जन्मभूमीचा त्याग
जन्मभूमीचा त्याग
बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता. गाव मोठा सुखी व समृद्ध होता. गावात नाना प्रकारचे धंदे चालत. शेतकरी, विणकरी, रंगारी, पिंजारी, सोनार, सुतार, लोहार , कुंभार- सर्व प्रकारचे लोक होते. गावात भांडण बहुधा होत नसे. मारामारी होत नसे कोणी कोणाचा हेवादावा करीत नसे. सारे गुण्यागोविंदाने नांदत.
सायगावची एक विशिष्ट परंपरा होती. त्या गावचे लोक कधी राजाकडे न्याय मागायला जात नसत. ‘पाप करणारा असेल त्याला देव शिक्षा करीलच’ असे ते म्हणत. ‘पाप करणार्याचे मन त्याला खातच असते, आणखी त्याला शिक्षा कशाला?’ असेही कोणी म्हणत. जर गावात अपराध झालाच, तर सारे लोक देवळात जमत. कोणी अपराध केला त्याची चौकशी होई. अपराध करणार्याचे नाव देवासमोर सांगण्यात येई. त्याला दुसरी शिक्षा नसे. गावातील सर्व लहान-थोरांना अपराध करणार्याचे नाव कळे. त्याच्याकडे सारे लोक ‘हा तो अपराधी’ अशा दृष्टीने बघत. हीच शिक्षा.
सायगावात विनू व मनू दोघे मित्र होते. विनूला मनूशिवाय करमत नसे व मनूला विनूशिवाय. मनू एकटा होता. त्याचे आईबाप मरण पावले होते. त्याची लहान बहीण होती. या बहिणीवर त्याचा फार लोभ. परंतु ती बहीणही देवाघरी गेली. मनूला अपार दु:ख झाले. जीवनात त्याला अर्थ वाटेना. कोणासाठी जगावे, का जगावे ते त्याला कळेना. परंतु विनूमुळे तो वेडा झाला नाही.
मनू विणकर होता. विणण्याची कला त्याच्या बोटांत होती. धाकटी बहीण होती. तेव्हा तिच्यासाठी तो विणी. पैसे मिळवून बहिणीला नटवी. पुढे-मागे बहिणीचे लग्न करावे त्यासाठी तो पैसे साठवी. परंतु बहीण देवाकडे निघून गेल्यावर मनू फारसे काम करीत नसे. देवाने त्याच्या जीवनाचे वस्त्र जणू दु:खाने विणले होते. ते दु:खाचे वस्त्र पांघरून मनू घरी कोपर्यात बसे विनू येई तेव्हा मात्र तो जरासा हसे.
असे काही दिवस गेले. एकदा काय झाले, त्या गावात एक परका पाहुणा आला. त्याच्याजवळ बरेचसे पैसे होते. विनूला पैसे पाहिजे होते. विनूच्या मनात पाप आले. त्या श्रीमंताचा खून करावा असे त्याच्या मनात आले. शेवटी त्याने संधी साधून त्या श्रीमंताचा खून केला. त्याची पिशवी त्याने लांबविली. परंतु खून पचवायचा कसा?
विनूने रक्ताने माखलेला सुरा मनूच्या उशाशी ठेवून दिला. मनू झोपलेला होता. विनू मुकाट्याने आपल्या घरी जाऊन पडला. सकाळ झाली. प्रवासी मरून पडलेला दिसला. सर्व गावभर वार्ता गेली. कोणी केला तो खून? कोणी केले ते पाप?
मनू जागा झाला. त्याच्या उशाशी रक्ताने माखलेला सुरा होता; तो दचकला. तो सुरा हातात घेऊन तो वेड्यासारखा बाहेर आला. लोक त्याच्याकडे पाहू लागले.
“हा पाहा लाल सुरा, रक्तानं रंगलेला सुरा! कुणाचं हे रक्त? कुठून आला हा सुरा? माझ्या उशाशी कुणी ठेवला? लाल लाल सुरा.” असे मनू बोलू लागला.
“यानंच या प्रवाशाचा खून केला असेल.”
“आणि स्वत: साळसूदपणा दाखवीत आहे.”
“त्याला खून करून काय करायचं होतं?”
“देवाला माहीत. एकटा तर आहे. पैसे हवेत कशाला?”
“लोभ का कुठं सुटतो?”
असे लोक म्हणू लागले. मनूला काही समजेना. तो वेड्याप्रमाणे बघू लागला.
“मी कशाला कोणाला मारू? मी आधीच दुःखाने मेलो आहे. मला कशाचीही इच्छा नाही. ना धनाची, ना सुखाची! कोणी तरी हा सुरा माझ्या उशाशी आणून ठेवला असावा. स्वत:चं पाप या गरीब मनूवर ढकलीत असावा.” मनू म्हणाला.
त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. शेवटी देवळात सारे लोक जमले. मनू तेथे दु:खाने हजर राहिला. मनूनेच तो खून केला असावा, असे सर्वांचे मत पडले. मनूची मान खाली झाली होती. ईश्वराने त्याचे आईबाप नेले होते; त्याची बहीण नेली होती. आता त्याची अब्रूही परमेश्वर नेऊ पाहात होता; जीवनातील सर्वांत मोठी मोलवान वस्तू. तीही आज जात होती. मनूने विनूकडे पाहिले. परंतु विनू त्याच्याकडे पाहीना. आपला मित्र तरी आपणांस सहानुभूती दाखवील असे मनूस वाटत होते. परंतु तीही आशा का विफळ होणार?
मनू उभा राहिला. तो म्हणाला, “सर्व गावानं मला अपराधी ठरवलं आहे, परंतु मी निष्पाप आहे. इथं असलेल्या सर्वांना का मी खुनी आहे असं खरोखर वाटतं? निदान माझा मित्र विनू तरी तसं म्हणणार नाही. मित्र मित्राला ओळखतो. माझा स्वभाव विनूला माहीत आहे. विनू, तुझं काय मत आहे ते सांग. सार्या गावानं जरी मला दोषी ठरविलं तरी मला त्याची पर्वा नाही, परंतु मित्र दोषी न ठरवो. विनू, तुझ्या डोळ्यांनाही मी खुनीच दिसतो का? सांग, तुझं मत सांग. तुझ्या मताची मला किंमत आहे. तुझ्यामुळं मी जगलो आहे. या जीवनात तुझाच काय तो एक स्नेहबंध मला आहे. विनू, बोल. माझ्याकडे बघ. माझे हात कोणाच्या उरात भोकसतील का सुरा? सुंदर वस्त्र विणणारे हे हात, ते का कोणाचं जीवनवस्त्र कापून टाकतील? शक्य आहे हे? सांग, मित्रा, तुझं मत सांग. तुला जे खरोखर वाटत असेल ते सांग.”
विनू उभा राहिला. तो म्हणाला, “मनू माझा मित्र आहे. परंतु सत्याशी माझी अधिक मैत्री आहे. सत्याला मी कधी सोडणार नाही. मनू, मनुष्याच्या मनात केव्हा काय येईल त्याचा नेम नसतो. निर्मळ आकाशात केव्हा काळे ढग येतील ते काय सांगावं? तुझ्या उशाशी तो सुरा होता. तो का दुसर्यानं आणून ठेवला? तूच तो खून केला असावास, मलाही असंच वाटतं. माझ्या मित्रानं खून करावा याचं इतर सर्वांपेक्षा मला अधिक वाईट वाटत आहे. ‘खुनी माणसाचा मित्र’ असं आता लोक मला म्हणतील व हिणवतील. मनू, काय केलंस हे? केलसं तर केलसं, परंतु पुन्हा निरपराधीपणाचा आव आणू बघतोस. हे तर फारच वाईट. हातून पाप झालं तर कदाचित दु:खाच्या लहरीत, उदासीनतेच्या लहरीत, वेडाच्या लहरीत केलं असशील हे पाप. परंतु ते कबूल करून गावाची क्षमा मागण्याऐवजी तू दंभ दाखवीत आहेस, काय याला म्हणावं?”
आपल्या मित्राच्या तोंडचे ते शब्द ऐकून मनूचे तोंड काळवंडले. जिथे त्याची सर्व आशा तिथेच निराशा पदरी आली. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यानेही आपल्याविषयी गैरसमज करून घ्यावा ह्यासारखे दुनियेत दुसरे दु:ख नाही, तो सर्वांत प्रखर असा प्रहार असतो.
सभा संपली. मनूला ‘खूनी मनू’ म्हणून संबोधन्यात येऊ लागले. मनू घरातून बाहेर पडेना. तो भयंकर मन:स्थितीत होता. एके दिवशी रात्री सायगाव सोडून जाण्याचे त्याने ठरविले. तीव्र निराशेने तो घेरला गेला होता. ‘या जगात न्याय नाही, सत्य नाही, प्रेम नाही काही नाही!’ असे तो मनात म्हणाला. जगात देव नाही, धर्म नाही मरता येत नाही म्हणून जगायचे. जग म्हणजे एक भयाण वस्तू आहे असे त्याला वाटले.
मध्यरात्रीचा समय. सर्वत्र अंधार होता. मनूच्या मनात बाहेरच्या अंधाराहूनही अधिक काळाकुट्ट असा अंधार पसरला होता. परंतु तो उठला. ते पूर्वजांचे घर सोडून तो निघाला. जेथे त्याच्या आईबापांनी त्याला वाढविले, जेथे आपली पोरकी बहीण त्याने प्रेमाने वाढविली, असे ते घर सोडून तो निघाला. त्याला वाईट वाटले; त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. परंतु शेवटी प्रणाम करून त्याने घराबाहेर पाऊल ठेवले. तो रस्ता चालू लागला. बहुळा नदीच्या तीरावर तो आला. त्या नदीत तो कितीदा तरी डुंबला असेल. मित्राबरोबर पोहला असेल. बहुळेच्या काठी एका खडकावर तो बसला. वरती तारे चमचम करीत होते. मनूच्या मनात शेकडो स्मृती जमल्या होत्या. हृदयात कालवाकालव होत होती. मोठ्या कष्टाने तो उठला. त्या मध्यरात्री बहुळेचे तो पाणी प्यायला. पुन्हा एकदा गावाकडे वळून त्याने प्रणाम केला. बहुळेला प्रणाम केला आणि वेगाने निघाला. लांब लांब जाण्यासाठी मनू निघाला, जेथे त्याला कोणी खुनी असे म्हणणार नाही तेथे जावयास तो निघाला. मातृभूमीला रामराम करून तो निघाला.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |