फिरस्ते.
----------

 बहुशः सुगीच्या संधानांत व तुरळक इतर दिवसांत गांवगन्ना जे बिछायती ( बिछायत घरांत नसते, ती ओटीवर असतेः म्हणून बिछायती म्हणजे बाहेरून-पर ठिकाणाहून आलेला ) येतात त्यांत कांहीं वतनदार व कांहीं उपलाणी असतात. येथे वतनदार याचा अर्थ इतकाच की, हे फिरस्ते नियमित काळी नियमित रहाळांतील गांवीं येतात, व तेथे आपला माल विकून, काम करून, अगर भिक्षा मागून कमाई करतात. अशा प्रकारे उघाडीच्या दिवसांत हे अनेक गांवें घेतात, आणि पावसाळा ते स्थाईक झाले असतील त्या गांवी किंवा आपले रहाळांत कोठे तरी काढतात. जे फिरस्ते नेमलेल्या गांवीं वहिवाटीप्रमाणे न येतां वाटेल तेथें भटकतात, त्यांना आपण उपलाणी म्हणू. घिसाडी ऊर्फ पांचाळ, बेलदार, वड्डर, कैकाडी, वंजारी, लमाण, नेमाडांतील मेवाती, वैदू, गोंड, मांगगारोडी, गोपाळ, कोल्हाटी, हरदास, दरवेशी, बंदरवाले (मुसलमान), गारोडी, माकडवाले ऊर्फ कुंचेवाले, कंजारी, नंदीबैलवाले ऊर्फ तिरमल, चित्रकथी, फांसपारधी, बहुरूपी, रायनंद, भोप्ये, भगत, भुत्ये, आराधी, वाघे, मुरळ्या, जोगती, हिजडे, जोगतिणी, कातकाडीणी (हाडकांच्या माळा घालणाऱ्या नवलाया ), भराडी, वासुदेव, पांगूळ, गुरुबाळसंतोष, राऊळ, मेढिंगे ऊर्फ ठोके जोशी, कुडमुडे जोशी, सुप हलव्या, पोतराज, कानफाटे, उदासी, अघोरी, खरे खोटे आंधळे पांगळे रक्तपित्ये वगैरे विकल लोक, नाथपंथी, वारकरी, कबीरपंथी, संन्याशी, तीर्थयात्रा करणारे नाना संप्रदायांचे गोसावी, बैरागी, जती, साधु, जातिजातींचे गुरु व मागते, मानभाव, नानकशाही, फकीर, शिद्दी, इराणी, बलुची, अफगाणी इत्यादि अनेक प्रकारचे उदरनिमित्त बहुकृत वेष लोक खळी मागण्याला व इतर वेळी खेड्यांवर फेऱ्या घालीत असतात. ह्यांची दिनचर्या वरवर पाहिली तर असा भास होतो की, त्यांपैकी कित्येकांना काही तरी कला-
कुसरीचा अगर मनोरंजनाचा दर्शनी धंदा असतो, व कांहीं निवळ भिक्षार्थी असतात. परंतु बाहेरचा बुरखा जरा ओढला तर अशी खात्री होईल की, बहुतेकांची मदार भिक्षेवर आणि भिक्षेच्या आडून फसवेगिरी, दगलबाजी, चोरीचपाटी, ह्यांवर व कांहींची व्यभिचारावर देखील असते. वतनदार व उपलाणी फिरस्ते नुसती भीक म्हणून शेकडा दोन ते चार शेतमाल हडसून खडसून नेतात. चोरीचपाटी ह्याखेरीज. फिरस्त्यांमधील वरिष्ठ जातींचे भिक्षुक व साधु हिंदु असल्यास मठांत किंवा देवळांत व मुसलमान असल्यास मशिदीत, दरग्यांत उतरतात; आणि दोन्ही धर्माचे लोक सर्रास चावडी धर्मशाळांत उतरतात. गुन्हेगार जाती साधु किंवा फकिराच्या वेषाने गुन्हे करण्यास बाहेर पडतात, तेव्हां त्या ओसाड देवळांत, मठांत, मशिदीत अगर तक्यांत, उतरतात; कांकी त्यांची कृष्णकारस्थानें कोणाच्या नजरेस येऊ नयेत. बाकीच्या भटकणाऱ्या जाती - आपापली जाति-विशिष्ट पाले देतात. पालावरून जात ओळखता येते. बहुतेक आपापली पालें गांवाच्या आत बाहेर शेत दोन शेत दूर ठोकतात, व जमल्यास मुख्य गांवाजवळ न उतरतां गांवाच्या एखाद्या वाडीजवळ पाले लावतात. फांस-पारध्यांना दिवा पाहण्याची अनेगा आहे म्हणून त्यांची पालें लोकवस्तीपासून फार दूर असतात, व त्यांत दिवा म्हणून कधी दिसावयाचा नाही. पिकाची, धान्याची, जनावराची चोरी पचेल अशी चोरट्या जातींच्या पालांची ठेवण असते.

 घिसाड्यांची दोन ते दहा बिऱ्हाडे मुक्कामाला येतात. ती बहुधा गांवाजवळ बारदानाच्या पालांतून उतरतात. दर बिऱ्हाडाला दोन तें दहा गाढवे आणि एक दोन बिऱ्हाडे मिळून एखादी ह्मैस असते. त्यांच्या जवळ तट्टे, बकरी, कोंबड्या, व मोठाले कुत्रे असतात. नांगराचा फाळ, कुऱ्हाडी, कुदळी, वसु, खुरपीं, ऐरण, आंख, धांवा, सुळे, पळ्या, विळे, नाचकंडे, शिवळांचा खुळखुळा, सुकत्या, वडारी-फावडे वगैरे लोखंडकाम हे करतात. त्यांच्या बायका त्यांना लोहारकाम करू लागतात, व पळे, विळे, नाचकंडे वगैरे जिनसा बाजारांत व घरोघर विकावयास नेतात.
बेलदार दहापांच बिऱ्हाडे मिळून धर्मशाळेत किंवा पोत्यांच्या पालांनी गांवाजवळ उतरतात. दर बिऱ्हाडाला पांच ते पंधरा शेळ्या, कोंबड्या, गाढवें, कुत्रीं, असतात. ते विहिरी, घरे, पार, वगैरेचे दगडकाम करतात व जातीं, उखळे, पाटे, वरवंटे, चौरंग वगैरे विकतात. बायका व पुरुष जात्यांना टांकी लावतात. घिसाडी, बेलदार भीक मागत नाहीत. वड्डर पंधरा बिऱ्हांडे एक मेळानें गवती पालांत गांवानजीक उतरतात. दर बिऱ्हाडाला दोन ते चार गाढवे, शिवाय शेळ्या, बोकड, कोंबडी, कुत्री असतात. एका गांवीं गणती केली ती-पाले १४, लहान मोठी माणसें ६०, गाढवें ३०, शेळ्या बोकड १५, शिवाय कुत्रीं. वड्डर बांधणी घालणे, विहिरी खणणे, मात-काम वगैरे मक्तत्याने करतात; जाती, उखळ, पाटे, वरवंटे वगैरे विकतात, व त्यांना टांकी देतात. माल विकणे व टांकी देणे ही कामें बहुधा बायका करतात. ह्यांच्या बायका, पोरें गांवांत भाकरी, व शेतांत धान्य मागतात. एंजिनियरकडील मक्तेदार वडारांची बायका-पोरें सुद्धां गांवांत भीक मागतांना दृष्टीस पडतात. उभे पीक व मेंढरें चोरणे, पेव फोडणे, घरफोडी वगैरे गुन्हे वड्डरांच्या कांहीं जाती करतात. ह्यांची डुकरें गांवोगांव पिकांचा धुव्वा उडवितात. कैकाडी गांवाबाहेर उघड्या पटांगणांत झाडाच्या सावलीला उतरतात. त्यांची चार पांच किंवा अधिक बिऱ्हाडे असतात. दर बिऱ्हाडाला दोन तीन गाढवें आणि शेळ्या, कोंबड्या, कुत्री असतात. ते पिटकुल, करंजी, तरवड, वगैरेंचे फोंक काढून त्यांच्या पाट्या, कणगी, कोंबड्यांचे डाले किंवा झांप करतात, आणि विकतात. ही जात भीक मागणारी व चोरटी आहे. भीक मागतांना ते घराची कुलपें काढून चोरी करतात. ज्या घरांत थोडी माणसे असतील त्याच्या मागच्या दारी कांहीं कैकाडणी बसतात, व काही जणी पुढच्या दारी भांडून एकमेकांना रक्त निघेपर्यंत मारतात. घरांतील माणसें तंटा तोडण्याला दाराबाहेर गेली म्हणजे मागच्या दारी बसलेल्या कैकाडणी आंत शिरून हाती लागेल ते घेऊन पसार होतात. पिके, धान्य, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या चोरण्यांत त्यांचा हातखंडा कुंचेवाले ऊर्फ माकडवाले ही कैकाट्यांची पोटजात आहे. ते गांवाबाहेर सुरड नांवाच्या गवताच्या पालांत उतरतात. त्यांची दहा बारा बिऱ्हांडे एकमेळाने असतात, व त्यांबरोबर माकडे, गाढवें, बकरी, कोंबड्या, कुत्री असतात. ते माकडांचा खेळ करतात व साळी, कोष्टी, धनगर, मोमीन वगैरेंच्या कुंच्या बांधतात. ह्या कुंच्या ते गवताच्या मुळ्यांच्या करतात; व त्या सव्वा ते दीड रुपयाला विकतात. त्यांच्या बायका बायकांना गोंधतात, शिंदीचे खुळखुळे विकतात, व सुपें, टोपली फोकाट्यांनी सांधितात. बायका, पुरुष, पोरें गांवांत तुकडे व शेतांत धान्य मागतात. एका गांवीं कुंचीवाल्यांची ४ पाले उतरली होती; त्यांत माणसें २३, गाढवें २२, कुत्रीं ५, माकडे ५, बोकड २, व एक कोंबड्याचा झांप होता. कंजारी ही सांनसी नांवाच्या दरोडखोर जातीची एक पोटजात आहे, व ती गांवाबाहेर पालांतून उतरते. ते साळी वगैरेंच्या कुंच्या बांधतात; शिंकी, हातळ्या, जोती-जुंपण्या, पिछाड्या, मोहक्या वगैरे करतात; आणि कानांतला मळ काढतात. त्यांच्या बायका टाळ्या पिटून अचकटविचकट हावभाव करून उखाणे म्हणतात, आणि ऐकणाराला अगदी शरमून टाकून भीक उकळतात. लमाण, वंजारी हे पूर्वी बैलांचे तांडे घेऊन मीठ व सरपण ह्यांची नेआण करीत. आताही काहीजण बैलांचे भाडे करतात, व जनावरें राखोळीला घेतात. त्यांच्याजवळ कुत्रे फार नामांकित असतात. ते गांवाजवळ मैदानात उतरतात आणि त्यांच्या तांड्यांत १०० -२०० बैल व ५० -६० माणसें असतात. ते बैल, शेळ्या, मेंढ्या व उभी पिकें ह्यांची चोरी करतात. वैदू गांवापासून एक दोन शेतें दूर उतरतात. त्यांची दहा बारा बिऱ्हाडे जमावाने फिरत असतात. त्यांच्याजवळ गाढवें, शेळ्या, कोंबड्या, व पुष्कळ शिकारी कुत्री असतात. ते ससे, तरस, घोरपडी, सर्प, मगर धरतात. कोणाच्या घरी साप निघाला तर शेरभर दाणे घेऊन ते तो धरतात. त्या वेळी ते पुंगी वाजवीत असतात. तापीकांठी मगरांना त्यांचा इतका दरारा आहे की, वैदूचा शब्द कानी पडतांच वाळवंटांत असलेले मगर
तडक पाण्यांत पळून जातात. पुरुष व बायका वनस्पतीचीं औषधे,भस्में,रांगोळी, सुया, दाभण विकतात. पुरुष शस्त्रक्रिया करतात, व तुंबड्या लावतात. पुरुष, बायका, पोरें, गांवांमध्ये भाकरी व कपडे आणि शेतांत धान्य मागतात. सर्व भटकणाच्या जातींत ही जात फार साळसूद आहे.व हेिच्या बायकांची पातिव्रत्याबद्दल फार ख्याति आहे.वर्षा दोन वर्षांनी पन्नास तें शंभर गोंड लोक वनस्पतींचीं औषधे, नकली सालममिश्री, सफेतमुसळी, वगैरे विकावयास एकमेळाने येतात. त्यांच्याजवळ ३०|४० म्हशी, १०|१२ तट्टे राहतात. ते गांवाजवळ पालें देतात आणि माणसा जनावरांच्या पोटासाठीं शिवार उकळतात. भराडी, गोंधळी, मुरळ्या, वाघे ह्यांची दहापांच बिऱ्हाडे, पोत्याच्या पालांत गांवाबाहेर उतरतात. त्यांच्याजवळ तट्टे, गाई, बैल, म्हशी, टोणगे, कोंबड्या, बकरी असतात. हे जनावर विकतात. खंडोबा ,भैरोबा, देवी वगैरे देवांची गाणीं, पोवाडे व लावण्या ते गातात, त्यावेळीं मंडळी जमून त्यांना पैसा दोन पैसे देते. त्यांपैकीं कांहीं बैठकीचे गाणे, व तमाशा करतात. हे गांवांत व शिवारांत भीक मागतात. भराड्यांच्या बायका गोदडया शिवतात व गोंधतात. भृत्ये नवरात्राच्या सुमारास घरोघर तेल,कपडे मागतात. त्याला बहुधा दर घरी एक पैसा मिळतो. आराधी वर्षभर भीक मागत फिरतात. जोगतिणी देवीच्या नावाने भीक मागतात.हिंदू हिजड्यांना जोगती म्हणतात. ते फार करून कुंभाराच्या घरीं उतरतात.ते टाळ्या पिढ्न अभद्र बोलतात, बायकी चाळे करतात, आणि देवीच्या नांवावर परडी फिरवून भीक मागतात. ते बहुधा दर घरी एक आणा घेतात. मुसलमान हिजड्यांच्या गुरूला ‘मुंढया'म्हणतात. तो मुसलमान असतो. अलमगीरचा जनाना हिजड्यांनी राखला, म्हणून त्यांनी हिजड्यांना व मुंढयांना वतन करून दिले, असें हे लोक सांगतात. हिंदू-मुसलमान हिजडे आपली कमाई मुंढयाला देतात. पोतराज महार किवा मांग असतो. तो शेंदूर फांसून लहंगा नेसून मरे आईचा देव्हारा घेऊन घरोघर फिरतो, स्वतःचे अंगावर शेंदराचा गोटा लावलेल्या आसुडाने कडाके ओढतो, आणि सूप अर्धसूप धान्य, पैसे व कपडे गोळा करतो. तिरमल ऊर्फ नंदीबैलवाले, मेढिंगे ऊर्फ ठोकेजोशी, कुडमुडेजोशी, वासुदेव, पांगूळ, हे गांवाबाहेर गोदड्याच्या किंवा पोत्याच्या पालांत उतरतात. त्यांचीं दहापांच बिऱ्हाडें मेळानें फिरतात. त्यांजवळ म्हशी, बैल, बकरें, तट्टे, कुत्रीं, असतात. तिरमल नंदीबैल शिकवून त्याच्याकडून होरा वदवितात. त्यावेळीं ते गुबगुबी व घड्याळ वाजवितात. ते धान्य, वस्त्र, पैसे मागतात. त्यांस दर घरचा १ पैसा मिळतो. त्यांच्या बायका गोदडया शिवतात व पोत, सुई, दाभण विकतात. एका गांवीं तिरमलांचा तळ येणेंप्रमाणें होता: माणसें ३०, नंदीबैल एक, तट्टे ७,टोणगे २, ह्मशी ४, बैल१०,शेळ्या ५, कुत्रीं ८,शिवाय कोंबड्या. मेढिंगे ऊर्फ ठोकेजोशी सकाळीं भस्म, गंध लावून डोक्यावर पागोट्याची ढाल ठेवून लफ्फेदार रेशीमकांठी धोतर नेसतात, आणि हातांत पंचांग घेऊन कुणब्यांना शुभाशुभ ग्रह, होराठोका सांगण्याला शेतोशेतीं जातात. त्यांच्या बायका सुई, पोत वगैरे विकतात. ते गायी, ह्मशी, तट्टे, विकून हजारों रुपयांचा व्यापार करून राहिले आहेत. कुडमुडेजोशी, गुरुबाळसंतोष, वासुदेव, पांगूळ रामप्रहरीं पाऊड गाऊन आयाबायांना व लेकरांना आशिर्वाद देतात. त्यांच्या पाऊडांत यात्रांच्या ठिकाणच्या देवांचीं नांवें व क्वचित वडेिलांचीं नांवें असतात. त्यांच्या बायका ' वाकळ' (गोदडी ) शिवतात, व घोंगड्या तुणतात. कुड्मुडेजोशी कुडमुडे वाजवितो. वासुदेव टाळ, चिपळया, व पावा वाजवितो, आणि त्याच्या डोक्याला मोरपिसांची टोपी असते; त्याला दर घरीं पैसा दोन पैसे मिळतात. राऊळ कोठं कोष्ट्यांंच्या फण्या भरतात, पण बहुधा पहाटेस भला मोठा त्रिशूळ घेऊन एखादा दोहरा म्हणत भीक मागतात. दरवेशी मुसलमान असतात, ते वाघ आस्वलाचे खेळ करून सुगीच्या दिवसांत खळीं मागतात. त्यांना बागवाले (वाघवाले) असेंही म्हणतात. मदारी गारोडी मुसलमान असतात व तें सापाचा आणि नजरबंदीचा खेळ करतात. मुसलमान बंदरवाले, वानर, माकडें, व बोकड ह्यांचे खेळ करतात. गोपाळ
डोंबारी, कसरतीचा खेळ करतात. त्यांच्याजवळ म्हशी असतात आणि ते त्यांचे दूधतूप विकतात. गांवकऱ्यांच्या म्हशी राखोळीला घेऊन ते अखेर गुंगारा देतात. कोल्हाटी कसरतीचा खेळ, नाचतमाशा करतात. त्यांच्या नायकिणी कसब करतात.कोल्हाट्याची पालें गांवांवर आली म्हणजे उपदंशाचा प्रसार होतो. आपणाजवळ उपदंशाची व पुष्टतेची रामबाण औषधे आहेत, अशी बढाई कोल्हाटिणी मारतात, व लौकिक समजूतही अशीच आहे. खानदेशांत कोल्हाट्याप्रमाणे 'उघड्या मांडीचे '( राजरोष ) कसब करणारी हरदास नांवाची जात आहे. रायनंद, बहुरूपी, भवय्ये ( गुजराती ) हे नानाप्रकारची सोंगें आणून पैसे, धान्य व वस्त्रे मिळवितात. ह्यांचा बेडा मोठासा नसतो. चित्रकथी मोठ्या जमावाने फिरतात. एका गांवीं त्यांची ३० पाले उतरली; त्यांत माणसें १२७, घोडी ५, म्हशी ७०, व १७ शेळ्या होत्या. हे म्हशीची हेड करतात, व दूधतूप विकतात. जातीचा एखादा इसम सिता, बभ्रुवाहन वगैरेंची चित्रे काढतो व चित्रपट लोकांना दाखवितो; आणि बायका काशाच्या थाळ्यावर मेण व काडी लावून परोपरीची गाणी म्हणतात. तरुण स्त्रिया शेतकऱ्याची थट्टामस्करी करतात, व कसबही करतात; त्यांना 'मैना' म्हणतात. पुरुष व स्त्रिया गांवांत भाकरी, वस्त्र व शेतांत धान्य, पेंढी मागतात. पिकाची चोरी करण्यांत ही जात अट्टल आहे. मांगगारोड्यांची टोळी सर्वांत दांडगी असते. एके गांवीं त्यांचा परिवार येणेप्रमाणे आढळून आलाः- माणसें ११९,म्हशी २०, हेले ४, गाय१, बैल २, घोडे २, बकरी ६, शिवाय कोंबड्या, कुत्री. हे गांवाबाहेर पालांत उतरतात, म्हशी विकतात व भादरतात, नजरबंदीचा गांवगुंडी खेळ ढोल वाजवून करतात, आणि भीकही मागतात. हे जबरदस्त चोर व कांगावखोर असतात; धान्य, कापूस, शेळ्या, मेंढ्या, म्हशी, कोंबड्या, चोरतात; आणि उभ्या पिकांत आपली जनावरें चारतात. हे थोडासा विसार देऊन भाकड म्हशी फळविण्याचा बहाणा करून घेतात, व त्यांना दूरच्या बाजारांत विकून पैसे गट्ट करतात. गांवकरी ह्यांच्या
तांड्यांत जाण्याला धजत नाहीत. त्यांत कोणी गेलें तर पुरुष वर्दळीला येतात, व बायका एकच गिल्ला करून सोडतात, आणि वेळेला सपशेल नागव्या होतात. कधी कधी त्या स्वतःला किंवा पोराला आपल्या हाताने दुखापत करून घेतात, अगर पोराची तंगडी धरून त्याला गरगर फिरवितात व आपटूं लागतात. फांसपारध्यांचा जथा फार जंगी असतो. त्यांच्या तळावर कधी कधी माणसें १०० पर्यंत असतात; शिवाय गाई, म्हशी, कोंबड्या, कुत्री. ते भीक मागतात, बजरबट्टू व जंगलच्या वनस्पतींची औषधे विकतात, पांखरें धरतात, आणि हरीण, डुक्कर, ससे, ह्यांची शिकार करतात. त्यांच्या बायका जात्याला टांकी लावतात. ते आपली गुरे उभ्या पिकांत चारतात, व पेवांतील धान्य, गुरे, शेळ्या, मेंढ्या, व उभे पीक ह्यांची चोरी करतात, आणि जमिनीमध्ये लहान भेग असेल ती खोदून तळाशी मोठी सांच करून तिच्यामध्ये चोरीचें धान्य घालून तोंड बंद करतात. खानदेशांत सातपुड्यांतील जंगलांत प्रतिवर्षी नेमाडाकडील मेवाती नांवाचे मुसलमान लोक हजारों गाईम्हशी व घोडे चारण्यास आणतात. ते जंगलाची फी भरतात, परंतु आसपासच्या गांवांच्या शेतांना त्यांचा अतिशय उपसर्ग लागतो. शेतांत राखणदार असला तरी पाण्यावर जातांना किंवा या गांवाहून त्या गांवाला मुक्काम हालवितांना ते आपल्या गुरांना शेतांत घुसण्याची इशारत देतात. मग राखण नसल्यावर रात्री बेरात्री ते आपली जनावरें शेतांत घालतात हे सांगणे नकोच. त्यांची जनावरे इतकी तरबेज झालेली असतात की, त्यांना परकी माणसांचा वास येतांच ती चौखार निघतात, आणि कांहीं केल्या हाती लागत नाहीत. पहाडांत वाघाची भीति असते, म्हणून शेतांत रात्री राखण बहुधा नसते. त्यामुळे ह्या हेड्यांचे आयतेंच बनतें. चार सहा वर्षांनी बायकापोरे मिळून शेपन्नास इराणी किंवा बलुची, पठाण लोकांची टोळधाड रेलवेजवळच्या खेड्यांनी आणि क्वचित आडरस्त्याच्या खेड्यांनीही बोकळते. घोडे, चाकू, कात्री, सुया, कपडा, जुने बूट, सोन्यारुप्यांची नाणी, जवाहीर वगैरे विकण्याच्या मिषाने ते फिरतात.
हिंदुस्थानावरील मुसलमानांच्या स्वाऱ्यांमुळे त्यांचा असा दरारा बसला आहे की, 'घरच्या भिणे घेतलें रान वाटेंत भेटला मुसलमान.' ही म्हण महाराष्ट्रांत बायकापोरांच्या तोंडात भिजत आहे. हे लोक लालबुंद, उंचे पुरे, भलेभक्कम आणि कजाग असतात; त्यामुळे ते जातात त्या गांवांत दिवसाढवळ्या जबरदस्तीने शिधा, चारा, लुटतात, व बिगारीच्या गाड्या काढतात. त्यांच्या टोळीबरोबर पोलीस असते. पण त्याची तारांबळ उडून आला पेंड कसा तरी पुढे वाटेला लावण्याविषयी कासाविशी चालते.

 चालूं वहिवाटीप्रमाणे भटकणाऱ्या लोकांना दर गांवीं तीन दिवस राहतां येतें. गांवच्या पाटलाची किंवा एखाद्या भरदार कुणब्याची अगर स्थानिक गोसाव्या फकिराची ओळख असते, अशा गांवीं ते तळ टाकतात, व तेथून आसपासची गांवें घेतात. मुक्कामाच्या गांवाला ते फारसा धक्का लावीत नाहीत, आणि गांव खूष राहील असा प्रयत्न करतात. त्याच गांवीं तेच भिकार फिरून फिरून उतरू लागले म्हणजे असे समजावे की गांवापासून तो नजीकचे पोलीसठाण्यापर्यंत त्यांनी वळण बांधिलं. भिकार उतरलें म्हणजे बिऱ्हांडे म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या व जनावरें पोरासोरांच्या दिमतीला लावतात. जरूर तितक्या बायका सरपण व चारा गोळा करण्याला शेताशेतांनी हिंडतात, आणि उमेदचार पुरूष व बायका काळी-पांढरी मागण्याला निघतात. मुलें गायरानांनी किंवा राखण कमी अशा शेताच्या कडांनी किंवा बांधांनी जनावर लावतात, आणि आपण रमत बसतात, अगर शेताचा लांगालुंगा गोळा करण्याला जातात. त्यांच्या दुर्लक्ष्यामुळे गुरे शेतांत घुसतात. आणि कधी कधी तर ती स्वतःच त्यांना शेतांत घालतात, गुरेही ओढाळ व खायखाय करीत असावयाची, त्यांनी शेतांत धुसावयाचे, शेतकऱ्यानें हैक हैक करावयाचे, आणि त्यांनी तसाच चरण्याचा रट्टा लावावयाचा किंवा मुसंडी देऊन निघावयाचे, हा त्यांचा रोजचा परिपाठ. फिरस्त्यांची गुरे बहुधा हाती लागत नाहीत. यदाकदाचित् जर ती धरली
तर राखणदाराला शेत मोकळे टाकून गांवांत कोंडवाड्यापर्यंत यावे लागते. पाटील भेटला आणि गुरे ताब्यात घेण्याला महार चावडीवर असला तर बरें, आणि जर कां दोघांपैकी एकाची गांठ पडली नाही तर तिष्ठत बसावे लागते. इतकी फुरसत शेतकऱ्यांला कोठून असणार ? आणि असली तरी नंगेसे खुदा बेजार. भिकाऱ्यांशी अदावत करून घरादाराचा उन्हाळा होण्याची भीति असते. शिवाय भिकार जाती पोरांपासून तो म्हाताऱ्यांपर्यंत लोंचट, आर्जवी, किंवा तंबी देणाऱ्या असतात. मुळी गुरांमागची पोरेंच दादा बाबा करून जनावरें सोडून न्यावयाची. त्यांची डाळ शिजली नाही तर तळावरील बायका, पुरुष, कुणब्याभोंवतीं घों घों जमतात व हातापायां पडतात. त्यांच्याही पुढे कुणब्याने आपला हेका सोडला नाही, तर ते गांवच्या शिष्टांकडे जातात, आणि उलट ते कुणब्यालाच हलकट ठरवून त्याला जनावरे सोडून देण्याची गळ घालतात. कारूनारूंची व अठरापगड भिकारांची जनावरें बाराही महिने शेते खात असतांना शेतकरी त्यांना कोंडवाड्यांत घालतात असें कां आढळून येत नाही, ह्यांतलें इंगित हे आहे. ज्या बायका गवतासाठी किंवा सरपणासाठी रान घेतात, त्या बहुधा राखणदाराचा डोळा चुकवून शेतांत घुसतात. चोरपावलाचा त्यांना बालाभ्यास असतो. त्या नसेल तेथन वाट पाडतात, व कांहीं कुपाटी काढली असल्यास ती बुजवीत नाहीत; कारण रात्री चोरी करण्याला ती आड-वाट उपयोगी पडते. शेतांत आल्यावर त्या ते वाटेल तसें तुडवितात; पिकें मोडतात; बांध, पाट, आळी, ढासळतात; गवत वेंचतांना भाजी, पाला, धान्य, फळे, ओटींत भरतात; आणि तेथल्या तेथें खाण्यासारखे असेल तें शेळीसारखें बकाबका झपझप खातात. शेताच्या मालकाची नजर गेली आणि तो लांबून ओरडला, तरी त्यांचे हात-तोंड चालूच राहते. जवळ येऊन तो फळे, भाजी, कणसें, परत घेऊ लागला तर त्या त्याची करुणा भाकतात, आणि नच जुळले तर गळा काढून कपाळाला स्वतःच दगड मारून घेऊन रक्त काढतात, आणि कुभांड रचतात की चार ठोंबांसाठी निष्ठुर कुणबी जीव घ्यावयाला उठला.
पापी कुणबी आंगाला झटून अब्रू घेऊ पाहतो, असाही आळ कित्येक जणी घालतात. अशा स्थितींत 'भीक नको कुत्रें आटोप' असें कुणब्याला होते. प्रसंग पाहून महार, मांग, भिल्ल, ह्यांच्या बायकाही शेतमाल चोरतांना असल्या युक्त्या अंगिकारितात. फिरस्त्यांच्या कांहीं जातींत पुरुष व बायका मिळून शेत मागावयास जातात, आणि कांहीं जातींमध्ये बायका-पुरुष वेगवेगळाले जातात. हे लोक शेतांत निरनिराळ्या वाटांनी एकदम घुसतात, आणि कणसें काढण्याचा तडाका लावतात. कुणबी अरे अरे करतो, इकडे एकाला किंवा एकीला घालवावयाला जातो, तों तिकडे दहापंधरा इसमांची कणसें खुडण्याची एकच गर्दी उसळते. त्याने आरडाओरड केली, म्हणजे सर्वजण त्याला वेढतात आणि बोलबोलून गोंधळून टाकतात. मांग-गारोडी, कैकाडी, चित्रकथी, फांसपारधी, इत्यादि चोरट्या जाती शेत उकळण्यांत फार बाक्या आहेत. तळाचा नाईक भले थोरले मुंडासें चढवून बरोबर मैना घेतो, आणि 'पाटील रामराम पाटील रामराम' करीत शेतकऱ्याच्या पुढे जातो. इतर बायका पुरुष चोहों बाजूनी शेतांत घुसून कणसें तोडूं लागतात. कुणबी शेतावर नजर टाकतो तों जिकडे तिकडे कणसें खुडण्याची एकच झिंबड त्याला दिसून येते, व तो रागें भरूं लागतो. परंतु 'मोठा दैवाचा बळीराजा धर्माचा वांटा दे' इत्यादि गुळचट भाषणे करून नाईक त्याला हरभऱ्याचे झाडावर चढवितो व खुलवितो; आणि मैना कोठे गळ्यांत हात घालून, तर कोठे दाढीला हात लावून पोवाडे, इष्किबाज गाणी व उखाणे म्हणून त्याची थट्टा सुरू करते. तेव्हां अर्थात् त्याची नजर शेतावरून गरंगळते. एवढ्या अवधीत सर्व टोळी दोन तीन पायल्यांना झोका देते: खेरीज नाईकाची भिक्षा व मैनेची ओवाळणी. कोल्हाटी-हरदासांच्या नायकिणी आडपडदा न ठेवतां थट्टा करतात, हे सांगणे नकोच. कंजारणीही टाळ्या पिटून अचकट विचकट उखाणे म्हणत म्हणत कुणब्याला अंगस्पर्श करतात. मांगगारोडी, फांसपारधी ह्यांच्या बायका आणि साधारपणे बहुतेक भिकार जातींच्या बायका शेत मागतांना करवेल तितकें कुणब्याचे
मन आकर्षण करतात. अशा रीतीने बिचारा रानचा गडी सुंभ होतो आणि भिकाराला उघड्या डोळ्यांनी शेत लुटू देतो. हा झाला उघड उघड रोजगार. ह्याखेरीज जमेल तेथें रात्रीतून पीक काढून नेण्याची अगर दावण बसविण्याची दहशत घालून खळे मागण्याला फिरतें भिकार कमी करीत नाही. 'कुनबी सरीखा दाता नहीं । पन मारे बिगर देता नहीं ॥' हा मंत्र कुणब्याला लुबाडणाऱ्या सर्व जातींच्या बायकापोरांनिशीं तोंडपाठ आहे; आणि त्याप्रमाणे त्याचा अंमलही जारी आहे. ह्याप्रमाणे

-----

 १नंदी ढवळा महादेव झाला ईश्वर स्वारी। बीं भरून पेरले एका भूमिकेच्या उदरी।। गण्या वर्षला मेघराजा पिकल्या घुंबरी । पांचा कणसांसाठी महादेव करून गेला चोरी ।। फिरून घेतली पांच कणसें मेंडे उडविले चारी। महादेवाचा गळा बांधिला एका वेळावरी ॥ सोड बळीराया तुझें भाग्य आहे थोरी । सोडून दिले बळीने महादेव गेला गिरजाजवळी ।। काय सांगू गिरजाराणी भगत मारू केला । अमृता शिपाई घोडा साजवंत केला ॥ फिरविलें मुंडासें हातभर बिलवला तुरा । धावू घातली वावरे बळी सांपडला बरा ॥ आव रे कुणबी हुरडा लेव रे बारीक । धांवत गेला बळी हुरडा मोडी निर्वाणीचा ॥ आपण खातो गिरजा देतो महादेव मौज पाहतो । गेला सारा दोरा दिवाणे केलें हवालदारू । अवकळी बळीराज संगे दिला हावलदारू ।। लाललाल घटी बुवाची सवारंग पट्टी । मुलखीचे दरबारी बुवाजी सांगत असे गोष्टी॥ मुलखींचा आला बुवाजी धराया नी नेला । आंध्रव गंध्रव राजा स्वर्गीचा झाला ।। अंकळी टंकळी राजा निर्वाणीची ढाळी । असा पवाडा गाते तुझ्या धर्माची साळी ॥

 देशी गांवांत खळी मगांतांना भिकार जाती कुणब्याला बहुधा वरील पोवाडा गातात, मानवाचें सत्त्व पाहण्यासाठी देव वाटेल ते रूप धारण करतो, व दान देणाराला स्वर्ग प्राप्त होतो; ही भिक्षेकऱ्यांच्या पथ्यावरची कल्पना ह्यांत मुख्य असून, गांव-मुकादमानीत सारावसुलीमध्ये कुणब्याला होत असलेल्या त्रासाचे वर्णन आहे.
दिवसा पेंढीदाणा गोळा करतांना रात्री कोणत्या शेतांत बिनबोभाट गरें चारता येतील, कोणत्या शेतातील पीक, लांकूड, ढोरे, मेंढ्या, कोंबड्या, नाडे उपटतां येतील हेही हे लोक टेहाळून ठेवतात, आणि त्याप्रमाणे रात्री काम उरकतात.

 झुंझरका राखणदाराला डोळा लागला म्हणजे चोरपावलाने शेतांत शिरून आपल्या गोण्यांत किंवा घोंगड्यांत धान्य अगर कणसें भरण्याची अनेक भिकार जातींची वहिवाट आहे. काही मध्यरात्रीला अगर पहिल्या रात्रीला म्हणजे कुणबी जेवणखाण करतो अशा वेळेला डल्ला मारतात. हे लोक चोरलेली कणसें लागलीच कुटतात व खातात, किंवा त्यांचे धान्य दुसऱ्या धान्यांत कालवतात; म्हणजे चोरी ओळखण्याची व अंगी लावण्याची अडचण पडते. गुराखी दोनप्रहरी लवंडला असतां ढोरवाड्यांतून किंवा मैदानांत चरणाऱ्या कळपांतून वंजारी, मांगगारोडी, चित्रकथी, पारधी व इतर ढोरे पाळणाऱ्या भटकणाऱ्या भिकार जातींचे लोक आणि स्थाईक चोरटे गुरेढोरें लांबवितात. ते आपली गुरे गांवच्या गुरांबरोबर करण्याला सोडतात, आणि आपल्या गुरांबरोबर गांवची गुरेही हांकून नेतात. रात्री रस्त्याने गाडी चालली असतां तिचा एक बैल सोडून एकजण जूंवाला खांदा देतो, आणि सोडलेला बैल आपल्या साथीदाराच्या हवाली करतो. व तो लांब गेला म्हणजे आपण जूं सोडून पसार होतो. गाडी वांकडी तिकडी चालून गाडीवाला जागा होतो, तोपर्यंत सोडलेला बैल कोठल्या कोठे नेलेला असतो. मेंढक्याने पाठ फिरविली की मांगगारोडी, कैकाडी, कळपांतून एकीकडे चरत असलेल्या बकऱ्याची किंवा मेंढराची हिसक्यासरशी मुंडी मुरगळतात, व त्याला झुडपांत किवा खांचेंत टाकून झटकतात; आणि मेंढक्या दृष्टीआड झाला म्हणजे तेथे परत येऊन तें बकरें अगर मेंढरूं घेऊन जातात. रात्रीच्या वेळी वंजारी मेंढ्यांच्या कळपांत शिरून यांना बिचकावतात, आणि त्या धांदलींत मेंढरे घेऊन पसार होतात. मेंढक्या आडवा झाला तर ते त्याला चोपतात. बेरड लोक हातांत वाघनख घालून वाघाचा किंवा लांडग्याचा आविर्भाव आणून कळपांत शिर-
आणि भेदरलेली मेंढरें बकरी चोरतात. भील, रामोशी, मांग वगैरेंची शेळ्यामेंढ्या चोरण्याची रीत अशी आहे-एक इसम मेंढवाड्याजवळ तडक जातो व बसतो; आणि बाकीचे १००।१५० कदमांवर राहतात. नंतर तो कडेंचे, मेंढरूं उचलतो व उजवा हात त्याच्या मागच्या पायांमध्ये आणि डावा हात पुढच्या पायांमध्ये घालून त्याची मान अशी दाबून धरतो की त्या मेंढराला 'ब्या' म्हणून करता येत नाही. अशा रीतीने आरडाओरड होईपर्यंत मेंढरें नेऊन ती आपल्या साथीदारांच्या हवाली करतो. चोरलेल्या शेळ्यामेंढ्यांनी ओरडू नये म्हणून मांग, रामोशी, कैकाडी व कातोडी त्यांच्या जिभेला मोठा कांटा टोचतात. चोरलेल्या जनवरांची शिंगें खुडून, त्यांच्या कानांचा आकार बदलून, अगर त्यांना डागण्या देऊन हे लोक त्यांचे स्वरूप असें बदलतात की, ती ओळखतां येऊं नयेत. कैकाडी, वड्डर, कुंचेवाले, कोल्हाटी वगैरे गाढवगोते ( ज्या जाती गाढवांवर बसतात, त्या एकमेकांना एकगोत्री चुलतभाऊ समजतात; असल्या सर्व जातींना गाढवगोते म्हणतात.) कुंभार-परटांची गाढवें चोरतात. हे लोक चोरलेली जनावरें लांब बाजाराला नेऊन स्वस्त भावाने फुकतात, किंवा मारून खातात. कधी कधी ते त्यांना आपल्या सामलातीतल्या खाटकांना अगर त्यांच्या मार्फत विकतात. रोज लागणाऱ्या जिनसा विकत घेण्यासाठी सर्व भटक्ये वाण्यांना आढीच्या दिढी भावानें धान्य देतात. सर्व भिकार जाती मनस्वी कैफ करतात. उद्यांची पर्वा नसल्यामुळे ते तलफेपायीं कलाल वगैरेंना फार स्वस्त दराने धान्य घालतात. भटकणाऱ्या भिकाऱ्यांच्या जमातींच्या वळणांतले कुणबी, वाणी, सावकार ठिकठिकाणी आहेत. त्यांच्याजवळ ते आपले धान्य सांठवितात, आणि कार्यप्रसंगी किंवा आषाढश्रावणांत गरज लागेल त्याप्रमाणे त्यांच्याजवळून चंदी आणतात. ह्यांना टांच बसते ती आषाढ आणि श्रावण महिन्यांत. त्या वेळेला खळी उलगडलेली असतात आणि रानांत कांहीं गवसत नाही, तेव्हां ह्यांना सांठविलेले धान्य उपसण्याची पाळी येते; म्हणून आषाढ-श्रावणाला हे लोक 'मेहुणा ' म्हणतात. मेहुण्यामेहुण्यांची मस्करी आबालवृद्धांस
माहीत आहे. जो जो समाज रानवट तो तो मस्करी जास्त. तेव्हां भिकार जाती सांगतात की, मेहुणा आला म्हणजे तो जसा दोन चार गचांड्या देऊन लोळवितो, आणि खाण्यापिण्यापायी खर्चात घालतो, त्याप्रमाणे आषाढ श्रावण दोनचार गचांड्या देऊन खर्चाची तसदी लावतो. भिकार जाती गांवात भीक मागतात ती अशी की, गांवकऱ्यांना जातिपरत्वें व्यवसायपरत्वें आळवून गाणी ह्मणून,कोठे बायकोपोरांना खुलवून तर कोठे कट कट नको असें करून,हे लोक आपली झोळी भरतात.भिक्षा मागतांना जर कांहीं चीजवस्त हाताला लागली तर ते ती लांबवितात, आणि ज्या जातींचा चोरी हाच जात-धंदा त्या तर भीक मागतांना हटकून चोरी करावयाच्या. भिकाऱ्यांच्या पालांभोंवतीं झारेकरी व कनिष्ठ प्रतीचे जव्हेरी खड्यागुंड्यासाठी नेहमी घिरट्या घालीत असतात. त्यांच्या पर्यटनांत त्यांना कोठे कांहीं कोठे कांहीं सांपडते. आणि ते चोऱ्याही करतात. त्यांना असला माल उजागरा विकण्याची पंचाईत असते, आणि खरी किंमतही माहीत नसते. त्यामुळे सोनार, झारेकरी, वाणी, जुनापुराणा जर खडेगोटे घेणारे फेरीवाले इत्यादि लोक त्यांच्याजवळून हलक्या किंमतीने माल घेऊन चांगला लाट मारतात. कोणत्याही गांवीं मुक्काम घालण्यासाठी व तेथें तो तीन दिवस टिकविण्यासाठी सर्व भिकाऱ्यांना पाटील-कुळकर्णी व हलके पोलीस ह्यांची मनधरणी करावी लागते. भिकार म्हणजे ह्या लोकांच्या बिनबोभाट उत्पन्नाची एक बाजू आहे. त्यामुळे कुणब्यांना कितीही त्रास झाला व वर्दळ लागली तरी गप्प बसावे लागते. भिकार जातींची किफायत किती आहे ह्याची कल्पना पुढील गोष्टींवरून करता येईल. पुण्याकडील खेड तालुक्यांतले ठोकेजोशी सावकारी करतात. भटकणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये

-----

 १ पारनेर तालुक्यांत पांचसहा वर्षांपूर्वी काही गोपाळांवर खुनाची तोहमत होती तेव्हां त्यांनी सुमारे हजार रुपये खर्च केला व चांगले चांगले सावकार त्यांना जामीन राहिले. १९१० साली पारनेरच्या मामलेदारांनी शेतचोरीबद्दल सात मांगगारोड्यांना प्रत्येकी शंभर रुपये दंड केला. त्यांतले ६०० रुपये तात्काळ आले आणि बाकी आठचार दिवसांत आले. साक्षीपुराव्याचा व वकिलांचा खर्च वेगळा
बायकापोरांनिशी दारू-तंबाखूचे व्यसन असते, अफू-गांजा सेवन करणारे आणि जुगार खेळणारे त्यांत पुष्कळ असतातं, आणि ह्यांपैकी एकही शोक पैशावांचून होत नाही. दर एक भुत्याला दीक्षा देतांना भोप्याला १०० रुपयांपर्यंत मिळकत होते. पोतराज करतांना भांग, गांजा, अफू, दारू वगैरे जितके म्हणून मादक पदार्थ असतील तितके पूजेला आणावे लागतात; व गुरुदक्षिणा, जेवणावळ मिळून सुमारे ५० रुयये खर्च येतो. पोतराजाचे धरित्रीपासून तो कलालापर्यंत १२ नमस्कार आहेत; आणि त्याला प्रत्येक कलालाचे दुकानी यथेच्छ दारू झोडण्याचा व दक्षिणा मागण्याचा हक्क आहे. एक वृद्ध पोतराज असे सांगत होता की, मुंबईस मनास वाटेल तितकी दारू मिळून पांच सात रुपयांखाली रोज जात नाही. कुंचेवाल्यांच्या लग्नांत मुलीच्या बापाला कमीत कमी पन्नास रुपये द्यावे लागतात. चित्रकथ्यांच्या लग्नाला दोनशे रुपयांचे वर खर्च येतो. फांसपारध्यांत १०० रुपयाचे खाली लग्न होत नाही, आणि १२५ रुपयेपर्यंत पंच दंड चोपतात. कोल्हाट्यांत लग्नाला ६०० - ७०० रुपये लागतात.

 चोरी, ठकबाजी करण्याच्या कामी गुन्हेगार-जातींना गोसावी, बैरागी, साधू , फकीर, वगैरेंचा वेष आतिशय उपयोगी पडतो. ह्याप्रमाणे नटून कोणी आला तर त्याच्या खाण्यापिण्याची चंगळ चालून त्याला घरें धुंडाळण्यास व वाटेल तेथे जाण्यास मज्जाव होत नाही. पुष्कळ गुन्हेगार जाती दुकानदारीचा आव घालून घरे हेरून ठेवतात व फोडतात. भामटे हे वारकरी, गोसावी, बैरागी, फकीर, यात्रेकरू वगैरेंची अनेक सोंगे आणून उचलगिरी करतात. बौरी (बावरी) जातीचे घरफोडे व दरोडेखोर अत्तरे व धातुपौष्टिक औषधे विकीत फिरतात. त्यांच्याबरोबर गाढवे, गाई, म्हशी, तट्टे असतात. समागमें बायकापोरें असल्यास ते गोसाव्याचा आणि सडेपणीं बैराग्याचा डौल घालतात. कांहीं खाकी साधू ( हे अंगाला भस्म चर्चितात, लंगोटी नेसतात आणि धुनी लावून बसतात. ) होतात. काहीजण कृत्रिम गंगाजलाच्या (पाण्यांत गोपी-
चंदन कालविलें म्हणजे तें भागीरथीच्या पापयासारखें दिसतें. ) कावडी घेऊन हिंडतात. खोटीं नाणीं पाडणारे व चालविणारे मारवाड अथवा गुजरात बौरी भाटाच्या, गिरी गोसाव्याच्या किंवा कबीरपंथी फकिराच्या थाटानें फेरीला निघतात, आणि बाण्या-दोहरे न अडखळतां म्हणतात. फकिराची ऐट आणून विजापुराकडील छप्परबंद नांवाचे मुसलमान लोक खोटीं नाणों पाडतात व चालवितात. औधीये लोक बैरागी किंवा ब्राह्मण यात्रेकरू बनतात आणि चोऱ्या करतात. उजळे मीने (मीयाने) लोक संजोगी साधूंची अक्कड लावून भगवा फेटा घालतात, किंवा कधीं कधीं ज्योतिषी बनतात आणि चोऱ्या घरफोड्या करतात.

 नाशिक, पंढरपूर, तुळजापूर, वगैरे क्षेत्रांच्या रस्त्यांवरील गांवांना सर्व पंथांच्या व धर्मीच्या खऱ्या-खोट्या सांधूंची बेहद्द तोषीस लागते. नवीन क्षेत्रं, नवीन साधू व नवीन पंथ निर्माण करण्यांत हिंदूंची बरोबरी करणारा एकही धर्म सबंध पृथ्वीत नाहीं. ‘ जितने कंकर उतने शंकर ' ' कवडीस कवी आणि गोवरीस गोसावी.' प्रवाससौकर्य आणि काठीला सोनें उघडें बांधून जाण्याइतकी शांतता असल्यावर क्षेत्रांच्या वृद्धीला आणि यात्रेकरूंच्या पायपिटीला ताळतंत्र कोठलें राहणार ? ह्यामुळे सध्यां गांवोगांव नेहमीं विकल, भिकारी, व साधू वस्तीला आलेले दृष्टीस पडतात. आंधळ्यापांगळ्यांची माळ बरीच मोठी असते, आणि त्यांना किफायतही पुष्कळ होते. आंधळे पांगळे अत्यंत सांसारिक व व्यसनी असून बहुधा दोन पैसे बाळगून असतात, कारण त्यांना दान करण्याची धर्मप्रवृत्तींपेक्षां, फॅशन ऊर्फ नवप्रिय चाल अलीकडे झपाट्यानें वाढत आहे. बायकापोरांचा संसार तर ते थाटानें करतातच; पण कैफही सडकून करतात. निरुद्योगी आंधळ्यापांगळ्यांच्या माळेचा उपसर्ग खेड्यांना हमेषा लागतो. त्यांचप्रमाणें वारकऱ्यांच्या दिंड्या–पालख्यांच्या वाटेवरल्या गांवांना त्याप्रीत्यर्थ नेहमी बराच खर्च येतो.

-----

१ एका गांजाच्या खटल्यांत एका वारकरी आंधळ्याला २० रुपये दंड मुनावतांच पांच सात मिनिटांत त्याच्या बायकोनें बिऱ्हाडावरून पैसे आणून भरले.
पूर्वापार रूढीप्रमाणे १००,२०० तें हजारों वारकऱ्यांना लोक भक्तिभावाने भाजीभाकरी पुरवितात. ह्याखेरीज दिंडीतले वारकरी वस्त्रप्रावरण, जोडे, घोंगड्या, छत्र्या, पैसे वगैरे उकळीत चालतात ते वेगळे. कानफाटे किनरीवर गोपीचंदाची गाणी म्हणतात व पीठ पैसे मागतात. भैरवदीक्षेचे गोसावी संध्याकाळी आल्लक पुकारीत पीठ मागतात. गोसावी-बैरागी घरोघर पीठ कपडा आणि गांजा तंबाखूला किंवा यात्रेला अगर एखाद्या मंदिराला पैसे मागतात. ते कधी कधी त्रागा करूनही पैसे काढतात. अघोरी राखेचा बोकणा तोंडांत भरून मेल्यासारखा पडतो तिळाची पेंड कुजविली म्हणजे तिची विष्टेसारखी घाण येते. याप्रमाणे नकली विष्टा खाण्याची भीत घालून अघोरी पैसे उकळतो. नानकशाही, कबीरपंथी पैसे मागत गांवोगांव हिंडतात. फकीर, शिद्दी भाकरी, पीठ, कपडा व पैसा मागतात. फिरस्त्या बैराग्यांपेक्षाही फकिरांचे वर्तन आतताईपणाचे व रंगेलपणाचें असतें. रफई फकीर गुरुजाने भोसकून घेण्याची किंवा मानेंतून 'सुलतानी' (सळई) घालण्याची जरब देऊन पैसे काढतात. मानभावांच्या झुंडीच्या झुंडी धान्य व पैसे गोळा करतात. 'बाहेरून काय मानभावीपणा दाखवितो, मानभावाप्रमाणे त्याचे मत कांहीं केल्या

-----

 १ सन १८०८ साली पैठणच्यानजीक दहा बारा गांवांत सुमारे २० फकिरांची टोळी पांच रुपये व घोडा पाहिजे म्हणून सवाल घालीत फिरत होती. त्यांना एका गांवाने पंधरा वीस रुपये करून दिले. त्यांत कुलकर्ण्यानें रुपया व पाटलानें आठ आणे दिले. कारण विचारतां गांवकऱ्यांनी असे सांगितले की, " फकिर दारांतून हलेना, तो फिरस्ता पडला. आगबिग लावली तर त्याचे घेतां काय?"

 २ सन १९०८ सालच्या आरंभी शेवगांव तालुक्यांतील खानपिंप्री गांवीं दोन प्रहरी कांहीं मानभाव आले, आणि सांगू लागले की, पन्नास मूर्ती गांवावरून उपाशी चालल्या आहेत. गांवाने साडेचार मण धान्य त्यांना करून दिले, त्याचे त्यांनी त्याच वेळी गांवच्या वाण्याजवळ ढिल्या भावानें टक्के केले आणि रोकड पैसे घेऊन ते चालते झाले.
कळावयाचें नाहीं; ' इत्यादि वाक्प्रचार लोकांमध्ये ह्या वर्गासंबंधानें वसत असलेली, खरी म्हणा खोटी म्हणा, साशंक भीति दर्शवितात.

 गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, हिजडे, मानभाव, फकीर, वगैरे देवाचें नांव पुढे करून भीक मागणारे लोक-मग ते फिरस्ते असोत किंवा स्थाईक असोत-हा नुसता निरुपयोगीच नव्हे तर समाजघातक वर्ग आहे. ब्राह्मणापासून तो सर्व वर्गाच्या व सर्व जातींच्या लोकांना ह्या वर्गात शिरतां येते. विष्णूचा पेला प्याला म्हणजे बैरागी होतो, शिवाचा पेला प्याला म्हणजे गोसावी, पिराचा प्याला ह्मणजे फकीर होतो इत्यादि. ह्यांनी संसार नांवाला सोडलेला असतो. त्यांपैकी बहुतेक संसारिकांपेक्षाही लालुची, लंफंगे, तामसी व दुर्व्यसनी असतात; आणि लोकही विशेषतः मारवाडी, गुजराती, उदमी व पाटील त्याना इच्छाभोजन, भांग,गांजा, अफू देण्यांत पुण्य मानतात. कोणी आईबापांवर तर कोणी बायकामुलांवर रूसून साधू फकीर होतो, कोणाला आधिव्याधीमुळे प्रपंच नकोसा होतो तर कोणाला पोटाची ददात, यातायात नको असते. ह्या वर्गाची खाण्यापिण्याची मौज, निष्काळजीचें बिनदगदगीचे आयुष्य, कोणाच्याही कह्यांत. वागणे नलगे अशी स्वच्छंदी प्रवृत्ति, लोकांकडून मिळणारा सन्मान, आत्मोद्धाराचें मृगजळ, आणि लांड्या कोल्ह्यांनी व मुंडणाऱ्यांनी ह्या जीवनवृत्तीसंबंधाने भरलेले खासें नामी छत इत्यादींना भुलून पुष्कळ मुलगे, मुली, गफलतीने गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, भोप्ये, आराधी, जोगतिणी, भाविणी, मानभाव, फकीर वगैरे होतात. मुलें होत नसली किंवा होऊन ती वांचत नसली अशा स्त्रीपुरुषांना हे लोक अंगारा, प्रसाद, व आशिर्वाद देतात; आणि सांगतात की, पहिले किंवा अमुक एक फळ देवाला वाहा म्हणजे तुझें पोट पिकेल, व वस्तीवाडी वाढेल. गरजवंताला अक्कल नसते. लोक बिचारे कबूल करतात, आणि जुनी लंगोटी देण्यास मागेंपुढें करणारे पोटचा गोळा तटकन् तोडून गोसावी, बैरागी, वाघ्या, भोप्या, जोगतिणी, मुरळी, फकीर, मानभाव ऊर्फ भवाळ इत्यादींच्या पदरांत टाकतात ! अशी एक समजूत आहे की, संकल्पाप्रमाणे मूल वाहिले
नाही तर तें नपुंसक होते आणि वंशखंड होतो. जन्मचे जन्म जातात तरी मोठमोठ्या पंडितांला धर्माचा सुगावा लागत नाही, परंतु आमच्यांत ज्याप्रमाणे बाहुलाबाहुलींची लग्ने होतात तशी लोकांच्या अज्ञानाचा व धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन पाळण्यांत चिल्यापिल्यांना धर्मदीक्षा किंवा पंथदीक्षा देण्यात येते. असे मुंडलेले लोक पुढे कुसंगतीने दुराचारी होतात, आणि मुरळ्या, भाविणी ह्यांना तर पोटासाठी कसब करणे प्राप्त होते. परंतु अप्रबुद्धपणी गुरूचे चेल्यावर जुलूम वजन असते; व त्याला मायेंत घेण्यासाठी खाणे-पिणे, लेणे वगैरे हरएक बाबतींत चेल्याचे असे लाड चालतात, की कोणी पोटच्या पोराचे इतके कोड पुरवीत नसेल. मानभावांच्या मेळ्यांतले कड्यातोड्यांनी मढविलेले गोजिरवाणे 'बाळबोवा' पाहिले म्हणजे वरील विधानाची सत्यता पटेल.

 आईबापांचें पोट पिकण्यासाठी त्यांनी आमच्या जन्माचें मातेरें केलें अशी कबुली जेजुरीस भर खंडोबाचे देवळांत किती तरी मुरळ्या समजू लागल्यावर देतात. हजार साधूत नऊशेनव्याण्णव ज्ञानशून्य, व्यसनी, कोपिष्ट व लालची असतात, आणि त्यांच्या दुर्वासवृत्तीला भिऊन लोक त्यांना पोस-

-----

 १ एका मराठ्याच्या मुलाला लहानपणीच त्याच्या आईबापांनी गांवच्या भवाळाच्या ओटीत घातले, आणि तो त्याच्या घरी दळण, कांडण, शेणकुर, स्वैपाकपाणी करीत होता. सोळा सत्रा वर्षांचा झाला तरी त्याला धड बाळबोधही वाचतां येत नव्हते. त्याला एकाने म्हटले की, इतके काम केले तर तुला १०० रुपये साल कोठेही मिळेल. तो म्हणाला, 'बुवा बरा जाऊ देईल!' दुष्काळांत मुलीसह मानभावीण झालेल्या व पुढे मेळा सोडलेल्या एका बाईनें आपली आठ दहा वर्षांची केशवपन केलेली मुलगी मेळावाल्यांकडून परत मागितली. पण बुवा तिचे ऐकेनात.म्हणून तिच्याबरोबर गांवकरी मेळ्याचे मुक्कामाच्या जागी गेले, तो मुलीने उत्तर दिले की, 'आई मला जारकर्माला नेते, मी मेळा सोडून येत नाही.' असले डावपेंच धर्मातरांत नेहमी आढळतात, व हीच अवस्था सर्व प्रकारच्या धर्मदीक्षा व पंथदीक्षा दिलेल्या मुलामुलींची पर्यायाने असते, हे चाणाक्ष वाचकाला फोडून सांगणे नको.
तात. अभ्यास करून करूनही मनाची एकाग्रता होत नाही, तर ज्यांचा सर्व काळ भटकण्यांत, शिधा कपडा पैसा उकळण्यांत, व निशाबाजींत जातो, त्यांनी 'आमचा काळ आम्ही परमार्थाकडे वेचतों, तुम्ही जसा पोटाचा तसा आम्ही देवाचा उद्योग करतों, सर्वांनीच रोजगार करावा तर देवाची चाकरी कोणी बजवावी ?' इत्यादि बकावें,आणि लोकांनीही तें खरें मानावें; ह्यापेक्षा आमच्या विचारमूढतेचा खंबीर पुरावा दुसरा कोणताही असू शकणार नाही. बहुतेक साधु निवळ खाणेपिणे, गप्पागोष्टी, हुक्कापाणी ह्यांत काळ घालवितात. थोडेसे तुळसीदासाचें रामायण झुकत झुकत वाचतात किंवा ५ - ५० अभंग, दोहरे, पदें ह्यांची पोपटपंची करतात; आणि फारच छेडलें तर एकादा दुसरा एकादें ठराविक धर्मविषयक कोडे किंवा कूटप्रश्न अज्ञ जनांचे तोंडावर फेंकतो, व त्याचे ठराविक पद्धतीने निराकरण करतो, आणि त्यांकडून वाहवा मिळवितो. असल्या बऱ्हाणी साधूंना दान करून त्यांच्यामार्फत स्वर्गात दाद लावून घेण्याचा यत्न करणे म्हणजे वंध्यापुत्राची अपेक्षा करणे नव्हे काय ? गोसावी, बैरागी, फकीर गांवांत आले की गांवचे चंगीभंगी आपली बैठक बुवाजी किंवा साईजीजवळ घालतात, आणि त्यांचे प्रस्थ वाढवून आपणही चैन करतात. या वर्गातले साधू पहिल्याने गांवच्या अल्पवयी पण चैनी मुलांना गाठून त्यांना अमलाची चट लावतात, आणि तत्प्रीत्यर्थ त्यांकडून घरचे धान्य, वस्त्रे, किंचा पैसा ह्यांच्या लहानसान चोऱ्या करवितात. ह्यांच्या प्रसादानें गांजा-अफूचे व्यसन लागून पुढे चोर किंवा कफल्लक झालेल्या व कधी कधी प्राणासही मुकलेल्या तरुणांची उदाहरणे मागाल तितकी खेड्यांतून दाखवितां येतील. ह्याप्रमाणे गांवांवर चरतां चरतां हे लोक जर एकाद्या गांवीं स्थायिक झाले की ते गांवकऱ्यांच्या उतरंडी उतरूं लागतात. ह्यांच्या धुनीजवळ गांवगुंड पडलेले असावयाचे, आणि मग 'कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर' असे धंदे चालतात. अनेक ठिकाणच्या तरुण स्त्रिया-विशेषतः विधवा डबोल्यासह ह्या लोकांनी काढून नेल्या आहेत, आणि ज्या घरांत मुंगीला
रीघ नव्हती, तेथे मोठाली भगदाडे पाडली, व मानधनांच्या तोंडाला काळें फांसलें. आगगाडी नव्हती तेव्हां साधू लोक पायी प्रवास यात्रा करून ठिकठिकाणची माहिती व ज्ञान मिळवीत; आणि त्यांच्या औषधपाण्याचा व जडीबुट्टीचा लोकांना उपयोग होत असे असें म्हणतात. आतां हे लोक आगगाडीने इकडून तिकडे जातात, व त्यांना देशाचार पाहण्यास व वनस्पतींचे ज्ञान मिळविण्यास कांहीसुद्धां संधि सांपडत नाही. तरी आपले लोक अजून समजतात की, साधूंना किंवा त्यांच्या घरभऱ्या चेल्यांना पुष्कळ कळते. काही साधूंना अल्पस्वल्प शास्त्रीय क्रिया माहीत असतात. उदाहरणार्थ, कागदावर तुरटीने गाईचे किंवा चेटकीचे चित्र काढले तर तें एरवी दिसत नाही, कागद पाण्यात बुचकळला म्हणजे तें दिसते व साधूचा बोलबाला होतो. झाडे,धान्याच्या सुड्या व चाऱ्याच्या गंजा जाळण्याच्याही युक्त्या आहेत, आणि अरिष्ट-प्रतीति आली म्हणजे लोकांना खरेंच वाटते की, साधूचा शाप भोंवला. असल्या कृती शिकून आपलें ढोंग मातविण्यापलीकडे किंवा साधूंचे कपडे पांघरून गुन्हे करण्यापलीकडे बहुतेक आयतखाऊंस उद्योगच राहिला नाही, असें म्हटल्यावांचून राहवत नाही. ह्यांच्याच नांवानें तुकोबाराय हळहळतात की "बुडतसें जन देखवेना डोळा । म्हणूनी कनवळा येत असे ॥"

 गांवोगांव भटकणाऱ्या भिकाराचे ढोबळ मानाने तीन वर्ग पडतील. जोशी, वासुदेव, पांगूळ, भराडी, वाघे, तिरमल वगैरेसारखे भिक्षुक; चित्रकथी, मांगगारोडी, पारधी, माकडवाले, कैकाडी, वगैरे सारखे चोर भिक्षुक; आणि वारकरी, विकल (आधळेपांगळे, रोगी वगैरे ), गोसावी, बैरागी, मानभाव, फकीर वगैरे प्रतिष्ठित भिक्षुक. अनेक प्रकारचे गुन्हेगार लोक आपल्या सोयीप्रमाणे उपरोक्त तिन्ही वर्गाची सोंगें घेऊन आपला कार्यभाग साधितात, आणि भिक्षेत ऊर्फ धर्मात प्रपंच भागला नाहीं म्हणजे तिन्ही वर्गातील लोक कमीआधिक मानानें लांडीलबाडी व चोरीचपाटी करतात. पहिल्या वर्गातील लोकांची जी काय प्राचीन गाणी, कथा, पोवाडे, होरे, ठोके, बाण्या असतील, त्यांचा संग्रह करून
प्रसिद्ध केला, तर सामाजिक व धार्मिक इतिहासावर आणि रूढिबद्ध लोकाचारावर बराच प्रकाश पडेल, असें तज्ज्ञ श्रोत्यांचे मत झाल्यावांचून राहणार नाही. स्टेडसारख्या पंडितांनी पाळण्यांतल्या मुलांची कवनें व गोष्टी निरंतर संग्राह्य म्हणून संपादन केल्या आहेत. पुष्कळ कवनांतील कथाप्रसंग अनेकरसपरिपूर्ण आहेत. परंतु तेवढ्यासाठी ती घोकून ठेवणारांच्या पोषणाचा सामाजिक खर्च अतोनात होतो असे मोठ्या कष्टाने म्हणावें लागते. त्यांच्या पाठांतराचा संग्रह व प्रकाशन झाले म्हणजे मग त्यांच्या धंद्यांत तर बिलकुल हंशील राहणार नाहीं. वेद प्रसिद्ध झाले आहेत म्हणून वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा देणे अनवश्यक आहे. अशी झालेली लोकप्रवृत्ति पुढे ढकलली म्हणजे वारकरी, कबीरपंथी, गोंधळी वगैरे प्रसिद्ध ग्रंथांतील अभंग, पदें, लावण्या पोवाडे म्हणणारांचे काम उरलें नाहीं असें होतें. भराडी, वासुदेव, गोसावी, बैरागी, पांगुळ, कानफाटे वगैरेंची कवनें व कथा प्रसिद्ध करण्यास सार्वजनिक वर्गणी केली, तर पुढील पिढीचा बराच खर्च वांचून ह्या भिक्षुकांना परवडेल तो उत्पादक धंदा करण्याचा रस्ता खुला करून दिल्याचे महत्कार्य होईल. अनेक महाराष्ट्रीय संस्थानिकांसमोर ह्या लोकांची, निदान तमासगीर बहुरूपी वगैरेंची दरसाल हजरी होत असते; व त्यांना इनाम, वर्षासनें, शिरपाव वगैरे बिदागी देण्यात येते. त्यांनी जर ह्या पद्धतीला व्यवस्थित स्वरूप दिले, आणि इंग्रज सरकाराच्या पुराणवस्तुसंशोधन खात्याप्रमाणे उपरोक्त वर्गातील यच्चयावत् लोकांच्या सांप्रदायिक विद्येचा संग्रह करण्याचे एखादें खातें काढले तर आपल्या देशबांधवांवर त्यांचे अनंत उपकार होतील ह्यांत संशय नाही. तरी संस्थानिकांनीही सहानभूतीने ह्या विनंतीचा विचार करावा. दुसऱ्या वर्गाचा म्हणजे चोरट्या भिकाराचा कोणालाच उपयोग नसून उलटा उपद्रव आहे. प्रतिष्ठित भिक्षुक बहुतेक यात्रेकरू म्हणून वावरतात. साधू-फकिरांच्या सर्व पंथांमध्ये जरी घरभरे आहेत, तरी वारकरी शिवायकरून बाकीच्यांमध्ये फार करून सडे लोकांचा भरणा विशेष असतो. काही तरी उद्योग करून दोन पैसे सांचवून
ह्यांनी खुशाल यात्रा, वाऱ्या व देवदेव करावा. मजुरीचे दर गेल्या पंचवीस वर्षांत दुपटीवर चढले आहेत. धष्टपुष्ट आंधळ्यांना सुद्धा डोळसपांगळ्यांची मदत घेऊन चार पांच पायल्या दळण दळण्यास हरकत कोणती? आपापल्या वकुफाप्रमाणे ज्या त्या भीकमाग्याने धंदा केला तर मजुरांची संख्या वाढून मजुरीचे दरही सैलावतील. अमुक तिथीला अमक्या यात्रेला गेले पाहिजे अशी निकड दाखवून भाड्याचे पैसे मागणारे ह्या वर्गात पुष्कळ असतात. पण ते असा विचार करीत नाहीत की, आपण रिकामटेकडे असतांना दोन तेथे चार महिने पायी प्रवास करून तिथि कां गांठू नये ? भिक्षुक येथून तेथून अर्कट व स्वार्थी ही खूणगांठ हृदयाशी बांधून त्यांना पुरे कसाला लावण्याचा सर्व जातींच्या, पंथांच्या व संप्रदायांच्या लोकांनी निर्भिडपणाचा निश्चय केला पाहिजे, आणि या कामांत कोणी कोणाला गळ घालू नये. पुष्कळ वेळां असें होतें कीं, गांवकरी एकमेकांच्या भिडेला गुंततात आणि अवघेही बुडतात. भवाळ पाटलाने माळकरी कुळकर्ण्याला म्हणावें की आम्ही तुमच्या दिंडीची संभावना केली तेव्हा तुम्ही मानभावाचे मेळ्याला मदत करा, आणि दोघांनाही मुसलमान मुलान्याने म्हणावें की, आम्ही तुमच्या लोकांच्या साधूंंना वर्गणी देतो, तर तुम्हीही आमच्या फकिराचा सवाल खाली जाऊ देऊ नका. ज्यांच्या गुणांची खात्री पटली असेल अशा-मग तो कोणीही असो-व्यक्तिविशेषाच्या भजनीं तुम्ही खुशाल लागा. कोणी लोकोपयोगी धर्मसंस्थेचा जीर्णोद्धार करीत असेल तर मनाची खात्री करून घ्या आणि त्याला यथाशाक्त साह्य करा. पण पिढीजाद भिक्षुकी किंवा पंथ किंवा सांप्रदाय या भपक्याला भुलून आपले नांव वाढविण्यासाठी कोणी स्वतः बुडूं नये, व इतरांनाही बुडवू नये. वारकऱ्यांना लोक फारसे भीत नाहीत; पण गोसावी, बैरागी, फकीर, मानभाव ह्यांची लोकांना भीति वाटते. त्यांच्या त्राग्यांना लोक चळचळा कांपतात; याशिवाय हे लोक म्हैस उडवतील, झाडे, फळे जाळतील, विहिरीचे पाणी पळवतील किंवा आग लावतील, असें ह्या साधूंचे लोकांना भय राहते. असें
सांगतात की, निजामशाहीत भिकार ठरत नाही. गांवकरी व अधिकारी त्यांना झोडून पिटाळून लावतात. मोकळ्या पायाच्या इंग्रजीत तसे होणे शक्य नसल्याने एकंदर आयतखाऊंचा प्रश्न सोडविणे कठीण आहे, व तो आमच्या लोकांच्या मायाळूपणानें अधिकच कठीण झाला आहे. प्रत्येकानें काम करावे आणि पोटाला मिळवावें. असें जो करीत नाही व मला पोटाला नाही म्हणून भीक मागण्याला येतो, त्याला भीक घालू नये. तो उपाशी मरत असला तर त्याला काम करण्यास सांगावे, पण फुकट पोटाला देऊ नये. तसेंच पैसा गांठी असल्याशिवाय कोणालाही भटकतां येऊ नये. अशी तजवीज झाली पाहिजे आणि हे काम लोकांचे आहे, ह्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येण्यासारखे काही नाही. वाटेल त्याने वाटेल त्या साधूला किंवा साधूंच्या मेळ्याला वाटेल तेथें न्यावे आणि त्यांचा खर्च सोसावा. ज्या भिक्षुकांजवळ वाटखर्ची नसेल त्यांना आमंत्रणाशिवाय गांवोगांव भटकतां येऊ नये, आणि ते गांवी आल्यास त्यांना तेथें भिक्षा मिळू नये व मागतां येऊं नये. आमंत्रित भिक्षुकांची बरदास्त आमंत्रण देणारांनी करावी, इतरांस त्यांची तोषीस लागू देऊ नये. असे झालें म्हणजे आमंत्रण देणारे अंथरूण पाहून पाय पसरतील. असले कांहीं सिद्धांत लोकांच्या मनांत बिंबल्याशिवाय आणि तदनुसार वागण्याचा त्यांनी निर्धार केल्याशिवाय भिकाऱ्यांची व गुन्हेगारांची संख्या आणि देशाचें दारिद्रय हटणार नाही. निमंत्रण नसलेल्या साधूंच्या फिरतीवर पोलीसने लक्ष ठेवावें आणि लोकांना त्रास होईल अशा रितीने कोणालाही भीक मागूं देऊ नये. मुंबई डिस्ट्रिक्ट पोलीस आक्ट (१८९० चा अंक ४) कलम ६१ रकम (एस्) नुसती कायद्यांत धूळ खात पडली आहे. तिचा जर गांवांत, यात्रांत व आठवडे बाजारांत अंमल केला तर पुष्कळ साधू आणि पंगू दुसरा धंदा पाहतील. जो कोणी त्रासदायक रीतीनें भीक मागतो अथवा भीक मिळविण्यासाठी रस्त्यांत किंवा रस्त्याजवळ रोग किंवा व्यंग किंवा किळसवाणी जखम दाखवितो त्याला पन्नास रुपयेपर्यंत दंड सदर कायद्याच्या सदर कलमांत सांगितला आहे. तसेंच अठरा वर्षांचे आंतील पुरुषाला
किंवा स्त्रीला आजन्म ब्रह्मचर्य-वृत्तीची दीक्षा देऊ नये, आणि बारा वर्षीच्या आंत कोणालाही चेला बनवू नये अशी कायद्याची अटक सरकारने घातली, तर पुष्कळच काम होईल. गुन्हेगारजातींचा गुन्हे करण्याचा धंदा सुटावा म्हणून हिंदुस्थान सरकारने गुन्हेगार जातींचा कायदा (इ० स० १९११ चा तिसरा ) पास केला आहे; आणि मुंबई सरकारनें तो सात आठ जिल्ह्यांत १०-११ जातींना लागू केला आहे. गुन्हेगार जातींतील इसमांची नांवें नोंदून त्यांनी नेमल्या प्रदेशांत स्थाईक झाले पाहिजे, ठरविलेल्या हद्दीबाहेर भटकू नये; ६ ते १८ वर्षांच्या वयापर्यतची मुले शाळेत घातली पाहिजेत, वगैरे निर्बध सदर कायद्याअन्वयें सरकारला करतां येतात. हा कायदा यशस्वी करण्यास लोकांनी सरकारला मदत केली तर बहार होईल. गांवकऱ्यांनी व गांवकामगारांनी मनांत वागविलें असते, तर सर्व आयतखाऊंचा बंदोबस्त मागेंच झाला असता. पीनल कोड सर्वांना पुरून उरलें आहे. खेरीज पोलीस आक्ट, कोंडवाड्याचा आक्ट वगैरे त्याची पिलें आहेतच. मागणाराने शेतांत किंवा घरांत पाऊल ठेवलें की अन्यायाची आगळीक होते; रोप तुडविलें की अपक्रिया आणि खुडलें की चोरी होते. दुसऱ्याच्या मालांत गुरें चारली तर पिनल कोडची अपक्रिया होऊन शिवाय कोंडवाड्याचे आक्टाप्रमाणेही गुन्हा होतो. सर्व भटके गदळ राहतात आणि मुक्कामाच्या गांवांत व आसपास अति घाण करतात. अगोदरच खेड्यांत स्वच्छता कमी आणि त्यांत फिरस्ते उतरले म्हणजे गावापासून अर्धा-पाव मैल नाक धरल्याशिवाय चालतां येत नाही. घाणीचे खटले करूनही त्यांचा प्रवास अडचणीचा व खर्चाचा करता येईल, व सार्वजनिक खजिन्यांत थोडी फार भर पडेल. तेव्हां जरूर ते कायद्याचे साह्य घेऊन सर्वांनीच ही सार्वजनिक पीडा घालविण्यास झटले पाहिजे.