जाणिवांची आरास
जाणिवांची आरास
(स्फुटसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in
दुसरी आवृत्ती २०१८
© डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com
मुखपृष्ठ
गौरीश सोनार
अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर
मूल्य ₹२५०/-
हा सारा आठवांचा पाझर
जाणिवा समृद्ध करणारा.
गतकालचे हे क्षण, कण
बरंच काही देऊन जातात.
स्मरणरंजनातलं हे चिरंतन चिंतन!
‘जाणिवांची आरास' हा माझा स्फुटसंग्रह होय. दैनिक लोकमत, कोल्हापूर आवृत्तीमध्ये सन २००६ मध्ये मी ‘गुड मॉर्निंग' या सदरात प्रासंगिक घटना, प्रसंगांच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार शब्दबद्ध केले होते. हे दैनिक सदर होते. मी गुरुवारी लिहीत असे. तत्कालीन आमदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), हुसेन जमादार (पुरोगामी मुस्लीम कार्यकर्ते), प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर (पर्यावरण तज्ज्ञ), विलास मोहिते (माजी पोलीस अधिकारी), प्रा. शिवाजीराव भुकेले (आध्यात्मिक वक्ते), पैलवान संभाजी पवार (माजी आमदार) या सदराचे सहलेखक होते. विषय, आशय, शैली वैविध्यामुळे ते सदर त्या वेळी लोकप्रिय ठरले होते.
त्यानंतर सन २००८ मध्ये दैनिक तरुण भारत (बेळगाव) च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी ‘अनुभव' सदरात दोन एक महिन्यासाठी लेखन करून आठ एक स्फूटे लिहिली होती. हे सदर अल्पकालिक होते की मीच अल्पकाल लिहिले ते काही आज आठवत नाही.
अलीकडे दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स' च्या ‘सगुण-निर्गुण' सदरासाठी एप्रिल ते जुलै २०१७ मध्ये मी लेखन केले. ते चार महिन्यांसाठी होते. सर्वश्री सुधाकर गायधनी, डॉ. पितांबर पाटील, रेणू पाचपोर, रामदास भटकळ माझ्याबरोबर लिहीत. हे जुने सदर. त्याचा वाचक वर्ग मोठा. शिवाय ते महाराष्ट्रभरच्या सर्व आवृत्त्यांत प्रकाशित होत असल्याने त्याला विस्तृत प्रसिद्धी मिळाली व मोठा वाचकवर्गही मिळाला. ‘टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रकाशित होणा-या 'Speaking Tree' ची ही मराठी आवृत्ती. इथे बहुधा आध्यात्मिक लेखन प्रकाशित होत असे. माझ्या लेखनाची
बैठक सामाजिक असल्याने मी त्या अंगाने लेखन करूनही ते पसंत केले
गेले हे विशेष.
दैनिक पुण्यनगरीचं ‘सुखद धक्का' सदर आत्मपर असल्याने व ते
सार्वत्रिक लेखनातून चालत असल्याने निमंत्रित त्यात लिहीत. त्याप्रमाणे
मी एकदा स्फुट लिहिले होते.
या सर्व सदर लेखनाने मला त्या-त्या वेळी अंतर्मुख केले.मागे वळून
पाहात हे लेखन झाले.ते समकालाशी साद घालणारे होईल असे मी
पाहिले. स्मरणरंजनातून चिरंतन चिंतन असं त्याचं स्वरूप होतं.
स्फुटलेखन करीत असताना लेखकाला एकाचवेळी अनेक व्यवधाने
पाळावी लागत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती नियमितता.
निश्चित वेळेत स्तंभाचा मजकूर वृत्तपत्र कचेरीस पोहोचवणे आवश्यक
असते. वृत्तपत्र नि सूर्य प्रकाशित होत नाही असे सहसा घडत नाही.त्यामुळे
तुमची नियमितता ही स्तंभलेखकाची विश्वासार्हता ठरत असते.ही
विश्वासार्हता वाचकांप्रती असते. त्यामुळे वाचक व स्तंभलेखकात त्या-
त्या काळापुरते ऋणानुबंध तयार होत असतात.तुमचा वार वाचकांच्या
सवयीचा झाल्याने ते स्तंभ लेखनाची जागा शोधून प्रथम स्तंभ वाचन व
नंतर वृत्त वाचन करतात असेही घडते. ती तुमच्या लेखनास मिळालेली
वाचकांची पोच व पसंती असते. मी गेले दशकभर अनेक वृत्तपत्रे व
नियतकालिकात स्तंभलेखन केले. दहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रे ही विचारपत्रे
होती. वृत्तांइतकेच महत्त्व स्तंभांना असायचे. जागतिकीकरणामुळे विचार
नि वृत्तांवर जाहिरातींचे आक्रमण झाले आहे. पूर्वी वृत्तपत्रात संपादक
प्रमुख होता. त्याची जागा आता व्यवस्थापक, वितरण प्रमुख, जाहिरात
व्यवस्थापकांनी घेतल्याने वृत्तांवर जाहिरातीचा कोट चढविण्यात वृत्तपत्रांना
काही वाटेनासे झाले आहे. स्तंभलेखकाने असीधारा व्रत घेऊन नियमित
लेखन केले तरी ते नित्यनेमाने नियत जागी प्रकाशित होईल याची खात्री
संपादक आता देऊ शकत नाही. इतकेच काय उद्याच्या अंकात स्तंभ
प्रकाशित होऊ शकत नसल्याची दिलगिरी संपादक छापत नाहीत.शिवाय
स्तंभलेखकास मजकूर प्रकाशित होणार नसल्याची पूर्वसूचना व दिलगिरी
व्यक्त करणे संपादकांना शिष्टाचार म्हणूनही आवश्यक वाटेनासे झाले
आहे.याला काय म्हणावे? लेखक व्रत म्हणून लिहितो, पैशासाठी नाही.
शिवाय वाचक वृत्तपत्रे आगाऊ पैसे देऊन विकत घेतात ते वृत्त नि स्तंभ
वाचण्यासाठी,जाहिरातींसाठी नाही. स्तंभांसंदर्भातील वाचक प्रतिक्रिया, प्रतिसादास माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक संपर्क जालाच्या (Social Networking) काळात जागा दिली जात नसल्याचे वैषम्य नि आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. लाईक, कॉमेंटच्या काळात हे सहज शक्य असताना त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ही संपादकांची उपेक्षा की अनास्था कळण्यास मार्ग नाही.
‘जाणिवांची आरास'हा माझा गत दशकातील विविध वृत्तपत्रांतील स्फुटलेखनाचा संग्रह होय. या लेखनात मी प्रसंगोपात निर्माण झालेले विचारमंथन शब्दबद्ध केले. प्रसंग छोटे, क्षणिक असले तरी त्यातून दिलेला आचार,विचार माणसास प्रगल्भ बनवेल असे मी पाहिले. माझे लेखन छंद म्हणून होत असले तरी तो मी शिळोप्याचा खटाटोप होऊ दिला नाही. आपल्या लेखनातून वाचकास विचार,कृती,व्यवहार,मार्गदर्शन मिळून तो जाती-धर्मनिरपेक्ष, समता, बंधुता, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांना मानणारा व्हायला हवा अशी लेखनामागे माझी सतत भूमिका राहिली आहे. देव, दैव,पारंपरिक धर्म, जातीयता, अंधश्रद्धा, वैरभाव यांना छेद देणारे लिहिले.ते माझ्या जाणीव व नेणिवेतही मानव हीच जात,मानव हाच धर्म असा मनुष्य हितैषी विचार पारदर्शी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ व स्पष्ट होता नि आहे.हे लेखन त्या अर्थाने माझ्या ‘जाणिवांची आरास' होय.
स्फुटलेखनास अलीकडच्या काळात संपादक शब्दमर्यादा घालून देतात. त्या मर्यादेतच मी लिहीत राहिल्याने माझ्या संक्षिप्त मजकुरास कधी संपादकीय कात्री लागली नाही. मला हेही या ठिकाणी नमूद करायला हवे की मी लिहायला लागल्यापासन मला माझ्या लेखनास संपादकांच्या सेन्सॉरशिपचा स्पर्श झाला नाही. त्यामुळे माझे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहोचत राहले. माझे लेखन व वक्तृत्त्व मी सहजसंवादी ठेवले, त्यात कोणताही अभिनिवेश, शैलीचा आग्रह राखला नाही. त्यामुळे ते सुबोध होत राहिले. ते हृदयस्पर्शी असते असा वाचक, श्रोता यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद मला लेखन , भाषण, वाचनास प्रेरणा नि प्रोत्साहन देत राहतो. माझ्या लेखन सातत्याचे तेच बलस्थान, प्रेरणास्थान नि गमक होय. लेखन मी निर्वैर होईल असे पाहिले म्हणण्यापेक्षा ते तसे झाले. कारण मी माझी घडण तशी होईल,माझा व्यवहार तसा होईल असे पाहिले. याचे वाचकांना सतत आश्चर्य नि आकर्षण वाटत राहिले आहे. यातून अन्य लेखन कसे असते याची जाणीव होत राहिली व मी माझ्या जाणिवांची आरास नेणिवेतही तशीच जपली, जोपासली. त्यामुळे स्फुटलेखन वाचनीय, विचारणीय, आचरणीय बनत गेले. हे स्फुटलेखन वाचकांच्या मनी, कानी गुणगुणत राहील असा नाद त्याला आहे, हे या पुस्तक संपादनाच्यावेळी दशकभराने वाचताना लक्षात येऊन माझे मलाच आश्चर्य वाटले! (नि खरं तर हेवाही!). असं ललित, मनोहर लिहिणारा मी प्रतिभावान साहित्यिक खचितच नाही. मी नेहमी म्हणत आलो आहे की, 'मी लेखक आहे, साहित्यिक नाही.' कारण अलंकारांची आरास मला जमली नाही. माझं स्फुटलेखन हे सामाजिक जाणीव व बांधिलकीची फलश्रुती होय. लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, पुरोगामीत्व, जाती धर्मनिरपेक्ष मानवतावाद अशी पंचसुत्री घेत माझं लेखन होत राहातं.ही मूल्ये हाच लेखनाचा आधार नि लक्ष्य होय.ती दृष्टी समाजहिताच्या दृष्टीने मला महत्त्वाची नि अनिवार्य वाटते. दुसऱ्याच्या मतांची जाणीव व आदर ठेवत माझंं लेखन होत राहातं. मात्र त्यांच्या विचार सावलीत मी माझ्या जाणिवा ना ओलावू देतो ना करपू. ‘देवाचे देवाला, राजाचे राजाला' असा बायबलचा संदेश मी आचरत आलो आहे.
स्फुटलेखन हे रकाने भरण्यासाठी मी कधीच केले नाही. लेखनाची एक उपजत असोशी माझ्यात आहे. ती मनात निरंतर रुंजी, पिंगा घालत असते.अशा निमित्ताने ते लेखन होत असले तरी नेणिवेत त्याचा नाद नित्य घुमत राहात असतो. समाजातील व्यक्ती, घटना, प्रसंग, क्रिया, प्रतिक्रिया, साद-प्रतिसाद माझे मन टिपत राहते, प्रतिक्षिप्त होत रहाते. लेखन त्याची प्रतिक्षिप्त क्रिया असते. त्यात जी उत्स्फूर्तता दिसते ती माझी उर्मी व ऊर्जा होय. ती उपजतच असते. जीवनानुभव माझी लेखन-प्रेरणा होय. वास्तवास भिडणं ही माझी जीवनशैली असल्याने तीच माझी लेखनशैली बनून अवतरते. त्यास अन्य सजावटीची गरज नाही राहात. हे लेखन एखाद्या पत्रकार, वार्ताहराप्रमाणे चौकस व चतुरस्रपणे समाजसंवेदी घटना, प्रसंग, व्यक्ती, विचार न्याहाळत, निरीक्षण करत टिपत होत राहातं. या लेखनामागे समाज बदलाची धडपड, धुंदी नि ध्यास असतो, हे मात्र खरं! शिवाय प्रश्नांना पर्याय देण्याचा संकटमोचक प्रयत्नही असतो. अन्यथा मग हे लेखन वाचले नि विसरले असे होणार. आपले लेखन ‘नळी फुंंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' असे होणार नाही हे पाहिले.
'जाणिवांची आरास' तुम्हाला आदर्श सुचवेल. प्रतिदर्श पुढे करेल. प्रस्तुत-अप्रस्तुतातला भेद समजावून तुमचा विवेक जागवेल. तुम्हास हे लेखन सोशिक बनवेल. सहिष्णुता रुजायची तर सोशिकता हवी. परकाया प्रवेश प्रवृत्तीतूनच सामाजिक सहिष्णुता जन्मत असते. या लेखनात थरकाप नसेल पण शहार जरूर. कारण कृतिप्रवणता ही मी लेखनाची पूर्वअट मानत
आलो आहे.सर्वसामान्यातपण आदर्श दडलेले असतात. 'गुड मॉर्निंग' मधील मोलकरीण,वाचनवेडा राजामाम,झाडू कामगार साहित्यिक वाचत असताना तुम्हास हे लक्षात येईल.इथे डॉ.अनंत लाभसेटवार,कवी विंदा करंदीकर,मातृहृदयी नानासाहेब गद्रे, करुणाकल्पतरु शां. कृ. वालावलकर ही भेटतील नि झिदानपण.तो तुमच्या कानात नव्या विचारांचा भुंगा सोडेल. तुमचा आयुष्यभर पिच्छा पुरवेल.तेच या लेखनातले चिरंतन चिंतन होय.जगातले अनुकरणीय आदर्श भारत उदयला साहाय्य करील.सामान्यांचं जगणं साध्या गाण्यातून -‘आज पहिली तारीख है' वाचलं की उमजेल.नवी तरुणाई वृद्धांनी समजून घ्यायला हवी.नवा काळ ‘बाय सेंटिनल मॅन' मधून तुम्हास कळेल.माणूस हे विकासाचे विचित्र रसायन आहे. जुन्या नव्याची कॉकटेल जीवनशैली -मिश्र जीवन व्यवहार त्याचं जीवन व्यामिश्र नि गुंतागुंतीचं करत आहे. हा चक्रव्यूह आहे.इथे आत जाता येते. परतीची वाट नाही.इथले अभिमन्यू संघर्षशील खरे पण पराभूत पराक्रमी! विकासात विवेक गमावणारा इथला माणूस त्यास ‘सब्र' मतिची गरज आहे.इथल्या श्रद्धा आता डोळस हव्यात नि प्रगल्भ, जबाबदारही! राजकारणी मतलबी व मतावलंबी असतात.ते समाजास जागे करण्याचे कर्तव्य मताधार घसरेल म्हणून कधीच करत नसतात. उलटपक्षी तीर्थक्षेत्र विकास, महाप्रसाद, महायज्ञ, कुंभमेळा, उरूस, जत्रांची भलावण करण्यात गुंतलेल्या राजकारण्यांना सामान्यांचे शिक्षण तुटत निघाल्याचा विशाद अपवाद असतो. म्हणून समाजास दुःख, दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धांचा निरास करणारे अगस्ती आज हवेत अशी जाणीव देणारी ही आरास, उत्सव-विवेक केल्याशिवाय इथला अस्वस्थ प्राजक्त फुलणार तरी कसा? कधी? असा प्रश्न आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे
अनुक्रम
* गुड मॉर्निग
१. सार्थकता/१५
२. चैतन्यरथातला बंडखोर आत्मा/१७
३. प्रस्तुत की अप्रस्तुत/१९
४. बिहारी सोशिकता२१
५. शहारणारे शहर/२३
६. मोलकरीण नव्हे ‘मोल' करी/२५
७. जाणीवांची आरसपाणी वर्तमानपत्रे/२७
८. घोडा आणि माणूस/२९
९. आज पहली तारीख है/३१
१०. कॉफी हाऊस/३३
११. साबरमती नहीं सब्र मति/३५
१२. वाचनवेडा राजाराम/३७
१३. तीन सार्वजनिक अण्णा/३९
१४. भाषा आणि व्यवहार/४१
१५. झाडू कामगार साहित्यिक/४३
१६. मलमपट्टी प्रशासन/४५
१७. आमचा काय गुन्हा?४७
१८. दुहेरी संवेदनेचे आव्हान/४९
१९. बंदीजन? नव्हे बंधुजन/५१
२०. आठवणींचे पाझर/५३
२१. गती, व्यस्तता की हव्यास व्यग्रता ?/५५
२२. सुरू जाहला लगबगीचा महिना/५७
२३. मोबाईलच्या करामती/५९
२४. फोटो आणि तारतम्य/६१
२५. एकविसाव्या शतकातील आचारसंहिता/६३
२६. अश्वत्थाम्याची वणवण/६५
२७. अस्वस्थ प्राजक्त नि नवा अगस्ती/६७
२८. शिक्षक : पेशा, व्यवसाय की धर्म?/६९
२९. झिदान झिंदाबाद?/७१
३०. अ.ब.क. /७३
३१. एका जंगलाची कथा/७५
३२. संस्था आणि माणूस/७७
३३. 'लोकमत समाचार'च्या निमित्ताने.../७९
३४. आकांक्षांचे हेलिकॉप्टर/८१
३५. उत्सव-विवेक/८३
३६. देते व्हा, देत रहा/८५
३७. मातृहृदयी नानासाहेब गद्रे/८७
३८. सेवा : सुरक्षा आणि शाश्वती/८९
३९. अंधारातला काजवा/९१
४०. महात्मा गांधींना अनावृत्त पत्र/९३
४१. माय टीचर गुटखा/९५
४२. 'अक्षरधारा' घरोघरी/९७
४३. लकी बझार/९९
४४. 'सेझ' नव्हे सेज/१०१
४५. बाललीला वर्णन/१०३
४६. मारीच आणि माणूस/१०५
४७. असंवाद/१०७
४८. वेदनेचे वेद झाले/१०९
४९. महाराष्ट्रीयांचा ‘अंतर्नाद'/१११
५०. देव, माणूस आणि आरसा/११३
५१. विकास की विस्तार ?/११५
५२. मराठी माती नि मन/११७
* अनुभव ५३. नवे वारे/१२१ ५४. नॅनोचं वादळ/१२३ ५५. राजकारणमुक्त गाव/१२६ ५६. मर्दानगी और कंडोम/१२९ ५७. सुमारांची सद्दी/१३१ ५८. दैन्य हटविणारा अगस्ती/१३३ ५९. पालकत्व/१३५ ६0. परीक्षांचा महापूर/१३७
* सगुण-निर्गुण ६१. सार्वजनिक सत्यधर्म/१४१ ६२. सर्वांभूति समानत्व/१४३ ६३. सात समंध मानेवर/१४५ ६४. माणूस/१४७ ६५. जगणं/१४९ ६६. स्वातंत्र्य/१५१ ६७. देणाऱ्याचे हात/१५३ ६८. भारतीय असणं/१५५ ६९. विवेकबुद्धी/१५७ ७०. विश्वबंधुत्व/१५९ ७१. कर के देखो.../१६१ ७२. लीन संप्रदाय/१६३ ७३. स्वर्ग हवा तर/१६५ ७४. संस्कृती, सभ्यता/१६७
* सुखद धक्का ७५. दिल्याने मिळत राहते.../१७१ * पूर्वप्रसिद्धी सुची/१७३
सार्थकता
काल अमेरिकेत स्थायिक असलेले माझे भारतीय मित्र डॉ. अनंत लाभसेटवार भेटले नि मला परत एकदा जगण्यातील सार्थकता नव्याने उमजली. नागपूरजवळच्या दारव्हा गावी त्यांचा गरीब कुटुंबात जन्म झाला. ते परिस्थितीशी झगडत इथे बी. एस्सी. झाले. एम. एस्सी. साठी त्यांची अमेरिकेला निवड झाली. अमेरिकेस जाताना विमानाच्या तिकिटाएवढे पैसे नसल्याने ते बोटीने अमेरिकेस गेले. बोटीने जातानाही पॅसेंजर बोटीऐवजी ते मालवाहू बोटीने गेले. कारण ती पॅसेंजर बोटीपेक्षा स्वस्त असायची. महिनाभरचा प्रवास. वर डेकवर अमेरिकन पाव-लोणी खायचे. त्यांना तळघरात इटलीच्या उकड्या तांदळाचा भात व सूप मिळायचं. अमेरिकेत जाऊन त्यांनी श्रमाची अनेक कामे केली व बोटीच्या प्रवासासाठी वडिलांनी काढलेले कर्ज फेडलं. अपार अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळविली. एम.एस्सी.तर झालेच पण पुढे पी.एचडी. ही!
असा हा माणूस आज अमेरिकेत स्वतःची बँक असणारा पहिला भारतीय झाला. त्यानं रेडिओ स्टेशन खरेदी केलं. मॉल्स् (मोठी दुकानं) खरेदी केली. त्यांच्या घराचं आवारच मुळी पाच एकराचं. ही जमीन कमी पडली म्हणून की काय त्यांनी अमेरिकेत एक हजार एकर (हो! एक हजार एकर!) जमीन खरेदी केली. एक दिवस मनात आलं नि सारं विकून त्यांनी एक ट्रस्ट केला नि त्यातून ते दरवर्षी भारतातील लोकसंख्या नियंत्रणासाठी कार्य करणाच्या व्यक्ती व संस्थांना एक लाखाचा पुरस्कार देतात. मराठी भाषेवरचं प्रेम म्हणून श्रेष्ठ मराठी साहित्यिकास एक लाखाचा पुरस्कार देतात. प्रतिवर्षी महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक
उपक्रमांना लाखो रुपयांची मदत करतात.
मला त्यांच्याकडे पाहिलं की लक्षात येतं की माणसांचं जगणं स्वतःसाठी
असतं, तसंच ते समाजासाठीही असायला हवं. तरुणपणात स्वतःसाठी
जगण्याचा कैफ अंमळ असतो. ज्यांना भर जवानीत जगण्याची जिद्द
गवसते ती माणसे काही करून दाखवू शकतात. काही करून दाखवण्याची
उर्मी माणसात येते, ती जीवनाच्या अडचणी नि संघर्षातून. जगण्याचा कैफ
उतरल्यानंतर तरी समाजासाठी नको का काही करायला? आपण एक
लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे मिळवतो त्यात समाजाचाही वाटा
असतो. केवळ व्यक्तिगत श्रमातून फार कमी हाती येतं. म्हणून जे हाताला
लागतं ते भरभरून देण्यातील सार्थकता माणसाने अनुभवायला हवी.
सार्थकतेचा अर्थ सांगणारी डॉ. लाभेटवारांसारखी माणसं भेटली की मला
'ज्वाला आणि फुले' मधील बाबा आमटेंच्या या ओळी आठवतात-
'यातनाहीनांना स्वप्ने नसतात
आणि जो थोडे सहन करतो
तो थोडेफार करू शकतो
जो खूप सहन करील
त्याला पुष्कळ काही करून दाखवता येईल.'
◼◼
कवी विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याचं ऐकलं नि विंदांच्या अनेक आठवणी, ओळींनी एकच कल्लोळ उडवून दिला. काही वर्षांपूर्वी विंदा कोल्हापुरी आले होते. निमित्त होतं महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार वितरणाचं. त्यांना सव्वा दोन लक्ष रुपयांची मिळालेली रक्कम समारंभातच त्यांनी कुटुंब नियोजन कार्यास देऊन टाकली. असंच त्यांनी कबीर पुरस्काराच्या वेळीही केल्याचं आठवतं. लाखो रुपयांच्या पुरस्काराची रक्कम समारंभात दान करून समारंभानंतर पायी चालत जाणारे विंदा. वाटेत चपलेचा अंगठा तुटला नि त्यावेळी ते रुपयासही महाग होते. हे ऐकून कुणास खरं नाही वाटणार!
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार स्वीकारला त्यावेळी मी त्यांना बालकल्याण संकुलात घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मुलांच्या फर्माईशीनुसार आपल्या कितीतरी बालकविता ऐकवल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलांशी केलेलं हितगुज माझ्या कानी आजही घुमतं आहे. ते म्हणाले होते, ‘मुलांनो, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हास वार लावून शिकायची नामुष्की नाही. इथे तुम्हाला सन्मानानं जेवू, खाऊ घातलं जातं. या कोल्हापुरात मी वार लावून शिकलो. वार लावून देणारे उदार होते. पण तसंच जेवणं मनाला टोचत राहायचं.' असंच एकदा कवी नारायण सुर्वेही संकुलात आले होते. 'मी बाळगलेला पोर होतो. तुमचा इथं सांभाळ, संगोपन होतं हे पाहून बरं वाटतं.' म्हणत सुर्वे गदगदून गेलेले आठवतात.
कवी पुरस्कृत होतो तेव्हा त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो, पण त्याचं रोजचं जीवन मोठे आव्हानांचं असतं. कधीकधी कस्पटाची क्षुद्रता
त्याच्या पदरी येते. ‘तेच ते' चा कंटाळा रोजचा. रोज मनास दगड बनवण्याचीच समजूत घालणारे विंदा. त्यांच्या लेखी ‘साम्यवेद' हा पंचम वेद असतो. सावल्यांचा माग काढत जाणारे विंदा उपासक होतात ते त्यांच्यातील जाज्वल्य मूल्यनिष्ठेमुळे. भूत नि भविष्य एकाचवेळी थरारत जगणारा हा कवी.त्याची जातकुळीच वेगळी! त्यांच्या निर्जीव मनात सृजनशील बीजे अंकुरतातच कशी याचं आश्चर्य वाटावं असा सारा आसमंत, पण तो असतो चैतन्यरथातला बंडखोर आत्मा. '
वेदनेला अर्थ दे रे' म्हणून प्रार्थना करणारा हा कवी. तो सुखाच्या धुक्यात कधी वाट हरवत नाही की दुःखाचा गहिवर कधी त्यास आक्रस्ताळा करत नाही, हेच त्याचं मोठेपण. त्याच्या प्रत्येक शब्दांना मृद्गंध असतो. प्रत्येक ओळीत आग वाहात असते. त्याच्या अर्थात समाजाचे सारे ताणतणाव आपसूक भरलेले असतात. खादीचा कुर्ता, पायजमा घालणारा हा कवी आतून-बाहेरून एक असतो. हेच त्याचं खरं महात्म्य! शब्दांचं सोनं होवो अथवा माती, त्यानं धृपद लिहिण्याचा छंद टाकला नाही. म्हणून ज्ञानपीठ त्यांचा गौरव करते, हे समजून घ्यायला हवं. या क्षणी त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्याच ओळीत तुम्हास सांगावं वाटतं -
‘जागृतांनो फेका। प्राणांच्या अक्षता।
ऐसा योग आता| पुन्हा नाही।।'
प्रस्तुत की अप्रस्तुत
मराठी भाषेत काही शब्द असे आहेत की सामान्य माणसास ते सहजासहजी समजत नसतात. अशांपैकी एक आहे ‘प्रस्तुतता'. सोप्या भाषेत जे सांगता येतं त्याऐवजी साहित्य, समीक्षा प्रांतातील विद्वत मंडळी कठीण शब्द का वापरतात हे एक न उलगडणारे कोडे आहे. प्रस्तुतता' या शब्दास हिंदीत मात्र सुलभ शब्द आहेत - प्रासंगिकता, सरोकार आदी. हे सगळं आठवायची अनेक कारणं या आठवड्यात घडली. शिवाजी विद्यापीठात 'एकविसावे शतक व खांडेकरी साहित्याची प्रस्तुतता' विषयावर परिसंवाद झाला. तिथे आजच्या काळात खांडेकर साहित्य कितपत लागू आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला. तिकडे पुण्यात मराठी साहित्यिक अनिल अवचट यांना ‘डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान' पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी जागतिकीकरणाच्या प्रस्तुततेविषयी डॉ. अनिल अवचट व डॉ. वसंत गोवारीकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली.
व्यक्ती, विचार व व्यवहाराची चर्चा खरं तर त्या-त्या काळाची परिस्थिती, गरज, आवाहने यांच्या संदर्भात व्हायला हवी. भाषेच्या अलंकारिक पोताचे आकर्षण स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसात होतं. कारण इंग्रजी आमदानीच्या काळात इंग्रजीपेक्षा भारतीयास स्वभाषेची अनिवार ओढ असायची. तो काळ सुधारणेचा होता. ध्येय, ध्यास, आदर्श त्या काळाची गरज होती. वि. स. खांडेकरांच्या साहित्यात ती शक्ती होती. त्याची मोहिनी त्या पिढीस पडणे यात गैर काहीच नव्हते. म्हणून काही आज खांडेकर एकदम कालबाह्य ठरत नाहीत. त्यांचे साहित्य सदैव प्रस्तुतच राहणार. कारण त्यात वैश्विकता, मानवतावाद, आदर्श आशावाद, समता, बंधुतासारखी कालातीत मूल्यं आहेत.
आज जागतिकीकरणात सामान्य मनुष्य भरडला जात आहे. म्हणून ते थोपवलं पाहिजे असे म्हणणारे साहित्यिक डॉ. अनिल अवचट व जागतिकीकरण ही काळाची गरज आहे म्हणणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर या दोहोंच्या विधानात प्रस्तुतता असली तरी एकात भाबडा मानवतावाद आहे तर दुस-यात देशाच्या प्रगतीचं भविष्यलक्ष्यी स्वप्न नि महत्त्वाकांक्षा आहे.
आज आपला भारत देश जागतिक महासत्ता होतो आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आर्थिक प्रगतीचा दर स्थिर राहावा म्हणून कोण मेहनत घेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हिंदी शिका म्हणतात. कारण अमेरिकेचं भारतावरचं परावलंबन वाढत आहे. सर्वांमागील प्रस्तुतता शोधून आपण आपले विचार व व्यवहार ठरविले पाहिजेत. भारत कायाकल्पाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताचं बदलतं चित्र पाहन स्टीफन स्वाईगचं आत्मचरित्र ‘द वर्ल्ड ऑफ येस्टर डे' आठवतं. त्यात ही कायाकल्पाचं अपूप आहे. तो म्हणतो -
"My Today and each of my yesterdays, my rise and falls are so divers that I sometimes feel as if I lived not one but several existences, each one different from the other." एका शैक्षणिक कामाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात बिहारला गेलो होतो. बिहार पाहायची इच्छा अनेक दिवसांची होती. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील दरभंगा जिल्ह्यामध्ये भूकंप निवारणाचे कार्य केले होते. यावेळी त्यांनी जमलेल्या निधीच्या पै-पै चा हिशेब समाजापुढे ठेवून सामाजिक जबाबदारीचा वस्तुपाठ समोर ठेवला होता. येथील चंपारण्यात महात्मा गांधींचा आश्रम आहे. सत्याग्रहाचे मूळ प्रयोग या प्रदेशांनी जवळून अनुभवले आहेत. नंतर आचार्य विनोबा भावेंनी येथे ग्रामदानाचे मोठे कार्य केले. आजही बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात ग्रामदान कार्यालये दिसतात. आणीबाणीच्या विरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी समाजक्रांतीचा संदेश दिला तो जयप्रकाश आश्रम आज पाटण्यात प्रेरणा देत राहतो. इथे लोक अजूनही खादी घालतात. महात्मा गांधींच्या साधेपणाच्या मोहातून सामान्य बिहारी जनता अद्याप मुक्त न झाल्याच्या खुणा येथील शिक्षक, प्राध्यापकांशी बोलताना लक्षात येत होत्या.
गौरवशाली परंपरा लाभलेल्या या राज्याची वाताहत झाल्याचे मला सर्वत्र दिसून येत होते. मधेपूरसारख्या गावानं १९९० पासून वीज पाहिलेली नाही. सर्वत्र केबलसारखी जनरेटरद्वारे मासिक ७0 रुपये भाड्याने एका ४० कॅडल बल्बसाठी रोज सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत वीज पुरवली जाते. गावोगावी अजून हातपंपच चालतात. इथे रस्त्याची दुरवस्था इतकी आहे की प्रवासाचं अंतर किलोमीटरनं न मोजता ते वेळेत मोजलं जातं. वीस किलोमीटरला इथं सहज एक तास लागतोच लागतो. कॉलेजीस आहेत, पण शिक्षकभरती नाही. सहा महिने पगार नाही, तर खर्चाचं अनुदान नसल्यानं सायन्समध्ये प्रैक्टिकल्स होत नाहीत. पदवी वर्गात दोन-तीन, फार तर पाच विद्यार्थी, प्राथमिक शाळांची दुरवस्था विचारायलाच नको. गेल्या वीस वर्षांत बिहार ५० वर्षे मागे गेल्याची भावना सर्वत्र आहे. पण बिहारी जनता अज्ञानी असल्यानं मोठी सोशिक आहे. इतिहासात रमणं, तक्रारींचे सूर आळवत आयुष्य काढणे इथला स्थायिभाव आहे. गतिमानाची गोष्ट फक्त पाटण्यातच.
एकेकाळी विचारांची बैठक लाभलेला बिहार आज भारतीय प्रशासन व्यवस्थेत मोठी कामगिरी करताना दिसतो. सामान्य बिहारी आजही कुशाग्रबुद्धीचा असल्याचं लक्षात येतं. असं असताना ही दुरवस्था का? याचा विचार करता लक्षात येतं की, येथे जमीनदार व मजूर यांच्यातील अंतर इतकं आहे की, सोसण्याशिवाय बिहारी जनता काहीच करू शकत नाही, अशी अगतिकता येथील राजकीय इतिहासांनी निर्माण केली आहे. आज प्रजासत्ताकदिनी हे वास्तव मला अधिक अस्वस्थ करते. तुम्हास?
***
काही शहरं माणसाच्या मनात घर करून बसलेली असतात. कलकत्त्यानं असं घर केल्याला किती वर्षे उलटून गेली, पण गेल्या महिन्यात हे शहर पाहण्याचा (खरं तर अनुभवण्याचा!) योग आला. इथल्या बेलूर मठातील रामकृष्ण परमहंस नि स्वामी विवेकानंदांचं वस्तुसंग्रहालय पाहिलं नि माझा वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय उभारणीचा सारा गर्व क्षणात जमीनदोस्त झाला. मी कलकत्त्यात होतो त्या काळात २३ जानेवारीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती. त्यांच्या जन्मघरी झालेला सोहळा मी पाहिला. एका समारंभाला किती मोठी माणसं यावी याला सुमार नव्हता. फिल्म दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेता सचिन खेडेकर (नेताजी फेम), सुभाषचद्रांचे नातेवाईक, महात्मा गांधी नि राजाजींचे नातू राज्यपाल गोपालकृष्ण गांधी-किती नावं सांगावीत? माणूस कलकत्त्याला जातो नि मदर तेरेसांचं ‘निर्मल हृदय' पाहात नाही असं कसं होईल? तिथं वसईची नन भेटते. मातीचं नातं जडतं नि मदर तेरेसांची राहती खोली, वेळ संपलेली असली तरी पाहता येते. तीच गोष्ट जगदीशचंद्र बोसांच्या घराची नि रवींद्रनाथांच्याही! शिक्षक असल्याचे फायदे असतात. त्यामुळे अडचणींच्या गुहा क्षणात खुलतात नि तुमच्यापुढे मग उभी राहतात साहित्य, संस्कृती, संगीत, कलेची शत शत महाद्वारं!
२४ जानेवारी २00६ हा कलकत्त्यातील दीडशे वर्षांनी उगवलेला ‘सुवर्णदिन' होता. कलकत्ता विद्यापीठाला या दिवशी १५0 वर्षे पूर्ण झाली. पूर्वसंध्येस मी विद्यापीठात फेरफटका मारला. विद्यापीठानं आपल्या माजी विद्यार्थ्यांचे फोटो अभिमानाने परिसरात त्या दिवशी प्ले कार्डसवर
लावले होते. डॉ. सी. व्ही. रामन, डॉ. मेघनाथ साहा, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी असे अनेक दिग्गज अन् हो अमर्त्य सेनही! अमर्त्य सेन यांच्यावरून आठवलं. कलकत्ता विद्यापीठ ज्या रस्त्यावर उभं आहे तो कॉलेज रॉ (रोड). पुस्तकांच्या शेकडो दुकानांनी दुतर्फा घेरलेला. छोटी-छोटी खोकी असलेली ही दुकानं. इथं नवी-जुनी पुस्तकं अत्यंत स्वस्त दरात मिळतात. रस्ता रुंदीसाठी कलकत्ता नगरपरिषदेनं ही दुकानं हटवायचा निर्णय घेतला होता. तेव्हा कलकत्त्याचे सगळे वाचक एकजुटीनी त्या विरोधात रस्त्यावर आले. तरी सरकार बधेना. अमर्त्य सेनांना हे कळलं. त्यांनी ज्योती बसूना पत्र लिहिलं नि कळवलं माझ्या नोबेलचं श्रेय या दुकानांना आहे. मग खोक्यांना जीवनदान मिळालं.
कलकत्ता विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव दिनी एका कॉलेजात मी प्रमुख पाहुणा होतो.ध्वजवंदनानंतर त्यादिवशी बरोबर साडेदहा वाजता सगळ्या महाविद्यालयात ‘विद्यापीठ गीत’ पहिल्यांदा सीडीवर वाजवलं गेलं.ते रवींद्रनाथांनी खास आपल्या विद्यापीठासाठी तत्कालीन कुलगुरुंच्या आग्रहावरून लिहिलं होतं. काल जन्मलेल्या सोलापूर विद्यापीठाचंही गीत आहे.आपल्या शिवाजी विद्यापीठाचं असं लिहून घेतलेलं पण अद्याप गायलं न गेलेलं गीत उगीचच त्यावेळी आठवलं नि मी एक वेगळा शहार अनुभवला.
***
माझ्या घरात मोलकरीण आहे. शोभा तिचे नाव. रूढ अर्थाने ती अशिक्षित, अल्पशिक्षित खरी; पण तिचं सुजाणपण, तिची समज मला नेहमीच एकीकडे अस्वस्थ करणारी, तर दुसरीकडे आश्वस्त करणारी वाटत राहते. माझी पत्नी उच्चशिक्षित नसली तरी रूढ अर्थाने सुशिक्षित आहे. एस.एन.डी.टी.ची इंटर झालेली. सुना तर सुशिक्षितच म्हणायला हव्यात. एक एम.ए. (अर्थशास्त्र), तर दुसरी साक्षात एम. कॉम. म्हणजे दोन्ही अर्थशास्त्र प्रवीण! मुलंही एम. कॉम., बी.ई. झालेली आहेत.
मी शिकल्यामुळे नि शिकत असल्याने रोज माझ्या घरी वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं नि माणसंही येत राहतात. हे सारं शोभा वाचत राहते. ती घरचा केरवारा करते, तेव्हा घरातील तमाम सुशिक्षितांनी वाचलेली वर्तमानपत्रं घड्या घालून ठेवते. वर्तमानपत्रातील मुलांच्या पुरवण्या बाजूला करते. विचारते,‘दादा,हे घेऊन जाऊ का?मुलाला वाचायला.पोराला वाचायचा लऽय नाद हाय बघा.' मी एकदा सांगूनच टाकलं,“तुला या घरातलं जे वाचावंसं वाटेल ते घेऊन जात जा.' मुलांच्या पुरवण्या वाचत शोभाचा मुलगा मोठा झाला तशी शोभाही.
माझ्या घरी छोटीशी अभ्यासिका आहे. चारी बाजूंनी छतापर्यंत टेकलेल्या कपाटात पुस्तकं कोंबून कोंबून भरलेली आहेत. कधी एखादा रूढ अर्थानी शिक्षित पाहुणा/पाहुणी या अभ्यासिकेत पहुडतात. घरातील आमची सारी सुशिक्षित मंडळीही इथं नित्य ये-जा करत असतात. कोणीही या पुस्तकांना कधी हातसुद्धा लावत नाहीत. लावते ती शोभा. वर्षातून दोनदा घरातील ही पुस्तकं स्वच्छ करून लावायचं कामही तीच करते नि तेही स्वतःहून.
माझी बायको दर महिन्याला घरातील घासलेली चकचकीत भांडीच परत चकचकीत करत राहते; पण तिला पुस्तकं अशी करावी, स्पर्शावी असं वाटत नाही. घरातील अन्य सुशिक्षितांनाही असं वाटत नाही.
शोभा अशिक्षित; पण मोलकरीण संघटनेच्या मोर्चात जाते. एकटीच जात नाही. कळंब्यातील साऱ्या मोलकरणी गोळा करून जाते. माझ्या घरातील तिचा वावर मला नेहमीच शालीन, सुसंस्कृत नि सुजाण वाटत राहतो,तो तिच्या छोट्या-छोट्या समजदार कृती नि कर्तृत्वामुळे. तिनं आपली भाची आपणाकडे शिक्षणासाठी आणली. माझ्याकडून तिच्यासाठी मदत, मार्गदर्शन घेत राहिली. आता ती शिकून ग्रामसेविका म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. 'मोलकरीण' हा शब्द कसा आला मला माहीत नाही; पण त्या शब्दातील ‘मोल' मला समजवलं शोभानी. कधी-कधी छोटी माणसं मोठी शिकवण देत राहतात. मोलकरीण अशी ‘मोल'करी असते याचं भान बऱ्या सुशिक्षित घरातून मला अपवादानं दिसतं.
एकविसावं शतक हे नव्या अर्थानी श्रमकऱ्यांचं असणार आहे. माणसांची यंत्रावरची परावलंबिता जसजशी वाढत जाईल, तसं श्रमाचं काम करणाऱ्यांचं मोल वाढत जाणार आहे. घरोघरी मोलकरणींवरचं आपलं विसंबून राहणं वाढत आहे. तिच्या कलानी घेण्याची, तिच्याशी जुळवून घेण्याची घरातील स्त्रियांची प्रवृत्ती वाढते आहे. मोलकरणीला आता 'ए' ऐवजी 'अहो' म्हटलं जातंय. या सर्वांमागे खालच्या वर्गाची वाढती सभ्यता व वरच्या वर्गाचा वाढता उद्दामपणा तर कारण नसेल ना, असं मला मोलकरणीच्या ‘मोलकरी होण्यातून वाटत राहतं.
***
माझ्या घडणीत ज्या अनेक गोष्टींचा वाटा आहे, त्यात वृत्तपत्रांना अढळ स्थान द्यावं लागेल. आपली ही तशीच भावना असेल. एखाद्या वडा-भजीच्या गाडीजवळून जाताना जसा खमंग वास आपणाला भुरळ घालतो तशी वृत्तपत्रं मला भुरळ घालतात. सकाळचा पहिला चहा नि करकरीत वर्तमानपत्र हे समीकरण तर सर्वांचच. पण मला ताज्या पेपरचा वासही येतो, माझ्या एका मित्राला तर वर्तमानपत्र वास घेत वाचायची सवयच आहे मुळी. पेपर स्टॉल्स मला नेहमी एखाद्या जीवलगासारखे वाटत आलेत. काही खादाड माणसं मिठाईच्या दुकानात सर्व पदार्थांची मिटक्या मारत खरेदी करतात. तशी मी वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं खरेदी करत असतो पेपर नि बुकस्टॉलवर.
प्रवास नि वर्तमानपत्राचं माझंं अद्वैत तर जुनंच! पेपरशिवाय प्रवास म्हणजे माणसांशिवाय राहणं. पेपर्सची चवड नि चुरमुरे-शेंगदाण्याचा फराळ ही प्रवासातील स्वर्गसुखाची खूणगाठच. ज्या एस.टी.स्टॅडवर पेपर स्टॉल नसतात ती गावं मला पेडगाव वाटतात. प्रवासात शेजारी बोलणारा अन् वाचणारा भेटला की प्रवास सुखकर होतो. खरं अलीकडे एक्स्प्रेस हायवे झाल्यापासून मला प्रवासात मासिकं, पुस्तकं आवश्यक वाटू लागलीत.
प्रवासावरून आठवलं, रेल्वेच्या प्रवासात जंक्शन आलं की मी पहिल्यांदा व्हिलर्स स्टॉल शोधतो. त्यात मग गुलशन नंदा, कर्नल रंजीत, जेम्स हेडली चॉईस भेटले की अनेक दिवसांचे प्रवास क्षणाचे होऊन जातात. रेल्वेच्या प्रवासात दीर्घ वाचनाचं जे सुख आहे ते घोस्ट रिडींगला लाजवणारं असतं. त्यात राजधानी, इंटरसिटीचा प्रवास असेल तर क्या कहने?
अलीकडे मी अनेकदा विमानातून प्रवास करतो. एअर पोर्टवर 'चेक इन' झाल्यावर बोर्डिंग पास घेताना मी स्वागतिकेला आवर्जून ‘रिअर साईड विंडो'(मागील बाजूची खिडकी) या जागेचा मोठा फायदा असतो.तिथं डोक्यावरच्या शेल्फवर विमानातली सर्व वर्तमानपत्रं, मासिके ठेवलेली असतात. एअर होस्टेसला एकदा सांगून मनमुराद सारी वर्तमानपत्रं,मासिक वाचता येतात. विमानातल्या शिष्ट,अबोल, गंभीर प्रवाशांकडे ढुंकून न बघता खालची गावं, दिवे न्याहाळत प्रवास कसा मस्त होऊन जातो.सोबत वारंवार येणारी कॉफी, ज्यूस, स्नॅक्स नि लंचमुळे तर पैसे फिटून जातात- (नि एअर होस्टेसमुळे डोळ्याचे पारणेही!)
रोजचा माझा दिवस वर्तमानपत्रांनी उगवतो नि मावळतोही! वेळेप्रमाणे मात्र, वर्तमानपत्रंही वेगवेगळी मिळण्याची अट असते. मुंबईत असेल तर ‘मिड डे' लागतो. पुण्यात असेल तर ‘संध्यानंद' हवा. विदेशातील प्रवासाने मला हॉटेल्स निवडण्यात पारंगतच करून टाकलंय. काही हॉटेल्स चक्क ‘गुड मॉर्निंग' असा शिक्का मारून ‘बेड टी' बरोबर ‘बेड पेपर' ही देतात. अशा हॉटेल्सशी माझी मैत्री आता जुनी झालीय. वर्तमानपत्रं नुसती वर्तमान सांगत नसतात. ती रोज भविष्य घडवितात. माणसं घडवितात असं मला वाटतं. ती तुम्हास वैचारिक लेख देऊन गंभीर करतात. तशी 'जाहीर नोटीस' म्हणून दिलेल्या मजकुरातून माणसांचे कंगोरेही समजतात. वर्तमानपत्र तुमची अनेक प्रकारची, जाण, समज, विकसित करतं. फक्त ती समज, जाणीव तुमच्यात सुप्त असावी लागते. जाणीवांची आरास घेऊन येणारी वर्तमानपत्रं माणसात संवेदनांची कारंजी,भावभावनांचे वसंत घेऊन येतात,तेव्हा मला आकाश ठेंगणे होते.
***
“काय रामूतात्या, उनाला बसल्यासा?' 'व्हय, आताशा पेनशिलीवर हाय! बक्कळ वकुतच वकुत!!' असा गावचावडीवरचा संवाद मी ऐकला नि नजर फिरवली. लक्षात आलं, रामूतात्यांना पेन्शन मिळाल्यामुळे स्वारी कशी निवांत होती. पायाला भिंगरी लावून गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दवंडी सादवणारे रामूतात्या लहानपणापासूनच माझ्या जिज्ञासेचा विषय होते. कधीकाळी झुपकेदार फेटा बांधून तरा-तरा चालणारे ताणातले रामूतात्या आज अंमल थकलेले! पेन्शन तर कसली? राजा उदार झाला नि भोपळा दान दिला, पण त्यावरही स्वारी मोगॅबोपेक्षा खूश असायची.
सन १९७० ला पिंपळगावसारख्या छोट्या खेड्यातील पंचायतीतून निवृत्त झालेला हा वृद्ध कुठे नि आज शहरातून सकाळ-संध्याकाळ फिरणारे वृद्धांचे तांडे कुठे? आजचे ज्येष्ठ नागरिक भाग्यवान खरेच! बक्कळ पेन्शन, वाढता महागाई भत्ता, प्रवास सवलत, बँक व्याजदरात एक टक्का अधिक, शिवाय वरिष्ठ विमा योजना, आरोग्य सुविधा एक ना दोन सवलती. शहरातले नोकरदार वृद्ध कुठे नि खेड्यातील निवृत्त शेतमजूर कुठे? नाही म्हणायला मरणाऱ्या मजुराला पंतप्रधान योजनेचा काय तो काडीचा आधार आहे म्हणायचा.
हे कमी म्हणून स्वेच्छानिवृत्त झालेल्यांचे तरुण थवे मी जेव्हा निष्क्रियपणे रस्त्यावरून इकडे तिकडे फिरताना पाहतो तेव्हा मला तीन भावांची स्वेच्छानिवृत्ती घेऊन बांधलेली टोलेजंग हवेली उगीचच आठवत राहते. परवा मी ती पाहिली नि लक्षात आलं की खरंच हा ‘गोल्डन् शेक हँड'आहे. त्याला खरं तर 'मिडास स्कीम' का म्हटलं नाही याचं आश्चर्य वाटतं.
हा पण फिका वाटावं असा अनुभव मला परवा आला. असेच स्वेच्छानिवृत्त एक प्राध्यापक मला परवा बँकेत भेटले. माझ्याकडे पेन नव्हतं. म्हणून त्याच्याकडून सहीपुरतं पेन घेतलेलं. स्वारी समोरची काही हलेना. मी पेन परत दिला तेव्हा कुठे स्वारीचा जीव भांड्यात पडला. म्हणाले, 'अहो सिल्व्हर पेन आहे. व्हीआरएसमधून घेतलाय' पेनशिलीवर असलेले रामूतात्या कुठे नि हे ‘पेन सिल्व्हर प्राध्यापक' कुठे.यावरून मला आठवले आमच्या संस्थेतील आयुष्यभर अनाथांची शुश्रुषा करून रिकाम्या हातांनी निवृत्त झालेले जाधवमामा. पदरात तीन मुली घेऊन निवृत्त झालेले जाधवमामा पेन्शनसाठी खेटे घालत मरून गेले, पण पेन्शन काही मिळाली नाही.
असं आपल्याकडे का? एकाला पेन्शन नाही, एकाला अपुरी, एकाला गरजेपेक्षा अधिक, तर एकाला छप्पर फाडके! पेन्शन असलीच पाहिजे, पण ती सर्वांना ज्याच्या त्याच्या गरजा भागवणारी नको का? मी ऑस्ट्रियात असताना मला एक व्हिक्टोरियावाला (टांगेवाला) भेटला होता. तिथे सहा महिने बर्फ पडतो तेव्हा व्हिक्टोरिया बंद पडते. तेथील सरकार हिवाळ्यात व्हिक्टोरियावाल्यांना दोन पेन्शन देते. एक घोड्यासाठी तर दुसरी व्हिक्टोरियावाल्यांसाठी. तेथील सरकार असा विचार करते की, घोडा जगला तर माणूस जगणार. आपण माणूस जगवणारी तरी पेन्शन नको का द्यायला? शेतमजूर, खासगी नोकरदार यांचे वाली कोण? संघटितांनी संघटितपणे सर्व सिस्टीमॅटिक मिळवायचं नि असंघटित म्हणून अन्य नागरिकांनी लाजिरवाणं जगायचं हा कुठला न्याय? एकविसाव्या शतकात जात, पात, संघटन इत्यादी पलीकडे जाऊन सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर साधनांची वाटणी नको का व्हायला?
***
आज तरुणाई जशी रेडिओ मिरचीवर फिदा असते तशी आमची तरुणाई त्या काळात रेडिओ सिलोन, विविध भारतीवर असायची. त्या वेळी या स्टेशन्सवर एक तारखेला एक गाणं हमखास लागायचं... खुश है जमाना आज पहली तारीख है'. किशोरकुमारनी गायलेलं हे उत्साही गाणं लागलं की तमाम नोकरदार वर्गाच्या कळ्या फुलून यायच्या. मी मिळवत नव्हतो तेव्हा या गाण्याचा ताल मला विलक्षण भावायचा. जेव्हा मी मिळवू लागलो तेव्हा या गाण्यातील महिन्याच्या विरहानंतर दिसणाऱ्या पैशाच्या आशेने मीही हरकून जाऊ लागलो.
या एक तारखेचं नि नोकरदारांचं जवळचं नातं असतं, पण त्यासाठी तुम्ही मध्यमवर्गीय, मजूर, नोकर असण्याची पूर्वअट असते मुळी. पूर्वी नोकरदारांचे पगार मालकाच्या लहरीवर व्हायचे. एक तारखेच्या पगाराची दिवाळी अनुभवावी सरकारी नोकरांनीच. एक तारखेला रविवार आला तर यांची दिवाळी व्हायची ३० तारखेलाच. केवळ एवढ्याच एका कारणासाठी अनेक वधू पित्यांनी आपल्या मुली सरकारी नोकरांना दिल्या. त्यामुळे नियमितपणे अनियमित तारखेस पगार होणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकांना सरकारी नोकरांबद्दल कायमचा हेवा वाटत राहायचा.
आमचा पगार तर ‘लांडगा आला रे आला' म्हणत आठवडाभर आवईवरच असायचा. बातमी यायची. आज पगार होणार. मग कळायचं संस्थाचालकांची चेकवर सही झाली. मग एक दिवस कळायचं की पैसे आणलेत, पण पाकिटं करायची राहिलीत. पाकिटं झालेल्या दिवशी हमखास हेडमास्तर कुठल्यातरी वर्दीवर गेलेले असायचे. अशा लांडग्याप्रमाणे हुलकावणी देणाऱ्या पगारामुळे एक तारखेला पगार मिळणारे मला भाग्यवान वाटायचे.
ज्या पामरांना असा एक तारखेला पगार नशीब नसायचा असे कितीतरी चाकरमाने, मजूर रोजच्या पगारासाठी टाचा घासायचे. एकदा मी मंत्रालयात कामासाठी गेलो असता तिथल्या कॅटिनच्या कामगारांनी आपल्या गांधी टोप्यांवर चक्क मालकाविरुद्ध जिहाद पुकारत घोषणाच लिहिली होती ‘काम कराके लेता है, पैसा नहीं देता है।' त्यादिवशी गल्ल्यावर नेहमीचा मालक नव्हता हे वेगळे सांगायला नको.
जेव्हा नोकरदारांना त्यांच्या गरजेच्या मानाने पगार कमी होते त्या वेळी किशोरकुमारांचं हे गाणं नुसतं ऐकलं तरी खिशात पैसे खुळखुळल्याचा भास व्हायचा. आजची एक तारीख मात्र तितकी आकर्षक राहिली नाही. पूर्वी वाण्याचे पैसे जाऊनही चार आणे कनवटीला राहायचे. आज पगार येण्याआधीच बँका, पतसंस्था, क्रेडिट सोसायट्या, भिशा काढून घेत असल्याने किशोरकुमारांच्या गाण्यातील ती जुनी रंगत काही येत नाही खरी. शेवटच्या आठवड्यात घरची सारी रद्दी गोळा करून ज्यांनी रविवारची लाल भाजी, पाहुण्यांसाठी शिकरणाची केळी (श्रीखंड नव्हे), मुलांसाठी वरकी आणली असेल त्यांनाच एक तारखेची खुशी कळणार. ज्यांच्या कॅलेंडरवर रोजच एक तारीख असते त्यांना किशोरकुमारांच्या या गाण्यातील आनंद कसा कळणार?
◼ ◼
मध्यंतरी मला छोट्या-छोट्या तीन ओळींच्या जपानी काव्यप्रकार ‘हायकू'नी वेड लावलं होतं. शांता शेळके या मराठी कवयित्रींनी अशा सुंदर हायकू लिहिण्याचं ऐकल्यावरून शोधून वाचल्या होत्या. त्यापैकी खालील हायकू मला समजलं नव्हतं.
‘कॉफी हाऊस,
प्रत्येक टेबलावर,
नवा पाऊस.'
अन् परवा अचानक ते उमगलं. मी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका बैठकीसाठी म्हणून अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात गेलो होतो. बैठक सुरू होण्यास वेळ होता म्हणून विद्यापीठ पाहात चौकात आलो. तर तिथल्या 'कॉफी डे' या कॅफेकडे माझं लक्ष वेधलं, ते तिथल्या तरुण तितली नि फुलपाखरांनी ! प्रत्येक टेबलावर तरुण कबुतरं गुटरगू करत होती. तिथल्या सगळ्या तड़क-भड़क इंद्रधनुष्यात या पांढऱ्या कबुतरानं कोपऱ्यातलं बिनपावसाचं टेबल पकडलं नि कॉफी हाऊसच्या आतला नि बाहेरचा ऊन-पाऊस मनमुराद कॉफीचे घुटके घेत पाहणं पसंत केलं. इथलं मेनूकार्डही मोठं रोमँटिक, त्याचं नावच होतं 'मेल्टिंग मोमेंट्स' (विरघळणारे क्षण!) इथल्या कॉफीच्या खुमारी नि वाफेत जो विरघळून जाणार नाही तो विरळा! हे नुसतं कॉफी हाऊस नव्हतं. ते 'गिफ्ट शॉप'ही होतं. लैला-मजनू इथं टीशर्ट, कॅप, जीन्स, टॉप, फिलिंग्ज कार्डस, परफ्यूम्स, मग, किटली, पेन, सॅग्ज, सीडीज खरेदी करून एकमेकांस भेट देत होती नि सात क्षणांच्या (जन्मांच्या नव्हे!) जिंदगीवर जान देत होती.
प्रत्येक टेबलवर नवा पाऊस ओथंबत होता. - 'ओ, डॅनी आय मिस यू लाँग टाईम...', ‘हाय रिना, यू लुक्स लाईक मल्लिका ऑफ माय ड्रीम्स', 'हॅलो शकुन, नारिता हियर यार, कबसे वेट कर रहीं हैं...' कॉफी तो हॉट मँगायी थी, इंतजार करते-करते ठंडी हो गई डार्लिंग, अस्सी से आना... हाँ सिग्नल तोडके... स्टॉप धीस ट्यूडिप, रानू... इटस् इनफ!'
या कॉफी हाऊसमुळे मला कळालं की नुसत्या कॉफीचे शंभर प्रकार असतात... हॉट, कोल्ड, ब्लॅक, लाईट, आयरिश, इंटरनॅशनल, एस्किमो, एस्प्रेसो, अरेबियन, ट्रॉपिकल, डेव्हिल्स, हनी, केनियन सफारी, कोलंबियन, चोको, ब्राऊन, सिफलिंग... अक्षरशः अनेक प्रकार! शिवाय त्याच्याबरोबर खायचे पदार्थ तर अनेक - पफ, बर्गर, पिझ्झा शिवाय आइस्क्रिम, शेक, केक्स, चॉकलेट्सही अनेक. पण या सर्वांपेक्षा तिथल्या नजरांचे रोमँटिक बाईट्स अधिक चवदार होते खरे!
हे नुसतं पैशाच्या मस्तीचं केंद्र नव्हतं. तिथं होतं इंटरनेट कॅफेही! तिथल्या भिंतीवर लावलेल्या ब्रिटिश कौन्सिलच्या भल्या मोठ्या वेब अॅडनी तर मला या पावसात नवं इंद्रधनुष्य दाखविलं... त्यात लिहिलं होतं- Espresso or Expresso तुम्हाला कॉफी हवी का स्वतःला फुलवायचं! मग आमची वेबसाईट पाहा... चक्क मोफत... ती तुम्हाला मुलाखतीचे तंत्र नि मंत्र शिकवेल... अहमदाबादहून अमेरिकेस नेईन... भुर्रऽदिशी... दशदिशा... अराऊंड द वर्ल्ड.'
मी उगीचच आजवर कॉफी हाऊसमध्ये जायचं टाळायचो... आता लक्षात आलं भारताच्या नव्या श्रावणधारा, नवे शुक्र, नवी इंद्रधनुष्य, नव्या चांदण्यां उद्या इथंच चमकणार! बाहेर रस्त्याच्या पलीकडे पण फुटपाथवर डब्या-डब्यांवर बसून अशीच काही तरुण-तरुणी पापडी नि चहा खात पित गप्पा करत होती... तिथं पैशाचा पाऊस नव्हता, इंद्रधनुष्य नव्हतं... होतं मध्यान्हीचं ऊन... सूर्य नेहमी डोक्यावर असलेलं! ताण-तणावातलं फुटपाथवरचं मौन तारुण्य नाहाळत मग मी विद्यापीठ गाठलं, माझं विद्यापीठ!
***
माणूस गुजरातला जातो नि त्यास महात्मा गांधींची आठवण होत नाही असं सहसा घडत नाही. गुजरातला जायचं ठरल्यावर मी महात्मा गांधींचा साबरमती आश्रम पाहायचं ठरवून टाकलं होतं. किंबहुना गुजरात विद्यापीठातील बैठकीचं निमंत्रण न टाळण्याचे मुख्य कारण साबरमती आश्रमच होतं.
संथ वाहणाऱ्या साबरमती नदीच्या किनारीच महात्मा गांधींनी आश्रम का स्थापला तेथपासून तिथल्या सर्व प्रयोगांची साद्यंत माहिती आपणास गांधी स्मारक संग्रहालय देतं.भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार असणारा हा सत्याग्रह आश्रम अधिक चांगला ठेवला पाहिजे असा तो सारा परिसर पाहून माझी खात्री झाली.
'हृदयकुंज' ही खरी बापू कुटी. तिथं बापूंची खोली, स्वयंपाक घर, बैठक हे सारं त्या काळात इतिहास म्हणून नेत असलं तरी तिची मांडणी अधिक सजीव व्हायला हवी. तिथं अनेक खलबतं, भेटी, निर्णय झाले ते सचित्र जिवंत करता येईल. कस्तुरबांच्या खोलीची ओळख नुसत्या तिथल्या एका पाटीनंच होते. सारी खोली रिकामी... स्त्रीकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोनाचा हा तर सज्जण नि सलज्ज पुरावाच! तीच गोष्ट मीराबेन नि विनोबांच्या कुटीची!! आपल्या कल्पना दारिद्रयाचं नि उदासिन वृत्तीचं ते प्रतीक! मिठाच्या सत्याग्रहाच्या दांडी यात्रेची गंगोत्री समजल्या जाणारा हा आश्रम... अवघ्या तपभरानंतर आपल्या स्थापनेची (२०१९) शताब्दी साजरी करेल, पण तोवर इतिहास फार पुसट होऊन जाईल...! कारण सध्याचं गुजरात सरकार साबरमतीच्या किनारी काँक्रिट रोड, रेल्वे, बझार अशा अत्याधुनिक सुविधांसाठी जेसीबीज, बुलडोझर्स, रोडरोलर्स फिरवत आहे. सर्वांना जागतिकीकरणाच्या स्वप्नांनी पछाडलं आहे. त्यात गुजरात भारताची व्यापार राजधानी. इंडिया ट्रेड सेंटरचं रूपांतर इंटरनॅशनल वर्ल्ड सेंटरमध्ये होईल तेव्हा त्याच्या प्रवेशद्वारावर महात्मा गांधींचा पुतळा, त्यांचा चरखा असेल... हे वाक्यही असेल... 'मेरा जीवनही मेरा संदेश है।' पण महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत तेव्हा असणार का, हा खरा प्रश्न आहे.
गुजरात विद्यापीठाच्या कोपऱ्यावर रिक्षा केली नि त्याला म्हटलं,‘महात्मा आश्रम' ले चलो!'तसं त्यानं विचारलं, “कौनसा महात्मा !' मी म्हटलं, 'बापू कुटी भाई!' तो म्हणाला, “यहाँ दो बापू है - एक गांधी बापू और दुसरा आसाराम बापू!' त्याचे विचारणं त्याच्या जागी बरोबरच होतं... एक महात्मा, बापू गेल्या शतकातला... एक या क्षणाचा! मला उगीचच आइनस्टाइन आठवला... तो म्हणाला होता... पुढच्या शतकात कुणाला खरंच वाटणार नाही की, असा गांधी होऊन गेला...मी चक्रावून गेलो हे सारं ऐकून...पाहून अन् लक्षात आलं की,साबरमतीचं मूळ शब्दरूप बहुधा सब्र मति (संयमी बुद्धी) असावं... मी हे सारं संयमानं, शांतपणे ऐकत, पाहात परतलो.
***
वाचनवेडा राजाराम
अलीकडे मला छोट्या माणसांतील मोठेपण शोधण्याचा छंदच लागलाय जणू. या नादात मला राजाराम मिळाला. तसं त्याचं नाव राजाराम पाटील. बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात शिकतो, माझ्या महावीर महाविद्यालयातच. मराठीत तो बी. ए. होणार. केव्हा होतो कुणास ठाऊक. यावर्षी परीक्षेचा फॉर्मच भरला नाही. का विचारले तर म्हणाला फॉर्म फी भरायला पैसे नव्हते? येणार कोठून नि कसे? दरमहा शे-पाचशे रुपयांची पुस्तकं खरेदी दोन-अडीच हजार रुपये पगारात होत राहिली तर!
राजारामचं गाव निगवे, वडणग्याजवळचं. शेती-भाती नाही. समज आली तेव्हा तो कोल्हापूरला आला. अजब पुस्तकालयात हरकाम्या झाला. राजारामनं पुस्तकाच्या दुकानातच नोकरी करायचं ठरविलं होतं. त्याचं एकमेव कारण होतं वाचनवेड. घरची ओढग्रस्त परिस्थिती. ग्रंथालयाची वर्गणी भरायची इच्छा असूनही भरू न शकणाऱ्या राजारामनं वाचनवेड भागविण्याचा नामी उपाय शोधला. पुस्तकाच्या दुकानातच नोकरी करायची म्हणजे आपल्याला हवी ती पुस्तकं वाचायला मिळतील,पण कसलं काय नि कसलं काय? गिऱ्हाईक उरकता-उरकता संध्याकाळ कशी व्हायची ते कळायचं नाही!
वाचनाचं वेड त्याला स्वस्थ बसू देईना. त्यानं पुस्तकं विकत घेण्याचा उपाय शोधून काढला. दिवसभर काम करायचं नि रात्री सपाटून वाचायचं. शिवाय पुस्तकाचंच दुकान ते. रद्दीत निघालेली पुस्तकं वाचत त्याचं वाचन प्रगल्भ झालं. मराठीची जाण विकसित झाली. तो ‘मेहता मराठी ग्रंथजगत', 'ललित', ‘प्रिय रसिक', 'साहित्यसूची' वाचू लागला.
निवडक पुस्तकं वेचून वाचायच्या छंदापोटी त्याने एकदा शेजारच्या मेहता बुक सेलर्सच्या अनिलभाई मेहतांची विकेटच घेतली. त्यानं ‘आहे मनोहर तरी' मागितलं. मेहता म्हटले, 'विकत घ्यावं लागेल' राजाराम नम्रपणे निर्धाराने म्हणाला,'विकतच मागतोय.' अनिलभाई उडालेच. आता राजाराम अधीमधी येऊन पुस्तकं खरेदी करू लागला. सारस्वत-पारखी अनिलभाईंनी त्याची साहित्यिक जाण जोखली नि आपल्या दुकानात ठेवून घेतलं.
राजारामची माझी गाठ अनिलभाईंकडेच पडली. मी एकदा संदर्भ शोधाने पिसाळलो होतो. त्या पिसाट अवस्थेत राजारामनं माझ्यापुढे विलक्षण पद्धतीनं ठेवलेल्या पुस्तकामुळे तर मी स्तिमितच झालो. कारण ते संदर्भ माझे विद्यापीठ व महाविद्यालयातील एम.ए.,पीएच.डी. झालेले प्राध्यापक मित्रसुद्धा देऊ शकले नव्हते. तुम्हाला खरं वाटणार नाही राजाराम 'ललित'चा वर्गणीदार आहे. त्याला पगार अडीच हजारच आहे.पण तो हुक्की आली की पाचशे रुपयांची खरेदी करतो. ‘भाषिक कौशल्याचा विकास','शालेय प्रशासन’, ‘भावनिक बुद्ध्यांक', 'वंदे मातरम्', 'विचारांचा आविष्कार अशी त्याने निवडलेल्या पुस्तकांची नावे असतात. रोज गावी सायकलने ये-जा करतो. बसचे पैसे वाचवितो नि वाचतो.
राजारामचं वाचनवेड पाहिलं की, माझ्या मनात येतं, मराठी शिक्षक, प्राध्यापकाची एखादी जागा कुठं निर्माण झाली की त्याला नेमावं. तो शैक्षणिकदृष्ट्या पात्र नसेल पण भाषा व साहित्याची त्याला असलेली जाण तो तथाकथित पात्र शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवू शकेल. कारण त्याच्यात वाचनाची न संपणारी तहान आहे. शाळा, कॉलेज, विद्यापीठातील वाचकांच्या प्रतीक्षेतील ग्रंथालयं राजारामासारख्या वाचनवेड्या तरुणांना मुक्तद्वार नि मुफ्तद्वार करून दिली तरच वाचनवेड वाढेल, जगेल!
***
तीन सार्वजनिक अण्णा
कोल्हापुरात तीन अस्वस्थ आत्मे राहतात.राहतात म्हणण्यापेक्षा भटकतात म्हणणे योग्य होईल. कारण ते घरात कमी नि बाहेर जास्त अशी त्यांची स्थिती.त्यांना घरापेक्षा रस्त्यावर येणं अधिक आवडतं.तिघांचे पक्ष वेगळे पण आराध्य एकच.ते म्हणजे शाहू महाराज तिघांना सार्वजनिक धुणी धुवायचा विलक्षण नाद;पण प्रत्येकाचा धुण्याचा घाट वेगळा.लोक घाटावर कपडे धुतात, तर हे बहाद्दर चक्क चौकात,भर चौकात धुणी धुतात.त्यांना धुवायला साबण लागत नाही. फक्त धुणं लागतं. एक बिंदू चौकात, दुसरा दसरा चौकात तर तिसरा उभ्या मारुती चौकात आपापलं काम इमाने इतबारे करतो. योगायोग म्हणजे या तिघांना त्यांचे निकटवर्ती ‘अण्णा' म्हणतात. ते तिघे कोल्हापूरचे सार्वजनिक अण्णाच होत.
पैकी एकाचा पक्ष कम्युनिस्ट.कायम खांद्यावर लालबावटा, कामगार, मोलकरणी, मजूर, बँकवाले, विमावाले सर्वांना ते संघटित करतात. ते कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचे आता नेतृत्व करतात. व्यवसायाने वकील असल्याने आपल्या मतांची बिनतोड वकिली ही त्यांची खासियत.या गोविंदानी आपला कधी गोपाळकाला होऊ दिला नाही. संघटन, संस्कृती, साहित्य, प्रबोधन, मिळेल त्या मार्गाने सर्वांना घेऊन आपली पुरोगामी विचारांची मशाल ते पथनाट्य, मेळावे, भाषणे, मोर्चे, व्याख्यानमाला, कवी संमेलन, प्रकाशन यांतून पेटवत राहतात. समाजाचे प्रश्न यांना अस्वस्थ करतात असे म्हणण्यापेक्षा यांना पाहून प्रश्न अस्वस्थ होतात, हे म्हणणे अधिक संयुक्तिक व्हावे.
दुसरे काँग्रेस पक्षाचे पुढारी. आज रोजी राष्ट्रवादीत डेरेदाखल. एकेकाळी यांनी कोल्हापुरात जनसेना स्थापून येथील सार्वजनिक जीवनात जनमनाचा कळवळा जपला. प्रबोधन हा त्यांचा पिंड. शाहू स्मारक भवनात काही ना काही निमित्त शोधून प्रबोधनाचा यज्ञ जागवण्यात त्यांना मोठा आनंद. कोल्हापूर गॅझेटची दुरुस्ती असो की शाहू महाराजांचा पुतळा उभारावयाचा असो, सतत शासनाच्या मागे हात धुवून लागायचं. त्याशिवाय बहुधा चैन पडत नसावी. भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षण, प्रकाशन, व्याख्यान आदींद्वारे पुरोगामी विचारांची धार ते वाढवत राहतात. या वृत्तीचं प्रतिबिंब त्यांच्या आडनावात दिसतं.
तिसरे तसे काँग्रेसचेच. पण पक्षापेक्षा पेठेत सतत कार्यरत राहणारे. यांनी हिकमतीने निवडणूक लढवून लोकमताची किमया दाखविली व महापौर होऊन एक नवा वस्तुपाठ मांडला. राजर्षी शाहू महाराजांवरील चित्रमालिका तयार करण्यात त्यांनी किती कोल्हापुरी झिजवल्या हे त्यांचे त्यांना माहीत. विजार, शर्ट असा साधा पोशाख, शिवाजी पेठेला प्रबोधनाची पेठ यांनीच बनविली. कुस्ती, दांडपट्टा, आखाडा ही त्यांची आवडती क्षेत्रं. कुणाचंही काम घ्यायचं नि ते पदरमोड करून करायचं असा त्यांचा छंद. लुनावरून स्वारी अखंड कोल्हापूर, ऊन, पावसात पालथं घालत राहतात. जगासाठी भीक मागणारा हा समाजसेठ, त्याची श्रीमंती काय वर्णावी?
असे हे तीन ‘सार्वजनिक अण्णा' म्हणजे कोल्हापूरचं सांस्कृतिक संचित, वैभव नि अभिमानाची गोष्ट! निष्कलंक, निष्कपट, निरिच्छ, निःस्पृह. असे हे तीन सार्वजनिक अण्णा! त्यांची नावं वेगळी सांगायची काय गरज? या तिघांपासून आपण घराबाहेर,स्वतः पलीकडे पाहण्यास शिकलं पाहिजे. जो स्वतःसाठी जगतो तो नुसता श्वासोच्छ्वास करत असतो. जो दुसऱ्यासाठी जगतो तो तरतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
***
मी भाषा विषयाचा शिक्षक आहे. गेली अनेक वर्षे हिंदी शिकवितो पण मराठी, इंग्रजी व अन्य भाषिक साहित्य भाषेच्या अंगांनी अभ्यासत असतो. अलीकडच्या आपल्या भाषेच्या स्वरुपावरून मी अशा निष्कर्षावर आलो आहे की, माणसांचा व्यवहार बदलतो, तशी भाषाही. अलीकडे शिक्षक, प्राध्यापक माझ्याकडे विद्यार्थ्यांच्या प्राविण्याची माहिती देण्यासाठी म्हणून येतात नि म्हणतात, 'सर, अमुक-अमुक स्पर्धेत आपला मुलगा पहिला बसला.' त्यांना म्हणायचं असतं, ‘अमुक-अमुक स्पर्धेत मुलाचा क्रमांक आला... तो पहिला आला. क्रमांकाने उत्तीर्ण होण्याला आमच्या लहानपणी येणे क्रिया वापरली जायची. आता बसणे क्रिया वापरली जाते. यामागे त्या शिक्षकाच्या खटपटी, लटपटी करून क्रमांक घेतल्याचाच भाव प्रकट होत असतो. शिक्षकांची ही भाषा का बदलली तर त्यांचे व्यवहार बदलले असे अभ्यासातून लक्षात येते.
पूर्वी पुरस्कार मिळायचे. अलीकडे लोक म्हणतात, 'त्याला अमुकअमुक पुरस्कार लागला.' यात लॉटरी लागल्याचा भाव असतो. म्हणजे एक तर त्याला तो अनपेक्षित मिळतो किंवा वर्णी लागावी तसा लागतो. त्यामागे सन्मानाने मिळाल्याचा भाव नसतो. भाव असतो मर्जीने मिळाल्याचा किंवा जुगार लावावा तसा तो लागतो. जुगारात आधी पैसे लावावे लागतात नि मग जुगार लागतो. अलीकडे पैसे देऊन पुरस्कार घ्यायचं पेव फुटलं आहे. त्यामुळे पुरस्कार मिळत नाहीत, लागतात, असे लोक म्हणतात.
रोजच्या व्यवहारात मला मलिदा खाणे, लोणी खाणे, काटा मारणे, फिक्सिंग करणे, वशिला लावणे, पैसे खाणे या वाक्प्रचारांचा प्रचार वाढलेला आढळतो.
या वाक्प्रचारांचा वाढता वापर आपल्या भ्रष्टाचारी व्यवहार वाढीचाच पुरावा नाही का? आता ‘डोळा मारणे' वाक्प्रचार वापरातच नाही. कारण आपल्या व्यवहाराची मर्यादा आता सर्रास बलात्कारापर्यंत येऊन ठेपली आहे. तोंडाला पाणी सुटणे वाक्प्रचाराची जागा लाळघोटेपणानी केव्हा घेतली ते कळलेसुद्धा नाही. तीच गोष्ट मस्का मारण्याची. लोणी मागं पडलं नि व्यवहारात मस्का (बटर) वाढला.
या नि अशा गोष्टीतून आपला रोजचा व्यवहार भ्रष्टाचाराकडे मोठ्या गतीने झुकल्याचे लक्षात येते नि मन विषण्ण होते. भाषा शिक्षक म्हणून मी पूर्वी भाषा शुद्धीचा, उच्चार शुद्धीचा आग्रह धरायचो. आज मात्र मला आचारशुद्धीचा आपण आग्रह धरायला हवा असे प्रकर्षाने वाटते.
***
झाडू कामगार साहित्यिक
जुलै २००४ ची गोष्ट. माजी महापौर भिकशेठ पाटील विजय शिंदे यांना घेऊन माझ्याकडे आले नि म्हणाले, “हे विजय शिंदे, म्युनिसिपालटीमध्ये झाडू कामगार आहेत. शाहू महाराजांच्या आरक्षण शताब्दिच्या निमित्ताने त्यांनी ‘शाहूराजे' हे खंडकाव्य, पोवाडारुपी जीवनपट लिहिला आहे. त्याचं प्रकाशन तुमच्या हस्ते नि शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली करायचे आहे. पत्रिका छापतो. तुम्ही यायचं.' मी क्षणभर भांबावूनच गेलो. एक झाडू कामगार खंडकाव्य लिहितो, यावर माझा विश्वासच बसेना. उगीच मनात विचार आला, खंडकाव्य शिकविणारे किती प्राध्यापक (माझ्यासह) खंडकाव्य लिहू शकतील?
झाडू कामगार असलेल्या विजय शिंदे यांची नंतर मला जी माहिती मिळाली, ती थक्क करणारी होती. ते मूळचे नांद्रयाचे. शिक्षण म्हणाल तर अवघे सहावी नापास. गेली पंचवीस वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेत झाडू कामगार म्हणून आपले काम इमानेइतबारे करतात. आजवर त्यांनी एकदोन नव्हे, तर चक्क सतरा पुस्तके लिहून प्रकाशित केलीत. यातील बरीच प्रकाशन त्यांनी पदरमोड करून केलीत. रंकाळ्यासमोर भाड्याच्या घरात राहणारे विजय शिंदे कुटुंबवत्सल गृहस्थ, पदरात मुलगी असूनही साहित्यावर प्रेम इतकं की आलेल्या प्रत्येक पैशावर ते साहित्याचा पहिला अधिकार मानतात. अनेक भाषणे, पुस्तक प्रकाशन समारंभात वळचणीत बसून श्रवणसाधना करणारे विजय शिंदे नंतर मी कितीदा तरी पाहिले आहेत. काही न लिहिता पहिल्या रांगेत बसणाऱ्या सुशिक्षितांच्या पार्श्वभूमीवर विजय शिंदे यांचं मागं तुरकून बसणं अधिक शालीन वाटत आलं आहे.त्यांनी गद्य, पद्य दोन्ही लिहिलं तरी त्यांचा मूळ पिंड कवीचा.
जयभीम गीतमाला, ‘जयभीम' गीतधारा (भाग एक ते नऊ), क्रांतिसूर्य (पोवाडा), देशभक्त अण्णा (पोवाडा), दलितांचा राजा शाहू (पोवाडा), घटनेचे मारेकरी (काव्यसंग्रह), अण्णाभाऊ साठे : काव्यमय जीवन दर्शन (रूपक पोवाडा), कामगारांची आजची समस्या (पुरस्कारप्राप्त), शाहूराजे (खंडकाव्य) या प्रकाशित रचनांशिवाय ‘सुरा अन्यायाचा' हे नाटकही त्यांनी लिहिलंय. ते प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. परवा ते घरी जयभीम गीतधारेचा नववा भाग देऊन गेले. येथील प्रज्ञा प्रकाशनाच्या प्रा. शरद गायकवाड नावाच्या संवेदनशील प्राध्यापकांनी स्वतःचा खिसा फाटका असताना ते छापलं, याची विशेष नोंद घ्यायला हवी. आज हे सारं पाहायला शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ असायला हवे होते. कचरा कोंडाळ्यातील घाण उपसत घाम गाळून काव्य करणारा हा शाहीर त्याला त्याचं कलासक्त मन स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्या काव्यात असतो टाहो नि गुदमरलेल्या किंकाळ्या. या कवीची इच्छा आहे की, ‘फोटो भीमाचा नोटांवर छापावा.' कवीची इच्छा अपूर्ण राहील असे वाटत नाही, पण त्यासाठी एखादा दलित अर्थमंत्री किंवा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर व्हायला हवा. 'कामगार भूषण' असलेल्या विजय शिंदे यांना महापालिकेने ‘कोल्हापूर भूषण' करावं. त्याच्यासाठी अशासाठी तरी कोल्हापूर भूषण पुरस्कार परत सुरू होईल, अशी आशा करुया. कोल्हापूरसारखंं रत्नपारखी शहर नाही, असा माझा दावा फोल ठरणार नाही, अशी आशा आहे. उद्या आंबेडकर जयंती. त्यावेळी या झाडू कामगार साहित्यिकाचा गौरव करुया. दुधाची तहान ताकावर भागवणं तर आपल्याच हातात आहे ना! तेच खरं बाबासाहेबांचं स्मरण होईल!
***
मलमपट्टी प्रशासन
देशाचे काय किंवा राज्याचे काय, सरकारी प्रशासन हे मला नेहमी मलमपट्टी प्रशासन वाटत आले आहे. परवा इथल्या शासकीय महिला वसतिगृहातील महिलांवर अत्याचार झाल्यावर लगेच तिथे पोलीस पहारा बसवला गेला. हा पहारा फारतर विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत असेल नि परत 'येरे माझ्या मागल्या', 'मागील पानावरून पुढे सुरू होईल. आग लावल्यावर विझवण्यापेक्षा ती लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक प्रशासन कार्यरत झालं तर देशाच्या चरित्र नि चारित्र्यात फरक पडत असतो.
यासाठी आपल्या शासकीय प्रशासनाचा संवेदन सूचकांक, कार्यक्षमता मूल्यांक, शासकीय यंत्रणेचे सामाजिक लेखापरीक्षण अशा अभिनव पद्धतीने मोजमाप सुरू झालं पाहिजे. बऱ्याचदा आपले मंत्री ज्या सरंजामी पद्धतीने वावरत असतात, ते पाहिले की युरोपातील मंत्र्यांचा साधेपणा आठवतो. पायलट कार नाही, फौजफाटा नाही, पोलीस नाही की ड्रायव्हर नाही. मंत्री ओळखतो तो गाडीवर लावलेल्या छोट्या झेंड्यामुळे. तीच गोष्ट उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांची. ते पदोन्नतीची वाट जनतेची आपण चांगली सेवा करू शकू या ध्यासाने पाहताना दिसत नाहीत. कमी काम, अधिक पगार, अधिक बडेजाव याकडे सारं लक्ष असतं. जनतानुवर्ती प्रशासन अशी मांडणी होण्याची गरज आहे.
अर्ज केल्यावर घरी दाखला येणं, मागणीची पूर्तता होणं हा जनतेचा हक्क नि अधिकार आहे आणि ती पुरवणं यंत्रणेचं कर्तव्य आहे, अशी भावना देशात रुजायला हवी. त्यासाठी जनतेनंही आपली मानसिकता। बदलायला हवी. अर्जाची शाई वाळेपर्यंत थांबण्याची आपली तयारी नसते.
याला काय म्हणायचे?पुढच्या आठवड्यात दाखला हवा तर आधीच अर्ज करायला हवा.शासनानेदेखील नियत सेवा,त्वरित सेवा, विलंब शुल्क आदींद्वारे उत्पन्न वाढवत सेवेची गती व गुणवत्ता वाढविण्याचे उपाय शोधले पाहिजे.सेवा शाश्वती असेल तर सेवाशुल्क देण्यास जनता तयार असते, आहे. हे पथकर वसुलीवरून सहज लक्षात येते.
युरोपच्या प्रवासात असताना लंडनच्या सीटी बसमध्ये माझा कॅमेरा विसरला. मी हादरलो.एक तर तो किमती होता नि मी ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांचा होता. हिंमत करून हिरमुसून घरी आलो नि चाचपडत सगळं सांगितलं तर यजमान म्हणाले, 'विसरलाच आहे ना? मिळणार,काही काळजी करू नको'. त्यांनी डेपोला फोन केला.बस परतायची होती. ती रात्री नऊला येणार होती. नऊ वाजून पाच मिनिटांनी फोन.‘तुमचा कॅमेरा तुमच्या सीटवर सुरक्षित आहे.पोहोचवू की घेऊन जाणार? मी दुसऱ्या दिवशी स्वतः गेलो.नाव सांगताच खाणाखुणा,ओळख काही न विचारता स्वागतिकेनी मला माझी कॅरी बॅग देत म्हटलं, 'पहा, सारं आहे ना? काही हरवलं असेल तर सांगा.नुकसान भरपाई देऊ.'सारं झाल्यावर मी आभार मानले तर बाई म्हणाल्या, 'कशासाठी आभार ? हे तर आमचं कर्तव्यच आहे.' गरज आहे मानसिकता बदलण्याची, मलमपट्या लावणे व बदलणे आता बंद व्हायला हवे.आपले स्वातंत्र्य आता हीरक महोत्सवाच्या उंबरठ्यावर उभे आहे, याचा आपणास विसर पडता कामा नये.
***
आमचा काय गुन्हा?
गेल्या आठवड्यात औरंगाबादला अनाथाश्रम,रिमांड होम, बालगृह,बालसदन,अनुरक्षण गृह,स्वीकारगृहासारख्या संस्थांत राहून मोठ्या झालेल्या परंतु तरीही निराधार,निराश्रित बेरोजगार राहिलेल्या विदर्भ,मराठवाड्यातील युवक-युवतींचा एक आगळा-वेगळा मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याचे आयोजन निवासी संस्थांतर्गत बालकांचे गुणवत्तापूर्ण संगोपन व पुनर्वसन कार्य करणाऱ्या एका चळवळीने केले होते.निवासी संस्थाश्रयी युवक संघटनेने यात पुढाकार घेतला होता.महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हा मेळावा यशस्वी व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले होते.जळगाव, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद,पैठण,औरंगाबाद अशा ठिकाणांहून सुमारे २५० मुले-मुली पदरमोड करून या कार्यक्रमास उपस्थित होती.
मेळाव्यातील प्रत्येक मुला-मुलींच्या डोळ्यात मी आशेचे लक्षलक्ष दीप जागताना अनुभवले.भरपूर भोगलंय;अजून भोगायची प्रतिबद्धता त्यांच्या निस्तेज चेहऱ्यांवर मी वाचली.कुणाचेच कपडे परीट घडीचे नव्हते.बरीच मुलं अनवाणी होती.काही पायी,काही सायकलनी गावाहून आलेली.इथे कोणीच कुणाचं नव्हतं पण सर्व एकमेकांचे कुणीतरी होते. अनाथपण,उध्वस्तपणानी या साऱ्यांना एकमेकांचे एक करून सोडले होते.
या मुलांचं मागणं आहे संस्थेत आम्हाला चांगलं सांभाळा.आमचं कोणी नाही म्हणून आम्हाला गुलामासारखे वागवू नका.आमचा शारीरिक,मानसिक,भावनिक, लैंगिक छळ थांबवा.शिकेल तितके आम्हाला शिकू द्या. आम्हाला माणूस म्हणून वागवा नि माणूस म्हणून जगू द्या.
संस्थेत शिकून-सवरून मोठ्या झालेल्या परंतु नोकरी,रोजगार, व्यवसायाअभावी अद्याप निराधार, निराश्रित असलेल्या तारुण्याच्या उंबरठ्यावरील या मुलांचं मागणं आहे की समाज व शासन सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर दलितांना नि अल्पसंख्यांकांना ज्या सोयी, सवलती, आरक्षण, प्राधान्य, प्रवेश, कर्ज, घर विवाह अनुदान, भूखंड आदी देतं ते सर्व दलितांच्या अगोदर आम्हाला मिळायला हवं. कारण जन्मतारीख, आई, वडील, जात, धर्म, उत्पन्न, रेशनकार्ड असं या भारताचा आम्ही नागरिक म्हणून सिद्ध होऊ असं काहीच आमच्याकडे नसतं. त्यांची मागणीच आहे की आता दलितबांधवांनी, पुरोगामी कार्यकर्त्यांनी व सर्व समाजहितैषी राजकीय शक्तींनी एकत्र येऊन आम्हा वंचितांना - ‘ज्यांना काहीच नाही त्यांना सर्व काही देण्याची प्रतिबद्धता स्वीकारावी व आम्हास सन्मानाने साधार करावं.'
या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन व समारोप समारंभात भाषण करताना खरंतर मी तुमच्यासारखाच निरुत्तर होतो. मेळाव्यातील मुले-मुली मेळाव्यापूर्वी, मेळाव्यात नि मेळाव्यानंतरही एकच प्रश्न विचारत होती. आम्ही अनाथ, निराधार झालो यात आमचा काय दोष? आमचा काय गुन्हा? त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी आता शासन व समाजाची आहे. प्रश्न समाजाने निर्माण केला आहे. समाजानेच तो नको का सोडवायला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या धर्मव्यवस्थेस कंटाळून धर्म नाकारला, सोडला. ते आठवून याक्षणी माझ्या मनात येतं ही आजची या मुलांची स्थिती पाहून त्यांनी काय-काय नाकारलं असतं? जात! धर्म!! नागरिकत्व!!!
***
दुहेरी संवेदनेचे आव्हान
जिवंतपणीच आख्यायिका बनलेला एक अमेरिकन विज्ञानलेखक आहे. आयमॅक अॅसिमोव्ह त्याचे नाव. त्यानी फक्त ४८६ पुस्तके लिहिलीत. त्याच्या कादंबरीवर आधारित एक चित्रपट मी काही दिवसांपूर्वी पाहिला होता. परवा परत पाहण्याचा योग आला.'बायसेंटीनिअल मॅन' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. स्टार मुव्हीवर तो लागतो. परत लागल्यास अवश्य पाहा.
अॅसिमोव्हनं या चित्रपटात माणूस नि यंत्राचं सुंदर द्वंद्व चित्रित केलंय. साधारणपणे २०० वर्षानंतर यंत्रावर अवलंबून राहणाऱ्या माणसापुढे काय वाढून ठेवलं असेल याचं चित्रण या कथेत आहे.एक शास्त्रज्ञ असतो.तो यंत्रमानव बनवत असतो. तो बनवत असलेले यंत्रमानव इतरांच्यापेक्षा वेगळे असतात.ते विचार करू शकतात,त्यांना संवेदना असते, दुसऱ्याला आपलंसं करण्याची नि आपण दुसऱ्याचं होण्याची त्यांच्यात क्षमता असते.त्यामुळे त्याचे यंत्रमानव ज्या घरी जातात त्या घरचे ते होतात.इतकेच नव्हे तर यंत्राच्या माणूस बनण्याने घरात,घरातील माणसांपुढे नि खुद्द त्या यंत्रमानवाच्या जीवनातही विलक्षण प्रश्न निर्माण होतात.
त्यातील काही प्रसंग लक्षात राहण्यासारखे आहेत. चित्रपटातील यंत्रमानव ज्या घरात जातो, तिथे एक तरुण मुलगी असते. तिच्यात तो गुंततो, पण माणूस होऊ शकत नाही. अगदी छोटी घटना. मैत्रीण त्याला विचारते काय घेणार - चहा, सरबत, वाईन? तो म्हणतो, मला पोट कुठे आहे? या नि अशा प्रसंगातून अॅसिमोव्हनं यंत्राचा माणूस बनणं अशक्य असल्याचं जसं स्पष्ट केलं आहे तसंच माणसाचं यंत्र बनणंही कठीण !
माणसचं यंत्रावर अवलंबून राहणं वाढत आहे. तसे नव-नवे प्रश्न निर्माण होत आहेत. माणसाची जीवनशैलीच बदलत निघाली आहे. यंत्रामुळे माणसाची गती वाढते आहे. या गतीने अनेक गुंते निर्माण होत आहेत. माणसास माणूस म्हणून वागण्यास, व्यवहार करण्यास वेळ राहिलेला नाही. भौतिक सुखामागे धावणाऱ्या माणसाने यंत्र चालवणारी पण यंत्रे तयार केलीत. त्यामुळे एक काळ असा येईल की जग यंत्रांचं असेल. तिथं माणूस असणार नाही.
आपली आजची घरं, व्यवहार, समाज पाहता अॅसिमोव्हनं २०० वर्षांनंतरच्या मनुष्य समाजाचं कल्पनेनं चित्रित केलेलं जग अशक्य वाटत नाही. आज माणसापुढे यंत्राने दुहेरी संवेदनशीलतेचं आव्हान उभं केलं आहे. यंत्राच्या तंत्रावर नाचणाऱ्या माणसाला माणुसकीचा मंत्रही जपून राहावा वाटतो आहे. मिक्सरमध्ये वाटून पानात वाढलेल्या कैरी डाळीला आईने पाट्यावर वाटलेल्या कैरी डाळीची चव नसल्याचं शल्य जसं अस्वस्थ करतं तसं घरातील उखळ पांढरं होण्यामुळे उखळच न राहणं त्याला सलत राहतं. माठ, फिरकीचा तांब्या, पानाचा डबा, रवी, पाट, चौरंग, झोपाळा, चूल, शेगडी, बंब यांच्या जाण्यानं आपण घरात न राहता हॉटेलमध्ये राहतोय याचा फील वाढतो आहे. घरात माणसांचं येणं-जाणं कमी होणं, मामाचा गाव तुटणं, आजोळ न राहणं यातून यंत्र होणाऱ्या माणसापुढे माणूसपणाच्या संवेदना, खुणा जपण्याचं आव्हान उभं राहतं आहे.
***
बंदीजन? नव्हे बंधुजन
गेल्या आठवड्याची गोष्ट. स्थळ होतं कळंबा मध्यवर्ती कारागृह. निमित्त होतं इथल्या महावीर महाविद्यालयानं कारागृहात बंदिजनांसाठी योजलेल्या प्रबोधन व्याख्यानमालेचं. प्रसंग होता समारोपाचा. प्रमुख पाहुणे होते कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. पी. शेटे. ते भाषणास उभे राहिले नि म्हणाले, 'बंधूजनहो' नि तुरुंगातील साऱ्या बंदीबांधवांनी प्रचंड टाळ्या वाजवून शेटेसाहेबांच्या संबोधनाला उत्स्फूर्त दाद दिली. ती नुसती दाद नव्हती तर आपणाला शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश आपणाला भाऊ, बांधव मानतात. आपणास मनुष्य म्हणून मान्यता देतात याचं त्यांना मोठं अप्रूप वाटलं. आम्हास माणूस म्हणून मान्यता द्या, अशी मागण बंदीजन कित्येक वर्षे करत आहेत.
मी गेली दहा-एक वर्षे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा प्रतिनिधी म्हणून तुरुंगात नियमितपणे जात आलो आहे.भारतातील नि परदेशातील अनेक तुरुंग मी पाहिली,अभ्यासली आहेत. बिहारपेक्षा आपले तुरुंग कितीतरी चांगलेच. मानव अधिकाराची संकल्पना समाज,शासनाने स्वीकारल्यापासून तुरुंगात उदारमतवादाचे वारे वाहू लागले आहेत. कधी काळी शिक्षा, श्रम, उपेक्षेची केंद्र असलेले तुरुंग आता ‘सुधारकेंद्र' बनले आहेत.
बंदीजनांसाठी आता सकस आहार मिळू लागला आहे. कोंड्याची भाकरीची जागा आता दूध,केळ्यांनी घेतली आहे. वर्तमानपत्रे, मासिके बंदीजन रोज वाचू शकतात. ते कथा, कविता लिहितात. त्यांची पुस्तके प्रकाशित होतात. त्याला पुरस्कार मिळतात. बंदीजन तुरुंगात राहून प्राथमिक,
माध्यमिक तर सोडाच, चक्क उच्चशिक्षण घेतात. आमच्या महावीर महाविद्यालयानं बंदीजनांसाठी (नव्हे या बंधूजनांसाठी!) इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू केलं आहे. पुढच्या वर्षी अनेक बंदीबांधव पदवीधर होतील. ज्याचा पदवीदान समारंभ तुरुंगात हाईल. तो तुरुंगात संपन्न झालेला जगातला पहिला पदवीदान समारंभ ठरेल. इथे लवकरच सुसज्ज रुग्णालय सुरू होत आहे. इमारत बांधून केव्हाची तयार आहे, पण शासन डॉक्टर, कर्मचारी केव्हा देतात कुणास ठाऊक? इथं लवकरच द्रुतगती न्यायालय सुरू होईल. त्वरित न्याय हा तुरुंगातील बांधवांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय. पालकभेट, पत्रे, बातमी यांची कोण ओढ असते बंदीबांधवांत. इथले तुरुंग अधिकारी आता'शोले'तले ‘अंग्रेजों के जमाने के जेलर' राहिले नाहीत. ते ‘समाज शिक्षक' होत आहेत. महाराष्ट्रातील तुरुंगात बंदीबांधव जी विविध उत्पादनं करतात, त्यातून येणारं उत्पन्न कित्येक कोटींच्या घरात आहे. बंदीजनांच्या संख्येच्या मानानं काम कमी पडतं. कारण आपण त्यांच्या उत्पादनांच्या खरेदीस प्राधान्य देत नाही. बनियन, चादर, सतरंजी, टॉवेल, फर्निचर, फळफळावळ, भाजी, अंडी, फुलं अशा कितीतरी वस्तूंचे उत्पादन इथं होतं. बंदीजनात डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर अन् हो वकीलही असतात. ते एकमेकांस उपचार, सल्ला, शिक्षण देत चार भिंतीतलं आपलं जीवन एकमेकांच्या साहाय्यानं सुसह्य करतात. मला खात्री आहे, हे सर्व वाचून तुम्हास आपणही तुरुंगात एकदा जाऊन आलं पाहिजे असं वाटेल. तुरुंगातील बंदीजनांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून तुरुंग प्रशासन, मानवाधिकार आयोग खूप प्रयत्न करत आहे. पण तुरुंगात कुणासच जाऊ लागू नये असं सामाजिक स्वास्थ्य निर्माण व्हायला हवं. ती समाज सुधारल्याची खरी खूणगाठ ठरेल.
***
आठवणींचे पाझर
माणसाचं सारं जीवन आठवणींच्या पाझरांनी चिंब भिजलेलं असतं. हे सारे आठव माणसास सतत सजीव, रसरशीत बनवत असतात. माणसाच्या काही आठवणी त्याची जीवनभर सोबत करतात, तर काही क्षणिक! काही आठवणींना सुगंध असतो तर काहींना सल असते! आठवणींनी कधी डोळे पाणावतात तर कधी ते शून्यात हरवतातही! आठवणींची सोबत तशी सार्वकालिक असते. भर गर्दीतही आठवणी आपला पिच्छा पुरवत असतात ना? आपण एकटे असलो की त्या नुसत्या उच्छाद मांडतात! मी वयाची छप्पन्न वर्षे मागे सारली तरी या आठवणी काही माझा पाठलाग सोडत नाहीत. उलट त्या वय वाढेल तशा अधिक आक्रमक, सजग होत आहेत असं मला वाटतं.
परवा मी एका विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या लग्नाला म्हणून बार्शीला गेलो नि माझ्या बालपणीच्या आठवणींचं मोहळ उठलं. मी दुसरीत असताना बार्शी-वैरागजवळ असलेल्या मालेगावमध्ये मे महिन्याची की दिवाळीची सुटी घालवली होती. माझी मावस-मानलेली बहीण तिथं राहायची. ती सुटी लक्षात राहायचं एकच कारण. मी माझ्या जीवनातलं पहिलं खेडं तिथं पाहिलं- अनुभवलं होतं. बार्शीला गेलोय तसा मी नंतर अनेकवेळा! प्रत्येकवेळी मालेगावच्या आठवणींचा भुंगा गुंजारव करत असायचा. या वेळी गाडी हाताशी होती. शोधून काढायचा हिय्या केला नि यश आलं. तीव्र इच्छेस अपयश असत नाही हेच खरं!
मी पहिलं शेत इथंच पाहिलं होतं. हुर्डा खाल्ला होता इथंच. गाई, म्हशी, बैल, कुत्री, मांजरं, कोंबड्या, शेळ्यांच्या सहवासातले ते दिवस
मला आजही माणसाच्या सोबतीपेक्षा अधिक जवळचे वाटतात. धारोष्ण दुधाची चव मी पहिल्यांदा चाखली ती इथंच. भावोजींच्या खांद्यावर बसून शेत, खळे, ओढे, विहिरी पाहिल्या तेव्हा मी किती आश्चर्यगूढ झालो होतो. 'राम राम पाव्हणं','घासभर खाणार का?','वाईच चा घ्या की'चा तो माणूसपणानी भरलेला संवाद आजही माझ्या कानात तसाच घोंघावत होता.मी त्या गावी पोहोचलो नि गावाची वेश, विहीर शोधत राहिलो.तिथं त्या खुणा होत्या,पण त्यांचे चेहरे,त्यांची ओळख बदललेली होती.
पूर्वी वेशीचं दार बंद केलं की गाव बंद व्हायचा.आता दारं कित्येक दिवसांत सताड उघडी असतात.कारण आता या गावाने वेशीबाहेर दूरवर आपले हात-पाय पसरलेत. विहीर आहे पण तिचे पाझर आटलेत.विहीर,ओढे सारे निर्जल, निर्जीव का व्हावेत? तर माणूस निष्ठूर झाला म्हणून.ही त्याची निष्ठूरता निसर्गाशी जशी आहे तशी ती माणसाशी पण!
नाही म्हणायला त्या आटलेल्या खेड्यात मला एक घोडकेमामा भेटले.ते माझ्या भावोजींचे वर्गमित्र! त्यांना मी आल्याचा कोण आनंद! असा आनंद शहरात नसतो. त्यांनी दिलेला गुळाचा चहा, पण काय प्रेम भरलेलं होतं त्यात म्हणून सांगू? माणुसकीनं भरलेला तो चहा पहिलाच! मामा म्हणाले, “पावणं, मी आता हरीऽ हरी करत टाळ कुटत बसतो. परपंच प्वारं बघत्यात. अध्यात्मच बघा आता सर्व! आतिथ्य नाही केलं तर अध्यात्म हरवतं, असं आमचे गुरुजी सांगतात.'मी मनात म्हणालो,हे जरा शहरात येऊन शिकवा! इथल्या अशा माणुसकीच्या विहिरींचे पाझर केव्हाच आटून गेलेत.
***
गती, व्यस्तता की हव्यास व्यग्रता?
आज माणूस गतीचा गुलाम आहे की हव्यासाचा बळी हेच कळेनासं झालं आहे.गेल्या शतकात शहरं गतिशील होती. आज रस्ते, पूल झाले.सायकलची जागा मोटारसायकलींनी घेतली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या गावी मुक्कामाची एस.टी. येऊन थांबते, याचा कोण अभिमान होता गावकऱ्यांना.आज गाव एस.टी. आणि सीटी बसच्या शटल सर्व्हिसनी घुसळून निघालाय.त्यात भरीस भर म्हणून बसचे किफायती पास आले नि खेडे नि शहरातलं अंतरच संपून गेलं. शहर, तालुक्यालगतची गावं, तिथली माणसं मुंबईच्या लोकलनी फिरणाऱ्या माणसांसारखी लोकल झालेल्या बस, वडापच्या टॅक्स, मोटारसायकल्समुळे गतिशील होऊन गेलीत. शहरात काय नि खेड्यात काय. सगळेच ऐंशीनी पळताना दिसतात.
या गतीमुळे मात्र माणूस माणसात राहिला नाही. पूर्वीचे जीवाभावांचे संबंध आता औपचारिक होत चालले आहेत. अगदी जीवलग मित्रांची भेट एकतर लग्नात होते नाहीतर कुणाच्या तरी मयताला. स्मशानभूमीत पूर्वी कोण गांभीर्य असायचं. आता रविवारी रक्षाविसर्जन असेल तर तिथे झालेली गर्दी, गोंगाट बघून हा बाजार आहे की जत्रा असा प्रश्न पडतो. सारं उपचार म्हणून सुरू असतं. तिथली उपस्थिती म्हणजे भोज्याला पाय लावणं असतं. पळाऽऽ पळा कोण पुढे पळतो अशीच सारी स्पर्धा!
ते केवळ जीवनाची गती वाढली म्हणून झालं असं जर कोणी म्हणत असेल तर ते अर्धसत्य होय. माणसाचं धापा टाकत पळणं पाहिलं की लक्षात येतं - माणूस हव्यासामागे पळणारा यक्ष झालाय! त्याला मृत्यूनंतर साडेतीन हातच जमीन लागते ही माहीत असलं तरी पळेल तितकी जमीन
पायाखाली आणण्याचा त्याच्या मनातील हव्यास त्याला थांबू देत नाही. संपत्ती, सत्ता, संकटं, संग्रह, संभोग, संमोह, संशयादी सप्तविकारांनी ग्रासलेला मनुष्य! आज त्याला संस्कार, संयम, अपरिग्रह, अहिंसा, अस्तेयादि एकादश व्रते नव्याने शिकण्याची गरज आहे. गरज आहे गती नि गरजा कमी करण्याची. तोच सदासुखी जीवनाचा खरा राजमार्ग आहे. मृगजळामागे धावणारा आजचा माणूस कांचनमृगाची शिकार करण्याच्या मोहात स्वतःच शिकार होत आहे, असं सर्वत्र दिसतं.
हे लक्षात घेता आज इतकं तरी आपणास करता येईल का? माझ्या खिशातल्या माझ्या पैशातला एक पैसा, रुपया निरपेक्ष सहाय्यार्थ मी खर्च करीन. खरेदीपूर्वी क्षणभर विचार करीन - आज हे घ्यायलाच हवं का?
वेळेची थोडी काटकसर करून, स्वतःच्या कामाचा क्रम बदलून थोडावेळ शक्य असेल तर कुणाच्या तरी उपयोगार्थ घालवता येईल? मी नि माझं यापलीकडे त्याचा, तुमचा, दुसऱ्याचा, समाजाचा, क्षणभर विचार करता येईल का? असं झालं तर आजचं ‘गुड मॉर्निंग' हे ‘सोशल गुडविल' म्हणून विकसित होईल. ती उद्यासाठीची चिरंजिवी गुंतवणूक ठरेल. गती नि हव्यासाच्या कस्तुरीगंधाची नशा उतरायची तर स्वतः पलीकडे पाहणं, थोडं थांबणं हाच एकमेव रामबाण उपाय होय. पहा तरी प्रयत्न करून 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती!'
***
सुरू जाहला लगबगीचा महिना
जूनसारखा लगबगीचा महिना तुम्हाला शोधून सापडणार नाही. मामाच्या गावी शिकरण-पोळी खाऊन सुस्तावलेली बच्चेकंपनी जून उजाडू लागला की अंमळ हिरमुसली होत असते. आता नको बाई नि मास्तरांचा ससेमिरा सुरू होणार! पण नव्या वर्गात नव्या दप्तर, पाटी, पुस्तक, वह्या, कपडे, रेनकोट, छत्री, कंपास, पट्टीनिशी जायला मिळणार म्हणून मंडळींची कोण धांदल उडत असते. बच्चेकंपनीच्या हट्टापुढे तमाम पालकमंडळी कान धरून उठा-बशा काढत असतात. तिकडे दहावी पास ताई-दादा कॉलेजला जायला मिळणार, शायनिंग मारायला मिळणार म्हणून मॅचिंगच्या तालात मनाच्या रॅम्पवर केव्हा कॅटवॉक करू लागतात ते कळतसुद्धा नाही. जुने कॉलेजकुमार, जुनी पाखरं नव्या पाखरांच्या शोधात भिरभिरू लागतात ती याच महिन्यात!
तिकडे शिवारावर पावसाची भुरभुर सुरू होते नि पेरणीसाठी बळिराजाची कोण धांदल! तिकाटणं, खुरपं, इरलं साऱ्यांचा शोध, खोपीची डागडुजी, छप्पराची शाकारणी समद्याची कशी एकच लगबग! ज्येष्ठाचा तडाखा संपून आषाढाचा शिडकावा, मृद्गंधाची स्वैर उधळण, दुर्वांकुराचं डोकं वर काढणं, नव्या हिरवाईचं राज्य सुरू होतं ते याच जूनच्या लगबगींनी! ‘आषाढस्य प्रथमं दिवसे' तर जगभर ‘कालिदास दिन' म्हणून साजरा होतो हे फार कमी लोकांना माहीत असावं.
जून महिना म्हणजे छत्री दुरुस्ती, रेनकोट खरेदी, वायपर दुरुस्ती, गाडी स्लीप होऊ नये म्हणून तुंबलून गोटा झालेल्या टायरी (नाईलाजाने) बदलायचा महिना! याच महिन्यात पुस्तकांच्या दुकानात साहित्याला मागं सारून
पाठ्यपुस्तकं पुढे सरसावतात. झब्ब्याची झब्बूशाही संपून कोट-स्वेटरची सरशी होते ती जूनमध्येच! झेरॉक्स, ट्रू कॉपीचा तेजीचा महिना जूनच.
शाळा-कॉलेजात शिक्षक, खडू, डस्टर शोधू लागतात. अन् हो! त्या वर्षोन् वर्षे सोबत करणाऱ्या, पिवळ्या पडलेल्या, कव्हर फाटलेल्या नोट्सच्या वह्यांचा पाठलाग की लपंडाव सुरू होतो तो जूनमध्येच! जून म्हणजे नव्या शिक्षकांत शिकवण्याचा जुनून (ध्यास, धुंदी) निर्माण करणारा नि जुन्या शिक्षकांना सुटीची जांभई आवरता आवरता नाकीनऊ आणणारा महिना.
इकडं घरोघरी आया-बाया पै-पाहुणे गेल्यानं, पोरा-टोरांचं लटांबर शाळेत गुदरल्यानं थोडं हुऽऽश होतात ते जूनमध्येच! आणि विसरलोच की हो. सगळ्यात जर जून महिन्याचा आनंद कुणाला होत असेल तर तो डॉक्टरांना बघा. सर्दी, पडसे, ताप, डोकं साऱ्यांची दुखणी रंगात येऊन कोरडा गेलेला मे महिना प्रॅक्टिस धुवून काढतो तोही जूनच! नर्सरीत (बालवाडी नि रोपवाटिका) सरसरी येते ती जूनलाच. सूर्यनारायणाचं दक्षिणायन जूनमध्येच सुरू होतं. रिक्षावाल्यांची माहुंदाळ कमाई सुरू होते तीही जूनमध्येच. नाही म्हणायला जून उजाडला की काटा उभारतो झोपडीत राहणाऱ्या दरिद्री नारायणाच्या अंगावर! नदी-नाल्याकाठी राहणाऱ्या मंडळींना पुराची दिवास्वप्न सुरू होतात ती जूनमध्येच. भाड्याच्या घरात पत्र्यांच्या छिद्रा-छिद्राखाली भांडी ठेवता ठेवता भाडेकरूंची दमछाक सुरू करणारा महिनाही जूनच ना? पोस्टमन, पेपरवाला, दूधवाला साऱ्यांची सहनशक्ती पाहणारा जूनसारखा दुसरा महिना नाही!
***
मोबाईलच्या करामती
काही साधनं अशी असतात की ती माणसाचं सारं जीवन आमूलाग्र बदलून टाकतात. मागच्या शतकात तार, रेल्वे, रस्ते, टेलिफोन आदी दळणवळणाच्या साधनांनी जगास जवळ आणलं. आज संपर्क साधनांच्या क्रांतीमुळे जगातील अंतरच संपुष्टात आलंय. मोबाईल फोननी, त्याच्या वाढत्या करामतींनी एकीकडे माणसास जवळ आणलं तर दुसरीकडे माणसास त्याचं खासगी आयुष्य विस्तृत करण्याचं जणू वरदानच दिलं असं मला वाटतं. 'तेरी भी चूप और मेरी भी' हे मोबाईलमुळे खरं ठरलं.
फार पूर्वी नाही, पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी गावात एकच फोन असायचा. तोही पोष्टात. फोन येणार म्हणून माणसं दिवसभर वाट पाहात बसायची. नंतर बँक, शाळा, सोसायटीत फोन आले. हळूहळू ते घरोघरी झाले. ज्याच्या घरी फोन असायचा त्याचा काय भाव असायचा म्हणून सांगू? जावयाला जितकं जपायचे तितकं फोन असलेल्या शेजाऱ्यास! पुढे एस.टी.डी.बुथचा जमाना आला. रात्री अकरानंतर हाफ चार्ज असल्यानं रात्री अकरा ते बारा बूथवर ही गर्दी वेटिंग, क्यू असायचा. मनातल्या मनात शिव्या देत लोक आपला नंबर यावा म्हणून तिष्ठत राहायचे.
मग मोबाईल फोन आले. पेजर आले. सुरुवातीस माणसं दागिन्यासारखे मोबाईल मिरवायचे. आज भांडीवाली, भाजीवाली, भंगारवाला, गवंडी, मिस्त्री, साऱ्यांकडे मोबाईल आहेत. मोबाईल नाही असा माणूस शोधणे दुर्मीळ!
या मोबाईलनी सर्वांत मोठी करामत जर काय केली असेल तर ती संवाद-स्वातंत्र्याची! पूर्वी फोनवर क्रॉस कनेक्शन लागायचं. त्यामुळे आपण
काय बोलतो ते ऑपरेटर, क्रॉस कनेक्शन जिथं लागायचं तिथं सगळं ऐकू जायचं. लोक खासगी बोलताना जीव मुठीत धरून बोलायचे. शिवाय कधी-कधी राँग नंबर लागायचे. मग सगळाच घोटाळा. जे झाकायला जावं ते उघडे पडायचं! बोलायची चोरी असायची.
आता मनमुराद (चोरून!) बोलता येतं. अनेक तासांनी जाऊन आल्यावर जसं हायसं वाटतं, तसं मोबाईलवर बोलताना वाटतं. पूर्वी तासांनी जाऊन आल्यावर लोक फ्रेश, इझी व्हायचे. हल्ली मोबाईल आल्यापासून शाळकरी पोरांपासून ते आजोबापर्यंत सर्व कसे सदासर्वकाळ फ्री, फ्रेश, इझी असतात. सगळ्यांनी ‘कर लो दुनिया मुट्ठी में' म्हणत मुठी आवळल्यात. 'झाकली तर सव्वा लाखाची, उघडली तर फुकाची' या एकोणीसाव्या शतकातल्या म्हणीचा अर्थ एकविसाव्या शतकात येऊन खऱ्या अर्थानं उलगडला, सार्थ ठरला. या मोबाईल प्रायव्हसीने माणसास खासगी जीवन जगण्याची मुभा दिली. मोबाईलमुळे माणसाच्या मनावरचे कितीतरी ताणतणाव कमी झाले. मोबाईल आता संपर्काचं साधन न राहता ते मनोरंजन, मजा, करामती, मस्करीचं साधन होऊन गेलंय. कुणालाही टोपी घालावी, कुणालाही नाचवावं, कुणालाही काहीही बोलावं, लिहावं अशा अराजकापर्यंत गेलेल्या मोबाइल प्रायव्हसींनी शास्त्रज्ञांपुढे माणसाच्या मेंदूच्या दुरूपयोगावर नियंत्रण आणण्याचं आव्हान उभं केलंय!
***
फोटो आणि तारतम्य
अलीकडच्या काळात वृत्तपत्रे नि वृत्तवाहिन्या वेश्या, बारबाला, जुगार, बलात्कार आदी संदर्भातील बातम्यांना अनावश्यक प्राधान्य व ठळकपणा देत आहेत असे माझे मत झाले आहे. पोलीस वेश्या व्यवसाय चालतो तेथे छापा टाकतात. ते योग्यच आहे, पण छापे टाकल्यानंतर वृत्तपत्रांत नि वृत्तवाहिन्यांवर फोटो येतात ते वेश्यांचेच. एखादी स्त्री वेश्या व्यवसाय करते, ती तिची गरज असते. पोट चालवायला दुसरे साधन नसल्याने, कुणीतरी फसविल्याने, विकल्याने तिला या नरकात राहावे लागते. ती तिची बहधा मजबुरी असते, पण वेश्यांकडे जाणाऱ्या पुरुषांचे तसे नसते. गरजेपेक्षा चैन, वासना, व्यभिचार म्हणून पुरुष वेश्यांच्याकडे जातात. सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर वेश्या स्त्रीपेक्षा गिऱ्हाईक म्हणून जाणारा पुरुष खरा अपराधी असतो. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पुरुषही मिळतात. त्यांची नावे, छायाचित्रे वृत्तपत्रांत व वृत्तवाहिन्यांवर प्रकाशित व्हायला हवीत. पण आपल्या पुरुषी मानसिकतेमुळे आपण सामाजिक तारतम्य गमावतो, नि वेश्या, बारबालांचीच छायाचित्रे प्रकाशित करतो. त्यामुळे त्यांना तोंड लपविण्याची आणखी एक नामुष्की पत्करावी लागते
तेच बारबालांचे. फोटो बारमालकांचे, बारमध्ये चैन, हौस, हवस म्हणून जाणाऱ्या आंबटशौकिनांचे यायला हवेत. तसे घडताना दिसत नाही. वेश्यांचे दलाल, कोठीवाल्या मालकीण, मटक्याचे खरे सूत्रधार, बारमालक, जुगार क्लबचे मालक, गिऱ्हाईक यांची छायाचित्रे छापण्याचे, प्रकाशित करण्याचे धाडस, तारतम्य वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी दाखविले तर या वाममार्गास
चांगला प्रतिबंध बसू शकेल. आणखी एक गोष्ट छायाचित्रांसंदर्भात बरेच दिवस माझ्या मनात आहे.
सभा, समारंभात अलीकडे छायाचित्रकार, व्हिडिओ शुटिंगवाले कॅमेरामन आदींची गर्दी वाढत आहे. समारंभाच्या मुख्य क्षणी प्रेक्षक व समारंभ क्षण यामध्ये छायाचित्रकार जी चीनच्या भिंतीसारखी अभेद्य फळी उभी करतात, त्यामुळे कार्यक्रमाच्या मूळ हेतूचाच पराभव होतो. पूर्वी कॅमेरे साधे होते. छायाचित्रकार हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. त्यावेळी ते समारंभाच्या मुख्य क्षणाचा फोटो चपखल टिपायचे. अलीकडे छायाचित्रांकन करणारे कॅमेरे खरं तर अधिक संवेदनशील व सुविधाजनक आहेत. त्यामुळे पाहुण्यांना पोझ घ्यायला लावायची गरज नाही, पण छायाचित्रकारांचे योग्य प्रशिक्षण नसणे, कॅमेऱ्याची साद्यंत माहिती नसणे यामुळे हे घडते असे मला वाटते.
तीच गोष्ट समारंभाचे औचित्यपूर्ण छायाचित्र प्रकाशित करण्याचीही. समारंभ असतो शिबिर, स्नेहसंमेलन, रक्तदान आदींचा. फोटो छापला जातो पाहुण्यांचा. पाहुण्यांचे महत्त्व खरे. पण तो कार्यक्रम ज्यांच्यासाठी असतो त्याचा, उपक्रमाचा, कार्याचा (कार्यक्रमाचा नव्हे) फोटो छापण्याचं तारतम्य आपण बाळगायला हवे. यासंदर्भात संपादक महोदयांनी अधिक लक्ष घालायला हवे. वाढत्या दुर्लक्षामुळे, दादा, अण्णा, बाबा, भाई, महाराज, खंबीर नेतृत्व, समर्थ साथी, पाठिंबावाले, ब्रदूक मंडळाचे थोर, खुर्द सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणमहर्षी, चेअरमन यांच्या छायाचित्रांची चलती सामाजिक तारतम्य नष्टप्राय होत चालल्याचेच संकेत नाही का देत ?
***
एकविसाव्या शतकातील आचारसंहिता
१. पूर्वजांच्या पुण्याईवर जगण्याचा काळ संपल्यात जमा असल्यानं एकविसाव्या शतकात प्रत्येकानं स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२. एकविसावे शतक कार्यसंस्कृतीचे असल्याने प्रत्येकाने प्रत्येक काम मनस्वीपणे केलं पाहिजे.अनिच्छेने पाट्याच टाकल्या तरी देशाची व स्वतःची भरपूर प्रगती होणे सहज शक्य आहे.
३. हे शतक वैश्विकतेकडे झेपावणारं असल्यानं आपण संकुचितपणा सोडून व्यापकतेचा छंद जपायला हवा
४.‘तंत्रशिक्षण' या शतकाचा मंत्र असल्याने कोणत्याही शाखेचे शिक्षण तंत्रशुद्ध घेतल्याशिवाय पर्याय नाही, याचे भान हवे.
५. गतिशीलतेचे वरदान घेऊन जन्मलेले एकविसावे शतक माणसापुढे ताण-तणावाचे आव्हान उभे करत असताना तणावमुक्त जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करायला हवी.
६.‘व्यक्तिस्वातंत्र्य' हा या शतकाचा वेद असल्याने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची वृत्ती आपण अंगीकारायला हवी.
७. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार नि जातीअंताचा प्रारंभ हे एकविसाव्या शतकाचे वैशिष्ट्य असल्याने आपण नियती, परंपरेपेक्षा समकालीन नवसभ्यतेचा पुरस्कार करायला हवा.
८.तर्कशुद्ध जीवनपद्धतीचं हे शतक होणार असल्याने आपले सारे आचार-विचार विज्ञानाधिष्ठित व्हायला हवेत.
९.‘समानतेचं अधिराज्य घेऊन येणारं वर्तमान शतक गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा, स्त्री-पुरुष असे भेद गाडणारं नि सहअस्तित्वाचं शतक असल्याने प्रत्येकाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात खांद्यास खांदा लावून चालण्याचा छंद जोपासला पाहिजे.
१०. एकतंत्राकडून लोकतंत्राकडे अग्रेसर होणाऱ्या या शतकाचे राजकीय,
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याची सहिष्णुता निर्माण करणारे असल्याने परमत सहिष्णुतेची भावना आपणात वाढायला हवी.
११. एकविसावं शतक हे सामाजिक न्यायाचं शतक असल्याने सर्वांचा सर्वदिशी सर्वोदय हे आपलं ध्येय हवं.
१२. मानव अधिकाराच्या एकाधिकाराचं साम्राज्य निर्माण करणाच्या नव्या शतकात आपण उदारमतवादी होणं आवश्यक आहे.
१३. जगाकडे केवळ स्वतःच्या दृष्टीने न पाहता दुसऱ्यांच्या बाजूनेही जग पाहायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे मग आपणास विश्वरूप दर्शन होईल.
१४. एकविसावं शतक भौतिक संपन्नतेचं! तुम्ही तुमच्या पाल्यास सर्व काही द्या. फक्त तुमचे विचार नि स्वप्नं तेवढी देऊ नका. लक्षात असू द्या. तुमचे पाल्य स्वतःचे विचार नि स्वप्न घेऊन जन्मली आहेत.
१५. लक्षात असू द्या हात मागण्यासाठी नसतात तर निर्मिण्यासाठी. सतत नवनिर्मितीचा ध्यास व ध्येय उरी बाळगा.
१६. आत्मकेंद्रिततेचा शाप घेऊन जन्मलेल्या या शतकाचा पराभव करायचा
तर माणुसकीचा छंद जपायलाच हवा.
१७. अवकाशवेधी या शतकात तुमच्या आकांक्षाही अवकाशस्पर्शी हव्यात.
१८. यंत्रांचे साम्राज्य होऊ पाहणाऱ्या एकविसाव्या शतकात सर्वाधिक
किमती गोष्ट कोणती होणार असेल तर ती आहे मनुष्यसंवेदी कार्य! म्हणून तुमचा ‘संवेदन सूचकांक' सतत चढता असायला पाहिजे.
१९. पर्यावरण रक्षणाचे शिवधनुष्य पेलाल तर पृथ्वी परत ‘अमृतभूमी'
होईल.
२०. निसर्ग संपन्नतेच्या ऱ्हासमान शतकात गरज आहे विवेकी नि काटकसरी
जीवनशैलीची. प्रत्येक क्षणी दोनदा विचार करा नि निसर्ग जपा.
२१. लक्षात असू द्या, माहिती नि ज्ञान, विस्तार नि विकास यात फरक
असतो.
***
अश्वत्थाम्याची वणवण
‘इंडिया टुडे' नावाचं इंग्रजी साप्ताहिक आहे. या साप्ताहिकास ३० वर्षे पूर्ण झाली. आपल्या तीन दशकांच्या यशस्वी वाटचालीच्या निमित्ताने या साप्ताहिकाने एक विशेषांक प्रकाशित केला आहे. कालच तो माझ्या हाती आला. त्यात अतिथी स्तंभलेखक म्हणून अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणाऱ्या डॉ. अमर्त्य सेन यांचा ‘पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी' शीर्षक लेख वाचला. सध्या भारतात आरक्षण हा परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आपले विचार या लेखात मांडले आहेत. ते वाचून माझ्या मनात आलेले विचार तुमच्यापुढे मांडत आहे.
भारतीय समाजरचना मोठी गुंतागुंतीची आहे. इथे माणसाची पारंपरिक ओळख जात, धर्म, वंश, पंथ आदींवर होत असते. त्यामुळे इथल्या राजकारणाचे आधार घटकही तेच होतात. जगभर माणसाची ओळख अनेक घटकांच्या आधारे होते. शिक्षण, पद, प्रतिष्ठा, कर्तृत्व, व्यवसाय असे अनेक आधार जगभर प्रचलित आहेत. आपणाकडे अजून आपण जात, धर्म आदी पलीकडे पाहण्यास तयार नाही. मागासवर्गीय, अन्य आर्थिक दुर्बल घटक, भटके, विमुक्त आदींना आरक्षण देण्यामागे त्यांना सवलती देऊन समाजाच्या मध्य प्रवाहात आणण्याचे लक्ष्य होते नि आहे.
पूर्वसुरी प्रस्थापितांनी दलितांवर अनन्वित अन्याय, अत्याचार केले ते निषेधार्यच! त्यांना सवलती मिळायलाच हव्यात पण ज्यांना सवलती मिळाल्या, जे समृद्ध झाले त्यांनी समाजातील इतर दलित, वंचित,आर्थिकदृष्ट्या नाडलेल्यांसाठी दोन पिढ्यांच्या पर्याप्त लाभानंतर स्वेच्छा सवलती नाकारून अन्य गरजूंसाठी या सवलतीची आरक्षित पदे, योजनांचे
लाभ, स्वेच्छा नको का मोकळे करायला? स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षात सवलतींमुळे भारतीय समाजव्यवस्थेच्या सामाजिक न्यायाच्या परिघाबाहेर जे होते, ते परिघावर आले. जे परिघावर होते ते त्रिज्येवर आले. जे त्रिज्येवर होते ते समाज मध्यावरही आले; पण समाजाचा एक असा वर्ग आहे की, त्यांना अजून समाज व शासनाने पूर्ण नाव, जात, धर्म, नागरिकत्व अशा माणूस ओळखीच्या खुणाही बहाल केलेल्या नाहीत. त्यांना सवलत, आरक्षण नाही.
अशा अनाथ, अनौरस, निराधार, दारिद्रयरेषेखालील कुष्ठग्रस्त, वेश्या, देवदासी यांची आपद्ग्रस्त अपत्ये, परित्यक्तांची मुले या सर्वांनी अजून किती वर्ष अश्वत्थामा बनून वणवण फिरत न भरून येणाऱ्या जखमेसाठी तेलाचा जोगवा मागायचा, त्यांच्या सामाजिक न्यायाचे काय? ‘इंडिया टुडे'च्या वरील अंकातील लेखात अमर्त्य सेन यांनी ‘वंचित एकता' ही सामाजिक समतेची गुरुकिल्ली मानली आहे. जगातील अनेक लढे हे वंचितांच्या संघटित प्रयत्नाने यशस्वी झाल्याचे त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी दिलेले सामाजिक, राजकीय लढे, त्यांचा आधार भावनिक राजकारणाचा नव्हता. ते अन्याय व विषमतेच्या विरोधात उभे होते. अन्याय व विषमता सतत एकाच वर्गात होत राहतात असे नाही. कालपरत्वे पुलाखालून बरंच पाणी वाहून जातं. सामाजिक संदर्भ बदलतात. समाजात परिवर्तन, स्थित्यंतरे होतात. सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीचे मार्ग, निकष, काळ, आदींची गणितेही कालपरत्वे बदलतात. बदलांचे भान ठेवून जो समाज आपल्या सामाजिक न्यायाचा पट मांडतो, तो समाज जात, धर्म, वंश आदी पलीकडे जाऊन मनुष्यबळ विकासाचा असा आराखडा तयार करतो की, ज्यामुळे वंचित विकासास पर्याय राहात नाही. आपण काय करणार आहोत?
***
अस्वस्थ प्राजक्त नि नवा अगस्ती
सध्या बालवाडीपासून ते विद्यापीठापर्यंत सर्वत्र प्रवेशाची धांदल सुरू आहे. आपणास हव्या असलेल्या ठिकाणी प्रवेश मिळाला की, विद्यार्थ्यांना नि त्यांच्या पालकांना मिळणारा आनंद लॉटरीपेक्षा खचितच कमी असत नाही. कुणी काही म्हणा, या प्रवेशाच्या अडथळा शर्यतीत माझ्याकडे, माझ्या महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, त्यांचे पालक सर्वांची शिक्षणाची ओढ पाहिली की गलबलायला होतं. एकतर पालकांची आर्थिक स्थिती इतकी ओढगस्तीची असते की, आपल्या मुला-मुलीस पुढे शिकवावं की नाही या तगमगीत पंधरवडा कसा निघून जातो ते त्यांना कळतसुद्धा नाही. चार पैसे कनवटीस बांधून पालक मोठ्या हिमतीने नि कौतुकाने महाविद्यालयाच्या दारात येतात तेव्हा त्यांना 'प्रवेश बंद' (हाऊसफुल्ल!) ची पाटी वाचून जड पावलांनी परतावं लागतं. फुटबॉलसारखं या शाळेतून त्या शाळेत, या कॉलेजातून त्या कॉलेजात वणवणणारे पालक नि विद्यार्थी आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या विस्फोटाचे विखुरलेले तुकडे, कपटे असतात. ते असतात नव्या संपन्न अर्थव्यवस्थेचे बळी!! ते असतात आयुष्याच्या स्वप्नभंगाचं अस्वस्थपण वागवणारे ओझेकरी! विक्रमाच्या खांद्यावर उलटे फरफटणारे आधुनिक वेताळच ते!
प्रवेशाच्या झटापटीत मुलांशी बोलणं होतं. प्राजक्त तिसऱ्या वर्षात प्रवेश घ्यायला आला होता. गेल्या दोन वर्षांपासून मी त्याला पाहात आलोय. सालस, समंजस, अबोल पण हुशार. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच बोलला. जे बोलला ते ऐकून त्याच्या अबोलपणाचं रहस्य उलगडलं.
व्यसनी पालक, घराची वाताहत, शिकण्याची दुर्दम्य इच्छा. पैसे नव्हते, पण प्रवेश हवा होता.
नूरजहाँ झोपडपट्टीत राहते. वडील सेंटिंगचे काम करतात. कॉलेजात जाणारी ती तिच्या वस्तीतली पहिली मुलगी. अवघे पंचवीस रुपये मुश्किलीने तिने जमवून आणलेले. कॉलेजची फी पाचशेच्या घरात. आकडा ऐकून तिला भोवळ यायची तेवढी राहिलेली.
सुषमा नि राधा एकाच घरातील दोन बहिणी. दोघींना शिकवायची पालकांची इच्छा, पण कसंतरी जमवून एका मुलीची फी भरू शकू म्हणून दाताच्या कण्या करणारे तिचे पालक म्युनिसिपालटीत झाडू कामगार !
रमेश उस्मानाबादहून आलेला. इथे नोकरी करून शिकणार होता. आला तेव्हा वाटखर्चाइतकेच पैसे घरातून भांडून घेऊन आलेला. माझ्याकडे प्रवेश नाही म्हटल्यावर त्याचं अवसान गळालं. त्याची अस्वस्थता, त्रेधा पाहून विचारलं तेव्हा म्हणाला, ‘प्रवेश राहू द्या सर, परतीचं पैकं बी न्हाइयात!'
असे कितीतरी अस्वस्थ प्राजक्त मी अनुभवले तेव्हा या देशाचं एक भीषण वास्तव माझ्या लक्षात आलं. आपला देश २०२० सालापर्यंत जगातील महासत्ता बनणार आहे. आपल्या देशाची महासत्ता कोणत्या क्षेत्रात असू शकेल याचा विचार करता करता लक्षात येतं की लोकसंख्या, दारिद्रय, विषमता, निरक्षरता याच क्षेत्रात आपली अजेय महासत्ता असणार. हे सारं चित्र बदलायचं तर आपण नियोजनाकडे (केवळ कुटुंब नियोजनाकडे नव्हे!) लक्ष द्यायला हवे; अन्यथा मुंबईचाच नाही, भारताचा समुद्र झाल्याशिवाय राहणार नाही. आज देशास हवे आहे, देशास घेरलेल्या लोकसंख्या, दारिद्रय, विषमता, निरक्षरता, अव्यवस्था, अनास्था, नि अस्वस्थतेचा समुद्र हटवणारे नवे अगस्ती!
***
शिक्षक : पेशा, व्यवसाय की धर्म?
इथल्या श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचं एक छोटं, धडपडणारं हायस्कूल आहे. देशभूषण विद्यामंदिर त्याचं नाव. तिथे एम. डी. मधभावे नावाचे एक मुख्याध्यापक होते. अवघे वर्षभर मुख्याध्यापक, पण जन्मभर शिक्षक म्हणून हयात गेली त्यांची. परवा त्यांचा निरोप समारंभ झाला. निरोप समारंभाच्या उत्तरादाखल भाषणात ते म्हणाले की, 'मी शिक्षक हा पेशा व्यवसाय न मानता ‘धर्म' मानला होता.' त्यांच्या या वाक्यानं मला अस्वस्थ केलं. आपल्याकडे नोकरी, पेशा, व्यवसायास धंद्याचं रूप आलं आहे. हे सर्व ‘धर्म' म्हणून चालतील तरच देश महासत्ता होऊ शकेल.
‘पेशा' शब्द बाणा, वृत्तीच्या जवळ जाणारा. ‘धंदा' हा उद्योगाजवळ जाणारा. त्यात पैसा हेच ध्येय असतं. धर्म म्हणजे शास्त्रसंमत, न्यायसंगत, विवेकशील कर्म. कधीकाळी शिक्षक होणे, असणे हा धर्म होता. आज तो पेशा, व्यवसाय न राहता धंदा झाला आहे. पूर्वी शिक्षकास देव मानलं जायचं. गावात निवाडा शिक्षक करत. समझोता तेच करायचे. वचनचिट्ठी लिहिणे, पत्रं लिहिणे, पत्रं वाचून दाखविणे, तंटा मिटविणे, वाटण्या करणे, खरेदीखत करणे, मुला-मुलींची लग्नं ठरविणे आदींपासून ते निवडणुकीत गावाचा सरपंच करण्यापर्यंत सारी मदार शिक्षकावर असायची. स्वातंत्र्यानंतर प्रेमचंद, सानेगुरुजी, वि. स. खांडेकर, महर्षी कर्वे यांच्या पठडीतील शिक्षक लोप पावले याचं कारण शिक्षण पंचायती राज्यव्यवस्थेकडे सोपवलं गेलं नि त्याचं जे व्हायचं ते (वांगं) झालं.
याला व्यवस्था जितकी जबाबदार आहे, तितकेच स्वतः शिक्षकही ! अजून तरी शाळा, कॉलेज, विद्यापीठातून प्रयोगशील, उपक्रमशील, संशोधक शिक्षकांनी ते करतील ती पूर्व असं स्वातंत्र्य आहे. अगदी सोपविलेलं काम अंगाला न लागता, खरचटता करायचं म्हटलं तरी भरपूर काही करता येणं शक्य असतं नि आहे. माझे एक शिक्षक होते. प्राचार्य ए. के. भागवत. ते शिक्षकांना नेहमी एक वाक्य सांगायचे. ‘पाट्याच टाका पण भरून टाका'
आज शिक्षकी पेशा धंद्याकडे झुकू लागला आहे तो तासांच्या टोलांमधील टोलवाटोलवीमुळे! आपल्याकडे शासनाची अनुकंपा, संघटनांची हक्ककेंद्री बांधणी, नोकरीतील सुरक्षा नि शाश्वती यांमुळे सरकारी नोकऱ्या, बँका, विमा, शाळा, विद्यापीठे सर्वत्र एकप्रकारची बेफिकीरी वाढली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन कॉलेज, फर्गुसन महाविद्यालय, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था यातून वि. वि. चिपळूणकर, आगरकर, टिळक, कर्वे, भाऊराव पाटील यांनी तसेच म. फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू, विठ्ठल रामजी शिंदे प्रभृतींनी महाराष्ट्रात शिक्षक नि शिक्षणाची हिमालयाएवढी परंपरा निर्माण केली असता तिचं रूपांतर सावलीत का व्हावं? शिक्षणाची झेड. पी. का व्हावी? याचा शोध घेताना लक्षात येतं की आजच्या शिक्षकांनी धर्मावर सोमवार करत जगायचं ठरवलं आहे. काही न करता जगणं हे देशाला जसं परवडणार नाही तसं ते स्वतःच्या जीवनातही सोसण्यासारखं राहीलं नाही. धर्मकर्म संयोग म्हणून जे या पेशात आले त्यांनी आता स्वतःहून स्वतःस धर्मकाट्यावर पारखून घ्यायला हवं, स्वयंमूल्यमापनासारखं दुसरं परिमाण नाही.
श्री. एम.डी. मधभावे अब्दुललाट येथून इचलकरंजीस रोज पायी चालत येऊन शिकले. पहिला तास त्यांना कधीच मिळाला नाही. म्हणून त्यांना गणित सोडून एस.एस.सी. व्हावं लागलं. सी.पी.एड्. झाले. कोकणात शिक्षण झाले. तिथे पैसा फंड जमवून मुलांना पैसे-मासे खाऊ घालून रिझल्ट वाढविले! इथे देशभूषणमध्ये आल्यावर घिसाड गल्ली, अकबर मोहल्ल्यातील न शिकणाऱ्या मुलांना नि घरी बसलेल्या मुलींना शाळेत आणलं, शिकवलं. ते मुख्याध्यापक झाले, पण तासावर जायचं त्यांनी थांबविलं नाही. मुख्याध्यापक झाले, पण कधी झेड.पी.त गेले नाहीत. त्यांना आदर्श शिक्षकाचा कोणताही पुरस्कार मिळाला नाही. कारण शिक्षक होणे हा त्यांचा ‘धर्म होता. ते नुसते मधभावे नव्हते. सद्भावे होते. शिक्षकाचं सद्भावी होणं ही काळाची गरज आहे.
***
झिदान इिंदाबाद?
जर्मनीत नुकतेच विश्वचषक फुटबॉलचे सामने झाले. त्यात फ्रान्स आणि इटलीमध्ये अंतिम लढत होऊन इटलीचा संघ अजिंक्य ठरला. अंतिम सामन्यात फ्रान्सचा कर्णधार झिनेदिन झिदान याने इटलीच्या मार्को मॅटेराझीशी गैरवर्तन केले म्हणून रेडकार्ड दाखविण्यात आले. झिदानच्या गैरवर्तनाबद्दल जगभर निषेधाची लाट उसळली. ते पाहून त्याने नुकतीच जाहीर माफी मागितली आहे.
या सर्व प्रकारात फ्रान्स हादरला. तेथील वृत्तपत्रांनी व वृत्तवाहिन्यांनी झिदानला भंडावून सोडले. त्यांचा एकच प्रश्न होता ‘झिदान तू आमच्या मुलांचा आदर्श होतास ते आम्हाला विचारत आहेत, झिदान असा का वागला? आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचे?' माझ्या दृष्टीने जो देश मुलांच्या पुढील आदर्शाचा राष्ट्रीय प्रश्न म्हणून विचार करतो तो नक्कीच मोठा समजायला हवा. त्यानंतर झिदानने जगाची माफी मागत असताना जे उद्गार काढले ते त्या देशाची आणि झिदानची उंची वाढविणारे होते. तो माफीनाम्यात म्हणाला, “मी त्या दिवशी जे केलं त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. विशेषतः लहान मुलांची. ते कृत्य गैर होते. पण मी जे काही केले त्यात माझी काहीच चूक नाही. मी चूक मान्य केली तर मार्को मॅटेराइझी जे काही बोलला ते योग्य होते असा त्याचा अर्थ निघेल. मला ते मान्य नाही... एखादे कृत्य चुकीचे असेल पण ते करणाऱ्यालाच शिक्षा का? त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्याला शिक्षा का नाही?"
हा माफीनामा मी वाचला नि नकळत माझ्या मनात मी झिदानचा झिंदाबाद सुरू केला. माझ्या दृष्टीने झिदान अशा प्रौढ, सुसंस्कृत पिढीचा
प्रतिनिधी आहे ज्या पिढीस आपल्या दुष्कृत्याबद्दल पश्चात्ताप वाटतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांची माफी मागणे, मुलांची प्रौढांनी माफी मागण्यासारखा श्रेष्ठ संस्कार नाही. त्यात मनुष्य निरहंकारी होतो. खलील जिब्रानने ‘प्रोफेट' या आपल्या महाकाव्यात प्रश्न केला आहे. "त्याला तुम्ही कोणते शासन कराल, की ज्याचा पश्चात्ताप त्याच्या दुष्कृत्यातून अधिक मोठा आहे?"
झिदानने आपल्या माफीनाम्यात विचारलेला हा प्रश्न मला तितकाच महत्त्वाचा वाटतो की चूक करणाऱ्यालाच शिक्षा का? चुकीस प्रवृत्त करणाऱ्याला का नाही? याचाही समाजाने अपराध, शिक्षा, कायदा इत्यादी संदर्भात विचार केला पाहिजे असे मला वाटते. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, “अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी आहे.
झिदानच्या संदर्भात मला वाटते की त्याला काय शिक्षा द्यायची, जो शरीराने हत्या करणारा आहे. पण, ज्याच्या आत्म्याचीच हत्या झाला आहे. त्याचे काय? पश्चात्तापासारखं दुसरं प्रायश्चित्त असूच शकत नाही. अपराध नि शासन ह्या दोन्ही गोष्टी मोठ्या गुंतागुंतीच्या आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करताना गेल्या सहा वर्षात ज्या शेकडो बंदिजनांच्या संपर्कात मी आलो, त्यांच्याशी बोलत असताना मला लक्षात आले की त्यातील अधिकांशांनी क्षणिक क्रोध, प्रतिक्रिया म्हणून अपराध केला आहे. आपण जे केलं त्याचा त्यांना इतका पश्चात्ताप असतो की औपचारिक शिक्षा ही वरवरची गोष्ट राहते. त्यांना सर्वाधिक मोठी शिक्षा असते, त्यांना वारंवार होणारा पश्चात्ताप. पश्चात्तापाच्या प्रायश्चित्तानंतर आणखी शिक्षा द्यायलाच हवी का?
***
वाचन, व्यासंग, संशोधनाच्या कोल्हापूरच्या परिघात अ.ब.क. या संक्षिप्त परंतु संपूर्णतेने परिचित एक गृहस्थ आहेत. अनंत बळवंत करवीरकर त्यांचे नाव. ते सध्या येथील विजापूरकरांच्या एका खासगी कंपनीत हिशेबाच्या वह्या लिहिण्याचे, ऐतिहासिक भाषेत सांगायचे तर खर्डेघाशीचे काम करतात. आयुष्याची सुरुवात ५० रुपये वेतनावर करणारे हे सद्गृहस्थ आज ८० वर्षे पूर्ण करताना मासिक फक्त २००० रुपये कमावतात. सन १९४९ मध्ये इंटर आर्ट्स पास झालेले करवीरकर आजऱ्याहून कोल्हापुरात शिक्षणासाठी येतात. शाळेत मोरेश्वर हुजूर बाजार, सलगर, बाद्रायणी, गिरीधर पंडितांसारख्या शाळकरी मित्रांशी त्यांची गट्टी जमते. ही सारी मुलं वाचणारी. करवीरकरांनाही वाचनाचा छंद जडतो. त्याचं व्यसनात रूपांतर कधी झालं ते त्यांना कळलंसुद्धा नाही!
प्रापंचिक उलाढालीत पोटची मुलं करतीसवरती झाली. एक मुलगा पुरातत्त्व विभागात नोकरी करू लागला. वस्तुसंग्रहालयातील नोकरी त्यानं अधिक चांगली करावी म्हणून करवीरकरांनी आपल्या मुलास ऐतिहासिक साधनांचा अभ्यास शिकवायला सुरुवात केली. मुलाचा अभ्यास काही पुढे सरकला नाही. बेटे से बाप सवाई झाला. त्या वेळी इतिहासकार ग. ह. खरे निवर्तले नि महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रात शिलालेखाचा अभ्यास ठप्प झाला. करवीरकरांनी शिलालेखाचे अ ब क सुरू केले. तेही पदरमोड करून, त्यांना प्राध्यापकांसारखे विद्यापीठ अनुदान आयोगाचे कधी गलेलठ्ठ अनुदान मिळाले नाही. प्राध्यापकांसारखी अंशकालीन नोकरीसाठी पूर्णकालीन पगारही कधी लाभला नाही. विद्यापीठाची ग्रंथालय सुविधा नाही. तरी त्यांनी चक्क तीस शिलालेख उजेडात आणले. शिलालेख संरक्षण नि वाचनाची नवी पद्धत रूढ केली. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील शिलालेखाद्वारे चोल राजाची स्वारी प्रकाशात आणली. त्यांच्या कार्याच्या आधारे डॉ. रत्तींसारख्या महारथींनी इंग्रजीत ग्रंथ लिहिला. तो धारवाड विद्यापीठाने प्रकाशित करून विश्वमान्यता दिली. आज अ.ब.क. यांच्याकडे असे ऐतिहासिक दस्तावेज आहेत की त्यांचा अभ्यास करायला विद्यापीठीय नि पुस्तकी संशोधकांना सात जन्म वेचावे लागतील.
अ.ब.क, यांचे घर म्हणजे अजायबघरच! ते एक-एक चीजा काढून दाखवितात. तेव्हा माझ्यासारख्याची अबब म्हणत बोबडी वळते. शेणवी, सारस्वत समाज नि शिवाजी महाराज, करवीर गॅझेट दुरुस्तीच्या महायज्ञाचा प्रारंभ, जे. पी. नाईक प्रभृतींसारख्या महनीय व्यक्तींच्या जीवनप्रसंगांची दुर्मीळ छायाचित्रे, अनेक दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते यांच्या पसाऱ्यात सतत हरविणारे अ.ब.क. म्हणजे खरे करवीरभूषण! येत्या ३१ जुलैला त्यांच्या वयास ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना लाभलेल्या सहस्रचंद्रदर्शन योगाबद्दल त्यांचे बुके देऊन अभिष्टचिंतन करणे मात्र उपचार होईल. त्यांना चिंता आहे आपल्याकडील बुकांचं, साधनांचं काय करायचं? करवीर नगर वाचन मंदिर, शिवाजी विद्यापीठसारख्या संस्थांनी पुढे येऊन त्यांची चिंता दूर करावी. त्यांनी जपलेल्या चिजांचं चीज व्हावं, अन्यथा कोल्हापूरकरांना आपल्या इतिहासाचा प्रारंभ परत अ ब क नी करावा लागेल.
***
एका जंगलाची कथा
परवा शिवाजी विद्यापीठात सुविख्यात बालसाहित्यिक गोविंद गोडबोले भेटले. भेटताच त्यांनी आपल्या बॅगेतून मुलांसाठी लिहिलेलं आपलं पॉकेट बुक काढून दिलं. मूल्य १ रुपया फक्त (एकविसाव्या शतकात १६ पानी पॉकेट बुक चक्क एक रुपयाला मिळतं! आहात कुठं?) हा पराक्रम करून दाखवला आहे ‘गर्जनाकारां'चे नातू सतीश पाध्ये यांनी. त्यांचं शब्दवेल नावाचं प्रकाशन आहे. आपल्या प्रकाशनतर्फे ते संत तुकारामांचे एक-एक व्यावसायिक प्रयोग करतात अशी आता खात्री झाली आहे.
‘एका जंगलाची कथा' असं त्या छोटेखानी खिसा पुस्तकाचं नाव. त्यात एकही जोडाक्षर नाही. कोणत्याही मुलाला अथवा साक्षराला ते पुस्तक पाच मिनिटात वाचून संपविता येतं. जंगलातल्या वाघाची गोष्ट खरी, पण ती माणसाला पर्यावरणाचं, विकासनीतीचं भान देते. पुस्तकं महाग असतात, मोठी असतात, दुर्बोध असतात, म्हणून पालक विकत घेत नाहीत व मुलं वाचत नाहीत. कॅडबरी, बिस्किट, टॉफी, लेज, पॉपकॉर्नपेक्षा किती तरी स्वस्त (खरं तर फुकट!) असलेलं पुस्तक सर्वांनी मस्त वाचायला हवं!
या पुस्तकावरून आठवलं. पन्नास वर्षांपूर्वी वाचकांचं जंगल घनदाट होतं. पुस्तकांची जाळी दाट होती. वाचक वाघासारखा पुस्तकांचा फडशा पाडायचे. देशी साहित्याची चलती होती. हऱ्या-नाऱ्यासारखे सवंगडी, चंदू, गोट्यासारखे नायक, चिंगीचं लग्न, सूरपारंब्या, काचकवड्या, भातुकली, लपंडाव सारं साहित्यिक विश्व या मातीतलं होतं. आता हॅरी पॉटर आला.
लाकडाची बाहुली जाऊन डोळे मिचकावणारी (व मारणारीही) बार्बी डॉल आली. अॅटो टाईजचा जमाना आला.
किल्ली फिरवली की जग फिरू लागलं! या सर्वात सानेगुरुजींच्या ‘गोड गोष्टी', ना. ग. गोरेंचं ‘करवंद', पंडित नेहरुंचे ‘इंदिरेस पत्र', वि. स. खांडेकरांचं ‘सूर्यास्त', विंदांची ‘बालगीतं' कुठे हरवली ते कळलंसुद्धा नाही.
हे वर्ष प्रेमचंदांचं शतकोत्तर रजत वर्ष, प्रेमचंदांनी मुलांसाठीच्या ‘ईदगाह', ‘बडे भाईसाब' सारख्या कथा लिहिल्या. त्यांच्याप्रमाणे महादेवी वर्मांनी हिंदीत ‘घीसा' या शिकू इच्छिणाऱ्या मुलाचे शब्दचित्र रेखाटून प्रत्येक वाचकाचे डोळे पाणावले. त्यांचंही जन्मशताब्दी वर्ष. 'अपना अपना भाग्य' मधून बालमजुराचं दुःख रेखाटणाऱ्या जैनेंद्र कुमारांचंही शताब्दी वर्ष!
या साऱ्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या साहित्याला ओहोटी लागताना पाहून आश्चर्य वाटतं. वनातच जंगलतोड झाली असती तर वृक्षारोपणाने भरून काढता आली असती. मनात झालेल्या जग तोडीला हृदयारोपणाने समृद्ध करण्याचा उपाय अजून माणसाच्या हाती यायचा आहे. तोवर तरी वाचनाचे जंगल दाट, घनदाट करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या घुसखोरीत या मातीत न रूजणारी जर्मिनेटर येऊ घातली आहे. पेंग्विन, ऑक्सफर्ड, केंब्रीज, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्रकाशन व वितरण संस्था भारताच्या समृद्ध बालपणावर डल्ला मारू पाहत आहेत. नवश्रीमंतीच्या कैफात आपल्या मुलांच्या हाती बंदुका देणाऱ्यांनी रुपया किमतीची लाखगुणी पुस्तकं अव्हेरली तर ती आपली बौद्धिक दिवाळखोरी ठरेल. शिवाय पिढीची केलेली कत्तलही! हे होऊ द्यायचं नसेल तर मुलांना सांगितलं पाहिजे, “देशी वाचाल तर परदेशात वाचाल."
***
भारतीय समाजजीवनाची एक विशेषता आहे. इथं सारं व्यक्तीकेंद्रित आहे. घरापासून राष्ट्रापर्यंत व्यक्ती बदलली की कार्य, पद्धती, परिणाम बदलतात. अलीकडे शिवाजी विद्यापीठाचा चेहरा बदलतो आहे. त्याचं कारण विद्यापीठाला लाभलेलं दूरदर्शी नेतृत्व. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंंखे यांना कुलगुरू झालेल्या पहिल्या दिवसापासून मी जवळून पाहात आलो आहे.
सतत नवा विचार करायचा. काळाच्या पुढे जाऊन पाहायचं. विकासाची सामूहिक कल्पना करायची. प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचं. राजकारण, गट, तट यांना बगल द्यायची. काम करणारी माणसं हेरायची. त्यांना स्वातंत्र्य द्यायचं. सकारात्मक दृष्टी ठेवायची. हे सारं करताना संस्थात्मक शिस्त सांभाळायची. कोणाही व्यक्तीबद्दल मनात किल्मिष ठेवायचं नाही. दूरचं पाहायचं. सूक्ष्म नियोजन करायचं. कार्यवाहीत मात्र सूट नाही द्यायची. त्यांच्या या साऱ्या गुणविशेषतांमुळे विद्यापीठ म्हणजे नव उपक्रमांचं ऊर्जा केंद्र झालं.
विद्यार्थ्यांचं ऐकलं जाऊ लागलं पण ऐकण्यात विवेक पाळण्यात आला. लोकप्रिय घोषणांपेक्षा लोकहिताचा विचार महत्त्वाचा मानण्यात आला. शिकू इच्छिणाऱ्याला मार्ग मिळाला.'मागेल त्याला काम' योजना अंमलात आली. विद्यापीठाचे संगणकीकरण झालं.
एकविसाव्या शतकास साजेसं तंत्रज्ञान प्रशासनात आलं तसं अधिविभागातही! पहिल्या दिवसांपासून विभागात तास होण्याचा चमत्कार घडला. प्राध्यापकांचं प्रगती पुस्तक तयार झालं. ते विद्याथ्र्यांनी तयार
इतकं सारं एक माणूस बदलण्यानं घडलं. ही खचितच आनंदाची गोष्ट होय. भारतीय समाजजीवनात व्यक्ती बदलली की संस्थेचा चेहरा बदलतो ही गोष्ट सार्वत्रिक अशी, तशी सार्वकालिकही राहिली आहे. व्यक्ती म्हणूनच तिचं कार्य गौरवाचं खरंच! मला या निमित्तानं असं सुचवावंसं वाटतं की, माणसं, यंत्रणा तीच असताना माणूस बदलला की संस्थांचे चेहरे का बदलतात? याचा विचार व्हायला हवा. (संशोधन नको.) संस्थांची घडण, कार्यपद्धती, विकास प्रक्रिया महत्त्वाची मानून अशी कार्यसंस्कृती नि शैली रुजावी की तो माणूस बदलला तरी ती कायम राहावी. विद्यापीठाचा कारभार सुदैवाने कायदा, नियम, अधिसभा, विधी सभा, विद्वत सभा, व्यवस्थापन मंडळ, अभ्यास मंडळ अशा अनेकविध सामूहिक प्रयत्नांचा गोफ आहे. असे असताना माणूस बदलला की संस्थेचा चेहरा का बदलावा, तो चांगल्या अर्थाने कायम का राहू नये? परंपरा, गौरव, विकास आदींचा चेहरा कायमचा का होऊ नये? चूक कशात आहे? व्यक्तीत, संस्थेत, समाजात की आपल्या मनात?
‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद (उद्देश) नहीं है,
मेरी कोशीश है की, यह सूरत बदलनी चाहिए।'
- दुष्यन्तकुमार
***
आकांक्षांचे हेलिकॉप्टर
रोजच्याप्रमाणे आजही डायनिंग टेबलवर वर्तमानपत्र होतं. मी सपत्नीक पहिला चहा घेत होतो. वर्तमानपत्रांत सर्वात वर सैनिकांनी वाचवलेले पूरग्रस्त हेलिकॉप्टरमधून बाहेर पडत असल्याचे हृदयद्रावक छायाचित्र होते. मी व पत्नी आम्ही दोघेही पूरग्रस्तांच्या दुरावस्थेबद्दल कितीतरी वेळ बोलतच राहिलो होतो. आपणास काय करता येईल अशी चर्चा होती. तेवढ्यात मोठी सून आली. तिनं वर्तमानपत्र उचललं नि म्हणाली, “पूरग्रस्तांची मजा आहे नाही? हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळालं." मी सुनेस पूरग्रस्तांचं दुःख समजावत असताना ज्येष्ठ चिरंजीव आले. एखादा शब्द इकडे तिकडे असेल. तोही म्हणाला, “पूरग्रस्त खुश असतील. हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळालं." मी त्याला पूरग्रस्तांची दैना समजावत होतो. तितक्यात कनिष्ठ चिरंजीव आले. वय वर्षे पंचवीस. तोही तसंच काहीसं म्हटला. मला नि माझ्या पत्नीला जे वाटलं ते मुला-सुनेस वाटलं नाही. असं का व्हावं? एक घटनेच्या दोन भिन्न, टोकाच्या प्रतिक्रिया का याव्यात?
मी विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलं... माझी नि माझ्या मुलांची पिढीही स्वातंत्र्यानंतरच जन्मली नि वाढली पण दोन पिढ्यांच्या वाढीची परिस्थिती मात्र भिन्न होती. माझी पिढी वाढत असताना देश गरीब होता, भूकबळी व्हायचे, दुष्काळ पडायचा, धान्य आयात केलं जायचं, रेशनची दुकानं होती, लांबच लांब रांगा असायच्या, पगार तुटपुंजा होता. दारिद्र्य होतं, पण स्वतंत्र देशाचं सुराज्यात रूपांतर करायची जिद्द होती. माझ्या पिढीनं वयाच्या पन्नासाव्या वर्षी समृद्धी अनुभवली. (सन १९९०) ही समृद्धी कष्टसाध्य होती. एक अविकसित देश विकसनशील करत माझ्या पिढीने देशास विकसित देश होण्याच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं. माझ्या पिढीत सर्वच काही आदर्श होतं असं नाही. पण संघर्ष, जिद्द, घडण्याच्या सच्चेपणाबद्दल कुणाला शंका असणार नाही याची मला खात्री आहे.(अगदी आमच्या मुला-सुनांच्या पिढीसही!)
आमच्या पुढची पिढी आणीबाणीनंतर जन्मली. आणीबाणीचं वर्णन देशाचं दुसरं स्वातंत्र्य असं केलं जातं! दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर देशानं मोठ्या गतीनं प्रगती केली. शेतीबरोबर व्यापार, उद्योग, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माझ्या पिढीनं घोडदौड केली. या संपन्नतेची फळे चाखत आमच्या पुढची पिढी पाहता-पाहता प्रौढ झाली.
आमच्या मुला-सुनांच्या वाढीच्या काळात आमच्या पिढीनं एक चूक केली. आपल्या जीवनात जे मिळालं नाही ते मुलांच्या पिढीस दिलं. देताना स्वतःच्या अभावग्रस्त, ओढग्रस्त जीवनाची जाणीव ठेवून भरभरून, एक मागितलं तर दोन दिलं. या पिढीस त्यांच्या वाढीच्या काळात ऊन, पाऊस, थंडी लागू दिली नाही. त्यांना त्यामुळे दुष्काळ नि पुरातील फरकच समजला नाही. सुकाळात वाढणाऱ्या पिढीस परदुःखे शीतल राहतात हेच खरे!
चूक आमचीच झाली असं स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव साजरा करत असताना आमच्या पिढीनं कबुलीजबाब द्यायला हवा. आम्ही स्वसंघर्षाच्या कैफातून आलेल्या समृद्धीचं वरदान नव्या पिढीस देत असताना स्वजीवनात जपलेले संस्कार, संवेदनाही द्यायला हव्या होत्या. त्यांना पूर, दुष्काळ दाखवायला हवा होता. नुसतं आकांक्षांचं हेलिकॉप्टर दाखवत राहिलो. माणूस, जगणं, परपीडाही त्यांना शिकवायला हवी होती. ते राहून गेलं खरं!
***
‘लोकमत समाचार'च्या निमित्ताने...
२० ऑगस्ट २००६. कोल्हापूर-सांगली परिसरात एका नव्या युगाची सुरुवात झाली. लोकमत वृत्तसमूहाने लोकमत समाचार'या हिंदी दैनिकाचा प्रारंभ केला. या परिसरात हिंदी नवी नाही. कोल्हापूर संस्थानचा देवासारख्या हिंदी बाहुल संस्थानाशी असलेला संबंध सर्वपरिचित आहे. इथे मराठ्यांचं राज्य व गादी असली तरी सोयरिक हिंदी राजे, सरदार, उमरावांशी होत राहिल्याने दरबारातही हिंदी बोलण्याची परंपरा होती. छत्रपती शिवाजी महाराजांना तर ‘भूषण' नावाच्या हिंदी कवीस ‘राजकवी' म्हणून मान्यता नि आश्रय दिला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात इथं आर्य समाजास आश्रय मिळाला. तिथं अनेक आर्य समाजी हिंदीभाषी साधू-संत अनुयायी येत. त्यांनी तर इथं चक्क मोफत हिंदी वाचनालय चालविलं होतं. कोल्हापूरचा आजचा ‘श्रद्धानंद हॉल' पूर्वीच्या हिंदी प्रचारप्रसाराचे केंद्र होतं, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.
कोल्हापूर-सांगली परिसरात हिंदी पत्र-पत्रिका निघण्याची परंपराही जुनी आहे. कोल्हापूरजवळच असलेल्या गांधीनगरहून श्री. नोतानी हे ‘देशनूर' नावाचं हिंदी साप्ताहिक काढायचे. मी त्यात काही काळ लिहिल्याचं आठवतं. सांगलीच्या डॉ. गो. रा. कुलकर्णी यांनी 'संबंध' नावाचं भारतीय साहित्यविषयक त्रैमासिक काढलं होतं. त्यातही मला लिहिल्याचं आठवतं पण दैनिक सुरू झाल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरात अवघ्या दक्षिण महाराष्ट्राचं पहिलं हिंदी दैनिक होण्याचा मान ‘लोकमत समाचार'नं मिळविला आहे. त्याचं स्वागत नि अभिनंदन करताना मला एक हिंदी वाचक, अभ्यासक, संशोधक, लेखक, अनुवादक, शिक्षक, प्राध्यापक, संपादक म्हणून आनंद होत आहे.
कोणत्याही प्रांत वा पंचक्रोशीचा विकास भाषेनं होत असतो. ज्या मनुष्य, समुदायांनी अनेकानेक भाषा आत्मसात केल्या त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून अटकेपार झेंडा लावला.
एकभाषी समाज संकुचित राहतो. माणसाचंही तसंच असतं. बहुभाषी मनुष्यच बहुश्रुत होतो. आजचं जग हे विश्वसमुदाय बनत आहे. तुम्हास नुसतं भारतीय भाषा येऊन चालणार नाही तर जर्मन, जपानी, चिनीही यायला हवी. इंग्रजी सर्वांना येऊ लागली आहे. माध्यमांमुळे हिंदी भारताची बोलिभाषा झाली आहे.
हिंदी आपल्या देशाची संपर्कभाषा आहे. ती राजभाषा (कार्यालयीन सरकारी भाषा) ही आहे. ती राष्ट्रभाषा बनविण्याचे लक्ष्य आपणासमोर आहे नि असले पाहिजे. देशाला राष्ट्रभाषा असणे हा केवळ अस्मितेचा प्रश्न नसून अस्तित्वाचाही प्रश्न आहे. विदेशात हिंदी भारतीय भाषा म्हणून ओळखली जाते. जगातील १२५ विद्यापीठांतून ती शिकविली जाते. जगातील तिसरी भाषा होण्याचा गौरव असलेली हिंदी आपली राष्ट्रभाषा होऊ नये यासारखी शरमेची बाब नाही. भाषा राष्ट्रभाषा व्हायची तर त्या भाषेत विपुल दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं निघायला हवीत. 'लोकमत समाचार'ही त्याची सुरुवात आहे. लोकमत समूहाने ‘सहारा समय’ सारखं 'लोकमत समय' किंवा 'लोकमत साप्ताहिकी' सुरू करायला हवं. कोल्हापूरच्या पंचक्रोशीत हिंदीभाषी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, हिंदी अधिकारी, हिंदी भाषी इतके आहेत की त्यांना रोजचं जग हिंदीतून समजून घेणं, वाचणं म्हणजेच आपला देश देशी भाषेतून समजून घेऊन देशविकासातील आपली एतद्देशीय भागीदारी वाटते. 'लोकमत समाचार' सुरू झाल्यानं महात्मा गांधींचं एक स्वप्न पूर्ण झालं. महात्मा गांधी म्हणत, 'देश को देश की भाषा में पढना, लिखना, बोलना चाहिए।'
***
भारतीय समाज उत्सवप्रिय खरा! पण उत्सवात त्याने कालपरत्वे बदल केल्याचेही दिसून येते. तसा तो पुरोगामीही राहिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गावतळी सुरक्षित राहावी, विहिरी बुजू नयेत, नद्या आटू नयेत, पाणीसाठे प्रदूषित होऊ नये म्हणून अनेक पुरोगामी कार्यकर्ते व संघटना निर्माल्य, गौरी, गणपती पाण्यात, नदीत, विहिरीत विसर्जित न करता दान करा म्हणून गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. इतक्या वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर शासनाला या प्रयत्नांचे सामाजिक व कल्याणकारी महत्त्व पटले. आता शासनानेच शाळा-कॉलेजांना परिपत्र पाठवून पाणसाठे प्रदूषित होऊ नयेत म्हणून निर्माल्य, गौरी, गणपतीचे दान करण्याचे आवाहन करून एक पुरोगामी पाऊल टाकले आहे. त्याबद्दल शासनाचे व असे समाजहिताचे प्रयत्न केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अभिनंदन! काही ग्रामपंचायती, नगरपालिका नि महानगरपालिकांनी मोठे गणपती पाणसाठ्यात विसर्जित करण्यासाठी क्रेन, दोरखंड, रक्षक, अग्निशामक दलाचे जवान न देण्याची घेतलेली भूमिकाही कालसंगत होय. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या गणपती विसर्जनात येणारी अडचण लक्षात घेऊन घडीचे गणपती बसविण्याची घेतलेली भूमिकाही मला उत्साहातले विवेकी पाऊल वाटते.
समाजपरिवर्तन व संक्रमणाचा प्रवास पाऊल वाटेनेच सुरू होतो. काळाच्या ओघात आपणच त्याचा महामार्ग करत असतो. तो प्रवास होतो प्रत्येकाच्या घराघरातून, घराघरातील प्रत्येक सुशिक्षित, विवेकी, सुजाण माणसांनी निर्माल्य, गौरी, गणपतीचे विसर्जन न करता दान केले पाहिजे हे लोण सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांनीही आपले गणपती विसर्जित न करता दानाची भूमिका स्वीकारली पाहिजे. अशा मंडळांना स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, शासन यांनी सर्वतोपरी प्रोत्साहन, साहाय्य दिले पाहिजे.
उत्सवातील उत्साह विवेकी असायला हवा. अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्गणी गोळा करताना खुशीची सक्ती करत खंडणी गोळा करण्याच्या पद्धतीकडे झुकू लागल्याचे लक्षात आल्यावर कोल्हापूर पोलिसांनी संचलन करून समाजास अभय देण्याचा केलेला प्रयत्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचे सर्वसामान्य माणसांची उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
सार्वजनिक उत्सावांच्या वर्गणीचा वापरही विवेकाने करायला हवा. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या वर्गणीतील काही हिस्सा सामाजिक कार्यावर खर्ची करतात ही गोष्ट अनुकरणीय आहे. पण याचे प्रमाण अत्यल्प आहे. धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भात पुढाकार घेऊन सार्वजनिक वर्गणीचा २५ टक्के हिस्सा समाजहितकारी कार्यास देण्याची सक्ती केली पाहिजे. चांगल्या कामासाठी सक्ती गैर मानू नये. आपल्या समाजात अनाथ, अंध, अपंग, वृद्धांचे कार्य करणाऱ्या संस्था पैशापैशासाठी धापा टाकत असताना आपण लक्षावधी रुपये रोषणाई, वाजंत्री, मिरवणूक, देखावे आदींवर खर्च करणे कितपत योग्य! याचा विचार आता नव्या मनाच्या शिक्षित व विवेकी तरुण नेतृत्वाने गांभीर्याने करायला हवा. मी स्वतः धर्मनिरपेक्ष. माझ्या घरातील अन्य मात्र धार्मिक. व्यक्ती स्वातंत्र्याच्या काळात हे अटळ, पण आमच्या घरातील मंडळींनी उत्सवाला विवेकी व वैज्ञानिक रूप दिलं. धातूचा गणपती ते पूजतात. पूजेनंतर पुसून ठेवतात. पुढील वर्षी परत पूजतात. आमच्या घरापुरतं निर्माल्य नाही, प्रदूषण नाही. जुन्या प्रथांचं विसर्जन व नव्या प्रथांचा अंगीकार म्हणजे उत्सवांचा विवेकी प्रवास!
***
शांताराम कृष्णाजी पंत वालावलकरांचा काल सहावा स्मृतीदिन अगदी साधेपणानं (खरंतर मौनपणे!) साजरा झाला. ते गेले तेव्हा समाजाने व्यक्त केलेली हळहळ माझ्या डोळ्यांसमोर दिवसेंदिवस अजून जशीच्या तशी तरळते आहे. स्मरणसाखळ्या दिवसेंदिवस क्षीण होत चालल्या आहेत हेच खरे! काल त्यांच्या पुतळ्यास व्रत म्हणून हार अर्पण करताना माझ्या मनात प्रश्न आला - 'मी हे कर्मकांड का करतो?' एकंदरच मनुष्य एखादी गोष्ट व्रत म्हणून का स्वीकारतो? यावर विचार करताना माझ्या लक्षात आलं की प्रत्येक माणसास असं वाटत असतं की आपलं जीवन सर्वगुणसंपन्न असावं. गुणांचा गुणाकार नि दोषांचा भागाकार ही काही सोपी गोष्ट नसते. मग मनुष्य जो गुणाकार आपल्यास जमला नाही त्याची भरपाई गुणपूजेनं करत असतो. गुणांचं अनुकरण होतं म्हणून तर गुणसंवर्धन होत राहतं.
वालावलकर माझ्या लेखी ‘करुणा कल्पतरू' होते. स्वकष्टानं मिळविलेली गडगंज संपत्ती निरिच्छ होऊन महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीने समाजास दान करणं हे बापूच करू जाणे. महात्मा गांधी काय नि वालावलकर काय - ते सर्वांचे ‘बाप' होतात म्हणून ‘बापू!' बापूंना मी वयाच्या दहाव्या वर्षी प्रथम पाहिलं. (१९५९-६०). सन २००० पर्यंत मी पाहात राहिलो. चाळीस वर्षांच्या निकट प्रवासात, सहवासात मी अनेकदा अनुभवलं आहे की त्यांना नात्या-गोत्यांतील माणसांपेक्षा समाजातील इतरेजनांबद्दल अधिक वाटायचं. ही व्यापकता हेच अशा माणसांचं मोठेपण। असतं. दुकानातील कामगारांना ते घरच्या माणसासारखे वागवत. त्यांना अधिकाधिक देण्याकडे त्यांचा कल असायचा. बापू देण्यात धन्यता मानणारे गृहस्थ! पैशांबद्दल अशी निरिच्छता मी सहसा कुठं पाहिली नाही. मागणाऱ्याला देण्यात कसली धन्यता कसली? कोण व्यक्ती, संस्था, गरजू आहे कळलं की ते स्वतः देते व्हायचे. एखाद्या संस्थेस मदत देतो म्हणलं की देईपर्यंत त्यांना चैन नसायची. मी त्यांच्या ट्रस्टचा सचिव असण्याच्या काळात पाहिलं आहे की हा माणूस कर्ज काढून देणग्या द्यायचा. एकविसाव्या शतकात दातृत्वाचे एक एक झरे वाळवंट होत असताना हे कुणाला खरंही वाटणार नाही.
माणसाचं ‘कल्पतरू' होणं, प्रत्येक करुणेचा कल्पतरू होणं हे आगळे रसायन होतं. मी माझ्या जीवनात ‘दाता' होऊ शकलो नाही, पण देता झालो. मला जेव्हा जसं शक्य झालं तसं देत राहिलो, अशी देत राहणाऱ्यांची एक जात आहे. देते कोण होतात? जे प्रथम आपल्या जीवनात ओढग्रस्त असतात. मग ते कष्टकरी होतात. काटकसरीनं संचय करतात. बऱ्याचदा देता यावं म्हणून ते काटकसर करतात. देतात त्यात त्यांना आनंद असतो. या आनंदाच्या तळाला संवेदनेचे लक्ष-लक्ष झरे असतात. देते झाल्यानंतर त्यांना कोण ब्रह्मानंद होतो हे मी जवळून पाहिलं आहे. शां. कृ. पंत वालावलकर, शिवराम हरी गद्रे, भैयासाहेब परदेशी, प्राचार्य लीला पाटील (सृजनानंदी), डी. बी. पाटील, व्ही. बी. पाटील, जे. के. निकम, रा. कृ. कणबरकर, आर. जे शहा अशी मला देते होणाऱ्या माणसांची फौजच फौज आठवते. अशी माणसं सांगली, कोल्हापूरच्या पंचक्रोशीत का घडतात याचा मी विचार करतो तेव्हा लक्षात येतं इथल्या मातीचाच तो धर्म आहे. लोकराज्य शाहू इथच का झाला? या साऱ्यांचं रहस्य इथल्या मातीत मिसळण्यात आहे.
***
गेल्या आठवड्यात मी कोकणपुत्र शां. कृ. पंत वालावलकर यांच्या सामाजिक करुणेबद्दल लिहीलं होतं. आज आणखी एका कोकणपुत्राबद्दल लिहिण्याचा योग येतो आहे. योगायोगाने आज त्यांचा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिन हा आठवांचा उमाळा न होता कृतीचा ओहळ बनून झरझर वाहील तर समाज किल्मिषे नि कोळीष्टके दूर होतील म्हणून हा प्रपंच.
शिवराम हरी गद्रे, शां. कृ. पंत वालावलकर, वि. स. खांडेकर, डॉ. विजय करंडे हे काही असे कोकणपुत्र होते की ज्यांच्याबद्दल कोल्हापूर-सांगली परिसरातीलच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रास त्यांचा आजही अभिमान वाटावा. पैकी डॉ. करंडेच्या रूपाने एक दिवा अजून लुकलुकत आहे खरा! शिवराम हरी गद्रे हे देवरूखचे व्यापारी, कष्टाच्या जोरावर मोठे व्हायचे म्हणून घाटावर कोल्हापुरी आले. सचोटीने व्यापार करून मोठं होता येतं याचा वस्तुपाठ त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला. ते अनेक संस्थांचे आधारवड होते. 'आधी केले मग सांगितले' हे त्यांच्या जीवनाचं ब्रीद होतं. आज कोल्हापुरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी समाज सेवा केंद्र, रोटरी क्लब, बालकल्याण संकुल, महालक्ष्मी धर्मशाळा, खादी ग्रामोद्योग संघ आदी संस्थांमुळे जे सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे, त्याचे श्रेय गद्रे यांच्या उदार साहाय्यास द्यावं लागेल. ते कोल्हापूरचे 'नाना' होते.
वालावलकरांप्रमाणे नानांकडे गेलेला कोणी कधी रिक्त हस्ते परतला नव्हता. कोकणच्या तांबड्या मातीत दातृत्वाचे कण नसावेत असा माझा अंदाज होता. आता मात्र खात्री झाली आहे. गद्रे कुटुंबातच सामाजिक कणवांचे कण सतत का सापडतात? ‘समतानंद अनंत हरी गद्रे यांनी
महाराष्ट्रात ‘झुणका-भाकर' योजना राबवून जाती-भेद दूर करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच बोलावून सहभोजन योजले होते. त्यांच्या नि नानांच्या मातोश्री भागीरथीबाई गद्रे यांनी बत्तीसाव्या वर्षी वैधव्य येऊनही न डगमगता कोकणात 'मातृमंदिर' स्थापून स्त्री आरोग्याचा श्रीगणेशा केला. नानांनंतर त्यांचे चिरंजीव व कुटुंबीय आजही दातृत्व व मातृत्वाचा दिवा विझू नये म्हणून प्रयत्नशील आहेत. नानांचे चिरंजीव चंद्रकांत गद्रेही असेच उदार. त्यांनी इथल्या सागर शिक्षण मंडळाच्या हायस्कूलला बाबूराव धारवाडे यांच्या विनंतीवरून २५ लक्ष रुपयांचे साहाय्य केलं. पन्नास द्यायचे होते. पंचवीस दिले. नावाची अट नाकारली. असं औदार्य गद्रे कुटुंबीयच करू शकतात. बाबूराव धारवाडे यांनी नानांच्या नावे हायस्कूल सुरू करून जिवंत स्मारक उभारले आहे.
नाना, भाऊ, बापू, सर्वांवर महात्मा गांधीचा फार मोठा पगडा नि प्रभाव होता. तिघांनी टोपी कधी सोडली नाही की बदलली नाही. तिघेही मातृहृदयी. नावांचं सामाजिक वजन इतकं मोठं होतं की ते फोनवर बँकेचे लक्षावधीचे व्यवहार करत. चेक नंतर पोहोचायचे. पैसे अगोदर मिळायचे. इथल्या समाजजीवनात शब्दप्रामाण्य, मूल्यनिष्ठा, सचोटी, समाजशीलता, उपजत दातृत्व नि मातृत्व यांचा एक कधीही न आटणारा एक झरा नानांच्या रूपाने सतत झरायचा. तो निमाला. आज त्यांचं स्मरण कृतीसाठी आपणा सर्वांना खुणावतंय! आपणही समाजकार्यासाठी आपल्या कष्टातला एक रुपया रोज देत राहिला पाहिजे.
***
सेवा : सुरक्षा आणि शाश्वती आपल्या समाजात नोकरदार व मजूर मोठ्या संख्येने आहेत पैकी काही संघटित तर काही असंघटित आहेत. संघटितांच्या संघटना असतात. संघटनशक्तीच्या जोरावर नोकरदारवर्गास पगारवाढ, सेवा सुरक्षा, आरोग्य अनुदान, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन असे अनेक लाभ मिळतात. त्यामुळे नोकरदार वर्ग व त्यांचे कुटुंबीय यांना सेवा सुरक्षिततेतून सुखपूर्ण जीवन लाभते. शासन त्यांना सतत महागाई भत्ता, पुढील वेतनवाढ, पदोन्नती देत असते. संघटित क्षेत्रातील नोकरदारवर्गास विशेषतः शासकीय, निमशासकीय सेवकांना सतत वरचा अर्थलाभ होत असतो. नोकरदारांना या सर्व सोयी जनतेच्या करातून शासनास मिळणाऱ्या लाभातून मिळत राहतात. पर्यायाने संघटित व सुरक्षित नोकरदारांना मिळणारा लाभ हा जनताच देत असते. शासन व्यवस्था फक्त माध्यमाचे कार्य करते. शासकीय, निमशासकीय, शासन अंगीकृत, राष्ट्रीयकृत, राज्य, केंद्र सरकारची कार्यालये, बँका, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, नगरपरिषदा, जिल्हापरिषद व तत्सम कार्यालय, संस्था, संघटनांतील कर्मचाऱ्यांना समाजातील अन्य क्षेत्रातील तशाच स्वरूपाच्या नोकरदारांपेक्षा अधिक सेवा, सुरक्षा व स्वास्थ्य असते, हे सारे ज्यांच्या जीवावर आपणास मिळते त्या जनतेशी, जनसामान्यांशी त्यांचा व्यवहार कसा असतो? काही सन्मान्य अपवाद वगळता या सेवा सुरक्षित गटसमूहांकडून कोणती सेवा शाश्वती मिळते? काही दिवसांपूर्वी मी महानगरपालिकेकडून रितसर परवाना घेऊन नियमबद्ध बांधकाम केले. त्याचे पूर्ततापत्र हवे म्हणून मी अर्ज केला. त्यासाठी मी कर थकबाकीदार नाही म्हणून 'ना हरकत प्रमाणपत्र' मला हवे होते. मी सर्व कर, देयके नियमित भरतो. विलंब शुल्क द्यावे लागू नये असा माझा प्रयत्न असतो. नागरी जीवनाचे जबाबदारीने पालन करणाऱ्या माझ्यासारख्या त्वरित आवश्यक ती कागदपत्रे मिळायला हवी का नको? पण असे घडत नाही. अनेक सबबी सांगून चालढकल, विलंब यामुळे आपण माय-बाप जनतेची उपेक्षा करतो हे तेथील नोकरदारांना का वाटत नाही? ओळख असली की काम फत्ते! अनोळखी माणसांनी येरझाऱ्यांनी मेटाकुटीला यायचं? याला सुशासन म्हणायचं का? ज्या क्षेत्रातील नोकरदारांना सेवा सुरक्षा आहे त्या क्षेत्राने जनतेस सेवेची शाश्वती नको का द्यायला? स्वातंत्र्याच्या साठ वर्षांच्या प्रवासानंतर जर हा देश सेवा शाश्वती देणार नसेल तर देश विकसित झाला कसे म्हणायचे? देशविकास म्हणजे सेवाशाश्वती (Service Gaurantee) असे सूत्र व्हायला हवे. लोकशाही देशात सर्वसामान्य माणसास जनताभिमुख शासनाचा प्रत्यय यायला हवा. ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत' एवढ्यावर समाधान मानायचा काळ मागे पडला आहे. 'आम्ही जनतेचे सेवा तत्पर आश्वासक आहोत.' इथवर आपल्या कार्यसंस्कृतीचा विकास होईल तर? ‘शासन तुमच्या दारी' सारख्या सवंग घोषणेपेक्षा सेवा शाश्वतीचा चमत्कृत साक्षात्कारच जनतेस शासनकर्त्यांबद्दल आदरभाव निर्माण करील. त्या सुदिनाच्या प्रतिक्षेत!
***
अंधारातला काजवा
काल मी काही कामानिमित्त महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या कार्यालयात गेलो होतो. ते होतं कोल्हापुरातलं ताराबाई पार्कमधील मुख्य कार्यालय, तिथे ग्रामीण भाग - १ चे कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्यांचं एक छोटं कार्यासन आहे. डोअर क्लोजर नाही, केबिन नाही, ए.सी. नाही, गालीचा नाही, तिथे तुकाराम भिसे नामक एक भाबडे अधिकारी भेटले. त्यांच्या मागे असलेल्या एका फलकाने माझे लक्ष वेधले. लिहिले होते - ‘हे कार्यालय भ्रष्टाचारमुक्त आहे. या कार्यालयाचे काम पारदर्शी व्हावे यासाठी कोणत्याही गैरव्यवहाराचा संशय आल्यास ९८६०१९३९०० वर संपर्क साधावा.' हा फलक, तो लिहिण्याची हिंमत करणारा तो अधिकारी अंधारातला काजवा असला तरी मला त्यांच्यात अंधारलेल्या प्रकाशगडावर स्वार होऊ इच्छिणारा प्रकाशपुत्र वाटला. तो त्याच्यापरीनं एक प्रकाशयात्रा करतो आहे हे पाहून उगीचच या ओळी आठवल्या -
'अंधार फार झाला, पणती जपून ठेवा...'
त्यांनी तो फलक आपल्या अधीन ४६ कार्यालयात लावल्याचं कळलं. कोणतंही चांगलं काम सुरू झालं की टोपी उडविणाऱ्यांची कमी नसते. अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. प्रत्येक माणसाची प्रतिक्रिया म्हणजे त्याच्या आत्म्याचा उजेड वा अंधार असतो.
कुणी प्रशंसा केली, कुणी उपहास, कुणी उपेक्षा. भिसेंच्यातल्या तुकारामावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यानी अंधाराशी आपली लढाई घालून ठेवली आहे.
ते कायद्यापेक्षा विवेकावर भिस्त ठेवतात. कोणी लाईनमन, कुली पैसे घेताना सापडला तर ते सहसा निलंबित करत नाहीत. त्यांचं विवेक न्यायालय कार्यरत होतं. 'हा सूर्य हा जयद्रथ' होतं. ज्याचे पैसे घेतले त्याला ते परत केले जातात. तेही चारचौघांच्या साक्षीनं. पुढे मग तो माणूस माणसाळतो. माणसास माणसाळण्यासारखं लोकशिक्षण नाही. मेमो, विभागीय चौकशीचे फार्स नाहीत. विवेकासारखं फास्ट ट्रॅक कोर्ट दुसरं कोणतं?
तुकाराम भिसे वेडे, वेंधळे नाहीत. त्यांचा स्वतःच्या भाबडेपणावर प्रचंड विश्वास. पाप, पुण्य, प्रायश्चित्ताचं त्यांचं एक व्यवहारी अध्यात्म आहे. त्यापुढं सैतानही हात टोकतो. असा अनुभव तुकारामांचा विवेक कुणी अनुल्लेखांनी मारला, कुणी उपरोधानी; पण आपला विवेक रक्तबीजासारखा अमर्त्य आहे यावर त्यांची अटळ श्रद्धा आहे.
त्यांच्यात मला माणूस भेटला. म्हणून ते ‘धनगरवाडा' प्रकाशित करू शकले. लोकांनी अभिनंदनाची फुलं दिली, ती त्यांनी खुर्चीच्या परंपरेस वाहिली. ते रोज आपल्या पूर्वसुरींचे स्मरण करतात नि म्हणतात, 'ही खुर्ची जनतेच्या सेवेचं सिंहासन आहे. ते भ्रष्ट होता कामा नये. माझा विवेक ढळू देऊ नको' एकदा ते एकाक्षणी लढून हरले. ठरवलं आपणही पैसे घ्यायचे. त्यांनी मागून बघितले. त्यांना कुणी पैसे द्यायला धजलं नाही. त्यांच्या लक्षात आलं, नागड्यांच्या राज्यात अजून कापडाची शर्म शिल्लक आहे. जव्हार, मुखेडसारख्या कुणी न जाणाच्या ठिकाणी मागून बदली घेणारे तुकाराम भिसे हे कलियुगातील धर्मराज होत.
मूर्खांच्या नंदनवनातील शहाणी माणसं अपवादानं जन्मतात म्हणून सभ्यता, सचोटी, सज्जनपणाच्या पाऊलखुणा मागं राहतात. मग असा एक प्रकाशपुत्र जन्मतो. तो पणतीच्या नम्रतेनं सूर्याचा अहंकार दूर करत राहतो नि म्हणून शरदाच्या चांदण्याला बहर येतो. 'प्रकाशयात्रा' नावाचं आठ पानी मासिक आपल्या परीनं अंधाराच्या अष्टदिशा हटवत राहतं एक काजवा बनून सांगत राहतं. सूर्य बनता न आल्याचा विषाद विसरून जा. काजवा बनू शकलो याचा ब्रह्मानंद मिळवा. एक दिवस असा येईल, अंधारलेला ‘प्रकाशगड' स्वयंप्रकाशित होईल.
***
महात्मा गांधींना अनावृत्त पत्र
संपादन श्रद्धेय बापू,
सादर प्रणाम
तुम्हास हे पत्र मी पोस्टानेच पाठविणार होतो, पण ते वेळेत तुम्हास मिळेल याची खात्री नाही. स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षांत पोस्टाने येथील सामान्य माणसास सेवा अनुभवाने जिंकले नाही, जिंकता आले नाही. तुमच्यावर त्यांनी किती तिकिटे, कार्ड, पाकिटे काढली तरी! कुरियरनी पाठवायचे म्हटले तर ती सेवा इतकी महागडी आहे की सामान्य भारतीयाला ती परवडत नाही. म्हणून हे अनावृत्त पत्र! सुदैवाने वृत्तपत्र रोज नि वेळेवर प्रकाशित होत आहेत, नि स्पर्धेमुळे स्वस्तही आहेत.
आज हे अनावृत्त पत्र लिहिण्याचे कारण खरंतर अस्वस्थता हेच आहे. तुमचे विचार, आचार हा माणसाचा रोजचा व्यवहार झाला तरच तुम्हाला अपेक्षित खरा भारत आकारास येईल. तसे घडताना मात्र दिसत नाही. एका चित्रपटाचं प्रदर्शन झालं की नवी फॅशन येते, तसं तुमचं येणं (नि जाणंही) ही काही परिवर्तनाची नांदी नव्हे! शिवाय या परिवर्तनाची नांदी ठरणारे ‘हिरो’, त्यांचा इतिहास, त्यांचे चरित्र, त्यांच्या दोन ऑक्टोबरच्या दिवशी प्रसिद्धीमाध्यमातून प्रक्षेपित झालेल्या मुलाखती सारा एक राजकीय उथळ बनाव होता.
गांधी जयंती ही या देशात 'ड्राय डे' म्हणून भारतीयांच्या मुळावर उठत असेल तर असली दारूबंदी न केलेलीच बरी. एका गालावर थप्पड़ दिल्यास दुसरा पुढे करण्याचा तुमचा संयम, हृदयपरिवर्तनाचा मार्ग जर कोणी तिसऱ्या थपडेनं पराभूत करत असेल तर इथे अहिंसा कशी नांदणार?
बापूजी, तुम्हाला आमच्यातून निघून जाण्याला सहा दशके लोटली. आम्ही इथे तुमचे पुतळे, वस्तुसंग्रहालये उभारली, ती नव्या पिढीस तुमचं चरित्र, विचार कळावेत म्हणून. त्यांची दुरवस्था पाहिली की तुमच्या त्यागावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी काय म्हणावं ते सुचत नाही. बऱ्याचदा वाटत राहतं की तुम्ही अन्य देशांत जन्मता तर ते देश किती बदलले असते. तुमचं प्रासंगिक स्मरण, तेही कर्मकांड म्हणून माझ्यासारख्याला सतत सलत राहतं.
हे खरं आहे बापूजी, माझी पिढी तुमचा साधेपणा पचवू शकली नाही, पण अजून किती तरी दिवे सच्चेपणाचे काजवे बनून लुकलुकत आहे. त्यांनी पावलापुरता प्रकाश मानून व्यक्तिगत जीवनात त्याग, मूल्यवत्ता, सचोटी पाळली आहे. अजून या देशात अण्णा हजारे, मेधा पाटकर, न्यायालयीन, सामाजिक लढाया हरले तरी लढत आहेत. माझ्यासारखे अनेक शिक्षक पाट्याच टाकतात, पण भरून टाकतात ते बापू तुम्हासच स्मरून! अजूनही पोलीस खात्यात लाच न घेणारा शिपाई दिसतो नि लक्षात येतं अजून कवडसा जिवंत आहे. उद्या नक्कीच पूर्ण सूर्य येईल. मी माझं काम चोख बजावत, जेवढे मला दुसऱ्यासाठी, प्रसंगी पदरमोड करून जे करता येईल ते करत राहतो. अशी शेकडो माणसे बापूजी, या देशात आहेत. मला वाटतं त्यांच्या जीवनावर क्षणिक चित्रपटापेक्षा तुमच्या अमर चारित्र्याचा ठसठशीत प्रभाव आहे म्हणून शेकडो मानव भाई लगे राहतात. 'लगे रहो मुन्नाभाई'चा हेतू साध्य झाला आहे. जगात हेतू शुद्ध असून चालत नाही. शुद्धता नि शुचितेचं सातत्य हे मला कळून आलेलं तुमचं चरित्र! ते इतरांना कळायला काय करावं लागेल?
तुमचा,
एक अनुयायी.
***
माय टीचर गुटखा
माझ्या हातात निळ्या, पिवळ्या चकचकीत कागदाची पाऊच (पुडी) आहे. तिच्यावर लिहिलंय ‘माय टीचर गुटखा.' माझ्या एका तरुण सहकारी प्राध्यापकांनी मोठ्या भांबावलेल्या अवस्थेत ती पुडी माझ्या हाती सोपविली नि म्हणाले, 'मला काही सुचत नाही हे सारं बघून!' (असे अस्वस्थ, भांबावलेले, भाबडे तरुण या व्यवसायात येत आहेत हा किती मोठा आशेचा किरण आहे म्हणून सांगू.)
चौकशी करता कळलं की बाजारात एक नवीन गुटखा लाँच झालाय. ‘माय टीचर गुटखा' हे त्याचं नाव. अशी अक्षरं छापलेले टी-शर्ट घालून काही तरुण विक्रेते शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या अवती-भवती फिरून प्रचार प्रसार करत आहेत. नावावरून लक्षात येतं की त्यांचं टार्गेट ग्रुप मास्तर, शिक्षक, प्राध्यापक आहेत. एकदा का मंडळींना पटवलं (खरंतर गटवलं!) की मग विद्यार्थ्यांना गटवणं सोपं! गुरूसारखी दुसरी दीक्षा नाही! इसे कहते है मार्केट स्टॅटेजी!!
गुटका, गुटी हे शब्द मुळातले आयुर्वेदातले. पूर्वी बाळ गुटी, पाचक गुटका असायचा. पुढे अर्क आले. (बहुधा अर्कशाळा आल्यावर) 'कुमारी आसव' अशी औषधं आली. नंतर इंग्रजी औषधांबरोबर ‘डॉक्टर्स ब्रॅंडी' आल्याचं आठवतं. ती क्षयरोग्यांना डॉक्टर लिहून द्यायचे. पुढे डॉक्टर्सच ती घेऊ लागले. तसंच गुटख्याचंही झालं. ऑक्सफर्ड पॉकेट डिक्शनरी बाजारात आली ती कोटाच्या खिशात मावणारा संदर्भ ग्रंथ असावा म्हणून गोरखपूर प्रेसनी त्याच धर्तीवर ‘रामचरितमानस गुटका', ज्ञानेश्वरी गुटका' काढला, तो वाचकांच्या खिशात हे ग्रंथ नेहमी राहावे म्हणून. पूर्वीच्या शिक्षकांच्या
कोटाच्या खिशात एक डिक्शनरी असायची नाही तर धर्मग्रंथ! आता माणिकचंद साहेबांनी ‘बीग बी'ला हाताशी धरून 'ऊँचे लोगोंकी ऊँची पसंद' सांगत पानमसाले, गुटखे बाजारात आणले. पाचव्या वेतन आयोगानंतर अन्य नोकरदारवर्गाबरोबर शिक्षकही ‘ऊँचे लोग' झाले. त्यांची पसंत पुस्तकांच्याऐवजी पान पराग, गुटखा, आसव, अर्क झाली. त्याचाच परिणाम म्हणजे 'माय टीचर गुटखा' होय. एकदा वाढत्या वेतनाच्या विनियोगाचा अभ्यास व्हायला हवा. सहाव्या वेतन आयोगाबरोबर विनियोगाच्या शर्ती आणण्याची अनिवार्यता आज निर्माण झाली आहे. अमीर खान हल्ली कोकाकोला आरोग्यवर्धक, शुद्ध, निर्जंतुक आहे असं सांगू लागल्यामुळे हे आवश्यक झालं आहे.
‘माय टीचर गुटखा' मनात घोळत असतानाच मराठी साहित्यातील गाढे संत साहित्य अभ्यास, संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे भेटले. त्यांची कन्या मराठी कवयित्री डॉ. अरुणा ढेरे ही भेटल्या. ते सांगत होते - त्यांच्या घरी चाळीस हजार ग्रंथ आहेत. इतके ग्रंथ काही कॉलेज ग्रंथालयातही नसतात. त्यांच्या घराचा रंग दिसत नाही. जाल तिथे पुस्तकांचे ढीग. एक हिंदी साहित्यिक त्यांच्या घरी आले होते. म्हणाले, “आपके घर में सर्वत्र पुस्तकों के ढेरही ढेर है। तभी आपका नाम ढेरे होगा।' असं नाव सार्थ करणारी किती शिक्षकांची घरं दिसतील? मी त्यांना व्याख्यानाला बोलाविलं. त्यांनी निक्षून नाकारलं. म्हणाले, ‘बोललेलं हवेत विरून जातं. लिहिल्याचा इतिहास होतो. इतिहासातून संस्कृती जन्मते. संस्कृती माणूस घडवते. मी झोपेतही वाचतो, लिहितो असा भास होत राहतो. नुसतं बोलत राहणं, म्हणजे आयुष्य वाया घालवणं.' त्यांचं हे सारं बोलणं मी गुटखा समजून गिळत राहिलो. मला माझा ‘माय टीचर गुटखा' मिळाला. अलीकडे ‘अक्षर निष्ठांची मांदियाळी' (डॉ. अरुण टिकेकर), 'लोकसत्ता'चे,'चतुरा'चे वाचन संस्कृती अंक, ‘साधना'चे ‘वाचनसंस्कृती अभियान अंक’, ‘लोकवाङ्मय वृत्त'मधील सतीश काळसेकरांची वाचकांची रोजनिशी' सारखी सदरं माझे गुटखे झालेत. तुमचे?
***
‘अक्षरधारा' घरोघरी
मराठी समाज मानसात अक्षरांचं प्रेम नवं नाही. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, बहिणाबाई सर्वांनी शब्दांचं महात्म्य प्रत्येक मराठी मनात कोरलं आहे. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।।' म्हणत तुकारामांनी जागवलेला शब्ददीप नंदादीपासारखा आजही तेवत राहतो त्याचा आनंद काय वर्णावा? मराठी घरा-घरांत पुस्तक नेण्याचं ऐतिहासिक कार्य ढवळे ग्रंथयात्रेनं केलं. आज तेच कार्य ‘अक्षरधारा ग्रंथयात्रा करत आहे. ‘अक्षरधारा' ग्रंथयात्रेच्या प्रवासास बारा वर्षे परवा १३ ऑक्टोबर २००६ ला पूर्ण झाली. त्यानिमित्त ही ‘अक्षरधारा' तपपूर्तीचा आनंद ‘माय मराठी शब्दोत्सव' योजून साजरा करत आहे. त्या शब्दोत्सवाचा आज समारोप होत असताना ‘अक्षरधारा'स लक्ष लक्ष शुभेच्छा द्यायला हव्यात.
कोल्हापुरात या ग्रंथयात्रेचे सुवर्णमहोत्सवी प्रदर्शन झाले. सांगलीत अमृतमहोत्सवी. आज पुण्यात ही ग्रंथयात्रा द्विशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (२५० वे) प्रदर्शन भरवत आहे. हे यश मराठी माणसाच्या दिवसेंदिवस साक्षर, शिक्षित नि सुशिक्षित होत जाण्याची चढती भाजणी सिद्ध करते. आज मराठी घरात शोकेसमध्ये मराठी क्लासिक्स् दिवाणखान्यांची शोभा वाढवत आहेत. घरोघरी वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांचं एक तरी पुस्तक असतं. याचा अभिमान वाटतो तसा वाढतोही आहे.
अरे छापीसनी आलं, मानसाले समजलं। छापीसनी जे राह्यलं, देयालेच उमगलं।।
म्हणणारी जीवनवादी बहिणाबाई अत्याधुनिक खरी! ती अमेरिकेपुढे होती. आज अमेरिकन संस्कृतीचं ब्रीद आहे. 'Perish or Publish' (जगायचं असेल तर स्वतःस प्रकाशित करत रहा.) जे छापलं जातं ते माणसांपर्यंत पोहोचतं. अन्यथा ते तुमच्यापर्यंत राहतं. जे छापलं जातं ते वाचलं जातं. जे वाचलं जातं त्याचा संस्कार होतो. संस्कारातूनच संस्कृती घडते. त्याचं भान आल्यामुळे मराठी माणूस आपले व्यवहार वेगाने बदलत असल्याचं मी पाहतो. तो लग्नात पाच भांडी देण्यापेक्षा पाच पुस्तकं भेट देण्याइतका प्रगल्भ झाला आहे. दिवाळी भेटीच्या रूढ कल्पनाही बदलत आहेत. मराठी भाऊ आपल्या बहिणीला वि. स. खांडेकरांचा कथासंग्रह ‘भाऊबीज' भेट म्हणून चकचकीत कागदाच्या लखलखीत वेष्ठनात देतो तेव्हा भाऊराया सुजाण झाल्याचं तेज मराठी बहिण्याच्या डोळ्यांत चमकत नीती धन्य होते. नव श्रीमंत मित्र-मैत्रिणी एकमेकाला गुळगुळीत शुभेच्छाकार्डे मागे सारून 'मृत्युंजय', 'स्वामी', 'ययाती', 'पु. ल. एक साठवण', 'विशाखा', संभाजी', 'तणकट' भेट देतात तेव्हा येथली श्रीमंती नुसती सेंटेड राहिली नाही. ती संस्कार सुगंधाच्या उटण्यानी अंग अंग गंधगर्भ करू इच्छिते हे लक्षात येतं. मराठी उद्योगपती मिठाईचे पुडे न वाटता ‘फिटे अंधाराचे जाळे', 'चाकाची खुर्ची', ‘खाली जमीन, वर आकाश' सारखी आत्मकथनं दिवाळी भेट म्हणून पाठवतो तेव्हाही लक्षात येतं की इथं जपानसारखाच श्रीमंतीस शालीन करण्याचा परिपाठ रुजतो आहे. हे सारं केवळ आर्थिक समृद्धीनं घडलं नाही. इथली मराठी आई सुशिक्षित झाली. तिनं आपल्या बाळाच्या वाढदिवसादिवशी गोळ्या, चॉकलेट वाटण्याऐवजी पेन्सिल, पेन, वह्या, पुस्तके भेट देण्याचा संस्कार घरोघरी रूजवला आहे.
***
लकी बझार
ऐन दिवाळीच्या तोंडावर माझ्या हाती एका संस्थेचं बोनस कुपन पडलं. अर्थातच याचा मला आनंद झाला. बोनस नाही का मिळेना, बोनस कुपन तरी! पण याचा खरा आनंद माझ्या सौभाग्यवतीला अधिक झाला. नाही म्हणायला माझा सारा पगार दिवाळी खरेदीवर उडविला तरी हिची खरेदी हौस काही संपली नव्हती. बाजारात अलीकडे सतत तेजी का आहे याचं रहस्य मला त्यादिवशी उमगलं. ते कुपन होतं लकी बझारचं. गेलो (इलाज नव्हता). एकविसाव्या शतकात पुरुषाचा जन्म येणं हे किती दीन-हिन अवस्था प्राप्त होणं आहे ते त्या अडीचशे रुपयांच्या खरेदीसाठी अडीच तास घालविले तेव्हा लक्षात आलं. वरखर्च वेगळाच.
बाजाराच्या दारात एक महाशय बकोटीला बाळ घेऊन दुसऱ्या हाती ‘बिग शॉपर' घेऊन आपला सारा जीव एकवटून ‘वेटलेफ्टिंग' करत उतरत होते. त्यांच्या मागं त्यांच्या सौ. पर्स, पैसे, पावती सांभाळत ऐटीत रिक्षाचा पुकारा करत्या झाल्या. मी याची देही याची डोळा पाहिलं की बाजाराच्या समोरील त्या सिक्युरिटी गार्डनी बिचाऱ्या मास्टरला सलाम न करता चक्क मॅडमला सॅल्युट ठोकला. प्रवेशद्वाराचं हे दृश्य पाहून पुढे आपल्यावर काय अतिप्रसंग ओढावणार याची पुसटशी पण नीटती कल्पना आली आणि लक्षात आलं की आपण लकी नाही, अनलकी आहोत.
सौ. नी आत जाताच (नेहमीप्रमाणे) पिशव्या माझ्या हाती सोपविल्या नि महाखरेदीसाठी म्हणून ती गर्दीत अंतर्धान पावली. जेव्हा मी तिच्याबरोबर देवळात जात असतो तेव्हाही ती आपल्या चपला अशाच बिनधास्तपणे माझ्या हवाली (मला हवालदार समजून) करत असते. बाजारात वेळ काढायचा म्हणून मग मी समोरच्या ‘किडस् पार्क' (मुलांचं अंगण) वर नजर फिरविली. तिथंही साऱ्या बाल-गोपाळांचा सांभाळ (काला झालेले) पुरुष अर्थात साक्षात बापच करत होते. तेव्हा लक्षात आलं की आता पालकत्वाचं होकायंत्र आईकडून बापाकडे सरकू लागलं आहे. बराच वेळ तिथल्या साऱ्या माशा (आणि कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात डेंग्युचा फैलाव होऊ नये म्हणून डासही) मारून संपले, तेव्हा मी बझारमध्ये फेरफटका मारायचा म्हणून आत प्रवेश करता झालो, तर पहिल्याच कौंटरवर माझ्या गालावर न मारता फटका मारल्यासारखं झालं. एका बिचाऱ्या (आणखी एक) पुरुषास ब्लेड, दाढीचा साबण, बूट पॉलिश, टाय अशा काही आपल्या पुरुषी वस्तू घ्यायच्या होत्या. त्याचा निर्णयही त्याची सौ. च घेताना पाहिलं तेव्हा लक्षात आलं की, या पृथ्वीतलावरच उरलं-सुरलं पुरुषांचं राज्य सपशेल संपलं.
एव्हाना सौं.ची ती खरेदीनं प्रसन्न झालेली मूर्ती पाहून मनातल्या मनात मी सुटकेचा निःश्वास टाकतो न टाकतो तर ती विचारती झाली, 'अहो क्रेडिट कार्ड कुठाय?' मला कळेना कुपनच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड कशाला लागतं? मी बावळटपणे विचारलं, 'अगं कुपन आहे ना!' ती उत्तरली (खरंतर खेकसलीच) 'अहो सोफासेट किती छान आहे, कुपन देऊन नुसते दहा हजार द्यायचे आहेत.' ऐकून मला क्षणभर अंधारी आली. पण तेवढ्यात कुणीतरी कानात कुजबुजल्यासारखं ऐकू आलं. 'मैं हूँ ना, आय. सी. आय. सी. आय. बँक!' मग माझ्या लक्षात आला त्या बँकेचा खरा अर्थ. आय. सी. ... मी पाहून घेईन! (तुम्ही वेळेत हप्ता नाही भरला तर!) मी भांबावलेल्या स्थितीतून थोडा भानावर येतो न येतो तेवढ्यात (खरं तर आरोळी) ऐकू आली. 'अहो, रिक्षा नको टेम्पो हवाय दरवानसाहेब.' त्याची शिटी वाजताच अल्लाउद्दीनच्या दिव्यातून जसा लगेच राक्षस येतो तसाच टेम्पो हजर! माझा मात्र एव्हाना सारा टेंपो गेला होता. आपण नोकरी (खरंतर चाकरी) का करतो, सारे पुरुष नोकरी का करतात, ओव्हरटाईम का करतात ते उमगलं. अन् हे कळून तर माझा सारा पुरुषी अहंकार लोपला की या बाजाराचं हे नाव साऱ्या स्त्रियांनी कधी नव्हे त्या एक मतांनी (पुरुषांविरुद्ध कटकारस्थान करून) ठेवलं आहे. एल. फॉर लकी, लेडीज अँड लक्झरी! जे फॉर जंटलमन! जहन्नम में जाव जानेमन!
This is not Twenty first century, but first century of ladies truly.
***
गेल्या आठवड्यात अतुल पेठे यांनी तयार केलेला ‘अराजकाची नांदी' हा माहितीपट पाहिला. इथल्या श्रमिक प्रतिष्ठान या सतत सामाजिक, सांस्कृतिक धडपड करणाच्या संस्थेने तो दाखविला. दोघांचे आभार नि अभिनंदन अशासाठी की त्या माहितीपटाने सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या तुम्हाआम्हासारख्या सर्वांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले. तरीही आपण सर्वजण नुसते डोळे चोळत बसणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच.
अलीकडच्या सर्व वृत्तपत्रे नि नियतकालिकांत नित्य-नियमांनी एक शब्द छापून येतो तो म्हणजे 'सेझ'. एका इंग्रजी संकल्पनेचे ते मराठी संक्षेपण होय. ‘विशेष आर्थिक क्षेत्र' (Special Economic Zone) असं त्याचं पूर्ण रूप. भारतात यापूर्वी अशीच ‘विशेष औद्योगिक क्षेत्र' (Special Economic Zone) निर्माण करण्याचा प्रयोग झाला आहे. त्याचे फारसे उत्साहवर्धक लाभ हाती आले नाही. सरकारच्या तिजोरीला फटका बसला, पण उद्योगपतींची तुंबडी मात्र भरली. तरीही आपण शहाणे झालो नाही हेच खरे.
कोणताही अराजक दुसऱ्याच्या अंगणात असतं तोवर आपणास त्याची तीव्रता लक्षात येत नाही. ते आपल्या अंगणात ठाण मांडतं तेव्हा झोप उडते. तसंच या 'सेझ'चं आहे. ही जी विशेष आर्थिक क्षेत्रं उभारली जात आहेत त्याची वैशिष्ट्य आहेत. परिसरातील सलग हजारो एकर जागा सरकार सेझसाठी संपादित करते. ती पडीक असती तर ठीक, पण पिकाऊपण घेतली जाते. तिथे बहुराष्ट्रीय कंपनी येते. ती त्या जागेची मालक बनते.
जमीन मालकाला, शेतकऱ्याला नाममात्र मोबदला दिला जातो. कंपनीवर मात्र सवलतींची खैरात केली जाते. निर्यात परवाना नाही, १०० टक्के परदेशी गुंतवणुकीची मुभा, येथील सर्व कायदा विदेशात पाठविण्याचे स्वातंत्र्य, प्राप्तिकर नाही, कामगार कायदा लागू नाही, सर्वप्रकारची कर माफी सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे वीज व पाणी ही मोफत. हे सारं कमी पडेल म्हणून त्या क्षेत्रात कुणासही जाण्यास बंदी. म्हणजे आपल्या देशात जागोजागी छोटे-छोटे विदेश निर्माण होणार आहेत. पूर्वी इंग्रज ‘ईस्ट इंडिया कंपनी' घेऊन आले. व्यापार, उद्योग करू लागले. त्यांनी इथे तैनाती फौज बसविली. त्यांचं इथं बस्तान कसं नि कधी बसलं ते आपणास कळलंसुद्धा नाही. कोल्हापुरात कागलची पंचतारांकित एमआयडीसी हे अगदी जवळचं उदाहरण. अराजक आलं की नाही आपल्या अंगणात?
हिंदीत 'सेझ' शब्दाजवळचा एक शब्द आहे ‘सेज'. त्यावरून एक वाक्प्रचारच आहे. सेज बिछाना, म्हणजे शय्यासोबतीसाठी बिछाना अंथरूण ठेवणे. आपल्या सरकारने विदेशी कंपन्यांशी शैय्यासोबत करायची ठरवून जागोजागी बिछाने अंथरलेत. तिथे व्यापार, उद्योगाच्या विदेशी बिछायती निर्माण होतील. तेथील रहिवासी उद्ध्वस्त होतील. महाराष्ट्रात पेणला असं झालंय. अंबप, कुपवाड, गोडोली या कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या परिसरात सेज अंथरायचं काम सुरू झालंय. सावधान!
हे सारं विकासाच्या नावावर चाललेलं भांडवलदारांच्या तुंबड्या भरणारं कटकारस्थान आहे. आपणास विकासाचा खरा अर्थ न समजल्यानं हे अरिष्ट उभारलंय. विवेकाची कास म्हणजे विकास. देशाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे इथल्या सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे. हजारो सामान्यांना उद्ध्वस्त करून मूठभरांची तुंबडी भरणारा सरकारने चालविलेला 'सेझ'चा उद्योग म्हणजे असंगाशी संग होय हे लक्षात घेऊन आपणा सर्वांनी जागं व्हायला हवं. पुण्याजवळ सेझमधून एक शहरच उभारलंय. नावंच त्याचं 'मगरपट्टा' आहे. आर्थिक मगरीच्या तावडीतून ‘माणूस' सुटल्याचा इतिहास नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
***
हिंदीत एक संत कवी होऊन गेले. सूरदास त्यांचं नाव. ते कृष्णभक्त होते. त्यांचा एकच काव्यग्रंथ आहे- 'सूरसागर'. त्यात त्यांनी कृष्णाच्या बाललीला वर्णिल्या आहेत. आधुनिक काळात बाललीलांकडे पाहण्यास जन्मदात्या आई-वडिलांना वेळ राहिलेला नाही. अशा काळात बालकांच्या हक्कांबद्दल कोणी तळमळत असेल यावर विश्वास बसत नाही. पण, आपल्या परिसरात प्राचार्य लीला पाटील नावच्या एक शिक्षण विदुषी (शिक्षणमहर्षी नव्हे!) आहेत. सृजनदायी शिक्षण आनंदी व्हावी म्हणून त्या सतत धडपडत असतात. अलीकडेच त्यांनी ऐंशी पूर्ण केले. त्या शिक्षणमहर्षी नसल्याने त्यांना अद्याप सहस्त्रचंद्र दर्शनाचा लाभ झाला नाही किंवा कुणी साधे फूल देऊन त्यांचे अभिष्टचिंतनही केले नाही. समाजाच्या या करंटेपणाला काय म्हणावे? समाजातील बाल्य सृजनशील व आनंददायी व्हावे म्हणून नाबाद ऐंशी असलेल्या या सृजनदायनीने अलीकडेच एक पुस्तक लिहिले आहे. 'बालक हक्क' आहे या पुस्तकाचा विषय. त्याविषयी जेव्हा मुलंच स्वतः बोलू लागतात तेव्हा ते शिक्षक, पालकांनी ऐकणे, वाचणे महत्त्वाचे होऊन जाते. हे पुस्तक माझ्या दृष्टीने ‘आधुनिक बाललीला वर्णन' होय. आधुनिक बालकांचे लीलाताईंनी केलेले संशोधन, सर्वेक्षण, विचार यांचे ते गंभीर विश्लेषण होय. ‘ग्रंथाली'ने हा ग्रंथ लीलाताईंच्या ८० व्या वाढदिवसादरम्यान प्रकाशित करून मोठे औचित्य साधले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) बालक हक्कांचा जाहीरनामा प्रकाशित केला असून तो भारताने स्वीकारला आहे. ते हक्क अंमलात आणणे आपणा सर्वांवर बंधनकारक आहे. पण मुलांचं कोण ऐकतो! कर्त्या पिढीचे बाल्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आजची मुले नवे हक्क मागत आहेत. त्यांची घालमेल या पुस्तकात आहे. मुलांना वेगळे विचार मांडण्याचा हक्क हवाय, त्यांना हवाय शिक्षक, पालकांवर टीका करण्याचा हक्क. त्यांना हवं ते जाणून घेऊ इच्छितात, त्यांना प्रयोगशाळा वापरण्याचा हक्क हवाय! (हे राष्ट्रपतींना कुणी तरी कळवायला हवं!) मुलींना हवाय मनसोक्त वागण्याचा हक्क, मुलांना हवाय पालकांचे प्रेम मिळण्याचा हक्क. (नोकरी करणाऱ्या आई-बाबांसाठी हं!) हे नि असे अनेक नवे हक्क मुलांना हवेत. या बाललीला वाचल्या की मुलांची नवी पिढी किती प्रगल्भ होऊ लागली आहे हे ध्यानी येतं. लीलाताई पाटील, रेणूताई दांडेकर (दापोली), रेणू गावसकर (पुणे), शोभा भागवत, डी. बी. पाटील, रमेश पानसे, अभय बंग यांच्यासारखी काही मंडळी मुलांच्याबद्दल सतत विचार करतात. म्हणून इथे अजून ‘बाललीला' अनुभवास येते. अन्यथा इथे ‘हाताची घडी तोंडावर बोट' म्हणजे शिस्त, ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम' म्हणजे खरे शिक्षण असा समज अजूनही दृढ नि रूढ राहिला असता. सर्व शिक्षण अभियानानंतरही इथे शिक्षक, प्राध्यापक मूल्यांकनास सामोरे जात नाहीत. कारण त्यांना बालकांनी केलेले त्यांचे वजन पेलणार नाही पण बालक हक्कासंदर्भात लीलाताई पाटील यांच्या सारख्यांच्या 'मुलंच जेव्हा बोलू लागतात' स्वरूपाची पुस्तकं प्रकाशित होत राहतील तर शिक्षणातील खारे वारे जाऊन मतलाई वारे (मतलबी नव्हे!) वाहू लागतील व बालकांचे हक्क बाललीला म्हणून समाज मोकळेपणाने स्वीकारेल. लीलाताई पाटील त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन योगाने हे घडून आले, तर ती भारतीय बालकांना देशाने दिलेली अमोल देणगी ठरेल.
***
कोल्हापूरचा देवल क्लब हा इथल्या संगीत, नृत्य, नाट्य, गायन, वादनादी कलांचे केंद्र, नाटककार गोविंद बल्लाळ देवलांनी आपल्या 'शारदा' या सामाजिक नाटकाची मराठी प्रेक्षकांना मोहिनी घातली. त्यामुळे कन्या-जरठ विवाह इथून हद्दपार झाला. त्यांच्या नाटकांनी प्रभावित होऊन तत्कालीन नाट्यरसिकांनी संगीत आणि नाटकांच्या वाढी-विकासासाठी सांगली, कोल्हापूर, इथे देवल क्लबची स्थापना केली. आज हा क्लब प्रभाकर वर्तक यांच्यासारख्या समर्पित संगीतप्रेमींच्या धडपडीमुळे या भौतिक शतकातही नाटक, संगीत जिवंत राहावं म्हणून सतत प्रयत्नशील आहे. प्रभाकर वर्तकांची सूत्रधार म्हणून असलेली भूमिका परवा देवल क्लबने सादर केलेल्या ‘मारीच' नाटकाने ठळकपणे अधोरेखित केली. त्यांचं नि क्लबचे अभिनंदन अशासाठी की त्यांनी आज मारीच होऊ पाहणाऱ्या माणसास जागं केलं.
वाल्मिकी रामायणातील एक राक्षसी, मायावी पात्र म्हणून मारीच प्रसिद्ध आहे. याच मारीचानं सीताहरणासाठी रावणास मदत केली. तो मायावी होता. त्याला तपसिद्धीमुळे अलौकिक शक्ती प्राप्त झाली होती. त्यानं कांचनमृगाचं रूप धारण केलं नि कपटी रावणास साहाय्य केलं. त्या मारीचास माणूस होण्याचं विलक्षण आकर्षण होतं, पण त्याची मतिभ्रष्टता त्याला नडली व तो रामाच्या हातून मारला गेला. सर्व उपनिषदे, पुराण, वेद, रामायण, महाभारत आदी प्राचीन ग्रंथ म्हणजे बोधकथा, मिथकांचा खजिनाच! या सर्व कथा नि पात्रं कालजयी, अमर झाली ती त्यांच्यातील सार्वकालिक सत्यामुळे. प्राचीन साहित्यातील कोणतीही कथा, पात्र आजच्या
घडीला ‘प्रसंग सार्थक' वाटतात, ती त्यांच्यातील जीवनवेधी हेतुमुळे! ‘मारीच' नाटक लक्ष्यवेधी ठरतं ते आजच्या काळाची प्रतिमा हबेहूब उभा करतं म्हणून. नाटक हा मुळात एक खेळ आहे. नाटक करणं, बसवणं, हे कृत्रिम असतं. बंगालीत ‘नाटक खेलबो' म्हणतात. पूर्वी नाटकांचे 'खेळ' व्हायचे. आज ‘शो' होतात. नाटकातील कलाकारांचं भूमिका वठवणं वेगळं नि ‘जगणं' वेगळे. डॉ. श्रीराम लागूंनी केलेली नटसम्राटाची भूमिका, निळू फुले यांनी ‘सूर्यास्त'मधील वठविलेली मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांची भूमिका, ‘फुलराणी'मधील भक्ती बर्वेची भूमिका ही सारी भूमिका जगण्याची उदाहरणं होत. परवाच्या ‘मारीच' मध्येही प्रभाकर वर्तकांची ‘जादुगार', दिलीप बापटांची 'रावण', सिनेटरची केलेली भूमिका ही ‘जगणं' या मालिकेचा विस्तार होय. नाटकाचा संबंध प्रत्यक्ष जगण्याशी तेव्हा येऊन भिडतो, जेव्हा ते ज्वलंत, समकालीन समस्यांचे भाष्य नि माणसांचं भविष्य होतं. आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या महासत्ता प्रस्थापित होत आहेत. त्यात सामान्य माणूस उद्ध्वस्त होतो आहे. व्यवहार विवेकास पराभूत करतो आहे. अर्थसत्ता हे यशाचं प्रबळ साधन होऊ पाहणाऱ्या आजच्या काळात माणसाचं ‘मारीचीकरण' सुरू झालंय. अमेरिका राजकीय सत्ता झाली. डॉलर हा पर्यायी पैसा झाला. कट-कारस्थान, युद्ध, गनिमीकावा, कांगावाखोरांची चलती, बुरखाधाऱ्यांची चंगळ, असा एक मायावी बाजार थाटला जातोय. ‘माया म्हणजेच जग आणि जगणं' असं समीकरण रूढ होऊ पाहात असताना अल्पभूधारकांसाठी मोहन धारिया, धरणग्रस्तांसाठी मेधा पाटकर, कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे जेव्हा जिवाचं रान करतात तेव्हाच जगाच्या मारीचीकरणास वेसण घातली जाते. या जगात विवेक जागा राहतो तो काळापुढे पाहणारी काही माणसं, संस्था, चळवळी असतात म्हणून! पैसा परमेश्वर नव्हे. अन्यायाच्या राज्याचाही अंत असतो. तुम्हास सर्वकाळ सर्वांना फसवता येत नाही. सारखं जीवन वास्तव साहित्य, कला, संगीत लक्षात आणून देतं. म्हणून माणसाचा मारीच होऊ द्यायचा नसेल तर यंत्रांची घरघर चालू ठेवत सतारीचा झंकार ऐकण्याची व नृत्यनाटकं पाहण्याची उसंत माणसांनी जपली पाहिजे.
***
काल मी एका रोटरी क्लबच्या साप्ताहिक बैठकीस गेलो होतो. व्याख्याता म्हणून कोणत्या विषयावर बोलणार असे विचारल्यावर मी उत्स्फूर्तपणे एक विषय सांगून टाकला - ‘समाज : एक असंवादाचे घर'. हा विषय जरी मी अनावधानाने सांगितला तरी अनेक दिवस हा विषय माझ्या मनात खदखदत होता हे खरे!
असं का व्हावं आपलं की आपण एकमेकांशी दिवसेंदिवस कमी बोलू लागलो आहोत. आपण हसेनासे झालो म्हणून. मग समाजात ‘हास्य क्लब' आले. तसे आता एकमेकांशी बोलण्याची 'चॅटिंग सेंटर्स' आली तर मला नवल वाटणार नाही. माणूस रोज महत्त्वाकांक्षेच्या सुवर्णमृगामागे, कांचनमृगामागे धावतो आहे. कस्तुरीमृगासारखी माणसाची स्थिती झाली आहे. स्वतःकडे असलेला गंध तो त्याच्या गावीच राहिला नाही. अंतर्स्वराचीगुंज न ऐकणारा माणूस डॉल्बी ऐकत बहिरा जसा झाला तसा फोन, टी.व्ही., इंटरनेटमुळे मुकाही झाला आहे असे मला वाटते.
माणसास भौतिकच सर्वस्व वाटू लागलं आहे. भौतिकतेचा ध्यास माणसात हव्यास निर्माण करतो. हव्यास हे एक व्यसन आहे. ते माणसास रेसच्या घोड्यासारखं सतत गतीचा फायदा पाळण्यास भाग पाडतं. आपण पळतो खरे! पण का पळतो याचा विचार करायची उसंत त्याला उरलेली नाही. सारा समाज एका वेगळ्या आत्ममग्न अवस्थेकडे घोडदौड करता झाला आहे. एकत्र आपण राहतो, जेवतो, बोलतो त्या सर्व व्यवहारास असलेली औपचारिकतेची झालर रोज रूंद होते आहे. घरात बोलणारी यंत्रे वाढली तितकी बोलणारी माणसे घरात नसतात हा या असंवाद समाज घराचा शाप आपणास कुठे घेऊन जाणार आहे माहीत नाही.
संवाद ही एक संवेदी क्रिया आहे. ती तुम्हास ब्रह्मानंदाकडे घेऊन जाते. पूर्वी आपण प्रवासात शेजाऱ्यांशी प्रवास संपेपर्यंत हितगुज करायचो, आज आपण प्रवासात वर्तमानपत्र घेतो ते संवाद टाळता यावा म्हणून. माणसास असं कांही वाटतं की बोलू नये? एक तर तो आत्मकेंद्री झाला तसा आत्मसंतुष्टही. नांर्सिसस होऊ पाहात असलेला मनुष्य आत्मकोशातून बाहेर यायला हवा.
यासाठी आपणास काही गोष्टी सहज करता येईल. जीवनाची गती कमी करायला हवी. गरजांचं क्षितिज ठेंगणं करता आलं तर आपलं रेसचा घोडा होणं थांबेल. दुसरं घरात एकवेळ अशी असावी की सर्व एकत्र आहेत. ताणतणाव नाहीत, व्यवधान नाहीत. त्या वेळी आपण एकमेकांचे एकमेक असू. एक जेवण एकत्र करणं, त्या वेळी फोन, टी.व्ही. बंद करणं. एखादी सुट्टी मिळून जगणं स्वतःला भावलेलं इतरांना मनस्वीपणे सांगणं यातून जगण्याची भागिदारी वाढते हे आपण लक्षात घ्यायला हवं. 'स्व'च्या पलीकडे विचार करण्याचा प्रारंभ म्हणजे माणसाचं समाज होणं. या ओळी लिहित असताना मोहन धारियांचे उपोषण हा एक समाजसंवाद होता. ते शेतकऱ्यांचे कोणी नसताना (नेते आदी) त्यांचे उपोषण करणं ही कृती एक सामाजिक प्रकट संवाद होता. बाळासाहेब भारदेंचं सारं आयुष्य एक कृतीशील संवाद होता. असे स्वतः पलीकडे जगण्यातूनच समाजाची असंवाद अवस्था बोलकी होईल. या तर, बोलू या, बोलके करू या, बोलत राहू या!
***
वेदनेचे वेद झाले
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या विद्यमाने महामंडळ प्रतिवर्षी उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार प्रदान करत असते. यावर्षीचा (२००६) हा पुरस्कार प्रदान सोहळा अमरावती येथे रविवार (२६ नोव्हेंबर) तेथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. तेथील कवी सुरेश भट स्मृती प्रतिष्ठानने त्याचे संयोजन केले होते. या सोहळ्यास पुरस्कार विजेता म्हणून हजर राहण्याचा आनंद होता, पण त्यापेक्षा मला विदर्भाची साहित्य संस्कृती अनुभवायची होती.
या सोहळ्यात वैदर्भीय कवी मधुकर केचे यांचा अभंग ‘वेदनेचे वेद झाले' सादर करण्यात आला होता. तो अभंग म्हणजे वैदर्भीय साहित्यनिर्मितीचा इतिहासच. आज विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या शोकात्म कालखंडातून मार्ग काढतो आहे. कापसाचे चुकारे न मिळाल्याने तो जसा आत्महत्या करतो तसा कर्जामुळेही! कर्ज पिकाचंच असतं असं नाही. लग्न, हुंडा, मानपान, प्रतिष्ठा, आदींच्या चक्रव्युहात सापडलेला तेथील शेतकरी फुकाच्या कर्जातही बुडतो आहे. हे तेथील रहिवासीच सांगतात, तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. विदर्भ म्हणजे वेदनेचा प्रदेश! प्रतिकूल निसर्ग, पण अनुकूल सांस्कृतिक समृद्धी हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर हे विदर्भाचे सारे नऊ जिल्हे मी यापूर्वी जवळून पाहिले आहेत. तिथे दीर्घकाळ राहून तिथल्या लोकांचं रसायन अनुभवलं आहे. तिथला निसर्ग, प्रतिकूलता, सांस्कृतिक व साहित्यिक समृद्धी, लोकसाहित्य, लोकपरंपरा, इतिहास मी जवळून न्याहाळला आहे. त्यावरून मी एका निष्कर्षाशी पोहोचलो आहे. प्रतिकूलतेशिवाय विकास नि समृद्धी अशक्य. जिथे सुबत्ता असते. तिथे सुस्तता येते. जिथे संघर्ष असतो, तिथे समृद्धी उदयाला येते. आचार्य विनोबा सर्वोदयाचे केंद्र म्हणून पवनार निवडतात. महात्मा गांधी जीवन शिक्षणासाठी सेवाग्रामला येतात. बाबा आमटे आनंदवन इथेच निर्माण करतात. कालिदास इथेच जन्मतो. सीमा, दमयंती, रुक्मिणी इथेच जन्मते. महानुभावासारखा उदार संप्रदाय इथेच विस्तारतो. अन् मधुकर केचे, सुरेश भट, विठ्ठल वाघ इथेच काव्य साधना करतात. याच भूमीने महाराष्ट्राला राष्ट्रसंत तुकडोजी व संत गाडगे बाबा दिले.
अशा या भूमीतच वेदनेचे वेद उदयास येतात, हे इथल्या मातीच्या गुणामुळे! इथली माती मोठी माणूसप्रेमी. माणसं हळवी. प्रेमळ नि आतिथ्यशीलही. अजून इथे ग्रामगीतेच्या प्रभावामुळे असेल, पण ग्रामीण संस्कृती टिकून आहे. बोलीचं प्रेम जपावं इथल्याच माणसांनी. भोंडल्याची गाणी इथं अजून गुणगुणली जातात. भरीत-भाकरीचा भर्ता अजून चव राखून आहे. अहिरणी भाषेतील लोकगीतं इथं अजूनही घुमत असतात. माले-तुलेची इथली भोळी भाषा सानेगुरुजींच्या संस्काराची आठवण करून देते. रणरणती उन्हें अंगा-खांद्यावर झेलणाऱ्या इथल्या माणसांनी मूल्यांची रणकंदनं मात्र कधी केली नाही. विकासाचा अनुशेष भरून न काढल्यानं भकास राहिलेला हा प्रदेश वेदनेचे वेद गात झकास जगतो आहे. हे सारं पाहिलं की आपण पश्चिमेकडे का पाहतो हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो तो कायमचाच.
◼◼
महाराष्ट्रीयांचा 'अंतर्नाद
दिवाळी सरली, फराळ संपला. नाताळ तोंडावर आला. तरी माझ्या मनातला दिवाळीचा कैफ काही अजून उतरत नाही. हे दरवर्षीचेच असतं. फराळ खाऊन संपला की दिवाळी अंकांचे वाचन पुढच्या दिवाळीपर्यंत सवडीनं सुरू असतं. काही दिवाळी अंक आयुष्यभराचे सोबती बनून आहेत. त्यांच्याशिवाय दिवाळीची कल्पनाच मला असह्य होऊन जाते. ‘अंतर्नाद', 'ऋतुरंग', 'मौज', 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकसत्ता', 'साप्ताहिक सकाळ', 'साप्ताहिक साधना' हे असे दिवाळी अंक असतात की त्यांची बेगमी वर्षभर संगत करत राहते. दरवर्षी यापैकी असा एक दिवाळी अंक हाती येतो की, तो आयुष्याची एक नवी दृष्टी, उर्मी देतो. यावर्षी ‘अंतर्नाद' मासिकाचा दिवाळी अंक संपादक भानू काळे यांनी ‘श्रेष्ठ पुस्तके विशेषांक' म्हणून प्रसिद्ध केला आहे. ‘अंतर्नाद' मासिक सुरू होऊन तपपूर्ती होत आहे. पण हा अंक काही घरोघरी पोहोचला नाही. हे मासिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीस समर्पित आहे. हे मासिक सुरू झालं तेव्हा संपादक महोदयांनी 'अंक पसंत न पडल्यास पैसे परत' करण्याची योजना जाहीर केली होती. मनात वाचनाचा वसंत सतत फुलत राहायला हवा. वसंत असला की उसंत मिळते. उसंत मिळाली की पसंत ठरते.
‘अंतर्नाद'च्या या दिवाळी अंकात 'महाराष्ट्र टाईम्स', 'आकाशवाणी', ‘अंतर्नाद' यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या श्रेष्ठ मराठी पुस्तकांच्या याद्या दिल्या आहेत. शिवाय आजवर साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेल्या श्रेष्ठ रचनांची सूची आहे. ते सर्व वाचत असताना उगीच कल्पना येऊन गेली की लॉटरी (अगदी मटका ही!) लागली/लागला तर कुणीही ही सारी पुस्तकं खरेदी करावी नि घर सजवावं, समृद्ध करावं/ मग जुगाराचा गुन्हाही माफ!
या अंतर्नाद'मध्ये मराठीतील श्रेष्ठ २० पुस्तकांचा मान्यवरांनी करून दिलेला परिचय वाचणे म्हणजे आपलं मराठीपण, महाराष्ट्रीय पण समृद्ध करणं, केवळ ‘जय महाराष्ट्र' म्हणून महाराष्ट्र समृद्ध होणार नाही हे हा अंक वाचताना प्रकर्षांनं लक्षात आलं. केशवसुतांपासून अनिल अवचटांपर्यंतच्या वीस श्रेष्ठ कादंबरीकार, कथाकार, नाटककार, कवी, समीक्षक, चरित्रकार, आत्मचरित्रकार, व्यक्तिचित्रकारांच्या 'श्यामची आई', 'ययाती', 'बनगरवाडी', 'चिमणरावांचे चव्हाट', 'काजळमाया', 'सखाराम बाईंडर', ‘विशाखा', 'मृद्गंध', 'युगांत’, ‘स्मृतीचित्रे', 'बलुतं', 'व्यक्ती आणि वल्ली' अशा प्रकारच्या ३० ग्रंथांचा खजिना ज्या घरात असेल ते घर महाराष्ट्राचं शासनानं वा एखाद्या प्रकाशनानं 'महाराष्ट्राचा अंतर्नाद' योजना जाहीर करून या २० पुस्तकांचा संच माफक दरात महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचविला तर काय बहार येईल, म्हणून सांगू? ही पुस्तके महाराष्ट्रीयांचा अंतर्नाद व्हायला हवीत. प्रत्येकाने काटकसर करून रंगीत टी.व्ही., सोफासेट, वॉशिंग मशीन, मोबाईल, स्कुटी, गालिचा, कपडे, गॉगलसारख्या वस्तूस बगल देऊन ही पुस्तके घरी आणून वाचावी. पुढच्या पिढीस वारसा म्हणून द्यावी. एकविसाव्या शतकातील पालकांनी आपल्या पाल्यास पैसे, जमीन, दागिने देण्याऐवजी सांस्कृतिक वारसा, संस्कार, देण्याचा चंग बांधायला हवा. मी अलीकडे मोठमोठी घरं पाहतो. तिथं फर्निचर पाहतो. तिथं फर्निचर आहे. फर्निचरसारख्या रंगाची पुस्तकं इंटिरिअर डेकोरेटर रंगसंगतीचा भाग म्हणून घेऊन येतो व घर सजवतो. हे पाहून अस्वस्थ व्हायला होतं. आपल्या बौद्धिक, सांस्कृतिक दिवाळखोरीचं वैषम्य, दुःख वाटत राहतं. हे व्हायचं नसेल तर येणाऱ्या पिढीस पैशाच्या नादापेक्षा पुस्तकाचा अंतर्नाद द्यायला हवा. 'अंतर्नाद' घ्या. वाचा, माझ्या या लेखनामुळे अशी बातमी यावी. 'अंतर्नाद'चं ब्लॅक सुरू झालंय! रुपये ९० चा अंतर्नाद ९०० रुपयाला!! ती असेल आपली सांस्कृतिक समृद्धी!
◼◼
देव, माणूस आणि आरसा
सध्या महाराष्ट्र शासनाने यावर्षी उत्कृष्ट वाङ्मयीन कृती म्हणून गौरविलेल्या साहित्याचे वाचन सुरू आहे. या उद्योगात विजया राजाध्यक्ष यांचं ‘बहुपेडी विंदां'चे दोन खंड हाती लागले. वाचकांच्या हातातून वाचता वाचता अनेक पुस्तके सटकतात. फारच कमी हाती लागतात. त्यापैकी ही होत. माझ्या हाती लागलेली.
या पुस्तकाच्या पहिल्या खंडात विंदा करंदीकरांची प्रदीर्घ मुलाखत आहे. प्रत्येक साहित्यप्रेमी, अभ्यासकांनी साहित्य व्यवहार समजून घेण्यासाठी ती वाचायला हवी.
त्यात एक छोटा प्रसंग आहे. कवी विंदा करंदीकरांना केरळ कवी कुमारन आशान स्मृती पुरस्कार लाभला होता. आपणाला ज्याच्या नावे पुरस्कार मिळाला तो कवी समजून घेताना त्यांच्या लक्षात आलं की, हा कवी होता तसा समाजसुधारक. आशान जन्माने अस्पृश्य होता. त्याच्या कळत्या वयापर्यंत मंदिरात त्याला कधी प्रवेश मिळाला नाही. म्हणून समज आल्यावर त्यांनी आपले गुरू नारायण गुरुस्वामी यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश असलेल्या मंदिरांची केरळच्या गावोगावी उभारणी केली. अशी पहिली पस्तीस मंदिरं बांधली. त्यात देवांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, पण छत्तीसावं मंदिर बांधलं तेव्हा त्यांनी देवाच्या जागी आरसा बसवला व केरळात एकच गहजब झाला.
माणूस देवळात का जातो? ते त्याचं मानसिक दौर्बल्य असतं की तो स्वतःला तिथं जाऊन बलशाली, सर्वगुणसंपन्न बनवू इच्छितो? हा वादाचा मुद्दा आहे. पण मंदिरं ही माणसास त्याचं खरं रूप जाणवून देतात. शिवाय मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माणूस स्वतःच स्वतःची झाडाझडती घेत असतो. त्यासाठी आरशासारखं दुसरं पारदर्शी, वस्तुनिष्ठ साधन दुसरं नाही. आता तुमच्या लक्षात येईल की, कुमारन आशाननी मंदिरात देवाऐवजी आरसा ठेवून किती मोठी क्रांती केली होती ते. ‘आशान' शब्दाचा केरळच्या मल्याळम् भाषेत अर्थ आहे गुरू किंवा शिक्षक. कुमारन आशान हा तसं पाहिलं तर जाती नि धर्मनिरपेक्ष आधुनिक भारताचा खरा समाजशिक्षक होता. केरळ सरकारने त्याच्या जन्मभूमी, कर्मभूमी व मोक्षभूमीत स्वतंत्र अशी जयंती स्मारक, कर्मकेंद्र व प्रेरणास्थल उभारली आहेत. आपणाकडे वि. स. खांडेकरांची अशी जयंती स्मारक (सांगली), कर्मकेंद्र (शिरोडा) व प्रेरणास्थल (कोल्हापूर) उभारायला हवीत.
देव, माणूस आणि आरशात एक अद्वैत आहे. तिन्हीचं खरं रूप पारदर्शी, वस्तुनिष्ठ, मग माणूस सापेक्ष होतो केव्हा नि कसा? तर रुढी, परंपरा नि संस्कारांनी त्याची जडण-घडण होत असते. या जडणघडणीतून त्याच्या जाणिवा विकसित होत असतात. जाणिवेत अनुभव, पाहाणं, ऐकणं, कल्पना, वाचन, विचार, विवेक साऱ्यांचा समावेश असतो. त्यातून आत्मनिष्ठेच्या जागी समाजनिष्ठा निर्माण होते. ती माणसास खरा देवमाणूस बनवते. माणसास पारदर्शी, वस्तुनिष्ठ बनवण्यासाठी मी आरसे महाल नाही तर आरसा मंदिर, आशान मंदिर बांधायचं ठरवलंय. वर्गणी द्याल ना?
◼◼
विकास की विस्तार?
आपलं रोजचं जीवन एका नव्या पर्वाची नांदी असते. उद्याचा उदय नेहमीच आजच्या खांद्यावर होत असतो. आज जे असतं त्याचं उद्याचं रूप न्यारं नि निराळं असतं खरं! आता हेच पहा ना- आपलं घर, गल्ली, गाव घ्या. त्याचा रोज चेहरा बदलत असतो. ते विस्तारतं की विकसित होतं? मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट घ्या. अगोदर तिचा विस्तार होतो, मग ती विकसित होते. विस्तार भौतिक असतो तसा बाह्य. तो मूर्त असतो, दिसतो. विकासाचं तसं नसतं. तो आंतरिक असतो. दिसत नसला तरी जाणवतो, लहान मुलाचा माणूस होणं अगोदर विस्तार होतो. वाढ होते. मग विकास.
भारताचा गेल्या साठ वर्षात विस्तार झाला, पण चीनचा विकास झाला हे अनेक उदाहरणांवरून सांगता येईल. चीनपुढे जपानचा आदर्श आहे. आपणापुढे अमेरिकेचा. हा मूलभूत फरक आहे. विस्तारामागे लागलेले पसरतात नि पसारा वाढवितात. विकसित होण्याची प्रक्रिया खोलीकडे कूच करणारी असते. माणसं भौतिक समृद्ध होतात. ती विकसित झाली असं म्हणणं धाडसाचं ठरावं. भौतिक समृद्धी पचवून, प्रसंगी नाकारून जी बौद्धिक, भावनिक विकासाकडे लक्ष देतात ती कालजयी होतात. महात्मा गांधींचं जीवन हे त्याचं एकदम पटणारं उदाहरण. हे सारं माझ्या मनात आलं ते एका साध्या निरीक्षणामुळे. अलीकडे आपल्या आजूबाजूला नि देशात चोहीकडे विस्ताराची धामधूम आहे. महासत्ता होण्याचा ध्यास लावलेल्या या देशात माणसाचं मोठं होणं अटळ खरं! पण ते सारं चाललंय ते मूल्यास बगल देऊन, ती आहे माझी खुपरी नस. मी असं मानतो की थोडं उशिरा उजाडलं तरी बिघडणार नाही; पण भगाडण्याची धांदल थोडी मंदच हवी. इमारत रंगवणं रात्रीत होतं, पण पिकासोचं चित्र तयार व्हायला कधी-कधी वर्ष गेली. सारवणावरची रांगोळी नि प्लास्टिक छापाची चिकटणारी स्टीकर रांगोळी यातला फरक हा निसर्ग नि कृत्रिमतेचं अंतर स्पष्ट करणारा आहे. बर्गर की भाकरी? पूर्व की पश्चिम? असं द्वंद्व माझ्या मनात नाही. मला पूर्व आणि पश्चिमेच्या समन्वयानं जाता, जगता येतं की नाही असं विचाराचंय. थोडा विचार करा म्हणजे कळेल की घाईचा घात हा भरून न येणारा तोटा असतो. उलटपक्षी संयमी चाल ही उशिरा यश देणारी असली तरी ती चिरंजीवी, चिरस्थायी असते. हे आपण लक्षात ठेवायला हवं. सन २००७ कडे जात असताना माझ्या असं लक्षात आलंय की गेल्या सहा वर्षांत आपणास विस्तारभयानं पछाडलंय.
◼◼
मराठी माती नि मन
बेळगाव आणि त्या भोवतालचा मराठी मुलुख राजकीयदृष्ट्या कर्नाटकात असला तरी त्याची माती आणि मन मराठीच आहे याची मला आलेली प्रचिती आपणाप्रत पोहोचवावी असे प्रकर्षाने वाटल्यावरून हा पंक्तिप्रपंच. बेळगावच्याजवळील कडोली, उचगाव, येलूर, माचीघर या परिसरात गेली बावीस वर्षे प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन भरत असते. पूर्वेला अद्याप न भरल्याने प्रथमच दि. २४ डिसेंबर २००६ रोजी सांबरा गावी साहित्य संमेलन संपन्न झाले. काही अपरिहार्य कारणांमुळे पूर्वनियोजित अध्यक्ष येऊ न शकल्याने अध्यक्षपदी माझी वर्णी लागली. त्यात माझ्या योग्यतेपेक्षा सीमावासियांच्या मराठी माणसांविषयीच्या सहजस्नेहाचा भाग मोठा होता.
सांबरा येथे संपन्न झालेले मराठी साहित्य संमेलन तिथल्या माय मराठी संघाने आयोजित केले होते. स्वागताध्यक्ष दिलीप चव्हाण व त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांनी मराठी प्रेमापोटी जीवापाड कष्ट घेऊन, पदरमोडी करून हे संमेलन यशस्वी केले.
या संमेलनाची अनेक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आली. सीमाबांधवांच्या मराठी प्रेम व अभिनयाचा कित्ता आपण गिरवायला हा. इथली सर्व साहित्य संमेलने लोकवर्गणीतून यशस्वी होतात. त्यांना सरकारी अनुदान असत नाही. आपल्याकडच्या संमेलनांचे शासकीय अनुदान बंद झाले तर ती भरतील का असं उगीच माझ्या मनात येऊन गेले, संमेलनाचे स्वरूप गावजत्रेसारखं उत्साही असतं. त्यात पोरं-टोरं, तरुण-तरुणी, आबाल-वृद्ध सारे सारख्याच उत्साहाने सहभागी असतात. ही संमेलने भरू नये म्हणून कर्नाटक सरकार भरपूर प्रयत्न करते. मराठी मन आणि माती त्यास पुरून उरते. सांबऱ्याला त्या दिवशी पोलीस छावणीचे रूप होते. ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. दिंडीत बेंजो, झांजपथक, लेझीम पथक, चित्ररथ, वारकरी दिंडी, शाळकरी मुलांचे वाचन संस्कृती पथक, काय नव्हतं? ग्रंथपालखीचा सारा मार्ग शेणसड्यानं सारवलेला, त्यावर प्रत्येक दारी रांगोळी, ग्रंथ पालखीची घरोघरी आरती, पाय धुणं, प्रसाद वाटप, पुष्पवृष्टी असं डोळे दिपवणारं दृश्य. प्रत्येक घराच्या गच्चीवर बंदुकधारी पोलिसांची गस्त यास दृष्ट लावत असली तरी त्या साऱ्याने तेथील सरकार अस्वस्थ दिसून येत होतं खरं!
सभामंडपात हजारोंचा जनसमुदाय, तोही मोठ्या प्रतिज्ञा व प्रणाने हजर. उठून जाणं नाही. सूर्य चढेल तशी चढती गर्दी. सूर्य ढळला तरी गर्दी शेवटपर्यंत अढळ होती. चित्रपटगीतकार जगदीश खेबुडकर, गोव्याचे लोककवी विष्णू सूर्या वाघ, प्रबोधनकार प्रा. शिवाजीराव भुकेले, लोककथाकार सुरेखा मिसाळ साऱ्यांनी आपापले फड मोठ्या शिताफीने व तडफेने गाजविले. आमराईतले सहभोजन, ग्रंथ दालनातील ‘एक होता कार्व्हर' नि ‘श्यामची आई' चं घरोघरी जाणं या साऱ्यातून मराठी माती नि मन ओसंडून वहात होतं. जिथं पिकतं तिथं विकत नसतं हेच खरं! आपण साऱ्यांनी सीमाबांधवांकडून प्रेरणा घेऊन आपापल्या परिसरात लोकवर्गणीतून मराठी साहित्य संमेलनांचा यज्ञ पेटवून तो जागवायला हवा.
◼◼
अनुभव जाणिवांची आरास/११९ ________________
जाणिवांची आरास/१२०
नवे वारे
नव्या शतकातील प्रथम दशक सरत आलंय. एकविसावे शतक अनेक नव्या विचारांची मांडणी घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे पुरोगामी असणार हे स्पष्ट करणाच्या दोन घटना या आठवड्यात घडल्या. पश्चिम बंगालमध्ये असलेल्या माक्र्सवादी सरकारने राज्याचे औद्योगिकीकरण व्हायचे असेल तर भांडवलशाही स्वीकारली पाहिजे हे मान्य केले. दुसरीकडे मुंबईतील अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाने कौटुंबिक छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाललेल्या एका खटल्यात पतीच्या बाजूने निकाल देऊन कायदा ‘डोळस' असतो हे सिद्ध केले आहे.
कोणताही विचार, वाद, प्रवाह हा सार्वत्रिक व सर्वकात्मिक असत नाही. मुळातच समाजात प्रस्थापित होणारे विचार प्रवाह हे त्या त्या समाजाच्या पूर्वानुभवाच्या संचितातून जन्म घेत असतात. समकालीन वा पूर्वकालीन जे हेच आहे, त्याज्य आहे, ते नाकारण्यासाठी, नष्ट करण्यासाठीच नवे विचार, वाद जन्म घेतात. जे लोक, समाज, राज्य, राष्ट्र स्वीकारतात ते टिकवतात. नव्या विचारांना स्वीकारण्यासारखे शहाणपण दुसरे असत नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि' म्हणून तुतारी फुकणारा कवी आपणास हेच समजावतो. 'चकाकते ते सोने' असं असत नाही. भांडवलशाहीतून दिसणारी प्रगती ही चकाकी आहे. समाजवादी विचारसरणीस समाजातील तळागाळात असलेला जो सामान्य माणूस असतो, तो विकासाचा केंद्र असतो. शेतकरी, मजुरांना भांडवलशाहीत स्थान असत नाही. सत्तेची खेळी खेळण्यासाठी हुकमी पाने हाती धरायचा मतलबीपणा सर्व राजकारणी करत असतात. त्यास कोणतेही पक्ष अपवाद नसतात हेच या विधानाने सिद्ध होते. भांडवलशाहीतून येणारा गतिमान विकास व समाजवादातून येणारं समाजस्वास्थ्य यांचा मेळ घालणारं नवं तत्त्वज्ञान एकविसावं शतक मागत
आहे. असं नवं वारं जो विचार व व्यवहार देऊ शकेल, अशा नव्या विचारधारेची जनता वाट पाहते आहे.
अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयाने आपल्या नव्या निकालानेही हेच अधोरेखित केले आहे. सन १९७५ नंतर जगभर स्त्री न्यायविषय समाजमन तयार झाले. त्यातून अनेक कुटुंब, बाल, महिला कायदे, आयोग योजना आल्या. आपणास झुकते माप मिळते म्हणून कोणी महिला पुरुषांविरुद्ध कुभांड रचत असेल तर तर्कसंगत जसे नाही तसे न्यायसंगतही नाही. न्याय आंधळा, पण न्यायाधीश डोळस असतात. कायद्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक असते. सरसकट एकाच प्रकारची निकालपत्रे द्यायला न्यायाधीश कशाला हवेत? एटीएमसारखी यंत्रे व यंत्रमानव ती कामे करतील. निवाडा हा मुळात एक सजीव, संवेदी प्रक्रिया आहे. साक्षेपी न्यायाधीशच ती पाळू शकतात. त्यामुळेच न्यायाच्या राज्यावरचा लोकविश्वास वाढत राहील.
समाजस्वास्थ्य व सामाजिक न्याय या एकविसाव्या शतकातील दोन अशा मानवी गरजा आहेत की, त्याबाबतचा विचार विवेकी व विकास याचा तोल सांभाळत केला गेला पाहिजे. क्षणिक व गतिमान विकास आणि चिरस्थायी विकास यातील अंतर समजावून घेऊन मनुष्य समाजाच्या अंतिम कल्याणाचा विचार हा सर्वतोपरी हे विसरून चालणार नाही. नवे वारे नवं पर्यावरण घेऊन येतात, तशी नवी संस्कृतीही. स्थलांतरित पक्षी जसे सतत निरामय निसर्गाच्या शोधात असतात, तसं माणसानं निरामय समाज जीवनाचं निरंतर ध्यास घेऊन शोधक, चिकित्सक राहायला हवं. गतानुगतिक राहणं जसं धोक्याचं असतं तसं मृगजळामागे गतिमान धावणेही! कोणतेही नवे बदल, विचार हे क्षणिक सुख, सोयीसाठी स्वीकारू नये.
नॅनोचं वादळ
टाटाची 'नॅनो' मोटार गाडी बाजारात आली. तिनं मोटारीच्या बाजारात जसं एक नवं वादळ आणलं तसं सामान्यांच्या मनातही तिनं नवं स्वप्नवादळ निर्माण केलं आहे. 'नॅनो'मुळे बाजारात अशाच लहान मोटारींचा सुळसुळाट होणार हे उघड आहे. 'मारूती'मुळे भारतात छोट्या गाड्यांचं युग सुरू झालं. त्यामुळे मोटार ही मोठ्यांची मिरासदारी न राहता सामान्य मध्यमवर्गीयांच्या ती आवाक्यात आली. तरी ती किमतीच्या अंगाने उच्चवर्गीयांचीच राहिली. नॅनोमुळे शिक्षक, लेखनिक, पोलीस, कनिष्ठ अभियंते, प्रोग्रामर असे निम्नमध्यवर्गीय मोटारमालक होतील हे उघड आहे. दोनचाकीची जागा चारचाकी घेणार हे नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.
तिच्यामुळे रस्ते, पार्किंग, प्रदूषण, मोटारींच्या किमतीचे युद्ध, पेट्रोलचा प्रश्न अशा समस्या निर्माण होतील. सध्याचे आपल्या शहरातील गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की गावच्या लोकसंख्येनुसार गावातील रस्त्यांची रुंदी, लांबी, वळणे, कुंपणांची उंची, दुभाजक, पादचारी मार्ग याबाबत राष्ट्रीय धोरण व नियोजनाचा प्रश्न वादळाचे रूप धारण करील. मी या मोटारींचा विरोधक नाही. पण मोटारींची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यांचे नियोजन हा कळीचा मुद्दा बनेल.
दुसरा प्रश्न वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारी दिरंगाई हा असेल. जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबर उपनगरातील व नव्या वसाहतीतील रस्त्यांची रुंदी आत्ताच वाढवली पाहिजे. रस्त्यांवर दुभाजक, नियंत्रक, सिग्नल,
पादचारी मार्ग अनिवार्य व्हायला हवेत. प्रदूषण नियंत्रण हा मोठा आरोग्याचा प्रश्न म्हणून पुढे येईल.
भारतात आर्थिक दारिद्र्यापेक्षा कल्पना व नियोजनाचं दारिद्र्य मोठं आहे. प्रश्न निर्माण झाल्यावर आपण सोडवत राहतो. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून नियोजन करण्याकडे आपला कटाक्ष नाही. जो आहे तो भविष्यवेधी वा लक्षवेधी नाही. यासंदर्भात युरोपचा आदर्श घ्यायला हवा. आवली टाटाची नॅनो मोटार गाडी बाजारात आली तिने मोटारींच्या बाजारात जसं एक नवं वादळ आणलं तसं सामान्यांच्या मनातही तिन नवं स्वप्नवादळ निर्माण केलं आहे. नॅनो'मुळे बाजारात अशाच लहान मोटारींचा सुळसुळाट होणार हे उघड आहे. 'मारुती'मुळे भारतात छोट्या गाड्यांचं युग सुरू झालं. त्यामुळे मोटार ही मोठ्यांची मिरासदारी न राहता सामान्य मध्यमवर्गीयांच्या ती आवाक्यात आली. तरी ती किमतीच्या अंगाने उच्चवर्गीयांचीच राहिली. नॅनोमुळे शिक्षक, लेखनिक, पोलीस, कनिष्ठ अभियते, प्रोग्रामर असे निन्ममध्यवर्गीय मोटारमालक होतील हे उघड आहे. दोनचाकीची जागा चारचाकी घेणार त्यामुळे नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज नाही.
तिच्यामुळे रस्ते, पार्किंग, प्रदूषण मोटारींच्या किमतीचे युद्ध पेट्रोलचा प्रश्न अशी समस्या निर्माण होतील. सध्याचे आपल्या शहरातील गावातील रस्ते इतके अरुद आहेत की गावच्या लोकसंख्येनुसार गावातील रस्त्याची रुंदी, लांबी, वळणे, कुपणाची उंची, दुभाजक, पादचारी मार्ग याबाबत राष्ट्रीय धोरण व नियोजनाचा प्रश्न वादळाचे रूप धारण करील. मी या मोटारींचा विरोधक नाही पण मोटारींची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता रस्त्याचे नियोजन हा कळीचा मुद्दा बनेल.
दुसरा प्रश्न वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारी दिरंगाई हा असेल. जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबर उपनगरातील व नव्या वसाहतीतील रस्त्यांची रुंदी आताच वाढवली पाहिजे. रस्त्यांवर दुभाजक, नियंत्रक, सिग्नल, पादचारी मार्ग अनिवार्य व्हायला हवेत प्रदूषण नियंत्रण हा मोठा आरोग्याचा प्रश्न म्हणून पुढे येईल.
भारतात आर्थिक दारिद्र्यापेक्षा कल्पना व नियोजनाच दारिद्रय मोठं आहे. प्रश्न निर्माण झाल्यावर आपण सोडवत राहतो. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून नियोजन करण्याकडे आपला कटाक्ष नाही जो आहे तो भविष्यवेधी
वा लक्षवेधी नाही यासंदर्भात युरोपचा आदर्श घ्यायला हवा. आपली व्यवस्थापनाइतकेच ते आपत्तीपूर्व नियोजनावर कार्य, संशोधन करतात.
मोटार हे प्रतिष्ठेचे प्रतीक न राहता उपयोगी साधन गतिमान दळणवळणाचे सुखद उपकरण म्हणून ते विकसित होणार आहे, हे लक्षात घेऊन योजना हवी पार्किंगचा प्रश्न बिकट होणार आहे. त्यामुळे त्यासंदर्भात नवे धोरण त्वरितं अगिकारावे लागेल. रस्ता चालणाऱ्याचा की चालवणाच्याचा असे एक नवे वैचारिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न उभा करणारे वादळ घेऊन येणारी 'नॅनो' ही नव्या सामाजिक, आर्थिक वादळाचीही नांदी ठरणार हे उघड आहे. म्हणून आपण आता सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशातील कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. तिथे कायद्यातच सुविधा व सेवाचा अंतर्भाव असतो, आपल्याकडे पण तसे व्हायला हवे.
जाणिवांची आरास/१२५ ________________
राजकारणमुक्त गाव
गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला. या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षापूर्वी गेलो होतो. त्यावेळी गावचे जे दृश्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असं मी आग्रहाने सांगितले होते. त्यावेळी लोक हसले होते. कुणी ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव
निर्मलग्राम बनेल असा माझा विश्वास आहे.
भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं. ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पहायचाआहे ना? मग एखादं खेडे पहा.' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशेने त्यांची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसत्ता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे (दर मिळत नसला तरी!) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिराआवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहेत. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे. ‘गाव सारं टग्यांचं, बघ्यांचं' असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न
जाणिवांची आरास/१२६ ________________
बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढा-यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचं चित्र आहे. शहरात वा गावात पुढा-यांच्या मागे धावणाच्या तरुणांचे तांडे माझ्यासारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यांच्या मागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधींच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता आज तसे चित्र नाही. तरूण पदवीधर बेरोजगार आहेत. शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे. व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकत्र्यांच्या हाती आहेत. तरुणांचे तांडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्यग्रस्त होणारे तरूण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी राहणी, ढाब्यांवरची भोजनावळ, मोटारसायकलवरच्या त्रिकुटांच्या सफरी, सटर फटर कारणासाठी गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षांपूर्वी गेलो होतो. त्या वेळी गावचे जे दृष्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असे मी आग्रहाने सांगितले होते. त्या वेळी लोक हसले होते. कुणी ते फारस मनावर घेतलं नव्हतं आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव निर्मलग्राम बनेल असा मला विश्वास आहे.
भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधीचं एक वाक्य आठवतं ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पाहायचा आहे ना? मग एखादं खेड पाहा' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशने त्याची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे. (दर मिळत नसला तरी) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिरा आवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहे. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.
जाणिवांची आरास/१२७ ________________
‘गाव सारं टग्यांचं बघ्यांचं असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे वृावाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढा-यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचे चित्र आहे. शहरात व गावात पुढा-यांच्या मागे धावणाच्या तरुणाचे तांडे माझ्या सारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यामागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधीच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता. आज तसे चित्र नाही. तरुण पदवीधर बेरोजगार आहेत शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे, व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकर्त्यांच्या हाती आहेत तरुणांचे ताडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्याग्रस्त होणारे तरुण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी रहाणी, ढाब्यांवरची भोजनावळ, मोटरसायकरवरील त्रिकुटांच्या सफरी, सटरफटर कारणासाठी शहराकडे जाण्याची हौस यात ही सारी मंडळी मशगूल आहेत. शेती विकून नोकरीसाठी लाखो रुपये मोजायला एका पायावर तयार असलेल्या तरुणांना हे पैसे घेऊन तू एखादा व्यवसाय घर, नोकरीसाठी शेती विकण्यापेक्षा शेती कर, शेती किफायतशीर होण्यासाठी म्हणून काही प्रयोग कर म्हणणारे पुढारी, कार्यकर्ते खेड्यात औषधाला सापडत नाहीत. खेड्यातील शिक्षक प्राध्यापकांनी आपली नैतिकता व्यावसायिक बांधिलकी व्यासंग सोडल्यामुळे मार्गदर्शक म्हणून पूर्वीचा त्यांचा 'आब' इतिहासजमा झालाय. अशावेळी गावातील ज्येष्ठ समाजधुरिणांनी राजकारणी गावाची मांडणी समाजकारणावर आधारित कारणे काळाची गरज आहे. पक्ष, गट, तट विसरून गावाच्या हिताच्या प्रश्नांवर एकवाक्यता, एकी, दिलजमाई गावचे केंद्र बदलून शाळा, ग्रंथालय, व्याख्यानमाला हे तरुणाई बदलाचं साधन म्हणून त्यांची राष्ट्रीय वृत्तीचे (राष्ट्रवादी नव्हे) समाजकेंद्री तरुण होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकाबदलचा स्वीकार अर्थातच आज राजकीय सत्ता हाती असलेल्या नेत्या, पुढा-यांनीच केला पाहिजे. राव करतील तेच गाव करेल अशी आज स्थिती आहे.
जाणिवांची आरास/१२८ ________________
मर्दानगी और कंडोम
जाहिरात प्रचार, प्रसार, प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे खरे पण कधी कधी त्यातले तारतम्य हरवलेले दिसते. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. चुकीचा संदेश जातो. परवा मी स्कुटरवरून आयटी पार्कच्या जीवघेण्या रस्त्याने जात होतो. तेवढ्यात महापालिकेचा भरधाव मैलावाहू टँकर मागून पुढे गेला. मुळातच त्या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. अशात त्या टँकरचं असं अकारण भरधाव धावणं, त्यामुळे माझं धाबं दणाणलं. मनात मी काहीबाही पुटपुटत होतो. तेवढ्यात माझं लक्ष त्या टँकरमागं लिहिलेल्या कुटुंब नियोजनासंबंधी वाक्याकडं गेलं. 'मर्दानगी का इतना शौक है तो कंडोम का इस्तेमाल करो' असं काहीसं वाक्य होतं. निरोध या गर्भनिरोधक साधनं, औषधे यांची जाहिरात लोकसंख्या कमी करण्याकडे कल वाढवणारी हवी. ती पुरुषार्थाचे उदात्तीकरण व स्त्रीचे खच्चीकरण करणारी असते. इतकेच नव्हे तर परस्त्री संबंध असणारच ही अटळ गोष्ट आहे असं या जाहिराती सूचित करतात, ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक गोष्ट आहे. स्त्री-पुरुष संबंध ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सामाजिक नीतिनियमांवर आधारलेली असली पाहिजे. हे संबंध समाजमान्य चौकटीत असले पाहिजेत. पण या जाहिराती विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांचे गौरवीकरण करणाच्या तसेच नकळत समर्थन करणाच्या, प्रोत्साहन देणाच्या असतात. आजवर आपण त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नसल्याने शरीरसंबंधातील आक्रमकता, हिंसा, अत्याचार वाढत आहेत.
जाणिवांची आरास/१२९ ________________
स्त्री-पुरुष संबंध एक सहज उद्गार आहे. तो काही केवळ पुरुषी आविष्कार नव्हे. खरं तर स्त्री-पुरुषांतील ताणतणाव कमी करण्याचं ते एक निमित्त आहे. तो काही ‘मर्दानगी का शौक (पुरुषार्थी छंद) नव्हे. त्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. एफ कुस्ती आहे. विवाहमान्य संबंधात संतती टाळण्याचं साधन, मूल होऊ न देण्याचा उपाय, मुलांतील अंतर वाढवायचा उपचार, गर्भधारणा रोखणारं साधन, लोकसंख्या नियंत्रित करण्याचा रामबाण उपाय ही तत्त्व गृहीत धरून या जाहिराती हव्यात. एका सरकारी जाहिरातीत मागं केव्हा तरी एस. टी. मागं लिहिलेलं असायचं की, “जवानी की दिवानगी का उपाय.' खरं तर बचने का उपाय हवा. सामाजिक गांभीर्यानं लिहायचं तर ‘जवानी मे दिवानगी बेवकूफी है।' (तारुण्यातील बेजबाबदारपणा मूर्खता आहे.) यौन संबंध जब जब, कंडोम तब तब' असं लिहून आपण यौन संबंध वाढवण्यास प्रोत्साहन देतो, हे आपल्या लक्षातच येत नाही, लिहायला असं हवं की, शक्यतो यौन संबंध टाळा, अटळ वाटल्यास निरोध वापरा. विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध अनैतिक आहेत. तो सामाजिक अपराध आहे त्यातून होणाच्या गर्भधारणेतून सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यातून निर्माण होणारी गर्भधारणा, अपत्य सामाजिक अपराध ठरतो. गाफील क्षणांवर नियंत्रणाचा उपाय म्हणून संतती निरोधक साधने होत, अशा अंगाने प्रबोधनाचा उपाय म्हणून जाहिरातीकडे पाहायला हवं. आरोग्य खाते, कुटुंब नियोजन विभाग, संतती नियमनाची साधने खाते, कुटुंब नियोजन विभाग, संतती । नियमनाची साधने निर्माण करणा-या कंपन्या (कामसूत्र, माला डी, निरोध,आयपिल्स, ड्युरेक्स, मूडस्) यांनी आता 'मी तुला चंद्र दाखवतो म्हणालो होतो' असं सांगण्याऐवजी 'मी तुला म्हणालो होतो ना, आपले पाय कायम जमिनीवर हवेत!' म्हणायला शिकलं पाहिजे. लैंगिक संबंधातील भावसाक्षरता, स्त्री-पुरुष समानता, विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध : सामाजिक अपराध या अंगांनीच जाहिराती व्हायला हव्यात. आजवर आपण केवळ शारीरिक एड्सचाच विचार करत राहिल्याने आपला सामाजिक एड्स कोणत्या टोकाला जाऊन भिडला आहे, हे लक्षातच आले नाही. घरोघरी राम, सीता हवेत की। दुष्यन्त-शकुंतला? सती सावित्री हवी की विश्वामित्र? कर्ण-कुंती हवी की यशोधरा-राहुल?
जाणिवांची आरास/१३० ________________
सुमारांची सद्दी
बदल हा सृष्टी नि समाजाचा अटळ घटक आहे. बदलाचा प्रारंभ कल्याणकारी भावनेतून विकासापर्यंत होतो. विकासानंतर विस्तार होतो. कारण त्यात बदलाची उर्मी नसते. विस्तार विकासाच्या गतीचा परिणाम सहज घडून येणारी एक प्रतिक्षिप्त क्रिया. मानवी समाजात या काळात सुमारांची सद्दी होते, दिसते. देशात सध्या ते दिसू लागलंय असा माझा अनुभव आहे. ‘मला शिकावंसं वाटत नाही' या लेखातून आजच्या शिक्षणविषयीचे वास्तव मी मांडलं होतं. वर्तमान समाजात सर्वत्र सुमारांच्या सद्दीचा सुकाळ हा आपल्या चिंता व चिंतनाचा विषय ठरावा असे मला वाटते. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत मनापासून येणा-या व शिकणाच्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. वर्गातील संख्येपेक्षा वर्गाबाहेरील विद्यार्थी संख्या काळजी करण्याइतकी मोठी आहे. शिकण्या व शिकवण्यातील आनंद, आकर्षण, ओढ, जिज्ञासा, उर्मी हरवल्याच्या नुसत्या पाऊलखुणा' नाहीत तर ‘घसघशीत ठसे दिसून येतात. जे शिक्षणाचं तेच चित्र समाजातील अन्य वर्ग व व्यवसायाचे दिसून येतं. पोलीस होण्यामागे कायद्याचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा नाही. काय द्यायचं यावर लक्ष अधिक असं चित्र! इंजिनिअर,आर्किटेक्ट इमारती बांधतात.चार आडव्या-उभ्या रेषा मारणे म्हणजे आराखडे व रेखांकन झाले आहे. उपभोक्त्याची गरज, सोय, सुविधा या बाबत विचार करायला त्यांना वेळ नाही. मॅकॅनिककडे दुरुस्तीसाठी गाडी घेऊन जा. तो दुरुस्त करून देतो नि दुस-याच दिवशी परत तक्रार निघते. डॉक्टरांचं औषध लागू पडेलच याची शाश्वती नाही. पूर्वविचार, निदान,
जाणिवांची आरास/१३१ ________________
संशोधन, वाचन यासाठी त्याला वेळ उरलाय कुठे? त्याला बँक, हप्ते, गुंतवणूक, गाडी, मुलांचं महागडं शिक्षण यातून उसंत आहे कुठे? प्रश्न आहे तो उपाय शोधण्याचा. {gap}सुमारांच्या सद्दीचा सुकाळ हा विकासाचं विस्तारित (Enlarged) चित्र असतं. विकासात गुणवत्ता असते. विस्तारात नुसती संख्या वाढ असते. ती क्षणात शतपट होणारी असते. वारुळातून क्षणात येणा-या मुंग्यांमुळे क्षणापूर्वी रिकामी असलेली जमीन या भिंत मुंग्यांनी भरून जाण्यातला अचंबा, आश्चर्य (खरं तर चमत्कार!) असतो. विश्वास न वाटणारा! यासाठी उपाय आहेत. गती कमी करणं... थबकणं... थोडं थांबून-मागे वळून पाहून... सावकाशीनं चालत राहणं! {gap}एकविसावं शतक हे गतीचा शाप घेऊन जन्माला आलंय अशी सर्वत्र स्थिती आहे. इथं पळणारे रस्ते... जिने, लिफ्ट आहेत... माणसं त्यावरही जीवाच्या आकांताने पळताहेत... रस्ते रुंद कितीही करा... दुस-याच दिवशी ते अरुंद वाटू लागावेत असा विकासाचा वेग आहे. नव्या काळाची गाणीही नवी हवी. सावध ऐका पुढच्या हाका, पळाला तो संपला' असं येणारं अरिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे. थांबत चालावं. पहिलं पचलं की मग दुसरं खावं. शिकलेलं समजलं की नवं शिकावं. शिकलेल्यात गती, कौशल्य हाती आलं की नव्याला हात घालावा. पैसा साठू द्यावा. त्याला लगेच हापसा किंवा हप्ता लागणार नाही याची दक्षता घ्यावी. क्रांतीपेक्षा बदलाचा ध्यास हवा. क्रांती क्षणात येते नि जाते. बदल टिकतात. लोणच्याप्रमाणे. मुरल्याशिवाय उरत नाही, हे लक्षात असू द्या. हा माझा अनुभव. तुमचा?
जाणिवांची आरास/१३२ ________________दैन्य हटविणारा अगस्ती
माणसं दोन प्रकारे जगत असतात, असा माझा अनुभव आहे. एक स्वतःसाठी जगणं आणि दुसच्यासाठी. दुसन्यासाठी जगणं यामागे दिव्य प्रेरणा, परहित भाव, ध्यास असतो. त्यासाठी तुम्हाला प्रलोभनांचा त्याग करावा लागतो. मोहाची अनेक वळणं ठिकाणं सोडावी लागतात. 'मी'च्या पलीकडे सतत विचार करावा लागतो. ही सोपी गोष्ट नसते. हे सारं
आठवायचं कारण बाबा आमटे. ते नुकतेच आपल्यातून निघून गेले. त्यांनी केलेलं अनाथ, निराधार, अंध, कुष्ठपीडितांचं पुनर्वसन कार्य केवळ अभिनंदनीय नव्हतं तर अनुकरणीय होतं.
ऐन तारुण्यातील काही काळ मी त्यांच्या सहवासात घालवला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वीस वर्ष अनाथांचे पुनर्वसन व संगोपन कार्य मी केलं आहे. त्यांच्या कार्याची माहिती मला त्यांच्या पुनर्वसवन पद्धतीत आढळते. माणसाचं भीक मागणं ही काही स्वेच्छेची गोष्ट नसते. परिस्थिती माणसास लाचार बनवते. लाचारी ही त्याचा जीवन व जगण्याचा जाहीर पराभव असतो. असं जिवंत मरण जगणाच्या शेकडो माणसांना बाबा आमटे यांनी जगण्याचं बळ दिलं. हाताला काम दिलं. कामातून पैसे मिळाले. त्या पैशातून त्यांना त्यांच्या जगण्याचा पैस, आधार मिळाला. महात्मा गांधी, विनोबा, मार्क्स, सानेगुरूजी, प्रॉमिथिअस हे त्यांचे आदर्श होते. परहितार्थ स्वतः झोकून देण्याची फकिरी जे करू शकतात, तेच जग बदलतात. बाबा आमटे दैन्य हटविणारे अगस्ती होते. म्हणून ते अनाथांसाठी 'गोकुळ', अंधांसाठी ‘आनंद निकेतन', कुष्ठांसाठी ‘आनंदवन', वृद्धांसाठी ‘उत्तरायण' देऊ शकले. आपल्या जगण्याच्या हिशोबाची एक
जाणिवांची आरास/१३३
साधी कसोटी असली पाहिजे की मी स्वतःच्या पलीकडे पालात असलेल्या माणसासाठी काही करतो का?
बाबा आमटे म्हणत की ‘क्रांती ही सीतेच्या पावलासारखी असते. ती हळू यायला हवी. हळूहळू घडणारी क्रांती कायमचे बदल घडवते. दुसच्याबद्दलचं जगणं, तसा विचार करणं, क्षणिक भावनिक आवेग असता कामा नये. ती एक विचारपूर्ण कृती असायला हवी. तुमच्या प्रयत्नातून बदललेल्या जगाचं हास्य दुस-याच्या चेह-यावर पाहण्याचा छंद जे लावून घेतात त्यांनाच सामाजिक कायाकल्प करता येतो.
वेदनेचा शर नसलेले शरीर उन्मत्त होते.
व्यथेच्या पावसात चिंब भिजून ते विशुद्ध होते.
असं बाबा आमटेंनी एका कवितेत लिहिलं आहे. आपण नम्र, ऋजू का असत नाही तर आपणास परपीडेची फिकीर असत नाही. बाबा आमटेंचा हात तेथील अंध मुलं आपसूक ओळखायचे. ते ओळखणं त्यांच्या कामाचं तापमापक (थर्मामीटर) होतं. आपल्या आयुष्याचं तापमान मोजणारं तापमापक संवेदनासूचकांक सांगणारं होकायंत्र असून ते कुणी शोधून काढलेलं नाही. त्याचा शोध लागला तर आपल्या लक्षात येईल की दैन्य, दुःख जाणणारा, तो हटवणारा अगस्ती शतकात एखादाच जन्मतो. बाकी सारे श्वासोच्छ्वास करणारे जीवजंतू असतात, असा माझा अनुभव आहे. तुमचा?
पालकत्व
आज जे पालक आहेत, ते सन १९६० नंतरच्या दशकात जन्मलेले आहेत. ते जन्मले तेव्हा स्वातंत्र्याचे तप उलटून गेलं होतं. भारतात प्रगतीच्या पाऊलखुणा उमटत होत्या. त्यांच्यापूर्वी जे पालक जन्मले त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून आपलं ध्येय प्राप्त केलं. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यास भरभरून दिलं. त्यांची पिढी आज पालकत्व पेलत आहे. स्वातंत्र्याचा खरा लाभ उपभोगलेला वर्ग आज पालक म्हणून सज्ज झाला आहे.
आज पालकत्वाची एक कल्पना रूढ होताना दिसते आहे. मुलांनी मागेल ते देणं म्हणजे पालकत्व निभावणं. अलीकडे पालक पोस्टमन झालेत. फक्त ‘देणं' (डिलिव्हरी करणं) त्यांना माहीत आहे. पालकत्व म्हणजे देणं' नव्हे तर 'पेलणं' असतं. खलिल जिब्रान नावाचा एक अरबी कवी होता. तो इंग्रजीत लिहायचा. त्याचं एक सुंदर काव्य आहे. ‘प्रोफेट त्याचं नाव. मराठीत त्याचे अनेक अनुवाद उपलब्ध आहेत. त्यानं पालकत्वाबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मुलं आपण जन्माला घातली तरी ती आपली नसतात. ती स्वतंत्र जीवन घेऊन जन्मतात. त्यांचे स्वप्न, वृत्ती, विचार सारं त्यांचं घेऊन ती जन्मतात. पालकांचे कार्य धनुष्यासारखं असतं. धनुष्यानं फक्त बाण सोडायचा असतो. दिशा द्यायची असते. अगदी गतीही द्यावी. पण लक्षात असू द्या बाणाचं लक्ष्य स्वतःचं असतं. म्हणून पालकांनी मुलांवर विचार, स्वप्नं लादू नयेत.
एकदा का हे पक्क स्पष्ट झालं की मग पालकत्व पेलणं, निभावणं सोपं असतं. आपली मुलं ही काही आपल्या छापाच्या मूर्ती नव्हेत. आपण त्यांना सुविधा, संस्कार, संधी द्यायची. संधीचं सोनं करायची जबाबदारी
मुला-मुलींची. आपल्याला एखादी गोष्ट मूल असताना मिळाली नाही, म्हणून आपण आपल्या पाल्यास तत्परतेने देतो. पण ती देताना जाणीव करून देतो का? उपकाराच्या भावनेने पाल्यास काहीच देऊ नये. जे द्यावं, ते कर्तव्यभावानं. पाल्याच्या बाबतीत तुम्ही निष्काम कर्मयोग आत्मसात केला पाहिजे. द्या आणि विसरून जा. पालकांनी पाल्याच्या बाबतीत फकीर असायला हवं. 'नेकी कर और समुंदर में डाल’, ‘कर्तव्य कर नि विसरून जा.' मुलांकडून अपेक्षा करू नका. तो पाणी पाजेल, तो म्हातारपणात आपली काठी होईल, मुलगी आपण दाखवू त्या स्थळाशी लग्न करेल. मुलांच्या भविष्याची स्वप्न पहा, पण आग्रह करू नका. सक्ती तर नकोच नको.
चांगले पालक आपल्या पाल्याच्या वाढीबरोबर आपली भूमिका बदलतात. पालक, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र, निरीक्षक, सल्लागार, त्रयस्थ असा भूमिकेतील बदल जे आत्मसात करतात, त्यांच्या हाती मुलं लागतात. मुलांच्या वाढीबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. ‘सावध ऐका पुढच्या हाका' या न्यायानं मुलाला केव्हा सांगायचं नि त्याचं केव्हा ऐकायचं याचं तारतम्य पालकांना हवं. जन्मभर मी मुलाचा बाप, मी आई असं असत नाही.
मुलांना लहानपणी प्रेम देणं, संगोपन करणं, अगदी लाड करणं मुलाची गरज असते. कुमार वय संस्कारांचं असतं. किशोर वयात चांगलं नि वाईट यातला फरक समजावयाला हा. तरुणपणात ध्येय द्यावं, फुलवावं. विकासाच्या सर्व संधी देण्यासाठी जिवाचं रान करावं पण या वयात बंधनांचा कासरा हळूहळू सोडायला शिकावं. मुलांचं वय धोक्याचं झालं की संवाद सुरू ठेवावा. लादणं कमी करावं. मुलं कॉलेजात जाऊ लागली की जोजवणं कमी करावं. जबाबदारी द्यावी. तो मिळवून शिकेल असं पहावं. सारं ऐतं दिलं की मुलं मस्तवाल होतात. परिस्थिती असली तरी मिळवून खायला शिकवा. आपल्याकडे पालक मुलांचा संसारही पेलताना मी पाहतो. मग ती त्यांचे जीवन केव्हा जगणार? त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. तुम्ही मदतनीस राहा.
आजचे पालक अनुभवत असताना मला जे वाटलं ते लिहिलं. तुम्हाला काय वाटतं?
परीक्षांचा महापूर
आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. त्या पाठोपाठ दहावी, मग विद्यापीठ, शाळा, कॉलेजांच्या अनेक परीक्षा येत आहेत. आजचा काळ हा परीक्षांचा झालाय खरा! अगदी बालवाडीच्या प्रवेशालाही सीईटी (प्रवेश परीक्षा) द्यावी लागत आहे. पालकांना द्यावी लागणारी मुलाखत ही त्यांची सत्वपरीक्षाही असते नि अग्निपरीक्षाही! जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो परीक्षांचा चक्रव्यूह. त्यातून कोणीच, कधी सुटला नाही. एखाद्या परीक्षेस जाणं, भिडणं वाघाच्या गुहेत जाणं असतं! पूर्वी नव्हे तितकी स्पर्धा... जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली ती परीक्षांच्या महापुरामुळे! प्रवेश परीक्षा, चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, वार्षिक परीक्षा, वधू परीक्षा, रक्त परीक्षा, थुकी परीक्षा, लघवी परीक्षा, नाडी परीक्षा... एक का शंभर परीक्षा!
अलीकडे मी सारखा विचार करतो आहे... हे परीक्षांचं पीक फोफावलं कसं? पूर्वी मनुष्य अज्ञानी होता. तो अकुशल होता. अक्षमही होता तो. त्यावेळी त्याला कोणत्याच परीक्षेला तोंड द्यावं लागायचं नाही. श्रमाच्या घामानं शेत भिजायचं. आईच्या मायेनं घराची भिंत सारवली जायची. ताई अंगण सारवायची. चिमणी नि चुलीच्या धुराने घर काजळी धरायचं तेव्हा परीक्षा नव्हती नि काळजी पण! सारं कसं शांत, मुलायम, सुखद होतं! आज सारं कसं झगझगीत, चकचकीत लागतं. असतं ही ते तसं पण आत-आत असतं एक उद्ध्वस्तपण, अस्वस्थपण, हे सारं आधुनिकतेच्या हव्यासातून, ध्यासातून आलं. परीक्षेचा जन्म हा हव्यासाच्या स्पर्धेतून जन्मला.
आज पालकांना आपली मुलं रेसचे घोडे करण्याचा ध्यास लागला आहे. त्यांना टक्क्यांचे टटू हवेत. ‘मूल्यवान माणूस' कुणासच नको आहे. सगळ्यांना हवी आहेत यंत्र... प्रत्येकाच्या कानात एकच मंत्र घुमतो आहे... ‘पळा रे पळा, पाहू कोण पुढे पळतो ते'. आपणास पळणारे नि पाळता येणारे वळू हवे आहेत. स्वतंत्र विचार करणारा माणूस आपली अडचण बनतो आहे, असा माझा अनुभव आहे.
परीक्षेला पर्याय शोधून कौशल्य, स्मरणशक्तीला फाटा देऊन उपयोजन महत्त्वाचे. भाषेचा उपयोग गाळलेले शब्द भरण्याऐवजी वगळलेली माणसं जोडण्याची कला म्हणून कसा करता येईल याचे आव्हान आपणापुढे ठाकलेले आहे. धोतर व साडीऐवजी पँट वापरणं यालाच जर आपण आधुनिकता म्हणणार असू तर गफलत झाली म्हणून समजा. परीक्षेतून उपयोगिता वाढली पाहिजे. परीक्षेतून कौशल्य विकसित व्हायला हवं. परीक्षेतून मिळवलेल्या टक्क्यांचा उपयोग समाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, गरिबी, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झाला तर ते योग्य संक्रमण, परिवर्तन होय. पण आज स्थिती उलट आहे. विद्यार्थी सातवी पास झाला की गाव, दहावी पास झाला की तालुका, बारावी पास झाला की जिल्हा, पदवीधर झाला की राज्य नि पदव्युत्तर परीक्षा... विद्यापीठाची परीक्षा पास झाला की देश सोडतो. परीक्षा जोडण्याचे साधन न होता तोडण्याचे हत्यार होते आहे. ही काळजी करण्याची बाब आहे.
परीक्षेनं माझ्यातला 'माणूस' मोठा होतो का, हा खरा प्रश्न आहे. शिक्षणानं येणारं संक्रमण वैभवी तेव्हा असतं जेव्हा माणूस शिकूनही उपयोगी, नम्र भाव, नाते जपणारा राहतो. हिंदी कवी कुँवर बेचैन आपल्या एका कवितेत म्हणतात,
‘साडी-टाई बदले, या घर बदले
प्रश्नचिन्ह नित और बड़ा हो जाता
कारण केवल यही, दिखावों से जुड़ हम
तोड़ रहे अनुभूति, भावना से नाता'
असा माझाही अनुभव आहे. तुमचा?
सगुण निर्गुण
जाणिवांची आरास/१३९
जाणिवांची आरास/१४0
सार्वजनिक सत्यधर्म
दोन दिवसांमध्ये एक रात्र असते की, दोन रात्रींमध्ये एक दिवस? असा प्रश्न केला तर काही उत्तर देतील की, ‘दोन दिवसांमध्ये एक रात्र असते तर काही ‘दोन रात्रींमध्ये एक दिवस असतो. असो. दोन्ही उत्तरे सापेक्ष असल्याने बरोबरच. ज्यांचे उत्तर दोन दिवसांमध्ये एक रात्र असे आहे, ते आशावादी होत. त्यांना जगातले उज्ज्वल अधिक दिसते. ज्यांचे उत्तर दोन रात्रींमध्ये एक दिवस आहे त्यांना निराशावादी म्हणावे लागेल. कारण त्यांना अंधार अधिक दिसतो आणि उजेड कमी. माझे उत्तर मात्र वेगळे आहे. ते आहे, ‘एक दिवसानंतर एक रात्र असते. हे प्रश्नाचे वस्तुनिष्ठ उत्तर. उत्तराचं असं का व्हावं? तर माणसं जीवनातील प्रश्न आपला वकूब, दृष्टिकोन आदींनी ठरवतात नि त्या अनुषंगाने ते सोडवतही असतात. आशावादी माणसं सकारात्मक असतात. “जग बदल घालुनि घाव यावर त्यांचा विश्वास असतो. तसेच, ‘बाबा, जग हे बदलायचे' अशी त्यांची धडपड असते. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातांवर तरलेली आहे. या तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास असतो. अशी माणसं जीवनाबद्दल आश्वस्त असतात. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे यावर त्यांचा विश्वास असतो. अपेक्षा नि कृती अशा दोन्ही पातळीवर ही माणसं रचनात्मक दृष्टी ठेवतात. अशी माणसं प्रयत्नवादी व प्रयत्नशील असतात. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान अशी नसणारी ही माणसं एकतर अल्पसंतुष्ट नसतात नि दैववादीही. पूजापाठ, व्रतवैकल्ये, कर्मकांडाने या जगात काही मिळत नसते. मिळते ते सारे कर्मयोगावर.
जाणिवांची आरास/१४१
शेतकरी बी पेरून घरी बसत नाही. खुरपणी, छाटणी, पाणी देणं, खत घालणं, फवारणी करणं, राखण करणं असं हर प्रयत्नांनी तो पीक पदरी पाडून घेतो. माणसाचं आशावादी असणं दुसरे तिसरे काही असत नाही. ती असते त्याच्या मनाची ठेवण व वागण्याची पद्धत, ज्याला अलीकडे आपण जीवनशैली म्हणतो. निराशवादी टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वतः निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देण्याबरोबरच सक्रिय करणंही महत्त्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ‘जीवन त्यांना कळले हो' पठडीतली असतात. ती आशेने हरळत नाहीत नि निराशेने हताश होत । नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळ, गलबल्यात स्वतःस न विसर्जित करतात, न हारतात. ‘अत्त दीप भव' म्हणत ती स्वतः अंधाच्या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्नं कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर फुकाचा भरवसाही ठेवत नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो आणि भरोसाही. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन नि वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि ‘तू' याच्या पलीकडे आपण असा सामूहिक सद्भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्त्वाची वाटते. जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.
जाणिवांची आरास/१४२
सर्वांभूति समानत्व
एक पंडित होते. नावेतून रोज पलीकडच्या मंदिरात मंत्रोच्चार करीत देवदर्शनार्थ जात असत. नावाडी अडाणी होता. एक दिवस न राहून त्याने पंडितास विचारले, “तुम्ही रोज काय पुटपुटत असता, ते मला काही कळत नाही. सांगाल का?' पंडित म्हणाले, “अरे मी संस्कृत मंत्र म्हणतो. तुला संस्कृत नाही येत? तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं म्हणायचं.' हे ऐकून नावाड्याला आपण अडाणी राहिलो याचे शल्य वाटत राहिले. असेच काही दिवस गेले. नदीला पूर आलेला. नावाडी नेहमीप्रमाणे पंडिताला पैलतीरी घेऊन निघालेला. नदीपात्राच्या मध्यावर असताना नावेची तळातील जीर्ण फळी पाण्याच्या जोराने उचकटली नि नाव बुडू लागली. नावाडी पंडीत महोदयांना पाण्यात उडी टाका नि पोहायला लागा म्हणून समजावू लागला. पंडिताने विचारले, ‘पोहायचं म्हणजे काय करायचं?' नावाडी उडी टाकत म्हणाला, “तुम्हाला पोहायला येत नाही? मग तर तुमचं संपूर्ण आयुष्यच वाया गेलंय म्हणून समजा.' कोण ज्ञानी नि कोण अज्ञानी याचा आपण तपास करू लागू तर लक्षात येते की, प्रत्येक ज्ञानाचा संबंध जीवन जगण्याशी असतो. ज्ञान आहे, पण उपयोग नाही असे ज्ञान काय कामाचे? वर्तमानात तुम्ही कितीही शिकलेले असा, जर तुम्हाला संगणकीय ज्ञान नसेल तर तुम्ही अज्ञानीच. काळाप्रमाणे ज्ञानाचे स्वरूप बदलते. पूर्वी मंत्रोच्चार, पठण, श्रवण म्हणजे ज्ञान होते. नंतर लेखन, वाचन, अंकमोड म्हणजे ज्ञान झाले. वर्तमानात तेच माहिती, तंत्रज्ञान साधनाद्वारे सुदर पोहोचविता येणे ही ज्ञानीपणाची पूर्वअट होऊन गेली. असे असले तरी जीवनातील छोटी, मोठी कामे करणा-यांचे महत्त्व
जाणिवांची आरास/१४३
कमी झालेले नाही. ज्ञानी समाज जितकी यंत्रे बनवेल, जितका तो यंत्रवत आणि यंत्रमय बनेल, तितके मूलभूत हस्तकौशल्याचे महत्त्व वाढेल. आजचे ज्ञान हा त्याचाच आविष्कार नाही का?
ज्ञान हे पैसे मिळवायचे साधन की जगण्याची कला? याची फारकत होणे वर्तमानाची शोकांतिका आहे. भारतीय समाजात विशेषतः ज्ञान, श्रम । व कौशल्य यातील वाढत्या दरीनेच येथील केवळ विषमतेची दरी रुंदावलेली नाही तर शिक्षित माणसं मानसिकदृष्ट्या अडाणी व अल्पशिक्षितांना हीन, दीन, अस्पृश्य मानतात हा वर्तमानाचा सामाजिक महारोग होय. फळांनी लगडलेली फांदी ओझ्याने उन्नत न होता नम्र होते, या निसर्ग नियमाची पायमल्ली विषण्ण करणारी आहे. भारतीय समाजमानसात कमी शिकलेल्यांबद्दलचा तुच्छ भाव आपल्या सरंजामी वृत्तीचेच प्रतीक होय. शिक्षण माणसास सभ्य करण्याचे साधन व माध्यम म्हणून आपण वापरत नाही, ही आपली शोकांतिका होय. नुसती कल्पना करून पाहा की गवंडी, प्लंबर, सुतार, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, नर्स, लाइनमन, ऑपरेटर, शेतमजूर, मीटर रीडर नाहीत. जग सारं डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, नट, नेत्यांनी भरलेलं आहे. सर्वत्र नुसते संपादक आहेत. पत्रकार, कॅमेरामन, अँकर, प्रिंटर, कंपोझिटर नाहीत. यंत्रात सर्व भाग महत्त्वाचे तसेच समाजातील सर्व प्रकारची माणसे तितकीच महत्त्वाची. भेद, दुजाभाव, श्रेष्ठ-कनिष्ठता, उजवा-डावा असे भेद-फरक आपल्या मानसिक घडणीचा राहिलेला दोषच. ‘सर्वांभूति समानत्व हे प्रगल्भ समाजाचे लक्षण होय. प्राप्त ज्ञानाचा विवेकी वापर, निरअहंकारी वर्तन, 'मी' नव्हे 'आपण' असा सर्वग्राही, सर्वव्यापी, समाज व्यवहार नि सभ्यता म्हणजे सज्ञानता अशी ज्ञानाची व्यापकता आपण सुशिक्षित समाजाच्या वर्तन व्यवहारात रूजवू शकू तर तो खरा मानव विकास नाही का ठरणार ? केवळ भौतिक समृद्धीचं साधन म्हणून आपण ज्ञानाकडे पाहात राहिलो तर माणसाचा मिडास होण्यास वेळ लागणार नाही. शिक्षितांच्या मनुष्यलक्ष्यी होण्याचा प्रवास ज्या दिवशी सुरू होईल तो दिवस सोनियाचा म्हणायचा.
जाणिवांची आरास/१४४
सात समंध मानेवर
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी विंदा करंदीकर यांच्या 'मृद्गंध' कवितासंग्रहात 'हे आइन्स्टीन!' शीर्षकाची कविता आहे. तिच्या काही ओळी अशा,
'हे आइन्स्टीन! 'कोण', 'काय', ‘कसे', 'कुठे', 'का' - असे सात समंध माझ्या मानेवर! हे समंध समस्त मानव जातीच्या मानगुटीवर अनादि, अनंत काळापासून
बसलेले आहेत. समंध म्हणजे भूत. भूत एकदा मानेवर बसले की उतरत नसते म्हणे! कोण, काय, कसे, कुठे, कधी, किती, का ही तशी प्रश्नात्मक सर्वनामे; पण शब्दांनी सा-या ज्ञान, विज्ञान विकासाचा पाया घातला. आपल्या भाषेत शब्दांचे अस्तित्व नसते तर आपण अद्याप अश्मयुगात असतो. माणसाला प्रश्न पडणे वा प्रश्नात माणूस पडणे यात समस्त मानव जातीचा विकास सामावलेला आहे.
'कोण' हा प्रश्न कोऽऽहम? पासून आला. माणूस विचार करायला
लागला म्हणजे काय? तर तो अंतर्मुख झाला नि स्वतःला प्रश्न केला की, मी कोण? शोध घेता घेता त्याच्या लक्षात आले की, कालपटलाच्या अनंत प्रवासात 'मी' म्हणणारा अहंकारी मनुष्य कःपदार्थच असतो. आकाशगंगेत असंख्य तारे असतात तशी पृथ्वीतलावर असंख्य माणसे. त्यातला एक तू.
जाणिवांची आरास/ १४५
तुला अमर व्हायचं तर मनुष्याचा महात्मा, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, साहित्यिक, कवी, कलाकार व्हायला हवं. नाही तर तू सामान्यातील एक.
'काय' प्रश्नाने साच्या जगाचे रहस्य उलगडलेस. काय हवं, काय नको या विधिनिषेध विवेकाने जंगली माणसाला सभ्य, सुसंस्कृत बनवलंस. नीती, आदर्श, संस्कार, सभ्यता, संस्कृती या साच्या संकल्पनांचा उदय ‘काय' या प्रश्नातून झालेला आहे. 'कसे' आणि 'कुठे' तसे गौण प्रश्न. पण त्यांनीही स्थल, काल महात्म्य अधोरेखित केलं आहे. हे शब्द नसते तर पृथ्वीचा शोध लागला नसता. कोलंबस, वास्को दि गामा यांनी पृथ्वी प्रदक्षिणा करून जगातले नानाविध देश, भाषा, संस्कृती, ज्ञान-विज्ञान शोधून काढले म्हणून समस्त मानव समाज निरंतर उन्नत होतोय. ‘कधी' या प्रश्नाने कालभान दिले. या कालभानामुळेच माणसाला गतीचा बोध झाला. गतीने सूर्यमंडळाला गवसणी घातली. गॅलिलिओ, सॉक्रेटिस, अॅरिस्टॉटल, तुकाराम आणि आज डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, माणूस गती स्वीकारत नाही. फक्त तो क्षमा मागतो. असहिष्णू व्यवहार केवळ क्षमाप्रार्थनेने दुरुस्त होत नसतात. पोपच्या क्षमा याचनेपेक्षा सर्वसामान्यांचं प्रगल्भ, स्वप्रज्ञ होणं महत्त्वाचं. ‘कधी प्रश्नाला बगल देणारा समाज सदैव देववादी नि दैववादी राहिल्याचा इतिहास आहे. प्रबोधन पर्व सात समंधांचा पिच्छा पुरवत स्वतःला उसवत विवेकवादी बनवत राहते. आइन्स्टीन मोठा का? तर त्यानं जगाला सापेक्षता समजावून निरपेक्ष केलं. ‘किती' प्रश्न वर्तमानाचं चलनी नाणं होऊन बसलं आहे. माणसाने नाणे जन्माला घातले हा अंकज्ञानाचा गैरवापर होय. अर्थशास्त्र किती? प्रश्न विचारते. तो गरज सूचक होय. गरजेपेक्षा संग्रह म्हणजे विषमता, अत्याचाराचे मूक समर्थनच. सत्ता आणि संपत्ती दोन्ही किती शब्दाच्या पायावर उभी असते. मताच्या जागी मन आणि नाण्याच्या जागी माणूस पाहतात ते राज्यकर्ते. सर्वसंग परित्याग करणाच्या गौतम बुद्धाने जीवनातून ‘किती शब्द बहिष्कृत करत तो स्वतः हद्दपार झाला होता. 'कफनी’ आणि ‘कफन' यातलं अंतर त्यालाच समजलं. आज आपण काय पाहतो? ‘का?' या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हीच शोधायचे.
जाणिवांची आरास/१४६
माणूस
माणूस हा मला नेहमी हिमनगासारखा वाटत आला आहे. दिसतो छोटा, असतो मोठा. माणूस जसा नि जितका असतो, त्यापेक्षा कमी दिसतो नि समजतो. मनुष्य संबंधातले सारे ताणतणाव निर्माण होतात, ते असण्या नि दिसण्याच्या गफलतीतून. माणसाचं असणं... त्याचा शोध, वेध घेऊ पहाल तर कठीण! माणूस एकच असतो पण समाजजीवनात त्याला संबंधपूर्ततेचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पुरुष हा मुलगा, बाप, काका, मामा, भाचा, पुतण्या, शिष्य, प्रियकर, नवरा, बॉस, नेता काहीही असतो. म्हणजे एकच पुरुष एका जन्मात असंख्य भूमिका निभावतो. तीच गोष्ट स्त्रीची. ती मुलगी, मावशी, आई, ताई, आत्या, शिष्या, सहकारी, सचिव, वरिष्ठ, नर्तकी, अभिनेत्री, वैज्ञानिक असू शकते. पुरुष किंवा स्त्री एक मनुष्य म्हणून किती चेहरे, मुखवटे घेऊन फिरत असतात. त्यामुळे, एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुस-या एखाद्या व्यक्तीस अप्रिय ठरतो. माहेरची मुलगी सासरी गेली की ती तिथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी ती बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं? याचा शोध घेता लक्षात येतं की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी, संबंध लक्षात घेऊन नटासारख्या भूमिका वठवत असतो. ते समाजाने त्याच्यावर लादलेलं पारंपरिक ओझं असतं. आपल्याकडे संबंधाच्या भूमिकांनुसार आपलं वागणं ठरतं. सारे प्रश्न त्यातूनच निर्माण होतात. माणसाचं वागणं शोभादर्शकातल्या प्रतिमांसारखं असतं, असं मला वाटतं. म्हणजे एकाच वेळी शोभायमान परंतु भ्रामक, जागा बदलली की,
जाणिवांची आरास/१४७
आकृती बदलणं जसं अटळ ठरतं तसं माणूस स्वभाव, वृत्ती, बोलणं, भूमिका, तत्त्वज्ञान बदलतो. बदलातली ही भ्रामकता माणसात स्वाभाविकच विसंगती निर्माण करते. तो दुस-याकडून जे अपेक्षितो तसं दुस-याशी तो वागतोच असे नाही. त्यामुळेच किंबहुना एकाच माणसाच्या स्वभावाची वर्णने अनेक. ते वर्णन अनुभव, प्रचीती, प्रत्ययांवर अवलंबून असते. घरी मुलांना अतिशय प्रेमळ वाटणारा बाप कार्यालयातील कर्मचारी तसेच सहका-यांना खाष्ट, कठोर वाटू शकतो. किंबहुना, एकच माणूस वेगवेगळ्या स्थळी, काळी, प्रसंगी भिन्न रूप, रंग, वृत्ती घेऊन वागतो आणि जगतो. माणूस समाजशील होण्यातून आलेलं हे परिवर्तन परंपरा म्हणून किंवा दायित्व म्हणून तो निभावत असतो. हे सारं त्याच्यासाठी अटळ होऊन जातं.
मग, प्रश्न असा पडतो की नेमका माणूस कळायचा तरी कसा? ते कळणं ही महाकठीण गोष्ट आहे खरी! माणसातील खन्याचा शोध ‘क्ष किरण' टाकले तरी लागणे अशक्य. कारण माणूस म्हणजे केवळ हाडामासाचा गोळा नाही. तसेच तो केवळ स्नायू व मज्जातंतूचा पुंजका नाही. त्याला कोणत्याही इतर सजीव प्राण्यापेक्षा दोन शक्ती अधिकच्या लाभल्या आहेत. एक विचार करण्याची शक्ती नि दुसरी त्याच्या मनात निर्माण होणारी भावना. भावना प्राण्यांना पण असतेच. परंतु, माणसाने तार्किक विकास घडवून आणला, त्यातून त्याने अनेक नवनव्या गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यात संस्कृती ही सर्वांत मोठी गोष्ट त्याने साकारली आहे. प्राणिसंस्कृतीच्या रीतीभाती, सवयी आणि माणसाच्या रूढी, परंपरा, संबंध नाते यांच्या मूलभूत अंतर आहे. प्राण्यांमध्ये नर आणि मादी एवढेच नाते असते. माणसाने अपत्यजन्माच्या विकासात संबंधांना रुढी, परंपरांनी बांधून प्राण्याचा मनुष्य केला आहे. पण त्याच्यात झालेले बदल हे वरवरचे असल्याने त्याच्यात कधी कधी मूळ वृत्ती उफाळून येतातच. त्यामुळे, असे सांगितले गेले आहे की माणसांचे आंतरिक बदल महत्त्वाचे. आंतरिक वृत्ती, स्वभावाचे परिष्करण जो माणूस भूमिका, भान म्हणून स्वीकारतो, तो आत-बाहेर एक असतो. माणसाचं आत-बाहेर एक असणं आदर्श असलं तरी कठीण! ते अवघड आहे. आपल्यातला हिंस्त्रपणा त्याने मारला, त्यामुळे खरंच का माणूस अहिंसक झाला?
जाणिवांची आरास/१४८
जगणं
माझ्या लहानपणी व माझी मुले लहान असतानाही रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाईलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता. मात्र, हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतंय. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मात्र, मोबाईलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. लहानपणी हा खुळखुळा व्हिडिओ गेम्सचा नाद लावतो. ते गेम त्याला गाणी, गोष्टी, खेळ शिकवतात. थोडा मोठा झाल्यावर हा खुळखुळा त्याला फोन करायला शिकवतो. पाचवीत गेला की, तो व्हॉट्स अॅप वापरू लागतो. आठवीला गेला की, ‘मिस कॉल देऊ लागतो. अकरावीत व्हिडिओ क्लिप बघू आणि पाठवू लागतो. कॉलेजला गेली की, युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते. माणूस मिळवू लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक'वर बाता मारू लागतो. लग्न झाले की फेक अकाऊंटवरून हृदय नि मन मोकळं करत राहतो. कधी लाइक, कधी कॉमेंट असं व्यक्त-अव्यक्त आभासी जगात जगू लागतो. गुड मॉर्निग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम्स, काँग्रेट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडेच! आभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना मी अनेकदा पाहतो. या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. या संस्कृतीचे भाकित अॅरिस्टॉटल यांनी केले होते. अगदी अलीकडेच बाबा
जाणिवांची आरास/१४९
आमटेंनी ‘ज्वाला आणि फुले' मध्ये ते अधोरेखित केलं आहे. 'मे-फ्लाय संस्कृती' तिचे नाव! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. माशी, नाकतोडा, टोळ, पंख मुंगी हे सारे या प्रजातीत मोडतात. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड व पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही! तो रक्तहीन असला तरी रतिप्रवीण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारुण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठी जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम ‘सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. संभोग जबरी असतो. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे, मरणे नि मारणे. जगणे नसतेच.
माणूस मे-फ्लाय होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला एटीएम जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहणे आले पाहिजेत. ते राहिले पाहिजेत. तुम्हीही इतरांच्या घरी जात-येत रहा. गतीत ते शक्य नाही, याची मला जाणीव आहे; पण गतीत उसंत शोधा. उसंत स्वतःसाठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. वाचा, बोला, ऐका, लिहा, पाहा. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वतःपलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे मोजून भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाईल हे सारे त्या त्या काळातले आभासी भावच! माणूस भावाचा भुकेला असतो. आभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जिवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरे जगणे!
जाणिवांची आरास/१५०
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य हे जीवनमूल्य आहे. ते राष्ट्र, मानव समाज अशा संघटित जीवनात जितके महत्त्वाचे, त्यापेक्षा व्यक्तिगत जीवनात त्याचे महत्त्व असाधारण! माणसाला उपजतच स्वातंत्र्य आवडते. अगदी लहान मुलांनाही. म्हणून तर आपण टीव्ही, व्हिडिओ गेम बंद करून अभ्यास कर म्हटले की त्याला राग येतो. मुले मोठी होऊ लागली की, मित्र-मैत्रिणी हे त्याचे स्वातंत्र्य असते. कारण तिथे त्यांना मन मोकळे करता येते. खरंतर मुलांना घरी मोकळा श्वास घेता आला पाहिजे. मुक्त संवाद करता आला पाहिजे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांची गोष्ट सांगितली जाते. अध्यक्ष झाल्यावरसुद्धा ते रविवारचे भोजन कुटुंबासमवेत घेत. त्या दिवशी घरचे सर्वजण उपस्थित असत. जेवणाच्या टेबलावर सर्व समान! अध्यक्ष झाल्यावर नातूसुद्धा त्यांना ‘मिस्टर हॉवर' म्हणून बोलावत असे. आधी स्वातंत्र्य, समता, बंधुता घरात नांदली पाहिजे. नंतर ती समाज नि देशात पाझरायला हवी. स्वातंत्र्याचा पायाच समानता आहे. घरातील स्त्री-पुरुष एकमेकांशी मनातलं बोलतात की औपचारिक संवाद राहतो, यावर घराचं घरपण अवलंबून असतं. आई-मुलगा, मुलगी-वडील, सासू-सून, मुलगी-सून हे दोन ध्रुव असतील तर तिथं स्वातंत्र्य, समता नसते. मग बंधुतेचा प्रश्नच निर्माण होत नाही. एका निबंधकाराने घराचं घरपण बोलणे, ऐकणे नि सहन करणे अशा तीन शब्दांवर टिकून असल्याचे लिहून ठेवले आहे. मनात येणारे विचार मोकळेपणाने व्यक्त करा; पण दुसन्यास दुखवू नका. दुस-याचे उदारपणे ऐका. पटले नाही तर दुर्लक्ष करा. वरील दोन क्रियांमध्ये आपणाला
जाणिवांची आरास/१५१
दुसरा सहन करतो, स्वीकारतो, हे लक्षात ठेवून इतरांना सहन करा नि स्वीकारा. मग पहा, मतभेद राहिले तरी मनभेद नाही होत. तिथे शहाणपण, सामंजस्य, समन्वय नांदतो. मतभेदपूर्ण सहजीवन, सहअस्तित्व म्हणजे समाजशीलता होय.
स्वातंत्र्याची संकल्पना एकतर्फी असू शकत नाही. स्वातंत्र्य केवळ आपलं नि दुस-याचं मानणं हा स्वार्थ झाला. सर्वांचे स्वातंत्र्य मानणे, म्हणजेच व्यापक उदारता. स्वातंत्र्य म्हणजे नुसता हक्क नाही, तर ते कर्तव्यही असते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तुम्हाला आविष्कार स्वातंत्र्य आहे; पण दुस-याच्या स्वातंत्र्याचा आदर ही त्याची पूर्वअट असते. नाही तर मग आपणास वेगवेगळ्या वनवासास तोंड द्यावे लागते. जगात सारे बदल व परिवर्तने ही स्वातंत्र्यापासून जन्माला आली आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा संकोच हा निषेधार्ह ठरतो. मी म्हणतो तेच खरे, अशी वृत्ती अहंकारातून जन्म घेते. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. सामाजिक जीवनात बहमताला किंमत असते. शहाणा माणूस बहुमत प्रमाण मानून एकान्त पसंत करतो. ही एकप्रकारची समाजसहिष्णुताच असते. स्वातंत्र्य हा एकाधिकार नाही. स्वातंत्र्याची दुसरी बाजू म्हणजे समोरची व्यक्ती नि समाज. ब-याचदा घर, समाज, राष्ट्र आदींसंदर्भात कर्ता अधिकारी असतो. त्याला अधिकारपद लाभते ते कर्तव्य करतो म्हणून किंवा करेल म्हणून. ब-याचदा अधिकारपदी गफलत होते. कर्तव्यदक्ष असतानाही अन्य आकांक्षी कर्तव्यदक्षांबद्दल गैरसमज पसरवतो. सामाजिक मन माध्यमांवर स्वार असते. म्हणून माध्यमांचा विवेक आजच्या काळात महत्त्वाचा. आज जगभर सर्वाधिक नाजूक गोष्ट कोणती विचाराल तर त्याचे नाव स्वातंत्र्य !स्वातंत्र्य म्हणजे जुलूम नि गुलामीचा हास. स्वातंत्र्य लाभायला हवे. लादलेले स्वातंत्र्य कोणतीच निर्मिती करू शकत नाही. निर्मितीशून्य स्वातंत्र्य हे अपराधभाव जन्माला घालते. स्वातंत्र्य म्हणजे स्वाभिमान प्रज्वलित करणारे स्फुल्लिंग होय. स्वातंत्र्यात भय, दरारा, दहशत असता कामा नये. स्वातंत्र्य ही दुस-याच्या डोळ्यात पाहण्याची गोष्ट होय. दुस-याच्या डोळ्यात तुमची प्रतिमा सहिष्णुतेची असेल तर समजावे, या जगात मुंगीलाही अभय आहे.
जाणिवांची आरास/१५२
देणान्याचे हात
माणसाच्या ज्या मूलभूत वृत्ती आहेत, त्यात संग्रह एक आहे. मनुष्य भविष्याची गरज म्हणून जसा संग्रह करतो, तसा तो लोभामुळेही करतो. गरजेपेक्षा अधिक संग्रह समाजात विषमता निर्माण करतो. माणसं संग्रह करतात स्थावर, तर जंगम संपत्ती चंचल, गतिशील. गरजेपेक्षा अधिक संग्रह माणसाला चैन पडू देत नाही. संपत्तीचा विनियोग, उपभोग विवेकाने करणारी माणसं अतिरिक्त संपत्ती दान करतात. दान करण्यामागे दया, साहाय्य, पुण्य, उदारता असे अनेक भाव असतात. धर्मात दानाचे महत्त्व आहे. त्यामागे पुण्यप्राप्तीची आकांक्षा असते. अपेक्षेने केलेल्या दानाची किंमत शून्य असते. दान निरपेक्ष, निःस्वार्थ हवं. दानामागे परताव्याची अपेक्षा असता कामा नये. 'नेकी कर और समुंदर में डाल' इतकं ते निरिच्छ हवं. दान त्याग असायला हवा. त्यागात गरज असताना साहाय्याची उदारता असते. त्यागपूर्ण दान श्रेष्ठ, शिवाय ते देव, धर्म, दैवादी भावनेपेक्षा समाजहितार्थ करणे अधिक महत्त्वाचे. मंदिराच्या जीर्णोद्धारापेक्षा जिवंत माणसाचा विकास केव्हाही श्रेष्ठ, दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, धनदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान इत्यादी. सर्वांत श्रेष्ठ सर्वस्व दान. त्याला मोठी हिंमत लागते. तुम्ही 'स्व'चं विसर्जन करू शकाल, तेव्हाच ते शक्य आहे. संतपदास पोहोचण्याची ती कसोटी होय. मानवी जीवनात दानास इतके महत्त्व का? असा विचार करू लागाल तर लक्षात येईल की, माणूस सहसा कोणतीही गोष्ट सोडायला तयार होत नाही. सत्ता, संपत्ती, पद, अधिकार या अशा गोष्टी आहेत की, ज्या मोहात माणूस अडकतो. हवं असताना सोडणं हे प्रगल्भतेचे लक्षण, काळजी, गरज,
जाणिवांची आरास/१५३
जबाबदारी म्हणून संग्रह करणे शहाणपणाचे. तेच तत्त्व दानासही लागू आहे. दुस-याची काळजी, गरज हे आपण आपले कर्तव्य मानतो का? यावरच माणूसपण अवलंबून असते.
असताना कोणीही दान करील. नसतानाही दान करता आलं पाहिजे. स्वतः भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दुःख आपलं वाटणं म्हणजे संवेदनशीलता. ती उसनी नाही घेता वा आणता येत. ती असायला हवी नि असते. ती जाणीवेतून येते. चमडी देगा लेकिन दमडी नहीं,' म्हणणारी माणसं नुसती कंजूष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वतःच्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो. मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुम्ही दुस-याला साधने देता तेव्हा तो काही मोठा दानधर्म असतो, असे नाही. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे स्वविसर्जन खरे उच्चकोटीचे दान. निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात घेण्याची कल्पना हे जगातले सर्वोत्तम अनुकरण म्हणायला हवे. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहीत असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपूर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगांना दान चांगलेच पण, त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु, दिव्यांग बनवणे लाख मोलाचे. ते केवळ देण्याने घडत नाही. ते होण्याने शक्य असते. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं, ‘त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.
जाणिवांची आरास/१५४
भारतीय असणं
माणूस एखाद्या देशाचा नागरिक असतो म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा मी नेहमी हक्काच्या परिघात फिरताना अनुभवतो. हक्काच्या लढाईइतकीच कर्तव्य भावना महत्त्वाची. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात तर कर्तव्यपरायणता अधिक महत्त्वाची. कारण भारत हा वैविध्यपूर्ण देश. ज्या देशात एकवंशी समाज असतो, तिथं त्या राष्ट्राचं एकात्म होणे भारताच्या तुलनेने सोपे असते. त्या राष्ट्रामध्येही छोटे छोटे भेद असतातच; पण भारतातील नागरिकत्वास वेगळे परिमाण आहे. हा देश आकारलाच मुळी विविध वंशांतून. निग्रो, पठण, द्रवीड, आर्य, ग्रीक, शक, हूण, कुशाण, कंगोल, मुस्लिम, तुर्क असे कितीतरी प्रकारचे, वंशाचे लोक भारतात आले. त्यांच्यात शतकानुशतके रोटी-बेटी व्यवहार होत राहिले. म्हणून भारतात स्थापना व विकासकाळापासून बहुवंशीय समाज दिसून येतो. बहुवंशातून बहुवर्ण साकारले. वर्णाचे जातीत रूपांतर झाले. आज आपल्या भारतीय समाजात विविध जाती, पोटजाती दिसतात त्याचे मूळ कारण आपलं बहुवंशीय असणे आहे. तीच गोष्ट धर्माची. हिंदू, मुस्लिम, जैन, बुद्ध, पारशी, शीख असे धर्मवैविध्यही इतिहासकाळापासून इथे नांदतेय. भाषा, संस्कृती, सण, दागिने, पोशाख, चालीरितींचे वैविध्य इथल्या आसेतू हिमालय पसरलेल्या निसर्गातून पाझरलंय. म्हणून इथे विविधतेतही एकता दिसून येते. इथली एकता सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. भारतावर इतिहासकाळापासून अनेक स्वाच्या, आक्रमणं झाली. अनेकांनी हा देश विशिष्ट धर्म, संप्रदायाचा बनविण्याचे प्रयत्न केले; पण त्याला यश
जाणिवांची आरास/१५५
आले नाही. कारण दैनंदिन जीवनात जगत असताना इथले नागरिक बंधुता घेऊन जगतात. इथे गणेशोत्सव असो अथवा ईद हिंदू-मुस्लिम मिळून साजरे करतात. हे एकत्व खरं तर आपल्या भाषा, शिक्षण, साहित्यातून अधिक प्रकर्षाने व प्रगल्भपणे जोपासता येईल; पण आपण प्रांतवादाच्या संकीर्णतेमुळे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणजे असे की, आपल्या प्रत्येक प्रांताच्या सीमेवर बहुभाषी, बहुलिपी, बहुसांस्कृतिक प्रांत असतात. आपण त्यांचा अभ्यास करायला हवा. आपण पर्यटक म्हणून भारतभ्रमण करतो; पण एक नागरिक म्हणून करतो का? गुजराथी, कन्नड, तेलगू, हिंदी या आपल्या भाषा भगिनी. त्यांचा अंतर्भाव आपल्या शिक्षणात व्हायला हवा. आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची म्हणून भारतीय साहित्य, भारतीय भाषा, भारतीय लिपी, भारतीय संस्कृती असे विषय उच्च शिक्षणात समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, साहित्यशास्त्र यात आणले पाहिजेत. असे लोकशिक्षणच इथल्या संकीर्ण राजकारणास छेद देऊन भारत एकात्म करेल.
आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष, विचारधारा या भेदावर उभ्या असतानाही आपण आपल्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही ही मूल्ये का स्वीकारली तर त्यामागे देश एक ठेवण्याचे भान आहे. देशाचे पूर्वीचे नाव 'हिंदुस्तान' असताना आपण ‘भारत' स्वीकारले. त्यामागेही सर्वसमावेशकता, सहिष्णुता, समन्वय वृत्ती आहे हे नागरिक म्हणून आपणाला विसरता येणार नाही. गोवंश पूजणारा नि गोमांस भक्षण करणारा समाज शतकांपासून इथे गुण्यागोविंदाने नांदतो. त्यामुळे शत्रू इथे येण्यास धजावत नाही. शाकाहार-मांसाहार,आर्य-अनार्य, काळे-गोरे, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत इथे सारखेच. म्हणून ‘मेरा भारत महान!' जर्मन कवी व नाटककार गटे जर्मन होते; पण कालिदासाचं 'शाकुंतल' नाटक त्यांनी वाचले होते. रवींद्रनाथ टागोर बंगाली; पण नरसी मेहता, सुब्रह्मण्यम भारती, तिरूवळ्ळूवर आदी कवींचे साहित्य, काव्य त्यांनी मुखोद्गत केले होते. आचार्य विनोबा भावे यांना अनेक भारतीय भाषा यायच्या. साने गुरुजींना म्हणून तर ‘आंतरभारती' नि रवींद्रनाथांना ‘विश्वभारती'चं स्वप्न पडलं होतं, ते भारतात राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणूनच!
जाणिवांची आरास/१५६
विवेकबुद्धी
हे काय प्रकरण आहे? ही क्षमता आहे, वृत्ती आहे, व्यवस्था आहे की काय आहे? सत्, असत्, विवेक नि बुद्धी अशा चार वेगवेगळ्या स्थिती, घटकांचा संयोग म्हणजे एक सार्वजनिक विचार, व्यवस्था होय. ती भूतकाळात होती, वर्तमानात आहे नि भविष्यातही राहील. विज्ञान अनेक चमत्कारिक शोध लावतो आहे. ते मनुष्यहितकारी असतात तोवर ठीक; पण अशी कल्पना करा की, मानवी कल्पात (क्लोन) फेरफार करून विज्ञानाने माणसाची मतीच गुंग करून टाकली तर? मग सत्, असत्, विवेक, बुद्धी हे सारे शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ मुळासकट संपून इतिहासजमा होतील ना? पण तसे काही होण्यापूर्वीच वर्तमानात एक चाणाक्ष यंत्रणा विज्ञानाच्या आधाराशिवाय असा कायाकल्प घडवून आणत असल्याचे लक्षात येते. या यंत्रणेचा लक्ष्य गट आहे बुद्धिवादी वर्ग. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक घेऊ, त्याला तुम्ही सेवाशाश्वती दिली की, तो स्वप्रज्ञ होतो. त्याला मत, मन, मनगट येतं. म्हणून मग काय करायचं तर त्याची शाश्वतीच हिरावून घ्यायची. शासन, संस्था, सत्ता अशा मोक्याच्या जागेवर बोक्यासारखं लक्ष ठेवून सतत ते सर्व आपल्या मुठीत राहील असं पाहायचं. सार्वजनिक पैसा, साधन, संपत्ती अगदी लोकशाही मार्गांनी अशी कवेत ठेवायची की, त्याने श्वासही आपल्याला विचारूनच घ्यायचा. सर्वत्र जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पाठीचा कणा नसलेले, मतांचा विकास होणार नाही असे लीन संप्रदायी समाज निर्माण करायचे. बाबावाद जसा डोळे मिटा, हात जोडा, नतमस्तक व्हा, विचार करायचे सोडा, फक्त मी तुमच्या ध्यानी, मनी, रंध्रा, श्वासात आहे असे कल्पा. स्वविसर्जन करा ‘तो’ ‘मीच' ओ
जाणिवांची आरास/१५७
माना... असं सांगत सद्सद्विवेकबुद्धी हिरावून घेऊन माणसास अस्तित्वहीन, सदाशरण करून टाकतात तसे वर्तमानात घडते आहे.
शिक्षण, प्रशासन, सहकार, माध्यम, बँक, उद्योग, व्यापार जिथे म्हणून विचार करून व्यवहार करायची शक्यता असते तिथे सत्यअसत्याशी मन केले ग्वाही, नाही मानियले बहुमता' असा स्वतंत्र विचार व कृती होणार नाही हे निरंतर डोळ्यात तेल घालून पाहिलं जाणं यासारखं मनुष्य विकास खुटविणारं दुसरं अस्त्र-शस्त्र नाही. ज्या देश, समाजात सार्वजनिक सत्ता, संपत्ती, साधनांवर अगदी वैध मार्गांनी एकाधिकार मिळवून व्यक्तिगत प्रतिष्ठा, वर्धन, प्रतिमापूजन होत राहणे हे काही समाजहिताचे असत नाही. सत्-असत्, न्याय-अन्याय, नैतिक-अनैतिक, विधी-निषेध यात तारतम्य नि विवेकाधारे फारकत करण्याचं स्वातंत्र्य असणं म्हणजे ती व्यवस्था अंतिमतः मनुष्य कल्याणकारी असणं होय. आपण इतिहासाच्या प्रवासात राजेशाही, हकूमशाही, सरंजामशाही, जमीनदारी नष्ट करून राजा जागी प्रजा आणली. याचा अर्थ बहुमत मान्यता व सन्मान आणला. जर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात घराणेशाहीमार्गे तेच जुने तंत्र येणार असेल तर तो प्रबोधनपर्वाचा पराभवच मानायला हवा. आदर्श समाजरचनेत सर्वसामान्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीस शाबूत ठेवण्याचे आश्वासन असतं. तिथे मग सत् असत्मधून तर्क, विवेक, बुद्धीच्या आधार नि कसोट्यांवर निर्णय शक्यता निर्माण होते. माती जागवेल त्याला मत' अशी व्यवस्था असली की आत्महत्येची वेळ येत नाही. माझ्या मना बन दगड' असं बुद्धीजीवी वर्गाला वाटू लागणं म्हणजे विचारप्रक्रिया कुंठित होणं. 'मुठी वळू नका, मनगटे सरसावू नका' असे सांगितले जाऊ लागले की, समजावे ‘मुकी बिचारी कुणी हाका'चा काळ येतो आहे. सामान्य माणसाचं मन प्रफुल्लित, आश्वासक राहणं हे। समाजजीवनात अत्याधिक महत्त्वाचं असतं. ते व्यापक हित धोरणातूनच शक्य असते. त्यासाठी समाजधुरीण, सत्ताधारी, साहित्यिक, संपादक, शिक्षक, कलाकार या सर्वांचा सद्सद्विवेक समानपणे जागृत व सक्रिय असणे तितकेच महत्त्वाचे असते.
जाणिवांची आरास/१५८
विश्वबंधुत्व
मध्यंतरी माझ्या मोबाइलवर कुणीतरी इंग्लंडमधील मँचेस्टर एरिनापुढे झालेल्या मानवी बाँबहल्ल्याची क्लिप पाठविली होती. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांसह २३ नागरिक मारले गेले. शंभर-सव्वाशे जखमी झाले. त्यानंतर काही दिवसांनी एका मुस्लिम युवकाने भर रस्त्यात उभे राहून । छापडीवर (कार्डबोर्ड) फलक लिहून आवाहन केले होते, 'मी मुस्लिम आहे, मला आलिंगन द्या.' इंग्लंडमध्ये आलिंगन हा सद्भावाचा शिष्टाचार समजण्यात येतो. झालं असं की लोकांनी रांगा लावून त्याला आलिंगन दिलं. त्यात आबाल, वृद्ध, दिव्यांग, स्त्री-पुरुष होते. त्यात एक असा सद्गृहस्थही होता की त्याचा भाऊ या बाँब हल्ल्यात मृत झाला होता. जर्मनची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचे एक चर्च होते. सेंट योहान्स चर्च त्याचे नाव. नुकतीच त्या चर्चमध्ये एक मशीद सुरू करण्यात आली आहे. खरं वाटत नाही ना? कधी कधी सत्य कल्पनेपेक्षा सुंदर असते नि शिवही! विशेष म्हणजे त्यांचे जे नव्याने नामकरण करण्यात आलेले आहे ना ते आहे ‘इब्न रश्द गोएथ' हे दोन विचारवंत, साहित्यिकांचं संयुक्त नाम होय. पैकी इब्न रश्द (१९२६-१९९८) हा स्पेनमध्ये जन्मलेला पाश्चात्य विचारवंत. धर्म व तत्त्वज्ञानाची सांगड त्यांनी घातली. दुहेरी सत्याचा सिद्धान्त मांडला. सत्य हे धार्मिक असते तसे तात्त्विकह. मुस्लिम असून त्यांनी कॅथलिक पंथीय धर्मविवेचन करून विश्वमान्यता मिळवली. योहान वॉल्फगाड् फॉन ग्यॉटड (१७५0-१८३२) त्याला आपण गटे म्हणून ओळखतो. हा जर्मन कवी, कादंबरीकार, संशोधक, प्रशासक, समीक्षक होता. ‘फाऊस्ट' हे त्यांचं जर्मन महाकाव्यात्मक नाटक वैश्विक साहित्यकृती म्हणून प्रसिद्ध आहे.
जाणिवांची आरास/१५९
गोव्याचे एक प्रसिद्ध भाषांतरकार ८२ वर्षांचे सुरेशबाबा गुंडू आमोणकर. कोकणी भाषेत ते हिंदू-ख्रिस्ती धर्माचे व इंग्रजी, संस्कृत, मराठी, कोंकणीचे समन्वयक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी फादर स्टीफन कृत 'ख्रिस्तपुराण' चा नुकताच कोंकणीमध्ये अनुवाद केला आहे. त्याची पृष्ठे १०७० आणि वजन सहा किलो. यापूर्वी त्यांनी धम्मपद, श्रीमद् भागवत, तिरुकुळ्ळकर, झेन कथा, जपुजी साहब अशा बौद्ध, हिंदू, शीख धर्मग्रंथांची तसेच तमीळ, चिनी साहित्याची कोंकणीमध्ये भाषांतरे केली आहेत. जग हे निसर्गाचे प्रतिबिंब आहे. निसर्ग हा अनेक रंगांनी भरलेला म्हणून इथली प्राणिसृष्टी बहढंगी. इथे डायनासोर-अमिबा असतो नि हत्ती-मुंगीपण! इथे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अस पंचतत्त्व मीलन पाषाण युगापासून नातं आहे. दिवस-रात्र षड्ऋतू यांचा जीवनक्रम अद्याप कोणी बदलू शकला नाही. म्हणून जगात सांस्कृतिक वैविध्य दिसून येते. मानववंशशास्त्र असे सांगते की वंश-वैविध्य हे निसर्ग प्रभावी परिमाण नि परिणाम होय. भाषा, रंग, रूप, सण, रूढी, परंपरा वैविध्य म्हणून जग सुंदर! या सुंदर जगास आपल्या लहरींनी एकरंगी, एकदंगी करण्याचे प्रयत्न इतिहासात कमी का झाले? तलवारीच्या बळावर सारं जग इस्लामी बनवण्याची आकांक्षा इथे हरली. धर्मातरांनी सर्व जग ख्रिश्चन करण्याचे मनसुबे ब्रिटिशांना मनातल्या मनात गिळावे लागले. भारताचा परत हिंदुस्थान' करण्याचे मनोरथ हा या क्रमाचाच भाग असला तरी भारत हा पूर्वापार बहुधर्मीय, बहुवंशीय, बहुसांस्कृतिक देश राहिला आहे. तो पूर्वीपासून इथल्या उपजत संपन्नतेमुळे ह्युआन सांगचं जसं आकर्षण होता, वास्को-डी-गामाला पडलेली भारताची भुरळही तशीच होती. फ्रान्समध्ये नुसती ट्युलीपची फुलं नि भारतात फक्त कमळ फुलेल, असं होणार नाही. चीनचं आकाश पिवळे नि पाकिस्तानचं हिरवं असं नाही घडणार. जोवर माणूस 'माणूस' राहील तोवर त्याला विश्वबंधुत्व, सहअस्तित्व, समन्वय, सहिष्णुता यांची तहान व ओढ लागणारच आणि ती कोणी थांबवू शकणार नाही, कारण तिचा उगम निसर्गाच्या वैविध्यात आहे.
जाणिवांची आरास/१६०
कर के देखो...
मानवी उत्क्रांतीच्या काळात आपली शेपूट झडून गेली. त्यामुळे जात झडून जाणे सहजशक्य आहे, असे मला वाटते. जात निर्मूलनाबाबत आपण गंभीर असू तर छोट्या छोट्या कृती करणे शक्य आहे. नव्या पिढीच्या नोंदी जात रकाना काढून टाकणे, रकाना पाहिला तर तिथे ‘मनुष्य' अशी नोंद । करणे. याचाच विस्तार करून ‘मानव धर्म' लिहून पूर्ण करणे उचित ठरेल. कोणत्याही व्यापक बदलाची सुरुवात अभिलेख नोंद असते. मग जेवढे जातीय परिघातले व्यवहार टाळणे म्हणजे अस्पृश्यता न मानणे, जातीत विवाह न करणे, जातीय संघटनांचे सदस्य न होणे, आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय व्यवहार समर्थन व सकारात्मक कृती करणे, आपले विवाह आंतरव्यवहारी होतील असे पाहणे. रोटी-बेटी व्यवहारातूनच जात, धर्म निर्मूलन शक्य आहे. आपण व आपला व्यवहार जातीय होतो का ते पाहायच्या छोट्या छोट्या कसोट्या आहेत. तुम्ही जातीय कर्मकांड मिरवता का? तिला धर्मीय जोड असते का? जाती, धर्माची चिन्हे, प्रतिके आपण गळ्यात, मनात मिरवतो का? जात, धर्म विशिष्ट समाजातच तुमचा वावर असतो का? तुमचे निवासस्थान जातीय वा धार्मिक विशेष वसाहतीत आहे का? पूर्वापार असणे, वडिलार्जित असणे भाग अलाहिदा, निवडीत स्वातंत्र्य असते तेव्हा आपण व्यापकता, उदारता दाखवतो, पाळतो का? आपल्या रोजच्या संपर्क, संवादात आपण भिन्न जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत कसोटीवर बहुभाषी, बहसांस्कृतिक, बहप्रांतीय भान बाळगतो का? त्यांची आणखी चपखल रोजच्या कृतीतील गोष्ट तपासायची, पडताळायची म्हणजे
जाणिवांची आरास/१६१
आपल्या मोबाइल्सवरील कॉन्टॅक्टस्, मेसेज, चॅट्स तपासून पहा. काँटॅक्टमध्ये किती विभिन्न जात, धर्मीयांशी आपला संपर्क, संवाद असतो वा संदेशन, संप्रेषण असते? आपण जात, धर्म पुरस्कार करणाच्या पोस्ट लाइक करतो का कमेंट देतो? त्यावरूनही आपण जातीय, धर्मीय आहोत का लक्षात येते.
‘जात नाही ती जात' अशी व्याख्या करणारे जात समर्थकच मानायला हवेत. ‘जात जाऊ शकते' मानणारे उदारमतवादी, मानवतावादी, वैश्विक मानायला हवेत. जातभेद भारतातच आहेत. अन्यत्र वंशभेद, धर्मभेद आहेत. तिथे अनेक सकारात्मक कृतीतून यावर त्यांनी विजय मिळवला आहे.
आपणही आरक्षण, अल्पसंख्य विकास आदीमधून तशी सकारात्मकता दाखवतो आहोत. त्याला आपण घटनात्मक दर्जाही बहाल केला आहे. मध्यंतरी भारत सरकारने गॅसवरील सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देणारे भारतीय अनेक कोटी निघाले. भारतीयांची ही सकारात्मक कृती म्हणजे सामाजिक, न्याय व परिवर्तनाच्या दृष्टीने उचललेले स्वेच्छा पाऊलच होते. शांत क्रांती बदलांच्या पावलांसारखी। अदृश्य; पण परिणामकारक असते. जनांच्या प्रवाहाचा विचार न करता । नेहमी प्रवाहाविरुद्ध पोहण्यातूनच नव्या समाजसुधारणा घडत आल्या आहेत. तसे मग स्वेच्छा जात-त्याग हा उपायही प्रभावी ठरू शकतो. जात । सापशिडीसारखी असते. ती कधी तुमचा विकास करते, तर कधी घात. जातीचे फासे नेहमी विधायकच पडतात हा गैरसमज आहे. तिचे तोटेच अधिक.
माणुसकीचा व्यवहार जातीपलीकडचा असतो. म्हणून कबीरदासांनी लिहून ठेवले आहे की, “जाति न पुछो साधू की, पूछ लीजियो ज्ञान.' सभ्य माणसाची ओळख जातीवरून करण्यापेक्षा त्याच्या ज्ञान, सभ्यता, चारित्र्यावरून व्हायला हवी. या अशा गोष्टी आहेत की, त्रिकालाबाधित. ज्ञान देऊन संपत नाही, सभ्यता दाखवून कमी होत नाही. चारित्र्यासारखा पारदर्शी दुसरा गुण नाही. म्हणून म्हणतो जात सोडून, वजा करून, जगून तर पहा. लक्षात येईल, तो एक टॅबू आहे, टॅग आहे, ट्रेडमार्क नक्की नाही. सोडून पहा. जात झडून जाणे शक्य आहे... कर के देखो...!
जाणिवांची आरास/१६२
लीन संप्रदाय
मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत, शिकत, स्वावलंबी झालो. या प्रवासात अनेकांचे साहाय्य झाले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात निरंतर कृतज्ञतेचा भाव होता नि आहे. पण मी असे अनुभवले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत साहाय्य करणारी माणसं ते निरपेक्षपणे करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. अलीकडे मी काय पाहतो, तर नोकरदार दिवसेंदिवस दीन होताहेत. कारखाने, बँका, उद्योग, व्यापारात हे मी समजू शकतोद्धपण त्याहीपेक्षा गैर मला सार्वजनिक पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत अस्वस्थ करतो. ‘शिक्षकदिनी संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यांपर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून आम्ही सर्वांचा सत्कार करतो!' असे सांगून शिक्षक दिनी एका संस्थेने मला व्याख्यानाला आमंत्रित केले; पण मी तेथे काय पाहिले तर एक छापील प्रमाणपत्र व फूल अध्यक्षांच्या हस्ते सर्वांना दिले. संस्थेचे अध्यक्ष असल्याने प्रचार्यांपासून शिपायापर्यंत सर्वजण अध्यक्षांच्या पुढे नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता. समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. सहकारी साखर कारखाने, डेअरी, बँका, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे सर्वत्र हा सार्वजनिक सोपस्कार बनत त्याचे रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. ‘खाल मान्या, हो
जाणिवांची आरास/१६३
नाम्या' असं जीर्ण त्यांनी आयुष्यभर जगायचं. काडीचं कर्तृत्व नसताना संस्थापकांचा, अध्यक्षांचा नातू, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर दुसरीकडे शिपाई, लिपिक, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने ‘एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.
विशेषतः समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं या समाजाला जागतिकीकरणाने दिलेला अभिशाप आहे. माध्यमातील नोकरदारही याला अपवाद राहिलेले नाहीत. समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिमंद व मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यांसारखे सामाजिक अधःपतन दुसरे कोणते असू शकते? सध्या सर्वत्र लीन संप्रदाय वाढतो आहे. तो सामाजिक, सार्वत्रिक, सांसर्गिक प्रादुर्भाव वाटावा इतका त्याचा झपाट्याने प्रसार होतो आहे. त्यात खेदाची बाब म्हणजे, हा सारा खटाटोप सार्वजनिक साधनसंपत्तीच्या बळावर व्यक्तिप्रतिष्ठा जोपासण्याकामी खर्च पडतोय. यासाठी जनजागृती, जनसंगठन, जनमतसंग्रह आदी उपायांची चर्चा कालौघात होईलच; पण याला हस्तक्षेप म्हणून त्वरित व्यवस्था बदलाच्या दृष्टीने समाजमनाने अंतर्मुख होऊन सक्रिय व्हायला हवे. समाजजीवनात विश्वस्तवृत्तीचा विकास होणे हा त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक सर्वच क्षेत्रांत सर्वोच्चपदी जाणारी व्यक्ती ‘इदं न मम' म्हणणारी असेल तर मी तो भारवाही हमाल' अशी निरीच्छता त्याच्या ठायी येणार; पण त्यासाठी मोठ्या मूल्यसंस्कार व नैतिक पाठराखणीची गरज असते. मार्क्सवाद काय नि गांधीवाद काय, विचार म्हणून सर्वच वाद आदर्श असतात; पण वादाची सत्ता आली की, वादी विश्वस्त न राहता सत्ताधारी बनतात. यासाठी माणसाची जडणघडण । महत्त्वाची. बुद्धीप्रामाण्य नागरिकांची निर्मिती शिक्षण व संस्कारातून होते. त्यासाठी घर, समाज, गाव, राज्य, राष्ट्र अशा सर्वच स्तरांवर त्याविषयीची भावसाक्षरता आणि संवेदनासूचकांक जपणे हे खरे लोकशिक्षण होय. त्यासाठी स्वतंत्र माणसाची घडण हे उद्दिष्ट हवे. ‘पेड-पौधे है बहुत बौने (बुटके) तुम्हारे, रास्तों में एक भी बरगद (वड) नहीं है।' कवी दुष्यंत कुमारांच्या या ओळी उगीचंच आठवत राहतात नि अस्वस्थता वाढत राहते.
जाणिवांची आरास/१६४
स्वर्ग हवा तर
माझ्या निरीक्षणातील भारतीय मी नोंदवत आहे. हे सर्वसाधारण भारतीय होत. यातील प्रत्येक प्रकारात सन्माननीय अपवाद आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. आपणास रस्त्यात पडलेला रुपया ओलांडून जाता येत नाही. आपण तो बिनदिक्कतपणे इकडे तिकडे न पाहता उचलतो. आपणास सार्वजनिक जीवनात शिस्त पाळणे जीवावर येते. ट्राफिक सिग्नल असलेल्या चौकात आपण किती उतावीळ असतो! समोरचा नियम पाळणारा असेल तर चक्क हॉर्न वाजवून त्यालाही नियम मोडायला भाग पाडतो. ओळ पाळणे आपणास कमीपणाचे वाटते. म्हणून जिथे ओळ असते, तिथे घुसखोरी अगदी होतेच होते. शिक्षणाचा व आपल्या जगण्याचा संबंध कमी. शिक्षण आपल्या लेखी मिळकतीचे साधन व माध्यम! घरी पुस्तके अपवादानेच. घर म्हणजे भौतिक संपन्न वस्तू व साधनांचे संग्रहालय, वेळेचा अपव्यय करावा तर तो आपणच. तासन्तास गप्पा, टीव्ही पाहणे, भटकणे, चैन करणे यात आपणास काही गैर वाटत नाही. पैसे घेऊन मतदान करणे तर अनेकांची वृत्तीच होऊन गेली आहे. कार्यालयातले कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही, याची आपणास खात्री असल्याने लाच देणे, घेणे हा गुन्हा न वाटता तो आपल्याला शिष्टाचार वाटतो. पेट्रोल पंपावर आपण जितके पैसे मोजतो, तितके पेट्रोल आपल्याला बहुतेकदा मिळतच नाही आणि आपण तसा आग्रहसुद्धा धरत
नाही.
बन्याचदा रिक्षावाले मीटरपेक्षा अधिक पैसे मागतात नि आपण देतो. ‘अडला नारायण' म्हणून आपला व्यवहार पदोपदी. ‘परस्त्री मातेसमान' हा
जाणिवांची आरास/१६५
आपला आदर्श दुस-याकडून पाळला जावा, अशी आपली अपेक्षा असते. आपण स्वतः कोरडा पाषाण. आपल्यासारखे स्थितिस्थापक आपणच. सिंगापूरला गेलो की शिस्तबद्ध, मुंबईत पाऊल ठेवताच मूळ भारतीय. स्वच्छता दुस-याने पाळावी. आपण सालं, कपटे, कचरा, बडके गुपचूप टाकतो. ते 'चलता है' म्हणून. कर भरणे हा आपणास तोटा वाटतो. चुकवणे म्हणजे मिळवणे हे आपले जीवन तत्त्वज्ञान व ध्येयही!
कामात कुचराई आपल्या दृष्टीने क्षम्य; पण दुस-याने केली की, आपण तडक फाशीची भाषा वापरतो. स्वजातीचा वृथा अभिमान व परजातीची असूया आपल्यात मुरलेलीच म्हणायची. तीच गोष्ट धर्माची. दया, क्षमा, शांती म्हणजे बुळेपणा आणि अरेरावी, दांडगाई म्हणजे पुरुषार्थ, असे आपण मानतो. मी म्हणजे कोण, दुसरा ‘किस झाड की पत्ती!' वाचाळता आपला स्थायिभाव. कृतिशीलता अपवादाने! आपण दाखवतो। तसे नसतो. जे असतो ते जगास दिसत नाही म्हणून बरे! ‘एकमेकां साह्य करू' आपणास तोंडपाठ असते. पण अपघात दिसताच आपण पळ काढतो. खरे संवेदनशीलच मदतशील असतात. जिवाभावचे नाते, जगणे, ते अल्पशिक्षित अधिक जगतात. शिक्षित आत्मकेंद्री, स्वार्थी अधिक.
आता पुरुषाने बाळाला जन्म दिला म्हणजे निसर्गचक्र बदलले हे नक्की झालं. निसर्ग हरला, माणूस जिंकला! आता कोणताही शोध लागणे सहज शक्य. म्हणजे असे की, आपल्या मनात काय आहे ते पडद्यावर दिसू शकेल. मनात आणायचा अवकाश! पण काही गोष्टी अशक्य नसल्या तरी अवघड होत जातील. म्हणजे माणूस सत्शील राहणे, सदाचारी होणे, बुद्धिप्रमाण वागणे, दैववादी न होणे, विवेक व विज्ञानाच्या कसोटीवर जगणे आदी. त्या सर्व गोष्टी सोप्या नि सहज करायचा एकच उपाय आहे. जे विधायक, हितकारी, वैध आहे असे आपण शिकतो, जाणतो ते आचरणात आणू. दुसरा काय करतो, याचा विचार न करता आपले आचरण दुसन्यास अनुकरणीय वाटावे, असे वागू. आपल्या नैतिक कसोटीवर दृढ राह. पहा, एक दिवस असा येईल, लोक म्हणतील, अरे सत्ययुग आले तर. आपली जन्मभूमी स्वर्ग झाल्याचा आनंद मिळवायचा असेल तर स्वतःच सत्यवान झाले पाहिजे नि सावित्रीपण!
संस्कृती, सभ्यता
संस्कृती आणि सभ्यता हे शब्द मानवी समाजात खरेतर एक दुस-याचे पर्यायवाची होते; पण आज ते विरुद्धार्थी म्हणून वापरले जात आहेत. संस्कृती म्हणजे मानवी समाजाची जीवनपद्धती होय. संस्कृतीत शिष्टाचार, पोशाख, खानपान, भाषा, साहित्य, विचार, धर्म, तत्त्वज्ञान, कर्मकांड, कायदे, कला यांचा संगम असतो. या सर्व गोष्टी ज्या काळात संस्कृतीत आदर्शवत असतात, तेव्हा सभ्यता अस्तित्वात असते. कालपरत्वे संस्कृतीत बदल होतात. जुनं ते सोनं' हे तत्त्व सर्व बाबतीत लागू नसतं. माणूस समज नि अनुभवाने समृद्ध होतो तसतसा तो सुधारतो, आधुनिक होतो.
सिंधू, हडप्पापासून ते आजच्या जागतिकीकरणापर्यंतच्या संस्कृतीचा प्रवास पाहता काय दिसते? पूर्वी संस्कृती एका छोट्या प्रदेशावर साम्राज्य करायी. आज ती जगावर राज्य करायला निघाली आहे. पूर्वी राष्ट्राराष्ट्रांच्या संस्कृती भिन्न असत. आज संपर्कसाधने, तंत्रज्ञान, उद्योग-व्यापारांचे महत्त्वाकांक्षी वाढते साम्राज्य यामुळे पूर्वीच्या व्यापक संस्कृती लयाला जाऊन छोट्या-छोट्या संस्कृती उदयास आल्या. त्या स्वार्थ नि अर्थ या दोन खांबावर उभ्या आहेत. आदिवासी संस्कृती आजही काही प्रदेशांत तग धरून आहे. जल, जमीन, जंगल हेच तिचे स्थावर-जंगम होते. मग भाषा नि साहित्याने तिच्यावर आक्रमण केले आणि लोकसंस्कृती निर्माण झाली. तिचे रूपांतर नागर संस्कृतीत झाले. त्यातून महानगरी संस्कृती उदयाला आली. ती जागतिकीकरणाचे अपत्य होय. या संस्कृतीने स्वतःची शिष्टता, शिक्षण, तंत्र, रहिवास विकसित केला तो बुद्धीच्या आधारे, कमी श्रमात अधिक लाभ उकळायच्या शहाणपणाच्या जोरावर. ते शहाणपण बाह्य
प्रभावी व आतून पोखरलेले असते, हे आता कालौघात लक्षात येऊ लागले
आहे. ती अभिजात संस्कृती पूर्वीही नव्हती, आजही नाही. केवळ बहुजन नव्हे तर सर्वजन हितकारी संस्कृती खरी आदर्श संस्कृती.
कालपरत्वे सरंजामी, माध्यम, सिनेमा, दूरदर्शन, फॅशन, प्रादेशिक आदी संस्कृती उदयास आल्या. या संस्कृतींचा एककलमी कार्यक्रम आहे, ‘सब घोडे बारा टक्के करायचे. म्हणजे काय तर आपल्याला हवी तशी माणसं घडवायची. पूर्वी माणूस विचार करायचा म्हणे! का तर तो वाचायचा. नव्या संस्कृतींनी माणसाचं वाचन तोडलं ते त्याने विचार करू नये म्हणून.आपली पुढची किंवा त्याही पुढची पिढी पहा. ती सक्तीच्या क्रमिक पुस्तकांशिवाय काही वाचत नाहीत. तिला नुसतं नव्या संस्कृतींनी ‘सुशेगात केले आहे. खाओ, पिओ और मजा करो!' त्यांना पत्र लिहिता येत नाही, आपुलकीनं बोलता येत नाही. कुणाच्या घरी जायचं म्हणजे अंगावर काटा. नातेवाईक एकतर बारशाला येतात, नाहीतर बाराव्याला. तेही हाताची घडी नि तोंडावर बोट, तेरी भी चूप और मेरी भी! झाकली मूठ सव्वा लाखाची, उघडली तर फुकाची.
सभ्यता म्हणजे आपलेपणा. सभ्यता म्हणजे नम्रता. सभ्यता म्हणजे दुस-याचे कोणीतरी आपण होणे, असणे. सभ्यता म्हणजे सुसंस्कृतता, सहिष्णुता. सभ्यता म्हणजे द्वेषमुक्ती व परमताचा आदर, सद्भाव, सभ्यता म्हणजे परकाया प्रवेश. आपल्याला जे हवं असतं, ते दुस-यालाही मिळालं पाहिजे अशी जाणीव व भावना. सभ्यता म्हणजे आपपर भेदातीतता. ‘फायर ते फ्राइड' असा माणसाचा विकास म्हणजे भौतिकापेक्षा भावनेच्या ओलाव्याचा आलेख उंचावणं व ओलाव्याचा प्रदेश रुंदावणं. स्त्री-पुरुष अंतर मिटून दोन्ही माणसाचीच रूपे आहेत असे समजून वागणे, बोलणे, विचार करणे. त्यासाठी तुमचे सेलिब्रेटी कोण हवेत? राजकारणी, नट-नट्या की साहित्यिक, कलाकार, समाजसेवी? जो समाज वाचतो, लिहितो, विचार करतो तो प्रगल्भ-सभ्यता जन्माला घालतो. प्रबोधनपर्वात युरोपात अशी सभ्यता निर्माण झाली. आपल्याकडे त्यानंतर समाजसुधारणा घडून आल्या. त्या सर्व आपण हरवून बसलो आहोत, ते सभ्यतेस आपण तिलांजली दिली म्हणून.
दिल्याने मिळत राहते...
डोक्यावर सूर्य घेत डोंगर सर करावा नि शिखरावर पोहोचताच अनपेक्षित अपरा सृष्टीचं नयनरम्य दृश्य दिसावं, तसं आयुष्यातही घडतं. मी हजार-दोन हजार वस्तीच्या एका गावी हिंदीचा शिक्षक म्हणून रुजू झालो तो काही नोकरी मिळत नव्हती म्हणून नव्हे!
सन १९५६ ते १९७० हा काळ शिक्षकांच्या दृष्टीने खडतर होता. अल्प पगार तोही अनियमित; पण शिक्षण पूर्ण नि तेही नियमित. मध्यंतरी मी वि. स. खांडेकरांचे एक वस्तुसंग्रहालय केले. मराठीस भारतीय ज्ञानपीठाचे प्रथम पारितोषिक मिळवून देणारे प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर महाराष्ट्र-गोवा सीमेवरील शिरोडा या छोट्या गावात शिक्षक म्हणून गेले. ते शिरोडा खेडे आहे, त्याची खात्री करून, म्हणजे वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, पोस्ट नाही असं गाव. गावातील लोकांचे उपजीविकेचे एकमेव साधन निसर्गाधारित शेती. उपचार सोयी नाहीत. त्या वस्तुसंग्रहालयात मी वि. स. खांडेकर मुख्याध्यापक असलेल्या ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलचं शिक्षकांचे हजेरी पत्रक लावलंय. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक सर्व दिवस हजर. ही असते शिक्षकांची विद्याथ्र्यांप्रती बांधिलकी, तो आदर्श माझ्यापुढे होता. कारण मी खांडेकरांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालयात शिकलो. त्या शाळा नि शिक्षिकांनी माझ्यातला शिक्षक घडवला. पुढे त्याच शाळेत मला शिक्षक होता आलं.
सन १९७१ ते २०१० अशी चार दशके मी शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य असा नित्य चढता आलेख चढत राहिलो. १९७१ साली हाती ‘अॅपोइंटेड, स्टार्ट इमिजिएटली' अशा ३० तारा म्हणजे नोकरी नियुक्तीपत्रे
होती. पुणे, मुंबई, नाशिक, चौक, चाफळ, रत्नागिरी अशा गावांतून नोकरीची आमंत्रणं असताना मी पिंपळगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. जेव्हा पिंपळगाव हे दुसरे शिरोडेच होते. १९७१ ते ७९ या आठ वर्षांत मी समर्पित, सेवाभावी शिक्षक होतो. याची प्रचिती मला परवा एका सुखद धक्क्याने दिली. मी सन १९७३ मध्ये मुक्त सैनिक हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होतो, तेव्हाची सर्व मुले अचानक मला न सांगता; पण परस्पर चौकशी करून दत्त. १० मुले व १० मुली. सन १९७३ मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे ते विद्यार्थी, तेव्हा ते १५ वर्षांचे नि मी २३ वर्षांचा तरुण शिक्षक. त्यांच्या नि माझ्या वयात ७-८ वर्षांचेच अंतर. परवा आले ते त्यांची साठी साजरी करायला. म्हणजेच काय, तर पाया पडायला नि मी शिकवलेली एक कविता ‘जग हे असार सुनती हूँ, मुझको सुखसार दिखलाता है' महादेवी वर्मांची कविता साठीतल्या साच्या मुला-मुलींनी एका तालसुरात म्हटली. तेव्हा ४० वर्षांनंतर ते १५ वर्षांचे होते नि मी २३ वर्षांचा एक साम्य होतं.
मी आयुष्यभर हिंदीचा प्रचार करत राहिलो. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अन् परवा अचानक महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने १ लाख रुपयांचा ‘अखिल भारतीय महाराष्ट्र भारती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेने सुवर्णमहोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित केले. तोही एक सुखद धक्काच म्हणायचा. अनपेक्षित पुरस्कार हे तुमच्या दीर्घ समर्पणाचे फलित असते. आजपर्यंत १० लाखाचे पुरस्कार मिळाले, पुरस्कार ठेवून धन मात्र समाजासाठी समर्पित केले.
* गुड मॉर्निग (दै. लोकमत, २००६)
१. सार्थकता (दि. ५ जानेवारी, २००६)
२. चैतन्यरथातला बंडखोर आत्मा (दि. १२ जानेवारी २००६
३. प्रस्तुत की अप्रस्तुत (दि. १९ जानेवारी, २00६)
४. बिहारी सोशिकता (दि. २६ जानेवारी, २00६)
५. शहारणारे शहर (दि. २ फेब्रुवारी, २00६)
६. मोलकरीण नव्हे ‘मोल' करी (दि. ९ फेब्रुवारी, २00६)
७. जाणिवांची आरसपानी वर्तमानपत्रे (दि. ९ फेब्रुवारी, २00६)
८. घोडा आणि माणूस (दि.२३ फेब्रुवारी, २00६)
९. आज पहली तारीख है (दि. १ मार्च, २००६)
१०. कॉफी हाऊस (दि. ९ मार्च, २००६)
११. साबरमती नहीं सब्र मति (दि. १६ मार्च, २00६)
१२. वाचनवेडा राजाराम (दि. २३ मार्च, २00६)
१३. तीन सार्वजनिक अण्णा (दि. ३0 मार्च, २00६)
१४. भाषा आणि व्यवहार (दि. ६ एप्रिल, २00६)
१५. झाडू कामगार साहित्यिक (दि. १३ एप्रिल, २००६)
१६. मलमपट्टी प्रशासन (दि. २० एप्रिल, २००६)
१७. आमचा काय गुन्हा? (दि. २७ एप्रिल, २००६)
'१८. दुहेरी संवेदनेचे आव्हान (दि. ४ मे, २००६)
१९. बंदीजन? नव्हे बंधुजन (दि. ११ मे, २००६)
'
२०. आठवणींचे पाझर (दि. १८ मे, २00६)
२१. गती, व्यस्तता की हव्यास व्यग्रता ? (दि. २५ मे, २००६)
२२. सुरू जाहला लगबगीचा महिना (दि. १ जून, २00६)
२३. मोबाईलच्या करामती (दि. ८ जून, २००६)
२४. फोटो आणि तारतम्य (दि. १५ जून, २००६)
२५. एकविसाव्या शतकातील आचारसंहिता (दि. २२ जून, २00६)
२६. अश्वत्थाम्याची वणवण (दि. २९ जून, २००६) २७. अस्वस्थ प्राजक्त नि नवा अगस्ती (दि. ५ जुलै, २००६)
२८. शिक्षक : पेशा, व्यवसाय की धर्म? (दि. १२ जुलै, २००६)
२९. झिदान झिंदाबाद? (दि. १९ जुलै, २००६)
३०. अ.ब.क. (दि. २६ जुलै, २००६)
३१. एका जंगलाची कथा (दि. ३ ऑगस्ट, २००६)
३२. संस्था आणि माणूस (दि. १० ऑगस्ट, २००६)
३३. 'लोकमत समाचार'च्या निमित्ताने... (दि. २४ ऑगस्ट, २००६)
३४. आकांक्षांचे हेलिकॉप्टर (दि. १७ ऑगस्ट, २00६)
३५. उत्सव-विवेक (दि. ३१ ऑगस्ट २00६)
३६. देते व्हा, देत रहा (दि. ७ सप्टेंबर, २००६)
३७. मातृहृदयी नानासाहेब गद्रे (दि. १४ सप्टेंबर, २00६)
३८. सेवा : सुरक्षा आणि शाश्वती (दि. २१ सप्टेंबर, २००६)
३९. अंधारातला काजवा (दि. २८ सप्टेंबर, २00६)
४0. महात्मा गांधींना अनावृत्त पत्र (दि. ५ ऑक्टोबर, २00६)
४१. माय टीचर गुटखा (दि. १२ ऑक्टोबर, २००६)
४२. 'अक्षरधारा' घरोघरी (दि. १९ ऑक्टोबर, २00६)
४३. लकी बझार (दि. २६ ऑक्टोबर, २००६)
४४. 'सेझ' नव्हे सेज (दि. २ नोव्हेंबर, २००६)
४५.{ बाललीला वर्णन (दि. ९ नोव्हेंबर, २००६)
४६. मारीच आणि माणूस (दि. १६ नोव्हेंबर, २००६)
४७. असंवाद (दि. २३ नोव्हेंबर, २00६)
४८. वेदनेचे वेद झाले (दि. ३० नोव्हेंबर, २००६)
४९. महाराष्ट्रीयांचा ‘अंतर्नाद'(दि. ७ डिसेंबर, २००६)
५0. देव, माणूस आणि आरसा (दि. ४ डिसेंबर, २००६)
५१. विकास की विस्तार ? (दि. २१ डिसेंबर, २००६)
५२. मराठी माती नि मन (दि. २८ डिसेंबर, २00६)
* अनुभव (दै. तरूण भारत - २00८)
५३. नवे वारे (दि. १० जानेवारी, २००८)
५४. नॅनोचं वादळ (दि. १७ जानेवारी, २००८)
५५. राजकारणमुक्त गाव (दि. २४ जानेवारी, २00८)
५६. मर्दानगी और कंडोम (दि. ३१ जानेवारी, २००८)
५७. सुमारांची सद्दी (दि. ७ फेब्रुवारी, २00८)
५८. दैन्य हटविणारा अगस्ती (दि. १४ फेब्रुवारी, २00८)
५९. पालकत्व (दि. २३ फेब्रुवारी, २००८)
६०. परीक्षांचा महापूर (दि. २८ फेब्रुवारी, २००८)
* सगुण-निर्गुण (दै. महाराष्ट्र टाइम्स - २०१७)
६१. सार्वजनिक सत्यधर्म (दि. २८ एप्रिल, २०१७)
६२. सर्वांभूति समानत्व (दि. ५ मे, २०१७)
६३. सात समंध मानेवर (दि. १२ मे, २०१७)
६४. माणूस (दि. १९ मे, २०१७)
६५. जगणं (दि. २६ मे, २०१७)
६६. स्वातंत्र्य (दि. २ जून, २०१७)
६७. देणान्याचे हात (दि. ९ जून, २०१७)
६८. भारतीय असणं (दि. १६ जून, २०१७)
६९. विवेकबुद्धी (दि. २३ जून, २०१७)
७0. विश्वबंधुत्व (दि. ३0 जून, २०१७)
७१. कर के देखो... (दि. ७ जुलै, २०१७)
७२. लीन संप्रदाय (दि. १४ जुलै, २०१७)
७३. स्वर्ग हवा तर (दि. २१ जुलै, २०१७)
७४. संस्कृती, सभ्यता (दि. २८ जुलै, २०१७)
* सुखद धक्का (दै. पुण्यनगरी - २०१७)
७५. दिल्याने मिळत राहते... (दि. १५ मे, २०१७)
डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा
१. | खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन) |
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती | |
२. | भारतीय साहित्यिक (समीक्षा) |
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती | |
३. | सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह) |
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती | |
४. | वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती | |
५. | एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती | |
६. | कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२०० /तिसरी आवृत्ती | |
७. | प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती | |
८. | दुःखहरण (वंचित कथासंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती | |
९. | निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१०. | शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती | |
११. | आकाश संवाद (भाषण संग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती | |
१२. | आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह) |
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती | |
१३. | एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१४. | समकालीन साहित्यिक (समीक्षा) |
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१५. | महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती |
१६. | वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती | |
१७. | नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती | |
१८. | भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा) |
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरीजाणिवांची आरास/१७७ आवृत्ती | |
१९. | मराठी वंचित साहित्य (समीक्षा) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती | |
२०. | साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती | |
२१. | माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती | |
२२. | वेचलेली फुले (समीक्षा) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती | |
२३. | सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती | |
२४. | वाचावे असे काही (समीक्षा) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती | |
२५. | प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती | |
२६. | जाणिवांची आरास (स्फुट संग्रह) |
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती | |
आगामी | |
● | भारतीय भाषा (समीक्षा) |
● | भारतीय साहित्य (समीक्षा) |
● | भारतीय लिपी (समीक्षा) |
● | वाचन (सैद्धान्तिक) |
* | वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन |
◼◼