ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सुना होत्या. चातुर्मास्यांत श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हां ती जरा खिन्न झाली व मनांत माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणूं लागली.

इतक्यांत काय झालं? शेषभगवानास तिचीं करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरितां आला. ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आतांच कुठून आला? पुढें त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं, ब्राह्मणानं तिची रवानगी केलीं. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळांत नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळांत घेऊन गेला. आपल्या बायकांमुलांना ताकीद दिली कीं, हिला कोणीं चावूं नका.

एके दिवशीं नागाची नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिचीं पिलं वळवळ करूं लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खालीं पडला. पोरांची शेपूटं भाजलीं. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली, तो म्हणाला, “तिला लौकरच सासरीं पोंचवूं.” पुढं तीं पूर्ववत आनंदानं वागूं लागलीं. एके दिवशीं मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरीं पावती केली. नागाचीं पोरं मोठीं झालीं. आपल्या आईपाशीं चौकशी केली. आमचीं शेपूटं कशानं तुटलीं? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरीं आले.

नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहींत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढलीं. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांचीं पिलं पहात होतीं. सरतेशेवटीं तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत.” असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनीं पाहून मनांतील सर्व राग घालविला. मनांत तिजविषयीं दया आली. पुढं त्या दिवशीं तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यांत पहांटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसर्‍या दिवशीं तिनं हार उचलून गळ्यांत घातला.

तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हांआम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण!



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.