दुःखहरण

डॉ. सुनीलकुमार लवटे








दुःखहरण

(वंचित कथासंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर- ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ 00 ९३ drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in


दुसरी आवृत्ती २०१८


© डॉ. सुनीलकुमार लवटे


प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com


मुखपृष्ठ
गौरीश सोनार


अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी


मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर


मूल्य १७५/- 










या कथांतील

सर्वांच्या शर्थीच्या

संघर्षाला...







ऋणनिर्देश


लेखनसंधी
• दैनिक प्रहार, मुंबई • आल्हाद गोडबोले (संपादक)
• राम जगताप (फीचर एडिटर) • दैनिक सकाळ, नाशिक.
प्रकाशन
• अक्षर दालन, कोल्हापूर
प्रस्तावना
• डॉ. रणधीर शिंदे
रेखांकने
• सागर बगाडे, सार्थक क्रिएशन्स, कोल्हापूर




प्रस्तावना

 हादरवून टाकणाच्या जगाचे अंतर्भेदी दर्शन
 कोणीतरी रडतंय
 मघापासून
 कोणीतरी रडत होतं
 रात्रभर कोणतरी रडत बसलंय
 युगानुयुगे

     - अरुण कोल्हाटकर


 ‘खाली जमीन वर आकाश' या बहुचर्चित आत्मकथनामुळे सुनीलकुमार लवटे हे नाव मराठी वाचकांना मोठ्या प्रमाणात परिचित झालेले आहे. याबरोबरच त्यांची महाराष्ट्रीय समाजाला वेगळी ओळख आहे. कोल्हापूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सक्रिय काम केलेले आहे. हिंदीचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. विशेषतः बालसंकुल कल्याण संस्थेत तसेच निराधारांच्या कामासाठी त्यांनी महाराष्ट्र पातळीवर काम केलेले आहे. याशिवाय वि. स. खांडेकर यांचे बरेचसे अप्रकाशित साहित्य प्रसिद्धीस आणले आहे. कामाची सततची अखंड ऊर्जा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. विधायक अशा समाजबांधणीला ते नेहमी आपल्या कामातून महत्त्व देत आलेले आहेत. पंधराएक दिवसापूर्वी त्यांनी फोनवरून विचारणा केली, “माझे दुःखहरण हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यासाठी तुला प्रस्तावना लिहायची आहे." मी आकस्मिक गडबडलो व काहीसा अवघडलोही; परंतु ते ज्या पद्धतीने ठामपणाने सांगत होते, त्यामुळे काहीसे संकोचून मी ही जबाबदारी स्वीकारली.
 सुनीलकुमार लवटे यांचे या ग्रंथातील लेखन हे प्रामुख्याने दै. प्रहारच्या रविवार आवृत्तीतून प्रसिद्ध झाले आहे तर काही दै. सकाळ मधून प्रसिद्ध झाले आहे. लवटे यांना त्यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तीसंबंधीचे हे लेखन आहे. ते दीर्घकाळ या सामाजिक समस्याग्रस्त जगाशी निगडित राहिले आहेत. प्रत्यक्ष त्यांनाही या जगाचे चटके सहन करावे लागलेले आहेत.
 तसे पाहिले गेले तर भारतीय समाज फार गुंतागुंतीचा आहे. या समाजरचनेत अनेक ताण आणि तणाव आहेत. वर्ग आणि वर्णभेद आहेत. या समाजात मोठ्या प्रमाणात बेदखल असे वंचितसमूह आहेत. दुःखहरणचा मुख्य विषय आहे तो म्हणजे वंचितांचे जग. हे वंचितांचे विश्व अर्थात चहुबाजूचे. ते केवळ आर्थिकच नाही तर विविध तव्हेचे आहे. मनुष्यपण हिरावून घेतलेल्या माणसाचे जग या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. लवटे यांनी या लेखरूपांना वंचित कथांचा संग्रह म्हटले आहे. इतर वंचित, शोषितांना स्वसुरक्षिततेचा काही ना काही आधार व जगण्याची काही ना काही शाश्वती असते. तसे या पीडित-वंचित निराधार माणसांना कशाचीही शाश्वती व स्थिरता नसते. सर्वार्थाने ते निराधार असतात. चहूबाजूने उस्कटलेले, विसाव्याचे काहीच ठिकाण नसणाच्या समूहसंवेदनेचा आविष्कार या लेखनात आहे.
 मराठी साहित्यात विविधक्षेत्री अनुभवाचा प्रवेश फारसा झालेला नव्हता. १९६० नंतरच्या काळात मात्र महाराष्ट्राच्या विविध भूप्रदेशातील तसेच अज्ञात सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचे प्रकटीकरण काही प्रमाणात झाले. मात्र अजूनही मानवी जीवनाची अनेक अलक्षित जीवनक्षेत्रे प्रतिभावंतांच्या नजरेच्या टप्प्याबाहेर आहेत. त्यापैकीच वंचितांचे हे एक जग आहे. मानवी व्यवस्थेचे बळी ठरलेले हे जग मराठी लेखनातून फारसे आविष्कृत झालेले नाही.
 प्राचीन काळापासून असा वंचित समूह जगभरात पाहायला मिळतो. त्यांच्या अस्तित्वाची दखल ना समाजाने घेतली, ना शासकांनी घेतली, ना लेखक-कलावंतांनी. ते जसे आपल्या समाजकक्षेच्या परीघाबाहेर राहिले तसेच ते अभिजनांच्या लेखनप्रकल्पाच्या बाहेर दुर्लक्षितच राहिले. एका बाजूला वंचित समूह हा नेहमीच उपेक्षेचा, हेटाळणीचा विषय राहिला आहे; तर दुस-या बाजूला एका सीमित वर्गाच्या दृष्टीने तो दयाबुद्धीचा व कोरड्या सहानुभूतीचा राहिला आहे.
 ‘दुःखहरण' या संग्रहातील कथांत विविध त-हेच्या पीडित व्यक्तिरेखा आहेत. ज्यांचा भूतकाळ काळोखमय होता आणि वर्तमान अडथळ्याचा आहे. मात्र त्यांची भविष्याकडे जाण्याची सकारात्मक धडपड चालू आहे अशा माणसांच्या या कथा आहेत. वंचित जगातील अनेक प्रकारची माणसे या लेखांचे चित्रणविषय आहेत. क्षणांत चूक घडलेली व गुन्हेगार समजले जाणारे, अपंग, परित्यक्ता, कुमारी माता, शिक्षा भोगणारे, बालसंकुलात निरीक्षणाखाली ठेवलेल्या अनेक व्यक्तींचे जीवनपट या लेखांत आहेत. लहान मुलांपासून स्त्री-पुरुषांपर्यंतचे जग या लेखनात आहे. छिंदवाडा-गोव्यापासून महाराष्ट्रातील विविध भागातील स्त्रीपुरुष या लेखनात आहे. सर्वसामान्यांच्या जीवनकक्षेच्या बाहेरचे अनुभवविश्व यामध्ये आहे. वाचताक्षणी डोके सुन्न व्हावे. आपल्या आवतीभोवती इतके भयावह वास्तव आहे याची दखलही आपल्याला नसते. अशा जगाचे भेदक असे दर्शन या लेखनात आहे. यातील एकेकाचे आयुष्य हे कल्पनेपलीकडचे आहे. हादरवून टाकणाच्या जगाचे हे अंतर्भेदी दर्शन आहे.
 व्यक्तींच्या परिस्थितीशरणतेची मीमांसाही या लेखनात आहे. या व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या विपरीत प्रसंगांची सर्वांगीण चिकित्साही आहे. समाजाच्या पराकोटीच्या नैतिकतेच्या विशिष्ट आग्रहापोटी, चुकीच्या गृहितकांमुळे व समाजभयाच्या अदृश्य सावटाखाली गुदमरणाच्या जिवांचा झगडा या चित्रणात आहे.
 सुनीलकुमार लवटे यांच्या लेखांतील चित्रणविषयाचा लक्षणीय विशेष म्हणजे, ते ज्या वंचित समूहाचे जग चितारतात ते सर्वस्वी अभावाचे, दुःखाचे, अनिश्चिततेचे जग आहे. या माणसांचे जीवनचक्र पराकोटीच्या दुःखचक्राला बांधलेले आहे. दारिद्रय, अनाथपण, वंचना त्यांच्या वाट्याला आलेली आहे. या माणसांच्या जगण्यातील केवळ दुःखाचे, अन्यायाचे करुणेचे ते केवळ चित्रण करीत नाहीत. ही माणसे मोडून पडत नाहीत, सदैव जगण्याला दोन हात करतात. पुन्हा नव्याने आयुष्य उभं करतात. जीवन जगण्याची अदम्य विजीगीषू वृत्ती त्यांच्यात आहे. जीवनावरच्या या आस्थेपोटीच ते अभावाच्या जगाला समांतर पर्याय शोधतात आणि वाटचाल करतात. नैराश्य, उदासीनता, विमनस्कतेच्या गर्तेतून पुन्हा नव्याने जगण्याला कवटाळतात आणि आनंदाने स्वतःच्या जीवनविषयक दृष्टीने आपले मार्ग शोधतात. म्हणून या लेखनातील नायक-नायिका सतत नवे जग आपलेसे करतात. ती केवळ कुढत बसत नाहीत. अशा माणसांच्या या शौर्यगाथा आहेत.
 यातील अनेक माणसे दुःसह अडचणींवर, संकटांवर मात करून यशस्वी होतात. मूकबधीर सचिन आंतरिक ऊर्जेने अपंगत्वावर मात करून बँकेचा मॅनेजर होतो. बहुविकलांग वल्लरी एम. ए. संस्कृत मध्ये पहिली येते. चेह-यावर व्रण असणारी बेबी शिक्षिका होते. शरीरात भिन्नलिंगी झालेले बदल स्वीकारून वासंती नगरसेविका होते. बिपिन शून्यातून करोडपती होतो. अशा निराळ्या जगातील या माणसांच्या यशोगाथा या कहाण्यातून मांडल्या आहेत.
 ‘दुःखहरण'मधील लेखनाला मोठा सामाजिक संदेशही आहे. पराकोटीच्या अभावाच्या जगातून ही माणसे यशस्वी होतात. जिद्द, चिवटपणा व अदम्य इच्छेच्या बळावर ते जीवन तारून नेतात. ‘कोशिश करनेवाले की कभी हार नहीं होती, मैं नही, मेरा काम बोलेगा' यावर श्रद्धा असणा-या माणसांचे हे जग आहे. शून्याचे शतक होतानाचे विश्व या लेखनात लवटे यांनी उभे केले आहे.
 लवटे यांच्या लेखनाचा आणखी एक महत्त्वाचा अक्ष म्हणजे, या चित्रणविषयात अध्याहृत असणाच्या निराधारांविषयी काम करणाच्या संस्थांविषयीचा. वंचितांच्या या जगाला खराखुरा आधारवड असतो तो या संस्थेचा. या संस्था लोकांना आश्रय देतात. सगळ्या जगाने हेटाळलेल्या माणसांची वाढ या संस्थांमध्ये होते. म्हणून या चार भिंतींच्या आतले विश्व त्यांना प्रेममय वाटते. या माणसांत आत्मविश्वास आणि बळ देण्याचे काम त्या करतात. त्यांचे भरणपोषण करतात. उपजीविकेबरोबरच त्यांच्या मानसिक घडणीचाही विचार संस्थांमध्ये होतो. म्हणूनच मला समजून घेतलं असतं तर' मधील नायिका म्हणते, संस्थेत माझं जीवन बदललं. माणूस चुकतो, पण चूक पोटात घेऊन सुधारण्याचा मोठेपणा न समाज दाखवतो न घर. त्यामुळेच संस्था स्वर्ग वाटते ती माणसाला त्याच्या नरकयातनांतून सोडविण्याच्या तिच्या निरपेक्षतेमुळे. बालकाश्रम, अर्भकालय, आधारगृह, अनुरक्षणगृह या संस्था या व्यक्तींना आधार देतात. अनाथांना सनाथ करतात. म्हणून या संस्थांच्या कामाविषयीचा कमालीचा कृतज्ञताभाव या लेखनात आहे.
 या वंचितांचं जग सुसह्य करण्यात या संस्थांचा मोठा वाटा आहे. या संस्थांमधील आजूबाजूच्या सोबत्यांवर त्यांचे मैत्र जमते ते विकसित होते. या संस्था या व्यक्तींना माया देतात, प्रेम देतात. एकमेकांना जगण्याचे बळ देतात. उभे करतात. एका अर्थाने या माणसांना अस्मिता (Identity) देण्याचे काम या संस्था करतात.
 ‘दुःखहरण'मधील लेखनामागे उभ्या असणाच्या जीवनदृष्टीचाही इथे विचार करायला हवा. मानवी जीवनाकडे पाहण्याची एक उन्नत मानवतावादी जीवनदृष्टी यामागे आहे. ती केवळ करुणेची व अकारण प्रदर्शनखोर वृत्तीची नाही. स्वतः लेखक या वंचितांच्या जगातच घडलेला आहे. आपल्या कर्तृत्वाने काहीएक लौकिक प्राप्त केल्यानंतर तो या जगापासून वेगळा झालेला नाही. त्यापासून स्वतःला छाटून घेतलेले नाही. त्यांचा लागाबांधा भूतकाळातील या जगाशी घट्ट बिलगलेला आहे. त्यामुळेच वर्तमानातही त्याचे कृतिशील स्वरूपाचे मानसविश्व त्यांच्या जगाचा विचार करते. त्यात ते आतून सहभागी होतात. आस्थेवाईक ममत्वाने या जगाला ते आपलेसे करतात. त्यामुळेच या माणसांचे जग त्यांनी नेहमीच प्रेरक व विधायक दृष्टीनेच चित्रित केले आहे. मानवी कळवळ्याच्या आंतरिक तळमळीतून ते प्रकटलेले आहे. त्यामुळेच उपेक्षित जीवन लाभलेल्या वंचित जगातल्या दुःखभोगाचे चित्रण हा या लेखनाचा केंद्रवर्ती विषय आहे.
 दस-या जगात काहीच निश्चित असत नाही. निश्चित एकच असतं. परिस्थिती कितीही आकाश फाडणारी असो, आकाशालाही टाका घालण्याची शक्ती, शक्यता सतत एकवटत राहायच्या या प्रयत्नातून हे जीवनचित्रण झालेले आहे.
 लेखकाने हे सारे लेखन ब-याच वेळा तृतीय पुरुषी निवेदनात केले आहे. तो प्रत्यक्ष त्यात सहभागी आहे. मात्र तटस्थपणे मानवी कळवळ्यापोटी केलेले हे निवेदन आहे. तर काही वेळा त्या त्या लेखातील पात्रेच आपल्या मनोगतातून व्यक्त होतात. रुक्मिणीहरणासारखा लेख पहावा म्हणजे ही बाब लक्षात येईल. स्वतःवर ओढवलेल्या घटनाप्रसंगाचे, त्याच्या मानसिक स्थितीचे व दृष्टिकोनाचे प्रकटीकरण या पात्रमुखी निवेदनातून सरस असे उतरले आहे. या विविधस्वरूपी निवेदनात मोठ्या प्रमाणात आत्मपरता आहे. ओघवती कथनशैली आहे. संवाद आहे. हिंदी-मराठी वाक्यप्रयोगांची संमिश्र भाषारूपे आहेत. 'दुःखहरण'मधील व्यक्तिचित्रणात विस्ताराच्या अधिकच्या शक्यता होत्या. मात्र वर्तमानपत्राच्या मर्यादित अवकाशाच्या जागेमुळे त्यांना आटोप प्राप्त झाला आहे. जागेच्या मर्यादेमुळे ती अधिकाधिक बंदिस्त केली गेली आहे. या संग्रहातील सर्वच लेख व्यक्तीविषयक असल्यामुळे या सा-या शक्ती ठळकपणे अधोरेखित झाल्या आहेत. त्यांच्या बाह्यवर्णनाबरोबरच विशेषतः परिस्थितीच्या गडद सावटाखाली वावरल्यामुळे होणारी त्यांची घुसमट प्रत्ययकारीरित्या साक्षात झाली आहे. त्यांच्या दुःखाच्या, अभावाच्या जगापासून ते लढायापर्यंतचा कणखर प्रवास साकार झाला आहे. पंढरपूरच्या आश्रमातील वयोवृद्ध लक्ष्मीबाईसारख्या अनेक व्यक्ती या लेखनात आहे. तिचे दररोज शंभर-दोनशे भाकया बडवण्यापासून ते आश्रमातील साच्या मुलींना न्हाऊ घालण्यातील तिची मनःपूर्वकता फार वेधकपणे साकारली गेली आहे.
 या लेखनाचे मोल सामाजिकदृष्ट्या फार महत्वाचे आहे. आपल्या समाजाची या वंचिताच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी फारशी निकोप नाही? ती काहीशी दुषित आहे. या माणसांना आम्ही मनुष्यत्वाची वागणूक देत नाही. लेखनातील हा संदेश या वाचनाची महत्त्वाची फलप्राप्ती आहे की ते या जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी करून देते. वाचक या लेखनसंस्काराने आतून बदलतो. आधीचे संस्कारठसे पुसले जातात. त्याच्या जीवनभानात फरक पडतो. निकोप समाजमन वाढीसाठी या प्रकारचे लेखन उपयुक्त ठरते. समाजशिक्षणासाठी या लेखनाचे महत्त्व फार आहे. म्हणूनच लेखकाने म्हटले आहे की ‘नवसमाजरचना व नवसमाजमन तयार करण्याच्या प्रयत्नातील हा एक खारीचा प्रयत्न आहे. समाज जसा कृपण आहे तसाच तो कृतज्ञही आहे. निराश्रितांना आधार मिळावा. त्यांची माणूस म्हणून प्रतिष्ठापना व्हावी. यातून सुजाण समाज घडावा अशी कळकळीची भावना यामध्ये आहे. उद्याच्या सुंदर दिवसासाठी हे एक प्रकारे समाजाचे समुपदेशनच आहे.
 एकंदरच सुनीलकुमार लवटे यांच्या ‘दुःखहरण'मधील व्यथाकथा वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. वंचितांच्या, पीडितांच्या शोकात्मकथा आहेत. तसेच दुर्दैवशरण माणसांच्या लढाईच्या कहाण्या आहेत. जगण्याविषयीच्या ओढीने ते परिस्थितीवर स्वार होऊन यशस्वी होतात. बिंदू-बिंदूतून सिंधू शोधण्याची ही दृष्टी आहे. या माणसांच्या जगण्यातील दुःखहरणाची जीवनदृष्टी यामध्ये आहे. समाजमीमांसा आहे. या सत्यकथेमागे दडलेल्या कारणाचा शोध आहे. आणि लेखकाच्या दृष्टीने तो आपणच गुजरलेल्या आयुष्याचा तो पुनर्णोध आहे. या पुनर्णोधाच्या अनेक वाटा या कथांमध्ये आहेत. निकोप समाजमनाच्या घडणीसाठी या प्रकारच्या लेखनाची उपलब्धी मराठी विचारविश्वाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे.

- रणधीर शिंदे

मनोगत


 अन्यायाचा वेताळ उतरावयाचा असेल तर...
 तुम्ही सर्वसामान्य माणसं ज्या जगात जगत आहात, ते एक जग आहे. तुमच्या जगात सर्व कसं सुखकर, सुखद असतं. तुमचा सूर्य रोज नव्या आशा, आकांक्षा, संधी, सुविधा घेऊन उगवतो. तो रोज नवं सुख शिंपडत तुमचं जीवन आज आहे त्यापेक्षा उद्या अधिक सुंदर कसं होईल ते पाहात असतो. तुमच्या जगात नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्र सारे असतात. शिवाय जगणं सुसह्य करणारी जात, धर्म, वंश परंपरा, चालीरीती, घराणं, नाती, सण समारंभ, उत्सव सा-यांनी कसं तुमचं जीवन जगावं असं होत असतं. जमीन-जुमला, घर, स्थावरजंगम, दाग-दागिने, घर, वाडे, शेती, सारं तुमचे पूर्वज तुमच्यासाठी साठवून ठेवत असतात अन् ते सारं तुम्हाला लीलया, आपसूक, पैतृक, मातृक, वांशिक संपत्ती म्हणून लाभतं. तुमच्याभोवतीचं तुमचं जग तुम्हाला तुमच्यासारखं दिसतं, असतं, असावंसं वाटतं. यात गैर काहीच नाही. कोण कुंतीसारखं ‘मला दुःख दे' म्हणून वरदान मागेल?
 या तुमच्या जगाशेजारीच दुसरं, निराळं जग जगतं आहे. या जगात काही माणसं जगत राहतात, एक नाइलाज म्हणून त्यांच्या जीवनातला सूर्य रोज काळरात्र घेऊन जन्मतो. या लोकांना नातेवाईक असतातच असे नाही. असले तर ते या लोकांच्या विशिष्ट सामाजिक संकटांमुळे विश्वामित्र होतात. ही माणसं जे वंचित, शापित, उपेक्षित, कलंकित, दुर्लक्षित जीवन जगतात त्याला प्रत्येक वेळी तेच जबाबदार असतात असं नाही. ब-याचदा तरी त्यांचा कसलाही दोष नसताना केवळ समाज परंपरेचे बळी म्हणून त्यांना कलंकित जीवन जगावं, भोगावं लागतं. अनौरस, अनाथ मुलंच घ्या ना, त्यात त्यांचा काय दोष असतो? या निराळ्या जगात आवती-भोवती त्यांच्यासारखीच माणसं असतात. जग असतं. पण सर्वस्वी तुमच्यापेक्षा भिन्न. माणसं असतात पण ते त्यांचे कोणीच नसतात. नातं असतं ते क्षणिक, मानलं तर अन् मानेपर्यंतच! जग असतं पण असह्य. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे-
 ‘‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत.
 सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत"
 अशीच स्थिती. एकही धागा सुखाचा नसतो. रोज आत्महत्या करावी असं भोवतालचं विश्व! ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशीच परिस्थिती रोज नवं अरिष्ट घेऊन येत असते. सतत चिंता, काळजीचे काळे ढग भरलेलेच! निरभ्र आकाश एक दिवास्वप्नच! निराळ्या जगातील निराळी माणसं, त्यांच्या जीवनकथा, संस्था, कार्यकर्ते पाहात मी साठ वर्षं मागं टाकली तरी तेच जीवन, तीच माणसं, तशीच दुःखं, संस्था सारं कसं जैसे थे. जुनं जग नवे प्रश्न घेऊन जन्मत राहतं. सुटका, मुक्ती ती नाहीच कशी!
 • ‘मी कुमारी माता झाले. सर्वच दोष माझा कसा? शिक्षा मलाच का? तो विश्वामित्र नामानिराळा, उजळ माथा घेऊन फिरतो तरी तो संभावित? मी मात्र पाय घसरलेली. तो सतत सावरत सुरक्षित!
 • ‘मी अनौरस म्हणून जन्मलो म्हणून आयुष्यभर अनाथ, उपेक्षित, कलंकित जीवन जगायचं? जगायचं ते पण आयुष्यभर ‘दुय्यम माणूस म्हणून का? तुमच्यासारखाच जन्मलो ना पण मी? मग मी वेगळा कसा? केवळ तुम्ही म्हणता म्हणून? नैतिकतेच्या तुमच्या कल्पना... आग लागो त्याला! माझा ‘सोशल डी. एन.ए.' तुम्ही ठरविणारे कोण? तुमचा सोशल डी.एन.ए. मी मागितला तर? आहे खात्री त्याची? का फक्त तुम्ही म्हणता ते प्रमाण. हा सामाजिक न्याय आहे का ते फक्त मला सांगा.
 • ‘मी अपंग म्हणून जन्मले. प्रत्येक पाऊल उचलायला तुमच्यापेक्षा जास्त कष्ट लागतात मला. तुमची व माझी बरोबरी कशी होणार? मला नको सवलत, सुविधा, संधी, साहाय्य?
 • ‘मी अंध, अंधाराशिवायचं सुंदर जग मी पाहूच नाही शकत. पावलागणिक ठेच ठरलेली! माझं शिक्षण, जगणं, जग वेगळं, निराळं नको का?
 • ‘आम्हाला बाळ होत नाही यात आमचा काय दोष? बाळ होणं जितकं नैसर्गिक तितकं न होणं पण ना? मग आम्हाला बाळ घ्यायला इतका त्रास का? अनाथ बाळ सहज नको का मिळायला? तो नाही का आमचा हक्क? अन् त्या बाळाचाही!  • 'मी मूक-बधिर, मतिमंद, गतिमंद, अस्थिव्यंग, विकलांग... मला नको विशेष सुविधा, उपचार, संधी?
 • 'मी पोलीस, निरीक्षक, न्यायाधीश, जेलर. आम्ही तुमच्यासारखे सहृदय असतो. पण ते पद, जबाबदारी आम्हास तसं वागायला भाग पाडते. ते आमचं कर्तव्य असतं. फाशी सुनावणं व देणंही आमचं कर्तव्यच! तुम्ही हे केव्हातरी एकदा समजून घ्या.
 • “मी परित्यक्ता म्हणून जीवन जगते यात जर काय माझा काही दोष असेल तर माझं स्त्री होणं, स्त्रियांनी का नि किती सहन करायचं? त्याला काही मर्यादा? पुरुष होणं म्हणजे अत्याचाराचा परवाना का? पोटच्या गोळ्यासाठी सहन करते म्हणजे मी अपराधी ठरते. याला का समाज न्याय म्हणायचा? हे केव्हा थांबायचं? थोपवायचं कुणी?"
 हे वंचितांचं विश्व तुमच्या जगापेक्षा वेगळं असलं तरी ते तुमच्याच जगाचा एक भाग असतं. ते जग तुम्हीच निर्माण केलंय. त्याला त्यांच्याइतकेच तुम्हीही जबाबदार आहात. ते तुमच्याच जगाचं अभिन्न रूप! पृथ्वीचा उपग्रह चंद्र असतो. तसंच चंद्राला डाग असतात म्हणे? चंद्रावर जाऊन बघा. पृथ्वीवरही डाग दिसतात. कोणतंच जग निराळं नसतं. जग जग असतं. माणसं माणसं असतात. हे एकदा का आपण समजून घेतलं की आपपरभेद संपला म्हणायचा! पण अजून तरी तसं घडत नाही, म्हणून निराळं जग जन्मतं अन् माणसं निराळी होतात.
 ‘दुःखहरण'मध्ये वंचित विश्वाचं सम्यक दर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे. हे काही मुद्दाम त्यासाठी लिहिलं नाही. सन २०१० च्या शेवटाला केव्हा तरी दैनिक 'प्रहार', मुंबईची रविवार पुरवणी ‘कोलाज'चे संपादक मित्र राम जगताप भेटले होते. गप्पांच्या ओघात वंचितांच्या प्रश्न व समस्यांचा विषय निघाला. ते सहज म्हणाले, “तुम्ही 'कोलाज'साठी यांच्याबद्दल एका सदरात सविस्तर नि सलग का लिहीत नाही?" मी अनवधानाने 'हो' म्हटलं. त्याचं एक कारण होतं. मी निवृत्त होणार होतो. सदरासाठी जी उसंत लागते, ती मिळेल असं वाटलं. पण झालं उलटंच. निवृत्त झाल्यावर मी कामात अधिक बुडालो. सदर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ चालवू शकलो नाही.
 ते सदर सुरू होऊन महिनाही झाला नसेल, लोकवाङ्मय गृहाची एक बैठक होती. त्यात याचं पुस्तक व्हावं असं सुचवण्यात आलं. त्यालाही दोन वर्षं उलटून गेली. लेखांना पुस्तकरूप देण्यासाठी व वंचितांचं विश्व सम्यक उभं रहावं म्हणून नंतरच्या सहा महिन्यांच्या काळात सदरासाठी लिहायच्या विषयांची मी यादी करून ठेवली होती. दरम्यानच्या काळात त्या अनुषंगाने अधिकचं लेखन केलं. सन १९९३ मध्ये दैनिक सकाळ, नाशिकसाठी ‘आभाळ पेलताना...' सदरात सहलेखन केलं होतं. त्याची शैली आत्मकथनात्मक होती. त्यातीलही काही लेखन यात समाविष्ट आहे. नावे इ.त बदल न करता आहे तशी देऊन त्या सत्यकथा म्हणूनच सरळ सांगितल्या होत्या. त्या सर्वांचे एकत्रित रूप म्हणजे वंचित कथांचा हा संग्रह ‘दुःखहरण'. यात मी उपेक्षित जीवन लाभलेल्या वंचित जगातल्या दुःख भोगणाच्यांची रामकहाणी सांगितली आहे. पण त्या रडकथा नाहीत. असेलच तर त्या माझ्यासाठी शौर्यगाथा, पुरुषार्थ कथा होत. यातल्या काही चरित्रांचे जीवन; त्याचा शेवट शोकात्म असेल. परंतु लढाई हरूनही एखादा योद्धा 'वीर' ठरतो अशी चरित्रं यात आहेत. वेगवेगळ्या शैलीत त्या सादर केल्या असल्यानं वाचनीय ठराव्यात. पण त्यापेक्षा जर त्या तुम्हास अंतर्मुख करतील, वंचितांचं जीवन सुखद व सुसह्य व्हावं म्हणून कृतिप्रवण करतील तर मला अधिक आनंद होईल.
 वंचित विश्वातील ह्या माणसांच्या तव्हा पाहाल तर तुम्हास आश्चर्य वाटेल. असं जीवन असतं का एखाद्याचं? हे सोसायचं बळ येतं कुठून? यातल्या साध्या कथा, पात्रं सत्य आहेत. काही ठिकाणी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून नाव, गाव, प्रसंग बदललेत. पण त्यातलं सारं जग सत्यच! तुरुंगातले कैदी, त्यांचं भावविश्व, त्यांचे समर प्रसंग, घालमेल, आयुष्यभराची अस्वस्थता सारं वाचताना तुम्हाला वाटत राहील की तासभर डोकं दुखलं तर नकोसं होतं आपल्याला. ही माणसं आयुष्यभर डोक्यात एखाद्या विषयाचा भुंगा नि पिंगा घेऊन जगतात कसे? कोणती झिंग असते त्यांच्या जगण्यात? तेच असतं त्यांचं निराळेपण! जन्म दिलेल्या मुली हरवतात. अज्ञानामुळे शोध घेणं होत नाही. शोध लागतो तेव्हा त्या दत्तक गेलेल्या असतात. मग जन्मदाती त्या धक्क्यानं आयुष्यभर वेडीपिसी. काय असतं एखाद्याच्या पानात वाढून ठेवलेलं? अशा तेवीस एक कथांतून, चरित्र नायक, नायिकांच्या निराळ्या जग-जीवनातून अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, अंध, अपंग, मतिमंद, बहुविकलांग, मूक, बधीर, कुमारीमाता, वेश्या, परित्यक्ता, प्रताडित भगिनी, विधवांचं एक निराळं जग हा कथासंग्रह आपल्यापुढे उभे करतो.
 हे नवं, निराळं आयुष्य समाजापुढे सामाजिक न्यायाचे नवे प्रश्न विचारतं. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांच्या प्रवासात या वंचितांना आपण माणूसपणाचा चेहरा बहाल करू शकलो नाही. आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्राचे अधिकारी, हक्कदार होऊ न शकलेली ही माणसं... त्यांना तुम्ही कोणत्या आधारे भारतीय नागरिक ठरवणार? ज्यांना काहीच नाही त्यांना सर्वकाही' हाच खरा सामाजिक न्याय नाही का? जात, धर्म, वंश समाजात दच्या निर्माण करतात, समाज उतरंड तयार करतात. त्यापेक्षा सामाजिक स्थितीच्या आधारावर वंचितांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याची सकारात्मक सामाजिक न्यायाची वाट धरणार की आरक्षणाद्वारे विषमता निरंतर ठेवत मतांची राजकीय बांधणी करत राहणार? दलित, स्त्रिया, वंचित, उपेक्षित सारेच समान गरजू समजून त्यांना माणूस बनवण्याचा कार्यक्रम जोवर आपण हाती घेणार नाही तोवर समाज एकसंध होणार तरी कसा नि केव्हा? जात, धर्मनिरपेक्ष विकासच देशास पुरोगामी बनवू शकतो हे केव्हा तरी छोट्या-छोट्या स्वार्थापलीकडे जाऊन आपण समजून घेऊन कृतिकार्यक्रम ठरवायला नको का?
 ‘दुःखहरण'मधील वंचितांच्या वेदना समाजास जोवर विकल करणार नाहीत तोवर हा समाज संवेदी आहे असं मानणं म्हणजे फसगत करून घेणं आहे. यातला रियाज आमिषाला बळी पडतो त्याचं कारण दारिद्र्य नि संधीचा अभाव, जमीरा पोटच्या गोळ्यांना मुकते ती शिक्षण न मिळाल्यानं. सुनंदा नि महेश पोटचं पोर घाटात टाकतात ते समाज त्यांचं खरं प्रेम स्वीकारत नाही म्हणून नि समाजाच्या जात, पात, प्रतिष्ठा, नैतिकतेच्या भ्रामक कल्पनांमुळे. समाजाचे खरे गुन्हेगार माणसं नसून बुरसटलेले विचार व परंपरा होत, हे आपण केव्हा गळी उतरवणार? घसरलेला पाय सावरावा म्हणून प्रयत्न करणारी बिंदू... झाकल्या कोंबड्यांचा चोरटा रोमान्स वैध नात्याची ढाल किती दिवस सहन करणार? तेच ‘रुक्मिणीहरण' मधील तुकारामाचं? लैंगिक उद्गार नैसर्गिक! त्यांना नैतिकतेच्या भिंती थोपवू शकत नाहीत हे पुराण कथांपासून सिद्ध झालं तरी आपण हेका नाही सोडणार! प्रकट नि चोरट्या शरीरसंबंधाबाबत तुम्ही जितक्या लवकर युरोपसारखे उदार व्हाल तितक्या लवकर घरा-घरांतील ‘कुमारसंभव' कमी होतील. हे आपण अभिनिवेश, अहंकार, मानभावीपणा सोडून वस्तुनिष्ठ पद्धतीनं पाहणं यातच समाजशास्त्रीयता नाही का? समाजातलं अनौरस होणं, कुमारी माता होणं थांबायला नको का? ते सामाजिक प्रागतिकतेशिवाय कसं शक्य आहे? लिंगभावच तृतीय पंथ निर्माण करतो ना? स्त्री-पुरुष भेदापलीकडचा माणूस समाज हेच त्याचं उत्तर नाही का? अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर मुलांना आपण अजून किती वर्ष छळत राहणार ? यातील वल्लरी, सचिन, भारत, संगीताच्या कथा हाच प्रश्न विचारतात ना? उत्कर्षाच्या सूर्योदयाची वाट वंचितांनी आयुष्याचा सूर्यास्त होईपर्यंत का पाहायची? का रोज सोसायचं? हे प्रश्न मित्रांनो, तुम्हास जोवर अस्वस्थ करणार नाहीत तोवर या कथा समाजमनाचा पिच्छा पुरवत राहतील. समाजाच्या पाठकुळीवरचा छळ, विद्वेष, उपेक्षेचा पाठलाग जोवर संपणार नाही तोवर अन्यायाचा वेताळ उतरणार नाही, याची खूणगाठ बांधणा-या या कथा म्हणजे नवसमाज रचना व नवं समाजमन तयार करण्याच्या प्रयत्नातील एक खारीचा प्रयत्न होय. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

 १ मे, २०१३

 महाराष्ट्र दिन

डॉ. सुनीलकुमार लवटे

अनुक्रम


१.फाटलेल्या आकाशाला टाका घालताना.../१९
२.जमीराच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू लागतात.../२३
३.खरा गुन्हेगार कोण?/२८
४.जखम बरी होते, पण.../३३
५.घसरलेला पाय सावरताना.../३८
६.माझं रुक्मिणीहरण/४३
७.एका स्वप्नाची झटापट/४९
८.साऱ्या संकटांना पुरून उरणारी स्थितप्रज्ञता/५४
९.वल्लरीची भरारी/६०
१०.सचिनचं साहेबी स्वप्न/६४
११.सोसल्यानंतरचा सूर्योदय/६९
१२.इच्छामरण मी स्वीकारले आहे.../७४
१३.उसवलेली आयुष्यं सावरताना.../८०
१४.शकुंतलेचा कलंक का ?/८५
१५.एकटी, अनाथ... तरी स्वाधार/८९
१६.मला समजून घेतलं असतं तर.../९५
१७.डाग नसलेला चंद्र/१०१
१८.सूरदास नव्हे कालिदास!/१०५
१९.कोंडीची कोंडी/१०९
२०.अनाथांचं आभाळही अनाथच/११४
२१.एका शून्याचं शतक होणं..!/११६
२२.उत्तरायुष्यात तरी आश्रम नको!/१२१

२३.पुरुषार्थी आई/१२३

फाटलेल्या आकाशाला टाका घालताना...


 नेहमीप्रमाणे एका संध्याकाळी मी बालकल्याण संस्थेत काम करत बसलो होतो. तेवढ्यात एक महिला पोलीस एका लहान मुलीस संस्थेत दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश घेऊन आल्या. झालं असं होतं, त्या मुलीच्या वडिलांनी तिच्या आईचा म्हणजेच आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला होता. पोलिसांनी त्याला जेरबंद केलं होतं. मुलीला आई-वडिलांच्या जवळच्या नातेवाइकांनी सांभाळण्यास नकार दिल्यानं मुलगी पोलिसांनी निराधार घोषित करून आमच्या स्वाधीन केली होती.
 तिचं नाव संध्या. ती संस्थेत आली तेव्हा पाच वर्षांची चिमुरडी होती. आली तेव्हा भेदरलेली होती. तिनं आपल्या आईचा खून प्रत्यक्ष पाहिला होता; पण वडिलांनी गुन्हा कबूल केल्यामुळे तिला साक्ष देण्याचा काही प्रसंग आला नाही. संध्याचा सांभाळ आमचे सगळे काळजीवाहक मनापासून करायचे. बघता बघता संध्या मुलींत रमली. संस्थेत रुळली. शाळेतही। जाऊ लागली. अनाथाश्रम, रिमांड होम, कारागृहासारख्या संस्थांत एक असतं, तिथं वेगळ्या कारणांनी आलेली मुलं, मुली, स्त्री-पुरुष कोणीच कोणाची नसतात; पण परिस्थितीनं ती समाज संपर्कापासून, घरादारापासून दूर लोटली गेल्यानं प्रारंभी एकलकोंडी, अंतर्मुख, आत्ममग्न, मौन, उदास असतात; पण हळूहळू वातावरण त्यांना सांगत राहतं. किती दिवस एकटा, उपाशी, असा जागा राहणार! हे काही दिवस, तासाचं जग नाही... इथं तुला अर्धे आयुष्य काढायचं आहे. अनेक वर्षं राहायचं आहे. मग तो अथवा ती व्यक्ती हळूहळू स्वतःला बदलते नि मग तिथलं जग त्याचं/ तिचं होतं.  संध्या शाळेत जाऊ लागली नि एक दिवस टपालात तिच्या वडिलांचा एक विनंती अर्ज व ते ज्या जेलमध्ये शिक्षा भोगत होते, त्या कारागृह अधीक्षकाचं पत्र होतं... बंदी विश्वनाथ पांढरे यांची मुलगी आपल्या संस्थेत आहे. त्याला तिला भेटायची इच्छा आहे... तो सारखा आठवण काढून रडत असतो... कधी-कधी दोन दोन दिवस जेवतही नाही. अमुक... तमुक... या दिवशी त्या भेटीची वेळ निश्चित केली आहे. तरी तिला भेटीस घेऊन यावे... जेलर चांगले असल्याने त्यांनी फोन करूनही आमच्या अधीक्षिकेस सर्व समजावलं होतं.
 संस्थात्मक चौकटीत भावना व व्यवहारात जमीन अस्मानाचं अंतर असतं. जेलरचं पत्र आलं तरी संध्या आमच्याकडे बालन्यायालयाच्या निरीक्षणात होती. त्यांची परवानगी आवश्यक होती. ती मिळाली नि संध्या बाबांना भेटून आली. ती जशी भेटून आली तशी परत घुमी, एकटी राहू लागली. तिच्या चेह-यावरचं हास्य, तेज काळवंडल्याचं माझ्या लक्षात आलं. तिचा पालक म्हणून माझी स्थिती मोठी विचित्र झाली होती. इकडे आड तिकडे विहीर! मी त्या काळात अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे रिपोर्ट वाचायचो. मानव अधिकारांबद्दल जागृत होत होतो. संध्याच्या अशा दोन-चार भेटींतून तिची बदलणारी स्थिती मला अस्वस्थ करत होती. तिला भेटू द्यावं तर पंचाईत, न द्यावं तर अडचण शिवाय संस्थेतून प्रत्येक वेळी कोर्ट, ऑर्डर, वॉरंट, काळजीवाहक पुरवणं त्रासाचं व्हायचं.
 मग काही वर्षांनी संध्याच्या वडिलांच्या वकिलांनी कोर्ट निकालानंतर मुलीला भेटता यावं म्हणून जेल बदलून मागितलं नि तो आमच्या शहरातल्या जेलमध्ये आला. आता संध्या दर पंधरा दिवसांनी त्यांना भेटत होती. भेटीत वडील जेलमधल्या भत्त्यातून तिला खाऊ द्यायचे. जेलमध्ये कैदी कामं करतात. त्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना भत्त्याच्या रूपात पैसे मिळतात. जेलमध्ये छोटं कॅन्टिन, बेकरी असते. तिथून ते गरजेच्या मान्य वस्तू विकत घेऊ शकतात. बाप, मुलगी दोघं खूश बघून आम्ही निवांत झालो.
 संध्या पाहता पाहता मोठी झाली. हायस्कूलमध्ये शिकू लागली. वडिलांच्या केसचा निकाल लागल्यानंतर तिला आम्ही कोर्टातून सोडवून घेऊन सर्टिफाय करून बालगृहात ठेवलं होतं. त्यामुळे संध्या आता वयाच्या अठरा वर्षांपर्यंत संस्थेत राहू शकत होती. तिची शाळेतली प्रगतीही चांगली होती. नाकीडोळी नीटस असल्यानं ती संस्थेतल्या प्रत्येक नाचगाण्यात असायची. स्वभाव लाघवी असल्यानं सगळ्यात मिळून मिसळून राहायची. आता संध्याचं जीवन हा काही आमच्या चिंतेचा विषय राहिला नव्हता, कारण आम्ही तिचे पूर्ण पालक झालो होतो. तीही समजदार होऊन संस्थेची झाली होती.
 नेहमीप्रमाणे मी संस्थेच्या कामासाठी म्हणून बाहेर पडायला स्कूटरची कीक मारत होतो तर पांढरे समोर उभे! मला क्षणभर खरंच वाटलं नाही. त्यांनी नमस्कार केला. मी विचारलं, “सुटला का पांढरे?"
 म्हणाले, “एवढ्या लवकर सुटका होती का दादा? अजून तीन वर्षं हयाती? मग आलात कसे? पळून?"
 पांढरे : (कान धरून) “कसं पळून येईन? पॅरोलवर सुटून आलोय... महिनाभराचा पॅरोल मिळालाय. मुलीला सुट्टीवर न्यायचं म्हणून आलोय."
 जन्मदात्याची पोरीवरची माया बघून आम्ही सर्वच नेहमी म्हणायचो, आईनं चूक केली. शिक्षा निष्पाप पोरीला. आई-वडील असून संध्या अनाथ, निराधार झाली होती. बापाची माया बघून आम्ही संध्याला सुट्टीवर पाठवायची परवानगी दिली. आमच्या अधीक्षकांनी कारागृह अधीक्षकांचा पांढरेच्या सद्वर्तनाचा अहवाल घेतला आणि संध्याला रजेवर पाठवलं. आम्ही सर्व, संध्याही घरी जायला मिळणार म्हणून खुशीत होती... हरखली होती. बाबांनी तिच्यासाठी नवे कपडे, खाऊ मैत्रिणींना चॉकलेट्स आणली होती.
 ... संध्या जाऊन दोन दिवसही झाले नाहीतर पांढरेवाडीहूून फोन आला, 'मी पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, 'संध्याला घेऊन जाण्यासाठी ताबडतोब निघून या. इथं आल्यावर सविस्तर बोलू...' काही विचारण्यापूर्वीच त्यांनी फोन ठेवल्याने जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. संध्याच्या संस्थेच्या म्हणजे कन्या बालगृहाच्या अधीक्षिका या विचित्र फोनमुळे एकट्या जायला तयार होईनात. मग सोबतीला आम्ही एक पुरुष अधिकारी, एक महिला काळजीवाहक अशी विशेष बाब म्हणून योजना करून पाठविली व पोहोचताच फोन करायला सांगितले. मी घरी निघून गेलो; पण बेचैन होतो. सतत फोनची घंटी वाजली की मनात पाल चुकचुकायची, असं काही झालं की, काहीच सुचायचं नाही. त्या दिवशी दुपारचं जेवण घेणंही जिवावर आलं. चाळा म्हणून वाचत, पानं चाळत राहिलो. सायंकाळी पाचला पांढरेवाडीहून अधीक्षकांचा फोन आला, “सर, तुम्ही टॅक्सी करून निघून या. संध्या तुम्ही आल्याशिवाय येईल असं वाटत नाही नि तिला तसं आणणंही बरं नाही."  मी रात्री टॅक्सीनं पांढरेवाडी गाठली. सरळ पोलीस स्टेशनवरच गेलो. इन्स्पेक्टरांनी विश्वनाथ पांढरेचा जबाब मला वाचायला दिला. तो माणुसकीला काळिमा फासणारा तर होताच. शिवाय विश्वास, नातं, सभ्यता साच्या शब्दांना मुळातून उपटून टाकणारा होता... विश्वनाथ पांढरे यानं आपल्या मुलीवर बलात्कार केला होता. कारण एकच, संशय! त्यांना बायकोचा संशय येऊ लागल्यापासून त्यांच्या मनानं एकच घेतलं होतं की, संध्या आपली नाही. संध्याच्या आईच्या खुनानंतर त्यांच्या मनानं एकच हिय्या केला होता... बायकोला संपवलं... तिच्या प्रियकराला पण संपवायचं... पण धाडस होईना... मग मनावर घेतलं... मूल आपलं नाही... नासवायचं...
 आम्ही संध्याला समजावून घेऊन आलो. पांढरे परत जेलमध्ये गेले. त्यांच्यावर आणखी एक केस दाखल झाली... आता त्याचं उर्वरित आयुष्य कारागृहात जाणार ही काळ्या दगडावरची रेघ होती; पण आमच्यापुढे संध्याचं उभं आयुष्य होतं.
 पुढे पाच-सात वर्ष संध्याला सांभाळणं, समजावणं अशक्यप्राय होतं. आम्ही एक ठरवून टाकलं होतं... तिचा भूतकाळ जागा होईल, असं कुणी काही बोलायचं नाही. काही दिवसांनी ती नॉर्मल झाल्याचं हाती आलेल्या तिच्या एका प्रेमपत्रानं समजलं... मी पालक म्हणून निश्चित झालो. डोक्यावर बर्फ ठेवून तिच्यावर अक्षता उधळल्या तो क्षण आमच्या सर्वांच्या मनावरील मणामणाचं ओझं उतरवणारा होता... त्यापूर्वी पालक म्हणून आम्ही एकच काळजी घेतली होती की, वडील असलेल्या जेलमध्ये वा पांढरेवाडीत याचा मागमूस लागणार नाही. संस्थेतल्या मुलीचं लग्न उजळमाथ्यानं, डामडौलात करण्याची आमची परंपरा; पण संध्याचं लग्न आम्ही भूमिगत राहून केलं.
 दुस-या जगात काहीच निश्चित असत नाही... निश्चित एकच असतं... परिस्थिती कितीही आकाश फाडणारी असो... आकाशालाही टाका घालण्याची शक्ती, शक्यता सतत एकवटत राहायच्या... ते पुन्हा फाटणार आहे, हे गृहीत धरूनच!

◼◼

जमीराच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू लागतात...


 ही १९८५ मधील गोष्ट असावी. डहाणू-कोसबाड परिसरातील एका पाड्यावर एक कातकरी कुटुंब राहात होतं. ते शेतमजूर होतं. हातावरचं पोट होतं त्यांचं. एकू व जमीराचं लग्न होऊन चार-पाच वर्षं झाली होती. पदरात दोन पोरी होत्या. वीरा व मीरा, वीरा पाच वर्षांची तर मीरा तीन. एकू मेहनती होता. गावात दोघा-तिघांची शेती एकटा सांभाळायचा. मोठा कष्टाळू होता एकू. मुलींना शिकवायचं नि मोठं करायचं स्वप्न, त्याला मालकांच्या मुलांना रोज शाळेत पोहोचवत असताना पडलं नि तो दुप्पट कष्ट करू लागला. जमीराला त्यानं हे सांगितलं तेव्हा तीही हरखून गेली. म्हणाली, “आपण गुलामीचं जिणं जगतो. पोरी तर मालकिणी होतील." एकू म्हणाला, “आपण म्हमईला जाऊ या. तिथं वसईला एक वकील हायाती. त्यांनी शेती घेतलीया. त्यांना सालदार कुटुंब हवंया. इथल्या परीस पैकं मिळतील, पोरींना सिक्षान भेटंल, पैकं बी अन् शानपन बी!" जमीराला कल्पना भावली. तिनं हिय्या केला. रोज एकूमागं घोर लावला. “वकिलाला सांगावा धाडा. आपण म्हमईला जाऊ या."
 आज-उद्या करत एकदाचा दिवस उजाडला नि एकूनं आपला मुक्काम हलवून वसई गाठली. वकिलाची मोठी शेती होती. केळीची बाग, नारळ बाग, भात-शेती, वडिलार्जित शेतीपण त्यांनी वकिलीच्या पैशातून वाढविली होती. अशी दोन कुटुंब त्यांनी यापूर्वीच वस्तीला आणली होती. वाढत्या पसाऱ्यामुळे त्यांनी आपल्या अशिलाकरवी एकूशी संधान बांधलं होतं. एकूला खोपी मिळाली. इतर कुटुंबासह त्याचे जीवन सुरू झालं. त्यांची घरं रेल्वेलाईनीजवळच होती. हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशन होतं. वस्तीवरची पोरं रोज स्टेशनात दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाली की खेळायला जायची. आई-वडील शेताची कामं सांभाळत पोरांकडे लक्ष देऊन असायची.
 एकू, रामशा व जकी तिघं मिळून वकिलांची शेती सांभाळत. वर्षही गेलं नसेल. जकी नि रामशामुळे एकू दारूच्या आहारी गेला. अन् वर्षातच त्यानं स्वर्ग गाठला. जमीरावर आकाश कोसळलं खरं; पण गावाकडं घेतलेलं कर्ज, आगाऊ मजुरीपोटी तिची इच्छा नसताना पोरींसाठी राहणं भाग पडलं. एकूनं जग सोडलं, तसं तिची जिद्द वाढली. दोन मर्दीची कामं एकटी करायची. वाकून-वाकून तिला कुबड येऊन गेलं.
 एक दिवस जमीरा कामात गुंग होती. पोरी डोळा चुकवून केव्हा स्टेशनवर खेळायला गेल्या ते समजलंच नाही. दुपारी एकला जेवणाची सुट्टी करून खोपीत आली तर खोपी रिकामी, स्टेशनवर गेली तर पोरींचा पत्ता नाही. सारं गाव पालथी घातली; पण पत्ता नाही.
 इकडे या मुली खेळत-खेळत खोळंबलेल्या रिकाम्या रेल्वे डब्यात खेळत बसल्या होत्या. अन् अचानक रेल्वे गाडीनं गती घेतली. स्टेशनं घेतली तशी माणसं डब्यात वाढत गेली अन् पोरी चेंगरू लागल्या. विरारचर्चगेट शटलच्या दोन चार फेन्या केल्या तरी पोरी भेदरून डब्यातच. योगायोगानं सकाळी ड्यूटीवर गेलेल्या एका पोलिसाची नजर या मुलींकडे पडली. त्याच्या सारा प्रकार लक्षात आला अन् त्यानं चर्चगेट येताच पोरींना पोलिसांच्या हवाली केलं नि तो आपल्या ड्यूटीवर गेला. पोरींची रवानगी चिल्ड्रन्स एडस सोसायटीच्या मानखुर्द येथील रिमांड होममध्ये करण्यात आली.
 या संस्थेचे स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. इथं अशी चुकलेली, घर सोडून पळून आलेली, रस्त्यावर भटकणारी, गुन्हे करताना सापडलेली, हरवलेली शिवाय अनाथ, निराधार, काही मुकी, मतिमंद, वेडसर अशी ३000 च्या घरात मुलं-मुली आहेत. ती साध्या भारतातून आलेली असतात. मुंबई पोलिसांचे एक पथक आहे. जापू पथक, (ज्युव्हेनाइल एड पोलीस युनिट) बालसहाय्यक पोलीस पथक, ते मुंबईभर फिरत असतं. शिवाय मुंबईची सर्व उपनगरं, तेथील पोलिस स्टेशन्स, रेल्वे पोलिस, सर्वांशी ते संपर्कात असतं. रोज अशी पाच-पन्नास मुलांची वर्दी त्यांच्यापर्यंत येते. ते अशा मुलांना गोळा करतात व चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या ताब्यात सांभाळण्यास, पालकांचा शोध घेण्यास देतात. गुन्हा असेल, तर तपासापर्यंत ही मुलं संस्था सांभाळत राहते. ही आशिया खंडातील सर्वांत मोठी बालकल्याण संस्था 'बालनगरी' म्हणून ओळखली जाते. शासन व समाजसेवक मिळून ती चालवतात.
 इथं काळजीवाहक, प्रोबेशन अधिकारी असा मोठा कर्मचारी वर्ग आहे. तो मुलांचा सांभाळ तर करतोच; पण मुलांशी बोलून, पत्रव्यवहार करून, पोलिसांची मदत घेऊन पालक शोधतो व मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली करतो. ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही त्यांना मग दत्तक दिलं जातं अथवा अन्य संस्थेत शिक्षणासाठी धाडलं जातं. वीरा व मीरा चर्चगेट पोलिसांमार्फत जापूकडे सोपविल्या गेल्या. जापूकडून त्या बालनगरीत आल्या. त्यांना फारसं बोलता येत नव्हतं. पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे प्रयत्न करूनही सहा महिने पालकांचा शोध लावून लागला नाही. शेवटी त्यांना बेवारसी जाहीर करण्यात आलं नि दत्तक द्यायचं ठरलं.
 त्या काळात आपल्या देशातील लोक फक्त मुलगेच दत्तक घेत. मुली विदेशी दत्तक जात. सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून वीरा व मीरास हॉलंडच्या थॉमस कुटुंबास दत्तक देण्यात आलं.
 इकडे जमीरानं अन्न टाकलं. ती कामावर न जाता पोरी शोधत वेडीपिशी झाली. वकीलबाईंकडून ही घटना वकीलसाहेबांना कळली तेव्हा ते हळहळले. स्वतः निपुत्रिक असल्यानं जमीराचं दुःख त्यांना आपलंच वाटणं स्वाभाविक होतं. त्यांनी आपला एक सहायक वकील या कामावर मुक्रर केला. महिनाभरात साच्या पोलिस डायच्या, हरवल्याचा शोध जाहिराती, जापूच्या नोंदी यातून वीरा व मीरा फोटोवरून व संस्थेच्या दप्तरी नोंदी, फोटो इ. च्या साह्याने शोधण्यात यश आलं खरं; पण त्या दत्तक जाऊन वर्ष उलटलं होतं व त्या तिथं रुळल्या होत्या. त्यांना तिथलं नागरिकत्वही मिळालं होतं.
 वकीलसाहेबांनी आपलं सारं कौशल्य, पैसा पणाला लावून मुलींना परत जमीराबाईंच्या हवाली करण्याचा चंग बांधला. त्यांनी संस्था, पोलीस, बालकल्याण विभाग सर्वांना पार्टी करून त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संस्था, पोलिस, बालकल्याण विभाग यांच्या चौकशी पद्धती, अहवाल, दत्तक पद्धत, कायदा आदींमधील त्रुटींचा अभ्यास करून, पालकाचे अधिकार व अन्य कलमांच्या आधारे जन्मदात्या आईस मुलीचा ताबा मिळावा, अशी मागणी केली. डोळ्यांत तेल घालून पाठपुरावा केला तरी बोर्डावर केस येईना. तसा त्यांनी विशेष अर्ज करून याचिका सुनावणीस लवकर घ्यावी म्हणून प्रयत्न केले तरी तारखा, रिपोर्ट, म्हणणे यांचा मेळ घालण्यात काळ उलटतच राहिला. इकडे जमीरा वेडी झाली तर वकील तिला सांभाळत राहिले. केवळ वकीलसाहेबांच्या पाठपुराव्यामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दत्तक दिलेल्या मुलांना परत भारतात साक्षी, चौकशीसाठी परत बोलावण्यात वकीलसाहेबांना यश आलं. सर्व बाजू, पक्ष समजून घेऊन न्यायालयानं निकालपत्र दिलं. त्यात लिहिलं होतं
 ‘‘जन्मदात्या पालकाला आपल्या पाल्याचा ताबा मिळण्याचा प्रथम अधिकार आहे; पण जन्मदात्या पालकानं वेळेत शोध घेतला नसल्याने व दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्यायालय मुलींचा ताबा जन्मदात्या आईस एवढ्यासाठी देऊ शकत नाही की, एक तर मुली कळत्या झाल्या आहेत. त्यांचं त्या कुटुंबात व देशात सुस्थापन झालं आहे. त्यांची परत भारतात येण्याची इच्छा नाही. शिवाय दत्तक पालक मुलींचा सांभाळ योग्य रीतीनं करत असल्याने व इकडे जमीरा वेडी झाली असल्याने ती मुलींचा सांभाळ करण्यास सक्षम नाही. सबब मुली दत्तक आई-वडिलांकडेच राहणे सयुक्तिक ठरते."
 कायदा, पोलीस, संस्था, न्यायालय, वकील, समाज सा-यांचं जग घड्याळाच्या काट्याप्रमाणे ठरलेल्या दिशेनं चालत राहत असतं. निराळ्या जगातील जमीरासारखी संकटग्रस्त माणसं... घर फिरलं की घराचे वासे फिरतात, तसं त्यांच्या जीवनाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरू लागतात. होत्याचं नव्हतं होतं... ज्यांच्याकडे काहीच नसतं. शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा, मान्यता... त्यांच्या हाती संकटकाळी काहीच येत नाही... येतो वनवास, पश्चात्ताप नि जीवनभर पुरून उरणारं उपेक्षित जीवन! ‘सामान्यांचं जग' नि ‘वंचितांचं विश्व' यात असामान्यत्वाची एक अशी दरी असते, ती मानव अधिकारांनापण पराभूत करत राहते... म्हणून वाटतं वंचित, उपेक्षितांसाठी कायद्याची एक नवी कल्याणकारी चौकट हवी. जी हरलेल्या, थकलेल्यांना दिलासा येईल... धीर देईल... ज्यांनी उद्ध्वस्तपणाचे भूकंप अनुभवले त्यांनाच पुनर्वसनाचे अनिवार्यपण काय असतं हे उमगणार ना?
 कोर्टाच्या निकालानंतर निष्णात वकिलांनीही हात टेकले. जमीराला सांभाळणं आता आटोक्याच्या बाहेर घेऊन गेलं होतं... माणूसपणाचा झरा कितीही प्रवाही, प्रभावी असला तरी ती सामान्याचा असल्यानं एक ना एक दिवस वास्तवाच्या कुंपणाजवळ येऊन थांबतो... आटतोच!
 शेवटी वकीलसाहेबांनी वसईच्या पोलीस ठाण्यात हारून अर्ज केला... जमीरा अनाथ, निराधार, बेवारस वेडी असल्याने पोलिसांनी तिचा ताबा घेऊन उपचार व पुनर्वसनार्थ तिची रवानगी मनोरुग्णालयात करावी.
 जमीराला ठाण्याच्या वेड्याच्या इस्पितळात दाखल केल्यानंतर जिवंत असूनही तिचा इहलोकापासूनचा संबंध तुटल्यात जमा होता. आता ती समाजाच्या लेखी ‘माणूस' नव्हती. ती होती ‘वेडी' शहाण्यानं वेड्यांच्या नादी लागायचं नसतं... ती जिवंतपणी मरणयातना भोगत राहिली... भोगत राहिली.
 अखेर ती मेली तेव्हा पोलीस पंचनाम्यात लिहिलं होतं... ‘जमीरा नावाची बेवारस स्त्री जीव आज रोजी दहन करण्याकामी ताबा मिळाल्याने कायद्याच्या अधीन राहून सोपस्कार करण्यात आल्याने ठाण्याची जमीरा एकू फाइल दफ्तरबंद करणेत येत आहे. मेहरबानास जाहीर व्हावे.'

◼◼

खरा गुन्हेगार कोण?


 एके दिवशी सुनंदा स्वतःहून संस्थेत दाखल झाली. ती आली तेव्हा पोरगीशीच होती... दिवस गेले होते; पण पोट फारसं दिसत नव्हतं... भेदरलेली होती... विरलेलं लुगडे नेसलेली... हडकुळी इतकी की लुगडंही ओझं वाटावं... ठेंगणी, ठुसकी... आली तेव्हा केस पिंजारलेले... लालमातीनं माखलेले... आठ दिवस अंगाला पाणी लागलेलं नसावं... पोटातही अन्नाचा कण गेला नसावा.
 नुसतं पाहूनच काही गोष्टी एव्हाना आमच्या लक्षात यायच्या मावशी, ताईंना मी सूचना दिल्या नि अन्य कामात राहिलो. आठ दिवसांनी सुनंदाचा चेहरा उजळलेला पाहिला तेव्हा बरं वाटलं. दरम्यान बाईंकडून मला समजलं होतं...
 सुनंदाची घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील प्राथमिक शिक्षक होते; पण घरावर कर्जाचा डोंगर होता. गुरुजी धनगर वाड्यावरील शाळेत शिक्षक होते. पदरात दोन मुली. दुस-यांदा सुनंदा जन्मली तेव्हा गुरुजींनी तिच्या जन्मापासूनच उजवण्याचा घोर लागला. कर्जामुळे घरात सतत चिडचिड होत राहायची. सुनंदाची आई गावात मास्तरीण बाई म्हणून मानकरी होती; पण दिवस फिरले तसे त्या पण शेतावर जाऊ लागल्या. मुली शाळेच्या वयात शाळेत जाऊ लागल्या. सुनंदा मात्र आईचं शेंडेफळ... शेपूट... शाळेला नुसतं जायचं म्हटलं तरी भोंगा पसरायची... गुरुजीची पोर म्हणून चौथीपर्यंत ढकलत नेली खरी; पण पुढंं गाडंं अडलं ते कायमचं.  शाळा सुटली तशी सुनंदा घरी राहू लागली. होईतो स्वयंपाक, केरवारा करू लागली. गुरुजी दोन कोस ये-जा करत शाळा सांभाळायचे... आई शेत... पगार पुरायचा नाही... सावकारांच्या तगाद्यानं जीव मेटाकुटीला आला, तसा गुरुजींनी उपाय शोधला... शाळेतली, हुशार मुलं तालुक्याला शिकायला जायची... कोण हायस्कूलला, कोण स्कॉलरशिपला, कोण नवोदयच्या शिकवणीला... सर्व एकत्र खोली घेऊन राहायचे. जेवणाची आबाळ होत राहायची म्हणून जेवणाला बाई ठेवायची ठरली. तालुक्याच्याच ठिकाणची बाई ठेवली; पण मेळ काही बसेना. मग गुरुजींनी सुनंदालाच ठेवायची टूम काढली... स्वार्थ होता... महिना पाचशे मिळाले तरी एक हप्ता भागेल... गुरुजींचा शब्द गावात प्रमाण असायचा... एकदा बाजारचा दिवस गाठून गुरुजी, पालक तालुक्याला गेले. भांडी, स्टोव्ह, धान्य सर्व व्यवस्था केली. मुलीला शेजारच्या खोलीत ठेवलं... घरमालकिणीला लक्ष द्यायला सांगितलं नि निघून आले.
 हा क्रम गेली चार-पाच वर्षे बिनबोभाट पार पडत आला... सुनंदा सुट्टी, सणासाठी घरी येत-जात राहायची; पण तिला मुलांच्या जेवणाचा घोर लागलेला असायचा. तिची ओढ तालुक्याला असायची... कर्जही डोक्यावरून खांद्यावर येत राहिल्याने गुरुजी निश्चित होते... पोरीचं वळण, राहणं, भाषा सुधारून शहाणपण आल्यानं, समज आल्यानं आईपण हरखून गेली होती... पोरीला स्थळ मिळायला आता अडचण नव्हती.
 इकडे मे महिन्याच्या सुट्टीत मुलं अभ्यासाला, क्लासला, परीक्षेला म्हणून तालुक्यालाच मुक्काम करू लागली, तसं सुनंदाचं गावाकडे येणं कमी होऊ लागलं... एकदा मुलं परीक्षेसाठी म्हणून जिल्ह्याला आठ दिवसांसाठी गुरुजी व पालकांसह गेली; पण कॉलेजला जाणारा महेश... त्याला एकट्यालाच कसं ठेवायचं म्हणून सुनंदाला गावी न पाठवता सोबतीला ठेवलं... वयात आलेली दोन मुलं... आठ दिवसांत त्यांचं कसं सूत जमलं ते कुणाच्याच लक्षात आलं नाही.
 अन्य मुलांची शाळा दुपारची... महेशचं कॉलेज सकाळी... दुपारी सुनंदा नि महेशच खोलीवर असायचे... मालकीण म्हणणारी शेतावर जायची... सुनंदा-महेशला मोकळे रान मिळायचं... काही-काही प्रसंगांनी मालकिणीला संशय येऊ लागला... मुलांतही कुजबुज सुरू झाली... आणि या महिन्यात तर ती बाहेर बसलीच नाही... विटाळ आला नाही तसं मालकिणीनं घर अंगावर घेतलं... काय होणार हे सुनंदाच्या लक्षात आलं तशी ती भेदरली... महेशनं काखा वर केल्या... तशी तिची जमीनच हादरली... सुनंदा अल्पशिक्षित होती; पण शहाणी होती... तिनं एका डॉक्टरबाईशी संधान बांधलं... त्यांनी पुरवलेल्या माहितीवरून ती स्वतःहून आमच्या संस्थेत दाखल झाली... दिलेल्या जबाबात तिनं झाला प्रसंग सांगितला होता... आई-वडील, चुलते ठार मारतील याचं भय... शिवाय महेशच्या घरातले विश्वामित्र होण्याचा धक्का मोठा होता... काय करावं सुचत नव्हतं... संस्थेत ती अबोल असायची, एकटी राहायची, भूक नसायची, सारखी पडून राहायची... झोप उडालेली तिची स्थिती चुकलेल्या हरणीपेक्षा वेगळी नव्हती...
 आम्ही तपास करून पालकांना बोलावून घेतलं... नंतर महेशच्या पालकांनाही; पण ते ऐकायच्या स्थितीत नव्हते... त्यांना हे घोंगडं गळ्यात नको होतं, ते गावातील प्रतिष्ठेमुळे. मुलीचे वडील तयार झाले. मामाच्या गावी सुनंदाला ठेवायचं ठरलं. महेश गुपचुप संधान साधून होता. त्यामुळे मामानं सक्ती करूनही सुनंदा पोट पाडायला तयार नव्हती... मला नोकरी लागू दे... मी तुला करून घेतो म्हणून निरोप पाठवत राहायचा... त्या आशेवर सुनंदा आकाश पेलून उभी होती. या ताणतणावात नऊ महिने केव्हा उलटले समजलंसुद्धा नाही.
 सुनंदाला मुलगा झाला तसं बापानं पाणी सोडलं... गुरुजींना अब्रू चव्हाट्यावर येऊ नये असं वाटत राहायचं... ते स्वाभाविक होतं... दोनचार दिवस विचार करून त्यांनी पोरीला मोकळं करायचं ठरवलं... सुनंदा पोराचा बळी द्यायला तयार होईना. तसं मग मूल सोडायचं ठरलं... रात्रीच्या वेळी मूल घाटात ठेवायचं... आडाला राहून ते कुणी घेऊन जाईपर्यंत पहारा ठेवायचा ठरलं... मूल पाहून उगीच बालंट नको म्हणून एक... दोन गाड्या निघून गेल्या... अन् गस्तीवरच्या परतणाच्या पोलीस गाडीची नजर बाळावर पडली... घाट उतरताना तर बाळ नव्हतं... “अर्ध्या तासात कुठून आलं म्हणून त्यांनी वायरलेस वरून दोन्ही बाजूच्या चेक पोस्टवर नाकाबंदी केली... चार तास उलटून गेले तरी तपास लागेना... तसं त्यांनी बाळ उचललं नि चेकपोस्टवर आणलं... पहारा, तपास चालू ठेवला... महिला पोलिसांची कुमक मागविली. पहाट होता होता घाट चढून पायी येताना दोघं-तिघं दिसली म्हणून पोलिसांनी हटकलं. पहिल्यांदा त्यांनी आपण या गावचेच नाही, असा बहाणा केला; पण तो भाषेवरून फार वेळ टिकला नाही... कोकणच्या पोलिसांना ही मंडळी घाटावरची असल्याचं कळायला वेळ नाही... त्यांनी मामा, गुरुजी आणि सुनंदाला अटक केली... बाळ दिसताच सुनंदाला पान्हा आला... रडू कोसळलं... आईपणामुळे बिंग फुटलं नि अटक झाली... तपासात संस्थेचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी बाळाला व मुलाला आमच्या हवाली केलं... गुन्हा दाखल केला... मामा-वडिलांना जेलची हवा दाखविली.
 गुरुजींनी असं करावं याचा मला राग आला... मी त्यांची कानउघाडणी करायला म्हणून सबजेलला गेलो... ते अगोदरच मेल्याहून मेले झाले होते. मी न रागावता त्यांचं सारं ऐकलं तेव्हा त्यांना निरपराध ठरवून परतलो. मामा, गुरुजींना जामीन मिळेल, असं पाहिलं... त्यांची सुटका केली... ते नोकरीतून निलंबित होऊ नयेत म्हणूनही कुणाकुणाला भेटत राहिलो... अनाथ, निराधार, संकटग्रस्त मुले, मुली, महिलांचं काम करताना मी ते अपराधी असले तरी त्यांचा वकील होऊन जायचो. मला गुंता सोडवणं महत्त्वाचं वाटायचं... पाय घसरला म्हणून तो तोडायचा, हात काळोखला म्हणून कापायचा, हा सर्वसामान्य समाजाचा न्याय मला त्या वेळी अमान्य असायचा... अपराध गैरच... पण फाशी हा उपाय नाही... सुधारायला संधी या मताचा मी... तसा प्रयत्न करत राहायचो...
 या प्रकरणात मी माझा न्याय ठरवून टाकला होता. सुनंदा अजाणतेपणी फसली होती... समाजमन खोट्या प्रतिष्ठेच्या गर्तेत राहतं... जग बघितल्यामुळे असेन... कुमारीमातेस तिला तिचं बाळ घेऊन स्वाभिमानानं, स्वावलंबनानं राहता आलं पाहिजे, अशी माझी धारणा होती नि आहे... माझं हे तत्त्वज्ञान माझ्या भोगातून आलं होतं. सुनंदात मी माझी सोडून गेलेली आई शोधायचो... सुनंदाच्या बाळाचं... स्वप्नील नाव ठेवलं होतं आम्ही. त्यात मी माझ्या आयुष्याचं स्वप्नं... प्रतिबिंब पाहत राहायचो. या समाजात स्त्रीलाच वनवास... पुरुष बिनधास्त, निरपराध हे मला अमान्य होतं नि आजही आहे.
 त्याच काळात अशा मुलींच्या पुनर्वसन व स्वावलंबनासाठी टाटा ट्रस्टनी आम्हास मोठं अनुदान देऊ केलं होतं... आम्ही शिलाई, स्वेटर्सची मशिन्स खरेदी केली... आधारगृहातील सर्व मुली व महिला उत्साहानं काम करत राहिल्या... संस्थेत तीनशे मुलं-मुली होती. त्यांचे कपडे, स्वेटर्स, अन्य गरजेच्या वस्तू आमच्या उद्योगघरात तयार होत... सुनंदा स्वप्नीलला सांभाळत सारं करत राहायची. एव्हाना तिच्या हे लक्षात आलं होतं की, आपण स्वावलंबी झालो, तर महेश रुंजी घालेल... तिच्या कष्टाला तोड नव्हती... ती उद्योगघरात अन्य मुली-महिलांपेक्षा अधिक कमवायची व काटकसर करून पैसे साठवत राहायची... म्हणायची, मी स्वप्नीलला दादांसारखं शिकवणार, मोठं करणार...
 एक दिवस तिचं स्वप्न फळाला आलं... महेश पत्रकार झाला नि तिला घेऊन जायला आला... आम्ही त्यांचं रीतसर लग्न लावायचं ठरवलं... त्याची एकच अट होती... केसचा निकाल लागू दे... करू या... मी संस्थेच्या वकिलांशी बोललो, पोलिसांशी चर्चा केली... तिचं पुनर्वसन होणार असल्याचं समजावलं... मग संस्थेनं सुनंदाच्या बाजूनं अॅफिडेव्हिट घातलं... तिला प्रोबेशन अँड ऑफेंडर्स अॅक्ट लागू करावा असा रीतसर अर्ज पालक म्हणून दाखल केला. या कायद्यानुसार गुन्हा पहिलाच असेल, तर गुन्हेगाराला चूक सुधारायची संधी देण्याची तरतूद असते... त्याचा फायदा घेऊन सुनंदा निर्दोष झाली... न्यायाधीशांनापण आमच्या धडपडीचं कौतुक वाटत राहिलं होतं, हे त्यांच्या प्रश्नांवरून व नंतरच्या निकालपत्रावरून लक्षात आलं...
 तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, महेश आज सहाय्यक तहसीलदार आहे... स्वतःचा बंगला आहे... स्वप्नील कॉलेजला जायच्या तयारीत आहे... परवा सुनंदाला भेटायला गेलो होतो. गुरुजी आता निवृत्त आहेत... व्हरांड्यात ते डोलखुर्चीवर वर्तमानपत्र वाचताना पाहिले नि हा सारा सिनेमा लख्ख झाला. मनात आलं, खरा गुन्हेगार कोण? माणूस की समाज? समाज की वास्तव? काळ की प्रश्न ? तुम्ही जग जसे पाहाल तसे दिसते... जसे घडवाल तसे घडते... लागतो फक्त मनाचा मोकळेपणा... स्वीकार वृत्ती... सकारात्मकता! केल्याने होत आहे ते आधी केलेचि पाहिजे.

◼◼

जखम बरी होते पण..


 फॅक्टरी साईटवर त्या वेळी मोठमोठी बांधकाम सुरू होती. ठेकेदारानं बीड, उस्मानाबादहून अनेक बिगारी मजुरांचे तांडे आणले होते. दगड फोडणारे, खणणारे, वाळूची वाहतूक करणारी गाढवं नि त्यांचे हाकारे. साईटवर लमाणांची खाशी वस्ती वसली होती. फॅक्टरी होणार म्हणून काही घरं, दुकानंही होऊ घातली होती. तिट्यावर वीज वितरण केंद्र आणि त्यांच्या कर्मचा-यांची वसाहत होती. पिकअप शेड, हॉटेल्स, दुकानं, टपच्या सा-यांचा तिट्यावर बाजारी असा माहोल होता. ढालेकाका वीज केंद्राच्या वसाहतीत राहात होते. दोन किलोमीटरवर असलेल्या लमाण वस्तीजवळ फॅक्टरीसाठी ट्रान्समीटर उभं करायची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते रोज तिट्ट्यावरून साईटवर ये-जा करायचे. त्यामुळे लमाणांशी त्यांची चांगलीच जान-पहचान झाली होती. गाढवांचा तांडा घेऊन आलेले रशीद मियाँ त्याचे दोस्त झाले होते. त्याचे एकमेव कारण तंबाखू-चुन्याचं दोघांचं समान व्यसन. या एका छोट्या गोष्टीनं हिंदू-मुस्लीम एकता घडवून आणली होती! या कुटुंबात परक्याला प्रवेश निषिद्ध असला तरी ढालेकाका थंडीत चक्क त्यांच्या चुलीवर हात शेकत बसायचे.
 त्या तांड्यात खुमान आपल्या इनमीन दोन गाढवांना घेऊन दगड, विटा वाळू वाहायचा, ते आपल्या एकुलत्या छोट्या रियाजसाठी. ढालेकाकांना म्हणायचा, ‘रियाज को पढायेंगे। साब बनायेंगे। बाप बनेगा बेटा दुनिया का।' एवढ्यावर खूश होऊन ढालेकाका त्याला चहा पेश करायचे. म्हणायचे, ‘इंजिनिअर बनायेंगे। एमएसईबी में लगायेंगे।  वर्षभरात फॅक्टरीचं काम वर आलं होतं. धुराडंं, वर्कशॉप, गोडाऊन, शेड उभारणी होती. ट्रान्समीटर सुरू होऊन साईटवर वीज सुरू झाली होती. ढालेकाकांचं काम संपलं तरी तांड्यावर त्यांचं येणं-जाणं नित्याचं होतं. एकदा ते फिरून वसाहतीकडे परतले असतील. तेवढ्यात तांड्यावर मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज, गलका ऐकू आला. धावत येऊन पाहतात, तर खुमान विजेच्या खांबाला चिकटला होता. सारे लमाण काठीनं त्याला काढायचा प्रयत्न करत होते. ढाले काकांच्या प्रकार लक्षात येताच त्यांनी पळत जाऊन वीज बंद केली नि तांड्यावर आले. खुमान खाली पडला होता. तांड्यानं आकाशपाताळ एक केलं होतं. नंतर लक्षात आलं की, ठेकेदाराने रात्री आकडा टाकून वीज कनेक्शन रात्रपाळीसाठी ओढलं होतं, काम झाल्यावर आकडा काढायचा आळस केला नि होत्याचं नव्हतं झालं...
 आपल्या दुर्लक्षामुळंं खुमान गेला, असं ढाले काकांच्या मनानं घेतलं, तसं त्यांना जेवण गोड लागेनासं झालं. आपल्या विलास, विकाससारखा रियाज... तो अनाथ व्हावा याचं शल्य. त्यांना चैन पडेना... गाढवं ठेकेदाराच्या हवाली करून ते रियाजला घरी घेऊन आले... वसाहतीत एकटेच राहायचे. बि-हाड गावी असायचं... घासातला घास देत राहिले. त्याला शाळेत घातलं. वर्षही उलटलं नसेल. तांडा काम झाल्यानं गावाकडं परतला. जाताना ठेकेदार रियाजला न्यायला आला. ढालेकाकांनी दिला नाही. म्हणाले, 'मी खुमानला शब्द दिला होता... त्याला इंजिनिअर करायचं... एमएसईबीत लावायचं.' ठेकेदार निराश होऊन रिकाम्या हातांनी परतला. तो एका हक्काच्या वेठबिगारास मुकला होता.
 रियाज तिसरीत जाणार तेवढ्यात ढाले काकांची बदली गावाकडं झाली, तसा रियाजचा प्रश्न उभारला. घरची मंडळी तयार होईनात... रमेश असला तर ठीक होतं... रियाज..., कोण कुठला, शेजारीपाजारी, भावभावकीला काय उत्तर द्यायचं... ढालेकाका बेचैन होते... काय करायचं कळेना. तेवढ्यात कुणी तरी आमच्या संस्थेनं ‘अनिकेत निकेतन' हे अनाथाश्रम सुरू केल्याचं त्यांना सांगितलं. सारं ऐकून त्याचं नाव रियाज खुमान ढाले नोंदवलं. त्याची आठवण ठेवून ढालेकाका रियाज मोठ्ठा होऊन संस्था सोडेपर्यंत भेटायला येत राहायचे. सुट्टीवर, सणाला नेत राहायचे. तो त्यांचा तिसरा मुलगाच झाला होता.  रियाज आल्यापासून अबोल होता. चेह-यावर फारसे भाव नसायचे. त्यानं दंगा केल्याचं कधी आठवत नाही. दहावी पास झाला. शाळेत पहिला आला. ७५ टक्के गुण होते. विचारलं, “पुढे काय करणार? कॉलेजला जायचं होतं त्याला. त्याची संस्थेतली मुदत संपली होती. संस्थेपुढेही प्रश्न होता... मग आम्ही त्याच्यासाठी ‘किशोर अनुरक्षण गृह सुरू केले. बारावी होऊन तो सायन्सला गेला. त्याला कॉम्प्युटर सायन्सला जायचं होतं... माक्र्स कमी होते... प्रवेश मिळत नव्हता. प्राचार्यांना जाऊन भेटलो. खास बाब म्हणून प्रवेश मिळाला; पण देणगी द्यावीच लागली... देणगीवर आमची संस्था चालायची... या निमित्ताने संस्था देणगीदार झाली. ती एका उदारमनाच्या उद्योगपतीमुळे!
 रियाजमुळे संस्थेच्या मुलांचं कॉलेजला जाणं सुरू झालं. नंतर मुलीही कॉलेजला जाऊ लागल्या. तशी संस्था घर बनून गेली. पाहता पाहता रियाज बी. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) झाला. नंतर त्याच्याच प्रयत्नानं एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटरमध्ये तो ट्यूटर झाला. स्वावलंबी झाला. इतर मित्रांबरोबर खोली घेऊन राहू लागला. ढालेकाकांनी त्याच्या मागे इंजिनिअर होण्याचा घोषा सुरूच ठेवला होता; पण त्याला यातच करिअर करायची होती.
 दोन-तीन वर्षांनी अचानक एक दिवस एक मासिक घेऊन आला. ‘कॉम्प्युटर एज्युकेशन', सांगू लागला, ‘दादा, मराठीतलं हे पहिलं, कॉम्प्युटर मॅगेझीन'. मी चाळलं अन् धक्काच बसला. संपादक म्हणून नाव होतं ‘रमेश जाधव' हे कोण विचारताना सांगितलं की, जाईल तिकडे लोक विचारतात... कॉलेजातही विचारायचे ‘रियाज खुमान ढाले' असलं कसलं धेडगुजरी नाव रे?' मी नाव बदलून घेतलंय... गॅझेट केलंय... मुली बघताना पण त्रास व्हायला लागला दादा..." मी निरुत्तर होतो. समाजात माणूस महत्त्वाचा नसतो. त्याची जात, धर्म, नाव... माणूस म्हणून तुम्ही काय असता ते गौण होत जातं... ते या देशाला कुठे नेणार कोणास ठाऊक?
 या घटनेला काही दिवस झाले असतील अन् आमचे काळजीवाहक जोडपे कांबळे मामा नि मामी रडत आल्या... सांगू लागल्या... रियाज कॉलेज करत असताना आम्ही त्याला मागेल तो पैसा, अडका, कपडे, पुस्तकं देत राहिलो... आम्हाला आशा होती... तो आपला दत्तक मुलगा व्हावा...' होय म्हणत राहायचा. गेले काही दिवस तो संस्थेतल्या बेबी भोसलेच्या शिकवणुकीनं लांब लांब राहतो... त्याच्यासाठी संस्थेतली खोली सोडून तुम्हाला खोटं सांगून बाहेर घर घेतलं... कर्ज हाय अंगावर... मिळवायला लागलो की, पैसे देईन म्हणणारा रियाज... आता रमेश जाधव झालाय... म्हणतो कसा, तुम्ही कांबळे, मी जाधव. कसं दत्तक होणार... किती आशेनं पैका उधळला त्याच्यावर... वैरी उलटला... नासकं रक्त आपल्याच वाटेवर जाणार... मी त्यांना धीर दिला... समजावलं... रियाजला बोलावून समजावतो म्हणून सांगितलं. तसा त्यांना धीर आला.
 मी काही दिवस जाऊ दिले; पण मामा-मामीची उदासी वाढत राहिली... एक दिवस तर नोकरीच सोडून जातो म्हणाले, तसे मी रियाजला बोलवणं पाठवलं. अनेक निरोप देऊनही तो न आल्यानं मी स्वतः इन्स्टिट्यूटमध्ये गेलो... तो हबकला. त्याचे मालक देशपांडे माझ्या चांगलेच परिचयाचे होते... त्यांनी त्याला पार्टनर करून घेतलं, तेव्हा मी जामीन होतो....मागं एकदा त्याला कर्ज हवं होतं तेही मी आणि संस्थेतील एक शिक्षक जामीन होतो... या सर्व हक्कांनी मी त्याच्यापुढे उभा होतो... शर्मिंदा होता तो...
 नरमला... “दादा, मी संस्थेत येऊन उद्या भेटतो." म्हटल्यावर मी काही न बोलता परतलो.
 ठरल्याप्रमाणे तो दुस-या दिवशी आला... घडाघडा बोलू लागला. दादा, माझ्या पूर्वेतिहास तुम्हास माहीत आहे. तुमची काय नि माझी काय... एकच धडपड होती... ध्येय होते... मोठ्ठ व्हायचं. दादा, मी आता इतका मोठ्ठा, प्रतिष्ठित झालोय की, मला माझा इतिहास विसरायचा... पुसायचा आहे... माझं जग आता निराळं झालंय... चांगल्या घरातली स्थळे येतात. उलटं कसं चालायचं?
 रियाजचं हे तत्त्वज्ञान मला नवं नव्हतं... मागं एकदा असंच संस्थेत शिकून मोठ्या पदावर पोहोचलेल्या, लेफ्टनंट कर्नल झालेल्या मुलाला निरोप दिला होता... एकदा संस्थेत ये... मुलांसमोर बोल... मुलांना प्रेरणा मिळेल. त्यानं फोनवर मला समजावलं होतं, “शहाणा माणूस जखमेवरची खपली काढत नसतो... जुन्या आठवणी बळावलेल्या जखमेतील पूसारख्या असतात... पू पिळून टाकल्याशिवाय जखम भरत नाही... जखम बरी व्हायची तर खपली धरू देणं शहाणपणाचं.", मी उद्धटपणे विचारायचं ठरवून विचारलं नव्हतं... मनात आलं होतं. सांगावं, जखम बरी होते... विसरता येते... व्रण मात्र पुसता येत नाहीत... नि ते व्रण निवांत झोपही लागू देत नाहीत... माणसानं आत-बाहेर एक असावं.
 मी रियाजला त्या दिवशी काही बोललो नाही. इतकंच म्हणालो, “तू इतका मोठा झाला आहेस की, मी तुला भरवावं, शिकवावं असं वाटत नाही. जो तो आपली दृष्टी, संस्कारांना जगतो... मी, संस्था कमी पडलो, याचं वाईट वाटतं.'
 मी माझ्या कामात रियाजला विसरून गेलो... अशा अनेक अनुभवांमुळे मी माझं मन फकिरासारखं करून टाकलं होतं... 'नेकी कर और समुंदर में डाल'. वर्षा-दोन वर्षांनी मला कुणाकडून तरी कळलं की, त्यानं अमेरिकेत जायच्या आमिषानं एका मुलीशी प्रेमविवाह केला... ती श्रीमंत होती... तिला याचा पूर्वेतिहास नंतर कळला... तिनं याला त्याची जागा दाखविली... त्या दिवसांपासून तो कुणालाही दिसला नाही. मी मात्र त्याला शोधतो आहे... मला असं वाटतं... आता त्याला माझी अधिक गरज आहे... अन् मला मदतीचा हात द्यायचा पण आहे... पक्षी परतून येणार याची मला खात्री आहे. ‘सुबह का भूला, देर सही, शाम को लौटता ही है।' याची मला एव्हाना खात्री होऊन गेली आहे.

◼◼

घसरलेला पाय सावरताना...


 बिंदू, तशी गोव्याकडची. आमच्या आधारगृहात आम्ही तिला दुस-यांदा प्रवेश दिला, तेव्हा तिची आईच तिला घेऊन आली होती. तेव्हा तिला दुसरा की तिसरा महिना लागला होता. त्यांच्या घरची गरिबी होती. वडील बिंदूच्या लहानपणीच वारले होते. हातावरचं पोट होतं. आई म्हापश्याजवळच्या वस्तीत राहात होती. किडूकमिडूक पडेल ते काम करायची. वडिलार्जित दोन-एक गुंठे जागा. जागेला लागूनच कुडाचं दोन आखणी घर. दोन गुंठ्ठ्यात रान कधी रिकामं नसायचं. आंबा, केळी, सुपारीची झाडंच जास्त. जागा पाणथळची होती. तिच्या शेताचं असं काम नसायचं. ती नि बिंदू मिळून शेजारच्या कॉलनीतील बंगल्याची केरवारा, भांडीकुंडी करायच्या. या व्यापात बिंदू कधी शाळेला गेलीच नाही. ती मोठी झाल्यावर चार पैसे अधिक मिळावे म्हणून तिला दोन घरांचं स्वतंत्र काम दिलं. मायलेकी मिळून येत जात. काम स्वतंत्र करीत.
 बिंदूू ज्या दोन घरी कामाला जायची तिथं शेजारी सोनाराचं दुकान होतं. सोनाराचा तरुण मुलगा ते चालवायचा. दोन खणाचं दुकान. आत कोठी (गोडाऊन) होतं. अन् बाहेर दुकान. बिंदूला त्यानं कामाबद्दल विचारलं तशी ती पैशाच्या आमिषानं हो म्हटली. हे काम धरलेलं तिनं मात्र आईला कळू दिलं नाही. कारण पगार झाला की, आई सगळा पगार काढून घ्यायची. तिला वयात आल्यामुळे नटावं-मुरडावं वाटायचं. चेन घे, डूल घे, मेंदी, नेलपेंट लाव, असं तिला वाटत राहायचं; पण सोय नव्हती. या वरच्या कामानं तिची सोय झाली नि ती अधिकच सुंदर दिसू लागली. सोनाराच्या मुलानं एक दिवस तिला चांगलं काम करते म्हणून पैंजण दिलं तशी ती हरखली; पण ती आईला खोटं सांगत राहायची. कामावरच्या मावशींनी दिलं. पाहुणे आले त्यांनी बक्षिसी दिली इ.
 सोनाराच्या कामावर तिचं घुटमळणं एव्हाना वाढलं होतं. दुकान उघडलं की बिंदू आत जायची. मालकही आत बाहेर घुटमळत राहायचा. दोघांचं संधान जुळलं. पाळी चुकली तशी आई जागी झाली अन् तिच्या चौकशीतून सारं पितळ उघडे पडलं. ज्या कामावर आई जायची तिथं हे लक्षात आल्यावर त्यापैकी एक डॉक्टर असलेल्या कुटुंबांनी आईला मदतीचा हात दिला. तिला मोकळं केलं. त्याच दरम्यान आमच्या आधारगृहाची माहिती गोव्यातल्या ‘सकाळ'मध्ये आली होती. डॉक्टरबाईंनी तिला समजावून देऊन चिठ्ठी देऊन आमच्याकडे पाठवलं.
 एका सुट्टीत गेलेली बिंदू तीन-चार महिने झाली तरी परतली नव्हती. परतली तेव्हा परत तिला दिवस गेलेले. तेही त्याच मुलाकडून समजल्यावर मात्र आम्ही तिला प्रवेश नाकारला. तशी आई ओकसाबोकशी रडू लागली. आईसाठी म्हणून तिला प्रवेश दिला; पण सुट्टी न मिळण्याच्या अटीवर. तशी बिंदू गप्प-गप्प राहू लागली. ती पहिल्याप्रमाणे पोट पाडायला काही तयार नव्हती. लाख समजावलं पण ऐकेना... मग संस्थेत रीतसर तिचं बाळंतपण झालं. तिला मुलगी झाली.
 मुलगी चिकू बालवाडीला जाऊ लागली तशी बिंदूला आम्ही समजावलं की उभं आयुष्य आहे. चिकूला दत्तक देऊ. तुझं लग्न करू. असं सुचवण्याचंही कारण होतं. संस्थेतलं तिचं वागणं आम्हाला संशयाचं, धोक्याचं वाटू लागलं होतं. योगायोगाने त्याच वेळी एक बिजराचं स्थळ चालून आलं होतं. तिची लग्नाची अट होती, आपल्या जातीपैकीच हवा. तेही जुळून आलं. योग्य स्थळी नि तेही आमच्याच संस्थेच्या गावी राहणार म्हणून आम्हीही जोर धरला. त्याचं कारण ती आमच्या सर्वांच्या नजरेत राहील.
 बिंदूचा संसार चांगला सुरू होता. नवरा केटरिंगचं काँटॅक्ट घ्यायचा. दोघं मिळून चांगला संसार करू लागली. घरी नव-याची चुलत बहीण लक्ष द्यायला होती. बिंदू अध्ये-मध्ये भेटायला यायची. तिच्या बाई, स्टाफ कोणीतरी जात येत राहायचं. खुशाली कळत राहायची. आज काय कपाट घेतलं, उद्या काय पंखा घेतला म्हणून सांगत यायची. दोन वर्षे झाली तरी घरात पाळणा हालला नाही म्हणून मी बाईंना विचारायला सांगितलं. बाईंनी विचारताच तिचा बांध फुटला... ‘तुम्ही दोनदा माझा घसरलेला पाय सावरला... उगीच तक्रार नको म्हणून सांगितलं नाही... हे माझ्याशी संबंधच ठेवत नाहीत... त्यांचे नि बहिणीचे संबंध आहेत. त्यांनी मला कामाला मोलकरीण म्हणून आणलंय... त्यांना जगाला दाखवायला बायको अन् कामाला हक्काची बाई हवी होती. माझ्यासमोर त्यांचं सारं चाललेलं असतं. मला सारखं टाकून बोलतात... घसरलेल्या पायाची... मी वाद करत नाही. सांगून बघितलं. दादांना सांगितलं तर गळा आवळीन म्हणून दम भरतात. अनेक गोष्टी तिनं बाईंना सांगितल्या. बाई तर फारच अस्वस्थ होत्या. मी विचार करून बिंदूच्या नव-याला बोलावणं पाठवलं. येतो म्हणायचा, पण टाळायचा. तिसरा निरोप मी निर्वाणीचा दिला तसा तो बिंदूला घेऊन आला. मुकाट्यानं उभा होता चोरासारखा. बस म्हटल्यावर अंग चोरून बळेनंच बसला.
 बिंदूचा नवरा अरविंद गुणी व कामसू होता; पण तो बहिणीच्या मुठीत होता. बहीण अविवाहित होती. चुलत भाऊ एकटा करून खातो म्हणून येऊन राहिलेली. अरविंदला विचारल्यावर सर्व सविस्तर सांगितलं... कबूल केलं. मी आणि बाईंनी त्याला समजावलं; पण माझ्या लक्षात आलं की, बहीण असेपर्यंत बिंदूची डाळ शिजणार नाही. मी दुस-या दिवशी बहिणीला घेऊन यायला सांगितलं. तसा तो गयावया करू लागला. मी पोलिसांत तक्रार देईन म्हटल्यावर तयार झाला. ठरल्याप्रमाणे दुस-या। दिवशी अरविंद बहिणीला घेऊन आला. आम्ही एकेकाला विश्वासात घेऊन ज्याचं माप त्याच्या पदरात टाकलं. शेवटी सर्वांना एकत्र घेऊन ठरलं की, बहिणीनं गावाकडं घरी जायचं नि परत यांच्या संसारात विष कालवायचं नाही. काही गडबड केली गावाकडे सर्व प्रताप येऊन सांगणार म्हटल्यावर ती निमूट तयार झाली. शिवाय बिंदू शासनाची मुलगी आहे. तिने तक्रार केली की तुरुंगात जायला लागणार म्हणून खोटेनाटं धमकावलं. ती मात्रा लागू पडली नि बहीण सरू गावाकडे गेली ती कायमचीच.
 बिंदूचा संसार अपेक्षेप्रमाणे सुरळीत सुरू झाला. अन् तिला मुलगा झाला; पण बिंदूचं रहाटगाडगं एवढ्यावर संपेल तर शप्पथ. बाळ होताच तिनं नव-याला सुख देणं बंद केलं. तसं अरविंद संस्थेच्या चकरा मारू लागला. बाईंना भेटला. एकदा मलाही. मी बाईंना बिंदूला समजून सांगा नि तिचं काय म्हणणं आहे बघून घ्यायला सांगितलं. बिंदूला दुसरं मूल नको होतं. ती ऑपरेशन करून घ्या किंवा माझं तरी करा म्हणून मागं होती. नवरा काही तयार नव्हता. त्याची दोन कारणे होती. तो सांगत होता त्याप्रमाणे त्यांच्यात पुरुष ऑपरेशन करत नाहीत... गावाकडे चिडवतात. दुसरं तिचंही ऑपरेशन करायला तो तयार नव्हता... मनात कुठं तरी संशय होता असं लक्षात आलं. इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती होती. थोडा विचार करा असे सांगून वेळ घ्यायला हवी, असं मला वाटलं. बाईंना तुम्ही पण विचार करा असं सुचवलं.
 काही दिवस गेले नि अरविंद सरूला घेऊन संस्थेत दत्त. काय विचारताना म्हणाला, “बिंदूचे दोनदा पाय घसरले... तुम्ही तिला सावरले... हिला पण एकदा सावरा. बिंदूला कळू देऊ नका. मी हिला वचन दिलं होतं. बिंदूप्रमाणे तुला पण तुझा हक्क देईन... बाळ देईन." त्याच्या ठिकाणी तो बरोबर होता. सरूला सावरायला पाहिजे होतं, हेही खरं. बिंदू ऑपरेशन करून मोकळी करणं पूर्वानुभवामुळे धोक्याचं... अशा विचित्र कात्रीत संस्था... मी... बाई होतो.
 मी विचार करू लागलो... आपण, संस्था जे कार्य करतो ते आपत्ती व्यवस्थापन आहे, की आपत्ती निमंत्रण... हे आपत्ती नियंत्रण कसं होईल? पण हा अत्यंत दूरचा प्रवास आहे. समाजमन घडवणं ही दीर्घकालीन कामगिरी मात्रा सर्वांना सारखी कधीच लागू पडत नाही. कारण व्यक्ती हे। विचित्र रसायन आहे. वैचित्र्य हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. व्यक्ती, व्यक्तीमधील भावनिक गुंतवणूक व गुंता त्याचे अनेक पदर असतात. हा गुंता सोडवणं अवघड काम असतं. गुंता सुटून धागा सरळ तर व्हायलाच हवा; पण मध्ये गाठ राहता नये हे पाहावं लागतं. त्याचसाठी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक यांची अनिवार्य गरज असते.
 आम्ही सरूला प्रवेश देऊन दुस-या संस्थेत परगावी ठेवायचा निर्णय घेतला. तिला मोकळी करून लग्न करायचं ठरवलं. दरम्यान अरविंद आणि बिंदूला दर महिन्याला संस्थेत बाईंना भेटायची सक्ती केली. हा क्रम तीन वर्षे संयमाने व व्रतासारखा करत राहिलो. एक दिवस बिंदू, रवींद्र, त्यांचा रमेश, सरू, तिचा नवरा, तिची मुलगी हेमा सर्व जण मिळून पाया पडायला आले. म्हणाले, “आम्ही दोघांनी एका ठिकाणी रो हाऊसिंगमध्ये जुळे घर घेतलंय. वास्तु प्रवेश दादा तुमच्या हस्ते करायचा आहे. वास्तुशांतीनिमित्त संस्थेतल्या सगळ्यांना आम्ही जेवण ठेवलं आहे. या बरं का?"

 जग बदलतं... घसरलेले पाय सावरतात... माणसं बदलतात... तुमचा चांगुलपणावर अटळ विश्वास हवा. आज माझ्या लक्षात येतं... निराळं जग, निराळी माणसं आहे म्हणून समाजाचा समतोल आहे... समाज कृपण आहे नि कृतज्ञही! तुम्हाला सांगड घालता आली पाहिजे. संस्थात्मक काम सोडून एक तप पूर्ण होत आलं. गेल्या तपात ही संस्थाबाह्य किती प्रश्न आहेत, हे लक्षात आल्यावर मी तप करत राहिलो. कुणाला धीर दे, कुणाचे समुपदेशन कर, कुणाचं संयमानं ऐकत राहा, कुणाला पैसे दे, कुणाला पुस्तक... अडेल त्या गाडीला हात द्यायचा. चाक आवाज करू लागलं की वंगण घाल, पलीकडच्याला जाणीव असो नसो... करत राहा, हे करणं केवळ समाजाचीच गरज नसते. ती माझीही असते. कारण आज माझं आयुष्य निष्प्रश्न होऊन सुखाच्या अवकाशानं मोकळं आहे. ते भरणं माझी गरज असते. पूर्वी माझं प्रश्नांनी भरलेलं आकाश कुणीतरी असंच हात देऊन निरभ्र केलं होतं. आज मी तेच करतो आहे. असं प्रत्येक पिढीत घडत असावं. झीज नि भर हाच तर सामाजिक अविनाशत्वाचा सिद्धांत... मला गवसलेला... बिंदू-बिंदूतून सिंधु उदयला!

माझं रुक्मिणीहरण


 तुम्ही कधी तुरुंगात गेलात?
 कधी भेट दिलीत तुरुंगाला?
 नाही ना?
 तुम्ही भाग्यवान आहात! चुकूनसुद्धा जाऊ नका. माणसानं जायची ती जागा नाही. पण काय करू? मला मात्र जावं लागलं. मुद्दाम नाही गेलो. कसा गेलो ते माझं मलाच कळलं नाही. अन् तुरुंगात गेल्याला पण चारपाच वर्षं उलटून गेलीत... अजून किमान तितकी तरी घालावीच लागणार... प्रयत्न आहे शिक्षा कमी व्हावी... मला 'माणूस' म्हणून जगायची प्यास आहे. तसा मी काही हैवान नाही... नव्हतो ही! पण 'त्या' क्षणी मी 'माणूस' राहिलो नव्हतो हेही तितकंच खरं आहे. निदान आज तरी तसं वाटतंय.
 त्याचं असं आहे की, आता तुमच्याशी काय लपवून ठेवायचंय? अन् लपवायला राहिलंच काय आहे माझ्याकडे? माणूस एकदा का नागडा झाला... मग त्यानं निकर घातली. काय नि सूट... सारं व्यर्थ असतं... गौण ठरतं.
 तसा मी रूढ अर्थाने ‘सुशिक्षित आहे. मुंबई विद्यापीठातून बी. एस्सी. झालेला मी. मूळचा पनवेलचा. सुभाना येशू बोराडे. हल्ली वय वर्षे ३५. सध्या एका मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय... गावाचे नाव नाही सांगत... उगीच मग तुम्ही ‘दया' दाखवत भेटायला याल. मला त्या ‘दया' ह्या शब्दाचा अलीकडे तिटकारा येऊ लागला आहे. माणसं कुत्र्याच्या पिल्लाला चुऽऽचु करत चुचकारतात अन् त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. असं पाळीव, पराधीनपण होणं मला नको आहे. मी जो जसा असेन तसं तुम्ही मला स्वीकारायला हवं असं वाटतं... मी चूक केली हे खरं आहे... क्षणाची चूक अन् आयुष्यभर शिक्षा ही विषमता मला अमान्य आहे... मी सांगितलंय ना... हो, मी बायकोचा खून केलाय. माझ्याच आणि हैवान म्हणून नाही, माणूस म्हणून... खरं म्हणजे माणूस होतो म्हणूनच बायकोचा खून केला. तुम्ही सांगा ना मला. 'बायको' आणि 'मादी' मध्ये फरक आहे ना? मादीला योनिशुचिता नसते... तिला असते नुसती खाज... तिला नवरा नको असतो... हवा असतो नर... कोणीही! मी सुख देत असताना तिनं दस-याला वश व्हावं याचा मला राग आला... मी मनानं नसेन, शरीरानं मर्यादापुरुष होतो... तिनंही शरीरानं सावित्री असावं अशी माझी अपेक्षा होती... ती अहिल्या झाली... डोकं भडकलं... सपासप वार नाही करावे लागले... एका वारातच गेली... जाब, जबाब, पुरावे काही करायची गरज नव्हती... मी आतून, बाहेरून एक होतो... आहे. खरं म्हणजे मी नैतिकतेच्या आग्रहामुळेच गुन्हेगार ठरलो.
 चांगल्या घराण्यातली म्हणून तिला वरकड खर्च करून आणलं होतं... नोकरी, शेती सारं करत संसाराची कसरत करत होतो... माझ्याही जीवनात मोहाचे क्षण आले... नाही असे नाही... पण तिथंच तर माणसाची कसोटी असते ना? ती शेजारच्या विठ्ठलाच्या नादाला लागल्याचे मित्र सांगायचे... मी विश्वास नाही ठेवला... पुरुष स्त्रीशी बोलतो... स्त्रीनं पुरुषाशी बोलणं मी गैर मानायचो नाही... माझा विश्वास होता तिच्यावर... मी माझ्या नजरेनं जग बघायचो... मला वाटायचं... ते माझ्यासारखंच आहे... पण निराळं जग... निराळी माणसं बघितली नि माझं सटकलं... माझ्याच बिछान्यावर विठ्ठलला झोपलेलं पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ताकीद देऊन सोडलं... म्हटलं माणूस आहे... चुकणार... सुधारायची संधी द्यायला पाहिजे... माझ्यापुढे माझे गुरुजी होते. हायस्कूलला असताना मी वाहात निघालो होतो संगतीनं. फराकटे गुरुजी होते... कोल्हापूरचे... म्हटले होते... ‘सुभाना, अरे येशुदाचा नारे तू? बाप कुठं, तू कुठं? तो घाम गाळतो तुझ्यासाठी... हे काय सिगारेट फुकायचं वय? फुकायची तर आप कमाईवर... बाप कमाईवर नाही... त्या आगरी पोरांवर जाऊ नको... त्यांच्या जमिनीच्या तुकड्याला पण सोन्याचा भाव आहे. एमआयडीसी आल्यापासून तर स्वर्गातच आहेत ते. तुझा तुकडापण नाही... त्या दिवसांपासून मी कानाला खडा लावला... पण राग काही आवरता नाही आला त्या दिवशी... घोटाळा सारा त्या रागाचाच.
 मी विठ्ठलचा खून करू शकलो असतो... पण विचार केला... आपलं नाणं खोटं. दुस-याला दोष देऊन काय उपयोग? एक दिवस तिनं मला झिडकारलं... परत परत झिडकारलं... मी पुरुष असून विनवण्याच करत राहिलो... पुरुष असून म्हणजे स्त्रीला कमी नाही लेखत... पण स्त्रीचा आदर करूनही... तिच्यावर मी बलात्कार करायचं टाळायचो... तिच्या कलानं, घ्यायचो... वाटायचं, तिनं पण माझ्या कलानं घ्यावं... पण हळूहळू लक्षात आलं की माझा मोठेपणा तिला बुळा वाटू लागला... गोडीत राणी म्हणायचो... ती सरकार म्हणायची... पण राज्याला दृष्ट लागली. विठ्ठल अस्तनीतला निखारा निघाला... नुसतं चारित्र्याच्या संशयावरून खून नाही केला... हा सूर्य अन् जयद्रथ करूनही... जरासंध वठला नाही... धड परत चिकटत राहिलं अन् मी पशू झालो... माणूस नावाचा पशू... माणूस म्हणून रहाणारा, वागणारा... तुमच्या लेखी पशू,... माणूस नावाचा पशू, हैवान!
 निकालपत्रात लिहिलंय... भारतीय दंड संहिता कलम ३०२ खाली गुन्हा सिद्ध होत असल्याने... सदोष मनुष्य वधाचा गुन्हा... जन्मठेप व रू. .. दंड... दंड न भरलेस... इतकी आणखी शिक्षा... दंड भरलाय... शिक्षा कमी झालीय.... तरी किमान चौदा वर्ष तुरुंगात काढावीच लागणार आहेत...
 तुम्ही तुरुंगात नाहीत ना आलात? खरंच भाग्यवान आहात... एकदा का तुम्ही कायद्याच्या चौकटीत गुन्हेगार झालात की तुमचं जगच बदलून जातं... जीवन बदलतं...
 ज्या दिवशी रुक्मिणीचा खून केला... तिला तिचा विठ्ठलच हवा होता याची खात्री झाल्यावर... मी पळून नाही गेलो... कांगावा नाही केला... ओरडत रडत होतो... पुरुषासारखा पुरुष असून बाईसारखा रडत होतो... तो एक वाराचा क्षण सोडला तर मी मनुष्य होतो... माझी चूक कळाली. पण... बूंद से गयी... हौज से कहाँ भरेगी? अलीकडे रोज हौद उपसतो हो पश्चात्तापाचा... एकच इच्छा आहे... सुधारायची... सिद्ध करायची संधी द्या!  पोलिसांनी अटक करून मला पनवेलच्या चौकीत नेलं... वाईट साईट बोलत राहिले... मी गप्प होतो... खून झालेल्या दुस-या क्षणी मी परत मनुष्यच झालो होतो. पण कुणाचाच विश्वास नव्हता... कोण पुढे यायला धजत नव्हतं. ना बाप ना भाऊ... मला त्या क्षणी गरज होती. कुणीतरी मला समजून घ्यावं... आपलं म्हणावं... पण सगळे मला सर्कशीतल्या सिंहाप्रमाणे बघत राहिले... पोलीस पण भीतच आत आले होते... कारण चाकू अजून हातात होता... खरं तर मी मूठ सोडू पाहात होतो... पण इतका एक्साईट होतो की सुटत नव्हता... माझं मलाच काही कळत नव्हतं...
 दुस-या दिवशी सकाळी १०.०० वाजता कोर्टात नेलं... मला न्यायालयीन कोठडी मिळाली... सगळं कबूल केलं होतं... कबूल होतं... न्यायाधीश चांगले वाटले... कुणी काही त्रास दिला का? मदत पाहिजे का? विचारलं... त्यांनी मला असं विचारावं याचं आश्चर्य वाटलं... मी मानेनेच नाही... नको... म्हटलं. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं काही वाटलं नाही... हां, पोलीस चौकीत जाऊ नये हे मात्र खरं! गुन्हा कबूल म्हटल्यावर तुच्छ का वागवावं! गुर्मी नाही... उद्धटपणा नाही... गुन्हेगार माणसासारखा वागला तर त्यांनी पण माणसासारखं नको का वागायला?
 दुपारी दोनला तुरुंगात गेलो... चौकी, न्यायालय अन् आता तुरुंग... चोवीस तासात तीन शॉक बसले.. हा तिसरा शॉक सिव्हियर... झटका होता... पोलीस गाडी, बेड्या... तो बुलंद दरवाजा... नोंद... कपडे बदलले. बंदी क्रमांक... पांढरा शर्ट... पांढरी चड्डी... पांढरी टोपी, त्यावर एक-एक काळी रेघ... सिंबॉलिक होती असं वाटलं... बरॅकमध्ये चोवीस तास उलटले नसतील... मी या परग्रहाचा एलियन होऊन गेलो... व्हावंच लागतं तुम्हाला. न होऊन कुणाला सांगतो?
 आता मी पॅवलॉवचा कुत्रा झालो होतो... मॉडर्न टाइम्समधला चार्ली... सारा खेळ शिवाजी म्हणतो... तसा. हळूहळू लक्षात येत गेलं... एक उंच भिंत, बरॅक, बंदिवास सोडला तर इथं सारं अलबेल असतं... टाइम टू टाइम... काट्याला काटा... जेवण मोजून... पाणी मोजून वापरायचं... संडासची गम्मतच... आतून कडी नाही... काही संडासांना दारच नाही... लाइट मात्र सगळीकडं... आत, बाहेर, व्हरांडा, अंगण, चार भिंतीबाहेर... हेऽऽ मोठे हॅलोजन. रोज दिवाळी, दसरा... भारनियमनाचा ठाव नाही... डॉक्टर पण... मात्र औषधं बँडचीच... पोलीस, जेलर चांगली माणसं... आम्ही त्यांना 'बाबा' म्हणतो... यातच सर्व आलं!
 माझ्या तारखा लागायच्या... प्राण कंठाशी यायचा... जीव टांगणीला लागायचा... कुणाला देव भेटला की नाही माहीत नाही... तुकारामाला विठ्ठल भेटला होता म्हणे (मला पण... पण दुसरा!)... मृत्यू मात्र मला भेटला... भेटत राहिला... तारखेच्या दिवशी मृत्यू दिसायचा... भेटायचा... कसा ते नाही सांगता येणार... जावे त्याच्या वंशा... तहान लागायची... घाम यायचा... फाशीचा दोर दिसायचा... वधस्तंभाकडे आपण निघालो आहोत असं वाटत राहायचं... लवकर लवकर सगळं आवरून बसायचो... पोलीस गाडीची वर्दी केव्हा येईल याची वाट पाहात राहायचो... इतर बंदीपण बरोबर असायचे... दुस-या बरॅकमधले पण... त्यानिमित्त परत माणसात यायचो... रस्ते, माणसं, मोटारी... दुकानं, हॉटेल्स... अधाशासारखा पहायचो... कधी सरकारी वकील नसायचे... कधी साक्षीदार... कधी बंदोबस्त नाही म्हणून तारीख चुकायची... हे सारं जीवघेणं असायचं? केव्हा एकदा निकाल लागेल असं वाटायचं!
 वाटायचं बक-या, कोंबड्यासारखे एक घाव दोन तुकडे व्हावे... इंतजार का फल मीठा होता है, हे खोटं आहे... खट्टा होता है हेच खरं!
 अजून निकाल लागायचा होता... तारखा वाढतील तसा मी भेदरत होतो... एक दिवस फणफणलो... दोन दिवस तुरुंगातल्या दवाखान्यात अॅडमिट होतो... डॉक्टर चांगले होते... वॉर्डबॉय बंदीच होते. भाऊच होते... पण इथं भावकी नव्हती, भाऊबंदकी नव्हती. भेद, स्वार्थ नव्हता... सर्व समदुःखी, पण काही क्षण समसुखी होतो... मग ताप उतरेना म्हणून मला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं... तिथले डॉक्टर्स, नर्स, आया, वॉर्डबॉय... इतर पेशंटशी माणूस म्हणून असतील, बरे वागायचे. पण आमच्याशी... बंदी बांधवांशी वैर होतं त्यांचं... सारी उपकाराची भाषा... तुच्छ व्यवहार... खून केल्याचा पश्चात्ताप पोलीस, डॉक्टरांच्या सान्निध्यात अधिक वाटायचा... कुपणानंच शेत खाल्ल्यावर कुणाकडे दया। भाकायची... जेव्हा धीर हवा असायचा... ही माणसं मोठी धीट व्हायची... वाटायचं, त्यांनी नीट वागावं...
 मी मधे मधे रजेवर गेलो आहे... पॅरोलवर.. चांगलं वागलो... मुदतीत परत आलो... जेलची शिफारस भेटली... सद्वर्तणुकीची... चांगली वर्तणूक ठेवूनही पोलीस रिपोर्ट केव्हाच चांगला आला नाही... माझाच नाही... इतर अनेक जण तेच सांगायचे... छापील रिपोर्टासारखे असायचं ते... जेलर सांगायचे... दोन रिपोर्ट एकसारखेच... झेरॉक्स नसले तरी झेरॉक्सच!
 निकाल लागल्याला आता सात वर्षं उलटलीत दादा... अजून सात वर्ष शिल्लक आहेत. रोज मनाच्या भिंतीवर रेघ नाही... ओरखडा ओढतो... इथं दिवस उगवतो... पण सूर्य लवकर मावळत नाही... इथं तुरुंगात रात्र होते, पण ती सरता सरत नाही... डोळ्याला डोळा लागत नाही... इथं घोरण्याचा आवाज नसतो... सगळे कुशी बदलत झोप घेण्याचा प्रयत्न करत असतात... डोळे मिटून पडणं म्हणजे इथे झोपणं असतं... डोळ्यांसमोर रोज विठ्ठल नि रुक्मिणीच असते.... प्रत्येकाचं वादळ वेगळं, वारा न्यारा!

 आताशा मात्र मी दोघांनाही माफ केलंय! गेल्या सात वर्षांत मला एकच कळून चुकलंय दादा... माणसानं क्षणावर विजय मिळवायला हवा! मोहाचा क्षण... रागाचा क्षण... मत्सराचा क्षण...! तुरुंगानं मला काही शिकवलं असेल तर हेच... माझी खात्री आहे.. २०१७ साली मी सुटून जेव्हा बाहेर येईन तेव्हा मोह, राग, मत्सरमुक्त असेन. आता मला दुस-याच्या अंगणात पारिजातकाचा सडा जरी पडला तरी त्याचा वास येणार नाही हे मात्र नक्की. माझं रुक्मिणीहरण नाटक, आता परत त्याचा दुसरा प्रयोग नाही.

एका स्वप्नाशी झटापट


 मी संस्थेत नित्याप्रमाणे काम करीत होतो. एवढ्यात एक बाई ‘‘मे आय कम इन?" असं म्हणत आत आल्या. मी “या, बसा' म्हणत स्वागत केले. तसं बसत त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड माझ्यासमोर टेबलावर ठेवलं. 'डॉ. सुषमा भोसले, एम्. डी. (इंडोक्रायनॉलॉजी) उमा क्लिनिक, बार्शी, जि. सोलापूर. “माझा एक प्रॉब्लेम आहे. तुमच्या संस्थेबद्दल ऐकून आहे. म्हणून सोलापूर, पंढरपूर ओलांडून इकडे आलेय." त्या ब-याच तणावाखाली आहेत असं जाणवत होतं. “तुम्ही रिलॅक्स व्हा... हे पाणी घ्या... हवं तर चहा मागवतो' म्हणत मी बेल वाजवली. शिपायास चहा, पाणी आणायला सांगितलं, तशा त्या थोड्या सैल होऊन बसल्या नि बोलू लागल्या.
 “मी बार्शी, सोलापूर इथं प्रैक्टिस करतेय. माझ्याकडे एक प्रॉब्लेमेटिक केस आली आहे... तुम्ही मदत कराल, मार्ग काढाल, असं कळल्यावरून आलेय. एक गरीब कुटुंब आहे. आई, वडील, त्यांची दोन मुलं... मूळचे ते वाशिमकडचे. इकडे सोलापुरात गिरणीत काम मिळालं म्हणून आले. गरिबीचा असला तरी सुखाचा संसार चालला होता. एक दिवस वडील काही कामानिमित्ताने कुडुवाडीतून बार्शीला जात होते. पंढरपूरची वारीची गर्दी परतत होती. दारात लटकत प्रवास करत होते. गर्दीच्या चेंगराचेंगरीत ढकलाढकलीत फेकले गेले. अधू झाले हाता-पायांनी... तशी नोकरी गेली. अपघाती विमा, ग्रॅच्युईटी इत्यादीचे थोडेबहुत पैसे हाती आले... छोटी-छोटी कामं करत राहिले. त्यांची मंडळी धुणी-भांडी करायला लागल्या. काही तरी करत दिवस ढकलत होते; पण एका नव्याच संकटाने मजकडे आलेत.
 त्यांची दोन मुलं आहेत. पैकी एक वयात यायला लागला आहे. दुसरा पण उंबरठ्यावर आहे. मोठा मुलगा वसंत वयात यायला लागलेला... त्याची वाढ मुलीसारखी व्हायला लागलीय... छाती भरायला लागली आहे. लहानपणापासून मुलींतच असायचा; पण आता मोठा व्हायला लागला तसा चेष्टेचा विषय होऊन बसलाय... घरी कोंडून घेऊन राहतो... तसं आईनं धुणी-भांडी करायला ज्या डॉक्टरांकडे जायची त्यांच्याकडे हा विषय काढला... त्यांनी त्याची तपासणी केली आणि चिठ्ठी घेऊन माझ्याकडे पाठवलं.
 काही मुला-मुलींबाबत अशा बदलाचे प्रसंग येतात... ओढवतात. लहानपणापासून मुलगा म्हणून वाढलेला, वाढत्या वयात मुलगीसारखा वाढू दिसू लागतो... याउलट लहानपणी मुलगी म्हणून वाढलेली... कळत्या वयात मुलगा दिसू लागते... वसंतात मुलीची लक्षणं दिसू लागलीत... तिचा छोटा भाऊ किरणची पण तपासणी केली... त्याचंही असंच होणार असं दिसतंय! ब-याचदा जे सुशिक्षित असतात त्यांच्या मुला-मुलींचे प्रश्न निर्माण होणाच्या काळातच सुटतात... अज्ञान व गरिबीमुळे मात्र या कुटुंबाची वाताहत झाली आहे खरी! आधी अपघात... मग ओढाताण... बेकारी... रोज जगणं म्हणजे युद्धाचा प्रसंग... आत्ता कुठे दोन घास सुखानं पोटात जाऊ लागले तोवर वसंताचा गोळा पोटात उभा... किरणदेखील हेच वादळ घेऊन येणार... सारं कुटुंब नुसतं कसं हादरून गेलंय... ज्वालामुखीवर बसलंय असं वाटतं.
 आम्हाला तुमची एक मदत हवी आहे. आम्ही या दोन मुलांना मुली म्हणून तुमच्या संस्थेत दाखल करू इच्छितोय... मुलींच्या संस्थेत राहिल्या तर त्या मुली होऊन जातील... त्यांचं योग्य वेळी ऑपरेशन करता येईल... लिंग बदलाचं ऑपरेशन. हा प्रश्न सुटायला तुमची मदत हवी आहे. त्यांचं नाव, पोषाख, वागणं बदललं की ऑपरेशन एक औपचारिकता आहे."
 मला हा प्रश्न नवा होता. आमच्या संस्थेच्या जीवनातलाही हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा... मी असा प्रश्न ऐकूनही नव्हतो. इतक्या वर्षांत मला मदर टेरेसांचं वाक्य आठवलं, “वर्क अॅकॉर्डिंगली' प्रसंग पाहन कार्य करा! त्यांना मदत तर करायलाच हवी होती. मी हिय्या केला, पण हे काम सोपं नव्हतं. रिस्कही होती, मुलींच्या संस्थेत मुलं ठेवायची. मी नि डॉक्टरांनी यासाठी थोडा वेळ घ्यायचं ठरवलं. मोठ्ठ्या मुलाचं वसंताचं नाव वासंती करायचं. छोट्या मुलाचे किरणचं नाव तेच ठेवायचं. ते मुलाचंही असतं नि मुलीचंही... बदलायची गरज नव्हती. पालकांचा वस्तुस्थितीदर्शक अर्ज घ्यायचा. सोबत डॉक्टरांचं पत्र, प्रमाणपत्र जोडायचं. योग्य वेळी दोघांची ऑपरेशन्स करायची आणि त्यांना गाव बदलून सुस्थापित करायचं.
 आमच्याकडे बालगृह, निरीक्षणगृह, आधारगृह तिन्ही प्रकारच्या मुलींच्या संस्था होत्या. छोट्या किरणला मुलींच्या निरीक्षणगृहात तर वसंतला वासंती म्हणून महिला आधारगृहात ठेवायचं ठरलं. हे सारं संस्थेत माझ्याशिवाय फक्त अधीक्षिकेलाच माहीत होतं. ते त्यांच्यापुरतंच माहीत राहील अशी काळजी घ्यायचं ठरलं. शिवाय इतर मुलींपासून या दोघांचं राहणं, झोपणं, वेगळं राहील याची काळजी घ्यायचंही ठरलं... ते महत्त्वाचं होतं. तत्पूर्वी आम्ही महिनाभरात दोन-तीनदा आई, वडील, मुलं, डॉक्टर, अधीक्षिका, मी अशा एक दोन अनौपचारिक, बैठका घेऊन कसं राहायचं, पथ्य काय पाळायची इ. विषयी आपसांत बोलून, ठरवून घेतलं. संवाद, चर्चा, शंका, समजावणं सारं केलं... हे सारं संस्थेबाहेर घडवून आणलं. कारण संस्थेत आम्हास याचा बभ्रा नको होता.
 महिनाभरानंतर वासंती व किरण मुली म्हणून संस्थेत आल्या... राहू लागल्या. डॉक्टरबाई अधी-मधी येऊन भेटत, बोलत, उपचाराच्या अंगाने काळजी घेत राहायच्या.
 ती दोन वर्षं मात्र मी नि त्या अधीक्षिका विलक्षण तणावाखाली होतो... माझ्यापेक्षा त्या अधिक... रोज मनात पाल चुकचुकत राहायची. हा एक अंगलट येणारा प्रयोग होता. विषाची परीक्षाही होती. वासंती सोळा वर्षांची होऊन आम्ही तिला आई-बाबांच्या ताब्यात दिली. एव्हाना ते पालक सोलापूर सोडून कोल्हापूरला राहू लागले होते. वासंती समाजाच्या, शेजाच्यापाजाच्यांच्या लेखी मुलगीच होती. एस.एस.सी. झालेल्या वासंतीला आमच्यापेक्षा परिस्थितीनं बरंच शिकवलं होतं.
 ती ज्या झोपडपट्टीत राहात होती तिथं तिनं संस्थेकडून प्रेरणा घेऊन छोटी-मोठी मदत करायला सुरुवात केली. तिला संस्थेत असताना हे समजावण्यात आलं होतं की, ज्यांचे जीवन वादळ घेऊन जन्मतं... सोसाट्यांचे वारे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असतात. त्यांच्या हातात एकच असतं... तो वा-याची दिशा बदलू शकतो. झुंजून... झटापटीत परिस्थितीलाच थकवायचं... शरण यायला भाग पाडायचं... आपण मात्र कधीही परिस्थितीला शरण जायचं व्हायचं नाही. मग एक दिवस वाराच काय वादळही शमतं... शरण येतं... शरणागत होतं. वादळवाटाच मग पाऊलवाटा होऊन जातात... त्या थकलेल्या वाटसरूंना दिलासा देतात... वाट दाखवितात.
 काही दिवसांनी वासंती पिग्मी बचत गोळा करायचं काम करू लागली. घरोघरी तिचा राबता... संपर्क सुरू झाला. आईची धुण्याभांड्याची कामंही इथंही सुरू होती. वडील आज अंथरुणाला खिळले होते. पत्र्याच्या खोलीतून झरणारे कवडसे त्यांच्या मनात किरणांची स्वप्नं पेरत राहायचे... वासंतीच्या जीवनात वसंत ऋतू यावा... ती उजवली जावी, असं मनोमन वाटत राहायचं... ते एका घोर लागलेल्या बापाचं स्मरणरंजन... स्वप्नरंजन असायचं. वासंतीला ते न सांगताही कळत राहायचं... एव्हाना तिची झटापट आपल्या परीनं सुरू असायची... कधी मोडायची, वाकायची... तुटली, हारली असं मात्र कधी झालं नाही.
 दोन-चार वर्ष अशीच निघून गेली अन् महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. झोपडपट्टीत एकच गोमगाला सुरू झाला. वासंती वाशिमकर... अपक्ष उमेदवार... कप बशीपुढे फुली मारा... वासंती वाशिमकरांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, म्हणत साच्या कुडाच्या भिंती रंगल्या... वासंतीवर मोठे पक्ष दबाव आणू लागले... धमक्या सुरू झाल्या... पण ती बधली नाही. लोकांनीच तिला उभं केलं होतं. लोकच वर्गणी गोळा करायचे. गेल्या दोन निवडणुका जिंकणाच्या अशोक लवांगरेविरुद्ध अर्ज भरायचा खायचं काम नव्हतं... पण फॉर्म भरायच्या दिवशी आख्खी झोपडपट्टी रोजगार बुडवून हजर राहिली अन् एका अर्थाने निवडणुकीचा निकालच जाहीर झाला. विरोधकांचं धाबं दणाणलं. वासंतीच्या विजयाची घोषणा आता एक औपचारिकताच होऊन राहिली.
 वासंतीचं पिग्मी गोळा करणं नि मत मागणं एकाच वेळी होत राहिलं... ती भेटेल त्याला एकच सांगत राहायची... गरिबाची कळ गरिबालाच येणार... आपण एकीनं राहू... झोपडपट्टी सुधारू... नुसतं ओळखपत्र, रेशनकार्ड मिळालं म्हणजे झालं नाही... वीज, गटार, रस्ते, पाणी, संडास... सगळं आपल्याला मिळाय हवं. दवाखाना व्हायला हवा... झोपडपट्टीत राहणारे बीड, उस्मानाबाद, वाशिम, पंढरपूरहून आलेले... सगळ्यांना वासंती आपली मुलगी वाटायची.  वासंती नगरसेविका झाली. तिचं जग बदललं... जीवनही! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईची धुणी-भांडी बंद झाली. वासंतीला आपल्या परिस्थितीचं चांगलं भान होतं... ऑपरेशन झालं तरी आपण आई होऊ शकणार नाही, हे ती ओळखून होती... ती एक दिवस मला भेटायला आली... म्हणाली, ‘दादा, मी कष्टानं सारं मिळवलं... पद, पैसा, प्रतिष्ठा सर्व पण दादा, आई-बाबा उदास असतात. आतल्या आत झुरतात. जगासाठी माझ्यासारखं सुखी दुसरं नाही अन् माझ्यालेखी माझ्यासारखं दुःखी कुणी नाही... मी वरवरचं हसत राहते... आत काळीज करपत राहतं... सगळं असून नसल्यासारखं. मी किरणला पण आता घरी नेणार आहे; पण त्याआधी मला एक बाळ दत्तक घ्यायचंय!
 हे ऐकून मला सारं स्वप्नासारखं वाटत होतं... पण ती एक सत्यकथा होती. आम्ही मग दुस-या एका संस्थेशी संपर्क साधून तिला बाळ मिळवून दिलं. नंतर ती ठरल्याप्रमाणे किरणलाही घेऊन गेली आणि मी वर्षोनवर्षे रोखलेला श्वास सोडला... जीव भांड्यात पडला माझा पण नि त्या अधीक्षिका बाईंचा पण...
 हल्ली वासंतीचा फोन म्हणजे नवा धक्का हे ठरूनच गेलं होतं. ती मोठ्या आत्मविश्वासानं सारं करत राहायची. मोर्चे-निदर्शने घेराओ... सर्व सुधारणा तिनं झोपडपट्टीत घडवून आणल्या आश्वासनाप्रमाणे. आज तिनं नवाच धक्का दिला, “दादा, मी लग्न केलंय... सारं सांगून... ते तरीही तयार झाले... तसं आम्ही गेले तीन वर्षे एकत्र हिंडलो, फिरलो आहे."
 ... त्यांचं एकच म्हणणं आहे... “तुझं हे वरवरचं हसणं मला जाळतं... मला तुला खरं सुखी करायचंय! दादा, आम्ही अनेक रात्री एकत्र घालवल्यात त्यांना सुख मिळतं... मला पण... आणि काय हवं? किरणचं पण जमवत आणलंय. जमलं की कळवीन.'

 मला तिच्या स्वप्नामागून स्वप्नांच्या झटापटीचं आश्चर्य वाटत राहतं. वाटतं, अशी सा-यांचीच स्वप्नं सत्य व्हायला हवीत... प्रश्न सुटायला हवेत! त्याचसाठी होता हा सारा अट्टाहास!

साऱ्या संकटांना पुरून उरणारी स्थितप्रज्ञता


 तसं तिचं शाळेच्या दफ्तरी नाव म्हणाल तर प्रतिभा फातरफेकर असं लंबचौडे होतं. पण आख्ख्या आश्रमाच्यालेखी ती बेबीच होती. लहानपणी आईनं आश्रमात जन्माला घातलं तेव्हापासून आईच्या तोंडी ती बेबीच होती. बेबीला जन्म देऊन आई तिला आश्रमात सोडून निघून गेली. तिला मामा न्यायला आले होते. जाताना तिनं हट्ट धरला म्हणून सिस्टरांनी तिला लक्ष्मीबाईंना सांभाळायला दिलं. तेव्हा बेबी दोन-तीन महिन्यांची असेल. आई तिला सोडून गेली तरी मामा तिच्यासाठी आश्रमात पैसे पाठवत राहायचा. पत्रं पाठवायचा. बेबीला जपा, शिकवा, असं निर्वाणीचं लिहीत राहायचा. हा क्रम बरेच वर्षे चालला होता म्हणे. मग बेबीच्या आईचं तिकडे माहेरी लग्न झालं तसं हा उमाळा केव्हा आटला ते कळालं नाही. आश्रमाला हे काही नवं नव्हतं. तो इथला रिवाजच बनून गेला होता. कुमारी माता, परित्यक्ता, विधवा, विवाहिता अशा कितीतरी भगिनी आश्रमात नित्य येत राहायच्या. कुणाला नातेवाइकांनी, कुणाला शेजारच्यांनी, कुणाला मामांनी, कुणाला मित्रांनी, कुणाला काकांनी फसवलेलं असायचं. ती मुलगी... बाई उजवली जाईपर्यंत मंडळी आश्रमाशी संधान बांधून असायची... भय असायचं... समाजभय अब्रू, प्रतिष्ठा, खानदान अशा काहीबाहीचं भूत प्रत्येकाच्या मानेवर असायचं. एकदा का उतरलं की त्यांच्यालेखी आश्रम शून्य... गरज सरो अन् वैद्य मरो... त्या जन्म दिलेल्या मुला-मुलींचं काय झालं, याचा शोध परत कुणी घेतला असं आठवत नाही. या मुला-मुलींच्या मनात मात्र आयुष्यभराची हुरहुर... झुरणं ठरलेलं, आपली आई कोण असेल? वडील कोण होते? आता त्यांचं काय!
 बेबी आठ-नऊ महिन्यांची झाली असेल अन् तिला देवी आल्या. अंगभर फोड होते. पंढरपुरात देवीची साथ होती म्हणून आश्रमाच्या अधिका-यांनी तिला कुडूवाडीच्या मोठ्या दवाखान्यात ठेवलं. लक्ष्मीबाई नि उमाबाईंना आश्रमांनी खोली घेऊन दिली होती. तीन महिने उपचारानंतर बेबी बरी झाली; पण कुडुवाडीहून ती परतली तेव्हा सारा चेहरा देवीच्या व्रणांनी भरून राहिलेला होता. लक्ष्मीबाईंना ते आयुष्यभर खात राहिलं होतं. म्हणायच्या, “कार्टीसाठी दिवस रात्र एक केली... पण डाग काही मी वाचवू शकले नाही. जळ्ळे मेले माजं नशीब" म्हणत बोटं मोडत राहायच्या.
 लक्ष्मीबाई आश्रमात बुटकी' म्हणून ओळखल्या जायच्या. अंगाची छोटी चण. नऊवारी साडी. डोक्यावरचा पदर लक्ष्मीबाईंनी कधी ढळू दिला नाही. त्या आश्रमात परित्यक्ता म्हणून आल्या. पोटचं पोर न वाचल्याचं शल्य त्यांनी पंधरा पोरं सांभाळून भरून काढलं. पंकजा, मधुकर, सुमंत, विठ्ठल, बिपिन, मंडोदरी, बेबी, श्रीमती, नीरजा, चित्रा, ललिता किती मुला-मुलींना लक्ष्मीबाईंनी सांभाळलं. साऱ्या आश्रमाला हंडेच्या हंडे पाणी तापवून गरम पाण्याने अंघोळ करण्याचं व्रत लक्ष्मीबाईंनी पन्नास वर्षं तर सांभाळलं असेल. रविवार हा आश्रमातील मुलींचा न्हाण्याचा दिवस. साच्या मुलींसाठी त्या पातेलेभर शिकेकाई चेचून, शिजवून तयार ठेवायच्या. प्रत्येकीचे केस घसाघसा घासायच्या. गरम पाणी रविवार अंमळ जास्तच करायच्या. रोज नऊला संपणारा अंघोळीचा कार्यक्रम रविवारी बारा वाजले तरी संपायचा नाही. नऊला गच्चीत ऊन आलं रे आलं... की साच्या मुली झिंज्या झाडत उनात वाळवत राहायच्या... त्या वेळी मुलींचं सौंदर्य खुललं की लक्ष्मीबाईंची कळी खुलायची... “आता कशी रंभा दिसते... काल भूत बघायचं होतं हिचं." कार्यक्रम एवढ्यावर थांबायचा नाही. लक्ष्मीबाई जेवण आटोपून आल्या की, फणी घेऊन यायच्या. मग ऊवा, लिखा मारायचा सार्वजनिक कार्यक्रम व्हायचा...
 अशा सर्व व्यापातून लक्ष्मीबाई बेबीचं हवं नको पाहायच्या. त्यामुळेच असेल कदाचित, आश्रमातल्या इतर मुली जिथं आठवी, नववीलाच शिक्षणाला रामराम ठोकायच्या तिथं बेबीनं मॅट्रिक प्रयत्नपूर्वक पूर्ण केली होती. तिला डी. एड्. होऊन शिक्षिका व्हायचं होतं; पण अनाथ मुलामुलींना ना जातीचे आरक्षण, ना सामाजिक प्राधान्य, तिनं टेलरिंग कोर्स कर, साक्षरता प्रशिक्षण प्रमाणपत्र, एम्ब्रॉयडरी कोर्स काय-काय करून आपली पात्रता वाढवायचा आटापिटा केला. परिस्थितीवर मात करायची अक्षय ऊर्जा तिच्यात उपजतच होती. ती तिला आरशात पाहताना मिळायची. तिच्या बरोबरच्या कमी शिकलेल्या मुलींची लग्नं पटापट झाली; पण आश्रमानं बेबीला कधी एक स्थळ काढलं नाही की दाखवलं नाही... आपल्या चेह-यावरचे देवीचे तोंडभर व्रण तिला सतत आरशात पाहताना बजावत राहायचे... या व्रणांवर तुला मात करायची आहे, तशी ती विद्रूप नव्हती दिसत; पण व्रण मात्र लक्षात येत ... हे लक्षात येणंच धोंड होती.
 बेबीची आश्रमात एक मैत्रीण होती सुमन, ती खरंच तिची जिवाभावाची मैत्रीण होती. तिचं लग्न सहज झालं असतं; पण बेबीचं झाल्याशिवाय करायचं नाही, ही तिची भीष्मप्रतिज्ञा. सख्खी बहीण जिथं थांबत नाही तिथं सुमननं थांबावं याचं साच्या आश्रमाला आश्चर्य वाटायचं. बेबीच्या जीवनात उमेद निर्माण करायचं काम जसं सांभाळलेल्या आई लक्ष्मीबाईंनी केलं, तसंच ते या मैत्रिणींनी. माणसाला ऐन उमेदीच्या काळात जगण्याला भावनिक आधाराचं बळ लागत असतं, ते या दोघींनी दिल्याने बेबी देवीच्या दिव्यातून व मानसिक ताण-तणावातून बाहेर पडली.
 लक्ष्मीबाईंनी सांभाळलेली, संस्थेत शिकून मोठी झालेली बिपिन, विठ्ठल, सुमंत अशी मुलं कोल्हापुरात स्थायिक झालेली होती. त्यांचे स्वतःचे संसार, नोकरी होती. भाड्याच्या घरात राहणारी मुलं त्यांनी बेबीला निमित्तानं कोल्हापूरला आणलं. त्यांनी स्वतः धडपडून नोकरी मिळविली होती. तशी ती त्यांनी बेबीला मिळवून देण्याचा चंग बांधला. या दरम्यान कोल्हापूरच्या न्यू शाहूपुरी विभागात एक छोटी शाळा चालायची. तुकाराम विद्यालय तिचं नाव. बी.टी. पाटील नावाचे एक काँग्रेस कार्यकर्ते ती चालवत. त्यांना आपली शाळा चांगली चालावी म्हणून धडपडणारी, कष्टाळू शिक्षिका हवी होती. त्यांनी बेबीला नोकरी देऊ केली नि बेबीची बाई झाली.
 शाळेत आजूबाजूच्या झोपडपट्टीतली, सर्वसाधारण घरातली मुलं या शाळेत येत. शेजारी महापालिकेचीपण शाळा होती. फातरफेकर बाईंनी या मुलांसाठी जिवाचे रान केलं. त्यांना स्वच्छता शिकवली. पाढे म्हणून घेतले. अंकज्ञान, अक्षरज्ञान दिलं. गप्पा, गोष्टी, गाण्यातून शिकवायला बाईंनी सुरुवात केल्यावर मुलं शेजारची शाळा सोडून इथं येऊ लागली. वर्षा-दोन वर्षांनी मोठी मुलं चौथी शिष्यवृत्ती परीक्षेस बसली. यश मिळालं; पण संस्थाचालक काही पगार वाढवायचं नाव काढेनात, तसं बेबीनं मग त्र्यंबोली विद्यालय, बालकल्याण संकुल इथं काम करत नवे प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आलं. बालकल्याण संकुलात साक्षरता शिक्षकाचं पद तिला मिळालं. सरकारी वेतनाशिवाय आपल्यासारख्या अनाथ मुलामुलींना शिकवायला मिळतं म्हणून तिला आनंद झाला. इथं तिला पहिलीचा वर्ग मिळाला, तो तिच्या तळमळीनं शिकवायच्या कौशल्यावरच.
 कायम नोकरी मिळाल्यावर वय झालं तरी तिच्या पायावर तिनं उभं राहावं, तिच्या गोतावळ्यातील सर्वांना वाटायचं. सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं नि बेबीचं लग्न सामंत नावाच्या गृहस्थांशी झालं. तिला भरलं घर मिळालं. सासू, नणंद, दीर, भावजय असा मोठा गोतावळा होता. घर भाड्याचं होतं; पण नवरा कष्टाळू, कामसू होता. परदेशी आणि कंपनीसारख्या नामवंत दुकानात कामाला असलेले सामंत दुकान, टप-या, हॉटेल्स इ. मधून सिगारेट्स, तंबाखू, बडीशेप, गुटखा इ. विकत. पगाराशिवाय विक्रीवर कमिशन असल्याने आख्खं कोल्हापूर शहर सायकलनी पिंजून काढत. लग्न झाल्यापासून त्यांना नि बेबीला (आता ती सौ. स्वाती सामंत झाली होती) आपली मुलं, घर असावं असं वाटू लागलं होतं. पुढे त्यांना पहिला एक मुलगा झाला. मनातील उभयतांचा आनंद त्यांनी ‘संतोष' नाव ठेवून स्पष्ट केला. पुढे मग मेघा झाली. घर झालं व संसार झाला.
 बेबीच्या साऱ्या जीवनाकडे पाहात असताना एक गोष्ट मला सतत अस्वस्थ करत राहते. तिला कधीच काही सहज का मिळालं नाही? संतोषचीच गोष्ट घ्या. तो तिचा एकुलता मुलगा. आपल्या परिस्थितीच्या मर्यादेत आई, बाबा, आजी सा-यांनी संतोषचे लाड पुरवले. तो लाडाकोडात वाढला. शिकला पण आई-वडील त्याला काही मिळाले नाहीत. आईवडील दोघंही नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर घाण्याच्या बैलासारखे काळचक्राला बांधलेले असायचे. संतोष शाळेतून आला की, मित्रांत असायचा. घरी आजी, बहीण असायची; पण संतोषला त्याची पर्वा नसायची. तो मोठा होऊन हायस्कूलला गेला तसं शाळेतल्या तक्रारी वाढल्या. शेजार दीर रहात बेबीचे. संतोषचे रामकाका. त्यांना तो घाबरायचा; पण त्यांच्यापर्यंत आपल्या कुलंगड्या जाऊ नये याची तो पूर्णपणे काळजी घ्यायचा; पण एका मारामारीत त्याचं सारं पितळ उघडे पडलं तसं त्यानं शाळेचं नाव टाकलं. रिक्षावर जातो म्हणू लागला. बसून डोक्यात नाही ते विचार नको म्हणून बेबी, सामंत सर्वांनी मिळून एक रिक्षा गाठून दिली, तसा तो घराबाहेर राहू लागला. तो घरी रात्री-अपरात्री यायचा. बेबीचा जीव टांगणीला लागलेला असायचा. हल्ली घरी त्यानं सा-यांशीच बोलायचं टाकलं होतं. काहीही विचारा... हाऽ हूऽ शिवाय उत्तर नसायचं. बेबीच्या मनात नाही नाही त्या शंका येत राहायच्या. मित्रही काही विचारलं की, कानावर हात ठेवत. शेवटी बेबीनं संतोषला रामभरोसे सोडून दिलं. हात टेकले अन् व्हायचं तेच झालं. एके दिवशी तो झोपला, तो उठलाच राही. हलवलं तरी उठला नाही अन् मग पाल चुकचुकली. अन् डॉक्टर आल्यावर लक्षात आलं की त्यानं झोपेच्या गोळ्या घेऊन कायमचाच सर्वांचा निरोप घेतला. बेबीवर आकाश कोसळलं. संतोषकडे पाहात ती भविष्याची मनोरथ रचायची. सारी धुळीला मिळाली.
 नातू गेला तशी आजींनी हाय खाल्ली. पाठोपाठ सामंतांची नोकरी सुटली. तसे ते भ्रमिष्टासारखे वागू लागले. उठता बसता चिडचिड करायचे. आई, मुलगा, नोकरी सारं एका पाठोपाठ हातातून निसटत गेलं. बांधलेल्या घराचे कर्जाचे हप्ते तटू लागले, तशी बेबीची पण झोप उडू लागली. त्यातच सामंतांचं आजारपण वाढलं. ते अंथरुणाला खिळले. भरीसभर मुलगी मेघा गुणी पण वयात आलेली. नाही त्या विचारांचा पिंगा बेबीच्या मनात रोज फेर धरत राहायचा. शेवटी बेबीनं नोकरीच्या ठिकाणचा... बालकल्याण संकुलात शिकून मोठा झालेला भूषण हेरला नि त्याला मेघा दाखविली. त्यानं पसंत केली. मेघावर अक्षता टाकल्या तशी ती निश्चित झाली.

 पण बेबीची साडेसाती तिच्याबरोबर संपणार, असे शेजारपाजारचे म्हणत राहिले, तरी बेबीनं जगण्यावरचा विश्वास गमावला नाही. लढल्याशिवाय हरायचं नाही, हे तिनं प्रारंभीपासूनच व्रत म्हणून पाळलं. अन् शेवटी तेच तिच्या कामी आलं. सामंतांची उसाभर करत तिचा जीव मेटाकुटीला यायचा. शीऽ शूऽ ते आता बिछान्यावरच करत. लघवीसंडासमधून रक्त जायचं. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यासारखी रोज स्थिती. डोळ्याला डोळा लागायचा नाही. शेजारचे कोणी मदतीला यायचं राहोच, यांनी घर सोडून जावं म्हणून रात्री-अपरात्री दार वाजव, कौलावर दगड मार,पाणी बंद कर, विजेची वायर तोड- काय नाही केलं शेजा-यांनी? वाळीत टाकल्यागत जमा. शेवटी सामंतांचे हाल बघून तिनंच देवाला साकडं घातलं. 'यांचे हाल पाहवत नाही. त्याची सुटका कर अन् मला पण ने' देवानं पूर्ण ऐकलं तर कोण त्याला पूजणार? त्यानं फक्त सामंतांना नेलं.  बेबीनं गल्लीत राहायचं नाही असं ठरवलं. नीतीचे दिवस बदलून गेले. ती मुली-जावयाकडे राहू लागली. घर विकलं तर सुखच सुख. बेबीला सुखानं झोप लागत नाही यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. एक अविश्वसनीय सत्य... अनपेक्षित सुखाचा स्वर्ग! आज बेबीला खरंच वाटत नाही. ती स्वतःलाच चिमटा घेऊन खात्री करून घेते. हे दिवस तिचे का म्हणून? बेबीचं आजचं जीवन कालच्या साच्या कष्टाचं चीज म्हणून पाहायला हवं. जीवनावरच्या अविचल श्रद्धेने बेबीला हे दिवस दिले! आई लक्ष्मीबाईचा आधार... सामंतांची संगत... साच्यानं तिचं अनाथपण भरून गेलं. आज एका मोठ्या अपार्टमेंटच्या फ्लॅटवर मी पाटी पाहतो... श्रीमती स्वाती सामंत, शिक्षिका, बालकल्याण संकुल, कोल्हापूर, तेव्हा खरं वाटत नाही. भूषण, मेघा, सामंतबाई आपल्या नातवासह घरी येतात तेव्हा इतिहास तरळत राहतो... या बाईचं बेबीचं... तिच्या सहनशक्तीची सोसण्याची पराकाष्ठा मी पाहिली असल्यानं आश्चर्य वाटतं की जीवनाच्या कोणत्याच प्रसंगी तिनं कुणाकडे हात पसरला नाही... मदतीसाठी जीभ उचलली नाही... आपले प्रश्न आपणच सोडवायचं बेबीच्या अंगवळणी पडलं होतं... जीवनात कधीच तिनं कशाची तक्रार, कुरकुर केल्याचं आठवत नाही. तिच्याकडून शिकण्यासारखं बरंच; पण एक नक्की... जीवनात सतत स्थितप्रज्ञ राहायचं! तेच तिचं जीवन रहस्य होतं.

वल्लरीची भरारी


 सन १९७० चा सुमार. भालचंद्र करमरकर आणि विद्या करमरकर यांचा विवाह होतो. ते आपलं वैवाहिक जीवन सुरू करतात. अगदी तुमच्या माझ्यासारखं... खरं तर सर्वसामान्यांसारखं... विद्याताई काही दिवसांनी आपल्या बहिणीकडे ठाण्याला येतात... एका मुलीला जन्म देतात... वल्लरी नाव ठेवतात तिचं मोठ्या हौसेनं!.. मग पवईला भावाकडे मुक्काम हलवतात... वल्लरी गोरीपान... सुंदर पाणीदार डोळे... चेह-यावर तेज... दृष्ट लागावी अशी! जन्माच्या वेळी झालेला त्रास... सिझेरियन... काळवंडलेलं बाळ... त्याचं सूतभर चिन्हही आता उरलेलं नव्हतं... घरी सर्वत्र बाळाचा कोण आनंद उत्सव! कौतुक!! ... कुणी गोविंद घ्या! कुणी गोपाळ!!
 अन् लक्षात आलं की, वल्लरीची टाळू नाही भरलेली... उपचार करताच सांगलीचं घर गाठलं... डॉक्टरांना दाखवलं... त्यांनी निदान केलं... रडत नाही, गिळत नाही, वळत नाही... हालचाल नाही म्हणजे ती सेलेब्रल पाल्सी आहे. बहुविकलांग आहे. ऐकताच आई-बाबा, आत्या सारे जण पटकन खाली बसले.. अवसान पुरतं गळून पडलं; पण काही दिवसच! ते ठरवतात... डॉक्टर म्हणतात ना तिला हे येणार नाही... ते येणार नाही... ते ते सारं येईल असं पाहायचं... प्रयत्न करायचे... ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हे म्हणणं सोपं असलं तरी करणं महाकर्मकठीण... जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!
 वल्लरी चार वर्षांची झाली तरी बसू शकत नव्हती... चालायची, बोलायची तर दूरच... पण भाऊ, ताई, आत्यांचे प्रश्न सुरूच... जिंकू किंवा मरू या जिद्दीनं... कमल नमन कर... आई, आत्या, भाऊ सर्वांची शिकवणी २४ तास सुरू... वल्लरी काहीबाही मोठ्या जिकिरीनं बोलायचा प्रयत्न करायची... तेवढ्यावर घरातले सारे खूश... ओठ हालत नव्हते... आता हलतात... हसत नव्हती आता हसते... भाऊ, ताई, आत्या म्हणजे सारे एवढ्यावरच फिदा, मग लक्षात आलं की, वल्लरीला रेडिओ ऐकायला आवडतो. मग बाळाच्या तोंडात निपल धरतात, तसं ते रेडिओ लावून ठेवायचे... बॅटरीवरचा रेडिओ आता इलेक्ट्रिक करून घेतला... 'सिग्नेचर टून... वंदे मातरमपासून ते उद्या भेटू या सकाळी सहा वाजता' अशी उद्घोषणा होईपर्यंत रेडिओ ओऽऽ करत रहायचा. नि वल्लरी गुणगुणत रांगत... बसू, टेकू लागली.
 असेच काही दिवस गेले... त्यावेळी सांगली आकाशवाणीवरून सकाळी साठेआठच्या बातम्या संपल्या की, दर रविवारी सकाळी नवं गीत महिनाभर ऐकवलं जायचं... ८.४५ वाजता बातम्या लागल्या की, वल्लरी गुणगुणायला लागायची... महिना संपला की नवं गीत कोणतं ते आवर्जून ऐकायची... प्रत्येक रविवारी रेडिओ लावायची आठवण करायची... तिची प्रगती आश्वासक होती... एका रविवारी तर तिनं आई, बाबा, आत्याची विकेटच घेतली... त्या महिन्यात सरिता पदकीचं गीत लागायचं... शेवटच्या रविवारी वल्लरीनं शिरा ताणत, जीभ वळवत, दात ओठ खात मोठ्या जिद्दीनं धृवपद सर्वांना ऐकवलं-
 लाख लाख या दीपकळ्यांचा, प्रकाश आपण उजळू या।
 पदराखाली जपुनी त्यांना, वादळातही फुलवू या।।
 तिनं प्रत्येकाची टाळी घेतली, तशी भाऊंची पण ब्रह्मनंदी टाळी लागली. त्यांनी तिची प्रगती बघून तिला शाळेत घालायचं ठरवलं... आमचं दोघांचं शिक्षणही अडथळ्यांच्या शर्यतीतून पार पडलं होतं... त्यामुळे हरणारी प्रत्येक शर्यत जिंकायची कशी, याचं बाळकडू प्यायलेले आम्ही... मी पोरका... ही कव्र्यांच्या हिंगण्याच्या अनाथ महिलाश्रमात राहून शिकलेली... त्यामुळे सारं लेटच झालं. शिक्षण, लग्न, मूल, संसार सर्व, पण यातून एक शिकलो... लढल्याशिवाय हरायचं नाही! ऑपरेशन करून तिला बसतं केल्यावर तिला शिकवावं असं ठरवलं... कठीण होतं; पण अशक्य नव्हतं... घरी मुळाक्षरं... अंक... पाढे... गणितं सुरू केली... इथं आईचं पूर्वीचं शिक्षिका होणं उपयोगी पडलं... त्यांनी आपल्या या शाळेचं नाव ‘समजूतदार विद्यालय' ठेवून टाकलं... तेच शिक्षक, परीक्षक, एकशिक्षकी शाळा बघता-बघता बहुशिक्षकी झाली तरी समाधान होईना... मग शाळेत घालायचं ठरवलं... अनेक अडचणी होत्या. बसणं, बोलणं, शी-शु... वल्लरी तर भित्रा ससा... माँटेसरी... पहिलीपासून हा विद्यार्थी ‘एक्स्टर्नल'... सगळे भाऊ... ताईंना शंभर प्रश्न विचारायचे... त्यांनी जिद्द सोडली नाही. घरी अभ्यास करून परीक्षेला बसायची खास परवानगी मिळविणे म्हणजे साक्षात आकाशीचा चंद्र मिळविणेच होते... उशिरा का होईना चंद्र उगवायचा यावरच भाऊ खुश!
 असं करत वल्लरी चौथी पास झाली नि भाऊंच्या कानात ‘झिंदाबाद! झिंदाबाद' ऐकू येऊ लागलं! भाऊ वल्लरीला तीनचाकीवरून शाळेला नेऊ लागले... सायकलीला घुगुरजोडी बांधलेली. ही घंटा वाजली की घोळका जमायचा... वर्गात संगीता, ज्योत्स्ना, पल्लवी, वल्लरीच्या मैत्रिणी झाल्या. तशी वल्लरी शाळेत रमू लागली.. वेळ झाली की बेचैन व्हायची! सातवी, आठवी करत वल्लरी दहावीत गेली, तेही चांगल्या मार्कानी! सायकल घेत तिनं केलेला प्रत्येक पराक्रम हनुमान उडीपेक्षा कमी नव्हता.
 ऑक्टोबर ८९ ला वल्लरीचा फॉर्म भरला... सहीच्या जागी अंगठा उठवला... बघता बघता मार्च उजाडला तसं नवं संकट दिसू लागलं... रायटरसाठी अर्ज केला... परवानगी मिळेना... बोर्डाला हे प्रकरण नवीनच... शिवाय आमचा एक विशेष अर्ज होता... वल्लरीबरोबर आईला लांब दिसेल असं बसू द्यावं... लाख विद्याथ्र्यांतली एक वल्लरी... पण विजय पाटील म्हणून बोर्डाचे अधिकारी पाठीशी उभे राहिले अन् तिने परीक्षा दिली... हे सारं पुण्याच्या अनेक फे-यांनी घडलं; पण केल्याने होत आहे। रे, आधी केलेची पाहिजे... सांगणारं! तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा... वल्लरी ७६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली... संस्कृतमध्ये ९१ गुण पाहून वल्लरीनं संस्कृतमध्ये बी. ए. करायची घोषणाच करून टाकली!
 वल्लरी आता भाऊंच्या लूनावर त्यांना मागं घट्ट धरून कॉलेजात जाऊ लागली... बारावी झाली... एफवायबीएला ती अपंग असल्यानं शिवाजी विद्यापीठास जादा अर्धा तास पेपर सोडवायला वेळ वाढवून मागितला... नियम नसल्यानं नामंजूर' असं छापील उत्तर आलं... आपल्या शिक्षणात ‘सब घोडे बारा टक्के' असतं... दोन पाय असणा-यानं व लंगड्यानं एकाच शर्यतीत भाग घ्यायचा व दोघांनी एकाच वेळी शर्यत पूर्ण करायची याला काय सामाजिक न्याय म्हणायचा? न्यायदेवतेबरोबर शिक्षणही आंधळ्याच्या गाई हाकतं हे कळलं... हे सारं विषण्ण करणारं... अन्यायाचं होतं; पण भाऊ, ताई, आत्यांची भीष्मप्रतिज्ञाच होती.. लढल्याशिवाय शस्त्र खाली नाही ठेवायचं... हरायचं नाही... मग नाकच्या काढत यश यायचं... वल्लरीसारख्या विशेष मुलांना विशेष नियम, सवलती नको का? पण त्याला एकच उपाय ठरतो... नियम करणा-यांच्या पोटी अशी बाळं येणं... त्याशिवाय डोळे कसे उघडणार?
 वल्लरीच्या अडचणी जेन्युइन होत्या... दया म्हणून नको... अपंगांना विकासाची संधी हवी, क्षमतानिहाय संधी हवी होती... ती कधी मिळायची... कधी नाही... पण हळूहळू आम्ही विद्यापीठाच्या गळी उतरवू शकलो... नियम बदलत गेले... संधी... सवलत मिळत गेली... आज वल्लरी संस्कृत घेऊन एम. ए. आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन... मी कुलगुरु झालो असतो, तर वल्लरीसाठी खास पदवीदान समारंभ योजला असता... अन् आता तर वल्लरी चक्क संगणकाशी झटापट करते आहे.. तिला बोलता येणार नाही, चालता येणार नाही म्हणून भविष्यवाणी करणारे डॉक्टर वल्लरीला पाहतात तेव्हा त्यांना आपल्या पारंपरिक भाकितांची शरम वाटते. आता ते असा पेशंट आला की, भाऊंकडे पाठवतात... म्हणतात, काहीही अशक्य नाही.. ‘धीर धरी रे धीरापोटी! असती मोठी फळे गोमटी।।' मतिमंद मूल पोटी आलं म्हणून हादरणाच्यांना वल्लरी वादळातही प्रकाशाच्या दिशा दाखवते, कळी खुलू शकते, असा विश्वास देते.

 वल्लरी आता चाळिशीत आहे... भाऊ, ताईंना सहस्त्रचंद्रदर्शन योग... आत्याबाईंना नाबाद शंभरावा प्रयोग, वल्लरी संगीत संस्कृत शिकणा-यांचं फोनवरून शंका समाधान करते... तिची फोन इन ट्यूशन फॉर्मात आहे... सत्यालाही विचलित होण्याचा भ्रम व्हावा अशीच सारी स्थिती... या पार्श्वभूमीवर आरक्षणही तोकडे, ठेंगणं वाटतं... आकांक्षापुढती इथं गगन ठेंगणं... मग आठवतात सर्व काही असताना काही न करणारे लोक. कुंथत, कण्हत जगणारी माणसं... त्या सर्वांनी वल्लरी संजीवनी गुटी घ्यावी... तिचा मृत्युंजयी फॉर्म्युला आचरावा... मग प्रत्येक माणूस कर्मवीर... माणसं वाचावीर अधिक असतात... त्यांना वल्लरी, भाऊ, ताई, आत्या सान्यांकडून एक शिकावं... भीक नाही मागायची... हक्क मागायचा... मिळेपर्यंत झगडायचं, लढायचं. “कोण म्हणतं देत नाही... घेतल्याशिवाय राहत नाही' असा पुरुषार्थ, आत्मविश्वास प्रत्येक भारतीयात येईल तर भारत खचितच महासत्ता होईल! या तर, वल्लरीला एकदा भेटू... न पेक्षा तिची कर्मकहाणी वाचू या... 'फिटे अंधाराचे जाळे' हे तिच्याविषयीचं पुस्तक म्हणजे जीवन संजीवनीच!

सचिनचं साहेबी स्वप्न


 ऑगस्ट, २००५ चे दिवस असतील ते. मी आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नुकताच रुजू झालो होतो. प्रवेश संपून कॉलेजचे वर्ग सुरू झाले होते. मग प्राचार्य म्हणून मी त्या दिवशी विद्याथ्र्यांशी हितगुज करणार होतो. प्राचार्य अभिभाषण' असं भारदस्त नाव घेऊन घातलेला तो घाट... भाषणात मी बरीच स्वप्नं मांडली. त्यात हे महाविद्यालय ‘अपंगांचं स्वराज्य असेल असं बोलून गेलो होतो... टाळ्याही मिळाल्या होत्या.
 दुस-या दिवशी हे सारं काहूर कानात भरलेलं असताना एक पालक भेटायला आले. त्यांनी ठोकलेल्या सॅल्यूटवरून लक्षात आलं की, हे एक्स सर्व्हिसमन... निवृत्त सैनिक असणार... मी त्यांना नि त्यांच्या मुलाला बसायला सांगितलं. हातातल्या कागदपत्रांवर सह्या पूर्ण केल्या नि बोला म्हणालो. “सर, मी सुभाष काळे. सीआयएसएमध्ये हवालदार होतो. या मुलासाठी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली सर...' म्हणत ओकसाबोकशी रडायला लागले. मी बेल वाजवून शिपायाला पाणी द्यायला सांगितलं. त्यांना शांत केलं. मुलगा कावराबावरा होऊन हे सारं ऐकत होता. खुणेनंच बाबांना धीर देत होता. त्याच्या कानातील श्रवणयंत्र व त्याच्या हावभावावरून एव्हाना माझ्या हे लक्षात आलं होतं की, तो मूक-बधिर आहे.
 तुम्ही मनात काही न ठेवता सर्व बोला. मला वेळ आहे. एव्हाना मी शिपायास आत कोणास सोडू नको, असं बजावलं होतं... तसं ते आश्वस्त होऊन सांगू लागले...  मी शिरोळचा. नववी पास. मंडळी सातवी पास. दोन मुलींवर मी थांबायचं ठरवलं होतं; पण मंडळींचा हट्ट... मुलगा पाहिजे... वंशाला दिवा हवाच. हा सचिन झाला १९८७ साली. नव्वद उजाडलं तरी ब्र काढेना. म्हणून डॉक्टरना दाखवलं... तेव्हा माझं पनवेलला पोस्टिंग होतं. डॉक्टरांनी एक पत्र दिलं, आलियावर जंग इन्स्टिट्यूट, बांद्रा, मुंबई... तपासणी करून घ्या म्हणाले. संस्था बघूनच मला भरून आलं... आजूबाजूला सर्व मुलं-मुली मुकी... बहिरी... पाल चुकचुकली... तरी धीर धरून तपासणी केली... श्रवणदोष आहे; पण प्रयत्न केला तर हळूहळू ऐकू येईल... थोडं थोडं बोलू लागेल, असं तिथल्या डॉक्टरबाईंनी समजावल्यावर धीर आला...
 त्यांनी सांगितल्यावरून मी सचिनला रुचिराम थडानी मूक-बधिर विद्यालय, चेंबूरमध्ये घातलं. दरम्यान मी पनवेलहून माहीमला ट्रान्सफर करून घेतली. रोज बायकोचा नि माझा खटका उडायचा तो सचिनवरून. ‘घे तुझा वंशाचा दिवा... पाड आता जगभर प्रकाश' ... ती बिचारी निमूट सारं ऐकायची नि पोरीपेक्षा सचिनवर माया करत राहायची. पोरी पण भावाला जीव लावायच्या... काळजी घ्यायच्या. त्या शाळेत सचिनला चांगल्या बाई भेटल्या. भाग्यश्रीताई त्यांचं नाव... आज लक्षात येतं की, त्या बाईंचं पूर्ण नाव कधी आम्ही विचारलंच नाही...शाळा पालकसभा घ्यायची... सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयाच पालकसभेला यायच्या... मीच एकटा बाप असायचो... बायकांत पुरुष लांबोडा वाटायचो; पण मंडळी अडाणी आणि मी चार बुकं जादा शिकलेला... गावोगावचं पाणी प्यालेला... मला या साच्या अनुभवानं अधिक शिकवलं... शहाणं केलं. भाग्यश्रीताईंनी एकदा मला समजावलं, “काका तुम्हाला वाटतं म्हणून सचिन लगेच बोलणार नाही. दहा वर्षं तर लागतील.' ऐकून मी डोकं धरून अक्षरशः जमिनीवर बसलो... बाई चांगल्या होत्या; त्यांनी मला धीर दिला... सांगितलं, “तुम्ही स्वतः मुके व्हा... बोलता येत नाही, असं समजा नि त्याला जे शिकवायचं आहे ते पहिल्यांदा तुम्ही शिका. नुसत्या शाळेनं मूल बोलणार नाही. पालकांचे प्रयत्न हवेत. हे टीमवर्क आहे." हळूहळू घरच्यांनी पण माझ्या फे-यांत हात धरला नि सचिनचे ओठ हलू लागले.
 ‘कोशिश करनेवालों की हार नहीं होती हे ट्रकच्या मागं लिहिलेलं वाक्य वाचलं नि माझा जीवन बदलला. कोणीतरी सांगितलं म्हणून मी मी संजीवकुमार नि जया भाद्रीचा ‘कोशिश' पाहिला... त्या चित्रपटानं मला भावसाक्षर केलं. मी स्टॅमिना वाढवत गेलो... सचिनला शिकवत राहिलो. मग मी चक्क मूक-बधिर मुलांना शिकवायचा कोर्स केला. बिनपगारी रजा घेतली; पण ठरवून टाकलं की, सचिनला शिकवायचं... बोलतं करायचं. हट्ट आणि प्रतिसाद यात दरी होती; पण चढत, चालत राहिलो.
 या धडपडीत एक गोष्ट लक्षात आली की, मुक्यांच्या शाळेत ठेवलं तर, सचिन मुकाच राहणार. म्हणून मी भाग्यश्रीताईंच्या सल्ल्यानं शाळा बदलली. त्याला चेंबूरच्या श्री नारायण आचार्य विद्यालयात घातलं. दरम्यान माझी बदली अलिबागला झाली. मी सचिनला नागठाण्याच्या पेट्रोकेमिकल स्कूलमध्ये घातलं. तिथं तो पाचवीपर्यंत शिकला. सचिननं माझी उमेद वाढवली. तो पास होत गेला. तसा मला विश्वास आला... माझा आत्मविश्वास वाढला; पण नोकरी... बदली, ड्यूटी या सर्वांतून सचिनला शिकवणं, सांभाळणं, शाळेला नेणं-आणणं... त्यातले कष्ट, ताप कुणाच्याच वाट्याला येऊ नये... एकदा तर सचिनची टेस्ट होती. माझी नेमकी ड्यूटी त्याच वेळी लागली. ड्रायव्हिंगची.. मी मोठ्या साहेबांना विनंती केली. त्यांनी परवानगी दिली. त्यांच्याकडे गेलो म्हणून खालचा साहेब खट्ट... मला सचिनशिवाय काही दिसायचं नाही... सहका-याला विश्वासात घेऊन मस्टरवर सही करून मारली दांडी... टेस्ट करून येतो, तर बरॉकीत महाभारत... त्या ड्रायव्हरनं केला अॅक्सिडेंट, ड्यूटी माझी रेकॉर्डवर. ३५ सेक्शनखाली मला नोटीस शिवाय सायबाची सुभाषितं ऐकायला लागली ती वेगळीच.
 त्या दिवशी मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन गावी आलो. सात हजारांचा पगार सतराशे पेन्शनीवर आला. उपाशी राहीन; पण सचिनला शिकवीन, असं मी सचिनसमोर सायबाला चैलेंज केलं. परतताना सचिन मला अडखळत म्हणाला, “बाबा... मी... साहेबच होणार...' त्याच्या या वाक्यानं मी भरून पावलो; पण स्वप्न आणि सत्यातलं अंतर मी रोजच कापत आल्यानं मी जमिनीवरचे माझे पाय कधी अधांतरी होऊन दिले नाहीत...
 सर, असं करत सचिन एस.एस.सी. झालाय... कोणीच कॉलेजमध्ये त्याला घेत नाही... तुम्ही घ्याल असं अनेकांनी सांगितलं... तुमच्या ओट्यात सचिनला घालायला आणलाय... नाही म्हणू नका सर... घर, शेत विकतो हवं तर... काही कमी पडू देणार नाही.
 सचिनला घेण्या न घेण्याचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता हॉस्टेलची सोय. त्याचं एकदम शहरात येणं... कॉलेजचं हाय-फाय वातावरण... कॉलेजच्या रगाड्यात व्यक्तिगत लक्ष पुरवणं... मला भावनिक होऊन चालणार नव्हतं.. “दोन दिवसांनी या. मी विचार करतो.' म्हणून त्यांना परत पाठवलं; पण त्या दोन दिवसांत सचिन काही मनातून जायला तयार नव्हता...
 मी पूर्ण विचार करून त्याला घराजवळ ज्युनिअर कॉलेजला पाठवायचं ठरवलं. जयसिंगपूरचं एक ज्युनिअर कॉलेज माझ्या परिचयाचं... ऐकण्यातलं होतं. तिथल्या प्राचार्यांना सर्व समजावलं. ते ज्युनिअर कॉलेज हायस्कूल अटॅच होतं... ते सचिनला वरदान ठरलं नि सचिन बारावी झाला.
 काळे परत २००७ मध्ये जूनच्या मध्यास सचिनसह दत्त. आता बॉल माझ्या कोर्टात असा येऊन पडला होता की, परतवणं शक्य नव्हतं. मी सचिनला त्या दिवशी दत्तक घेतलं. काळेना म्हणालो, “तुम्ही आता निवांत राहा, नोकरी करा, संसार बघा. मी सचिनला ‘साहेब' करूनच तुमच्या हवाली करीन."
 सचिनला मी आर्टसला प्रवेश घे म्हटलं तर 'कॉमर्स' म्हणून त्यानं जजमेंटच देऊन टाकलं. आमच्या कॉलेजचं साधं वसतिगृह होतं म्हणून त्याला हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्डच्या वसतिगृहात प्रवेश दिला, तर म्हणाला ‘मी इथंच राहणार.' फी माफीचा अर्ज भर म्हटल्यावर स्कॉलरशिप मिळते की, म्हणून मला त्यानं ऐकवायला कमी केलं नाही... तो प्रत्येक बॉलला माझा क्लीन बोल्ड करत राहिला, तसा मी त्याच्या प्रेमात पडत गेलो... शिक्षक, मुलं सर्वच सचिनची काळजी घेत... आमच्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूरचे आम्ही विचारपूर्वक विकसित केलेलं वैशिष्ट्य होतं... आमच्याकडे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील अपंग, अंध, अनाथ मुलं शिकत होती... त्यांना सर्व सोयी आम्ही आऊट ऑफ वे जाऊन देत असू. सचिन पहिलाच मूक-बधिर... पण त्याला प्रयत्नपूर्वक बोलता यायचं... यंत्रानं चांगलं ऐकायचा... सर्वांत मोठी गोष्ट होती त्याची समज, शहाणपण, संयम, जिद्द... या सर्वांसाठी हॅट्स ऑफ!
 एफ.वाय.बी.कॉम... ए.टी.के.टी.... एस.वाय.बी.कॉम... ए.टी.के.टी... प्रत्येक वेळी अकौंटन्सी राहायची... एकदा मी सचिनला केबिनमध्ये बोलावून विचारलं... “प्रत्येक वेळी अकौंटन्सी का राहतं रे? लक्ष दे... ट्यूशन लाव...' तर याचं उत्तर... ‘‘राहात नाही सर, मी गॅप घेतलाय अकौंटन्सीचा... ऑक्टोबरला सुटणार सर...' सचिनचा आत्मविश्वास... त्याला आत्मविश्वासाचं नोबेलच द्यायला हवं... कॉलेजच्या सर्व उपक्रमात भाग... अपंग वसतिगृहात पुढे ठेवलं तर सगळ्या अपंग मुलं... मुली हा धडधाकट म्हणून सगळ्यांचा हा आधार... कुबडी व्हायचा! एका मुलीची चाकाची खुर्ची धरून नेणाच्या सचिनला मी नेहमी पाहायचो! एकदा फिरकी घेतली... ‘‘तिची सायकल सोडत नाहीस रे!" लाजत म्हणाला, “तुमच्या मनात आहे ते माझ्या नाही..." मीच शरमलो...
 हे सारं आठवायचं कारण परवा घडलं. शिवाजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता... पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून प्रमुख पाहुणे होते... ते आमच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयास भेट देणार होते. संचालक म्हणून माझी तारांबळ, धांदल सुरू होती. तेवढ्यात मोबाईल वाजला म्हणून घेतला. तिकडून आवाज आला, “सर मी सचिन काळेचा वडील... आपण कुठे आहात? सचिनचा हट्ट आहे... तुम्हाला भेटल्यावरच पदवी घ्यायची." मी संग्रहालयात आहे म्हटल्यावर पाच मिनिटांत दोघे हजर... दोघांचे डोळे डबडबलेले... माझं मन भरून आलं... अंगठा मागणारा द्रोणाचार्य आठवला... बाबा सांगते झाले, “सर, सचिन पतसंस्थेत मॅनेजर झालाय... ‘साहेब' झालाय... एम. कॉम.चा फॉर्म भरलाय... एम्प्लॉयमेंट कॉल यायला लागलेत... आरक्षण आहे अपंगांना... नक्की भेटणार सर क्लास वनची नोकरी... खरा साहेब होणार सचिन!"

 ‘मूकं करोति वाचालं, पंगु लंगयते गिरिम्।' हा आठवीत वाचलेला श्लोक... साठी उलटताना तो खरा समजला.

सोसल्यानंतरचा सूर्योदय


 मीरा आश्रमातल्या इतर मुलींपैकी एक; पण तिचं स्वतःचं असं वैशिष्ट्य होतं. ती लहानपणापासून कुणाच्या न अध्यात न मध्यात. ती दोन-तीन वर्षांची असेल. पोलीस तिला आश्रमात घेऊन आले होते. ती एक हरवलेली, सोडलेली मुलगी होती. आश्रमात एकटीच बसून असायची. बहुदा लहानपणी तिला तिच्या आई-बाबांची आठवण येत असावी. ती शाळेत जाऊ लागली तशी ती मुला-मुलींत मिसळू लागली. हसू-बोलू लागली; पण स्वभाव स्वतःहून न बोलण्याचाच.
 ती सातवीत शिकत असतानाची गोष्ट. वार्षिक परीक्षा जवळ आलेल्या. त्यावेळी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात रमाकांत तांबोळी म्हणून नवीन अधीक्षक कार्य करत होते. सारे आश्रमीय त्यांना दादा म्हणत. पूर्वी बाबासाहेब जव्हेरी होते. त्यांना बाबा म्हणत. मुली सगळ्या अभ्यास करत होत्या. नि लोल्या नावाची मुकी मुलगी... तिला मोडकंतोडकं तोतरं बोलायला यायचं. ती सौ. वैजयंती तांबोळी (दादांच्या पत्नी) यांच्याकडे शिपाई होती. त्यांना सर्व वहिनी म्हणत.
 ‘सातवीच्या सर्व मुली... दादा... वहिनी... ऑफिस ऑफिस' लोल्याचं तोतरं, तुटकं बोलणं नि हातवारे यांची भाषा साऱ्या आश्रमाला कळायची. झालं साऱ्या आश्रमात गलका.
 “ईऽऽ सातवीच्या मुलींना ऑफिसात दादा-वहिनींनी बोलावलं."
 होय नाही करत सर्व आठ-दहा मुली जमल्या. “तू चल पुढे... मी येते मागे' म्हणत कितीतरी वेळ त्या ऑफिसच्या व्हरांड्यातच उभ्या होत्या. ऑफिसमध्ये जायची भीती शिवाय दादा नवीन आलेले.  शेवटी वहिनींनी ऑफिसमधूनच आवाज दिला, “चला आत या."
 तशासरशी एकेक करून साच्या खाली मान घालून कोण तोंडावर हात करत, कोण खालीवर बघत, एकमेकीला ढकलत उभ्या.
 दादांनी विचारलं, “परीक्षा झाल्या का?"
 सर्वांचं एक सुरात उत्तर "नाही."
 परत दादांची विचारणा केव्हा संपणार?'
 कधी नव्हे ते मीराने तोंड उघडलं, “२० एप्रिलला संपणार, दादा."
 ‘‘शाब्बास तुझं नाव काय?" ‘‘मीरा!"
 “हे पाहा आपल्या आश्रमाजवळच एक नवीन शाळा सुरू होते आहे. हे दत्ता सावळे सर, चांगले शिकवतात. तुमच्याकडे लक्ष देतील. अभ्यास करून घेतील. एस.एस.सी.ला सगळ्या पास होतील, असं शिकवतो म्हणतात... जाणार कां? दादांनी प्रेमानं विचारलं.
 तशा सर्व मुली 'हो' म्हटल्या.
 मग दादांनी सर्वांना ‘जावा, अभ्यास करा, 'Best Luck' दिलं नि मुली 'Thank You' म्हणून बाहेर पडल्या अन् त्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला. सान्यांना दादांनी कशाला बोलावलं याची भीती होती. पाय लटपटायचे. कधी एकदा वाघाच्या गुहेतून बाहेर पडतो असं झालेलं.
 शेवटी जून उजाडला नि दादांनी मीराला मॉनिटर करून आठवी, नववीच्या सर्व मुलींना गौतम हायस्कूलला पाठवलं. त्यात मीरा, वसू, शीला, दिव्यप्रभा, मैथिली, सुशीला, राणी सर्व पंधरा-सोळा मुली होत्या, त्या मिळून जायच्या, मिळून यायच्या. त्यांची प्रगतीही चांगली होत होती.
 एस.एस.सी.चा निकाल लागला नि वहिनी संध्याकाळी हॉलमध्ये मुली वाचत बसलेल्या... तिथं आल्या. पास झालेल्या मुलींचं अभिनंदन केलं. नापासांची कानउघाडणी केली. ऑक्टोबरचा फॉर्म भरायला सांगितला. प्रत्येकीला उठवून पुढे काय करणार म्हणून विचारणा केली. टिपून घेतलं नि त्या निघून गेल्या. कोण नर्सिंगला, कोण डी. एड्.ला तर कोण बालवाडीला जाणार म्हणाल्या. सुरेखा कॉलेजला जाणार म्हणाली अन् सर्व मुलींच्या भुवया उंचावल्या.
 काही दिवसांनी वहिनींनी मीरा व वसूला ऑफिसमध्ये बोलवून बालवाडी प्रशिक्षण एक वर्षाचं आहे. कोसबाडला जावं लागेल. तिथं सर्व सोयी आहेत. अनुताई वाघ चांगलं शिकवतात, लक्ष देतात म्हणून सांगितलं नि दोघींनी एकमेकींकडे पाहत मान हलवून होकार दिला. दोन दिवसांनी तयारी होऊन वहिनी त्यांना कोसबाडला सोडून आल्या.
 वर्षासाठी गेलेली मीरा. वसू... वसू परत आली वर्षांनी. मीराला अनुताईंनी आणखी एक वर्षासाठी ठेवून घेतलं. त्या वेळी अनुताई वाघ सर्व शिक्षिकांना एकच वाक्य, शिकवण वारंवार सांगत देत असायच्या. ‘ही मुलं तुमची माना, त्यांचं जे काही करता येईल ते करा. त्यांच्या 'बाई' होऊ नका, 'ताई' 'आई' व्हा." मीरानं ही शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवली.
 मीरा आश्रमाच्या बालमंदिरात शिकवू लागली. त्या वेळी आश्रमात शिकून मोठी झालेली मुलं दिवाळी, मे महिन्याच्या सुट्टीत आश्रमात त्यांना सांभाळणाच्या मानलेल्या आयांकडे येत. मीरा लक्ष्मीबाईंच्या खोलीत एव्हाना राहायला लागली होती. त्या खोलीत बिपिन, विठ्ठल, सुमंत सुट्टीत येत. अशा एका सुट्टीत गुजरातवरून गप्पा निघाल्या. बिपिन गुजरातला जाणार होता. मीराने गुजरात पाहिलेला. तिच्या माहितीचा बिपिनला भरपूर उपयोग झाला. एवढंच निमित्त झालं अन् दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. बिपिन गुजरातला ननीताईची मोठी शेती सांभाळायचा. एका दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी दादांना आपला लग्नाचा मनसुबा सांगितला. दादांनीही संमती दिली व डिसेंबर, १९७२ ला मीरा-बिपिनचं लग्न झालं. मीराला घेऊन तो मढीला (गुजरात) शेती करू लागला.
 गुजरातमध्ये बिपिनबरोबर मीरा ननीताईंकडे राहायची. ती पण पंढरपूरच्याच आश्रमातली. बालवाडी शिक्षिकाच होती. ती लक्ष्मीबाईंच्याच खोलीत राहायची. त्यामुळे या सर्वांमध्ये एक मानलेले नाते, गोतावळा तयार झालेला. लग्न झालं तशी ननीताई नवच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेत गेली होती. तिथं पैसे मिळवून त्यांनी गुजरातला नव-याच्या गावी शेत, घर अशी मोठी स्थावर घेऊन ठेवली होती. ननीताईचा नवरा अचानक वारल्यानं तिला लहान दोन मुलांसह भारतात परतावं लागलं होतं. वडिलार्जित घर, जमीन होतीच. शिवाय ननीताईच्या नवव्यानं भरपूर मिळवलं होतं. ती येऊन दीराकडे राहिली; पण त्याचा डोळा ननीताईच्या पैशाकडे असायचा. सारखे या ना त्या कारणांनी पैसे मागायचा. तिच्या लक्षात आलं की तो आपल्या एकटेपणाचा, असहाय्यतेचा गैरफायदा घेतोय. तिनं विठ्ठलबिपिन एकदा गुजरातला आले असताना कानावर घातलं होतं. त्यातून तिला आधार द्यायला बिपिन गुजरातला गेला होता; पण काही वर्षांनी तिची मुलं मोठी झाली नि मामा-भाच्यांचे खटके उडू लागले. मग बिपिनमीराने पदरात असलेल्या कैलाससह कोल्हापूरला आपलं बि-हाड हलवलं. इथे दहा बाय दहाच्या खोलीत विठ्ठल त्याची बायको कुसुम, आई लक्ष्मीबाई, बहीण बेबी, विठ्ठलचा मुलगा दीपक, मीरा, बिपिन, कैलास सर्व एकत्र कसे तरी राहत. मिळवणारा एक व खाणारे दहा असं किती दिवस चालणार होतं! शेवटी तो दिवस उजाडलाच. बिपिननी एक झोपडीसारखी खोली नाममात्र भाड्यानी घेतली ती स्वतः काही तरी करायचं ठरवून.
 तो काळ मीराच्या जीवनातील अत्यंत काळाकुट्ट असा काळ होता. त्यांनी घेतलेली खोली वेश्यांच्या वस्तीत होती. ते ज्या खोलीत राहात तिथेही पूर्वी एक वेश्याच राहात असे. खोली मातीने बांधलेली. दार नाही. एक बारदान (पोतं) आडोसा म्हणून टांगलेलं. जमीन सारवलेली ओबडधोबड. कुत्री, मांजर, डुकरं सतत येत राहायची. हे कमी म्हणून की काय गि-हाइकं वेश्या राहते समजून यायची. मीराला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. बिपिन दिवसभर हातगाडीवर भजी, चहा तयार करायचं काम करायचा. रोज येताना उरलेले पाव, वडे, भजी आणाचा. मीरा त्यावरच दिवस काढायची. दिवस ढकलता येईना म्हणून मीराने शेजारच्या कॉलनीत धुण्या-भांड्याची कामं घेतली तशी कैलासच्या तोंडात दोन शितं पडू लागली. मग बिपिननं काम बदललं. तो उद्यमनगरात एका कारखान्यात ड्रिलिंगचं काम करू लागला; पण घरच्या ओढाताणीने खाडे व्हायचे. त्यातून घरात मीराशी वाद व्हायचा. एकदा तर रागात त्यानं उलथनं भिरकावलं. डोळ्यांतच लागायचं. ते डोक्यावर निभावलं. टाके पडले. सुनील, विठ्ठल, बेबी, सुमंत सर्वांनी बिपिनला समजावलं तशी गाडी रूळावर आली. सहा महिन्यांनी बिपिनला आंतरभारती शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लागली व मीराचा वनवास संपला म्हणायचा.
 पुढे मीराला पण काळजीवाहिका म्हणून बालकल्याण संकुलाच्या वात्सल्य बालसदनमध्ये कायमची नोकरी मिळाली. भाड्याचं चांगलं घर, सुखी संसार सुरू झाला. नि स्वरूपाचा जन्म झाला. त्यानं तिच्या जीवनाचं स्वरूप बदललं. नव-याच्या बदल्या उदगाव, निगवे इथे होत राहिल्या, तरी मीरानं धीर धरत संसार केला. कोल्हापुरी आल्यावर मग हळूहळू घर घेतलं. मुलं शिकली, सवरली मोठी झाली. त्यांची लग्नं, संसार यात पण मीरास काही कमी सोसावं लागलं नाही. कैलास मोठा झाला नि आँगमध्ये राहू लागला. दिवसभर कुठे असायचा ते माहीत नसायचं. रात्री स्वारी फक्त झोपायला दिसायची. सुनीलला सांगून त्यांची नाकेबंदी केली तसा तो रूळावर आला. मग कधी कैलासला सांगावं लागलं नाहीत अल्लड वयात कोण चुकतं नाही?
 मीरा बालकल्याण संकुलाचं काम अनुताईंच्या शिकवणुकीनुसार करत राहायची. इतर बायका संस्थेतल्या मुलांना हिडीसफिडीस करत राहायच्या. मीराला अनुताई आठवायच्या... अन् आठवायचं आपलं बालपण... अनाथपण. तिनं पडेल ती ड्यूटी, कामं तिने तक्रार न करता केली. त्याचं तिला फळ मिळालं. संस्थेनं आपल्या सुवर्ण महोत्सवात ‘आदर्श कर्मचारी निवडायचं ठरल्यावर मीराची एकमताने झालेली निवड हा तिच्या समर्पित वृत्तीचा गौरव होता.
 मीराचं आज स्वतःचं घर, दोन्ही मुलांचे सुखी संसार, बिपीन व तिला मासिक पेन्शन, घरी गाडी... घर झालं... तेव्हा सर्वांनी मिळून मीराचं नाव घरास ठेवलं ‘सरोज कुंज' (मीराचं लग्नानंतरचं नाव ‘सरोज') तेव्हा मीराच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू उपस्थितांनी पाहिले त्यात तिनं सोसलेलं सारं दुःख वाहून गेलं. इतके दिवस संकुलातील ३०-३५ अनाथ अर्भकांचं शी-शू, जेवण, धुणं, भरवणं, सफाई करणारी मीरा... तिला घरची चार नातवंडं, दोन सुना, मुलं नवरा सांभाळताना वाईच हलकंच वाटत राहतं.

 मीरा नि बिपिनला आता मी तीर्थयात्रेला जाताना पाहतो, रोज सकाळ संध्याकाळी फिरायला जाताना पाहतो, सहपरिवार गाडीतून इकडे तिकडे भटकताना पाहतो तेव्हा हे खरंच वाटत नाही. स्वप्न वाटावं असं वास्तव मीराच्या वाट्याला आलं. ते संसाराचं सारं विष, हलाहल तिनं पचवलं म्हणून! मीरा आपल्या या साच्या सुखाचं श्रेय संकुलातील अनाथ मुलांच्या सेवेस देते, तेव्हा लक्षात येतं की, तिच्या जीवनात सुरुवातीपासूनच एक कृतज्ञता, समर्पणाचा भाव भरलेला असायचा. ती जीवनभर अबोल राहिली ‘मैं नहीं, मेरा काम बोलेगा' असा तिचा मूक आविर्भाव न बोलता बरंच सांगून जायचा. बालकल्याण संकुलातील मुलांना देणगी म्हणून बरंच देत. खाऊ, खेळणी, कपडे, फटाके ते मुलांबरोबर कर्मचा-यांनाही देत मीरानं नोकरीच्या काळात त्यातली टाचणीही कधी घरी आणली नाही. ती तिथंच कपाटात ठेवायची. ही गोष्ट छोटी असली तरी बरंच सांगून जायची. नोकरीच्या काळात देशमुख बाई'नी (मीरा) कधी कुणाचं 'ब्र' ऐकून घेतलं नाही. (खरं तर 'ब्र' काढायची कुणाची हिम्मत झाली नाही!) हे सारं तिनं उपकार म्हणून नाही, ऋण फेडण्याच्या भावनेनं केलं. म्हणून उत्तरायुष्यात तिला सारं भरभरून मिळालं!

इच्छामरण मी स्वीकारते आहे...


 तुम्ही सगळे जगत होता तेव्हा मी रोज एक नवं मरण भोगत होते. तो मरणभोग जगताना वाटायचं की, आत्महत्या करावी; पण पदरी ज्योती होती. तिचा निरागस चेहरा समोर यायचा नि मग वाटायचं, नाही... जगलंच पाहिजे... माझी आई मला आश्रमात टाकून परागंदा झाली म्हणून मला या नरकयातना भोगाव्या लागतात... माझा काही दोष नसताना... ज्योतीला मरणजिणं वाट्याला येऊ नये म्हणून तरी जगायलाच हवं...
 परवा अरुणा शानबागचा निकाल वाचला... चुकीचाच वाटला. इच्छामरण हवंच... त्यासाठी माझ्यासारखं मरण भोगावं लागतं... मी न्यायाधीश असते, तर नक्कीच अरुणाला मरण दिलं असतं नि पिंकीला दिलासा...
 मी अनाथाश्रमात जन्मले, वाढले, शिकले. आश्रमातल्या इतर मुलींपेक्षा मला तसं सुसह्य बालपण मिळालं होतं म्हणायचं... कारण मला सिस्टर सांभाळायच्या... इतर मुली मॅट्रिक होणं मारामार; मी एम. ए., एम. एड., पीएच.डी. या शिक्षणाच्या ध्यासात माझे लग्नाचे वय केव्हा उलटून गेलं समजलंसुद्धा नाही... सिस्टरांना वाटायचं, मला फॉरेनचा नवरा मिळावा... मलाही त्या स्वप्नानं आत सुखावल्यागत व्हायचं... स्थळही आलं... फोनाफोनी... पासपोर्ट, व्हिसा सर्व झालं... विमानाचं तिकीटच ते काय काढायचं बाकी होतं नि मैत्रिणीचा फोन आला, अगं त्या मेननांचं लग्न झालंय... मुलगा आहे... डायव्होर्सी आहे, भरपूर पितो म्हणून तर पिल्ले मॅडमनी सोडलं त्यांना... इतकं सगळं ऐकून कोण ‘आ बैल मुझे मार' म्हणणार?
 पण सिस्टरांचा धोशा... “मी आश्रम सोडून आता धर्मप्रसाराला वाहून घेणार आहे... भारतभर मला भटकावं लागणार. तुझं लग्न झालं की मी सुटले... हे प्रभू येशू... या लेकराला तेवढं सुखी कर... तू सगळ्यांचा पालक ना रे?..." इंग्रजी पेपरातल्या वधूवर सूचक जाहिराती पाहणं, लिहिणं, संपर्क साधणं हाच सिस्टरांचा नि माझा उद्योग होऊन गेलेला... अन् लग्न एकदाचं ठरलं... मी तिशीत... ते पस्तिशीचे इंजिनिअर... स्वतःचा फ्लॅट, नोकरी. सासू-सासरेच घरी, मुली साध्या सासरी गेलेल्या, नोकरी करायची परवानगी. मुलगा अबोल, फक्त निरागस हसायचा. लग्नाआधी आम्हाला बोलायला दिलं होतं... हॉटेलात गेलो, समुद्रावर फिरून आलो... मीच बोलत होते... तो ‘हां... हो... चालेल... हरकत नाही...' तिसरा शब्द नाही... एवढं सोडता नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. हो म्हटलं नि झालं... आश्रमात नाही, बाहेर कार्यालयात लग्न करायचा आग्रह होता तिकडच्यांचा. तो आश्रमाच्या फादरनी अपवाद करून मान्य केला... प्रभूला काळजी म्हणून!
 कितीतरी स्वप्नं घेऊन मी सासरी आले... सासरे निवृत्त ऑडिटर... मोठे खाष्ट. सासू पुढे काही बोलायची नाही... मागे काड्या घालायची... मटण-मासे मला आवडायचे नाही; पण सासर सुखी तर आपण सुखी म्हणून शंभर गोष्टी स्वीकारत गेले... सिस्टरने लग्न झाल्यावर मला निरोप देताना डोळ्यांत पाणी आणून निर्वाणीचं सांगितलं होतं, तुझी आई फसून आली होती... तिला मोकळं करायचं होतं... आश्रम सोडताना मी तिला प्रभू येशूची शपथ घेऊन सांगितलं होतं. प्रभू, प्रसाद म्हणून सांभाळीन; पण लग्नापर्यंतच. नंतर ती तिची प्रभू! त्यांनी तो शब्द पाळला नि परागंदा झाल्या. त्यांनी आश्रम सोडला होता धर्मप्रसारार्थ... त्या कुठे गेल्या कुणालाच माहीत नाही... एकदा एका ननने सांगितलं की, त्या तुझ्या आईसारख्याच आल्या होत्या... पण परत घरी न जायच्या अटीवर... त्यांना घर होतं का? नातेवाईक? कुणालाच माहीत नाही... आल्या तेव्हा फादरना म्हणाल्या होत्या, मी प्रभूच्या चरणी 'शरण' म्हणून आले आहे... ईश्वराच्या लीला भरपूर पाहिल्या... ऐकलं होतं... प्रभू निराधारांचा सांभाळ करतो... मी कोण विचारू नका... मला सांभाळा... मी कळपातलं एक लेकरू सांभाळीन... प्रायश्चित्त म्हणा किंवा उतराई. आता मी माझी होते... आगा ना पिछा... फक्त जगणं हा एकच मार्ग... अन् एका रात्री कळलं की, यांना इच्छाच होत नाही... डॉक्टरांना भेटले... उपचार झाले... दोन वर्ष प्रयत्न झाले... ते रोज पाठ फिरवून झोपून जायचे...
 रोजचा त्यांचा दिनक्रम ठरलेला... उठणं... आवरणं... पेपर वाचणं.. नाश्ता करणं.... बसनं फॅक्टरीत जाणं... ठरलेल्या वेळी घरी येणं... सिनेमा... हॉटेल... समुद्र... फिरणं सगळं यथाक्रम बेमालूम पार पडायचं... रात्र सरता सरायची नाही. अन् एक दिवस ते कधी नाही ते नोकरीवर जाणार नाही म्हणून बसले... खोलीत कडी लावून बसायचे... पेपरवर काहीबाही लिहीत राहायचे... मग मीच पुढाकार घेऊन एक दिवस युनियनच्या मध्यस्थीनं कामावर नेलं... ते साहेब होते.... शिफ्ट इन्चार्ज... सगळे मानायचे... पण लहरी स्वभाव म्हणे! महिनाभर असाच गेला... मी गाडी मूळ पदावर आली म्हणून खूश होते... खुशीत मी नोकरीची परवानगी मिळविली... सुदैवानं मला महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लेक्चरची नोकरी मिळाली... रात्रीचा प्रॉब्लेम होता... पण दिवस तरी चांगला जाऊ लागला... नाही तर सोसायटीत बायकांचं ऐकून घ्यायला लागायचं... 'एवढी डॉक्टरेट... माशा मारते...'
 सहा महिने बरे गेलेले प्रभूला पाहवले नसावे... फॅक्टरीच्या गाडीतून त्यांना काही लोकांनी दुपारी घरी आणून सोडलं... मॅनेजरांचा फोन आला... फोन करायला सांगितला... संध्याकाळी सासूबाईंनी भांडीवाली आली नाहीच्या सहजतेनं फॅक्टरीचा निरोप दिला.. मी भीतभीतच फोन केला... आणि काय वाढून ठेवलंय म्हणून... एव्हाना मला आता रोज काही तरी अघटित, अनपेक्षित घडणार हे अंगवळणीच पडून गेलेलं... मीठ नाही म्हणून सास-यांचं ताटावरून उठणं.. वन्संना फोन केला नाही म्हणून सासूचा अबोला... गणपतीला दिरांच्या घरी नैवेद्य पाठवला नाही म्हणून नणंदा, दिरांचा अघोषित बहिष्कार... या सा-यांतून रोज वाट काढण्यापेक्षा समुद्रात उडी टाकून जीव द्यावा वाटायचं. दुस-या दिवशी कॉलेजला जाण्यापूर्वी फोन केला मॅनेजरांना... 'मॅडम, मी जे सांगतो ते तुम्ही धीरानं ऐकून घ्या... आमची सहानुभूती आहे; पण इलाज नाही... यापूर्वी आम्ही छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं.. पण काल त्यांनी सगळा प्लॅन्टच शटडाऊन करून टाकला... एक कोटीचा फटका बसला... साहेबांना काही परत फॅक्टरीकडे पाठवू नका... लीगल अॅक्शन होईल... कॉम्पेनसेशन मिळेल... ते आता काम करू शकतील, असं आम्हाला वाटत नाही... ट्राय टू अंडरस्टैंड असं...
 हे घरी राहू लागले तसे विचित्र झाले... वेडे नाही... पण सरळही नाही... झोपून राहायचे... सगळ्या सोसायटीच्या भिंती लिखाणाने भरायच्या... तरी बरं पेन्सिलनेच लिहायचे... रोज कॉलेजहून आलं की, लहान मुलासारखं खोडरबर घेऊन पुसत राहायचं... सोसायटीवाले... शेजारीपाजारी सोशिक. काही बोलायचे नाहीत; पण त्यांचा सारा व्यवहार न बोलका बोलका असायचा...
 आता माझी नोकरी अनिवार्य, अटळ बनली होती... मला शेअर करायलाही कोणी नव्हतं... माझ्याकडे सगळं होतं.. रूप, गुण, स्वभाव, कौशल्य, जीव लावणं... करणं, देणं, घेणं... पण आपलं माणूस तेवढे आपलं नव्हतं... माणूसच कशाला... घरचीदारची कोणीच माझी नव्हती. एकटेपण... तणाव... कामाच्या वाढत्या जबाबदाच्या... घर, मंडई, वाणी, धूणी, भांडी, आल्या-गेल्याचं करणं... ‘बाई होणं म्हणजे गुलाम होणं वाचलं होतं... आता मीच तशी झाले होते... म्हटला तर कसलाच त्रास नाही... सुख तर कशातच नाही... फक्त श्वासोच्छ्वास म्हणजे जगणं... मरण येत नाही म्हणून जगणं.. मी टकळीसारखी फिरत राहायचे माझ्याभोवती... गती होती; पण स्थित्यंतर नव्हतं. याचं कुणाला सोयरसुतकही नसायचं.
 वर्षभरात सासरे गेले... एक त्रास कमी झाला. दुस-या वर्षी सासूबाईपण त्यांच्यामागोमाग गेल्या. त्यांचं त्यांच्या पतीवर खरंच प्रेम होतं... दोघांनी त्रास नाही दिला; पण स्वीकारलं नाही... मुली आल्या की कानावर पडत राहायचं... करते बरीक सर्व पण वळण नाही... आपली चव नाही... देवाधर्माचे वेड नाही... उरक आहे; पण उसंत नसते... दिवसभर भुतासारखं बसायचं... टी.व्ही., चॅनल, फोन, पुस्तकं, खाणं-पिणं सगळं करते... सगळं देते पण मूल होऊ देत नाही.
 ऐकून संताप यायचा... वाटायचं तोंड फाटकी व्हावं... डॉक्टरांचं सर्टिफिकेट तोंडावर फेकून मारावं नि सांगावं... पंढ पोरगा जन्माला घातला... माझं वाटोळं केलं... पण आश्रमानं मला संयम, सभ्यता, सदाचार शिकविला होता... सिस्टर मला रोज... प्रसंगानं संस्कार देत राहायच्या... मन दुखावणं, हिंसा... रागानं बोलणं पशू होणं, सेवा हाच धर्म... मी बाप्तिस्मा घेतला नव्हता... फादरनीही दिला नाही. लोकांना आश्चर्य वाटायचं... हे कसं जगावेगळं? मला माहीत नाही. पण ते सत्य होतं... वास्तव होतं... मी 'माणूस' होते.
 हा एकटेपणा मी माझ्या एका कलीगना, सहका-यांना एकदा असह्य होऊन शेअर केला... तेव्हा आम्ही सेमिनारच्या निमित्ताने प्रवासात होतो... पुढे दोन दिवस एकाच हॉस्टेलवर राहायला होतो... दिल्लीतले ते दोन दिवस... त्यानं माझं जीवन बदलून टाकलं... मला जगावं अशी उमेद त्यांनी दिली.
 मी घरी परतले... डॉक्टर, सायकॅट्रिस्टना भेटले... लोक, सासरचे सर्वच म्हणू लागले... मॅडम, तुमची कमाल आहे... तुम्ही साहेबांना मरणाच्या दारातून स्वतःच्या पायावर उभं केलं... विश्वास नाही बसत... वेडा शहाणा होऊ शकतो. त्याचंही रहस्य होतं... माझ्या मित्राच्या सहकार्याने, मार्गदर्शनानं मी हा प्रवास आखला... डॉक्टरांना विश्वासात घेतलं... हे सारं करण्याचंही कारण होते... सासू, सासरे गेले तसे नणंदा, दीरांनी सोसायटीला अर्ज दिला... फ्लॅट त्यांच्या नावावर करावा... मी वकील मित्रांशी बोलले... त्यांनी मोठी मदत केली; नाहीतर मी रस्त्यावरच आले असते त्यांचीही मदत झाली. त्यांनी कागदावर सह्या करायचं नाकारलं. विशेष म्हणजे मी नसताना. दीरांना म्हटले कसे, ‘ती कशीही असू दे... मला बघते... तुम्ही नाही' हे शहाणपणही त्यांना त्या माणसांच्याच व्यवहारातून आलं असावं... मी काही शिकवलं, पढवलं नव्हतं... तुम्ही विश्वास ठेवा, ठेवू नका.
 याच शहाणपणाच्या आधारावर मी एकदा त्यांना विश्वासात येऊन कृत्रिम गर्भधारणेबद्दल समजावलं... ते चकित... मग अगोदरच का नाही केलं आपण? मग मी त्यांना आईचा विरोध सांगितला तसे ते संमती देत दवाखान्यात आले.
 दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर ज्योतीचा जन्म झाला! माझे ते मित्र सहकारी मदतीला आले, त्यांची पत्नी पण... कुणा स्त्रीला हे पटणार नाही... पण अपवाद असतोच ना? आणि अपवादानेच नाही का नियम सिद्ध होत? मित्रांनी नि त्यांच्या बायकोनं सर्व ठिकाणी हात दिला म्हणून मी सनाथ झाले...
 या साऱ्या घटना मी सरळ सांगत सुटले तितक्या त्या कधीच सरळ घडत गेल्या नाहीत... प्रत्येक सरळ वाटणाच्या रस्त्यावर थांबा, वळण, चढ, उतार, स्पीड ब्रेकर यायचेच... कधी कधी पॉवर ब्रेक, शॉक्स ही बसायचे... एकदा तर मी त्यांच्यावर उपचार करणा-या सायकॅट्रिस्टकडे पेशंट म्हणून स्वतःच गेले तर ते लागले हसायला... सज्जन गृहस्थ होते... म्हणाले, “वहिनी, तुम्हाला विकार नाही, ताण आहे. तुम्ही फार विचार करता. तुम्ही एकट्या नाही. माणसं जोडा, जोडत राहा... जग बदललेलं दिसेल. तुम्हाला एक सांगतो, जगाची फार काळजी, विचार करू नका. आपण एकविसाव्या शतकात जगतो आहोत... इथं काही लागत नाही... मन खंबीर लागतं... ‘जलनेवाले तेरा मुँह काला' म्हणा नि जगा... फिकीर करू नका कुणाची... कोण रोज तुम्हाला वाढायला येत नाही... आपणच । शिजवायचं नि खायचं, दुसरा काय म्हणतो कशाला विचार करता? दुनिया गयी भाड़ में. अपना हाथ जगन्नाथ!"

 मी घरी सूर्य घेऊनच परतले... एकटीच होते सोबतीला, आता दृष्टी होती... रोजचं मरणं मला जगणं वाटू लागलं... मी रोज एकटेपणाच्या ज्वालामुखीवरच बसलेली असायचे... पण इतक्या सामाजिक त्सुनामी अनुभवल्या होत्या... भूकंप, पूर, हादरे कशानेच हादरायचं नाही असं आता माझं मीच ठरवल्यामुळे ज्योती वयात येताच तिला स्वयंवराचा मंत्र देऊन रिकामी झाले. आज नातू आहे, जावई आहे, हे आहेत... पण आता मला जगण्यात स्वारस्यच उरलं नाही... इच्छामरण स्वीकारायचं असं मी अरुणा शानबागच्या निकालादिवशीच ठरवलं... आहार कमी घेते... कमी करत निघाले आहे... औषध सोडलं आहे... जगच सोडायचं तर माणसानं निरिच्छ व्हावं.. नाही तर माणूस एकटाच असतो ना? अकेला आता है, जाता है भी एकेला! अकला चलो रे!

उसवलेली आयुष्य सावरताना...


 निराळं जग, उद्ध्वस्त कुटुंब नि त्यातील माणसांचं असतं. या जगात विस्कटलेली आयुष्य सावरणं नि ती स्थिरावणं एक आव्हान असतं. मी कोल्हापूर रिमांड होमचं बालकल्याण संकुलात रूपांतर करत असतानाच्या काळात तेथील लाभार्थी व त्यांचे प्रश्न सोडवायचे म्हणून गरजेतून एका मागून एक संस्था स्थापन केल्या.
 अर्भकालय, बालकाश्रम, आधारगृह, अनुरक्षण गृह... या नि अशा इतर काही संस्था स्थापन करताना एकच विचार त्यांच्या पाठीशी होता की, समाजातल्या प्रत्येक वंचिताला आधार, संरक्षण देऊन त्यांच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवायची, त्यांचे समाजात सुस्थापन करायचं.
 या काळात मला आठवतं की, एकदा नेहमीप्रमाणे संकुलात शनिवारी बालन्यायालय भरलं होतं. संस्था प्रतिनिधी म्हणून न्यायाधीश, परिविक्षा अधिकारी यांच्याशी मुला-मुलींच्या काही न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत चर्चा करत होतो. तेवढ्यात एक आजी आपली मुलगी व नातवाला घेऊन आल्या. डोळ्यांत पाणी काढून विनवत होत्या... नातू गुणाचा आहे. लेक अपंग आहे खरी; पण कपाळ फाटलं, तिचं काही करा. त्यांना आसरा द्या. मला निभवलं तोवर मी सांभाळलं. आता माझ्याच्यानं निभवंना. काही पण करा... दोघा लेकरांना सांभाळा."
 आजींनी त्या दिवशी सांगितलेली कहाणी हृदयस्पर्शी होती, तशीच विलक्षणही! त्यांची मुलगी विद्या जन्मतः एका हाताने अधू होती. लुळी म्हणून घरात उपेक्षितच राहिली. शिक्षण न झाल्यातच जमा होतं. मोठी झाली वयात आली, तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली तशी विद्या अस्वस्थ, कुढत विचार करत राहायची. मुळात एकलकोंडी विद्या गप्प गप्प असायची. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. झोप नाही. विद्याच्या आईने तिच्या लग्नासाठी नेट लावला. तिला पत्रिका पाहण्याचा नाद होता. ज्या ज्योतिषाकडे जायची त्याला विद्याच्या आईची दया यायची. त्या ज्योतिषाकडे बेळगावचे रघुनाथ बापट नावाच्या आपल्या मुलाची पत्रिका घेऊन आले होते. त्यांचा मुलगा चांगला होता; पण काही करायचा नाही. त्याची कर्मदशा बदलावी कशी म्हणून ते आले होते. ज्योतिषाचं मन सामाजिक होतं, विद्याचं भलं व्हावं, तिच्या आईचा घोर कमी संपावा म्हणून त्यांनी त्या गृहस्थास सुचवलं की, तुम्ही या विद्याशी तुमच्या मुलाचं लग्न कराल तर तुमची ग्रहदशा बदलेल... मुलाला चांगली नोकरी लागेल. ते गृहस्थ विचार करून आठ-पंधरा दिवसांनी परत ज्योतिषाकडे आले, ते होकार व मुलाला घेऊनच. विद्याला दाखवायचा कार्यक्रम झाला. साखरपुडा झाला. यथावकाश लग्नही झालं. विद्या बेळगावला जाऊन संसार करू लागली. अधू असली तरी आईनं कामाचं वळण ठेवलं, शिकवलं होतं. वर्षा-दोन वर्षांत घरी पाळणा हलला. मुलगा झाला. त्याचं नाव भूषण ठेवलं तेच मुळी मोठी स्वप्नं घेऊन. भूषणच्या जन्मानं घरची गृहदशा पालटली, बाबांना बँकेत नोकरी लागली. शेंगाच्या मिलमध्ये हात मजुरी करणाच्या बाबांना कायमची नोकरी. मोठा पगार, राहायला घर यामुळे काही दिवसांनी भूषणच्या बाबांना विद्या नकोशी वाटू लागली.
 घर फिरलं की घराचे वासे फिरतात... अगदी तसंच झालं! भूषणच्या बाबांनी एक दिवस चक्क विद्या व भूषणला कोल्हापूरच्या एस.टी.त तिकीट काढून बसवलं. ते सज्जड दम देऊनच... “मी तुम्हाला मेलो... तुम्ही मला... परत बेळगावात पाय ठेवायचा नाही. ठेवला तर पाय पण लुळा करीन." विद्याच्या आईनं त्या दमाचा जो धसका घेतला तो शेवटपर्यंत. तिला आधी चक्कर यायची... आता फिट्स येऊ लागल्या. तरी आजी, मामाने विद्या व भूषणला सांभाळलं. ते आजीची थोडी पुंजी होती म्हणून. ती जशी संपली तसा मामाने एकच धोशा लावला... “मी माझ्या मुलाबाळांचे करू की लुळ्या-पांगळ्यांना सांभाळू?" मग आजीनं इकडेतिकडे चौकशी करता समजलं की कोल्हापुरात बालकल्याण संकुल आहे. तशा त्या आल्या होत्या. आम्ही भूषणला रिमांड होममध्ये प्रवेश दिला. आधारगृहात विद्याताई राहू शकतील, असं वाटलं नाही, म्हणून त्यांना शासकीय महिला आधारगृहात प्रवेश द्यायला भाग पाडलं. तशा आजी निश्चिंत मनानं भावाच्या घरी गेल्या. काही दिवसांतच त्यांनी प्राण सोडल्यानं विद्याताई व भूषणसाठी संस्थाच एकमेव आधार बनली.
 १९८३-८४ ची गोष्ट असेल. भूषण आमच्या रिमांड होममध्ये आला तेव्हा तिसरी-चौथीत होता. आजीच्या संस्कारांमुळे सत्शील, अभ्यासात हुशार, नीटनेटकं राहणं, कुणाच्या अध्यात नाही की मध्यात. त्यानं संस्थेतल्या सर्वांची मनं जिंकली होती. १९८६ ला आम्ही ‘अनिकेत निकेतन' हे। अनाथ विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं. त्या वेळी भूषण बापटची आवर्जून निवड केली, ती त्याच्या अंगभूत चुणचुणीतपणामुळे. ‘अनिकेत' मधून तो चांगल्या मार्गाने एसएससी झाला.
 त्याच्याबरोबरची इतरही मुलं चांगल्या मार्गाने पास झाली. सोळा वर्षे पूर्ण झालेली ही मुलं नियमाने ‘अनिकेत निकेतन' मध्ये राहू शकत नव्हती. एवढ्या लहान वयात त्यांना संस्थेबाहेर पाठवणं म्हणजे कळत्या, उमलत्या वयात पुन्हा अनाथ करणं वा वाममार्गाला जाण्याचीच संधी देणं... म्हणून मग आम्ही ‘किशोर अनुरक्षण गृह' सुरू केलं. कल्पना अशी की, मुलांनी शिक्षण घेत घेत कमवायला लागावं... चार-दोन वर्षांत स्वावलंबी व्हावं... ही मुलंही त्यांच्या मर्यादेत प्रतिसाद देत राहिली. भूषण कॉमर्स करत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाला. दोन-चार वर्षांनंतर स्वतंत्र खोली घेऊन राहू लागला, तसा मी सुटकेचा श्वास टाकला.
 पण त्याच्या आईचा-विद्याताईचा प्रश्न वारंवार डोकं वर काढायचा. त्यांना आम्ही शासकीय महिला आधारगृहातून आमच्या दाभोळकर महिला आधारगृहात आणलं ते भूषणनं आईची औषधपाण्याची सोय पाहायचं मान्य केल्यामुळे. संस्थेत विरोध असायचा; पण मला एक कुटुंब उभं करायचं होतं. मी सर्वांना विश्वासात घेऊन समजावत होतो. अधीक्षिका, काळजीवाहक भगिनींना ते पटायचं; पण विद्याताईंचा स्वभाव, त्यांच्या फिट्स, हट्टामुळे त्या बेजार व्हायच्या. आधारगृहातील अन्य लाभार्थी भगिनींची पण भुणभुण असायचीच. भूषणला इकडं मी समजावत, जबाबदारीची जाणीव देत राहायचो. अधीमधी लग्न कर, असंही सुचवायचो. त्याची अट होती, ‘आईला सांभाळणारी बायको मिळाली तरच मी लग्न करणार. नाहीतर आईला घेऊन राहणार... फक्त घर होऊ दे. मी आईला सांभाळणार.' भूषणच्या जिद्दीचं कौतुक वाटायचं.
 मी संस्थेच्या नेहमीच्या राऊंडवर होतो नि सामंतबाई समोर आल्या... दादा, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. ऑफिसात येऊ का?" “मी राऊंड पूर्ण करतो... मग या' म्हणून काम करत राहिलो अन् विसरून गेलो. थोड्या वेळानं त्या आल्या... “तुम्हाला माझं सगळंच माहीत आहे. मेघाचं लग्नाचं चाललं आहे. भूषण माझ्या मनात आहे. तुम्ही मध्यस्थी केली तर होईल." मी त्यांना भूषणची अट सांगितली, त्यांना ती माहीतच होती. त्यांनी तयारी दर्शवली तरी मी थोडा वेळ द्या, विचार करतो म्हणालो.
 स्वाती सामंत या आमच्या कन्या निरीक्षणगृहाच्या शिक्षिका. माझ्यापेक्षा मोठ्या. माझ्याबरोबरच पंढरपूरच्या बालकाश्रमातून लहानाच्या मोठ्या झालेल्या. आई जन्म देऊन परागंदा झाल्यावर लक्ष्मीबाईंनी अन्य अनेक मुला-मुलींबरोबर त्यांचा सांभाळ केला. लहानपणी देवी रोगाची बळी ठरलेली ती प्रतिभा... तिला सारेजण बेबी म्हणत. देवी बच्या झाल्या पण साच्या चेह-यावर त्याचे कितीतरी खोल व्रण... बरोबरच्या सगळ्या मैत्रिणी उजवल्या तरी हिचं लग्न जमलं नव्हतं. झुरणाच्या बेबीनं स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवून प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण पूर्ण केलं, मानलेल्या बहिणीकडे गुजरातला जाऊन स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला; पण गुजराती येत नसल्यानं ती कोल्हापूरला आली. तुकाराम विद्यालयात नोकरी मिळाली; पण पगार जेमतेम. त्याच दरम्यान आम्ही १९८३ ला कन्या निरीक्षणगृह केलं होतं. आम्हाला शिक्षिका हवी होती. तेव्हा बेबीला आवर्जून घेतलं. तिनेही मुलींसाठी जिवाचे रान केलं. त्यांचे कट पाहन आम्ही संकुलातल्या मुला-मुलींसाठी सुसंस्कार विद्यालय सुरू केलं. तिथं त्या शिक्षिका झाल्या. कायमची नोकरी मिळाली म्हणून मग आम्ही लग्नाचे प्रयत्न सुरू केले. सामंतांचे स्थळ आलं. दिला बार उडवून. श्रीकांत सामंत मोठे कष्टाळू होते. पै-पै जमवून स्वतःचं घर... मुलगा... मुलगी असा सुखी संसार होता. मुलगा तरुणपणीच गेला. तसं मुलगी मेघाच्या लग्नाच्या काळजीनं त्यांच्या काळजाचंच घर झालं. त्यात नवरा विकलांग झाला. आपण सोसलं... मुलीला घोर नको म्हणून भूषणचं स्थळ त्यांनी हेरलं अन् मुलीचे हात पिवळे करून त्या निश्चिंत झाल्या; पण सामंतांची विकलांगता... रोगग्रस्तता म्हणजे रोज एक नवी लढाई... रोज एक नवा जगण्याचा संघर्ष होता.
 माझ्यापुढे तीन उद्ध्वस्त कुटुंबं होती. लक्ष्मीबाई परित्यक्ता म्हणून पंढरपूर बालकाश्रमात दाखल झालेल्या. आपलं उद्ध्वस्त आयुष्य सावरत त्यांनी बिपिन, विठ्ठल, नलिनी, प्रतिभा, मीरा, सत्यवती, लाडी अशांचं कुटुंब उभारलं होतं. हे सारं अनाथ, अनौरस, परित्यक्ता, मतिमंद, प्रौढ अविवाहिता... कोण कुणाचं नव्हतं. त्यांच्या कुणालाच भूतकाळ नव्हता... नातीगोती, जात, नातलग काही नव्हतं, तरी ते एकमेकांचे भाऊ, बहीण, आई, मावशी, ताई झालेले होते.
 दुसरं कुटुंब सामंतांचं. लक्ष्मीबाईंनी देवीग्रस्त बेबी (प्रतिभा), श्रीकांत सामंतांशी विवाहित होऊनही स्वाती सामंत बनून शिक्षिका झालेली. पदरी संतोष, मेघा येऊन सुखी झालेला परिवार, संतोष अकाली निवर्तला, श्रीकांत सामंत अकाली नि अचानक विकलांग, रोगग्रस्त झाल्यानं त्यांना त्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांनी वाळीत टाकलं होतं. सख्खा भाऊ शेजारी; पण अपरिचितासारखा राहायचा. तेव्हा विठ्ठल, बिपिन हे मानलेले भाऊच पाठीमागे उभं राहायचे.
 विद्याताई, रघुनाथ, भूषण आजी, मामाचं तिसरं कुटुंब उच्चभ्रू; पण दिवस फिरल्यानं दुर्दशेत सापडलेलं. अपंगत्व येणं, निराधार होणं, गरिबी हे असं वारं असतं की, ते तुम्हाला होत्याचं नव्हतं करतं. तुमच्या हातात असतात भूतकाळाच्या श्रीमंत स्मृती व वर्तमानाचे चटके! ते एकाच वेळी तुम्हास स्मरणरंजनात गुंग करत राहतात... कधी भूतकाळाचं तर कधी भविष्याचं; पण त्यात वर्तमान हातातून निसटून जातो. हाती लागते फक्त संस्था अन् तिथंच फक्त शिल्लक असलेली माणसं... अन् त्यांची माणुसकी!
 मी संस्था नि मनुष्य संबंधाचा गोफ गुंफत उसवलेली आयुष्य शिवत राहतो. तो उपकाराचा उद्योग नसतो. तो असतो एक खटाटोप. आपणच आपल्या गुजरलेल्या आयुष्याचा तो असतो एक पुनर्णोध! ते काम एखाद्या कुशल खलाशासारखं करावं लागतं. एकाच वेळी अष्टावधानं सांभाळायची... वाच्यावर स्वार व्हायचं... नावेचं नियंत्रण... दिशा निश्चिती... अन् प्रवास तर सुरूच! लाटा, वादळे, खडक सारं असतं अन् त्याचं भविष्यलक्ष्यी भान ठेवत पुढे जायचं असतं. हे सोपं नसतं. ही कथा जितक्या संक्षिप्तपणानं लिहिली तितकी माझं नि त्या सर्वांचं हे गतायुष्य इतकं सुबोध, सरळ मुळीच नव्हतं!

 आज तीस वर्षांनी मागे वळून पाहताना... ‘शेवट गोड ते सारं गोड वाटलं तरी प्रवासातले खाचखळगे आठवतात, तेव्हा आज वातानुकूलित घरातही अंग शहारतं! लक्षात येतं, उसवलेल्या आयुष्यांना टाके घालणं म्हणजे रोज नव्या संकटांना सामोरं जाणं असतं... आनंद एकाच गोष्टीचा असतो... उद्याचं जग आपलं होणार असतं...

शकुंतलेचे नशीब माझ्या कपाळी का आले?


 माझ्या आईचे नाव मनकर्णिका, वडिलांचे नाव सदाशिवशास्त्री. ती मूळची छिंदवाड्याची. पहाड्यांची मुलगी. लग्न होऊन पाटणसोंगीला आले. माझा जन्म नक्की कधी झाला मला माहीत नाही. माहीत आहे इतकंच की, मी अकरा महिन्यांची असताना आई वारली. पुढे वडिलांनी व घरातल्यांनी माझा सांभाळ केला. मी सात वर्षांची झाले असेन. वडिलांनी दुसरे लग्न केले. माझी सावत्र आई सरस्वती चिंचोली गावची. तिला दिवस जायचे; तिची मुलं जगायची नाहीत. एक मुलगा दोन वर्षांचा होऊन गेला. दुस-यांदाही मुलगा झाला. तो पाच दिवसांनी गेला. तिसरा सावत्र भाऊ 'बाबा' मात्र जगला. तो आजही अधूनमधून भेटत असतो.
वडिलांनी माझे अकराव्या वर्षी लग्न केले जैतापूरच्या महादेवराव कस्तुरेंशी. घरी नणंद होती. नणदेचा नवरा येत-जात असायचा. त्याने मला फसवले. सासरे कर्मठ. त्यांना हे पसंत पडले नाही. शिवाय माहेर जाणे शक्यच नव्हते. सास-यांनी माझी रवानगी पंढरपूरच्या बालकाश्रमात केली. मी पंढरपूरला आले तेव्हा चार-पाच महिन्यांची गरोदर होते. घरच्यांनी पैसे भरायचे नाकारले म्हणून मला ‘कामवाल्या बायकांत प्रवेश मिळला. (तिथे पैसे देणा-या, कमी देणाच्या, अधिक देणा-या, न देणा-या अशा वर्गाच्या बायका, कुमारी माता, परित्यक्ता इ. असायच्या.) पैसे देणान्यांना सर्व सोयी असायच्या; पण काम काहीच नसायचे. माझ्यासारख्या पैसे देऊ न शकणाच्यांना सोयी काहीच नसायच्या वर काम करायला लागायचे.  बाळंतपणापर्यंत झेपेल तितके काम करायची मुभा होती. बाळंतपणानंतर मात्र सांगेल ते काम करणे भाग पडायचे. जेवणे, राहणे फुकट असल्याने केलेल्या कामाचे पैसे मिळायचे नाहीत. शिवाय पोटच्या पोरीचा खर्चही आश्रम करायचा. मला मुलगी झाली. अंगावर दूध भरपूर होते. त्यावेळी ‘सुनील' नावाच्या मुलाची आई त्याला सोडून घरी निघून गेली होती. त्याला वरचं दूध पचेना. मला तर दूध भरपूर होतं. मेट्रननी सुनीलला मला पाजायला दिलं. त्याला दूध पचू लागलं. मी माझ्या मुलीबरोबर त्याला पण पाजू लागले. त्याला माझा व मला त्याचा कधी लळा लागला ते कळालेच नाही. मी माझ्या मुलीप्रमाणे... ज्योत्स्नाप्रमाणे त्याचा सांभाळ करू लागले. नंतर मला भाकरीच्या कामावर नेमले. सकाळ-संध्याकाळ शे-दोनशे भाकरी भाजाव्या लागायच्या. दोन रुपये महिन्याला मिळायचे. राम आठवायचा. दोन पोरं सांभाळत सारं करायला लागायचं. प्रायश्चित्तच होतं. मी निमूटपणे सहन करायची.
 माझे काम व स्वभाव पाहून मला पुढे मुलांचा सांभाळ करायचे दाईचे काम मिळाले. पुढे ते करत करत मी परिचारिका झाले. मुलांना औषध देणे, ताप घेणे, निरीक्षण करणे अशी सारी कामं करायला लागायची. बारा तासांचे काम. सुट्टी नसायची. पगार हळूहळू वाढत गेला.
 एक दिवस ज्योत्स्ना आंघोळ घालताना चक्कर आल्याचे निमित्त झाले नि तिचा एक पाय नि एक हात लुळापांगळा झाला. उपचार केले; पण यश आले नाही. डोक्यावर परिणाम झाला. पोटची पोर टाकायची कशी म्हणून तिचे सर्व करत राहिले. परिचारिका झाल्यावर मला राहायला स्वतंत्र खोली मिळाली. आणखी एक परिचारिका होत्या रमाबाई. त्यांची दोन मुलं नि माझी दोन. आम्ही दोघी व आमची मुले गुण्यागोविंदाने राहात असू. नोकरी करत असलो तरी आश्रमाचे सर्व नियम बंधनकारक होते. विचारल्याशिवाय बाहेर जायचे नाही. बघता-बघता मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाली की त्यांची दुसरीकडे बदली करत. पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेल्या सुनील, विकास, रतन, अभय, अशोक यांना तोडताना जीव तुटायचा. रक्ताची सारी माणसं परागंदा झाली तेव्हा आश्रम माझं नवं घर झालं. नवी नातीगोती जमली. सारी मानलेली; पण घट्ट. कसली खोट नाही. मुली मोठ्या झाल्या, की आश्रम लग्न करून देत. स्नेहा, कुसुम, शुभांगी, लीला, चंचला किती तरी मुली सांभाळल्या. तुटलेलं नातं जोडायला नवा मुलगा, नवी मुलगी येत राहायचे. त्या साच्या चक्राची स्वतःची अशी गत होती. समाजाने दिलेली; पण समाजाला त्याचं थोडंही सोयरसुतक असायचे नाही. समाज विश्वामित्री पवित्रा घेऊन नेहमीच पाठ फिरवलेला निर्धास्त. इकडे मेनका, शकुंतला मात्र अपराधी, अपमानित, उपेक्षित, सुनील कोल्हापूरच्या अभिक्षणगृहात गेला. तरी इतर सांभाळलेल्या मुलांप्रमाणे येत-जात राहायचा. पत्रव्यवहार असायचा. ज्योत्स्नाची सारी स्वप्नं स्वप्नंच राहणार होती. सुनील एकच आशा होती. पै-पै जमवून त्याला शिक्षणाला मदत केली. लग्नही करून दिले. त्याच्या घरी येत-जात राहायचे. सून रेखा आश्रमातलीच मुलगी पण समजूतदार निघाली. पारणे, पांग फिटल्याचा आनंद मिळत होता.
 तशात एक दिवस आश्रमाने सांगितले की उद्यापासून तुम्हाला नोकरी करता येणार नाही. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्हाला कुष्ठरोग झालाय. मुलांना संसर्ग होईल. ज्या मुलांच्या आधारावर मी उभी पंचवीस-तीस वर्षे सर्व विसरून आयुष्य झोकून दिलं तो आधारच गेला. पायाखालची वाळू सरकू लागली. पायाखाली ना जमीन राहिली ना डोक्यावर आभाळ, भ्रमिष्ट झाले. वॉर्डाच्या कोप-यात जिन्याखाली माझी खाट घातली गेली. मी आजवर ज्यांच्यावर अधिकार गाजवला त्या आया-दाया पण मला हेटाळू लागल्या. अन्न गोड लागेना. तापाने फणफणले. बहुधा मी झुरून मरणार म्हणून अहिरराव (अधीक्षक) यांनी सुनीलला बोलावून घेतले. सुनीलने ज्योत्स्नासह मला कोल्हापूरला नेले; पण भाड्याच्या घरात ज्योत्स्नाला अशा वेडसर स्थितीत घेऊन राहणे शक्य होईना. पुन्हा आश्रमात आले. ज्योत्स्नाला आश्रमाच्या हवाली करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्योत्स्नाला आश्रमात सोडणे म्हणजे तिच्यावर पाणी सोडणेच होते नि तसे झालेही. ती काही दिवसांतच गेली.
 सुनील-रेखाने माझे सर्व केलं. औषधोपचार नियमित केले नि मी बरी झाले. मला कुष्ठरोग झाला नव्हता, असं डॉक्टरांचं म्हणणं. उपासतापास भरपूर करायचे. उष्णता वाढून कातडी काळी पडू लागली होती. औषधोपचार, सकस आहार, उपवास बंद करणे यामुळे मी पूर्ण बरी झाले. आज मी सुनीलच्या मालकीच्या घरात नव्हे, बंगल्यात अत्यंत ऐषारामात आहे. कुणालाही हेवा वाटावा, असे सुख मला लाभले आहे. ईश्वर नामस्मरण, वाचन, दूरदर्शन, नातवांशी गुजगोष्टी; सारं कसं अनपेक्षित पण सुखदायक्  आयुष्याच्या या प्रवासात वारंवार आभाळात ढग आले. प्रत्येक वेळी मी कष्टपूर्वक व निग्रहाने लढले. माझी माझ्या सचोटीवर श्रद्धा होती. त्यामुळे आभाळ पेलताना खांदे हेलावले; पण मला बसायची वेळ आली नाही. ही सारी पुण्याई त्या अक्षरशः शेकडो अनाथ मुला-मुलींची, ज्यांची देखभाल, औषधपाणी, आजारपण, उष्टावळ सारं मी मनःपूर्वक केलं, त्याचं फळ. मी एक घर गमावले खरे; पण मिळाली हजार घरं. माझी नि माझीच.


एकटी... अनाथ... तरी स्वाधार!


 माझा स्वभाव लहानपणापासून हट्टी व हेकेखोर होता. मी आमच्या घरातलं शेंडेफळ होते. माझ्या आधी दोन भाऊ व पाच बहिणी जन्मलेल्या. माझ्या कौतुकाचं कारण नव्हतं. घरी जमीन-जुमला, धन-धान्य, दूधदुभतं, गडी-नोकर असं सुखवस्तू घर. आमच्या बिद्री गावात वडिलांचा दरारा होता. एक तर घरची पाण्याखालची १५-१६ एकर शेती, उसाची पट्टी यायची. वडील पोलिसात होते. चांगले ठाणे अंमलदार होते; पण भाव फौजदाराचा होता. आई-वडील सुशिक्षित नसले तरी समज होती. माझ्या वरची भावंडं फार शिकली नसली तरी सगळी शाळेत जात. इतरांच्या मानानं शिक्षण आमच्या घरी बरंच म्हणायचं. माझं शिक्षण कधी घरी, कधी बहिणीकडे असं झालं; कारण काही नव्हतं... असेलच तर माझं लहान असणं... सर्वांचे लाड... त्यामुळे मी शेफारली असावे... मला ते काही आठवत नाही. एवढच आठवते की मला 'नाही' शब्दच माहीत नव्हता... मी म्हटलं की व्हायचं... त्यामुळे पुढे स्वभावच असा झाला की, मी म्हणेल ते व्हायलाच पाहिजे... मी म्हटलं तर सूर्य पश्चिमेला उगवणारच!
 माझ्या या स्वभावामुळे मला आठवतं की, मी दहावीची परीक्षा झाल्यावर माझ्या मोठ्या बहिणीकडे सांगलीला गेले होते... सुट्टीला म्हणून... ती घरी एकटीच असायची. तिचे मालक (आमचे भावोजी) जयसिंगपूरला जाऊन-येऊन करायचे. ती नारायण हॉस्पिटलला नर्स होती. ते तिच्या नवग्याचं दुसरं लग्न होतं. पहिलीला मूल होत नव्हतं म्हणून दुसरीला करून आणली. बहिणीच्या पायगुणानं सवतीचं नशीब उजाडलं... तिला दिवस


गेले. भावोजी पहिल्या बायकोकडेच राहू लागले. अधी-मधी बहिणीकडे यायचे; पण राहायचे नाहीत. बहिणीला दिवस गेले म्हणून मी तिच्या हाताखाली आले. दहावीत होते; पण समज कॉलेजची होती... भांडीकुडी, दळप-कांडप, स्वयंपाक-पाणी सारं यायचं... आईचं वळणच तसं होतं... पोरीच्या जातीला संसाराचं सारं करता आलं पाहिजे... असा तिचा आग्रह असायचा. आम्हा तीनही बहिणींना तिनं एकसारखं वागवलं... वळण लावलं होतं... त्यामुळेच असेल कदाचित. आम्ही स्वतःच्या पायावर व स्वतःच्या समजेवर उभ्या आहोत. मी फार शिकलेली नाही; पण मला समजतं लवकर, समज म्हणजे शिक्षण... शहाणपण.
 मी सांगलीत गेले. ताई हॉस्पिटलला ड्यूटीवर जायची. मी मधल्या सुट्टीत डबा घेऊन जायची. गेले की तास दोन तास तिथंच घुटमळत राहायची. तिथं एक ब्रदर होते. मुकुंद काळे त्यांचं नाव. त्यांची नि माझी तिथं ओळख झाली. तसं ते ताईकडे येऊ-जाऊ लागले. ताईची डिलिव्हरी झाली. डॉक्टरांना नर्स हवी होती. ब्रदरनी डॉक्टरांना माझं नाव सांगितलं. मला काहीच यायचं नाही. वेळ जायचा नाही म्हणून मी जाऊ लागले. घरी बहीण शिकवायची. हॉस्पिटलमध्ये ब्रदर. सुरुवातीला मी वरची कामं शिकले. बेड लावणं, औषधं देणं, ड्रेसिंग करणं, रक्त घेणं, सलाईन लावणं करत सगळं शिकले. ब्रदर मदतीला असायचेच, नाईटला एकटी असले की टेन्शन यायचं... कधी कधी नस सापडायची नाही पेशंटची... ताई येऊ शकायची नाही बाळाला सोडून...ब्रदर निरोप दिला की यायचे. डॉक्टरांची भीती वाटायची... ब्रदरचा आधार वाटायचा.
 काही दिवसांनी ताई ड्यूटीवर जॉईन झाली तशी मी गावी घरी आले तर काळेचा फोन वरचेवर यायचा. डॉक्टरांना गरज आहे... मला पण करमत नाही... तुमची सवय झाली म्हणून. पहिल्यांदा मी काही मनावर घेतलं नाही. तसं काळे गावी आले... चलच म्हणून! मी ऐकेना. त्यांनी बहिणीला मध्ये घातलं. मला काही कळेचना... एवढा काय पाठलाग? मग एकदा बहीणच म्हटली की, “ब्रदरना तुझ्याबद्दल वाटतंय... माणूस चांगला आहे. नाही म्हणू नको. त्यांनी मला सोडचिठ्ठी पण दाखवली आहे." मला काहीच कळत नव्हतं. अजून मी विशीतच होते. हो-नाही करत अखेर गेले. त्यांनी मला अकलूजला खोली करून दिली. लग्नाच्या रजिस्ट्रेशनची नोटीस दिल्याचं सांगितलं. मी बहिणीच्या भरोशावर लग्न केलं. दोन मुलं झाली. सासरची माणसं येऊ-जाऊ लागली. माहेरचं पण येणं-जाणं होत राहिलं. काय झालं कुणास ठाऊक. संसार थाटून पाच वर्षही झाले नाहीतर त्यांची माहेरच्या माणसांच्या येण्याजाण्यावरून कुरबुर सुरू झाली. मला काही बोध होईना. तेवढ्यात समजलं की, यांचं गावाकडं पहिलं बि-हाड आहे. शेताचं निमित्त सांगून जायचे... खरं नंतर समजत राहिलं, तशी मी मुलांना घेऊन माहेरी आले.
 मी मुलांना घेऊन कायमची राहायला आले, असं सांगितलं तसं आई, वडील, भाऊ, बहिणी सर्वांनी घर डोक्यावर घेतलं. मला काही कळेचना, आजवर माझी थुकी झेलणारे... ढुंकून पाहिनात की बोलेनात. मला समजत गेलं. जगात आपलं कोणीच असत नाही. गोतावळा म्हटला तर आपला. नाती सगळी सोईची असतात. गरज संपली की, कुल्ल्याला हात पुसून नामानिराळे. सुखात सगळे आपले असतात. दुःखात जोडलेली माणसंच कामाला येतात. हे मी गेल्या पाच वर्षांत संसार केला तसं उमजत गेलं.
 आईचा एकच धोशा होता... पोरं बालकल्याण संकुलात... कोल्हापुरात ठेव... मोकळी हो... हात परत पिवळे करू. मला हे पटत नव्हतं. आईवडील, आजी-आजोबा, कामा-मामा असताना पोरांना अनाथ करायचं मला पटत नव्हतं. मी नाहीच म्हणून बसले. मोठा भाऊपण अंगावर येऊ लागला... ‘आमच्याच्यानं नाय व्हनार' म्हणायचा. दुसरा भाऊ बोलायचा नाही; पण री ओढायचा. एकदा तर सवती (वेगळ) रहा म्हणाले, तसं माझं डोकं फिरलं... मी मुळातच हट्टी होते, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. मी पण हिय्या केला, नाही राहायचं घरात, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पोरांना शिकवायचं.
 माझा एकच दोष होता. मी कुणाच्याही ओंजळीनं पाणी प्यायचे नाही. कुणावरही अवलंबून राहायचे नाही. अवलंबन म्हणजे गुलामी, असंच मला वाटायचं. मी पोरांना घेऊन बालकल्याण संकुलात गेले. बाईंना भेटले. आई सोबत होती; पण तिची नुसती सोबतच होती... तेवढ्यात तिनं आपलं घोडं दामटायचा प्रयत्न केला... "पोरांना तेवढं ठेवा. मी पोरीचं बघते" मी नाही म्हटलं. “माझ्यासह ठेवा... नाहीतर मी नदीत उडी टाकून मरते; पण घरी नाही जाणार."
 बाई म्हटल्या, “ठीक आहे... ठेवून घेते; पण तुम्हाला पडेल ते काम करावं लागेल." मी 'हो' म्हटलं, तशी आई निसटली. तिचा जीव भांड्यात पडला. मलाही स्वतंत्र झाल्याचा आनंद भेटला. स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगता येण्यासारखे दुसरं स्वातंत्र्य नसतं. वळचणीत राहणं म्हणजे गुलामी. मी मुलांना घेऊन संस्थेत राहू लागले. पडेल ते काम करू लागले. घर, दार, नवरा सारं विसरवलं संस्थेनं. संस्थाच माझं माहेर झालं... खरं माहेर!
 मी कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात जातानाच मनाशी ठरवलं होतं की सासर, माहेर माझ्यासाठी संपलं, मेलं. संस्थेत प्रवेश केला नि मी एका निराळ्यात जगात आले असं वाटू लागलं. घरी पाच-दहा लोकांत राहायची सवय... इथं चांगली तीनशे मुलं, मुली, बायका. प्रत्येकीची तन्हा वेगळी. एकाच ठिकाणी अनेक संस्था पण कशा सुतासारख्या चालायच्या. तेव्हा दादा संस्था पाहायचे. त्यांचं सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असायचं. स्वच्छता, जेवण, मुलं नीटनेटकी, दवाखाना, औषधपाणी सारं जिथलं-तिथं व जेव्हाचं तेव्हा. ही १९९२-९३ ची गोष्ट असेल. पहिला आठवडा मी बसूनच काढला. मग दादांनी तेव्हा लहान मुलांच्या आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करायचं ठरवलेलं. ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी मन लावून करू लागले. अंघोळ, कपडे, केस विंचरणं सारं करायचे... मुलं उजळली... सर्व माझं कौतुक करू लागले. मग पाळणाघराकडे नेमले. संस्थेत टाकलेली, सोडलेली मुलं असायची. आमच्या सांगलीच्या हॉस्पिटलपेक्षा इथं सोय चांगली होती. डॉक्टर, नर्स, जेवण, राहणं, खेळणी, रेडिओ, टी.व्ही... सर्व म्हणजे सर्व! मुलांना फुलासारखे जपायचे. दादांचं ऑफिस शेजारीच होतं. बाळ रडलं तरी यायचे... घ्यायचे. त्यामुळे सर्व जागृत असायचे. मला मग पगार सुरू केला. काही वर्षांनी वाढला, तशी मी संस्थेबाहेर मुलं घेऊन राहू लागले.
 या संस्थेनं माझ्याबरोबर अशा कितीतरी निराधार मुलं-बायकांना स्वतःच्या पायावर उभं केलं होतं... कितीतरी मुलं, मुली, स्त्रिया ... शोभा, जयश्रीबाई, श्यामा, सुतारबाई, रजाक, निलेश, विकास, यशवंत किती नावं सांगू? मला मोठं आश्चर्य वाटायचं... रक्ताचं नातं असलेले काखा वर करतात... इथं कोण कुणाचं नसतं... पण किती माया... किती विचार.. लक्ष. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा. प्रत्येकाची सोडवणूक वेगळी. मी खोली करून राहिले तरी संस्थेचा खाऊ घरी यायचा... मुलांसाठी. जन्मदाते। विचारत नव्हते... संस्था खरी आय... माय होती. पगार वाढला तसा मी स्वतःचं गहाणवट घर घेऊन राहू लागले. घरचे बाहेरून चौकशी करत राहायचे, मला आश्चर्य वाटायचं. नंतर कळलं की दादाच त्यांना सांगायचे... धीर द्यायचे... अन् मला आधार!  मी नेहमीसारखी ड्यूटीवर होते... मुलं शाळेत गेली होती, तर काळे संस्थेत दत्त. मला राग आला... मनात आलं... आले सुखात विष कालवायला... मी ड्यूटीवर आहे सबब सांगून भेटायचं टाळलं, तर संस्थेबाहेर उभे... ड्यूटी संपून घरी निघाले तर पाठलाग करत आले. मी दम भरला तसे परतले. हे बळ मला संस्थेमुळे आलेलं होतं. संस्था कवचकुंडल होती. यापूर्वी इतरांचे मालक असेच घोळत असायचे... अशांना संस्था, दादा, ताई, साहेब प्रसंगी पोलिसांत द्यायचे, हे मी यापूर्वी पाहिलेलं होतं. ते गेले तसा मी श्वास सोडला... दमले होते म्हणून पाठ टेकली... मुलं शाळेतून येण्याची वाट पाहात होते, तेवढ्यात दादांनी बोलावलं म्हणून सांगावा घेऊन मामी घरी आल्या. आमच्या सर्वांच्या लेखी संस्थेचा, दादांचा निरोप म्हणजे वॉरंटच! अपील नसायचं... वाटेतच मामींकडून कळलं की काळे रडत दादांना भेटले... मला काय होणार हे अंदाजानं उमगलंच. मी धीर एकवटून दादांपुढे उभे राहिले... मान खाली घालून. दादा म्हणाले, “हे काळे, बोला काय ते...!” “मी परत भांडणार नाही... मारणार नाही... सोडणार नाही... हकलणार नाही...' सगळी जुनीच टेप, तरी फरक होता एका वाक्याचा... “हे मी केलं नाहीतर दादा जेलमध्ये टाका मला! निराधार तू नाहीस. मी आहे... मला तुझ्या आधाराची गरज आहे. पहिलीपेक्षा तूच प्रेमाची, हे आता मला कळून चुकलं... वाटलं तर मी सर्वांसमोर पाय धरतो." दादांपुढे मला नाही म्हणणं शक्य नव्हतं... तरी त्यातून म्हटलंच मी, ‘‘पुरे झालं नाटक... चला मुकाट्यानं" माझ्या मागं खरंच मुकाट्यानं आले. वाटेत पोरांना खाऊ घेतला... भाजी घेतली... गोड घेतलं आणि शाळेतून मुलांना घेऊनच परतलो.. पोरं त्यांच्याकडे जाईनात तसे हंबरडा फोडून रडू लागले... काळेच्यात फार बदल झाला होता, असं आठवडाभरात लक्षात आलं. गावची देशमुखी... थाट पार उतरला होता. जाधवबाईंच्या ओळखीनं त्यांनी नोकरी मिळवली ब्रदर म्हणून... गावचं शेत, घर विकलं म्हणाले. चांगलं राहात होते; पण गाडी थोड्या दिवसांत मूळ पदावर आली. दादांना, संस्थेस घाबरत; पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना? एक दिवस नशेत स्वतःला पेटवून घेतलं अन् गेले.
 मी परत एकटीच! मला कुणाचा शाप कुणास ठाऊक... मी लहानपणी पण भरल्या घरात एकटीच असायचे. ताईकडे गेले तरी एकटीच... मला कसला घोर लागायचा कुणास ठाऊक... मला माझा शोध अस्वस्थ करतर राहायचा... अन् मी परत नव्याने एकटी प्रयत्न करत राहायचे... रस्ते नवे... गाव नवं... माणसं नवी... मी परत एकटीच! माझं हे एकटेपण शक्ती होती... बळ होतं. संस्थेनं मला या एकटेपणाचं नवं भान दिलं. नवरा गेला तरी माहेरी जावं... सासरी जावं, असं वाटलं नाही. संस्थेनं माझ्यात मीपण जागवलं होतं. आता पाहा ना! मी पन्नाशीच्या उंबरठ्यावर एकटी आहे. मुलगा प्रशांत मोठा झालाय. विशी पार केलेला प्रशांत. त्याला परिस्थितीनं अकाली प्रौढ केलं. तो गारमेंटचा व्यवसाय करतो. त्याची सोयरीक त्यानंच जमवली. सून प्रिया बी.एस्सी झालेली गुणी मुलगी. प्रतिमा लवकरच ग्रॅज्युएट होईल. तिला उजवण्याची सर्व जय्यत तयारी. काळे गेले; पण मुलांसाठी चार पैसे ठेवून गेले. माहेरचा हिस्सा मी भांडून मिळविला. सोडला असता; पण त्यांनी मला वा-यावर सोडलं तेव्हा फाऽऽर सोसलं. असे भोग कुणासच येऊ नयेत. मला माझ्या मुलांना वा-यावर नव्हतं सोडायचं. संस्थेनं मला जर कोणतं बाळकडू दिलं असेल ते हेच! हात पसरायचे नाहीत. मिळवलं तरी माजायचं नाही. आपलं नसेल कोणी... दुस-याचं व्हायचं. बुडत्याला हात द्यायचा पण स्वतः बुडायचे नाही... डगमगणार नाही याची काळजी घ्यायची. मी ठरवून टाकलंय... पोरीचे हात पिवळे केले की, परत एकटं राहायचं! पोरांच्या संसारात ढवळाढवळ नाही करायची. संस्थेसारखं खंबीर पाठीमागे उभं राहायचं पण स्वतंत्र! संस्थेनं माझं असह्य जीवन सुसह्य केलं.. आज मी ऐकून आहे... सासर, माहेरचे माघारी म्हणत असतात पोरगी एकच राजर्षीसारखी राहतेवागते. मुलगी असूनही पोरासारखा पुरुषार्थ केला... न माघारी आली... न कधी हात पसरले... आली तरी सन्मानानं... नाकावर टिच्चून जगली... आमचंच चुकलं... आम्ही नाही तिला जोखलं... तिला अनाथ करायला नको होतं... आज आम्हीच अनाथ झालोय... पोरं एकटी. आम्ही एकटे... चुकलेल्याला पोटात घेण्यासारखं शहाणपण नाही. पण वाहून गेलेली नदी कुणाला कधी भरता आलीय?


मला समजून घेतलं असतं तर...


 मुक्काम पोस्ट हिवरे हे तालुका खानापूर जिल्हा सांगलीतील छोटं खेडे. हजारभर वस्ती असावी त्या वेळी. गाव इतकं छोटं की, सगळे सगळ्यांना नावानिशी ओळखत. सारं गाव एक घर असल्यागत. गावाबाहेर शिवारात आमची शिंद्यांची वस्ती होती. चार-पाचच घरं पण पांगलेली. या वस्तीतच माझं घर होतं. वडिलांना आम्ही आबा म्हणायचो नि आईला आऊ. दोघं प्रेमळ. आमच्या घरात दोन भावांत मी एकटीच बहीण. नव्या वर्षाचा नवा सूर्य घेऊन मी १९५६ ला जन्मले म्हणून माझं नाव ‘सूर्या ठेवलं. घरी सर्व शेतावर अवलंबून होतं. चांगली पंचवीस एकर जमीन होती. काही बागायत, काही जिरायत. मी दिसायला काही सुंदर होते असं नाही; पण चपळ, चुणचुणीत, इतर मुलां-मुलींबरोबर शाळेत जायचे. गावात सातवीपर्यंत शिक्षण होतं. हायस्कूलमध्ये गेले तशी पोरं माझी कळ काढू लागली. मला पहिल्यांदा समजंचना... माझ्या का मागं? मी खेळात... अभ्यासात... नाचात पुढे पुढे असायची... गुरुजी कौतुक करायचे. घरी पण आबा, दादा, आऊ सा-यांना कौतुक असायचं! एकदा मी नववीला असताना घरी रडत आले... पोरं छळतात म्हणून.... तसं आऊ-आबांना म्हटली... ते म्हणाले, ‘राहू द्या ते शिक्षणबिक्षन... हात पिवळं करून व्हा मोकळं...' मला आऊचा राग आला. समजून घ्यायचं सोडून मलाच शिक्षा! मला वाईट वाटलं. त्या दिवसापासून मी समदं सोडलं... मुकी... बहिरी... आंधळी झाले... वाटायचं मुलीचा जन्म नको... मुलगा म्हणून जन्मले असते तर स्वातंत्र्यच स्वातंत्र्य... पण इलाज नव्हता.

 अकरावीच्या निकालाची पण वाट पाहिली नाही घरच्यांनी दिला बार उडवून तसं माझं जग बदललं, निराळं झालं. हे प्राथमिक शिक्षक होते. जिल्ह्यात बदली असायची. गौरगाव, खरसुंडी अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. आम्ही बि-हाड करून राहायचो. पंधरा वर्षांच्या संसारात दोन मुलं, एक मुलगी झाली. सुखाचा संसार होता. दृष्ट लागावी असा. मुलं अन् हे शाळेला जायची. मी रिकामी... मन रिकामं... ते केव्हा भुताचं झालं समजलं नाही.
 तेव्हा आमचं बि-हाड तासगावला होतं. शेजारी नारायण कॉन्ट्रैक्टर राहायचा. यांच्याच वयाचा. आमच्या गल्लीत त्याचा रुबाब असायचा. आम्हाला सारी मदत करायचा. मला मोठं आश्चर्य वाटायचं... याला आपली अडचण कशी कळते? हा अगोदरच ती दूर करायचा. मुलांचं लाड करायचा. यांनी जे मला करावंसं वाटायचं ते तो करायचा... मला सिनेमा आवडायचा... फिरायला आवडायचं. यांची कायम नकारघंटाच, मला नटायला आवडायचं... हे म्हणायचे ‘‘बाईमाणसानं साधं राहावं... तू तीन लेकरांची आई आहेस... शिक्षकाची बायको तू...' मला ते नाही पटायचं... इच्छा मारून जगणं म्हणजे मरणं वाटायचं. नारायणचं वागणं, बोलणं, विचार माझेच वाटायचे. हे गेले की नारायण घरी यायचा. तास तास बोलत बसायचा... मला माझं जग मिळायचं. इच्छेच्या पलीकडे सर्व व्यर्थ वाटायचं... शेजारपाजारच्या बायका नारायणबद्दल वाईटवंगाळ बोलायच्या. मला वाईट वाटायचं... म्हणायच्या, ‘पैशावर, रूपावर जाऊ नगंस... लई द्वाड हाय त्यो... त्येला बाई... बाटलीचा नाद हाय... बोलण्यावर भुलू नगंस!' मला पटायचं; पण वळायचं नाय... त्याची नशा झाली होती। माझ्यावर. मुलांच्या विचारानं मागं सरायची; पण मन म्होरं व्हायचं. एकदा हे ट्रेनिंगला गेले होते. मुलं गावी होती. मी घरच्या कामासाठी म्हणून बि-हाडी आले होते. तसा नारायण आला, सिनेमाला जाऊ म्हणाला. मी नाही म्हणताना बळेनं चल म्हटला. मी मग काय वाटून हो म्हटलं, पण गावात नको. सांगलीला जाऊ म्हटलं... तसा तो हरखला. आम्ही सिनेमा बघितला, हॉटेलमध्ये जेवलो. उशीर झाला. गावाकडं परतायच्या मुक्कामाच्या गाड्या पण चुकल्या. काय करावं कळना, स्टेंडातच बसू म्हटलं, तर म्हटला गावाकडचं कोण आलंबिलं तर... आपण लॉजमधी जाऊ... पहिल्या गाडीनं तू तुझ्या गावी जा... मी माघारी जातो म्हणाला. इलाज नव्हता. स्टॅडच्या समोर लॉज होता. तिथं राहिलो... रात्री जे होऊ नये ते झालं. पुढे मला त्याचा घोर लागला. सांद मिळताच आम्ही भेटत राहिलो. पाळी चुकली तशी माझं धाबं दणाणलं. आम्ही तीन मुलांवर बाळ होऊ द्यायचं नाही म्हणून नवरा-बायको म्हणून संबंध ठेवणं बंद केलं होतं.
 दिवसा डोळ्यांपुढे काजवे चमकायला लागले. पोरं दिसू लागली. माझी मलाच किळस वाटू लागली. मी नारायणाशी संबंध टाळू लागले... त्याला सर्व सांगितलं तसं त्यानं परत मदतीचा हात पुढे केला... क-हाडला जाऊ... पाडू... काळजी करू नगंस. मी मेल्याहून मेली झाले होते. गावाकडे जायचं निमित्त करून कराडला गेले. पोट पाडलं; पण गावी जायचं धाडस होईना... मग आम्ही ढेबेवाडीत ओळखीच्या ठिकाणी खोली केली... नारायण येऊन जाऊन राहायचा... मी घरात कोंडून घेतलं होतं.
 तोंड दाखवायचं नाही म्हणून बि-हाड बदलत राहिलो. पोरं दिसायची सारखी डोळ्यांपुढं... पण काय तोंड दाखवणार? घरी... गावी माझा बभ्रा झाला होता... पळून गेली म्हणून... नारायणवर संशय होता पण दुम नाही। लागायचा. नारायण कॉन्ट्रॅक्टिंग करतो म्हणून गावोगावी फिरायचा... त्याला इचारायचं कुणाचं धाडस व्हायचं नाही. त्यानं यापूर्वी दोघांचा निकाल लावला, अशी वदंता होती. हे सारं मला नंतर उमजत गेलं... म्हणजे त्याच्याच बरळण्यातून समजून आलं. आताशा तो घरी आणून प्यायला लागला, तसं माझं डोकं फिरलं.
 गेली आठ-नऊ वर्षं मी त्याचं ऐकत आले... तो पण माझं... पण हल्ली तो बाजीराव झाला... गुरगुरू लागला... हात टाकू लागला तशी माझी मर्जी अन् मन मेलं. मी त्याला हात लावू द्यायची नाही. तसा तो चेकाळायचा... ‘दोघांना संपवलं, तुझं काय घेऊन बसलीस?' म्हणू लागला. तसं माझं अवसान संपलं. घर, दार सारं गमावलेली मी... मी । रंगान सावळी होते म्हणून वर्गातल्या मुली ईनं काळ्या तोंडाची म्हणायच्या... आता तर मीच मला तसं म्हणू... समजू लागले... नारायण नसला की तासन्तास आरशासमोर उभं राहून बोलत राहायचे... माझी मलाच घृणा... किळस वाटून यायची, त्या भरात एकदा मी स्वतःला पेटवून घेतलं... तडफड... आरडाओरड्यांनी शेजारच्यांनी कितीतरी वेळा प्रयत्न करूनही दरवाजा निघाला नाही. तेव्हा मी बेशुद्ध झाले होते म्हणे... मला ते काहीच कळलं नाही. शुद्ध आली तेव्हा माझे दोन्ही हात अंगाला चिकटलेले होते.
 बरी झाले तसे नारायणनं घरी आणलं... मी ब्लाऊज घालू शकत नव्हते. वडरांच्या बायकांसारखं बिनचोळीचं मला राहावं लागायचं. नाही म्हणायला छाती-पाठच भाजली होती. वरून कुणाला काहीच कळायचं नाही. ढेबेवाडी सोडून आता आम्ही गारगोटीकडे आकुर्डे गावी एकाच्या ओळखीनं बि-हाड केलं. दोन्ही हात कोपरापर्यंत चिकटलेले होते. कोपरापासून हात हालायचे. माझं मी सगळं करू शकायचे; पण अपंगच झाले होते. मन मनातल्या मनात म्हणत होतं... “कोण होतीस तू.. काय झालीस तू!' इकडे बि-हाडात धान्य भरून हातावर हजार रुपये ठेवून नारा गेला. जाताना सांगून गेला की, मला गुजरातचं कॉन्ट्रैक्ट मिळणार हाय. महिनाभर काय येता येणार नाय!, मी महिना वाट पाहात काढला. दोन महिने झांल तरी पत्ता नाही. म्हणून गावाकडे चौकशी केली; तिथंपण तो बेपत्ताच होता. मी निराधार झाले होते... दोन वेळची भाकरी महाग झाली होती. मजुरी पण करू शकायची नाही... शेजारच्यांनी वाढून महिना काढला. रोज लोकांच्या दारात जाणं जिवावर आलं. मी आजवर राजस राहिले. भीक मागणं मरण वाटू लागलं. कंटाळून विहीर, नदीवर जीव द्यावा वाटायचं... पोरं दिसायची अन् नको वाटायचं!
 गावात एक अंगणवाडी सेविका होती. तिच्याकडून मला महिला आधारगृहाची माहिती मिळाली. तिनंच पुढे करून मला शासकीय आधारगृहात दाखल केलं. तिथं पाटील बाई सुपरिटेंडेंट होत्या. आम्ही त्यांना ताई म्हणायचो. ताईंनी माझी कहाणी ऐकली... माझी स्थिती पाहिली अन् मला संस्थेतच काम दिलं. संस्थेतील बाकी मुली, बायको कोण बाहेर शिकायला, कोण आयटीआयला, कोण नोकरीला जायच्या. काही संस्थेतच असायच्या. इतर कर्मचारी बरे नव्हते; पण ताईमुळे सगळं पोटात घेत आम्ही राहत असू. इतर मुली, महिलांची प्रत्येकीची कथा म्हणजे एकेक सिनेमाच असायचा. काही केवळ अनाथ असायच्या. त्याचं फार वाईट वाटायचं. सोसण्याशिवाय पर्याय नसायचा. वाटायचं माणसानं अनाथ असू नये... जात नाही, नाव नाही, नातं नाही... आपण म्हणजे आपले जग आमचं बरं होतं. वळचणीला जायचं म्हटलं तर जागा होती; पण आमचा वनवास आम्हीच निर्माण केलेला. त्याचं वाईट वाटायचं.
 मी एकदा बाईंना माझ्या मनातली इच्छा बोलून दाखविली... ‘बाई... ऑपरेशन करून हात होतील का हो मोकळे... ब्लाऊज तरी घालता येतील.' ही कल्पना यायला पण कारण घडलं होतं. पेपर वाचताना ‘प्लॅस्टिक सर्जरीचे चमत्कार' म्हणून एक लेख पाहिला होता. बाईंना तो दाखविला. प्रयत्न करूया म्हणाल्या. पण खर्चाचं काय? बघते म्हणाल्या; पण तीन महिने तसेच गेले. आमच्याच शहरात एक ट्रस्टचं हॉस्पिटल होतं. संस्थेची नि माझी सर्व माहिती देऊन त्यांनी प्लास्टिक सर्जरीसाठी प्रयत्न केले. शहरात आणखी एक निराधारांची संस्था होती. तिथले प्रमुखच त्या हॉस्पिटलचे सेक्रेटरी होते. त्यांच्यामुळे माझी सर्जरी विनामूल्य झाली. सर्जरी झाल्यावर जखमा वाळायला दोन महिने गेले; पण हात मोकळे झाले. खरं तर मी मोकळी झाल्यासारखं वाटलं.
 त्याच दरम्यान संस्थेत एक काळजीवाहकाची जागा भरायची होती. बाईंनी मनावर घेतलं. सेवायोजना कार्यालयात नाव नोंदवणं, कार्ड काढणं, कॉल काढणं, इंटरव्ह्यूची तयारी करून घेणं सारं बाईंनी पुढे होऊन केलं. ताईंच्या रूपाने मला साध्वीच भेटली. शासकीय नोकरी, पगार इत्यादीमुळे माझं आयुष्य बदललं. मी घराकडे संपर्क केला. हे काही बघेनात; पण मुलगी आली प्रथम. मी तिचे सर्व करताना हळूहळू मुलं येऊ लागली. एक घरी राहू लागला. दुसरा वडिलांकडे राहिला. मी मुलांचे शिक्षण, लग्न सारं पुढे होऊन केलं. क्षमा मागून कन्यादानासाठी तरी या म्हणून यांना गळ घातली. पहिल्यांदा लोकलाजेखातर का असेना आले. मग येत राहिले.
 संस्थेनं माझं जीवन बदललं. माणूस चुकतो; पण चूक पोटात घेऊन सुधारण्याचा मोठेपणा ना समाज दाखवतो ना घर. संस्था स्वर्ग वाटते, ती माणसाला त्याच्या नरकयातनांतून सोडवण्याच्या तिच्या निरपेक्षतेमुळे! संस्थेतली माणसं कोण कुणाची असत नाहीत; पण सगळ्यात दुःखाचा एक समान धागा असतो. दुःखी माणूसच दुस-याचं दुःख जाणतो. तसंच दुस-याचं दुःख आपलं म्हणणारे संस्थेचे प्रमुख आपले सर्वच होतात.. आई, वडील, मित्र, मार्गदर्शक सर्व! त्यांच्यामुळे नव्हत्याचं होतं होतं... जगणं सुसह्य होतं?
 आज मी जे दिवस पाहते... अनुभवते आहे ते पाहात मागे वळून बघताना खरंच वाटत नाही. एक काळ असा होता की, रोज विष खावं, आत्महत्या करावी, असं वाटायचं. माणसानं चूक करू नये खरं आहे; पण माणूस चूक का करतो, हे समजून घ्यायला हवं. माणूस ज्याच्या त्याच्या आतल्या आवाजावर नाचत असतो. माणसाला त्याच्या गुण-दोषासह समजून घेऊन स्वीकारायची उदारता ना समाजात असते ना आपल्या माणसात. मतभेद माणसाला दुरावतात, बिघडवतात. यांनी माझ्यासाठी थोडा वेळ काढला असता... मला थोडा वेळ दिला असता... मला समजून घेतलं असतं तर माझा पाय घसरला नसता. शेण माणूस सुखासुखी खात नाही. त्याचं म्हणून काही म्हणणं... घोर असतो. आपण माणसाला कालच्या मोजपट्ट्या लावून आज मोजतो... कसं होणार?
 हेच पाहा ना, मी मुलीला आणलं... शिकवलं तर तिचा नवरा व्यसनी निघाला. मी फारकत घेऊन तिच्या मुलीसह... नातीसह तिला सांभाळलं... समजून घेतलं. तिच्या नव-याला पण सुधारायची संधी दिली... त्याला पण काही काळ सांभाळलं; पण सुधारायचं नाव नाही. त्याच्यात एक न सुधारणाच्या पुरुषाचा पीळ आहे... जळल्याशिवाय नव्हे जळल्यावरही तो सुटणार नाही, याची खात्री झाल्यावर मी नाद सोडला. पोरीला मुक्त विद्यापीठात शिकवलं. ती पदवीधर होईल. नात चौथीत आहे. पोरीला मी माझ्या जागी लावीन म्हणते... तिनं माझा वनवास स्वर्ग झालेला पाहिला आहे... चांगल्या अर्थानं ती माझ्यावर गेली आहे. संस्थेतल्या मुलीमहिलांचं ताईंचं शिकून मी जसं करते तसं ती करेल, याची मला खात्री आहे. वातीला वात लागते म्हणतात. वात लागली आहे... वाताहत होणार नाही याची खात्री आहे; कारण तिनं उभारीतच भरपूर उद्ध्वस्तपण अनुभवलं आहे. आमचं निराळं जग म्हणाल, तर उफराटं असतं. इथं समाजाच्या दृष्टींन वंगाळ माणसं असतात; पण खरं सांगू... इथं धोका नसतो... नारायणसारखे धोकेबाज, मतलबी नसतात. इथे आपले परके होण्याची शक्यता नसते... इथे काखा वर करणं नसतं... इथं मी निराळे जग कवेत घेतलं. इथं कवटाळताना कोणी कंटाळत नाही; कारण कवटाळण्यातूनच इथे एकमेक एकमेकांचे कोणीतरी होतात ते जन्मभर! अन् जन्मोजन्मीचे!


डाग नसलेला चंद्र


 मी सौ. रेखा सुनीलकुमार लवटे. पूर्वाश्रमीची रेखा श्याम राव. या पूर्वाश्रमीत एक शब्द लपला आहे आश्रम आणि तोच मनाला बोचतोय. मी खरोखरच पूर्वी आश्रमात राहिले आहे. अनाथपणाचे ओझे घेऊन. दुःखात सुख एवढेच की, माझी आई, सासू, पती सारेच माझ्यासारखे असल्याने आम्ही अनाथाचे आता सनाथ झालो आहोत.
 मला असं सांगितलं गेलंय की माझा जन्म कुमारीमातेच्या पोटी झाला. आईविषयी मला जी थोडीफार ऐकीव माहिती आहे, त्यावरून मी सोनार घराण्यातली होती, पूर्वी माझे नाव रेखा वयुडे होते म्हणे; पण नंतर मला दोन महिन्यांची असताना आई आश्रमात सोडून गेली आणि माझा सांभाळ आश्रमातील मेट्रन सिस्टर पी. राव यांनी केला नि माझे नाव रेखा श्याम राव असे झाले व तेच शाळेत लागले.
 मला माझी खरी आई-जन्मदाती आई काही आठवत नाही व तिची कधी आठवण झाल्याचेही स्मरत नाही; पण या सांभाळलेल्या आईने माझे इतके केले की खरं तर तीच माझी खरी आई वाटते. पंढरपूरच्या बालकाश्रमात आईबरोबर माझं सारं बालपण गेलं. शिक्षणही तिथेच झाले. मी आश्रमात असले तरी आईबरोबर स्वतंत्र राहात असे. त्यामुळे आश्रमातील माझ्या इतर मैत्रिणींना जो त्रास व्हायचा, जे सोसायला लागायचं ते मला मात्र सोसावं लागलं नाही. आश्रमाच्या चार भिंतीत मी सनाथ होते आईमुळे. बाईंनी (सिस्टरांनी) माझ्याबरोबर आणखी एका मुला-मुलीचा सांभाळ केला होता. वनमाला राव. ती माझी मोठी बहीण झाली. रमाकांत राव. तो माझा मोठा भाऊ झाला. घरात भाऊ, बहीण, वहिनी, भावोजी, भाचे, पुतणे सगळे आकारले ते आईमुळे. आईंनी आम्हा सर्वांची शिक्षणे, आजारपण केलं, संसार थाटून दिले. हे सारं चार भिंतीत ठीक होतं; पण समाजाच्या, जगाच्या दृष्टीने मी अनाथच होते. मी आश्रमातील मैत्रिणींबरोबर शाळेत, फिरायला, सिनेमाला जात असे. रस्त्यातून जाता-येता कोण हेटाळणी व्हायची. माणसाच्या जीवनात नुसतं भौतिक सुख असून चालत नाही. सर्व असून नसल्यासारखं वाटायचं. माझ्यात माझ्याबरोबरच्या मैत्रिणींमध्ये काहीच कमी नव्हतं. कमी होतं ते फक्त ‘अनाथपण' त्यात माझा काय दोष, अपराध होता?
 मी दहावीत असतानाची गोष्ट. मैत्रिणींची टक्कर झाल्याचं निमित्त झालं. मी माझा एक डोळा दुखावला. ते दुखणं आजही अधी-मधी अंगावर येतच आहे. दृष्टी जाऊन अंधत्व येणार या भीतीने मी गारठलेले; पण आश्रमांनी नि विशेषतः आईंनी त्या वेळी ज्या खस्ता खाल्ल्या त्या जन्मदात्या आईनेही पण खाल्ल्या नसत्या. अनाथपणाबरोबर अंधत्वाचे व्यंग आलेले पण निभावून गेले.
 आईची निवृत्ती जवळ आली. पोटच्या गोळ्याप्रमाणे तिने माझा अठरा वर्षे सांभाळ केला नि आता परत ‘अनाथ' करायचं तिच्या जिवावर आलं म्हणून तिनं निवृत्तीपूर्वी लग्न व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले. शिक्षणात माझी फारशी गती नव्हती. शिवणकाम, स्वयंपाक, गायन यात मला अधिक रस होता. त्यामुळे लग्नाचा विचार पक्का झाला.
 माझ्यापूर्वी ताईचं लग्न झालेलं. तिच्यासाठी आईंनी सुशिक्षित घरदार, नातेवाईक, सामाजिक प्रतिष्ठा, मोठा पगार आदी सर्व पाहून स्थळे पाहिलेली. अनुभव जो पाठीस आला तो इतकाच की ताईत सारं काही असून ती 'केवळ' अनाथ होती म्हणून ‘सारं मुसळ केरात गेलं' नि ती तिच्या वाट्याला फार मोठे नैराश्य आलं; पण ती जिद्दीची. तिनं ते निभावून नेलं. मला ते पेलेल असे न वाटल्यावरून आईंनी, आश्रमाचे अधीक्षक रमाकांत तांबोळी यांच्या सल्ल्याने माझे लग्न आश्रमातल्या शिकून सवरून मोठा झालेल्या एका मुलाशी करायचे ठरवले नि तसे ते झाले.
 सुनीलला मी लहानपणापासून ओळखायचे; पण त्याच्याशी लग्न होईल असे कधी वाटले नव्हे. माझे लग्न झाले तेव्हा ते हायस्कूलमध्ये शिक्षक होते. अवघा ऐंशी रुपये पगार हाती यायचा. भरल्या समृद्ध घरातून टाईल्सच्या घरातून मी शेणाने सारवायच्या घरात आले. १९७२ ते १९९२ या गेल्या वीस वर्षांत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं.
 आई निवृत्त होऊन काही दिवस माझ्याकडे राहिली. आता ती ताईकडे असते. दरम्यान, मला दोन मुले झाली. निशांत मोठा. नुकताच बारावी झाला. सी.ए. करतोय. छोटा अंकुर सातवीत शिकतोय. लग्नाच्या वेळी माझा शिक्षक असलेला माझा पती आज प्राध्यापक आहे. संशोधन, मार्गदर्शक, लेखक, संपादक, वक्ता, समाजसेवक, अनेक पुरस्कारांचा मानकरी, सर्व युरोप पालथा घालून आलेला दर्यावर्दी झालाय. स्वतःच्या टुमदार बंगलीत मी माझ्या सासूसह (सुनीलला आश्रमात सांभाळणाच्या आई) सुखावले आहे.
 आज माझं वय चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन उभं आहे. गेल्या चाळीस वर्षांचे अवलोकन करताना माझ्या लक्षात येतंय की अनाथपणाचं आभाळ पेलताना आश्रम, आई, ताई, दादा, माझे पती या सर्वांनी वेळोवेळी मला जो आधार दिला त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य. हे आभाळ पेलताना मला प्रत्येक क्षणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आलीय की आम्हा आश्रमातील मुलीत समाजानं नाकारावं असं काहीच नसताना समाज आम्हाला का नाकारतो? अनाथ मुली घरी-दारी नाही का असत? पाय घसरलेल्या किती माय-भगिनी घरंदाजपणाच्या बुरख्यात आपलं हरवलेलं कौमार्य, सौभाग्य, पावित्र्य नाही का लपवत आल्यात? आम्ही केवळ आश्रमाच्या आधार, आश्रयाने वाढलो म्हणून का आम्ही कमी?
 मला वाटतं, या सर्वामागे अनाथाश्रम, रिमांड होम यांसारख्या संस्था, तेथील मुले, मुली यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा विकृत नि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनच कारणीभूत आहे. यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. तशी संस्थांनी आपली कार्यपद्धती पण बदलणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आभाळ पेलण्यापूर्वीच ते फाटेल आणि खरं विचाराल तर ब-याच संस्थाश्रयी पुनर्वसित मैत्रिणी, भगिनींच्या जीवनाचं आकाश इतक्या ठिकाणी नि इतक्या त-हेने फाटलेलं असतं, त्यांच्या जीवनाची वाताहत पाहात असताना मला नेहमी जीर्ण, जर्जर, भोकाभोकांनी भरलेल्या, काड्या तुटलेल्या व भर पावसात वा-याच्या झंझावाताने उलटलेल्या छत्रीची आठवण येत असते. म्हटलं तर आसरा असतो; पण ब-याचदा निरुपयोगी.  माझ्या व्यक्तिगत जीवनात मला फार कमी भोगायला मिळालं. तुलनेने भौतिक कसोटीवर; पण आसपासच्या समाजाने कळत नकळत साध्या साध्या कारणांनी मला माझ्या अनाथपणाची सतत जाणीव बोचणी दिली. कुशनवर बसलेय खरी; पण खिळा सतत बोचतोय. काढायचा तर कुशनच पूर्णपणे उसवायला हवं; पण आज तरी माझ्या मनाची तशी तयारी नाही. ती बोच हीच माझ्या जीवनाची रंगत आहे. त्याशिवाय जीवन ते कसले? डाग नाही तर चंद्राची गंमत ती काय?


सूरदास नव्हे, कालिदास!


 सन १९८८-८९ ची गोष्ट असेल. आमच्या बालकल्याण संकुलात पोलीस एका तीन-चार वर्षांच्या छोट्या मुलाला घेऊन आले. पोलीस जीप संस्थेच्या दारात थांबली की ठरलेलं... कोणीतरी बालगुन्हेगार, पाकीटमार, रेल्वेत विना तिकीट सापडलेला, चुकलेला मुलगा-मुलगी असणार... पण आज आणलेला मुलगा नेहमीपेक्षा वेगळा होता. एक तर तो आंधळा होता... त्याला बोलता येत नव्हतं... आम्ही काय बोलतो ते त्याला कळत नव्हतं. लेडी पोलीस सांगत होत्या की अंबाबाईच्या देवळात त्याला त्याची आई दुकानाच्या फळीवर खाऊ आणतो म्हणून सोडून गेलीय... तीन चार दिवस झाले ती देवळात घुटमळत होती. असं दुकानदार सांगत होते... कन्नड बोलायची... रबकईची असल्याचं सांगत होती.
 मुलगा लहान असल्यानं, मुका, आंधळा असल्यानं त्याला आम्ही आमच्या वात्सल्य बालसदन' या पाळणाघरात ठेवलं. तिथल्या काळजीवाहिका मावशींना त्याची विशेष काळजी घेण्यास सांगितले. आमच्याकडे नवीन प्रवेश झालेल्या मुला-मुलींची आम्ही सर्व माहिती एका फाईलमध्ये ठेवत असतो... पोलीस वॉरंट, रिपोर्ट, प्रवेश अर्ज, आरोग्य तपासणी अहवाल, दाखला, गृह चौकशी अहवाल, पोलीस तपास अहवाल इ. सारं त्यात असायचं. वात्सल्य बालसदनाच्या मुलांसाठी डॉ. विजय कारंडे, डॉ. सौ. भांडारकर मुलांची आरोग्यतपासणी इ. पाहायचे. त। दिवशी डॉ. विजय कारंडे आले होते. त्यांनी मुलाची तपासणी केली. तो आंधळा होता म्हणून मी सूरदास नाव सुचवलं. आलेल्या मुला-मुलींची काही माहिती नसेल, तर आम्ही नाव ठेवत असू... माहिती गोळा करत असायचो. त्याचं नाव सूरदास ठेवायची दोन-तीन कारणं होती... मी हिंदीचा प्राध्यापक असल्यानं सूरदास नावाचा कवी आंधळा होता हे वाचलेलं... ते नाव संस्थेत कोणाचंही नव्हतं. सहसा नसलेलं नाव ठेवायचो, द्विरुक्ती टाळायची. आलेला मुलगा मुका होता; पण गुणगुणायचा... चाळा म्हणून. एक जागी बसून असायचा... मासाचा गोळा वाटायचा... बसल्या जागी शी-शू करायचा... भरवायला पण लागायचं. वात्सल्य बालसदनमध्ये ओहळ बाई म्हणून काळजीवाहिका होत्या. त्या मुलांचा सांभाळ अत्यंत प्रेमाने करायच्या. माझ्या बालपणी त्यांनी माझाही सांभाळ केला असल्यानं मला त्याचा अनुभव व प्रचिती होती. मी त्यांना व देशमुख बाईंना ‘सूरदासा'ची विशेष काळजी घेत जा, तो परस्वाधीन आहे, हे लक्षात आणून दिलं. तशा त्या म्हणाल्या, ‘दादा, काळजी करू नका. राणी नाही का चालू लागली आपली. हा पण सर्व करेल. तुम्ही नका चिंता करू. तसा मी निश्चिंत झालो. अशी मुलं संस्थेत आली की झोप लागत नसे. रुखरुख असायची.
 सूरदासला येऊन आठ-पंधरा दिवस उलटून गेले. तो अपेक्षेपेक्षा लवकर रुळला. सर्व काळजीवाहिका त्याचे विशेष लाड करायच्या. आणखी काही दिवस गेले इकडे-तिकडे गेले असतील. डॉ. कारंडे एक दिवस माझ्याकडे आले नि म्हणाले, ‘‘सूरदासच्या हालचालींवरून त्याला अंधुकसं दिसतं असं वाटतं. तो आंधळा नसावा. लहानपणी वा जन्मतः फूल पडलं असावं. आपण डॉ. अतुल जोगळेकरांना दाखवून घेऊ या." त्याप्रमाणे लगेच आम्ही डॉ. जोगळेकरांशी संपर्क साधला. त्यांनी तपासणी केली व डॉ. कारंडेंच्या मताला दुजोरा दिला. फूल काढायचं ठरलं. डॉक्टरांची वेळ घेऊन आम्ही त्याचं ऑपरेशन केलं आणि काय चमत्कार... त्याला दिसू लागलं. आम्हा सर्वांना कोण आनंद झाला. मी लगेच एक गोष्ट केली. त्याचं ‘सूरदास' नाव बदलून ‘कालिदास' ठेवलं.
 कालिदासला दिसू लागलं तशा त्याच्या हळूहळू हालचाली वाढल्या... तो प्रतिक्रिया... प्रतिसाद देऊ लागला. त्याला दिसत नव्हतं तेव्हाची एक गोष्ट आठवते. आमच्या संस्थेस भेट देण्यास, देणगी देण्यास, तपासणी करण्यास, माहिती प्रशिक्षणास नित्य कोणी ना कोणी येत राहायचं. येणारा प्रत्येक जण वात्सल्य बालसदनास भेट द्यायचा. कोणी भेटीला आलं की मुलं ‘काका नमस्ते, ताई नमस्ते' म्हणायची नि स्वागत करायची. पाहुण्यांना बरं वाटायचं. त्यात कोण देणगीदार असेल, तर मुलांच्या हातावर खाऊ ठेवायचा. त्या वेळचा सूरदास पाहुण्यांच्या बोलण्यावरून ओळखायचा.. पाहणे पाहणरे आहेत की देणारे... ओहळबाईंना पुटपुटत असायचा... 'देंगी आली... (देणगी) देंगी आली' इतका हुशार होता... आता तर त्याला डोळे फुटले होते. अन् पुढे काही दिवसांनी तोंडही सुटू लागले; पण एक झालं की, तो हिंडू फिरू लागल्यावर सुटलेलं पोट आत गेलं.
 कालिदासला येऊन वर्ष, दीड वर्ष उलटून गेलं. त्याची प्रगती डोळ्यांत भरण्यासारखी होती. तो हिंडू, फिरू बोलू तर लागलाच; पण वात्सल्याच्या सगळ्या मुलांत मोठा असल्यानं खोड्याही करू लागला होता. चिमटे काढ, खेळ लपव, असे त्याचे उद्योग.. तक्रारी नित्याच्याच झाल्या होत्या. तशा त्या विभागाच्या प्रमुख सौ. हेब्बाळकर एक दिवस माझ्याकडे आल्या नि म्हणाल्या, “सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ‘सूरदास' चा 'कालिदास केला; पण हा तर आता ‘कालिया' होऊ लागला आहे. आपण त्याला बालगृहात ठेवू या." बालगृहाच्या पहिलीच्या पुढची मुलं असायची. स्वतःचं स्वतः मुलं-मुली करू लागली की, आम्ही बालसदनातून मुलामुलींना त्यांच्या बालगृहात हालवत असू.
 कालिदासला बालगृहात हलवणं मला प्रशस्त वाटलं नाही. बाईंना म्हटलं, “थोडे दिवस सांभाळून घ्या... थोडी कळ काढा. आपण पोलिसांकडे जरा आई-वडिलांचा शोध घेण्याचा लकडा लावू." मी गृह चौकशी करणारे परिविक्षा अधिकारी विष्णू शेटे यांना बोलावून घेतलं. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आमच्या संस्थेचे पदसिद्ध कार्याध्यक्ष असायचे. त्यांना कालिदासबद्दल सर्व माहिती, केलेले प्रयत्न, त्याची झालेली प्रगती सारं सविस्तर लिहन पालकांचा शोध प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिलं. श्री. शेटे यांना पाठपुरावा करायला सांगितला. तिस-याच दिवशी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे फौजदार व दोन पोलीस डी.एस.पी.ना लिहिलेलं आमचं पत्र घेऊन सलाम ठोकते झाले. त्यावर लिहिलं होतं, ‘त्वरित शोध घेऊन अहवाल सादर करावा. व्यक्तिगत लक्ष घालावे.'
 आम्ही आमच्याकडची सारी कागदपत्रं त्यांना दाखविली. मेवेकरींच्या दुकानाच्या फळीवर मुलगा सापडल्याचं सांगितलं. श्री. शेटेंना मदतीला दिलं तशी चौकशीची चक्रे गतीनं फिरू लागली. पोलिसांनी कालिदासचे दाखल होतानाचे फोटो इ. घेऊन रबकई गाठली. मेवेकरींनी बाईचं वर्णन केलं होतं. त्यात कपाळावर टण्णू असल्याचे, वय वर्षे अंदाजे इ. टीप्स दिलेल्या होत्या. कन्नड येणारा पोलीस घेऊन फौजदार रबकईला रवाना झाल्याचं कळालं होतं शेटेंकडून.  तिस-या दिवशी पोलिस कालिदासच्या आईला घेऊन दत्त. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून त्या बापडीनं पोर सांभाळणं कठीण म्हणून देवीच्या हवाली केलं होतं. त्या आई आल्या; पण हे मूल माझं नाहीच म्हणून बसल्या. मुलाला सोडून दीड-दोन वर्ष होत आलेली. सोडताना तो आंधळा, मुका, लोळा-गोळा. आत्ताचा मुलगा दिसणारा, चालणारा, बोलणारा... आता आली का पंचायत, ‘सूरदास'चा ‘कालिदास' असा कायाकल्प करण्याची किमया वाटणाच्या आमच्या सर्वांपुढे एक नवाच प्रश्न उभा होता. मेवेकरांची ओळख परेड झाली. बाईंची ओळख पटली; पण आईला मूल आपलं वाटेना. आम्ही प्रयत्न करत होतो; पण यश येत नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून आईला म्हटलं, मुलाला काय हाक मारायची तशी मारून तर बघ, तशी ती खेकसली, ‘अय अप्पाएऽऽ' तसा कालिदासनं हंबरडा फोडला... आऊ एऽऽ' अन् तिची खात्री पटली. कालिदासला दिसत नव्हतं... बोलता येत नव्हतं; पण ऐकू यायचं. त्याच्या बालस्मरणातील आऊच्या स्मृतीची गाज त्याच्या मना-कानात भरून होती. ती आप्पाचे पटापट मुके घेऊ लागली. कुरवाळू लागली. मायेनं बोटं मोडू लागली... कन्नडमध्ये म्हणती झाली, ‘‘पोर असं होणार माहीत असतं, तर मीच सगळं केलं असतं... भांडी-कुंडी विकून केलं असतं." ती म्हणत होती त्यात तथ्य होतं... प्रामाणिकपणा होता... होतं परिस्थितीचं प्रखर वास्तव. अप्पाला तिनं ताब्यात घेतलं. मी पोलिसांना म्हटलं तिला शिक्षा नका करू. त्यांनी तिचे, आमचे जबाब घेतले व केस बंद केली. जाताना फौजदार म्हणाले, “सर, सायबांना पत्र लिहून अॅवॉर्ड द्यायला सांगा." आम्ही तसं पत्र दिलं. आऊ जाताना हरखली होती. म्हणते कशी, “गव्हर्नमेंट परत पोर मागणार नाही नव्हं?" या वाक्यात संस्थेतील साच्यांच्या कष्टाचं चीज होतं नि डॉक्टर, पोलिसांच्या प्रयत्नांची साथ. संस्था नावाची श्रेयदार होती नि मीही.

 संस्थेत चुकलेली, सोडलेली मुलं-मुली नेहमीच येत असतात. सर्वच मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेणं संस्थेस, पोलिसांना शक्य होत नाही. जंगलात चुकलेलं कोकरू कधीतरीच आईला परत मिळतं. कधी कोकरू मॅऽमं करत आईस शोधत हरवतं, तर कधी आई हंबरत दूध द्यायचं सोडते; पण जर का कोकरू परत मिळालं तर म्हणे तिला परत पान्हा फुटतो. पान्हा, पाझर जिवंत असतात. म्हणून माणुसकीस उशिरा का होईना, उमाळा येत असतो हेच खरं!

कोंडीची कोंडी


 पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात सन १९५० ते १९६५ या काळात बाबासाहेब जव्हेरी व त्यांच्या पत्नी मंजुताई ज्यांना आम्ही आश्रमातील सर्व ‘आई-बाबा' म्हणत असू, त्यांनी आश्रम अक्षरशः ‘घर बनवला होता. त्या आश्रमातून मी वयाच्या ९ व्या वर्षी सन १९५९ ला कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये शिकण्यासाठी आलो तरी दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही इथं आलेली आठ मुलं पंढरपुरी जात असू. सुट्टीची किती कित्ती वाट पाहात असायचो आम्ही! आम्ही मुलं सुट्टीसाठी आश्रमात आलो की, पाय ठेवताच सारा आश्रम चैतन्यमय होऊन जायचा. मुलं-मुली मिळून कॅरम, पत्ते, सिनेमा, क्रिकेट, वाचन इ. ची एकच धमाल असायची. त्याशिवाय कबड्डी, खो-खो, लपंडाव, लंगडी, जिबली, दोरीवरच्या उड्या, गलोरी, व्यापार, सायकल, गजगे खेळलो नाही, असा खेळ नसायचा.
 या खेळात कोंडीताई कबड्डी, खो-खोमध्ये आघाडीवर असायची. पदर खोचून खेळणं, शिवणं, लंगडी घालणं यात तिचा हात आणि पायही कोणी धरू शकायचा नाही. कोंडीताई खेळात आली की रंगत भरायची. ती ज्या पार्टीत ती पार्टी जिंकली म्हणून समजा. ताईचा तो ओसंडता उत्साह मला आजही चकित करतो. एकदा असाच सुट्टीवर गेलो असताना समजलं की, कोंडीताईचं लग्न ठरलंय नि तिला कोल्हापूरला दिलंय. तिला नि आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू?  कोल्हापूरला एक साबणाची कंपनी होती. त्या कंपनीचे एजंट माल विकायला खपवायला म्हणून पंढरपूरला येत असत. त्यांची आषाढी, कार्तिकी वारी चुकली असं कधी झालं नाही. असेच एकदा ते वारीवर आले असताना संस्थेत आले होते व त्यांनी आपणाला संस्थेतील मुलगी करायची इच्छा व्यक्त केली. मंगेश काळे त्यांचं नाव. काळेशे, उंच, सडपातळ गृहस्थ. जैन कुटुंबातील. घरात कर्मठ वातावरण, जैन घरातीलच मुलगी करायची होती त्यांना; पण मुली त्यांना रंगामुळे पसंत करत नसत. घरी वृद्ध आई होती. घरात पूजाअर्चा, सोवळे-ओवळे, शिवाशिव पाळली जायची. त्यांना कामसू मुलगी हवी होती. आश्रमाने कोंडीताईला दाखवलं. दोघांची वयं वाढली असल्यानं दोघांनी एकमेकांना पसंत केलं ते पदरी पडलं पवित्र झालं या भावनेनं. कोंडीताईचं लग्न होऊन ती कोल्हापूरला राहायला आली तेव्हा मी आठवी-नववीला असेल. शाहपुरीतील आंतर भारती विद्यालयात (आत्ताची वि. स. खांडेकर प्रशाला) शिकत होतो. आमच्या शाळेजवळच कोंडीताईचं घर होतं, असं लक्षात आल्यावर जाणं येणं होत राहायचं. तिला दोन मुलंही झाली. आम्ही घरी जात असू तेव्हा सासूच्या धाकाने कोंडीताई जरा जपूनच आमचं आगत-स्वागत करत राहायची; पण तिच्या प्रेमात खोट नसायची.
 पुढे तिची सासू वृद्धापकाळानं वारली. अन् घरी काही दिवसांनी जाणं झालं तेव्हा घरी आश्रमातली नर्सिंग करणारी उषा नावाची एक मुलगी पाहून आश्चर्य वाटलं. नंतर कळलं की, ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून नोकरीस लागली आहे. तिची सोय होईपर्यंत घरी राहायला आली आहे. काही दिवस असेच गेले नि ताई नाराज, उदास, अबोल दिसायची. खोदून विचारल्यावर कळलं की काळे उषाला घेऊन राहतात. घरी येणं कमी झालंय. पदरातील दोन मुलांची आबाळ होते. पैसे मागितले की चिडचिड करतात... अशा अनेक तक्रारी... इतके दिवस आनंदी, उत्साही पाहिलेल्या कोंडीताईचं ते हरलेलं... हबकलेलं रूप... विश्वासच वाटायचा नाही. आम्ही इतके लहान होतो... अभय, मूर्ती, मी... काही करू शकायचो नाही. सहानुभूती दाखवणं इतकंच आमच्या हाती होतं.
 पुढे मी, अभय, मूर्ती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला गेलो, तसं कोंडीताईचा संपर्क तुटला; पण अधी-मधी खुशाली कळत राहायची. नंतर उषाच्या नवव्यास हे कळल्यावर त्यानं बदली करून घेतली तेव्हा कोंडीताईची सुटका झाली व काळे मूळ पदावर आले. दरम्यान तिची मुलंही मोठी झाली. मी शिक्षक झालो. तिची मुलं माझ्याच शाळेत शिकू लागली. असं पुलाखालून पाणी वाहात राहिलं; पण कोंडीची कोंडी सुटली असं कधी झालं नाही. एखाद्या माणसाच्या जीवनाची वाताहत निरंतर होत राहते, त्यात कधी-कधी सरळ, सत्शील मनुष्य भरडत राहतो. त्याची सभ्यता हीच त्याच्या शोकांतिकेचं कारण बनून राहते.
 कोंडीताईचं जीवन याचं मला व्यवच्छेदक उदाहरण वाटत आलं आहे. तिचं लग्न उशिरा ठरलं यात तिचा काहीच दोष नव्हता. संस्थेचे दुर्लक्ष व तिचं मुखदुर्बळपण. उषाच्या प्रकरणात करेल तो भरेल म्हणत ती सोसत राहिली. अन् हे सगळं करत तिनं आपला गोतावळा जमा केला. मला आठवतं, उषाच्या प्रकरणाच्या काळात भावोजी घरी फिरकत नसत नि पैसेही देत नसत. कोंडीताई राधाकृष्ण मंदिर झाड, तिथल्या उपाध्येंचा केटरिंगचा व्यवसाय होता, तिथं हात लाव. शेजार-पाजारची मुलं बालमंदिरला पोहोचव. याचं दळपकांडप कर. त्याचं रेशन आणून दे. हिचे पापड लाटून दे. तिच्या सुनेच्या बाळंतपणात तेलपाणी कर. बागलांच्या मुलांचं लग्न ठरलं, तर महिनाभर लग्न घराची पडेल ती कामं कर. दवाखान्यात पेशंटच्या सोबतीला नाहीतर बसून काढ. चहा, शिरा पोहोचव. अडत दुकानात दिवाणजी नाहीतर फोन, निरोप घे; पण कोंडीताईंनी कुणाकडे हात पसरलेला कुणी पाहिलेला असेल तर शपथ. ती सगळ्यांची ताई होती. सा-या गल्लीची दाई होती. बायाबापड्याची ही माई प्रत्येकाच्या घाईचा हात होती.
 केवळ या तिच्या कष्ट व प्रामाणिकपणावर भले-भले विसंबून असत. प्रत्येक लग्न घरातली कोठी सांभाळायची कोंडीताईंनी. रक्ताच्या पाहुण्याला निमंत्रण चुकेल; पण कोंडीताईला निमंत्रण मिळालं नाही, असं व्हायचं नाही. गल्लीतलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याचा दरवर्षीचा दहा दिवसांचा सारा पसारा सांभाळायला मंडळाला ताईच लागायची. तिचं हे सार्वजनिक ताईपण प्रत्येक घरातल्या चुलीपर्यंत पोहोचलेलं होतं. कोणी कुठं परगावी, यात्रेला, विदेशाला जावो कोंडीताईला तिथून भेट आणली नाही, असं कधी झालं नाही.
 पुढे भावोजी वृद्ध झाले नि कॉटवरच बसून असायचे. ताई त्यांचे सर्व करायची; पण तिनं नवच्याविरुद्ध कधी कुणाकडे ब्र काढला, असं कधी झालं नाही. दोन मुलं, एक मुलगी ताईनं बिनपैशाची वाढवली, शिकवली हे कुणाला खरं वाटणार नाही. तिला जगायला पैसे लागायचे नाहीत. आपटेबाई दूध सरिता केंद्र चालवायच्या. ताई केंद्र उघडायची, साफसफाई करायची. परत बंद करायला यायची. रोज जाताना तिला अर्धा लिटरची बाटली रतिबासारखी मोफत मिळायची. राशनच्या दुकानदारानं महिनाभराचं धान्य द्यायचा अलिखित करार होता. ती सगळ्या घराचं राशन पाळीत न उभारता घरोघरी पोहोचवायची. तिला कुणी पाळीसाठी हटकल्याचं आठवत नाही. शहाबेन वर्षाचं लोणचं घालायच्या. त्यातली एक बरणी ताईसाठीच असायची. पाहुणे आलेत. बर्फाचा तुकडा दे म्हणून ताई बर्फ फॅक्टरीत गेली, तर नोकर सोडाच मालकांनी पण लादी फोडून ताईला बर्फ द्यायचाच. अशा अचाट मनुष्य संग्रहामुळे तिचा बँक बॅलन्स कधी खर्चच झाला नाही. छोट्या-मोठ्या कामाचे ताईला पैसे मिळायचे. ताई ते कधी घरी आणायची नाही, थेट बँकेत भरणा. त्याची काळवेळ नाही, ताई सकाळी आठला पण भरणा करू शकायची व रविवारी पण बँकेतून पैसे मिळायचे तिला. फक्त बँकेत कोणीतरी असलं पाहिजे. चौकीदारापासून चेअरमनपर्यंत तिला कोणीही चालायचं. 'गणपुले काका हे पैसे व पासबुक भरून ठेवा, मी येतो' (येते नाही. कोल्हापूरच्या बायकांची बोली भाषा पुरषी!). ‘मिरजे मामा, डॉलीला बघायला पाहुणे येणार आहेत. पाचशे रुपये द्या, उद्या खात्यातून घ्या' असं चेअरमनला सांगणारी ताई एकटीच. खत, सिमेंट, लाडू, भाजी कशालाच तिला पैसे लागायचे नाहीत. अशी हुकमत तिनं आपल्या सचोटीनुसार निर्माण केली होती. धाकटा मुलगा नववीत असताना शाळेत तक्रार झाली. तिनं मुलाचं नाव शाळेतून काढलं व थेट एका डॉक्टरांच्या एक्स-रे क्लिनिकमध्ये पिंट्याला नेलं. डॉक्टरांना म्हटली, ‘याला तुमच्या हाताखाली ठेवा. तोच अर्ज, तीच ऑर्डर. नोकरी परमनंट इतकी की, त्या डॉक्टरांना आपली फर्म बंद करण्यापूर्वी पिंटूला दुसरीकडे नोकरी लावली. ताईंना सांगून मग कुलूप. नाहीतर बायको घरी खाईल ही डॉक्टरांना भीती.
 एका मुलीचं व दोन मुलांचे शिक्षण, नोकरी, लग्नं, संसार ताईनं हिमतीने केले. आता मात्र सावल्या लांब पडू लागल्यात. तिच्या अंगवळणी पडलेलं सतत काम करणं तिला स्वस्थ बसू देत नाही. तिला कुठं जायची गरज उरली नाही तरी ती पाच किलोमीटरची पायपीट करून रोज दहा उंबरे झिजवणारच. काही वर्षांपूर्वी अचानक माझ्या घरी सोन्याचं वळं घेऊन आली. “तू मुलांचे शिक्षण, नोकरी सगळं बघितलं. मला कसली तोशीश पडू दिली नाही. ही आपली गरीब बहिणीची भेट." असं म्हणत ती देवाचे देवाला, सिझरचे सिझरला देत आली. त्यामुळे ती निष्कांचन असून कांचनभटासारखी जगली. आताशा मुलं, सुना, नातवंडं तिच्यावर खेकसत राहतात. तक्रार एकच, गरज नसताना दहा घरं फिरती ताईचं म्हणणं असतं, “आपल्या गरजेला ते होते. त्यांच्या गरजेला आपण नको का जायला?" ‘‘गरज सरो नि वैद्य मरो' असा स्वार्थ तिला जमत नाही, हेच तिच्या शोकांतिकेचं मूळ आहे.
 ताईनं आयुष्यभर मिळविलेलं गुडविल एखाद्या पारंपरिक पेढीस, पिढीस लाजवेल असं आहे. तिनं आमची घरची भाऊबीज, रक्षाबंधन चुकल्याचा इतिहास नाही. तिच्याकडे नव्हतं तेव्हाही ती घरी कधी रिकाम्या हाती आली नाही व रिकामी कधी परतली नाही. सर्व घरात ती हरकाम्या असून सन्मानित होती, ती तिच्या कर्तव्यदक्षतेमुळे. तिला कुठल्या घरात मी बाई (कामवाली) म्हणून बोलविलेले मी पाहिले, ऐकले नाही. आता तिला ऐकू कमी येतं. दिसतंही अंधूक. ती लांब राहायला आलीय, स्वतःचं घरबांधून; पण जुन्या गल्लीच्या गोतावळ्यात ती कधी गेली नाही, असा दिवस नाही. नव्या कॉलनीत ती रुळली नाही. म्हणते, “इथली घरं सुट्टी सुट्टी, माणसंही तशीच सुटसुटीत. घराला घर लागून असेल तरच माणसास माणूस जोडून राहतो." तिचं हे निरीक्षण, हा निष्कर्ष एखाद्या समाजशास्त्रज्ञाला लाजवेल असा.
 ताईच्या घरून हल्ली मुलांचे, सुनेचे फोन असतात. ‘ताईला सांगा, सुखानं एक जागी बसून खा.' मी मात्र अजून जाऊन ताईला ते सांगू शकलो नाही. मला माहीत आहे, मी सांगितलं तर ती निमूट ऐकणार; पण कदाचित ती निमूटपणे जगाचा निरोप घेणार हेही मला माहीत आहे. आज ती तळमळत, तडफडत दिवस घालवते आहे. बंद पिंज-यातील पक्षी अधिक फडफडतात... ताईचं तडफडणंही तसंच! तिकडे जुन्या गल्लीत मात्र चैतन्य हरवलंय... ताई जायची बंद झाल्यापासून तिथली घरं पण सुट्टी सुट्टी झाली. माणसं पण!


अनाथांचं आभाळ अनाथच!


 मी शोभा रामचंद्र सुतार. आता सौ. किरण नलवडे. माझे वडील लहानपणीच वारले. ते आठवत नाहीत. पाच वर्षांची झाले नसेन. वडिलांच्या मागे आईपण निघून गेली.
 अत्यंत लहानपणीच मला माझ्या मोठेपणाची जाणीव झाली. जबाबदारीने माझ्यात कधी पोक्तपणा आणला कळलेच नाही. ज्या वयात । खेळायचे, बागडायचे त्या वयात भावा- हिणींची मला लागलेली काळजी एक न उलगडणारे कोडे आहे खरे!
 आश्रमात प्रेमाचा ओलावा प्रचंड होता. इतर मुली संधी असून शिकायच्या नाहीत. त्यांना जबाबदारीही नव्हती. मी मात्र शिकत गेले. परिस्थितीच्या जाणिवेने नि भावंडांच्या पालकत्वामुळे शिकले. एसएससी होऊन आश्रमात नोकरीस लागले रेस्क्यू विभागात. नोकरी करत शिकत राहिले.
 दरम्यान, मुलींसाठी स्वतंत्रपणे अभिक्षणगृह सुरू करायचे ठरल्यानंतर संस्थेने मला जाणीवपूर्वक घेतले. संस्थेने माझ्या पालकत्वाची बजावलेली जबाबदारी कधीच विसरू शकणार नाही. मला कायमची नोकरी मिळाली. चार आकडी पगार. मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी छोटीशी खोली। घेऊन राहू लागले. माझ्या दोन भावा-बहिणींना मी आधार व्हायचे ठरविले नि तसा तो देता आला, याचा मला आज मोठा आनंद होतो. बहीण परिचारिका झाली. तिचं लग्न करून दिलं. ती कोकणात पडेलला सुखाचा संसार करीत आहे. भाऊ पुण्यास व जुन्नरला होते, त्यांना आणलं. आज ते आपल्या पायावर उभे आहेत. मोठा भाऊ स्वतःची रिक्षा चालवतोय. छोटा शिकतोय. त्याला त्यांच्या पायावर उभं केलं की, माझ्या संसाराची जबाबदारी संपली.
 मी व माझी भावंडे अशी स्वावलंबी झाल्याचे पाहून एकदा मामा दत्त म्हणून उभा राहिला. घरी चल म्हणाला; पण आम्ही मात्र गेलो नाही. इतक्या वर्षांनंतर त्याच्या ओळख देण्याचा हेतू न कळण्याइतके आम्ही आता लहान नव्हते.
 जबाबदारी संपली तशी माझ्या लग्नाविषयी विचारणा होऊ लागली. मी खोली घेऊन राहात होते तिथे पुरवठा खात्यातील एक अधिकारी शेजारी राहायचे. त्यांनी प्रदीप नलवडेंचे स्थळ आणले नि फारसा पुढचा मागचा विचार न करता, चौकशी न करता मी लग्न केले.
 लग्नाच्या दुस-या दिवशी कळलं, मी ज्यांच्याशी लग्न केलं ते त्यांचं दुसरं लग्न आहे. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी चौकशी न करता, संस्थेतील कुणाचा सल्ला न घेता हे केल्याने पश्चात्ताप करण्यात अर्थ नव्हता. माझं आभाळ मला पेलायचं होतं ना! अनाथांचं आभाळही अनाथ असतं कळलं नि मी मला सावरलं. निभावून न्यायचं ठरवून मी दिवस काढू लागले. मला अजिंक्य झाला नि जग जिंकल्याचा आनंद झाला. आता या वयात आपलं हक्काचं कोणी तरी आहे हा मोठा आधार वाटू लागला.
 हे दोन्ही घरात येऊन जाऊन राहतात. मला अजिंक्य झाल्यावर पहिलीला दिवस गेले. यांनी माझ्याशी लग्न केलं ते पहिलीला दिवस जात नव्हते म्हणून; पण माझ्या पायगुणांनी तिला दिवस गेल्याची यांची धारणा असल्याने त्यांनी मला आजवर कधी अंतर दिले नाही. कधी ते घरी येणार नसले की वाटते...

 माझ्या कितीतरी आश्रम भगिनींची होणारी परवड पाहिली की वाटतं, आपल्या साच्या दुःखांसह आपण खरंच सुखी आहोत. या जाणिवेमुळेच त्यांना साहाय्य करण्याची शक्ती माझ्यात येते.

एका शून्याचं शतक होणं


 बिपिनला मी त्यांच्या नि माझ्या बालपणापासून पाहत आलो आहे. खरं तर आम्ही दोघं एकमेकांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झालो. आम्ही दोघं पंढरपूर बालकाश्रमात जन्मलो, वाढलो. त्याला त्याची जन्मदाती आई सत्यवती जन्म देऊन सोडून गेली. सत्यवतीच्या खोलीत राहणा-या। लक्ष्मीबाईंनी लळा लागलेल्या बिपिनला नंतर सांभाळलं. लक्ष्मीबाई म्हणजे मायेचा अखंड झरा! त्यांनी विठ्ठल, सुमंत, बेबी, श्रीमती, मीरा, सुमन अशा कितीतरी मुला-मुलींचा सांभाळ केला. लक्ष्मीबाईंची खोली आमच्या खोलीशेजारीच होती. त्यांच्या खोलीसारखी आमची खोली; पण नेहमी मुला-मुलींनी भरलेली असायची. बिपिन लहानपणापासून खोडकर. उपजत हजरजबाबीपण त्याच्यात होता. एक नंबरचा खट्याळ. मुलगा असून फ्रॉक घालून आश्रमभर फिरायचा. त्याच्या मागे ‘बुटकाऽऽ, बुटका, भुंडीऽऽ मुंडी म्हणत मुलींची झुंड चिडवत, डिवचत फिरत राहायची. तो लहानपणापासून नकला करण्यात पटाईत. उंदी, लोल्या, पी, अव्वा अशा आश्रमातील विसंगत, अपंग विक्षिप्तांची टिंगल, टवाळी, नकलांचा बिपिनचा कार्यक्रम एकदा का सुरू झाला की अख्खा आश्रम जागा व्हायचा... गारुड्याचा खेळ जमतो तसा. “बच्चे लोग ताली बजाव' न म्हणता टाळ्यांचा पाऊस पडत राहायचा. त्याच्या नकलेत श्रेष्ठ, कनिष्ठ भेद नसायचा. आश्रमाचे साहेब नि शिपाई त्याच्या लेखी सारखेच असायचे. हसून-हसून सा-यांची मुरकुंडी वळायची. लहान मुली हसून लोळा-गोळा व्हायच्या. गाठीनं बांधलेल्या त्यांच्या बिननाडीच्या चड्ड्या मोकळ्या होऊन एक नवीनच समांतर कार्यक्रम सुरू व्हायचा. तिकडं साडीतल्या मुलींना पदराचं भान राहायचं नाही. असा बिनपैशाचा बिपिनचा तमाशा म्हणजे फूल टू धमाल!
 बिपिन बालवाडीपासूनच माझ्याबरोबर होता; पण माझी एकेक इयत्ता वाढत जायची. उलटपक्षी त्याची मात्र एक इयत्ता हमखास मागं राहायची. आयुष्यभर बिपिनने मार्कलिस्टवर 'पास' हा शेरा लिहून घेतला नाही. एक तर ‘नापास' नाहीतर ‘वर घातला' (ढकलला!) नववीपर्यंत बिपिन वर ढकलत, चढत राहिला. कधी कधी मनात विचार येतो, उदार मायबाप शिक्षक नसते, तर वयाच्या अठराव्या वर्षीही बिपिन बालमंदिरातून फार फार तर पहिलीत गेला असता. ऐन परीक्षेच्या दिवशीही बिपिन हातात पुस्तक धरेल तर शपथ! हायस्कूलला जाता जाता आम्ही पंढरपूरहून कोल्हापूरला आलो रिमांड होममध्ये. रिमांड होममध्ये मुलं सुधारतात म्हणे! बिपिन आणखीनच बिघडला. त्याचं सदैव लक्ष खेळ, स्वयंपाक, गंमतजंमत यातच. इथं येऊन तो स्वयंपाकघरात अधिक रमू लागला. संस्थेत स्वयंपाकघरास भिशी म्हणायचे. हा कायम भिशीत पडून असायचा. संस्थेने नेमलेले आचारी नावाला असायचा. तो नुसतं फोडणी द्यायचं काम करायचा. बाकी रेशन काढणं, धान्य निवडणं, दळणं, पीठ मळणं, भाजी चिरणं, पोळ्या लाटणं-भाजणं; सर्वांना बिपिन पुरून उरायचा. सकाळ, संध्याकाळ शंभर मुलांचं जेवण तो एकटा करायचा. त्याचा फायदा आम्हाला भरपूर व्हायचा. चांगलं-चुंगलं बिपिनमुळे आम्हाला खायला मिळायचं. त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘असली माल!'
 आम्ही शिकत असायचो तेव्हा बिपिन आपल्या वारंगे, लाल्या, देसाई इ. गैंगबरोबर मार्केट यार्डला जा, गूळ शेंगा खा, गोळा कर. शेतात जा, ऊस खा, टॉकीजमध्ये जा, पोस्टर्स, फोटो बघ, मॅच बघत बस. शाळेच्या शेजारी जयप्रभा स्टुडिओ होता. तिथं शूटिंग चालायचं, ते बघत बस. ग्राऊंडवर विहीर होती, शेतात पण एक होती. तिथं जा, पोहत राहा. असे एक से एक उद्योग बिपिनला कसे सुचायचे कोण जाणे! एकदा आमच्या रिमांड होमच्या साहेबांनी बिपिनला शाळा चुकवून फिरताना पकडलं व प्रार्थनेच्या वेळी सर्वांपुढे त्याची चंपी केली. एवढ्यानं बिपिन बधेल तर तो कसला. जेवण झाल्यावर साहेबांची नक्कल करत त्यानं आमची वळवलेली मुरकुंडी आजही आठवली की हसता भुई थोडी होते.
 पुढे त्याची नि माझी रिमांड होमची मुदत संपली. तो स्टेट होमला गेला नि मी गारगोटीच्या मौनी विद्यापीठात कॉलेजसाठी म्हणून गेलो. मग सुट्टीतच बिपिनची भेट व्हायची. तो हॉटेलात वेटर म्हणून काम करू लागला. पगाराबरोबर टीप्सचे पैसे त्याच्या खिशात खुळखुळू लागले. तेव्हा तो मला श्रीमंत झाला असं वाटायचं. तो पर्ल, टुरिस्ट अशा मोठमोठ्या हॉटेलात काम करायचा. तिथल्या पब, बिअर बार, परमीट रूममध्ये दारू द्यायचं काम करणारा बिपिन; पण त्यानं कधी दारूला शिवलं नाही. नाही म्हणायला सिगारेटची चव तो चाखू लागला होता. छानछोकी कपडे, सिगारेटचे झुरके, टाय, बूट घालणारा बिपीन आम्हाला देवानंदपेक्षा कमी रोमँटिक नव्हता.
 बिपीन आश्रमात ज्या लक्ष्मीबाईंच्या खोलीत राहायचा तिथंच नलिनी जोशी या आमच्या बालमंदिराच्या बाई, शिक्षिका राहात. त्यांना आम्ही ननीताई म्हणत असू. त्यांचं लग्न होऊन त्या आफ्रिकेत गेल्या होत्या; पण काही वर्षांतच त्यांचे पती अचानक वारले. दोन लहान मुलांसह त्या भारतात सासरी परतल्या. त्यांचा संसार गुजरातमध्ये मढीला होता. शेती, घर, जमीन-जुमला, मोठी इस्टेट होती. ते दीर सांभाळत. ननीताई परत मुलांसह अचानक आली व वाटा मागू लागली, तसं सासरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ननीताईनं बिपिनला बोलावून घेतलं अन् बिपिनच्या आयुष्यानं एक वेगळंच वळण घेतलं. तो तिथं जाऊन ताईची शेती सांभाळू लागला. हॉटेलच्या नोकरीमुळे बिपिनला हिंदी, गुजराती, इंग्रजी कामचलाऊ येत होतं. त्याचा त्याला तिथं फायदा झाला. ताईला बिपिनमुळे इस्टेटीचा वाटा नावावर करून मिळाला. दरम्यान, बिपीनचं आश्रमातल्या मुलीवरचं प्रेम यशस्वी झालं. त्याच प्रेयसी बालवाडीच्या कोर्सला डहाणू, कोसबाडला शिकत होती. बिपिन गुजरातहून जवळच असल्यानं भेटत राहायचा; पण पुढे ननीताईंची मुलं मोठी झाली अन् बिपिनने कोल्हापूरला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा कैलास त्याच्या पदरी होता. अवघ्या वर्षाच्या कैलासला घेऊन मीरासह एक दिवस परतला.
 आता बिपिन पूर्वीचा राहिलेला नव्हता. मुलं पदरात असल्यानं असेल कदाचित किंवा गुजरातमधील अनुभवाने असेल; पण आपलं आयुष्य वा-यावरची वरात असता कामा नये; असं त्याला वाटू लागलं. हसणं, खिदळणं जाऊन गंभीर झालेला बिपिन खराच वाटत नसायचा. पूर्ण कायाकल्प झालेला बिपिन! तब्येत खालावलेली, गप्प गप्प राहणारा, विठ्ठलच्या १० बाय १० च्या खोलीत त्याचा संसार होता. विठ्ठल व बिपिन लहानपणापासून लक्ष्मीबाईंकडे राहात आल्यानं दोघांत भावाचं नातं होतं. विठ्ठलनी लक्ष्मीबाईंना आपली आई म्हणून घरी आणलेलं. त्यातच एक दिवस नोकरी शोधायला म्हणून बेबीपण येऊन राहिली. विठ्ठल, त्याची बायको कुसुम, मुलगा दीपक, लक्ष्मी आई, बेबी, बिपिन, त्याची बायको मीरा, मुलगा कैलास असं इतकं मोठं कुटुंब खोतांच्या माडीवरील उतरत्या कौलाच्या ठेंगण्या खोलीत जीव मुठीत घेऊन राहात होतं. माझी उंची सहा फूट असल्यानं त्या खोलीत मला वाकूनच उभं राहावं लागायचं. कसं कुणास ठाऊक, अनुवंश असल्यासारखे लक्ष्मीच्या खोलीत सगळे बुटके. लक्ष्मीबाईंना अख्खा आश्रम तर बुटकीच म्हणायचा अन् बिपिनला बुटक्या. आश्रमाच्या साच्या मुली तर बिपिनला ‘चिंचेचं बुक' म्हणून चिडवून बेजार करायच्या. इथं घरातली परिस्थिती ओढग्रस्तीची होती. विठ्ठल एकटा मिळवणारा अन् खाणारी तोंड आठ. बिपिन लाल्याच्या हातगाडीवर कामाला लागला तसा संध्याकाळी येताना गाडीवर उरलेली भजी, वडे, पाव घेऊन यायचा अन् संध्याकाळ साजरी व्हायची. त्याच वेळी माझी पत्नी रेखाला दिवस गेले होते. तिला कांदा, बटाटा भजी आवडायची म्हणून बिपिन न विसरता घेऊन यायचा. रेखाला त्यानं लहानपणापासून बहीण मानलं होतं. त्याचं प्रेम पाहून भरून यायचं.
 विठ्ठलच्या खोलीत रोजच्या ओढाताणीनं कुरबुरी वाढतच गेल्या. विठ्ठल घाटगे-पाटील कंपनीत वेल्डर होता. त्याला कितीसा पगार असणार? मग बिपिननं शहाणपणानं एक खोली भाड्याने घेतली खरी; पण भाडे भरणंही त्याला जमायचं नाही. खोली कसली, बिनदाराचं खोपटच होतं. चौकटीला दाराऐवजी गोणपाट टांगलेलं असायचं. आसपास वेश्यावस्ती. खोलीत कोणी नसलेलं पाहून आजूबाजूची मोकाट कुत्री, डुकरं, त्यांची पिल्लं आपल्याच बापाचं घर म्हणून यायची नि धुमाकूळ घालायची. भांड्यात तोंड घाल, गुंडाळलेला बिछाना विस्कट हे ठरलेलं. हातभार म्हणून शिकलेली-सवरलेली मीरा धुणी-भांडी करायची. तेवढाच हातभार. एव्हाना बिपिननं हातगाडी सोडून उद्यमनगरात विठूलच्या ओळखीनं उदय इंडस्ट्रीत ड्रिलर म्हणून नोकरी मिळवली. बाबा देशपांडे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीत नोकरी करीत. त्यांचं एक छोटं मशिनिंग, ड्रिलिंगचं युनिट होतं. एका छिद्राला एक पैसा मजुरीनं बिपिन अहोरात्र काम करायचा. त्याचे कष्ट, ओढाताण पाहावयाची नाही. दरम्यान मी हायस्कूलमध्ये शिक्षक झालो होतो. बिपिनची खोली माझ्या घराजवळच होती. एकदा घरातील ओढाताणीतून बिपिननं मीरावर हात उचलला. उलथनं फेकून मारलं तशी मीरा खोक पडलेल्या, रक्तबंबाळ कपाळावर हात धरून आली. रेखाने डॉक्टरांकडे नेऊन ड्रेसिंग करून आणलं. दोन टाके पडलेले. नंतर समजलं, की घरात अन्नाचा कण नव्हता. मूल भुकेनं बेजार होतं. रेखाने डाळ, तांदूळ, पीठ बांधून दिलं. जेवून पाठवलं. त्याचवेळी आमच्या शाळेत एक शिपाई भरायचा होता. मी शाळेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून पुढारपण करत होतो. शिक्षक संघटनेत जिल्हाभर नाव झालं होतं. संस्थेचे सर्व शिक्षक, संचालक मानायचे. हे पाहून मी बिपिनसाठी शब्द टाकला अन् त्याला नोकरी मिळाली; पण नियुक्ती परगावी होणार होती. मी बिपिनला एक गोष्ट सांगितली, “नोकरी लावायचं काम माझं, टिकवणं तुझं. पडेल ते काम कर. कशाला नाही म्हणू नको. संडास धुवायला सांगितले तरी नाही म्हणायचे नाही." बिपिननी ते तंतोतंत पाळलं अन् त्याचं जीवन बदलून गेलं.

 बिपिनमधील हरहन्नरीपणा, प्रत्येक कामातलं कौशल्य, स्वयंपाक, धुणी, भांडी, गवंडी, सुतार, चहापान साच्यातलं तरबेजपणा पाहून संस्थेनं त्याला खेड्यातून शहरात आणलं आणि त्याला स्थैर्य दिलं. दोन मुलं अन् संसार सांभाळत घर घेतलं. शाळेच्या शिपायाचा तो लॅब अटेंडंट झाला अन् बिपिनचा ‘देशमुख सर झाला. त्याची लॅब पाहायला इतर शाळा येऊ लागल्या. सायन्स टीचर्सला रिलीफ मिळाला. बोर्डाच्या परीक्षेचे प्रयोग कुठले येणार ते तो शिक्षकांच्या आधी सांगू लागला. विद्यार्थ्यांत शिक्षकांपेक्षा मान देशमुख सरांचा इतका की हेडमास्तरही त्याला आता ‘देशमुख सर म्हणून बोलावू लागले. शाळेत पोषण आहार सुरू झाल्यावर तर तो शाळेचा ‘फायनान्सर' झाला. शाळेची लाखोंची बचत त्याच्या कष्ट नि काटकसरीनं झाली अन् इमारती उठल्या. बिपिन शाळेतून निवृत्त होताना पायी, सायकल, लूना, स्कूटर करत फोर व्हिलरपर्यंत येऊन पोहोचला होता हे कुणाला सांगून खरंही वाटणार नाही. गाडी आणि माडीचा मालक झालेला बिपिन म्हणजे ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' चा दृष्टांत! या साच्या प्रवासात बिपिननं सचोटी, प्रामाणिकपणा आपला अन् स्वाभिमानही! माणसास मोठेपण येतं ते केवळ स्वप्नांनी नाही तर स्वप्न सत्यात उतरवण्याच्या शक्यतांचं आकाश जो निर्माण करू शकतो, तोच असा पुरुषार्थ दाखवू शकतो. दोन मुलं, दोन सुना, चार नातवंडे व हे नवरा-बायको असं दहा जणांचं कुटुंब आता महिना पाचपन्नास हजार कमावत करोडपती होतं, हे कुणास सांगून पटणारही नाही. एका शून्याचं शतक होणं खरं वाटत नाही.

उत्तरायुष्य तरी आश्रमात नको


 “...आई-वडिलांनी रस्त्यावर टाकून दिलं, तरी राष्ट्रपतिपदक मिळविणारा लष्करी जवान पती म्हणून लाभला. वृद्धापकाळात पुन्हा आश्रमात जावं असं वाटत नाही. ते जगणं आता नको वाटतं..."
 मी सौ. शीला ओहळ, जन्मानंतरच मला खड्ड्यात टाकण्यात आलं होतं. वर लिंबाचा पाला टाकला होता. खड्डा लोकांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर होता. माझ्या रडण्यानं लोकांचं लक्ष गेलं. पोलिसांत वर्दी गेली नि पोलिसांनी मी तान्ही असताना पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात आणले. मी लहानाची मोठी तिथेच झाले.
 ज्ञानरूपी वसा मला संस्थेत असताना संस्थेतील व्ही. एस. जव्हेरी व सौ. सुलोचना जव्हेरी, आम्ही त्यांना ‘आई-बाबा' म्हणत असू, त्यांनी दिला. त्यांच्या प्रेमळ सहवासामुळे आमचा आश्रम खरं 'घर' होतं. नाही म्हणायला बनूबाई सुळे - आम्ही त्यांना अक्का म्हणत, त्यांची कडक शिस्त होती. या सर्वांमुळे स्त्रीसुलभ मर्यादेचे सर्व संस्कार आमच्यावर होत असत. माझं शिक्षण सातवीपर्यंतच झालं असेल नसेल, तर माझं श्री. पांडुरंग ओहळ यांच्याशी लग्न करून देण्यात आले. ते निराधार होते. मिलिटरीत होते. बिजवर होते. याची मला व आश्रमाला कल्पना नव्हती; पण त्याचा मला फारसा त्रास झाला नाही.
 मला एक मुलगा व तीन मुली झाल्या. हे अनेकदा युद्धावर जायचे. त्यांना राष्ट्रपतिपदकही मिळालं होतं. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून कोल्हापूरला उद्यमनगरात भाड्याची खाली घेऊन कायमचं बि-हाड केलं. हे मिलिटरीत निघून गेल्यावर निराधार वाटायचं. घरमालकीण, शेजारी चांगले होते. मदत करायचे. नाही म्हणायला पंढरपूरच्या आश्रमातील चार-पाच मुलं उद्यमनगरात नोकरी करायची. येऊन-जाऊन असायची. अडचणीला धावून यायची. मुलांच्या बाळंतपणात फार सोसावं लागलं. कुणी करणारं नसायचं. घरी मूल नि मी दवाखान्यात. मूल बेवारशी ठेवणं पटायचं नाही. मी दवाखान्यातून यायची. सारं करत राहायची. त्या वेळी अंगावर काढलेली दुखणी आज भोगतेय. त्या वेळी सतत वाटायचं की आपलं कोणीतरी असायला हवं.
 पहिल्यांदा मी परस्वाधीन होते. पतीच्या मर्जीवरच जगायला, नाचायला लागायचं. नंतर मुलं मोठी झाल्यानंतर मला नोकरी लागली. तीही संस्थेच्याच महिलाश्रमामध्ये. ज्याची आवड होती तेच पदरात पडल्यामुळे दुःखात व कष्टात दिवस काढल्यानं सुखाचा सुस्कारा टाकला. गाडी रूळावर येऊ लागली तोच मुलीचं लग्न ठरलं व नोकरी सोडली. पुन्हा पूर्वीचे दिवस आठवू लागले. दिवसभर काबाडकष्ट करायचे. आठवणींनी अंथरूणावर डोळ्यातून टिपं टाकत कधी झोप लागून जायची हे कळायचं नाही. काही काळ लोटला तोच पुन्हा नोकरी मिळाली. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात. माझ्या लहानपणीची पुन्हा आठवण झाली. ती जिथं जे तीन दिवसांचं बाळ (दीपावलीच्या दिवशी) सापडलं ती मुलगी होती. म्हणून तिचं नाव आम्ही दीपा ठेवलं. तिची अवस्था इतकी वाईट होती, आता आहे तर आता नाही अशी. त्या अर्भकावर इतका जीव बसला की घरात। माझ्या कोण कोण आहे, याची आठवणदेखील राहात नसे. नंतर तिचं कोडकौतुक.

 आज आम्ही उभयता वृद्धत्वाकडे झुकलो आहोत. मुलगा आहे; पण त्याचे प्रश्न आहेत. आम्ही दोघंच एकमेकांचे आधार. मतभेद असूनही आमच्यात काही अंतर आणू दिलं नाही. हे नेहमी वृद्धाश्रमात जायची भाषा करतात. वाटतं, सारं आयुष्य आश्रमात घातलं, आता उत्तरायुष्य नको. म्हणून माझा विरोध आहे.

पुरुषार्थी आई


 सन १९६७ ची गोष्ट असावी. मी एस.एस.सी. पास झालो होतो. पुढील शिक्षणासाठी मी मौनी विद्यापीठ, गारगोटी येथे आलो होतो. येऊन पाच-सहा महिने झाले असतील. मी कॉलेज करून ग्रंथालयाकडे जात होतो. वाटेत शाहू कुमार भवन हायस्कूल लागायचं. ते सुटलं होतं. मुलं घरी जात होती. घोळक्यानी शाळकरी मुली परतत होत्या. त्यात आमच्या आश्रमातील शैला बापट या मुलीला मी पाहिलं नि चक्रावून गेलो. ही इथं कशी? हाक मारली तर तिलाही आश्चर्य वाटलं. मी आईकडे आले आहे. आईनं माझी मुदत संपली म्हणून सोडवून आणलंय. मंगल अजून पंढरपूरच्या बालकाश्रमातच आहे. इथं मी, आई अन् लहान भाऊ प्रकाश सर्व जण मिळून राहतो. खोपड्यांच्या माडीवर घर आहे. आई डॉ. पंडितांकडे नर्स आहे, असं सारं एका दमात सांगून शैला मोकळी झाली. “घरी ये... मी आईची ओळख करून देते." म्हणून निघून गेली.
 या घटनेलाही महिना-दोन महिने झाले असतील. एकदा नदीकडे फिरायला जात असताना शैला आणि तिची आई वाटेतच भेटल्या नि बळेच मला घरी घेऊन गेल्या. शैलाच्या आईची नि माझी ती पहिली भेट असली, तरी त्यांना मी माझ्या लहानपणापासून पाहात आलो होतो. मला सांभाळणारी माझी आईपण त्यांच्यासारखीच नर्स असल्यानं त्या माझ्या आईला ओळखायच्या. पहिल्या भेटीत शैलाच्या आईनं जे आगत-स्वागत केलं, जे अगत्य दाखवलं, आपलेपणा व्यक्त केला त्यातून गारगोटीसारख्या परक्या ठिकाणी मला हक्काचं घर मिळाल्याचा आनंद झाला.  पुढे वेगवेगळ्या निमित्ताने त्यांच्या घरी येणं-जाणं होत राहिलं. कधी सणावाराला जेवायला, आजारी पडलो की औषधाला, रक्षाबंधनला अशी घरगुती निमित्तं असायची; पण जाणं-येणं सहज होत राहायचं. हा क्रम सन १९६७ ला सुरू झालेला. तो मी सन १९७१ ला गारगोटीतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडेपर्यंत तर राहिलाच; पण आजअखेर ते ऋणानुबंध पहिल्यासारखेच अन् खरं तर अधिक दृढ होत राहिले आहेत. शैला, मंगल, प्रकाश यांची लग्नं, त्यांच्या मुलांची बारशी, शिक्षण, परत मुला-मुलींच्या मुलांशी लग्न अशा निमित्तानी उभय घरात जाणे-येणं नित्याचं होऊन गेलंय. मी गारगोटीस व्याख्यान इ. निमित्तानं वरचेवर जात असतो; पण त्यांच्या घरी न जाता गारगोटी सोडली, असं कधी घडलं नाही.
 बापटबाई हे गारगोटीतलं त्यांचं परिचित नाव. तेच नाव माझ्या ओठी. घरी प्रकाश, शैला, मंगलची आई असल्या तरी माझ्यासाठीही त्या ‘आईच होत्या नि आहेत. गेल्या ५० वर्षांतील त्यांचे जीवन, जगणं, संघर्ष माझ्यासमोर आहे. माझ्यासाठी त्या पुरुषार्थी आई' म्हणून नेहमीच प्रेरक राहिल्या आहेत. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा आजच्यासारखा स्त्रीधार्जिणा नव्हता. उलटपक्षी त्या दिवसांत स्त्रीचं एकटं असणं, राहणं, जगणं म्हणजे पुरुषांना डोळा वाकडा करायची संधी, हात टाकायचं निमित्त नि पाय घसरायचा बहाणा असायचा. समाज हे गृहीतच धरायचा. बाई विधवा आहे, एकटी आहे, फिरते मग असं होणारच. अशा काळात खांद्यावरचा पदर ढळू नये म्हणून समाजधुरीणांना धरून राहायचं शहाणपण बापटबाईंकडे होतं, म्हणून गारगोटीसारख्या आडगावात आडोसा शोधत स्वतःचं बस्तान त्या बसवू शकल्या. तो काळ पाहता हे सोपं नव्हतं. त्यांचं शहाणपण, व्यवहार, कष्टच कमी आले अन् आला दिवस निघून गेला.
 आज मी मागे वळून त्यांचे पूर्वजीवन आठवायला लागतो. ते पाहून खरंच वाटत नाही का, हा गतकाळ त्यांचाच होता! तसं त्या मुळात येसूबाई गोखले. दोन मुलींच्या पाठीवर सन १९३२ ला त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव जनार्दन, आईचं रुक्मिणी. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातलं तळेखाजण हे त्यांचं मूळ गाव. वडील मूळचे शेतकरी; पण शेतात कुळ होती. कुळकायद्यात सारी शेती गेली. अन् दोन वेळची भाकरीही मुश्कील झाली. म्हणून मग वडील नशीब काढायला म्हणून मुंबईत गेले. शिक्षण नसल्यानं गिरगावच्या पानाच्या वखारीत त्यांना हरकाम्याची नोकरी करावी लागली. तोवर येसूबाई आईसह तळेखाजणमध्येच शिकत कसे तरी दिवस घालवत होत्या. चौथी पास झाल्यावर वडिलांनी ओढाताणीस कंटाळून बि-हाड मुंबईला हलवलं. दरम्यान, अन्य दोन मोठ्या मुलींची लग्नं उरकून जनार्दनपंत मोकळे झाले होते. वडिलांनी येसूला शाळेत घातलं. आई घर सांभाळायची. बायकोमुलांत रमल्यानं जनार्दनपंतांना कष्टाचं काही वाटायचं नाही. सोबत त्यांचा एक भाऊ स्टेशनमास्तर होता. तोही बदलून मुंबईस आला. दोघांना एकमेकांची मदत होत राहायची. जाणं-येणं होतं; पण संसाराची जबाबदारी ज्याच्या त्याच्याकडे होती. सगळं सुखानं चाललं असताना एक दिवस येसूचे वडील अचानक वारले अन् आकाशच कोसळलं. नोकरी गेली तसा वखारीचा आधार, आसरा गेला. दिरानं असमर्थता दाखवली म्हणून आई येसूला घेऊन परत कोकणात आली.
 कोकणात येऊन वर्ष उलटलं असेल नसेल, मुंबईचे स्टेशनमास्तर काका गावी आले ते येसूसाठी स्थळ घेऊनच. त्यांचा एक भाचा होता. व्यंकटेश बापट त्याचं नाव. तो मुंबई पोलिसात सी.आय.डी. होता. इतकं चांगलं स्थळ कोकणातल्या मुलीला चालून येणं म्हणजे आईचा जीव भांड्यात पडणंच होतं. आईनं होकार देताच येसूबाई सौ. शांताबाई व्यंकटेश बापट झाली. नवव्याच्या सतत बदल्या होत राहायच्या. त्यामुळे पेण, पनवेल, कुलाबा इथं बि-हाड थाटत संसार फुलत होता. वर्षा-दोन वर्षांच्या अंतरानं शैला, मंगल, प्रकाश जन्मले. या मुलांचे वडील व्यंकटेश बापट मोठे कामसू होते. मुलांवर जिवापाड प्रेम होतं. तब्येतीची किरकोळ तक्रार असायची. पोट सारखं दुखायचं, म्हणून अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं तसे ते जास्तच थकू लागले. अठरा वर्षे नोकरी झाली. झेपेना म्हणून पोलीस नोकरीचा राजीनामा दिला. रक्त वाढेना, अॅनिमिया झाला, अन् त्यातच ते दगावले, ते १९५५ साल होतं.
 ऐन तारुण्यात वैधव्य... पदरात तीन मुलं... मुंबईसारख्या ठिकाणी राहणं अवघड. मालक गेले; पण कळवूनही साधं भेटायला कोणी आलं नाही. त्या वेळी त्या आपल्या कुटुंबासह सांगली असलेल्या दिराकडे हवापालट म्हणून येऊन राहिल्या होत्या. पतींना मुंबईची हवा मानवत नव्हती हे खरं होतं; पण इथलीही हवा अंगाला लागली नाही. ते सारखं विचारात असायचे. तीन मुलांचं काय होणार? संसार कसा ओढायचा? अन् एक दिवस काळजीनंच त्यांना ओढून नेलं. तेव्हा बापटांचं कुटुंब सांगलीला एका वाड्यात होतं. शेजारी सोहनींचं कुटुंब राहात होतं. ते चांगले गृहस्थ होते. बापटबाई धुणी-भांडी करून तीन मुलांचा संसार ओढताना ते रोज पाहायचे. त्या वेळी सातवी पास स्त्री म्हणजे सुशिक्षितच समजली जायची. अशी शिकलेली बाई धुणी-भांडी करून संसार उपसते हे पाहन सोहनींना त्यांना भरून यायचं. मदत तरी किती करणार? करत राहणंही अवघड. त्यांनी आपल्या मंडळींकडून एक प्रस्ताव ठेवला. “इथं जवळच मिरजेला डॉ. एन. आर. पाठक आहेत, ते मोठे समाजसेवक आहेत. त्यांचं मोठं प्रसूतिगृह आहे. त्यांना वरचेवर नर्स लागतात. तेथे दाईचा कोर्सपण चालतो. सातवी पास बायका घेतात ते." शांताबाई बापटांना सोहनी वहिनींचं म्हणणं पटलं. श्री. सोहनींनी चौकशी केली तर तिथंच राहावं लागणार अशी अट निघाली. शिवाय मुलं घेऊन राहता येणार नव्हतं. मग दोन मुलींची सोय कुठं तर बोर्डिंगात करायचं ठरवलं; पण पैसे फार लागणार म्हणून शेवटी डॉक्टरांच्याच ओळखीनं पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात ठेवायचं ठरलं. मुली १५ वर्षांच्या होईपर्यंत आश्रमात ठेवायचा बाँड भरला. मुलगा प्रकाश लहान असल्यानं आपल्यापाशीच ठेवायचं ठरवून बापटबाईंनी मिडवाईफ्री नर्सिंगचा कोर्स सुरू केला. डॉक्टरांचा अनाथाश्रमही पण होता. कोर्सच्या वेळी प्रकाशला आश्रमात ठेवलं जायचं. अशा दिव्यातून नर्सिंग पार पडलं अन् रिझल्टच्या आधीच बापटबाईंचा सेवाभाव, कष्ट, प्रामाणिकपणा, पेशंटशी वागणं-बोलणं हेरून डॉक्टरांनी आपल्याच दवाखान्यात नोकरी देऊ केली. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. आणखी काय पाहिजे होतं?
 दोन वर्षे त्यांनी डॉ. एन. आर. पाठक यांच्याकडे नोकरी केली; पण मुलींची ओढ त्यांना गप्प बसू देईना. गेली तीन वर्षे त्यांनी छातीवर दगड ठेवून काढली. कारण मार्गच नव्हता दुसरा. तशात त्यांना पंढरपूरच्या डॉ. काळेच्या हॉस्पिटलमध्ये नर्सची आवश्यकता असल्याचं कहलं. डॉ. काळेंनीही डॉ. पाठकांना गळ घातली. बापटबाई प्रकाशसह पंढरपूरला आल्या. मुली आनंदल्या आणि बाईंचा जीव भांड्यात पडला. हे वर्ष होतं ५८-५९. पुढे त्या ९ वर्षे पंढरपूरला राहिल्या. मुली आश्रमात होत्या; पण डोळ्यांसमोर असल्यानं त्यांचं हवं-नको पाहणं व्हायचं. वयात येणा-या मुली डोळ्यांसमोर वाढलेल्या ब-या हा त्यामागचा त्यांचा विचार.
 मुली मोठ्या होऊ लागल्या तसा त्यांची लग्न, हुंडा, खर्च इत्यादी विचारांनी बापटबाईंना अस्वस्थ केलं. डॉ. काळेच्या हॉस्पिटलमध्ये पगार तुटपुंजा होता. तो खर्चात उडायचा. हातात कधीच राहायचं नाही. म्हणून सरकारी नोकरी मिळते का पाहावी असा विचार मनात आला. त्याच दरम्यान 'सकाळ'मध्ये गारगोटीच्या मौनी विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली. भारत सरकारच्या मदतीनं ग्रामीण विकासासाठी समाजसेवा केंद्र सुरू होणार होतं. त्यासाठी खेडोपाडी जाऊन आरोग्यसेवा देणारी सेविका हवी होती. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवल्याचा फायदा झाला आणि कॉल आला. नोकरीही मिळाली. कारण कोणीच यायला तयार नव्हतं. काम फिरतीचं होतं. पंढरपूर सोडून बापटबाई गारगोटीला आल्या. डॉ. चित्रा नाईक तेव्हा हे काम पाहायच्या. रोज एक गाव याप्रमाणे आठवड्याला सात गावं करावी लागायची. सुट्टी नसायची. प्रवास पायी असायचा. कारण त्या वेळी गावांना एस.टी. जात नव्हती. रस्ते नव्हते. नद्यांवर पूल नव्हते. होड्या होत्या. बैलगाडी हेच प्रवासाचं साधन होतं. ते पण हमरस्त्यापुरतं. वाडी, वस्ती, डोंगरकपारीत पायीच जावं लागे. बाळंतीण अडली वा आडवेळेला कळा येऊ लागल्या तर डोली, कावड करून बाळंतिणीला आणावं लागायचं. म्हसवे, खानापूर, कलनाकवाडी, आकुर्डे, सालपेवाडी, पुष्पनगर, सोनारवाडी ही अधिकृत गावं असली, तरी पंचक्रोशीत फिरावं लागायचं. कष्ट होते तरीपण सेवेचं समाधान होतं.
 हे काम करत असताना डॉ. पंडित यांनी स्वतःचं प्रसूतिगृह काढायचं ठरवलं. आणि बापटबाईंना नोकरी देऊ केली. फिरती कमी व एका जागी काम. तशात शैलाचा बाँड संपल्यानं ती घरी येणार होती. सर्वांचा विचार करून मौनी विद्यापीठाची नोकरी त्यांनी सोडली. डॉ. पंडित तेव्हा त्यांना २00 रुपये पगार देत; पण सर्व पाहायला लागायचं. त्यांनी समाजसेवा केंद्र सोडलं; पण त्यांचे जुने सर्व पेशंट डॉ. पंडितांकडे येऊ लागले. त्या वेळी भुदरगड तालुका सहकारी संघ होता. कॉ. मोरे, कॉ. भांगिदरे, कॉ. देसाई इ. मंडळी तो पाहात. त्यांच्या घरची, संघाची, पक्षाची अशी सर्व कार्यकर्ती मंडळी कामामुळे त्यांच्या परिचित झाली होती. त्यांचे कष्ट पाहता मिळणारा तुटपुंजा पगार पाहून सर्वांनी “तुम्ही समाजसेवा केंद्रासारखं घरोघरी काम सुरू करा. आम्ही मदत करू." म्हणून त्यांना उभारी दिली. त्यांनी परत पहिल्यासारखं घरोघरी जाऊन औषधोपचार, सलाइन, बाळंतपण सुरू केलं. अगदी अडलं तर कोल्हापूरला पेशंट नेणं सुरू झालं. यातून एक झालं, आजवरच्या अनुभवामुळे अडायचं नाही. निदान अचूक असायचं. माणसं भोळी, प्रेमळ होती. बाईंचा हातगुण म्हणून आवर्जून डॉक्टरांपेक्षा त्यांनाच बोलवायची. आया-बाया डॉक्टरपेक्षा बाई बरी म्हणून बापटबाईंनाच सांगावा धाडायच्या.
 कष्ट पडले तरी पैसे मिळू लागले; पण त्यामुळे त्यांनी कधी लोभीपणा दाखवला नाही. बापटबाई म्हणजे गावोगावच्या आया-बायांची ताई, आई, माई, आक्का झाली. ‘जो देगा उसका भला, न देगा उसका भी भला' अशा फकिरी उदारतेनं त्या सेवा करत राहिल्या. त्यांचं रक्ताचं कोणी नसलं, तरी गरजेच्या वेळी आख्खी गावं त्यांच्या पाठीशी उभी असायची. त्या वेळी त्यांना पंचायतीच्या निवडणुकीसाठीही आग्रह व्हायचा. कारण सगळ्या पक्षाचे लोक त्यांना मानत; पण सेवाधर्म त्यांनी सोडला नाही. राजकारणापेक्षा समाजसेवेचीच कास धरत त्या चालत राहिल्या.
 याचं फळ म्हणा, त्यांचं उत्तरायुष्य सुखात गेलं. शैलाचं लग्न झालं. मग मंगल आश्रमातून आली. तिचेही हात पिवळे केले. दरम्यान, प्रकाश मोठा झाला. त्याला आजरा बँकेत गारगोटीतच नोकरी मिळाली. पाहतापाहता नातवंडांमुळे घराचं गोकूळ झालं. जागा घेतली. घर बांधलं. आज त्यांचे जीवन स्वर्गाहूनही सुखी आहे!
 आज त्या वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. सहस्त्रचंद्रदर्शनयोग जीवनात येईल, असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. लहानपणी गरिबीमुळे, तारुण्यात वैधव्यामुळे, प्रौढपणी मुलांच्या काळजीने, नंतर जीवन संघर्षामुळे... कारणं बदलत गेली पण दिवस काही बदलत नव्हते. त्यांच्या जीवनातले एकेक प्रसंग मी वेळोवेळी ऐकले आहेत. कुणालाच असे दिवस येऊ नयेत, असं त्यांचं सारं ऐकताना वाटत राहतं. नवरा वारला तेव्हा त्यापूर्ण अनाथ, निराधार झाल्या होत्या. त्यात नवग्याच्या विम्याचे पैसे आले. दोन हजार रुपये. त्या वेळी ती रक्कम मोठी होती. कनवटीला राहील, अशी ती एकमेव पुंजी; पण ते आमचे पैसे आहेत म्हणून दीर हटून बसले. त्यांनी फार त्रास दिला; पण चार आजूबाजूचे खंबीर पाठीराखे निघाले, नि त्यातूनही त्या तावूनसुलाखून बाहेर पडल्या.
 असे एक ना दोन अनेक प्रसंग आले. त्या खंबीरपणे तोंड देत राहिल्या, माता धीराई म्हणून. बाई असूनही कत्र्या पुरुषासारख्या स्वतःच्या हिमतीवर व स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. या कष्टांना मरण नाही, येणाच्या संकटांना अंत नाही' असं गुणगुणत त्यांनी आयुष्य मागं टाकलं. आज समोर आहे आनंदाचा मळा... ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. कधी काळी कुणी आपल्यावर लिहील असं त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल; पण जग दुर्लक्ष करत असलं तरी आंधळं नसतं. त्याला चांगल्या-वाईटाची पारख असते. सोन्याला आपली झळाळी सिद्ध करायला तेजाबातून वर यावं लागतं. बापटबाईंच्या जीवनातील आजचे दिवस म्हणजे तिमिरातून तेजाकडे जाणारा एक प्रेरक प्रवास... एक प्रेरक जीवन!  डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा


१.  खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२०० /तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती

१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती
आगामी
भारतीय भाषा (समीक्षा)
भारतीय साहित्य (समीक्षा)
भारतीय लिपी (समीक्षा)
वाचन (सैद्धान्तिक)
* वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

◼◼