तिच्या डायरीची पाने/सावितराच्या डायरीची पाने
११
सावितराच्या डायरीची पाने
पान १
अंऽऽ सांगते तसंच लीव बरं का ग. न्हाई तर मनचंच घुसडशील. ही ढायरी माझी हाय. हं, तर लीव. काल रातच्याला त्या भल्या दादापानं मला हितं आनून सोडलं. तो माघारी गेला तवा लई आवघड वाटलं मला. रानात वाट चुकावी तसं. मी सासरी गेलेवते तवा बी इतक वाईट वाटलं नव्हतं. मायनं सांगितलं व्हतं, 'बाई गं; सासू, जाऊ, नणंद, सासरा ही समदीच नाती वरवरची असतात. सासू मायीवानी वागली तरी सुनेच्या नाकाला मुरडा पडतोच. आन् सून किती बी शेवा करनारीन असली तरी सासूला मिरचूचा ठसका लागतोच. पन, नवरा बरिक आपला असतो. त्याचं मन सांबाळ. तो गोड तर समदं गोड. मीठ बी चवदार! तवा, त्याचं मन धरून ऱ्हा. तो म्हनील तशी वाग.'
आमची वरात निगाली तवाची गोस्ट. आता आमचे मालक शेजारीच की, मला त्यायेन्चा चुकून धका लागला तरी कसनुसं व्हायाचे. लाज बी वाटायाची. मनात यायचं की ह्ये माणुस फकस्त आपलं हाय. लई इसवास वाटला वता. माजा जीव, माजा जलम ह्येंच्या साठीच. पन, जाऊदे. त्याचा इचार आता कशाला?
काल रातच्याला हितं आले तवा कुनाचा आधार व्हता? इसवास होता? पन ममीनं जवळ घेतलं. डोकीवरून हात फेरला. म्हनाली, "रानी, जिऊन घ्ये. आता कुणाला काई सांगू नको. उद्या दिदी येतीला. तवा मातुर समदं खरंखरं सांग, सारुबाई, हिला वाढशीक. अन् न्ये तुज्या संग. गादी पांगरूण काढून दे. आन् समद्या नीट झोपून जावा. तिला उगा काहीबाही इचारू नका. दमलयां लेकरू. कोण्या घरचंय नि का परदेशी झालंय देव जाने!"
ममीला पाहून मला दम आला. जीव शांत झाला नि झोप लागली.
आज सकाळी दिदी आल्या. त्यानला पाहून जीव दडपलाच. म्हंजी आजून बी भीती वाटते. त्यांनी फारम का भरून घेतला. लई सवाल इचारले. मी बी थोडं खरं आन् थोडं खोटं बोलले. फारम वर सही कराया सांगितलन् तर काय! आमी आडानी. उमटावला अंगुठा. तशी माज्याकडं पाहून हसल्या नि ही ढायरी का काय दिली. वही म्हना की, आन् सांगितलं, रोज रातच्याला झोपायच्या अगुदर मनातलं समदं यात लिवायचं. दिसभर काय केलं, कसं वाटलं. कोन काय बोललं समदं, जे मनात येईल ते. आता मला सही बी कराया येत नाही. त्यांनी सरूबाईला हाक मारली. आनी सांगितलं, "सरू, ही सावित्रा जे जे सांगल ते तसंच्या तसं हिच्या ढाइरीत लीव. नि हिला रोज दोन तास साळा शिकीव."
आज मला पाटी नि पेणसल दिलीया. तर, सरूबाई आज इतकंच पुरे. तुला बी झोप याया लागलीय.
पान २
हितं येऊन आठ दिस झाले. रोज दुपारला मी शिवण शिकते. मिशन चालवाया शिकवलं मंजूताईनं, सरू दुपारी लिहिणं बी शिकीवते.
आज माझ्या मनात खूप काय काय आलं. ही आमची मम्मी. ही म्हनं इध वा झाली तवा शानीबी झाली नवती. लगीन झालं सातव्या वरसाला नि त्यो दादापा म्येला तवा आकरा सालाची होती. तिचा उभा जलम भाऊभावजयांच्या संसाराची उस्तवार करन्यात गेला. हितं सवस्थेत येऊन बी बारा वरसं झाली. हितल्या मायबापाविना अनाथ लेकरांचा सांबाळ कराया आली ती समद्यांची मम्मी झाली.
मम्मी म्हंजी आअी. विंग्रजीत आअीला मम्मी म्हणतात. आमी आमच्या आईला माय म्हणतो काय तरी गम्मत. मम्मी नि माय. जरा जरा एकच आलं की! ते विंग्रजी साता समुंदरा पल्याडचं. पन तिथली नि इथली माय जनु भैनीभैनीच की!
हितं आमी पांचजनी ऱ्हातो. शेरटर… शेरटर असं कायतरी म्हनतात समदी. मला आपलं ते सोप्प 'सावली घर' च म्हनाया बरं वाटतं.
सरूच्या नवऱ्यानं तिला टाकून दिलंया, लातूरच्या कोरटात तिनं भांडन धरलंय. शान्ताचा नवरा रोज दारू पिऊन हानमार करायचा. एक दिवस तर लेकरूच हिरीत फेकाया निगाला. तीन लेकरासंगट हितं आली. बारकी पदमिन. अगदी न्हानुशी हाय. असल चौदा-पंधरा वरसांची. ती रंगानं काळीढुस हाय म्हणून तिच्या नवऱ्यानं एक दीस बी नांदिवलं नाही. आता बापाघरी बी अडचण व्हायला लागली. भावानं हितं शिवण शिकाया आणून घातलीय, छगूचा नवरा मिलट्रीत आहे. चांगला पगार मिळतो. पण त्याचं लफडं हाय. छगूला तो न्येतच नाही.
आन मी ही अशी. अशी मंजी कशी? जाऊदे. झोप आवरंना आता. लिवता लिवता हात भरून आला न.
क कमळाचाच का? क कनसाचा कढईचा बी असल की. कमळ म्या पाहिलं नाही. सरू म्हणते की सुंदर फूल म्हंजी कमळ, तिनं चित्र बी दावलं कमळाचं, पन माज्या डोसक्यात कनसाचा क फिट्ट बसला. आन् कनीस भाजून खाऊसं वाटलं. सरू उद्या बाजारात जाशील तवा कवळी कनसं घेऊन ये. आन आता लिवनं बास झालं. हिकडं दे ढायरी. मला काढु दे अक्षरं. सही आली की सही करीन.
क र व ढ ई म ट
पान ३
हितं येऊन महिना झाला. आता मन रमलंय. लहानगी होते तवा दोनचार महिनं साळेत गेलेवते. पन माजं मन तिथं रमायचं नाही. येकच मास्तर. तो बी कवाकवा यायचा. तो आला की गावची मानसं गोळा व्हायाची. यो काम केलं का? तहशीलात गेलावता का? लेकराचं औषध आनलं का? असं काय काय इचारायची. भीमा माळणीनं भाजीचं बेणं आणाया रुपये दिलेले असायचे तर कुन्या पोराचा फारम आनायचा असायचा. मास्तर बेजारायचा. एक तर डोंगर रस्त्यावर सायकल मारून थकून जायचा. त्यात एकलपायी. त्यानं मंग शिकवावं तरी कसं? नि कवा? एका लायनीत पैलीची पोरं. दुसऱ्या लायनीत दुसरीची. अशा चार लाइनी. आन् पोरींची लाईन पाचवी.
त्यातून आमच्या मायला दिस का ऱ्हाऊ नयेत? मी थोरली, माज्या पाठीशी
लागून शिरू. मग नंदी. मग बाळ नि लगीलग लती. ती जलमली नि माजी साळा सुटली. पाटी फुटून गेली. आज वाटनं, शिकले असते तर अशी पोतेऱ्यावानी हिनं तिथं लोळले नसते. आमच्या दिदीला कालिजात लई मोठा पगार मिळतो. येका महिन्याचं चार हज्जार रुपये. ढगीण मावशीनंच सांगितलं.
माझं लगीन करताना हुंड्याचे तीन हजार रुपये एक सालात पोचिवले नाही म्हणून मला घराबाहीर काढलं.
बरंय माय. दिदीच्या लेकीच्या जलमाला असा वनवास यायचा न्हाई. पन सरू सांगत होती की एक फौजदारीण बाई वी दोन दिस हितं ऱ्हाऊन गेली. तिचा दुकानदार नवा सौशय घ्यायचा तिच्यावर. हितं आली तवा पाठीचा तवा सुजून लाल झाला व्हता म्हनं.
कालिजात गेलेली पोर, तरी पन वनवास?
आता मी पहिलीचं बुक वाचते. बुक म्हणजे पुस्तक. पन लिहाया अजुक जमत न्हाई.
काल बाजारातून आमी कनसं आणली. ममीनं टोपल्यात निखारा टाकून भाजली. सगळ्यांनी निचितीनं खाल्ली. निचितीनं खाल्लेला घास कसा गुळमट गोड लागतो. आज बुदवार. गावातल्या बाया बी मीटिंगला येतात. तितं गानी म्हटली.
बुद्ध कबीर भीमराव फुले
या भूमीवर जलमले
त्यांनी जनजीवन फुलविले ग ऽ
शेजारिन सखये बाई....
दिदीनं सावितरामाय आणि फुलेबाबांची गोस्ट सांगितली. माजं नांव सावितरा हाय. लई छान वाटलं मला. दिदी घरी जातांना गोडगोड हसून म्हनल्या,
"सावू तुजा आवाज गोड आहे. गाणं शीक. आपण तुझं गाणं रेडिओच्या डबीत भरून ठेवू."
पान ४
काल वकीलसाब आलेवते. ते बापावानी समजावून सांगीत व्हते. मनाला येकीकडून पटत बी व्हतं. पन वळत मातर नाही.
मी नवऱ्याकडं पोटगी मागावी. त्येनं मला जीवे मारून टाकायचा कसा डाव टाकला त्येबी पोलिसात सांगावं. मी अशी तरणी, किती दिस वनवन फिरणार? समद्यांना वाटतं की मी कायतरी शिकावं. पोटपानी पहावं नि नवऱ्याला धडा शिकवावा. पण माजं मन मागेच ओढतं. किती बी झालं तरी घेवाबामानासमूर त्याला माळ घातली. शेवटी नवराच त्यो. त्याचा मान मोठा. काय तरी गेल्या जलमाचं पाप असंल म्हणून घेवानं त्याला अशी बुद्धी दिली. त्याला कशापायी दोस द्यायचा? आपलंच नशीब खोटं!
मी असं काही बोलू लागले की दिदी काम करता करता थांबतात. आणि एक-टक कुटंतरी बघत राहातात. मग मला म्हणतात,
"फार शहाणी ग तू. जा चांगली कॉफी करून आण. साखर कमी घाल. तुझा हात आधीच गोड आहे."
आज दुपारच्याला सरूबरोबर मी कोरटात ग्येलेवते. बाजारावानी माणसांचा काला. झाडाखाली, सडकीवर, भिंतीच्या कडव्यांनी मानसंच मानसं. पांढरं लाळेरं बांधलेली वकीलं काळा कोट घालून हिकडंतिकडं हिंडत व्हती. ती तेवढी शेहरातली. बाकीची मानसं खेड्यातली. अनवाणी पायांची नि बापुडवान्या तोंडाची. बाया बी बक्कळ व्हत्या. आमच्यावानीच नवऱ्यानी हाकलून दिलेल्या. कुनाच्या कडेवर न्हानगं लेकरू, तर कोनी पोटुशी. बेवारशी गायीसारख्या. काळा कोट चढवलेली एक बाई बी व्हती तिथं. पुरूस मानसांसंग बोलत होती. हासत होती. मला वाटलं हिला बी नवऱ्यानं टाकलंया. मी माजी शंका इचारली तशी सरू फसदिशी हसली. म्हनाली तुमी डोंगरातल्या बाया लईच येड्या. ती बाई वकिलीन आहे. वकिलाची बायको नव्हं. सोवता वकील आहे. मंग माज्या मनात आलं, हिला कसा नवरा टाकून देईल? पैस्याचं झाड कोन उपटून टाकील?
मी ठरवलंया की मनापासून शिकायचं. आता उद्यांच्याला ढायरीखाली मी सही करनार आहे.
पान ५
सरूबाई एवडा महिना तुमी डायरी लिवा. पुडच्या महिन्यात ढायरी… नव्हं रोजनिशी मी लिहिनार.
परवा आमी पुन्याला जाणार आहोत. तिथे बायांची लई मोठी मीटिंग आहे. शिबीर म्हनत्यात त्याला. सरू तूच नाव लिही त्याचं. लईच अवघड हाय. परिकता की काय मनतात खर! मी आज दिदीला विचारलं, "दिदी याचा मतलब काय? जरा सोपं करून सांगा की," तशी मनाल्या,
"अग, खूप बाया आहेत, ज्यांना नवऱ्यानी, सारच्यांनी टाकलंय. घरातून हाकून लावलंय, अशा बायांना एकटं रहावं लागतं. कुणाच्या संग लेकरं असतात. मग खूप अडचणी येतात. लोक वाईट नजरेनं पाहातात. कुठे काम मिळत नाही. तर अशा बायांनी एकाजागी जमायचं आहे. एकमेकींना आपापलं गबाळ मोकलून दावायचं. त्याचा इचार करायचा नि त्यातून काही वाट सापडते का ते पहायचे."
तशी मी चटकनी म्हणाले,
"दिदी, तो अवघड शद्व कशापायी वापरायचा? चक्, टाकलेल्या बायांची मीटिंग म्हणा की!" तशी दिदी म्हणाल्या,
"सावू, तू शहाणी आहेस. तुला जे कळतं ते खूपदा आम्हालाही कळत नाही. पुण्याच्या शिबिरात तुला भाषण करायचंय. तयारी कर. काय बोलायचं ते मनाशी जुळवून ठेव. तू, सरू नि शहनाज, तिघींना चलायचं"
शहनाज कालच हितं आली. औरंगाबादेहून. पन पुण्यासाठी तिचा नंबर लागला. शान्ता, पद्मीन संगमनेराला जाणारेत. काय बोलावं बरं पुण्याला? उद्या आमी समद्या एक गट्टा बसून काय बोलायचं ते ठरवनार आहोत. पुन्याच्या सभेत बोलायचं म्हंजी भीती वाटनारच की! दिदी छान बोलतात. पुंगी वाजल्यागत वाटतं, निसतं गुंग होतं मन.
मी पन मनातल्या मनात बोलून पहाणारेय. जमलंच की, न जमाया काय झालं? दिदी माणूस आहेत. तशी मीबी मानूस हाय. मन घट्ट कराया हवं. परयत्न कराया हवा.
आताशा मला कुन्नाकुन्नाची आठवन येत न्हाई. इथं मन गुतायलंय. वाटतं हितनं कुठच जाऊ नाही.
आज मी कोरटात गेले. सायवा समूर हुबं केलं. इचारलेल्या सवालांचा ठासून जवाब दिला. वकीलकाका खूप खूस झाले, मी पन पोटगीसाठी दावा दिलाय, जमिनीतबी हिस्सा मागितलाय. बघू काय होतं ते. लई दुखात गेले दिवस. वाटायचं, मरन बरं. रोज मरनाला साकडं घालीत होते. एकदा तर घासलेट हातात घेतलं होतं. पन तवा डोळ्यासमूर मायचा मुखडा आला तशी ठिऊन दिली बाटली.
पण आता जगू वाटतंया. आला दिवस नवा वाटतुया. सावूची सही. सावितरा. सावू.
पान ६
सरू, तू आज थकली असशील माय. पन आज कसंपन करून माज्या मनची गोष्ट लिहीच.
पुनं. केवढं मोट्ट शहर. मोठेमोठे रस्ते. गाड्या, स्कुट्रा, फटफट्या, मोटारी, सायकली. मानसांची घाई. दुकानं की दुकान! जनु रोजचीच जत्रा भरतीया हितं. मला पुनं आवडलं. आन् भीती वी वाटली. जरा का वाट चुकली, तर पुन्ना म्हणून आपली मानसं सापडायची न्हाईत. पन हिनलं आभाळ कसं मोकळं आहे.
कुनी कुनाच्यात नाक खुपशीत न्हाई. मुंग्यांसारखी भुरूभुरू पळनारी मानसं. स्कुट्रीवर बायाच बसतात जादा करून. म्हाताऱ्या बाया भर्राट स्कूटर चालवतात.
पुन्याच्या शिबिरात लई बाया आल्यात. नाशिक, धुळ, संगमनेर, नागपूर, मुंबई. चारशेच्या वरून असतीला. दिदी सारक्या ताईपन आल्यात बक्कळ. या बालिस्टर विंग्रजी बोलणाऱ्या बाया. आमच्याशी दूधभातासारख्या गोड बोलतात. बरोबरीनं गानी म्हणतात. त्ये हिंदी गानं मला लई छान वाटलं ग. तू आपल्यासाठी लिहून घे बरं का.
तू खुदको बदल, तू खुदको बदल
तो, सारा जमाना बदलेगा…
खरंच हाय बाई. आमी बाया सोताला हलक्या समजतो. आपनच आपल्याला चिखलमाती समजतो. पन त्यातूनच झाड उगोतं. हे का न्हाई कळू आमाला? त्ये बूढे नानासाव! भाषण कराया लागले तशी वाटलं जानजवान मानूस ठासून बोलतोय! दिदी सांगत होती की यांनी तरुणपनी इधवा बाईशी लगीन लावलं.
यांचं लगीन पहिलं. इधवेचं दुःख आमालाबी कळतंच. आमी तरी काय? नवरा असून इधवाच की! तरुण वय जाळून घ्यायचं. जरा का डोकीत रंगीत पिना माळल्या नि केसाचा फुगा काढला की दिदीपन ओरडतात. "नीट केस बांधा. फालतू नट्टापट्ट चालणार नाही इथे."
माज्या मनात आलं की
नानासाबाच्या पायावर डोसकं डिवावं. पन बसले जागच्या जागी. मनातली परतेक गोस्ट खरी कशी हुईल?
आज पुन्यात आमची फेरी निगाली. मला तर बाई लाज वाटत हुती. समदे वघनारे काय म्हनत असतील?
"या वाया नवऱ्यानं टाकलेल्या बाया." हे असलं मनात आलं की धुळीत फेकल्यागत वाटतं. पन विद्याताईचं म्हननंबी खराय.
"टाकलेल्या बायांची ही फेरी पाहून आपण का शरमायचं? समाजानं लाजायला हवं."
रात्री 'बाई' नावाचा सिनेमा दाखवला. तो एका बाईनंच तयार केलाया. सरू, या समद्या वाया आपल्यासाठी किती जीव तोडतात. मग आपन कशापायी घाबरायचं? कशापायी नसीबाला टोकरायचं?
उद्या मी भाषण देनारेय.
पान ७
आज भाषण कराया हुबी राहिले नि पाच मिनिटं गच्चच. तोंडातून सबूद फुटंना. डोळे टकाटका समद्यांना बघत होते. समुर चित्रासारखी भरलेली सभा. पन ती वी मुकी अन मी बी मुकी. श्वास घेता येईना. घसा कोरडा पडला. दिदी माज्या शेजारीच. त्यांचे होट हालत होते. पन मी जनु ठार भैरी झालेली. अन् यकायक काय झालं की, मोरीचा तुंबा मोकळा व्हावा नि पाणी भळूळ भळूळ झोंबाळत बाहीर यावं तशी बोलत सुटले.
"मी सावितरा. सावलीघरात रहाती. मी शानी झाले नि लगी लगी माझं लगीन लावून दिलं बापानी. मी सिकलेली न्हाई. आता मातुर सिकतेय. माजा नवरा म्यॅट्रिक फेल झालेला. घरी इस एकर जिमीन नि एक हीर आहे. माज्या
नानानी धा हजार हुंडा ठरविला. एक एकर तुकडा इकून इवायाला सात हजार रुपयं दिलं. लगनात नवऱ्याला दोन शेवंत्या म्हंजी डिरेस केले. घडी दिली. इतकं करून बी जेवताना जावई रुसलाच. अंगठी हवी म्हनला. मग माज्या मायनी, धाकल्या भावासाठी केलेली मुंदी जावयाला दिली. तवा कुठं जेवाया उठले त्ये. मला ह्ये समदं कळत व्हतं. मन लई खारं झालं. पन मी कुणाला वालणार? काय करनार? माजी बुद्धी आखूडच व्हती. मला वाटायचं वाईची जातच हलकी. पुरसाची शेवा करण्यासाठी द्येवानं तिला जलमाला घातली. ती माणूस आहे याचा इसवासच कुठे होता?
सासरी वनवास वाढून ठिवलेला. सासू घालून पाडून बोलायची. आन्न सडवून खाऊ घालायची. तीन हजार रुपये घिऊन ये म्हनायची. मायवापाला घान घान श्या द्यायची. एकदा दूध उतास गेलं तशी माज्या पाठीवर निखारा चिटकविला होता तिनी. नवरा तर नवराच. तो रातच्याला ओचकारून बोचकारून जीव नकोसा करी. आन् वर धाक घाली, पंचमीला माहेरला जाशीन तवा हुंड्यातले तीन हजार रुपये घेऊन ये. पैसे आणले तर घरात घेइन. न्हाईतर रहा बापाकडे. मला तुजी गरज न्हाई.
पंचमीला म्हायेरी आले. नाना पैस्याची गोस्ट काढीनात. तवा जीवाचा धडा करून मायीला समदं सांगितलं. तसी तीच माज्यावर उपसली. म्हनाली, "तुजं लगीन करताना आमी पार डोक्यापरवर बुडालो. आजूक रीण फिटणार न्हाई चार वरसं. दोन डिरेसाच्या दोन शेवंत्या केल्या. त्याला दोन हज्जार लागल्ये. तुजा नवरा तवा बी रुसला 'भारीची पॅन्ट पाहिजे' म्हनून. सासूला चारशेचं पोट झाकणं घेतलं. येवड्यानंबी त्याचं थोबाड भरलं न्हाई म्हणून माज्या शिरूला त्याच्या आजानं दिलेली सा माशाची पिवळीधम मुदी दिली. आता आजूक काय हाय ग? आमी एक पैसा दिऊ शकत न्हाई. पुडचं नुको का पहाया? तू कशी बी तुज्या मानसांची समजूत घाल. आता तुझं घर ते. हितं धर्मानं ये. जमल तसी चोळीवांगडी करू. कवाबवा पातळ घिऊ. पन त्या तीन हजाराची बात पुन्ना काडायची असंल तर हितं येऊ नकस."
काय वाटलं असंल माज्या मनाला? जागच्या जागी जिरून गेल्यागत झालं. धोब्याच्या कुत्र्यावानी गत. ना माहेरची ना सासरची. मला माहेरचा घास गोड
वाटंना. त्या परीस सासूचं वरवटं बोलनं, डागनं बरं वाटाया लागलं. ते निदान हक्काचं होतं.
मी अशी रित्या हातानं परतले. तशी सासू फुगून तट् झाली. नवऱ्यानंबी रातच्याला पाला वरवाडावा तशी वरवाडून पलंगाच्या सळीनं त्याचा जीव भरूस्तो मारलं. सकाळी मामासाब म्हनले की माहेरी नेऊन घालतो. तशी मला कुठून बळ आलं की, कधी न्हाई ती थेट त्यांच्या समूर आले नि बोलले, "मी माहेरी जायाची न्हाई. लगीन झालं तसा माजा तितला शेर संपला. हितं शिळंपाकं घाला. पर माहेरी धाडू नका." तवापासून तर हाल वाढले. मरेस्तो काम करायचं. शिळंपाकं खाऊन निजायचं. जणू मी अंधारातून चालतेय, नि दिवस उजाडतच न्हाईये असे ते दिवस. झापडं लावलेल्या बैलागत घाण्याभोवती फिरत होते. पन इतकं करून बी त्यांना चैन पडना. माज्या नवऱ्याला दुसऱ्या लग्नाचा शौक चढला. सासूला नव्या पोट झाकण्याच्या लुगड्याची हौस आली. सासरा मवाळ होता. पन त्याचं कोन ऐकणार?
एकदीस रातच्याला जागी झाले तर नवरा भुतासारचा समोर. मला वढतोय. सासू ढकलतेय. सासूनं माज्या पदरात दगडधोंडे भरले. मी वरडतेय… वरडतेय. पन कोनाला ऐकू जाणार? भवताली काळूख नि हुबं रान. मरणाची भीती अंगभर सरसरून गेली. एरवी मी मरनाला इनवायची, "ये नि सोडीव बाबा. पन जवा परत्यक्ष मरन समोर आलं तवा जगावंसं वाटलं. जीव फडफडला. जोरानं हाताला हिसडा देऊन सुम्म उसात शिरले. श्वास रोखून गपचीप पडून हाईले. "थांव, बॅटरी आनतो. बघू कशी सापडत न्हाई ते!" असं म्हणत नवरा झोपडीकडे गेल्याची चाहूल लागली नि मी ऊर भरून श्वास घेतला. अडूशा अडूशानं, वाट फुटल तशी चालत ऱ्हाईले. पहाटेला सडक लागली. कोंचीतरी रातीची यस्टी येत असावी. वीडाला जानारी. हात दिला तशी थांबली. बिचाऱ्यानं पैसं न्हाईत म्हटल्यावर पुडच्या ठेसनाला उतरावून बी दिलं. त्या ठेसनावर दिसभर उपासपोटी बसून ऱ्हाईले. रात झाली तशी पुन्ना भ्या वाटलं. दोन हालकट मानसं सारकी माज्या पुढून येजा करीत व्हती. येकानं तर धा रुप्याची नोट बी दावली. तशी डोईवरचा पदर पुडं घेऊन वसून ऱ्हाईले. मग मातर लई रडाया याया लागलं. वाटलं मरताना जीव जरा धुसमटला असता. पन आता पुढं काय वाढून ठिवलंया? रातच्याला
मला उतरवून देणारा कंडक्टर परत आला. त्यानं मला बघितलं. जवळ आला. विचारपूस क्येली. काय बोलनार मी? पण त्यानं जाणलं. म्हणाला माज्या मायभैनीसारखी आहेस. जेवू घातलं. सोवताच्या घरी न्येलं. वैनीला घेऊन दिदीच्या संवस्थेत मला आणून घातलं.
मी आता एकली न्हाई. सरू, शेनाझ, पद्मीन समद्या हितं रहातो. शिवण शिकलो, लिवायला शिकतो. सायकलीचं पंचर काढाया शिकलो. मी सायकल वी खेळू शकती आता. सायकलीवर बसलं की वाटतं आपन वाऱ्यावर बसून राज कराया लागलोत. तर जाऊ दे.
आता डोसक्यात बरंच उजाडायला लागलंय. तुमी समद्यांनी आमाला आमच्या पायावर हुबं रहायला मदत करावी ही माजी हात जोडून इनंती."
मी खाली बसले नि दिदीकडं पाहिलं. दिदीचे डोळे भरभरून आलेवते. त्यांनी माजा हात घट्ट धरून ठिवला. आतून दाबला.
सरू मी काई हितं कायमची ऱ्हानार नाही. हितं शिकनार आणि गावोगाव हिंडून समद्या बायांना सांगनार-
"वायानो, आपुन जनावरं न्हाई. जितं जागतं मानूस हाय. आता कुत्र्यावानी दिल्या भाकरीवर जगायचं न्हाई. मानसासारखं जगायचं. उद्योगधंदा करायचा. नवऱ्याला, मुलाबाळांना प्रेम द्यायचं. पन त्यांच्या श्या खायाच्या न्हाईत. त्यांचा हात धरून फुडे… फुडे....जायचं."