तिच्या डायरीची पाने/मेरे हाथों में नऊ नऊ चूडियाँ रे ऽऽऽ


मेरे हाथोमें नऊ नऊ चुडियाँ रे ऽ ऽ ऽ


 "माझी सावत्र आई बहोत छळायची. पिक्चरमध्ये दाखवतात ना, तशी! मला सात बहिणी. मी धरून आठ. धाकटा भाऊ, आमी वरच्या तिघी. एका आईच्या, नि खालच्या पाच नि भाऊ या आईचा. सात वर्षे गुवाहाटीला होतो आम्ही. दोन साल पहले लातूरला आलो. इकडं आल्यापासून तर फारच तरास करायची.... मग काय करावं?....."
 तेजस सावळा रंग, गुबऱ्या गालात बुडालेले अपरे नाक.. रुसव्याची कायमची रेघ असलेले रेखीव ओठ. टपोऱ्या डोळ्यात गुलाबी छटा. अशी ठेंगणी ठुसकी मीरा स्वतःची कहाणी सांगत होती....
 मीराने तिच्या झोपडीजवळ राहाणाऱ्या मुर्तुझा या मुस्लिम तरुणाशी सिद्धेश्वरच्या मंदिरात जाऊन माळा घालून लग्न लावले. तो मूळचा नांदेडचा. १२ वी नंतर टेक्निकल कोर्स शिकण्यासाठी लातूरला आला होता. तिथे या दोघांची ओळख झाली होती, असे तिने सुरवातीस सांगितले होते.
 "क्या कहूँ भाभी, मेरी सौतेली माँ मुझे इतना मारती थी और चार चार दिन भूखी रखती थी। मुर्तुझा देखता था। वो ही मुझे सबकी नजर चुकाकर खाने को देता था। मै भी उसके पास जाती थी। बहोत प्यार करता था। मेरी सूरत उसे बहोत पसंद थी। शादी के बाद कितना मजेमें रहे हम! उसके दोस्त बहुत अच्छे थे। पंधरा दिन कैसे गुजरे समझा भी नही। फिर क्या करें? सौतेली माँ की नजर लग गयी। एक दिन कुछ बताये बिना मुर्तुझा भाग गया। मुझे अकेली छोडकर।..."
 "ताई मला ना हिंदी, बंगाली भाषाच आपल्या वाटतात हो. तीच भाषा ओठात बसलीया." मीरा हे सांगत असतांना श्यामाच्या, आमच्या कार्यकर्तीच्या
मनातलं कुतुहल जागं झालं. तिने प्रश्न टाकला, "तोमार नाम की? तोमार बाबा नाम की? शे की करो?..." आणि शामापेक्षाही सफाईदार बंगालीत उत्तरे मिळाली.
 पहिल्या दिवशीच तिच्या मनाला ताण देण्यापेक्षा, दोन दिवस तिची माहितीच विचारायची नाही असे ठरवून तिला दिलासात दाखल करून घेतले. दिलासा घराचे नियम पाळण्याचे हमीपत्र लिहून घेतले आणि दोन दिवसात मीरा दिलासाच्या वातावरणात मिसळून गेली. दिलासाच्या नियमानुसार तिची वैद्यकीय तपासणी केली. अवध्या पंधरा वर्षाची कळी पण कुंकर घालून अकाली उमलवली गेली होती.
 मीराचे वडील मजुरी करीत. लातूरच्या तेल कारखान्यात ते कामावर होते. माणूस गरीब, प्रामाणिक आणि इमानदार. त्यामुळे मालकाच्या अगदी विश्वासातला. मालक काही वर्षापूर्वी आर्थिक कारणांमुळे थेट आसाममध्ये निघून गेले होते. जाताना पैशाअडक्याबरोबर लक्ष्मण जाधवाच्या कुटुंबालाही घेऊन गेले. लक्ष्मणचा संसार मोठाच होता. सहा मुली नि दोघे नवराबायको. गोहाटीला गेल्यावर दोन मुली आणि धाकटा मुलगा जन्मले. एकदाचा वंशाला दिवा मिळाला. अकराजणांच्या पोटाला भाकर घालण्याची ऐपत मालकातही नव्हती. बंगल्याच्या वळचणीत राहण्यासाठी दोन खोल्या आणि महिना हजार रुपये लक्ष्मणच्या हातावर ठेवले जात. मुली आणि बायको आजूबाजूच्या घरात कामं करीत. मोठी शान्ता, नंतरची मीरा अकरा नि दहा वर्षाच्या. त्यांना घरकामासाठी दुसऱ्या कुटुंबातून ठेवले होते. मीरा रोज सकाळी सात वाजता सवितादीदीकडे कामाला जाई. तिथेच नाश्ता, चहा, जेवण मिळे. दीदी शाळेत टीचर होत्या. बाबूजी कॉलेजात शिकवत. दीदीची चिमुकली करिश्मा सांभाळायचे काम मीरा करी. शिवाय मछली धुवून घ्यायची, नारळाचा छोल काढून द्यायचा, मिक्सर, फूड प्रोसेसर वॉशिंग मशीन, फोन इत्यादी
 आधुनिक उपकरणे सराईतपणे हाताळण्याची तिला सवय होती. मीराला गाण्याची खूप आवड. सवितादीदी रविन्द्र संगीत गाणारी. तिची गाणी ऐकून मीराही खूप गाणी शिकली होती. ती संस्थेत असतानाची गोष्ट. मी एक दिवस "ओ सजना बरखाँ बहार आयी" हे गीत गुणगुणत होते. लगेच मीराने मला मूळ बंगाली गाणे
गाऊन दाखवले. मीरा त्या घरीच लिहायवाचायला शिकली. चार माणसांत कसे वागायचे, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे, फोनवरचे निरोप घेऊन व्यवस्थित कसे सांगायचे यात मीरा तरबेज झाली होती. सवितादीदीही तिच्यावर खूप माया करीत. कपडेलत्ते चांगले घेत. लाड करीत. जणू ती त्यांच्या घरातीलच.

 पाहाता पाहाता चार वर्षे निघून गेली. आणि अचानक मालकाची नाव किनाऱ्याला लागली. मालकिणीचा भाऊआला. सर्व पसारा आवरून बहिणीला आणि मुलांना घेऊन धारवाडमध्ये निघून गेला. लातूरला परतण्याशिवाय लक्ष्मणसमोर दुसरा मार्ग नव्हता. त्यात मोठ्या शांताने असामिया टेलरबरोबर पळून जाऊन लग्न लावले होते. तिच्याहून धाकटी मीरा शहाणी होऊन तीन वर्षे झाली होती. सवितादीदीच्या घरचे चांगले चुंगले खाणे, नीटनेटके कपडे यामुळे ती अधिकच उठून दिसे. शांताच्या मार्गाने ही लेक गेली तर कसे? असा प्रश्न मनाला सतावत राही. त्यामुळे फारसा विचार न करता लक्ष्मणने निर्णय घेतला आणि एक दिवस त्याने सगळा गाशा गुंडाळून थेट लातूर गाठले. सिग्नल कँपात एका मित्राच्या मदतीने झोपडे ठोकले आणि सारेजण राहू लागले. आसामात भात आणि मासे मुबलक. दोनवेळचे खाणे सहज भागे. पण इथे मात्र महागाई प्रचंड वाढलेली होती. हायब्रीडची भाकर नि एक कालवण खायचे तरी परवडत नसे. इथेही मीरा,रत्ना, पद्मीन, माया, वीणा धुणीभांडी, झाडलोट करायला चार घरी फिरत. आई आठ नऊ बाळंतपणांनी पार खंगली होती. नेहमी खोकला येई. थकवा येई. घरची कामे धाकट्या रेखा आणि मीनू सांभाळीत. मीराच्या झोपडीशेजारच्या बंगल्यात टेक्निकल शाळेची तरुण पोरे राहात. त्यांच्या धुण्याभांड्याचे काम मीरा करी. त्यातच मुर्तझा होता. मुलांना अधूनमधून 'तिखट' आवडे. मीरा ते बनवण्यात तरबेज होती. पोरं तिच्यासमोर सामान आणून टाकत. मनापासून खपून ती झन्नाट कालवण तयार करी. पोरं खुश. नि शिवाय उरलेला रवा, भात चपात्या घरी न्यायला मिळत. मीराही खुश. सवितादीदीच्या हाताखाली मीरा ते कालवण करण्यात तरबेज झाली होती. तिची स्वच्छ आणि आधुनिक राहणी, बोलण्यातला गोडवा यामुळे ती भल्या घरातली मुलगी वाटे.
 मीराचे केस कुरळे नि दाट होते. डोक्यावरून पाणी घेण्याची सवय आसामात लागलेली. मोकळे केस पाठीवर टाकून हिंडणारी.... काम करणारी मीरा अनेकांच्या नजरा वळवून घेई. त्यातच मुर्तुझा होता. तो तिला डोक्याच्या पिना, डोळ्यात घालावयाचा सुरमा, भिवया रेखायची पेन्सील, पावडर इत्यादी खास वस्तू आणून देई. मग घरात दुसरी पोरं नसतील तेव्हा त्याचे हट्ट मीराला, पुरवावे लागत. सवितादीदीच्या घरात वाढल्याने स्त्रीपुरुष मैत्रीतले नेमके धोके तिला माहीत होते. ती शहाणी झाल्यावर दीदींनी तिला चार गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. चित्रं दाखवली होती. मुर्तुझाचे बारीकसारीक हट्ट पुरवताना एक दिवस आईनेच पाहिले. त्या रात्री वडिलांनी मरेस्तो मारले. आईने दोन दिवस उपाशी ठेवले. अर्थात मुलांचे कामही बंद करून टाकले. घरची देखभाल मीरावर सोपवून आई खोकत खाकत चार घरची धुणीभांडी करू लागली. चार आठ दिवस बरे गेले. आई बाहेर कामाला गेली की धाकट्या भावंडांच्या हातावर चॉकलेट, गोळ्या देऊन मीरा मुर्तुझाची खोली गाठे. तोही वाट पाही. खोलीतली बाकीची मुले गावी निघून गेली होती. हा मात्र मीराच्या ओढीने लातूरला राहिला होता. धाकट्या भावाने, बालाजीने एक दिवस आईजवळ कागाळी केली. त्या रात्री तर मीराला बापाने इतके बडवले की शेजारच्यानी सोडवले. मुर्तुझाला त्याच्या मालकाने खोली मोकळी करायला लावली. बापाला वाटले की पोरगी आता तरी ठिकाणावर येईल. मुर्तुझाने शेजारच्या झोपडपट्टीत एका मित्राच्या मदतीने खोली केली. एक दिवस मीरा घरातून नाहिशी झाली. दोघांनी सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन एकमेकांना माळा घातल्या. भांगात सिंदूर, पायात बिछड्या, हातात चुडा, त्यात सवितादीदींनी दिलेली शंखाची बांगडी अशा थाटात मीरा संसाराला लागली. मुर्तुझाही मजुरी करी, दोन वेळचे भागे. जेमतेम महिना झाला असेल नसेल लग्न करून. एक दिवस मुर्तुझा काम शोधायला गेला तो परतलाच नाही. आठ दिवस गेले. एक रात्री त्याचा मित्र आला. वेडंवाकडं बोलू लागला. त्याच्याजवळ मीराने राहण्याची भाषा करू लागला. मीरा संतापली, आरडाओरडा करून तिने चार माणसे गोळा केली. पण साऱ्यांनी तिलाच दोष दिला.
 "बगा ताई समदे माझ्या तोंडावरच थुकले. ही पोरगीच चवचाल आहे
म्हणे. त्या भाड्याला कुणी दोष दिला नाही. मग दुसऱ्याच दिवशी ती झोपडी खाली केली. एस्टी स्टँडवर लई वेळ बसून ऱ्हाईले. कुठं जावं कळेना. मग नाइलाजानं आईच्या दारात गेले. तिनेपण शिव्या दिल्या. म्हणाली, बाप यायच्या अगूदर काळं कर. तू दिसली तर तुजा गळा कापील नि जाईल जेलात. त्यो जेलात गेला तर या पसाऱ्याच्या तोंडात काय कोंबू? एवढी भाकर खा. पानी पी. हे पन्नास रुपये घे नि काळं कर. सावत्र आईच. पण तेवढी दया केली बघा. मग पुना स्टँडवर आले. दिसल त्या गाडीत बसले नि इथे अंबाजोगाईत पोचले. रस्त्यावरून हिंडताना एका ब्युटिपार्लरची पाटी दिसली. तिथं आत शिरले. सवितादीदीने मसाज करायला शिकवले होते. पंधरावीस दिवसांनी मीच दीदीचा चेहेरा साफ करून द्यायची. म्हटलं ही नोकरी मिळाली तर बरंच हाय. पन नशीब खोटं. त्या बाईच्या नवऱ्याची बदली झाली होती. ती चार दिवसांनी गावाला जाणार होती. तिनेच तुम्हाला फोन केला नि मला संस्थेत आणले. लई उपकार केले बाबा!"
 अशी होती मीराची कहाणी. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील राहाणीमान अंगी पडल्यामुळे मीराला इतर मुलींच्यात मिसळणे जमत नसे. खेड्यात वाढलेल्या इतर स्त्रिया डोक्याला पचपचून तेल लावीत. तर या बाईसाहेब नहायच्या आदल्या रात्री खास तेल लावणार. दिलासातील महिलांना हातखर्चासाठी संस्था शंभर रुपये देते. पण तेही तिला अपुरे वाटत. मुलगी वा बाई दिलासात रुळली की आम्ही त्यांना गटाने खरेदीसाठी, उदा. भाजी आणणे वगैरे साठी पाठवीत असू. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, संस्थेविषयी आस्था निर्माण व्हावी, निर्णय घेण्याची क्षमता यावी हा यामागे हेतू होता. एक दिवस तक्रार आली की मीरा भाजीला गेली की हॉटेलमध्ये चहा पिण्याचा हट्ट धरते आणि तडीलाही नेते. लहान गावात विशिष्ट १-२ उपाहारगृहे सोडली तर स्त्रिया हॉटेलमध्ये जात नाहीत. छोट्या गावात सगळे सगळ्यांना ओळखतात. हॉटेल मालकाचाच एक दिवस फोन आला, भाभी पोरीची नजर चंचल वाटते. तिला सांभाळा.... उगा आफत यायची. लोक काय वाईटावरच असतात. मी मुद्दाम फोन केला."
 एरवी मीरा इतकी गोड, हुशार, बोलण्यात तरबेज, वाचनाची आवड. काय करावे हे सुचेना. आमच्या एका कार्यकर्तीने सुचवले की मीच तिला
कामासाठी घरी ठेवावे. माझ्या मुलीबरोबर तिची दोस्ती होतीच. सायंकाळी जेऊन खाऊन दिलासात परतावे. त्या बदल्यात मी जेवण, कपडे वगैरे देऊन दीडशे रुपये तिच्या नावे बँकेत भरावेत. घरगुती वातावरणात ती अधिक स्थिर होईल. मीरा मला घरात मदत करी. घर स्वच्छ ठेवणे नि मला स्वयंपाकात मदत करणे एवढेच तिचे काम. दुपारी २ ते ४ संस्थेत शिवण शिकायला मी पाठवीत असे. १९९० साल 'युनोने' बालिका वर्ष म्हणून जाहीर केले. त्या निमित्ताने बालिका मेळावे घेतले. त्यात मीरा पुढे असे. अंताक्षरीत तर कोणालाच हार जात नसे.
 केव्हातरी बाजारात जाताना तिला तिचा मामा भेटला. त्याने नंतर संस्थेत पत्र पाठवले. मीराची आई सावत्र नव्हती तर सख्खी होती. मुर्तुझाबरोबर पळून गेल्यावर ती परत घरी कधी गेलीच नव्हती. आम्हाला सांगितलेल्या माहितीतल्या अर्ध्या गोष्टी खोट्या होत्या. एक दिवस सायंकाळी आईवडिल संस्था शोधीत आले. मीराला परत घेऊन जाण्यासाठी. मीराला त्यांच्यावरोबर परत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिने काही गोष्टी मीठमसाला लावून सांगितल्या होत्या. आठ बहिणी नव्हत्या. होत्या सहाजणी. मोठीने आसामात टेलरकाम करणाऱ्याबरोबर लग्न केले होते. मीराचा नंबर तिसरा. तिच्याहून मोठी मीना. तिचे लग्न गेल्यासाली झाले. मीराला नटामुरडायची खूप हौस. ते आईला आवडत नसे. त्यात ती ज्या घरी कामाला जाई तिथे हातउचल करी. मुर्तुझा हा शिकणारा मुलगा नव्हता. तो कुठल्याशा फॅक्टरीत फिटरचे काम करत असे. तो नांदेडचा होता. दिसण्यात देखणा होता. त्याच्याशी मीराची असलेली जवळीक आईवडिलांना आवडत नसे. त्यातून मुसलमान मुलगा आपल्या पोरीला बिघडवतो याचा राग येई. दोघेही मीराला खूप मारत. पण तिच्यातला धट्टपणा कमी झाला नाही.
 मीरा पळून गेल्यावर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केला नाही. बला टळली असेच वाटे. पण आठवण मात्र येत राही. शेवटी पोटची लेक. तिचा पत्ता लागल्याचे भावाकडून कळताच आईने उचल खाल्ली. लेकीला भेटावं असा हेका धरला.
 आणि ते संस्थेत आले, "ताई, सख्खे आईबाप झाले म्हणून काय झालं? इतकं मारतात का पोरीला? कंदी तरी मायेनं पोटाशी घेतलंय का मला? विचारा
ना! मला नका धाडू तिकडे". मीराने हट्ट धरला. मीरा आमच्याकडे १९८९ ते १९९१ या काळात होती. दरम्यान तिला आम्ही चौथी परीक्षेस बसवले. त्या निमित्ताने वैद्यकीय शास्त्रानुसार तिचे वय निश्चित केले. ने सतरा एवढे भरले. मीरा आठरा वर्षाच्या आतली होती. तिने वडिलांकडे जाणे कायद्याच्या दृष्टीने योग्य होते. वडिलांनी यापुढे तिच्याशी नीट वागण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तिच्या इच्छेविरुद्ध तिची आईवडिलांबरोबर पाठवणी केली. नियमानुसार तिच्या सामानाची तपासणी झाली. त्यात तऱ्हेतऱ्हेची सेंटस्, चेहरा साफ करायचे क्लीनसिंग लोशन, लॅक्मे... पॉण्डस क्रीमच्या बाटल्या, आयब्रो पेन्सिली, चार रंगाच्या ओठकांड्या (लिपस्टिक्स); गुलाबपाण्याची बाटली, चंदन पावडर असा भरपूर महागडा खजिना सापडला. तो पाहात असताना गेल्या वर्षीच्या माहेर संमेलनात तिने केलेले नृत्य मला आठवले. सुरेख साडी, माथ्यावर बिंदी, नाकात नथनी, कमरपट्टा यात सजलेली देखणी मीरा तबकडीच्या तालावर नाचत होती.

....मेरे हाथोमे नऊ नऊ चुडियाँ रे ऽऽऽ
जरा ठैरो सजन मजबुरीयाँ है ऽऽऽ


 हातातल्या इन्द्रधनुषी बांगड्या खनकावीत तालात ठुमकणारी मीरा.
 मीराला नवऱ्यावर मन भरून 'प्यार' करायचा होता. स्वैपाकघर सजवून, छान छान पदार्थ बनवून त्याला खिलवायचे होते. एक प्यारीसी गुड्डीपण हवी होती. वडिलांबरोबर परतलेल्या मीराला यातले काय काय मिळाले याबद्दलं नेहमीच उत्सुकता वाटे. सुमारे सहा महिन्यानंतर श्यामा, संस्थेची संवादिनी वडिलांचा पत्ता शोधत गेली. पण दोन महिन्यांपूर्वीच मीराचा पूर्ण परिवार गाव सोडून गेला होता.
 मीराएवढी लहान मुलगी आजवर संस्थेत आली नव्हती. तिचा बालसुलभ अवखळपणा दिलासाघराला… मम्मीला ताजवा देत असे. पण कधी कधी तापही होई. बाजारची भजी खाण्याची चटक कार्यकर्तीला नेहमी वैताग आणी. ही बाजार करून बाहेरून आली की कुठेतरी भज्यांचा पुडा खोचून ठेवणार. स्वतः खाणार नि खाणाखुणा करून इतरांनाही खाऊ घालणार. आमच्या शिस्तप्रिय
आणि कडक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा गुन्हा महाभयानक. मग जेवण न देण्याची शिक्षा केली जाई. मीराही इतकी हेकेखोर की ताईनी-कार्यकर्तीने 'जेव' म्हटल्याखेरीज घास तोंडात घालणार नाही. पुस्तकी शिस्तीपेक्षा मायेचा मऊ हात अधीक महत्त्वाचा असतो हे कार्यकर्तीला समजावून सांगताना माझी तारांबळ उडे. त्यातूनच मग मीराला माझ्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. राखी पौर्णिमेला निरांजन ओवाळून, साग्रसंगीत राखी बांधण्याचा कार्यक्रम फक्त दादाभैय्यापुरताच नसे तर आमच्या बालसदनच्या मुक्तारलाही सन्मानाने राखी बांधली जाई.
 पेपर वाचण्याचाही नाद होता. पुण्याला कोणते सिनेमे लागलेत ते या बाईला माहीत असत. त्यातूनच तिला चौथीला बसवण्याचे मला सुचले. आणि पहिल्या वर्गात पासही झाली. मीराचा मामा तिला भेटला नसता तर कदाचित ती आणखी शिकली असती. मीरा आसाममध्ये असताना सविता दीदींच्या सुखवस्तू घरात राहिली. सुशिक्षित आणि स्त्रीपुरूष समतेचा विचार स्वीकारलेल्या घरात तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिळाले. तरूणाईच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवताना सुखी संसाराचे चित्र जवळून पाहिले. त्यामुळे त्या अधमुऱ्या वयात तिच्या मनानं. सुखी संसाराबद्दल, प्रियकर… साथीदाराबद्दल सुंदर स्वप्ने पेरली गेली. लातूरला झोपडीतले दरिद्री जीवन जगताना मुर्तझासारखा दिसण्यात तेज, थोडाफार शिकलेला, तिच्या सौंदर्याची स्तुती करणारा मित्र भेटला, परंतु त्याने चार दिवस तिच्या सौदर्याचा उपभोग घेऊन तिला सोडून दिले. एका बाजूने पारंपारिक संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या मीराला हा धक्का सहन झाला नाही. आईवडिलांकडे परत जाण्याची हिंमत झाली नाही. दिलासाघरातल्या वातावरणात ती आरपार रमली होती. मीराला निरोप देताना आम्ही सारेच आतल्याआत हेलावलो होतो.
 कोणत्याही संध्याकाळी मीरा आठवते नि मनात येते, मीराच्या हातातल्या चुडियाँ कनखत असतील का? तिचा सजन तिला सापडला असेल? का उजाड शुष्क डोळ्यांचे बिनबांगड्यांचे हात दारोदारची धुणीभांडी करण्यात निष्पर्ण, राठ, . भेगाळ बनत चालले असतील?