स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
 दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥ १ ॥

 प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
 प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ २ ॥

 बहु जन्व जंव होये । तंव तंव कांहींच न होये ।
 कांहीं नहोनि आहे । अवघाचि जो ॥ ३ ॥

 सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें ।
 तेंवि न वेंचतां जग होणे । अंगें जया ॥ ४ ॥

 कल्लोळकंचुक । न फेडितां उघडें उदक ।
 ते न्वी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥ ५ ॥

 परमाणूचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।
 तेंवी विश्वस्फूर्तिं इया । झांकवेना जो ॥ ६ ॥

 कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा हरपों नेणें ।
 कां वन्ही दीपपणें । आन नोहे ॥७ ॥

 म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते ।
 तें मी नेणें आ‍इते । ऐसेंचि असे ॥ ८ ॥

 जेंवी नाममात्र लुगडें । येहवीं सुतचि तें उघडें ।
 कां माती मृद्‌भांडें । जयापरी ॥ ९ ॥

 तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत द्‍ई~ण्मात्र जें असे ।
 तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥

 अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।
 नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ ११ ॥

 तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
 प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ १२ ॥

 नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।
 प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ १३ ॥

 बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी ।
 तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ १४ ॥

 घडियेचेंइ आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें ।
 तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ १५ ॥

 न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक ।
 होय आपणिया सन्मुख । आपणचि जो ॥ १६ ॥

 तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्ट्टत्वा आणिजे जेणें ।
 बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ १७ ॥

 तेंवी आपणचि आपुला पिटीं । आपणया दृश्य दावित उठी ।
 दृष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडें तें हे ॥ १८ ॥

 सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें ।
 तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटि हें ॥ १९ ॥

 न्य्सधें मुख जैसें देखिजतसें दर्पणमिसें ।
 वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ २० ॥

 तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा ।
 हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ २१ ॥

 दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्ट्रत्व होये संसारा ।
 या दोहींमाजिला अंतरा । दृष्टं पंगु होय ॥ २२ ॥

 दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्ट घे‍ऊनि असे का‍ई ? ।
 आणि दृश्येंविण कांहीं । दृष्ट्रत्व होणें । २३ ॥

 म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि द्रष्ट्रत्व होणें ।
 पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥ २४ ॥

 एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति ।
 तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥

 दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं ।
 माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ २६ ॥

 पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे ।
 परी दृष्टीतें वा‍उगें । झकवित असे ॥ २७ ॥

 म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्ट्टत्वावेगळें ।
 वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ २८ ॥

 वाद्यजातेविण ध्वनी । काष्ट्जातेविण वन्ही ।
 तैसें विशेष ग्रासूनी । स्वयेंचि असे ॥ २९ ॥

 जें म्हणतां नये कांहीं । जाणो नये कैसेही ।
 असतचि असे पाही । असणें जया ॥ ३० ॥

 आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा ।
 तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥

 जें जाणणेंचि कीं ठा‍ईं । नेणणें कीर नाहीं ।
 परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ ३२ ॥

 यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व हो‍ईजे ।
 नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥
 नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके ।
 नाना कल्लोळमाळिके । पाणि जेंवि ॥ ३४ ॥

 जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण ।
 हें असो आपणीया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥

 जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें ।
 कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ ३६ ॥

 तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।
 चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥

 ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।
 ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । ३८ ॥

 बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे ।
 कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवि ॥ ३९ ॥

 सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।
 मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ ४० ॥

 गोडिये परस्परें आवडी । घेतां काय न माये तोंडी ।
 आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥

 सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे ।
 कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥

 भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन ।
 तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥

 कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी ।
 ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥ ४४ ॥

 चांगया ! टुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें ।
 हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥

 लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।
 तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥ ४६ ॥

 तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं ।
 तेथें तून् कैचा का‍ई । कल्पावया जोगा ॥ ४७ ॥

 जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके ।
 तेंवि तूंतें देखोनि मी थाके । कांहीं नहोनि ॥ ४८ ॥

 अंधाराचे ठा‍ईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं ।
 परी मी आहें हें कांहीं । नवचेचि जेंवि ॥ ४९ ॥

 तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी ।
 उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ ५० ॥

 डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।
 आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ ५१ ॥

 तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि ।
 मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥ ५२ ॥

 आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।
 ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ ५३ ॥

 रूपतियाचेनि मिसें । रूचितें जेविजे जैसें ।
 कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥ ५४ ॥

 तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली ।
 रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ ५५ ॥

 इयेचें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ ।
 दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ ५६ ॥

 तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी ।
 आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥

 जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव ।
 गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ ५८ ॥

 ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझें साच आहे आपणपें ।
 तें स्वानंदजीवनपे । सुखिया हो‍ई ॥ ५९ ॥

 चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति ।
 वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ ६० ॥

 चांगदेवा तुझेनि व्याजें । मा‍उलिया श्रीनिवृत्तिराजे ।
 स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ ६१ ॥

 एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।
 परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥

 तियेपरि जो इया । दर्पण करील ओंविया ।
 तो आत्मा‍एवढिया । मिळेल सुखा ॥ ६३ ॥

 नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे ।
 असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं हो‍इहे ॥ ६४ ॥

 निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।
 केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]