घनश्याम श्रीधराची भूपाळी
शाहीर होनाजी बाळा यांनी श्रीकृष्णाला उठविण्यासाठी ही भूपाळी रचलेली आहे.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।
उठीं लवकरि वनमाळी । उदयाचळीं मित्र आला ॥ ध्रु ॥
सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं ।
अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी ।
अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी ।
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं ।
यमुनाजळासी जाती मुकुंदा । दध्योदन भक्षीं ॥
मुक्तता होऊं पाहे । कमळिणीपासुनियां भ्रमरा ॥
पूर्वदिशे मुख धुतलें । होतसे नाश तिमिरा ॥
उठिं लवकरि गोविंदा । सांवळ्या नंदकुमारा ।
मुखप्रक्षालन करीं अंगिकारी भाकर-काला ॥ १ ॥
घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।
गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति जाती ॥
प्रवर्तोनि गृहकर्मी रंगावळि घालूं पाहती ।
आनंदकंदा ! प्रभात झाली उठ सरली राती ॥
काढीं धार क्षीरपात्र घेउनि धेनू हंबरती ।
द्वारी उभे गोपाळ तुजला हांक मारुनि बाहती ॥
हे सुमनहार कंठी । घालि या गुंजमाळा ।
हाती वेत्रकाष्ठ बरवें । कांबळा घेइं काळा ॥
ममात्मजा मधुसूदना । ह्रुषीकेशी जगत्पाळा ।
हंबरताति वांसरे हरि धेनुस्तन-पानाला ॥ २ ॥
प्रातः स्नाने करुनि गोपिका अलंकार नटती ।
कुंकुमादि चर्चुनी मंथनालागिं आरंभिती ।
प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळि गाती ।
अर्घ्यदान देउनियां द्विजजन देवार्चन करिती ॥
नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णु-पूजा समर्पिती ।
स्मार्त शिवार्चनसक्त, शक्तितें शाक्त आराधिती ॥
ऋषिगण आश्रमवासी । जे कां निरंजनी धाले ।
अरुणोदय होतांचि । आपुले ध्यानिं मग्न झाले ॥
पंचपंच-उषःकालीं । रविचक्र निघों आलें ।
येवढा वेळ निजलासिम्हणुनि हरि कळेल नंदाला ॥ ३ ॥
विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी ।
अध्यापन गुरु करिति शिष्यही अध्यायना उदयीं ॥
याज्ञिकजन कुंडांत आहुती टाकिताति पाहीं ।
रविप्रभा पडुनियां उजळल्या शुद्ध दिशा दाही ॥
हे माझे सावंळे पाडसे उठिं कृष्णाबाई ।
सिद्ध सवें बळिराम घेउनि गोधनें वना जाई ॥
मुनिजनमानसहंसा । गोपीमनःकमलभृंगा ।
मुरहर पंकजपाणी । पद्मनाम श्रीरंगा ॥
शकटांतक सर्वेशा । हे हरि प्रतापतुंगा ।
कोटिरवींहुनि तेज आगळें तुझिया वदनाला ।
होनाजी बाळा नित्य ध्यातसे ह्रुदयि नाममाळा ॥ ४ ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |