पुरवणी.
महायात्रा.
----------

 आडक्या हत्ती झाला म्हणून का भलत्याने घ्यावा ? । अनंत फंदी.

 काश्याम्मरणान्मुक्तिः । ‘मरावें काशी का मरावें मिराशी' 'न लागो पुत्राचा हात पण लागो डोमाची लाथ. ' असे लोक म्हणत आले आहेत. 'काशीयात्रा घडो' हा आशीर्वाद बहुधा विधवा स्त्रियांना देण्याचा प्रचार आहे. 'माझ्या नशिबांत महायात्रा आहे काय ?' असें आपला हात किंवा पत्रिका सामुद्रिक-ज्योतिष्याला दाखवून विचारणारे जुन्या समजुतीचे पुष्कळ गृहस्थ निघतील. प्रयाग, काशी, आणि गया, ह्या त्रिस्थली यात्रेला महायात्रा म्हणतात. प्रयागास त्रिवेणीचे वृत्तिवान् उपाध्ये प्रयागवाळ, काशीस मणिकर्णिकेचे गंगापुत्र व गयेस गयावाळ असे तद्देशीय तीर्थोपाध्याय आहेत. उत्तर हिंदीस्तानांत उपाध्यायाला सामान्यत्वें पंड्या म्हणतात. ह्या तिन्ही क्षेत्रांचे महात्म्य वर्णन केले आहे असे अनेक कथाभाग संस्कृत-प्राकृत ग्रंथांमध्ये जागोजाग आढळतील. तरी ह्या कर्मभूमीत जन्म घेऊन महायात्रा घडावी; आणि प्रयागामध्ये त्रिवेणीस्नान व सौभाग्यवतीचें वेणीदान करावें, काशीमध्ये मणिकर्णिकास्नान व पिशाचमोचन करावे, तसेंच कालभैरवाचे देवळांतील गंडे-विक्याकडून त्याचा हलका सोटा खाऊन यमराजाचा मोठा सोटा चुकवावा, गयेमध्ये विष्णुपदावर पिंडदान आणि अक्षय वटाखाली गयावळाकडून आत्मसहित सर्व कुलाची जन्ममरणापासून मुक्ति करून घ्यावी, असें प्रत्येक हिंदूच्या मनांत येणे साहजिक आहे.

-----

 १ काशीवासाविषयीं भर्तृहरीची आतरता इतकी होती---

  कदा वाराणस्याममरतटिनीरोधसि वसन्।

  वसानः कौपीनं शिरसि निदधानोञ्जलिपुटम् ॥

  अये गौरीनाथ त्रिपुरहर शम्भो त्रिनयन ।

  प्रसीदेत्याकोशन्निमिषमिव नेष्यामि दिवसान् ॥ वैराग्यशतक  पूर्वी वाटेच्या अडचणीमुळे काशीयात्रा करणे मोठे जिवावरचे होते. यात्री परत येईलच असा भरंसा नसल्याने, यात्रेला निघण्यापूर्वी आप्तेष्टाना त्याला जेवावयास बोलविण्याचा आणि परत आल्यावर त्यानेही कालाष्टक व गंगापूजन करून मोठे जेवण (मावंदें) घालण्याचा प्रघात पडला. तेव्हां अति निवडक लोक काय ते महायात्रेच्या भानगडीत पडत. आणि यात्राही पण फार तर वर्षातून एकदां म्हणजे वसंताचे सुमारास जात असे, असें तिन्ही क्षेत्रांचें उपाध्याय व गांवोगांवचे लोक सांगतात. आतां आगगाडी झाली, दक्षिणउत्तरेचे परूस-आंगण झालें, व रेलवे-भाडे कमी दिसू लागले. चिकित्सा न करितां ब्राह्मण करतात एवढ्या हवाल्यावर ते करतात तितकी कर्मे व विधि करण्याची लालसा कारकुनी शिक्षणप्रसाराबरोबर जसजशी फैलावत चालली, तसतशी महायात्रेला यच्चयावत् जनता लोटू लागली; आणि केव्हाही पहा त्रिस्थळीत यात्रेकरू नाहीत असा एकही दिवस उगवेनासा झाला आहे. वर वर्णन केलेली अनुकूल संधि प्राप्त होतांच तीर्थोपाध्यांनी चपळाई केली, आणि आपली अमदानी म्हणजे यात्रेकरूंची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने प्रयागवाळ-गंगापुत्र-गयावाळ-परस्पर-साह्य-कारक मंडळ्या अस्तित्वांत आल्या. मजुरांच्या भरतीसाठी ज्याप्रमाणे चहाचे मळेवाले आपले एजंट देशोदेशी पाठवितात, त्याप्रमाणे ह्या मंडळीनेही आपले दलाल व नोकर प्रांतोप्रांतीं फेंकिले आहेत; इतकेंच नव्हे तर त्यांपैकी काही जणांनी पुणतांबे, नाशिक, सारखी क्षेत्रे शहरे व मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, सारखी स्टेशनें वगैरे ठिकाणी कायमचे डेरे दिले आहेत. असें सांगतात की, ... नांवाच्या गयावळाचे १६०० गुमास्ते देशावरावर घुमतात. ही संख्या अतिशयोक्तीची मानली तरी एवढे मात्र खास की, यात्रेकरू जमविण्याच्या व्यापारांत हजारो हिंदुस्थानी गुंतले आहेत. ते हरप्रयत्नाने यात्रेकरू येण्याची व त्याच्या द्रव्यबलाची बातमी मिळवितात,

-----

 १ अहमदनगर जिल्ह्यांतल्या एका वकिलांनी कोर्टात काम करतो असा मोघम धंदा पंड्याला सांगितला. त्याने तार करून ते ऐपतदार असल्याबद्दल माहिती आणविली. वकील झाडोझाड हिंडले असले तर पंड्ये पानोपान हिंडलेले असतात! त्याला कोणत्याही गांवी किंवा स्टेशनावर गांठले की पुसूं पुसूं बिलबिला करतात, आणि एवढ्यावर तो हाती चढला नाही तर आपले मालकास अगर पुढील उतार स्टेशनच्या इसमास तार देऊन तो हस्तगत करण्याची कसोशी करतात. आम्ही प्रयागवाळाचे नोकर तुम्हांपासून खाण्यापुरते मूठभर तांदूळ घेऊन मालकाचे खर्चाने बद्रिनारायणापर्यंत तुमच्या बरोबर येऊ व खडी तैनात पहारा करूं, तुम्ही तुळशीपत्र दिले तरी आमचा मालक त्यांत संतोष मानील व तुमची यात्रा सुफळ करून देईल, इत्यादि प्रमाणे हे लोक साखर पसरतात. प्रयागवाळही आमचा माणूस म्हणून सदर इसमांना यात्रेकऱ्यांबरोबर पुढे पाठवितात, व गंगापुत्र आणि गयावळ हेही झांकली मूठ सहसा उघडी करून दाखवीत नाहीत. वास्तविकपणे हे लोक नुसते प्रयागवाळांचेच दलाल नोकर नसून गंगापुत्र व गयावळ ह्यांचेही असतात, आणि कदाचित पुढील क्षेत्रांच्या पंड्यांचेही असतील. बारीक तपास करतां असें निश्चयात्मक समजले आहे की, ह्या भरती करणाऱ्यांपैकी बहुतेक जण पंड्यांचे नोकर नसून पातीदार आहेत; आणि सामान्यतः जरी त्यांची पाती आठ आण्याची असते, तरी कांहीं भिकार तीर्थभट केवळ भोजन व भोजनदक्षिणा ह्यांवर तृप्त होतात, आणि यात्रकऱ्यांची सर्व किफायत ह्या आडत्यांना देतात. असेही ऐकण्यात आले की, साधल्यास हे तैनाती यात्रेकरूंची चोरी करतात, किंवा आपल्या सामलतींतल्या चोरट्यांना सधन यात्रेकरूंची खबर देतात. अर्थात् यात्रेकरूला मोहिनी घालण्याच्या नानाप्रकारच्या भिक्षुकी व्यापारी युक्त्या हे का योजितात, ह्याचा ह्यापेक्षा अधिक उलगडा करण्याचे प्रयोजन नाही. ह्याखेराज यात्रांचे स्थानिक भरेकरी आहेतच. यात्रेकरू काबीज करण्याचे मुख्य ठिकाण प्रयाग होय, तेथे त्याला एकदां रोंखला म्हणजे गंगापुत्र व गयावळ ह्यांचीदेखील निचिंती होते. कांहीं प्रयागवळांनी स्टेशनच्या खेपा करणाऱ्या हिंदू मुसलमान गाडीवानांशी सरकत केल्याचे ऐकिलें आहे. यात्रेकरूंनी उपाध्यायाचें नांव सांगितले तरी हे गाडीवान त्याला आपल्या सरकतदाराच्या घरी आणून सोडतात, आणि तोच तो इसम आहे असें भासवितात. अगोदरच फुगलेल्या आमच्या भिक्षुकांच्या संख्येत ह्याप्रमाणे सहस्रावधि भर पडली, व तिच्यायोगाने यात्राभरतीचे काम झपाट्याने व मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ज्याप्रमाणे पलटणीच्या तुकड्या अंमलदाराच्या मागे चालतात त्याप्रमाणे दक्षिण प्रांताचे हजारों शेतकरी, सोनार, कासार, सुतार, लोहार,साळी,माळी, धनगर, वगैरे गांवढेकऱ्यांंच्या झुंडीच्याझुंडी लाठीवाल्या भरेकऱ्याच्या मांगें चालतात. तो त्यांना आपल्या मालकाच्या अथवा भागीदाराच्या घरी नेऊन गुदरतो, त्यांच्या जवळपास आपला चौका देतो, आणि आपल्या कळपांतले लोक कोठेही बाहेर जावयाला निघाले तर त्यांचे पुढे पहारेकऱ्याप्रमाणे चालतो. त्याचे ऐटदार पाऊल आणि त्याचे मागे आमचे लोकांची मेंढ-माळ पाहिली म्हणजे आम्ही किती व कसे परवश होतो ह्याची तीक्ष्ण प्रतीति येऊ लागते.

 यात्रेकरूला वाटते की परमुलखांत अल्पसंतुष्ट व माहीतगार वाटाड्या मिळाला, सबब आतां ठिक ठिकाणचा निरख माहीत नसल्यामुळे जी फसवाफसवी व्हावयाची ती होणार नाही. आपण आडत्ये आहोत हे भांडे फुटले नाहीं तोंवर गिऱ्हाईक बिचकणार नाही आणि आपला व्यापार अप्रतिहत चालेल हे भरेकरी जाणून असतो. त्यामुळे स्टेशन, धर्मशाळा वगैरे ठिकाणचे नोकर, दुकानदार, गाडीवान, हमाल इत्यादि सर्वांची तोंडदाबीं केल्याखेरीज त्याला गत्यंतर नसते; आणि त्याच्या सल्ल्याने यात्रेकरूचे एका पैशाचे ठिकाणी दोन तीन देखील जातात. ते, उपाध्ये व त्यांचे इतर नोकर यात्रेकरूंशी 'अन्नदाता, धर्मावतार' इत्यादि मिष्ट भाषण करतील, ह्या मुलखाचे सर्वच लोक बदमाष म्हणून त्यांबद्दलचा ओठापासून तिटकारा दाखवतील, परंतु त्यांनी तोंडावाटे काढलेले दाम वाजवी अंकावर उतरविणार नाहीत; उलट तितकेचे तितके देण्याची शिफारस करतील, आणि त्यातून आपली चोरटी हिस्सेरशी घेतील. आडत्यांनी जरी सांगितलें की आमचा मालक अल्पसंतोषी आहे, तरी त्याला नोकर, यात्रादलाल ह्या सर्वांचा खर्च काढावयाचा असतो. म्हणून जेथे ज्यापासून जितकें निघेल, तेथें तितकें त्यापासून काढण्याला कोणीही कमी करीत नाही. प्रयागवाळ, गंगापुत्र व गयावळ हे एकाचे एक असल्यामुळे प्रयागास कमी पडले तर त्याची कसर काशीस निघते, आणि तेथेही कमी पडले तर त्याच्या दिढीदुपटीचा वचपा गयावळ यात्रेकरूंकडून पिळून काढतात.

 हिंदुस्थानीपेक्षां दाक्षिणात्य ब्राह्मण आचार-कांडांत तरबेज आचारसंपन्न व वैदिक याज्ञिक विद्येत चांगले निष्णात असतात, ही गोष्ट सर्वसंमत आहे; आणि त्यामुळे महाराष्ट्रीच काय पण दक्षिणेमध्ये वापरलेले मारवाडी, गुजराती यात्रेकरू देखील महाराष्ट्री सांगता उपाध्याय मिळविण्यास उत्सुक असतात. प्रयागवाळ व गयावळ ह्यांच्याकडे त्यांच्या पुठ्यांतले महाराष्ट्रीय उपाध्याय कसेबसे अजून मिळतात. परंतु काशीत दाक्षिणात्य ब्राह्मण व गंगापुत्र ह्यांच्यामध्ये वाद चालू आहे. दाक्षिणात्यांचे म्हणणे असें आहे की, काशींत मणिकर्णिकेशिवाय गंगापुत्रांना पौरोहित्य नाही असें सरकारदरबारी निवाडे झाले आहेत. सबब गंगापुत्रांकडे यात्रेकरू उतरला असतां महाराष्ट्रीय ब्राह्मण कर्म चालविण्याला येत नाही, आणि तें यथासांग करण्याची अडचण पडते. अशी स्थिती आहे तरी गंगापुत्राकडे महाराष्ट्रीय ब्राह्मण मिळतील, अशी थाप सरकतीचा स्वार्थ साधण्यासाठी भरेकरी व प्रयागवाळ यात्रेकरूला बेलाशक मारतात; आणि ते त्याला सरकतदार गंगापुत्राकडे नेऊन गुदरतात. सकृदर्शनी गंगापुत्रही छातीला हात लावून सांगतो की, मी दक्षिणी ब्राह्मण आणून देतो; आणि तो आयत्या वेळेला तोंडघशी पाडतो, तेव्हां यात्रेकरूला ह्या परस्परसाह्यकारी टोळीच्या लबाडीची पहिली ठोकर लागल्यासारखी होते. 'आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा झाली धनी' ॥'कथड्याशी कैंचा

-----

 १ मुंबईकडील एका ह्माताऱ्या कोळणीने सांगितले की, 'मी गंगेवर येतें न येते तोच उपाध्यायाने माझा हात धरला. मला वाटले तो मला हात देतो. पण पहाते तो त्याने तो एका कालवडीच्या शेपटीला लावला व ह्मणाला की तूं गोप्रदान केलें, आठ रुपये टाक; गाईला हात लावल्यावर नाही कसे म्हणावे असे माझे मनांत येऊन मी चुंबीत आठ रुपये काढून दिले. भाव । पुजाऱ्याशी कैचा देव' ॥ ह्या साधुश्रेष्ठाच्या उक्तीला हरताळ कोण लावील ? यात्रेकरूचे कर्म यथासांग होते की नाही, व ते तसें न झाले तर त्यांत कांहीं दोष आहे की काय ? ह्याशी ह्या दोन पैसे कमविण्यासाठी निर्माण झालेल्या भिक्षुकी टोळ्यांना काय करावयाचें आहे ? कोणीकड़न तरी शिकार साधली म्हणजे त्यांचे काम झाले. तरी दक्षिणी ब्राह्मणांकरवी तीर्थविधि व्हावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यानीं खबरदारी घेऊन प्रयागासच दक्षिणी ब्राह्मणाच्या मार्फत बिऱ्हाड घ्यावें, म्हणजे पुढचे गोते टळतील. पैशासाठी उत्तर हिंदुस्थानी पंड्ये नाही नाही ते आचार फैलावीत आहेत, आणि अज्ञजनाची वंचना करीत आहेत. असें सांगतात की मारवाडी गुजराती लोक वेणीदान करीत नाहीत. परतु दाक्षिणात्यांत पहावे तो त्याचा भयंकर प्रसार झाला आहे. विधवा-केशवपनासंबंधानें खुद्द ब्राह्मणांत रण माजून राहिले आहे. परंतु तुमच्याकडून ब्राह्मणाचे आचार करवून तुमचा धार्मिक दर्जा वाढवितों, आणि ब्राह्मणी पुण्य मिळवून देतो; असें कुणब्याधुणब्यांना मधाचे बोट दाखवून हे वृकोदर त्यांच्यामध्ये विधवा-केशवपन भराभर पसरीत आहेत. ही एकच गोष्ट त्यांच्या भिक्षुकीचे व्यापारी स्वरूप दाखविण्यास पुरी आहे.

 तीर्थोपाध्याय हे वतनवृत्तीचें अति नासकें फळ होय. त्यांच्या सामान्य नीतिमत्तेचा विचार बाजूला ठेवला तरी त्यांच्या यात्रेकरूसंबंधाच्या व्यवहाराकडे कानाडोळा करता येत नाही. विमलाचरण आणि अगाध विद्वत्ता ह्यांना पावन क्षेत्रे आणि मनसोक्त प्राप्ति ह्यांपेक्षा अधिक काय पाहिजे? प्रयागवाळ, गंगापुत्र व गयावळ ह्यांकडे डोळे उघडून पहा म्हणजे वतनदारी आणि सद्गुण ह्यांमध्ये छत्तिसाचा आंकडा आहे अशाविषयीं देहांत उजेड पडल्यावांचून राहणार नाही. त्यांना पंड्या(पंडित),व महाराज म्हणतात; परंतु बहुतेक वेदशास्त्रशून्य असतात, ते इतके की त्यांना स्नानसंकल्प देखील शुद्ध सांगता येत नाही. इकडे विद्येच्या नावाने असली रड; तथापि हत्ती, घोडे, गाड्या, मोटार, चाकर, आडत्ये, वगैरेच्या खर्चासाठी
दक्षिणा फुगतच चालली आहे!! घोड्याची शेप देखील ज्यांमध्ये दृष्टीस पडत नसे असे सत्स्फूर्तिदायक व मनःकमलोन्मीलन करणारे साधे प्रेमळ ऋषींचे आश्रम कोणीकडे आणि ज्यांमध्ये विलासी लवाजमा व ऐषआरामाचा दर्प कोंबला आहे अशा गयावळांच्या हवेल्या कोणीकडे ? शास्त्र ह्यांना दक्षिणा देण्याला सांगते ती ह्यांनी शाश्वत वेदविद्या पाळावी ह्मणून, का ओकारी येईपर्यंत नश्वर ऐश्वर्य उपभोगावे म्हणून ? ' घोडा आपल्या गुणावर दाणा वाढवून खातो' ही म्हण वतनदार उपाध्यांनी पार खोटी करून दाखविली आहे. निमी दक्षिणा निरक्षर शूद्रवृत्तीच्या दलालांनी घ्यावी हाच का आमचा उत्तमोत्तम आर्यधर्म ? क्षेत्रांच्या ठिकाणी क्षौर करा, श्राद्ध करा, वेणीदान द्या, वगैरे कर्मे करण्यास आमच्या आचार्यांनी आज्ञा केली. परंत ती ज्यांकडून करवावयाची त्यांनी किती विद्या संपादन करावी व विधिपूर्वक कर्म करण्यासाठी त्यांनी किती मोबदला घ्यावा ह्याला धरबंद घातला नाही. त्यामुळे हे वृत्तिवंत अनक्षर तोंड वाशीतच आहेत आणि लोक बडतच आहेत. ठाकरांसारख्या पहाडांत राहणाऱ्या अक्षरशून्य ज्ञातींत इतका विचार असावा की नवरीच्या बापानं दहा का बारा रुपायांपेक्षा जास्त पैसे घेतले तर त्याला जात शासन करते; आणि अठरा वर्णांचे साक्षर गुरु जे ब्राह्मण त्यांच्या जातींतल्या प्रयागवळांनी वेणादानाच्या वेळी, गयावळांनी पिंडदानाच्या वेळी, किंवा मथुरेस चोब्यांनी, दक्षिणेसाठी यात्रेकरूंना त्राहि भगवान् करून सोडावें व नियंत्रणासाठी प्रांतोप्रांती वर्षानुवर्ष संचार करणाऱ्या श्रीशंकराचार्यांनी हा बाजार बेलाशक उघड्या डोळ्यांनी चालू द्यावा, ह्यापेक्षा धर्मविडंबनेची व आंधळेपणाची निरुत्तर साक्ष दुसरी कोणती असू शकेल ? एकतर आचारकाडांतून ही कर्मे काढा, आणि ठेवणे असेल तर ह्या

-----

 श्री रामचंद्राच्या अश्वमेधांतील घोडा पाहून भगवान् वाल्मिकीच्या आश्रमातले विद्यार्थी गोंधळून जाऊन लवाला सांगतात-बटवः कुमार अश्वोऽश्व पशुसमाम्नाये कोऽपि भूतविशेषो जनपदेषु श्रुुयते। सोऽयमस्माभिरधुना स्वयं प्रत्यक्षीकृतः । उत्तररामचरितम् । सट्टेबाज उपाध्यायांना वेदमुख करा व त्यांच्या दक्षिणेची किमान अल्प इयत्ता ठरवा. धर्माध्यक्षांची हुकमत ह्या गोमुखव्याघ्रांवर चालत नसेल तर शास्त्रांनी धर्माचे नांवावर लोकांची अशी नागवणूक करणे म्हणजे खाटिकवाड्यांत शेळ्या हांकून लावण्यासारखे आहे.

 जातां जातां दुसऱ्या एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. पूर्वी थोडेससे कर्मठ लोक पायदळ किंवा बैलगाडीने प्रवास करून अन्यक्षेत्रस्थ देवांवर गंगाजल आणून घालीत, आणि त्यांच्या सोईसाठी अशी सवलत निघाली असावी की पारोशाचा किंवा हिंदु गाडीवान वगैरेंचा स्पर्श झाला तरी गंगाजलाला बाट नाही. परंतु त्याचा अर्थ असा नसावा की, त्याला अति शूद्र, म्लेंच्छ, ऋतुमती स्त्रिया किंवा सुतकी जन ह्यांचा स्पर्श झाला तरी तें देवाच्या अभिषेकाला चालते. असे असेल तर सध्या जे हजारों लोक--विशेषतः उत्तर हिंदुस्तानांतले गांवढेकरी व चोहोंकडचे साधू गंगाजलाच्या कावडी किंवा भांडी आगगाडीने नेऊन गयागदाधर, वैजनाथ, रामेश्वर, त्र्यंबकेश्वर वगैरे अनेक क्षेत्रस्थ देवांवर अथवा इतर घरच्या दारच्या उपास्यदेवदेवतांवर रिचवितात, हे विधिवत् की अन्यथा आहे ह्याचा कोणी आचार्यांनी विचार केला आहे काय ? नसल्यास जरूर करावा आणि आगगाडीने गंगोदक नेण्यामध्ये अज्ञ लोकांच्या कालाचा, पैशाचा व मेहनतीचा जो दुरुपयोग होत आहे तो होऊ देऊ नये.

 तीर्थे, क्षेत्रे करून मानसिक अगर आध्यात्मिक उन्नति पदरांत पाडून घ्यावी तर तिला उपरिनिर्दिष्ट परिस्थिति किती योग्य व उपकारक आहे, ह्याचा निर्णय ज्याचा त्यानेच करावा. त्यांकडून शारीरिक उन्नतीला मदत होईल असे म्हणावें तर तसे घडणें सर्वथैव अशक्य आहे. सरसकट रोगी-निरोगी यात्रेकरूंच्या डोक्यावर चालविलेले वस्तारे, तीर्थांचे आसपास पडलेले केंसाचे ढीग व मलमूत्रविर्सजनाची दुर्गंधि, सर्व प्रकारच्या लाखों यात्रेकरूंनी स्नाने करून व पिंड सोडून खराब झालेले बहुतेक कुंडांचे व फल्गूसारख्या नद्यांचे पाण्यांत स्नान, हजारों रुपये मिळत असतांही पंड्यांनी प्रयागचे सरस्वतीकुंड, काशीची ज्ञानवापी, मणिकर्णिका इत्यादि व फल्गुचे झिरे वगैरे
मुळीच साफ न ठेविल्यामुळे त्यांतल्या अति घाणेरड्या पाण्याचें तीर्थप्राशन, देवळाच्या भोवताली गराडा घातलेल्या भिकाऱ्यांचा अमंगळपणा, देवळांतील गर्दी व रोगी-महारोगी ह्यांनी तेथें तुडविलेल्या पाण्यांतून व चिखलांतून जाणे येणे, पंचामृताच्या अतिरेकाचा न्हाणीमधून सुटणारा वास, पैसा मागण्यासाठी अंगस्पर्शापर्यंत महारोगी देखील करीत असलेली लगट, गलिच्छ दाट वस्ती व आसमंतात् पसरलेली घाण, श्राद्धे व दर्शने ह्यांमुळे जेवणास होणारा नित्य अवेळ, वाटेवरचे व क्षेत्रींचे दुकानदार विकीत असलेला भेसळीचा, निकस आणि कुपथ्यकर शिधा, ही सर्व एकवटली म्हणजे आरोग्य कसें रहावें व वाढावे ? यात्रा करून धडधाकट परत येणे मुष्किलीचं समजतात तें यथार्थ आहे ! हिंदूंचे जे प्रधान पवित्रस्थान काशी ती बेसुमार कोंदट व घाण असावी, ही हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक इसमास मोठ्या शरमेची गोष्ट आहे. निदान ती तरी नमुनेदार, खुलावट, स्वच्छ आणि सर्वतोपरी आरोग्यदायक व दर्शनीय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली देवालये, तीर्थ व क्षेत्रे निरोगी करण्यासाठी ज्या त्या समाजाने झीज सोसणे व जरूर ती वर्गणी उभारणे अवश्य आहे. आणि शेकडोंशें मंदिर बांधण्यांत, सांड ( देवाचे नांवाने सोडलेली जनावरें ) वाढविण्यांत, व कुपात्री दानांत जो पैसा जातो तो अशा उपयुक्त कामांत खर्च करण्याची सुबुद्धि आमचे लोकांना होईल तो सुदिन म्हणावयाचा !!

 विद्वान्, साधु इत्यादींना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करण्याचा प्रशस्त प्रघात आमच्यांमध्ये अनादि आहे असे म्हटले तरी चालेल. पुढे पुढे मागेल त्याला-मग तो विद्वान् असो किंवा टोणपा असो, निरीह संत असो किंवा 'लोक म्हणती बुवाबुवा । न कळे गुलामाचा कावा॥' अशा कोटीतला असो-द्रव्य देणे ह्यांतच पुण्य आहे अशी लौकिक समजूत होत गेली; आणि तिने भिक्षुकवृत्तीचा मूळ बांध फोडून वतनदार तीर्थोपाध्यांखेरीज सर्व जातींच्या आळशी, लतकोडगा, आयतखाऊ लोकांना ह्या फुकट्या धंद्यांत लोटलें. श्रीविश्वनाथाच्या मंदिराचे उदाहरण घ्या. त्याच्या आंत बाहेर नाना प्रकारच्या देवदेतांनी असा वेढा देऊन नाकेबंदी केली आहे की, त्यांचे दर्शन घेतां घेतां आणि त्यांपुढे पैसा अधला ठेवतां ठेवतां पुरे वाट होते ! ह्या चक्रव्यूहांतून बाहेर पडावें तेव्हा का मुख्य देवाचे दर्शन होते. तपासाअंती असे समजले की, अनेक स्वार्थी पुजाऱ्यांनी मोठमोठ्या देवळांमध्ये जागा विकत घेतली व तेथें देवदेवतांची स्थापना करून आपल्या पोटपाण्याची निचिंती केली. ह्याप्रमाणे मुख्य देवांच्या वतनदार पुजाऱ्यांना हे पुजारी जडले व त्यांमध्येही पुष्कळ पेंढार भिक्षुकांची भर पडली, आणि सर्व ठिकाणच्या क्षेत्राक्षेत्रांनी जिकडे तिकडे देवळेंच देवळे, मूर्तीच मूर्ती, आणि याचकच याचक झाले आहेत. याचक वृत्तीने एकटा ब्राह्मण वर्णच डागला आहे असें नाही, तर ती हिंदू समाजाच्या अगदी शेवटच्या थरापर्यंत जाऊन खेंटली आहे हे मागे सांगितलेच आहे. अनेक जातींचे हजारों लोक तीर्थांवर, देवळांत आणि दोहोंच्याही वाटांनी असलेल्या स्टेशनांवर व धर्मशाळांत दान मांगतात. त्यांमध्ये जे कोणी देवाच्या मूर्ती व व चित्रे दाखवून पैसे मागतात, त्यांना अट्टल म्हटले पाहिजे. त्रिवेणीच्या खेपा करणाऱ्या नावाड्यांना सरसकट कमीत कमी दोन रुपये प्राप्ति होते. एका कोळ्याने ह्याच्यापेक्षा ज्यास्त किफायत मिळावण्याची युक्ति काढली, ती अशीः त्याने आपले नावेमध्ये गंगायमुनेच्या मूर्ति बसविल्या आहेत, व त्यांच्या पुढे तो कोणा तरी राख फांसलेल्या साधूला रोजंदारीने घंटा वाजविण्याला व आशीर्वाद देण्याला बसवितो. यात्रेकरूंची नाव दिसली की तिचे पुढें तो आपली नाव आणितो व पैसे उकळतो. क्षेत्रांच्या न्हाव्यांचा अनुभव घेतला म्हणजे जातधंद्याच्या पद्धतींतले दोष चांगले दिसून येतील. त्रिस्थळीच्या न्हाव्यांना इन्कमटॅक्स आहे असे सांगतात. परंत बहुतेकांचा हात व हत्यार वाईट असते. ते क्षौराचे पैसे शहरच्या चांगल्या न्हाव्यापेक्षाही ज्यास्त घेतात आणि तेही हक्कानें रुसून व भांडून. ह्याखेरीज धर्म म्हणून आणखी पैसे मागत सुटतात.

-----

 १ अलीकडे पंढरपूरच्या आगगाडीमध्ये काही आंधळे अभंग गाऊन थाटाने पैसे मिळवितात. कित्येक तर ह्या विधीचे गंभीर स्वरूप न जुमानतां क्षौराचे पाठोपाठ सधन यात्रेकरूंचे पाय रगडतात आणि बक्षीस मागतात !! गाडीवानाचा व हमालाचा धंदा बडा छाकटा असतो. रस्त्यावरील स्टेशनें व त्रिस्थळी येथे त्यांचा रोजगार असा चालला आहे की पुसूं नका. त्यांच्या मागणीला आगा-पिछा मुळीच नसतो. कड लावण्यापर्यंत ज्ञान व फुरसत असलेला यात्रेकरू लाखांत एखादा. त्यामुळे त्यांच्या तोंडाला रक्त लागून त्यांचा जबडा दिवसेंदिवस फुगतच आहे. बिऱ्हाडाचे ठिकाण तसेच तेथून देऊळ, स्नानाचा घाट वगैरे किती दूर आहे हे माहीत नसल्यामुळे आणि उपाध्यायांच्या मिंधेपणामुळे गाडीवान चांगलेच चरतात, आणि दुप्पट भाड्याचा ठराव झाला असला तरी शेवटी 'बक्षिस' 'धर्म' किंवा 'पोलीसची 'दस्तुरी म्हणून दोन चार आणे तरी कटकट घालून ज्यास्त काढतात. शहरांतल्या हमालांचाही तोच नमुना. रेल्वे हमाल पाहतां मनमाड काहींसें बरें. परंतु भुसावळपासून पुढे त्यांच्या थापाथापीस व आडवणुकीस सीमा नाही. महारजागल्यांचे पोट ज्याप्रमाणे रयतेकडून होणाऱ्या प्राप्तीवर चालतें त्याप्रमाणे ह्या हमालांचे पोट परभारें उतारूंवर चालतें, एवढेच नव्हे तर त्यांना परवाना काढण्यासाठी रेलवे कंपनीला दरसाल तीस चाळीस रुपये फी भरावी लागते असे सांगतात. असें ऐकण्यांत येते की, रेलवेच्या नोकरीतल्या हमालाला बारा रुपये दरमहा आहे. तथापि त्यांच्या जागांपेक्षां लायसेन्ड कुलीच्या (बिन पगारी हमाल) जागांवर शेकडों उड्या पडतात आणि त्या मिळविण्याला पुष्कळ शिफारस भिडवावी लागते. रेलवे हमालांचे म्हणणे असें आहे की, 'आम्हांला रेलवे कामगारांच्या मकानांत व कचेऱ्यांत पाळीपाळीने बिगार करावी लागते, आणि जी मिळकत होते तिच्यांत 'प्राप्तीचा अर्धा वांटा ' किंवा अधिक पडद्याआड घेणारे पुष्कळ आहेत. त्यामुळे जरी दीड दोन रुपये रोज आमच्या हातांत येतो तरी पदरांत कांही पडत नाही' वगैरे, वगैरे. स्टेशनपासून धर्मशाळा किती दूर आहे हे पुष्कळ उतारूंना माहीत नसल्याने रेल्वे हमाल पहिल्याने हक्काने मिळणाऱ्या मजूरीपेक्षा दसपट आधिक सांगतात, आणि
मोठ्या मिनतवारीने चौपट पांचपट मजुरीवर बोजे नेण्याला कबूल होतात. उतारू म्हणतील की आम्हांपैकी एक जण धर्मशाळा पाहून येतो, तर रेलवे पोलीस कान्स्टेबल तिकीट मास्तर वगैरेंचा तगादा लागतो की आधी स्टेशनाबाहेर पडा. कमजास्त करून स्टेशन हमालाकडून टेशनाबाहेर बोजे न्यावे आणि ते तेथून बिऱ्हाडापर्यंत नेण्यासाठी दुसरा हमाल पहावा ह्या उद्देशाने येण्याजाण्याची वाट सोडून रस्त्याच्या कडेला गांठोडी लावून इकडे तिकडे पहावें, तो स्टेशन हमालाचे सांगीवरून स्टेशनाबाहेरचे पोलीस मागे लागलेच समजा की चाल बोजा उठाव. अशा कोंडमाऱ्यांत स्टेशन हमाल मागेल ते कबूल करावे लागते. रेलवेचे पोलीस व हलके नोकर ही खळखळ पाहातात, पण उतारूला त्यांची मदत क्वचित् पोहोंचते. हमाल, गाडीवान, दुकानदार, नावाडी, वगैर सर्वांचा एकच भिक्षुकी मंत्र, मोठे यात्रा करण्याला निघालां! काही धर्म करा, पुण्य करा, कोणाला दुःख देऊ नका. स्टेशनांतून बाहेर पडले ह्मणजे हे हमाल असेल तेथील म्युनिसिपालिटीच्या जकातीच्या नाकेदाराला खुणवितात, आणि तोही चिरीमिरी मागतो. तसेंच गाडी येण्याच्या अगोदर तिकीट काढण्याचे आमिष दाखवून ते कोचिंग क्लार्कच्या नांवावर तिकिटामागे आणा दोन आण्याचा चट्टा देऊन तिकिटें काढून देववितात, आणि चांगली जागा धरून बसण्यासाठी अगाऊ गेले पाहिजे असें सांगून रेलवे पोलीस व तिकीट कलेक्टर ह्यांच्या नांवानें आठचार आणे पानसुपारी घेऊन गाडीत बसवितात. थोड्या वेळाने पहावें तर प्रवाशांची एकच गर्दी गाडीत घुसते, आणि सर्व पैसे फुकट गेले असें आशाळू प्रवाशाला कळून येते. फक्त गाडींत जागा देतो एवढ्या मेहरबानीखातर कित्येक हमाल काडीचे ओझें न उचलतां उतारूंना गच्च भरलेल्या डब्यांत आणून गुदरतात आणि त्यांकडून दोन चार आणे उपटतात.

-----

 १ जबलपुर स्टेशनवर सर्व अधिकारी लोकांचे यात्रेकरी लोकांकडे फार दुर्लक्ष आहे. याकरितां सदरचे स्टेशन चुकवून दुसरे स्टेशनचे तिकिट घ्यावें.  साळूजीजी-कृत काशीयात्रा पृष्ठ ९.
अशा प्रकारे फुकटफाकट सावलीत फारसें अंग न झिजवितां अवाचे सवा पैसे मिळू लागल्यामुळे शेतीसारख्या उत्पादक व प्रामाणिक धंद्यांतून गांवढेकरी बाहेर पडत आहेत, आणि क्षेत्र व स्टेशन हमालीच्या उडाणटप्पू धंद्यांत गर्दी करीत आहेत. डब्यांत किती उतारू बसवावयाचे हे त्यांतल्या पाटीवर लिहिले असते. तितके उतारू बसल्यावर जो कोणी रेलवे नोकर त्यांत अधिक उतारू बसवील त्याला रेलवे आक्टचे (सन १८९० चा अंक९) कलम १०२ प्रमाणे वीस रुपयेपर्यंत दंड होतो. ह्या कलमाची अमलबजावणी होत नसावी. ती होती तर रेलवेचे बहुतेक उत्पन्न सरकारला दंडापायींच अर्पण करावे लागते! खरे पाहूं गेलें तर ह्या कामी रेलवेकडेही फारसा दोष नाही. त्यांच्या तरतुदीपेक्षा जर जास्त यात्रा लोट्रं लागली तर त्यांनी तरी आयत्या वेळेला डबे कोठून आणावेत ? सबब त्यांना संकटांत न घालण्याचा उपाय म्हटला म्हणजे यात्रेकरूंची संख्या ओसरली पाहिजे. स्टेशनावरच्या काय आणि यात्रांच्या वाटांवरच्या गांवांतल्या किंवा क्षेत्रांतल्या दुकानदारांत काय, लोभ आणि लबाडी नखशिखांत भरली आहे. परवाना-फी द्यावी लागते, एवढ्या सबबीवर स्टेशनदुकानदार डावा माल ठेऊन तो कमीतकमी सवाईनें महाग विकतात. तीर्थविधीचे सामान चौपट महाग मिळतें. कारण विचारतां इनकमटॅक्स द्यावा लागतो असे सांगतात. निकस घाणेरडा शिधा दुकानदार दिढीदुपटीने महाग देतात. पैसाबट्ट्याशिवाय प्रयागसारख्या इलाखाच्या ठिकाणी देखील खुर्दा किंवा मोड मिळत नाही. कलाकुसरीच्या जिनसा क्षेत्रात पुष्कळ मिळतात, परंतु ठकबाजी व दलाली ह्यांचा तडाखा जबर बसतो. काशीस कोणताही माल घेण्याला गेलें की रिकामटेकडे दलाल न बोलावतां मागोमाग येतात, आणि गिऱ्हाइकाला नाहक्क बुडवितात. सारांश उपाध्ये, भिक्षुक व यच्चयावत् धंदेवाले हे सर्व भीकमाग्यांच्या ढंगांनी पूर्ण ग्रासिले आहेत; आणि सर्व जण तोंड वेंगाडून, शिव्याशाप व धमकी देऊन, भांडून तंडून अगर हातचलाखीनै मेहनतीपेक्षां, मोलापेक्षा किंवा ठरावापेक्षा ज्यास्त पैसे उगवतात. ह्या येथून तेथवर पसरलेल्या लुच्चा-लफंग्यांना गैरवाजवी अगर अन्यायाचा पैसा ओतण्यांत धार्मिक कारण नैतिक खात्रीने नव्हे-पुण्य असेल तर महायात्रा सुफल होते असे म्हणावें !!!

 व्यावहारिक दृष्ट्या महायात्रेचा विशेष उपयोग आहे असें ह्मणवत नाही. अन्नसत्रे व सदावर्ते झोडीत जे साधू भिक्षेच्या पैशावर यात्रा करितात, त्यांना यथेच्छ सवड असली तरी ते उद्योग हुन्नरांत मन घालून वा प्रांताचें ज्ञान त्या प्रांतांत नेऊन लोकांची संसारयात्रा सुखकर करण्याच्या नादांत पडतील ही गोष्ट कालत्रयीं होणार नाही. जे शेतकरी व हुन्नरी लोक यात्रांला जातात त्यांना तिर्थविधि, क्षेत्रविधि व देवदर्शन ह्यांपेक्षा काही अधिक करण्याला वेळ,पैसा व साधनें आहेत कोठे ? गंगाजल,गंडे,प्रसाद,काही खाण्याचे व हौसेचे जिन्नस एवढे घेऊन ते परततात, व फार तर ठिकठिकाणी झालेल्या तंगीची व त्रासाची वर्णनें कशीबशी देतात. देशाटनाने प्राप्त होणाऱ्या चातुर्याने आपलें कसब सुधारावे असा यात्रेचा हेतु नसतो, आणि तसा परिणाम झाल्याचे ऐकिवांतही पण नाही. रेलवेचें हांशील व भरेकऱ्यांच्या थापा ह्यांवर भिस्त देऊन थोडक्यांत यात्रा करूं असें गोरगरीब लोक म्हणतील तर 'अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई वैद्य' या म्हणीचा खडतर अनुभव त्यांना आल्यावांचून राहणार नाही. ते ज्या वर्गातले असतात त्या वर्गाच्या लोकांची त्यांच्या ओळख-देखीच्या चावडी-कचेरीतली तारांबळ व बुडवणूक, महार जागले शिपाई प्यादे व हलके कामगार ह्यांचे त्यांशी वर्तन, भटकणाऱ्या जातींकडून होणारी गांवकामगार व हलके पोलीस ह्यांची मूठदाबी वगैरे गोष्टी लक्ष्यांत आणिल्या म्हणजे, परमुलखांत गाडीच्या गर्दीत व धांदलीत खेडवळ व फिरस्ते साधू ह्यांशी आगगाडीच्या व पोलीसच्या हलक्या नोकरांचा कसा काय संबंध घडत असेल ह्याची कल्पना सहज करितां येईल. वास्तविकपणे हा संबंध नियमित स्थली व नियमित काली पडत असतो. सबब आडवळणी खेड्यापाड्यांनी अगर डोंगराजंगलांनी रयतेशी पडत असलेल्या कनिष्ठ सरकारी नोकरांच्या संबंधापेक्षा त्यावर सक्त नजर ठेऊन तो मुक्याआंधळ्या व जाण्या-येण्याला घाबरे पडलेल्या यात्रेकरूंना सुखकर करणे किती तरी सुसाध्य आहे! परंतु तसे झाल्याची बोलवा नाहीं व अनुभवहीं नाही. उलट 'जळत्या घराचा पळता वासा' ह्या म्हणीचा जारी अमल दिसून येतो. असो. प्रस्तुत स्थितींत लोकांनी तिकिटाच्या हाशिलाची सवाई दिढी व हमालीची आठ दहा पट रक्कम तरी घेऊन निघावें हें बरें. दान-दक्षिणेसंबंधी व शिधापाण्याच्या खर्चाचीही हीच अवस्था. अंदाजापेक्षा जास्त खर्च होऊन निपूर आलेले सर्व तीर्थक्षेत्रांचे यात्रेकरू निमानीम तरी असतात. परंतु आपल्या फसगतीचे यथार्थ वर्णन दिले तर क्षेत्रांची निंदा होऊन लोक तेथे जाण्याला निरुत्साह होतील, व आपणांला पाप लागेल ह्या भोळवट समजुतीने पुष्कळ लोक तसे करीत नाहीत. तरी अज्ञात पुण्याची आशा वगळली आणि कोणत्याही बाजूने महायात्रेच्या प्रस्तुत व वास्तविक स्थितीचा विचार केला तर गोरगरिबांनी ह्या फंदात पडू नये असा न विचारतां स्पष्ट आभिप्राय देणे भाग आहे.

 आपण होऊन ह्मणा, किंवा दुसऱ्याच्या प्रोत्साहनाने ह्मणा यात्रा जात राहाणारच. तेव्हां तिला शक्य तितकी सुखकर वाट शोधिली पाहिजे. पहिली मुख्य गोष्ट अशी की, यात्रेकरूंचा रेलवेवरचा व क्षेत्रांमधील त्रास व तोटा चुकविला पाहिजे. विलायतेस ज्याप्रमाणे गुडफ्रेंड्रस सोसायटी वगैरे संस्था आहेत, त्यांच्या धर्तीवर जनतासेवेची आवड असणाऱ्या लोकांनी एखादी संस्था काढावी, आणि आपले सदस्य मोठमोठ्या स्टेशनांवर व क्षेत्रांत पाठवावेत. सरकारच्या व रेलवेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांची सहानुभूति त्यांना खात्रीने मिळेल, आणि त्यांनी यात्रेकरूंची वंचना कोठे व कशी होते हे अमलदारांचे नजरेस आणावें. त्याच ठिकाणी त्यांना यात्रा भरती करणारांचे डावपेंचही यात्रेकरूंचे नजरेस आणतां येतील, व जेणेकरून ते त्यांच्या तावडीत न जातील अशी त्यांची समजूत घालतां येईल. दुसरी गोष्ट ही आहे की, कांहीं दक्ष तरुणांनी मनांत आणल्यास त्यांना ह्या बाबतींत स्वार्थ व परार्थ उत्तम तऱ्हेनें साधता येईल. त्यांनी जरूर ते भांडवल जमवावे आणि उतार स्टेशनांनजीक धर्मशाळांत व
क्षेत्रांत वाजवी नफ्याने चोख माल विकण्याची दुकाने घालवीत. मालाच्या जबरदस्त उठावामुळे त्यांना अतिशय नफा होऊन यात्रेकरूंशी खरा व्यापार केल्याचे पुण्य लाभेल, आणि लोभी व कपटी व्यापाऱ्यांवर चांगला दाब राहून पेठांचें गढूळ वळण निवळेल. जेथें जें कलाकुसरीचे सामान होतें तें सचोटीने व रास्त नफ्याने मिळण्याची दुकानें क्षेत्रांनिहाय मोठ्या प्रमाणावर निघाली पाहिजेत, व त्यांची माहिती यात्रेकरूंना स्टेशनांवर, धर्मशाळांत मिळेल अशी तजवीज झाली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की, अज्ञेय पुण्यापलीकडे यात्रांपासून कोणताही तादृश व्यावहारिक फायदा नसल्यामुळे त्या जितके थोडे व निवडक लोक करतील तितकें बरें, असा लौकिक समजुतींत पालट झाला पाहिजे. पुराणातल्या फलश्रुतीला किंवा हरदासी-भिक्षुकी अतिशयोक्तीला अक्षर खरं मानून साधारण स्थितींतल्या माणसांनी तीन तीनदां महायात्रा किंवा उठल्या बसल्या आळंदी-पंढरी इत्यादींच्या वाऱ्या करकरून काळाचा व पैशाचा अपव्यय आणि आयतखाऊंची चंगळ करणे आपल्या देशाच्या सध्यांच्या सांपत्तिक हलाकीत अत्यंत उधळेपणाचे आहे. भिक्षुकी व उडाणटप्पू धंद्यांतले लोक जितके कमी होऊन धनोत्पादक धंद्यांत जातील तितकें देशाला हितकर आहे. लोकांत ज्ञानप्रसार झाल्यावांचून ही बाब त्यांच्या खात्रीस येणार नाही. परंतु ती जितकी आणतां येईल तितकी आणण्याची खटपट अवश्य झटून व तांतडीने झाली पाहिजे. हिला उपक्रम सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांतून त्वरित करता येईल. अन्नसत्रांत जेवणाराला काशीस 'छत्रपति' म्हणतात. छत्रपति साधू याप्रमाणे जेवण बाहेर काढतात आणि रेलवेभाड्यासाठी भीक मागतात. त्यांनी निढळच्या घामानें पैसे मिळविले नसल्यामुळे लांचलुचपत देण्याला त्यांना खंती वाटत नाही. आणि जो धारा ते पाडतात तो इतरांनाही भोंवतो. म्हणून पहिल्यानें याचक यात्रेकरूंच्या व साधूंच्या वर्गात मोडणाऱ्यांना सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांमध्ये जी खुराकी मिळते ती बंद झाली पाहिजे. म्हणजे कसाला टिकणारे असेच यात्रेकरू निघतील; आणि सध्या थापाथुपीच्या जोरावर जें
यात्रांचे बंड वाढत आहे ते कमी होईल. उत्तेजन नाही म्हणून आपल्या प्राचीन विद्येचा लोप होत चालला आहे अशी हळहळ ऐकू येते. सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांत खर्ची पडणाऱ्या पैशाचा ओघ जर विद्यार्जनाकडे व विद्वानांच्या संभावनेकडे वळेल तर किती तरी बहार होईल! तरी दानशूरांनी ह्या गोष्टीचा सहृदयतेने विचार करावा.

 देशामध्ये व्यापारवृद्धि किती झाली आहे हे ठरविण्याच्या साधनांपैकी प्राप्तीवरील कर व रेल्वेच्या उतारूंची संख्या ही प्रमुख होत. यात्रेकरूंच्या उपयोगाकरितां गुंतलेले सर्व भांडवल व लोक देशांतला व्यापार व संपत्ति वाढी लावतात असें ह्मणतां येणार नाही. ह्मणून तीर्थविधि व क्षेत्रविधींकडे गुंतलेल्या लोकांचे प्राप्तीवरील कर व्यापारवृद्धीचे निदर्शन ह्मणून स्वीकारता येणार नाही. तरी असला आंकडा स्वतंत्र रीतीने कळणे इष्ट आहे. उतारूंच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रवासाच्या हेतूंची वर्गवारी कळेल तर किती जणांचा प्रवास व्यापारी पेशाने झाला हे समजेल, आणि त्यावरून उतारूंच्या अवाढव्य संख्येपैकी कितीजणांच्या हालचालीची मदत खऱ्याखुऱ्या व्यापारवृद्धीला झाली ह्याचा ठाव घेता येईल. परतु प्रत्येक उतारू कशासाठी गाडीत बसला ही चौकशी जितकी अफाट तितकाच कंटाळवाणी होईल. सबब तूर्त रेलवेने प्रवास करणाऱ्यांचे 'यात्रेकरी' 'व इतर' असे दोन आंकडे जरी वेगळाले मिळाले तरी कितींचा प्रवास धनोत्पादक होत नाही हे कळून येईल.

 सध्यां धार्मिक विधींना वाणसौद्याचं, तीर्थोपाध्यायांना वाण्याचे आणि यात्रांना व्यापारी सट्ट्याचे स्वरूप आले आहे. भरती करणाऱ्यांच्या युक्त्यांमुळे महायात्रेला जाणाऱ्या गांवढेकऱ्यांच्या संख्येचे एकसारखे वाढणारे प्रमाण लक्षांत आणलें म्हणजे, हा भाग गांव-गाड्यात घालण्यामध्ये विषयान्तर केलें असें मत होणार नाही. खेड्यांच्या यात्रांच्या मानानें महायात्रेचा संबंध गांव-गाड्याशी फार कमी येतो म्हणून हा विषय दुकानदारी ह्या प्रकरणांमध्ये न घालतां पुरवणीरूपाने घेतला आहे.

-----: समाप्त:-----
क्षेत्रांत वाजवी नफ्याने चोख माल विकण्याची दुकानें घालवीत.मालाच्या जबरदस्त उठावामुळे त्यांना अतिशय नफा होऊन यात्रेकरूंशी खरा व्यापार केल्याचे पुण्य लाभेल, आणि लोभी व कपटी व्यापाऱ्यांवर चांगला दाब राहून पेठांचें गढूळ वळण निवळेल. जेथें जें कलाकुसरीचं सामान होते तें सचोटीने व रास्त नफ्याने मिळण्याची दुकानें क्षेत्रांनिहाय मोठ्या प्रमाणावर निघाली पाहिजेत, व त्यांची माहिती यात्रेकरूंना स्टेशनांवर, धर्मशाळांत मिळेल अशी तजवीज झाली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की, अज्ञेय पुण्यापलीकडे यात्रांपासून कोणताही तादृश व्यावहारिक फायदा नसल्यामुळे त्या जितके थोडे व निवडक लोक करतील तितकें बरें, असा लौकिक समजुतींत पालट झाला पाहिजे. पुराणातल्या फलश्रुतीला किंवा हरदासी-भिक्षुकी अतिशयोक्तीला अक्षरशः खरै मानून साधारण स्थितींतल्या माणसांनी तीन तीनदां महायात्रा किंवा उठल्या बसल्या आळंदी-पंढरी इत्यादींच्या वा-या करकरून काळाचा व पैशाचा अपव्यय आणि आयतखाऊंची चंगळ करणे आपल्या देशाच्या सध्यांच्या सांपत्तिक हलाकीत अत्यंत उधळेपणाचे आहे. भिक्षुकी व उडाणटप्पू धंद्यांतले लोक जितके कमी होऊन धनोत्पादक धंद्यांत जातील तितकें देशाला हितकर आहे. लोकांत ज्ञानप्रसार झाल्यावांचून ही बाब त्यांच्या खात्रीस येणार नाही. परंतु ती जितकी आणतां येईल तितकी आणण्याची खटपट अवश्य झटून व तांतडीने झाली पाहिजे. हिला उपक्रम सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांतून त्वरित करता येईल. अन्नसत्रांत जेवणाराला काशीस 'छत्रपति' म्हणतात. छत्रपति साधू याप्रमाणे जेवण बाहेर काढतात आणि रेलवेभाड्यासाठी भीक मागतात. त्यांनी निढळच्या घामाने पैसे मिळविले नसल्यामुळे लांचलुचपत देण्याला त्यांना खंती वाटत नाही, आणि जो धारा ते पाडतात तो इतरांनाही भोंवतो. म्हणून पहिल्याने याचक यात्रेकरूंच्या व साधूंच्या वर्गात मोडणाऱ्यांना सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांमध्ये जी खुराकी मिळते ती बंद झाली पाहिजे, म्हणजे कसाला टिकणारे असेच यात्रेकरू निघतील, आणि सध्यां थापाथुपीच्या जोरावर जें यात्रांचे बंड वाढत आहे तें कमी होईल. उत्तेजन नाही म्हणून आपल्या प्राचीन विद्येचा लोप होत चालला आहे अशी हळहळ ऐकू येते. सदावर्ते व अन्नसत्रे ह्यांत खर्ची पडणा-या पैशाचा ओघ जर विद्यार्जनाकडे व विद्वानांच्या संभावनेकडे वळेल तर किती तरी बहार होईल ! तरी दानशूरांनी ह्या गोष्टीचा सहृदयतेने विचार करावा.

 देशामध्ये व्यापारवृद्धि किती झाली आहे हे ठरविण्याच्या साधनांपैकी प्राप्तीवरील कर व रेल्वेच्या उतारूंची संख्या ही प्रमुख होत. यात्रेकरूंच्या उपयोगाकरितां गुंतलेले सर्व भांडवल व लोक देशांतला व्यापार व संपत्ति वाढी लावतात असें ह्मणतां येणार नाही. ह्मणून तीर्थविधि व क्षेत्रविधींकडे मुंतलेल्या लोकांचे प्राप्तीवरील कर व्यापारवृद्धीचे निदर्शन ह्मणून स्वीकारता येणार नाही. तरी असला आंकडा स्वतंत्र रीतीने कळणे इष्ट आहे. उतारूंच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रवासाच्या हेतूंची वर्गवारी कळेल तर किती जणांचा प्रवास व्यापारी पेशाने झाला हे समजेल, आणि त्यावरून उतारूंच्या अवाढव्य संख्येपैकी कितीजणांच्या हालचालीची मदत खऱ्याखुऱ्या व्यापारवृद्धीला झाली ह्याचा ठाव घेता येईल. परंतु प्रत्येक उतारू कशासाठी गाडीत बसला ही चौकशी जितकी अफाट तितकीच कंटाळवाणी होईल. सबब तूर्त रेलवेने प्रवास करणाऱ्यांचे 'यात्रेकरी' 'व इतर' असे दोन आंकडे जरी वेगळाले मिळाले तरी कितींचा प्रवास धनोत्पादक होत नाही हे कळून येईल.

 सध्या धार्मिक विधींना वाणसौद्याचं, तीर्थोपाध्यायांना वाण्याचे आणि यात्रांना व्यापारी सध्याचे स्वरूप आले आहे. भरती करणा न्यांच्या युक्तन्यांमुळे महायात्रेला जाणा-या गांवढेकऱ्यांच्या संख्येचे एकसारखे वाढणारे प्रमाण लक्षांत आणले म्हणजे, हा भाग गांव-गाड्यांत घालण्यामध्ये विषयान्तर केलें असें मत होणार नाही. खेड्यांच्या यात्रांच्या मानाने महायात्रेचा संबंध गांव-गाड्याशी फार कमी येतो म्हणून हा विषय दुकानदारी ह्या प्रकरणांमध्ये न घालतां पुरवणीरूपाने घेतला आहे.

समाप्त
महाराष्ट्र यथोत्तजक समा