणि चरकाचे तोंड देखील पुरते माखत नाही, त्याप्रमाणे त्यांची गत झाली आहे.१
१ पनवेलच्या महारांनी अजमासें १०० रुपये सालाप्रमाणे हाडकाकातड्यांचा हक्क मिस्तर याकुबभाई नांवाच्या गृहस्थास दिला आहे. महार वर्षानुवर्ष त्यांस हाडके कातडी देतात, आणि भाईसाहेब लक्षाधीश झाले आहेत असें ऐकतों! त्यांना ह्या जिनसा फुकट मिळत असल्यामुळे त्यांजवळन त्या व्यापारी जाती हलक्या दराने घेतात. तेच व्यापारी त्या भारी दराने चांभाराला विकतात. ह्यामुळे चांभारकाम फार महाग पडूं लागले आहे. काही दिवसांपूर्वी कुणबाऊ जोड्याला आठ आणे तें सवा रुपाया पडे; त्याला आता दोन ते तीन रुपये पडतात. मोटेची किंमत साडेपांच रुपयांपासून १५-२० रुपयांपर्यंत चढली आहे. तात्पर्य, ह्या बाबतीत कुणब्याला महार बुडवितात व महारांला व्यापारी, मिळून कुणब्याची दुहेरी बुडवणूक होते.
वतनपद्धति जशी महाग आहे तशी ती एक प्रकारची जुलमाचीही आहे. दुर्जन पतीशी संसार करतांना बायका म्हणतात की, जसा पूर्वजन्मी शंकर पुजला असेल तसा मिळाला. असाम्यांनाही असें म्हणण्याची पाळी येते की, जसे पूर्वजन्मीं कारू पूजले असतील तसे लाभले. पाटीलकुळकर्णी कितीही उपद्व्यापी व रयतेची बाजू मांडण्यास बेवकूब असले, तरी कायद्याने वजा होईपर्यंत ते कशी तरी गांवे करतात. गांवभट ठोंब्या असला, तरी दुसऱ्या जाणत्या ब्राह्मणाला बोलावून त्याला दक्षिणा देऊन खेरीज गांवभटाचा हक्क द्यावा लागतो. गांवचे महारजागले कितीही कुचर, चोरटे, गुरें-मारे असले तरी ते गांवकामगारांना व रयतेला चुकत नाहीत. कारूनारू कितीही अडाणी असले तरी त्यांच्या असाम्यांनी त्यांच्याच हातून काम घेतले पाहिजे. ते त्यांच्या भाऊबंदाकडून सुद्धां घेतां कामा नये. हा जुलूम नव्हे तर काय ? खंडू वारिकाची असामी जयवंतराव पाटील आहेत. खंडूजवळ हत्यारे तर नीट नाहीतच, पण त्याचा हातही जड आहे. पाटील दर खेपेला कातवतात, त्यांची लेकरें खंडबा पाहिले की पळतात व हजामतीचे वेळी रडतात. खंडूचा भाऊ पांडू जरी चांगला कारागीर असला तरी पाटलाला खंडूला नको म्हणून पांडूला बोलावतां येत नाही. हीच स्थिति
सुतार, लोहार, चांभार ह्यांच्यासंबंधाने असते१. पैसा अगर धान्य देऊन आपले पसंतीच्या कारूनारूंकडून काम घेण्याची असाम्यांना मुभा न ठेवल्यामुळे कारूनारू कसबांत कमी पडूं लागले व शिरजोरही झाले.
वतनपद्धतीमुळे एक अति मोठा समाजविघातक अवगुण आमच्यांत शिरला; तिने सर्वाला अरेरावी, भिक्षुकी आणि चोर चाळे शिकविले. तिचा अंमल जारी असता तर आगगाडीची तिकिटें वर्षानुवर्ष खपली नसती, आणि वतनदार व त्यांचा माल फुकट न्यावा लागता; आणि इंग्रज सरकार ज्याप्रमाणे दुष्काळांत चाऱ्याच्या वाहतुकीबद्दल भाडे भरपै करतें तसे काहीं एक लाभलें नसते. घोडे, गाडी पाहिजे असली की, ज्याजवळ गांवांत असेल त्याला त्याचे ग्रामबंधु तगादा लावतात. तुळशी, फुलें, केळीची पाने हवीं असली की, ज्याजवळ ती असतील त्याकडे मागतात, व त्यांनी दिली नाहीत म्हणजे रागावतात आणि वड्याचे तेल वांग्यावर काढतात. मागणे नको आणि रागावणे नको म्हणून काही लोक हौसेच्या जिनसा जवळ बाळगीत नाहीत किंवा नामांकित उदीम करीत नाहीत. गुऱ्हाळघरची हकीकत मागे आलीच आहे. फळफळावळांपासून तों लोणकढे तुपापर्यंत वाणगी मिळावी अशी इच्छा सार्वत्रिक असते. खेड्यांतले श्रीमंत सुद्धा विचारतात की, तुमच्याकडे आंबे, शेंगा, कोबी झाली पण आमच्याकडे वानवळा आला नाही. एकटे दुकटे कुणबी किफायतशीर पीक करीत नाहीत तें एवढ्यासाठी की, एकट्याने केलें म्हणजे तें
१ एका कुळकर्णी वतनदार मामलेदारांनी आपल्या घराचे सुतारकाम गांवच्या सुताराला दिले. त्याने सागवान गैरहिशेबी कापले, तेव्हां कळून आले की हा रद्दी कारागीर आहे. म्हणून त्याला रजा देऊन दुसरा सुतार पाहूं लागले. तो बारा कोसांत कोणीही काम घेण्याला धजेना ! तालुक्याच्या ठाण्यांत देखील एका परटाकडे धुणे जाऊ लागले आणि नंतर त्याने कपडे फाडले, चोरले, अगर त्यापेक्षा दुसरा काम चांगले करतो असें कळून आले तरी पहिल्याला काढून दुसऱ्याला लावतां येत नाही, व दुसराही अदावतीच्या भीतीने पहिल्याचे काम धरीत नाही !! हा अनुभव पुष्कळ उपऱ्या नोकरांना असेल.
सर्व वाणगीवारी व शेरणीवारी खपते. एखाद्याला कां पुरे दिले नाहीं की तो दंश धरतो, आणि तो हलक्या वर्गातला असला तर तें चोरून नेतो१. ह्या फुकटाफुकटीचा परिणाम रास्त कामावर होत गेला. गिऱ्हाइकानें काम करून घ्यावें, काम करणारानें वेतनासाठी हेलपाटे घालावेत आणि कसब्याने चाळवाचाळवी व कुचराई करावी, असले दुर्गुण (ह्याला गांवगुंडकी कसब म्हणतात.) सर्वांमध्ये पांगले. येतां येतां हक्काला भिडे व भिकेचे स्वरूप आले. मला अमुक गुण येतो, व त्याचा मोबदला अमुक घेईन, असें गुणीजन म्हणत नाहीत; आणि आपणांला काय द्यावें लागणार ह्याची कल्पना उपभोक्त्यासस नसते. वैद्याने औषध द्यावे आणि संभावना काय होते ह्याची चिंता करीत बसावें. मालकापुढे हजरी द्यावयाची तुम्ही शिरपाव द्या किंवा नका देऊ असें म्हणून गोपाळकोल्हाटी खेळ करतात, आणि ऐपतीप्रमाणे काही दिले तरी खूष होत नाहीत. बरे, त्यांची जिवावरची कामे पाहावयाला शेंकडों जमतात, पण थाळी फिरण्याची वेळ आली की गर्दी ओसरते; आणि खेळकरी ओरडतो की जाईल त्याचे तोंड काळें. रोख पैसे देऊन आपली गरज किंवा हौस परविण्याचा सराव खेड्यांत अजिबात मोडल्यासारखा झाला आहे. निदान कामाच्या मानाने रास्त पैसे देणारे घेणारे लोक क्वचित् दिसतात. या सार्वजनिक खोडीमुळे काम नासते, कारागिरांच्या गुणांचें चीज होत नाही, व उघड हिशेबाने होणारे दाम मालकाच्या हातून सुटत नाहीत. म्हणून कामगारांत टंगळमंगळ व चोरटावा माजून राहिला आहे, आणि देवगण अकलेत मोडूं लागले आहेत. कामाचे किंवा सौद्याचे अगोदर आणि नंतर जी चहूंकडे ओढाताण घासाघीस चालते, तिचे कारण 'रोख भाई ठोक' ह्या व्यवहाराला आम्ही फार दिवसांपासून पारखे झालों हे होय.
येथवर आपण गांवगाड्याच्या समाईक हितासंबंधानें वतनपद्धतीचा
१-प्रवरा कालव्याच्या किनाऱ्याच्या एका गांवीं एका जागल्याला चोरून घोसाळी काढतांना मळेकऱ्यानें पाहिले. मळेकरी रागावून बोलला आणि दुसरे दिवशी पाहतो तो वेल खुडलेले !
विचार केला. आता त्यांतील वतनदारांच्या हितानहिताचा त्यांच्या त्यांच्या पुरता विचार करूं. खेड्यांतले अघाडीचे वतनदार पाटीलकुळकर्णी. खानदेशांत अशी म्हण आहे की, 'शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा' ( कुळकर्णी ). शेतांत कुंदा कालवला म्हणजे जसें पीक वाढत नाही तसा गांवांत कुळकर्णी राहिला म्हणजे लोक सधन होत नाहीत. 'कर्त्याची किंवा करील त्याची पाटिलकी आणि भोगील त्याची संपदा' ही ह्मण सर्वत्र प्रचारांत आहे. 'पाटलाची घोडी' हा भाषणसंप्रदायही बराच रूढ आहे, व त्याचा अर्थ असा आहे की, पाटलाच्या गोठ्यांत गवताची काडी नसतां घोडीवर मात्र लिंबू ठरत नाही; म्हणजे ती दुसऱ्याच्या शेतांत फुकट चरते. ही लोकांमध्ये पाटीलकुळकर्ण्यांची योग्यता! ह्या वरील म्हणींना अपवाद असतील; पण वतनदार पाटीलकुळकर्ण्यांच्या मुशाहिऱ्याच्या सध्यांच्या स्थितीत कानांत तुळशीपत्र घालून राहणें असंभाव्य दिसते. वाढत्या महागाईत मुशाहिऱ्यामध्ये प्रपंच भागला नाही, तर कोठे तरी पैसे मारलेच पाहिजेत. स्वराज्यांत राजरोष पैसे खाण्याची रूढि पडल्यामळे पैसे खाऊन पचविण्यांत मोठी शहामत व भूषण मानीत. पैसे खाल्ल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या डोळ्यांत धूळ टाकल्याबद्दल एकमेकांना वतनदार सहसा दोष देत नाहीत; न खाणारांना मात्र शेळीचे गलूल (अजागळ) म्हणून हांसतात. ज्याचे नुकसान होतें तो अगर त्याचे आप्त मात्र ओरडतील; परंतु नुकसान करणाराला दूषण ठेवणारे खेड्यांत विरळा. तेव्हां परद्रव्यापहारासारख्या पातकाबद्दल साधारण लोकांना काही वाटू नये, व तें कसब गणले जावे हा नैतिक अधःपात कमी आहे काय ? 'जमेदारकी नरमाई,' गुरमाई उपयोगी नाहीं असेंही म्हणतात. मिधेपणा असला म्हणजे बाणेदार वर्तन राहत नाही. खेड्यांत गेले असतां पाटीलकुळकर्णी तर हांजी हांजी करणारे दिसतातच, पण त्यांच्या लहान लहान मुलांत सुद्धां पाणी दिसून येत नाही. त्यांच्या अंगांतही फाजील लवचीकपणा बाणतो. जनहिताच्या दृष्टीने स्वाभिमान नाहीसा होणे बरे नाही. शिक्षणाची सोय खेड्यांत
नसल्यामुळे व मुलांना परगांवी ठेवण्याची ऐपत फार थोड्या वतनदार पाटीलकुळकर्ण्यांना असल्यामुळे त्यांमध्ये अज्ञान फार असते, आणि तें सर्व गांवाला नडते. निरक्षर पाटील अनेक प्रसंगी परबुद्धीने चालून आपल्याला व आपल्या निरक्षर बंधूंना खोड्यांत टाकतात. तेव्हां पाटीलकुळकर्णी आपल्या मुलाबाळांच्या पदरांत वतनाची दौलत म्हणून दारिद्र्य, अज्ञान व दुर्गुण ह्यांखेरीज दुसरी कोणती टाकणार आहेत ? उद्योग न करतां व चोरीचपाटीने कुणब्याचा माल घरांत घालून संसार करण्यांत भिल्ल,कोळी,रामोशी, महार, मांग वगैरे निकृष्ट जातींच्या हलके गांवनोकरांना आज बरे वाटते. पण ही स्थिति किती दिवस टिकेल ? सर्व जग कांहीं आतां डोळे मिटून बसलें नाहीं. चोरी-चपाटीने, आळसाने किंवा लोचटपणानें प्रपंच चालवावा अशा भावनेने त्यांच्या सबंध समाजाला घेरणे ही मोठी नैतिक हानि आहे.उद्योग न करतां प्रपंच चालतो म्हणून ते आपल्या मुलांना शाळेत घालीत नाहीत, व हुन्नर शिकवीत नाहीत, हे अत्यंत शोचनीय आहे; आणि यांत ते भावी पिढीचे मोठे नुकसान करीत आहेत. बाजेवतनदारांचीही हीच स्थिति. कामापेक्षा व अकलेपेक्षा जास्त नफा पुष्कळांना मिळतो, यामुळे जास्त उद्योग करावा व ज्ञान संपादन करावे अशी ईर्षा ते धरीत नाहीत वडिलांनी पोट भरले तसे आपणही गांवावर पोट भरूं अशी त्यांची खातरजमा असते, आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा सुद्धा ते फायदा घेत नाहीत. वास्तविक त्यांची कामें मोठ्या कसबांची आहेत. ही कसबें जगांत झपाट्याने वाढत आहेत, आणि परकी लोकांच्या त्यांवर उड्या पडत आहेत. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, परीट वगैरे जी हत्यारें आजकाल वापरतात त्यांकडे पाहिले म्हणजे असे दिसून येते की, सर्वांजवळ परदेशी हत्यारांचा भरणा झाला आहे. ती सर्व आपल्या देशांत, नव्हे, गांवोगांव होत होती. पण कारूनारुंच्या अज्ञानामुळे व निरुद्योगामुळे त्यांत सुधारणा झाली नाही, व ती मागे पडली. हीच अवस्था त्यांच्या कसबांच्या कामांची होऊन बसली. कारूनारूंनी तयार केलेली आउतें निरुपयोगी ठरून कुणबी सुधारलेली आऊतकाठी घेण्याच्या मागे
आहेत. चांभाराचे जोडे मागे पडून जिकडे तिकडे देशी परदेशी बूट फैलावत आहेत. पण गांवच्या चांभारबोवांना कांहीं तें काम सुधरत नाहीं; इतकेच नव्हे तर मावळी चांभाराच्या वहाणा घाटी चांभारांना करतां येत नाहीत. जगाच्या आजच्या गरजा भागविण्यासारखे कारूनारू तयार करण्याची सोय खेड्याखेड्यांनी होणे दुरापास्त आहे. त्यांनी खेडी सोडलीच पाहिजेत, आणि नवीन विद्या शिकून आपला माल योग्य नफा घेऊन गांवकऱ्यांना मिळेल अशी तजवीज केली पाहिजे. तर त्यांचे पुढे चालेल. सारांश, कोणत्याही वतनदारांना आजच्या स्थितीत वतनापासून कायमचा फायदा आहे असे म्हणतां येत नाही.
वतनपद्धतीमुळे वतनदारांचे व्यक्तिशः फार नुकसान झाले आहे. त्यांतील होतकरू मंडळीपैकी जरी कित्येक गांव सोडून अन्यत्र आपल्या बुद्धिवैभवावर आजपर्यंत कमाई करीत आले, तरी पुष्कळांची गात शेवग्याच्या झाडाच्या गोष्टीप्रमाणे झाली आहे. एक श्रीमंत कुटुंब दरिद्रावस्थेप्रत पोहोंचलें. त्यांच्या अंगणांत एक शेवग्याचे झाड होते. त्याच्या शेंगा गुजरींत स्वतः विकल्या तर आब जातो म्हणून त्या रात्री काढून ते एका माळ्याला विकीत, आणि गुपचिप तो देईल त्या किमतीवर गुजराण करीत. कुटुंबांत चार पांच भावांचा विस्तार होता. तेव्हां पाळीपाळीनें कित्येकांना उपवास काढावे लागत. एक दिवस त्यांचा सोयरा रात्रीं मुक्कामाला आला. त्याला व लहान मुलांना जेवण्यास बसविलें, व बाकीच्यांनी भूक नाही म्हणून वेळ मारून नेली. सोयरा निजला असें पाहून कारभाऱ्यानें नित्यक्रमाप्रमाणे शेंगा माळ्याला दिल्या, आणि त्यांचे दाम घेतले. सोयरा जागा होता. त्याला सर्व अवस्था अगोदर माहीत होतीच, आणि हा प्रकारही त्याने पाहिला. चार पांच धडधाकट भाऊ आज जे उपवास काढतात, ते या शेवग्यामुळे अशी त्याची खात्री झाली; आणि त्याने जिकडे तिकडे सामसूम झाल्यावर रात्रींतून झाड कापून न विचारतां आपले घराची वाट धरली. सकाळी घरांत जिकडे तिकडे हाहाःकार झाला. 'हगवणीला बायको आणि नागवणीला सोयरा' असे
म्हणतात. ह्या सोयऱ्याने तर दहा पांच मण धान्य पाठविण्याच्या ऐवजी अर्थ कोर भाकर देणारा शेवगाही तोडला, म्हणून सर्व त्याला शिव्याशाप देऊ लागले. तो दिवस कसा बसा गेला, आणि रात्री सर्व कुटुंब एकत्र जमून त्यांनी विचार काढला की, आतां घर सोडले पाहिजे. सर्व भाऊ घरंदाज व चांगले असल्यामुळे त्यांना रोजगार लागले, आणि वर्ष दोन वर्षांत घर सुधारले. नंतर सर्वजण दिवाळीला घरीं जमलेले पाहून तो सोयराही मुद्दाम तेथें आला, तेव्हां सर्वांनी त्याचे पाय धरले, व कबूल केलें की, तुम्ही झाड तोडले नसते तर आम्हांला घर सुटतेंना व आमचे दारिद्म जन्मभर फिटतेना. ही गोष्ट लागू पडणार नाही, असें वतनदारांचे एकहीं घर सांपडणार नाही. घरच्या घरी राहून शक्य असेल तें तेथल्या तेथे मिळवून कसा तरी कालक्षेप करावा, 'अर्धी सोडून सगळीच्या मागे जाऊं नये', ही प्रवृत्ति पुष्कळ होतकरू वतनदारांत बलवत्तर असते. ह्यामुळे त्यांच्या गुणांचा फायदा त्यांनाही मिळत नाही, आणि एकंदर जनतेलाही मिळत नाही. ठशांचे काम करणारा एक गुणवान् वतनदार तांबट पाहिला. तो जर मुंबईसारख्या शहरांत असता, तर चार पांच रुपये रोजाखाली जाता ना. पण त्याच्या वतनाच्या गांवीं त्याला अंग झांकण्याइतकें सुद्धा वस्त्र भेटेना. गांव का सोडीत नाही म्हणून प्रश्न केला तेव्हां तो म्हणाला, गांव सोडलें आणि वहिवाट मोडली म्हणजे माझ्यामागे पोराबाळांना कोणी विचारणार नाही. वतनदार पाटीलकुळकर्णी व कारूनारू ह्यांच्या घराण्यांत आज किती तरी उमेदवार सुग्रण लोक याप्रमाणे खिजबत पडले आहेत ! पूर्वीच्या दामदुकाळ काळांत हुषार लोकांचे अशा प्रकारे होणारे व्यक्तिशः नुकसान जाणवत नसे. आतां तें ज्याचे त्याला तर जाणवतेंच, पण लायक लोक मागे राहून नालायक लोक त्यांची जागा घेतात हे पाहून अतिशय वाईट वाटते. वतनपद्धतीचे अभिमानी यावर असें म्हणतील की, हे सर्व जरी खरे मानले तरी एकंदरीत वतनपद्धति फार सोईस्कर आहे. रोखीने व्यवहार करण्यासाठी कुणब्याजवळ अगर इतर गांवकऱ्यांंजवळ वेळेवर धान्य किंवा पैसा असतो कोठे ? कुणब्याचा
किंवा गांवढेकऱ्यांचा उधारीचा व्यवहार फायद्याचा असेल तर गोष्ट वेगळी; पण तो तसा नसेल तर तो जितके लवकर बंद होईल आणि तो बंद करण्याच्या कामांत ज्या येतील त्या अडचणी जितक्या लवकर दूर करूं तितकें बरें. वाण्यांना किंवा बलुतदारांना नांवे ठेवून कुणब्याची स्थिति सुधारते असे नाही. त्याची स्थिति सुधारण्यासारखी परिस्थिति निर्माण केली पाहिजे. वतनपद्धति अल्प खर्चाची नाही, आणि असेल तर जो तो या वैश्ययुगांत आपल्या कसबाप्रमाणे पैसे चोपून घेत असतांना वतनदारांना तरी कमी वेतनावर काम करण्यास कां भाग पाडावें ? पूर्वीप्रमाणे ह्या राज्यांत वतनदार गांवाला अगर वतनाला जखडलेले नाहीत.त्यांना पोटापाण्यासाठी वाटेल तेथे जाण्याची मुभा आहे. अर्थात् त्यांना गांवीं डांभण्याचा कोणालाही हक्क नाही. पूर्वीच्या काळी वतनपद्धतीचा कितीही उपयोग झाला असला तरी ह्या काळांत ती चालविणे कोणालाही हितकर नाही. एकाद्या श्रीमंत जहागिरदाराने आपल्या भोंवतीं मोठा थोरला परिवार जमवावा आणि पुढें संपत्ति नाहींशी झाल्यावर व परिवारापैकी पुष्कळांचे काम नाहींसें झाल्यावरही तो तसाच ठेवावा हे जसें भोपळसुती आहे, तितकेंच प्रस्तुत काळी सर्व कारू-नारू गांवगाड्याने ह्मणजे कुणब्याने पोसणे आहे.