चित्रा नि चारू/महंमदसाहेबांची बदली

म हं म द सा हे बां ची
ब द ली

♣ * * * * * * ♣







 बळवंतराव निर्मळपूरला आले, परंतु त्यांचे मित्र बनलेले महंमदसाहेब फौजदार यांचीच आता बदली झाली. बळवंतराव व महंमदसाहेब यांचा थोड्या दिवसांत खूप परिचय झाला होता. विशेषत: फातमा व चित्रा यांची मैत्री फारच जडली होती. फातमा चित्राकडे नेहमी यावयाची. दोघींच्या गप्पागोष्टी चालायच्या. दोघी झोपाळ्यावर बसत. झोके घेत. चित्रा पेटी वाजवी, फातमा गाणी म्हणे. चित्रा आईजवळून खायला आणी व दोघी मैत्रिणी खोलीत बसून खात.

 "चित्रा, आजोबांची येथून बदली होणार. मी येथून जाणार. आपण एकमेकींपासून दूर जाणार. पुन्हा कधी, कोठे भेटू, काय सांगावे?"

 "फातमा तुझे लग्नही होईल. पुढे काय काय होईल कोणी सांगावे? तू तुझ्या सासरी गेलीस म्हणजे कदाचित पडद्यात अडकशील. हे आजोळचे प्रेमळ मोकळे स्वातंत्र्य तुला पुन्हा मिळेल की नाही? तू मला कशी पत्रे पाठवणार? सारे मनोरथ मनातच राहातील. आपली कदाचित पुन्हा भेटही होणार नाही. मला वाईट वाटते. खरेच वाईट वाटते. फातमा, तू इतकी कशी ग चांगली? मी तुझी मैत्री जोडली, म्हणून इतर मुली माझ्याकडे येत नाहीत. न येऊ देत. तू मला एकटी पुरेशी आहेस."

 "चित्रा तुझी आई फार मायाळू आहे. ती मला तुझ्याकडे येऊ देते म्हणून. ती न येऊ देती तर ?"

 "माझी आई माझ्यावर जीव की प्राण करते."

 "मला आईच नाही."  " परंतु तुझे आजोबा आईची आठवण नाही ना येऊ देत ?”

 "होय चित्रा, पैगंबरांचे आईबापही लहानपणीच वारले. ते पोरके होते. पोरक्या मुलांविषयी पैगंबरांना फार प्रेम वाटे. कुराणात पुन्हा पुन्हा सांगितले आहे, की ' पोरक्या मुलांना फसवू नका. त्यांची इस्टेट लुबाडू नका, त्यांना प्रेम द्या,' आजोबा मला प्रेम देत आहेत."

 "तुझ्या वडिलांचे तुझ्यावर प्रेम नाही का?"

 "आहे. परंतु ते दूर असतात, मला कपडे पाठवतात. खाऊ, पुस्तके पाठवतात. आता मी त्यांच्याकडेच जाणार आहे. सावत्र आईजवळ. चित्रा, लवकरच माझे लग्न होईल. बाबा. लग्न करणारच माझे यंदा."

 "तुझे वडील खरेच का निवडणुकीस उभे राहाणार आहेत ?"

 "हो. त्यांना फार नाद. हजारो रुपये खर्च करतात निवडणुकीसाठी."

 "ते कोणत्या पक्षाचे आहेत ?"

 "ते स्वतंत्र पक्षाचे."

 "परंतु कोणत्या तरी पक्षाचे असल्याशिवाय लोक मते देत नाहीत.”

 "बाबा नेहमी निवडून येतात. ते उदार आहेत. सर्वांना मदत करतात. ते पक्षातीत आहेत. ते सर्वांचे मित्र आहेत. त्यांना शत्रू नाही. ते म्हणतात, मी निवडणुकोत कधी पडणार नाही. एकदा पडलो तर पुन्हा उभा राहाणार नाही."

 "फातमा, तुला मी काय देऊ? कोणती भेट देऊ? "

 " तुझे ते मराठी संक्षिप्त रामायण मला भेट दे. मला फार आवडते राम-सीतेची गोष्ट. "

 "दुसरे काही माग."

 "काय मागू ? असेच प्रेम ठेव. मुसलमान म्हणजे वाईट असे नको समजू. जे असे म्हणतील त्यांना सांग, की माझी एक मुसलमान मैत्रीण आहे. तिचे नाव 'फातमा.' ती माझ्यावर प्रेम करी. चित्रा, हिंदुमुसलमानांची भांडणे ऐकून तुला वाईट नाही वाटत ? "

 "फातमा, आपण लहान मुली काय करणार ? "

 "जेवढे होईल तेवढे करू, चित्रा, तुला मी ' इस्लामी संत' हे पुस्तक भेट म्हणून देईन. ती माझी तुला आठवण."  "फातमा, थांब. शेवटचा फराळ करून जा. मी घेऊन येते हैं. येथे बैस."

 चित्रा खाली गेली. आईजवळून तिने चकल्या, लाडू, वगैरे फराळाचे सामान आणले. लिंबाचे सरबत तिने केले होते. दोघी मैत्रिणींनी फराळ केला. दोघी सरबत प्यायल्या.

 "जाते आता चित्रा."

 "हे घे रामायण."

 "तुला मी विसरणार नाही."

  फातमा गेली. चित्रा एकटीच आता खोलीत बसली होती. 'खरेच का आपलेही लग्न बाबा लवकर करणार?' ती विचार करीत होती, परंतु तिला तो विचार आवडला नाही.

 "चित्रा, स्टेशनवर येतेस का ?" बळवंतरावांनी विचारले.

 "कशाला?"

 "अग, ते महंमदसाहेब आज जाणार आहेत."

 "उद्या ना जाणार होते ?"

 "नाही, आजचे जात आहेत. तुझी फातमा आली होती ना ? तिने नाही का सांगितले ? "

 " तिला नक्की दिवस माहीत नव्हता."

 "चल. तुझ्या मैत्रिणीला निरोप दे."

 "बाबा, फातमास मी काय देऊ ? "

 " काय देतेस ? "

 "तिला एखादी सुंदर ओढणी घेऊन दिली असती."

 "खरंच. छान होईल, मी मागवतो हो."

 आणि बळवंतरावांनी एका दुकानातून सुंदर रेशमी ओढणी ताबडतोब मागवून घेतली. चित्राला ती आवडली. पित्याबरोबर ती स्टेशनवर गेली.

 "रावसाहेब, आपण कशाला आलेत मुद्दाम ? ' फौजदारसाहेब म्हणाले.

 "मित्र म्हणून आलो. रावसाहेब म्हणून नव्हे. आणि चित्रालाही यायचे होते. "  चित्राने फातमाला ती ओढणी दिली. फातमाने खांद्यावरून व डोक्यावरून ती घेतली. छान दिसत होती.

 "फातमा, किती तू छान दिसतेस ? "

 "चित्रा, तुही मला सुरेख दिसतेस."

 "ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते नेहमी चांगलेच दिसते." बळवंतराव म्हणाले.