नवे शिक्षण, नवे शिक्षक
नवे शिक्षण, नवे शिक्षक
डॉ. सुनीलकुमार लवटे
डॉ. सुनीलकुमार लवटे
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगर जवळ,
पोस्ट कळंबा, कोल्हापूर ४१६ ००७
मो. नं. ९८८१ २५ 0 0 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in
प्रथम आवृत्ती ऑक्टोबर, २०१६
सुधारित आवृत्ती मार्च, २०१७
© लेखकाधीन
प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com
मुखपृष्ठ
योगेश प्रभुदेसाई, कोल्हापूर.
अक्षरजुळणी
सौ. शिल्पा कुलकर्णी
मुद्रक
श्रीपाद ऑफसेट, कोल्हापूर.
मूल्य ₹ २२५/-
शिक्षक अंकीय साक्षर हवेत.
मी २००५ ते २०१० या काळात महावीर महाविद्यालय, कोल्हापूरचा प्राचार्य होतो. आमच्या महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांबरोबर स्वतंत्र अशी अध्यापक शिक्षण (शिक्षणशास्त्र/शिक्षक प्रशिक्षण) विद्याशाखा होती, या शाखेमार्फत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची मान्यता असलेला बी.ए;बी.एड्. हा एकात्मिक अभ्यासक्रम चालत असे. स्वतः मी सन १९६७ ते १९७१ या कालखंडात श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी येथून डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस (एज्युकेशन) हा बी.ए:बी.एड्. समकक्ष एकात्मिक अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन माध्यमिक शाळेत शिक्षक झालो होतो. सन १९७१ ते १९७९ अशी आठ वर्षे मी विविध माध्यमिक शाळात हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र, कार्यानुभव इत्यादी विषयांचे अध्यापन केले. नंतर सन १९७९ ते २०१० अशी ३१ वर्षे हिंदीचे अध्यापन केले. याच काळात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पदव्युत्तर अध्यापन केंद्रात एम.ए., एम्.फिल., पीएच्.डी. अभ्यासक्रमांसाठी मानद अध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले. सन २००५ ते २०१० या कालखंडात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आमच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राचा प्रमुख होतो, तिथे ही बी.ए., बी.कॉम., शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांचे एम्.फिल्. अभ्यासक्रम आम्ही चालवत होतो. या काळात शिवाजी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातील बाल शिक्षणास मी मार्गदर्शन करत असे. बालवाडी ते पदव्युत्तर अशा सर्वस्तरावरील अध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभवातून शिक्षणविषयक माझे काही एक आकलन तयार झाले आहे. सन १९९० ते २०१६ या कालखंडात मी फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया, स्विट्झर्लंड, लक्झेंबर्ग, व्हॅटिकन, जपान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँगसारख्या देशांना राष्ट्रीय आदान-प्रदान कार्यक्रम व शिष्टमंडळातून भेटी दिल्या, युरोपला तर मी दीर्घकाळ होतो. या काळातही मी तेथील शिक्षण संस्था, शाळा, विद्यापीठे, प्रशिक्षण केंद्रे यांना भेटी देत तेथील शिक्षण व्यवस्था जवळून अभ्यासली आहे.
मधल्या काळात निवृत्तीनंतर एका बृहत् संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीने दिलेला सुमारे दहा लक्ष रुपयांच्या अनुदानातून मी ‘हिंदी वेब साहित्य' वर संशोधन केले. महाविद्यालयाचा प्राचार्य असण्याच्या काळात महाविद्यालयाच्या प्रशासनात ई-गव्हर्नन्स यशस्वी केले होते. ग्रंथालयाचे संगणकीकरण, कॉम्प्युटर लॅबसारखे प्रकल्प पूर्ण केले होते. त्या सर्वांतून माहिती तंत्रज्ञानाशी संपर्क व सहवास लाभला होता. या विविध परिदृष्यांतून जागतिक शिक्षणाचे जे माझे आकलन तयार झाले होते, त्या तुलनेत मी सतत भारतीय शिक्षणाची तुलना करत होतो. शिक्षणविषयक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवाल मी वाचत राहिलो आहे, वेगवेगळ्या शिक्षण व शिक्षकविषयक प्रश्न व समस्यांवर इंटरनेटवर उपलब्ध अद्यतन माहिती, लेख, लिंक्स, पीडीएफ्स, पीपीटी, क्लिप्स, इ. वाचत, पाहात नि ऐकत आलो आहे. भाषाविषयक सॉफ्टवेअर्स हाताळली आहेत. शिक्षणविषयक अध्यापन साधने, ब्लॉग्ज, ऍपस् अनुभवत वेबसाईटस् मी पाहिल्या, वाचल्या. विविध विद्यापीठ व संस्थांचे ऑनलाईन अभ्यासक्रम पाहिले. या सर्वांतून माझ्या लक्षात आलेल्या गोष्टीपैकी महत्त्वाची गोष्ट ही की जागतिक माहिती तंत्रज्ञानाची गती आणि आपले शिक्षण यात मोठे अंतर आहे. आपण बदलतो हे खरे असले, तरी विकासाच्या घोडदौडीपुढे आपले बदल कासव गतीचेच ठरतात. (खरं तर गोगलगाईच्या गतीचेच ! अन् जगाची तर गती गुगलची आहे !) जग दरवर्षी अभ्यासक्रम बदलत असताना, आपण आपले अभ्यासक्रम दशकाने बदलतो. विद्यापीठे तीन एक वर्षांनी आपले अभ्यासक्रम बदलतात. पण त्यात मूलभूत बदल होत नाहीत. 'नव्या बाटलीत जुनी दारू' असं त्या बदलाचं रूप असतं. आज तर स्थिती अशी आहे की विद्यार्थी Digital Natives आहेत, तर शिक्षक Digital Migrants. शिक्षक संगणक साक्षर आहेत, परंतु आधुनिक तंत्र साधनांचा वापर करीत नाहीत. खिशातील मोबाईलचा शैक्षणिक साधन म्हणून करण्याची मानसिकता नाही. नव साधन व तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या ऊर्जा व उत्साहाच्या अभावी विद्यार्थी व शिक्षकांतील दरी रुंदावते आहे. आपण कालबाह्य गोष्टी शिकवत वेळ आणि पैसा वाया घालवतो. शिवाय पिढीला जीवनोपयोगी शिक्षण व कौशल्य न दिल्याने बेरोजगार व अकुशल मनुष्यबळाची पैदास आज तेजीत आहे.
वरील रोगाचे मूळ आपल्या अध्यापक शिक्षणात (Teacher Education) आहे. डी.एड्., बी.एड्., एम.एड्., अभ्यासक्रमविषयक धोरण ठरविणारी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) आहे, तीच अकार्यक्षम व भ्रष्ट राहिल्याने व तिने जगाचे बदल न स्वीकारल्याने आपल्या शिक्षणाची खरी दुर्गती झाली आहे. न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल स्वीकारून आपण अध्यापक शिक्षणात सुधारणा केल्या असत्या तरी काही एक बदल झाले असते, पण देशातील शिक्षणाचे सूत्रधार (संस्था चालक), राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने सरकार त्यांचे हितसंबंध जपत आले आहे. शासन अनुदानित विद्यापीठे व महाविद्यालये स्वायतत्तेचा फायदा घेऊन कात टाकत आहेत, असे चित्र नाही. उलटपक्षी अन्य खासगी वा विदेशी संस्था वा विद्यापीठांच्या तुलनेत ते मागेच दिसतात. नॅकचा दर्जा भौतिक संपन्नता द्योतक आहे. तो बौद्धिक मूल्यमापन करतो, पण ते मुल्यमापन संरचनात्मक (Framed) आहे. संशोधनाचा दर्जा सुमार असून प्रकाशने तकलादू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले एकही विद्यापीठ नसणे, हा त्याचा पुरावा. या पुस्तकातील लेख शिक्षण व शिक्षक विकासाचा आग्रह धरते. मला हा देश म्हणजे 'गया बीता' वाटत नाही. येथील शिक्षण व शिक्षक जागतिक दर्जाचे असावे असे वाटते. गुणात्मक शिक्षण हे प्रयोग, संशोधनातून उदयाला येते. त्याला फार कमी वाव आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे, या ग्रंथातील 'नवे शिक्षण' विभागात बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाच्या प्रत्येक स्तराचे विवेचन आहे. शिवाय अध्यापक शिक्षणावरही विचार करण्यात आला आहे. स्त्री शिक्षणाचा ऊहापोह आहे, तसेच शिक्षणाच्या वाढत्या व्यावसायीकरणावर चिंता व्यक्त करून काही उपायही सुचविण्यात आले आहेत. तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा आग्रह अशासाठी की आपले आजचे मौखिक शिक्षण क्रियात्मक व विद्यार्थी सहभागी करून घेणारे व्हावे. कारण त्याशिवाय ज्ञानरचनावाद यशस्वी होणार नाही. भारतीय शिक्षणावर होणाऱ्या जागतिकीकरणाचे परिणाम विशद करून चक्रव्यूह भेदण्याचे आवाहन या पुस्तकात करण्यात आले आहे.
'नवे शिक्षण' हे 'नवे शिक्षक' घडले तरच यशस्वी होणार, हे लक्षात घेऊन दुसऱ्या भागातील अकरा लेखांतून नव शिक्षकाच्या बदलत्या पात्रता, साधने, कौशल्ये, उपक्रमशीलता, अंकीय साक्षरता (Digital Literacy) , नवी अध्यापन पद्धती (New Pedagogy) ३० बाबत पारंपरिकेस छेद देणारे आग्रह आहेत. नवा प्रशिक्षित होणारा शिक्षक अजून गुंडाळी फळाच वापरणार असेल तर त्याच्या हाती लॅपटॉप येणार केव्हा? स्लाईड प्रोजेक्टर जाऊन अध्यापक महाविद्यालयात थ्रीडी तंत्रज्ञान, फोरजी, जीपीएस, व्हर्च्युअल एज्युकेशन, ऑनलाईन अभ्यासक्रम आल्याशिवाय शिक्षक आधुनिक बनणार कसा? अजून अध्यापक महाविद्यालयातील मेथड मास्टर जर लेसन नोटमध्येच अडकून असतील तर ते 'One Note' तंत्रज्ञान केव्हा वापरणार? असा प्रश्न आहे. ब्लॉग्ज, लिंक्स, सॉफ्टवेअर, विकीज, प्लॅटफॉर्म, फोरम, ऍनिमेशन, व्हिडिओज या तर झाल्या सामान्य गोष्टी. 'नवशिक्षकाची अंकीय साक्षरता' लेखात जी आधुनिक साधने स्पष्ट केली आहेत, ती किती अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षक अध्यापक, प्राध्यापकांना माहीत आहेत? ती ते स्वतः वापरतात काय? मग प्रशिक्षकांना ती साधने अवगत होणार. अशा अंगांनी आपण अध्यापक शिक्षणाकडे पाहायला हवे. शिक्षणात गुणवत्ता येण्याचे महाद्वार म्हणजे अध्यापक शिक्षण अत्याधुनिक असणे होय, याचा आपणाला विसर पडता नये. यासाठी सिंगापूरसारखा देश आपला आदर्श व्हायला हवा. फिनलंडसारखा छोटा देश जागतिक क्रमवारीत अव्वल असतो, तर आपण खंडप्राय असून का नाही? असा भुंगा आपल्या कानात सतत घोंगावला पाहिजे. हॉर्वर्ड विद्यापीठ जागतिक दर्जात वर्षांनुवर्षे अव्वल का राहते? असा प्रश्न जोवर आपणास बेचैन करून कृतिशील करणार नाही, तोवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आपणाकडे निर्माण होणार नाही.
सदर पुस्तकात संदर्भ शोध, चित्रे इत्यादी साहाय्याबद्दल मी प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. रवींद्र मिरजकर, प्रा डॉ. श्रद्धा पाटील, प्रा सुरेश संकपाळ या माझ्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूरमधील पूर्व सहकाऱ्यांचा ऋणी आहे. तद्वतच हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अक्षर दालन, कोल्हापूरचे अमेय जोशी यांचाही मी मन:पूर्वक आभारी आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे
'नवे शिक्षण, नवे शिक्षक' या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रकाशित झाली होती. चार महिन्यातच त्याची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशक प्रकाशित करीत आहेत. हे शिक्षण क्षेत्रातील सुचिह्न होय. पहिली आवृत्ती हातोहात खपली याचे श्रेय दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था, बेळगाव, श्री शिवाजी शिक्षण संस्था, बार्शी, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर या संस्थांनी मोठ्या संख्येने पुस्तक खरेदी करून ते आपल्या संस्थांच्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाईल असे पाहिले. इतकेच नव्हे तर सदर पुस्तक प्रत्येक शिक्षक वाचतील अशी व्यवस्था त्यांनी केली. हे या पुस्तकाच्या आशय व विचाराचे यश होय. प्राचार्य डी. एन्. मिसाळे, काकतकर महाविद्यालय, बेळगाव यांनी आपल्या महाविद्यालयाला उत्कृष्ट 'नॅक' मानांकन मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ हे पुस्तक वाचून आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेट दिले. संजय कांबळे हे केवळ वाचन प्रसारार्थ व्याख्यानमाला, मेळावे, परिसंवाद इ. ठिकाणी जमीनीवर पुस्तके पसरवून विकतात. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक शिक्षक वाचकास या पुस्तकाचा मलपृष्ठ मजकूर (ब्लर्ब) वाचायला लावून पुस्तक विकत घेण्याची प्रेरणा देत खेड्या-पाड्यात १०० पुस्तके पोहोचवतात. काही संस्था आपल्या शिक्षक, प्राध्यापकांसाठी केवळ या पुस्तकावर शैक्षणिक शिबिरे घेतात. दैनिक 'सकाळ'ने या पुस्तकाचे महत्त्व ओळखून आपल्या 'सप्तरंग' पुरवणीत परिचय देऊन सदर पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचवले. शिक्षण हा आपल्या समाज आणि संस्कृतीत किती महत्त्वाचा घटक मानला जातो, हे यावरून स्पष्ट होते. दुसऱ्या नव्या, सुधारित आवृत्तीत, रचनात्मक बदल करण्यात आला आहे. पहिल्या आवृत्तीत 'नवे शिक्षण' आणि 'नवे शिक्षक' असे दोन भाग स्वतंत्र होते. ते यात एक करण्यात आले आहेत. अनुक्रमणिका एकत्र दिल्याने समग्र पुस्तक एका कटाक्षात विषयाच्या अनुषंगाने वाचकास समजणे सोपे झाले व त्यातून समग्र पुस्तक वाचले जाईल अशी व्यवस्था झाली आहे. पूर्वप्रसिद्धी सूचीचेही एकत्रीकरण केले आहे. 'शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा' शीर्षक 'नवे शिक्षक' मधील मूळ लेख हे एका शिक्षक शिबिरातील माझे भाषण होते. ते पुनर्लेखन करून लेख रूपात छापले आहे. याचा पूर्वप्रसिद्ध मसुदा सदोष होता, म्हणून ही सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय 'नवा शिक्षक' कवितेचा मूळ क्रमही बदलला आहे. या सर्व सुधारणा आणि बदलामुळे ही आवृत्ती वाचक सुलभ झाली आहे. या कामी अक्षर दालन प्रकाशनचे अमेय जोशी यांचे आभार. वरील सर्वांचे ऋण व्यक्त करून 'दोन शब्दां'ना विराम! या पुस्तकाची कन्नड आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे.
- डॉ. सुनीलकुमार लवटे
२७ फेब्रुवारी, २०१७
मराठी भाषा दिन
नवे शिक्षण
• | कात टाकण्याशिवाय पर्याय नाही | १५ | |
१) | खेळकर खेळघर | १७ | |
२) | प्राथमिक शिक्षण आणि क्षमता विकास | २२ | |
३) | प्राथमिक शिक्षण : प्रगती आणि प्रश्न | २७ | |
४) | माध्यमिक शिक्षण : आमूलाग्र बदलाची गरज | ३२ | |
५) | माध्यमिक शिक्षणाचे जागतिक चित्र | ३७ | |
६) | उच्च माध्यमिक शिक्षण : सर्वाधिक उपेक्षित स्तर | ४२ | |
७) | आंतरराष्ट्रीय दर्जा व महाराष्ट्रातील विद्यापीठे | ४७ | |
८) | भारताच्या उच्च शिक्षणाचा भविष्यवेध | ५३ | |
९) | नव्या स्त्रीचे नवे शिक्षण | ५८ | |
१०) | शिक्षणाचे चिंताजनक व्यावसायीकरण | ६३ | |
११) | क्रांतीच्या उंबरठ्यावरील अध्यापक शिक्षण | ७४ | |
१२) | उच्च शिक्षणातील अध्यापक शिक्षणाची उपेक्षा | ८० | |
१३) | नव्या युगाच्या शिक्षणाचे आव्हान | ८५ | |
१४) | वर्तमान शिक्षणापुढील नवीन आव्हाने | ९१ | |
१५) | शिक्षण आणि शाश्वत विकास | ९६ | |
१६) | एकविसाव्या शतकातील शाळेचे स्वरूप | १०३ | |
१७) | उद्याचे तंत्रज्ञानाधारित शिक्षण | १०६ | |
१८) | नवे शिक्षण : जग आणि भारत | ११० | |
१९) | जागतिकीकरणाचे शिक्षणावरील परिणाम | १२२ | |
• | चक्रव्यूह भेदण्याचा प्रश्न | १३४ |
• नव्या शिक्षकाची संकल्पना १४१
१) शिक्षकाच्या नव्या पात्रता १४६
२) शिक्षकाची नवी साधने १५२
३) शिक्षकाची नवी वाचन साक्षरता १६०
४) शिक्षकाची नवी उपक्रमशीलता १६६
५) शिक्षकाची नवी अध्यापन कुशलता १७२
६) नवशिक्षकांची अंकीय साक्षरता १७७
७) शिक्षक विकासाच्या नव्या पाऊलखुणा १८२
८) नवशिक्षकाचे व्यक्तिमत्त्व १८७
९) एकविसाव्या शतकातील शिक्षकाची घडण १९२
१०) शिक्षक विकास : शोध आणि बोध १९७
११) शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा २०३
१२) शिक्षकाची नवी आचारसंहिता २११
१३) नवा शिक्षक (कविता) २१३
नवे शिक्षण
एक लाकडी घोडा, एक पाण्याचा पिंप, एक बाई/दाई आणि चांगली पाच-पन्नास चिल्ली-पिल्ली घेऊन १०x१० च्या खोलीत बालवाडी नामक कोंडवाडा चालवायचा काळ इतिहासजमा होणार. बालवाडी चांगली चार-पाच वर्ग, भरपूर खेळणी, मल्टिमिडिया, संगीत कक्ष, विश्रांती कक्ष, उपाहार गृह, जिम, मैदान, दहा-पंधरा शिक्षक आणि मुलं-मुली फार तर वीस-पंचवीस. बालवाडीत सिनेमा, टी.व्ही., व्हिडिओ गेम्स, असेल, नसेल पाटी-पेन्सिल. असेल टॅब, लॅपटॉप्स. मुलांनी रिकाम्या हाताने यायचं नि डोकं भरून परतायचं. आलेला मुलगा, मुलगी जाताना, शाळा सोडताना फुलपाखरू झालेला असेल. तो कल्पना चंचल, स्वप्नलक्ष्यी, रंगवेडा, निसर्गप्रेमी, खेळकर, खोडकर आणि किल्ले रचणारा अन् सर करणाराही असेल.
तीच गोष्ट शाळेची. शाळा म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, वर्ग, फळा, टेबल, खुर्ची, बेंच, कपाट नव्हे. शाळा असेल बहुरंगी, बहुढंगी. विषय मुलांच्या आवडी, कल, कला, वृत्तीनुसार ठरतील. सगळ्यांना एक युनिफॉर्म नाही, प्रत्येकाचे कपडे वेगळे, तसे विषयही. सर्वांना एकच अभ्यासक्रम, पुस्तक, गृहपाठ इतिहास जमा होईल. विषय बदललेले असतील, शिकवणं टंकन (Typing) असेल. अक्षर व अंक तो टाईप करेल. लिहिणं, गिरवणं, संपलं. बेरीज, गुणाकार, भागाकार तो संगणक, कॅल्सीवरच शिकेल. गृहपाठ वह्या नसतील. दोन लॅपटॉप असतील. एक घरचा घरी, दूसरा शाळेतला शाळेत. दोन्ही इंटरनेटने जोडलेले असतील. होमवर्क तो शाळेतून जाताना घरच्या पीसीवर फॉरवर्ड करेल. घरी होमवर्क पूर्ण करून ते शिक्षकांना सेंड करेल. शिक्षक तपासून दुरुस्त करायच्या सूचना मेल करतील. पालकांना एसएमएस/मेल/क्लिप करून शिक्षक पाल्याची प्रगती कळवत राहील.
ही मुलं फार तर हायस्कूलपर्यंत शाळेत शिकतील. तोवर कॉलेजीस बंद झालेली असतील. सारं उच्च शिक्षण ऑनलाईन, व्हर्च्युअल होईल. विद्यापीठे, डिग्री सारं व्हर्च्युअल व ई-कंटेंट देणारं असेल. विद्यार्थी व शिक्षक हे व्यक्तिशः निवडले जातील. विद्याथ्र्यांना अभ्यासक्रम, पदव्यांचे शेकडो पर्याय उपलब्ध असतील. शिक्षणासाठी हॉर्वर्ड विद्यापीठला अमेरिकेत जायची गरज राहणार नाही, विद्यापीठच तुमच्या दारी येईल.
घराच्या शेजारी कुठं तरी मार्गदर्शन, समुपदेशन, प्रात्यक्षिक, शंका निरसन केंद्र असेल. ते तुम्हास आवश्यक ते सारं साहाय्य पुरवील. शिक्षण म्हणजे वर्ग, फळा, शिक्षक, शाळा ही संकल्पना संपुष्टात येऊन व्यक्तिगत स्वयंशिक्षणाची पर्यायी व्यवस्था विकसित होईल. हे भारतातील नागरिकांना आज वाचताना काल्पनिक, प्रसंगी स्वप्नवत वाटलं तरी जगात प्रत्यक्षात आलेलं वास्तव आहे. ते आज आपल्या उंबरठ्यावर आहे. उद्या ते घरीदारी होईल, अशी शिक्षणातील भारताची भविष्यगती आहे. त्यासाठी कात टाकण्याशिवाय पर्याय नाही.
•••
बाल शिक्षणाचा विचार बाल विकासाच्या पायावर उभा असला पाहिजे. म्हणजे बाल विकासाच्या आपल्या जाणिवा प्रगल्भ हव्यात. बालकांच्या सामाजिक व भावनिक स्थिती व गरजांचे आपणास भान हवे. त्यांच्या बौद्धिक विकासाच्या मर्यादांची माहिती हवी, शारीरिक विकास कसा होत राहतो याचं निरीक्षण हवं. भाषा, अंक, अक्षर, खेळ, संघभाव, स्वभाव साऱ्यांच भान ठेवत बालवाडीतील शिक्षक-विद्यार्थी संबंध व स्नेहभावाचा गोफ विणत राहायला हवा. शिक्षक-विद्यार्थ्यांत मातृबंध हवेत. विद्यार्थी आवड व वृत्ती लक्षात घेऊन शिक्षकांनी आपली भूमिका, व्यक्तिमत्त्व विकसित ठेवण्याकडे निरंतर लक्ष ठेवायला हवे. त्यांचा कल विद्यार्थी अनुकूल हवा. विद्यार्थ्यांना निरंतर प्रोत्साहन, प्रेरणा देण्याची शिक्षकाची भूमिका हवी. शिक्षकांची सकारात्मक वृत्तीच बालकांच्या मनातील शाळेविषयीचे भय दूर करून रचनात्मक आकर्षण, अभिरुची निर्माण करू शकते, हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.
बालवाडीचा अभ्यासक्रम आपण बालकांना कसे घडवणार आहोत, ते ठरवून रचायला हवा. म्हणजे आपणास आपली मुलं पोपट हवीत की गरुड हे ठरवलेच पाहिजे. ती सावलीतील रोपे वा ग्रीन हाउसमधील फुले न राहता उन्हातान्हात स्वबळावर वाढणारी झाडे-झुडपे व्हायची तर मुले कुशीत न घेता, ती पहिल्या दिवसापासूनच पाळण्यात ठेवायला हवीत. बालपणीच ती पोहायला हवीत. ती लवकर स्वावलंबी करण्यावर भर हवा. बालवाडीत स्वच्छता, स्वावलंबन, स्वाध्याय, स्वयंशिक्षणावर भर हवा. बालवाडी तासापासून दिवसापर्यंत वाढत जाणारी हवी. वेळापत्रकात वैविध्य हवं, शिवाय त्यात लवचीकताही, मुलागणिक विकास योजना हवी. मुले मर्यादित, शिक्षक अमर्याद-हे सूत्र स्वयंपूर्ण विकासाकडे आपणास नेईल. मी सन १९५४-५५ च्या दरम्यान बालवाडीत होतो. बालवाडी आमच्या अनाथाश्रमाचीच होती. आमच्या बाई नलिनी जोशी त्यांना आम्ही नन्नीताई म्हणत असू. त्या माँटेसरीबाईंकडे शिकलेल्या होत्या, आमची बालवाडी प्रशस्त होती, स्वागत कक्ष, वर्ग, स्वयंपाकघर, शयनकक्ष, भांडार, प्रसाधनगृह, बगीचा सारे होते. बाई नमस्ते म्हणून आमचे स्वागत करायच्या. त्या आमचे कपडे, भांग, बटणे पाहायच्या. बालवाडीत केस विंचरायची सोय होती. आरसा, कंगवा, पावडर, तेल, नॅपकीन, नेलकटर, साबण, पाणी सारे विपुल, पण वापरण्याचा कटाक्ष मात्र काटकसरीवर असायचा. प्रार्थनेने बालवाडी सुरू व्हायची. खेळ म्हणजेच शिक्षण होते. साधनांची खोली गच्च भरलेली असायची. दट्टा पेटी, मनोरे, साचे, फ्रेम्स, किसणी, विळी, झाडू, चित्रे, तक्ते, मॉडेल्स, सूप, परात, कपडे, सुईदोरा, सार त्या खोलीत होते. निवडणे, कुटणे, किसणे, कापणे सर्व शिकवले जायचे. दोरा ओवणे, बटण लावणे, बंध बांधणे, गाठी मारणे / सोडणे, बुटाला लेस घालणे /काढणे; सारे बाई आम्हांस शिकवत. गाणी, नाच, नक्कल, उड्या, मेणकाम, मातीकाम, कागदाच्या लगद्यापासून भांडी बनवणे, होडी, घसरगुंडी, खुरपे, झारी, पेरणे, खुरपणे सारे लुटुपुटु असायचे. सहल, प्रदर्शन, सर्कस, जत्रा, वारी, मेरी गो राऊंड, वाळू कुंड, पाणी हौद सर्व होते. बालवाडीत मला जे शिक्षण मिळाले ते परत कधीही, कुठेही मिळाले नाही. आमच्या बालवाडीत येताना, जाताना कधी कुणी रडल्या, रुसल्याचं आठवत नाही. तीच बालवाडीची खरी कसोटी असायला हवी.
बालवाडीचे शिक्षण म्हणजे मुलांचं सामाजीकरण व स्वावलंबन. घर, आई, बाबा, ताई, दादा सोडून मित्र, मैत्रीण, शिक्षकात राहणे, रमणे. हातात हात घेऊन फेर धरणे, सगळे मिळून गाणे. गप्पा करणे, गोष्टी सांगणे. कट्टी न करणे, चिमटे न घेणे, मारामारी न करणे, आपल्या डब्यातला खाऊ मित्र-मैत्रिणींना देणे, गोळी, चॉकलेट, बिस्कीट वाटून खाणे, हात पाय स्वत: धुणे, पुसणे, शीऽऽ, सूऽऽ करणे, पाणी मारणे, सगळे स्वतः हळूहळू करणे, शिकणे. अंक, अक्षर ओळख, गिरवणे, उच्चारणे. चित्रे काढणे, चिकटवणे, फाडणे, कापणे, रंग ओळख, स्वर संगती लावणे. कपड्याच्या घड्या घालणे, बिछाना घालणे, गुंडाळणे, ठेवणे, वर्ग लावणे, आवरणे, मांडणे, आजच्या संदर्भात संगणक सुरू करणे, बंद करणे शिकवणे, क्लिक, माउस, कट, पेस्ट, सिलेक्ट, फॉरवर्ड शिकणे. व्हिडिओ गेम खेळणं, टी.व्ही. पाहणे, गाणी ऐकणे, व्हिडिओ रेस, गेम्स, पझल्स, सेटस्, पत्ते, क्रिकेट, टेनिस व्हर्च्युअल खेळणे आणि मैदान, मातीत पण लंगडी, लपंडाव, गलोरी, घसरगुंडी खेळणे. सापशिडी, व्यापार, बँक, पोस्ट, एटीएम्, पैसे काढणे, दार उघडणे सारे, सारे शिकणे म्हणजे बालवाडी. बालवाडी शिक्षण म्हणजे स्वत:ला विसरणे व दुसऱ्यात, समाजात रमणे, शिकणे. स्वतंत्र, स्वप्रज्ञ होणे. वस्तू, वास, चव, रंग, आकार, अंक, अक्षर, शब्द, बोलणे साऱ्याची मोडतोड, जुळवाजुळव म्हणजे बालशिक्षण. मुलांच्या चेहऱ्याचे भाव हेच त्याचं प्रगती पुस्तक व शिक्षक कौशल्याचा आरसापण तोच!
बालवाडी पंचवीस मुला-मुलींची हवी. किमान पाच खोल्या हव्यात. पाच शिक्षिका हव्यात. त्या बाल शिक्षणातील किमान डी.टी.एड्., बी.एड्. हव्यात. विदेशात बालवाडी शिक्षिका पीएच्.डी. पण असतात. बालवाडीस डॉक्टर, आहार तज्ज्ञ, संगीत शिक्षक, बालमानसशास्त्र, शिक्षणतज्ज्ञ जोडलेले हवेत. शिक्षिका गायन, वाचन, शिक्षण, अभिनय, नृत्य, नक्कल इत्यादीत तरबेज हव्यात. त्या समाजशील, मातृमुखी हव्यात. बालवाडीत शिक्षकपण हवेत. ते मारकुटे नसावेत. जरब नको, जाणीव हवी. बालवाडी म्हणजे खेळकर खेळघर हवे. शाळा नंदनवन, स्वर्ग असायला हवी.
तीन वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींनाच बालवाडीत प्रवेश दिला जावा. आपणाकडे पालक फार घाई करतात. बालवाडी शिक्षण दोन, तीन वर्षांचे हवे. पहिले वर्ष सामाणिीचे. दुसरे वर्ष स्वावलंबनाचे, तिसरे शिक्षणाचे. जगात ७ वर्षांपर्यंत बालशिक्षण चालते. आपणाकडे पाचव्या वर्षीच संपते. मुलांची वाढ होण्यापूर्वीच आपणाकडे बौद्धिक ताण दिला जातो. जन्म ते सात वर्षे हा बालशिक्षणाचा जगमान्य कालावधी आहे. तो मानसशास्त्रीय जसा आहे, तसा तो समाजशास्त्रीय व शैक्षणिकही आहे. बालशिक्षणाची भूमिका अनुभवास जीवन जोडायची असायला हवी. शिक्षणास पूरक वातावरण व व्यक्तिमत्त्व विकास हे बालवाडीचे ध्येय असायला हवे. वर्ग शिक्षणावर भर हवा. बाह्य शिक्षण प्रासंगिक हवे. शिक्षणात कुटुंब व पालक गृहीत व अंतर्भूत हवेत. मूल्याधिष्ठित स्वावलंबी, स्वप्रज्ञ नागरिक घडविण्याचे लक्ष्य हवे. शिस्त, संस्कृती आणि संस्कार हवेत.
एकविसाव्या शतकातील बालवाडी चालवत असताना बदललेल्या पर्यावरणाचे भान हवे, गती, तंत्र मनात हवे. आधुनिकता गृहीत हवी. शहर, गाव, भेद लक्षात घेऊन नियोजन, अभ्यासक्रम हवेत. विशेष मुलांकडे विशेष लक्ष हवे. 'सब घोडे बारा टक्के' असे सरधोपट शिक्षण नको. मुलांच्या गरजांवर आधारित शिक्षण हवे. मुलांच्या क्षमतांचा विचारही महत्त्वाचा. मुले सक्रिय, शिक्षक मार्गदर्शक, मदतनीस अशी शिक्षण रचना हवी. सांघिक वर्तन व व्यक्तिविकास याचे संतुलन व समन्वय म्हणजे बालकांचे सामाजीकरण व स्वावलंबन. ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा. निरंतर मूल्यमापनातून अभ्यासक्रम लवचीक ठेवायला हवा, तर प्रत्येक मुलाच्या विकासाकडे लक्ष पुरवणे, केंद्रित करणे शक्य होईल. शंका समाधान, जिज्ञासावर्धन, कौशल्य विकास या तिन्हीत समन्वय घडवत बाल शिक्षणाची आखणी, मांडणी व अंमलबजावणी व्हायला हवी. ज्ञानरचनावाद हवा, पण लक्ष्य मनुष्यबळ विकासच हवे. सर्जनात्मकता, रचनात्मकता, रंजकता, आनंद, नवता, तंत्र साधनांचा वापर यातूनच मुले काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम होतील याचे भान हवे.
एकविसाव्या शतकातील बालवाडीत अंक, अक्षर, गाणी, गोष्टी, कला, कौशल्य, सांघिक जीवन, स्वावलंबन, रंजन यांचा समन्वय साधणे संपन्नतेतूनच शक्य आहे. त्यासाठी शाळेत गणित, घड्याळ, मोजमाप, यांची साधने हवीत. लेखन, वाचन विकासाची साधने हवीत. तंत्र आणि मंत्र (माणूस आणि यंत्र) यांचा समन्वय, संतुलन हवे. आपणास माणसाचा रोबो बनवायचा नाही, माणूस अधिक समाजशील, संवेदी, संवादी, कुशल बनवायचा आहे. शाळेत ग्रंथालय हवेच, प्रयोगशाळा हवी, लँग्वेज लॅब हवी, नाट्यगृह हवे, ऑर्केस्ट्रा हवा. हे सारे जमवत समाजाला गवसणी घालण्याचे भान हवे. एखादे विद्यापीठ उघडणे सोपे, बालवाडी विकसित करणे म्हणजे देशाचे नियोजन करणे, हे भान ज्या दिवशी आपणास येईल, तो सुदिन !
भारतातील बाल शिक्षण विविध स्तरीय आहे. काही मुले अंगणवाडीत, काही बालवाडीत, काही प्ले ग्रुपमध्ये तर काही ज्युनिअर, सिनिअर के. जी. मध्ये. हे केवळ नाव वैविध्य नाही, ते स्वरूप वैविध्यही आहे! झाडाखाली भरणाऱ्या बालवाडीपासून फाईव्ह स्टार, स्पार्टेक्स मल्टिमिडिया, इंटरनेट, टचस्क्रीन बालवाडीपर्यंतचे आपले वैविध्य म्हणजे भारताचे प्रतिबिंब ! ते राहणारच. आपल्यापुढे आव्हान आहे, ते विषमता कमी करत गुणवत्ता वाढीचे. त्यासाठी राष्ट्रीय धोरण, यंत्रणा, अभ्यासक्रम, संशोधन, प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे. त्यासाठी गरज आहे 'मुले प्रथम' या मानसिकतेची ! ती आपण मनी-मानसी, जळी-स्थळी, जन-गणात रुजवू या !!
•••
संदर्भ :-
• New Jersey Kindergarten Implimentation Guidelines/
(April - 2011.)
• The Power of K (June - 2007) प्राथमिक शिक्षण आणि क्षमता विकास
सन १९९२ मध्ये आपल्या देशात प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र सुधारणा करण्याचे धोरण अंगिकारण्यात आले. सन १९९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १४ वर्षांपर्यंतचे शिक्षण हा बालकांचा मूलभूत अधिकार असल्याचे आपल्या एक निकालात जाहीर केले. योगायोगाने त्याच वर्षी दिल्लीत लोकसंख्या बहुल देशांची एक शिक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली, तीत 'सर्वांसाठी शिक्षण' (Education For All) संबंधी आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्तीचा निर्णय घेण्यात आला. सन १९९५ मध्ये जागतिक सामाजिक विकास परिषदेच्या निमित्ताने सन २००० पर्यंतच्या शिक्षण विकास व उद्दिष्टांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार १९९८-९९ मध्ये 'सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण' (Universal Elementary Education) हे राष्ट्रीय लक्ष्य घोषित करण्यात आले, २००१ ला 'सर्व शिक्षा अभियान' जाहीर करून २०१० पर्यंत लक्ष्यपूर्तीचा निर्णय घेण्यात आला. 'सर्व शिक्षा अभियान' भारतातील प्राथमिक शिक्षण भौतिक सुविधा संपन्न करणारे ठरले. केव्हा तरी शाळांना फळा देणारे (Operation Black Board) आपले भारत राष्ट्र प्राथमिक शाळांना संगणक, इमारत, ग्रंथालय, पेयजल, प्रसाधन कक्ष, प्रयोगशाळा, शिक्षक पुरविणारे शिक्षण समृद्ध राष्ट्र बनते. हे खरेच वाटत नाही. भौतिक सुविधांशिवाय सर्व शिक्षा अभियानामुळे भारतीय प्राथमिक शिक्षणात अनेक गुणवत्ताप्रधान बदल झालेत. बहुसंख्य विद्यार्थ्यांत शिकण्याची गोडी निर्माण झाली. अधिकांश शाळा, वर्गातून बहुस्तरीय अध्यापन, आंतरशाखीय अध्यापन रूढ झाले. शिक्षक-विद्यार्थी प्रमाण जागतिक प्रमाणाच्या निकट पोहोचू शकल्याने शिक्षक-विद्यार्थी यांच्यामधील दरी, अंतर कमी होणे शक्य झाले. बहुतेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष पुरवू लागल्याने व्यक्तिकेंद्रित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गतिमान झाली. शिक्षण विकासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या सुधार-शिक्षण (Remedial Teaching) योजनेबद्दल विद्यार्थी-पालकांत जागृती, जाणीव कमी असल्याने अपेक्षित यश जरी येऊ शकले नसले, तरी ज्यांनी प्रतिसाद दिला, सहकार्य दिले, अशा विद्यार्थ्यांत प्रगती दिसून आली. शिक्षक क्षमता विकास (Capacity Building) कार्यक्रम शिक्षकांच्या उत्साही सहभागामुळे परिणामकारकरित्या यशस्वी झाला. पण कृती संशोधनाच्या आघाडीवरील यश मात्र लाक्षणिकच ठरले. समाज सहभाग वाढला. हे सर्व यश प्राथमिक शिक्षणाच्या जागतिक प्रगतीचा आलेख पाहता प्राथमिकच म्हणावे लागेल. प्राथमिक शिक्षणात जगात आघाडीवर असलेल्या देशातील प्राथमिक शिक्षणाची प्रगती त्यांच्या नि आपल्यातील गुणवत्तेची दरी अधोरेखित करते.
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD), प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (PISA) या जागतिक शैक्षणिक दर्जा ठरविणाऱ्या अनुक्रमे फ्रान्स व अमेरिकेतील संस्था होत. त्यांच्यानुसार दक्षिण कोरिया, फिनलंड, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, सिंगापूर, हाँगकाँगसारखे देश वाचन, गणित, विज्ञान या विषयांतील गुणवत्तेच्या आधारे जागतिक क्रमवारीत आघाडीचे देश मानले जातात. 'युनेस्को' च्या क्रमवारीत भारत १०५ व्या क्रमावर दिसतो. शिक्षण विकासात भारतास किती मजल गाठावयाची आहे, याचे भान येण्यास ही क्रमवारी लक्षात ठेवायला हवी.
जगातील अनेक देश प्राथमिक शिक्षण दर्जेदार व्हावे, म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न करताना दिसून येते. आपणास त्यातून बरेच शिकता येणे शक्य आहे. ऑस्ट्रेलियात शाळेत शिकण्यास अनुकूल वातावरण निर्मिण्याकडे अधिक लक्ष पुरविले जाते. प्राथमिक शाळा गुणवत्तेची हमी देतात. तेथील शिक्षण वास्तवाधारित ठेवण्याकडे कटाक्ष असतो. शिक्षणाचे ध्येय, लक्ष्य निश्चित केलेले असते. ते प्राप्त करण्यासाठी दैनंदिन मूल्यमापनाकडे, नोंदीकडे पुरेसे लक्ष ठेवले जाते. शिक्षणात समस्या सोडवण्यावर (Problem Solving) भर असतो. सहकारी विद्यार्थी (Peer) एकमेकांस शिकवत असतात. मिळून शिकण्यावर भर असतो. सर्व विषय एकमेकांच्या संदर्भात शिकविण्याची (Interdisciplinary Approach) पद्धत रूढ आहे, प्रकल्पाधारित शिक्षण (Project Based Learning) हे तेथील अध्ययन-अध्यापनाचे बलस्थान आहे. शिक्षक शिकविण्यापेक्षा मदत, मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.
जगात फिनलंडसारखा छोटा देश प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता विकासात सतत प्रथम क्रमांकाचा देश राहिला आहे. चाळीस वर्षांपूर्वी या देशाने शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याचे ठरवले. त्यात प्रयोग, परिवर्तन निरंतरता ठेवत आज तो देश प्राथमिक शिक्षणातील अग्रणी देश बनला आहे. १,३0,५९६ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा युरोपीय देश स्वीडन, नॉर्वे, रशिया, एस्टोनियामध्ये वसलेला. ५४,७४,०९४ इतकीच लोकसंख्या. दरडोई उत्पन्न ४०,००० डॉलर्स. पण शिक्षणविषयक जागृतीमुळे तो बलाढ्य ठरला. त्या देशाची स्वत:ची अशी एक शिक्षण दृष्टी, नीती, कार्यपद्धती, धोरण आहे. एक म्हणजे तिथे मुलांना ६ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय शाळेत घातलेच जात नाही (आणि खरे सांगायचे तर घेतलेच जात नाही). विद्यार्थी पौगंडावस्थेत येईपर्यंत त्यांना ना गृहपाठ दिला जातो ना त्यांची कसली परीक्षा घेतली जाते. (वय वर्षे १२ / इयत्ता ६ वी). विद्यार्थी १६ वर्षांचा झाला की तो सार्वत्रिक परीक्षेला (Board Examination) पात्र समजण्यात येतो. हुशार व ढ सर्व विद्यार्थ्यांना एकत्र व एकाच वर्गात शिकवले जाते, गुणवत्ताधारित तुकड्या नसतात. तरी अमेरिकेपेक्षा त्यांचा शिक्षण खर्च सुमारे ३०% कमी असतो. ३०% विद्यार्थ्यांना वयाच्या ९ व्या वर्षांपर्यंत अधिक साहाय्य/लक्ष पुरविले जाते. शालेय शिक्षणातून ६६% विद्यार्थी महाविद्यालयात जातात. अन्य व्यवसाय वा व्यावसायिक शिक्षणाकडे वळतात. हुशार व सामान्य विद्यार्थ्यांत अल्प अंतर असते, हे तेथील शैक्षणिक गुणवत्तेचे खरे रहस्य. 'किमान गुणवत्तेचे कमाल विद्यार्थी' हे त्यांच्या प्रगतीचे सूत्र होय. विज्ञानासारख्या प्रात्यक्षिक विषयांच्या वर्गात १६ विद्यार्थी (Batch) असतात. त्यामळे व्यक्तिगत लक्ष ठेवणे शक्य होते. अधिकांश विद्यार्थी (९३%) शाळांतूनच पदवीधर होतात. व्यावसायिक अभ्यासक्रमास सुमारे ४३% विद्यार्थी पसंत करतात, जातात. शाळेच्या वेळेत मुलांना ७५ मिनिटे सुट्टी असते, शिकताना मुले थकू, कंटाळू नये याकडे लक्ष असते. शिक्षक दर दिवशी ४ घड्याळी तास शिकवतात. आठवड्यातून दोन तास मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते. शिक्षक-विद्यार्थी प्रमाण अध्यापन गरजेवर आधारित असते. शालेय शिक्षण मोफत असते. शिक्षणाचा खर्च शासन करते. सर्व शिक्षक पदव्युत्तर शिक्षण घेतले असतात. (एम.ए., एम्.कॉम., एम.एस्सी.) तेथील पदवी, पदव्युत्तर शिक्षण खर्च अल्प असतो. शिक्षणाचा अभ्यासक्रम मार्गदर्शक असतो. प्रयोग, निवड, परिवर्तनाचे शाळेस स्वातंत्र्य असते. पहिल्या १०% गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांतून शिक्षक निवडले जातात व त्यांना प्रशिक्षण दिले जाते. शिक्षकांचा वार्षिक पगार १५ ते १६ लक्ष रुपये (मासिक सव्वा ते दीड लाख रुपये) असतो. शिक्षकांना गुणवत्ता वेतन (Merit Pay) नसते. कारण सर्वच शिक्षक गुणवान (Meritorious) असतात, हे विशेष. शिक्षकांची गणना समाजातील उच्चभ्रू म्हणून केली जाते.(डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजीनिअर, वकील इ. सारखी)
कोरियासारख्या गुणवत्ताप्रधान प्राथमिक शिक्षण देणाऱ्या देशातही अन्य श्रेष्ठ देशांप्रमाणे समाजशास्त्र, उद्योग, कायदासारख्या विद्याशाखांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य असते. न्यूझीलंडमध्ये शिक्षण हे जीवनाचे संवेदी व समाजशील साधन म्हणून पाहिले जाते. जपानमध्ये शिक्षण व उपजीविका तसेच उत्पादन यांची सांगड महत्त्वाची मानली जाते. चीन शिक्षणास राष्ट्रीय गरजांच्या पूर्ततेच्या नजरेतून पाहतो. या सर्व पार्श्वभूमीवर आपण शिक्षण केवळ नोकरीचे माध्यम म्हणून पाहत असल्याने जीवन आणि शिक्षणातील आपली दरी न ओलांडता येणारी आहे, याचे भान ठेवून नव्या शिक्षणाची आखणी व्हायला हवी.
या सर्व पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियासारखा देश प्राथमिक शिक्षणाकडे ज्या गृहित आणि उद्दिष्टांचा मेळ घालत शिक्षणाचा आकृतीबंध बनतो, ती दृष्टी आपण लक्षात घ्यायला हवी. प्राथमिक शिक्षणाबद्दल ऑस्ट्रेलिया विचार करताना म्हणतो की, "We believe that children are born with all of their senses ready to make meaning of their world, that they come to school with knowledge and experiences. They are autonomous learners, ready to explore the world around them; and that an interdisciplinary, authentic, negotiated and collaborative curriculum is essential to their development."
•••
संदर्भ :-
• International Comparison of Finland's Education System.
www.oph.fi
• Finish Education in nutshell.
www.cimo.fi
• Quality Issues in Elementary Education - India.
ssa.nic.in
• Education For All - Final Report.
(Towards the quality with Equality).
mhrd.gov.in प्राथमिक शिक्षण : प्रगती आणि प्रश्न
सन २०१५ च्या 'सर्व शिक्षा अभियान' (Education For All) अहवालानुसार आपणास जागतिक पातळीवर बाल मृत्यू प्रमाण कमी करण्यात ५०% यश हाती आले, तरी जगात २०१३ साली ५ वर्षांखालील सुमारे ६० लक्ष बालके मृत्युमुखी पडली. आपण बालकांच्या आहाराचा दर्जा उंचावण्यात चांगले यश संपादन केले हे खरे आहे, तरी जगातील १/४ बालके अद्याप कुपोषित आहेत, हे आपण विसरता कामा नये. तरी आपण १८४ दशलक्ष मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा देऊन प्राथमिक शिक्षणाचा प्रसार भविष्यात होत राहील, याची खबरदारी घेतली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
सन १९९९ मध्ये जगभर आपण 'सर्व शिक्षा अभियान' राबवायचे ठरले तेव्हा ८४% च मुले प्राथमिक शिक्षण घेत होती. आपले लक्ष्य सन २०१० साली १००% करण्याचे होत. ताज्या आकडेवारीनुसार आपण ९३% पट नोंदणी करू शकलो आहोत. ४ जुलै, २०१५ रोजी आपण भारतातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले, तेव्हा लक्षात आले की अजून भारतातील ६० लक्ष मुले शाळेपासून वंचित आहेत. पैकी ४९% अनुसूचित जाती-जमातीतील असून इतर मागासवर्गीय ३६% आहेत. अद्याप मुस्लीम २५% मुले-मुली शिक्षण वंचित आहेत.
सन २००९ मध्ये आपण सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करून मुलांचा शिक्षण हक्क मानला. आता इ. १ ली ते इ. ८ वीचे शिक्षण प्राथमिक मानण्यात आले आहे. म्हणजे ६ ते १४ वयोगटातील सर्व मुले शाळेत येणे अनिवार्य झाले आहे. पण तरी देशात ६० लाख मुले शिक्षण वंचित आहेत, शिवाय शाळा सोडण्याचे प्रमाण प्राथमिक स्तरावर ३% तर माध्यमिक स्तरावर ते २०% इतकं आहे.
गेल्या शतकाअखेर आपण प्राथमिक शाळांना पक्की इमारत, वीज, पाणी, प्रसाधनगृह पुरवू शकलो नव्हतो, म्हणून सर्व शिक्षा अभियान काळात (२००० ते २०१०) आपण दोन स्तरावर प्रगती केली. एक शाळांना इमारती दिल्या व सुविधा विकास केला. पटनोंदणीत आपण आघाडी घेतली. भविष्यकाळात आपले लक्ष्य गुणवत्ताप्रधान, आधुनिक साधनसंपन्न शिक्षण असले पाहिजे. ३० मुलांमागे १ शिक्षक ही जागतिक सरासरी गाठण्याचे आव्हान आपणापुढे आहे. आपल्या देशातील मुले शिक्षण वंचित राहण्याची जी कारणे आहेत, त्यात पालक निरक्षर असणे, त्यांची आर्थिक स्थिती बेताची असणे, ही जशी कारणे आहेत तसेच वाडी-वस्तीच्या ठिकाणी शाळा नसणे, शाळेसाठी दूरवर जावे लागणे, शाळा सुविधायुक्त नसणे अशीही कारणे आहेत. त्यांचा निपटारा आपण जोवर करणार नाही, तोवर १००% पटनोंदणीचे लक्ष्य आपण गाठू शकणार नाही. जगातील शाळा आपल्या नियत वेळापत्रकापूर्वी व नंतर शाळाबाह्य मुलांसाठी विविध प्रकारे प्रयत्न करतात. तसे प्रयत्न आपणाकडे आढळत नाहीत. दर हजार वस्तीमागे एक शाळा, असे धोरणातील लक्ष्य गाठले, तर आपण १००% शिक्षण प्रसाराचे प्राथमिक स्तरावरील प्राप्त करू शकू. आहार, कुपोषणावर मात करण्याच्या हेतूने आपण प्राथमिक शाळात मध्यान्ह आहाराची सोय केली आहे. याचाही परिणाम पटवाढीत झाला आहे. अनेक शाळात शिक्षकांची पदे रिक्त असणे, यामुळे प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमात कृतिशीलता, प्रयोग, जीवनानुभव, निसर्गजोड इ. संदर्भातील अनेक दोष आहे. परिणामी प्राथमिक शिक्षण न चेतनादायी आहे, न चैतन्यदायी ! असेही पाहण्यात आले आहे की मुले केवळ मध्यान्ह भोजनाच्या आमिषाने शाळेत येतात. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या संदर्भातील हे सत्य आपणास नाकारता येणार नाही. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गळती व स्थगिती (Wastage and Stagnation) हा देखील आपल्या प्राथमिक शिक्षणातील एक गंभीर प्रश्न आहे. प्राथमिक स्तरावरील शिक्षण रंजक, प्रभावी, सर्जनात्मक, आनंददायी, प्रयोगशील करण्यास आपणास भरपूर वाव आहे. पण अद्याप आपले तिकडे लक्ष नाही. शिक्षक व विद्यार्थ्यांतील सुसंवाद ही देखील अलीकडच्या काळातील मोठी समस्या होते आहे. शिक्षकांची उपक्रमशीलता, लेखन, संशोधन, वाचन, माहिती व तंत्रज्ञान प्रावीण्य हे वर्तमान शिक्षकांचे कौशल्य असायला हवे. पण त्यांचा वाढता अभाव यांमुळे शिक्षक भूमिकेवर समाज प्रश्नचिन्ह उभे करताना आढळतो.
ज्या समाज वर्गातील मुले शिक्षण वंचित आहेत, त्या समाजाच्या निरक्षरतेबरोबरच दारिद्र्याचा प्रश्न भयंकर आहे. मोलमजुरी करणारे, भटके वर्ग, स्थलांतरित कुटुंबे पाहता त्यांना अपत्य हे कमाईचे साधन म्हणून आवश्यक असते. बालमजूरच नव्हे, तर घरकाम, घर सांभाळणे, व्यवसाय यासाठी मुले त्यांना उत्पन्न साधन म्हणून हवी असतात. अशा वर्गाच्या आर्थिक उन्नतीशिवाय त्यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे कठीण. हा भावनिक प्रश्न नसून ती एक त्या समाज वर्गाची आर्थिक गरज म्हणून पाहणे आवश्यक आहे. याच्या बळी त्या वर्गातील मुली पहिल्या होतात, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. लिंग समानतेचा प्रश्न जगण्याच्या समान संधीशी आपण जोवर जोडणार नाही, तोवर वास्तविक समानता रुजणार नाही. आपल्या शैक्षणिक प्रश्नांची मुळे जगण्याच्या संघर्ष व समस्येशी भिडलेली आहेत.
हे सारे जागतिक पार्श्वभूमीवरील भारतातील सर्वसाधारण प्राथमिक शिक्षणाचे चित्र. भारतात प्रांतनिहाय प्राथमिक शिक्षणाची स्थिती भिन्न आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वर्तमान प्राथमिक शिक्षण अनेक दृष्टींनी संक्रमण अवस्थेत आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाच्या काळात आपणाकडे विना अनुदान शिक्षण पद्धती सुरू झाली. पूर्वी आपल्याकडे शासकीय प्राथमिक शाळा होत्या. त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकांमार्फत चालविण्यात येत होत्या. त्याशिवाय खासगी शाळा होत्या. त्यांना अनुदान होते. स्थानिक स्वराज्य संस्था संचालित प्राथमिक शाळा व खासगी प्राथमिक शाळा यांचे अनुदान सूत्र भिन्न होते नि आहे. पालकांची पहिली पसंती खासगी शाळांना होती नि आहे. विना अनुदान तत्त्वाने शिक्षण प्रसारास साहाय्य झाले असले, तरी प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे, हे सर्वमान्य आहे, कारणे काही असोत.
सन १९९० नंतर प्राथमिक शाळांपुढे वा शिक्षणापुढे म्हणा, माध्यमाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिकीकरणामुळे शहरी व मध्यमवर्गीय पालकांची मुले मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जाऊ लागली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटण्यास शासनाचे मराठी माध्यमाच्या शाळासंदर्भातील अनुदार धोरणही कारणीभूत आहे. गेल्या २०-२५ वर्षांत शासनाने मराठी शाळांना परवानगी न देण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पटभरती कार्यक्रम कार्यरत आहे. हा छुपा अजेंडा आहे. परिणाम असा झाला की खेड्यापाड्यात इंग्रजी शाळांना परवानगी मिळाल्याने पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्था संचलित शाळांचा पट झपाट्याने खाली आला. आज तर जेवढे शिक्षक तेवढी ही मुले नसलेल्या शाळा मी पाहिल्या आहेत. खासगी प्राथमिक शाळांना आता त्याची झळ पोहोचू लागली आहे. कारण प्रत्येक पालकाची पहिली पसंती इंग्रजी माध्यमाची शाळा होत चालली आहे. एकंदरीत प्राथमिक काय नि माध्यमिक काय सर्व शालेय शिक्षण केवळ संक्रमण अवस्थेतून जात नाही तर त्याचा प्रवास अराजकाकडे सुरू आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे इ. १ ली ते इ. ७ वी प्राथमिक शिक्षण मानले जायचे. सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या अधीन राहून सक्तीच्या मोफत शिक्षणाचा हक्क मूलभूत अधिकार म्हणून मान्य केला. जागतिक स्तरावरील बालक व मानव अधिकारांनुसारही बालकांना शिक्षणाचा हक्क असून जागतिक बालक हक्क सनदेवर भारताने सही केली असल्याने सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण राष्ट्रीय जबाबदारी झालेली होती. केंद्र शासनाने खरे तर ३+ ते ५+ दोन वर्षांचे पूर्व प्राथमिक शिक्षण (बालवाडी, अंगणवाडी) मान्य करायला हवे होते. शिवाय, ५+ ते १७+ असे बारा वर्षांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे कायदेशीर होते. कारण कायद्याने १ दिवस ते १८ वर्षे वयोगटातील सर्व मुले-मुली 'बालक' संज्ञेत येतात. सन २००९ च्या सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणात ६ ते १४ वयोगटातील शिक्षणास प्राथमिक शिक्षण संज्ञा दिल्याने वर्तमान प्राथमिक व माध्यमिक शाळातील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला. आपल्याकडे इ, ५ वी ते इ. ७ वी हे तीन वर्ग प्राथमिक शाळांतही आहेत नि माध्यमिक शाळांतही. खरे तर नवा कायदा काटकसरीच्या विचाराने केल्याने तो अविवेकी ठरला. शिवाय अशैक्षणिक ही त्याचे दुष्पपरिणाम सध्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावर दिसून येत आहेत. खरे तर नवा कायदा स्वीकारून शिक्षणाचे समायोजन, पुनर्रचना होणे अपेक्षित होते. शासनाने ते आस्थापना समायोजन मानून शिक्षक विभाजन / समायोजन करून हात झटकले आहेत. कायद्याने इ. १ ली ते इ. ८ वी प्राथमिक शिक्षण झाल्यावर प्राधान्याने अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके बदलणे अनिवार्य होते. आता येथून पुढे ती प्रक्रिया होईल. पण संरचना दोष मात्र कायम राहणार, हे उघड सत्य होय.
•••
या शिवाय सदर अभियानाचे अनेक उद्देश आहेत. प्रत्येक दोन किलोमीटर परीघात माध्यमिक शाळांचे जाळे विणणे अपेक्षित आहे, आपणास माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची आहे. शिक्षणातील मुला-मुलींची विषम दरी भरायची आहे. सर्व माध्यमिक शाळांत अपंग सुविधा (रॅम्पस्, ग्रिप्स, कमोड, ब्रेल पुस्तके, श्रवणयंत्रे इ.) निर्माण करावयाच्या आहेत, सामाजिक व आर्थिक दुर्बल घटक, वंचित बालके (अनाथ, निराधार, बालमजूर, बालगुन्हेगार, रस्त्यावरची मुले, वेश्या, कुष्ठपीडितांची अपत्ये, एडसग्रस्त, मतिमंद, अपंग इ.) शिक्षणाच्या मध्यप्रवाहाचे लाभार्थी बनवायचे आहेत. 'प्रत्येक बालकाला शिक्षण' हे नजीकच्या काळातील आपले ध्येय असून ते साध्य करू शकलो, तरच माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले असे म्हणता येईल. याशिवाय माध्यमिक शाळांच्या वर्ग खोल्यांत वाढ, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छ व सुविधा सुलभ शौचालये, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाश, वायुविजन, वीज, संगणक, इंटरनेट, दूरदर्शन, प्रोजेक्टर्स इ. व्यवस्थाच्या रूपाने शाळा भौतिक व शैक्षणिक साधन संपन्न करावयाच्या आहेत.
हे जरी खरे असले, तरी जगात माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांनी माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाच्या प्रांतात जी गरुडभरारी घेतली आहे, ती पाहता आपण शिक्षण क्षेत्रात करू पाहात असलेल्या सुधारणा प्राथमिक व जुजबीच म्हणाव्या लागतील. अजून आपण भौतिक संपन्नतेच्या गर्तेत आहोत. बौद्धिक संपन्नता व विकास ही त्यानंतरची गोष्ट असते, हे आपण लक्षात ठेवायला हवे. माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत पुढील पाच देशांचा समावेश होतो- १) दक्षिण कोरिया २) फिनलंड ३) कॅनडा ४) न्यूझीलंड ५) जपान. भारताचे आकारमान, साधन संपत्ती, मनुष्यबळाचा विचार करता हे देश छोटे आहेत. तरी त्यांनी अमेरिका, रशिया, चीन, भारतादी महासत्ता असलेल्या वा होऊ पाहणाऱ्या देशांच्या तुलनेने कशी प्रगती केली, हे समजून घेतल्याशिवाय अशी प्रगती आपण करू शकणार नाही.
वरील देशांत माध्यमिक स्तरावर विषय निवडीचे जे पर्याय व स्वातंत्र्य आहे, त्या तुलनेत आपला विषय विस्तार अपुरा आहे. जगात माध्यमिक स्तरावर शिकवले जाणारे काही विषय असे आहेत की त्यांचा आपण विचारही केलेला नाही. उदाहरणार्थ, अभियांत्रिकी शोध, ग्राफिक डिझायनिंग, नर्सिंग, वाहतूक व्यवस्थापन, मरीन इंजीनिअरिंग, क्रीडा वैद्यकशास्त्र, पत्रकारिता व माध्यमविकास, माहिती व तंत्रज्ञान इ. जगात ऑनलाईन होम वर्क, मूल्यांकन वाढते आहे, स्वयंशिक्षणावर मोठा भर आहे. प्रश्नोत्तरांच्या, स्मरणशक्तीच्या पलीकडच्या अध्ययनात प्रकल्प कार्य, निर्मिती, सर्वेक्षण, संग्रहण, पृथक्करण, वर्गीकरण, विश्लेषण यावर भर दिला जात आहे. आपण वस्तुनिष्ठ कसोट्यातच गुंतून आहोत. आपली परीक्षा स्मरण समर्पित आहे, ती जीवनलक्ष्यी नाही. त्यामुळे शिक्षण व जीवन (वास्तव) यात आपल्याकडे मोठी दरी आहे. आपण पुरेसे नि पात्र शिक्षक देऊ शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकांचा स्तर जागतिक प्रतवारीत सरासरीच गाठणारा आहे.
या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाचे शैक्षणिक मॉडेल समजून घेणे उपकारक ठरेल. दक्षिण कोरियात बालवाडी शिक्षण ऐच्छिक आहे. लहान मुलं सहाव्या वर्षांपर्यंत घरी ठेवण्यावर तिथे कटाक्ष असतो. मात्र त्यानंतर म्हणजे प्राथमिक शिक्षण मात्र सक्तीचे आहे. प्राथमिक शाळेत इंग्रजी, कला, कोरियन भाषा, गणित, नैतिक शिक्षण, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय, विज्ञान, समाजशास्त्र या सारखे विषय शिकविले जातात. तिथे प्राथमिक शिक्षण सहा वर्षांचे असते. ते बाराव्या वर्षांपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असते. पूर्व माध्यमिक शिक्षण तीन वर्षांचे असते. म्हणजे ते नववीपर्यंत असते. इथे प्रवेश लॉटरी पद्धतीने दिला जातो. प्रवेशाची समान संधी हे तत्त्व अंगिकारले जाते. या स्तरावर शिस्तीस असाधारण महत्त्व दिले जाते. मुले बिघडण्याचे हे वय. तिथेच नागरिकत्वाची घडण योग्य होईल याची दक्षता घेतली जाते. राष्ट्रीय नागरिकत्वाची घडण ते महत्वाची मानतात. इथे काही विषय सक्तीचे असतात. त्यांना ते 'कोअर' (गाभा विषय घटक) मानतात. त्यात इंग्रजी, कोरियन भाषा, गणित, मूलभूत विज्ञान यांचा समावेश असतो. ऐच्छिक विषयात कला, नैतिक शिक्षण, समाजशास्त्र, संगीत, गृहविज्ञान, तंत्रज्ञान आणि चिनी लिपी (Honja) यांचा अंतर्भाव असतो. माध्यमिक शिक्षणही तीन वर्षांचे असते. ते १८ व्या वर्षांपर्यंत (प्रौढ होण्यापूर्वी) पूर्ण करणे अपेक्षित असते. इथे विशेषीकरणावर (Specialization) भर असतो. कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान अशा शाखानिहाय शिक्षणाची (Faculty Education) सोय असते. मुलांचा कल माध्यमिक स्तरावरच निश्चित होतो. इथे गुणवत्ता (Merit) महत्त्वाची ठरते. यानंतर सुमारे २५% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळतात. ७५% विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे (Tertiary) जातात. इथे प्रवेशपरीक्षा (College Scholastic Test) असते. तिच्या आधारे प्रवेश दिला जातो. या स्तरावरचे शिक्षण कोरियात इतके महत्त्वाचे मानले जाते की सारे घरदार यात गुंतून राहते. ते इतके की या परीक्षांच्या काळात साऱ्या देशाचे उद्योग, व्यापार, बँक, वाहतूक, कार्यालये, शाळांच्या वेळापत्रक परीक्षांवर ठरते. परीक्षा काळात कार्यालये अर्धवेळ चालतात. यावरून देश उच्च शिक्षणास किती महत्त्व देतो ते स्पष्ट होते.
शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित करणारी एक संस्था आहे. प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट, 'पिसा' नावाने ती जगभर परिचित आहे, ती विद्यार्थ्यांच्या सार्वमताच्या आधारे तसेच अन्य अनेक परिमाणांवर विचार करून दर्जा ठरवते. तिने दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ७३ देशांची यादी निश्चित केली असून त्यात भारताचा क्रमांक ७१ आहे. म्हणजे शेवटून तिसरा आहे. याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. (www.quora.com) आपल्याकडे शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर असलेले गळतीचे प्रमाण (शिक्षण सोडण्याचे) मोठे आहे. त्याची अनेक कारणे आहेत. गरिबी, साधन अभाव, सुविधा दारिद्र्य, शिक्षण दर्जा, अभ्यासक्रमांची कालबाह्यता, जीवन व शिक्षणातील अंतर अशी ती आहे. सर्वांत लक्षात घेण्याचे महत्त्वाचे कारण शिक्षकांना शिकवण्यात रस नसणे हे आहे. त्याला जबाबदार इथली व्यवस्था आहे. शिक्षणावर होणारा खर्च हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५% ही होत नाही, तो किमान ६% असलाच पाहिजे म्हणून आपण आग्रह धरतो, पण ते मान्य होत नाही. दक्षिण कोरिया शिक्षणावर १५.७७% खर्च करते. (www.tradingeconomics.com / south korea) भारतात राष्ट्रीय स्तरावर शिक्षणविषयक नियोजन व प्रशासनावर विचार करणारे एक स्वतंत्र विद्यापीठच आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन (NUEPA) तिचे नाव. या संस्थेने एप्रिल, २०११ मध्ये माध्यमिक शिक्षणावर एक शोध प्रबंध / अहवाल प्रकाशित केला आहे. 'सेकंडरी एज्युकेशन इन इंडिया : डेव्हलपमेंट पॉलिसीज्, प्रोग्रॅम अँड चॅलेंजिस' या के. बिस्वाल संपादित प्रबंधात स्पष्ट केले आहे की. "India needs to step up investment in pre reform activities for creating a sustainable environment for initiating change; improving political will; introducing strategic management models ensuring continuity in change at the school level; and increasing budgetary allocation to make more inclusive quality secondary education a reality." (www.nuepa.org)(pageviii)
शिक्षण हक्क व सक्तीचे मोफत शिक्षण या दोन राष्ट्रीय निर्णयांमुळे सध्याचे माध्यमिक शिक्षण इयत्ता सहावी ते बारावी असे सात वर्षांचे झाले आहे. ते तीन विभागांत विभाजित झाले आहे - १) पूर्व माध्यमिक (इ. ६ वी ते इ. ८ वी) २) माध्यमिक ( इ. ९ वी ते इ. १० वी) ३) उच्च माध्यमिक ( इ., ११ वी ते इ. १२ वी). हे विभाजन केवळ इयत्तांचे झाले आहे. त्यास कोणताही तार्किक, शैक्षणिक वा वैज्ञानिक आधार, अधिष्ठान नाही. हे विभाजन व्यवस्थेचे आहे,म्हणजे शिक्षक समायोजनाचे आहे. असायला हवे होते शिक्षण समायोजन, पूर्व माध्यमिक व माध्यमिक मिळून एक स्तर केल्याशिवाय आपणास दर्जेदार, उद्देशानुर्ती माध्यमिक शिक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी अशा यांत्रिक पद्धतीने झालेले हे विभाजन शिक्षणाचा दर्जा खालावणारे ठरले तर आश्चर्य वाटायला नको. या विभाजनाची कोणतीही तर्क संगत, शैक्षणिक श्वेतपत्रिका शासनाने प्रकाशित केलेली नाही. त्यामुळे या शिक्षण स्तराची पुनर्रचित आखणी महत्त्वाची आहे. उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर व्यावसायिक शिक्षण देण्याची, कल निश्चितीची कल्पना मोडीत निघाल्यात जमा आहे. जीवन गरजांवर आधारित शिक्षणाचे आकृतिबंध, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शिक्षक पात्रता व प्रशिक्षण, संशोधन यावर जोवर आपण लक्ष केंद्रित करणार नाही, तोवर आपला जगातला क्रमांक शेवटून तिसराच राहणार. माध्यमिक पाठ्यपुस्तके तपभर न बदलण्याच्या आपल्या स्थितीशीलतेस काय म्हणायचे ?
•••
संदर्भ :-
• mhrd.gov.in / rmsa
• www.classhase.com / korea
• Glnd.k12.va.us माध्यमिक शिक्षणाचे जागतिक चित्र
सन २००९ च्या उपलब्ध जागतिक आकडेवारीवरून असे लक्षात येते की प्राथमिक स्तरावरील 'सर्व शिक्षा अभियान' (Education for All) जगभर सक्षमपणे राबविल्याने जागतिक साक्षरता उंचावली. सन १९९९ मध्ये ८४% विद्यार्थीच प्राथमिक शिक्षण घेत होते. दशकभराच्या सातत्यपूर्ण जागतिक प्रयत्नांच्यामुळे हे प्रमाण २००९ मध्ये ९०% करण्यास आपणास यश आले. आपले उद्दिष्ट १००% चे असल्याने मधल्या काळात आपण शालाबाह्य १०% मुलांवर लक्ष केंद्रित केल्याने ९०% चे प्रमाण ९५% पर्यंत आपण करू शकलो असला तरी १००% चे उद्दिष्ट अद्याप आपणाला गाठता आले नाही. २०२० पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्याचा जगाने चंग बांधला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार जगातील १६२ देशांपैकी ९१ देशांतील सर्व मुले आता प्राथमिक स्तराचे शिक्षण पूर्ण केलेली असणार आहेत. विशेष म्हणजे या देशांतील मुला-मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचे प्रमाण समसमान असणार आहे. गमतीची गोष्ट अशी की या ९१ देशांपैकी ४७ देशात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असणार आहे, तर २४ देशांत मुलांचे प्रमाण कमी राहणार आहे. लिंग समानता व लैंगिक विषमता या दोन्ही अंगाने विचार करता हे प्रमाण पूर्वीच्या तुलनेने आशादायक व आश्वासक होते आहे, हे विशेष.
युनेस्को सांख्यिकी संस्थेच्या (UIS) नव्या सूचकांकानुसार (Indicators) प्राथमिक शिक्षणाकडून माध्यमिक शिक्षणाकडे अग्रेसर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मध्यपूर्व युरोप, मध्य आशिया, उत्तर अमेरिका व पश्चिम युरोपातील देशांमध्ये हे प्रमाण ९५% असणार आहे, परंतु दुसरीकडे आफ्रिका खंडातील अविकसित वा विकसनशील देशांत मात्र हे प्रमाण १७% ते ३०% इतके कमी असणार आहे. यातूनही माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याचे जगाचे स्वप्न किती कठीण आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही.
सन १९९९ पासून माध्यमिक शिक्षणाचा प्रचार, प्रसार, आणि प्रमाण जगभर सातत्याने वाढत असले, तरी सार्वत्रिक माध्यमिक शिक्षण (Universalization of Secondary Education) उद्दिष्टापासून ते अद्याप फार दूर आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. निम्मस्तरीय माध्यमिक शिक्षण (इ. ५ वी ते इ. ७ वी) स्तरावर सकल नोंदणी प्रमाण (Gross Enrollment Ratio) ७२% वरून ८०% वर गेले आहे, ही आशादायक गोष्ट आहे. परंतु आफ्रिकी देशातील या स्तराचे हे प्रमाण अद्याप २८% ते ४३% च्या घरात आहे, हे आपणास दुर्लक्षून चालणार नाही. जगातील ८०% देशांमध्ये माध्यमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. (भारताला ही मजल केव्हातरी गाठावीच लागेल.) जगातील एक तृतीयांश देशात निम्नस्तरीय माध्यमिक शिक्षण सक्तीचे करण्याने आपण या स्तरावर ९०% यश कमावू शकलो असलो, तरी ते पुरेसे नाही.
अनेक विकसनशील देशांमध्ये अद्याप उच्च माध्यमिक शिक्षण सक्तीचे नाही. उच्च माध्यमिक शिक्षणाची जागतिक सरासरी ५६% आहे. पण त्यापेक्षा कमी टक्केवारी असलेले देश आहेत, अरब राष्ट्रे - ४८%, दक्षिण व पश्चिम आशिया - ४४%, आफ्रिकी राष्ट्रे - २७%. सन २००९ मध्ये असलेली ही स्थिती. त्यात कालपरत्वे प्रगती झाली आहे. एका गोष्टीची गंभीरपणे आपण नोंद घ्यायला हवी, ती ही की व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असणारा विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या दशकभराच्या कालखंडात (१९९९ ते २००९) कमी होत चालला आहे. त्यातून लक्षात येते की उच्च माध्यमिक स्तरांवरील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा उंचावणे, सदरचे अभ्यासक्रम आधुनिक गरजानुवर्ती व कालसुसंगत करणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य होऊन बसले आहे. अशा अभ्यासक्रमांचे स्वरूप पुस्तकी व पारंपरिक राहिल्याने व त्यामुळे हे हुकमी रोजगार मिळवून देण्याचे माध्यम बनू न शकल्यामुळेही ते विद्यार्थ्यांना आकर्षू शकले नाहीत. सदर अभ्यासक्रमांचे विशेषीकरण (Specialization) होणे जसे अत्यावश्यक आहे, तसे ते समकालीन गरजा, कौशल्ये यांना पूरक होणेही महत्त्वाचे आहे.
माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांतील मुला-मुलींच्या प्रमाणातील विषमता जागतिक चिंता नि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे, ते जगापुढचे आव्हानही बनले आहे. सन १९९९ ते २००९ या दशकात निम्न माध्यमिक स्तरावर पटनोंदणीच्या पातळीवर सन १९९९ ला असलेले मुलींचे प्रमाण ६९% होते. ते २००९ मध्ये ७६% झाले, ही खचितच स्वागतार्ह बाब आहे. अशीच वाढ उच्च माध्यमिक स्तरावर ही जगभर दिसते आहे. या स्तरावरील ४३% चे प्रमाण ५५% पर्यंत वाढविण्यात जगास यश आले आहे. अरब आणि आफ्रिकी राष्ट्रातील मुला-मुलींच्या प्रमाणातील विषमतेची दरी मात्र चिंताजनक आहे. विशेषत: निम्न माध्यमिक स्तरावरची ही विषमता गंभीरपणे नोंद घेण्याची गोष्ट ठरली आहे. युनेस्को ही विषमता दूर व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. पायाभूत इयत्तांमध्ये असलेले हे प्रमाण उच्च माध्यमिक स्तरावरही तसेच राहते, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता, सार्वत्रिक माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट कालबद्ध मर्यादेत पूर्ण करणे अवघड होऊन बसते. ज्या राष्ट्रांमध्ये मुलामुलींचे माध्यमिक स्तरावरील प्रमाण समसमान आहे, अशा प्रगत युरोपीय राष्ट्रांमध्येही ग्रामीण व गरीब समाजात लैंगिक विषमता आढळते, हे वास्तव आहे.
सन १९९० ते २००९ या दोन दशकांच्या कालावधीत जगभर माध्यमिक शिक्षकांच्या संख्येत वाढ दिसून येते ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक प्रमाण आपण राखू शकलो. जगभर असेही दिसून येते की प्राथमिक शिक्षकांच्या तुलनेने माध्यमिक शिक्षकांचे वेतनमान अधिक आहे. शिवाय सुविधा वाढविणारे राहिले आहे. मात्र आफ्रिकी देश यास अद्याप अपवाद आहेत. तिथे सर्व स्तरांवर शिक्षक वेतनमान जागतिक प्रतवारी व प्रमाण पाहता कमी आहे. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील राष्ट्रांमध्ये मात्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनमानात नगण्य अंतर आढळते. याचे सर्वत्र अनुकरण अपेक्षित आहे.
जगामध्ये ७२ दशलक्ष मुले अद्याप शालाबाह्य आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे अग्रक्रमीय कार्यक्रम म्हणून सर्वमान्य झाला आहे. जगात सर्वत्र याबाबत विशेष मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. भारतातही हे प्रयत्न प्राधान्याने होत आहेत. आफ्रिकी राष्ट्रांमध्ये अन्य प्रश्नांप्रमाणे हाही ऐरणीवरचा प्रश्न आहे. अद्याप शाळेतच न गेलेल्या मुलांचा हा 'लक्ष्यगट' जगापुढचे खरे आव्हान आहे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी १९% विद्यार्थी शाळा सोडलेले आहेत तर ८१% मुलांनी अद्याप शाळेचा उंबरा ओलांडलेला नाही.
शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विचार करता असे दिसून येते की सकल घरेलू उत्पादनाच्या (GDP) १.७% प्राथमिक शिक्षणावर खर्च होतात, तर माध्यमिक शिक्षणावर मात्र १.६%. सन २००९ चे हे जागतिक चित्र. यातूनही माध्यमिक शिक्षणाची जगभरची अनास्था अधोरेखित होते. माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चातही जगभर वैविध्य आढळते. कुठे अधिक तर कुठे कमी खर्च होतो. ज्या देशांत माध्यमिक स्तरावरील पटनोंदणी प्रमाण अधिक आहे, तेथील शाळांवर होणारा खर्च प्राथमिक व उच्च शिक्षण खर्च प्रमाण पाहता कमी होतो ही वस्तुस्थिती आहे. यातूनही माध्यमिक स्तराकडे होणारे जागतिक दुर्लक्ष स्पष्ट होते.
या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात माध्यमिक शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरविण्याची, अधिक खर्च करण्याची व अधिक सुधारणा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे येते. प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेली ९५% मुले माध्यमिक स्तरावर प्रवेश घेतात, असे सर्वसाधारण जागतिक चित्र आहे. अविकसित व विकासशील देशात अर्थातच हे प्रमाण वरीलपेक्षा कमी आहे. माध्यमिक शिक्षणासंदर्भातील मागणी व पुरवठा प्रमाण विषम असणे, हाही एक जागतिक चिंतेचा विषय आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
जगातील अनेक देशांत उच्च माध्यमिक शिक्षणाची जी गरज आहे, त्यापेक्षा कमी शाळा, संस्था उपलब्ध होतात असे चित्र आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची वर्तमान काळातील आवश्यकता लक्षात घेता माध्यमिक स्तरांवरील शिक्षणात अत्याधुनिक शैक्षणिक संसाधनांचा वापर होणे, माध्यमिक शाळांतील दैनंदिन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढणे, गुणवत्तावाढीसाठी आवश्यक आहे. समाजाची व जागतिक गरज लक्षात घेऊन मनुष्यबळ विकासाचे साधन व माध्यम म्हणूनही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकडे पाहणे ही आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता माध्यमिक शाळांची जागा, इमारत सुविधा, विद्यार्थी संख्या, व्यावसायिक अभ्यासक्रमांची उपयुक्तता, स्थानिक गरजा, शैक्षणिक साधने व सुविधा, प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक या सर्वच बाबींवर सूक्ष्मपणे व खोलात जाऊन विचार व कृती करण्याची गरज आहे. शाळाबाह्य विद्यार्थी माध्यमिक शाळेत आणण्यासंदर्भात ही भविष्यकाळात कृतिकार्यक्रम आखणे व त्याची अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण करणारे, किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी निर्माण करणे जगाचे उद्दिष्ट बनायला हवे. तसे झाले तरच उच्च माध्यमिक गुणवत्ताप्रधान शिक्षणाद्वारे आपण प्रत्येक देशातील कुशल मनुष्यबळ, प्रशिक्षित युवा पिढी घडवून बेरोजगारीवर मात करू व देशाचा अपेक्षित विकास साधू शकू.
•••
(युनेस्कोद्वारा माध्यमिक शिक्षणासंदर्भात विशेष विचार करून प्रकाशित करण्यात आलेल्या 'ग्लोबल एज्युकेशन डायजेस्ट-२०११' च्या गोषवाऱ्याचा भारत संदर्भित मुक्त अनुवाद.) उच्च माध्यमिक शिक्षण : सर्वाधिक उपेक्षित स्तर
भारतीय शिक्षणात उच्च माध्यमिक शिक्षणाचा विचार पहिल्या पंचवार्षिक योजनेबरोबर सुरू झाला. सन १९५३ च्या माध्यमिक शिक्षण आयोगाने सर्वप्रथम या शिक्षण स्तराची संकल्पना मांडली. पण त्याला बळ मिळाले ते मात्र कोठारी आयोगाच्या अहवालामुळे. या आयोगाने १०+२+३ आकृतिबंध मांडला व तो मान्य करण्यात आला. १९५२ साली तत्कालीन मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या माध्यमिक शिक्षण आयोगाने १९५३ साली सादर केलेल्या अहवालात तत्कालीन माध्यमिक शिक्षणातील दोष स्पष्टपणे अधोरेखित केले होते. त्यानुसार १) ते शिक्षण मर्यादित (Narrow) होते. २) ते पुस्तकी व सैद्धांतिक होते. ३) वर्गातील मुले व शिक्षक प्रमाण व्यस्त होते. ४) कृतिशीलतेचा शिक्षणात अभाव होता. ५) किशोर व युवकांच्या क्षमतांचा विचार नव्हता. ६) तांत्रिक व औद्योगिक शिक्षण नव्हते. ७) परीक्षा केंद्री अभ्यासक्रम होता. या आयोगाने यात सुधारणा सुचवत खालील शिफारशी केल्या. १) शिक्षण समग्रतः अनुभवजन्य असावे. २) अभ्यासक्रमात वैविध्याबरोबर लवचीकता असावी. ३) अभ्यासक्रम समाजानुवर्ती असावा. ४) शिक्षण कृतिशील व आनंददायी असावे. ५) विषय व आशयात समन्वय हवा. या आयोगाने प्रथमच ऐच्छिक विषयाची कल्पना मांडून काही विषय सक्तीचे तर काही ऐच्छिक केले. त्यांनी ऐच्छिक विषयात हस्तव्यवसाय ही एक विद्याशाखा सुचविली होती. त्यात सूतकताई व विणकाम, सुतारकाम, शीटमेटल वर्क, बागकाम, शिवणकाम, मुद्रण, उद्योग शाळा, भरतकाम, मॉडेलिंग याचा समावेश होता. पुढे कोठारी आयोगाने उद्योग शिक्षणार्थ उच्च माध्यमिक स्तराची शिफारस केली. त्यानुसार २ वर्षांच्या उच्च माध्यमिक शिक्षण स्तराचा ५०% अभ्यासक्रम हा व्यावसायिक शिक्षणाचा (Vocational Education) करणे अपेक्षित होते.
नवीन आकृतिबंधानुसार पाचव्या योजना काळात उच्च माध्यमिक स्तर सुरू झाला खरा, पण ५०% व्यावसायिक शिक्षणाला आवश्यक आर्थिक तरतूद करणे शक्य न झाल्याने हा स्तर सामान्य शिक्षणाचा (General Education) होऊन बसला, तो आजअखेर तसाच आहे. नाही म्हणायला काही उच्च माध्यमिक शाळांमधून किमान कौशल्य अभ्यासक्रम सुरू आहेत, पण त्यांची स्थिती आय.टी.आय. पेक्षा वेगळी नाही.
भारतात सन १९९० मध्ये मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर जागतिकीकरणाला गती आली. त्या वेळी या स्तरावर आमूलाग्र बदल अपेक्षित होता. पण त्या वेळी आपण प्राथमिक शिक्षणावर भर दिला. परिणामी आज व्यावसायिक शिक्षण ही उच्च शिक्षणाची मालकी होऊन राहिली आहे. सन २०१४ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार आपल्या देशातील ६४% लोकसंख्येसह २० ते ३५ वयोगटातील म्हणजेच कार्यक्षम वा कार्यरत लोकसंख्या (Working Force) आहे. ती सन २०२० पर्यंत ३० सरासरी वर्षांची होईल. हे मनुष्यबळ अमेरिका व चीनला मागे टाकणारे ठरेल असे असून आपण या कार्यरत लोकसंख्येचे (युवा लोकसंख्येचा) कुशल मनुष्य बळात (Skilled Labor) रूपांतर करू न शकल्याने ही लोकसंख्या आपल्या देशातील बेकारांची फौज झाली आहे. सन १९९० मध्ये युरोपमध्ये असताना मी तेथील उच्च माध्यमिक संस्था (Lycee Schools) पाहिल्या होत्या. त्या शाळात या स्तरावर अनेक प्रकारचे अभ्यासक्रम होते. मला आठवते त्यानुसार स्थापत्य, वैद्यकीय, शेती, शिक्षण, विधी, वाणिज्य, विज्ञान इत्यादी सर्वच विद्याशाखात दोन-तीन वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम करून विद्यार्थी ड्रॉफ्टस्मन, ओव्हरसियर, सुपरवायझर, प्लंबर, कार्पेंटर, गार्डनर, नर्स, प्रयोगशाळा साहाय्यक, प्रोग्रॅमर म्हणून बाहेर पडत. नोकऱ्यांबरोबर स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या शक्यता व क्षमता पाहून मला आपल्या पुस्तकी शिक्षणाचे व्यर्थपण जाणवले होते, आज या घटनेस २५ वर्षे उलटून गेली, तरी आपल्या उच्च माध्यमिक स्तरावर बदल होऊ नये याला काय म्हणावे? मधल्या काळात आपण स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. मुली, युवती मोठ्या संख्येने शिक्षित झाल्या. स्त्री मनुष्य बळ विकासाचे कोणते स्वतंत्र अभ्यासक्रम आपण निर्माण केले? सन १९९६ मध्ये जपानने स्त्री शक्ती विकासाचे धोरण अंगिकारलेले मी अनुभवले आहे, शिक्षित स्त्रियांसाठी घर व नोकरीचा मेळ घालणाऱ्या जपानमध्ये असलेल्या योजना, सवलती देशाचे द्रष्टेपण सिद्ध करणाऱ्या होत्या, एकच उदाहरण सांगतो. नोकरदार स्त्रीस बाळ झाल्यावर ती बाळ शाळेत जाईपर्यंत रजा घेऊ शकते, ती परत नोकरीत येते तेव्हा तिचे सारे पूर्वाधिकार सुरक्षित असतात. (पदोन्नती, पगारवाढ, रजा इ.)
उच्च माध्यमिक अभ्यासक्रम म्हणजे कुशल मनुष्यबळ विकासाच्या शिक्षणाचा कालखंड, देशाला लागणाऱ्या श्रमिक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देऊन तयार करण्याची ही संधी. ती आपण सर्वसाधारण शिक्षण देत बसल्याने गमावतो आहोत. भारतात सन २००० ते २०१२ मध्ये झालेल्या कार्यरत मनुष्यबळाचे क्षेत्रनिहाय परिवर्तन खालीलप्रमाणे आहे -
क्षेत्र | वर्ष २००० | वर्ष २००५ | वर्ष २०१० | वर्ष २०१२ |
---|---|---|---|---|
१) कृषी | ५९.८% | ५५.८% | ५१.१% | ४७.२% |
२) उद्योग | १६.१% | १९.०% | २२.४% | २४.७% |
३) सेवा | २४.१% | २५.२% | २६.५% | २८.१% |
कृषी क्षेत्रातील मनुष्यबळात घट होते आहे. उद्योग व सेवा क्षेत्रातील मागणी वाढते आहे. हे लक्षात घेऊन आपण आपले उच्च माध्यमिक शिक्षण व अभ्यासक्रम आखतो का ?
जगातील कित्येक छोटे देश केवळ कुशल मनुष्यबळावर (Skilled Workforce) बलाढ्य झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत, हे पाहणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य झाले आहे -
देश | कुशल मनुष्यबळ |
---|---|
दक्षिण कोरिया | ९६% |
जपान | ८०% |
जर्मनी | ७५% |
ब्रिटन | ७०% |
भारत | २% |
उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणाबाबत विचार करण्यासाठी नेमलेल्या ईश्वरभाई पटेल समितीने १९७७ साली हे शिक्षण समाजोपयोगी उत्पादक शिक्षण व्हायला पाहिजे म्हणून आग्रह धरत स्पष्ट केले होते की, "Socially Useful Productive Work (SUPW) may be describe as purposive, meaningful, manual work resulting in either goods or services which are useful to community." इतके साधे लक्ष्य पण आपण साध्य करू शकलो नाही, म्हणून भविष्यकाळात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाचा भाग म्हणून (RMSA) उच्च माध्यमिक शिक्षण सार्थक, उत्पादक, कौशल्य केंद्रित करण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी श्रमाला प्रतिष्ठा देण्याची मानसिकता समाजात रुजवणे आवश्यक आहे. भारतीय मानस नोकरी केंद्रित आहे. ते व्यवसाय केंद्रित कसे होईल, ते पाहायला हवे. सामूहिक कार्य संस्कृतीचा संस्कार हे आपल्यापुढील एक नवे आव्हान आहे, सकारात्मक दृष्टिकोनही आज अनिवार्य होऊन बसला आहे. सहकार्य भाव, आज्ञाधारकपणा, कार्यतत्परता (कर्तव्यपरायणता) यांचा अभाव हे कुशल मनुष्यबळ निर्मितीतील अडथळे आहेत. लोकशाही, संघटन, हक्क अशा त्रिस्तरीय प्रक्रियेतून कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती केवळ काल्पनिक ठरेल का अशी शंका वाटावी अशी समाज स्थिती असली तरी तीवर मात करून आपण कुशल मनुष्यबळ विकासाचे लक्ष्य गाठावेच लागेल. त्याला पर्याय नाही. 'मन की बात' व्यक्त करत राहायचं की 'मन की बात' कृतीत आणायची यातला पर्याय निवडायची वेळ येऊन ठेपली आहे, मूलगामी विचार व कृतीचे अद्वैतच भारतीय जनमानसास नवी दिशा देऊ शकेल. त्यासाठी जबाबदारीचे तत्त्व अंगिकारले तरच आपण आपले शिक्षण परिणामकारी करू शकू.
•••
संदर्भ :-
• Global Education Digest-2011 - Unesco.
• National Skill Development Policy-2015 - Govt. of India आंतरराष्ट्रीय दर्जा व महाराष्ट्रातील विद्यापीठे
अशी प्राचीन परंपरा लाभलेल्या नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा विचार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी प्रथम मांडला, त्यास संसदेने मान्यता देऊन सन २०१० मध्ये नालंदा विद्यापीठ विधेयक मंजूर केले. जपान, सिंगापूरने त्यास मोठे अर्थसाहाय्य दिले. त्यातून नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उदयास आले. १ सप्टेंबर, २०१४ रोजी विधिवत हे विद्यापीठ कार्य करू लागले असून नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन या विद्यापीठाचे कुलपती आहेत. इतिहास शासन आणि पर्यावरण असे दोन अधिविभाग विद्यापीठात सुरू झाले असून प्रत्येक अधिविभागात पंधरा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार भारतीय उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चिंतेतून पुढे आला. प्रतिवर्षी जगातील पहिल्या १०० गुणवत्ताप्रधान विद्यापीठाची यादी इंग्लंडच्या 'टाइम्स' मार्फत प्रकाशित होते, ती थॉमसन रिचर्सच्या परिमाणांच्या आधारे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठास हा मान वर्षानुवर्षे मिळत आला आहे. या यादीत जगातील छोट्या राष्ट्रांची विद्यापीठे असतात, पण भारतची त्यात असत नाहीत अशी चिंता विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सतत व्यक्त करत असतात.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ११२३.७ लक्ष इतकी आहे. साक्षरतेचे प्रमाण ८२.३% आहे, उच्च शिक्षणाचा वयोगट १८ ते २३ वर्षे मानला जातो. त्यानुसार १३४.७ लक्ष युवक उच्चशिक्षित असणे अपेक्षित आहे. लोकसंख्येच्या २७.६% युवकांपैकी अवघे १०.६% युवकच महाराष्ट्रात पदवी व उच्च शिक्षण घेतात.
महाराष्ट्रात १८ सार्वजनिक (शासकीय) विद्यापीठे, १४ खासगी अभिमत विद्यापीठे, ७ शासकीय अभिमत विद्यापीठे, राष्ट्रीय शिक्षण संस्था-३, केंद्रीय विद्यापीठ-१, मुक्त विद्यापीठ-१ अशा एकूण ४४ विद्यापीठीय दर्जाच्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यात वैद्यकीय ६, तंत्रज्ञान-४, कृषी-४ तर सर्वसाधारण शिक्षण देणाऱ्या ३० विद्यापीठांचे वर्गीकरण पाहता अजून आपण पारंपरिक व सर्वसाधारण शिक्षण (कला, वाणिज्य, विज्ञान) यातच अडकून आहोत हे स्पष्ट होते. पदवी शिक्षणाचा विचार करायचे झाले तर राज्यात ४५१२ संलग्न महाविद्यालये असून त्यात ३२.३३ लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी २८% महाविद्यालये शासकीय असून ४५% खासगी विनाअनुदानित तर २६% खासगी अनुदानित आहे. राज्यात ७८% विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात तर अवघे ११.४% विद्यार्थी विद्यापीठ शिक्षणापर्यंत पोहोचतात. साहाय्यक प्राध्यापक ६१% तर प्राध्यापक दर्जाचे शिक्षक अवघे ११% आहेत.
उच्च शिक्षणात आपण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत का पोहोचू शकत नाही तर त्याचे वास्तव इथल्या रचनेत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, नाशिक, जळगाव इथली शासकीय सार्वजनिक विद्यापीठे सर्वार्थाने पारंपरिकच राहिली आहेत. शासकीय अनुदानावर पोसल्या जाणाऱ्या या विद्यापीठात संशोधन, पेटंट, प्रकाशन, उत्पादनाच्या ऊर्जा अभावाने आढळतात. लोकशाही प्रशासन हे इथल्या दर्जाचे एक वास्तव आहे. या सर्व विद्यापीठांचे प्रमुख राज्यपाल असतात. त्यांच्या नियुक्त्या शैक्षणिक न राहता राजकीय असल्याने ते पक्षीय व पक्षबांधील असतात, ते पारंपरिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करतात. ती निवड राज्य सरकारशी सल्लामसलत होऊन त्यांच्याच शिफारशीने होते. त्यामुळे गुणवत्ता, विद्वत्ता या निकषांपेक्षा पक्षीय संबंध, लागेबांधे, पुरस्कर्ते यांचीच निवड कुलगुरूपदी होते, हे आता लपून राहिले नाही. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या नियुक्तीतही राजकीय पाझर आता सुरू झाला आहे. विद्यापीठातील अधिविभाग, व्यवस्थापन परिषदा, सिनेट, विद्यापरिषद, अभ्यासमंडळे यातील नियुक्त्या, निवड ही लोकशाही पद्धतीने होत असल्याने तिथेही गुणवत्ता, विद्वत्ता, स्वतंत्र बाणा याला फार कमी वाव राहिला आहे. शैक्षणिक पात्रता ही किमान गुणवत्ता होय. ती अर्हता असते, संशोधन, पेटंट, ज्ञाननिर्मिती, लेखन, अध्यापन यांत बुद्धिप्रामाण्य, प्रज्ञा, नवज्ञान, प्रतिभा, शोधवृत्ती, व्यासंग, आंतरराष्ट्रीय भान, दर्जा इ. निकषांवर वरील निवड, नियुक्त्यांचा अभ्यास केला असता, जे हाती येईल तो निष्कर्ष आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संदर्भात काय संदेश देतो हे पाहणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील विद्यापीठांचा दर्जा राष्ट्रीय मानांकन परिषद (नॅक) ठरवते. महाराष्ट्रातील वरील शासकीय, सार्वजनिक, पारंपरिक विद्यापीठे 'अ' आणि 'ब' दर्जाची असली, तरी महाराष्ट्रातील इंदिरा गांधी राष्ट्रीय संस्था, मुंबईचा 'अ++' हा दर्जा ती गाठू शकलेली नाहीत. ही झाली राष्ट्रीय गुणवत्तेची स्थिती. थॉमसन रिचर्स, टाइम्स, एनएफएसएसारख्या संस्था विद्यापीठांची आंतरराष्ट्रीय मानांकने कशाच्या आधारे निश्चित करतात ते समजून घेणे आवश्यक आहे.
अनुदान/अर्थसाहाय्य
उच्च शिक्षण संस्थांचा विकास, स्थैर्य, आस्थापना, सुविधा या सर्व गोष्टी अर्थसाहाय्यावर अवलंबून असतात. त्याला आंतरराष्ट्रीय मानांकनात ४१% गुण दिले जातात. आपल्याकडे शासन पंचवार्षिक योजनेतून उपलब्ध साहाय्य हप्त्या-हप्त्याने देत असल्याने विकासही हप्त्यानेच होतो व त्याची प्रतीक्षा करावी लागते. उलट विद्यापीठ अनुदान आयोग गतीने निधी देते. आज उच्च शिक्षणाचा जो विकास दिसतो तो त्या स्वतंत्र, स्वायत्त संस्थेमुळे. आपली विद्यापीठे दर्जाने स्वायत्त असली तरी तिचे प्रशासन शासन निर्भर आहे व ते दिवसेंदिवस सरकारी होत आहे. राज्य शासनाचा कल खासगी व स्वयं अर्थशासित शिक्षण संस्था विकासाचा असल्याने पारंपरिक विद्यापीठांना मुक्तहस्ते अर्थसाहाय्याची शासकीय मानसिकता व उदारता दिसत नाही.
शिक्षक वेतन/योग्यता
शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय दर्जा ठरवत असताना शिक्षकाची अर्हता, योगदान, संशोधन, लेखन, निर्मिती, योगदान याचा विचार करून वेतन निश्चितीच्या दर्जावर परिमाण (Standard) निश्चित केले जाते. मूल्यांकनात ह्याचे महत्त्व ३६% इतके असते. आपल्याकडे पदनिर्मिती, पदभरती, आरक्षण, भरती बंदी, तासिका दरावर, करार पद्धतीने नियुक्त्या या साऱ्यांची कसरत करत शिक्षक नियुक्त्या होत असतात. पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. महाविद्यालयीन पातळीवर शिक्षक नियुक्ती व लिलाव पद्धती आता जगजाहीर आहे, उच्च शिक्षणातील नियुक्त्या केवळ शैक्षणिक गुणवत्ता, व्यासंग, योगदान, निर्मिती क्षमता, ज्ञान इ. निकषांवर व निमंत्रण, निवड इ. पद्धतीने होणे न्यायसंगत असते. आंतरराष्ट्रीय शिक्षणात कोण शिकवतात ते पाहून विद्यार्थी विषय, अभ्यासक्रम निवडतात. आपणाकडे असे दृश्य नाही. वेतन समाधानकारक असले तरी ते आंतरराष्ट्रीय परिमाणांचे नाही.
संशोधन खर्च
विद्यापीठे संशोधनावर किती खर्च, गुंतवणूक करतात यालाही ३६% महत्त्व देण्यात येते. संशोधन दर्जा, उपयुक्तता, नवता, निर्मिती, ज्ञानात भर या सर्वांचा विचार करून संशोधनावर होणारा खर्च, अभ्यासक्रमातील त्याचे महत्त्व, प्रकाशन, आंतरराष्ट्रीय मान्यता, वापर हे निकष महत्त्वाचे मानले जातात. आपले संशोधन नोकरीची पात्रता, पदोन्नती, वेतनवृद्धी यांना लक्ष्य करून होत असल्याने त्यांची स्वत:ची म्हणून एक मर्यादा तयार होते. शिवाय कागदी, सैद्धांतिक, तार्किक संशोधनावर भर असल्याने जीवनलक्ष्यी व जीवनोपयोगी कसोट्यांवर ते कुचकामी ठरते.
पेटंट
संशोधनातून हाती आलेल्या व्यवच्छेदक ज्ञान, साधनांवर एकाधिकार ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट खरी. पण आपल्या विद्यापीठातून त्यांचा अपवाद विचारही आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जा नसण्याचे प्रमुख कारण होय. मानांकन
शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाबाबत जागतिक एकमान्यता नसली, तरी 'टाइम्स', थॉमसन रिचर्सची परिमाणे प्रमाण मानली जातात. त्या निकषांत सांख्यिकी माहिती, नोंदणीत (प्रवेश) नित्यवाढ, अभ्यासक्रमांची प्रसंगोचितता, समकालिकता, विद्यार्थी गरज, सुविधा, नावीन्य, संरचना, मूल्यमापन या निकषांच्या संदर्भात जगाच्या आपण फार मागे आहोत हे मात्र खरे.
संकीर्ण
या शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जा ठरवताना संशोधन फलनिष्पत्तीस (Output)-१८%, पदवीधारक प्रमाण (निकाल)-१४%, देणगी (जनसहभाग)-१४%, नोंदणी (प्रवेश) प्रमाणे-९%, शिक्षक प्रतिष्ठा/परंपरा-९% यांना इतके महत्त्व (Weightage) दिले जाते.
वरील सर्व निकषांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ नित्य उच्च आंतरराष्ट्रीय मानांकन का मिळवत आले आहे, याचा विचार करता असे दिसून येते की ते विद्यापीठ आपल्या अधिविभागात (School/ Department) मध्ये शिक्षक नेमताना त्या विषयातला जगातला श्रेष्ठ शिक्षक निवडते. विद्यापीठात इतके विषय, अभ्यासक्रम असतात की विद्यार्थ्यास आपल्या आवड, कल, वृत्तीनुसार शिक्षण निवडीचे स्वातंत्र्य मिळते, शिवाय ते विद्यापीठ विद्यार्थ्यांना काय पाहिजे (Want) पेक्षा काय देणे गरजेचे (Need) याचा निरंतर विचार करून अभ्यासक्रम ठरवते. विद्यापीठातील शैक्षणिक सुविधा, वातावरण हे विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास, निसर्ग, सौंदर्य, मनोरंजन, संशोधन, निवास, भोजन इ. सुविधा केंद्री असते. विद्यार्थी नेतृत्व गुणास वाव असतो. ग्रंथालय, प्रयोगशाळा, साधने इत्यादी सतत अत्याधुनिक असण्यावर, कटाक्ष असतो. धर्म, प्रांत, लिंग, संस्कृती, वंश यांचा विचार न करता दिल्या गेलेल्या प्रवेशामुळे सर्व देशातील श्रेष्ठ विद्यार्थी इथे प्रवेश घेतात. प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होताच जगातील श्रेष्ठ स्थानांवर नियुक्ती होते. 'निवडक निवड' तत्त्व सर्वच स्तरावर पाळल्यामुळे या विद्यापीठाचे ४६ विद्यार्थी नोबेलधारक तर ४९ पुलित्झरधारक होतात. जगातील सर्वाधिक पेटंट सर्वश्रेष्ठ संशोधन होते ते याच विद्यापीठातून.
आपली पारंपरिक व शासकीय विद्यापीठे असोत वा नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वा देशात नव्याने सुरू झालेली केंद्रीय विद्यापीठे असोत, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची ठरायची तर विद्यार्थी, शिक्षक, संशोधन, अभ्यासक्रम, सुविधा, प्रशासन, अर्थसाहाय्य सर्वच पातळीवर आपणास नवी कार्यपद्धती, निवड, नियुक्ती, मानांकन पद्धती अंगिकारावी लागेल. अन्यथा पांढरा हत्ती पोसत राहणेच आपले कार्य होऊन राहील. शिक्षणाचा प्राथमिक, माध्यमिक विस्तार सर्व शिक्षा अभियान करून आता आपण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडे (रूसा) अग्रेसर होत असताना आंतरराष्ट्रीय मानांकनाचे भान ठेवले पाहिजे.
•••
भारतीय उच्च शिक्षणापुढील वर्तमान आव्हान खरे तर न उचलता येणारे शिवधनुष्य खरे, पण केव्हा तरी ते आपणास उचलले पाहिजे, याची जाणीव आता आपल्या देशास तीव्रतेने झालेली दिसते. कारण सिंगापूर, फिनलंड, दक्षिण कोरिया, स्विट्झर्लंडसारखे छोटे देश जर उच्च शिक्षणात जागतिक क्रमवारीत आघाडी घेत असतील तर खंडप्राय भारत देशास स्वस्थ बसून कसे चालेल? आपल्याकडे शिक्षण विस्तारात गती असली, तरी गुणवत्ता विकासात आपण मागे आहोत, कारण संशोधन, नवोपक्रमशीलता हे आपल्या शिक्षणाचे नर्मबिंदू (Weak Points) होत. अपरिवर्तनीय अभ्यासक्रम, किचकट संलग्नता, मान्यता, समकक्षता प्रक्रिया हेही आपल्या शैक्षणिक प्रशासनातील दोष होत. उच्च शिक्षणातील खासगी गुंतवणूक अल्प असणे हेही उच्च शिक्षण विकासाच्या धीम्या गतीचे कारण होय. या संदर्भात अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ आपण अभ्यासायला हवे. पूर्ण स्वयं अर्थशासित हे विद्यापीठ जागतिक क्रमवारीत गेली अनेक वर्षे सतत अव्वल राहात आले आहे.
भारतीय उच्च शिक्षणासंदर्भात अधिकृत सांख्यिकी माहितीचा अभाव, हेही उच्च शिक्षणाची प्रगती मंद असण्याचे एक प्रमुख कारण आहे. कारण असे की नियोजनातील काटेकोरपणा हा सांख्यिकी माहितीच्या पायावर उभा असतो. ती माहिती नेमकी हवी. आपल्या उच्च शिक्षणविषयक केंद्र सरकारच्या धोरणातील ताठरपणा ही आपल्या शिक्षण प्रगतीतील धोंड होय. अलीकडे आपण नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करून त्याचे कुलगुरूपद नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्यसेन यांना दिले होते. इथल्या लालफितीच्या कारभाराला कंटाळून त्यांनी मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ऐकून आश्चर्य वाटले नव्हते.
या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जगभर चालणाच्या उलथापालथी आपण समजून घ्यायला हव्यात. त्यापासून आपणास भरपूर शिकता येणे शक्य आहे. जगातील अनेक देशांतील आर्थिक क्षेत्राबरोबरीने शिक्षणाच्या क्षेत्रातही मुक्त वा उदारीकरणाचे धोरण अंगीकारलेले दिसते. मुक्त व्यापार, गुंतवणूक यांचा संबंध अनेक देशांत उच्च शिक्षण विस्तार आणि विकासाशी जोडल्याचे लक्षात येते. त्यामुळे मोठ्या संख्येने परदेशात मुले शिकतात. त्यातून त्या देशांना उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळ आपोआप प्राप्त होते. कार्य परवाना (Work Permit), नागरिकत्व (Citizenship), परवाने (Licence) याबाबतची लवचिकता हेही तेथील उच्च शिक्षण विकासाचे कारण होय. अमेरिका याचे उत्तम उदाहरण होय. जगातील अनेक देश आपले उच्च शिक्षण जागतिक दर्जाचे व जागतिक मागणीचे ठरावे म्हणून आपले शिक्षण विकास धोरण लवचीक व उदार बनवत चालले आहेत. आदर्शाच्या हटवादीपणापेक्षा उपयुक्ततेचे लवचीक धोरणच शाश्वत विकास घडवून आणते, हे त्यांनी अनुभवाने सिद्ध केले आहे. अमेरिका, इंग्लंड, चीनसारख्या देशांनी या आधारे उच्च शिक्षण विकासात मुसंडी मारली आहे.
अमेरिकेची उच्च शिक्षणातील वाढती गुंतवणूक, चीनची शिक्षणविषयक उदारतेची वाढती धोरणे, इंग्लंडची शिक्षणातील वाढती लवचीकता यांचा लाभ त्या त्या देशातील उच्च शिक्षण गतिमान होण्यात झाला आहे. चीनने तर शिक्षणाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र खुले केले आहे, अमेरिकेने तर सन २००५ मध्येच उच्च शिक्षण आयोग स्थापून उच्च शिक्षणाचे भविष्यलक्ष्यी धोरण अंगीकारण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च शिक्षणात अमेरिका सतत अव्वल ठेवण्याची जबाबदारीही त्या आयोगावर आहे, हे विशेष. अमेरिकेने उच्च शिक्षणात येत्या दशकात १३४ शतलक्ष (कोटी) डॉलर्स ची गुंतवणूक करायचे ठरवून देश विकासात उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. इंग्लंड त्या मानाने मागे आहे, कारण तिथे शिक्षण अजून शासकीय राहिले असून सार्वजनिक वा खासगी गुंतवणूकीस भरपूर वाव आहे. सन १९७८ पासून चीनने विपणन केंद्रित अर्थनीती (Marketable Economy) चे धोरण स्वीकारले असल्याने तेच धोरण त्यांनी शिक्षणासही लागू केल्याने तेथील उद्योग, व्यापाराबरोबर उच्च शिक्षणातही क्रांतिकारी बदल घडून आले आहेत.
भारतात शिक्षणाच्या खासगीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसते. खासगी विद्यापीठांना परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय विद्यापीठांची स्थापना होते आहे. शिवाय केंद्र, राज्य सरकारांची उच्च शिक्षणावरील तरतूद ही नित्य वाढते आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय शिक्षण संस्था या सर्वांच्या प्रयत्नांतून उच्च शिक्षण विस्तारले आहे, पण गुणात्मक दर्जा आपणास अद्याप उंचावता आलेला नाही. शिक्षण क्षेत्रातील व विशेषतः शिक्षकांत कार्यसंस्कृतीचा अभाव, समर्पण वृत्तीची कमतरता, नव शिक्षणातील सातत्याचा अभाव, संशोधन वृत्ती नसणे, वाचन लेखन व्यासंगाची कमतरता अशी त्याची अनेक कारणे अशी आहेत तशी शिक्षण संस्थांची कार्यपद्धती, शिथिलता हेही त्याचे एक मोठे कारण आहे. शासकीय नियंत्रणाचा अभाव हे पण महत्त्वाचे कारण म्हणून नोंदवता येईल.
भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानने एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात उच्च शिक्षण विकासार्थ जे धडाडीचे व धाडसी निर्णय घेतले, त्यातून भारतास बरेच शिकण्यासारखे आहे. भारताप्रमाणे पाकिस्तानातही विद्यापीठ अनुदान आयोग होता. त्याची अकार्यक्षमता पाहून ते मंडळ पाकिस्तानने बरखास्त केले. त्या जागी उच्च शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. त्या आयोगास ३.८ शतलक्ष रुपयांचा निधी दिला. प्राध्यापकांचे वेतनमान उंचावले, संशोधनकाची प्रतिष्ठा वाढवली, गुणवत्ता विकास साध्य करण्यासाठी परिणामकेंद्री कार्यक्षमता मापनाचे धोरण राबविले.
भारताने अलीकडे उच्च शिक्षण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे, त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपल्या देशास कुशल, उच्चशिक्षित मनुष्यबळाची जितकी गरज आहे, त्यामानाने तरुण शिक्षित तयार होत नाहीत. खासगी शिक्षणातील व्यावसायिक शिक्षणात जिथे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे लक्ष्य असते, अशा संस्थांत सरकारी धोरण हस्तक्षेप, आरक्षण नीती, प्रशासनिक दिरंगाई इ. अनेक कारणांमुळे गुंतागुंत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात सातत्यपूर्ण वा शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. तरुण लोकसंख्येचा वाढता रेटा सहन करण्याची क्षमता विद्यमान उच्च शिक्षणात नसणेही महत्त्वाचे कारण आहे. उच्च शिक्षणात अभियांत्रिकी, वैद्यक, शिक्षण या क्षेत्रात 'मागणी व पुरवठा' धोरणाचा अभाव असल्याने भरमसाठ संस्थांना मान्यता देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे उच्च शिक्षणापुढे काही यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत. खासगी संस्थांना शैक्षणिक शुल्क ठरविण्याच्या दिलेल्या अधिकारामुळे, सुविधा व शुल्कवाढ यात विषमता असल्याने शिवाय गरजेपेक्षा अधिक पदवीधर निर्माण केल्यामुळे बेरोजगारी, संस्थांत जागा रिक्त राहणे, प्रशिक्षित व पात्र प्राध्यापक न मिळणे या सर्वांतून उच्च शिक्षणापुढे असलेले प्रश्नचिन्ह रोज दैत्यरूप घेते आहे.
वर्तमान भारतीय लोकसंख्येचे देशास एक वरदान आहे. पुढील काही वर्षे भारत हा जगातील तरुण लाकसंख्येचे आधिक्य असलेला देश राहणार आहे. आपण धोरण ठरवून कार्य करू शकू तर जगास शिक्षित, कुशल मनुष्यबळ पुरवू शकू, देशांतर्गत उद्योग, व्यापार, व्यवसाय, सेवा, वाहतूक, पर्यटन, शिक्षण, संशोधन, श्रमिक गरज इत्यादी क्षेत्रांत गतिशील विकासाद्वारे अर्थविकासाची शक्यता, संभाव्यता मोठी आहे. पण नियोजन अभाव, अपुरी गुंतवूणक यामुळे लोकसंख्येचा महापूर जिरता न राहता वाहात राहून वाया जाण्याचीच शक्यता जास्त दिसते. नवे सरकार घोषणाबाजीत अडकल्याने कार्यक्षम प्रशासनाची वानवा हे आपले वैगुण्य ठरत आहे. जोडीला भ्रष्टाचार, दिरंगाई, कार्यसंस्कृतीचा अभाव ही आपली पारंपरिक अपत्ये अद्याप समाजातील अढळपद सोडायला तयार नाहीत. त्यामुळे सिंगापूर, जपान, फिनलंड, दक्षिण कोरियासारखे द्वीपदेश खंडप्राय भारतापुढील अनुकरणीय आदर्श व आव्हान ठरत आहेत. प्रवेश, समान शिक्षण, समाज व आर्थिक स्थित्यंतर, अभ्यासक्रमात नवता यामुळेच आपण भारतातील विद्यमान उच्च शिक्षणाचा चेहरा-मोहरा बदलू शकू. पण त्यासाठी आवश्यक बांधिलकीची भावना न शासनात आहे, न शिक्षण क्षेत्रात.
"Education is a powerful catalyst for development. It significantly affects other sectors and vice versa." हे लक्षात घेऊन आपण देशाच्या प्रगतीचा आलेख आखताना, त्यात उच्च शिक्षणास असाधारण महत्त्व व प्राधान्य द्यायला हवे.
•••
संदर्भ :-
• Envisioning Education in the Post-2015-Unesco
• Indian Higher Edcuation : Envisioning the future. -Pawan Agarwal. नव्या स्त्रीचे नवे शिक्षण
एकविसाव्या शतकात जागतिकीकरणामुळे स्त्री विकास झपाट्याने होतो आहे. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात चूल आणि मूल असे असलेले स्त्री रूप बदलते आहे. स्त्री शिक्षण म्हणजे बाल संगोपन, गृह दक्षता, पाककला, शुश्रूषा, कलाकुसर निपुणता अशी कल्पना होती. स्त्री पत्नी, माता, गृहिणी, सखी, सोबती असे सूत्र होते. आता स्त्री साक्षर, शिक्षित, उच्च विद्याविभूषित, कमावती, पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आघाडी घेणारी स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची सबला बनते आहे. त्यामुळे स्त्री शिक्षणाच्या संकल्पनेतही झपाट्याने बदल घडून येत आहेत. क्षमता, कौशल्य, प्रक्रिया, विचार, नवता, संवेदना, संवाद, साधने, संबंध, सामूहिकता, सामाजिकता, स्वास्थ्य अशा अनेक निकषांवर तिच्या स्वत:च्या अपेक्षा व आकांक्षा जशा वाढत आहेत तशास समाज गरजाही. म्हणून एकविसाव्या शतकातील नव्या स्त्रिचे शिक्षणही नवे असले पाहिजे अशी मागणी जगभर जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जगातील नवे स्त्री शिक्षण नवसंकल्पना व नवक्षमता कौशल्यांचा वेध घेत स्त्रिस नवसंजीवनी देण्याची मनीषा बाळगून आहे.
नव क्षमता विकास
वर्तमानात स्त्री शिक्षणाचा विचार करताना तिचे बहुविध रूप लक्षात घ्यायला हवे. पूर्वी तिला केवळ घर सांभाळावे लागे. आता तिचे स्वत:चे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, स्वतंत्र व्यक्ती, नोकरी/व्यवसाय, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी यांचे संदर्भात स्त्री शिक्षण विचारात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे अशा शिक्षणाची रचना हवी जेणेकरून तिला साक्षर करून भागणार नाही तर ती सक्षमही हवी. ही सक्षमता बहुविध क्षमतांनी युक्त हवी. लेखन, वाचन, व्यवहार, संवाद, संपर्क, सामाजिकता, नेतृत्व, नवता, विज्ञान, 'अर्थार्जन' अशा अंगांनी तिच्या क्षमता विकसित होतील असे विविध शाखांच्या शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून देणे अनिवार्य झाले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात समान क्षमता विकासाचे शिक्षण धोरण हवे.
स्वयंशिक्षण
शिक्षण म्हणजे घोकंपट्टी नव्हे. ते माहिती संग्रहणही नाही. शिक्षण म्हणजे व्यक्ती विकास. हे एकदा मान्य केले की स्त्रिची मनुष्य म्हणून घडण होणे अपेक्षित ठरते. मग स्त्रिस पुरुषांच्या ओंजळीने पाणी न पिता स्वप्रज्ञतेने, स्वतंत्रतेने, स्वावलंबनाने शिक्षण घेण्याचे मुभा व संधी देणे हे सरकार, समाज, कुटुंब व पालकांचे कर्तव्य ठरते. शिवाय स्त्रिनेही स्वत:च्या आशा, आकांक्षा, स्वप्ने, विचारानुरूप संधीचा शोध घेत स्वत:ला विकसित करत राहिले पाहिजे. त्यासाठी स्वयंशिक्षण (Self Education) अथवा शिकायला शिकणे (Learning to Learn) सारख्या संकल्पनांचा अंगीकार स्वत:स्त्रीने आत्मसात करायला हवा.
आजीवन शिक्षण
शिक्षण ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी एक निरंतर विकास प्रक्रिया आहे, हे एकदा मान्य केले की स्त्रिने जीवनभर शिकत राहणे ओघाने आलेच, पूर्वी केवळ साक्षरतेने भागायचे. नंतर पदवीधर होण्यात समाधान व्हायचे. आता स्पर्धेचे युग आहे. शिवाय जीवन क्षणोक्षणी बदलते आहे, रोज जगण्याची नवी आव्हाने उभी ठाकताहेत, या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी निरंतर कौशल्य व क्षमता विकासाने स्वत:स स्वप्रज्ञ व स्वावलंबी बनवत रहायला हवे. यातूनच तिची पुरुष पराधीनता संपणार आहे.
चिकित्सक विचारशीलता
'बाबा वाक्यं प्रमाणम्'चा जसा काळ संपला तसे पुरुषशरणतेचा युगही संपायला हवे. ते स्वतंत्र बुद्धीने स्त्री विकास होण्यानेच शक्य आहे. म्हणून स्त्री शिक्षणाचा विचार करता स्त्रित चिकित्सक विचारबुद्धी विकसित करण्यावर येथून पुढच्या शिक्षणात भर हवा का ? कसे ? जसे आवश्यक तसे असे का नाही ? अशी विचारणाही स्त्री करायला लागेल तेव्हाच ती दुय्यम दर्जाच्या मनुष्य जीवनातून मुक्त होऊन स्वतंत्र होईल. जात, धर्म, परंपरा, लिंग यांच्या दमन व जाचातून तिला आता कोणी समाजसुधारक, प्रेषित येऊन मुक्त करेल अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे मृगजळामागे धावणे ठरेल. मीच माझी शिल्पकार म्हणत जेव्हा ती शोधक, चिकित्सक वृत्तीने आत्मस्वरामागे धावेल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र मनुष्य बनेल. तसे शिक्षण हे बुद्धिप्रमाण, वैज्ञानिक, तंत्रकुशल आरखड्यातूनच शक्य आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकातील शिक्षणाचा आकृतीबंध गुलामीस शह देत स्वप्रज्ञतेला साद घालणारा हवा.
नवतेचे अनुसरण
नवता, नव आविष्करण, नव साधन विकास, नव तंत्रज्ञान हेच नव्या काळाची ओळख बनते आहे, त्यामुळे स्त्रिने नवतेचे (Innovation) वेड स्वत:ला लावून घेतले पाहिजे. ती स्वावलंबी बनायची, तिची बहुविध जबाबदारीतून मुक्ती व्हायची तर काळ, काम, वेगाचे तिचे असे नव गणित, नव व्यवस्थापन, वेळ नियोजन तिनेच करायला हवे. नव्या शिक्षणात स्त्रिचा नवा अवकाश वेध घेणारा अवसर हवा. स्वयंपाकगृह, शयनगृह, माजघरापलीकडे तिची स्वतंत्र खोली/दालन (Room of One's) घरात ज्या दिवशी निर्माण होईल तेव्हाच जीवनात तिचा स्वत:चा अवकाश (Space) निर्माण होईल. कुटुंब, मुले, पती यांच्यासाठी तर जगायचे आहेच पण स्वत:च्या इच्छा, आकांक्षांना महत्त्व व अवसर देत समाज विकास करायचा तर स्त्रिने नवतेचा, नव आविष्करण व अनुसरणाचा छंद जोपासायला हवा. शिक्षणाने तिला हे शिकवले तरच ती घराच्या घरघरीतून मुक्त होऊन स्वचित्त होईल.
संवेदना सूचकांक
संवेदना, भावना यांचे आणि स्त्रिचे अद्वैत पारंपरिक आहे. त्याला जीवशास्त्रीय आधार व अधिष्ठान आहे. कधी काळी माणसाचे मूल्य हे बुद्ध्यांकावर मोजले, तोलले जायचे. मनुष्य जसा यंत्र बनत चालला तसा बुद्ध्यांकाबरोबर त्याचा भावनिक सूचकांक (Emotional Quotient) महत्त्वाचा बनला. तरलता ही स्त्रिची उपजत देणगी आहे. तिचं हे बलस्थान शिक्षणाद्वारे विकसित होईल तर जग भविष्यातील अनेक संकटातून वाचेल. म्हणून शिक्षणात स्त्रिच्या संवेदना सूचकांकाचा विचार होणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. स्त्रिच्या संवेदनशीलतेवर घराचे घरपण, समाजाची एकता व राष्ट्रीय ऐक्य अवलंबून असते, हेही या संदर्भात आपण लक्षात घ्यायला हवे.
संवाद कौशल्य
जागतिकीकरणाने तंत्रज्ञान युगाचे वरदान दिले. त्यामुळे हितगुज ही कौटुंबिक गरज न राहता वैश्विक आवश्यकता बनली. स्त्रिचे वाढते समाज संपर्क, वावर, व्यवहार यात अबोल स्त्रीचे रुपडे मागे पडून ती संवादिनी, समुपदेशक, सल्लागार, सहयोगी बनत विकसित होते आहे. कधी काळी साहाय्यक स्त्री आता नेतृत्व, निर्माती, सर्जक होत आपली हुकमती मुद्रा समाजमनावर उठवते आहे. अशा काळात माहिती, तंत्रज्ञान, पर्यटन, मनुष्यविकास, व्यवस्थापन, बँकिंग, विमा, संशोधन, प्रवास, शिक्षण, आरोग्य सर्वच क्षेत्रात तिला संवादी कौशल्य अनिवार्य झाल्याने स्त्री शिक्षणात संवादाचे महत्त्व अधोरेखित होत अग्रगामी, अग्रणी होते आहे. 'बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, न बोलणाऱ्याचे मोती विकले जाणे दुर्लभ' असे सिद्ध करणाच्या या काळात स्त्रिस मूकदर्शक न राहता ध्वनिवर्धक बनणे काळाची गरज बनली आहे. उद्घोषणा, स्वागत अशी क्षेत्रे मागे पडून मध्यस्थ, सल्लागार, मार्गदर्शक अशा स्त्री प्रतिमा व प्रतिभांचे हे युग आहे.
संबंध वर्धन
नव्या काळात स्त्रिचे बहुरूपी व्यक्तिमत्त्व तिला विविध संबंधांचा दुवा बनवत समाज, कुटुंब जीवनात ती अधिकारिणी बनते आहे. तिच्या या नव्या भूमिकेला वाव देणारे स्त्री शिक्षण हवे आहे. तरच ती समाज संबंधांचा सेतू समर्थपणे सांभाळू शकेल.
समूह नेतृत्व
स्त्री पुरुषाची अनुगामी न राहता सहचर, सहयोगी बनत आता मार्गदर्शक भूमिकेत उभी आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सर्वच क्षेत्रांत तिची वाढती उपस्थिती केवळ संख्यात्मक वाढ राहिली नसून ती गुणात्मक परिणाम व परिणामाचे निदर्शक बनत असल्याने शिक्षणात तिच्या नेतृत्व विकासावर भर द्यायला हवा, तसे झाले तरच आपण स्त्री-पुरुष समानतेचे लक्ष्य गाठू शकू.
सत्त्व आणि 'स्व'त्व
मनुष्य जीवनात सकारात्मकतेचे जितके महत्व आहे, तितकेच महत्व 'स्व'त्वचे आहे. स्त्रिमध्ये उपजत सर्जकता, संवेदना आणि सकारात्मकता असते, त्याला 'स्व'त्वाची जोड देणारे स्वयंप्रकाशी शिक्षण मिळाले तर स्त्रिचा समग्र व संपूर्ण विकास शक्य आहे. ते आपल्या नवशिक्षणाचे अंतिम ध्येय व धोरण असायला हवे.
या साऱ्या बाबी प्रसंगी तात्त्विक वाटल्या तरी व्यावहारिक गरज म्हणून जर आपण त्यांच्याकडे पाहू लागू तर मग आपल्या लक्षात येईल की शिक्षणाचा आकृतीबंध ठरवताना जी गृहितके आजवर आपण अंगिकारली, त्यांची नवी मांडणी, पुनर्रचना करायला हवी, तरच अपेक्षित समानतेचे लक्ष्य आपण गाठू शकू. "Education of women is important not only from the angle of equal education opportunity between the sexes but also for the substantial social and economic returns to female education that can be achieved by rising women's productivity and income level, producing better educated and healthier children and reducing fertility rate." शिक्षणातील स्त्री सहभागासंदर्भात युनेस्को वा अन्य शिक्षण तज्ज्ञांचा हा दृष्टिकोन तिच्या बदलत्या भूमिकेचेच निदर्शक आहे.
•••
संदर्भ :-
• World Women-2010-unstates.un.org
• Census India-2011-www.census.gov शिक्षणाचे चिंताजनक व्यवसायीकरण
महाराष्ट्रातील औपचारिक शिक्षणाची पद्धत तेराव्या शतकापासून दिसून येते. तत्पूर्वी शिक्षण हे गुरूकुल, धर्मपीठे इत्यादीमार्फत होत असे. मुसलमानी शासकांच्या काळात (इ. स. १२०० ते १३००) अनेक गावांत लेखन, वाचन, अंकज्ञान घोकंपट्टीने शिकविणाच्या तात्यापंतोजी पद्धतीच्या शाळा होत्या. छत्रपती शिवाजी व पेशव्यांच्या काळात परकीय आक्रमणे कमी झाल्याने शिक्षणात स्थैर्य आले. ब्रिटिश आमदानीत एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सर्वप्रथम मन्रो या ब्रिटीश अधिकाऱ्याने मद्रास प्रांताचा शैक्षणिक अभ्यास करून भारतातील सार्वत्रिक शिक्षणाचा विचार रुजवला. मुंबई इलाख्यापुरते बोलायचे झाले तर गव्हर्नर मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनने मातृभाषा व इंग्रजीचे शिक्षण प्रचलित केले, शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके त्याच्याच काळात अस्तित्वात आली. पेशवाईपासून ब्राह्मणांना देण्यात येणारा रमणा बंद करून शिक्षणासाठी त्याने त्याचा वापर करून दक्षिणा फंड सुरू केला. अनुदान व शिष्यवृत्तीची परंपरा त्यातून सुरू झाली. पूर्वी वाई, पैठणसारख्या तीर्थस्थळी संस्कृत शाळा असत, तशा आता गावोगावी सर्वांना शिक्षण देणाच्या शाळा सुरू होऊन शिक्षणाचे सार्वत्रिकरण सुरू झाले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्व शाळा या देवळे, धर्मशाळा, वाडे अशा ठिकाणी भरत. शिक्षक व विद्यार्थी सवर्ण असत. वंचितांच्या शिक्षण व कल्याणाचा विचार ब्रिटिश मिशनरींकडून प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी सुरू केला, तोवर स्त्री शिक्षणाचा विचारही नव्हता. शिक्षण सर्व जाती, धर्म, वर्ग यांना अनिर्बंधपणे सुरू झाले ते मात्र विसाव्या शतकात.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात (मुंबई इलाख्यात) १७०० शाळा होत्या, त्यात ३५००० विद्यार्थी शिकत. या शतकात सामाजिक सुधारणांचे वारे वाहू लागले. सुधारकांची एक मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली, त्यातून शिक्षण व पत्रकारिता विकसित झाली. शिक्षणास गती आली. राष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गो. ह. देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक प्रभृती मान्यवरांनी शाळा, संस्था, कॉलेजीस सुरू करून स्वातंत्र्यपूर्व काळात समाजहिताच्या भावनेने शिक्षण प्रसाराचे कार्य केले. याच काळात मिशनरी शिक्षण संस्थाही सुरू झाल्या पण त्यांचा भर धर्म शिक्षण व प्रसारावर होता. सन १८५० च्या दरम्यान सर्वत्र इंग्रजी शिक्षणाच्या शाळा सर्रास सुरू झालेल्या आढळतात. १९२० ला गांधी युग सुरू झाल्यावर मूलोद्योगी शिक्षणाची संकल्पना रूढ झाली. सन १९६० ला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाले तरी विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र समान शिक्षणाचे धोरण १०+२+३ आकृतीबंधाद्वारे मात्र १९७२ ला सुरू झाले.
नव्या आकृतीबंधाचे परिणाम :
नव्या आकृतीबंध व अभ्यासक्रमानुसार सन १९७७ ला नवशिक्षित तरुणांची पहिली तुकडी उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून प्रवेशेच्छु झाली. हे पाल्य अशा पालकांची अपत्ये होती ज्यांचे विवाह स्वातंत्र्याच्या आरंभी (१९४७-५०) झाले होते. पालक म्हणून त्यांच्या शिक्षणविषयक आकांक्षा स्वातंत्र्यामुळे उंचावल्या होत्या. कारण ही पालकांची पिढी आर्टस्, कॉमर्स पदवीधरांची होती, त्या काळात डॉक्टर, इंजीनिअर, बँक अधिकारी होणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. प्रत्येक पालकाला आपला मुलगा/मुलगी डॉक्टर, इंजीनिअर व्हावे असे वाटायचे. पण त्या काळात इंजीनिअर व मेडिकल कॉलेजीस हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच होती व तीही शासकीय. तेथील प्रवेश क्षमता मर्यादित. तिथेही आरक्षण पद्धती प्रवेशासाठी लागू झाल्याने मागणी अमर्याद व प्रवेश मर्यादित असे चित्र निर्माण झाले होते. निराश पालकांनी शेजारच्या कर्नाटक प्रांताकडे आपला मोर्चा वळवला. कारण तुलनेने तिथे जागा अधिक व संख्याही अधिक होत्या. लोक देणग्या देऊन प्रवेश मिळवू लागले, तशी महाराष्ट्रातील पैसा कर्नाटकात जाऊन तो प्रांत समृद्ध होतो अशी हाकाटी सुरू झाली आणि इकडे तर मेडिकल, इंजीनिअरिंग कॉलेजीस उभारणीसाठी लागणारा पैसा शिक्षणात घालावा, गुंतवावा अशी शासनाची मानसिकता व तयारी नव्हती.
विना अनुदान धोरणाची फलनिष्पती :
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सन १९८३ साली विना अनुदान तत्त्वावर शिक्षण संस्था सुरू करण्याचे धोरण स्वीकारून तसा कायदा करून शिक्षण शासकीय काचातून मुक्त केले. आज शिक्षणाला व्यवसाय व बाजाराचे रूप आले आहे त्याचे बीज त्या धोरणात आढळले. प्रारंभी व्यावसायिक शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी विशेषतः इंजीनिअरिंग, मेडिकलसाठी हे धोरण अंगीकारले गेले, त्यात शासकीय गुंतवणूक, तरतूद वाचलीच पण डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ, सिंबॉयसीस इत्यादींच्या यश व फायदेशीर कमाईकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष गेले व जवळजवळ सर्व मंत्री, आमदार, खासदार यांनी आपापल्या मतदार संघात, साखर कारखाना साईटस् वर शिक्षण संकुले उभारणे सुरू केले. प्रवरा, राजारामबापू, वारणा अशी उदाहरणे म्हणून सांगता येतील. शिक्षण हा देणगी, फी वर वाढणारा किफायतशीर व्यवसाय आहे असे लक्षात आल्यावर राजकीय मंडळींनी बी.एड. कॉलेजीस, समाजशास्त्र महाविद्यालये, तंत्र संस्था, व्यवस्थापन संस्थांतून D.Ed., B.Ed., M.Ed., M.S.W., M.B.A., B.B.A., B.C.A., M.C.A. चे अमाप पीक काढायला सुरूवात केली. त्यातून पैशाची चटक लागल्याने पुढे प्रवेश क्षमता (सीटस्) वाढवून घेण्याचा सपाटा लावला, 'छोटा मासा, मोठा मासा' स्पर्धा जीवघेणी झाली तशी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, आश्रमशाळा करत हा बाजार आता प्रत्येक घरातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या मराठी शाळांना लागलेली घरघर सर्वप्रथम ऐकू येऊ लागली, ती तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या पहिलीपासून इंग्रजीची सक्तीसारख्या लोकानुनयी निर्णयातून. आज तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जितकी सहज परवानगी मिळते, तितकी ती मराठी माध्यमांना मिळत नाही.
गुदस्ता वर्षाच्या बाजारात झालेला फायदा लक्षात घेऊन आता शासनाने शिक्षणात निर्गुंतवणुकीचे अघोषित धोरण स्वीकारल्यात जमा आहे, त्याच पुरावा म्हणजे स्वयंअर्थशासित शिक्षण संस्था धोरण. इथेही साप-मुंगसाचा खेळ शासनाने मांडला आहे. ज्यांच्याकडे एकरावारी जागा त्यांना प्रथम शिक्षण संस्था-शाळा दिल्या जाणार. व्यापाराचे एक तत्त्व आहे- पैशाकडे पैसा जातो. त्या चालीवर ज्यांनी या उद्योग, व्यवसाय गुंतवणूक केली आहे व ज्यांनी आपले विस्तार-कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांना प्राधान्य. बळी तो कान पिळी म्हणतात ते हेच. एकदा व्यापार करायचे ठरले की व्यापाराचे म्हणून शास्त्र आहे, कमी गुंतवणुकीत अधिक नफा व अधिक गुंतवणुकीत अत्याधिक नफा. गाय चारा दिल्यावर दूध देते ती गरीब शेतकऱ्याची गाय असते, श्रीमंत शेतकऱ्याची गाय गावच्या गवतावर दूध देते, हे सर्वांना ठाऊक असलेलं उदाहरण. आपले अधिकांश राजकारणी गावातून आलेले असल्याने त्यांना हा कानमंत्र जगण्यातून मिळाला होता. त्यांनी आपल्या राजकीय शहाणपण, सत्ता वापर व अधिकारांचा उपयोग करून गावोगावी गावगन्ना शिक्षण संस्था सुरू केल्या. वर्ग, खोल्या, बेंच, प्रयोगशाळा, शिक्षकांची किमान गुणवत्ता, पात्र शिक्षक नेमणूक, नियुक्त शिक्षकांना शासनमान्य वेतन, ग्रंथालय, शैक्षणिक साधने इत्यादी बंधने झुगारून, वेशीवर टांगून शिक्षण अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून हप्त्या-हप्त्याने कायम विनाअनुदानित म्हणून मिळवलेल्या शाळा, कॉलेजीसना 'कायम' शब्द काढून (खरं तर गाळून !) २५%, ५०%, ७५% क्रमाने पूर्ण अनुदानित करून घेतल्या. ते करताना शिक्षकांचा फरक, नियुक्तीसाठी देणगी (संस्थाचालकांना बक्षिसी!) प्रवेश देणगी, फी वाढ, तुकड्या वाढ नवे कोर्सेस आहे त्या इमारतींचा, शिक्षकांचा अधिकाधिक वापर करून सुरू करणे असे नवनवे कल्पक फंडे अमलात आणले.
शिक्षणातील निर्गुंतवणूकीचे धोरण
आता तर खासगी विद्यापीठे, परदेशी शाळा, औद्योगिक व्यवस्थापन, कंपन्यांना शिक्षण संस्था सुरू करण्यास परवाने देऊन शासन थांबलेले नाही तर अशा संस्था, विद्यापीठांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देत 'एज्युकेशन सेझ' निर्माण करत आहे. आता तर शासन शिक्षणातून पूर्ण अंग काढून घेतल्यास किती आर्थिक तरतूद वाचेल असा हिशोब करत असल्याचे ऐकतो. याचा सरळ अर्थ असा आहे की शासन शिक्षणात 'जिसकी लाठी उसकी भैंस' न्याय रुजवू पाहते आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर गुणवत्ताप्रधान शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, इत्यादीचा विचार करणे कठीण झाले असले तरी आग्रह सोडणे संयुक्तिक होणार नाही म्हणून हा लेखप्रंपच.
महाराष्ट्रातील विद्यमान शिक्षणाचे हे स्वरूप भारतीय शिक्षणविषयक धोरणाचे अंग असले, तरी इथल्या शिक्षणविषयक प्रश्नांना राज्य शासनाचे धोरण, शिक्षक, संस्थाचालकांचा दृष्टिकोन, पालकांची मानसिकता असे स्थानिक पदर कारणीभूत आहेत. भारतातील अन्य राज्यातील अधिकांश शिक्षण शासकीय संस्थांमार्फत दिले जाते. महाराष्ट्रात उलटी स्थिती आहे. शासनाची शिक्षणातील उपस्थिती प्राथमिक कडून उच्च शिक्षणाकडे जसे जाऊ तशी ती अल्प वा प्रातिनिधिक होताना दिसते. उच्च शिक्षणात विद्यापीठे पूर्वी स्वायत्त होती, ती अलीकडच्या काळात शासकीय अनुदानावर अवलंबित राहिल्याने व अभ्यासक्रम, संशोधनातही ती पारंपरिक राहिल्याने त्यांचे स्वरूप स्वायत्ततेकडून शासकीतेयकडे वाटचाल करणारे ठरत आहे. याचे प्रमुख कारणही कुलगुरू हे राजकीय पक्षांचे मूक प्रतिनिधी वा भूमिगत समर्थक असल्याने त्यांची सारी धोरणे शासनानुकूल, संस्थाचालक धार्जिणी होताना दिसत आहे. त्याचेही मूळ शोधू लागलो तर राज्यपाल नियुक्त्यांच्या राजकीयकरणात ते सापडते.
व्यावसायीकरणाची कारणमीमांसा
महाराष्ट्रातील शिक्षणाचे व्यावसायीकरण हे जागतिकीरणापेक्षा राजकीयकरणामुळे अधिक झाले आहे. शिक्षण क्षेत्रात उद्योग संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक शिक्षण संस्था (कंपन्या) यांची वाढती उपस्थिती हा केंद्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे. केंद्रास शिक्षण क्षेत्रात किमान १५% तरतूद करण्याचे वैश्विक उद्दिष्ट जसे साध्य करता आले नाही तसे प्रगत राष्ट्रांप्रमाणे उच्च शिक्षणात १५% प्रवेशाचे लक्ष्यही गाठता आले नाही. यामागेही नियोजन अभाव, धोरणात असातत्य (धरसोड) ही कारणे आहेतच.
शिक्षणाचे नागरी केंद्रीकरण (Urban Centralization) हे व्यावसायीकरणाचे एक प्रमुख कारण आहे. एके काळी खेड्यांचा शहरांकडे असलेला ओढा हा नोकरी, रोजगार, उद्योग, सुविधा, मनोरंजन केंद्र म्हणून होता. आता त्याची जागा शिक्षणाने घेतली आहे. गावची मुले तालुक्याला, तालुक्याची मुले जिल्ह्याला हे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणापर्यंत चालते. अधिक ताणले गेले तर उच्च माध्यमिक शिक्षण जिल्हा केंद्रात घेणे विद्यार्थी व पालक पसंत करतात. पण महाविद्यालयीन वा विद्यापीठीय शिक्षणाच्या ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू झाला की 'पाऊले चालती पंढरीची वाट' या तालावर लातूर पॅटर्न, नागपूर पॅटर्न, पुणे पॅटर्नकडे लोक वळतात. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरे तिथे विद्यापीठे आहेत म्हणून 'एज्युकेशन हब' होत नाहीत, तर तिथे कोचिंग क्लासेस आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळते, कँपस इंटरव्ह्यू होतात, पूरक शैक्षणिक पात्रता संपादन केंद्रे आहेत (कॅट, गेट, जी-मॅट, जीआरई, जेईई, टोफेल, सीईटी, नीट, एसएसबी, एन्ट्रन्स (स्पर्धा परीक्षा), आत्मा इत्यादी) म्हणून. या प्रवेश परीक्षाही एक प्रकारची शिक्षणास व्यवसाय करणारी एक नवी प्रक्रिया व कारण बनते आहे. काहीच दिवसांपूर्वी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र टाइम्सची एक शैक्षणिक पुरवणी माझ्या पाहण्यात आली. तिचे शीर्षकच मुळी होते 'नागपूर द न्यू कोटा'. कोटा हे राजस्थानातले एक शहर आहे, सर्व सुपर फास्ट ट्रेन्स तिथे थांबतात, त्या रेल्वे जंक्शन म्हणून नाही तर ते 'एज्युकेशनल जंक्शन' झाले आहे म्हणून. राजधानी, दुरंतोही तिथे थांबतात. बन्सल, मेघे, रिजोनन्स, एमबीडी आदी कोचिंग सेंटर्स तिथे आहेत. राजस्थानात केंद्रीय विद्यापीठ स्थापन झाल्यावर त्याचे केंद्रीय कार्यालय पहिल्यांदा सुरू झाले ते कोटातच, कारण सगळी राजस्थानची गुणी (?), गुणवंत (?) मुले/मुली तिथं टॅप करणे सोपे होते, हा आपल्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेचा पर्यायी यंत्रणे केलेला पराभवच नव्हे का?
वरील महानगरांत एक अभ्यासक्रम करत अनेक पूरक अभ्यासक्रम करता येतात हेही एक कारण असते. बी.ए. करत बीबीए, एम.ए. करत नेट, सेट असे पर्याय उपलब्ध असणे हे नगरांत शक्य असते. ती सुविधा गावात नसते, शिवाय शिकत मिळवण्याची संधी हेही कारण असते. अशा अनेक कारणांनी ग्रामीण भागांचा ओढा शहरी शिक्षण केंद्राकडे वाढतो, वाहतो आहे, महानगर संस्कृतीचे सुप्त आकर्षण (मॉल्स, मल्टिप्लेक्स, मल्टिमीडिया, मल्टिमनी असं नवं ‘एम्’ व्हिटॅमिन शहरात मुबलक !) असतेच.
राज्य महामार्गावरून आपली गाडी राष्ट्रीय महामार्गावर धावू लागली की रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्रात 'नॉलेज सिटीज्' पाहायला मिळतात. या सिटीज आता डोंगर कपारीत, कासेगाव, लिंबसारख्या छोट्या गावातही पाहण्यास मिळतात. ज्या गावात ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नाही करता आली तरी शिक्षण सम्राट 'ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट' मात्र नक्की स्थापू शकतात. तुमचा राजकीय पुरुषार्थ आता तुमच्या कनवटीला किती टेंपररी, कंत्राटी, सीएचबी, शिक्षण सेवक (त्यालाच शिक्षक असेही म्हणतात !) आहेत; म्हणजे हक्काचे सालदार किती आहेत यावर ठरतो. निवडणुका जिंकायला ही हुकमी प्रचारकांची रोजंदारी फौज कामी येते. पालकही आपला पाल्य अशा बहुविध अभ्यासक्रम शिकवणाच्या शिक्षण संकुलात आवर्जून पाठवतात. कारण ती संकुले संगणक, ग्रंथालय, लॅबस्, कँपस इंटरव्ह्यूची सोय, तज्ज्ञ शिक्षक, वाहतूक सुविधा, कँटीन, होस्टेल्स, वायफाय सुविधांनी संपन्न असतात.
शिक्षणातील भ्रष्टाचार हेही शिक्षणाच्या व्यावसायीकरणाचे प्रमुख कारण आहे. हा भ्रष्टाचार मंत्रालय, सचिवालय, संचालनालय, विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षणाधिकारी, संस्थाचालक असा पाझरत शिक्षकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृतीकारण.... जीवनाचे कोणतेच क्षेत्र शुद्ध न राहिल्याने शिक्षण क्षेत्र नुसते शुद्ध कसे राहणार ? संस्था मिळवायला, अभ्यासक्रम मंजुरीला, प्रवेश क्षमता वाढवायला, शिक्षक पद मंजुरीला, पद/संच मान्यतेला, पदोन्नतीला, पेन्शन मंजुरीला, मेडिकल क्लेम मंजुरी; कशाला नाही पैसे द्यावे लागत ? शासकीय अधिकारी मोक्याच्या (सोयीच्या नव्हे!) जागी नेमणूक व्हावी म्हणून काय नाही करत ? असे मिंधे शिक्षणाधिकारी काय निरीक्षण करणार नि नियंत्रण ठेवणार ? कारण ते नव्या पंचायत राज व्यवस्थेत लोकशाही, विकेंद्रीकरण, सहकार इत्यादी नावावर लोकप्रतिनिधींचे ताबेदार, सालदार बनलेत ! 'ऐक नाही तर जा गडचिरोलीला' असे संवाद आता नित्याचे बनलेत. शिक्षकही बदलीसाठी काय नाही करत ? (हे नुसतं पंचायत राज व्यवस्थेत नाही तर रयत, विवेकानंद, भारती सदृश बहसंस्थात्मक शिक्षण संस्थांतही पाहायला मिळतं !) भ्रष्टाचार नुसता आर्थिक राहिला नाही तर संस्था चालक/पदाधिकाऱ्यांचे लांगूलचालन, वशिला, भेटी देणं, सत्कार, विवाह, व्याख्यानांना हुकमी उपस्थिती लावणे, गौरव लेख लिहिणे यातूनही दिसून येतो. हे शिक्षण व शिक्षकांचे अध:पतनच होय.
शिक्षणाच्या बाजारीकरणाचे एक कारण नियंत्रक संस्था, यंत्रणा, व्यवस्थेचं निष्क्रियपण ही आहे. बालवाडीपासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत सर्व ठिकाणी नियंत्रक व्यवस्था आहे. शिक्षणसंस्था सुरू करण्याच्या अटी, सुविधा, पात्रता, संख्या, शिक्षक-विद्यार्थी प्रमाण, संरचना इत्यादीचे नियम आहेत. निरीक्षण व नियंत्रण यंत्रणा आहे, मान्यता, संचालन, विस्तार, गुणवत्ता सर्व बाबींसाठी परिपत्रके, स्टॅट्यूटस्, कोडस् आहेत. ड्यूटी चार्ट आहे. वेळापत्रक, कार्यभार, सेवाशर्ती सर्व आहे. त्याबरोबर शिक्षण व्यवस्थेत 'चलता है' संस्कृतीही पक्की रुजली आहे, त्यामुळे विद्यमान शाळांची पटपडताळणी झाली तेव्हा शाळांच्या अपेक्षित दर्जा (Desirable Standard /Minimum Standard) चे पितळ उघडे पडले, तरी शासन कठोर कार्यवाही करत नाही. कारण आपलेच दात, आपलेच ओठ. शिक्षण खाते, विद्यापीठे, मान्यता परिषदा / संस्था (VGC, NCERT, NCTE, MC इत्यादी) सर्वत्र 'तेरी भी चूप, मेरी भी' असाच कारभार चालतो.
व्यावसायीकरणामुळे गुणवत्तेस ग्रहण :
इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर एकदा म्हणाले होते की, "Students cannot be effective in tomorrow's world, if they are trained in yesterday's skill." आपल्या विद्यमान शिक्षण विश्वास ते चपखलपणे लागू पडते. आपण जर आपले अभ्यासक्रम, वर्षानुवर्षे बदलत नसू तर आपले शिक्षण कालबाह्य व कुचकामीच राहणार. आज सर्वत्र 'नेते मागे अनुयायी पुढे' असे चित्र आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी तंत्रज्ञानात कुशल तर शिक्षक संगणक निरक्षर, असे जे चित्र आहे, ते शिक्षक स्वत:स स्वयंप्रेरणेने अद्यतन करत नाहीत म्हणून. डी.एड्. बी.एड. होऊन लागलेला शिक्षक एम.एड, होतो असं अपवादाने दिसते. नोकरीतील सेवा शाश्वती, वर्षाकाठी काही न करता आपोआप वेतनवाढ, संप केला की नवे, चढे वेतनमान, वरिष्ठतेने पदोन्नती या नि अशा अतिरिक्त सुरक्षेने शिक्षकांत अध्ययन, वाचन, लेखन, संशोधन, कृती प्रकल्प, नवोपक्रम इत्यादीच्या ऊर्जाच निर्माण होत नाहीत. जे नवे, उत्साही शिक्षक येतात त्यांना जुने जाणतेपणाने नामोहरम करतात. शिक्षण क्षेत्रात आज खरी गरज आहे, ती मरगळ दूर होण्याची. शासनास जाग येवो न येवो, शाळा टिकली तर मी टिकणार या जाणीव-जागृतीने शिक्षक काही करू मागेल, धजेल तरच वर्तमान स्थितीस छेद देता येईल.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेस ग्रहण लागण्याची अनेक कारणे आहेत. त्यात शिक्षकाची खालावलेली गुणवत्ता हेही एक कारण आहे. शिक्षक ही वृत्ती आहे, ती केवळ औपचारिक पात्रतेने निर्माण होत नाही. तुमच्यात विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा व जिज्ञासा निर्माण करायचे कौशल्य असेल तरच तुम्ही चांगले शिक्षक होऊ शकता. आज चांगले वेतनमान मिळते म्हणून या व्यवसायाकडे धाव घेणारे शिक्षक; त्यांच्यात व्यवसायविषयक न समर्पण आढळते, न अध्यापनाविषयी गोडी. पाट्या टाकणारे शिक्षक रस्त्यावर पाट्या टाकणाच्या मजुरापेक्षा वेगळे असत नाही. वाचन, व्याख्यान, समाजशीलता, बुद्धिप्रामाण्य, संशोधन वृत्ती, व्यासंग या शिक्षकाच्या आदर्श कसोट्या लावता येईल अशा व्यक्ती शिक्षणात अत्यल्प आढळतात. त्यातूनही हा व्यवसाय धंदा होऊ लागला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाचे ते एक प्रमुख व गंभीर कारण आहे.
आज जी पाठ्यपुस्तके तयार होतात त्यात उद्दिष्टानुवर्ती आशय संपन्नता अभावाने आढळते. त्यामुळे शिकण्याची गोडी विद्यार्थ्यांत तयार होत नाही, मूल शाळेला जाताना रडते. यातून मिळणारा संदेश विचार करण्यासारखा आहे किंवा महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी तास का चुकवतात? याचाही विचार व्हायला हवा. पाया भुसभुशीत राहण्याने कळस झगझगीत होत नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. आज घरे भौतिक समृद्ध आहेत पण भावनिक नाते संबंधांना ओढ लागल्याने बाल्य पोरके होत आहे. जीवन जगण्याचा संघर्ष पाहता विद्यमान शिक्षण त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमता व कौशल्य देत नसल्याने शिक्षणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षणातील वाढती भाषिक औपचारिकता, भाषेची काठिण्य पातळी शिकण्यातला मोठा अडथळा ठरत आहे. मूल्यमापनाची सदोष पद्धत प्राथमिक स्तरावर गळती व स्थगितीचे कारण ठरत आहे.
त्यामुळे आजही जगात शाळा सोडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. आज जगात ३१ दशलक्ष मुले प्रतिवर्षी शाळा सोडतात व तितकीच नापास होऊन त्याच वर्गात बसतात. हे चित्र पाहिले की आपल्या शिक्षण पद्धतीची सदोषता लक्षात आल्यावाचून राहत नाही. शिक्षणाची पायरीच न चढणाऱ्या मुली घरोघरी अशिक्षित माता घडवण्याचेच पर्यवसान बालमृत्यू, अनारोग्य, संस्कारअभावादी प्रश्न निर्माण करतात. आई शिकलेली असेल तर बाल्य व बालपण निरोगी व संस्कार संपन्न होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील शिक्षण वंचित मुले शहरापेक्षा दुप्पट असण्याचं हे गूढ कारण होय.
शिक्षणातील अर्थकारणाचा बाजार
शिक्षण व्यवसायापलीकडे जाऊन त्याला बाजारी, ओंगळ स्वरूप येण्यात शिक्षणाचे अर्थकारण जबाबदार आहे. शिक्षणात मूल्यांची जागा किमतीने घेणे यातून ते स्पष्ट होते, 'सर्वांसाठी शिक्षण' हे स्वातंत्र्याचे आपले एक ध्येय होते, म्हणून आपण शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे धोरण अंगिकारले होते. यातूनच आपण सन २००९ ला ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. देशातले प्रत्येक मूल शिकावे म्हणून आपण कायद्याने शिक्षक व पालकांना त्यात जबाबदार घटक बनवले. ही गोष्ट चांगलीच आहे, शिक्षणमान वाढावे, सकारात्मकता रुजावी म्हणून परीक्षेऐवजी निरंतर मूल्यांकन नीती अवलंबिली.
पण दुसरीकडे विना अनुदानित शिक्षण संस्कृतीस महाद्वार उघडे करून दिल्याने शिक्षण ही धनदांडग्यांची मक्तेदारी बनली. वर्गरहित समाजाचे स्वप्न धुळीला मिळाले. शिक्षणात नवा वर्णाश्रम रुजला. 'पैसा असेल तो शिकेल' अशा विषमता समर्थक धोरणामुळे शिक्षणाची दुकानदारी फोफावली. महाग शिक्षणाने फक्त महाग सुविधा निर्माण केल्या. सकस व गुणवत्ता प्रधान शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. मुले बूट, टाय घालू लागली, रिक्षा, बसमधून जाऊ लागली, इंग्रजी शिकू लागली, शाळा स्पार्टेक झाल्या. शिक्षक व शिक्षण स्मार्ट झाले नाही. भौतिक संपन्नता शिक्षण नव्हे.
माहितीचे रूपांतरण ज्ञानात होऊन ते जीवन जगण्याचे साधन व जीवन दृष्टी करणारे होणे म्हणजे शिक्षण. यांचा आपणास विसर पडला आहे. जन सामान्यांकडे आलेल्या गरजेपेक्षा अधिक पैशाने एक चंगळवादी संस्कृती निर्माण केली. मॉल्स, मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर शाळा मल्टिमीडिया युक्त झाल्या, पण गरीब समाज शिक्षण वंचित राहण्याचे नवे दुष्टचक्र शिक्षणाच्या खासगीकरणाने जन्माला घातले. शिक्षण समृद्ध हवे, तसे ते सर्वांना समान प्रवेश व विकासाची संधी देणारे राहील, तरच समाज सर्वंकष समृद्ध होणार ना? जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण राष्ट्रीय शिक्षणाचा ध्येयवाद व मूल्यवाद हरवून बसलो आहोत. आपली मुले आपण एटीएम मशिन्स बनवत आहोत. आपणास संस्कारशील, नीतिमान, जबाबदार नागरिक हवे असतील तर न्याय्य नागरी समाज निर्माण करणारे शिक्षण द्यायला हवे. आपण कमावती पिढी घडवून सामाजिक आत्महत्या करत आहोत. अर्थसंपन्नेतेने माणसाचा कांचनमृगच झाला नाही, तर क्रौंचवधही झाला आहे.
शिक्षणाच्या पुनर्रचनेचे आव्हान
जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञानातील क्रांती, उदार अर्थनीती, मुक्त व्यापार यातून आपल्या समाजजीवनात व जीवनशैलीत गतीने बदल होऊन आपण भौतिक समृद्धी म्हणजे जीवन असे चंगळवादी तत्त्वज्ञान आत्मसात केले. माहितीचा स्फोट झाला, संपर्क साधने जनसामान्यांच्या हाती आली, पण माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्याची प्रगल्भता आपण निर्माण केली नाही. चॅनल्सच्या महापुरात आपण माहिती, ज्ञान व मनोरंजन एकाच वेळी दिले. पण ज्ञान निवडीची बौद्धिकता दिली नाही. लोकशाही अधिकार दिले, पण मताचा विवेक व विधिनिषेध आपण रुजवला नाही. परिणामी आपल्या देशात आर्थिक समृद्धी वाढूनही बौद्धिक दारिद्र्य दूर झाले नाही. धर्मांधता, जातीयवाद, दैववाद आपण कमी करू शकलो नाही. नागरी जीवनात मूल्यनिष्ठ व्यवहाराची मुळे (Roots) आपणास निर्माण करता आली नाहीत. मोबाईल दिला, पण इंटलेक्च्युअल मोबिलिटी आपण विकसित केली नाही.
हे दूर करायचे असेल तर शिक्षणाच्या पुनर्रचनेस पर्याय नाही. आपणास जग बदलाची आव्हाने कवेत घ्यायची आहेत, पण सर्वांना समान शिक्षण व समान संधीचे धोरण देऊन. आरक्षण हवे पण त्यापेक्षा समाजातील सर्व जात, धर्म वंचितांना समान सामाजिक न्याय त्यातून मिळायला हवा. ज्ञानरचनावादी शिक्षण हवे, पण समाजरचनेत समता, बंधुता, स्वातंत्र्य, जातीधर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही मूल्यांवर विश्वास वाढवणारे ते हवे, हे विसरता नये. आगामी वीस वर्षांचा समाज कसा असेल, ते कल्पून जर आपण शिक्षणाचा अभ्यासक्रम व आराखडा देऊ शकलो तर पिढीतील वैषम्य, बेरोजगारी, निराशा आपण दूर करू शकू.
नवा ज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ व विवेकी आणि विज्ञानवादी नागरिक घडवणारे शिक्षण नवे शिक्षण ठरेल. युनेस्कोने म्हटल्याप्रमाणे "Justify public trust and confidence and enhance the esteem in which the profession is held by providing quality education for all students." हा आपल्या शिक्षणाच्या आकृतिबंधाचा आत्मा असायला हवा, तरच आपण नव्या पिढीची आव्हाने स्वीकारणारे व अपेक्षा नि आकांक्षा उंचावणारे शिक्षण त्यांना देऊ शकू. त्यासाठी आपला जगाची स्पर्धा करणाच्या नव्या कौशल्ययुक्त शिक्षणाची मांडणी करायला हवी.
•••
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ हे भारतीय शिक्षकांच्या सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या दृष्टीने क्रांतीचे वर्ष आहे. या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम सर्वच स्तरांवर किमान दोन वर्षांचे करण्यात आले आहेत. रूढ डी.एड्., बी.एड्., एम.एड्, डी.पी.एड., बी.पी.एड, एम.पी.एड्.,ए.टी.डी. अभ्यासक्रम दोन वर्षांचे होत आहेत. काही आधी झाले होते. आता राष्ट्रीय स्तरावर सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात असून ते स्तुत्य व स्वागतार्ह आहे. शिवाय आता या वरील पदविका, पदव्यांची नावेही नवी ठेवली जात आहेत. त्या पदविका, पदव्या कोणत्या इयत्ता/अभ्यासक्रमांना शिकवण्यास पात्र राहतील, हेही निश्चित करण्यात आले आहे. त्यांचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे -
१) पूर्व प्राथमिक शिक्षण पदविका : (Diploma in Early Childhood
Educaiton) D. E. C. Ed. दोन वर्षे कालावधी - बालवाडी अध्यापनास पात्र.
२) प्राथमिक शिक्षण पदविका : (Diploma in Elementary Education)
D.El. Ed. कालावधी दोन वर्षे-इ. १ ली ते इ. ८ वी अध्यापनास पात्र.
नव्या सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायद्यानुसार Right to Education)
३) शिक्षण पदवी : (Bachelor of Education) - B. Ed. दोन वर्षे कालावधी.
उच्च प्राथमिक (इ. ५ वी ते ८ वी), माध्यमिक (इ. ९ वी, इ. १० वी) आणि
उच्च वा वरिष्ठ माध्यमिक (इ. ११, इ. १२ वी) अध्यापनास पात्र
टीप : ही पदवी मुक्त विद्यापीठ / दूरस्थ शिक्षण केंद्रे इत्यादीमधून सेवांतर्गत शिक्षकांना घेता येण्यासाठी सोय.
४) एकात्मिक शिक्षण पदवी (Bachelor of Elementory Education) B. El. Ed. चार वर्षे कालावधी. बारावीनंतर प्रवेश, (सध्याच्या B.A. B.Ed. B. Sc. B. Ed. ला पर्यायी अभ्यासक्रम.)
टीप : अनेक शिक्षण आयोगांनी B. Ed. पदवी चार वर्षे करण्याची शिफारस केली आहे, पण विद्यमान शिक्षणशास्त्र महाविद्यालय चालकांचा यास विरोध असल्याने ही महत्त्वपूर्ण शिफारस समझोता म्हणून विद्यमान B. Ed. दोन वर्षे करण्यात आले.
५) उच्चतर शिक्षण पदवी / पदव्युत्तर शिक्षण (Master of Education) दोन वर्षे कालावधी. M. Ed. उच्च माध्यमिक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये अध्यापनास पात्र
टीप :
१) काही विद्यापीठांतून M. A. (Education) दोन वर्षे कालावधीची सुविधा उपलब्ध
२) नवे दोन वर्षांचे बी.एड. करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असेल.
३) ही पदवी नियमित वा दूरस्थ/मुक्त केंद्रांतून करण्याची सोय.
६) शारीरिक शिक्षण पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षणक्रम - प्रत्येकी दोन वर्षे कालावधी D.PEd. / B.PEd. / M.P.Ed. क्रमशः प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन अध्यापनास पात्र.
७) कला शिक्षण पदविका (Diploma in Art Education) D.A.Ed. दोन वर्षे कालावधी - चित्रकला, शिल्पकला / संगीत, नृत्य, अभिनय अशा दोन शाखांत पदविका घेण्याची सोय / माध्यमिक, महाविद्यालयीन अध्यापनास पात्र
८) विशेष शिक्षण पदविका (Diploma in Special Education) D. S. Ed. अंध, मूक-बधिर, मतिमंद अध्यापनाच्या स्वतंत्र शाखेत पदविकांची सोय.
९) प्रगत शिक्षण पदविका / पदवी (Diploma/Digree inAdvance Education) शिक्षणशास्त्रांतील प्रगत पारंगततेसाठी विशेष संस्थांत विशेष अभ्यासक्रम. (संशोधनाधारित)
१०) विद्यावाचस्पति पदवी (Doctor of Philosophy) - Ph.D.
११) विद्यापारंगत पदवी (Master of Philosophy) - M. Phil. संशोधनाधारित वरील सर्व शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सध्या सुरू असले, तरी त्यांच्या अभ्यासक्रमात मूलभूत बदल करून नवे अभ्यासक्रम अस्तित्वात येत असल्याने भारतातील शिक्षकांचे शिक्षण क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. शिक्षकांचे शिक्षण, प्रशिक्षण, पात्रता, अभ्यासक्रम निश्चित व नियंत्रित करणारी एक परिषद / संस्था आहे, नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई) या नावाने ती सर्वपरिचित आहे. पूर्वी तिचे मुख्यालय भोपाळला होते. आता नवी दिल्लीतून ती कार्य करते. मधल्या काळात आर्थिक व्यवहारांच्या आधारे शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची खिरापत वाटण्यात आली. त्यावर न्यायमूर्ती वर्मा आयोग नेमण्यात येऊन चौकशी झाली. चौकशीत अर्थ व्यवहाराच्या आधारे संस्था मिळवण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून आले. सन २०११ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात व तत्पूर्वीही सन १९९३ मध्ये शिक्षक प्रशिक्षण संस्था, त्यांचे असमाधानकारक कार्य इ. संदर्भात नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, "The Teachers Training Institutes are meant to teach children of impressionable age and we can not let loose on the innocent and unwary children the teacher who have not received proper and adequate training." याची दखल घेऊन सन १९९८ मध्ये एनसीटीईने अभ्यासक्रम पुनर्रचनेचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावर समान अभ्यासक्रम राबविण्याचे निश्चित करून सन २००५ मध्ये 'नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क' (एनसीएफ-२००५) मान्य करण्यात आले. येऊ घातलेले बदल या पार्श्वभूमीवर होत आहेत याची नोंद घ्यायला हवी.
भारतात शिक्षकांच्या शिक्षणाच्या प्रारंभास पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्ववर्षी हे बदल होत आहेत. शंभर वर्षांपूर्वीचा सन १९१७ चा 'सँडलर्स कमिशन रिपोर्ट मध्यंतरी काही संदर्भानी पाहिला होता. त्या वेळी देशात ६१२ प्राथमिक शाळा होत्या. त्यांना त्या वेळी नॉर्मल स्कूल्स म्हणत. माध्यमिक शाळा अवघ्या २५ होत्या. हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये होती. त्याचे वर्णन अहवालात 'Few' असे करण्यात आले होते. १९९७ साली स्वतंत्र भारताला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण, प्रशिक्षण, संशोधनार्थ स्थापित 'नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग' (एनसीईआरटी) नी 'Fifty Years of Teachers Training' शीर्षक जी. एल. अरोरा आणि प्रणाती पंडालिखित अहवाल प्रकाशित करण्यात आला, तेव्हा भारतातील ६८% प्राथमिक तर ५७% माध्यमिक शिक्षकच प्रशिक्षित आढळले. म्हणून प्रशिक्षण संस्था वाढवल्या. पण गुणवत्तेस घसरण लागली. यावर उपाय म्हणून नवे राष्ट्रीय अभ्यासक्रम अमलात येत आहेत.
प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील बदल
प्राथमिक शिक्षकांच्या घडणीत बाल्य व बालक समजून घेण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या भारतीय प्राथमिक शिक्षकास भारतीय समाजमन व संस्कृती माहीत असणे अपेक्षित आहे. बालक संगोपन व शिक्षण प्रक्रियेची मूलभूत माहिती नव्या शिक्षकांना दिली जाणार आहे. भाषा (मातृभाषा, प्रादेशिक) विज्ञान समाजशास्त्र, इंग्रजी अनिवार्य, गणित मूळ पाहावे. या विषयांच्या अध्यापन पद्धती शास्त्र (Pedagogy) अनिवार्य विषय असतील. पूरक विषयात नाटक, ललितकला, आरोग्य, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, योगाचा अभ्यास अपेक्षित आहे.
या प्रारंभिक प्रशिक्षण, शिक्षणानंतर दुसऱ्या वर्षी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, समाजधारणा, लैंगिक समानता, सामाजिक समावेशन, स्वयंविकास (व्यक्तिमत्त्व), इंग्रजी लेखन, उच्चारण, प्रावीण्य, पर्यावरण, माहिती व संपर्क साधन तंत्रज्ञान (ITC), मुलांचे शारीरिक, भावनिक आरोग्य या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे.
दोन्ही वर्षी पाच-पाच महिन्यांचे क्षेत्र अनुभव कार्य (Fieldwork / Internship) अनिवार्य राहणार आहे. नव्या अभ्यासक्रमात दोन बदल महत्त्वाचे राहणार नवा अभ्यासक्रम पूर्ण करणारा प्राथमिक शिक्षक इंग्रजीवर प्रभुत्व असणारा असेल. तो संगणक, इंटरनेट कुशल असेल. पर्यावरण, लिंग समानता व सामाजिक समावेशन भाव यामुळे तो शिक्षक म्हणून समतोल व समावेशी मन घेऊन शाळेत येईल. त्याला मुलांच्या सर्व बाबींची समग्र माहिती असेल तो सर्व शालेय विषयात पारंगत असेल. त्याचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व उन्नत असेल यावर भर देण्यात आला आहे.
यानुसार शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा, साधने, प्रशिक्षक प्राध्यापकांचे प्रशिक्षण, पात्रता उंचावण्याची काळजी घेण्यात आली आहे. या महाविद्यालयात मनुष्यबळ वाढ अपेक्षित असून कार्यपद्धतीतही आमूलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत. आदर्श आणि व्यवहार यातील शिक्षण क्षेत्रातील दरी अरुंद राहण्यावरच नव्या आकृतीबंधाची यशस्विता अवलंबून आहे.
माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील बदल :
नव्या माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे तीन विभाग आहेत १) मूलभूत अभ्यासक्रम (Core Course) २) अध्यापन पद्धती/शास्त्र (Pedagogy) 3) शिक्षक जाणिवांचा विकास (Developing Teacher Sensibility ) पहिल्या घटकात शिक्षणाची मूलभूत तत्वे, विद्यार्थी व अध्ययन प्रक्रिया (Learner and Learning), विद्यार्थ्यांचे सामाजीकरण, शालेयकरण व स्वभाव, अध्ययन-अध्यापन संबंध, अभ्यासक्रम, भारतीय शिक्षणाचे परिप्रेक्ष्य व दृष्टी इत्यादीद्वारे नव्या माध्यमिक शिक्षकाचा शिक्षणविषय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर राहणार आहे. दुसरा घटक अध्यापन पद्धतीचा असून त्याअंतर्गत प्रशिक्षक वा विद्यार्थी-शिक्षक जो अध्यापनाचे शालेय विषय (School Subject/Method) निवडील त्याच्या अध्यापन तंत्राचे त्याला प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. विषय ज्ञान, अंतशाखीय अध्यापन पद्धती, मूल्यमापन शिक्षकाचे स्वत:चे शिकणे (निरंतरता) अशा नव्या बाबींवर भर देण्यात आल्याने भविष्यात शालेय अध्यापनात आमूलाग्र बदल होईल असे वाटते. तिसरा घटक नव बदलातील महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व व अध्यापन समृद्धी(Enrichment), भाषा प्रावीण्य (Proficiency), माहिती व संपर्क साधन तंत्रज्ञानाचा अध्यापनात कुशल वापर, शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य (विद्यार्थी व शिक्षक दोघांचे - खरे तर परस्परपूरकता!) कला व सौंदर्यदृष्टी विकास, विविध ज्ञानसाधनांचा वापर (प्रयोगशाळा, ग्रंथालय, शैक्षणिक साधने) यांना प्रशिक्षणात विशेष महत्त्व राहणार आहे. शिवाय लिंगभेदातीतता, शांतता, पर्यावरण जागृती, विशेष विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची तत्परता (अंध, मतिमंद, गतिमंद, मूक-बधिर, वंचित इ.) वर्गात प्रसंगोपात संबोधन (जयंती, स्मृतिदिन, विशेष घटना इ. अनुषंगाने) याद्वारे शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील, समाजशील व समाज सहभागात सक्रिय राहील यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे. दुसऱ्या वर्षात वरील घटकांचा उत्तरार्ध अपेक्षित आहे. असे प्रशिक्षण मिळेल तर शाळेतले कंटाळवाणे अध्यापन संपले असे म्हणायला वाव आहे.
भारतातील पूर्वप्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंतच्या विद्यमान शिक्षक, त्यांचे शिकणे, शिकवणे, चित्र-चारित्र्य, आचार-विचार, समाजमनातील शिक्षकाची ढासळती प्रतिमा या सर्व पार्श्वभूमीवर नव बदलांना महत्त्व असून ते अनिवार्य आहेत. प्रश्न असा आहे की वर्तमान विषम व्यवस्थेत शिक्षक स्वत:ची ऊर्जा नि वृत्ती टिकवून धरत शिकवत राहणार का? आजच्या शिक्षकांपुढे खरे आव्हान प्रयोगशील स्वातंत्र्याचे आहे. वर्तमान व्यवस्थेत त्यास वाव नाही, म्हणून शिक्षक किती दिवस चाकोरीत पाट्या टाकत राहणार? त्याला केव्हातरी आरशासमोर उभारून प्रश्न करावाच लागेल की 'मी माझे कर्तव्य विवेकाने व कर्तव्यबुद्धी निभावतो का ? अभ्यासक्रमाची पूर्तता हा शिक्षकी पेशाचा वैधानिक भाग व बाब आहे, त्यापलीकडे तो रचनात्मक, विधायक भूमिकेतून आकृतिबंधाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी घडणीकडे - त्याच्या नागरिक भूमिकेकडे लक्ष देणार का?' शिक्षक स्वयंप्रेरित, ध्येयवादी असणे आता काळाची गरज आहे. भारतासारख्या गरीब देशाने शिक्षकाना गरीब ठेवलेले नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ व स्पष्ट असताना विद्यार्थी-पालकांच्या पुन:भरणात (Feed-Back) शिक्षक मागे का? तो अपेक्षांना पूर्ण का उतरत नाही, याचा विचार शिक्षक अंतर्मुख होऊन जोवर करणार नाही, तोवर अभ्यासक्रम, प्रशिक्षण हे वरवरचे व बाहेरील बदलच ठरतात. गरज आहे, शिक्षकांच्या स्वयं कायाकल्पाची!
◼◼◼
संदर्भ :-
• (भारत सरकार, अध्यापक शिक्षण विभाग) www.teindia.nic.in
• संकेतस्थळ - NCTE (www.ncte-india.org)
• संकेतस्थळ - NCERT (www.ncert.nic)
• Indian Journal of Applied Research - Vol -4 / Issue 5 / May, 2015
• Educational Leadership - Dec. 2010 / Jan.-2011/Vol. - 68 / Issue - 1
• Revue Web - 22 Oct, 2009
• National Curriculum Framework - 2005
• Syllabuses for Two Year Courses. उच्च शिक्षणातील अध्यापक शिक्षणाची उपेक्षा
भारतातील शिक्षणाचे स्थूलपणे दोन भाग आहेत - १) कनिष्ठ शिक्षण २) वरिष्ठ शिक्षण. कनिष्ठ शिक्षणात बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा अंतर्भाव होतो. वरिष्ठ शिक्षणास उच्च शिक्षण (Higher Education) असेही संबोधले जाते. यात महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाचा अंतर्भाव होतो, आपल्याकडे कनिष्ठ स्तरावर शिकवायचे असेल, तर सेवापूर्व प्रशिक्षण अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला डी.एड., डी.टी.एड., बी.एड्. अशी अध्यापनशास्त्र संबंधी पदविका अथवा पदवी आवश्यक आहे. तुम्ही शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिकवणार असाल तरी तुम्हाला बी.एड्., एम्.एड्. वा शिक्षणशास्त्रातील पीएच.डी. आवश्यक असते.
पण तुम्हाला महाविद्यालयात अथवा विद्यापीठात शिक्षक, अधिव्याख्याता, प्राध्यापक, प्राचार्य व्हायचे असेल तर मात्र तुम्हाला शिकवायचे कसे याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक नसते. उच्च शिक्षणात साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य ही पदे आहेत. या पदांची पात्रता विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) ठरवते. त्या पात्रता खालील होत.
१) साहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५%) नेट / सेट उत्तीर्ण
२) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५%) पीएच.डी., किमान API ३) प्राध्यापक (Professor)
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५%), १० वर्षे अध्यापन अनुभव, किमान API गुण
४) प्राचार्य (Principal)
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (५५%) पीएच.डी., १५ वर्षे अध्यापन अनुभव, किमान API - गुण
• API - Acadamic Performance Index
शिक्षणशास्त्राचे सर्वमान्य तत्त्व आहे की शिक्षकास आपला विषय शिकविण्यासंबंधीचे पद्धतशीर वा शास्त्रोक्त अध्यापन शिक्षण (Pedagogical Education / Training) हवे. २०१३ साली आपल्या देशात २०० विद्यापीठे होती. पैकी एकही विद्यापीठ वैश्विक दर्जाचे नव्हते. त्याची कारण मीमांसा करताना आपणास लक्षात येईल की महाविद्यालये व विद्यापीठांतील शिक्षकांची पात्रता व दर्जा वैश्विक पातळीचा नसणे हे जसे कारण आहे, तसे येथील संशोधनही उच्च दर्जाचे नसणे हे कारण होय. सॅम पित्रोदा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सरकारने (युपीए) नॅशनल नॉलेज कमिशनची नियुक्ती केली होती. त्यांनी भारतातील पी.एच.डीवर स्वतंत्र अहवालच सादर करून पदव्यांच्या दर्जावर क्ष किरण टाकले आहे.
युरोप खंडातील देश उच्च शिक्षणात आघाडीवर आहेत. तेथील शिक्षणाचा दर्जा युरोपियन कमिशन ठरवते. तेथील उच्च शिक्षणाच्या आधुनिकीकरणासंबंधीचा एक अहवाल नुकताच माझ्या वाचनात आला. 'Report to the European Commission on improving the Quality of Teaching and Learning in Europe's Higher Educational Institutions.' (June, 2013) सदर अहवालात उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसाठी खालील महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. ती अशी "All Staff teaching in higher education institutions in 2020 should have received certified pedagogical training. Continuous professional education as teacher should become a requirement for teacher in the higher education sector." (Page - 31, Rec. No. 4) अध्ययन हे जसे शास्त्र आहे तसेच अध्यापनही. अध्यापन पद्धती शास्त्रोक्त हवी. ती रामभरोसे अथवा व्यक्तीची मर्जी व मर्यादा राहील तर मिळणारे शिक्षण म्हणजे आनंदीआनंदच असणार हे उघड आहे. अध्यापन तंत्रात अध्यापन पद्धती समजावून घेऊन तिचे वारंवार प्रात्यक्षिक व प्रयोग, उपयोग करणे महत्वाचे असते, त्यातून शिक्षकाचे अध्यापन कौशल्य विकसित होत असते. या पार्श्वभूमीवर विद्यमान उच्च शिक्षणातील शिक्षकांची पात्रता अपूर्ण तर आहेच, शिवाय ती अध्ययन-अध्यापनाच्या शास्त्रोक्त गृहीतकाशी विसंगतही. आज केवळ नेट/सेट होणारा पदव्युत्तर उमेदवार शिक्षक होतो. नेट/सेट ही परीक्षा विषय ज्ञानाची आहे, तिचा अध्यापनाशी सुतराम संबंध नाही. त्यामुळे आजचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापन हे व्यक्तिसापेक्ष व व्यक्तिक्षमताधारित राहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील गेल्या सुमारे सात दशकांच्या काळात यावर अनेकदा विचार झाला. अगदी अलीकडे 'मॉडेल कॉलेज' निर्मिती संबंधी नेमलेल्या त्यागराजन समितीनेही शिक्षक पात्रतेसंबंधी केलेल्या शिफारशीत प्रशिक्षणावर जोर देण्यात आला होता. पण त्यास विरोध करण्यात आल्याने त्या मागे पडल्या. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात उच्च शिक्षणातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या वर्गातील विद्यार्थी हे अनेक अंगाने वैविध्यपूर्ण असतात. विद्यार्थी भाषा, प्रांत, क्षमता, लिंग, परंपरा, संस्कृती, अर्थ अशा दृष्टीने वैविध्यपूर्ण व भिन्नलिंगी / संमिश्र असतो. या पार्श्वभूमीवरही शिक्षकांचे प्रशिक्षित असणे अनिवार्य ठरते. गेल्या सात दशकांत देशातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात मूलभत स्वरूपाचा बदल होऊन ते विद्यार्थीकेंद्रित झाले, तसे उच्च शिक्षणाचे होऊ शकले नाही, उच्च शिक्षणाचे सार्वत्रीकरण न झाल्याने अध्यापनाचे उच्च शिक्षणविषयक तंत्र (Pedagogy) ही विकसित झालेली नाही. शिक्षकांच्या क्षमतांचे मूल्यमापन विषयक निकष हे शिक्षकाच्या व्यक्तिगत ज्ञानविकासाचे निकष होत. उदाहरणार्थ, लेखन, वाचन, संशोधन, भाषण, चर्चा सहभाग, निबंध/प्रबंध लेखन या एपीआय निदर्शकात अध्यापन कुशलतेची कसोटी दिसतच नाही मुळी. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापनविषयक प्रशिक्षण अनिवार्य होऊन गेले आहे. उच्च शिक्षणातील अध्यापकनिहाय अध्यापन पद्धतीमुळेही भारतातील शिक्षणात एकसमवायी चित्र दिसत नाही.
भारतातील आजवरचा उच्च शिक्षण विकास हा अभ्यासक्रम केंद्रित राहिला आहे. तो शिक्षक विकासकेंद्री (Faculty Improvement Programme) होणे गरजेचे आहे, आज संगणक व संपर्क साधन विकासामुळे अध्यापन तंत्र व पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवरपण उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची अध्यापनविषयक पात्रता निश्चित होऊन ती कालसुसंगत अशा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त होणे गरजेचे आहे. आजच्या महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाची मोठी मदार व्याख्यान पद्धतीवर (Lecture Method) आहे. ती प्रात्यक्षिक, सहभाग, प्रकल्प, सर्वेक्षण, स्वयंअध्यापन, समस्यापूर्ती, संगणकीय, आभासी इ. पद्धतींचा वापर करून सर्जनात्मक, सक्रिय, रंजक करणे शक्य आहे. मूल्यमापन पद्धती जी केवळ प्रश्नोत्तर केंद्री बनून राहिली आहे, तीपण क्षेत्रभेट, संशोधन, प्रबंध लेखन, मुलाखती इत्यादीवर आधारित करणे शक्य आहे. निरंतर मूल्यमापन, अंकांच्या जागी श्रेणी प्राप्ती, ऐकण्याऐवजी आकलन, समीक्षण, रसग्रहण, प्रक्रिया केंद्री अशा सुधारणांतूनही महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, संशोधन इ. क्षेत्रे आमूलाग्र बदलणे शक्य आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतील पारंपरिक अभ्यासक्रमांना फाटा देणे आता काळाची गरज बनली आहे. विधी, अभियांत्रिकी, वैद्यक, व्यवस्थापन, तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी शिक्षण नव सुधारणांच्या संदर्भात प्रात्यक्षिक केंद्री करणे आवश्यक आहे. नवा विद्यार्थी संगणक साक्षर, तंत्र कुशल, बहुभाषी, बहुआयामी कौशल्यधारी येतो आहे, याचे भान नवे अभ्यासक्रम बनवणाऱ्यांना अभावाने दिसते. नवा विद्यार्थी लिहिणारा न राहता टंकक होतो आहे, याचे भानही शिक्षकांत दिसत नाही. परिणामी भारतातील अध्ययन अध्यापन दोन्हीही जागतिक पातळीचे होत नाही.
•••
संदर्भ :-
• Effective University Teaching - ion.uwinnipeg.ca
• Education Success Profile : College/Univserity Professor - www.microsoft.com
• The need of Pedagogical training to higher education teachers in colleges and Universities in India-by - S. Vaidheeswaran. नव्या युगाच्या शिक्षणाचे आव्हान
'एक हृदय हो भारत जननी' चे ध्येय धराशी बाळगून साने गुरुजींनी 'आंतरभारती' चे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नामागे रवींद्रनाथ टागोरांच्या 'विश्वभारती' ची प्रेरणा होती. तिचं ब्रीदवाक्य होतं, 'यंत्र विश्वं भवति एकनीडम्' म्हणेच 'वसुधैव कुटुंबकम्.' साने गुरुजींना 'आंतरभारती' चे स्वप्न पडायचे, पण एक कारण होते. सन १९३० च्या कायदेभंग चळवळीत त्यांना अटक करून १७ मे १९३० रोजी धुळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तो तुरुंग, त्यातील साने गुरुजींची खोली 'राज्य स्मारक' म्हणून जपली आहे. ती मी पाहिली आहे. धुळ्यातून त्यांना जुलै १९३० ला त्रिचनापल्ली (मद्रास) येथे हलविण्यात आलं. इथं ते जवळ-जवळ नऊ महिने (३१ मार्च, १९३१ पर्यंत) होते. या तुरुंगात भारतभरचे सुमारे ३००० कैदी होते. केरळ, मद्रास (तमिळनाडू), आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल येथील राजबंदी या तुरुंगात होते. भारताच्या विविध भाषा, धर्म, संस्कृती, सण, पोषाख, साहित्य, विचार, परंपरांचे एक नवे दर्शन व अनुभव साने गुरूजींना येथे मिळाला. तेथेच त्यांची भेट आचार्य विनोबा भावे, आचार्य स. ज. भागवतांबरोबर झाली. सर्व भाषा व साहित्याने प्रभावित होऊन साने गुरुजींनी 'कुरल', 'शबरी', 'पत्री', 'हृदयाचे बोल', ‘चिंतनिका', 'रामाचा शेला', 'ते आपले घर', 'ही खरी संस्कृती', 'गीता प्रवचने' इ, अनुवाद, काव्य, नाटक, भाषण असे विविध स्वरूपाचे साहित्य लेखन केले. अनेक भाषा व साहित्यांचा अभ्यास व वाचन झाले ते इथेच ! पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केले. (१५ ऑगस्ट, १९४८)
ते स्थिरस्थावर झाल्यावर 'आंतरभारती'च्या त्यांच्या जुन्या स्वप्नांनी परत उचल खाल्ली. त्यालाही निमित्त घडले. १४ मे १९४९ ला पुण्याला अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार होते. अध्यक्षपदी आचार्य शं. द. जावडेकर यांची निवड झाली होती, या संमेलनात 'आंतरभारती' चा ठराव व्हावा म्हणून साने गुरुजींनी ७ मे १९४९ च्या 'साधना' मध्ये 'प्रांत भारतीचे माझे स्वप्न' शीर्षक लेख प्रकाशित केला. नंतर आठवडाभर पुण्यात प्रचार करून कधी नव्हे ते आचार्य विनोबांच्या 'तुमच्यासारख्यांनी साहित्य संमेलनाला यायला पाहिजे' या आग्रहावरून संमेलनास गेले. तिथे ठराव मांडला, भाषण केले, तो ठराव मंजूरही झाला. त्यापूर्वीच एक वर्ष आधी पुण्यात 'आंतरभारती' संस्थेची विधिवत स्थापना मोठ्या प्रयत्न व प्रचाराद्वारे सन १९४८ ला उत्साहाने करण्यात आली होती. तिचे उद्घाटन प्रख्यात कन्नड साहित्यिक मस्ती व्यंकटेश अय्यंगार यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबईत जोगेश्वरीत 'साधना' व 'आंतरभारती' साठी डॉ. वसंतराव अवसरेंची जागा १४०० रुपये वार्षिक भाड्याचे घेऊन पाडव्याला मुहूर्तही करण्यात आला होता. पण पुढे साने गुरुजींचे ११ जून, १९५० ला निधन झाले व ते स्वप्न अपुरे राहिले.
या अपूर्ण स्वप्नांचा पाठपुरावा स्वातंत्र्यानंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्ती संग्राम या दोन चळवळींतून होत राहिला. १ मे, १९६० ला स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र झाला. लगेचच वर्षभराने १९६१ ला गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. या लढ्यात समाजवादी व प्रजा समाजवादी नेते सर्वश्री एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, प्रा. ग. प्र. प्रधान सक्रिय होते, तसे राष्ट्र सेवादलाचे सैनिकही. या यशानंतर 'आंतरभारती' विचार रुजविण्याच्या हेतूने समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी साठोत्तरी कालखंडात उत्तूरच्या आंतरभारती शिक्षण मंडळाकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूर, कुरुंदवाड, इचलकरंजी, कुर्डूवाडी येथे आंतरभारती विद्यालये सुरू केली. नंतर त्यांची नावे बदलली. संस्था स्वतंत्र झाल्या. विकेंद्रीकरण व विभाजन झाले.
'आंतरभारती' विचाराची शिक्षणातील गरज आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नव्याने पाहण्याची गरज आहे. काळ बदलला की जनमत बदलते. जनमत बदलले की जनाकांक्षा बदलतात व शिक्षणाचे स्वरूप बदलणे अपरिहार्य होते. शिक्षण संस्था व शाळांचा प्रयत्न सतत समकालीन आव्हानांना सामोरे जात ध्येय व मूल्य उराशी बाळगत कौशल्यांचे शिक्षण दिले तरच विद्यार्थी शाळात येणार व नवे प्रश्न, जीवन पेलू शकणार. या संस्था स्थापन झाल्या तो काळ शिक्षणाच्या दृष्टीने 'थ्री आर' [3R'S] चा होता. Reading, Writting and Arithmetic आलं की शिक्षण झालं. लेखन, वाचन व गणित विषय स्वातंत्र्यपूर्व काळाच्या निरक्षर समाजास साक्षर करण्यास पुरेसे होते. स्वातंत्र्यानंतर आपण सन १९७५ मध्ये नव शिक्षणाचे धोरण स्वीकारून १०+२+३ आकृतीबंध स्वीकारला. सन १९८६ मध्ये 'शिक्षणाची नवी आव्हाने' या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पुनर्माडणी केली, एकविसाव्या शतकाचा प्रारंभ आपण सर्व शिक्षा अभियान स्वीकारून केला. सन २००९ ला आपण सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षक कायद्यान्वये प्राथमिक शिक्षण इ. १ ली ते ८ वी चे करून माध्यमिक शिक्षण दोन वर्षाचे केले. सध्या महाराष्ट्रात ८+२+२+३ असा नवा आकृतीबंध रुजू लागला आहे. राष्ट्रीय साक्षरता मिशन, सर्व शिक्षा अभियान यशस्वी करून आपण बाराव्या पंचवार्षिक योजनेत आता (२०१३ ते २०१८) 'राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान' राबवू लागलो आहे. हे अभियान दुसरे-तिसरे काही नसून 'युनेस्को' च्या 'Global Education Digest-2012' ची ती अंमलबजावणी आहे. या अहवालातून असे लक्षात आले आहे की जगातील ३२ दशलक्ष मुले परत त्याच वर्गात राहतात म्हणजेच नापास होतात. ३१ दशलक्ष मुले शाळा सोडतात, जी सोडतात ती परत शिक्षणाकडे वळतच नाहीत. अजून शाळेत न जाणाऱ्या मुली जगात आहेत. कमी वयाची मुले पुढच्या इयत्तेत दाखल केल्याने नापास होण्याचे प्रमाण मोठे आहे. जगातल्या १९६ देशांपैकी केवळ ९१ देशातच स्त्री-पुरुष शिक्षण प्रमाण समान आहे. भारत त्यात नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, ही स्थिती बदलून आपणास एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे असेल तर नवी कौशल्ये आत्मसात करणारे शिक्षण असले पाहिजे.
लेखन, वाचन व गणित ही जगातल्या सर्व देशातील शिक्षणाची किमान आणि समान उद्दिष्टे राहिली आहेत, पण जगात वाढत्या संगणक वापराने लेखन मागे पडते आहे. अक्षर ओळख मौखिक होऊन लेखनाची जागा टंकन (Typing) घेऊ लागले आहे. शिक्षणातील भाषिक माध्यमांतही जगभर क्रांती झाली आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा व जागतिक संपर्काची भाषा झाल्याने जपान, जर्मनी, फ्रान्स, चीनसारखे भाषिक क्षेत्रात स्वभाषेस प्राधान्य देणारे देशही प्राथमिक स्तरापासून इंग्रजी शिकविण्याकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहे. आपल्याकडे मराठी माध्यमांच्या शाळात पालकांचा सेमी इंग्रजीचा आग्रह त्यातूनच आला आहे, आता नवी पिढी सरळ इंग्रजी माध्यमांच्या शाळा पसंत करते आहे. हा बदलता प्रवाह लक्षात घेऊन आपण आपल्या भाषा शिक्षणाचे धोरण व स्वरूप नको का बदलायला ? मराठी अभिमान गीत गाणे लोकल अस्मितेचा भाग, पण ग्लोबल आव्हान पेलत संधीवर स्वार व्हायचे असेल तर इंग्रजी आलीच पाहिजे.
नव्या शिक्षणात सर्जनात्मकता, नवरचना, शोध यांना असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व विषय हे क्रियाशील अंगाने शिकवणे ओघाने आलेच. आता जगभर तोंडी शिकवणे, खडू-फळा, चित्रे-तक्ते या ऐवजी संगणक, इंटरनेट, सीडीज्, डीव्हीडीज्, मल्टिमिडीया, स्क्रीन, लॅपटॉप, मोबाईल्स, फिल्मस, क्लिप्स या पलीकडे जाऊन आता थ्री डी क्लास, व्हर्च्युअल क्लास, रोबो टीचर, ऑन लाईन टिचिंग लर्निंग सार्वत्रिक होत आहे, हे लक्षात घेऊन शाळा तंत्र साधनांनी संपन्न केल्याच पाहिजेत. येणारी पिढी उपजत संगणक साक्षर होते आहे, याचे भान ठेवून शिक्षकांनी स्वतः वेळ न दवडता संगणक साक्षर व्हायला हवे. रोजच्या अध्यापनात सीडी, डीव्हीडी, एलसीडी, इंटरनेटचा वापर केला पाहिजे, तर ते शिक्षण सर्जनात्मक, क्रियाशील, रंजक, आकलनक्षम होईल.
जगात आजची गोष्ट उद्या जुनी होती आहे. इतक्या गतीने जग बदलत असताना आपले अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके दरवर्षी नको का बदलायला? एस्.एस्.सी. बोर्ड तपाने पुस्तके, अभ्यासक्रम बदलते. बालभारतीचीही तीच स्थिती. त्यामुळे आपण मुलांना कालबाह्य शिकवून कालबाह्यच नसतो का करत? नवे शोध, नवे विचार, नवी साधन यांनी मुलं अवगत होतात व शाळेत मात्र अजून रहाट-गाडगे जर आपण शिकवत राहू तर कसे होईल? अवकाश व जमीन जोडत जे देश शिकवत राहात ते विकसित होतात, आकाश दर्शन शिकवत राहणार की अवकाश वेध घेणार यावर तुमची विकास गती ठरणार आहे.
शिक्षणातील या घोकंपट्टी जगातून केव्हाच हद्दपार झाली आहे. २+४=६ शिकवत ७ का नाही हे पण सांगितलं पाहिजे. ज्या वर्गात शिक्षक कमी बोलतात व विद्यार्थी जास्त विचारतात तिथे स्वतंत्र विचारांची, शोधांची निर्मिती अधिक होत असते. मुले घरी जितके प्रश्न विचारतात तितके शाळेत का नाही विचारत असा प्रश्न ज्या दिवशी शिक्षकास अस्वस्थ करेल, त्या दिवशी विचार विश्लेषण, समीक्षा, आकलन इ. शिक्षण सक्रिय करणाच्या व विद्यार्थ्यांची बुद्धीयुक्त करणाच्या प्रक्रियेचा प्रारंभ होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षकांनी प्रश्न द्यायचे, विचाराचे..... सोडवायचे, उत्तर शोधायचे विद्यार्थ्यांनी. आपल्या शिक्षणात सध्या झेरॉक्सची चलती आहे, नवनीतचे साम्राज्य आहे. या दोन्हीतून आपले शिक्षण मुक्त होईल तो सुदिन! गृहपाठ, प्रकल्प, आदर्श उत्तरे नवनीत छाप असतात याचे पालकांना व शिक्षकांना, परिक्षकांना वैषम्य वाटत नाही याचे आश्चर्य वाटते! शिक्षकाच्या घरी पाठ्यपुस्तक नसते पण नवनीत हवेच. शाळेच्या ग्रंथालयाची स्थिती वेगळी नसते. मुलाने स्वतंत्र उत्तर लिहिले, दिले तर नापास ठरत असेल तर प्रश्नांची नवी उत्तरे, समस्यांचे नवे उपाय निघतील कसे? शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक मशीनवर भरण्याच्या काळात हजेरी रोलकॉलनी कां? असा आपल्याला प्रश्न का पडत नाही. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर ज्या शाळा येथून पुढच्या काळात सक्षमपणे करणार नाहीत त्या मागेच पडतील. मुख्याध्यापकांनी राऊंड कशाला घ्यायचा? सीसीटीव्ही जर लुगड्याच्या दुकानात लावला जातो तर शाळेत का नाही? शाळेत जे शिकवले जाते ते व्हिडिओ रेकॉर्डिंग का नाही? ते ग्रंथालयात उपलब्ध का नाही ? ग्रंथालयात ई-बुक्स का नाहीत? द्रष्टेपणा असेल, समाजाला भिडण्याची संपर्क क्षमता असेल तर या सर्व सुधारणांसाठी अनुदानाची, परिपत्रकाची, शासन आदेशाची वाट का पाहायची? सर्व संस्थेने करायच्या मानसिकतेतूनही शिक्षकांनी बाहेर पडायला हवे. समाजातील संस्था, संघटना, कारखाने, धनिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी सुसंवाद आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून राहायला हवा तरच हे शक्य.
संगणक, इंटरनेट, तंत्रज्ञानाची साक्षरता तुम्हास भौतिक समृद्धी देईल. पण तुमचे जीवन स्वास्थ्य संपन्न व्हायचं तर मूल्य शिक्षण हवेच. नैतिकता, नागरिकशास्त्र, एकात्मता, प्रामाणिकपणा, समूहजीवन, धर्मनिरपेक्षता, जातीअंत, विज्ञाननिष्ठा, स्त्री-पुरुष समानता, लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुता, भ्रष्टाचार विरोध, कर्तव्यदक्षता या गोष्टींचे अध्यापन व संस्कार ही आंतरभारती शिक्षणाची खरी ओळख. तिची फारकत अक्षम्य !
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती निर्माण करणे हे आपल्या शाळेतील शिक्षणाचे आगळे वैशिष्ट्य ठरायला हवे. महाराष्ट्रीयांची वृत्ती ही अल्पसंतुष्ट राहण्याची जशी आहे, तशी नोकरी करण्याचीही. तो स्थितीशील आहे, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, मनी असू द्यावे समाधान' हा आपला आदर्श असल्याने एका गावातून दुसच्या गावी बदली आपणास संधी न वाटता शिक्षा वाटते. यात आपली संकुचितताच सिद्ध होते. दक्षिणेतील माणूस जगात सर्वत्र दिसतो, सिंधी नोकरी करताना दिसत नाही, गुजराथी माणसांचे उद्योग जगभर, पंजाब्यांची हॉटेल्स, ढाबे प्रत्येक चौकात, सगळ्या नोकरीत मराठी माणूस. त्यामुळेच त्याच्या विकासाची सीमारेषा कर्नाटकही ओलांडत नाही. हे चित्र बदलायचे तर अभ्यासक्रमात उद्योजगता विकास (Entrepreneurship) असायला हवी. शाळेच्या ग्रंथालयात उद्योगपती, वैज्ञानिक, संशोधक यांची चरित्रे, आत्मकथने हवीत, ती आपल्या अभ्यासक्रमाचाही भाग व्हावीत.
जपानला त्सुनामी येऊनही त्यांनी जगाची मदत नाकारली व दुसरे दिवशी देश पूर्ववत सुरू होईल याकडे लक्ष दिले. कारण त्यांना सतत भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामीला तोंड द्यावे लागले, ते सतत तत्पर असतात कारण आपत्ती व्यवस्थापन त्यांना बालवाडीपासून शिकवले जाते हे मी जपानमध्ये असताना पाहिले आहे. शिवाय प्रतिबंधात्मक उपायांचे शिक्षण देण्यावरही जगात भर असतो. या दृष्टीने आपण दुष्काळ, पूर, भूकंप, अतिवृष्टी इ. शिकवायला नको का? जलस्वराज्य, जल प्रदूषण, पाण्यांचा साठ्यांचा काटकसरीने वापर, तळी इ. चे पुनर्भरण, शेतीच्या पाण्याची शाश्वती, पाऊस पाण्याची जिरवण का नाही आपल्या शिक्षणाचा भाग?
राजकीय जागृतीस छेद देणारी सामाजिक जाणीव, नियमितपणा, सचोटी, साधेपणा, सण-समारंभात, विवाहात काटकसर, महाप्रसाद भोजनावळीस प्रतिबंध वा नियंत्रण, कायदा पालनातील प्रतिष्ठा, जे माझं नाही त्याला स्पर्श न करण्याची दक्षता या साच्यातूनच देश घडतो ना? देश घडणीचे शिक्षण हेच जर 'आंतरभारती शिक्षण' होऊन जाईल तर त्याचं अनुकरण जग नाही का करणार? चार दशकांचा प्रवास पूर्ण करत आपण जेव्हा सुवर्ण महोत्सवाचे स्वप्न न्याहाळत असतो तेव्हा विकासाच्या नव्या लक्ष्यभेदाचे भान आपण ठेवलं पाहिजे. एक टप्पा पार केला की दुसऱ्याचे वेध लागले पाहिजे. आपण आपले शिक्षण, संस्था, शाळा, शिक्षक, भौतिक समृद्ध करणार की मूल्याधिष्ठित बनवत ते गुणवत्ताप्रधान करणार यावरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. साने गुरुजींनी त्यांच्या काळात देश स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते. आपण देश समृद्धीचे स्वप्न पाहू, साकार करू.
◼◼◼
गेल्या पंचवीस वर्षांत जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती यामुळे जग बहुभाषी, बहुदेशी, बहुसांस्कृतिक न राहता उलटपक्षी ते सपाट, एकभाषी, एकसांस्कृतिक होते आहे, यालाच जगाचे खेडे होणे (Worldwide Village) म्हणतात. ते संपर्क साधनांच्या विकासामुळे 'वायरलेस' झालेय, यातूनच एके काळचे गोल जग सपाट झाले. काळ, काम, वेगाचे गणित बदलून ते 'स्वकेंद्री' झाले. तुम्ही ठरवले तर 'समाजशील' नाहीतर 'स्वयंभू' होणे शक्य झाले आहे, या बदलत्या समाज परिप्रेक्ष्यामुळे सर्वाधिक बदल जर कोणत्या क्षेत्रात झाले असतील तर शिक्षणात.
जागतिकीकरणामुळे शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा बदल भाषेच्या 'माध्यम' म्हणून असलेल्या संकल्पनेवर झाला. पूर्वी परिसर भाषा हे संवाद, व्यवहार, शिक्षणाचे साधन होती. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे व तंत्रज्ञानाची माध्यम भाषा म्हणून इंग्रजी जगाची संपर्क आणि ज्ञानभाषी बनली. संगणक इंटरनेट, सॉफ्टवेअर भाषा म्हणून इंग्रजीचा केंद्रीय विकास हे त्याचे प्रमुख कारण होय. एके काळी जपान, जर्मनी, फ्रान्स हे स्वभाषेचे कट्टर पुरस्कर्ते असलेले देश गेल्या पंचवीस वर्षांत इंग्रजीमय झाले ते केवळ संपर्क क्रांतीची भाषा इंग्रजी झाली म्हणून. शिवाय, बहुराष्ट्रीय बँका, कंपन्या, व्यापार, आंतरराष्ट्रीय संघ, संघटनांची व्यवहार भाषा इंग्रजी होणे हेही त्याचे एक कारण होय. परिणामी इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय शिक्षणाची माध्यम भाषा झाली. मला जर जग जिंकायचे असेल तर इंग्रजी येणे अपरिहार्य, अनिवार्य बनले, याचे भान सामान्यातल्या सामान्य नागरिकास जगभर झाले. परिणामी वाडी, वस्ती, डोंगर, कपारीतील शेळी, मेंढी पाळणारा धनगर, भटके, मजूर, कबाडी, कुणबी सारे 'हॅलो' म्हणू लागले. मोबाईलने सर्वांना समान करून टाकले तसे टी.व्ही चॅनल्सनीही. मूल हातपाय हालवू लागले, खेळू लागले, खेळणी वापरू लागले की ते संगणक साक्षर होते ते दोन साधनांमुळे. एक रिमोट आणि दुसरे मोबाईल फोन्स. उपजत त्याला ऑन, ऑफ, क्लिक, कट, पेस्ट, फॉरवर्ड, सेंड, प्रिंट, गेम्स, कॅलक्युलेटर्स सारे न शिकवता येऊ लागते. ही नवी पिढी उपजत त्रैभाषिक पिढी बनून गेली आहे. घर मातृभाषा शिकवते, शाळा इंग्रजी तर टीव्ही हिंदी पण एक भाषा धड न येणारी ही पिढी संकरित भाषेत वाढते, बोलते. "मम्मा, चाय फिका आहे" म्हणणारी पिढी एकभाषी पालकांपेक्षा नक्कीच संवाद कुशल. भाषा म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ, व्याकरण नाही. भाषा म्हणजे मला म्हणायचे ते दुसऱ्यास कळले म्हणजे झाले. यामुळे स्वभाषा, मातृभाषा, भाषाभिमान गोष्टी कालबाह्य ठरत आहेत याचं भान येणारे, आलेले पालक आपली मुले सेमी इंग्लिश, इंग्लिश शाळात पाठवतात, ते त्यांच्या काळाची पावले ओळखण्याच्या शहाणपणातून. हे शहाणपण ज्या शाळा अंगीकारतील त्या शाळातील मुलेच नव्या काळाचे, जगाचे, वर्तमानाचे आव्हान पेलण्यास समर्थ होणार हे सांगायला आता भविष्यवेत्त्याची गरज उरली नाही.
बदलत्या वर्तमानामुळे शाळेच्या विषयात ही बदल होत आहेत. विषयांचे स्वरूप झपाट्याने बदलते आहे. पूर्वी भाषा म्हणजे गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन. आता भाषा म्हणजे संवाद, अनुवाद, आकलन, संपर्क कौशल्य (एसएमएस, व्हॉटस् ऍप, ई-मेल) पूर्वी विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, आता विज्ञान म्हणजे साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद विज्ञान, शैली विज्ञान, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, प्राणीशास्त्र, भूविज्ञान, वायुविज्ञान, अवकाशशास्त्र, खगोलशास्त्र, फॅशनशास्त्र, देहबोली विज्ञान, व्यवसायशास्त्र, विमा शास्त्र, बँकिग. जीवनाचे प्रत्येक क्षेत्र विज्ञान होऊन गेल्याने विज्ञान संकल्पना समजून घेतली की सारी ज्ञान-विज्ञाने तुम्हास शिकता येतात. कोणतीही टू व्हीलर अथवा मोटार शिका आणि मग कोणतेही मॉडेल चालवा, तसेच विषयांचे झाले आहे. गणित म्हणजे अंकमोडही कल्पना बदलून गणित म्हणजे संकल्पना विकास विस्तार. तो तुम्ही किती सूक्ष्म व किती प्रकारे करू शकता, यावर तुमची बुद्धिमत्ता ठरते. मुलांना पाढे येत नाहीत पण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी पक्की. तुमच्या इंचाचे दहा भाग होते. आता शंभर, हजार, लक्ष भाग शक्य असते. ही किमया सूक्ष्म साधन व संकल्पनांची. मूल्य आणि मिळकत यांचे नैतिक सूत्र तुम्ही शिकत मोठे झाला. नवी पिढी फक्त मिळकत जाणते. मूल्य त्यांच्या लेखी पोट भरल्यावरच्या गप्पा. जीवनाबद्दलच्या संकल्पनाच बदलल्यामुळे शिक्षण बदलणं अपरिहार्य होऊन गेले आहे. वाचन, लेखन, टंकन, संवाद, श्रवण, संशोधन, नव संकल्पना, गणित, विज्ञान, मल्टिमिडिया, मूल्य, नैतिकता, संस्कृती, इतिहास, पर्यावरण हे नव शिक्षणाचे घटक बनत चालले आहेत, विषय नव्हे.
नवे शिक्षण चिकित्सक वृत्ती विकसित करणारे असले पाहिजे, तद्वतच ते समस्या सोडविण्यास साहाय्यभूत कौशल्ये विकसित करणारे असले पाहिजे. शिक्षणात माहिती, तंत्रज्ञानाच्या जोडीने नव्या ज्ञाननिर्मितीवर भर हवा. विद्यार्थी ग्रहणक्षम असण्यावर भर हवा. पाठांतरापेक्षा आकलन महत्त्वाचे व्हायला हवे. मौखिक व लिखित भाषा कौशल्य हवे. ज्ञान संपादनाची साधने व संपादन कौशल्य देण्यावर भर हवा. खडू-फळा (Chalk and Talk) नको, जोडा नि ओढा (Plug and Chug) असे नवे तंत्र हवे. जिज्ञासा व कल्पनांची स्वैरता जोपासणारे शिक्षण हवे. वेळापत्रकापेक्षा विद्यार्थ्यांना काय मिळाले, कळाले महत्त्वाचे व्हायला हवे. स्मरणापेक्षा समजण्याला महत्त्व हवे. पाठ्यपुस्तक साधन बनायला हवे, साध्य नको. शिक्षण कृतिशील, रचनात्मक हवे, मौखिक नको दृकश्राव्य हवे. मूल्यमापन कसोटीचे आकलन हवे. शिक्षक न्यायाधीश नाही, साहाय्यक, मार्गदर्शक हवा. पाठ्यक्रम दरवर्षी नवा हवा.
खडू, फळा, तक्ते, मॉडेल्सची जागा फिल्म, व्हिडिओ, कॅसेटस्, त्रिमिती, चौमिती फिती, मल्टिमिडिया यांनी घ्यायला हवी. शालेय प्रशासन पारदर्शी होण्यासाठी शाळा व घर जोडणारे नेटवर्क हवे. घरी बसून पाल्याला काय येते, न येते, तो काय करतो, न करतो समजायला हवे. विद्यार्थी जीपीएसवर हवा. क्लोज टीव्ही सर्किटवर शाळा हवी, प्रत्येक तासाचे रेकॉर्डिंग हवे. चुकलेला अभ्यास भरून काढण्यासाठी चुकलेल्या तासाच्या कॅसेटस्, ग्रंथालयात उपलब्ध हव्यात. ग्रंथालयात पुस्तके नकोत, ई-साधने (ई-बुक्स, कॅसेटस्, सीडीज, फिल्मस) हवीत, वही नको, लॅपटॉप हवेत. घरी एक, शाळेत एक. दोन्ही ऑनलाइनने जोडलेले, रिकाम्या हाताने जायचे, डोके भरून यायचे म्हणजे शिक्षण.
शिक्षणात पालक सहभाग महत्त्वाचा. पालक शिक्षित होईल तसे शिक्षण गतिमान होणार. शिक्षक रोज नवा हवा. नवज्ञान संपन्न. औपचारिक पात्रतेपेक्षा कौशल्य वृत्ती, व्यासंग महत्त्वाचा. शिक्षण व्यवसाय नाही, प्रवृत्ती आहे, प्रक्रिया आहे. ती नित्यनूतन व परिवर्तनशीलच हवी. मुले संगणक साक्षर जन्मत असतील तर संगणक निरक्षर शिक्षक कालबाह्यच समजायला हवा. स्मार्ट बोर्ड, डिजिटल वॉल, थ्रीडी क्लास म्हणजे नवी शाळा. घर यंत्राने भरलेले मग शाळा मंतरलेली का ? ती पण नव यंत्र, तंत्रानी युक्त हवी.
मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या त्या वेळचे सामाजिक पर्यावरण व शिक्षणविषयक जाणिवा भिन्न होत्या. जागतिकीकरणामुळे माणसाचे जिणे, जगणेच जागतिक झाले. सन २०४० साली अवतरणारे जग नक्कीच आजच्यापेक्षा प्रगत असणार. आजचा काळ आपण तेव्हा खऱ्या अर्थाने साजरा केला असे होईल, जेव्हा आपण २०४० च्या शिक्षणाच्या योजनांचा संकल्प आज करत उद्याच्या नव्या पायाभरणीस प्रारंभ करू. सन २०१५ नंतरचे अवतरणारे जे शिक्षणाचे विकासमान जग असेल. त्यावर 'युनिसेफ' या आंतरराष्ट्रीय संघटनेने आतापासूनच विचार करायला सुरुवात केली आहे. 'Global Thematic Consultation on Education in the Post-2015 Developmental Agenda' युनिसेफनी प्रकाशित केला आहे. त्यात उद्याच्या शिक्षणाचे अपेक्षित प्रतिबिंब आहे. ते स्पष्ट करताना म्हटले गेले आहे की, "There should be a reliable and disaggregated database linked to past and current data from nation's education system to effectively monitor progress towards the goals of the new agenda. Advance in technology and engagement with real-time data collection provide opportunities to avoid some of the monitoring limitations in the previous framework, such as the failure to focus on relevant, context-based, measurable and equitable learning outcomes, skills and competencies." यातून स्पष्ट होते की उद्याच्या शिक्षणाचे नियोजन करताना तुम्हाला काल, आज आणि उद्याचे भान हवे. ते भावनिक असता कामा नये. ते वस्तुनिष्ठ नि वास्तव हवे. अजून आपण आपल्या विद्यार्थी, शिक्षकांचा IQ, EQ काढत नाही. पाहात नाही. ज्यांना आणि जे शिक्षण देणार-घेणार त्यांची बौद्धिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक क्षमता व शक्यताच माहिती नाही. त्यांच्या विकासाचा आलेख तुम्ही काढणार कशाच्या आधारे ? तुमच्या जवळ सांख्यिकी माहिती (Database) हवा. तर तुम्ही उद्याचे रंगवणारे चित्र अपेक्षित यश (outcome) देणारे असेल. उद्याचे शिक्षण भविष्यलक्ष्यी, ससंदर्भ, मापनक्षम विद्याथ्र्यांचा समान विकास करणारे, कौशल्य व क्षमताधिष्ठित व्हायचे तर जाणिवा स्पष्ट हव्यात. हा काळ आपण जाणिवा विकसित करण्यासाठी समर्पित करू या, तर उद्याचे स्वप्न साकारेल. काही वर्षांपूर्वी शिक्षकांशी संवाद करताना, मी म्हटले होते की खरा शिक्षक तो, जो उद्याच्या शिक्षणाचा वेध घेत स्वत:ला समृद्ध करत राहतो. खरे शिक्षण ते, जे उद्याची आव्हाने ऐकत सावधपणे पुढची पावलं टाकत राहते. 'सावध ऐका पुढल्या हाका!'
◼◼◼
जगात शाश्वत असे काही नसते. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलत असतात. पण माणूस जेव्हा भविष्याचा विचार करतो, तेव्हा 'शाश्वत' घटक महत्त्वाचा ठरतो. संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) एकविसाव्या शतकाचा विचार करून नियोजन, विचारविमर्श करायला प्रारंभ केला तेव्हा त्याच्या लक्षात आलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी होती की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माणसाने निसर्गाची अपरिमित हानी केली असून निसर्ग नाशाचा हा क्रम भविष्यात असाच चालू राहिला तर जगाला फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. हवामानातील बदल, अनियिमित पाऊसमान व तपमान, संपत चाललेली खनिज संपत्ती, पाण्याची उधळपट्टी, जंगलतोड, प्रदूषण, असमान विकास, प्रगतीचा असमतोल हे असे काही मुद्दे होते की जगाने त्यावर विचार करून त्वरित हस्तक्षेप करण्याचे धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार जगभर शिक्षणाचे एक धोरण असावे तरच अपेक्षित बदल, विकास साधता येईल यावर जगाचे एकमत होऊन सन १९८५ च्या दरम्यान 'शाश्वत विकासासाठी शिक्षण' (Education For Sustainable Development) (ESD) असे सूत्र निश्चित करून त्यानुसार शिक्षणाचा विकास पट तयार करण्याचे ठरविण्यात आले.
'शाश्वत विकासासाठी शिक्षण' हा शिक्षणविषयक असा एक दृष्टिकोन आहे की ज्याच्याद्वारे आपणास मनुष्यास त्याच्या भविष्यविषयक जबाबदारीची जाणीव निर्माण करून देऊन ती पेलण्याची क्षमता त्याच्यात निर्माण करणे शक्य होईल. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८७ ते २००२ असा सलग पंधरा वर्षे विचार करून २००५ साली 'Learning the Treasure within' नावाचा एक अहवाल युरोपियन कमिशनच्या साहाय्याने प्रकाशित केला. त्यातून शिक्षणाद्वारे माणसाच्या अंतर्विकासाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. ते प्राप्त करण्यासाठी चार मूलभूत गोष्टी ठरविण्यात आल्या. त्यानुसार १) प्राथमिक शिक्षणात मूलभूत सुधारणा करणे, २) वर्तमान शिक्षणक्रमाची पुनर्रचना करणे, ३) शिक्षक प्रशिक्षण, आणि ४) विविध प्रकारच्या शिक्षण स्वरूपात (औपचारिक, अनौपचारिक व माध्यम शिक्षण) बदल करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रथमच शिक्षणास जीवनाचा निरंतर घटक ठरविण्यात आले. कारण मनुष्य जीवनभर शिकत रहिला तर जीवनभर तो विकसित व सक्षम होत राहणार, हा त्यामागचा तर्क नि विचार होता.
अंतर्विकासाच्या शिक्षणात गेल्या दशकभराच्या काळात (२००५ ते २०१४) दिल्या गेलेल्या शिक्षणात पाच गोष्टींवर भर देण्यात आला होता,
१) समजून घ्यायला शिकणे (Learning to know) -
या अंतर्गत शाश्वत विकासातील निसर्ग सहभाग व योगदान यांची जाणीव करून देण्यात आली. तसेच समाजात गरजा ह्या निरंतर वाढत असतात याचे भान देण्यात आले. स्थानिक गरजांच्या पूर्ततेचा वैश्विक पातळीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास झाला. त्यातून वैश्विक व स्थानिक गरजांच्या अंतर्संबंधांची गुंतागुत स्पष्ट झाली. यामुळे विश्वभान येण्यास साहाय्य झाले.
२) कृतिशीलता शिकणे (Learning to do) -
आपल्या दैनंदिन जगण्यात यथार्थतेचे भान असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दैनंदिन गरजा, क्रिया, उपक्रम, निर्णय याचा जो परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत असतो, त्याची आपणास जाणीव हवी. ती व्हायची व तिचा विकास व्हायचा तर आपल्या आजूबाजूच वातावरण सुरक्षित हवं. कारण ते तसे असेल तरच आपला विकास होणार.
३) जगायला शिकणे (Learning to be) -
माणूस म्हणून जगत असताना तत्त्व आणि मूल्यांचे असाधारण महत्त्व असतं. ते घेऊन जगणं म्हणजे माणूस म्हणून जगणे. तसे जगत असताना पर्यावरण, समाज आणि आर्थिक स्थिती यांचीही जाण हवी. माणसाच्या जगण्यात समग्रपण येते ते शरीर व मनाचा समतोल विकास, बुद्धीचे संतुलन, संवेदनशीलता, सौंदर्य आस्वाद आणि आत्मिक समाधान या गोष्टींनी यामुळे तो माणूस होतो.
४) समूह जीवन शिकणे (Learning to live together) -
जगत असताना आत्मकेंद्रिततेस छेद देऊन आपला प्रत्येक निर्णय समजानुवर्ती, समाजशील कसा होईल हे पाहायला हवे. सामाजिक संयम व सहनशीलता, पर्यावरण जागरूकता व संवर्धन, कार्यसंस्कृती, सार्थक जीवनभान यातूनच समूह जीवन विकसित होते याचे भान शिक्षणातून देणे.
५) व्यष्टीतून समष्टीकडे जाण्यास शिकणे (Learning to transform oneself to society) -
शिकण्याच्या सर्व क्रिया, प्रक्रियांतून उपजत एकात्म विकासाचे भान देणे, जेणेकरून माणूस हा भविष्याची जबाबदारी पेलण्यास सक्षम होईल. ही सारी मूल्ये, कौशल्ये, जाण, भान घेऊन गेल्या दशकात जगभरात तयार झालेल्या नव्या पिढीपुढील प्रश्न व आव्हाने लक्षात घेऊन २०१५ नंतरच्या शिक्षणाचा आराखडा तयार करण्याचे कार्य राष्ट्रसंघाने हाती घेतले असून त्याचा जो मसुदा तयार करण्यात आला आहे तो पाहता भविष्यलक्षी शिक्षणातील अपेक्षित बदल ध्यानात येतील.
तत्पूर्वी जगातील श्रेष्ठ विद्यापीठ म्हणून अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाने शिक्षणातील गुणवत्ता शाश्वत ठेवली कशी हे समजून घेणे अशासाठी आवश्यक आहे की शतकानुशतके एखादी शिक्षण संस्था सातत्याने जेव्हा गुणवत्ता टिकवते तेव्हा तिचे व्यवस्थापकीय कौशल्य जितके महत्त्वाचे तितकेच कालानुक्रमिक शिक्षण बदलाचे तिचे भानही ! हार्वर्ड विद्यापीठ १६३६ साली सुरू झाले, ते साधे कॉलेज म्हणून. ते आहे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट परगण्यातील केंब्रिज येथे. इंग्लंडचं केंब्रिज विद्यापीठ व याचा तसा संबंध नाही. आज हे जगातले सर्वात श्रीमंत विद्यापीठ म्हणून गणलं जाते. त्याची श्रीमंती अनेक अंगांनी सांगता येईल. एक तर हे खासगी विद्यापीठ आहे. जॉन हार्वर्डनी या विद्यापीठास १६३९ मध्ये सुमारे ७८० पौंड स्टर्लिंगची देणगी दिली व त्यांचे नाव तत्कालीन कॉलेजला देण्यात आले. कालौघात कॉलेजचे रूपांतर विद्यापीठात झाले. पण यापेक्षा त्या काळात मिळालेल्या ४०० पुस्तकांचे महत्व विद्यापीठास आजही वाटते हे विशेष! आजमितीस सुमारे २०,००० विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेतात. या विद्यापीठामार्फत ४६ पदवीपूर्व अभ्यासक्रम, १३४ पदवी अभ्यासक्रम. आणि ३२ व्यावसायिक पदव्यांचे शिक्षण दिले जाते. सध्या हार्वर्ड विद्यापीठात वैद्यकशास्त्र (Medicine), देव, धर्म (Divinity), विधी (Law), दंतचिकित्सा (Dental Medicine), कला व विज्ञान (Arts and Science), व्यवसाय (Business), विस्तार (Extension), रचना (Design), शिक्षण (Education), सार्वजनिक आरोग्य (Public Health), प्रशासन (Government), अभियांत्रिकी व उपयोजित विज्ञान (Engineering and Applied Sciences) या विद्याशाखातील अध्ययन, अध्यापन, संशोधन कार्य चालते. ३२ शतलक्ष डॉलर्सची गंगाजळी असलेल्या या विद्यापीठाचा परिसर २०० हेक्टर्सचा आहे. निसर्गरम्य अशा या परिसरात क्रीडा, संगीत, मनोरंजन, निवास, ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. संदर्भातील सर्व अद्ययावत सोयी असून संगणक, इंटरनेट, उपग्रह इत्यादींची स्वत:ची आस्थापना आहे. या विद्यापीठाची खरी श्रीमंती म्हणजे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. ४३ नोबेल पुरस्कारधारक, ४९ पुलित्झर पुरस्कारधारक विद्यार्थी ही या विद्यापीठाची खरी श्रीमंती! अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष, सिनेटर्स, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ या विद्यापीठाने दिले.
हार्वर्ड विद्यापीठ जगातील प्रथम क्रमांकाचे शिक्षण केंद्र म्हणून जे प्रसिद्ध आहे, त्याचे रहस्य विद्यापीठाच्या खालील वैशिष्ट्यात दिसून येते-
१) त्या त्या विषयातील जगातील श्रेष्ठ शिक्षक नेमण्याचा हार्वर्ड विद्यापीठाचा पहिल्यापासून लौकिक आहे. आजमितीस २०,००० विद्यार्थ्यांना २००० प्राध्यापक शिकवतात. अन्य १२,००० कर्मचारी पूरक सेवा बजावतात.
२) विद्यार्थी केंद्रित प्रेरक वातावरण निर्मितीवर विद्यापीठाचा भर असतो. त्यामुळे जगातील अत्यंत हुषार विद्यार्थ्यांचा ओढा या विद्यापीठाकडे असतो.
३) विद्यापीठामार्फत इतके अभ्यासक्रम, विषय शिकविले जातात की त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीचा अभ्यासक्रम व तोही त्याच्या आवडत्या विषयात निवडण्याचे पर्याय हेच या विद्यापीठाच्या यशाचे खरे रहस्य होय.
४) शैक्षणिक वातावरण, व्यक्तिमत्त्व विकासास वाव, प्रोत्साहन, साहाय्य अशा प्रकारचा वाव देणाच्या सुविधांची रेलचेल.
५) नेतृत्व गुणास वाव व नोकरीची हमी हे या विद्यापीठाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मानले जाते.
६) निवासी सुविधा असलेले हे जगातले मोठे विद्यापीठ. त्यामुळे कँपस कल्चर विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
७) हार्वर्ड विद्यापीठाचे ग्रंथालय हे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वाधिक सुविधा, अद्ययावत विपुल ग्रंथ संपदा, संदर्भ संग्रह, जागतिक संपर्क सुविधा केंद्र म्हणून या ग्रंथालयाकडे पाहिले जाते. विद्यापीठ परिसरात छोटीमोठी ७० ग्रंथालये आहेत.
८) भाषा, प्रांत, देश, संस्कृती, वंश, लिंग इ. दृष्टीने पाहायचे तरी हे खरे जागतिक विद्यापीठ ठरते. ९) भाषा, कला, संस्कृती, संगीत, क्रीडा, जीवन कौशल्ये, तंत्रज्ञान सर्व तऱ्हेच्या परंपरेसह आधुनिकता स्पर्शण्याची विद्यापीठाची विकास शैली हेच तिचे खरे बलस्थान म्हणावे लागेल.
१०) हार्वर्ड विद्यापीठाची पारंपरिक गुणवत्तेची प्रतिष्ठा विद्यार्थ्यास जगातल्या सर्वोत्तम संधी (वेतन, पद, प्रतिष्ठा) मिळवून देते. हार्वर्ड विद्यार्थी हीच त्याची ओळख व शक्ती.
शाश्वत गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने आपण एकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आपणास असे दिसून येते की शिक्षण प्रचलित शिक्षणास छेद देणारे आहे. ते शिक्षणविषयक पूर्व संकल्पना मोडीत काढते. ते अत्यंत लवचीकपण आहे, कारण ते प्रत्येक वेळेस बदलाला काळाच्या, विशेषतः समकालाच्या कठोर कसोटीवर स्वत:ला पारखण्याचा प्रयत्न करते त्याबरोबर ते असे पाहते की वर्तमान शिक्षण प्रक्रिया एकाच वेळी सर्जनात्मक असेल व दुसरीकडे ती विद्यार्थ्यांचा शिकण्यातील आनंद, रस वाढावा म्हणून रंजक, सुबोधही असेल. वर्तमान शिक्षणाच्या या साऱ्या आशा, आकांक्षांची पूर्तता करताना त्याचे आव्हानात्मक होणे, शिवाय व्यामिश्र (Complex) बनणे, स्वाभाविकच म्हणावे लागेल. यातून ते सुलभ होते आहे, ते तंत्रज्ञानाच्या नित्य नव्या संसाधनांतून.
तंत्रज्ञान विकासामुळे अगणित शक्यता माणसास खुणावत आहेत. जागतिकीकरणामुळे एकात्मक विकासाचे क्षितिज दृष्टिपथात येऊ लागले आहे, ऊर्जाचे नवनवे प्रकार माणूस शोधून काढत आहे. खनिजे संपत येत असताना सौर ऊर्जेचा पर्याय माणसाने शोधून काढला अन् पेट्रोल संपले तर जग थांबेल या कल्पनेस पूर्णविराम मिळाला. आरोग्य, औषध, वैद्यकीय साधन विकासातून माणूस 'मृत्युंजय' होतो की काय असे वाटू लागले आहे. कारण दरवर्षी जागतिक सरासरी आयुर्मान वाढते आहे. पर्यावरण विध्वंसास पर्याय म्हणून 'हिरवे जग' माणूस साकारू लागला आहे. संपर्क साधन विकासामुळे जग खेडे बनून गेले. अवकाशातील माणसाच्या चढाईमुळे नवी पृथ्वी माणसाच्या तळहातावर येईल हे निश्चित. प्रश्न आज का उद्या इतकेच! तीच गोष्ट समुद्र तळाची. तिथे माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकेल हे आता काही स्वप्न नाही. सत्याचा हा शोध म्हणजे नवशिक्षणाची मर्दुमकी. ती साधली केवळ शिक्षणाच्या शाश्वत गुणवत्ता भानामुळे, हे आपणास विसरून चालणार नाही. उद्याचे जग आजच्यापेक्षा समृद्ध असेल, ते सुखी करण्याचे आव्हान आज आपणापुढचा खरा प्रश्न आहे. जगातील विविध देशांकडे विकासाच्या दृष्टीने पाहिले तर तीन प्रकारची राष्ट्रे दिसून येतात. १) विकसित २) विकासशील ३) अविकसित. या देशांत विकास व विषमतेची दरी आहे. ती भरून काढणे गुणवत्ताप्रधान शाश्वत शिक्षणापुढचे खरे आव्हान आहे. वर्तमान शिक्षणाच्या या स्थितीचा विस्तृत अभ्यास टोनी बॅग्नर यांनी आपल्या 'The Global Achievement Gap' या ग्रंथात केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नवी पिढी हे माहिती व तंत्रज्ञान युगाचे अपत्य (Ikid) असल्याने गणुवत्तेच्या दृष्टीने या पिढीत काही नव्या कौशल्यांचा विकास करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य होणार आहे. त्यांनी सांगितलेली कौशल्य पुढीलप्रमाणे होत.
१) चिकित्सक विचार करण्याची क्षमता.
२) प्रश्न / संकटे सोडविण्याची शक्ती.
३) अंतर्जालीय क्षेत्र विकास (Network) संबंधी समायोजन (Adjustment)
४) प्रभावक्षम नेतृत्व
५) तत्पर समायोजन कौशल्य (Agility)
६)नव तंत्र व कौशल्य ग्रहण क्षमता (Adaptability)
७) उद्योजकतेत पुढाकार
८) मौखिक व लिखित संपर्क, संवाद कौशल्य
९) माहिती संपादन व विश्लेषण कौशल्य
१०) जिज्ञासा व कल्पनाविहाराची ओढ.
या कौशल्यांच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय शिक्षण प्रक्रिया व व्यवस्थेचा विचार करू लागतो तेव्हा लक्षात येते की, आपण किती कालबाह्य शिक्षण देत बसलेलो आहोत. ज्या शिक्षणात काळाचे आव्हान पेलण्याची व प्रश्न सोडविण्याची क्षमता नसते, ते शिक्षण कुचकामी खरेच. त्यासाठी वर्तमानाचे भान असणारे शिक्षण आशय, विषय, पद्धती सर्वच दृष्टीने ते समकालिक व्हायचे तर जागतिक पातळीवर होणारे बदल आपण सतत टिपण, निरीक्षण करत बदलत राहायला हवे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके जगात दरवर्षी बदलत असताना आपण दशकभर एकच शिकवत राहणे म्हणजे काळाच्या मागेच राहणे नाही का ?
त्यासाठी वर्तमान शिक्षणात खालील बदल करणे म्हणजे आपले शिक्षण गुणवत्ताप्रधान शाश्वत विकासाचे साधन बनवणे ठरेल.
१) शाळा, वर्ग पर्यावरणानुकूल बनवणे.
२) शाळेचे वेळापत्रक वेळ केंद्रित न करता ते परिणामकेंद्री बनवणे. ३) विद्यार्थ्यांना कळेल, आकलन होईल व ते त्यात कृतिशीलपणे वा सक्रियपणे सहभागी होतील असे अध्यापन करणे.
४) शिक्षण संश्लेषक (Synthesis) पद्धतीचे हवे. शिकवण्यापेक्षा समजण्यावर भर हवा.
५) पाठ्यक्रम ठरविताना मुलांच्या आकलन, ग्रहण क्षमतांचा पूर्वाभ्यास, पूर्वचाचण्या महत्त्वाच्या प्रयोग, संशोधनातून अभ्यासक्रम निर्मिती आवश्यक.
६) सर्व विषय कृती, निरीक्षण, सर्वेक्षण, प्रकल्प, गट चर्चा इ. माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागित्व देणारे असायला हवे.
७) शिक्षणाची पार्श्वभूमी व लक्ष्य जग हवे, आज अभ्यासक्रमाचे क्षितिज गाव, राज्य, राष्ट्र या परीघातच फिरते आहे.
८) शिक्षण विद्यार्थी केंद्री व विद्यार्थीलक्ष्यी हवे. आज ते शिक्षक केंद्री व शिक्षकलक्ष्यी आहे. शिक्षक सर्ववेळ सेवक बनवणे हा शिक्षण परिवर्तनाचा कृति कार्यक्रम व्हायला हवा.
९) शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी आवड, कल, क्षमता इत्यादींचा विचार करत प्रगतीचे स्वातंत्र्य हवे. प्रत्येक विद्यार्थी निहाय काळ, काम, वेग यांचे गणित घालणे आवश्यक.
१०) मूल्यमापन स्मरणशक्तीचे न होता आकलन, ग्रहण, कौशल्य, समज, वेगळेपणावर आधारित हवे.
११) स्वयंमूल्यमापन, निरीक्षण, परीक्षणाच्या संधीतून विद्यार्थी विकासाचे मोजमाप व्हायला हवे.
१२) आज अंक व अक्षर साक्षरता हेच शिक्षण होऊन बसले आहे, त्याऐवजी जीवन कौशल्य विकास (Life Skill Development) हे शिक्षणाचे परिमाण (Standard) व्हायला हवे. तसे झाले तर ते जीवन शिक्षण (Basic Education) होईल.
◼◼◼
या नव्या मुलांची बालवाडीही नवी हवी. म्हणजे बालवाडी शिक्षिका संगणक साक्षर हवी, ती किमान पदवीधर हवी. ती किमान MS-CIT तर हवीच, तिला लॅपटॉप हवा, शाळेचा वर्ग थ्री डायमेन्शनल हवा. फळा स्मार्ट बोर्ड हवा, तो टच स्क्रीनसारखा असतो, त्यास सी.डी., पेनड्राइव्ह, इंटरनेट कनेक्शन जोडले की तुमच्या टच स्क्रीन मोबाईल्स प्रमाणे स्वाईप करून नवे नवे दाखवत, बोलत, गात, नाचत शिकवत रहातो. वर्गात खोटा-खोटा म्हणजे आभासी (Virtual) पूर, भूकंप, चांदणे, जंगल, अंधार, इंद्रधनुष्य, पाऊस, हवा बदल (गरमी, थंडी, ढग) सारे निर्माण करता येते. वर्गाच्या भिंतीही डिजिटल करता येतात. मुलांना अक्षर, अंक ओळख करून दिली की त्यांना पाटी-पेन्सिलची गरज नाही. त्यांना आता शिकवला जातो की बोर्ड. त्यामुळे अक्षर काढणे आता नव्या शिक्षणात इतिहासजमाच झाले आहे. त्यांना शिकवायचे ते टंकन (Typing). टायपिंग आले माउस, सिलेक्ट, क्लिक, कट, पेस्ट, फॉर्वर्ड, सेंड, डिलीट, प्लस, मायनस, इन टू, डिव्हायडेड बाय, सेट, कलर, ऍनिमल, बर्डस्, प्लँटस्, ऱ्हाईम्स, साँग्ज थोडे-थोडे शिकवत राहायचे. मल्टिमिडिया, टी.व्ही., फिल्म, स्लाइडस्, डी.व्ही.डी, एम.पी.थ्री., मॉनिटर्स, इंटरनेट असले की झाले. बाई, आया, लाकडी घोडा, तक्ते, ठोकळे, सापशिडी, गलोरी, बाहुलीची बालवाडी मागच्या शतकाबरोबरच संपली खरे तर !
एकदा तुम्ही डिजिटल किंडरगार्टन सुरू केली की डिजिटल प्रायमरी स्कूल सुरू करणे सोपे. डिजिटल क्लास, थ्रीडी थिएटर, लँग्वेज लॅब, फार्म हाउस, परसबाग, मैदान, खेळणी (डिजिटल), ई लायब्ररी, ई-बुक्स, प्रत्येक मूल स्वत:चा लॅपटॉप (कारखान्याने दिलेला) वापरेल. विद्यार्थ्याचा स्वत:चा लॅपटॉप घरी असेल. शाळेतला शाळेत. दोन्ही इंटरनेटने एकमेकांना जोडलेले असतील. त्यामुळे दफ्तर, सँक, टिफिन, वॉटर बॉटल्स सगळ्याची हमाली बंद, रिकाम्या हातानी यायचे आणि डोके भरून न्यायचे म्हणजे नवी शाळा. शिक्षक एस्एम्एस् करून रोज होमवर्क, सुट्टी, रजा, पालक सभांची सूचना देत राहतील. दर आठवड्याची प्रगती व्हॉटस्अप्सवर सचित्र कळेल. आपला मुलगा, मुलगी शाळेत कसा शिकतो, नाचतो, गातो, उत्तर देतो, खोड्या करतो ते पालकांना घरी बसून त्यांच्या टी. व्ही वर / पी. सी. वर पाहता येईल. त्यासाठी शाळेणे मुलाला प्रवेश दिला की केबलने पालकांचे घर शाळेला जोडले जाईल. शाळेची बस जीपीएस युक्त असेल, बस कुठल्या स्टॉपवर आहे ते पालकांना त्याच्या मोबाईलवरून पाहता येईल. शाळेत कँटीन, हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स, काऊंसिलर, सायकॅट्रीक (बालमानसशास्त्रज्ञ), आहार तज्ज्ञ (डाएटिस्ट), फिजिओथेरपिस्ट, कोच, आर्ट टीचर, म्युझिक टीचर, लँग्वेज टीचर (तोच मराठी, इंग्रजी, हिंदी, जपानी, फ्रेंच शिकवेल, तो भाषांची पॅकेजीस/प्रोग्राम शिकवणारा असेल), सायन्स टीचर (तो बॉटनी, बायॉलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी, फिजिक्सचे ऍप्स वापरणारा असेल), सोशल टीचर (तो सोशल सायन्स, सिव्हिक्स, कल्चर शिकवेल, तो शाळेतला सगळ्यात श्रेष्ठ टीचर असेल!) मॅथस्, जॉमेट्री, जिऑग्राफी, स्पेस सायन्स, लाईफ सायन्स, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, होम सायन्स, होम ऍप्लायन्सेस, व्हिडिओ कार्टिंग असे नवे विषय शाळा शिकवेल. हे विषय ऐच्छिक असतील. पण नव्या विद्यार्थी, पालकांचा कल त्यांच्याकडे अधिक असेल.
हायस्कूलला स्पेस सायन्स, वर्ल्ड जॉग्रफी, वर्ल्ड हिस्ट्री, इंटरनॅशनल /काँटिनेंटल कल्चर, इकॉनॉमिक्स, इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर, पॉलिटिक्स, सिव्हिक्स, मॅनेजमेंट, लँग्वेज, लिटरेचर, मेडिकल, लॉ, असे मोठे विषय सोपे करून सांगणारे तोंड ओळख करून देणारे अभ्यासक्रम असतील. हायस्कूल्समध्ये स्पेस लॅब, मॉक पार्लमेंट, लँग्वेज लॅब, सायन्स लॅब, ई-लायब्ररी, ई-बुक्स, ई-जर्नल्स, जिम्नॅशियम, फायरिंग रेंज, रनिंग ट्रॅक्स, इनडोअर, आऊट डोअर स्टेडियम्स, स्विमिंग टॅक्स, बँक, पोस्ट, शॉप्स, मिनी मॉल्स, मार्केट, एटीम्स, वेंडिंग मशिन्स (चॉकलेट, दूध टीन्स, स्टेशनरी, गॅजेटस् इ. पैसे टाकून मिळणारी) सर्व असेल, मुले लॅपटॉप, मोबाईल्स धारक असतील, शिक्षक व्हर्च्युअल होतील.
संस्थाचालक शाळेचे पदसिद्ध सीएमडी असतील, शाळेचे प्राचार्य हार्वर्ड रिटर्न असतील. पालक किमान पदवीधर असतील. शाळा हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिजची ब्रांच असेल. पण या सर्वांचा पाया, आत्मा स्थानिक असेल. इथली माणसे, इथली माती, इथली मने पाहता पाहता जागतिकीकरणाचे अंग होतील, त्याचे कारण २०१५ पासून युनो, युनेस्को, युनिसेफ मार्फत 'Post-2015' (http://www.unesco.org/new/en/education/themes/leading-the-international-agenda/education-forall/education-post-2015) नावाचे एक व्हिजन डॉक्युमेंट मी नुकतेच इंटरनेटवर वाचले आणि लक्षात आले की जे नायजेरिया, युगांडा, इथिओपिया, लिबिया, सीरिया, भूतान, श्रीलंकेला होणार आहे, त्याच्याआधी ते भारतात नक्कीच होणार. वरील स्वप्न शाळेस पैसे फार लागणार नाहीत. आज आपण कॉंक्रीटच्या नामक गोदामी शाळा बनवत आहोत. त्यापेक्षा कमी पैशात या शाळा शक्य आहेत. पूर्वी बँकेस १००'x१००' ची जागा लागायची. आता १०x१० ची केबिन, एटीएमद्वारे सर्व काम करते. शाळेचेही तसेच आहे. एकविसाव्या शतकातली भविष्यलक्ष्यी शाळा, शिक्षण, शिक्षक विद्यार्थी, पालक हे नव्या ज्ञानसमाजाचे स्टेकहोल्डर रहाणार आहेत. नवे शिक्षण हळूहळू अंकीय, संगणकीय, अंतर्जालीय होत होत ते एकदिवस ऑनलाइन, आभासी (Virtual) होत 'One to One' होईल. त्यांची सुरुवात आपण बालवाडीपासून करू. विद्यापीठाचे स्वप्न पाहू. उद्याच्या जगात स्थान, वेळ, गती, अंतर या साऱ्या गोष्टी शून्य होऊन जातील. तुम्ही जिथे असाल, तेच तिथेच जग असेल. जग जिंकायची तयारी करायची असेल तर वरील नव्या जगाची रचना, निर्मिती आपण आजच नि आत्ताच करायला हवी.
•••
एकीकडे पालक, शिक्षण तज्ञ दप्तराच्या ओझ्याबद्दल बोलत आहेत नि दुसरीकडे राजकीय पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत टॅबलेट, लॅपटॉप देण्याच्या गप्पा करत आहेत. पण शाळा स्वत:हून पुढाकार घेऊन 'शाळा' नि 'घर' wi-fi ने जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. सोपे आहे (महाग असले तरी !) विद्यार्थ्यांचा शाळेतला टॅब शाळेने द्यायचा, घरचा टॅब किंवा लॅपटॉप पालकांनी घ्यायचा. दोन्ही टॅब किंवा लॅपटॉप नेटनी जोडायचे, दप्तराचे ओझे गुल ! टिफीन, वॉटर बॅगची जबाबदारी शाळेची, मध्यान्ह भोजन व शुद्ध पाण्याची गॅरंटी दिली की झाले. मुलांनी हात हलवत जायचे नि डोके भरून परतायचे. शाळेत दिलेले होमवर्क घरच्या पीसीवर फॉरवर्ड करायचे, घरी केलेला अभ्यास शाळेतल्या पीसीवर किंवा शिक्षकांच्या / शाळेच्या सीपीयूवर फॉरवर्ड करायचा. मला माहीत आहे, भारत गरीब आहे, पण दरिद्री नाही हे तर मान्य करू या. कल्पनादारिद्र्य जाणे महत्त्वाचे. साधने जोडणे एकविसाव्या शतकात पूर्वीच्या तुलनेने सोपे झाले आहे. भारताचे दरडोई उत्पन्न वाढत आहे.
नवे तंत्रज्ञान तुमचे वेळ, श्रम, पैसा वाचवायलाच जन्माला आले आहे, याबाबत आज शहाण्या माणसाला शंका राहिलेली नाही. रिक्षा, बस येणार म्हणून लहान मुलांनी झोप टाकून, मारून उठायचे. रिक्षा, बस येणार म्हणून पंधरा ते वीस मिनिटे अगोदर रस्त्यावर येऊन उभं राहायचे. आता याची गरज उरली नाही. रिक्षा, बसमध्ये जीपीएस बसवा. घरी मोबाईलवर कळते बस, रिक्षा केव्हा येणार ते. शिवाय, समान गुणवत्तेच्या व समान समृद्ध शाळांचे आश्वासन आपण जोवर शासनाकडून मागणार नाही, 'सर्वांना समान शिक्षणाची शाश्वती मिळवणे' म्हणजे घराशेजारी मुले शिकणे. नियोजन, नीती, तरतूद यात दृष्टी नसल्याने आपण कोणकोणत्या दिव्यांना तोंड देत आहोत, हे शक्य नाही का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची हमी देणे शक्य नाही का? प्रत्येकाची वाहने वाचली तर रस्त्यावर गर्दी, ट्रॅफिक जाम टाळता नाही का येणार? आपण थोडासा असा 'अविचार' करायला नको का शिकायला ?
खेड्यापाड्यात आता अगदी जिल्हा परिषदांच्या शाळांतूनही डिजिटल एज्युकेशन नाही का सुरू झालेले ? आज ते अपवाद, प्रायोगिक असेल. ठरवले तर का नाही आपण ते सार्वत्रिक करायचे ? एक बाई, एक लाकडी घोडा, एक पाण्याचा पिंप, एक गुंडाळी फळा, १०'x१०' ची खोली आणि ५० मुले म्हणजे बालवाडी ही कल्पना आपण पुसणार की नाही? २० मुले, तीन शिक्षिका, दोन काळजीवाहक, तीन खोल्या, वीस डेस्कटॉप्स, स्मार्ट बोर्ड, म्युझिक सिस्टिम, एलसीडी, छोट्या-टेबल खुर्च्या, प्रसाधनगृह, विश्रांती कक्ष (शिक्षकांसाठी नव्हे, विद्यार्थ्यांसाठी) स्वयंपाकघर, स्टोअर, खेळणी, बाग, मैदान, थ्रीडी क्लास, डीव्हीडी, सीडीज्, का नाही समृद्ध बालवाडीचे स्वप्न बाळगायचे ? साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेअरी, सूत गिरणी, खासगी उद्योगांना आपल्या परिसरात पाच-दहा लाख रुपये खर्चून अशी बालवाडी करणे अशक्य आहे का? गेस्ट हाऊस बंद करून, गाडी-घोडे कमी करून हे शक्य नाही का? 'मुले प्रथम' हे तत्त्व मनीमानसी आपण बिंबवले तर मग 'शिक्षण हक्क' कळणार ना? एकदा तुम्ही डिजिटल, थ्रीडी बालवाडीचा आग्रह धरा. पुढील शिक्षण आपोआप नव्या शतकात जाईल.
भारतातल्या प्रत्येक शिक्षकाकडे (किमान अधिकांश) मोबाइल्स आहेत. प्रत्येक घरात (अधिकांश!) मोबाईल्स आहेत. ते जरी एकमेकांना जोडण्याची दृष्टी शिक्षक-पालक-शाळांनी मिळून विकसित केली तर खालील श्रम, वेळ, पैसा, वाचेल. १) सुट्टीची सूचना २) गृहपाठ देणे ३) प्रगती कळवणे ४) परीक्षा सूचना ५) अभ्यासक्रम ६) शिक्षक रजा ७) शाळेत होणारे कार्यक्रम ८) पालक सभा, सूचना हे सर्व एसएमएस व्हॉटस्ऍपद्वारे सहज शक्य नाही का?
अजून आपल्याकडे पाठ्यपुस्तके, वह्या, पेपर्स, तपासणी, परीक्षा वेळापत्रक यात किती अपव्यय होतो आहे. पाठ्यपुस्तकांची जागा ई-बुक्सनी भरून काढणे शक्य आहे. सुरुवातीस कागदी पुस्तकांना सॉफ्ट कॉपी, सीडी पर्याय देणे शक्य आहे. ते स्वस्तही पडेल. गृहपाठ वह्यांऐवजी 'ऑन लाईन परीक्षा, गुणतक्ते, प्रमाणपत्रे' वितरीत करणे शक्य आहे. जगात तर मुक्त दूरसंचारी सार्वत्रिक शिक्षण (Massive Open Online Courses) (MOOCS) सुरू झालेत. तिथे तर 'End of Schools' ची भाषा सुरू झाली आहे, शिक्षकाला 'सुविधासाधक' (Facilitator) म्हणायला लागले आहेत. शिक्षकाचे काम 'Talk and Chalk' इतिहासजमा होऊन 'Plug and Chug' झाले आहे. 'बोला नि लिहा' चा काळ जाऊन 'जोडा आणि ओढा' चा जमाना आला आहे.
घरी जर पुस्तकांची जागा सीडी, डीव्हीडी, पेन ड्राईव्हनी घेतली आहे, तर शाळा, कॉलेजात अजून कागदी पुस्तकांची (तीही कालबाह्य झालेल्या!) खरेदी का करायची असा प्रश्न शिक्षण मंत्री, कुलगुरू, प्राचार्य, मुख्याध्यापकांना का पडत नाही ? ई-जर्नल, ई-बुक्स, ई-खरेदी का होत नाही ? अलीकडे प्रवासात मी 'नॉलेज सिटी, एज्युकेशनल कॉम्प्लेक्स' असे बोर्ड पाहतो नि कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटची जंगले उभारताना मी पाहतो अन् लक्षात येते की अरे पाहता पाहता हे ओस पडणार आहे. शिक्षण मोठ्या प्रमाणात व्यक्तिकेंद्री आवड नि निवडीकडे सरकत आहे. सगळ्यांना एक अभ्यासक्रम जाऊन प्रत्येकाचा वेगळा अभ्यासक्रम होतो आहे. मी माहीत असून 'सिम्युलेशन लर्निंग', 'ब्लेंडेड एज्युकेशन' वर बोलत नाही. 'व्हर्च्युअल म्युझियम', ‘यु-ट्यूब चॅनल', 'गुगल स्ट्रीट' मला माहीत नाहीत असे नाही, पण जे शक्य आहे, त्याबद्दल आपण का नाही पर्याय निवडायचे ? त्याला तर पैसे पडत नाहीत ?
मी शिकत असतानाच्या काळात मला वाचलेली दोन पुस्तके, धडे, निबंध आठवतात. निबंधाच्या पुस्तकाचं नाव होतं 'शिवशंभू का चिठ्ठा'. लेखक बालमुकुंद गुप्त. निबंधाचे पुस्तक हिंदी होते, दुसरी होती कथा. मराठी. नाव 'बापाची पेंड' लेखक द. मा. मिरासदार. दोन्हीत कल्पनेची भरारी होती. Fantasy. माणसाचे जीवन वास्तव व कल्पनेचे (Fact and Fantasy) सुंदर मिश्रण असते. वर्तमान शिक्षण Factasy झाले आहे, आभास व भौतिकतेचा सुंदर मिलाफ ! जगाचा क्रम भौतिकाकडून आभासाकडे (Virtual) जाण्याचा आहे. शिक्षण विकासात आपणास याचे भान हवे. ते असेल तरच उद्याच्या शिक्षणाचं आकाश नि अवकाश आपण कवेत घेऊ शकू.
आई सरोगेट. बाबा हायर्ड, आई-बाबांचं कुटुंब जाऊन दोन आयांचं किंवा दोन बाबांचं कुटुंब असू शकेल. मुलं जन्माला घालायची असा अट्टाहास संपेल. क्लोन बेबी, टेस्ट ट्यूब बेबी शक्य आहे, मुले सोबोर्ग असतील, शिक्षक रोबोट होतील, शाळा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म झालेला असेल. देश कल्पना जाऊन वर्ल्ड, युनिव्हर्स अस्तित्वात येईल. पासपोर्ट, व्हिसा इतिहासजमा होऊन विश्व नागरिकत्व आलेले असेल, अशा काळात तुम्ही कोणत्याही भाषेचे असा. तुम्हाला कोणत्या भाषेचा आऊटपुट हवा आहे, ते बटन क्लिक करा. परिवर्तीत भाषा, भाषांतर, लिप्यंतर, या गोष्टी ऍप्लिकेशन होतील, अशा स्वप्नवत काळाकडे आपण जात आहोत. डायलिंग, केबल, वाय-फाय जाऊन सॅटेलाईट मोड, फोनकडे आपण जात आहोत. या काळात गती शून्य होते आहे. स्थान गैरलागू ठरते आहे, तुम्ही ऑनलाइन आहात का ? तुम्ही 'कनेक्ट' आहात का हे महत्त्वाचे होण्याच्या काळातले शिक्षणही 'कनेक्ट' असण्यावर अवलंबून असणार आहे. अशा काळात भारतातील शिक्षक बदल, परिवर्तनाशी कनेक्ट आहे का हे महत्त्वाचे. साधन समृद्धी नसेल, साध्य जागरूकता आहे का ते महत्त्वाचे. ज्या देशातले शिक्षक जागे असतात, तो देश जागा. परवा जैन एरिगेशनचे डॉ. भंवरलाल जैन भेटले. वय वर्षे ८२. रात्रीची झोप कमी झाली ते बरे झाले म्हणाले. आता मी रात्री युरोपचे काम करतो, दिवसा आशिया खंडातले. जी माणसे वास्तव स्वीकारतात, तीच भविष्य निर्माण करतात. तंत्रज्ञान म्हणून तर श्रेष्ठ व अनिवार्य !
•••
पूर्व प्राथमिक शिक्षण
शालेयपूर्व शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण. तीन ते पाच वर्षे वयोगटाचे शिक्षण, जगात मात्र ते दोन ते सात वर्षांपर्यंत दिले जाते. देशनिहाय या शिक्षणाचा वयोगट व कालावधी भिन्न आहे. या शिक्षणाबद्दल भारताचे धोरण, अभ्यासक्रम, वयोगट, सक्ती असे सार्वत्रिक रूप नाही. २०१२ साली भारत सरकारने जाहीर केलेले 'Early Child Care and Education Policy' (http://icds-wcd.nic.in/schemes/ECCE/ccce01102013eng.pdf ) हे प्रकाशन वाचले की लक्षात येते की भारत सरकारला बाळ-बाळंतीण सुखरूप ठेवण्यात अधिक रस आहे. २००२ साली भारतीय संसदेने केलेली ८६ वी घटना दुरुस्तीही याचीच री ओढते. प्राथमिक व सक्तीच्या शिक्षण अधिकाराचा सन २००९ चा कायदा ६ ते १४ वयोगटातील इ. १ ली ते ८ वी पर्यंतची जबाबदारी घेतो, पण पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दल ब्र काढत नाही.
खेड्यापाड्यात, पाडे नि वस्त्या, झोपडपट्टीधमील अंगणवाड्या, बालवाड्या यांची स्थिती दयनीय आहे. भारतात खासगी बालवाड्याच काय तो जनतेचा खरा आधार. त्यांची जागा आता 'प्ले स्कूल्स' घेत आहेत. तिथे पोषाख, इमारत, साधन संपन्नता म्हणजे आधुनिक शिक्षण असा भारतीय पालकांचा समज असल्याने भौतिक व दिखाव्यावर भर दिसून येतो. पाल्य रिक्षा, बसमधून टाय, टिफिनसह जातो, यातच पालक खूष. शाळेत इंग्रजी व घरी मातृभाषिक व्यवहार असे भारतीय चित्र असल्याने हाँगकाँग, फिनलँड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, चीन सारखे समृद्ध व्यक्तिकेंद्री व व्यक्तिविकासास प्राधान्य देणारे शिक्षण भारतापासून कोसो दूर आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात सहा वर्षे वयोगटातील बालकांची संख्या १५८ दशलक्ष आहे. सुमारे ५ लक्ष बालवाड्या ग्रामीण भागात आहेत. त्यात २६.४५ दशलक्ष मुले-मुलीच शिक्षण घेतात. पूर्व प्राथमिक शिक्षणाची टक्केवारी २०% च्या आत आहे. पूर्व प्राथमिक शिक्षकाची विविध प्रशिक्षणे उपलब्ध असून ती दोन आठवडे ते दोन वर्षे कालावधीची आहेत. पात्र पूर्व प्राथमिक शिक्षक अपवादाने आढळतात. या संदर्भात क्रिएट-२०१०, युनिसेफ 'वर्ल्ड स्टेट ऑफ चिल्ड्रन-२०१३' (http://WWW.unicef.org/sowc2013) अहवाल वाचले तरी भारतीय बालशिक्षणाचे विदारक चित्र अस्वस्थ करण्यास पुरेसे आहे. मॅट्रिक पास शिक्षिका, एक आया, एक पाण्याचा पिंप आणि एक लाकडी फळा व घोडा घेऊन चालणाऱ्या बहुसंख्य बालवाड्या हे भारतीय बालशिक्षणाचे सरासरी चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर जगातील पूर्व प्राथमिक शिक्षण समजून घेणे उद्बोधक ठरेल, पूर्व प्राथमिक शिक्षण जगभर बालवाडी, अंगणवाडी, बालमंदिर, माँटेसरी, किंडरगार्टन, प्री-के, ग्रेड झिरो, हेड स्टार्ट अशा अनेक नावाने ओळखले जाते, २+ ला ते सुरू होते, ६+ वयापर्यंत चालते. वाचन, लेखनाचा प्रारंभ इतक्या माफक अपेक्षेने हे शिक्षण पूर्वी घरोघरी आईच द्यायची. पण आईच्या घराचा उंबरा ओलांडण्याच्या गरजेने हे शिक्षण औपचारिक रूप धारण करत गेले, औद्योगिक क्रांतीमुळे स्त्री कमावती झाली व तिच्या मुलांच्या व अनाथ अपत्यांच्या शिक्षणाचा प्रश्न जगास भेडसावू लागला. त्यातून जॉन फ्रेडरिक ऑबर्लिनने सन १७७९ मध्ये पॅरिस (फ्रान्स) मध्ये जगातील पहिली बालवाडी सुरू केली, ती 'Infant School' नावाने. ऑबर्लिनच्या मतानुसार पाळण्यातील मूलही शिक्षणक्षम असते, चूक की बरोबर, लहान-मोठे, अंधार-प्रकाश ते ओळखते, या शिक्षणास शास्त्रशुद्ध बनवले ते रॉबर्ट ओवेननी. त्याने बालशिक्षण पद्धती (Pedagogy) चा पाया रचला तो सन १८१६ मध्ये. गेल्या सुमारे २०० वर्षात बालशिक्षण विकसित झाले. आज पूर्व प्राथमिक शिक्षणात व्यक्तिगत लक्ष, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, सामाजिकरण, समूह जीवन, जीवन कौशल्ये, ऐकणे, बोलणे, गाणे, नाचणे, वर्गीकरण करणे, रंगसंगती, आरोग्य सवयी, खेळ, मनोरंजन, मल्टिमिडिया, व्हिडिओ गेम्स, शारीरिक शिक्षण, सर्जनशीलता, पंचज्ञानेंद्रिय विकास आदी घटक घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून हाँगकाँगसारखा छोटे बेट असलेला देश बालशिक्षणात आघाडीवर आहे.
हाँगकाँग सरकारची अभ्यासक्रम परिषद (The Curriculum Development Council) आहे. ती पूर्व प्राथमिक शाळा (बालवाडी) साठी 'Guide to the Pre-primary Curriculum' प्रकाशित करते. ते वाचले की लक्षात येते, तिथे आजीवन शिक्षण (Lifelong Learning) या तत्त्वावर ते उभे आहे. म्हणजे पोपटपंची त्यांना अपेक्षित नाही. आपणाकडे पाल्याच्या अक्षरज्ञान, अंकज्ञान बडबडीने पालकांना मोक्ष मिळतो. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हे त्यांचे बालशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. हाँगकाँगमध्ये पालकांना पहिला शिक्षक मानले जाते. शिक्षकाचे स्थान नंतर. त्यामुळे पालक बालशिक्षणात सक्रिय सहभागी असतात. बालवाडीस ते समाज, देशाची छोटी प्रतिकृती मानतात. कुटुंब व समाजास जोडणारा सेतू म्हणून ते बालवाडीकडे पाहतात. शिक्षकाची समज व मुलाचे शिकणे या गोष्टी ते महत्त्वाच्या मानत असल्याने प्रगल्भ शिक्षक निवड व नियुक्तीवर भर असतो. प्रत्येक मुलास प्रवेश हे त्याचे लक्ष्य आहे. सृजन, निर्मितीस शिक्षणात प्राधान्य दिले जाते. खेळातून सहज शिकवण्याकडे शिक्षकांचा कल असतो, शिक्षणात रस निर्माण व्हावा म्हणून शिक्षक सर्व ते प्रयत्न, उपाय, पर्याय चोखाळत असतात. मी २०११ साली हाँगकाँगमध्ये होतो तेव्हा मल्टिमिडिया, मिडिया लर्निंग, व्हिडिओ लर्निंग, नेचर सुप्रीम, इनोव्हेशन, क्रिटिकल थिंकिंग, इमॅजिनेशन असे शब्द बालवाडीतील शिक्षिका वापरत होती. थ्रीडी क्लास, व्हर्च्युअल लर्निंगचे त्याचे नियोजन सुरू होते. इतकी आधुनिक बालवाडी मी पाहात होतो पण त्या शिक्षिकेस आपण मुलांना अत्याधुनिक देऊ शकत नसल्याची खंत, अपराधी भाव मला सतत अस्वस्थ करत होता. चिनी, इंग्रजी भाषा समान शिकवण्यावर त्यांचा भर दिसला. शासन नियंत्रण करते व साहाय्यही करते. प्रशिक्षित शिक्षक नियुक्ती अनिवार्य आहे. 'पर्वत चढा तरच जग दिसणार' असे उच्च ध्येय ते बालवाडीतच अंगिकारत असल्याने प्रत्येक विद्यार्थी सुजाण नागरिक बनवण्याचे उद्दिष्ट हाँगकाँग प्राप्त करू शकला. शाळानिहाय अभ्यासक्रम भिन्न व शिक्षण पद्धती भिन्न असली तरी किमान शिक्षण, कौशल्य, अभ्यासक्रम बंधनातून सुटका कुणालाच नसते.
सन १९९० ला युरोपच्या दौ-यावर असताना फ्रान्सच्या मेझ (Metz) सारख्या छोट्या गावातील अनाथाश्रमातील समृद्ध बालवाडी पाहिली, 'असोसिएशन डी इन्फरमेशन एट डी एन्टाइड मोझेल' संस्थेतील ते खरे बालसंगोपन केंद्र तिथलं ते वात्सल्य आपल्या बालवाडीत केव्हा प्रतिबिंबित होणार ? 'सेंटर डिपार्टमेंटल दी इन्फरन्स' ही अजून माझ्या लक्षात आहे. जपानमध्ये 'मेगुरो केश्फु रो', 'एयुमीएन' संस्थातील मतिमंद, मूक-बधिर मुलांच्या संस्थांतील बालवाड्यांतील विद्यार्थी सुविधा, विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, काळजीवाहक पाहिले की 'बाल्य' ही अधिक संवेदनेने हाताळण्याची (Handle with care) गोष्ट आहे हे पटल्याशिवाय राहात नाही. काच वस्तूंच्या वेष्टनांवर लिहिलेलं हे वाक्य मला बालवाडीचे ब्रीद वाटत आलेय ! इंग्लंडमधील बालवाड्या तर पूर्ण शासकीय साहाय्यावरच चालतात. ती शासन आपली प्रथम व प्रधान (First and Prime) जबाबदारी मानते यातच सारे आले. तेथील बहुतांश बालवाड्या मला प्राथमिक शाळेस जोडलेल्या आढळल्या. इटलीतील बालवाड्या फ्रान्सच्या धर्तीवर चालताना मी अनुभवल्या आहेत. तिथले बालशिक्षण हे 'बालक हक्क' प्रमाण मानून विकसित करण्यात आले आहे. सिंगापूरमधील बालवाड्यांची स्पर्धा चीनशी दिसून आली.
प्राथमिक शिक्षण
भारतातील प्राथमिक शिक्षणाचा मूलाधार म्हणजे गुरूकुल शिक्षण पद्धती. घोकंपट्टी, संथा, श्रवण, स्मरण, वाचन, अंकन म्हणजे शिक्षण असा एक काळ होता. ब्रिटिश आमदानीत त्याचे पाश्चात्यीकरण झाले. राष्ट्रीय शाळा, व्हॉलंटरी स्कूल्स सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर अनुदानित शिक्षण व्यवस्था आली. शिक्षण ही शासनाची जबाबदारी अशी मानसिकता असलेल्या भारतीय समाजास विना अनुदान शिक्षण पद्धतीने धक्का देऊन शिक्षणासाठी पैसे मोजण्याची मानसिक तयारी पालकांना प्रथम इच्छेविरुद्ध करावी लागली. पण जागतिकीकरणाने विदेशी इंग्रजी शिक्षण संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे लोण खेडोपाडी पोहोचले. भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ सारख्या संस्थांनी प्रथम उच्च व व्यावसायिक शिक्षण पदरच्या खर्चाने करण्याची मानसिकता निर्माण केल्यावर त्या जोरावर व्हिबग्योर, रिलायन्स, प्रेमजी, अंबानी, पोद्दार आदी उद्योगांनी कंझ्युमर्स मॉलबरोबर एज्युकेशनल मॉल्सही 'नॉलेज सिटी' या गोंडस नावाखाली सुरू केले. परिणामी ५ रुपये फीत बालवाडी शिक्षण देणारा हा देश आता बालवाडीला पाच हजार ते पाच लाख डोनेशन देताना दिसतो. तिकडे दुसरीकडे 'सर्व शिक्षा अभियान' खेडोपाडी रुजून प्रत्येक मूल शाळेत आणण्याची जीवघेणी धडपड शिक्षकांना करावी लागते आहे. प्रसंगी खिचडी खिलवून, शिजवून पट सांभाळण्याची सर्कस वाडी-वस्तीवर जीवघेणी ठरत आहे.
भारतीय प्राथमिक शिक्षण अजून प्रचार, प्रसार, अभियानाच्याच स्तरावर विकसित होते आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद नियंत्रित 'पंचायत राज्य' केंद्रित लोकानुवर्ती प्रशासनामुळे प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेपुढचे प्रश्नचिन्ह दिवसेंदिवस मोठे होते आहे. शंभर टक्के पट नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्यापर्यंतच आपल्या सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची मजल आहे. खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, विना अनुदानित प्राथमिक शाळा शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असे विविध रूपाचे आपले प्राथमिक शिक्षण सध्या सन २००९ च्या सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायद्याच्या अंमलबजावणीच्या सावलीत रांगते आहे. इ. १ ली ते इ. ८ वी असे वैधानिक स्तर निर्माण करण्यात महाराष्ट्रात अनेक अडचणी आहेत. डी.टी.एड., बी.एड., एम. एड. पदव्या देणारी गावगन्ना, गल्ली-बोळात, गोदाम गोठ्यात सुरू झालेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आता छात्राध्यापक प्रवेश घेण्यास धजत नाहीत. लक्षावधी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक बेरोजगार आहेत. 'शिक्षण सेवक' नामक शिक्षण श्रेणीने शिक्षकास वेठबिगार बनवले आहे. 'शाळा, शिक्षक आहेत पण शिक्षण नाही' हे हेरंब कुलकर्णीचे निरीक्षण पुरेसे बोलके व वस्तुनिष्ठ आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विकासाची सारी मदार विश्व बँकेच्या अनुदानावर आधारित 'सर्व शिक्षा अभियान' वर येऊन ठेपली आहे. सन २०१० पासून तो टेकू गेला. आता सारी मतदार 'सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायदा' धारित केंद्रीय निधीवर बेतली आहे. अशा डळमळीत शिक्षण यंत्रणेकडून गुणवत्तेची अपेक्षा रास्त ठरत नाही.
अजून ८ दशलक्ष मुले शाळेत येणे बाकी आहे. शाळेतील गळतीचे प्रमाण २७% आहे, तेही पहिली ते चौथी इयत्तात. आठवीपर्यंत हे प्रमाण ४१% वर जाते, तर मॅट्रिकपर्यंत ५०%. प्राथमिक शिक्षणातला लिंगभेद चिंताजनक आहे, १०० प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींपैकी ८० मुलीच माध्यमिक शाळांत प्रवेश घेतात. इयत्ता ५ वीच्या ५०% मुलांना अंकज्ञान, अक्षरज्ञानाचं पूर्ण कौशल्य प्राप्त होत नाही, हे प्राथमिक सार्वत्रिक शिक्षणाचं चित्र केवळ विषण्ण करणारे ठरते. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण कायदा-२००९ अन्वये ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक प्रमाण निश्चित करण्यात आले आहे, ते आपण अद्याप पूर्ण केलेले नाही. १.३ दशलक्ष शाळांपैकी ७२% शाळातच मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहे (संडास, मुतारी) असून पैकी ८५% प्रसाधनगृहेच उपयोगात येण्यासारखी आहेत. (वायुविजन, प्रकाश, पाणी, वीज, साबण, टॉवेल्स, स्वच्छता इ. सुविधा असलेली.) अजून शाळात शारीरिक शिक्षा दिल्या जातात. युनिसेफच्या अहवालातून लक्षात येणारे चित्र आपल्या प्राथमिक शिक्षणापुढची खरी आव्हाने (Key Challenges) आहेत.
या पार्श्वभूमीवर 'फिनलंड मॉडेल' भारताने अभ्यासावे, अनुकरण करावे असे आहे. 'पिसा' या जगमान्य संस्थेने हे मान्य केले आहे. 'The Programme for International Student Assessment' (PISA), 'The Organisation for Economic Co-operation and Development (OECD)' सारख्या मानांकन व मूल्यमापन करणाऱ्या संस्थांच्या क्रमवारीत फिनलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान, हाँगकाँगसारखे छोटे देश अमेरिका, रशिया, भारत अशा महासत्ता घोष करणाऱ्या देशांच्या कितीतरी पुढे आहे. महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले तेव्हा म्हणजे सन १९६० मध्ये फिनलंड पारंपरिक शिक्षण देणारा देश होता. सन १९७० मध्ये फिनलंडने शिक्षणाकडे लक्ष द्यायचे ठरवून देशातल्या प्रत्येक मुलास उगवता तारा (Stellar) मानले. मातृभाषेतून शिकण्याचा अधिकार दिला. फिनिश, स्वीडिश, सामी भाषांतून मुले शिकतात. देश छोटा पण शाळांची संख्या ३०००. शिक्षण व संस्कृती मंत्रालय प्राथमिक, माध्यमिक शाळा विकासाचं कार्य करते. विशेष म्हणजे या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच चालवतात, त्यांचे राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे. ते शिक्षण धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती ठरवते व नियंत्रितही करते. अधिकांश शाळा सार्वजनिक असून त्या नगरपालिकांकडून त्यांच्याच निधीतून चालतात. अवघ्या १.५% शाळा खासगी आहेत.
सहा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास पहिलीत प्रवेश मिळतो. त्यामुळे ती शिक्षण घेण्यास प्रगल्भ असतात, असा विचार आपण करायला हवा. आपल्याकडे कमी वयात अधिक शिक्षण देण्याची प्रथा मुलांवर अन्याय करणारी आहे. सहा वर्षांचे शालेय शिक्षण असते. वर्ग शिक्षकच शिकवतात म्हणजे एकच शिक्षक सारे विषय शिकवतो. सर्व शाळांचा अभ्यासक्रम समान असतो. इयत्ता ७ वी ते ९ वीत ऐच्छिक विषय निवडले जातात. मातृभाषा व साहित्य विषयांतर्गत इंग्रजी, स्वीडिश किंवा फिनीश अशा दोन भाषा मुलं अनिवार्यतः शिकतात. शिवाय गणित, पर्यावरण (आरोग्य, भूगोल, वनस्पती शास्त्र, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र) धर्म अथवा नैतिक शिक्षण, इतिहास व समाजशास्त्र, कला, हस्तव्यवसाय व क्रीडा, गृह अर्थशास्त्र असे विषय असतात. काही ऐच्छिक (विज्ञान, कला) असतात. फिनिश विद्यार्थी गणित, विज्ञानात जगात अव्वल असतात. प्राथमिक शिक्षकास आठवड्याचा कार्यभार २४ तास इतका असतो, शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षणावर विशेष भर असतो. विद्यार्थी, शिक्षक व शाळांचे निरंतर मूल्यमापन, मूल्यांकन होत असते. त्रुटीच्या भरपाईवर सूक्ष्म लक्ष व अंमलबजावणीच्या धोरणामुळे गुणवत्ता वर्धनात सातत्य येते, संशोधनास महत्त्व देण्यात येऊन नित्य सुधारणा हे यांच्या परिपाठाचाच एक भाग होऊन गेला आहे. शाळेत भिन्नजिनसी (सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तेचे) विद्यार्थी गट असतात, हुशार वेगळे व ढ वेगळे ('अ' तुकडी, ‘फ' तुकडी) प्रकार नाही. त्याऐवजी 'प्रत्येक विद्यार्थी केंद्र' असे धोरण आहे, पदव्युत्तर शिक्षक प्राथमिक शाळेत सर्रास आढळतात. शिक्षक वृत्ती ही निवडाचा निकष मानली जाते (शिकण्या, शिकवण्यात रस). विद्यार्थी समुपदेशन अनिवार्य मानले जाते, संख्या नियमित व गुणवत्ता नियंत्रित असे प्रशासनिक तंत्र आहे. आरोग्य, आहार, स्वच्छता, नियमितता, समृद्ध ग्रंथालय, प्रयोगशाळा, साधन समृद्धी या किमान गोष्टी अनिवार्य मानल्यामुळे सर्वांना समान दर्जाचे गुणवत्ताप्रधान प्राथमिक शिक्षण देणे फिनलंडला साधले आहे.
माध्यमिक शिक्षण
'सर्व शिक्षा अभियान'च्या तथाकथित यशानंतर बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या वर्तमान काळात आता देशात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राबवले जात आहे. 'सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण कायदा -२००९' मुळे इ. १ ली ते ८ वी चे शिक्षण प्राथमिक होते आहे. परिणामी, इयत्ता ९ वी व १० वी अशा दोनच वर्षांचे माध्यमिक शिक्षण महाराष्ट्रात राहते आहे. इयत्ता ११ वी व १२ वी स उच्च माध्यमिक दर्जा आहे. निम्न माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा चार वर्षांच्या परंतु द्विस्तरीय विभागणीस सामोरे जाणाऱ्या माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमासंबंधी पुनर्रचनेचा विचार आता अटळ आहे. शिवाय जागतिकीकृत शिक्षणाशी समायोजित होण्याची संधी म्हणून या पुनर्रचनेकडे भारत पाहील तर १६ ते २० वयोगटातील किशोर व युवकांना आपणास रोजगार प्रधान व तंत्रकुशल असे मनुष्यबळ विकसित करण्याची ती संधी असेल. देशाच्या गरजेनुसार युवकांचे कुशल तंत्रज्ञ, कुशाग्र बुद्धिमंत असे वर्गीकरण व विभाजन करून आज सर्रास व्हाइट कॉलर (बेरोजगार) बनणाऱ्या युवा पिढीस रोजगारक्षम बनवणे शक्य होईल. विद्यार्थी कलमापन, समुपदेशन, क्षमतानिहाय विद्याशाखा, अभ्यासक्रम निवडण्याचे व त्यांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी असे त्रिस्तरीय पर्याय उपलब्ध करून दिल्यास मनुष्यबळ विकासाचे धोरण गतिमान होऊ शकेल व प्रत्येक हात मिळवता बनवता येईल.
स्वातंत्र्याच्या गेल्या ६७ वर्षांत माध्यमिक शिक्षण विकासाची गती अन्य स्तरीय विस्तार पाहता मंद रहिली आहे. स्वातंत्र्याच्या प्रारंभी ७००० माध्यमिक शाळा होत्या. ती संख्या सुमारे २३% वाढून आता १७३ हजार इतकी झाली आहे (२००७). शिक्षक संख्याही साहजिकपणे वाढली असून ती २१२७ हजार झाली आहे. शिक्षक : विद्यार्थी प्रमाण २१ चे ३५ होणे हे माध्यमिक शिक्षण गुणवत्तेपुढचे आव्हान आहे. शिक्षक : विद्यार्थी वाढत्या विषम प्रमाणामुळे व्यक्तिकेंद्री विकासाचे तत्त्व केवळ कल्पना बनून राहते. जग गुणवत्तेत गुंतले असताना आपण पटसंख्येच्या पाठीमागे लागून राहतो आहोत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात आपला सारा भर संख्या वाढ व भौतिक सुधारणांकडे आहे. विकासशील देशापुढे एकाच वेळी संख्या व गुणवत्तेचा संघर्ष असतो. पण या संघर्षात जे विषयी होतात तेच विकसित देश ठरतात. हे लक्षात घेऊन मर्यादांसह गुणवत्ता संवर्धनास भारतास पर्याय उरत नाही.
युनेस्को प्रकाशित 'ग्लोबल एज्युकेशन डायजेस्ट-२०११' नुसार १९७० च्या तुलनेने विद्यार्थी नोंदणी जगभर तिप्पट झाली आहे. बहुसंख्य देशांत माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या मुला-मुलींच्या पदवीधर होण्याची शक्यता वाढताना दिसते. शिक्षक संख्येत ५०% वाढ दिसून येते. मुलींच्या संख्येतील वाढ उत्साहवर्धक आहे. जगात कॅनडाचा माध्यमिक शिक्षणात वरचष्मा असून तिथे ९५% विद्यार्थी सार्वजनिक (Public) शाळात प्रवेश घेतात हे विशेष. जी-८ देशांच्या गटात कॅनडाचा विद्यार्थ्यांवर होणारा शिक्षणाचा दरडोई खर्च सर्वाधिक आहे. तेथील माध्यमिक शाळांत सन १९८० पासून शिक्षणासाठी म्हणून विदेशी विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी वाढते आहे. समृद्ध शैक्षणिक परिसर, साधन संपन्नता, शिक्षणाचा वैश्विक दर्जा, इंग्रजीतून अध्यापन, पर्यवेक्षित गृहनिवास ही तेथील वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना जगभरातून आकर्षित करीत आहेत. माफक दरात उच्च दर्जाचे माध्यमिक शिक्षण देणारा देश म्हणून जग कॅनडाकडे पाहते. इ. १ ली १२ वी पर्यंतचे शिक्षण शालेय मानले जाते. ते सार्वजनिक शाळातून दिले जाते. त्या सर्व शाळा मानांकित असतात. शासनमान्य पात्र शिक्षकच नेमले जातात. सार्वजनिक निधी (अनुदान)तून शाळांचे संचालन होते. कॅनडात सार्वजनिक माध्यमिक शाळा बरोबर खासगी आणि स्वतंत्र (स्वायत्त) माध्यमिक शाळा आहेत, पण सार्वजनिक कल अनुदानित शाळांकडे आहे. शाळांचा कल सहशिक्षणाचा आहे. मुले नि मुली एकत्र शिकवण्याचा सर्वत्र प्रघात आहे. निवासी, अनिवासी, धार्मिक, निधर्मी, राज्य सरकारी, केंद्रीय अशा विविध प्रकारच्या माध्यमिक शाळा कॅनडात आढळतात. पालकांना शाळा निवडण्याची मुभा आहे. इंग्रजी, फ्रेंच, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कला, आरोग्य, शारीरिक शिक्षण, नागरिकशास्त्र, रोजगार नियोजन व निवड (Career Studies) हे विषय तिथे शिकवले जातात. परीक्षा व मूल्यांकन पद्धती भिन्न असल्या, तरी राज्यस्तरीय, केंद्रीय अशा परीक्षा असतात. पदवी प्रवेश त्यावर अवलंबून असतो. वाचन, विज्ञान व गणित विषयातील कौशल्यावर तुमची गुणवत्ता विशेष मानण्यात येते. व्यक्तिगत लक्ष देण्याकडे कल असतो. विहीत पदवीधरच शिक्षक म्हणून निवडले जातात. शिक्षकांवर फौजदारी नसणे, आरोग्य सक्षम असणे बंधनकारक आहे, अशा छोट्या-मोठ्या गोष्टींतून कॅनडाने माध्यमिक शिक्षणात वर्चस्व स्थापन केले आहे. वैविध्य ठेवूनही गुणवत्ता आणता येते हे कॅनडाने जगाला दाखवून दिले आहे.
उच्च शिक्षण
भारतीय शिक्षण व्यवस्थेची मोठी गंमत आहे, 'पाया भुसभुशीत, कळस चकचकीत' असे तिचे सार्थ वर्णन करता येईल. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तर सुमार असताना उच्च शिक्षणास मात्र विश्व मान्यता (मानांकन नव्हे!) का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याची कारणमीमांसा करता लक्षात येईल की भारतीय विद्यार्थी उपजत प्रगल्भ आहेत. खालच्या शिक्षण स्तरांची गुणवत्ता वाढवली तर भारताचे मनुष्यबळ कुशल व रोजगार उपयुक्त बनवणे शक्य आहे. उच्च शिक्षण स्तरावर ज्या नियंत्रक संस्था आहेत त्या किमान वा अपेक्षित दर्जा, सुविधा, संलग्नता अटीत सवलत देत नसल्याने उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावतो आहे. विशेषतः माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरी जगमान्य आहे. विद्यापीठ अनुदान मंडळ, नॅक, संलग्नता / मान्यता देणाच्या राष्ट्रीय संस्थांचे कार्य प्रशंसेस पात्र आहे. अपवाद वैद्यकीय, शिक्षण परिषदा. शिक्षण दर्जा नसण्याचे हे सबळ कारण.
उच्च शिक्षणात खासगी संस्थांचे प्राबल्य व नियंत्रण हेही त्याचे एक कारण होय. पण त्याच संस्थांच्या शाळा मात्र ही गुणवत्ता देत नाही. याचे कारण रचना व आराखड्यातच खोट आहे किंवा निरीक्षक नियंत्रण यंत्रणा (शिक्षण खाते) कमजोर आहे. विदेशी विद्यार्थी भारतात येतात ते आफ्रिका, आशिया खंडातून म्हणजे अविकसित वा विकासशील देशातून. त्यामुळे वासरात लंगडी गाय शहाणी अशा स्वरूपाचं तिचे महत्त्व आहे. त्यामुळे एकूणच भारतीय शिक्षण पद्धतीत सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षण, संशोधन, निरीक्षण, नियंत्रण, गुणवत्ता विकास इ. सर्वच स्तरावर सुधारणेस भरपूर वाव आहे.
भारतात सध्या २१.८ दशलक्ष विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षण संस्थात संख्यात्मक वाढ होते आहे. गेल्या काही वर्षांत भारतात नव्या ६५ केंद्रीय संस्था, ८९ विद्यापीठे, ४००० महाविद्यालयांची भर पडली आहे, तरी आपण १५% प्रवेशाचे उद्दिष्ट गाठू शकलेलो नाही. संख्यावाढीबरोबर गुणवत्ता संवर्धनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'मागणी व पुरवठा' यांचा मेळ व घातला न गेल्याने सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न यक्षप्रश्न बनत असण्याच्या विद्यमान काळात उच्च शिक्षण व रोजगार संधी, क्षमतांची सांगड आता अनिवार्य झाली आहे. उच्च शिक्षणात शिक्षकाची कमतरता भासते आहे. त्यामुळेही दर्जा खालावत आहे. २००४ साली भारत सरकारने सर्व संलग्न, मान्यता, नियंत्रक संस्थांची प्रातिनिधिक समिती नेमून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता वाढीचा विचार केला. अनेक आयोग नेमले. उदा. नॅशनल नॉलेज कमिशन. सॅम पित्रोदा यांनी ग्रंथालये, पीएच.डी. असे स्वतंत्र ८ अहवालही सादर केले. प्रो. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली कार्य समिती नेमण्यात आली होती, प्रत्यक्षात कार्यवाही मात्र प्रभावी होऊ शकली नाही. आर्थिक तरतुदीच्या अभावाचे तुणतुणे आपण जोवर वाजवत राहणार, शिक्षकांचे कार्याचे लेखापरीक्षण करणार नाही, संशोधन दर्जा उंचावणार नाही व आपली विद्यापीठे जोवर संशोधन, पेटंट बळावर स्वयं अर्थशासित होत नाही तोवर प्राध्यापकांना पगार व विद्यार्थ्यांना पदव्या वाटणारी वितरण केंद्रे एवढेच त्याचे स्वरूप राहणार, हे केव्हातरी आपण गांभीर्याने समजून घ्यायला हवे.
या पार्श्वभूमीवर जगात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर दबदबा निर्माण करणारे हार्वर्ड विद्यापीठ वस्तुपाठ म्हणून अभ्यासायला हवे. हार्वर्ड विद्यापीठ पदव्या देते, पण संशोधनावर आधारित. अभ्यासक्रम पूर्तीनंतर पदवी प्रदान करण्याच्या पारंपारिक परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आपण बदलणे आवश्यक आहे. सन १६३६ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ. इथे औषध (मेडिसीन), धर्म (Divinity), विधी, दंत चिकित्सा, कला, विज्ञान, व्यापार/उद्योग, विस्तार (Extension), रचना (Design), शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, प्रशासन, अभियांत्रिकी इ. विद्याशाखांची स्वतंत्र संस्थाने असून त्यांची समृद्ध संकुले विकसित आहे. सुमारे ८५ हेक्टर परिसरात केंब्रिज, बोस्टन आदि ठिकाणी ही विद्याकेंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राची वसतिगृहे, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, सुविधा केंद्रे आहेत. शिक्षक आंतर्राष्ट्रीय दर्जाचे व निमंत्रित (नियुक्त नव्हे!) असतात. केंद्रे उपग्रह संलग्न आहेत. विद्यार्थी निवडीत संगणक साक्षरता ही मुख्य अट आहे. शिक्षणात कृती, सर्वेक्षण, निरीक्षण, निष्कर्ष, प्रकल्प, प्रकाशन, प्रगटीकरण, सादरीकरण, गट चर्चा, चर्चासत्रे यावर भर असतो. निरंतर मूल्यमापन, क्रेडिट पद्धत आहे. उच्च माध्यमिक (पदवीपूर्व), पदवी, पदव्युत्तर, संशोधन, उच्च संशोधन स्तरावर प्रमाणपत्रे, पदव्या प्रदान केल्या जातात. मूल्यमापनात पारदर्शितेस सर्वाधिक महत्त्व असते. सर्वाधिक नोबेल विजेता, शास्त्रज्ञ, लेखक, विश्वमान्य राजनीतिज्ञ, उद्योगी, व्यापारी, प्रशासक, संशोधक निर्माण करणारे हे विद्यापीठ. त्यांच्या या परंपरेमुळेच विद्यापीठास ३२ अब्ज डॉलर्सच्या वार्षिक देणग्या (वर्षासने) मिळतात व त्यातून विद्यापीठ चालते. हे निवासी संशोधन विद्यापीठ म्हणून अग्रमानांकित आहे.
•••
जागतिकीकरण म्हणजे जगाचे एकात्म होणे होय. गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जग विभागलेले होते. ते खंडनिहाय होते, तसे राष्ट्रांची ओळख मुख्य असायची. युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या पंचखंडांची स्वत:ची ओळख होती व वैशिष्ट्येही भिन्न होती, तीच गोष्ट देशांची. प्रत्येक देशाचं स्वत:च व्यक्तिमत्त्व होते. माणूस स्थलांतरित झाला, तो व्यापार व प्रवास करू लागला तसे खरे तर जग एकमेकाच्या संपर्कात आले. पर्यटनातून साहसी खलाशांनी नवनवे प्रदेश-देश शोधले. पंधराव्या शतकात व्यापारार्थ विकसित रेशीम मार्ग असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. एकोणिसाव्या शतकात वाफेच्या इंजिनाचा शोध ही जग जवळ आणणारी घटना ठरली. वाफेच्या इंजिनामुळे जहाज व आगगाडी गतीने पळू लागली व कमी वेळात मोठे अंतर कापणे शक्य झाले. विसाव्या शतकात तार व टेलिफोनने जागतिक संपर्क सुकर केला. मोटार, दुचाकी शोधाने माणसाचे चलन वलन गतिमान केले. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध संपर्क क्रांतीचा मानला जातो. संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे काळ, काम, वेगाचं गणित संपुष्टात आले. माणूस जिथे आहे तिथेच जग येऊन ठेपले. अंतर, गती, वेळ इ. संबंधी पूर्वसंकल्पना मिळालेला विराम हे संपर्क क्रांतीचे खरे यश. जगाचे सपाटीकरण यातून आले. म्हणजे जगाची भाषा, पोषाख, अन्न, चलन, कार्यसंस्कृती एक होणं म्हणजे जागतिकीकरण. ते आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक गुंतवणूक, तंत्रज्ञान, पर्यावरण, विकास, संस्कृतीच्या एक होण्यातून आकाराला आले.
डंकेल करार, गॅट, पेरिस्त्रोइका, विश्व व्यापार संघटन, संयुक्त राष्ट्रसंघ इत्यादींच्या विविध उपक्रम, प्रतिबंध, नियमावली, उपक्रम, प्रकल्पातून जागतिकीकरणास गती मिळाली. यांची विविध धोरणे, करार, जाहीरनामे यास कारणीभूत झाले. यातून व्यापार, राजनीती, उद्योग, संपर्क, शिक्षण, संस्कृतीचे जागतिक धोरण उदयास आले. त्याची परिणती वा प्रचिती म्हणजे जागतिकीकरण होय. उदारीकरण, खासगीकरणातून निर्माण होणारी भांडवली व्यवस्था ही जागतिकीकरणाचा आधार होय. विशेषतः आर्थिक व तंत्रज्ञानविषयक विस्तार आणि विकासातून जागतिकीकरण उदयास आले. ते आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर आपला प्रभाव व परिणाम करत आहे.
उगम व परिभाषा
जेव्हापासून माणूस आपल्या स्थानिक जगापलीकडचा वेध घेऊ लागला, तेव्हापासूनच जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 'हे विश्वचि माझे घर', 'एक हृदय हो भारत जननी', 'विश्वनिडम्', 'जय जगत्', 'Universe', 'सब दुनिया गोपाल की' या साच्यातून जागतिकीकरण संकल्पना उदयास आली. पण आज ज्या अर्थाने जागतिकीकरण शब्द वापरला जातो त्यांचे दोन आधार आहेत. १) आर्थिक २) तंत्रज्ञान.
आर्थिक जागतिकीकरणात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यात जगाच्या राजकोषीय धोरणात एकवाक्यता आणणे, सुसूत्रता निर्माण करणे व शिस्त आणणे अपेक्षित आहे. त्यानुसार जगात समाजवादी विचारसरणीची जी राष्ट्रे होती, तेथील अर्थव्यवस्थेत सूट, तगाई, सवलतींचे जे धोरण कल्याणकारी राज्य म्हणून प्रचलित होते, त्यामुळे ते देश कायम आर्थिक तुटीत असत. जागतिक कर्जे भागवणे त्यांना शक्य नसायचे, त्यामुळे व्यापारविषयक आंतरराष्ट्रीय धोरणातून, गुंतवणुकीच्या पर्याय व सुविधांतून तूट भरून काढून आर्थिक समृद्धीच्या उपाय योजनांचे धोरण अंगीकारण्यात आले. त्यात कर माफी, परवाना पद्धत रद्द करणे, व्याज धोरण पतपुरवठा, विदेशी गुंतवूणक आदींबाबत उदारतेचे धोरण जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आले. ते उदारीकरण म्हणून ओळखले जाते. त्यानंतर सार्वजनिक उद्योग जे तोट्यात चालत, त्यासंबंधी निर्गुंतवणूकीचे धोरण अवलंबून खासगी भांडवल व आंतरराष्ट्रीय कंपन्या, संस्थांच्या साहाय्यातून त्यांचे आर्थिक सबलीकरण म्हणजे व्यापार, उद्योगाचे खासगीकरण होय.
दुसरीकडे संगणक, इंटरनेटमुळे निर्माण झालेल्या संपर्क सुविधांद्वारे बौद्धिक, साहित्य, संस्कृती, कलांशिवाय आर्थिक आदान-प्रदान, जागतिक राजकारण, समाजकारण, सांस्कृतिकरण इत्यादींद्वारे जग एकसारखे व निकट संपर्काचे बनवणे शक्य झाल्यानेही जागतिकीकरण गतिमान झाले. ई-मेल, व्हॉटस् ऍप, फेसबुक, ट्विटर, एसएमएस, मोबाईल, लिंक्स, वेबसाइटस्, ब्लॉग्ज, ऍपस्, ई-बुक, डिजिटायझेशन, आभासी जग निर्मिती (Virtual World) शक्य झाली. त्यातून शिक्षण क्षेत्रात वैश्विक एकता आणणे, घरी बसून जगातल्या कोणत्याही विद्यापीठाचा कोणताही अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य झाले. इतकेच नव्हे, तर संगणक, इंटरनेट, उपग्रह यांच्या समन्वयामुळे मोबाईलद्वारे शिकणे, वाचणे, लिहिणे, प्रेषण, मूल्यमापन, मुद्रण, समन्वयाने ग्रंथालय, विद्यापीठ, विद्यार्थी यांचा एक नवा ज्ञानसमाज व नवी ज्ञान यंत्रणा विकसित होऊन 'सा विद्या सा विमुक्तये' प्रमाणे विश्वशिक्षण अस्तित्वात आले.
"Globalization is a process of interaction and integration among the people and government of different nations; a process driven by international trade and investment and aided by information technology. This process has effects on the environment, on culture, on political system, on economical development and prosperity and on human physical well-being in societies around the world."
- Globalization101.org.
१. शिक्षणातील माध्यम बदल
जगाच्या पाठीवर इंग्रजी अध्यापन ३१ डिसेंबर, १६०० मध्ये सुरू झाले. भारतात ते व्हायला त्यानंतर साडेतीनशे वर्षे वाट पहावी लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास भारतात कलकत्ता, मुंबई व मद्रासमध्ये विद्यापीठे सुरू झाली व येथील इंग्रजी शिक्षणास सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात इंग्रजी बोलता आली पाहिजे इतक्या माफक अपेक्षेने पहिल्या शंभर वर्षांत इंग्रजी शिकवले गेले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी लिखित इंग्रजीचा आग्रह धरला जाऊन इंग्रजी रीडर (पाठ्यपुस्तक) द्वारे प्रत्यक्ष पद्धतीने (Direct Method) ने इंग्रजी सुरू झाले. स्वातंत्र्योत्तर काळात दुय्यम भाषा म्हणून (Second Language) इंग्रजी शिकवली जाऊ लागली. हा काळ देशी भाषांच्या अभिमानाचा काळ होता. सन १९६० ते १९८० च्या काळात इंग्रजीच्या शास्त्रोक्त अध्यापनाचा आग्रह समाजात मूळ धरू लागला. जिल्ह्याच्या ठिकाणी एखादी इंग्रजी शाळा असे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील पालकांची मुले अशा शाळांत जात. सन १९७५ ला सर्वत्र नवा आकृतिबंध (१०+२+३) आला तरी इंग्रजीचे स्थान अभ्यासक्रमात दुय्यमच राहिले.
पण उच्च शिक्षणाच्या वाढत्या प्रचार, प्रसारातून जो नवशिक्षित पालक वर्ग उदयाला आला, त्याला सन १९९४ च्या दरम्यान जागतिकीकरणाची चाहूल लागली. सर्वप्रथम उच्च शिक्षणात इंग्रजीचा माध्यम म्हणून आग्रह धरणारे विद्यार्थी उदयाला आले. वाणिज्यविषयक शाखा ज्या मराठीत शिकवत, तिथे इंग्रजीचा आग्रह धरला गेला. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयात इंग्रजीत अध्यापन होत असे. व्यवस्थापन, संगणक, विधी, पत्रकारिता इ. क्षेत्रात जे नवे अभ्यासक्रम आले, ते इंग्रजीत. या सर्वातून उच्च शिक्षणाची सार्वत्रिक भाषा इंग्रजी झाली. प्रादेशिक वा मातृभाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी उच्च शिक्षणात इंग्रजीत कच्चे राहतात, या जाणिवेने पालकांनी शाळांमध्ये इंग्रजी, अर्ध इंग्रजी (Semi English) चा आग्रह धरण्यातून माध्यमिक शाळात इंग्रजीत शिकवणे पसंत केले जाऊ लागले. हे धेडगुजरी अध्यापन होते, ते लक्षात आल्यावर बालवाडीपासूनच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अपेक्षिणारा पालक वर्ग तयार झाला. यातून भारतभर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले.
पण यामागे जागतिकीकरणाचे भान पालकांना होणे, हे महत्त्वाचे कारण होते. दरम्यानच्या काळात इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता पावली होती. संगणक क्रांतीने इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित केल्याने चीन, जपान, फ्रान्स, जर्मनीसारखे भाषिक, कट्टर देशही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पुरस्कृत करू लागले. बौद्धिक संपदेची भाषा इंग्रजी बनली. पर्यटनाने, विशेषत: विदेशी पर्यटनात जागतिकीकरणाने वाढ झाली. त्यातून इंग्रजीच्या सार्वत्रिकरणाचे भान सर्वसामान्यास झाले. पण सर्वांत मोठी अनुभूती दिली ती मोबाईलने. या साधनाने खरे तर जागतिकीकरण सर्वदूर पोहोचवले.
एके काळी शाळा-महाविद्यालय इंग्रजी हे अनुवाद पद्धतीने शिकवले जायचे. आज प्रथम भाषा व प्रत्यक्ष पद्धती, संरचना पद्धती (Structural Method) ने शिकवले जाते. शिवाय संवादी कौशल्यावर भर दिल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांतील इंग्रजीचा न्यूनगंड कमी झाला. जागतिकीकरणाने सर्व भाषांचे इंग्रजीकरण करण्याचा झपाटा लावल्याने दैनंदिन भाषा व्यवहारात इंग्रजीचे वाढते आक्रमण प्रादेशिक भाषा प्रदूषित करीत आहे. नवी पिढी घरी मातृभाषा बोलते, टी.व्ही.वर हिंदी कार्यक्रम पाहते, शाळेत इंग्रजी शिकते. त्यामुळे ती त्रैभाषिक झाली आहे. तिला एकही भाषा धड येत नाही. 'मी डायनासोर पाहून डरलो' अशी वाक्ये सर्रास ऐकायला येणे, त्याचेच प्रतीक होय. वृत्तपत्रांनी तर भाषा प्रदूषणाचा विडाच उचलल्याची स्थिती आहे, त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमे (टी.व्ही आणि इंटरनेट, गुगल) मागे नाही. मोबाईलची भाषिक ऍपस् सदोष आहेत. 'दुसऱ्याला' शब्द 'दुसर्याला' लिहिणे भाग पडते. वर्तमानपत्रांचे सदोष मथळे 'उच्च शिक्षणाची फी दामदुप्पट' यात फी व दाम दोन्हीचा अर्थ एकच आहे, हे संपादकांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे जागतिकीकरणात इंग्रजीचा आग्रह सावध हवा. भाषिक प्रयोग जबाबदार हवेत. शिवाय स्थानिक भाषा, बोली, संस्कृती टिकली नाही तर उद्याची पिढी 'धोबी का कुत्ता न घर का न घाट का' अशी त्रिशंकू झाल्याशिवाय राहणार नाही.
२. सार्वत्रिक शिक्षणाकडून खासगीकरणाकडे
स्वातंत्र्यानंतर भारताने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे धोरण अवलंबून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शिक्षण प्रसार सुरू केला. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून देशी वा राष्ट्रीय शिक्षणाच्या काळात शहरांबरोबर खेड्यातही सुरू झाल्या. व्हॉलंटरी स्कूलची चळवळ ही टिळक, आगरकरांच्या पुढाकाराने व राष्ट्रीय चळवळीचे साधन म्हणून सुरू झाली. नंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सुरू होऊन लोकल बोर्ड अस्तित्वात आली. त्यांनी व्हॉलंटरी स्कूल्स (खासगी शाळा) ताब्यात घेतल्या. स्वातंत्र्यानंतर नगरपरिषदा व जिल्हा परिषदांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांद्वारे शासनाने प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक केले. याबरोबरीनेच साक्षरता प्रसार मोहीम राबवून प्रौढांना साक्षर बनविले. यास समांतर खासगी शाळा महाराष्ट्रात होत्याच. अन्यत्र मात्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोठ्या प्रमाणात सरकारीच राहिले.
जागतिकीकरणापूर्वीच येथील शाळांच्या गुणवत्तेत झालेल्या घसरणीमुळे खासगी शाळांचे महत्त्व वाढले. नगरपरिषदा व जिल्हा परिषदांच्या शाळांना ओहोटी लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे या शाळांत शिक्षक होते पण शिक्षण नव्हते. शिक्षकांची सेवा शाश्वती, वाढती पगार वाढ यामुळे प्रेमचंद, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, धोंडो केशव कर्वे पठडीतील ध्येयवादी शिक्षक जाऊन त्यांची जागा नोकरदार शिक्षकांनी घेतली. शिक्षक व गावचे पुढारी सार्वत्रिक शिक्षणाचा एकीकडे आग्रह धरायचे, पण आपले पाल्य मात्र खासगी शाळांत पाठवत. समाज जसजसा जागा व शिक्षित होत गेला तसे त्यास गुणवत्ताप्रधान, व्यक्तिगत लक्ष देणारे साधनसंपन्न, आधुनिक तंत्रज्ञान साधनांद्वारे शिक्षण (दृकश्राव्य साधने, प्रोजेक्टर, संगणक, इंटरनेट, स्मार्ट बोर्ड, स्मार्ट क्लास इ.) महत्त्वाचे कसे हे कळून चुकले. गावाकडून तालुका, तालुक्यातून जिल्हा, जिल्ह्यातून महानगरांकडे शिक्षणासाठी विद्यार्थी धाडण्या, ठेवण्याची पालकांची वाढती धडपड होती. या जागतिकीकरणाचे भान देणारी, सूचक, सावध धडपड होती. या वाढत्या कलातून इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, विदेशी विद्यापीठे याची मागणी वाढली.
उच्च शिक्षण स्तरावर पारंपरिक विद्यापीठांना आज लागलेली गळती ही उद्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या स्थैर्याची सूचक घंटा होय. अनुदानाने शिक्षक व संस्था टिकविता येतील. गुणवत्ता शिक्षण हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या अधिकच्या श्रमावर व संस्थांनी वाढविलेल्या कालसंगत शैक्षणिक साधनांवरच अवलंबून असते हे कळायला सर्वसामान्य समज पुरी आहे. महाराष्ट्रातील सार्वत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेस घसरण लागण्याचे आणखी एक कारण, येथील विना अनुदान शिक्षण धोरण, शिक्षण सेवक नियुक्ती, तासिका तत्त्वावर प्राध्यापक नियुक्ती, भौतिक सुविधांचा अभाव, पैसे घेऊन शिक्षक, प्राध्यापकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाढत्या नियुक्त्या, वेतनेतर खर्च, अनुदान कपात, शाळा भाडे बंद करणे अशी मोठी यादी देता येणे शक्य आहे. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन पातळीवर 'रुसा' (RUSA) योजनांची अंमलबजावणी झाली. उच्च शिक्षणात गुणवत्तेसाठी 'नॅक' मानांकन आले, शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी 'एपीआय' आला. सार्वत्रिक शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणून शिक्षण भौतिक संपन्न झाले. पण अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके ही कालबाह्यच राहिली. उच्च शिक्षणातील स्वायत्ततेचे प्रतिबिंब म्हणून प्रगत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आलीत असे म्हणणे वस्तुस्थितीचा विपर्यास ठरेल. बालभारतीची पाठ्यपुस्तके व पाठ्यक्रम, विद्यापीठीय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यांचे काळाच्या कसोटीवर मूल्यांकन केल्यास विद्यार्थी वर्गात का बसत नाहीत, याचे उत्तर हाती येईल.
प्रश्न सार्वत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा जसा आहे, तसा खासगी शिक्षण संस्थांतील शिक्षण मूल्यांचाही आहे. सार्वत्रिक शिक्षण शिक्षकांची हमी देते. 'शिक्षणाची हमी देणारे शिक्षण' हे वर्तमान सार्वत्रिक, खासगी व जागतिकीकरणाने येणाऱ्या विदेशी शिक्षण व्यवस्थेपुढचे आव्हान आहे. नव्या काळात ऑनलाईन एज्युकेशन, व्हर्च्युअल एज्युकेशनच्या नव्या व्यवस्था रूढ व लोकप्रिय होत आहेत. पारंपरिक शिक्षण पठडी बदलून कालसंगत शिक्षण हिच जागतिकीकरणाची खरी गाज आहे.
३. मौखिकतेकडून दृक-श्राव्य शिक्षणाकडे
आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. हे शतक 'माहिती व तंत्रज्ञानाचे युग' म्हणून महत्त्वाचे आहे. प्रगत देशांतील शिक्षणाचा प्रवास मौखिक अध्यापनाकडून (oral) दृक-श्राव्य अध्यापनाकडे (Audio-Visual Teaching) असा होताना दिसतो. प्रगत देशात जागतिकीकरणामुळे आपले शिक्षण जगात श्रेष्ठ ठरावे म्हणून जागरूकता आढळते. 'पिसा' चे निर्देशांक प्रमाण मानून वाचन, विज्ञान व गणित प्रमाण अभ्यासक्रम भाषा, विज्ञान व गणिताद्वारे अक्षर व अंकांच्या समन्वयाने भौतिकाचा वेध घेण्याची अटकळ त्यामागे दिसून येते. जगाला याचे भान आहे की नवी विद्यार्थी पिढी ही जन्मतः संगणक साक्षर आहे, त्यांचे वर्णन Digital Native वा Digital Kid असं केले जाते. नवी आई मुलाला जन्म दिला न म्हणता 'बाळ डाऊनलोड केले' म्हणते. ही बाळे खुळखुळ्याशी न खेळता 'गुगल' शी खेळतात, 'गुगल' नी त्यांना केवळ आवाजी कमांडवर (Voice Mail /App) वर जगाचे ज्ञानाचे महाद्वार उघडे केले आहे, ही पिढी लिहीत नाही, सरळ टंकित (Type) करते. तिला संगणक, मोबाईल, रिमोटच्या सर्व कमांड, इनपुट, आऊटपुट, डिलीट, डाऊनलोड, कट, पेस्ट, फॉर्वर्ड, मॅसेजिंग, सेंड, सारे न शिकवता येते. ते सारे खेळ व्हर्च्युअल खेळत व्हर्च्युअल जगाचे नागरिक होतात.
दुसरीकडे हे सारे उघड्या डोळ्यानी पाहणारे शिक्षण नियोजक, धोरणकर्ते, कुलगुरू, प्राध्यापक, शिक्षक मात्र बदलायला तयार नाहीत. ई-बुकच्या जमान्यात अजून ते कागदी पाठ्यपुस्तकातच रमून आहेत. अजून ग्रंथालयात ई-बुक्स, ई-जर्नल नगण्य आहेत. शिक्षक, प्राध्यापकांना स्वत:चा मोबाईल शैक्षणिक साधन म्हणून वापरावा वाटत नाही. एकट्या मोबाईलने हजेरी घेणे, रजा चिठ्ठी, गृहपाठ देणे, ऑडिओ, व्हिडिओ क्लिपद्वारे अध्यापन, व्हॉटस् ऍपद्वारे शंका निरसन सारखी शैक्षणिक कार्ये करणे शक्य असताना, ते करताना दिसत नाही. स्मार्ट बोर्ड आला तरी आपण ब्लॅक बोर्डमध्येच अडकून आहोत. एलसीडी प्रोजेक्टर असून आपण शिकवतो तोंडीच. प्रकल्प, सर्वेक्षण, जर्नल, गटचर्चा, स्वयंअध्यापन, सहविद्यार्थी अध्यापन अशा नव तंत्राचा अपवाद वापर आपल्या शैक्षणिक अनास्थेचे लक्षण होय.
संगणक, इंटरनेट, उपग्रह, ऍप्स्, क्लिप्स, ब्लॉग्ज, वेबसाईट, लिंक्स, युट्यूब, विकीपीडिया, ऑनलाईन भाषा, विज्ञान सॉफ्टवेअर आपण वापरू बघत नाही. इंटरनेटवर इतकी शैक्षणिक साधने आहेत की 'Chalk and Talk' च्या जागी 'Plug and Chug' चा काळ आलाय हे आपण आचरणात आणत नाही. कॉम्प्युटर लॅब, लँग्वेज लॅब, टच स्क्रीन बोर्ड (स्मार्ट बोर्ड), स्मार्ट क्लास, थ्री डी क्लास या काही अशक्य गोष्टी नव्हेत. 'डिगो', 'ग्लॉगस्टर', 'प्रेझी', 'ड्रॉपबॉक्स', 'एव्हरनोट', 'वॉलविशर', 'टायटन पॅड', 'स्कायपी', 'विबे', 'विकीस्पेस' सारखी असंख्य साधने मोफत डाऊनलोड करून दैनंदिन अध्यापन अधिक प्रभावी रंजक करणे शक्य आहे. फार नाही पण किमान संगणक साक्षरता व त्याचा दैनंदिन उपयोग शिक्षकांना अनिवार्य व आकर्षक वाटायला हवा, गरजेचा वाटायला हवा. टू व्हिलर, फोर व्हिलर गरजेचीच, पण लॅपटॉप व इंटरनेटही अनिवार्य मानून शिक्षक, स्वत:ला आधुनिक बनवतील, तरच ते जागतिकीकरण, खासगीकरण, विदेशी शिक्षण इत्यादी आव्हानांचा प्रतिकार करू शकतील.
जगात हार्वर्ड विद्यापीठा इतकेच खान ऍकॅडमीचे महत्त्व आहे. या ऍकॅडमीचा प्रमुख सल खान हा केवळ अध्यापनातील नव तंत्रज्ञानाचा वापर करत बिल गेटसशी स्पर्धा करत फोर्सच्या अब्जाधीशांच्या यादीत येतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, वैद्यक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक या सर्व विद्याशाखात आपण नवा तंत्रज्ञान कुशल विद्यार्थी लक्षात घेऊन अध्यापन केले तरच जागतिकीकरणाचे शिक्षणाचे आव्हान पेलू शकू. ज्ञानरचनावाद असो वा ऑनलाईन शिक्षण असो विद्यार्थी-शिक्षकातील दरी कमी होणे, अभ्यासक्रम समकालीन होणे, संस्था साधन संपन्न असणे काळाची गरज होय. शासनाचे शिक्षणातील निर्गुंतवणूकीचे धोरण पाहता शिक्षकालाच आपले शिक्षण बाजारमूल्य निर्माण करावे लागेल. समान अभ्यासक्रमांजागी विशेष व वैयक्तिक अभ्यासक्रमाचा काळ येऊन ठेपला आहे, याचे भानही येथील शिक्षण व्यवस्थेला व्हायला हवे.
४. नियंत्रिततेकडून स्वायत्ततेकडे
स्वातंत्र्यानंतर भारताने विकासाचे जे धोरण अंगीकारले होते, त्यास समाजवादी विचारांची बैठक होती. म्हणून उद्योगात नियंत्रित करणारे सार्वजनिक उद्योग आले तसे शिक्षणात नियंत्रित धोरणाचे अभ्यासक्रम व संस्था जागतिकीकरणाचा मूलाधार हा उदारीकरण आहे. त्याचे बीज मुक्त अर्थव्यवस्थेत आहे, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे 'कमवा नि खर्च करा.' यात शासकीय अनुदान नसते. सवलत, तगाई, माफी नसते. शिवाय 'सब घोडे बारा टक्के' असा रोख ठोक व्यवहार असतो. आपणाकडील शिक्षण व्यवस्थेचा स्वातंत्र्योत्तर काळातील विकास हा शासन साहाय्यावर व शासन नियंत्रित राहिला आहे. त्या वेळी आपणापुढे 'रशिया' हे विकासाचे मॉडेल होते. शिवाय अर्थसाहाय्यही रशियाचेच होते.
जागतिकीकरणाच्या प्रक्रिये दरम्यान सोव्हिएत प्रजासत्ताक म्हणजे रशियाचे विभाजन झाले. आर्थिक दिवाळखोरीत रशियाचा आधार संपला. भारताने विकासार्थ आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटन यांच्याशी वेगवेगळे करार करत आपला विकास दर कायम राखला. या सर्व उलाढालीत परवाना पद्धती, नियंत्रणे, अटी, कर पद्धती, अनुदान, सवलतादी बाबी कर्ज मुक्तीसाठी अडचणीच्या ठरू लागल्या. वाढत्या जागतिक दबावाला बळी पडून भारताने सन १९९० च्या दरम्यान जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण धोरण स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली.
याचा परिणाम म्हणून शिक्षणाचे खासगीकरण, शिक्षणात विदेशी गुंतवणूक, विदेशी विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांना त्यांच्या शाखा उघडायला अनुमती देणे विविध करारांमुळे अनिवार्य होऊन बसले. रिलायन्स, विप्रो, फिनोलेक्स सारख्या औद्योगिक संस्था शिक्षणाकडे उद्योग, व्यवसाय, कमाईचे साधन म्हणून पाहू लागल्या. दुसरीकडे शासनास शिक्षण हे निरुत्पादक (Non Productive) वाटू लागले. समाजही त्याच्याशी सहमत होण्याचे एक कारण असे होते की कोट्यवधी रुपये वर्षांनुवर्षे खचूनही शिक्षणाची गुणवत्ता वाढत नव्हती. शिक्षण व्यवस्था म्हणजे शिक्षक सांभाळण्याची निरुद्योग असे स्वरूप येऊन गेले. शासन तरी पांढरा हत्ती किती दिवस पोसणार? शासनाने शिक्षणात ही निर्गुंतवणूकीची नीती स्वीकारून स्वयंअर्थशासित शिक्षण संस्था सुरू करणे पसंत केले. विना अनुदानित शिक्षण संस्था ही त्या पूर्वीची कवायत होती. विद्यमान शासनाने शिक्षणाचे 'नवे धोरण-२०१६' जाहीर केले आहे त्यात स्पष्ट म्हटले आहे की, "Poor quality of education resulting in unsatisfactory learning outcomes is a matter of great concern. Quality-related deficiencies such as inappropriate curriculum, the lack of trained educators and ineffective pedagogy remain a major challenge relating to education." (Some inputs for draft NEP-2016 P-7) शाश्वत शिक्षण विकासाचे युनेस्को निर्धारित लक्ष्याशी शासन बांधील असल्याने येथून पुढच्या काळात शिक्षणाचे धोरण 'Ensure inclusive and equitable quality education and promote lifelong learning opportunities for all' राहणार हे उघड आहे.
शिक्षणाचे स्वायत्तीकरण (Autonomous System) हे शासनाचे दीर्घपल्ल्याचे धोरण असून त्याचाच एक भाग म्हणून व जागतिकीकरणाची अनिवार्यता म्हणून शासनाने नव्या धोरणात आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व स्वरूपाचे करण्याचे ठरवले आहे. नव्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की, "Internationalization is a inevitable dimension of higher education is in this era of globalization and generation of new knowledge and its application." (P. 37) (S.D. NEP) एकीकडे जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांत भारताचे एकही विद्यापीठ नसणे व दुसरीकडे येथील विद्यार्थ्यांचा विदेशात शिक्षणार्थ जाण्याचा वाढता ओघ. आपल्या शिक्षणाची गुणवत्ता व कौशल्य विकासाचे साधन बनवल्याशिवाय आपणास पर्याय नाही. त्यामुळे सार्वत्रिक नियंत्रित शिक्षणाकडून स्वायत्त विशेष शिक्षणाकडे आपण गलो तरच उद्याच्या स्पर्धेच्या जागत टिकून राहू, याचे भान ठेवून येथील शिक्षणाची रचना करणे अटळ व अनिवार्य आहे. ५. ज्ञानरचनावाद ते कौशल्य विकास
भारतीय शिक्षण औपचारिक होते तसेच ते केवळ माहिती पुरविणारे होते. त्यात विद्यार्थी केंद्रिततेचा अभाव होता. उलटपक्षी जगात मात्र शिक्षणाचे केंद्र विद्यार्थी होते. विशेषत: इ. स. १७५० ते १८५० हा कालखंड आपण पाहू लागलो तर रुसो, पेस्टॉलॉजी, फ्रोबेल यांच्या विचारांमुळे युरोपमध्ये मुलांच्या नैसर्गिक विकासाचे तत्त्व मान्य करून शिक्षणाची रचना करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र शिक्षणात त्याचे प्रतिबिंब दिसून येत नव्हते. मुले स्वत:च आपल्या ज्ञानाची निर्मिती करत असतात, यावर शिक्षकांचा विश्वास नसावा असे शैक्षणिक वातावरण होते, त्याला छेद देण्याचे कार्य ब्रूनरने केले. त्यातून बालकेंद्री शिक्षणाचा विचार सुरू झाला. सध्या शिक्षण जगतात ज्ञानसंरचनावादाची (Constructivism) जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार ज्ञान हे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांमध्येच विकसित होत असते, हे मान्य करून ते देण्याची वा हस्तांतरित करण्याची पूर्वापार पद्धत बंद करण्यात आली. ज्ञाननिर्मितीकेंद्री अध्यापनास महत्त्व हे ज्ञानसंरचनावादाचे मूळ उद्दिष्ट स्वीकारण्यात आले आहे. त्यासाठी बुद्धीला चालना देणारे वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणसंस्थांची व शिक्षकांची असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानुसार २०१३ पासून प्राथमिक स्तरावर या नव्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
त्याच्या पुढची पायरी म्हणजे कौशल्य विकास होय. विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न असून भागणार नाही. प्राप्त ज्ञानाचा उपयोग जीवन जगण्यासाठी होणे ही वर्तमान शिक्षणाची पूर्व अट होऊन बसली आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थी हा तंत्रकुशल असायला हवा. याचे भान देशास झाल्याने शिक्षणात कौशल्य विकासास असाधणार महत्त्व देण्यात आले आहे. आजच्या घडीला भारत हा जगातला सर्वांत तरुण देश आहे. भारताच्या विद्यमान लोकसंख्येच्या ५४% हे २५ वर्षांच्या आतील तरुण मुले-मुली आहेत. सन २०२२ पर्यंत ही संख्या १० कोटीच्या घरात असेल. (कार्यक्षम तरुण मनुष्यबळ) हे लक्षात घेऊन नव्या शिक्षण धोरणाचा (२०१६) जो मसुदा प्रकाशित करण्यात आला आहे, त्यात शिक्षणाचे व्यावसायीकरण व विद्यार्थ्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, "To enhance employability, a blend of education and skill is essential for individual growth and economic development. Festering dignity and social acceptibility to high quality vocational training needs increased attention." (Some Inputs for Draft NEP-2016 - Pg - 26)
पुढच्या काळात किमान २५% शिक्षण संस्थात कौशल्याधारित शिक्षणक्रम राबविण्याचा शासनाचा मनसुबा असून तो शिक्षणाच्या जागतिकीकरणाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीमागे धावण्याऐवजी नोकऱ्या निर्माण करणारे स्वयंरोजगार सुरू करावेत अशी अपेक्षा त्या मागे आहे. भविष्यकाळात भारताची स्पर्धा अमेरिकेशी न राहता चीनशी राहणार आहे, याचे भानही या धोरणामागे दिसून येते. या बरोबरीने सरकार भविष्य काळात माहिती व तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर देणार हेही स्पष्ट आहे. सन १९८६ च्या आणि १९९२ च्या शैक्षणिक धोरणात याचे सूतोवाच करण्यात आले होते, आता ते शिक्षक प्रशिक्षणात अनिवार्य करून नवा शिक्षक माहिती व तंत्रज्ञान विषयक साधन साक्षर असेल हे पाहण्यात येणार आहे.
त्यामुळे भारताचे भविष्यलक्ष्यी शिक्षण हे उद्योगमूलक, कौशल्याधारित, उत्पादक, स्वयंअर्थशासित राहणार ही काळ्या दगडावरची रेष होय. जागतिकीकरणाने शिक्षणाला दिलेले नवे उत्पादक परिमाण हे नव्या शिक्षणास भौतिक संपन्नतेचे साधन जरूर बनवेल, पण भारतीय समाजमन व समाज रचना लक्षात घेता, येथील उत्पन्न स्तर लक्षात घेता, येथील शिक्षण शासन साहाय्यित राहिल्याशिवाय विकसित होणार नाही, हे वास्तव विसरता कामा नये. पालकांची आर्थिक क्षमता हा खासगी सशुल्क शिक्षण पद्धतीचा पाया रहाणार असेल तर इथल्या दरडोई उत्पन्न वाढीचा विचार महत्त्वाचा होतो. भारताचा विकास दर आठ टक्क्यांपेक्षा पुढे सरकत नाही. येथील सशुल्क शिक्षण यशस्वी व्हायचे तर विकास दर दोन आकडी (१०%) होणे गरजेचे आहे. १५% उच्चशिक्षित विद्यार्थी तयार व्हायचे तर विकास दरही तितका व्हायला हवा.
•••
वर्तमान भारतीय शिक्षण जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे नियंत्रित व्यवस्थेकडून स्वायत्त व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. केंद्र व राज्य सरकारची विकासासंबंधीची मानसिकता कल्पना कल्याणाकडून निर्गुंतवणूकीकडे अग्रेसर आहे. त्यातून विना अनुदानित खासगी, स्वायत्त शिक्षण रचना अस्तित्वात येते आहे. कधी काळी शिक्षणावर ३% खर्च करणारे शासन दुप्पट तरतूद करत ६% पर्यंत येऊन पोहोचले आहे. आपण क्षमतेपेक्षा अधिक खर्च करतो याचा सरकारला कोण अभिमान ? पण शासनास या गोष्टीचा विसर पडतो की जे देश स्वत:चा विकास म्हणजे मनुष्यबळ विकास मानतात, ते शिक्षणावर १५% खर्च करतात. खरं तर शिक्षण विकासातून शासनाने घेतलेला काढता पाय हा या देशातील वंचित समाजावर केलेला अन्याय आहे. शासनाचे शिक्षणातील निर्गुंतवणूकीकरणाचे धोरण हे सरळ सरळ भांडवलधार्जिण्या खासगी संस्थांचे उखळ पांढरे करण्याचे धोरण आहे. देशातील अधिकांश शिक्षण संस्था या काँग्रेस व भाजप प्रणित आहेत, त्यातही अधिकांश राजकीय लोकप्रतिनिधी व पक्ष पुरस्कृत आहेत, त्यांचा प्रवास ध्येयाकडून धंद्याकडे सुरू आहे. समाजात वाढलेल्या आकांक्षा, आर्थिक स्तराचे उंचावणे, वैश्विक संपर्क (जगाचे जवळ येणे), ज्ञान क्षेत्र व समाजात ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचे वाढते वर्चस्व, परिणामी समाज मनाचे (पालकांचे) मातृभाषेकडून इंग्रजीकडे स्थलांतर या गोष्टींमुळे एके काळी सार्वत्रिक शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळांना ओहोटी लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा प्रलोभने दाखवत, देत (गणवेश, भोजन, वाहन, शैक्षणिक साहित्य इ.) टिकून असल्या, तरी शिक्षकांची मानसिकता पाट्या टाकण्याची असल्याने त्या फार काळ तग धरतील असे वाटत नाहीत. आजच शिक्षकांचे समायोजन (एका शाळेतून दुसऱ्या शाळेत मुखडे) गतिमान आहे, उद्या शाळांचे समायोजन काळ्या दगडावरची रेघ होय. शिक्षक संघटनाही हक्कांच्या लढाईत गर्क आहेत. शासन, संस्था, शिक्षक ज्याला त्याला आपले अंगावरचे कपडे वाचवण्यात धन्यता वाटते. बळी आहे तो गरीब, वंचित विद्यार्थी, त्याच्याशी कुणाचेच देणे-घेणे राहिले नाही. यामुळे शिक्षणात 'बळी तो कान पिळी' हाच कायदा अस्तित्वात आल्याचे चित्र आहे.
खासगी संस्थाचालक, त्यांच्या संस्था, संचालक, शिक्षक, शाळा कधी काळी ध्येयवादी होत्या. कारण त्यांचे स्थापक टिळक, आगरकर, महात्मा गांधी होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील संस्थांचे प्रेरक फुले, शाहू, आंबेडकर राहिले आहेत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्थापन झालेल्या संस्था, संघटनांमागे राष्ट्रीयता, ज्ञाती कल्याण, वर्ग-वर्ण अस्मिता व आकांक्षा विकास भावना कार्यरत होती. नंतरच्या पिढीत आलेले संस्थाचालक आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणारे निघाले. त्यांनी आपल्या शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील असे पाहिले नाही. त्या त्याग, समर्पण, ध्येयात मशगुल राहिल्या. उत्तराधिकारी पट्टीचे व्यावसायिक निघाले. ज्यांना आर्थिक दूरदृष्टी होती. राजकीय पाठबळ होते अशांनी डी.एड., बी.एड., इंजीनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक सुरू करून विशाल शिक्षण संकुले उभारली. परिसरातील विद्यार्थ्यांची सोय झाली, मूली शिकत्या झाल्या, शिक्षित पिढीस शिक्षक रोजगार लाभला, सततच्या वाढत्या देणगी फी (कॅपिटेशन/डोनेशन), शिक्षक-प्राध्यापकांचे वाढते वेतनमान (पाचवा/ सहावा वेतन आयोग) यामुळे संस्थाचालक मालक बनले व शिक्षक प्राध्यापक सालदार. संस्थांची विद्यार्थी क्षमता, तुकड्या निरंतर वाढत राहण्याच्या उद्योगात मागणी-पुरवठ्याचे गणित विस्कटले. आज संस्था आहेत, पण विद्यार्थी नाहीत, शिक्षक आहेत, पण शिक्षण नाही. हे विदारक चित्र शासनकर्त्यांच्या ऱ्हस्व शिक्षण दृष्टी व स्वार्थी विकासनीती यांचे अपत्य होय.
भारतीय समाज सन १९९० पूर्वी निम्न, मध्यम व उच्च असा त्रिस्तरीय होता. जागतिकीकरणाने उंचावलेल्या आर्थिक मानात मध्यमवर्ग संपुष्टात आला, निम्न मध्यमवर्गाचे निम्नवर्गात रूपांतर झाले. उच्च मध्यमवर्ग उच्च वर्ग बनला. सध्या समाजात दोनच वर्ग आहेत, दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील. सोप्या शब्दांत समाज गरीब व श्रीमंत वर्गात विभागला आहे. मोल-मजुरी, हंगामी नोकरी, करारबद्ध वेतन (अंगावर काम/खंडून काम) असा एक वर्ग. दुसरा वर्ग मिळवतो, पण शाश्वती नसलेला. उद्याची भ्रांत असलेला सध्या भारतात हाच वर्ग उत्पादक राहिला आहे. नोकरदार (सुरक्षित) व मालक वर्गाची सध्या चांदी आहे. उत्पन्न अधिक, खर्च कमी यामुळे त्याचे जीवनमान निरंतर उंचावते आहे. उलटपक्षी गरीब वर्गाच्या उत्पन्नापेक्षा महागाईमुळे खर्च वाढता राहून गरिबी वाढते आहे. घटनेत समाजवाद असला, तरी आपला सामाजिक व्यवहार भांडवल धार्जिणा झाला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बघ्या समाजासाठी सेलिब्रेटी बनले आहेत. ते माध्यमांचे च्युईंगम बनून रोज प्रसिद्धी, वाद-विवादात दंग आहे. खरे समाज हितैषी गोळ्या खाऊन मरत आहेत. न पेक्षा अप्रसिद्ध राहून मार्जिनल कार्य करत सातत्याने शांत क्रांती घडवत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सत्कार्याचे शासन, समाज, माध्यमांना देणे-घेणे राहिले नाही. सनसनाटी, झगमग, कॅमेरा व फ्लॅशगन स्वत:कडे वळवत ठेवण्याचे कौशल्य हा नवा समाज धर्म बनल्याने सामान्य माणसाला गुंगारा देणे, गुंगीत ठेवणे सोपे झाले आहे. इव्हेंटबेस प्रपोगंडा, बर्थ-डे, सेलिब्रेशन फंडा, फ्लेक्स कल्चर, होर्डिंग हँग ओव्हरमुळे जगण्याचे व विकासाचे खरे प्रश्न मार्जिनल होत जातीय, धार्मिक, सांस्कृतिक अस्मितांना आलेले टोक हे क्षणिक रंजक खरे पण अंतिम हिताचे खचितच नाही. स्पर्धा परीक्षांमागे धावणारे लक्षावधी घोडे रेसचा एक नियम विसरेल की स्पर्धेत यशवंत शंभरात दहाच असतात. नव्वदांचे वैफल्य स्पर्धेतून पूर्ण बाद (वय उलटल्यावर) झाल्यावर लक्षात येते, ते ९०% तिशी पार करत लग्न, नोकरी, व्यवसाय सर्व क्षेत्रात कुचकामी ठरतात. युएसएसचं स्वप्न घेऊन जगलेली तरुणाई श्रम संस्कृतीत पूर्णतः निकामी सिद्ध होते.
शिक्षक घटकाबद्दल मी इतके लिहिले असल्याने येथे अनुल्लेखच उल्लेख ठरावा.
पालक समाजाचा अविभाज्य भाग असल्याने 'समाज' चिंतनात त्यांचेच प्रतिबिंब आहे.
विद्यार्थी 'मुकी बिचारी, कुणी हाका' अशा स्थितीत कालही होते, आजही आहेत, उद्याही ते तसेच राहणार आहेत. प्रश्न आहे तो चक्रव्यूह भेदण्याचा ! प्रश्न आहे मत्स्यलक्ष्याचा !! अभिमन्यू आणि अर्जुनाच्या प्रतीक्षेतील शिक्षण अनुदान, नियंत्रण, नियमन या सर्वांपलीकडे सर्वांना समान गुणवत्तेचे शिक्षण देण्याचे शिवधनुष्य केव्हा पेलणार ? स्वातंत्र्यानंतर सन १९६० ते १९७० चे दशक महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सार्वत्रिक शिक्षण विकासाचे दशक होते. या दशकात दोन क्रांतिकारी घटना घडल्या. एक आर्थिकदृष्ट्या मागास (इ.बी.सी.) वर्गास उच्च शिक्षणाची कवाडे खुली झाली, ती शिक्षण शुल्क माफीमुळे. दुसरे याच काळात खेड्यापाड्यात माध्यमिक शाळा व महाविद्यालये सुरू झाली. सन १९७० च्या दरम्यान स्वतंत्र भारतात जन्मलेली शिक्षित पिढी मिळवती व कर्ती बनली. सन १९७० ते १९८० हा काळ समाजाच्या सार्वत्रिक व समान विकासाचा राहिला. सन १९७० दरम्यान १०+२+३ आकृतीबंध अस्तित्वात आला. सन १९७५ पर्यंत नव्या आकृतिबंधातील शिक्षित पिढी महाविद्यालयीन/उच्च शिक्षण घेण्यास सज्ज झाली. पण महाराष्ट्रात त्या वेळी अभियांत्रिकी, वैद्यक, विधी विद्याशास्त्रातील शिक्षण देणाऱ्या संस्था उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाच्या विद्यार्थी संख्येच्या मानाने अल्प होत्या. येथील विद्यार्थी उच्च शिक्षणार्थ परप्रांतात जात असत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अशा शासकीय संस्था विकसित करण्याइतकी मजबूत नव्हती. शासनाचा प्राधान्यक्रम सहकार, शेती, उद्योग, सिंचन, रस्ते, धरण असा भौतिक होता, यातून मार्ग काढण्यासाठी बिन भांडवली शिक्षण विकासाचे धोरण अंगीकारण्यात येऊन विना अनुदान शिक्षण व्यवस्था/संस्कृती उदयाला आली. आजचे खासगी शिक्षण धोरण त्याचाच विस्तार व विकास होय.
आज आपणा सर्वांना गुणवत्ताप्रधान शिक्षण द्यायचे आहे पण सर्वांना समान सुविधा व गुणवत्तेचे सार्वत्रिक शिक्षण ही शासनाच्या आवाक्यातली गोष्ट राहिली नाही. शासनकर्त्यांना प्रजाहितापेक्षा स्वत:च्या शैक्षणिक संस्थांची अधिक चिंता आहे. आजचे शैक्षणिक विश्व हे समांतर आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनले असल्याने पुढे जाता येत नाही व मागे सरकता येत नाही. विद्यमान शिक्षण संस्थांतील शिक्षण ग्लेझ्ड, गॅल्व्हनाईज्ड, ग्रेनाइटेड झाले आहे. या शिक्षणाचे दोन घटकांशी देणे-घेणे राहिलेले नाही १) गरिबी २) गुणवत्ता. विद्यमान शिक्षण 'रामभरोसे ' झाले आहे. हे ऐकण्यास क्लेशकारक, खेदकारक असले तरी ते वस्तुनिष्ठ व वास्तविक चित्र आहे.
यात बदल करायचा झाला तर वर्तमान संस्थांना अनुदान वाढ व शाश्वती द्यावी लागेल. पारंपरिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालये, माध्यमिक व प्राथमिक शाळांत भौतिक विकासाबरोबर गुणवत्ता, दर्जा उंचावण्याची संरचना, प्रक्रिया क्रियान्वित करणे, शिक्षक-प्राध्यापकांना विद्यार्थी गुणवत्तेस जबाबदार धरण्याची यंत्रणा/लेखापरीक्षण/बांधिलकी अनिवार्यता विकसित करणे असे मार्ग चोखाळावे लागतील. रिक्त पदपूर्ती, शिक्षक सेवक उच्चाटन, तासिका नियुक्ती संपविणे, बालवाडी ते विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय धोरणाचा अंगीकार, निरंतर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रमात काळानुरूप गतिमान बदल असे एकाच वेळी, बहुअंगी परिवर्तन व गुंतवणुकीचे धोरण शासनास अंगीकारावे लागेल. समाज प्रगल्भ, जागृत, शिक्षित झाल्याने पुढेच जावे लागेल. गडावरून उतरता येणार नाही, दोर कापलेले आहेत. हिरकणी बुरुजावर पहारा देत, 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' अशा निकराच्या, निर्वाणीच्या टोकावर, टकमकी बुरुजावर उभे वर्तमान शिक्षण विषमता पिऊ पाहणाऱ्या अगस्तीच्या प्रतीक्षेत आहे. आज मी या ओळी लिहितो आहे तो २०१५ चा शिक्षक दिन! यासारखे मुक्त शिक्षण चिंतन वर्तमानात दुसरे कोणते असू शकते? या तर अभिमन्यू बनू, अर्जुन बनू, चक्रव्यूह भेदू, मत्स्यभेद करू. सर्वांना समान गुणवत्ता व संधीचे सार्वत्रिक शिक्षण देऊ.
•••
नवे शिक्षक
केशवसुतांची 'नवा शिपाई' कविता कितीतरी दिवस माझ्या मनात घर करून आहे, तसा 'नवा शिक्षक' पण. 'नवा शिपाई' धर्तीवर मी 'नवा शिक्षक' कविताही लिहिली आहे. तो या लेखनामागचा भावपक्ष होय. भौतिक वास्तव मात्र वर्तमान आहे. ती या लेखाच्या शेवटी दिली आहे. गेल्या तपभराच्या काळात जगात, भारतात, महाराष्ट्रात मोठे बदल होत आहेत. जगातील शिक्षणाबाबत युनेस्को, युरोपियन युनियन, सार्क अशा विविध संघटना जागतिक, उपखंडीय शिक्षणाबाबत सतत विचारविनिमय, चर्चासत्रे, परिषदा, अहवाल असे रिंगण काळाच्या अपेक्षा व आवाहनांची सांगड घालत शिक्षणात नवे बदल सुचवत शिक्षकाची नवी भूमिका निश्चित करत असतात. त्या अनुषंगाने उपखंड, राष्ट्र, राज्य असे ते बदल पाझरत राहतात.
'शाश्वत विकासार्थ शिक्षण' असं ब्रीद घेऊन युनेस्कोने गेली दहा वर्षे सतत जागतिक शिक्षणाचा विचार केला आहे. या दशकापूर्वी १० ते १२ नोव्हेंबर, २०१४ ला युनेस्को जपान सरकारच्या सहकार्याने आबायामा येथे जागतिक शिक्षण परिषद योजत आहे. 'Learning Today for sustainable future' (शाश्वत भविष्यासाठी वर्तमान शिक्षण) हे या परिषदेचे बोधवाक्य, लक्ष्य आहे. यातूनही बरंच सुचवलं गेलं. सन २००९ च्या परिषद निर्णयानुसार शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील औपचारिक, अनौपचारिक शिक्षणात सुसूत्रता आणली जाणार आहे. अभ्यासक्रम पुनर्रचनेत शिक्षक प्रशिक्षणात मूलगामी बदल करून शिक्षक गुणवत्तेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. शिक्षण बदलात विद्यार्थ्यांचे मत घेतले जाणार आहे. शिक्षणातील लिंग असमानता (स्त्री-पुरुष शिक्षण भेद व विषमता) दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्ञान समाज निर्मितीसाठी वैश्विक सहकार्य व संघटन मजबूत केले जाणार आहे.
भारतातही राष्ट्रीय व राज्य पातळीवर मोठे बदल येऊ घातले आहेत. शिक्षण अधिकारांतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या सक्तीच्या व मोफत शिक्षणामुळे राष्ट्रीय स्तराची एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने आपणाकडील प्राथमिक शिक्षण इ. १ ली ते इ. ८ वी झाले असून त्या अनुषंगाने विद्यमान प्राथमिक, माध्यमिक, शाळांची, शिक्षकांची पुनर्रचना अपेक्षित आहे. ८+२+२+३ असा नवा शैक्षणिक आकृतीबंध आला आहे. (प्राथमिक ८ वर्षे+ माध्यमिक २ वर्षे + उच्च माध्यमिक २ वर्षे + पदवी ३ वर्षे) प्राथमिक स्तरावर साक्षरता अभियान, सर्व शिक्षा अभियानानंतर आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान बाराव्या पंचवार्षिक योजना काळात (२०१२ ते २०१७) यशस्वी केले जावयाचे असल्याने माध्यमिक स्तरावर भौतिक सुधारणा व शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने मूलभूत बदल अपेक्षित आहे. उच्च शिक्षणात राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या (Nation knowledge commission) शिफारशींनुसार उच्च शिक्षणाची सुधारणा व पुनरुज्जीवन (Renovation and Rejuvenation) करण्याच्या उद्देशाने लोकसभेत कायदा झाला असून खासगी, विदेशी, केंद्रीय विद्यापीठे, महाविद्यालये, अभ्यासक्रम, पदव्यांचे पेव फुटून उच्च शिक्षण स्वयंअर्थशासित व स्वायत्ततेकडे वाटचाल केलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
या सर्व पार्श्वभूमीवर आपण जेव्हा मोठ्या शिक्षकाच्या घडणीचा विचार करू लागलो तेव्हा एकूणच शिक्षण, शासन, समाज, शिक्षक, पालक, विद्यार्थी असे काय काय चित्र उभे राहते? आपले शिक्षण स्वायत्त नाही. ते सरकार नियंत्रित आहे. जे स्वातंत्र्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे, ते मराठी माध्यमाच्या शाळांना नाही. मराठी माध्यम शाळा व व शिक्षकांचे प्रकार, वर्ग पाहता समान शिक्षण, सार्वत्रिक शिक्षण हे केवळ धोरण म्हणून कागदावर आहे. व्यवहार सर्वथा भिन्न आढळतो. शिक्षण खात्याकडे गुणवत्ता, विकास नियंत्रण आहे. तेथील अधिकारी सुमार वकूबांचे असतात. केवळ अधिकार आहे म्हणून प्रतिष्ठा, मान. संस्थाचालक व्यापारी झाल्याने व त्यांच्या हाती नियुक्ती, बदली, बढती असल्याने त्यांना शिक्षक जुलमाचा रामराम करतात. शिक्षकांच्या सेवाशर्ती, वेतन, सेवा शाश्वती शासनमान्य असल्याने व यंत्रणेत गुणवत्तेऐवजी सेवा ज्येष्ठता निहाय असल्याने शिक्षकात विकासाची ऊर्जा अपवादाने दिसते. जी अर्हता धारण करून ते व्यवसायात येतात त्याच अर्हता, पात्रतेत ते निवृत्त होतात. सन्मान्य अपवाद वगळता पात्रता विकास आढळत नाही. जो आहे तो वेतनवाढ गृहीत धरून होतो.
मग नवा शिक्षक घडणार कसा? असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर सोपे असले तरी, प्रत्यक्षात येणे कठीण. शासन, संस्था, शाळा, काय असायचे ते असो. प्राप्त परिस्थितीत पर्यावरणाची तमा न बाळगता मी शिकत राहणार. गुणवत्ता वाढवणार. नव-नवी कौशल्ये आत्मसात करणार. नित्य वाचन करणार. लेखन, संशोधन, व्याख्याने, समाजकार्य, उपक्रम इत्यादीद्वारे मी स्वत:चा विकास करणार व समाज साहाय्यभूत होणार. माझे सहकारी, परिसर काहीही असो मी त्यांना छेद देत 'एकला चलो रे' म्हणत माझ्या विवेकाच्या कसोटीवर अध्ययन, अध्यापन, संशोधन, उपक्रम करणार, ते माझी बांधिलकी विद्यार्थ्यांशी आहे म्हणून! काळ, परिस्थिती कितीही विषम असो, विद्यार्थी हा घटक असा आहे की, तो शिक्षक सापेक्ष असतो. शिक्षक त्याच्या लेखी दैवत असतो. पालकांपेक्षा त्याची श्रद्धा, आज्ञाकारिता, स्वीकृती शिक्षकांप्रती अधिक असते. अशा विद्यार्थ्यांशी आपण पाट्या टाकून द्रोह करत असू तर आपणासारखे करंटे कोणीच नाही. देशाची जडणघडण पाहूनच लक्षात येते की, त्या देशातले शिक्षण कसे असेल व शिक्षक कसे असतील?
नवा शिक्षक निरंतर शिकणारा हवा. त्याचं वाचन चतुरस्र हवे. तो स्वप्रज्ञ हवा. त्याची स्वत:ची दृष्टी, मत हवं. तो साधन संपन्न हवा. त्याची पाठ्यपुस्तके, कोश, संदर्भग्रंथ, संगणक, पेनड्राईव्ह स्वत:चे हवे. आपल्या पगारातील काही वाटा त्याने शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास, साधन समृद्धी, अभ्यास, संशोधन, पर्यटन यावर खर्च करायला हवा. समाजाचे त्याचे अभिन्न नाते हवे. सामाजिक प्रश्नात त्याची भूमिका व सहभाग असायला हवा. नवा शिक्षक विद्यार्थी वेल्हाळ हवा. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त तो विद्यार्थ्यांसाठी काय करतो ही त्याच्या बांधिलकीची खरी कसोटी. शिकवणीस छेद देत शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा शिक्षक हवा. त्याचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न हवे. पोशाख नेटका हवा. बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा वृत्ती विकास जपणारा शिक्षक हवा. प्रेमळ, मृदुभाषी, मनमिळाऊ, तन्मयतेने शिकवणारा, रोज स्वाध्याय करणारा (अध्यापनाची पूर्वतयारी, चिंतन, मनन, साधन निर्मिती, संग्रह, भेटी, प्रकल्प इत्यादी) शिक्षक हवा. सुवाच्य व शुद्ध हस्ताक्षर, निर्दोष अध्ययन, वक्तृत्व, नाटकीयता, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, संगीत व्यासंगी शिक्षक हवा. कालमान हे नव्या शिक्षकाचे व्यवच्छेदक लक्षण. तो संगणक साक्षर हवाच. धर्म, जात, पक्ष, पंथ निरपेक्ष शिक्षक हवा. विज्ञाननिष्ठा, नैतिक, आदर्श, मूल्य जपणारा शिक्षक नवा. नवा शिक्षक तन, मन, धन समर्पित सातही दिवस चोवीस तास (७*२४)
बहुभाषी, बहुदेशी शिक्षक विश्वशिक्षक म्हणूनही तो हवा. नव शिक्षक सर्व ज्ञानी, आंतरविद्याशाखांचे भान असणारा हवा. विद्यार्थी समाजाच्या दृष्टीने प्रतिदर्श (Role Model) असणारा शिक्षक हवा. नव्या शिक्षकाचे चित्र, चरित्र, चारित्र्य, सदाचारी व सदाशयी हवा. त्याचा नवीन व्यवहार भेदातीत, समानशील, निरपेक्ष हवा. तो विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक हवा. रोजचे शिक्षण चैतन्यशील बनवणारा शिक्षक नवोन्मेषी हवा. विश्वभान असलेला शिक्षक कुपमंडूक राहूच शकत नाही. जग खेडे होत असतानाच्या काळातला नवा शिक्षक एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारा, तंत्रज्ञान कुशल, संशोधक हवा. जगायच्या ज्ञानापेक्षा प्राप्त ज्ञानाचे उपयोजन शिकवणारा शिक्षक संभावनांचे आकाश कवेत घेत भविष्यलक्ष्यी अध्ययन, अध्यापन, करत असतो. तो शिक्षक खरा नवा शिक्षक !
•••
लोकसाहित्यातून मिळणारे शहाणपण औपचारिक शिक्षणातून येत नाही, असा माझा अनुभव आहे. हिंदीत एक प्रश्नात्मक लोकोक्ती आहे. 'घोडा क्यों अड़ा? पान क्यों सड़ा?' अशीच काहीशी. कोणता घोडा अडेलतट्ट बनतो? ज्याला सारखं पळायची सवय केली जात नाही तो. खाऊचे पान विकणारा तांबोळी. त्याला चांगले माहीत असते की गड्डीत ठेवलेली पानं सारखी फिरवावी लागतात, नाही तर ती डागाळतात, कुजतात. भाकरी फिरवली नाही की करपते. आंब्याची आढी वरखाली केली नाही की, एका आंब्यामुळे (कुजलेल्या) सारी आढी नासते. शिक्षकांच्या पात्रतेचे पण असेच आहे. ती सतत वाढवली नाही की कुचकामी, कालबाह्य ठरते. मला हे आठवायचे कारणही तसेच आहे.
आपल्याकडे शिक्षक प्रशिक्षण, पात्रतेचेही असेच आहे. एक तर ते सुमार असते. दुसरे कालबाह्यही. शिक्षकांची पात्रता, प्रशिक्षण निश्चित करणारी आपणाकडे एक राष्ट्रीय संस्था आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (National council for Teacher Education) (NCTE) तिचे नाव. ती केंद्राच्या अखत्यारीत काम करते. ती व्यवस्थित काम करत नसल्याने देशात गुणवत्ताधारी शिक्षक निर्माण होत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने भारतातील अध्यापक शिक्षणाचा (Teacher Education) अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी न्यायमूर्ती वर्मा आयोगाची नेमणूक २०१० वर्षात केली होती. त्या नियुक्तीचे कारणही तसेच गंभीर होते. एनसीटीईच्या पश्चिम विभागीय कार्य समितीने सन २०१०-११ या वर्षी एकदम २९१ शिक्षण शास्त्र महाविद्यालयांना परवानगी दिली होती. मागणी, पुरवठा, धोरण कशाचाही विचार न करता. आता न्यायमूर्ती वर्मा आयोगानं आपला अहवाल सादर केला असून तो स्वीकारण्यात आला असून सध्या कालबद्ध कृती कार्यक्रमाचा धूमधडाका सुरू आहे. त्या अहवालाचे नाव आहे 'Vision of Teacher Education in India, Quality and Regulatory Perspective.' अहवालाच्या शीर्षकातूनच हे स्पष्ट होतेय की, भारतातले वर्तमान अध्यापक शिक्षण (Teacher Education) गुणवत्ताप्रधान नाही व त्यावर कुणाचे नियंत्रणही नाही. या आयोगाच्या सर्व शिफारशी तंतोतंत लागू झाल्या तरी भारतातील शिक्षक प्रशिक्षण, पात्रता, गुणवत्तेत आमूलाग्र बदल होतील असे दिसत नाही, कारण यंत्रणेत कालभानाचा अभाव आहे.
जग सध्या विद्यार्थी व शिक्षकांच्यामध्ये असलेली दरी रुंदावत असल्याबद्दल काळजीत आहे. वर्तमान माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे. संगणक, इंटरनेट, मोबाईल, टॅबज्, आयपॅडस्, व्हिडिओ क्लिप्स, एल. सी. डी., डी. ए. पी. प्रोजेक्टर, लेसर प्रिंटींग, मल्टिमिडिया, व्हिडिओ गेम्स घेऊन जन्मलेली व त्यातच वाढत असलेली विद्यार्थ्यांची नवी पिढी. सरासरी २०,००० तास टी. व्ही. पाहणारी, १०,००० व्हिडिओ गेम खेळणारी व फक्त ५०० तास वाचणारी. डिजिटल गेमवर आधारित शिक्षणाचे पाठ लिहिणारा एक शिक्षक, साहित्यिक आहे. मार्क प्रेन्सी त्याचे नाव. त्याने विद्यार्थ्यांच्या या नव्या पिढीचे वर्णन 'डिजिटल नेटिव्ह' केले आहे. ही पिढी संगणकाची भाषा बोलते, वापरते, व्यवहार करते. तिला
तिकडे शिक्षक या नव्या नेट वर्किंग जगात अपुरे ठरत आहेत. संगणक, इंटरनेट पूर्व काळात जन्मलेले शिक्षक नव्या काळात डिजिटल इमिग्रंट ठरत आहेत. .... स्थानांतरित पक्षासारखे. जागतिकीकरणापूर्वी जन्मलेला आजचा शिक्षक. त्याचे वर्णन 'प्रि-इंटरनेट जनरेशन' असे केले जाते. संगणक क्रांतीपूर्वी जन्मलेला, व्यवसायात आलेला. हे शिक्षक बंद खोलीत शिकवणाऱ्या पिढीचा शेवटच शिलेदार ठरणार ही आता काळ्या दगडावरची रेघच म्हणा ना! नव्या तंत्रज्ञानाने एक नवे ज्ञानाचे क्षितिज खुले केलेय. नवा ज्ञानसमाज (Knowledge Society) उदयाला आलाय. ज्ञानाची नव प्रतिसृष्टी... आभासी जग (Virtual world) निर्माण केलेय. आता ऑनलाइन एज्युकेशनचा काळ आला आहे. इंटरनेटवर अभ्यासक्रम, घटक, घटक चाचण्या, परीक्षा कार्यक्रम, प्रमाणपत्रे सारे असते. तुम्हीच अभ्यास करायचा तुमच्या सवडीने. परीक्षा द्यायची तुमच्या मर्जीप्रमाणे. विषय निवडायचे स्वातंत्र्य, शिक्षक पण आभासीच. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास अमूर्तपणे मदत करत राहतो. तो सूतोवाच करतो, सूत देतो, स्वर्गाला तुम्हीच जायचे तुमच्या बुद्धी, क्षमता कुवतीनुसार. नवे शिक्षण खरेच 'अपना हाथ जगन्नाथ' झालेय! त्याने शिक्षकाला म्हणजे मानवी शिक्षकाला (Human Teacher) हद्दपार, रिटायर्ड करायचा चंगच बांधलाय. आता नव्या शिक्षणात मानवी शिक्षकाचे कार्य काय तर प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांचे सामाजीकरण करणे, मूल्य शिकवणे, संवेदना वृद्धिंगत करणे, जिज्ञासा निर्माण करणे, कारण ते या आभासी साधनांकडून (अजून तरी) होत नाही. उद्याचे कुणी सांगावे? असे जग म्हणू लागले आहे की, नव्या शिक्षकाची भूमिका बालमानसशास्त्रज्ञाची, समुपदेशकाची (Counselor) राहिली आहे. मी उरलो नावापुरता ठरण्याची शक्यता असलेला शिक्षक पण लेचापेचा असणार नाही.
आता जग या डिजिटल नेटिव्ह जनरेशन (एकविसाव्या शतकातील उपजत संगणक साक्षर पिढीसाठी) नव्या आकृतिबंधाचा विचार करत आहे. नव्या विद्यार्थ्यांना तंत्र साधनांचे नवे पर्यावरण लाभले आहे. त्यामुळे ही पिढी न शिकवता बऱ्याच गोष्टी स्वयंशिक्षणाने शिकते. उदाहरणच सांगायचे झालं तर तुमच्या हातातल्या (शिक्षकांच्या) मोबाइल्सचा, रिमोटचा वापर जितका विद्यार्थी करू शकतात, तेवढा शिक्षक करू शकत नाही. व्हिडिओ गेम्स कोणतेही आई-वडील मुलांना शिकवत नाहीत. टू व्हिलर, फोर व्हिलर मुले कोणत्याही ड्राइव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिकत नाहीत. ती उपजत स्वयंशिक्षित पिढी आहे. हे आता तुमची इच्छा असो, नसो मान्य करायला हवे. तिची अपेक्षा शिक्षक, पालकांकडून एकच आहे. आम्हाला जिज्ञासेचे नवे मार्ग सांगा. (Please give us the way of Curiosity) आता शिक्षक, पालकांचे एकच कर्तव्य नव्या काळात उरलेय, ते म्हणजे आपण जे करू शकलो नाही तो अवकाश, संधी मुलांना-विद्यार्थ्यांना मिळवून देणे.
गणित, इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र शिकवणे म्हणजे नव्या पिढीचा विचका (Mess-Maths, English, Science, Social Science) करणे ठरत आहे. मग काय शिकवले पाहिजे नव्या पिढीला? काय गरज आहे नव्या पिढीची? त्यांना हवाय नवा विचार, नवे तत्त्वज्ञान, नवी नाती, नवी ग्रहण पद्धती, विचार, कृती, संबंध व संपादन हे नव्या शिक्षणाचे नवे गाभे गाभा घटक ठरू पाहात आहेत. त्यांना उद्देश्य, साधने, कृती, उपाययोजना, निष्कर्ष अशी जुनी अध्यापन पद्धती गैरलागू ठरते हे शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे.
या बदलत्या पर्यावरणात शिक्षकाची भूमिका बदलेल तरच तो एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलू शकणार. म्हणून जगभर नव्या शिक्षकाची नवी भूमिका, क्षमता, अपेक्षांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शिक्षकाची बदललेली भूमिका. ती स्वीकारायला अवघड आहे खरी, पण आता पर्याय राहणार नाही. आत्तापर्यंत शिक्षक, विद्यार्थ्याला जग दाखवायचा, त्याचे डोळे उघडायचा, त्याला दृष्टी द्यायचा; आता शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या नजरेतून जग पाहण्याची, समजून घेण्याची गरज आहे. आजवर शिकवणे म्हणजे शिक्षकांनी प्रश्न विचारायचे व विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायची म्हणजे शिक्षण असे समीकरण दृढ होते. आता नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासपूर्तीस असाधारण महत्त्व येणार असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकाला किंवा शिक्षकावर प्रश्नांचा भडिमार करणे अपेक्षित आहे. चांगला शिक्षक कोण तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात प्रोत्साहन, संधी देणारा. 'हाताची घडी तोंडावर बोट' जाऊन 'थुई थुई अंगणात नाच माझ्या मोरा' असा फेर वर्गात धरला जाईल तर तो वर्ग चैतन्यदायी शिक्षणाचा नि शिक्षकाचाही!
शिक्षकांनी ज्ञान देण्यापेक्षा ज्ञान संपादण्याच कौशल्य विद्यार्थ्यात निर्माण करण अपेक्षित राहणार आहे. नवा शिक्षक शिकणारा हवा. (Teacher must be learner first, Teacher second) विल रिचर्डसन नावाचा एक शिक्षण तंत्रज्ञ आहे. त्याचं म्हणणे आहे की, वर्गातून आता 'शिवाजी म्हणतो... चा खेळ' बंद व्हायला हवा. (लहानपणी एक खेळ खेळायचो, त्यात 'शिवाजी' शब्द आला तरच आज्ञा पाळणे अपेक्षित असायचे!) त्याला रिचर्डसननी (Makers Movement) म्हटले आहे. वर्ग म्हणजे आज्ञा, शिक्षक म्हणजे आदेशक, विद्यार्थी म्हणजे आज्ञाधारक. असे (One way) शिक्षण नाही.... 'वारे सर्व दिशांनी दूर' असे मुक्त शिक्षण (Open Ended Education) येऊ पाहत आहे हे शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी शिक्षक उदार हवा. तो तंत्रकुशल (Techno Savvy) हवा. विद्यार्थ्यांना उपकरणे वापरण्यास, तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणारा शिक्षक, स्वतः विश्व नागरिक बनू इच्छिणारा व विद्यार्थ्यांना विश्वसंचारी बनवणारा शिक्षक हवा. शोधक वृत्ती, विद्यार्थ्यांत निर्माण करणारा शिक्षक हवा. जात, धर्म, भाषा, वंश, प्रांताच्या एकांगी अस्मितेपेक्षा जात, धर्म, वंश निरपेक्ष जग शिकवणारा शिक्षक हवा.
असे सारे सांगताना मी भारत विसरलो असे मात्र नाही. मला वाडी, वस्तीवरच्या शाळा माहीत आहेत. गाव, पाड्यावर राहणारे आदिवासी मला माहीत आहेत. कुडात भरणारी शाळा मी पाहिली आहे व तट्ट्यात भरणाऱ्या शाळांत मी शिकवलेपण आहे. घड्याळाचे काटे उलटे नाहीत फिरत. आपल्याला जगाबरोबर बदलावे लागते. 'जे बदलतात तेच टिकतात असा सृष्टीचा नियम आहे. भारतातले आर्थिक वास्तव विषम आहे. अजून बिन फळ्याची, झाडाखाली भरणारी शाळा मी 'पॅलेस ऑन द व्हील, दुरंतो, राजधानीने' प्रवास करताना रेल्वेच्या आजूबाजूला पाहतो, तेव्हा लक्षात येते अंतर केवढे मोठे आहे. निजामुद्दीन व नवी दिल्लीतही किती फरक आहे?
भारतातले बालशिक्षण अजून रामभरोसे आहे. सक्तीच्या व मोफत शिक्षण कायद्याच्या परीघात ते नाही. ज्या देशाचे बालशिक्षण उपेक्षित त्या देशाचं भविष्य अनाथ असतं हे का मला माहीत नाही? पण बंद दरवाजे शिक्षकच किलकिले करू शकतात यावर माझा विश्वास आहे. यंत्रणेचे दरवाजे बुलंद असतात खरे पण दरवाजातली फट ज्यांना माहीत असेल तेच प्रतिकूलतेच्या लक्ष्मण रेषा, लांघू, ओलांडू शकतात हे मी अनुभवले आहे. शिक्षकात जिद्द हवी, बदलण्याची ऊर्मी हवी. नव्याचा ध्यास ज्यांना असतो तेच नवे ग्रह, तारे, शोधतात. मी निवृत्त होताना एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. तसा मी डिजिटल इमिग्रंटच ना? ठरवले की, इंटरनेटवर प्रकाशित साहित्य व भाषेचा अभ्यास करायचा. मी एकही पुस्तक हाती न घेता केवळ संगणकाच्या पडद्यावर वाचून संगणकावरच लिहिले, आधी इंटरनेटवरच. तो संशोधन प्रबंधही प्रकाशित झाला नि मग त्याचे पुस्तक झाले. ते हिंदीतले अशा प्रकारचे जगातले पहिले पुस्तक, संशोधन ठरले. तुम्ही जग बदलू शकता. त्याची एक शर्त असते. त्याआधी तुम्ही बदलायला हवे. जग मागे येते. तुम्ही मात्र पुढे जायला हवे, पुढे व्हायला हवे.
•••
संदर्भ :-
1. www.teindia.nic.in
2. blogs.edweek.org
3. www.educationteaching.com शिक्षकाची नवी साधने
शिकवणे साधनहीन होते म्हणजे त्याला शिकवायला काहीच लागायचे नाही. शिकवणाऱ्या शिक्षकाची आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सारी भिस्त ही त्याच्या स्मरणशक्तीवर होती. मौखिक अध्यापन म्हणजे संथा. रोज लक्षात राहील इतकंच शिकवायचे. बोललेले ऐकणे व ऐकलेले स्मरणात ठेवणं, पाठांतर करणे म्हणजे शिक्षण. त्या शिक्षणाला कोणतीच साधन लागायची नाही.
मग शिक्षणात लेखन आले, कित्ता आला, वही आली. उतरून काढणे म्हणजे शिक्षण होतं एके काळी. अक्षरज्ञान म्हणजे शिक्षण. मग त्याला अंकज्ञानाची जोड मिळाली. नंतर अनेक ज्ञान-विज्ञानांच्या विस्तार, विकासाबरोबर शिक्षणाचा विकास झाला. पाटी, पेन्सिल, वही, पुस्तक, शाई, दौत करत कंपास आला. शाळेत तक्ते, मॉडेल्स, उपकरणे, साधने आली. समाजशास्त्र, विज्ञान, भाषा, साहित्याचा विस्तार, विकास होत विविध ज्ञानशाखा अवतरल्या. ज्ञान विभाजन झाले. नुसत्या समाजशास्त्रातून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादीचा विकास झाला. विज्ञानाचे किती प्रकार आले. साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, लिपीविज्ञान, शैली विज्ञान, अनुवाद विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र, संख्याशास्त्र, गणितशास्त्र, अणुविज्ञान, प्राणिशास्त्र, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, संरक्षणशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलविज्ञान, अवकाश शास्त्र यातून प्रचंड साधने विकसित झाली व शिक्षणही समांतरपणे साधनसंपन्न होत गेले. कधी काळी बोलणे आणि लिहिणे (Chalk and Talk) म्हणजे शिक्षण होतं. त्याचे स्थित्यंतर, विकास, रूपांतर होऊन आज जोडा आणि ओढा (Plug and Chug) उपसा, भूमितीच्या पटीने ज्ञान वितरण शिक्षणाचे तंत्र होऊन बसले आहे. शिक्षक प्रशिक्षण काळात गुंडाळी फळा, तक्ते, प्रतिदर्श (मॉडेल्स) प्रकल्प म्हणजे साधन विकास होता. एकविसाव्या शतकातील नवा शिक्षक संगणक साक्षर, मोबाईलवाला, टॅबवाला, स्मार्ट फोनधारक होणे जसे अपेक्षित आहे, तशीच शाळा संगणक लॅब, लँग्वेज लॅब, टचस्क्रीन बोर्ड, व्हर्च्युअल क्लासरूम, थ्रीडी क्लास रूम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधायुक्त, बायोमेट्रिक हजेरी घेणारी, ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेणारी होणार ही आता अटळ गोष्ट आहे. त्यामुळे नव्या शिक्षकास नवी साधने आत्मसात करणे व नव्या पद्धतीने शिकवण्या-शिकवण्याच्या पद्धती आत्मसात करणे ओघाने आलेच.
आजचे सारे शिक्षक मोबाईलधारक आहेत. अगदी वाडी, वस्तीवर शिकवणारा शिक्षकही बी.एस.एन.एलमुळे डोंगर कपारीत कुठेही असला तरी संपर्कात असतो, राहतो. काही सन्माननीय अपवाद असले तरी बहुसंख्य शिक्षक मोबाइल फोनधारी आहेत. (भारताची वर्तमान लोकसंख्या १,२२०, ८००, ३५९ आहे. पैकी ९०४, ४८0, 000, इतके मोबाईलधारक आहे. हे प्रमाण सुमारे ७५% इतकं होते, हे गृहीत धरू.) त्यांनी व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करायचे ठरवले तर चक्रावून जायला होतं. अगदी साध्यात साध्या मोबाईलचा वापर करून शिक्षक खालील कार्य करू शकेल.
२. गृहपाठ, मार्क, परीक्षा, निकाल, पालक सूचना इ.>br>३. फोटो काढणे, पाठवणे.
४. व्हिडिओ क्लिप काढणे, पाठवणे.
५. एखाद्या प्रश्नावर मतसंग्रह (poll)
६. शालेय मतदान
७. शब्दकोश म्हणून वापर
८. कॅमेरा, बॅटरी, गजर म्हणून वापर
९. भाषण, ध्वनिमुद्रण व प्रेषण
१०. रेडिओ, टेलिव्हिजन, कॉन्फरन्सिंग, इ. माध्यम.
११. घड्याळ, टेप, स्टॉपवॉच, स्केल, डायरी, कॅलेंडर, कॅलक्युलेटर, इ. साधने.
१२. व्हिडिओ गेम्स, मल्डिमिडिया, प्रश्नसंग्रह, शंकासमाधान, पाठांतर, इ. साधने
१३. ई-बुकरीडर, ग्राफर, शूटर, स्केलर, टायमर
१४. संवाद, मंच
१५. अभिव्यक्ती, फोरम
'गुगल' (Google) हे असे संकेतस्थळ आहे की, तिथे शिक्षकाच्या प्रत्येक शंका समाधानाचे अढळपद लाभते. तिथे जगातली सारी माहिती क्रमाने, वर्गीकरण करून, आपणास हवी तशी, हवी तेवढी मिळण्याची सोय आहे. 'डिगो' (Digo) ( https://www.digo.com/) हे बुकमार्कचे ठिकाण. इथे तुम्ही तुमच्या प्रिय संकेतस्थळाबद्दल (Favorite Website) चे तुमचे मत व्यक्त करून इतरांची मतं जाणून घेऊ शकता. 'वादे वादे जायते शूरः' च्या तालावर मतमतांतराद्वारे इथं शिक्षक ज्ञानविस्तार घडवून आणू शकतो. 'ग्लॉगस्टर' (Glogster) (http://www.gloostercom/) हे आभासी जगाचे पोस्टर, होर्डिंग म्हणायला हरकत नाही. जाहिराती जसे आपले लक्ष वेधून घेतात तसे तुमचे नवे मत, संशोधन, प्रकल्प, प्रबंध, प्रकाशन इत्यादीकडे जगाचे लक्ष वेधण्याचे साधन. गावच्या चौकातले फ्लेक्सबोर्ड तसा हा जगाच्या चौकातला. 'प्रेझी' (Prezi) (https://prezi.com/) ची गंमतच न्यारी. त्रिमिती चित्रपट (Three Dimension film) 'मिस्टर इंडिया', 'छोटा चेतन' चित्रपट तुम्ही पाहिले असतील. आता घरोघरी थ्रीडी टेलिव्हिजन येत आहेत. (माझ्या घरी तर तो केव्हाच आलाय.) तशी एखादी गोष्ट तुम्हाला थ्रीडी पोस्ट अथवा प्रोजेक्ट करता येते ती इथे! शिक्षकाला सर्वाधिक उपयुक्त ठरणारे ठिकाण... जुन्या भाषेत बोलायचे झाले तर संदर्भ ग्रंथालय, विश्वकोशासारखे ठिकाण म्हणजे 'ड्रॉपबॉक्स' (Dropbox) इथे तुम्हाला हवी असलेली सारी माहिती संग्रह करून (file) ठेवता येते व हवी तेव्हा वापरता येते. मेमरी इथे मोफत साठवता येते. म्हणजे ती नेटवरची बिनभाड्याची सर्व सोयीने युक्त मुक्त खोली. इंटरनेटवर सारे मोफत नसते. काही माहिती मिळवायला पैसे मोजावे लागतात, पण अशा संकेत स्थळांवरील माहिती तुम्हाला 'एव्हरनोट' (Evernote) वर मिळू शकते. ती तुम्हाला लिखित, दृक्, श्राव्य सर्व रूपात मिळू शकते. थोडक्यात ज्ञानाचे अन्नछत्रच! 'क्विझलेट' (Quizlet)(https://quizlet.com/) हे इंटरनेट वरील सर्वात अत्याधुनिक संकेत स्थळ म्हणता येईल. पूर्वी इंटरनेटवर स्थिर (static) माहिती असायची. आता ती चल (Dynamic) स्वरूपात उपलब्ध होऊ लागली असून उपयोग करणारा त्यात भर घालू शकतो, दुरुस्ती करू शकतो, अनावश्यक भाग गाळू शकतो. ज्ञान, अध्ययन करण्याची ही पद्धती. इथे तुम्ही स्वत:चा कस सिद्ध करू शकता. 'वॉलविशर' (Wallwisher) (http://www.lessonpaths.com/learn/i/using-online-sticky-notes/ wallwishercom-login) वेलविशर नव्हे वॉलविशर... म्हणजे आभासी वृत्त मंच (Virtual Bulletine Board) प्रकाशित करू शकता, जे क्षणार्धात जगभर प्रसिद्ध होते. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद घडवून आणणारे संकेत स्थळ म्हणून 'टायटन पॅड' (Titan Pad) (https://titanpad.com) ओळखले जाते. जगातल्या कोपऱ्यातल्या कुणाही विद्यार्थ्याला कोणतीही शंका असेल तर त्याने इथे मांडायची.... जगातल्या दुसऱ्या कोपऱ्यातला शिक्षक ती दूर करतो... इंटरनेटवरचा हा मोफत शिकवणी वर्गच म्हणा ना! 'स्काईप' (Skype) (https://www.skype.com) म्हणजे जगात माहीत असलेल्या व्यक्तीशी दृक्-श्राव्य संवादाचे मोफत साधन. माणूस समुद्रात असू दे की, अवकाशात आपण या साधनाने, सुविधेमुळे परस्परांना पाहून, दाखवून एकमेकांसमोर बोलतो आहोत असा संवाद. म्हणजे प्रत्यक्ष समोर नसताही समोर बसून शिकल्यासारखेच. 'विबे' (Weeby) हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा आभासी संघ वा मंच होय. 'विकीस्पेस' (wikispace) (https://www.wikispace.com/) मध्ये आपण 'विकिपीडिया' च्या विविध माहितींच्या लिंक्स संग्रहित करून हव्या तेव्हा वापरू शकतो. शिकण्या शिकवण्याची शतकाची नवी, ऑनलाईन साधने म्हणजे नवे शिक्षण विश्व. ते नव्या शिक्षकांना माहीत होईल तो शिक्षक सलमान खानसारखा विश्वशिक्षक होईल.
मी उल्लेख केलेला सलमान खान हा हिंदी चित्रपट सृष्टीतला नट नसून इंटरनेटवरचा जगप्रसिद्ध शिक्षक आहे. इंटरनेटवर त्याची खान ऍकॅडमी नावाची संस्था आहे. हा जगप्रसिद्ध अमेरिकन शिक्षक असून बिल गेटस् यांनी त्याचं कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर 'यू ट्यूब' वर त्याचे शिक्षणाचे धडे, पाठ गिरवणारे १५ लाख सभासद आहेत. नादिया नावाच्या आपल्या चुलत बहिणीला शिकवायचे म्हणून तो ऑनलाईन शिकवू लागला. पुढे अनेक जण मागणी करू लागले म्हणून त्यानं काही धडे २००६ ला 'यू ट्यूब' वर टाकले व तो जगप्रसिद्ध शिक्षक बनला. त्याचे धडे आजवर साडेतीन अब्ज विद्यार्थ्यांनी गिरवले आहेत. तेही मोफत! 'फोर्ब्स' मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत माणसांच्या यादीत तो चमकला आहे.
नव्या शिक्षकासाठी आवश्यक, शिक्षण साधन बनवण्यात व ती स्वस्त दरात विकण्यात आजमितीस चीन हा देश आघाडीवर आहे. कधी काळी एक शिक्षक एका विद्यार्थ्यास शिकवायला (one to one) नंतर (Each one, Teach one) चा काळ आला. तो ऑनलाइन एज्युकेशन (E-Education) मध्येही अवतरला आहे. आता तुम्हाला पंढरपूरला राहून पॅरिसची ट्यूशन करता येते तशी टूरपण. आता एखाद्या शिक्षकाने ठरवले तर आपल्या घरी बसून आभासी विद्यापीठ (Virtual University) सुद्धा स्थापन करू शकतो. काही नाही, एक संगणक घ्यायचा. इंटरनेट कनेक्शन त्याला जोडायचे. आपली वेबसाईट तयार करायची. आपला अभ्यासक्रम परीक्षा, ट्यूटोरियल्स, डिग्री तयार करायची. प्रवेश घ्यायचा. ऑनलाईन शिकवायचं. ऑनलाईनच परीक्षा. डिग्रीपण ऑनलाईन मिळते.
इतिहास, काळ, अंतर संपल्याची घोषणा करणाऱ्या एकविसाव्या शतकात आता सुरू असलेल्या शाळा, कॉलेजीस, विद्यापीठे ओस पडली, शिक्षक बेकार झाले तरी खऱ्या, नव्या शिक्षकाला नव साधनसंपन्न, कुशल शिक्षकाला मरण नाही. एखाद्या संस्थेस पाच-पंचवीस लाख रुपये देऊन शिक्षक, प्राध्यापक होण्यापेक्षा अत्यंत कमी पैशात तुम्ही ऑनलाईन शिक्षक होऊ शकाल, पण त्यासाठी तुम्ही संगणक कुशल, ज्ञानसंपन्न व प्रभावी अध्यापक असले पाहिजे.
•••
संदर्भ :-
1. www.issu.com
2. www.edutechwiki.unige.ch
3. www.educationworld.com
4. www.khanacademy.org
5. www.dodea.edu शिक्षकाची नवी वाचन साक्षरता
शिक्षक मुळात ज्ञानसाधक असतो. त्याचे काम ज्ञानवहनाचे तसच ज्ञान निर्मितीचेही असते. ज्ञानाची संकल्पना, निर्मिती, अभिव्यक्ती, अभिसरण कालपरत्वे बदलते. पूर्वी गुरुजी संथा द्यायचे. म्हणजे रोज थोडं थोडं शिकवायचे. त्यांचे शिकवणे पोपटपंची प्रकाराचे असायचे. एकतर ते पाठांतर करायचे. दुसरे पाठांतरीत सामुग्रीचे निरूपण करायचे. या काळात पाठांतर व त्याचा गद्यविस्तार म्हणजे शिक्षण होते. मग लेखन आले. लेखन आले तसे कित्ता आला. कित्ता म्हणजे गिरवणे. नंतर स्वाध्याय आला. प्रश्नोत्तरे आली. शिक्षकांनी शिकवलेल्या भागावर शिक्षक प्रश्न देत. विद्यार्थी शिक्षकांनी ज्ञानावर आधारित स्मरणाला आधारे उत्तर लिहीत. आजही हा प्रकार सुरू आहे. एकाच उत्तराला वेगवेगळे गुण मिळतात. ते स्मरण, आकलन, शैली, शब्दरचना, शुद्धता, चूक, बरोबर या आधारे. म्हणजे अभिव्यक्ती व अभिसरण क्षमतेवर आज ज्ञानात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. पूर्वी कल्पना विस्तार, रसग्रहण, विवेचन, ससंदर्भ स्पष्टीकरण, आवृत्ती, नकाशे, आलेख, कृती पद्धती यांना महत्त्व होते. विशेष गमतीची गोष्ट म्हणजे ज्ञानाची झेरॉक्स म्हणजे गुणवत्ता समजले जायचे. उदाहरणासह सांगायचे झाले तर विज्ञानाचे देता येईल. विज्ञानही आपण झापड लावून शिकवत होतो. पूर्वी शिक्षक प्रयोग करून दाखवायचे. विद्यार्थी प्रयोगाचे अनुकरण करायचे. प्रयोग वहीही झेरॉक्स असायची. या झेरॉक्स ज्ञानपद्धतीतचा विस्तार सांसर्गिक रोगासारखा फैलावतो आहे. इंजीनिअरिंग, मेडिकलचे विद्यार्थी, हुशार मुलांची जर्नल्स, नोट बुक्स झेरॉक्स करून अभ्यास करतात. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशाखा खरे म्हणजे ज्ञाननिर्मिती, प्रयोग, संशोधनाच्या, पण तिथंही गिरवून काढणे म्हणजे जर गुणवत्ता ठरत असेल तर या विद्याशाखांचे आपण नोबेल अपेक्षिणे चुकीचे नाही का? शिक्षण पद्धतीत जर प्रयोग, प्रकल्प, नावीन्य शोध, वेगळेपणा यांना स्थान व महत्त्व असेल तरच ज्ञान निर्मितीत सातत्य व नवता येणार. त्यासाठी नव शिक्षकांनी ज्ञानरचनावादाही चिकित्सा करत सतत नवे वाचन, नवे चिंतन, नवे मनन, नवे संशोधन, नवलेखन केले पाहिजे. या सर्वांचा पाया आहे नववाचन. नव शिक्षकाच्या वाचनसाक्षरतेच्या संकल्पना, पद्धती बदलून गेल्यात. नवा शिक्षक एकविसाव्या शतकातही मुद्रितात अडकून राहील तर तो पाच-पन्नास वर्षे मागेच राहणार. ‘ई रीडर टीचर' ही नव्या शिक्षकाची ओळख आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे.
वर्तमान शतकातील साक्षरतेच्या कल्पनाही नव्या आहेत. विसाव्या शतकातील साक्षरतेचा संबंध अक्षरज्ञान व अंकज्ञानाशी येतो. एकविसावे शतक हे संगणक साक्षरतेचे आहे. संगणक साक्षरता ही अंक व अक्षर वाचन व लेखनाशी निगडित नाही. तिचा संबंध ज्ञान प्रक्रियेच्या नव्या चौकटीशी आहे. त्यात संगणक वापर कौशल्य, टंकन, प्रलेखन (programming) वेबसाइटस् शोध, इंटरनेटवरील माहितीचे वाचन, संकलन, संग्रहण, संपादन, पुनर्वापर, प्रक्रिया, प्रतिसाद, लेखन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यामुळे बुद्धिमत्तेची संकल्पनाही बदलून गेली आहे. स्मरणशक्ती म्हणजे बुद्धिमत्ता, पाठांतराची अभिव्यक्ती म्हणजे विद्वत्ता या कल्पना मागे पडल्या आहेत. आता शिक्षणापेक्षा समाज, शहाणपणाला (understanding and wisdom) यांना महत्त्व आले आहे. तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा त्या माहितीचा उपयोग तुम्ही किती कल्पकतेने, नव्या पद्धतीने करता याला महत्त्व आले आहे. 'Don't act indifferent, act differently' हा नव्या युगाचा मंत्र आहे.
वर्तमानाचे परिसरातील महत्त्वाचे प्रश्न कोणते याचे शिक्षकाचे स्वत:चे आकलन महत्त्वाचे. सामान्य माणसे बातम्या वाचतात. शिक्षकाने संपादकीय, लेख, स्तंभ, प्रतिक्रिया, विश्लेषण वाचायला हवे. ते वाचले तरच त्याचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, मत स्वतंत्र, जीवनशैली स्वतंत्र होणार व तो वेगळेपणाने विचार करणार व वागणार. शिक्षक एका विषयाचा न रहाता सर्व ज्ञानविज्ञानाचं वाचन, आकलन असेल तर तो आपला विषय विविध ज्ञानविज्ञानाशी जोडून आंतरशास्त्रीय पद्धतीने समन्वित दृष्टिकोन घेऊन शिकविणार. त्याला ज्ञानाच्या महाजालातून चोखंदळ निवडता येणे हे नवे युगाचं कौशल्य माहीत हवे. आपण संगणकाद्वारे महाजालावर जातो. एखादा विषय शोधू लागतो. संबंधित विषयांची अनेक संकेतस्थळे, ज्ञानलहरी (website and Links) आपणाला खुणावू (blink) लागतात. आपण संक्षिप्त माहिती वाचतो व निवड करून (click) करून विस्ताराने वाचन करतो. उपयुक्त वाटले की, संग्रहित (save) करतो, सुरक्षित ठेवतो. परत वापरतो. पुनर्वापरात आवश्यक तेवढे घेतो. बाकी सोडतो किंवा खोडतो. (Delete) करतो. नवज्ञान विस्तारात पर्यायांचा महापूर आला आहे. 'आंधळा मागतो एक आंतरजाल देतो हजारो' अशी स्थिती असल्याने निवडण्याच्या चोखंदळपणाला महत्त्व आले आहे. निवड तेच करू शकतात ज्यांना पर्यायांची पारख असते.
यामुळे नवशिक्षकास नवे तंत्र हवे तसे नवे मंत्र ही. त्याचे वाचन 'वाचू आनंदे', 'लिहू नेटके', 'तोतोचान', 'प्रिय बाई', 'शाळाभेट', 'माझी काटे मुंढरीची शाळा', 'प्रज्वलित मने', 'शाळेपासून मुक्ती', 'परीक्षेला पर्याय काय?', 'प्राचार्य', इथपर्यंतच मर्यादित असून चालणार नाही. त्याला 'आशय' 'भिंतीबाहेरची शाळा' सारखी पुस्तके माहीत हवीत, पण शिक्षण प्रक्रियेच्या मूलभूत गाभ्यांचा अभ्यास समजावणारी पुस्तकेही माहीत हवी. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण वाचनाचेच घेऊ. 'वाचन' या एकाच विषयावर मराठीत 'निबंधमाला' (विष्णुशास्त्री चिपळूणकर) यांच्यापासून 'जलद व प्रभावी वाचन' (अशोक इंगवले)यांच्या पर्यंतचे लेखन वाचले तर वाचनाचा प्रवास वर्णनापासून ते विज्ञानापर्यंत आलेला लक्षात येईल. एकट्या वाचन प्रकारांचा अभ्यास करू लागलो तर लक्षात येते की, वाचनाच्या किती परी असतात. वरवरचं वाचन, चाळणे, मौखिक, शांत, प्रकट, सूक्ष्म, स्थूल, भाषिक, सखोल विस्तृत इत्यादी. वाचकांचे प्रकारही अनेक भावनिक/भावनाशील, बौद्धिक, मनोरंजक, अनपेक्षित, विनोदी, अभ्यासू, परीक्षार्थी, संकीर्ण बहश्रुत, विघातक, विधायक इत्यादी. शिवाय वाचनाचा पट (canvas) असतो, तो विस्तारता येतो. वाचनाची गती असते, ती वाढवता येते. वाचन दोष असतात, तो दूर करता येतात. वाचनाच्या विविध शैली, आणि उद्दिष्टे असतात. वाचनाची शास्त्रोक्त पद्धत आहे. त्यात आसन, उजेड, अंतर, कोन, मुद्राक्षर आकार (Font size) कागद, अक्षररचना, इत्यादींचा अंतर्भाव असतो. वाचनाच्या खुर्चा (Reading Chairs) असे नुसते संगणकावर लिहा नि त्याची चित्रं (Images) पाहा.
जी गोष्ट वाचन मंत्राची तीच वाचन तंत्राची पण. आता डीएनएचा नकाशा माणसाच्या हाती आल्यापासून जग माणसाच्या साक्षरतेविषयक संकल्पनेचीच पुनर्माडणी करू पाहातो आहे. त्यात साक्षरतेच्या भाषिक, दृश्य, अवकाशी (spatial) ऐतिहासिक, सांस्कृतिक, माहितीविषयक, राजकीय साक्षरतेच्या संकल्पनांवर भाष्य करू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या 'ई वाचनास' असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकाची भाषिक साक्षरता पुस्तक वाचनावर न ठरता तो शिक्षक ऑनलाईन किती वाचतो, किती व्यापक विचार करतो. त्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन येते का? तो एल. सी. डी. प्रोजेक्टर वापरू शकतो का? यावर ठरेल. त्याला ग्राफिक्सचं ज्ञान किती, तो संकेत चित्र ओळखू शकतो का? उच्चारण बारकावे त्याला येतात का? त्याचा वाचनाचा, उच्चाराचा, गतीचा आलेख आता दृश्य स्वरूपात पाहण्यास मिळतो. त्याची प्रत मिळते. त्यावर त्याची योग्यता ठरेल. शब्दांची सांकेतिकता, शब्दांच्या अर्थछटा, जुन्या शब्दांचे नवे संदर्भ (व्यवहारातील) त्याला माहीत आहेत का यावर त्याची भाषिक क्षमता व साक्षरता ओळखली, मोजली जाईल. डिजिटल इमेज, चॅट, आयकॉन, ग्राफ, व्हिडिओ इत्यादी त्याच्या भाषिक क्षमता विकासाची साधने होतील. हा त्याच्या वाचन, विचार व व्यवहाराचा अविभाज्य भाग असेल.
शिक्षकाचे स्वत:चं ग्रंथालय, संगणक (लॅपटॉप) इंटरनेट कनेक्शन हवं. पेन तर हवाच, पण पेनड्राईव्ह, स्कॅनर, प्रिंटर हवा. या साऱ्याची किंमत मोटर बाइक (टू व्हिलर) पेक्षा कमी आहे. गाडी, माडी, महत्त्वाची की सीडी हे ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शिक्षकाच्या घरी मराठी विश्वकोश (वीस खंड) हवेच. शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दकोश, वाक्प्रचार कोश, म्हणी कोश, पर्यायी शब्दकोश, समानार्थी शब्दकोश हवेच. इंटरनेट घेतले की हे सर्व ज्ञानभांडार फुकट घरी येते. तुमचा मोबाइल आता अँड्रॉइड हवा. त्यावर ई-बुक्स, क्लिप्स, व्हॉटस् ऍप हवेच. कॅमेरा, शूटर, टेपरेकॉर्डर आपोआप येतोच. ही चैन नव्हे. ही नव्या शिक्षकाची नवी साधनसंपन्नता आहे. त्याचा कल्पक वापर, वाचन, अध्ययन, अध्यापनात शिक्षक करेल तर वर्गात माहितीचा महापूर व ज्ञानाचा धबधबा वाहिल्याशिवाय राहणार नाही. तो थ्रीडी व व्हर्च्युअलचा साक्षर असेल तर तो समकालीन अद्ययावत, आधुनिक शिक्षक, समजावा. शैक्षणिक साधने कोण्या एका भाषा, ज्ञानशाखेची नसतात. ती सर्वज्ञानी व सर्वज्ञानवाहक असतात.
मराठीमध्ये संक्षिप्त वाङ्मय कोश (भाग १,२) 'वाङ्मयीन संकल्पना कोश', 'संकल्पना कोश' (भाग १ ते ५), 'यांनी घडवले सहस्रक', 'राजभाषा', 'संविधान', 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली सर्व प्रकाशने', 'लोकराज्य', 'लोकप्रभा', 'पालकनीती मासिकांचे वाचन विशेषांक', 'वाचणाऱ्याची रोजनिशी' सारखे पुस्तक, साहित्य अकादमी, भारतीय ज्ञानपीठ, नोबेल पुरस्कृत साहित्य कृती, वेळोवेळी प्रकाशित शैक्षणिक अहवाल (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय) शिक्षकांनी मिळवून वाचलेच पाहिजेत. रोजच्या खर्चात बचत, काटकसर करून खरेदी केली पाहिजे. सर्व शिक्षक हे आपल्या गावाच्या सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयाचे आजीव सभासद हवेत. (ते पतसंस्थेचे असतात!) घरी वर्तमानपत्र हवे पण त्यापेक्षा दर्जेदार शैक्षणिक, अध्यापन विषयक मासिके हवीत. आपल्या विषयाची कात्रणे ठेवण्याचा छंद हवा. शिक्षकांनी व्याख्यानांना (वैचारिक साहित्यिक) हजेरी लावायलाच हवी. यातूनच शिक्षक बहुश्रुत होतो. आपल्या विचारांचे श्रेष्ठ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, छायाचित्रे, सीडीज, क्लिप्स, व्हिडिओज, घरी हवेच. फुरसतीच्या वेळात वाचन, ऐकणे, पाहण्याचा रियाज त्याला/तिला ताजातवाना करत रहातो. तरुण ठेवतो. (वय कितीही असू दे!) नव्या शिक्षकांनी नवे प्रदेश, विदेश पाहिले पाहिजे. "Seeing is believing" हे शिक्षण तत्त्व सर्व विषय शिक्षकांना लागू आहे. 'केल्याने देशाटन' सारखे लोकशिक्षण व लोकवाचन नाही.
शिक्षकांनी नुसते वाचत राहायचा काळपण केव्हाच मागे पडला आहे. आता शिक्षकांनी व्याख्याते, लेखक, संशोधक, अनुवादक, इतिहासकार, संपादक होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असे कार्य त्याचे शिक्षक व्यक्तिमत्त्व फुलवेल. शिक्षक गायक, चित्रकार, वैज्ञानिक, खेळाडू, वक्ता हवा तसा अभिनेताही. वाचन त्याला हे सर्व करण्याची, होण्याची क्षमता देईल. रोज वाचल्याशिवाय न झोपणारा शिक्षक सजग, 'दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे' असा समास लिहिणारा कवी खरा शिक्षक-प्रशिक्षक होता. त्याने वाचन, लेखन, विचारावर विचार केला होता. तशीच ती बहिणाबाई. नारायण सुर्वेही तसेच. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेही. प्रत्येकाने वेगळे, वेगळे लिहिले, पण जग आणि जगणे समजावले. तुकोबा, कबीर, मार्टिन ल्यूथर किंग, खलील जिब्रान, गॉर्की, प्रेमचंद, शेक्सिपिअर, वि. स. खांडेकर, सान्यांनी आपापल्या काळात शिक्षकांना दृष्टी दिली. सर्वांकडून सर्व नाही घेता येणार. ओंजळ पुरेशी! लिओझू म्हणाला होता, 'A journey of thousand miles begin with a single step.' (हजारो मैलांचा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो!) तेच खरे !
•••
सुट्टी
आपल्या उपक्रमशीलतेचा विचार आपण सुट्टीपासूनच करू या. उपक्रम म्हणजे प्रकल्प साहस, एखादी गोष्ट हाती घेणे, मनावर घेणे, नवी करणे, जुनी गोष्ट नव्याने, नव्या पद्धतीने करणे, कृती, संशोधन प्रकल्प हाती घेणे असं सर्व करणे म्हणजे उपक्रम करणे होय. उपक्रमशील शिक्षक, सतत नवे, बालसंगत, आव्हानात्मक, नवे उद्दिष्ट घेऊन काम करतो. 'सुट्टी' हाच उपक्रम घेऊ. भारत हा सुट्टयांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. वर्षाचे दिवस ३६५. सुट्यांचे दिवस १८०. शिक्षक अर्ध वर्ष शिकवतो व अर्ध वर्ष आराम करतो.
आरामाचे, सुट्टीचं अर्ध वर्ष उपक्रमशील कसे करता येईल? तर पहिले म्हणजे एक 'इअर प्लॅनर' घेऊ. बाजारात एक कॅलेंडर मिळते. एका मोठ्या कागदावर वर्षाचे बारा महिने व ३६५ दिवस आखलेले असतात. प्रत्येक दिवसाचा रकाना कोरा असतो. तो आपण आपल्या योजना, नियोजनाप्रमाणे भरायचा. म्हणजे वर्षाच्या प्रत्येक दिवसाचे नियोजन करायचे नि ते कृतीत, अमलात आणायचे. वार्षिक डायरीत दर महिन्याच्या शेवटी, प्रारंभी असा 'प्लॅनर' असतो. प्रत्येक सुट्टीचं, वर्षभरातल्या प्रत्येक सुट्टीचे नियोजन करता येईल. नवा शिक्षक सुट्टीत वाचन, अध्यापन तयारी, सहल नियोजन, सहल पूर्व प्रवास (जिथे सहल नेणार त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी, अभ्यास, सर्वेक्षण, माहिती, व्यवस्था, वेळ इ. नियोजन करणे) प्रकल्प तयारी, शैक्षणिक साधनांची निर्मिती, चर्चा, साधन संकलन, संदर्भ शोध, व्याख्यान, लेखन, संशोधन, परीक्षा तयारी, गृहपाठ तपासणी, उत्तर पत्रिका मूल्यांकन, प्रश्नपत्रिका तयार करणे, स्वाध्याय तयार करणे असे बरंच करू शकतो. असे सुट्टीचं नियोजन करता का? एकदा करून पाहा. अनुभव हीच खात्री.
नव्या अभ्यासक्रमाची तयारी
शिक्षक दोन प्रकारचे असतात (१) तयारी करून शिकवणारे. (२) तयारीचे. नवे शिक्षक तयारी करून शिकवितात. जुने शिक्षक तयारी नाही करीत. अभ्यासक्रम कसलाही असो, नवा, जुना तो त्याची तयारी नाही करीत. असे शिक्षक 'तयारीचे शिक्षक' पण काही जुने शिक्षक मी निवृत्तीच्या वर्षीही तयारी करून शिकविणारे पाहिले आहेत. रोज तयारी करून शिकवणारा शिक्षक उपक्रमशील. त्यामुळे त्याचे दरवर्षीचे अध्यापन नवे राहते. रोज नवे वाचन, नव संदर्भ संकलन, आपले अध्यापन ताजे करते. अभ्यासक्रम नवा असो वा जुना, तयारी रोज हवी. तुम्ही भाषेचे शिक्षक असाल तर नवप्रकाशित पुस्तके वाचा. इतिहास भूगोलचे असाल तर नवे नकाशे तयार करा. विज्ञान शिक्षक असाल तर नवे शोध वाचा, सांगा. प्रत्येक विषयात रोज नवे घडत असते. आपल्या रोजच्या अध्यापनात नव संदर्भ विचारपूर्वक योजून, चपखल वापरले पाहिजेत. शैक्षणिक साधने तयार करणाच्या शिक्षकाने नवे तंत्रज्ञान वापरले पाहिजे. नाट्यीकरण, भाषणे, स्पर्धा, नृत्य, आविष्करण, कृती, समूह सहभाग सर्वातून शिक्षण सर्जनशील, कृतीप्रधान, रंजक शिवाय ज्ञानकेंद्री होईल असे पाहिले पाहिजे. उपक्रमशीलता ही अभ्यासकेंद्री, व्यक्तिविकास केंद्री, समूह सहभागी, नवी, कल्पक, समकालीन असायला हवी.
सहल
सहल हा विद्यार्थी, पालकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम. शिक्षक त्याकडे मुख्याध्यापकांनी लादलेले काम, दिलेली शिक्षा म्हणून पाहतील तर त्यातले चैतन्यच नाही का हरवून जाणार. सहलीचे नियोजन हवं. तिचा उद्देश ठरलेला असावा. त्यानुसार पूर्व तयारी असावी. सहल न्यायच्या ठिकाणी शिक्षकांनी पूर्व भेट, नियोजन, निवास-भोजन व्यवस्था इ. चे नियोजन करायला हवे. एका भेटीत अनेक विषय, अमूल्य माहिती देता यायला हवी. हल्ली तीर्थाटन म्हणजे सहल रूढ होते आहे. एकविसाव्या शतकात साहित्यिक, वैज्ञानिक, विद्यापीठे, वस्तुसंग्रहालये, नैसर्गिक ठिकाणे यावर भर हवा. नव्या काळात नासा या अमेरिकेच्या अवकाश केंद्रास सहल काढणाऱ्या शाळा आहेत. त्या श्रीमंतांच्या शाळा अशी भलामण, उपेक्षा उपयोगाची नाही. आपल्या प्राप्त परिस्थितीत शैक्षणिक सहल शैक्षणिकच व्हायला हवी. सहलीत दंगा, मस्ती, भेंड्या, खाऊ, खेळ, मुक्तपणा हवाच. हाताची घडी तोंडावर बोट, ओळ, बसा, चढा, उभे राहा, झोपा, जेवा म्हणजे सहल नव्हे. सहल म्हणजे सहज जिज्ञासापूर्ती, सहजआनंद, सहज शिक्षण, पण ते शिक्षकांसाठी प्रयत्न, नियोजन, कृती, कष्ट इत्यादीतूनच साध्य होणार.
स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलनांचा प्रारंभच झाला आहे तो विद्यार्थ्याच्या सुप्तगुणांच्या विकासासाठी. त्यासाठी पूर्वअट आहे विद्यार्थ्यांचे सुप्तगुण शिक्षकास माहीत असणे. आजची स्नेहसंमेलने 'रेडिमेड' होत आहेत. शिक्षकांनी ते जाहीर करायचे, फतवे काढायचे, पात्र विद्यार्थ्यांनी तयारी करायची व शिक्षकांनी फक्त शिट्टी मारून पडदा उघडायचा. नृत्य, नाटकातला मेकअप, पोशाख सारी जबाबदारी पालकांची. आज परिस्थिती असताना स्नेहसंमेलन फी भरून पालक भुर्दंड सोसत आहेत. काही शाळांतून स्नेहसंमेलनातून जिलेबीचे जेवण हाच मुख्य कार्यक्रम होतो आहे.
स्नेहसंमेलनात प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणानुसार सहभागाचे नियोजन हवे काही कलाकार आणि काही प्रेक्षक असे विभाजन ..... शिस्त, कला, मेकअप, दिग्दर्शन, प्रदर्शन, रांगोळी, वाद्यवादन, नृत्य, नाटक, गायन, पटकथा लेखन, संवाद लेखन, सूत्रसंचालन सर्व विद्यार्थी करू शकतात, त्यासाठी अनेक दिवसांचे नियोजन, तयारी असेल तर ते उत्कृष्टच होणार. ज्या दिवशी पालक पाल्याचा गुणगौरव, कर्तृत्व पाहण्यासाठी पाहण्यासारखे सादर निमंत्रित म्हणून येतील त्या दिवशी ते विद्यार्थी-शिक्षकांचे स्नेहसंमेलन होणार. भाषण, गुणगौरव (पारितोषिक वितरण), सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन, प्रात्यक्षिके असे तुकड्या-तुकड्यांनी स्नेह संमेलन होईल तर विद्यार्थी सहभागी केंद्री होणार. अन्यथा ते 'चटावरचं श्राद्ध' म्हणून उरकले जाणारा प्रकार होईल. नव्या शिक्षकात नियोजन, शिस्त, दिग्दर्शन, कला, संगीत, क्रीडा, विज्ञान सर्वांत रुची व गती हवी. 'मी डाव्या अस्तनीचा शिंपी' म्हणण्याचा काळ केव्हाच लोटला आहे. वस्तुसंग्रहालय
{{gap}शाळा, कॉलेजातून केवळ अभ्यास शिकवण्याचे दिवस सरले हे नव्या शिक्षकांनी समजून घ्यायला हवे. शिक्षण म्हणजे जगायला शिकविणे अशी शिक्षणाची व्याख्या रूढ होते आहे. महात्मा गांधी ज्याला 'जीवन शिक्षण' म्हणत तेच नव्या रूपात येऊ पाहात आहे. नव्या शिक्षणात संस्कृती, पर्यावरण, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र इ. शास्त्रांना 'Soft Science' मानले जात आहे. 'Soft Skills' शिकवणं (संवाद, समूह जीवन, जीवन कौशल्य, सामान्य ज्ञान, सहवास, सहवेदना) शिक्षणाचा गाभा घटक बनतो आहे. विज्ञान+समाज विज्ञान = जीवन विज्ञान असे नवे सूत्र रूढ होत आहे ते माणसाच्या वाढत्या एकारलेपणातून! यावर मात करायचे प्रभावी साधन, उपक्रम म्हणजे वस्तुसंग्रहालय (Museum) म्हणजे संस्कृती संग्रह, संरक्षण व संवर्धन! मुलांत मुळातच संग्रह वृत्ती असते. वस्तुसंग्रहालये प्रेरक शिक्षण साधन, शालेय संग्रहालय हे पुराभिलेखागार (पुरातन स्मृती, दस्तावेज संग्रह) असतं. तिथे काळ, इतिहास, साधने, हत्यारे, नाणी, तिकिटे, दागिने, पोशाख, पुरस्कार, छायाचित्रे, निसर्ग, विज्ञान, क्रीडा, जीवन सारे जपायची सोय असेल तर त्यासारखे समाज साक्षरता साधन नाही. दरवर्षी त्यात भर पडेल तर ते प्राचीन होतही आधुनिक बनत राहील. प्रत्येक शाळेत स्वत:चे विविध विषयांना सामावून घेणारे वस्तुसंग्रहालयात असले पाहिजे. रोज त्यात भर पडायला हवी. तेच एक मोठे शिक्षण विद्यापीठ होईल.
शैक्षणिक साधने
अलीकडच्या काळात तयार शैक्षणिक साधनांचा रोजच्या अध्यापनात वाढता वापर शिक्षण नीरस, तर करत आहेच, पण त्यापेक्षा तो शिक्षकास निष्क्रिय करतो आहे. शिक्षण ही मुळातच सृजन प्रक्रिया आहे. सर्जनशीलता (Creativity) हा नव शिक्षकाच्या उपक्रमशीलतेचा अविभाज्य भाग आहे. शिक्षक जेव्हा स्वकल्पनेतून, स्वहस्ते, शैक्षणिक, साधन (प्रतिकृती, नकाशा, तक्ता, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, स्लाइड फिल्म, क्लिप, ऑडिओ टेप इ.) तयार करतो तेव्हा तो आपल्या विद्यार्थी क्षमतांसंदर्भात अध्यापनाच्या अहवाल व गरजांनुसार साधने तयार करतो तेव्हा ती अधिक प्रत्ययकारी व प्रभावी असतात. शिवाय अध्यापन परिणामकारक होते. तयार साधने मर्यादित अध्यापन क्षमतेची व निर्जीव असतात.
बहुश्रुतता ते बहुदृकश्राव्यता
उपक्रमशील नवा शिक्षक बहुश्रुत असला पाहिजे. पूर्वी भाषण, श्रवण हेच ज्ञानविस्ताराचे साधन होते. दृक-श्राव्य साधन विकास, मुद्रण गती, प्रकाशन विस्तार, साधन वैविध्य यांमुळे बहुश्रुत कल्पनेत पाहणे, वाचणे, लिहिणे, ऐकणे या क्रियांचा समावेश कालौघात होत राहिला. त्यामुळे ज्ञान ग्रहण व प्रकटीकरण वैविध्यपूर्ण झाले. चित्रपट, ग्रंथ, संदर्भ, संशोधन, दूरदर्शन, मोबाईल्समधील ऍप, सॉफ्टवेअर्स, इ. संदर्भ हे सर्व आता शिक्षकाच्या बहुश्रुततेत सामावल्याने शिक्षकाची 'बहुदृकश्राव्यता' अशी नवीन संकल्पनाच उदयाला आली आहे. त्यावर नव शिक्षकाची अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन, व्याख्यान, व्यासंग, छंद यातील उपक्रमशीलता व नावीन्य यांचे मूल्यमापन होत राहते. तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा विस्फोट झाल्याने 'निवडीचे तारतम्य' हेही नव शिक्षकाच्या उपक्रमशीलतेचा भाग होऊ पाहतो आहे. योग्य वेळी साधन, संदर्भाचा योग्य वापर हा नव्या युगाच्या हजरजबाबीपणा होतो आहे. हजरजबाबीपणाची जागा तत्परतेने घेतली आहे. असा तत्पर शिक्षक म्हणजे नव उपक्रमशील नवा शिक्षक होय.
संशोधन
संशोधन (Research) हा ज्ञानविकासाचा मूळ पाया. आज 'आकृतीबंध' केवळ अभ्यासक्रमाचा राहिला नाही, तर एकूण शिक्षण प्रक्रियेचाच एक साचा, चौकट बनून राहिला आहे. ही चौकट शिक्षणास 'घाण्याचा बैल' बनवते आहे. पूर्वी तेल काढायचे घाणे (चरक) असत. त्याला बैल जुंपलेला असायचा. तो ठरावीक परीघात फिरायचा. तो कितीही फिरला, त्याने कितीही चकरा काढल्या तरी तो परीघातच. तसे शिक्षकाचे झालेय. तो अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, घटक चाचण्या, गृहपाठ, पेपर, मूल्यमापन यात अंक देणारा अंपायर बनून गेला आहे. बरोबर किंवा चूक या दोन्ही अडकलेला शिक्षक विद्यार्थ्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार विसरून गेला आहे. विद्यार्थी विकासात त्याची भूमिका 'मूक प्रेक्षक' अशी दयनीय झालीय खरी!
पण याला छेद देत त्यानं स्वत:चा अवकाश निर्माण करून प्रयोग, उपक्रम, निष्कर्ष, संशोधन नि परत नवा प्रयोग अशी निरंतर संशोधन वृत्ती विकसित केली पाहिजे. नव्या काळात विद्यार्थी बहुभाषी झाला, पण लेखन, उच्चारण, शुद्धता गमावून बसला. उच्चारानुसारी लेखनामुळे दुसर्या, गिर्राहिक, अस्पृष्यता, पंचर, असे अशुद्ध लेखन रूढ होत आहे. 'गेम' शब्द 'तो' का 'ती' (स्त्रीलिंगी, पुल्लिंगी) काही कळेनासे झालं आहे. रस्त्यावरचे फलक 'पुढे शाळा आहे' का 'शाळा पुढे आहे' यातला फरक शिक्षकांनी नीट शिकवला नाही. भाषांतर कच्चे, व्याकरण कच्चे राहिले तर समाज कच्चाच राहणार ना? मडके, वीट, पक्कीच हवी, तर पाझर ठीक राहणार. बांधकाम मजबूत होणार.
या नि अशा कितीतरी गोष्टीतून नव्या शिक्षकाने आपली नवी उपक्रमशीलता निश्चित करून विकसित करायला हवी. जुना शिक्षक उपक्रमशील राहण्याची कोणतीच व्यवस्था वर्तमान यंत्रणात नाही. शिक्षकाने स्वत:ला साद घालत, काळाची पावले आव्हाने ओळखत, नव्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा व विकसित क्षमता, कौशल्यांचे मेळ घालत आपला रोजचा शिकवण्याचा खेळ रचण्याचे द्रष्टेपण विकसित केलं तर त्याचे रोजचे अध्यापन नाटकाच्या रोजच्या खेळाप्रमाणे (Show) चैतन्यशील, रंजक, प्रभावकारी, प्रत्ययकारी राहणार. उपक्रमशील नवा शिक्षकच यांत्रिक होत जाणाऱ्या शिक्षणात प्राण ओतू शकणार. त्यास रोज हत्यारास धार लावायचा नाद हवा. तरच त्याचे हत्यार रोज पाजळलेले राहणार व उपयोगी. मी परवाच एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. इंटरनेटवर OLX नावाचे संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. तिथे नव्या जुन्या वस्तूंची खरेदी, विक्री होते. लोक पहिल्यांदा तिथे जुनी सायकल, मोटर, मोबाईल, स्कूटर फर्निचर विकायचे आणि नवी किंवा बदलून जुनी पण घ्यायचे. आता तिथे प्रकल्प (Projects), प्रबंध (Thesis), तसेच उत्तरे (Notes) गरजेप्रमाणे किंवा ऑर्डरप्रमाणे करून मिळतात, विकतात, खरेदी करतात. विकणारे शिक्षक व खरेदी करणारे पण शिक्षकच. कुठे राहिली उपक्रमशीलता? शिक्षण ज्ञानविस्तारी, ज्ञानविकासी राहायचे तर शिक्षक, नवा शिक्षक नवं ज्ञानसधनच व्हायला हवा!
•••
मित्रांनो अलीकडचे एक भाषण, माझ्या वाचनात आले. डॉ. निळकंठ रथ यांचे. डॉ. निळकंठ रथ हे भारताच्या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे शिल्पकार असलेल्या डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे सहकारी, अर्थतज्ज्ञ. त्यांनी एका पुरस्कार वितरण समारंभात केलेल्या भाषणात वर्तमान शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. त्याचा घनिष्ठ संबंध शिक्षकांच्या अध्यापन विषयक भूमिकेशी, दृष्टिकोनाशी असल्याने तुमच्याबरोबर तो विचार वाटून घ्यावा असे वाटते. ते म्हणाले की, "आता माणसे विचार करत नाहीत. माणसे विचार करीत नाहीत ही सर्वसामान्य गोष्ट आहे, परंतु शिक्षण क्षेत्रातील जबाबदार घटकदेखील विचार करत नसतील, तर ती एक गंभीर समस्या आहे. अभ्यासक्रम तयार करणाऱ्या आणि अभ्यासक्रम शिकवणाऱ्या लोकांनी तरी किमान हा विचार करायला हवा की, प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण असते, त्यामुळे प्रश्न समोर ठेवून आपण काम केले पाहिजे. विचारशून्य शिक्षणाला काहीच अर्थ नाही. परंपरेला धरून काम करत राहणे आणि त्यानुसारच रथ चालवण्याला शिक्षण म्हणता येत नाही."
परंपरेला छेद देणे म्हणजे जर शिक्षण असेल... आशय जर नवा असेल तर तो आशय शिकवण्याची पद्धत पण नवी हवी. हल्ली शिक्षणात सर्जनात्मकता, विद्यार्थी सहभाग, उपक्रमशीलता, तंत्रकुशलता यांना जर महत्त्व येत आहे तर हर्बार्टची पंचपदी, (पूर्वतयारी, सादरीकरण, संबद्धता, सामान्यीकरण) आपली अध्यापन पद्धती, शास्त्र (Pedagogy) राहणार की, एकविसाव्या शतकाचे नवे 4H, 3R आपण शोधून काढून शिकवणार? विचार कौशल्य, मूल्यमापन, पारदर्शिता, प्रश्नांची सोडवणूक, प्रकल्पाधारित शिकणे, आंतरशास्त्रीय अध्यापन विकास, ससंदर्भ अध्यापन युक्त आपली नवी अध्यापन पद्धती असायला हवी जिच्यात ज्ञानरचना, ज्ञाननिर्मिती संशोधन, जीवन शिक्षण व कालभान आहे. भारताच्या काय किंवा महाराष्ट्राच्या काय एकूणच शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन, अध्यापन, सर्वास आपण एका चौकटीत बंदिस्त करून शिकवत आलो आहोत. आपल्याकडे प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम असतो. तो आपण काटेकोरपणे शिकवितो. आपल्यापैकी किती शिक्षक हे जाणतात की, तो आकृतीबंध म्हणजे वर्गाची किमान ज्ञानकक्षा असते. ती पात्रता धारण करत आपण त्या संदर्भातले कमाल देऊ शकतो. अगदी प्रश्नोत्तराच्या, घटक चाचणीच्या व विविध परीक्षांच्या चौकटीत फेर धरत शिकवणे किंवा परीक्षांचा खोखो खेळणे म्हणजे मुक्त ज्ञानसंवादास खो देणे असते. आपली पाठ्यपुस्तके ठरवून दिलेल्या ज्ञान उद्दिष्टपूर्तीची साधनं असतात. ती साधने प्रमाण मानून आपण पूरक साधनांकडे पाहात नाही, ज्ञानप्राप्तीचे विविध पर्याय सुचवत नाही. केवळ धड्याखाली दिलेले प्रश्न सोडवणे, यापेक्षा पूरक वाचन, स्वाध्याय, संदर्भ विकास महत्त्वाचा. ते कार्य जे शिक्षक अधिक जोमाने, जाणिवेने करतात ते विद्यार्थ्यांना सकस देतात. अन्नघटक (नत्र, पिष्ट, स्निग्ध, प्रथिने) आवश्यकच, पण जीवनसत्त्वे दिली तर कमतरतेची भरपाई जशी होते, तसेच शिक्षणातील त्रुटीचं आहे. कुशल अध्यापकच कमतरता भरून काढू शकतो. आज अभ्यासक्रम पूर्ण करणारे शिक्षक आहेत. काळाची गरज अभ्यासक्रम समजावण्याची, रुजवण्याची, त्याच्या उपयोजनावर भर देऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची, विकसित करण्याची आहे. विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यात उठता बसता याची जाणीव व्हायला हवी, 'हे माझ्या शिक्षकांनी शिकवले, शिक्षकांनी हे करायचे नाही, याचा संस्कार दिलाय. असे करायला, वागायला, विचार करायला, कर्तव्य, मूल्य पाळायला शिक्षकांनी शिकवलेय.' ... असे घडेल तो सुदिन! मार्काच्या स्पर्धेत, शिष्यवृत्तीच्या शर्यतीत आपण खरे शिक्षण गमावून बसलो आहोत याचे भान शिक्षकांनाच आत्मपरीक्षणातून आले पाहिजे. सरकारी परिपत्रकांवर नाचणाऱ्या शाळा आपणाला नको आहेत. ती एक अनिवार्य वर्तमान व्यवस्था म्हणून तिचे पालन करत त्यापलीकडे डोकावणारे स्वप्रज्ञ मुख्याध्यापक आपणास हवे आहेत. मी वर्गशिक्षक असो की विषय शिक्षक, माझा वर्ग, माझे विद्यार्थी 'माझे' म्हणून ओळखले जाणे ही शिक्षकाची अस्मिता सुजाण समाज घडणीची नवी मागणी आहे. पालक पुरवठादार होत असताना शिक्षकांनी केवळ आज्ञा, सूचनांमध्ये अडकून न राहता तो मार्गदर्शक, समुपदेशक, साहाय्यक होईल तर पालकांचे तणाव व विद्यार्थ्यांवरील दबाव कमी होण्यास ते पूरक, साहाय्यक होईल. शिक्षक-पालक विद्यार्थ्यांचा सखा, सोबती, समर्थक व्हायला हवा.
एकविसाव्या शतकाचे जे अध्यापनशास्त्र (Pedagogy) विकसित झाले आहे. त्यानुसार अध्यापन कुशल शिक्षक व्हायचे तर तुम्हाला तंत्रकुशल व्हायला हवे. शिक्षणाची माहिती, तंत्रज्ञान, संगणक इत्यादी विकसित झालेली इलेक्ट्रॉनिक शैक्षणिक साधने, सॉफ्टवेअर्स, फिल्मस्, स्लाइडस्, क्लिप्स, व्हिडिओज, ऑडिओ बुक, ई-बुक, थ्रीडी सीडीजचा पूर्वाभ्यास व त्यांच्या समर्पक वापराचे कौशल्य तुमच्यात हवे. तुम्हास विविध ज्ञान, विज्ञान, ग्रंथ, वेबसाईटस्, लिंक्सची नुसती माहिती असणे पुरेसे नाही. ते तुम्ही, कट, पेस्ट, डाऊनलोड, फॉरवर्ड, सेंड करून तुमच्या विद्यार्थ्यांप्रत कसे पोहोचवता यावर तुमच्या नव्या ज्ञान, माहिती प्रसारण, वितरण क्षमतेचे मूल्यमापन होणार, माध्यमांचा वापर तुम्ही किती प्रभावी करता (मुद्रित, इलेक्ट्रॉनिक) यावर तुमच्या अध्यापनाचा परिणाम ठरणार.
शिक्षक जे शिकवतो ते कसे, कोणत्या पद्धतीने शिकवतो यावर तो देत असलेल्या ज्ञानाचे अभिसरण, संप्रेषण व रुजणे-स्थिरीकरण (Retention) अवलंबून असते. त्यालाच आपण शिक्षणाचा चिरस्थायी परिणाम मानतो. जगभर झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, केवळ मौखिक अध्यापन (Lecture Method) पेक्षा एकमेकास शिकवण्या-शिकण्यातून शिकणे अधिक काळ राहते व चांगले समजतेही. त्याचा पिरॅमिड प्रत्येक शिक्षकांनी लक्षात घेतला पाहिजे.
एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे यश शिक्षक विद्यार्थ्यात विचार
नव अध्यापन विविध विषयांच्या संदर्भाना जोडत (Contextual) आंतरशाखीय (Interdisciplinary) होईल तर ते अधिक व्यवहार उपयोगी ठरणार. आपण जे शिकवतो ते व्यवहारात कुठे, कसे उपयोगी पडते ते समजावले तर ज्ञानाची उपयुक्तता वाढते हे शिक्षकांनी लक्षात ठेवून बिंबवायला हवे. आज शाळेत शिक्षक एकटेच शिकवतात. पालकांत, समाजात त्या विषय घटकातील तज्ज्ञ, विशेषज्ञ होऊन त्यांना मुलांपुढे सादर केले, परिचय करून देऊन शिकवायला लावले. त्यांची मुलाखत, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिके, त्यांच्यासह भेटी अशा कितीतरी अंगांनी आपले शिकवणे रंजक, उद्बोधक करणे शक्य असते. त्यासाठी पूर्वनियोजन, संपर्क, संवाद संबंध विकसित करायला हवेत. शिक्षक समाजातील होईल तर विद्यार्थी अधिक ज्ञानसंपन्न होणार, केवळ शाळेतल्या वेळात शिक्षक राहण्याची भूमिका सोडून 'सर्व वेळ शिक्षक' असा ध्यास जेव्हा शिक्षक घेतील तेव्हाच ते शक्य आहे.
जगभराच्या अध्यापनाच्या सुमारे १५० पद्धती आहेत. (पहा - http:/teaching.uncc.eclu/learming.... Methods) त्यातील नाट्यीकरण, अभिरूप, सादरीकरण, नकाशे तयार करणे, (शाळा ते मंडई, स्टेशन इ.) संग्रहण, सर्वेक्षण, सांख्यिकी माहिती जमा करणे, त्यांचे वर्गीकरण, विश्लेषण असे जुनेच परंतु नव्याने सातत्याने वापर करणारे शिक्षकच उद्याचा व्यवहारकुशल विद्यार्थी घडवू शकतील. आज विद्यार्थी अंकगणितात १०० गुण मिळवतो, पण दुकानात, बँकेत नोकरीस निरुपयोगी हे चित्र बदलणे गरजेचे. शाळा, महाविद्यालयातील भित्तीपत्रकांत, नियतकालिकांत प्रतिभावान विद्यार्थी प्रतिबिंबित न होता 'संग्राहक', 'भाषांतरीत', 'संकल्पक' दिसतात हे शिक्षकांचे अपयश व कार्यक्षमता मानू त्या दिवशी आपणास प्रज्ञा शोध लागेल. प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थी बसवणे हे नियमित कर्मकांड आहे. ते श्रमसाध्य खरे, पण त्यातून बुद्धिवानाचा, तल्लख बुद्धीचा, स्मरणचतुर विद्यार्थी गवसतो. आज गरज आहे स्वप्रज्ञ प्रतिभांची, ते शोधणाऱ्या शिक्षकाची. अरुणी आहेत जे वाया जाणारे पाणी अडवतील त्यांना प्रेरित करणाऱ्या ऋषीची निर्मिती आपले आजचे आव्हान आहे.
बहुविध अध्यापनाचे मल्टिमिडिया तंत्रज्ञान शिक्षक अवगत करतील तो सुदिन! मानवस्पर्शी शिक्षण श्रेष्ठ खरे, पण जोवर ते अवकाश कवेत घेण्याचे सामर्थ्य संपादन करणार नाहीत तोवर 'वसुधैव कुटुंबकम्' कसे हाती येणार? शिकणे म्हणजे सांगणे व ऐकणं नाही. विचार, विश्लेषण, उपयोजन असा फेर जोवर ते धरत नाही तोवर तो आत्मरंगी पिंगाच राहणार. मल्टिमिडियामुळे शिकणे-शिकवणे प्रभावी होते. ते पारंपरिक शिक्षणापेक्षा रंजक असते. मुलांच्या सुप्त विचारांना, क्षमतांना चालना देते, त्यांना सक्रिय, एकाग्र करते. शिक्षणात सजीवता येते. हालचाल, संगीत, दृश्य, आकृत्या, आलेख, रंग, गती यामुळे ते चिरस्थायी होतं. शिक्षकही त्यामुळे सक्रिय होतो. रोजच्या रटाळ परिपाठातून उभयपक्षी मुक्तता हे केवढे मोठे परिवर्तन ? 'अनुभव हीच खात्री' खर्चीकपणाचा दोष पदरी घेऊनही आपण ऋण काढून सण करतो तसं शिक्षणाचा हा उत्सवही उत्सवीच हवा!
त्रिमिती वर्ग (Three Dimensional Class) ही अध्यापन शास्त्रातील नवी शिक्षण पद्धती आज जगभर झपाट्याने विकसित होत आहे. थ्रीडी सिनेमा आपल्यापैकी अनेकांनी पाहिला आहे. असे वर्ग विकसित करून युद्ध, निसर्ग प्रकोप, काल्पनिक कथा, अवकाश सफर अशा कितीतरी गोष्टी अल्प खर्चात परंतु प्रत्यक्षापेक्षा प्रभावकारी पद्धतीने विद्याथ्यांपुढे सादर करून विद्यार्थ्यांच्या अनुभव कक्षा रुंदावू शकतो. दुसऱ्या महायुद्धाची भीषणता, पर्यावरण नाशामुळे ओढवणारे संकट भविष्यात जगास पर्यावरणशील, अहिंसक बनवण्यास मदत करील.
'युनेस्को' या आंतरराष्ट्रीय संघटनेने या शतकाच्या पूर्वसंध्येला १९९६ साली शिक्षणासंबंधी एक अहवाल प्रकाशित केला होता. त्याचे शीर्षक होतं 'Learning the Treasure within' त्यात शिक्षणाची चार उद्दिष्टे नमूद होती. (१) जगायला शिकविणे (Learning to be) (२) सर्जनशील बनवणे (Learning to do) (३) सामूहिकता सामाजिकता शिकवणे (Learning to live together) (४) अंतर्विकास करणे (Learning the Treasure within) नव शिक्षणापुढची ही उद्दिष्टे नसून ती आव्हाने आहेत. नवा शिक्षक स्वबुद्धीच्या जोरावर व विकासाद्वारे शिकवू लागेल तेव्हाच ही आव्हाने वर्तमानात पेलणे व उतरविणे शक्य होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने व्यवस्था, वर्तमानास दोष न देता प्राप्त परिस्थितीत जे अधिकाधिक प्रभावी अध्यापन शक्य आहे त्याचा अंगीकार, संकल्प केला तर मात्र हे अशक्य नाही.
•••
संदर्भ :-
1. WWW.Celt.iastate.edu. 2. www.educationworld.com
3. WWW.Slideshare.net 4. www.edorigami.org
5. Life long Learning - Christin Redecker (2008)
6. The Changing Classroom - Silva Sowa - The Jurnal -(2012) नवशिक्षकाची अंकीय साक्षरता
अंकीय साक्षरता म्हणजे माहिती, तंत्रज्ञान व संपर्क साधनांच्या कुशल वापराची योग्यता, संगणक साक्षरतेची ही पुढची पायरी. नवे अध्यापन तंत्रात आजकाल नवनव्या साक्षरता व क्षमतांची भर पडत आहे. उदाहरणार्थ स्तरीय साक्षरता (Layered literacy), मध्यमान्तर साक्षरता (Trans Literacy) इत्यादी. अंकीय साक्षरतेसाठी विविध संगणकीय संसाधने (Tools, Softwares) आवश्यकतेनुसार वापरण्याचे कौशल्य आवश्यक असते. माहिती, माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा योजक वापर करणारा अंकीय साक्षर समजला जातो. विद्यार्थ्यांची येणारी पिढी उपजत अंकीय साक्षर असते. कारण त्यांची खेळणी, खेळ, साधने, मनोरंजन, शिक्षण हे संगणक, टीव्ही., मोबाईल्सद्वारे औपचारिक, अनौपचारिकरित्या त्यांना अंकीय साक्षर करत असतात. मुले भिंतीवरील स्थिर अंकाच्या घड्याळापेक्षा मनगटावरील त्यांच्या अंकीय घड्याळाद्वारे लवकर वेळ मोजायला, जाणायला शिकतात. तीच गोष्ट त्यांच्या कार्टून फिल्म्स्, व्हिडिओ गेम्सची. आभासी खेळ (Virtual Games) आता त्यांना मोहिनी घालत आहे. हे सारे जग त्यांना डाऊनलोड, डिलीट, कट, पेस्ट, सेंड, कॉपी, फॉरवर्ड, शुट, स्नॅप, शॉट, स्टॉप, गो, विन, स्टार्ट, रिस्टार्ट, शट डाऊन या साऱ्या अंकीय क्रिया, प्रतिक्रिया आपोआपच शिकवते. शिक्षकास मात्र हे सारे प्रयत्नपूर्वक शिकावे लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. अंकीय साधने नव्या पिढीचा चाळा होत असताना शिक्षकास ती कुशलता मात्र अर्जुन आणि एकलव्याच्या एकाग्रतेने मिळवावी लागेल आणि आता त्याला पर्याय राहिला नाही. अंकीय साक्षरतेचे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम दिसून येतात. असे परिणाम, गुण-दोष सार्वकालिक असतात. पूर्वी होते आणि ते आताही राहणार. प्रश्न आहे शिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक करण्याचा. तुम्ही जितकी प्रगत साधने व तंत्रज्ञान वापराल तितके तुमचे शिकवणे/शिकविणे प्रगत होत राहील. नव्या पिढीचा अल्पकालिक एकाग्रता, चंचलता, दृश्य माध्यमांचा वाढता प्रभाव व आकर्षण व्यक्तिगततेचे विसर्जन (मुलांचे एकछाप होणे) समाज वास्तवापासून त्यांचे दुर जाणं नि राहणे, खासगीपणा संपणे, नैराश्य नि भयाचा वाढता अंमल हे सारे घेऊन येणारे आजचे विद्यार्थी हा नव्या शिक्षकापुढचा खरा प्रश्न नि आव्हान आहे. त्यास तोंड द्यायचे तर शिक्षकास आपल्या अंकीय साक्षरता व क्षमतांचा विकास करणे अटळ होऊन बसले आहे खरे ! अर्ध जग अंकीय निरक्षर असले, तरी अंकीय साक्षरता भूमितीच्या कपारीत राहात, जंगल, नद्या, नाले, डोंगर, दऱ्या तुडवत मोबाईल धारक झाल्याचे चित्र कोण नाकारेल? अंकीय साक्षरतेचा संबंध अज्ञान, दारिद्रयाशी फार जोडून त्याच्याशी फारकत घेऊन राहता येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही. हे वास्तव नव्या काळच्या शिक्षकांनी स्वीकारून अनुरूप आपली अध्यापन कौशल्ये व क्षमता विकसित करायला हव्यात. अंकीय साक्षरतेचे फायदे अनेक, तशीच त्यांची इंटरनेटवर साधनंही विपुल आहेत. ही साधने बरीचशी दृक्/दृश्यमय व काही दृकश्राव्यही! एका चित्र दृश्यात हजार शब्दांचं सामर्थ्य असते हे आपण विसरून चालणार नाही. गती प्रत्ययकारी, ध्वनी लयबद्ध असतो. त्यांचा संयुक्त त्रिमितिक प्रभाव जो हजार तासांनी निर्माण होणे अशक्य, तो क्षणात सिद्ध करण्याची किमया अंकीय साधनात असते. त्यामुळे नवशिक्षकांनी अंकीय संसाधने आत्मसात करून आपली साक्षरता सिद्ध केली पाहिजे. उपलब्ध आहेत त्यांच्या साहाय्याने शिक्षक, संदर्भ शोध, संकलन, प्रक्रिया, प्रेषण इत्यादी कार्य करून आपले शिकवणे रंजक, अद्ययावत करू शकतो.
* ब्लॉग्ज, विकीज्, प्लॅटफॉर्म
'ब्लॉग' म्हणजे इंटरनेटवरचं स्वत:चे व्यासपीठ. त्यावर आपण आपले म्हणणं, मत मांडू शकतो. शंका, प्रश्न विचारू शकतो. ते वाचणारे आपलं मत, माहिती देऊन समर्थन करू शकतात. शंका निरसन करू शकतात. प्रतिक्रिया, प्रतिसाद, समर्थन, विरोध इत्यादीद्वारे वादविवाद होत राहतात. खंडनमडनातूनच ज्ञानविकास, विस्तार, प्रचार, प्रसार होत असतो. याद्वारे शिक्षक, विद्यार्थी, पालक एकमेकांशी संपर्क, संवाद, देवाणघेवाण, विचारविनिमय करू शकतात. 'ईपल्स', 'किड ब्लॉग', 'एज्यु ब्लॉग', 'ब्लॉगर,' 'पोस्टरस', 'वर्ड प्रेस', 'टाइप पॅड', 'लाइव्ह जर्नल', 'टंबलर', 'ट्वेंटीफर्स्ट क्लास', 'मूडल', 'ड्रपल' असे ब्लॉग्ज आहेत. ती त्याद्वारे तुम्ही जगभर संवाद करून व्यक्त होऊ शकता. स्वत:ला समृद्ध करणारे हे साधन. याद्वारे शिक्षक स्वत:ची वेबसाईट, वेबपेज सुरू करू शकतात. वर्गाची माहिती, उपक्रम, वैशिष्ट्य जगासमोर आणू शकता.
'विकीज' म्हणजे वरील गोष्टी एकट्यादुकट्यानं न करता सामूहिकपणे करणे. उदाहरणार्थ, तुमच्या वर्गाला किंवा शाळेला गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची आहे. तुम्ही एकटे कराल, तर हजार रुपये जमा करू शकाल, पण तेच आवाहन शंभर वर्ग, शाळांनी मिळून केलं तर लाख रुपये जमा होतील. तीच गोष्ट एखादे जनमत, जागृती करण्याची. तुम्ही लोकमत संग्रह, संगठन विकीजद्वारे करू शकता. एकीचे बळ, समूह शक्तीचा आविष्कार म्हणजे विकिज. 'विकिपिडिया' सारखा विश्वकोश तयार होणं हा त्याचा मूर्त पुरावा म्हणून सांगता येईल. या विश्वकोशातील माहितीत प्रत्येक जण भर घालत तो कोश समृद्ध व अद्ययावत करत असतो.
'प्लॅटफॉर्म' हे एक संसाधन आहे. (Hardware) आहे. ही एक संचलन व्यवस्था आहे. त्याची मदत घेऊन शिक्षक, विद्यार्थी, पालकांना अनेक गोष्टी मोफत करता येतात. उपलब्ध होतात. ही एक नि:शुल्क इंटरनेट सेवा असून त्याद्वारे आपण मोफत वेबपेज, वेबसाइट इ. तयार करू शकतो, 'गुगल', 'वेब्ज', 'योला' सारखी संकेतस्थळे तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर असतात.
* चित्र विकासक
इंटरनेटवर अशी काही संसाधने आहेत की, जिच्याद्वारे शिक्षक चित्रं, प्रतिमा, दृश्य इत्यादीचे संकलन करू शकतात. ती चित्रे, दृश्य, आपणास हवी तशी बनवू शकतात व त्यांच्या अध्यापनातील उपयोगाने आपले अध्यापन रंजक, आनंददायी बनवू शकतात. 'अशक्य ते शक्य करिता सायास' ही ओळ या साधनांच्या साहाय्याने शिक्षक खरी करून दाखवू शकतात. उदाहरणच द्यायचे झाले तर आपणाकडे एक म्हण आहे. 'बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही.' पण इंटरनेटवर असलेल्या चित्र विकासक, संपादन साधनांच्याद्वारे आपण बेडकाला बैलाएवढा व बैलाला बेडकाएवढा बनवू शकतो व वर्गात धमाल करू शकतो. चित्रांचे आकार बदलणे, रंग बदलणे, चित्र बदलणे, अशा गमतीशीर गोष्टी करू शकतो. ऍनिमेशन फिल्मस् हे शालेय शिक्षणातले आजचे प्रभावी साधन, आपण रचलेली गोष्ट ऍनिमेशन रूपात दृश्यमय सादर करू शकतो. कार्टूनची निर्मिती या साधनांतून करता येते. 'पिकनिक', 'युवर ओल्डपिक', 'राऊंडपिक' ही अशी काही साधने होत. 'गिफअप', 'गिफमेक', 'गिकर' द्वारे आपण ऍनिमेटेड चित्र, फिती, त्रिमितिक चित्रे बनवू शकतो. 'गुगल सर्च', 'मॉरक्यू फाइल्स', 'फ्यूपिक', 'ग्राफिक रिसोर्सेस' द्वारे ग्राफिक, आलेख, आशय दृश्य स्वरूपात प्रगट करणे आता शक्य झाले आहे. कल्पना मूर्त करण्याची शक्ती शिक्षकांना देणारी ही संसाधने अध्यापन समृद्ध करण्याचे वरदानच होय.
* दृक् -श्राव्य फिती (video Tapes)
'गुगल एज्युकेशन', 'यू-ट्यूब' ही चित्रफिती पुरवणारी संकेतस्थळे सर्वसामान्यांना व शिक्षकांना माहीत असलेली ठिकाणे होत, पण त्यांना सशक्त व समर्थ पर्याय देणारी व केवळ शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी कार्यरत ८० संकेतस्थळे अशी आहेत की, ती अहोरात्र विविध विषय, घटक, पाठ्यक्रमाधारित दृक्-श्राव्य फिती प्रसारित, प्रकाशित करीत असतात. 'स्कूल ट्यूब', 'टीचर टीव्ही', 'टीचर ट्यूब', 'नेक्स्ट दिस्टा', 'संग फिल्म','ऍकॅडमिक अर्थ', 'डॉक्युमेंटरी हेवन' ही संसाधने तुम्हास 'हिस्ट्री चॅनल', 'नॅशनल जिऑग्राफी', 'ऍनिमल प्लॅनेट', 'बीबीसी', 'सीएनएन,' च्या गाजलेल्या फिल्मस्, वृत्तचित्रे, वार्तांकने उपलब्ध करून देतात. इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र शिक्षकांसाठी हा खजिनाच.
* इन्फोग्राफिक्स
सांख्यिकी माहिती आलेखाने सादर करणे, भूगोलाचे वेगवेगळे नकाशे (रस्ते, पठार, डोंगर, नद्या इ.) सपाट, साधे, रंगीत, उठावदार, त्रिमितिक करण्याची किमया आता चुटकीसरशी शक्य होते हे इन्फोग्राफिकचा वापर केल्याशिवाय शिक्षकांना कळणार नाही. भूमिती, अर्थशास्त्र, गणित, विज्ञानाच्या अवघड संकल्पना सुबोध करण्याचे साधन म्हणजे इन्फोग्राफ. हल्ली 'इन्फोटेनमेंट' शब्द 'ज्ञानरंजन' रूपात वापरला जातो. शाळेत तुम्ही 'मल्टिमिडिया', 'व्हिडिओ कॅमेरा', 'इन्फोग्राफिक' च्या मदतीने चक्क वर्गाचे रूपांतर आता स्टुडिओत करता येणे शक्य झाले आहे. 'इझल डॉट ली', 'स्टेंट प्लॅनेट', 'होही', 'क्रिएटली', 'टेबलएयू', 'इंकस्पेस' ही साधने वापरून आपण अवघडातील अवघड कल्पना सुबोध करू शकतो. विद्यार्थ्यांना आता गणित, भूमिती, अर्थशास्त्र, इंग्रजी विषय म्हणजे 'वाघिणीचे दूध' वाटायचा काळ इन्फोग्राफिक्समुळे इतिहासजमा होण्यास हरकत नाही.
* पीपीटी, पीडीएफ, स्लाइडस्
एखादा अवघड घटक सुलभ करून शिकवायचे. प्रभावी साधन म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, इंटरनेटवर टॉपिक टाइप करून पीपीटी लिहा. उदाहरणार्थ, भूकंप ('Earthquake PPT', 'Earthquake PDF', 'Earthquake slides') एवढे टाइप करा. किती पर्याय येतात पाहा. डोळे व डोके शिणून जाईल इतकी माहिती व काही प्रकारानुरूप उपलब्ध होते. म्हणजे भूकंपाची व्याख्या, भूकंपाचे प्रकार, भूकंपाची कारणे, भूकंप मापन, जगातले मोठे भूकंप काहीही विषय शंका दूर करून सर्वांगपूर्ण माहिती देणारी ही संसाधने शिक्षिकांचे श्रम, पैसा, वेळ वाचवणारे अध्यापनाचे सबलीकृत साधन. 'स्लाइड शेअर', 'आँनिमोटो', 'व्यूबॉक्स', 'नोव्हिओ', (Knovio) 'अहेड', 'हॅलो स्लाइड' या संकेत स्थळांवर शिकवायला सोयीची व उपयुक्त साधने शोधून तर पाहा. ती वर्गात दाखवण्याचा, वापरायचा मोह तुम्हास आवरता येणार नाही.
•••
संदर्भ :-
1. http://www.educatorstechnology.com
2. http://www.digitaliteracy.us
3. http://www.en.wikipedia.org.wiki/E-learning शिक्षक विकासाच्या पाऊलखुणा
दुसरीकडे प्रगत देशांत मात्र उमेदवार शिक्षकापासून ते ख्यातनाम शिक्षक होण्याच्या विकास कालखंडातील शिक्षकांचं बदलतं, विकसित व्यक्तिमत्व, क्षमता, वृत्तीविकास यांच्या आधारे प्रत्येक श्रेणीतील शिक्षकाचे स्वरूप, गुण, वैशिष्ट्ये यांचा नित्य अभ्यास व विचार होताना दिसतो. या संदर्भात मला अमेरिकेतील मिसौरी नामक छोट्या राज्यात तिथल्या जेफरसन सिटीमधील राजधानीच्या ठिकाणी कार्यरत जी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची व्यवस्था व रचना आहे, ती समजून घेणे उद्बोधक वाटते.
सर्वात प्राथमिक गोष्ट अशी की, तिथला शिक्षक निवडला जातो तो जात, धर्म, वंश, लिंग, वय, राष्ट्रीयत्व यापैकी कशाचाही विचार न करता केवळ त्याचे व्यक्तिमत्त्व, पात्रता, वृत्ती या निकषावर तो निवडला जातो हे विशेष. तो निवडत असताना त्यांनी आपल्या देशाची, प्रांताची गरज लक्षात घेऊन शिक्षकाची परिमाणे (standrds) निश्चित केली आहेत. ती परिमाणे दुसरे तिसरे काही नसून अपेक्षित शिक्षकाच्या त्या कसोट्या व क्षमता होत. त्यांचा आधार आहे प्रभावी अध्यापन कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवनभर शिकण्याची ऊर्जा, जिज्ञासुपणा, निरंतर स्वत:ला अद्ययावत (Update) करण्याची जागरूकता, नवे ज्ञान व तंत्रज्ञानाची ओढ, प्रयोगशीलता, संशोधन वृत्ती, वक्तृत्व, अभिनयकुशलता, खिलाडू वृत्ती, समाजशीलता, विद्यार्थी प्रेम, कष्टाळूपणा इत्यादी. त्यामुळे कसोट्याच निवड निश्चित करतात. आपल्याकडे एके काळी एखादा शिक्षक चांगले शिकवतो म्हणून संस्था अधिक वेतन व सवलती देऊन शिक्षक घेतले, निवडले जायचे. आता काही सन्मान्य अपवाद वगळता जो संस्थेस अधिक देणगी देईल त्याची निवड सरस होत आहे. मग शिक्षक विकास होणार तरी कसा? आणि अपेक्षा तरी काय करणार? म्हणून शिक्षक निवडीची परिमाणे समजून घेणे आवश्यक आहे.
विषयज्ञान व अध्यापन पद्धती (Containt and Method)
ही गोष्ट आपल्याकडे पाहिली जाते. मात्र पाळली जात नाही. विषय शिक्षकाचे त्या विषयाचे ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, तर त्या विषयाचा व्यासंगपूर्ण अभ्यास व आकलन, म्हणजे मराठीचा शिक्षक उदाहरण म्हणून घेऊ. आपणाकडे पाहिले जाते की पदवी मराठीतील आहे का? आणि डीटी.एड./बी.एड.ला मराठी ही त्याची अध्यापन पद्धती होती का? या दोन्ही औपचारिक पात्रता होत. पहिले काय पाहिजे? तर त्याला मराठी भाषा व साहित्याचा इतिहास माहीत आहे का? मराठी साहित्याचे वाचन, मराठी भाषेत नुकताच प्रकाशित संकल्पना कोश, वाङ्मय कोश, मराठी भाषा (बोली कोश) त्याला माहीत आहे का? आणि आपल्या नित्य अध्ययन, अध्यापनात तो ते वापरतो का? पाठ्यपुस्तकातील वेचे ज्या पुस्तक, संग्रह, कादंबरी, नाटकातून घेतले असतील ती मूळ पुस्तके, त्यांच्या समीक्षा, संदर्भ ग्रंथ, लेखकाचे जीवन त्यास माहीत आहे का ? हे सारे ज्ञान विद्यार्थ्याला देण्याची, शिकवण्याची त्याची काय योजना, उपक्रम आहेत? तो बहुभाषी संदर्भ जाणतो का? हे आपण पाहात तर नाहीच, पण या अंगाने आपण विचार व अपेक्षाही करत नाही. मग भाषेचा शिक्षक त्या भाषेचा साहित्यकार, कवी, समीक्षक, व्याकरणी, भाषा वैज्ञानिक, बोली संशोधक असा व्यासंगी हवा असे आपणास वाटत नसल्याने आपले भाषा शिक्षक शब्दार्थ शिकवणारे अर्थवाहक, माहितीवाहक झाले आहेत. थोडी शब्दकळा उपजत असलेला शिक्षक शाळा, कॉलेजात कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन अशा जुजबी कौशल्यावर आपला व्यवसाय कसा निभावतो याला काय म्हणावे?
जिज्ञासू ज्ञानसाधक (Curious scholar)
किमान औपचारिक शैक्षणिक पात्रता घेऊन आलेला शिक्षक त्याच पात्रतेसह व्यवसायातून निवृत्त होण्याचे शिक्षकाचे, आपले प्रमाण मोठं आहे. नाही म्हणायला ते मधल्या काळात सक्तीची जुजबी प्रशिक्षण पूर्ण करतात, तीच काय ती त्यांच्या तंत्र व ज्ञानातील मोलाची भर म्हणायची. स्वविकासार्थ व्यावसायिक गरज म्हणून स्वयंप्रेरणेने वेतन वृद्धीच्या प्रलोभनाशिवाय जेव्हा एखादा शिक्षक पात्रता, क्षमता वृद्धी करून दाखवतो, ती त्यांची अंतःउर्मी असते. असे शिक्षक अपवाद आढळतात. नित्य शिकणारा तो शिक्षक, सतत विद्यार्थी; भुमिका बजावणारा जिज्ञासु ज्ञानसाधक. निरंतर शिक्षण (Continuous Education) ही खरी सजीव शिक्षण प्रक्रिया (Vital Educational Process) ती पाळणारा शिक्षक नवध्यायी, नवोपक्रमशील शिक्षक, अशा शिक्षकाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो. तो जाणीव असणारा असतो. त्याला समाजभान असते. भावनिकता, संवेदनशीलता हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. शिकवण्याची त्याची हातोटी अन्य शिक्षकांपेक्षा वेगळी, प्रभावी असते. आपल्या पूर्वज्ञानाधारे तो सतत आपल्या अनुभव व समृद्ध शिकवण्यातनु मुलांची जीवने फुलवण्यात तत्पर असतो. भाषा, साहित्य, संस्कृती, ज्ञाननिष्ठा यांची सांगड घालत शिकवणारा हा शिक्षक स्वतः रोज शिकत, प्रयोग करत आपलं व्यक्तिमत्त्व नित्य विकसित करण्याचा ध्यास घेऊन शिकत-शिकत शिकवतो. (Learning while Teaching)
मार्मिक विचारक (Critical Thinker)
चिकित्सक असणे आणि जिज्ञासू असणे यात तर्क आणि बुद्धीमधील अंतर आहे, 'काय' प्रश्नात जिज्ञासा असते. का? प्रश्नात चिकित्सा भाव असतो. शिक्षक विवेकी हवा तर तो बुद्धिप्रामाण्यवादी, नैतिक, विज्ञाननिष्ठ असणार, असा शिक्षक स्वयंप्रज्ञ विद्यार्थी निर्माण करतो. तो पोपटपंचीवर विश्वास न ठेवता मुलांपुढे प्रश्न ठेवून त्यांना विचारप्रवण बनवतो. तो आपले अध्यापन सक्रिय बनवतो, ते विद्यार्थ्यांना सर्जनशील, कृतीशील बनवून. विचार, परिवर्तन ही व्यक्तिमत्त्व विकासाची पूर्वअट असते.
सकारात्मक शैक्षणिक पर्यावरण निर्माता
व्यक्तिगत जाण, समूह भावनांचा आदर व विकास, प्रेरणापर प्रोत्साहन, सर्जनात्मक अध्यापन, स्वयंशिक्षण पूरक उपक्रम व वर्ग नियोजन, सकारात्मक दृष्टी, या अशा काही बाबी आहेत की, शिक्षक जर याबाबत दक्ष आणि प्रयत्नशील राहील तर शाळेत, वर्गात सकारात्मक शैक्षणिक पर्यावरण निर्माण होऊन ते ठिकाण विद्यार्थ्यांच्या आकर्षण व अभिरुचीचे केंद्र बनेल. अशा शाळा विद्यार्थ्यांसाठी चैतन्याचे मळे व उत्साहाचे कारंजे होत असते. शाळेचा जिवंतपणा हा शिक्षकाच्या सकारात्मक, प्रोत्साहक, प्रेरक वृत्तीवर अवलंबून असतो.
हृदयस्पर्शी संवाद कुशलता
शिक्षणाची एक शब्दी व्याख्या 'संवाद' आहे. हा संवाद विद्यार्थी व शिक्षक या दोन व्यक्तीमधील असतो तेव्हा ते हितगुज असते, पण शिकणारा व शिकवणारा यांच्यामधील प्रक्रिया म्हणून जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ते संप्रेषणाचे रूप धारण करतं. शिक्षकाला या दोन्हीतील अंतर व मर्यादा यांचे भान हवे. शिक्षकाला जे सांगायचे, शिकवायचे, कळवायचे आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे तर शिक्षकाचे अध्यापन संवादी हवे तसेच ते बहुविधही हवे. प्रश्नोत्तर, नाटक, अभिनय, कोडी, विचार, चर्चा, गट कृती इत्यादीतून हा संवाद निर्मितीक्षम, कृतिशील करून सुजाण शिक्षक आपले अध्यापन ज्ञानवाही व ज्ञानवर्धक बनवतो.
वस्तुनिष्ठ मूल्यमापक
विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे सूक्ष्म निरीक्षणातून पाहणारा वस्तुनिष्ठ शिक्षक मूल्यांकनातून येणारा निष्कर्ष, निर्णयांच्या आधारे शिकवण्यात नित्य, नूतन प्रयोग करत राहतो. त्यामुळे त्याचं रोजचं शिकवणे नवे होते. स्वत:च्या अध्यापनाचा व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा कायाकल्प करणारा शिक्षक नित्यनूतन शिक्षक !
वरील परिमाणांच्या कसोटीवर निवडल्या गेलेल्या नव्या शिक्षकाचे विकासाचे टप्पे व शिक्षक म्हणून त्याचा होणारा नित्य, क्षमता, कौशल्य, तंत्र, आशय समृद्धी, प्रयोग, संशोधन, उपक्रम, मूल्यमापन इत्यादी अंगांनी होणारा नित्य, नूतन विकास या आधारावर प्रवेश ते निवृत्ती अशा सुमारे चार दशकांच्या कालखंडात निरंतर विकासशील शिक्षक आपल्या क्षमतावर्धन वृत्तीच्या जोरावर ठरावीक कालखंडानंतर वरच्या श्रेणी व क्षमतेचा शिक्षक बनतो. तो तसा बनणारा शिक्षक ख़रा ज्ञानसाधक व ज्ञानवर्धक! या आधारे शिक्षकांचे पाच वर्ग मानण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे (१) उमेदवार शिक्षक (प्रशिक्षणार्थी शिक्षक) (२) होतकरू शिक्षक (३) उपक्रमशील शिक्षक (४) निष्णात शिक्षक (५) नामवंत शिक्षक आपल्याकडे अशा सवर्ग विकासाचा चढता आलेख अपवादाने पाहायला मिळतो. कारण शिक्षक म्हणून व्यक्तिमत्त्व आणि वृत्ती विकासाची प्रोत्साहक, निरीक्षक, मान्यता देणारी यंत्रणा आपल्याकडे शालेय स्तरावर नाही. महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवर वार्षिक स्वयंमूल्यमापन (Self Appraisal) गुणवत्तावर्धक निर्देशांक (Academic Performance Index) यांची असलेली तरतूद यामुळे उच्च शिक्षणातील प्राध्यापक हिरिरीने शैक्षणिक पात्रता वाढ, चर्चासत्र सहभाग, लेखन, वाचन, संशोधन, प्रयोग, उपक्रम यातून स्वत:स विकसित करताना दिसतात. त्यांच्यातील ही ऊर्मी शालेय शिक्षकात जोवर येणार नाही, तोवर शिक्षकांचे गुणवत्तावर्धन होणार नाही. शिक्षण प्रभावी व्हायचे तर शिक्षक विकासशील हवा, जगात शिक्षक चैतन्यशील संशोधक व प्रयोगशील सर्जक राहावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न, प्रोत्साहनाच्या अनेक योजना असता भारतातील त्यांचा अभाव येथील शिक्षकांना स्थितीशील बनवतो. हे चित्र बदलायचे असेल तर नित्य विकसनशील शिक्षण यंत्रणा उभारण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. तसे झाले तर आपले शिक्षकही निरंतर विकासशील शिक्षक बनतील.
•••
संदर्भ :-
Teacher Standard - Missouri Educator Evaluation System. (U.S.) नव शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व
शिक्षक प्रशिक्षणात शिक्षक व्यक्तिमत्त्वाबद्दल फारसे बोलले, लिहिले जात नाही. 'टोमणे' दिले जातात, गरज असते 'टिप्स' घ्यायची. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व आंतरिक असते, तसे बाह्यही. आंतरिक व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच बोलले जाते. बाह्य व्यक्तिमत्त्वही आंतरिक व्यक्तिमत्त्वाइतकंच मला महत्त्वाचे वाटत आले आहे. शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर प्रथमदर्शनी प्रभाव पडतो, बाह्य व्यक्तिमत्त्वाचाच. शिक्षकाची देहयष्टी, देहबोली, पोषाख, केशरचना, बोलणे, वागणे, चेहऱ्याचा रखरखाव/देखभाल (मात्र सजावट नव्हे!) (मेक अप, दागदागिने, स्वच्छता, नखे, दाढी, केशरचना) लकबी (बोलण्या, लिहिण्या, वागण्याच्या) या सर्वांबद्दल सांगणे आवश्यकच नाही तर अनिवार्य वाटतं.
देहयष्टी
शिक्षक उंचापुरा, सशक्त, प्रसन्न चेहऱ्याचा, शिडशिडीत हवा. त्याच्यामध्ये चपळता हवी. त्याच्या चालण्या, बोलण्यात गतिमानता हवी. त्याच्या खाण्या-पिण्याच्या, वागण्याच्या सवयी आदर्श व अनुकरणीय हव्यात. स्वच्छता, आरोग्य, याचे त्यास उपजत बाळकडू आणि वरदान हवे.
देहबोली
शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वात देहबोलीचे महत्त्व असाधारण असते.शिक्षकाचे बोलणे, भाव व्यक्त करणे, विचार करणे, निरीक्षण, स्पर्श, डोळ्यांचे संकेत, शाबासकी देणे, प्रसंगी धाक-प्रसंगी आदर वाटणे, शिक्षकाची आकलन क्षमता, हावभाव, अभिनय, प्रगटीकरण, आवाजातील आरोह, अवरोह, दोन शब्द/वाक्यातील विराम, अवकाश (Pause) विद्यार्थ्यांना समजून घेणे, हात, पाय, शरीराच्या हालचाली, ठेवण, हस्तांदोलन इत्यादी गोष्टी शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन शिकण्यासारख्या आहेत. ऍलन आणि बार्बरा पीजचे जगप्रसिद्ध पुस्तक (The Definative Book of Body Language) आता मराठीतही 'देहबोलीविषयी सर्वकाही' (अनुवाद रोहिणी पेठे, मंजुल पब्लिशिंग हाउस) उपलब्ध आहे. ते अजून अभ्यासक्रमात का लावले नाही याचे आश्चर्य वाटते. देहबोलीचे शास्त्र आता इतके विकसित झाले आहे की तो अभ्यासक्रमात (डी. टी. एड./बी. एड. एम. एड.) समाविष्ट व्हायला हवा. शिक्षक देहबोलीवर संशोधन (पीएच. डी.) होणे अनिवार्य, शिक्षक-विद्यार्थ्यातील संवाद, नाते, प्रेम, आदर, काळजी, सुरक्षा सारं यातून विकसित होते.
बोलणे
शिक्षकाच्या बोलण्यात नेमकेपणा, स्पष्टता हवी. बोलण्यापूर्वी आपणास नक्की काय सांगायचे, समजवायचे आहे, ते उच्चारणापूर्वी अवबोध पातळीवर (मनात) ते पक्के हवे. बोलण्यात सोपेपणा हवा. बोलण्याची गती धीमी हवी. आपण बोलतो ते समजते का याचा अंदाज घेत बोलणे, शिकवणे, समजावणे अपसूक पुढे सरकत राहायला हवे. बोलण्याचा आरोह, अवरोह, विरामात धक्के (Jerks) नसावेत, संथपणा, प्रवाहीपणा हवा. बोलताना देहबोली, अभिनयाचं भान हवे. वाचिक अभिनयाचे शिकवण्यात मोठे महत्त्व असतं. नकली, प्रसंगी आवाज काढण्याचे (mimicry) कौशल्य हवे. प्रसंगी गाता यावे, रागावताही व प्रेम करताही येणे आवश्यक. शिक्षक म्हणजे वाचिक किमयागार !शिक्षकाचं बोलणे, शिकवणे मन:पूर्वक हवे. शब्दांची निवड चपखल हवी, वाक्याची फेक भाल्यासारखी हवी. तेच ते शब्द वापरणे, वाक्यांची वारंवारिकता टाळावी. त्यामुळे शिकवणे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होते. शिकवण्यात पाल्हाळिकता, रवंथपणा नसावा. उदाहरणे अनेक नकोत. अलंकार, म्हणी, वाक्प्रचार बोलण्यात सहज यावेत. 'मी' शब्द टाळावा. 'आपण' संबोधनामुळे विद्यार्थी शिक्षकात सामील होतात. आज्ञार्थक बोलू नये (करा, लिहा, उठा) इच्छार्थक क्रियापदांचा (करू या, बोलू या, लिहू या इ.) वापर विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभागी भूमिका देतो. भाषा प्रदूषित नसावी. एकाच वाक्यात मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे मिश्रण नको. उदा. 'म्युझियममध्ये सर्वत्र सन्नाटा होता.' अशी वाक्ये नकोत. बोलताना चेहऱ्याचे हावभाव व आशय यात ताळमेळ हवा. चेहरा हसरा, बोलका हवा. अगोदर ऐका मग विचार करा. प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया नसावी. स्मितहास्य, हास्य, सातमजली हसणे (ठहाका/Laugh) यातले अंतर, त्यांच्या सीमारेषा, ते वापरण्याचे तारतम्य शिक्षकात हवे. प्रश्न सहज विचारावेत. प्रश्नांच्या फैरी नकोत. प्रश्नातही मार्दव हवं. (How old are you?) आप कितने जवान हो ? आपले वय काय? एकच वाक्य तीन भाषेचे वैभव, मर्यादा, दोष दाखवते. त्याचं भान शिक्षकास हवे. विद्यार्थ्यांना हसू नका, त्यांना हसवा, सतत उपदेश नको. थोडे त्यांना स्वातंत्र द्या. बोलण्यात खाकरणे, खेकसणे, खर्ज, ढेकर, आवंढा, जांभई, शिंक, उचकी टाळण्याचा प्रयत्न करा. बसून शिकवू नका. सरळ उभे राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधा. पाय, हात, पुढे, मागे करणे, ठेवणे टाळा.
पोशाख
शिक्षक/शिक्षकांनी आपल्या पोशाखाबाबत नेहमी चोखंदळ, जागरूक असायला हवे. विद्यार्थी निष्पाप असले तरी त्यांचे निरीक्षण सूक्ष्म, संवेदी व अनुकरणशील असते, याचे भान हवे. शिक्षकांनी पोषाखाची निवड रोज विचारपूर्वक करायला हवी. वय, प्रसंग, ऋतु, हवामान, उत्सव, समारंभ या सर्वाचं प्रतिबिंब त्यांच्या पोषाखात हवे. पोशाखांचे रंग भडक, चकाकणारे, तलम नकोत. फिकट रंग तुम्हास सोज्वळ बनवतात. रंगसंगतीचे (Matching) भान हवे. नट, नटी, विदूषक, बहुरूपी होणे टाळावे. पोषाख नीटनेटका, टाचलेला हवा. फॅशन नको. पोशाख अंगास साजेसे हवेत. ढिले, ओंगळ मागून घातले असे वाटू देऊ नये. पोशाखात खोच, निऱ्या, कॉलर, पीन, पदर यांचं महत्त्व खबरदारीचे हवे. तुम्ही सुस्वरूप तर दिसायला हवे, पण चित्त चळेल असा पोशाख नसावा. पोशाख स्वच्छ, नेटका, इस्त्री केलेला हवा, पण 'कडक लिनन' नको. शाळेचा गणवेश असेल तर त्याचे पालन हवे. पुरुषांचे पोशाख उशीचा अभ्रा नको, तसेच शिक्षकांचा पोशाख खोळ नसावा.
केशरचना व देखभाल
केसांची स्वच्छता, रचना, देखभाल पोशाखाइतकीच महत्त्वाची केसांची निगा, स्वच्छता नियमित हवी. केशकर्तन नियमित हवे. केशकर्तनात फॅशनचा अतिरेक टाळावा. सभ्यता, सोज्वळता, साधेपणा जपत सौंदर्य वाढवणारी केशरचना हवी. शिकवताना केसावर हात फिरवणे, बटा, झुलपे मागे करणे, मुरका मारणे टाळावे. आपले वय, देहयष्टी, चेहरेपट्टीचा विचार करून केशरचना ठरवणे श्रेयस्कर. केशरचनेत फॅन्सी वस्तू (क्लिप्स, बँडस्, बो) टाळावेत. त्यात निगा, नियंत्रणावर भर हवा. प्रदर्शन नको. 'मॉडेल' बनणे टाळावे. केस विंचरलेले, बसवलेले हवेत. तेल लावावे, पण ओघळ येणार नाही याची काळजी हवी. शिक्षकांनी रोज दाढी करणे आवश्यक (वाढवली नसेल तर!) प्रसन्नता या सर्वांतून झरते.
सौंदर्य प्रसाधने/आभूषणे
भडक बेस, लिपस्टिक, आयब्रो टाळावेत. प्रसाधन सौंदर्य खुलवणारे हवे, पण खुणावणारे नको. दागिने अपवाद हवेत, अतिरेक नको. दागिने मण्या-धातूंची चकाकी, चकमकी चंचलता नको. लंकेची पार्वती नको अन् गौरी लक्ष्मी नको. साध्वी, सावित्री हवी. पुरुष देवानंद नको तसे केश्तो मुखर्जी, जॉनी वॉकर नकोत. ए. के. हंगल हवेत. नखे वाढवू, रंगवू नये. मेंदीचे हात, ग्लोज, स्कार्फ, उंच टाचाचे बूट, चप्पल्स टाळावेत. सँडल्स, स्लिपर्स, चप्पल्स ऐवजी बूट वापरावेत. त्यांचा वापर समयोचित हवा.
संलग्नके (Accessories)
वर्गात जाताना शक्यतो पर्स, बॅग, ब्रीफकेस, मोबाईल्स नेऊ नये. वर्गात मोबाईल्सचा वापर निषिद्ध मानावा. वर्गात पर्स, बॅग उचकत बसू नये. शैक्षणिक साधने, खडू, डस्टर, रोलकॉल्स घेऊन वर्गात प्रवेश करावा. रिकाम्या हाताने (व डोक्याने पण) वर्गात जाऊ नये. वर्गात गेल्यावर विद्यार्थ्यांनी वरील साहित्य आणायला पाठवू नये. वैयक्तिक कामे लावू नयेत. शैक्षणिक साधनांचे नियोजन (निवड, वापर इ.) हवे. पूर्वतयारी (शारीरिक, मानसिक, साधनविषयक) महत्त्वाची.
वरील विवेचनाकडे 'टीका' म्हणून न पाहता 'टिप्स' म्हणून पाहावे अशी माझी विनंती राहील. जगातील शिक्षक व भारतीय शिक्षक यांच्या भूमिकेतच मूलभूत फरक आहे. जगात शिक्षक व्यवसाय आहे. आपणाकडे शिक्षक धर्म, वृत्ती, संस्कार आदर्श, प्रतिदर्श (Role Model) आहे. कालौघात 'गुरुजी' हा 'सर', 'मॅडम' झाला तरी भारतीय जनमानसात शिक्षकाची प्रतिमा आणि प्रतिभा एखाद्या योगी, तपस्वी, उपदेशक, प्रवचकातीत राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षकाचे महत्त्व प्रसंगी आई-वडिलांपेक्षा अधिक असते. संस्कार, प्रभाव, विचार, अनुकरण, आदर्श याचा मोठा पगडा विद्यार्थ्यांवर असतो, तो पालकांपेक्षा शिक्षकांचा. हे अतिरिक्त दायित्व या व्यवसायावर असतेच. याचा शिक्षकास विसर पडता नये. तुम्ही चांगले शिकवायला हवे हे खरेच, पण तुम्ही चांगले दिसायला नि असायलाही हवे अशी समाजाची अपेक्षा खोटी नाही. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक ध्येयवादी व कृतिशील शिक्षकांच्या चर्चासत्रात असे म्हणाले होते की, "शिक्षकांनी विधवेसारखे असायला हवे." त्याचा अर्थ होता समाज कितीही बदफैली होऊ दे. विधवा व्रतस्थ, नैतिक, समाधी जीवन जगत असते. समाज तिच्यावर अन्याय करत असतो, तरी ती आपली नैतिक प्रतिदर्श भूमिका व्रतस्थपणे बजावत राहते. आज आपण एकविसाव्या शतकातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर आहोत. जग भारतीय शिक्षकांना प्राधान्याने निवडते ते त्यांच्या नैतिक मूल्यनिष्ठ चारित्र्य सामर्थ्यावर, बुद्धी इतकेच महत्त्व आज मूल्यांना येते आहे. भारतासारखा तुलनेने गरीब देश शिक्षकांना मात्र भरभरून देताना दिसतो. मग शिक्षकांचे समाजाप्रती काही देणे घेणे असेल तर त्याची उतराई त्याने अपेक्षापूर्तीने नको का करायला?
•••
संदर्भ :-
1. Teaching as a profession - Session V (Essentiats of Teacher Personality) www.het.gov.pk
2. The Definative Book of Body Language - Allan and Barbara Pease (Pease Renternational PTY Ltd. Australia) एकविसाव्या शतकाच्या शिक्षकाची घडण
'विचारी शिक्षक' (Thinker Teacher) निर्मिती हे त्यांच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे (Teacher's Training Programme) कायमचे ध्येय असल्याने त्यांनी एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांच्या स्वप्न आणि अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारे शिक्षक तयार करण्याचा संकल्प (21st Century LeamersCall for 21st Century Teachers) सोडला. त्यातून त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाचा एक आदर्श कार्यक्रम आखला. तो प्रशिक्षण कार्यक्रम जगासाठी अनुकरणीय वस्तुपाठ (Role Model) ठरला असल्याने तो आपण समजून घेतला पाहिजे. आपल्याकडेही राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) असून तिनेही आपल्या डी. एड्. (डी.टी.एड्.), बी. एड्., एम. एड. पदव्या देणाऱ्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल (Vision of Teacher Education in India Quality and Regulatory Perspective-2012) प्रकाशित झाला असून तोही जिज्ञासूंनी वाचायला हवा.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, सिंगापूरने Model of Teachers Education for the 21st Century CTE21 नावाने प्रसिद्ध केलेला सुमारे सव्वाशे पानी अहवाल मुळातूनच शिक्षक, पालक, संस्थाचालक आणि हो, शिक्षणाधिकाऱ्यांनीही वाचायला हवा. या अहवालात एकविसाव्या शतकातील शिक्षकांचे व्यावसायिक ज्ञान व कौशल्य वाढीवर भर देण्यात आला आहे. जागतिकीकरणामुळे जो नवा ज्ञान समाज (Knowledge Society) आकारतो आहे. त्यातून भविष्यलक्ष्यी जी आव्हाने ध्यानी येतात ती गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला असल्याने त्याचे काळासंदर्भातील महत्त्व असाधारण आहे. एकविसाव्या शतकापुढे नव्या पिढीच्या नैतिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व निसर्ग पर्यावरण संदर्भातील जाणीव व सौंदर्यविषयी दृष्टिकोनाने मुक्त अशा सर्वांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आव्हान आहे. जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची घडण करताना त्यांना नव ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, नवी साधने यांची माहिती असणे, ते वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे व नव्या ज्ञानसमाजाचा घटक बनवणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाल्याचे भान या अहवालात प्रतिबिंबित आहे. या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकातील शिक्षकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या बदलत असल्याने त्या पार पाडायची, पेलण्याची क्षमता शिक्षकांत निर्माण करणे राष्ट्राचे आद्य कर्तव्य झाल्याची जाणीव सदर अहवाल देतो.
जबाबदार शिक्षकाची घडण ही राष्ट्राचे शिक्षण मंत्रालय, शिक्षक, प्रशिक्षण महाविद्यालये व शाळा, महाविद्यालये यांची संयुक्त जबाबदारी सिंगापूर मानते. आपणाकडे या तीनही घटकात असलेला समन्वय, नियंत्रण व कार्यवाहीविषयक अभाव असल्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. आपल्याकडे विद्यापीठात शिक्षण विभाग आहेत, पण त्यांचा शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांशी कसलाही संबंध, संवाद नाही. शिक्षण विभागाचे स्वतंत्र संशोधन नाही. सिंगापूरच्या उपरोक्त अहवालात सहा महत्त्वाच्या सुधारणा व शिफारशी करण्यात आल्या असून त्यातून नव्या शिक्षक घडणीची त्यांची धडपड व संकल्पना स्पष्ट होते. त्यातून आपण बरेच शिकता येण्यासारखे आहे.
१. नवे मूल्य, कौशल्य आणि ज्ञान (V3sk) तिथले अध्यापक शिक्षण, प्रशिक्षण एका विशिष्ट तत्त्वज्ञानावर उभे आहे. ते तत्त्वज्ञान आकृतीबंध, अध्यापन (आविष्करण) व सुधारणा सर्वांना लागू असते. त्यामुळे शिक्षकाचा सकारात्मक विकास, कौशल्यवर्धन, शिक्षकाची खोली, उंची, रुंदी, वाढ, विकास, कौशल्यवर्धन, सुधार सर्वात एक निरंतरता, सातत्य आढळतं. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्याच्या त्यांनी या पूर्वअटीच मानल्यात हे विशेष.
नव्या शिक्षकात तीन मूल्यांचा (V3) ते आग्रह धरतात. (१) विद्यार्थी केंद्री मूल्य (२) शिक्षक व्यक्तिमत्त्व मुल्य (३) व्यावसायिक सेवा व समाज मूल्य, यानुसार शिक्षक घडणीचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो. सारं करायचे ते विद्यार्थ्यासाठी हे प्रशिक्षण काळात बिंबवले जाते. ते प्रशिक्षणार्थी युवक छात्राध्यापक (Trainee Teacher) असतात. त्यांना विद्यार्थ्यांची काळजी कशी करावी, त्यांचा विचार कसा करावा, अध्यापनातला आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे काय, त्याचे महत्व काय आहे, शिकणं म्हणजे नक्की काय असते, ते प्रभावी कसे करता येईल, त्याला वातावरण, साधनांची जोड कशी द्यायची, त्यातून अध्यापन परिणाम कसा घडतो, वाढतो हे सूक्ष्मरित्या शिकवले जाते. शिकण्या-शिकवण्याच्या कौशल्याबरोबर, नव्या शतकाची आव्हाने पेलण्याची कौशल्ये शिक्षक व्यक्तिमत्त्वात विकसित करण्यावर भर दिला जातो. तद्वतच शिक्षकात सेवाभाव व समाजशील वृत्ती विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्याविषयी बंधुभाव व प्रीती महत्वाची. ती शिक्षकात निर्माण केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थी शिकू शकतात, सर्वांत ग्रहण क्षमता (कमी, अधिक) असते. यावर भर दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्त गुणांच्या विकासाचे कौशल्य शिक्षकात विकसित केले जाते. प्रत्येक मूल वेगळे आहे, प्रत्येकाची क्षमता, कमतरता, बलस्थान भिन्न आहे. हे शिकवण्यावर प्रशिक्षणात दिलेला भर म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या विकासाचे राष्ट्राला दिलेले आश्वासन असते. या प्रशिक्षण धारणा व प्रयत्नांमुळे तेथील शिक्षक व्यवसायाशी, कर्तव्याशी एकनिष्ठ, समर्पित असतात. त्यासाठी शिक्षकास चार वर्षे पदवी प्रशिक्षण असते. आणखी एक वर्ष प्रशिक्षण घेतले की, त्याला पदव्युत्तर प्रमाणपत्र (एम्. एड.) प्राप्त होते. या काळात शिक्षकांचे ध्येय उंचवण्यावर, विस्तारण्यावर भर दिला जातो. त्यांच्या ज्ञानपिपासा वाढवली जाते. निसर्गाचे गूढ त्याला समजावले जाते. निरंतर नव्या क्षमता, कौशल्य स्वीकारायची वृत्ती शिक्षकात विकसित करण्यावर भर दिला जातो. तो संवेदनशील राहावा असा प्रयत्न असतो. शिक्षकाचे चरित्र व्यक्तित्व नैतिकतेच्या पायावर उभारले जाते. शिवाय तो व्यावसायिक असायलाच हवा हेही पाहिले जाते. त्यासाठी समाज संपर्क, समाज सहभाग, समाज संवाद असा त्रिविध गोफ गुंफला जातो. विविध मान्यवरांच्या भेटी, संवाद, मुलाखती, कार्य, वाचन असे नानाविध उपक्रम प्रशिक्षण काळात योजले जातात. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थीना विविध सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे लागते. शिक्षकाला जबाबदार काळजीवाहक (care-taker, Steward) बनवण्यावर भर दिला जातो. आपल्या प्रशिक्षणात यातील कितीतरी गोष्टींचा अभाव खटकतो.
शिक्षक, प्रशिक्षण काळात विचारशील वृत्ती विकास, अध्यापन कौशल्ये (Pedagodical Skills), लोक प्रशासन व व्यवस्थापन कौशल्य, स्वयंव्यवस्थापन कौशल्य, प्रशासन कौशल्य, संवाद कौशल्य, तंत्र कौशल्य, नवोपक्रमशीलता, सामाजिक व भावनिक बुद्ध्यांक वाढ इत्यादी कौशल्य वर्धनावर भर दिला जातो. यातून कुशल शिक्षक घडतो. कौशल्य वर्धनाबरोबर शिक्षण, प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण छात्राध्यापकाच्या ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, ते चतुरस्र करणे याला अत्याधिक महत्त्व दिले जाते. त्याअंतर्गत स्वशोध (क्षमता व कमतरतांचे भान), विद्यार्थी जाणीव बोध, समाजभान, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र, शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, बहुसांस्कृतिक साक्षरता (ही तर आपल्या देशासाठी काळाची गरजच!) जागतिकीकरण : स्वरूप आणि परिणाम, पर्यावरण जागृती इत्यादीचे ज्ञान, प्रशिक्षक, छात्राध्यापकास अनिवार्यपणे दिले जाते.
पदवी पातळीवरच्या प्रशिक्षणात व्यावसायिक कौशल्यवर्धन, शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास, प्रशासन व व्यवस्थापन तंत्र, प्रभावी व्यक्तिमत्त्वाची घडण यावर भर असते तर पदव्युत्तर स्तरावर प्रकल्प, संशोधन, संदर्भ यास महत्त्व असते. शिक्षक होण्यासाठी पदवी शिक्षण अनिवार्य असते. प्रशिक्षण एक वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष असे त्रिस्तरीय असते. एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण करून तुम्हाला शाळेत नेमले जाते. सहा महिने वरिष्ठ शिक्षकांच्या देखरेखीखाली कार्यानुभव घेणे बंधनकारक असते. नंतर सहा महिने तुम्ही प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून कार्य करायचे. मग शासन तुम्हास सेवेत सामावून घेते. प्रशिक्षक निवड तावून सुलाखून होते. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी छात्राध्यापकांना शिक्षक पगाराइतकी शिष्यवृत्ती असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो नियमित सेवेत आला की, त्याला सेवाशर्ती, सुरक्षा योजना, निवृत्तीवेतन, प्रशिक्षण सुविधा प्राप्त होतात. बी.ए., बी.एड., बी. एससी., बी. एड. एम्. ए. बीएड. एम्. एससी, बीएड. किंवा एम.एड. अशा पदव्या दिल्या जातात. प्रशिक्षणात सिद्धांत वर्षांच्या कालावधीचे असले तरी प्रत्यक्ष प्रशिक्षण कालावधी त्याच्या निम्माच असतो. त्यामुळे शिक्षक निम्माच तयार होतो व निम्माच उपयोगी पडतो. पूर्ण शिक्षकाची घडण हे आपल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमापुढील खरे आव्हान आहे. तसेच कालसंगत प्रशिक्षणाच्या सुधारणा प्रशिक्षण अभ्यासक्रमात जोवर आपण करणार नाही तोवर पाठ घेणारेच शिक्षक तयार होणार. शिकवणारे शिक्षक हवे असतील तर प्रशिक्षण हे गंभीर, कठोर, संशोधनाधारित, कालसंगत करायला हवे.
•••
स्वातंत्र्यपूर्व काळातली ही गोष्ट आज घडली तर कृपाशंकर गुरुजींना कोणी घरी घेऊन जाईल का? त्यांचे आतिथ्य करेल का? याबद्दल मी साशंक आहे. शिक्षकाचे झालेले अध:पतन, प्रतिमाभंजन यास स्वतः शिक्षक किती जबाबदार? शासनाची यात काय भूमिका ? समाजाचा बदललेला चेहरा, व्यापारी वृत्ती, आत्मरतता याला जबाबदार नाही का? या सर्व गोष्टींचा विचार शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर शिक्षकांच्या अध:पतनास सुरुवात झाली ती सन १९८० नंतर. स्वतंत्र महाराष्ट्रात त्या वेळी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पालकांची मुले उच्च शिक्षण घेती झाली होती. स्वातंत्र्यामुळे समाजाच्या शिक्षण विषयक आकांक्षा उंचावल्या होत्या. डॉक्टर, इंजीनिअर व्हायचं स्वप्ने सर्रास पाहिले जायचे. त्याला कारणही होतं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी बहुजन वर्गातील मुले शिकावी म्हणून आर्थिकदृष्ट्या मागास गरीब विद्यार्थ्यांना फी सवलत (इ. बी. सी.) दिली होती. सामान्य मुलगा सहज डॉक्टर, इंजीनिअर व्हायचा व तेही माफक फीमध्ये. सन १९८० च्या दरम्यान उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत जितकी वाढ झाली तितकी क्षमता, सोय महाराष्ट्रातल्या इंजीनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये नव्हती. परिणामी मुलं मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणासाठी कर्नाटकात जात. शासनाची इच्छा मेडिकल, इंजीनिअरिंग कॉलेज काढायची असून ते काढू शकत नव्हते. कारण अशी कॉलेजीस स्थापन करायला मोठी आर्थिक तरतूद, इमारती, जमिनी, दवाखाने लागते. या अडचणीतून खासगी संस्थांना मेडिकल, इंजीनिअरिंग कॉलेजीस देण्याच्या इराद्याने (त्या वेळी अशी कॉलेजीस केवळ शासन चालवायचे) विना अनुदान तत्त्वावर खासगी शिक्षण संस्थांना अशी कॉलेजीस देण्याचे धोरण स्वीकारून एका नव्या शैक्षणिक, संस्कृतीचा विकास करण्यात आला.
हेतू चांगला, पण व्यवहार उलटा होत गेल्याने विना अनुदान धोरणामुळे सुरू झालेल्या शिक्षण संस्था संस्थाने बनल्या. संस्था चालक संस्थानिक बनले. शिक्षण बरकतीचा धंदा होऊन सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या मतदार संघात, साखर कारखाना साईटवर शिक्षण संकुले उभारली. ती पत, पैसा, प्रतिष्ठेची साधने बनली. शिक्षक मजूर, मांडलिक झाला. त्या काळात डी. एड्., बी. एड्. कॉलेजीस मागेल त्याला देण्यात आली. अमाप देणग्या देऊन पदवीधर झालेला शिक्षक पंडित चंद्रधर कसा राहणार ? हे कमी की काय म्हणून कायम विना अनुदानित संस्थातील 'कायम' शब्द काढून शासनाने आपल्या सग्यासोयऱ्यांच्या या शिक्षण संस्थांना हळूहळू अनुदानाच्या जहागिऱ्या वाटायला सुरुवात केली. हंगामी शिक्षक वर्षानुवर्षे बिनपगारी नोकरी करत राहिले. अनुदानित संस्था होताच फरकाची रक्कम एकरकमी कपातीने संस्था चालकांच्या घशात गेली. संस्था चालकांना पैशाची चटक लागली. त्याचे देणगी फरकातुन समाधान होईना. पैशाची तहान भागवण्यासाठी त्यांनी नियुक्तीसाठी लाखात पैसे घेण्याचा सपाटा लावला. आज शिपायासाठी तीन लाख, प्राथमिक शिक्षकांसाठी पाच लाख, माध्यमिक शिक्षकासाठी दहा लाख, प्राध्यापकासाठी पंधरा लाख, प्राचार्यासाठी पंचवीस लाख सर्रास घेतले जातात.
हे चित्र एकीकडे तर दुसरीकडे शासनाने पैसे वाचविण्यासाठी विना अनुदान संस्कृती अधिक बळकट करण्याच्या इराद्याने शिक्षण सेवक पद भरतीचा नवा फंडा काढला. तिकडे अशाच शेखचिल्ली कल्पनेतून महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षक (सी.एच.बी.) नेमायचा सपाटा लावला, शून्याधारित अर्थसंकल्प (झिरो बजेट)च्या कल्पनेतून खुल्या वर्गाची पदे न भरण्याचे धोरण स्वीकारून होते नव्हते तितके शिक्षण कसे होणार नाही हेच पाहिले गेले. प्राथमिक स्तरावर जिल्हा परिषदांच्या शाळात तर सध्या शासनाने सचिवांच्या बौद्धिक संपदेतून एक नवी कॅटॅगरी अपंगासाठीच्या शिक्षकांसाठी शोधून काढली. ती म्हणजे फिरता शिक्षक (मोबाईल टीचर). आणिबाणीत आरोग्यमंत्री असलेल्या राजनारायण नामक विदूषकी मुंग्यांच्या सुपीक डोक्यातून अनवाणी डॉक्टर (बेअर फूट डॉक्टर) नेमले गेले होते. तसाच हा अमानुष प्रकार. आजवर शासकीय नोकरीत दोनच प्रवर्ग होते. हंगामी व कायम (टेंपररी/पर्मनंट) हे जे विशेष शिक्षक प्राथमिक शाळात अपंग, अंध, मतिमंदांसाठी नेमले गेले त्यांची एक नवीच कॅटॅगिरी आहे, ती म्हणजे 'कायम हंगामी' (परमनंट टेंपररी). सांगा, तो शिक्षक कोणत्या ऊर्जा, अंत:प्रेरणा घेऊन शिकवणार ?
हा दुष्काळ एकीकडे तर दुसरीकडे त्याच शाळा, कॉलेजीसमध्ये नियमित पदांवर नेमल्या गेलेल्या शिक्षक, प्राध्यापकांना इतका पगार, इतक्या सोयी, सवलती, सुरक्षा की त्यांनाही संघटनेचे कवच, सेवा सुरक्षा, अतिरिक्त समृद्धीमुळे शिकवावेसेच वाटेना झालेय, असे एक विचित्र चित्र, चरित्र शिक्षिकांचे तयार झाले आहे !
या सर्व प्रतिकूल वातावरणाने समाजातील शिक्षकांची प्रतिमा डागळत चालली आहे. यास शासन, समाज असा जबाबदार आहे तसा स्वत: शिक्षकही. सक्ती केल्याशिवाय तो स्वतः अधिक शिकायला तयार नाही. किमान पात्रता (डी.एड्., बी.एड्. एम्. ए.) व्हायचे अन् त्याच पात्रतेवर निवृत्त व्हायचे. वेळोवेळी निर्धारित केलेल्या पात्रता धारण करण्याचा प्रयत्न न करता संघटनेच्या जोरावर पात्रता शिथिल करण्यासाठी, सूट मिळवण्यासाठी संप करण्यासारखा प्रकार समर्थनीय नाहीच. अलीकडच्या प्राध्यापक संघटनेच्या संपाच्या मागण्या लक्षात घेता शासनाची भूमिका योग्यच ठरते.
प्राध्यापक, शिक्षकांचा लेखन, वाचन, संशोधन, व्यासंग चिंतेचा ठरावा अशी स्थिती आहे. रकाने भरण्यासाठी, वेतनवाढीच्या अमिषाने केलेली प्रगती खरी नसते. खरा ज्ञानी स्वानंदी विकासक, अध्ययन, अध्यापन पद्धती कालबाह्य झाली, तरी त्या बदलायला शिक्षक तयार नाहीत. अभ्यासक्रम बदलण्याचे स्वातंत्र्य व स्वायत्तता केंद्रीय व राज्य सरकारांनी शिक्षक, प्राध्यापक करताना दिसत नाहीत. पाठ्य-पुस्तके सदोष असणे, त्यांच्या निर्मिती त्रुटीपूर्ण असणे हे त्याचे उदाहरण. नव्या ज्ञान समाजात विद्यार्थी संगणक, मोबाईल, इंटरनेट इत्यादी नवं तंत्रज्ञान व माहितीच्या क्षेत्रात जितके तरबेज होऊन येत आहेत, त्यांच्या ज्ञान व कौशल्यापुढे शिक्षक निरक्षर व निरुत्तर होत आहेत.
रोजचे अध्यापन पाट्या टाकण्याच्या स्वरूपात होत राहिले आहे. पाट्याच टाका, पण भरून टाका इतक्या माफक अपेक्षांनाही शिक्षक उतरताना दिसत नाही. माध्यमिक स्तरावर क्लासचे वाढते प्रस्थ व महाविद्यालयीन स्तरावर तास चुकवायचे विद्यार्थी (आणि प्राध्यापकांचेही!) वाढते प्रमाण त्वरित हस्तक्षेप व नियंत्रणाची गोष्ट ठरली आहे. विद्यार्थ्यांना शिकावंसं वाटत नाही व शिक्षकांना शिकवावेसे वाटत नाही अशी उभयपक्षी मरगळ क्षेत्रातील भ्रमनिरास सिद्ध करतो आहे.
अशा सार्वजनिक शिक्षक प्रतिमाभंजनाचे एक कारण वाढती सेवा सुरक्षा, आपोआप मिळणारी वेतनवाढ, वारेमाप वेतनवाढ यामुळे अतिरिक्त सुख व सुरक्षेमुळे सुखावलेल्या शिक्षकास विद्यार्थी, पालक, समाज, शासनाने वेसण घालण्याची वेळ आली आहे. काही सन्मान्य अपवाद व आदर्श शिक्षक आहेत. ते अल्पसंख्य, असंघटित, पापभिरू ठरलेत. ते काही करू पाहतील तर कावळ्यांच्या शाळेत बहिष्कृत ठरतात. शिक्षकांना सन्मान, सुरक्षा, समृद्धी असायलाच हवी पण ती गुणवत्ता विकासाच्या निरंतर प्रयत्नांच्या आधारावर मिळेल तर शिक्षक प्रतिमा पूर्ववत आदर्श होऊ शकेल. जगभर शिक्षण व शिक्षक या दोन्ही गोष्टींकडे फार गांभीर्याने पाहिले जाते. जगातले सारे प्रगत देश विकास करताना आपणास दिसतात ते शिक्षण धोरणातले सातत्य, देशाचं विकास लक्ष्य, मनुष्यबळ विकासाचे नियोजन यामुळे. लोकानुनय करणारे शैक्षणिक निर्णय घेणे जोवर आपण थांबवणार नाही तोवर शिक्षण व शिक्षकांचे अध:पतन आपणास थांबवता येणार नाही. सिंगापूर, फिनलंडसारखे छोटे देश शिक्षणात जागतिक परिमाणे (स्टँडर्ड) निर्माण करतात तर आपणासारख्या खंडप्राय देशाने ते का करू नये? महासत्ता बनण्याचे स्वप्न असायला हरकत नाही. त्यासाठी राजकीय लाभापलीकडे देशाहित म्हणून शिक्षणाकडे पाहायला हवे.
शिक्षक दिनी ज्या शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. तो एक फार्सच म्हणायला हवा. मी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक निवड समितीत काम केलं आहे. सारे शासकीय आदर्श शिक्षक पुरस्कार हे प्रस्ताव मागवून त्यातून निवड करून दिले जातात. जो शिक्षक आपला प्रस्ताव चकचकीत (ग्लेज्ड) सादर करतो, तो आदर्श शिक्षक होतो. त्यातही मंत्री, संत्री यांच्या चिठ्ठया-चपाट्यांची भरती असतेच.
हे चित्र बदलायचे असेल तर खालील सुधारणांना पर्याय नाही.
१. खासगी, शासकीय, निमशासकीय सर्व शिक्षण संस्था मान्यता, शिक्षक पात्रता, निवड, वेतनमान यासाठी एकच व समान धोरण व संहिता हवी.
२. शिक्षणावरील आर्थिक तरतूद राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान ६% असावी. ती योजने गणिक वाढवत नेऊन १०% करावी.
३. विना अनुदान शिक्षण पद्धती त्वरित बंद करून सर्व शिक्षकांना सन्मानजनक समान वेतन व समान सेवाशर्ती लागू कराव्यात.
४. शिक्षकांची पदोन्नती, वेतनवृद्धी ही सेवाकाल, सेवा ज्येष्ठता या ऐवजी सेवा श्रेष्ठतेवर (काँपिटन्स) वर दिली जावी.
५. सेवा कालात लेखन, वाचन, वक्तृत्व, समाजसेवा संशोधन, प्रकल्प, प्रकाशन, इत्यादीस महत्त्व देऊन पुरस्काराऐवजी प्रोत्साहनपर वेतनवृद्धीचे तत्त्व अंगीकारावे.
६. वर्गातील शिक्षक व विद्यार्थी प्रमाण बालवाडी ते उच्च शिक्षण स्तरावर जागतिक परिणामानुसार निश्चित करावे. (युनेस्को स्टँडर्ड)
७. सेवांतर्गत प्रशिक्षणात निरंतरता, गुणवत्ता, तज्ज्ञता यांना महत्त्व देण्यात यावे. ८. सेवापूर्व प्रशिक्षणात आमूलाग्र बदल सर्व स्तरावर करण्यात येऊन प्रशिक्षण पाठ्यक्रम (बी. एड., बी. एड., एम. एड., एम. फिल, पीएच. डी., नेट, सेट इ.) माहिती तंत्रज्ञान, संगणक, संपर्क क्रांती, तंत्रज्ञान इ. चे अवधान ठेवून बनवावेत व प्रतिवर्षी ते अद्यतन (अपग्रेड) करण्यात यावेत.
९. बालवाडी ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षण स्वायत्त व स्वतंत्र (न्याय व्यवस्थेप्रमाणे) करावे. त्याचे नियमन, नियंत्रण, नियोजन, शिक्षण तज्ज्ञांकडे द्यावे.
१०. शिक्षकास विकास, संशोधन संधीचे, प्रयोगाचे स्वातंत्र्य देऊन शैक्षणिक अभ्यासक्रम प्रतिवर्षी सुधारित करावे. (रिव्हाइज्ड)
११. प्रशिक्षण, प्रवेश, पदभरती, पदोन्नती, नियुक्ती सर्व स्तरावर देणगी घेणे अपराध ठरवण्याचा कायदा करावा. त्यासाठी अध्यादेश काढावा.
१२. शिक्षकांनी आपली गुणवत्ता वाढवावी, टिकवावी म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षणाधिकारी/विद्यापीठ स्तरावर प्रतिवर्षी बहुस्तरीय फिडबॅक व मूल्यांकन पद्धती लागू करावी.
१३. शिक्षक वृत्ती विकासार्थ शैक्षणिक साधन खरेदी, संशोधन प्रकल्प, प्रकाशन, प्रयोग इत्यादीसाठी अनुदान दिले जावे. जे बालवाडी ते विद्यापीठ सर्व शिक्षणस्तरावर दिले जावे.
१४. शिक्षण संस्था संहिता, अनुदान संहिता सेवाशर्ती संहिता सर्व शिक्षण संस्थांना समानपणे लागू करून शिक्षणाचा अपेक्षित दर्जा (डिझायरेबल स्टँडर्ड) निश्चित केला जावा. त्याच्या निरीक्षण, नियंत्रण, विकासाची स्वतंत्र यंत्रणा उभारावी.
१५. 'शिक्षण प्रथम' (Education First) चे धोरण अंगीकारून केंद्र व राज्यस्तरावर नियोजन, तरतूद, अंमलबजावणी सर्व स्तरावर शिक्षण व शिक्षक विकासास प्राधान्य देण्यात यावे.
•••
आज तुम्ही सर्वजण रविवारचा सुट्टीचा दिवस असताना इथे 'शिक्षक नव ऊर्जा शिबिर' होते आहे म्हणून स्वत:हून आला आहात. या शिबिराची मूळ कल्पना राबवणारे तरुण शिक्षणाधिकारी श्री. विश्वास सुतार सदर शिबिर आयोजनार्थ अभिनंदनास पात्र आहेत, तसेच तुम्ही शिक्षकही ! 'थ्री टी' (टिकिट, टिफिन अँड टाइम) ची कल्पना केवळ अनुकरणीय ! शिक्षकांनी स्वत:च्या पैशानी, स्वत:चा डबा घेऊन व सुट्टीचा वेळ सत्कारणी लावायचे ठरवून हे शिबिर योजले आहे. पाटगाव (जि. कोल्हापूर)चा हा निसर्गरम्य परिसर ! शिवाजी महाराज इथे येऊन मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन दक्षिण दिग्विजयाला गेले होते, असे सांगितले जाते. तुम्ही आत्मप्रेरणेने आत्मविजय आणि आत्मविकासार्थ या शिबिरासाठी आला आहात. नवऊर्जा घेऊन आत्मस्वराच्या शोधार्थ तुमचे उद्याचे भविष्य उज्ज्वल होवो, तुमच्यातील शिक्षक निरंतर सजग राहो, अशी प्रार्थना व शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो.
मला संयोजकांनी सांगितलंय की मी तुमच्याशी 'शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा' या विषयावर हितगुज करावं. अशा शिबिरांची परंपराही आपणाकडे पूर्वापार चालत आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या पुढाकारातून पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेतर्फ सन १९८० च्या दरम्यान असे एक शिबिर पुण्यामध्ये योजण्यात आले होते. 'कृतिशील शिक्षक शिबिर' असं त्याचं स्वरूप होतं. आत्मस्वर जागा असणारा ऊर्जावान शिक्षक कृतिशीलच असतो. तो अध्ययन, अध्यापन कार्य कर्तव्यभावनेने, सचोटीने तर करतोच करतो. शिवाय त्यापलीकडे जाऊन तो स्वत:स सामाजिक उपक्रमांशी जोडत राहून सतत योगदान देत राहतो. अशी पदरमोड शिबिरे, सेवाकार्य योजणे व आपण त्यात सहभागी होणे, हे शिक्षकाच्या समाजबांधील असण्याचेच लक्षण होय. तेव्हा त्या शिबिरास संबोधित करताना डॉ. जे. पी. नाईक म्हणाले होते की, शिक्षक होणे सतीचे वाण आहे. शिक्षकांनी पूर्वीच्या विधवेप्रमाणे बंधनयुक्त आणि आत्मइच्छितेच्या वैषयिक, भौतिक प्रलोभनाला बळी न पडता त्यागी, समर्पित जीवन कंठले पाहिजे. ती समाजाची गरज आहे आणि शिक्षकाकडून समाजाची अपेक्षापण! सन् १९८० सालचे विधान हे, पण आज २०१५ लाही तितकेच समयोचितपणे लागू आहे, गरजेचे आहे, असे मला वाटते.
शिक्षक होणे हे सतीचे वाण कसे? असे जर तुम्ही मला विचाराल तर मला आठवते की सन १९७०-७१ मध्ये मी शिक्षक झालो. प्राथमिक, माध्यमिक वर्गाना शिकवायचो. इथेच जवळ असलेल्या श्री मौनी विद्यापीठात मी शिक्षक प्रशिक्षण पदविका डी. आर. एस्. (एज्यु.) पूर्ण केली. आमच्या वर्गात त्या वर्षी (१९६७-६८) ८० विद्यार्थी होते. पैकी बहुसंख्य बँक, शासकीय समाजकल्याण, सहकार खात्यात अधिकारी होण्यास उत्सुक. पैकी केवळ १० जणच शिक्षण शाखेकडे आले. त्यापैकी मी एक होतो. मी स्वेच्छा, ठरवून शिक्षक झालो. तुम्हीही तसेच स्वेच्छा शिक्षक झालात. 'शिक्षक' होण्याची एक भूमिका असते. तुम्ही निरंतर अध्ययन करायला हवे. तरच तुमचं अध्यापन निरंतर नूतन, अभिनव होत राहणार. तुम्ही आदर्श आचरणच करायला हवे. तरच तुम्ही समाजासाठी अनुकरणीय उरणार ना? मी शिक्षक व्हायचं ठरवलं तेव्हा समाजात एक धारणा रूढ होती- 'मागून मिळत नाही ना भीक, मग मास्तरकी शिक', काहीच जमत नाही ना, मग मास्तर हो. आपणास असे 'मजबुरी का नाम महात्मा गांधी' शिक्षक नाही व्हायचे. ठरवून चांगले शिक्षक व्हायचे आहे आपणास. समाज भले आपणाकडे कुत्सितपणे पाहो. आपण चांगलेच व्हायचे, राहायचे, जगायचे, शिकवायचे.
माझे एक शिक्षक होते. प्रा. विठ्ठल बन्ने त्यांचे नाव. गमतीने म्हणायचे, "बसलेली बाईपण शिक्षकाला उठत नाही." या गमतीत ही शिक्षकी पेशाचं एक गांभीर्य भरलेलं होतं. पूर्वी गावचा एक रस्ता हागणदारीचा असायचा. वर्दळ कमी असलेला हा रस्ता खेड्यात हागणदारीसाठी वापरला जायचा. एखादी स्त्री शौचाला बसलेली असायची. पाटील, तलाठी निघाला की उठून उभा राहायची, पण शिक्षक निघाला तर मात्र निवांत शरीरधर्म उरकत बसून राहायची. तिच्या अब्रू, लाजेला पाटील, तलाठ्याचं भय होतं. तिच्या लेखी शिक्षक म्हणजे अभय निरुपद्रवी आणि सज्जन, स्त्री दाक्षिण्य असलेला. हे असते शिक्षकाचे बलस्थान. नैतिक सचोटी, परस्त्री मातेसमान मानणारा, अनुकरणीय शिक्षक व्हायचे तर तुमचा आत्मस्वर नैतिक हवा. भौतिक संपन्नतेच्या मागे लागून आपला 'कांचनमृग' होणार नाही, 'मिडास' होणार नाही, हे ही आपण पाहायला हवं. हे असतं शिक्षकाचं विधवा होणं, आणि सतीचं वाण.
समाजाचं सर्वाधिक लक्ष जर कुणाकडे असेल तर ते शिक्षकांकडे असते. मला कोल्हापूरच्या सिटी बसमध्ये कितीही गर्दी असली तरी उभे राहावे लागत नाही. भरल्या बसमध्ये चढल्यावर पण कोणीतरी उठून मला बसा म्हणतो. ती अथवा तो माझा विद्यार्थी, विद्यार्थिनी असते, पालक असतो अन् एखादा त्रयस्थही असतो. कारण त्यांच्या लेखी, मनी मी शिक्षक असतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुम्ही शिक्षक असले पाहिजे. शिक्षक 'व्रत' आहे की 'व्यवसाय'? तर मी म्हणेन ते व्रतच असायला हवे. व्रत म्हणजे निश्चय, दृढ प्रतिज्ञता. पानी से पतला कौन है? या हुमानाचे उत्तर 'शिक्षक' आहे. शिक्षक पाट्या टाकायचा उद्योग नाही. माझे शिक्षक मला सांगायचे, 'भले पाटी टाक, पण प्रत्येक वेळी भरून टाक.' शिक्षकाची प्रत्येक कृती महत्त्वाची. कारण ती उपजत अनुकरणीय असते. तुमच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण विद्यार्थी करत असतात आणि तेही अंधभक्तीने. तुम्ही एक अनुस्वार चुकीचा लिहिला तर किमान पन्नास शब्द चुकीचे लिहिले जातात. म्हणून शिक्षकाचे आचार, विचार निर्दोष हवेत. त्याला क्षमा नाही. शिक्षक अक्षम्य व्यवसाय आहे, हे आपणास कधीही विसरून चालणार नाही.
आज मी निवृत्तीच्या वयात आहे. कधी कधी निराशा येते, मन विषण्ण होऊन राहते. वाटतं आपण जे मूल्याधिष्ठित जीवन जगलो, जो आदर्शवाद जपला, समाजाला त्याचे काही देणे-घेणे नाही. पण आज या नवऊर्जा शिबिरात तुम्ही १००-१५० जण आलात. मलाच नवी ऊर्जा मिळाली. नाही सर्वत्र वाळवंट नाहीत, ओऍसिसही आहेत. डॉ.जे.पी.नाईक यांनी सन १९८० साली बोलावले तेव्हा ५० शिक्षक होते. आज २०१५ साली १५० आहेत. त्या वेळी सर्व शिक्षकच होते. आज कितीतरी शिक्षिका या शिबिरात आहेत. आड वाटेला शिबिर भरलं असताना त्या आल्यात, हे पाहून मी सुखावलो आहे, भरून पावलो आहे. माझ्या दृष्टीनी एकविसाव्या शतकातले हे आशादायी चित्र आहे, स्वप्न आहे. शासकीय आदेश नसताना तुमचं येणं ही क्रांती आहे. 'एक-एक से ही कारवाँ बनता है।' मी लहान असताना आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे. गोष्ट कौरव-पांडवांची असायची. १०० कौरव विरुद्ध ५ पांडव. ते एकमेकांविरुद्ध असूनही त्यांच्यावर कुणी तिऱ्हाइतांनी हल्ला केला तर ते मिळून १०५ होऊन लढायचे. आज आपण १०५ एक आहोत. आपल्यात कौरव आहेत नि पांडवही. पण आदर्श व्हायचे आपण सर्वांनी मिळून. वर्तमान शिक्षकांच्या प्रचंड संख्येत आपण पांडवांप्रमाणे अल्पसंख्य असू. पण महाभारत घडविण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. आपला आत्मस्वर जागा आहे नि नवऊर्जा घेण्यास आपण उत्सुक आहोत. आपण देश बदलू शकू. समाजाचा मोहरा बदलण्याचे सामर्थ्य आपणात आहे.
सन १९७० साली मी याच तालुक्याच्या (भुदरगड) सीमेवरच्या पिंपळगाव नावच्या गावी शिक्षक होतो. गावचे छोटे पोस्ट होते. पोस्टातला पोस्टमन रोज सारं टपाल घेऊन शाळेत यायचा. तो शिकलेला होता पण त्याला इंग्रजी येत नसायचं. आम्ही सारं टपाल त्याला वर्गवारी (सॉर्टींग) करून देत असू. तो फक्त पोहोचवायचं काम करायचा. आम्ही सारं टपाल वाचायचो. संध्याकाळी गावचे सर्वजण टपाल वाचून घ्यायला परत शाळेतच येत असत. बहुधा टपाल मुंबईचं असायचं. गावचे लोक मुंबईत कामाला असायचे. आम्ही टपाल न वाचताच संबंधितांना मजकूर सांगायचो. कारण सकाळीच ते वाचलेले असायचे. त्यांना आश्चर्य वाटायचे. यांना न वाचता कसे समजले? अडाणी जगातला शिक्षक त्या वेळी सज्ञानी समजला जायचा नि असायचा पण. आज जग सज्ञानी झाले आहे. शिक्षकांनी अत्याधुनिक नको का असायला? शिक्षकाचे अत्याधुनिक असणे म्हणजे काळाच्या पुढे असणे होय.
काल मी या वेळेस राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो. मी तिथे काय पाहिले? अधिकांश विद्यार्थी कृषी पदवीधर. ते पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून शासकीय सेवेत अधिकारी होतात. मुळात कृषी शिक्षण हे कृषी विकासासाठी सुरू झाले. ते शिक्षण घेऊन विद्यार्थी शेतीशी संलग्न राहणार नसतील तर त्यांनी कृषी शिक्षण घ्यायचेच का, हा मला पडलेला प्रश्न. शिवाय ती सर्व शेतकऱ्यांची मुले, मुली होती. ते शेतीचं काही करणार म्हणून शासन, समाजानी त्यांना मोफत शिकवलेलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कृषी संस्कृतीचं उद्ध्वस्तपण भरलेलं आहे. डॉक्टरकी शिकलेल्यानं डॉक्टर व्हायचं नाही, शिक्षकी शिकलेल्यानं शिक्षक व्हायचं नाही तर त्या विशेष शिक्षणाला अर्थ उरत नाही. आज आपण पाहातो की मुलगा सातवी पास झाला की गाव सोडतो. दहावी पास झाला की तालुका सोडतो. पदवीधर झाला की जिल्हा सोडतो. पदव्युत्तर झाला की राज्य सोडतो. पीएच.डी. झाला की राष्ट्र सोडतो. या विस्थापन प्रक्रियेने शिक्षक अस्वस्थ झाला नाही तर जग कसे बदलणार? शिक्षक, साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञच जग बदलतात. सर्वच स्पर्धा परीक्षांच्या मागे गेले. सर्वांनीच 'साहेब' व्हायचं ठरवलं तर देश, दुनिया कशी चालणार ? मला हे माहीत आहे की आज शिक्षक होणं कठीण होऊन गेलंय. शिक्षकांची नोकरी मिळवायला १० लाख, प्राध्यापक व्हायला २५ लाख संस्थेला द्यावे लागत असतील व पैसे हीच 'गुणवत्ता' मानली जात असेल तर त्यासारखे आपल्या व्यवसायाचे दुसरे पतन नाही. हा शासनाचा करंटेपणा आहे. विना अनुदान संस्कृतीचं नवं शैक्षणिक जग, साम्राज्य निर्माण करून शिक्षणसम्राट जन्माला घालणारे, होणारे राजकारणी नाकारण्याचं बळ शिक्षकच निर्माण करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात गावचं मत शिक्षकाच्या हाती होतं. आज परत एकदा ती पत शिक्षकांनी प्रवाहाविरुद्ध पोहुन निर्माण केली पाहिजे. काळ बिकट आहे. काम अवघड आहे. पण अशक्य खचितच नाही. बिनपैशाची नोकरी मिळवायचे साधन म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पाहणारी तरुण पिढी शासकीय सेवेकडे आशाळभूत नजरेने आकर्षित होते, त्यामागे 'सेवाभाव' नसून 'मेवाभाव' आहे, हे अधिक क्लेशकारक समाजचित्र आहे. साधनहीन घरातील मुलं, मुली साधनसंपन्न होतात, पण सेवाभावी होत नाहीत. दलित, वंचित संचित होतात, पण दीन-दुबळ्यांप्रती नातेबांधील राहत नाहीत, याचं शल्य मोठं आहे.
शिक्षकांच्या आत्मस्वराचं मोठेपण कशात तर त्याच्या प्रलोभनमुक्त जगण्यात त्याचे प्रतिबिंब आहे. रस्त्यावर पडलेला रुपया उचलण्याच्या मोहातून शिक्षक मुक्त हवा. रुपया बघून मन चाळवणार, रिऍक्ट होणार. ते स्वाभाविकच, पण तुम्ही छोट्या प्रलोभनालाही बळी न पडणं, तुमचं हे आपवादपणच तुमचं बलस्थान बनेल तर तुम्ही आदर्श होणार, ते तुम्हीच व्हायला हवं. हा स्वर, ही ऊर्जा येथून घेऊन तुम्ही परताल, कृतिशील राहाल तर खरे शिक्षक व्हाल, तसे व्हावे असे मला वाटते. कार्य संस्कृती, कर्तव्यतत्परता, कर्तव्यपरायणता हे आजच्या आपल्या देशापुढचे खरे आव्हान आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी मुकादम लागणं, शाळेस मुख्याध्यापक असणं म्हणजे पराभवच ना? मुख्याध्यापक म्हणजे बरोबरीतला पहिला माणूस इतकेच त्याचे महत्त्व हवे. मग असे का? आपण बैल, घोडे कां आहोत? आपण ठरवून शिक्षक झालोत. आपणास कुणी शिक्षक केले नाही. जाणून, बुजून आपण शिक्षक झालो आहोत. येशू ख्रिस्त पापी माणसांना क्षमा करायचा. कारण त्यांचा असा समज होता की पाप अज्ञानातून घडले आहे, त्यामुळे क्षम्य आहे. आपला व्यवसाय अक्षम्य आहे. पापास त्यात वाव, स्थान नाही, याची आपण एकदा का खूणगाठ बांधून घेतली की मग आपले काम, भूमिका सोपी, स्वच्छ, पारदर्शी झाली समजायची.
भारतासारखा गरीब देश आपणा शिक्षकांना किती मोठा पगार देतो (विना अनुदान शिक्षक अपवाद). का तर आपण पिढी घडवतो. आपले काम शिकवायचे, ज्ञानसंपादन, शिकवायचे तसेच जीवन कसे जगावे हे शिकवणेही आपलेच काम आहे. पहिल्या इतकेच दुसरे कामही महत्त्वाचे. आपण अर्धेच काम करतो. म्हणजे फक्त अभ्यास शिकवतो. जीवन अभ्यास देत नाही. शिक्षकाची टोलवाटोलवी अक्षम्य अपराध आहे. आपला पगार जनतेच्या करातून येतो. गरीबपण कर भरतात. आयकराशिवाय अनेक कर असतात. गरीब जनता, शेतकऱ्यांना आपला अपराध कळेल तर ते क्षमा नाही करणार आपणाला. दगड, गोटे मारले तरी ते आपण सहन करायला हवेत. आपला सर्वात मोठा अपराध आपण विद्यार्थ्यांशी करत असलेली प्रतारणा होय. आपण इथे शिबिरात वेगळे शिक्षक व्हायचे या ऊर्जेनी आलोत. आपला आत्मस्वर संवेदी हवा. मी शिक्षक, प्राध्यापक होतो. पूर्णवेळ शिक्षक होतो. प्रारंभी पिंपळगावलापण आणि नंतर कॉलेजचा प्राध्यापक, प्राचार्य झालो, तेव्हापण. शाळा, कॉलेज वेळेव्यतिरिक्त अधिकच शिकवायचो. अभ्यासिका,शिबिरे, प्रदर्शने, सहली, सर्व मन:पूत करायचो. शिवाय उर्वरित वेळात सामाजिक कार्य करायचो. शिक्षक संघटना, वंचित विकास, व्याख्याने, लेखन, ग्रंथोत्सव, सांस्कृतिक मेळावे, स्नेहसंमेलने, शिबिरे, कार्यशाळा, परिसंवाद काय नाही केले ते विचारा. शिक्षकाचे काम सर्वज्ञ, सर्वंकष, सर्वग्राही असे समग्र असायला हवे ना? मी असा का झालो विचाराल तर त्याचे उत्तर आहे, 'मला चांगले शिक्षक मिळाले.' तुमचे विद्यार्थी चांगले व्हायचे तर आधी तुम्ही चांगले होणे ओघाने आलेच. त्यात सवलत नाही. अपवाद ही होता नये. सर्व शिक्षकांनी चांगलेच असायला हवे. बालवाडीच्या शिक्षिकेपासून ते विद्यापीठांच्या कुलगुरूंपर्यंत सर्वांनी चांगले शिक्षक व्हायलाच हवे.
शिक्षकाबद्दलची समाज संकल्पना बदलली आहे. 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम'चा काळ इतिहास जमा झाला आहे. बालकांचे हक्क, शिक्षण हक्क, मानव हक्क अशा काळात विद्यार्थ्यांच्या हृदयावर आपली प्रतिमा आचरणाने कोरणारा शिल्पकार ही शिक्षकाची नवी प्रतिमा, पुन्हा एकदा तिचे पुनरुज्जीवन घडवून आणण्याचा हा काळ आहे. मला फ्रान्समधील मतिमंदांच्या शाळेतील एक शिक्षिका या प्रसंगी आठवते. एका वर्गात एक शिक्षिका एका मुलीस मांडीवर घेऊन चित्र काढत असताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले होते. एका वर्गात एकच शिक्षक व एकच विद्यार्थी. मी विचारल्यावर कळले की, ती जी विद्यार्थिनी आहे ना, तिची आई नुकतीच वारली आहे. आई वारल्यापासून तिचे शिकणंच बंद झालंय. ती नुसती चित्रं काढते. तेही फक्त आईचंच चित्र! मी शिक्षिकेस विचारले, 'तुम्ही काय प्रयत्न करताहात मग?' त्या म्हणाल्या, 'तिनं माझं चित्र काढावे असा प्रयत्न करते आहे!' मी भारतीय शिक्षक असल्याने संशयाने (खरं तर स्वानुभवाने) म्हटले,'हे कसं शक्य आहे?' बाई अत्यंत शांत, दृढ पण नम्र, स्वरात म्हणाल्या, 'ती आता चोवीस तास माझ्याकडेच असते.' का नाही ती मुलगी 'आई' म्हणून 'बाईंचे' चित्र काढणार? कारण त्या शिक्षिकेस तिचा आत्मस्वर सापडला होता नि तिच्यात न आटणारे मातृत्व पाझरत होते. शिक्षिका ते मुख्याध्यापकांनी नेमून दिलेले काम नव्हती करत. ते तिने स्वीकारलेले सती-साध्वीचे वाण होते, व्रत होते. व्रतातून वृत्ती विकसित होत असते. शिक्षक व्यवसाय नसून वृत्ती, प्रवृत्ती, धर्म, कर्तव्य आहे. ती नोकरी, चाकरी नाही. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी स्वप्ने निर्मिणारा सौदागर नसून स्रष्टा आहे. तो स्वप्न विकत नाही, निर्माण करतो, जन्माला घालतो.
जगात दोन व्यवसाय समर्पणाचे मानले जातात. एक शिक्षकाचा. तो घडवायचे काम करतो. दुसरा पोलिसाचा. तो समाज बिघडू नये याची काळजी घेतो. ज्या देशात हे दोन्ही कार्य कर्तव्यभावनेने होते, तो देश मोठा होतो. समर्पणातून अचूकता, पूर्णता जन्माला येते. तासिका तत्त्वावरचा शिक्षक, अर्धवेळ शिक्षक या आर्थिक दारिद्र्यातून जन्माला आलेल्या गोष्टी होत्या. आज जर भारत महानतेचे, 'स्मार्ट नेशन'चे स्वप्न पाहात असेल तर शिक्षणावरील तरतूद चढत्या भाजणीचीच असायला हवी. दुर्दैवाने या देशात दोघांनाही 'चॅलेंज' केले जाते. ही या देशाची खरी शोकांतिका आहे, पराभव आहे. आज देशास रोज तयारी करून शिकवणाऱ्या व्यासंगी, प्रयोगशील शिक्षकांची गरज आहे. काही शिक्षक 'तयारीचे' असतात. तयार असल्याने त्यांना कधीच तयारी करायची प्यास असत नाही. ज्यांना वाचन, लेखन, उपक्रम, नवता, संशोधनाची प्यास नाही, अशा शिक्षकांनी व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे श्रेयस्कर! ते उभयपक्षी फायदेशीर. ना तुम्हाला अपराध बोधाचा पश्चात्ताप, ना विद्यार्थ्यांचे, समाजाचे नुकसान, प्रेमचंदाची 'बोध' नावाची एक कथा आहे. ती कथा पोलीस, तलाठी, डॉक्टरपेक्षा शिक्षकाचा व्यवसाय का व कसा श्रेष्ठ ते समजावते. ती कथा शिक्षक-विद्यार्थी संबंधांवरचे सुंदर, मार्मिक भाष्य आहे. त्या आधारे आपला आत्मस्वर हीच आपली कसोटी मानायला हवी. भारतात शिक्षक व्यवसायात आल्यानंतर अपवादानेच आपली गुणवत्ता, औपचारिक पात्रता वाढवतात. व्यवसायात प्रवेश झाला की त्यांना मोक्ष मिळतो. व्यापारी आपले भांडवल रोज वाढेल असे पाहतो. शिक्षकाने आपले ज्ञान रोज वाढेल याबद्दल दक्ष असायला हवे. आज देशापुढची संकटे चक्रव्यूह भेदण्याची आहेत. शिक्षित श्रीमंत होतात. कष्टकरी गरीब राहतो. प्रत्येक माणसाचं उत्पन्न वाढते आहे. पण माणसाची किंमत कमी होते आहे. माणसाची किंमत कमी होण्यासारखा दुसरा सांस्कृतिक ऱ्हास नाही. 'क्वालिफाईड' आणि 'क्वालिटेटीव्ह' शब्दातील अंतर शिक्षक समजून घेतील तर त्यांना आत्मस्वर गवसेल. ज्यांना आत्मस्वर गवसतो त्यांच्यात स्वऊर्जा आपोआप निर्माण होते. अशा शिबिराचे काम इंजेक्शन अथवा व्हिटॅमिनसारखे प्रासंगिक प्रेरणा देण्यासारखे आहे. शिक्षक देश, समाजाचा संवेदना सूचकांक व्हायला हवा, तसाच तो होकायंत्रही असायला हवा. दशा सुधारणे, दिशा दाखवणे हे द्रष्ट्या शिक्षकांचे कार्य असते. ते तुम्ही करावे, असे आव्हान करून मी माझे भाषण संपवतो. जयहिंद !
•••
१. मी शिकवण्यावर जिवापाड प्रेम करीन नि शिकवणे हाच माझ्या जीवनाचा ध्यास राहील.
२. विद्यार्थ्यांना संस्कारित करणे इतकेच माझे कार्य नसून त्यांच्या तरुण मनास दिशा देणे ही माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता असेल.
३. सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बुद्धिमान विद्यार्थी बनवणे हे माझे जीवन ध्येय राहील.
४. मी विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षकच नाही तर आई, बहीण, वडील, भाऊ या नात्याने वागेन.
५. मी जीवनात असा वागेन की, माझे जीवन हाच विद्यार्थ्यांना संदेश म्हणून प्रेरणा देत राहील.
६. विद्यार्थ्यात जिज्ञासा जागवून त्यांच्यात प्रश्न निर्माण करीन व प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देऊन प्रोत्साहन देत राहीन.
७. मी विद्यार्थ्याशी जात, धर्म, लिंग, वर्ण, वंश, स्थिती यांचा विचार न करता सर्वांशी समान सौजन्याने वागेन.
८. मी माझ्या अध्ययन-अध्यापन कौशल्य, व्यासंगाचा सतत विकास करून माझे अध्यापन गुणवत्तेचे करण्याचा निरंतर प्रयत्न करीन. ९. मी माझ्या विद्याथ्र्यांचे यश साजरे करीन व अपयशाचे सतत यशात रूपांतर करण्याची पराकाष्ठा करत राहीन.
१०. मी राष्ट्राच्या विकासात विद्यार्थ्यांसह पुढाकार व सहभाग सतत सक्रिय ठेवेन.
११. मी स्वत:त सदाचार, सभ्यता रूजवेन, विद्यार्थ्यांद्वारे समाजात व देशात त्यांचा प्रचार व प्रसार होत राहील याची दक्षता घेईन.
•••
कोण मला जिंकू शकतो ते मी पाहे !
जात नाही, धर्म नाही, न मी एक पक्षाचा
तेच संकोची जे आखडती प्रदेश समग्रतेचा !
अनंत माझी ज्ञानलिप्सा
अल्पाने न मला कधी समाधान
विश्व कवेत घेण्याचेच मला नित्य अवधान
शाळेस माझ्या कुलूप असणे कधी न मला साहे !
कोण मला जिंकू शकतो ते मी पाहे !
जिकडे तिकडे माझेच विद्यार्थी आहेत
सर्वत्र सावल्या माझ्या मला दिसताहेत
जग असे माझी मातृभूमी
अवकाश माझी स्वप्नभूमी असे
उद्याची उद्यमी पिढी माझी
मला नित्य खुणावते आहे
विद्यार्थी माझे, मी त्यांचा
एकच ध्येय आम्हातुनि वाहे !
नव्या ध्यासाचा, नव्या श्वासाचा, नवा शिक्षक मी आहे !
•••
* नवे शिक्षण
१. खेळकर खेळघर (जडणघडण/जानेवारी/२०१५)
२. प्राथमिक शिक्षण आणि क्षमता विकास (जडणघडण/फेब्रुवारी/२०१५)
३. प्राथमिक शिक्षण : प्रगत आणि प्रश्न (शिक्षण विचार/पं. पलूसकर बहुद्देशीय शिक्षण संस्था/पलूस/रौप्योत्सव ग्रंथ/२०१५)
४. माध्यमिक शिक्षण: आमूलाग्र बदलाची गरज (जडणघडण/एप्रिल/२०१५)
५. माध्यमिक शिक्षणाचे जागतिक चित्र (कोल्हापूर जिल्हा माध्य. उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक संघ नवी इमारत उद्घाटन स्मरणिका- २०१६)
६. उच्च माध्यमिक शिक्षण : सर्वाधिक उपेक्षित स्तर (जडणघडण/मे/२०१५)
७. आंतरराष्ट्रीय दर्जा व महाराष्ट्रातील विद्यापीठे (दिव्य मराठी/१६ सप्टेंबर/२०१४)
८. भारताच्या उच्च शिक्षणाचा भविष्यवेध (जडणघडण/जून/२०१५)
९. नव्या रिमचे नवे शिक्षण (जडणघडण/मार्च/२०१५)
१०. शिक्षणाचे चिंताजनक व्यावसायीकरण (ऋग्वेद दिवाळी - २०१३)
११. क्रांतीच्या उंबरठ्यावरील अध्यापक शिक्षण (जडणघडण/जुलै/२०१५)
१२. उच्च शिक्षणातील अध्यापक शिक्षणाची उपेक्षा (जडणघडण/ऑगस्ट/२०१५)
१३. नव्या युगाच्या शिक्षणाचे आव्हान (आंतरभारती वार्षिक/२०१३)
१४. वर्तमान शिक्षणापुढील नवी आव्हाने (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव रौप्योत्सवी स्मरणिका २०१४) १५. शिक्षण आणि शाश्वत विकास (ऋग्वेद/दिवाळी/२०१४)
१६. एकविसाव्या शतकातील शाळेचे स्वरूप (श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल रौप्योत्सव स्मरणिका/२०१४)
१७. उद्याचे तंत्रज्ञानाधारित शिक्षण - (जडणघडण/सप्टेंबर/२०१५)
१८. नवे शिक्षण : जग आणि भारत (विश्रांती/दिवाळी २०१४)
१९. जागतिकीकरणाचे शिक्षणावरील परिणाम (शिक्षणवेध/दिवाळी/२०१६)
• समारोप : चक्रव्यूह भेदण्याचा प्रश्न - (जडणघडण/ऑक्टोबर/२०१५)
* नवे शिक्षक
• नव्या शिक्षकाची संकल्पना (जडण-घडण/जानेवारी, २०१४)
१. शिक्षकाच्या नव्या पात्रता - (जडणघडण/फेब्रुवारी/२०१४)
२. शिक्षकाची नवी साधने - (जडणघडण/मार्च/२०१४)
३. शिक्षकाची नवी वाचनसाक्षरता - (जडणघडण/एप्रिल/२०१४)
४. शिक्षकाची नवी उपक्रमशीलता (जडणघडण/मे/२०१४)
५. शिक्षकाची नवी अध्यापनकुशलता (जडणघडण/जून/२०१४)
६. नवशिक्षकांची अंकीय साक्षरता (जडणघडण/जुलै/२०१४)
७. शिक्षक विकासाच्या नव्या पाऊलखुणा (जडणघडण/सप्टेंबर/२०१४)
८. नवशिक्षकाचे व्यक्तिमत्त्व - १६६ (जडणघडण/ऑक्टोबर/२०१४)
९. एकविसाव्या शतकातील शिक्षकाची घडण - (अप्राप्त)
१०. शिक्षक विकास : शोध आणि बोध - (महाराष्ट्र टाइम्स /५ सप्टेंबर २०१३)
११. शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा (प्राथमिक शिक्षक नव ऊर्जा शिबिर, पाटगाव/२०१५)
•••
१. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर/२०१२/पृ.१६६/रु.१००/दुसरी आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण (लेखसंग्रह)
सह्याद्री प्रकाशन, पुणे/२०१३/पृ.१११/रु.१००/प्रथम आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१३/पृ.१७५/रु.२००/दुसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१३/पृ.३१/रु.२५/दुसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
लोकवाङमयगृह, मुंबई/२०१३/पृ.१२५/रु.१३०/प्रथम आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
लोकवाङ्मयगृह, मुंबई/२०१३/पृ.१३६/रु.१५०/प्रथम आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
रावा प्रकाशन, कोल्हापूर/२०१३/पृ.१६०/रु.१८०/दुसरी आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
स्पर्श प्रकाशन, राजापूर/२०१३/पृ.१०३/रु.१२५/प्रथम आवृत्ती १२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (लेखसंग्रह)
शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर/२०१४/पृ.१७६/रु. १८०/प्रथम आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/प्रथम आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१४/पृ.१७६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (लेखसंग्रह)
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर/२०१४/पृ.११५/रु.१२०/प्रथम आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य :
साधना प्रकाशन, पुणे/२०१७/पृ. १८६/रु. २००/पहिली आवृत्ती
आगामी
• भारतीय भाषा (समीक्षा)
• भारतीय साहित्य (समीक्षा)
• भारतीय लिपी (समीक्षा)
• मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
• वाचावे असे काही (समीक्षा)
• समाजशील सुधारक (व्यक्तीलेखसंग्रह)
• प्रशस्ती (प्रस्तावनासंग्रह)
• साहित्य आणि संस्कृती (लेखसंग्रह)
• माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
• वेचलेली फुले (समीक्षा)
• सामाजिक विकासबोध (लेखनसंग्रह)
• चिंतन (स्फुट संग्रह)
• भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
•••