तिच्या डायरीची पाने/तीन गज की ओढणी
५
तीन गज की ओढनी....
वयाची पन्नाशी उलटून गेली तरी माहेरच्या दिशेने ओढ घेणारे मन कधीच वयस्क होत नाही. आईवडिलांच्या निर्व्याज प्रेमाची शाल, त्यांचा सहवास पन्नाशी उलटेपर्यंत लाभला. तर, माथ्यावरचे केस चंदेरी झाले तरी अंगभर बालपण हुंदडत राहाते. मी त्या वाबतीत भाग्याची. कालपरवापर्यंत आई-पपा होते. त्यांना भेटायला धुळ्याला जाताना, तिरवीच्या तलावाभोवतालचा हिरवा डोंगर लागला की माझे मन थेट घराच्या पायऱ्या चढत असे. भर उन्हाळ्यातही खानदेशी गरम वारे तनामनातला वसंत फुलवीत. आई खूप आजारी होती. मी पळतच तिथे पोचले. चार दिवस निवांतपणे राहिले. आता माहेरी गेले की बाजारात भटकणे आलेच. बॉम्बे कटपीस सेंटर हे आमचे गेल्या २०/२५ वर्षापासूनचे लाडके दुकान. तिथे जाऊन तऱ्हेतऱ्हेच्या कापडांचे तुकडे निरखण्यात नि त्यातून हवे ते तुकडे निवडण्यात दोन तास दहा मिनिटांगत अपुरे पडत. त्याही दिवशी पाय त्या दुकानाकडे वळले. पण दुकानाचा बाज आता पार बदलला होता. कटपीसचे दुकान एका तुकड्यात बसवले होते आणि उरलेल्या मोठ्या भागात तयार कपड्यांचा देखणा विभाग थाटात उभा होता. सुरेख झगे दिसले म्हणून आत शिरले. एक झगा न्याहाळते आहे तोच खूप आनंदाने रसरसलेली हाक ऐकू आली. 'भाभी!! दीदी!! तुमी? कवा आलात?" माहेरच्या अंगणात मला भाभी म्हणणारी कोण असा विचार करीत आवाजाच्या दिशेने नजर टाकली तर काजळभरल्या डोळ्यांनी टवटवीत नंदा मला हाक मारीत होती. काही उमजायच्या आत धावत येऊन कडकडून भेटलीही. नि तेवढ्या गर्दीत 'पाँव लागू' ही झाले. मग अंबाजोगाईतील सर्वांची खुशाली विचारली. नंदाच्या आवाजातला नम्र गोडवा खूप खूप दिवसांनी ऐकायला मिळत होता. तोच गोडवा
दुकानाच्या मालकांना विचारीत होता-
"पिताजी, या भाभी, माझ्या दीदी पण, अंबाजोगाईतल्या भाभी. यांच्याच संस्थेत मी शिवण, भरतकाम, पिको, फॉल लावायला शिकले. आपले वकील आहेत ना, प्रकाश भाऊ, त्यांची मोठी बहीण. मी त्यांना घरी नेऊन आणते. तासभर सुट्टी देता? संध्याकाळी जास्त थांबेन." आता कोणते पिताजी या भावूक विनंतीला नकार देणार?
सुमारे पाच वर्षापूर्वीची गोष्ट. धुळ्याहून, तेथील महिला संस्थेस, सहकार्य करणाऱ्या वकील महिलेचे पत्र आले होते. नंदा नावाच्या तीन चिमुकल्यांची आई असलेल्या परित्यक्तेला, शिवणासाठी दिलासा घरात प्रवेश हवा होता. धाकट्या मुलाला घेऊन ती येणार होती. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध जीव झोकून काम करणाऱ्या विजयाताईंच्या संस्थेतून येणारी महिला नक्कीच अडचणीत असणार. तिला पाठवून देण्याबाबत तात्काळ पत्र पाठवले. एका संध्याकाळी नंदा छोट्या केतनसह दिलासाघरात दाखल झाली.
नंदा जेमतेम पाच फूट उंचीची. नाजूक चणीची. मासोळीच्या आकाराचे काजळभरले डोळे. भांगात सिंदुराची ठाशीव रेघ. माथ्यावर पदर. पायात छमछमणाऱ्या घुंगराच्या बिछुड्या म्हणजे जोडवी. बोलण्याचालण्यात गरब्याचा अदृश्य ठेका.
"प्रणाम दिदी. माधुरीताईने लेटर दिया है. घरमे सब खुशहाल है. केतन दीदी को प्रणाम करो." असे म्हणत तिने केतनला माझ्या पायावर आडवा घातला. गंगामावशीला प्रणाम केला. नंदाच्या बोलण्यातला गोडवा पहिल्या क्षणीच सर्वाना भावून गेला. प्रत्येक प्रांताचे, भाषेचे, समाजाचे काही पारंपारिक वेगळेपण असते. नंदाच्या वागण्याबोलण्यातून ते जाणवत असे.
धुळ्याच्या सातव्या गल्लीतील हनुमान मंदिराचे पुजारीपण परंपरंने तिच्या वडिलांकडे आले होते. मंदिराच्या भवताली गुजराथी मारवाडी समाजाची वस्ती. भाविक लोक देवाला रोज काही ना काही उपहार चढवीत. सणवार, व्रतांची उद्यापने यासाठी सन्मानाने जेवायला बोलवीत. नेहमीच गोडाधोडाये जेवण, चांगले कपडे आणि पुजारीबाबांची मुलगी म्हणून चारजणीत विशेष मान. तिला पूजापाठ सांगता येत असे. कोणत्या विधीसाठी काय सामान लागते ते माहीत
असे. स्तोत्र सुरेख म्हणत असे. लग्नात वा इतर संस्काराचे वेळी म्हणायची गाणी येत. ती सातवीत असतांनाच नहाण आले. पुजारीबाबांनी जावई शोधण्याची मोहीम सुरू केली. मुळात पुजारीपण करणाऱ्यांची जात लहान. खात्यापित्या घरी लेक जावी हा आईचा हेका. सुरतेच्या पुराणिकांच्या घरातल्या धाकट्या मुलाशी - जीवनधरशी - नंदाचा विवाह झाला. साल होतं १९८१. जीवनधर दहावी पास होता. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कारागिरीत तरबेज होता. दिवसाला ऐंशी नव्वद रुपये मिळत. नंदा दिसण्यात गोड. नवरा नव्या नवरीचे भरपूर लाड करी. तऱ्हेतऱ्हेच्या साड्या, डोक्याला पिना, बांगड्या यांची खैरात करी. वयाच्या सोळाव्या वर्षीच नंदा आई झाली. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षात दोन मुली नि धाकट्या केतनला जन्म दिला.
दर बाळंतपणात शरीर थकत गेले. लहान मुलांकडे लक्ष देण्यात आणि घरकामात ती एवढी अडकून जाई की, नटण्यामुरडण्याकडे लक्ष द्यायला वेळच उरत नसे. घर आणि मुलं यांची देखभाल करण्यात जीव इतका गळून..थकून जाई. मग जीवनधरच्या हौशीमौजीत सहभागी होण्याचा उत्साह येणार तरी कुठून? मग चिडचिड, रुसवेफुगवे, रडारड, भांडणे. त्यातूनच हाणामारी सुरू झाली. जीवनधरला पत्ते आणि दारूची चटक लागली. तो शुद्धीवर असला की नीट वागत असे. पण अशी वेळ कमीच. नंदाची मोठी जाऊ म्हणजे तिची सख्खी मोठी बहीण.
तिच्या नवऱ्याने धाकट्या भावाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. वेगळे घर केले तर संसाराची जबाबदारी उचलावी लागेल आणि मग घरात गुंतेल. बाकीचे नाद आपोआप कमी होतील असे वाटले. पण वेगळे घर केल्यावर नंदाचे हाल अणिकच वाढले. जुगाराबरोबर दुसराही नाद लागला. घरातले दागिने नाहीसे होऊ लागले. जीवनधर घटस्फोटाची भाषा बोलू लागला. नंदाने राजीखुशीने सही न दिली तर मुलांसह नंदाला मारून टाकण्याचे बेत तो बोलू लागला. स्वतःच्या मुलांच्या जीवाला धोका पत्करण्याची तयारी कोणती आई दाखवेल? नंदाच्याच भाषेत सांगायचे तर ते असे-
"अपने पतीको वेश्याके घर तक सन्मानसे ले जाने वाली पतिव्रता या अपने लाडले बेटे को मारकर उसकी सागुती अतिथीके लिये बनानेवाली आदर्श
गृहिणी पौराणिक किताबोंमेही होती है. स्वतःच्या नवऱ्याला वेश्येच्या दारात नेऊन घालणारी पतिव्रता पत्नी आणि अतिथीला पोटच्या लेकराची भाजी करून खाऊ घालणारी आदर्श गृहिणी पुराणातल्या गोष्टीतच भेटतात. त्या 'माणूस' नसतातच. पण माणसाचे शरीर धारण करणाऱ्या आम्ही. त्यांचे कसे अनुकरण करायचे? नि का करायचे?"
नंदा व तिच्या बहिणीने विचारपूर्वक निर्णय घेतला. मोठ्या मुलीला सांभाळण्याची जबावदारी बहिणीने घेतली. धाकटा केतन आणि मधली वैशाली यांना घेऊन नंदा धुळ्याला आली. नंदाने नवऱ्याचे घर सोडून कायमचे माहेरी येणे वडिलांना पटले नाही. परंतु भाऊ आणि आई यांनी तिची बाजू उचलून धरली. वडिलांनी जावयाला पत्र पाठवून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. नंदाच्या भावाला त्याला आणण्यासाठी सुरतेला पाठवले. पण जावयाला पैशाची धुंदी चढली होती. तो दुसऱ्या लग्नाची भाषा अधिक जोरात बोलू लागला.
नंदा सातवीपर्यंत शिकलेली होती. समज चांगली होती. स्वतःच्या पायावर उभे राहून मुलांना शिक्षण द्यावे असे तिला मनापासून वाटे. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारागिरांबद्दल तिला सहानुभूती वाटे. ती म्हणे, हिऱ्याला पैलू पाडणाऱ्यांना पैसा भरपूर मिळतो. पण त्या माणसाचे डोळे अर्ध्या वयातच निकामी होतात. ऐन चाळिशीत अनेकजणांना धंद्यातून बाहेर पडावे लागते. पैसा आला की बारा वाटांनी निघून जातो. वाईट सवयी पैशाच्या नादाने लागतात. मग त्यांच्या मुलांनाही तरुण वयात शिक्षण सोडून वडिलांच्या धंद्यात पडावे लागते. तिला आपल्या मुलांना या धंद्यापासून दूर ठेवायचे होते.
धुळ्यात आल्यावर विजयाताई चौकांबद्दल तिने ऐकले. ती त्यांना भेटली. त्यांना सहकार्य करणाऱ्या वकील ताईना ती भेटली. वडिलांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे जीवनधर एकदा धुळ्याला आला. पण त्याला दुसरीशी लग्न करायचे होते. नंदाने घटस्फोटाला मान्यता दिली तरच तो मुलांच्या नावाने दोन पाच हजार बँकेत ठेवणार होता. अर्थात नंदाने व तिच्या भावाने त्याला नकार दिला. पाचसहा महिने धुळ्यात माहेरी काढल्यावर नंदाही खूप अस्वस्थ झाली. तिची अडचण सामाजिक व मानसिक होती. भोवताली व्यापाऱ्यांची वस्ती. स्त्रियांना पुढच्या बैठकीत येण्याची परवानगी नसे. बहुदा तिथे दुकान थाटलेले असे, तिथे
जाण्याचा प्रसंग दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने येणार. सुनांना तर हातभर घुंगट काढून तिथे जाता येई. लेकींची बात मात्र न्यारी. त्यांना कुठही प्रवेश असे. त्याही सठीमासी चार दिवस येत. माहेरी मनभरून श्वास घेऊन परत सासरी जात. तर असे हे भोवताली वातावरण. घरातल्या स्त्रियांना मोकळेपणी जाता येण्यासारखे ठिकाण म्हणजे हनुमान मंदिर. घरात भांड्याला भांडे लागून आवाज होणारच. असे आवाज झाले की सासवा नाहीतर सुना नंदाच्या आईकडे येत. निमित्त मंदिरात जाण्याचे. तेथे चार घरच्या चार जणी जमत. गप्पा रंगत. अर्थात गप्पा घराच्या चौकटीतल्या. हिने हे केले, तिने ते केले. ही अशी, ती तशी. कुणाचे सासरी पटत नाही, कुणाच्या नवऱ्याचं लफडं कुठे आहे. वगैरे.. वगैरे. अशा वातावरणात नंदा माहेरी चार महिने राहाताच, आडून विचारणे सुरू झाले, "इत्ता दिन क्यान रख्या ससुरालवालोंने? ठिक तो चल्यो होना?"
हा प्रश्न अनेकांच्या तोंडून येण्याआधीच नंदाने चारसहा महिन्यासाठी एखादा व्यवसाय शिकण्यासाठी इतरत्र जाण्याची इच्छा विजयाताई चौकांकडे व्यक्त केली. आणि त्यांनीच तिला मनस्विनी महिला प्रकल्पाच्या दिलासाघरात केतनसह पाठविण्याचा निर्णय घेतला. तिच्या केतनची जीभ थोडी जड होती. ऐकू चांगले येत असे. त्यामुळेच तो चांगले बोलू शकेल अशी आशा वाटे. केतनला उपचार करण्यासाठी परगावी नेले आहे अशी हूल उठवून नंदा अंबाजोगाईत पोचली.
आल्या दिवसापासून ती सर्वांच्याच मनात शिरली. ती आली त्याच वेळी संस्थेच्या स्वयंपाकघरात डिझेल आणि लाकडाच्या तुकड्यांपासून तयार होणाऱ्या गॅसवर चालणारी शेगडी आणली होती. लाकडाचे तुकडे तयार करण्याच्या हात यंत्रावर काम करण्यास दिलासातील महिला तयार नसत. खरे तर ते काम युक्तीचे होते, शक्तीचे नव्हते. पण युक्ती समजावून घ्यायला लागते. त्यासाठी मन स्थिर लागते. ठेंगणी नंदा हे काम हौशीने आणि सफाईने करी. फॉल लावणे, पिको करणे हे काम ती सहजपणे शिकली. शिवणकाम, भरतकामात तरबेज झाली. केतनला जिभेसाठी डॉक्टरांनी विशिष्ट व्यायाम सांगितला होता. तसेच ठराविक जागी चोळायला सांगितले होते. नंदा हे सारे नियमितपणे करी. केवळ केतनकडेच नाही तर दिलासातील इतर महिलांच्या मुलांकडे ती लक्ष देई.
उजव्या हाताने, न सांडता, एका जागी बसून जेवावे. संडासात शी करावी. हात साबणाने धुवून पुसावेत. जेवणात पालेभाजी, कोशिंबीर, उसळी असाव्यात यावर तिचा भर असे. यामागचे कारण एकच, वर्तमानपत्र मासिके, पुस्तके वाचण्याचा नाद. गाण्यात तर एकदम तरबेज. राजस्तानी, गुजराती लोकगीते छान म्हणायची. मराठी बोलताना अडखळे. पण हिंदी मात्र विलक्षण गोडव्याने बोले. आणि त्यामुळेच तिला मराठी गाण्यांपेक्षा "तीन गज की ओढनी" हे गाणे फार आवडे. दर बुधवारी महिलांच्या बैठकीत हे गाणे म्हटले जाणारच.
तीन गज की ओढनी,
ओढनी के कोने चार,
चार दिशाओंका संसार..
बाईचे सारे आयुष्य तीन वारांच्या ओढणीत बांधलेले. चार दिशा सुद्धा ओढणीच्या घुंगटातूनचं दिसणार. घुंगटातली घूटन.... गुदमर बाईच्याच वाट्याला.
कोठरी के चार कोने
हर दो कोने बीच दिवार.... ऽऽऽ
दिवार बना है घूगट
घूँगट भीतर घूटन घूटन भरी है जिंदगी....ऽऽऽ
ओढनी है जिंदगी
जिंदगी है ओढनी
ओढनी....जिंदगी....ऽऽऽ
हे गीत गातांना प्रत्येक कडव्यानंतर अत्यंत उदास .. करुण स्वरातले उकार असत. गाता गाता नंदाचे डोळे वाहायला लागत. एवढे वाईट वाटते,
दु:ख होते तर कशाला हे गाणे म्हणायचे? असे मी म्हणताच मला नंदाने उत्तर दिले होते, "भाभी, हे गाणं म्हणताना विहिरीला पाण्याचे फुटवे फुटतात ना तसे डोळ्यातून पाणी वाहाते. पण त्यामुळे मन खूप शांत होते. काही नवे करण्याची इच्छा पण जागी होते."
आजही खिचडी करताना मम्मीला नंदा आठवतेच. तिच्या खिचडीत वांगी नि बटाटे असणारच. कढीसाठी पीठ दळून आणताना त्यात पसाभर उडीददाणे नि वाटीभर धणे भाजून घालणारच. शिवाय फोडणीत चार मेथीदाणे टाकायला तिनेच नकळत शिकवले.
नंदा दिलासात असतानाच जीवनधरचे पत्र आले. पहिल्या वाक्यातच "आय लव्ह यू, डू यू लव्ह मी?" असा प्रश्न होता. नंदाची समजून घालण्याचा त्यात प्रयत्न होता. दुसरी वाई सोडून गेली होती. मुलाला भेटण्याची आग्रही विनंती पत्रात होती. पण त्यातील एकाही अक्षराने नंदा विचलित झाली नाही. ती म्हणे की मी गेली आठ वर्षे या थापांना भुलले. जिवावर दगड ठेवून, मुलांच्या भल्यासाठी घराबाहेर पडले. त्याला यायचेच असेल तर धुळ्यात यावे. नंदाच्या कुटुंबात, घरात राहावे. कामधंदा करावा, दारू, जुगार, पत्ते चालणार नाही. आता घर नंदाचे, तिच्या मुलाचे असेल. ही तिची ठाम भूमिका होती.
ज्येष्ठी पौर्णिमेस नंदाचा उपास होता. मी न राहवून विचारलंच, "नंदा, आम्हाला पत्ता लागू न देता वटसावित्रीचा उपवास करतेस. करवी चौथ केलीस. तीजेला पिंडा करून, केतनच्या हाताने तो कापून सार्वाना देतेस. मग जीवनधरकडे जायचे नाही असे का म्हणतेस?"....मी विचारले.
दिलासाघरात येईपर्यंत नवऱ्याच्या जाचाला आणि माराला कंटाळलेल्या मनातही 'पती हाच परमेश्वर' हे वाक्य गोंदलेले होते. माझी आई मला इथे येईपर्यंत जतावून सांगत होती की, नंदू तुझ्या पतीची बुद्धी काही काळापुरती फिरली आहे. पण हनुमानजी त्याला परत ठिकाणावर आणतील. तुझा परमेश्वर तुझा पतीच. त्याला दुवा देत जा. मला कळायला लागले तेव्हापासून, पती हाच देव आणि त्याच्या दारात, पती आगोदर मरणारी बाई सर्वात भाग्यवान हेच ऐकलेले. जोरात बोलले वा दणदण पाय वाजवीत चालले की आई ओरडे. ए हलक्या आवाजात बोल. सासरी अशी वागलीस तर आमची अब्रू बाहेर टांगशील. पापड आवाज न करता, तोंडातल्या तोंडात खायचा. शिळी भाकरी आवडीने खायची. जाता येता खायचे नाही. या साऱ्या गोष्टी तिने लहानपणापासून शिकवल्या. थेंवभर दुधाचा चहा अधून मधून प्यायला लावी. का तर सासरच्या हालाची आताच सवय हवी…
…मेंदूचा डबा बुडाशी भरलेला असतानाच झाकण गच्च बसवून टाकले. तो डबा कधी भरलाच नाही. पण इथे दिलासात आल्यापासून क्षणोक्षणी विचार करायला शिकले. मोर्चात सामील झाले. जगात काय घडतंय, देशात काय घडतंय हे वाचण्याची संधी मिळाली. मला वाचनाची खूप आवड पण पुडीचा कागद वाचू लागले तरी पिताजी रागवत. शिकलेल्या बाईचा संसार चांगला होत नाही असे ते म्हणत. पण इथे आल्यावर मेंदूच्या डब्याचे झाकण कधी मोकळे झाले आणि उघडले ते कळलंच नाही. माझ्यापेक्षाही दुःखी, अडचणींना व अत्याचारांना बळी पडलेल्या मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडे पाहून माझे दुःख फिके वाटू लागले आहे. आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत माझ्यात आली. स्वतःच्या कष्टाने घर उभारण्याची जिद्द उभारली.
पण तरीही… भाभी, लहान वयात झालेले संस्कार..तेव्हा मिळालेली शिकवणूक अंगावर उठलेल्या फोडांसारखी असते. फोड फुटून बरा झाला तरी वण कायमचे राहातात. मनाला कितीही पटले तरी व्रत वा उपवास केल्याशिवाय आंघोळ केल्यासारखे वाटत नाही. भाभी, कुणी सांगावं, आणखीन पाचदहा वर्षांनी हे वणही साफ होतील.
एवढे रामायण घडून गेल्यावर, मी जेव्हा नव्याने घर उभारीन ते माझे नि मुलांचेच असणार. मुलांच्या पप्पांनी यायचे तर जरूर यावं. पण, माझ्या घराच्या चौकटी मान्य करून. एकोणनव्वदच्या अखेरीस आलेली नंदा नव्वदच्या ऑगस्टमध्ये बोलणाऱ्या केतनला घेऊन माघारी धुळ्याला गेली. आज तिथे घर उभे आहे. जीवनधरला त्या घराच्या भिंती भावल्या नाहीत. तो त्या घरात आला नाही. आज नंदा दुकानात काम करते. उरलेल्या वेळात फॉल पिकोचे काम करते. अधूनमधून पत्र येते. त्यात लिहिलेले असते-
"मेरा और केतनका ऑल मानवलोक फॅमिली को धुलीया से अंबाजोगाई तक साष्टांग प्रणाम पहूँचे. मेरे घर आना.
बीच मे है टेबल, आजू बाजू मे गुलदस्ते
खत लिखना समाप्त हुआ, फिरसे कहेती नमस्ते...."
आपकीही नंदा.
नंदासारख्या हजारो.. लाखोजणी, ओढणीच्या घूटनमध्ये गुदमरणाऱ्या. त्यांना घर, जे त्यांच्या जोडीदाराचेही असेल, ते कधी मिळणार?