चित्रा नि चारू/चित्राची कहाणी
क हा णी
♣ * * * * * * ♣
त्या गुंडांनी चित्राला पळवून नेले. एका मोठ्या शहरात ते आले. जो गुंडांचा नायक होता, त्याच्या ताब्यात आता चित्रा होती. एका मोठ्या इमारतीत ती होती. एका खोलीत होती. खोलीला बाहेरून कुलूप होते. तो गुंड दिवसातून दोनचारदा येई.
"का मला छळता ? गरीब गाईला छळू नका. सोडा मला." ती म्हणे.
"बाई, पोटासाठी आम्ही सारे करतो. मी तुमच्या अंगाला हात लावणार नाही. परंतु तुम्हाला आम्ही विकू. त्या पैशांनी आमच्या कुटुंबांचे पोषण करू. तुमचा येथे छळ नाही. खा, प्या."
"कसे खाऊ ? येथे कशी राहू ?"
"ते तुमचे तुम्ही पाहा. येथे खायला मिळत नसेल तर सांगा. फळे ‘पाहिजेत ? तुमची भरपूर किंमत आली पाहिजे. आमच्यासाठी तरी शरीराची काळजी घ्या, अशक्त झाल्यात तर कोण विकत घेईल ?”
" तुम्ही का कसाब आहात ?"
"आम्ही पोटाची विवंचना करणारी माणसे आहोत. पोट आम्हाला कसाब व्हायला शिकवते, दरोडेखोर व्हायला शिकवते. खुनी व्हायला शिकवते. जातो मी. चांगल्या गि-हाइकालाच तुम्हाला विकीन. मलाही तुमची दया येते. परंतु माझ्या पोराबाळांची अधिक येते. " असे म्हणून तो गेला.
आणि एके दिवशी एक गि-हाईक आले.
"तुम्ही किती द्याल पैसे ? ' गुंडाने विचारले. "परंतु माल तर पाहू द्या." ते गि-हाईक म्हणाले.
"माल खूपसुरत आहे. बहोत उमदा माल ! "
"खरे सांगायचे, म्हणजे माल मलाही नको आहे. मी आणखी कोणाला विकीन. तू किती घेणार पैसे ? "
"दोन हजार तरी द्या ! "
"परंतु एकदा पाह दे ती मुलगी."
"मुलगी म्हणजे रत्न आहे. मला तिची दया येते. खरोखरच गोड आहे ती मुलगी."
तो गुंड व ते गि-हाईक चित्राच्या खोलीत आली. चित्रा घाबरली.
"सोडा हो मला. तुम्ही का मला त्यांना विकणार ? "
"हो,”
"अरेरे. मी का बाजारी माल ? "
"पोटासाठी, सारे पोटासाठी ! ”
"हे तर श्रीमंत दिसतात. हेही का पोटासाठी मला विकत घेणार ?"
"माझ्या चैनीसाठी तुला विकत घेणार आहे." ते गि-हाईक म्हणाले.
"तुम्ही मुसलमान दिसता. खरोखरच का मुसलमान वाईट असतात ?"
"आम्हाला बोलायला वेळ नाही."
ते दोघे गेले. सौदा ठरला, रात्रीच्या वेळेस . एक मोटार आली. चित्राच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला. तिच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला. तिला खाली नेण्यात आले. मोटारीत घालण्यात आले. गेली मोटार.
कोठे गेली चित्रा ? पुढे काय झाले तिचे ?
त्या मुसलमानाचे खरे नाव होते दिलावर. परंतु त्याने खोटे नाव, घेतले होते, पण त्याला दिलावर म्हणूनच ओळखू. कोण हा दिलावर ?
हा दिलावर फातमाचा नवरा. दिलावर उधळ्या होता. त्याला नेहमी पैशांची टंचाई असे. फातमा त्याला बोले. परंतु, त्याचा खर्च कमी होत नसे. त्याला डझनावारी कपडे लागत, आज ही टोपी घाली, उद्या दूसरी. आज गोंड्याची तर उद्या फेझ. आज हा सूट, उद्या तो. अत्तरांचा घमघमाट असायचा. मित्रांना हॉटेलांतून खाने द्यायचा. उदार म्हणून मिरवायचा.
पैसे पुरे पडत ना, तेव्हा दिलावर हा बायकांचा धंदा करू लागला. पळवून आणलेल्या बायका तो विकत घेई व पुन्हा आणखी कोणाला नफ्याने विकी. बरा चालला होता धंदा.
फातमाला या गोष्टी फारशा माहीत नव्हत्या, तिचे दिलावरवर प्रेम होते. दिलावर तसा स्वभावाने दुष्ट नव्हता. परंतु चैनीची चटक त्याला लागली होती आणि पैशांसाठी तो हे प्रकार करू लागला.
त्याने एका खोलीत चित्राला ठेवले होते. चित्राच्या सेवेला त्याने एक मोलकरीण ठेवली होती. तिची तो काळजी घेई. रोज तिच्याकडे जाई.
"सोडा मला. मी पाया पडते, माझा पती वाट पाहात असेल. आईबाप रडत असतील. दुःखाने वेडे होतील. दया करा. तुमचे नाव रहीम ना ? रहीम म्हणजे दया करणारा ना ? रहीम हे नाव लहानपणापासून मला आवडे."
"तुम्हाला का मुसलमानी नावे आवडतात ? "
"चांगली नावे कोणाला आवडणार नाहीत ? आणि माझी मुसलमान मैत्रीण होती. मी तिच्याकडे जात असे. किती माझ्यावर तिचे प्रेम. माझ्याजवळून तिने रामायण नेले होते. तिने मला 'इस्लामी संत' हे पुस्तक दिले होते. मुसलमान वाईट आहेत असे कोणी म्हटले, तर मी ते चांगले आहेत असे म्हणे आणि फातमा, तिचे आजोबा महंमदसाहेब यांचे उदाहरण मी देत असे. परंतु आज निराळाच अनुभव येत आहे. मुसलमानांचे नाव बद्दू नका करू. उज्ज्वळ करा. मला बहीण माना व सोडा, "
" तुझ्या मैत्रिणीचे नाव काय फातमा ? "
" ती तुम्हाला पत्र पाठवी ? " "एकदोनदा आले, तिच्या नव-याचे नाव दिलावर. तोही स्वभावाने उदार व प्रेमळ आहे असे तिने लिहिले होते. परंतु पुढे बरेच दिवसात तिचे पत्र नाही. तुम्ही ओळखता माझी फातमा ?"
" जगात लाखो फातमा आहेत. "
"परंतु माझ्या फातमासारखी प्रेमळ कोण असेल ? " रहीम, म्हणजेच दिलावर निघून गेला. कुलूप लावून निघून गेला. तो घरी आला. फातमा काही विणीत बसली होती.
" दिलावर !"
" काय फातमा ? "
"सोड हो तुझे फंद. तू मला रडवतोस. तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत असते."
"परंतु मी काय केले वाईट ? "
" ही चैन सोड. चैनीसाठी तुला पैसा पुरा पडत नाही. तू पैशासाठी खोटेनाटे करू लागशील. इज्जत घालवून बसशील. माझे ऐक, माझे स्त्रीधनही तुला दिले. तुझ्यासाठी मी भिकारी झाल्ये."
" तुला आता मी श्रीमंत करीन. पाच हजार रुपये तुला मी आणून देईन. तुझे पाच हजार मी खर्च केले, होय ना ?"
" दिलावर, माझे म्हणजे तुझेच हो. माझे द्यायला नकोत परत. परंतु चैन कमी कर, आपण गरिबीने राहू, परंतु अब्रूने राहू. कोठून रे आणणार आहेस पाच हजार ? जुगार खेळून ? दरोडा घालून?"
"मिळणार आहेत! बघ एक दिवस. तुझ्यासमोर आणून रास ओतीन,हे काय करते आहेस "
"माझ्यावर प्रेम करणाच्याला फ्रॉक, "
"कोण करते तुझ्यावर प्रेम?"
"तूच सांग."
"मी. होय ना ? तुला हे कोणी शिकवले करायला ? "
:माझ्या एका मैत्रिणीने. "
"काय तिचे नाव ? ! "तिचे नाव चित्रा. तिनेच ते रामायण मला दिले. प्रेमाची भेट. मला रामायण फार आवडते. एकपत्नी, एकवचनी राम आणि सीतादेवी तर केवळ सत्त्वमूर्ती ! "
"कोठे आहे तुझी चित्रा ? "
"माझ्या हृदयात आहे."
“तू पत्र नाही पाठवीत तिला ? "
"आमचे बायकांचे नाही हो शेवटी जमत. नव-यांच्या संसारात आम्ही एकरूप होतो."
"फातमा, आज पट्टी नाही दिलीस. "
"माझ्या चित्राला मी पट्टी करून देत असे. तिला माझ्या हातची आवडे. तिचे तोंड रंगे. माझे तोंड रंगत नसे तेव्हा."
"आता रंगते ना ? "
"दिलावरने मला विडा दिला म्हणजे रंगते. ही घे पट्टी. दिलावर, मला एक वचन दे आज."
"काय वचन देऊ ?"
"नकोच पण वचन. तू चांगलाच वागशील."
दिलावर बाहेर निघून गेला.
इकडे एके दिवशी चित्रा रडत होती, तो ती मोलकरीण आली.
"काय ग तुझे नाव ? "
"माझे नाव अमीना."
"अमीना, तू स्त्री, मी स्त्री. स्त्रीची स्त्रीने नाही बाजू घ्यायची तर कोण घेईल ? तू येथून मला सोडव. मी तुझे उपकार फेडीन, तुझे दारिद्र्य फेडीन. माझ्यावर विश्वास ठेव. अमीना, माझा पती माझ्यासाठी तडफडत असेल, पाखरेसुद्धा नर-मादी जर अलग झाली तर तडफडून प्राण देतात. आपण तर माणसे. अमीना, वाचवशील मला ?"
"मी एक करू शकेन."
"काय ? "
धन्याची बायको म्हणजे देवमाणूस आहे. तिच्या कानांवर मी तुमची हकीगत घालीन. तिला तुमची दया येईल.” "जा, त्या माउलीला सांग. मी तुझे उपकार विसरणार नाही."
अमीना फातमाकडे आली.
"अमीना, अलीकडे तू फारशी बाहेर जातेस ? आणखी कोणाकडे फावल्या वेळात काम करतेस वाटते ? "
"फातमाबिबी, तुमच्या पायाशी एक अर्जी आहे.
"काय आहे ? पैसे हवे असतोल. कोणी आजारी का आहे ? मुले बरी आहेत ना ?"
"सारी खुशाल, गुप्त गोष्ट आहे. दिलावरसाहेबांनी एक वाईट गोष्ट केली आहे."
"कोणती ?"
"त्यांनी कोणी एक हिंदू मुलगी पळवून आणली आहे. ती सारखी रडत असते. तुम्ही तिचे संकट दूर करू शकाल, फार गोड व गरीब मुलगी आहे, मला वाईट वाटते. परंतु मी काय करणार? म्हटल तुमच्या कानांवर घालीन."
"किती दिवस झाले ?"
"बरेच दिवस झाले."
"काही वेडेवाकडे झाले का ?"
"दिलावर तसे पाक आदमी आहेत. परंतु ते या मुलीला कोणाला तरी विकणार आहेत, त्यांची तिच्यावर पापदृष्टी नाही."
"पैशासाठी सारे ! दिलावर, काय चालवलेस है ! बरे, अमीना, आता येऊ का मी तुझ्याबरोबर ? दिलावर तेथे केव्हा येतो ?"
"आता आज येणार नाही."
"तर मग मी जरा अंधार पडला म्हणजे तुझ्ह्याबरोबर येईन. आणि हे बघ, आपल्या या घरात ती एक रिकामी खोली आहे ना ? ती खोली, झाडून तेथे खाट, गादी ठेव, समजले ? काही बोलायचे नाही हं."
"नाही."
सायंकाळ झाली. अमीना व फातमा दोघी निघाल्या. कुलूप उघडले. फातमा आत आली व अमीनाबाहेरच उभी होती."कोण फातमा ? "
"कोण चित्रा ? "
"होय फातमा, माझी फातमा, मला वाचव, वाचव, "
"चित्रा, भिऊ नकोस. आता काळजी सोड." दोघी मैत्रिणी गळ्यात गळा घालून रडल्या. चित्राने सारी हकीगत सांगितली. सासूचे कारस्थान सांगितले. मधूनमधून तिला हुंदके येत. फातमाचे डोळेही भरून येत.
"फातमा, चारू तडफडत असेल. बाबा दुःखाने वेडे झाले असतील. लवकर मला मुक्त कर."
"चित्रा, माझ्या बाबांना मी बोलावून घेते. ते आमदार आहेत. त्यांच्या अनेकांशी ओळखी आहेत मोठ्यामोठ्यांशी. पुष्कळ हिंदू आमदारही त्यांच्या परिचयाचे आहेत. बाबांना बोलावते. ते दिलावरचे कान उपटतील. तू आता निश्चिंत राहा. आता चल माझ्याबरोबर. माझ्या घरी. मोठे आहे घर. एका खोलीत बाबा येईपर्यंत तुला सुरक्षित ठेवीन, चल, बाबा तुला तुझ्या घरी घेऊन जातील हो. उगी, रडू नको. किती दिवसांनी भेटलो आणि किती चमत्कारिक परिस्थितीत. मला लाज वाटते. माझ्या नवऱ्याच्या हातून तू संकटात पडावीस ! "
" परंतु वाचण्यासाठीच तुझ्या पतीच्या हाती आल्ये म्हणायची. दुस-या कोणाच्या हातात पडल्ये असत्ये, तर फातमा, माझे काय झाले असते ? देवाची दया, की माझी विक्री होत होती. माझ्या शीलावर कोणी गदा आणलो नाही."
"चल, ऊठ. हा बुरखा घे."
त्या तिघीजणी निघाल्या. फातमाचे घर आले. चित्रासाठी झाडून ठेवलेल्या खोलीत फातमा तिला घेऊन गेली.
"चित्रा, उद्या तुला मी न्हाऊ घालीन. तुझ्या केसांना सुगंधी तेल लावीन, " " फातमा, चारू दृष्टीस पडेपर्यंत नकोत तेले, नकोत उटणी. त्याने जिवाचे बरेवाईट तर नसेल ना केले ? मी जणू त्याची प्राण आहे."
"चित्रा, भेटतील हो सारी. शांत राहा, मी बाहेरून कुलूप लावीन. दिलावर घरात नसला, म्हणजे मी तुझ्याजवळ येईन. आता रडू नकोस. तुझी ग्रहदशा संपली. आता सुखाचे दिवस येतील. खरेच, तुझ्या वडिलांचीही चौकशी करवते. बाबांना बोलावते. तारेनेच बोलावते. म्हणजे सारे ठीक होईल हो." फातमाने धीर दिला.