दत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो


जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो ।
तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥धृ०॥

जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो ।
कर जोडुनियां नमितों सहस्त्र वेळां, या अवतारा हो ।
जैशा दिनकरउदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो ।
तैशा अपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो ।
तूं स्मरगामी स्वामी विटलों या मी तापत्रया हो ॥१॥

तूं महायोगी अर्धांगस्त्रीधारी हे मदनारी हो ।
तूं नट नरनारायण नारायणि नर तूंचि नारी हो ।
तूं रघुवीर, श्रीनरहरी, हिरण्यकश्यपुहृदयविदारी हो ।
ब्रह्मचारी तूं ब्रह्मचि, राधाकृष्ण जय कुंजविहारी हो ।
तूं दाता, तूं त्राता, तूंचि विधाता, मुनि आत्रेया हो ॥२॥

तूं भक्तां कित जैसी जैसी भक्तीधची भावना हो ।
तैसी तैसी करणी करणें पडे तुज जगजीवना हो ।
जिकडे पाडस अळवी तिकडे हरणी धांव घे वना हो ।
उदंड देसी परंतु प्रसाद पदरीं मज घेवेना हो ।
विश्वदरुपासी पाहाया करि पार्थापरि सुपात्र या हो ॥३॥

प्रसन्नवदन सुशोभित कोमल घननीळ तनु साजिरी हो ।
जटा-मुकुट कुंडलें माळा पीतांबर भरजरी हो ।
केशरी गंध सुचंदन पुष्पें तुलशीदल मंजरी हो ।
दंड कमंडलुमंडित कृष्णाजिन डमरु खंजिरी हो ।
आनंदघन स्वरुपाला देवा कधीं पाहतिल नेत्र या हो ॥४॥

सद्‌गुरु माउलि, कृपेचि साउलि धरि तूं दयाळु गडे हो ।
ये आई म्हणतां येसी लगबग नेसुनिया लुगडें हो ।
जरि झांकिसि तूं एवढें मातें बाळ तुझें उघडें हो ।
विष्णुदास म्हणे तरि झडतिल कीर्तीचे चौघडे हो
उदंड कविच्या वदनीं सतत वाजतील वाजंत्र्या हो ॥५॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.