दत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता
आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा ।
सद्भावें पूजिता पावसि वारुनि ह्रत्तापा ॥ धृ. ॥
स्वरुप गुरुचें वर्णन करण्या मति नाही मजला ।
पाय तुमचे श्रीगुरुदत्ता लाजविती कमळ ॥
वर्तुळ गुल्फ सुंदर रम्य दिसती नेत्राला ।
कटिस्थित ती कौपिन शोभे अघटित गुरुलीला ॥ १ ॥
अरुणोदय सम छटि शोभवी श्रीगुरुमूर्तीला ।
हीच प्रसवली मिष्ट अन्न बहु कौतुक सर्वाला ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रही तुष्टविलें त्याला ।
अतृप्त ऎसा कोणी प्राणी ग्रामिं नाहीं उरला ॥ २ ॥
दंडकमंडलु शंख चक्र आणि पद्म गदा हस्तीं ।
जटा मुकुट मस्तकीं कंठीं माळा शोभती ।
कुंदरदन हे बिंब फळासम ओष्ठ विलसती ।
ऎसीं श्रीगुरू त्रैमूर्ती अति सुंदर मूर्ती ॥ ३ ॥
नवस करुनी धनकरि वेगें उदिमाप्रति गेला ।
तव कृपेनें उदीम वाढुनि लाभ तया झाला ॥
परतुनि येता द्रव्याशेने तस्करिं वधियेला ।
संकट जाणुनि वधुनि तस्करां उठवीलें त्याला ॥ ४ ॥
अन्न भक्षितां विप्रापोटी चाळविला शूळ ।
दु:खें तळमळ करुनि प्राणत्याग दुर्बळ ॥
आपण जवळी आणविसी तूं द्रवुनी दयाळ ।
अन्नचि औषध देउनि शूळा हरिही तत्काळ ॥ ५ ॥
संततिसाठी वंध्या नारी प्रार्थितसे तुजला ।
कन्या पुत्र देउनि तींतें हरिसी दु:खाला ॥
श्वेत कुष्ठि तो ब्राह्मण धांवत स्वामींपुढें आला ॥
शुष्क काष्टाद्रुम निर्मुनि निर्मळ करिसी तयाला ॥ ६ ॥
कोल्हापुरिंचा द्विज पुत्र तो अज्ञ अपवित्र ।
जिव्हा छेदुनि भुवनेश्वरिसी स्तवित अहोरात्र ॥
चौदा विद्या देउनि त्यातें करिसी सुपतित्र ।
त्रैमूर्तीचा महिमा अपार अघटित गुरुसूत्र ॥ ७ ॥
त्रिविक्रमानें दांभिक म्हणुनि केली तव निंदा ।
विश्वरुप या दाउनि गर्व हरिला गोविंदा ॥
पतितामुखिं तूं सामर्थ्याने बोलविशी वेदा ।
वांझ महिषिला दोहुनियां तू प्राशियले दुग्धा ॥ ८ ॥
दिपवाळीचे दिवशीं स्वामी अष्टरुप होसी ।
अष्टगृहांसी जाउनि प्रेमें भिक्षा तूं घेशी ॥
गाणगापुरिंच्या शुद्रे स्तवितां प्रसन्न तूं होशी ।
शेती त्याच्या सहस्त्रपटिने धान्यपीक देशी ॥ ९ ॥
ऎसा अपार गुरुमहिमा हा वर्णु मी कैसा ।
भक्तरक्षणा अवतरलासी श्रीगुरु सर्वेशा ॥
नरहरि दत्ता स्वामी समर्था पावे जगदीशा ।
मोरेश्वरसुत वासुदेव दिन तारी या दासा ॥ १० ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |