ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांस पत्रे

पत्र १ लें ॥सत्यमेव जयते॥ तारीख १३-९-१८८८

रा. रा. ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांस--

वि. वि. एक धर्मपुस्तक व व्याकरण एवढीं दोन पुस्तकें मात्र ठेऊन घेतलीं. बाकीची सर्व पुस्तकें व स्लेट परत पाठवून दिली. यांचा कांही उपयोग नाहीं. सरकारी शाळेत चि. लक्ष्मी चौथ्या इयत्तेत पसार झाली. व त्या इयत्तेकरितां लागणारी सर्व पुस्तकें येथें खरेदी केलीं. मुलीच्या जन्माची तारीख कृपा करून इकडे पाठवून द्या, कारण सरकारी शाळेतींल पंतोजीस तिचे कारण आहे.

ताजा कलमः--सध्या मुलीचा अभ्यास बरा चालला आहे. परंतु तिकडून आलेल्या लोकांस पाहिल्याबरोबर तिच्या अभ्यासाचा थोडा खोळंबा होतो. यास्तव तिला चांगले लिहिण्याचा नाद लागेतो पावेतो, तिकडून (हडपसराहून) अज्ञानी वायफळ माणसे जर पाठविणार नाही तर तुमची मोठी मेहेरबानी होईल. आदि सत्यमहाराज.

तात्यासाहेबाकरितां गो. ग. काळे,
स. शो. स. कारकून.


पत्र २ रें ॥सत्यमेव जयते॥ ता. २४ माहे सप्टेंबर सन १८८८

चि. सत्यरुप ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांस--

अनेक अशिर्वाद....सौभाग्यवतीनें एकदाचें सर्व काम सांभाळून लक्ष्मीस अगदी मोकळी ठेवली आहे. त्यामुळे तिचा अभ्यास सुरळीत होईल अशी चिन्हे दिसतात. यास्तव मी निर्मीकाचें आभार मानतो. कळावे. आदि सत्यमहाराज.

आपला,
जोतीराव गोविंदराव फुले.


पत्र ३ रे ॥सत्यमेव जयते॥

चि. सत्यमूर्ती ग्यानोबा कृष्णाजी ससाणे, हडपसर.

अनेक आशीर्वाद ता. ३० सप्टेंबर रोजी चि. काशीबाई उर्फ लक्ष्मीबाई या पुन्यास आमचे घरी मुलीस पाहण्यास आल्या होत्या. तें समई त्यांनी चि. राधा उर्फ लक्ष्मीबाईची चांगली कानउघाडणी केली; त्यामुळें आम्हा सर्वांस फार संतोष झाला. लक्ष्मीबाईस आम्ही परत हडपसरास दुसरें दिवशीं पाठवावे बरें, परंतु सौभाग्यवतीनें तिजला आग्रह करून राहती केली; म्हणून आम्हां सर्वांस क्षमा असावी. कळावे. आदि सत्यमहाराज.

आपला,
जो. गो. फुले वि. गो. ग. का. कारकून
ता. २ माहे ऑक्टोबर १८८८


पत्र ४ थें ॥सत्यमेव जयते॥ ता. १८ माहे आक्टोबर १८८८ ई.

चि. ग्यानोबा कृष्णाजी ससाणे, मुक्काम हडपसर.

अनेक आशिर्वाद. आपल्या उभयतांच्या अनुमतीनें असें ठरलें होतें कीं, चि. लक्ष्मीबाईस हायस्कूलांत पाठवावी. हल्लीं ज्या शाळेंत चि. लक्ष्मीबाई आहें त्या शाळेत पाठविण्याची सोय नाहीं, असें माझ्या मतें ठरतें. आतां मुलीस हायस्कूलात जर पाठवावी, तर दिपवाळी समीप येऊन ठेपली आहे. मुलगी जर यावेळीं हायस्कूलांत पाठवावी, तर चि. काशीबाईस मुलीशिवाय सणामध्ये घास धकणार नाही. यास्तव चि. लक्ष्मीबाईस तुमचे घरी चि. सादुजी गंगाजी वाघुलू यांजबरोबर तोळे, वाळे आणि गोठासहित दिपवाळी करण्याकरितां पाठवून देतो..... चि. काशीबाईस मुलीच्या शिक्षणाविषयी जर आनंद वाटत नाही तर आम्हास त्याविषयी फार दुःख वाटते. मर्जी देवाची.... आदि सत्यमहाराज.

तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून,
गो. ग. काळे, स. शो. समाजाचे कारकून.


पत्र ५ वें ॥सत्यमेव जयते॥ ता. २१ डिसेंबर सन १८८८ ई.

चि. ग्यानोबा कृष्णाजी ससाणे, मुक्काम हडपसर.

अनेक आशिर्वाद....आपल्या दीन अज्ञानी बांधवांकरितां एक "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक" तयार करण्याचें कामीं गुंतलो होतो, यास्तव मला आपणास एकहि पत्र लिहिण्यास फुरसत झाली नाहीं. असो; सुनबाई बुद्धीनें, स्मरणानें फार उत्तम असून मोठी मायाळू आहे. म्हणून इच्यामध्ये जे गुण आहेत त्यांची वरदास्त ठेविल्यानें परिणाम फार चांगला होणार आहे.....आपली आजी कै. राहीबाई म्हणजे माझी मावशी इचा स्वभाव आपल्यांतील वडील धाकट्यास "जी" म्हणण्याचा परिपाठ होता. तिची आठवण होताच मनास उल्हास होतो. आणि तुमच्या ससाण्यांच्या घराण्याचें मोठे वैभव वाटत होतें. परंतु चि. सुनबाई येथें आल्यापासोन हा काळपावेतो तिनें सर्वांस "जी" म्हणण्याकरिता किती वेळां सामोपचारानें व गोडीगुलाबीनें सांगून तिला कित्येक वेळां जरी खाऊ दिले, तरी तिला आशीच "जी" वाचण्याची लाज वाटते....तिनें आजपावेतों केलेल्या अभ्यासाविषयीं आपण स्वतः तिची झडती घेऊन तिला कांहीं वेळ खेळण्यास मोकळीक देत जाल तर बरें होईल.

ताजा कलमः--काल सकाळीं माझी प्रकृती बिघडली होती. त्यावेळीं चि. सुनबाईनें मोठ्या पोलाईनें कुंडाल्यासारखें मला शेकले; आणि मोठ्या भक्तीनें मी नीट होईतोपर्यंत बसली; आणि....घरांतील समया घासून काढल्या.

आपला,
जोतीराव फुले.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.