१ प्रथम नमन करुं गणनाथा । उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आंता दंडवत ॥१॥ दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा । वाक् सिध्दी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ॥२॥ आता वंदू देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत ॥३॥ आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ॥४॥ आतां नमूं रंगभूमिका । किर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें नमन दंडवत ॥५॥ ऎसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला । अज्ञानी म्हणोनि आपुल्या बाळा । चालवी सकळा नामा म्हेणे ॥६॥

२. प्रथम नमू गजवदनु । गौरीहराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनु नमियेला ॥१॥ त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ति । ऎके बाणें त्रिपूरा पाडिला क्षितीं । तैं पशुपति संतोषला ॥२॥ इंद्रादिकीं अष्टलोकपाळीं । लंबोदरु पुजिला कनककमळीं । त्यासी प्रसन्न झाला तयेवेळीं । म्हणवूनि सकळीं पूजियेला ॥३॥ सटवें रात्रीं मदनु शंभरें नेला । प्रद्युन्न समुद्रामाजीं टाकिला । तैं कृष्णें विघ्नहरु पूजिला । प्रद्युन्न आला रतीसहित ॥४॥ पूजिला साही चक्रवर्ति । त्यांचिया पुरतीआर्ती । युधिष्ठरें पूजिला चतुर्थी । राज्यप्राप्ति झाली तया ॥५॥ म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा । विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावें भजा एकदंता ॥६॥

३. गणेश नमूं तरी तुझाचि नाचणा । म्हणोनि नारायणा नमन तुज ॥१॥ सारजा नमूं तरी ते तुझी गायनी । म्हणोनि चक्रपाणी नमन तुज ॥२॥ ब्रह्मा नमुं तरी तो तुझिये कुशीं । म्हणोनी हृषीकेशी नमन तुज ॥३॥ शंकर नमूं तरी तो तुझी विभूति । म्हणोनि कमळापति नमन तुज ॥४॥ वेद नमूं तरी तुझाचि स्थापिता । म्हणोनि लक्ष्मीकांता नमन तुज ॥५॥ इंद्र नमुं तरी तुझिया त्या भुजा । म्हणोनि अधोक्षजा नमन तुज ॥६॥ गंगा नमूं तरी ती तुझे अंगुष्ठीं । म्हणोनि जगजेठी नमन तुज ॥७॥ लक्ष्मी नमुं तरी ते तुझे पायातळीं । म्हणोनि वनमाळी नमन तुज ॥८॥ नामा म्हणे भेटी जाहली पैं राया । कोण गणी बायां सेवकासी ॥९॥

४. गाणें जरी म्हणों तरी गणेश शारदा । आणीक नाही दुजा यावांचुनी ॥१॥ नाचेन म्हणूं जरी तांडव महेश्वरु । तोही नृत्य करुं जाणे एक ॥२॥ बोलूं म्हणों जरी बोलके वाचा चारी । ( म्ह.चारीवेद ) त्या एकाची उरी मग मी बोलों ॥३॥ जाणों म्हणे जरी अठराहि जाणे । त्या पैं काय उणें मग मी जाणों ॥४॥ कळावंत म्हणोंजरी चंद्रसूर्य दोन्ही । बारा सोळा गगनीं दाविताती ॥५॥ नामा म्हणे अवघें वेंचलें । केशवें आपुलें म्हणावें मातें ॥६॥

५. लंबोदर तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हाचा ॥१॥ चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥ भव्य रुप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥३॥ नाम घेतां तुझें दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥४॥ चौदा विद्या तुझ्या कृपेनें येतील । मुके बोलतील वेद्‌घोष ॥५॥ रुणझुण पायीं वाजताती वाळे । देखोनी भुललें मन माझें ॥६॥ भक्तवत्सला तूं पार्वतीनंदना । मस्तक चरणां ठेवितसें ॥७॥ नामा म्हणे आतां देई मज स्फूर्ती । वर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥८॥

६. सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुळती तुजलागी ॥१॥ लाडके लाडिवाळ मागतसें तुज । वंदीतसे रज चरणींचे ॥२॥ त्वरें येवोनियां शिरी ठेवीं हात । जाईल ही भ्रांत तेव्हां माझी ॥३॥ आपुल्या बाळासी धरा आतां हाती । न करी फजिती जनांमध्ये ॥४॥ विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी कीर्ति । आवडीचा ओती रस मायें ॥५॥ ऐकोनियां स्तव झालीसे प्रसन्न । नाम्या तव अभिमान मजलागीं ॥६॥

७. प्रल्हाद नारद पराशर पुंडलीक । व्यास आणि वाल्मिक नमीयले ॥१॥ बगदालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शुक नमीयले॥२॥ रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन तयालागीं ॥३॥ टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा निरंतर कृपा मज ॥४॥ साधुसंतसिद्ध शिरीं ठेवा हात । वर्णीन समस्त कृष्णलीला ॥५॥ नामा मनीं आठवीं खेचरचरण । तयाच्या कृपेनें सिद्धि जावो ॥६॥

८. देव आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधे ॥१॥ ब्रह्म आणि इंद्रा वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥ चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु ॥३॥ योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्‌गुरु ॥४॥ निर्गुण निराकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडिया ॥५॥ करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोबा । ऐकें कृष्णराया गोजरीया ॥६॥ नामा म्हणे जरी दाखविसी पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥७॥

९. क्षीरसागरांत अससीं बैसला । धांवोनी मजला भेटी देई ॥१॥ कैलासीचा शिव पूजितो तुजला । धांवोनी मजला भेटी देई ॥२॥ शेषावरी जरी अससी निजला । धांवोनि मजला भेटी देई ॥३॥ गहिवंरोनि नामा बाहात तुजला । धांवोनि मजला भेटी देई ।४॥

१०. चक्रवाक पक्षी वियोगें बहाती । झालें मजप्रती तैसें आतां ॥१॥ चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥२॥ वत्स न देखता गाई हंबरती । झालें मजप्रती तैंसे आतां॥३॥ जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥४॥ नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं । करीतसे खंती फार तुझी ॥५॥

११. काय माझा आतां पाहातोसी अंत । येई बा धांवत देवराया ॥१॥ माझ्या जीवा होय तुजविण आकांत । येई बा धांवत देवराया ॥२॥ असे जरी काम भेटूनियां मातें । येई बा धांवत देवराया ॥३॥ ये रे ये रे देवा नामा तुज बहात । येई बा धांवत देवराया ॥४॥

१२. न वर्णवे वाचें जन्ममरण दु:ख । दावी आतां मुख पांडुरंगा ॥१॥ कुरळा केश भाळीं शोभे तो टिळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥२॥ भोंवया व्यंकटा शोभती सुरेख। दावीं आतां मुख पांडुरंगा ॥३॥ कमलाकर नेत्र सुंदर नासीक । दावीं आतां मुखं पाडुरंगा ॥४॥ कर्णीचीं कुंडलें न वर्णवे हाटक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥५॥ अधर आरक्त दंत इंदुहूनि अधिक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥६॥ विष्णुदास नामा तुझेंचि बाळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥७॥

१३. बाहुबळें तुवां काढिलें अमृत । ठेंवा बा तो हात शिरावरी ॥१॥ जननी माझी जेव्हां ज्याकडे पाहत । ठेवीं बा हात शिरावरी ॥२॥ देवा बैसवोनि सुधेतें वांटीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥३॥ क्षीराचा सागर उपमन्यूसी देत । ठेवीं बा हात शिरावरी ॥४॥ घेऊनियां चक्र परीक्षिता रक्षीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥५॥ कौटाळिलें जेव्हां ध्रुवासी वनांत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ६॥ विदुराच्या घरीं कण्या जो भक्षीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥७॥ चिरंजीव करुनियां नगरी लंका देत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥८॥ नामा म्हणे युद्धीं रक्षियेला पार्थ ठेवीं बा तो हात शिरावरी ॥९॥

१४. रुणझुन्ण पायीं वाजताती वाळे । दावी तीं पाउलें दयानिधी ॥१॥ जनक श्रुतदेव यांच्या घरीं गेलीं । दावीं पाउले दयानिधी ॥२॥ धरियेलें नक्रा तेव्हां जीं धांवली तीं पाउलें दयानिधी ॥३॥ वस्त्रहरणीं जीं द्रौपदीनें चिंतलीं । दावी तीं पाउले दयानिधी ॥४॥ देखोनियाण ज्यातेंसौरव ते भ्याले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥५॥ धर्म आणि भीष्म विदुरादिक्स धाले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥६॥ स्वयंवरासी जातां शेळे उद्धरिले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥७॥ नामा म्हणे ज्यातें बळीनें पूजिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥८॥

१५. आडखळूनि पडसी घालूं नको जोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥१॥ बैसावयासाठीं घेऊं नको घोडा । धांवत दुडदुडां येईं आतां । भोजना बैससी येथे घेईं विडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥३॥ बाहुबळें काढिला देवांचा जो खोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥४॥ नामा म्हणे सुखी लक्ष्मीचा चुडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥५॥

१६. ये रे ये रे देवा तुला देईन मी पेढा । त्याला बाहे वेडा नामदेवा ॥१॥ ज्याचे पायीं असे विरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेवा ॥२॥ जनी पुसे सुखी रखुमाईचा जोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥३॥ यावयासी येथे आळस तुम्ही सोडा । घेईन इडापिडा नामा म्हणे ॥४॥

१७. युगा ऐसें पळ तुजविण जाय । पाहतोसी काय अंत माझा ॥१॥ कोमळ हृदय तुझें पंढरीराया । कठिन सखया कैसें केलें ॥२॥ विचारिसी चित्तीं दुर्लभ हरीहरा । जाऊं कैसा धरा रंकाचीया ॥३॥ अंगिकारावरी अव्हेराची मात । नव्हे हें उचित देवराया ॥४॥ मागें जें कां आळी केली वासुदेवा । उदारा केशवा पुरविली ॥५॥ नुपेक्षिसी ऐसा चित्तासी भरंवसा । आशेची निरास झाली दिसे ॥६॥ वांचोनियां दु:ख भोगावें रे आतां । प्राणांसी मुक्तता हेंचि भलें ॥७॥ वर्णितां तो नामा झाला समाधिस्थ । जहालें विदित पांडुरंगा ॥८॥

१८. त्वरें धांवोनियां आलासे गोविंद । सावध सावध नामदेवा ॥१॥ रुसलासे नामा देवासी न बोले । करें कुर्वाळिलें वदन तेव्हां ॥२॥ समजावूनि देव धरिला पोटासीं । बोले मजपाशीं नामदेवा ।३॥ नामा म्हणे देवा उशीर कां केला । किंवा माझा आला तुज राग ॥४॥

१९. वेळोवेळां तुज बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥ मागें बहुतांनी केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडावलों ॥२॥ माथां ठेवूनि हात बोले विश्वाचा जो बाप । वर्णी रे प्रताप नामदेवा ॥३॥

२०. करील जो प्रश्न सांगेल जो कधा । श्रवण करितां उद्धरती ॥१॥ कथा भागीरथी स्नान जे करिती । त्यांचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥ भागीरथी त्यांना श्रम लागे फार । करावें एकाग्र मन येथें ॥३॥ नामा म्हणे ऐसें बोले भागवत । श्रीशुक सांगतसे परीक्षिती ॥४॥

२१. पापी जे अभक्त दैत्य जे मातले । धरणीसी झालें ओझें त्यांचं ॥१॥ दिधलासे त्रास देव मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी तेव्हां ॥२॥ राहियेले यज्ञ मोडिलीं कीर्तनें । पळाले ब्राह्मण दैत्यां तेव्हां ॥३॥ वत्सरुपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोच सांगतसे ॥४॥ बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोसवेना भार मज आतां ॥५॥ ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव । चालियेले सर्व क्षीराब्धीशीं ॥६॥ नामा म्हणे आतां करितील स्तुती । सावधान चित्ती परिसाचें ॥७।

२२. वासुदेवा हृषीकेशा माधवा मधुसुदना । करिताती स्तवना पुरुषसुक्तें ॥१॥ पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हा कोणी नाही तुजवीण ॥२॥ जनार्दन हरी श्रीवत्सला गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आता आम्हां ॥३॥ वराहा पुंढरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ॥४॥ अच्युता शाश्वता अनंता अजा अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ॥५॥ नारायणा देवाध्यक्षा कैटभभंजना । करी रे मर्दना दुष्टांचिया ॥६॥ चक्रगदाशंकपाणी नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥ रामा हयग्रीवा भीमा रौद्रोद्धवा । आश्रय भुतां सर्वां तुझा असे ॥८॥ श्रीधरा श्रीपते चतुर्बाहो मेघ:श्यामा । लेंकुरें आम्ही पाव त्वरें ॥९॥ नामा म्हणे ऐसिं करितां स्तवन । तोषला भववान क्षीराब्धींत ॥१०॥

२३. आकाशींची वाणी सांगे सकळांशी । तळमळ मानसी करूं नका ॥१॥ देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥ उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वासी करील तो ॥३॥ रोहिणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥ ऐकोनियां ऐसे आनंद मानसी । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥

२४. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥ पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार । गाऱ्हाणें सुरवर सांगू आले ॥२॥ शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागीं अवतार मी न घेंचि ॥३॥ राम अवतारीं झालों मी लक्ष्मण । सेविलें अरण्य तुम्हांसवे ४॥ चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥ नामा म्हणे ऐसें वदे धरणीधर । हांसोनि श्रीधर काय बोले ॥६।

२५. पुर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मजसवें ॥१॥ आतां तूं वडील होईं गा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥२॥ देवकीउदरीं रहावें जावोनी । मायेसी मागूनि पाठवितां ॥३॥ योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ॥४॥ लक्ष्मीसी सांगे तेव्हां हृषीकेशी । कौंडण्यपुरासी जावें तुम्ही ॥५॥ नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥

२६. वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्यें विघ्न झालें ऐका ॥१॥ आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी भरंवसा हा बोलण्याचा ॥२॥ आठवा जो पुत्र वधील तुजसी । ऐकोनी मानसीं क्रोधवला ॥३॥ घऊनिया खड्‌ग माराया धांवला । हात तो धरिला वसुदेवें ॥४॥ देईन मी पुत्र सत्य माझें मानीं । ठेवा बंदीखानी दुता सांगे ॥५॥ पुण्य सरावया भेटे देवऋषी । वधी बाळकांसी ठेवुं नको ॥६॥ होतांचि प्रसुत नेऊनियां देत । सहाही मारीत दुराचारी ॥७॥ धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक । वधितां बाळक नामा म्हणे ॥८॥

२७. सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्र्चर्य क्रीत मनामाजीं ॥१॥ रोहिणी-उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥ कंसचिया भेणें यादव पळाळे । ब्राह्मण राहिले अरण्यात ॥३॥ नाही कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्ठांसी कोण आता ॥४॥ विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभुतीची ॥॥ अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापील धर्मासी नामा म्हणे ॥६॥

२८. देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे हृदय जळतसे ॥१॥ हरणें पळती देखोनियां व्याघ्र । कांपे तयापरी ॥२॥ अजासर्पन्यायें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥ जेवितां बोलतां सेजेसीं पैं निजे । आला आला मर मारावया ॥४॥ नाशील हा आतां दैत्याचें तें बंड । फाटलीसे तेव्हां त्याची ॥५॥ नामा म्हणे भयें लागलेसें ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसे ॥६॥

२९. विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भस्तुति ॥१॥ सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥ साहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३॥ अठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीता श्रीपति नमो तुज ॥४॥ चौघां जणां तुझा न कळेची पार । अमसी वारंवार आम्हांसाठीं ॥५॥ अठ्ठयांयशी सहस्त्र वर्णितांती तुज । ब्रह्मांडाचे बीज तुज नमो ॥६। जन्ममरणंचे नाही तयां भय । आठविती पाय तुझे जे कां ॥७॥ नवजणी तुझ्या पायीं लोळताती । परब्रह्म मूर्ति तुज नमो ॥८॥ नामा म्हणे ऐशी करिताती स्तुति । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळांशी॥९॥

३०. मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थड्या ॥१॥ भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सकळांच्या ॥२॥ विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरें ॥३॥ मंदमंद मेघ गर्जना करिती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥ नामा म्हण स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ॥५॥

३१. दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥ वसुनाम तिथि बुधवार असे । शुक सांगतसे परीक्षिती ॥२॥ रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र । माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥३॥ नवग्रह अनकूळ सर्वांचे जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥ जयाचा तो वंश तयासी आनंद । माझ्या कुळीं गोविंद अवतरला ॥५॥ अयोनीसंभव नोहे कांही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगटला ॥६॥

३२. कोटीशा आदित्य गोठे एके ठायी । तेजें दिशा दाही उजळल्या ॥१॥ घाबरा होवोनी वसुदेव पाहे । हृदयीं आश्र्चर्य करीतसे ॥२॥ मुकुटावरी रत्नें नक्षत्रांचा मेळा । भाळीं शोभे टिळा केशराचा ॥३॥ व्यंकटा भृकुटी कमळाकार नेत्र । नासीक विचित्र शुकचंचु ॥४॥ विद्युल्लते ऐसीं झळकती कुंडले । अधर कोंवळे अरुणादेव ॥५४। कंबुग्रीव कंठ हृदयी वत्सलांछन । ब्रह्मयासी शीण न कळे अंत ॥६॥ चतुर्भुज शंखचक्रगदापद्म । चिमणा मेघ:
श्याम वर्ण ज्याचा ॥७॥ कौस्तुभ निर्मळ वैजयंती माळा । कासे सोनसळा हाटकवर्ण ॥८॥ रुणझुण रुणझुण वाजताती जैशी रातोपलें । नामा म्हणे वाळे । आरक्त वर्तुळ नखीं शोभा ॥९॥ नामा म्हणे डोळे दिपताती ॥१०॥

३३. अयुत गायी ब्राह्माणांसी । सोडी संकल्प मानसीं ॥१॥ ओळखिलें तुज । आतां कळलासी मज ॥२॥ धर्म स्थापवया । येथें येसी देवराया ॥३॥ आलिंगतां दोही बाही । नामा म्हणे दोई पायीं ॥४॥

३४. सोडा सोडा मीठि । लपवा लपवा जगजेठी ॥१॥ झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥ वसुदेवा चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥ नामा म्हणे आलें हांसे । देव तेव्हां सांगतसे ॥४॥

३५. नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥ माया उपजली तेथें । ठेवी मज आणि येथें ॥२॥ म्हणसीं असे रक्षपाळ । तें म्या मोहिले सकळ ॥३॥ आच्छादित रूप । नामा म्हणे माझा बाप ॥४॥

३६. उचलिला कमळापती । पायीचीं बंधने गळतीं ॥१॥ त्रैलोक्यांत जो न माय । त्यासी बंधन त्यासी काय ॥२॥ कवाडें उघडतीं । देखतांची देवाप्रती ॥३॥ मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥४॥ पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ठ ॥५॥ त्वरें आला नंदाघरी । निद्रिस्त त्या नरनारी ॥६॥ ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥ रडे माया करी आकान्त नामा म्हणे उठती दूत ॥८॥

३७. पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणचिया ॥१॥ इच्छामात्रें करी सुष्टीचा प्रलय । त्यासी भय असे कवणाचें ॥२॥ नंदाचे सुकृत झालें अगणित । म्हणोनि भगवंत आला तेथें ॥३॥ सर्वों होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥

३८. तांतडीने जाती कंसा सेवक सांगती ॥१॥ उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥ २॥ त्वरें धांव घाली । पाहे कन्या उपरली ॥३॥ ज्याचा धाक तुज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥ मारायासी खड्‌ग घाली । हाताची निष्टूनिया गेली ॥५॥ तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥६॥ सांगो ब्रह्मज्ञान । देवकीचें समाधान ॥७॥ नामा म्हणे तयेवेळीं । त्यांची कंसेविचारबंधनें काढिलीं ॥८॥

३९. बोलावूनी अवघीयांतें । कंस पाहे विचारातें ॥१॥ कोणी एक ते बोलती । आम्हां ठायी देववस्ती ॥२॥ जेथें पुराण कीर्तन । गाईब्राह्मण करिते यज्ञ ॥३॥ तेथें असे नारायण । बघूं तयासी जाऊन ॥४॥ वैरी सहजची मरेल । ऐसे बोलातती बोल ॥५॥ कंसा मानवलें जाण । करा मजसाठीं यत्न ॥६॥ नामयाच्या छंदे । नंद करितो आनंद ॥७॥

४०. शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवन करितां तृप्ती नाहीं तुज ॥१॥ माया जातां मथुरे सावध निद्रिस्त । देखिला भगवतं यशोदेनें ॥२॥ अनंत ब्रह्माडें उदरीं न कळे कोणाला । वाजविती थाळा जन्मकाळीं ॥३॥ यज्ञभोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥४॥ गौळणी बहाती नंदलागीं तेंव्हा । पुत्रमुख पाहा नामा म्हणे ॥५॥

४१. विश्वाचा जो बाप हातीं त्याच्या सुत्र । महणवितो पुत्र नंदजीचा ॥१॥ तीथें ज्याच्या चरणीं करीताती न्हाणीं । यशोदा जननी म्हणताती ॥२॥ वेडावला शेष शिणले वेद चारी । निजे मांडीवरी यशोदेच्या ॥३॥ शरणागत देत क्षीरसिंधु दान । चोखितसे स्तन आवडीनें ॥४॥ त्रैलोक्याचा राजा वर्णूं काय रंक । ऐकावें जातक नामा म्हणे ॥५॥

४२. करुनिया स्नान वस्त्रें घेतलीं नूतन ॥१॥ पाचारी ब्राह्मण । श्रृंगारावें देवसदन ॥२॥ बाहा बाहा दशग्रंथी । त्यासी सांगा आणा पोथी ॥३॥ त्वरें बाहा रे ज्योतिषि । नंद करी जातकासी ॥४॥ केलें देवतार्चन । द्विज सांगती तर्पण ॥५॥ फार त्याला सुख । पाहे कृष्णजीचें मुख ॥६॥ करी पुण्याहवाचन नामा म्हणे आनंदाने ॥७॥

४३. आला जगदोद्धार । त्याचें भरलें भांडार ॥ १॥ सुशोभित दिसे मही । दोन लक्ष दिधल्या गायी ॥२॥ तिळ तांदूळ पर्वत । द्रव्यें वांटी अगणित ॥३॥ एक जाती एक येती । ओझें उचलितां कुंथती । भाट वर्णिताती । नामा म्हणे ज्याची कीर्ति ॥५॥

४४.. तुतारे भोंवारे वाजंत्री वारवती । अप्सरा नाचती थैयथैया ॥१॥ झणझणा झणझणा झांजा गर्जताती । नौबदा वाजती धोधोधोधो ॥२॥ सुरवर येती विमानांची दाटी । करिती पुष्पवृष्टी देवावरी ॥३॥ नारद तुंबर गंधर्व किन्नर । गाती सप्तस्वर सर्व तेव्हां ॥४॥ कीर्तनाचा घोष टाळांचा गजर । मृदंग सुखर वाजताती ॥५॥ केशरी गंध टिळा लावीतसे भाळा । घाली पुष्पमाळा द्विजाकंठीं ॥६॥ घरोघरी नंद धावी शर्करेसी । वस्त्रे सुहृदांसी नामा म्हणे ॥७॥

४५.. ब्राह्मण आशीर्वाद देती । नंदा पुसोनि निघती ॥१॥ चला चला म्हणती लोक । पाहूं नंदाचे बाळक ॥२॥ नरनारी अलंकार । श्रृंगारिले हो नगर ॥३॥ दैन्य दारिद्र्य अपेश । पळती मानूनियां त्रास ॥४॥ आणिताती बाळलेणें । स्त्रियी पाहती श्रीकृष्ण ॥५॥ नामा म्हणे पाहता मुख । हारपली तहानभूक ॥६॥

४६.. पाटावरी बैसाविती । गोपी अक्षवणें करिती ॥१॥ ब्रह्मादिक न देखती माथां । त्यासी लाविती अक्षता ॥२॥ नव्हे प्राकृत बालक । परस्परें म्हणती लोक ॥३॥ ध्वजवज्रांकुश चिन्हा । आला वैकुंठीचा राणा ॥४॥ लोक येती वेळोवेळां । नामा म्हणे पाहती डोळां ॥५॥

४७.. द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी ॥१॥ तेथें भेटें वसुदेव सांगितले गुह्य सर्व ॥२॥ कंसाचे मानसीं । घात इच्छी गोकुळासी ॥३॥ जाई जाई रे त्वरित । होती गोकुळीं आघात ॥४॥ नामा म्हणे ऐसें सांगे । नंद तेथूनिया निघे ॥५॥

४८.. कंसे पाठविली मायावी पूतना । देवोनियां स्तना बाळें मारी ॥१॥ दीन दुर्बळांची मारीत बाळकें । करिताती शोक मायाबाप ॥२॥ गहिंवरोनि तेव्हां पुसे परीक्षिती । भगवंताची मूर्ती बाळरूप ॥३॥ अभय देतसे बापा नको रडूं । तें काय घुंगुर्डू मारुं शके ॥४॥ जेथें पुराणेंही वर्णिताती कृष्ण । पळती तेथुन असुरादि ॥५॥ नामा म्हणे आली नंदाचिया घरी । स्वरूपें सुंदरी देवांगना ॥६॥

४९. कृष्णा लावितसे स्तनीं । तिसी मारी चक्रपाणी ॥१॥ भयानक प्रेत । जन विस्मय करीत ॥२॥ रडे तेव्हां माया । वांचलासी बा तान्हया ॥३॥ मिळोनियां समस्त । भाळीं अंगारा लावीत ॥४॥ वसुदेवें सांगितलें । नंद म्हणे तैसें झाले ॥५॥ कुऱ्हाडी आणिती । शस्त्रें करुनि तोडिती ॥६॥ नामा म्हणे दिला अग्नी । वास न माय गगनीं ॥७॥

५०. पुण्यवंता दावी बाळलीला देवें । पालथा केशव पडे तेव्हां ॥१॥ नंदे उत्सवासी करी तेव्हां फार । दिधलें अपार द्रव्य द्विजां ॥२॥ यशोदा घेतसे देवाचें चुंबन । तुजला न्हाणीन तान्ह्या माझ्या ॥३॥ चोंगईचा मुका घेताती गौळणी । हांसे चक्रपाणी आनंदाने ॥४॥ नामयाचा स्वामी मंद मंद हांसे । यशोदा करितसे लिंबेलोण ॥५॥

५१. करावया वनभोजन । जाती गोकुळींचे जन ॥१॥ भोजन करिती । कोणी देवा खेळविती ॥२॥ डोळे झांकीत श्रीपती । दावी निद्रेची आकृती ॥३॥ बहुत खेळालासे खेळा । आतां निजवा गे बाळा ॥४॥ वस्त्रें घालुनी शकटातळी । निजविती वनमाळी ॥५॥ क्षणएक निजला देव । रडे उठे वासुदेव ॥६॥ मुलालागीं म्हणे तेव्हां । माझा कान्होबा खेळवा ॥७॥ रागेंरागें झाडी लाथ । गाडा मोडोनी पडत ॥८॥ नामा म्हणे वाटी धन । नंद वांचला नंदन ॥९॥

५२. मांडीवरी घेत येशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥ तुंची माझा प्राण तुं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥ गणगोत भाऊ तुंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥३॥ तूंचि माझा धनी तूंचि माझें जीवन । चुंबीत वदन वेळोवेळां ॥४॥ नामा म्हणे भार घाली मांडीवरी । ठेवी भूमीवरी कृष्णजीला ॥५॥

५३. कंसे पाठविला तेव्हां तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापियेलें ॥१॥ दुष्ठबुध्दी तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठी देवें ॥२॥ यशोदा पहात न दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवुन शोक करी ॥३॥ गौळणीचा मेळा मिळाला समस्ता । कोणी कृष्णनाथा नेला सये ॥४॥ न लगे घरदार बुडाला संसार । दावा ग श्रीधर तान्हें माझें ॥५॥ ठावें असतें ऐसें बांधिते पोटासी । कोठें गुतंलासी बाळा माझ्या ॥६॥ धांवा गे धांवा पाहा गे लेंकरुं । शोक अनिवारु करीतसे ॥७॥ शिणल्या भागल्या येतों तुझ्या घरा । मुख हें उदारा दावीं कृष्णा ॥८॥ सोडूं पाहे प्राणा यशोदा सुंदरी । हंबरडा फोडी कृष्णालागीं ॥९॥ चेपोनि नरडी गतप्राण केला । भूमीसी पाडिला दैत्य तेव्हां ॥१०॥ नामा म्हणे वरी खेळत गोविंद । पाहोनि आनंद सकळांसी ॥११॥

५४. आला गोकुळासी । हर्ष न मावे मानसीं ॥१॥ नंदे गर्गातें देखिलें । भुजा स्तवनीं तोषविलें ॥१॥ भूतभविष्य वर्तमान । तुम्हां कळे हो संपूर्ण ॥ पहा सामुद्रिक लक्षण । याचें काय सांगा चिन्ह ॥४॥ बोले तेव्हां गर्ग ऋषी । झणीं कळेल कंसासी ॥५॥ रोहिणीनंदादि बैसती । गर्ग घेउनी एकांती ॥६॥ घालूनियां मंगलस्नान । आरंभी पुण्यहवाचन ॥७। ऐसी वदे शुकवाणी । नामा म्हणे ऐका कानीं ॥८॥

५५. जन्मजन्मांतरी झाला तुज श्रम । म्हणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥ राखतील गाई मारितील दुष्ट । न करी बोभाट जनांमध्ये ॥२॥ द्वादश गांव अग्नि करिल प्राशन । वांचवील प्राण सकळांचे ॥३॥ चोरोनिया गाई नेईल सौंगाडे । लावील हा वेड ब्रह्मयासी ॥४॥ उचलील पर्वत हरील हा गर्व । तारील हा सर्व नाममात्रें ॥५॥ समुद्रीं हा नगरी रचील क्षणांत । चरित्र अद्‌भुत करील हा ॥६॥ सोळा सहस्त्र शत‌अष्ट त्या नायका । करील बाईका तुझा कृष्ण ॥७॥ त्रैलोक्यांत हाचि उदाराचा राणा । देईल ब्राह्मणा हेमपुरी ॥८॥ सांगतसे त्या आशीर्वाद देउनी । नामा म्हणे मुनि जाता झाला ॥९॥

५६. श्रीकृष्ण जन्मला वार्ता हे ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥१॥ उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥ गौरवोनि त्यासी सांगे वर्तमान । शत्रूसी जाऊनि कोण मारी ॥३॥ महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत । शत्रूसी त्वरित मारीन मी ॥४॥ नामा म्हणे ऐसा बोलूनि निघाला । वेष धरियेला कपटाचा ॥५॥

५७. विप्रवेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेंगें ॥१॥ पुत्रोत्सव कोठें लोकांस पुसत । भाविक सांगत नंदाघरीं ॥२॥ ऐकोनियां ऐसें आला अकस्मात । यशोदा देखत सन्मुख त्या ॥३॥ श्रीकृष्णासी तेव्हां वोसंगीं घेतले । दंडवत केलें ब्राह्मणासी ॥४॥ सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे । बाळाचें या कैसें चिन्ह सांगा ॥५॥ पंचांग त्या वेळी काढिलें कपटानें । मान तुकवोनि पहातसे ॥६॥ नामा म्हणे मैदें पंचांग पाहून । यशोदे लागून बोलतसे ॥७॥

५८. तुझिया पुत्रासी लागलेंसें मूळ । करील निर्मूळ सर्वत्रांचें ॥१॥ बालकांचे अंगी अवचिन्हें बहुत । नेऊनि गर्तेत टाका यासी ॥२॥ लोभ धरूनिया ठेवाल बाळकासी । ग्रासील सर्वांसी एकदांची ॥३॥ ऐकोनी यशोदा गहिंवरोनी बोले । गर्गानें कथियेले उत्तम गुण ॥४॥ अमंगळ वणी पुनरपि बोलिला । गर्ग तो चुकला गणितासी ॥५॥ स्तनपान करीत असतां श्रीकृष्ण । मांडिलें विदान नामा म्हणे ॥६॥

५९. ठाईंहूनि जातीं उखळें उडताती । मस्तकीं आदळती येऊनियां ॥१॥ पाट वरवंटे वस्तुमात्रालागीं । जीव त्या प्रसंगी येता झाला ॥२॥ घाबरे दुर्जन पळाया पहात । आडव्या ठाकत बाजा पुढें ॥३॥ जानवें तुटलें पंचांग फाटलें । धोतरहि गळाले डुंगणाचे ॥४॥ पृष्ठीवरी होती बदबदा मार । तेथून सत्वर पळता झाला ॥५॥ आयुष्याची बाकी कांही उरली होती । म्हणोनि श्रीपति सोडे त्यातें ॥६॥ नामा म्हणे जीव घेऊनि पळाला । मथुरेसी आला कंसापाशीं ॥७॥

६०. परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥१॥ दुडदुडा पळती मुखीं घाली माती । शेणांत लोळती दोघेजण ॥२॥ नंदाच्या पुढील ओढताती ताट । मिटक्या मटमट वाजविती ॥३॥ कटीं कडदोरा वांकी घुंघुरुवाळा । पिंपळपान भाळां शोभतसे ॥४॥ देवातें झोंकिती वर्जिल्या रडती । धडोधडीं येती बिदीमाजीं ॥५॥ वत्साचिये पुच्छें बळे ओढताती । खोडी न सोडती दोघेजण ॥६॥ विमानांची दाटी येताती सुरवर । नाम्याचा दातार पहावया ॥७॥

६१. मृगाचे ते श्रृंगे धरोनि नाचती । जन हांसतती खदखदां ॥१॥ भोजना बैसती घांस घेती हाती । मांजरे देखती दुरोनियां ॥२॥ गळां त्यांच्या तेव्हीं धरी मेघ:श्याम । पुच्छ बळिराम ओढीतसे ॥३॥ यशोदा धांवत खदखदां हांसत । गवळणी समस्त पहाताती ॥४॥ पुसतांची मामा चुंगई दाविती । मर्कटाचे धरिती दोन्ही कान ॥५॥ रोहिणीसी म्हणे डसतील बाळ । किती म्यां सांडती भूमीवरी ॥७॥ नामा म्हणे स्वामी सर्वांचा जो साक्षी। धरीतसे पक्षी चंचुवातें ॥८॥

६२. मुतूनिया हातें भूमी सारविती । पोटासी पुशिती दोघेजण ॥१॥ घेऊनिया काष्ट घाशिताती दांत । वांकुल्या दावित नंदालागी ॥२॥ जेवितां जेवितां बाहेर पळती । श्वानासी बाहती यूयू करुनी ॥३॥ तयापुढें दोघे ठेवोनियां वाटी । घालिताती मिठी गळां त्याच्या ॥४॥ देखोनियां जन खदखदां हांसती । यशोदे सांगती कौतुकानें ॥५॥ भिंती धरुनिया उभे राहताती । आधार जगती ज्यांचा असे ॥६॥ उभयतां जाती बिदीं खेळावया । कुरवंडीन काया नामा म्हणे ॥७॥

६३. मिळूनं सौंगडे सांगती तयांसी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥१॥ गेले असे एक गौळण जळाला । सांगे गोपाळाला तेथें जाऊं ॥२॥ न पुरेची हात दूध शिंक्यावरी । करावें मुरारी कैसें येथें ॥३॥ पाटावरी पाट रची वनमाळी । पाडीतसे डुळी मोहरीनें ॥४॥ बडवोनी टिरी नाचतसे पेंदा । भलीले गोविंदा युक्ती केली ॥५॥ उदलाले बेते कलूं नका गलबला । थांबालीले गोला लोनियाचा ॥६॥ कोणी पिती दुध कोणी खाती दहीं । आली लवलाही गवळण ते ॥७॥ अहर्निशीं धरुं मी जपतसे तुज । जासी कैसा आज चोरटीया ॥८॥ मुखींहूनि पय टाकी तिच्या डोळां । नामा म्हणे पळा सांगतसे ॥९॥

६४. गाऱ्हाणें सांगाया । आल्या गोकुळीच्या स्त्रिया ॥१॥ यशोदा ऐकत । पळे बाहेरी भगवंत ॥२॥ एक म्हणे लोणी । माझें भक्षी चक्रपाणी ॥३॥ फोडितसे भांडे । विर्जिंलिया म्हणे रांडे ॥४॥ गाई वासरे सोडिती । येऊनी आम्हांसी सांगतों ॥५॥ अष्टदळ काढिलें अंगणीं । वरी मुते चक्रपाणी ॥६॥ घेऊनियां आला अग्न । तुझ्या घरासी लावीन ॥७॥ देईन मी तोंडावर । तुझ्या बापाचे हें घर ॥८॥ घेतसे वरखडे । शिव्या देऊनियां रडे ॥९॥ देखोनियां गरोदर । म्हणे केवढें उदर ॥१०॥ सांगतो गाऱ्हाणी नामा म्हणे ऐका कानी ॥११॥

६५. एक म्हणे धरी स्तन । याचे उपटीन कान ॥१॥ यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांही सांग ॥२॥ अंधारी लपत । पोरें करिती आकान्त ॥३॥ सांगतसो शिकवणा । खोडी नको करूं कान्हा ॥४॥ तोंड करूनि वांकडे । मला म्हणे तशीच रडे ॥५॥ देव पोरां शिकवीत । गोरस आणा रे समस्त ॥६॥ आम्ही निजलों समस्त । काजळ मुखासी लावीत ॥७॥ मेले आणूनियां सर्प । माझ्या पोरा दावी दर्प ॥८॥ योगियाचे न ये लक्षा । त्यासी लावुं म्हणती शिक्षा ॥९॥ अनंत गाऱ्हाणी । नामा म्हणे कीर्ति वानीं ॥१०॥

६६. मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥ लाकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥२॥ भावा भुललासी खरा । कांपतसे थरथरां ॥३॥ मुख तिथें उघडोनी । दावी तेव्हां चक्रपाणी ॥४॥ ब्रह्मांडे देखिलीं । नामा म्हणे वेडी झाली ॥५॥

६७. यशोदा घुसळती । स्तन मागे भगवंत ॥१॥ घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥ दूध जातेस उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥३॥ मंथनपात्रातें फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥४॥ मागें धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥५॥ हाती न लगे जगजेठी । नामा म्हणे होय कष्टी ॥६॥

६८. कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥ धरूनि आणिला । आजी बांधीन मी तुला ॥२॥ दावें सोडोनिया । बांधितसे देवराया ॥३॥ फार करितसे खोड्या । गोपी दाविती वांकुल्या ॥४॥ दावी अनंत लावीत । दोन बोटे उणें येत ॥५॥ करिताती चोज । परी नोव्हेचि उमज ॥६॥ श्रमतसें वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥७॥ विष्णुदास नामा पुढें । आला जेथें उभी झाडें ॥८॥

६९. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले । म्हणूनि शापिले नारदानें ॥१॥ व्हाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥ विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्शाप कृपाळू तो ॥३॥ कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी । आपुल्या स्थळासी याल वेगीं ॥४॥ मोडितसे तेव्हां वृक्ष लक्ष्मीचा पती । दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥ नामा म्हणे तेव्हां करिताती स्तुति । पापें दग्ध होती ऐकतांची ॥६॥

७०. दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥ विश्वव्यापका जर्नादना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥ अनंत अवतार घेसी भक्तांसाठी । कृपाळू जगजेठी तुज नमो ॥३॥ यज्ञेशा सर्वेशा दयानिधी हृषीकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥४॥ धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहें आम्हांकडे ॥५॥ जोडोनियां हात करितों विनंती । देई तुझी भक्ति जन्मोजन्मी ॥६॥ करुनि नमस्कार हळूहळू चालती । वेळोवेळां पहाती कृष्णाकडे ॥७॥ मोडतांचि वृक्ष धांवोनियां येती । मग पहाताती नामा म्हणे ॥८॥

७१. समस्तां सांगते लहानालीं मुलें । नवल देखिलें आम्हीं आतां ॥१॥ वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासी लागती कान्होबाच्या ॥२॥ यशोदेचें मनी झालासे विवेक । वैकुंठनायक येथें आला ॥३॥ नामा म्हणे तिशीं घालितसे माया । अपराध तया काय असे ॥४॥

७२. नंदे सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासुंद्या गे यासीं दही दूध ॥१॥ मजला लेंकरें नाहीत गे फार । विश्रांतीसी थार एवढेंचि ॥२॥ निवारिलें विघ्न देवें हें केवढें । पडती गे झाले याजवरी ॥३॥ आजपून यास बोलसी कठीण । देईन मी प्राण तुजवरी ॥४॥ स्फुंदस्फुंद रडे तेव्हां नारायण । देईं यासी स्तन भुकलासे ॥५॥ यशोदा बहात न ये वनमाळी धांवोनि कुरवाळी वदन त्याचें ॥६॥ समजावोनि देवा पाजितसे स्तन । घालीत भोजन नामा म्हणे ॥७॥

७३. एक गोप तेव्हां स्त्रियेस सांगत । सांठवी समस्त नवनीत ॥१॥ देवाचा नवस आहे पुरवणें । धरावे येथून अनसुट ॥२॥ सांगोनिया ऐसें राहिला तो स्वस्थ । मागें स्रीनें कृत्य काय केलें ॥३॥ चोरोनियां घृत भरोनि घागरी । नेवोनि शेजारीं ठेवियेल्या ॥४॥ गौळियानें तेव्हां संकल्प सोडिला । नवस फेडिला नामा म्हणे॥५॥

७४. गोपीने घृतासी चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंतर्यामी ॥१॥ सेजे घरीं होते ठेविलें चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथें ॥२॥ आज्य घेऊनियां गोपाळासी देत । आपण भक्षीत आनंदानें ॥३॥ तृप्त होऊनियां गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केलें त्यांच्या ॥४॥ नामा म्हणे ऐसा वैकुंठानायक । दावीत कौतुक नानापरी ॥५॥

७५. कांही एक दिन लोटालियावरी । गोपी तीचे घरी प्रवेशली ॥१॥ म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडाळीलें ॥२॥ म्हणे सये येथें नाही तुझें घृत । ऐकोनियां मात क्रोधावली ॥३॥ चोरी नवनीत नाहीं तुझें गेले । माझें काय झालें पुसतसे ॥४॥ नष्टें अभिलाष केला सांग सत्य । बोलोनि निवांत राहिली ते ॥५॥ कलह करावा भ्रतारा कळेल । शिक्षा तो करील यथास्थित ॥६॥ न मिळे जाणोन म्हणे कृष्णार्पण । आली तें बोलोनी मंदिरासी ॥७॥ नामा म्हणे शुक सांगे परीक्षिती । ऐसी किती ख्याति तुज सांगों ॥८॥

७६. एकदा श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवाचिता गोपीगृहीं ॥१॥ दोहीं करें तेव्हां नेत्र चोळितसे । गोपी पुसतसे काय झालं ॥२॥ कृष्ण म्हणे माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करूं काय ॥३॥ पुत्राची जननी तिचें दूध मिळे । घालितांची डोळे बरे होती ॥४॥ गोपी म्हणे दूध देतें मी काढून । तें नेत्रीं घालून बरें करी ॥५॥ देव म्हणे तूं दूध काढून देसी । कैसा गुण त्यासी येईल सांग ॥६॥ माझिया करानें पिळूं देसी स्तन । तरी येईल गुण लवकरी ॥७॥ ऐकतांची गोपी धांवे मारावया । पळे उठोनियां नामा म्हणे ॥८॥

७७. यशोदे भोंवला मिळाल्या गौळणी । सांगती गाऱ्हाणी नानापरी ॥१॥ गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळ सोडोनि जाऊं सये ॥२॥ एक गोपी म्हणे माझ्या घरीं येशीं । बांधीन खांबासी तुजलागीं ॥३॥ यशोदेसी ऐशीं सांगोनि गाऱ्हाणीं । चालिल्या कामिनी गृहापती ॥४॥ नामा म्हणे गोपी बोलिली बांधीन । तिजवरी विघ्न करी देव ॥५॥

७८. निशी प्राप्त होतां भ्रताराचे सेजे । गोपिका ती निजे आंनदाने ॥१॥ संधी पाहोनिया प्रवेशला देव । करी नवलाव काय तेव्हां ॥२॥ भ्रताराची दाढी कांतेची ती वेणी । एकत्र करूनी ग्रंथी देत ॥३॥ करूनि कौतुक निघोनियां गेला । अरुणोदय झाला तयेवेळीं ॥४॥ गोदोहनालागीं गोपी ते उठत । वेणी आसडत दाढीसंगें ॥५॥ भ्रतारासी तेव्हां बोले ते कामिनी । न धाये अजूनि मन कैसें ॥६॥ भ्रताराचे दाढी ओढतांच जाण । सक्रोध होऊन बोलतसे ॥७॥ मस्त होऊनियां माजली धांगडी । करीसी ओढाओढी मजलागीं ॥८॥ नामा म्हणे तेंव्हा उठोनी बैसती । आश्र्चर्य करिते मनामाजीं ॥९॥

७९. उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहताती परस्परें ॥१॥ सोडूं जंव पाजती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥ सोडितां सुटेना जाळितां जळेना । कापितां कापेना कांही केल्या ॥३॥ स्त्रियेलागीं तेव्हां भ्रतार बोलत । तुजसंगे मृत्यु मज आला ॥४॥ दोघेंहि रडत बिदिमाजीं येती । कोल्हाळ करिती तयेवेळीं ॥५॥ गोकुळींचे जन डोळा पाहताती । जाऊन सांगतीं नंदालागी ॥६॥ नामा म्हणे नंद बैसला चावडीं । घेऊनि आवडी कृष्णजीला ॥७॥

८०. गोपीगोप तेथें पातले त्वरित । हांसती समस्त देखोनियां ॥१॥ कृष्ण म्हणे कैशी बांधिसी मजला । बांधिले तुजला भगवंते ॥२॥ पायां पडताती रडोनी बोलती । सोडवा म्हणती आम्हांलागी ॥३॥ पाहोनी कींव त्यांची दया आली चित्ता । कृपेनें पाहतां मुक्त झाली ॥४॥ नामा म्हणे तेव्हां वंदोनि देवासी । गेली निजधामासी आनंदनें ॥५॥

८१. नंदाचिये घरी चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तंडाचा ॥१॥ पकान्नेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेने ॥२॥ वाघियामुर्ळी सांगितली दोन्ही । आला चक्रपणी खेळतची ॥३॥ मातेलागीं म्हणे लागलीसे क्षुधा । थांब रे गोविंदा म्हणे माता ॥४॥ घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारलें सांग नैवेद्यासी ॥५॥ नेऊनियां पुढें देवांच्या ठेविले । बोलवा वहिले आमंत्रिक ॥६॥ तों वरी मागें तो भक्षी नारायण । यशोदा आपण रागावली ॥७॥ दुरळ हा देव होय आतां कैसें । मार्तंडाचे पिसें लागे तुज ॥८॥ करी क्षणामाजीं वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवलें ॥९॥ जाणीतला भाव मायेचें अंतर । करूनियां खरें दावी देव ॥१०॥ वांकडियां हातें ग्रास घाली मुखें । मुख तेंहि सुखें तैसें दावी ॥११॥ पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार मायेलागीं ॥१२॥ पूर्वी म्यां सांगता नायकसी कैसा । पुढें हा वळसा वोढवला ॥१३॥ आले देवऋषि हालवितां सुपें । त्यांचिया न बापें देव निघे ॥१४॥ वासोनियां डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भये थरथरां ॥१५॥ मंत्रूनिया पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवें ॥१६॥ नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥१७॥ चिंतावली माय मुर्च्छा आली तिसी । झाली पोरपिसी मोहजाळें ॥१८॥ जाणोनी अंतर म्हणे कृष्णार्पण । तेव्हां आलें विघ्न दूर होय ॥१९॥ नामा म्हणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवलें पोटी हाचि देव ॥२०॥

८२. गोपिका म्हणती यशोदे सुंदरी । करीतो मुरारी खोडी बहु ॥१॥ यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥२॥ गणेश देईल त्यासी उत्तम गुण । वचन प्रमाण मानांवें हें ॥३॥ गजवदनासी तेव्हां म्हणत यशोदा । माझिया मुकुंदा गुण देईं ॥४॥ ऐसें हें वचन ऐकून कृष्णनांथें । सत्य गणेशातें केलें तेव्हां ॥५। एक मास खोडी देवें नाहीं केली । प्रचीत ते आली यशोदेसी ॥६॥ धन्य धन्य देव गणपती पाहे । यशोदा ती राहे उपवसी ॥७॥ इंदिरबंधूचा उदय होऊं पाहात । यशोदा करीत पूजनासी ॥८॥ शर्करामिश्रित लाडू एकवीस । आणीक बहुवस मोदक ते ॥९॥ ऐसा नैवेद्याचा हारा तो भरोनी । देव्हारा घेऊनि ठेवी माता ॥१०॥ मातेसी म्हणत तेव्हां हृषीकेशी । लाडू केव्हां देशी मजलागीं ॥११॥ यशोदा म्हणत पूजीन गजवदन । नैवेद्य दावून देईन तुज ॥१२॥ ऐसें म्हणूनियां माता बाहेर गेली । देव्हाऱ्याजवळीं हरि होता ॥१३॥ एकान्त देखोनि हारा उचलिला । सर्व स्वाहा केला एकदांची ॥१४॥ घेऊनियां ग्रास उगीच बैसला । भक्तालागीं लीला दावीतसे ॥१५॥ धूप घेऊनियां आली सदनातें । रिता हारा तेथें देखियेला ॥१६॥ विस्मय बहुत मातेसी वाटला । नैवेद्य हरिला पुसतसे ॥१७॥ कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते । एक सहस्त्र उंदीर आले येथें ॥१८॥ त्यांत एक थोर होता तो मूषका वरी विनायक बैसलासे ॥१९॥ सकळही लाडू सोंडेनें उचलिले । सर्व आकर्षिले एकदांची ॥२०॥ सर्वांगासी त्यानें चर्चिला शेंदूर । सोंड भयंकर हालवितसे ॥२१॥ उंदीर भ्यासूर भ्यालों मी देखून । वळली वदनीं बोबडी ते ॥२२॥ न बोलवे कांही माझेनी जननी । क्षुधा मज लागोनी लागलीसे ॥२३॥ लाडू मज देईं म्हणे जनार्दन । माता क्रोधें करून बोलतसे ॥२४॥ माता म्हणे कृष्णा पाहूं तुझें वदन । लाडू त्वांचि पूर्ण भक्षियेले ॥२५॥ हरि म्हणे माते लाडू ते बहुत । मावतील मुखांत कैसे माझ्या ॥२६॥ गणपति सर्व लाडू गेलासे घेऊन । आलें विहरण मजवरी ॥२७॥ हरी म्हणे मज

८३. कोणी एके दिनीं श्रीकृष्ण अंगणी । विलोकी नयनीं प्रतिबिंब ॥१॥ मातेप्रती तेव्हां म्हणतसे हरी । काढोन झडकरी देई मज ॥२॥ माता म्हणे बाला न ये ते काढितां । आणीक अनंता माग कांही ॥३॥ ऐसें ऐकोनियां रडतसे हरी । त्यासी नानापरी समजावीत ॥४॥ बहुत खेळणीं पुढें ठेवी माता । परी तो रडतां न राहोचि ॥५॥ पालखीं नेऊनि हरीसी निजवीत । यशोदा ते जात स्वकार्यासी ॥६॥ तेच समयीं राधा आलीसे मंदिरीं । देखिला श्रीहरी रडतां तिनें ॥७॥ पालखीं जवळी जाऊनि सत्वर । घेत कडेवर हरीलागीं ॥८॥ राधा म्हणे कां तूं रडतोसी चाटा । गोष्टी त्या अचाटा सांगतोसी ॥९॥ ऐसें ऐकोनियां उगाची राहिला । खेळवी हरिला प्रेमें राधा ॥१०॥ मागुती नेऊनि पालखीं घातला । रडावा लागला हरी तेव्हां ॥११॥ राधेसी म्हणत यशोदा सुंदरी । यासी क्षणभरी नेई आतां ॥१२॥ आपुले मंदिरा घेऊन जाय यासी । ऐकोनि मानसीं संतोषली ॥१३॥ नामा म्हणे राधा घेऊन हरीसी । गेली मंदिरासी आपुलिया ॥१४॥

८४. मंदिरा नेऊनि पलंगी बैसविला । म्हणत हरीला तयेवेळीं ॥१॥ ऐशिया समयीं थोर तूं अससी । तरी हृषीकेशी बरें होते ॥२॥ देखोनि भाव तिचा थोर झाला हरी । पाहूनि सुंदरा आनंदली ॥३॥ सुखशयनी राधा एकान्तीं असतां । अनया अवचितां आला तेथें ॥४॥ सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणसी बोलसी गुजगोष्टी ॥५॥ भ्रताराचा शब्दा ऐकतां श्रवणीं । दचकली मनीं राधिका ते ॥६॥ हात जोडोनियां विनवीत हरीसी । होई हृषीकेशी सान आतां ॥७॥ ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहीभात झडकरी ठेवी पुढें ॥८॥ कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत हृषीकेशी जेवितसे ॥९॥ कावड ठेवूनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥१०॥ नामा म्हणे अनया आनंदला मनीं । हृदयीं चक्रपाणी धरियेला ॥११॥

८५. राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तुं ॥१॥ एकलें हें तुज कर्मेना मंदिरी । खेळावया हरी आणीत जाई ॥२॥ भ्रतारवचन राधेनें ऐकोनी । आनंद तो मनी थोर तिच्या ॥३॥ स्वामी तुमची आज्ञा मजलागी प्रमाण । म्हणोनि चरण वंदियेले ॥४॥ सुखशयनी राधा भोगीत अनंता । गोकुळांत वार्ता प्रगटली ॥५॥ राधेचिया घरीं थोर होतो हरी । गोकुळींच्या नारी गुजगुजती ॥६॥ यशोदे मातेसी सांगती सुंदरी । आंवरी मुरारी आपुला हा ॥७॥ तैसीच जाऊन राधेच्या गृहासी । सांगती सासूसी तिच्या तेव्हां ॥८॥ राधेलागीं वृध्दा म्हणे तयेवेळी । घरासी वनमाळी आणू नको ॥९॥ नामा म्हणे लोकीं पडियेली तुटी । तिसी जगजेठी अंतरला ॥१०॥

८६. प्रात:काळीं राधा उठोनिया जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥ इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारीं रधिका ते॥२॥ विसरे गोदोहन वृषभाखालीं बैसत । कृष्णजींचे चित्त वेधियेलें ॥३॥ भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहतां हरी देखे ॥४॥ माता म्हणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्या वेळां हरी देत ॥५॥ दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥६॥ भरणा भरला आतां जाईं तूं घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हां ॥७॥ कृष्णासी यशोदा पाहें । वृष्भ कीं गाय दोहतोसी ॥८॥ कृष्ण खालीं पाहे वृषभ देखिला । म्हणे यशोदेल ऐक एक ॥९॥ देवाचा नवस चुकलीस बहुतेक । चौथानांचे थान एक झाले ॥१०॥ वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारी उभी राधा देखियेली ॥११॥ कां गे तेथें उभी घेऊनी घागर । जातसे सत्वर राधा तेव्हां ॥१२॥ नामा म्हणे ऐसें झालें गोदोहन । मुख प्रक्षाळून हरी जेवी ॥१३॥

८७. मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मनामाजी ॥१॥ मेळवोनी मुलें खेळे तिचे द्वारीं । देखिला श्रीहरी राधिकेनें ॥२॥ विसरोनी मंथन रित्या डेरीयांत । रवी फिरवीत गरगरां ॥३॥ डेर खडखडां वाजतां ऐकोनी । वृध्दा ते धांवोन बाहेर आली ॥४॥ सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र । देतसे उत्तर राधा तिसी ॥५॥ डेरा धड किंवा फुटका म्हणूनी । रवी घुसळोनी पहातसे ॥६॥ वृध्दा म्हणे तुझें चित्त नाहीं स्थिर । द्वारीं हो श्रीधर देखियेला ॥७॥ रांगे भरोनियां बोलत म्हातारी । येथें कां रे हरी खेळसी तूं ॥८॥ कृष्ण म्हणे आम्ही खेळतों बिदीसीं । तूं का दटाविसी थेरडिये ॥९॥ ऐसें बोलोनियां श्रीहरी पळाला । घरासी तो गेला नामा म्हणे ॥१०॥

८८. मध्याह्नकाळी मग हरीसी घेऊन । करीतसे भोजन यशोदा तें ॥१॥ भोजन करूनि पलंगी निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥२॥ यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥ नेत्रासीं पदर लावोनि रडत । अंतरी अनंत आठवोनी ॥४॥ करुणाशब्द तिचा ऐकोनी श्रवणीं । उठला चक्रपाणी तेथोनियां ॥५॥ जावोनियां राधा धरिली पदरीं । तिजलागीं हरि समजावीत ॥६॥ संसारासी माझ्या पडियेलें पाणी । ऐसें चक्रपाणी तुवां केलें ॥७॥ इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरीसी धुंडीत तयेवेळीं ॥८॥ एखादी हा कळी घेऊन येईल आतां । पहातसे माता चहूंकडे ॥९॥ पाउलाचा मार्ग चालिली काढीत । पावली त्वरीत यमुनातीरां ॥१०॥ राधा तयेवेळी म्हणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥११॥ मातेसी देखूनि गडबडां लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥१२॥ मातेसी म्हणत चोरोनि कंदुक । घेउनियां देख आली तेथें ॥१३॥ माता म्हणे कां वो यासी रडविसी । चेंडू तूं हरिसी देई वेगीं ॥१४॥ मा मीसें हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशी जाणा चेंडू नाही ॥१५॥ कृष्ण म्हणे माते झाडा घेई आतां । कंदूक तत्त्वता निघेल पैं ॥१६॥ वस्त्र जवं झाडीत राधा तयेवेळीं । पडियेला भूतळीं कंदूक तो ॥१७॥ ऐसें देखोनिया लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा म्हणे ॥१८॥

८९. चेंडू देखोनियां यशोदा कोपली । म्हणे तयेवेळीं राधिकेसी ॥१॥ महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥२॥ इतुकें ऐकोनी राधा ते चालिली । स्वगृहासी गेली आपुलिया ॥३॥ राधेचिया मनीं समजले पूर्ण । ब्रह्मसनातन श्रीकृष्ण हा ॥४॥ इकडे यशोद घेऊनी हरीसी । गेली मंदिरासी नामा म्हणे ॥५॥

९०. गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥ वृध्द ते म्हणती येतें आमुच्या मना । जाऊं वृंदावना सकळीक ॥२॥ समस्तां तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हां ॥३॥ अहनिंशीं देव करिती जतन । नामा म्हणे मन गोविंदा पैं ॥४॥

९१. विचारीत हो श्रीपती । जे मी जातो वनाप्रती ॥१॥ राखावया गायी । भार उतरावया मही ॥२॥ एके दिनीं सायंकाळी । नंदा पुसे वनमाळी ॥३॥ उद्या जाईन मी रानां । घेऊनि वा रे गोधना ॥४॥ बुध्दीचा चालक । नामा म्हणे हाचि एक ॥५॥

९२. प्रात:काळी मुलें येताती सकळ । ऊठ रे गोपाळा म्हण्ताती ॥१॥ आळस देऊनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडीतसे ॥२॥ माता देऊनि स्तन काकुळती येत । सांभाळा भगवंत वनामध्यें ॥३॥ जवळींच खेळा जाऊं नका दूरी । सांभाळा मुरारी प्राण माझा ॥४॥ होताती उत्पात याजवरी मोठे । मोडतील कांटे सांभाळावे ॥५॥ आसनीं शयनीं भोजनीं जतन करा । नामया दातारा केशिराजा ॥६॥

९३. चालियेलें तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥१॥ वत्साचिया रूपें वत्सासुर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥ पाहोनियां ऐसें तयासी मारिलें । झोकोनिया दिलें आकाशांत ॥३॥ चला आतां जेवूं बैसूं एके ठायीं । काढा रे लवलाही शिदोरीया ॥४॥ गोपाळा मिळोनी आनंदें जेविले । ब्रह्मरसें धाले कृष्णासंगे ॥५॥ उदक प्राशन करावया आले । बकाने देखिलें कृष्णजीला ॥६॥ दुष्टबुध्दी तेव्हां देवासी गिळीत । हृदया जाळीत उगाळील ॥७॥ धरोनियां हातें उभाचि चिरीला । आनंद देवला न समाये ॥८॥ नामा आले घरासी सकळ । सांगताती बाळें वर्तमान ॥९॥

९४. उठोनी प्रात:काळी गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥१॥ चला जाऊं त्याचें पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥ तांतडीने येती नंदाचिया घरा । पहाती उदारा कृष्णराया ॥३॥ कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभताती ॥४॥ अरुणोदय प्रभा अधर दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥५॥ भोंवया व्यंकटा सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होय ॥६॥ लल्लाटीं शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तुरीचा ॥७॥ वैजयंती माळा किरीत कुंडलें । नामयानें केले निंबलोण ॥८॥

९५. उठोनियां प्रात:काळी । देवें मुरली वाजविली ॥१॥ गडी मिळोनी समस्त । घ्या रे शिदोऱ्या सांगत ॥२॥ अलंकार घालिताती । दिसे सुशोभित मूर्ति ॥३॥ नामा म्हणे स्वामी माझा । आला भक्तांचिये काजा ॥४॥

९६. अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां शोभताती ॥१॥ रक्त पीतांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चालताती ॥२॥ रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूर पत्रवेठीं शोभताहे ॥३॥ शिंगे रंगविती देऊनियां रंग । चालत श्रीरंग मागें मागें ॥४॥ चित्तीं सर्वकळ राहे ऐसे ध्यान । नामा म्हणे धन्य तोचि एक ॥५॥

९७. शिवादिक ज्याचें बंदिती पायवणी । पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥ नंद पुण्य लेखा नव्हे आम्हांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥ सनकादिक ज्याचे ध्यानीं झाले पिसें । गायी चारीतसे गोकुळांत ॥३॥ गडीयासी काला वांटितो श्रीधर । कौतुक सुरवर पहाताती ॥४॥ नामा म्हणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥५॥

९८. कंस धाडी अधासुर । भारी नंदाचा कुमर ॥१॥ एक ओंठ खालीं । दुजा मेघाच्या मंडळीं ॥२॥ गाई गोपाळ उदरीं । देवा कळलें अंतरी ॥३॥ आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥४॥ क्षणार्धेंचि मारी । भक्तजनांचा कैवारी ॥५॥ भेणें गोपाळ पडियेलें । कृपादृष्टी उठविलें ॥६॥ तेज अद्‌भुत निघालें । कृष्णमुखीं प्रवेशलें ॥७॥ भक्तासी रक्षीत । नामा म्हणे कृष्णनाथ ॥८॥

९९. गडी आणि रमापती । तेव्हां आनंदे जेविती ॥१॥ कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥ कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥ कोणी पसरिती चवाळें कोणी पसरिताती ॥४॥ गोळे घेऊनियां हातीं । येरयेरातें हाणिती ॥५॥ पाहताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥६॥ मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥७॥ माया मोही ब्रह्मादिका । नामा म्हणे तेंचि ऐका ॥८॥

१००. गौळियांची पोरें वांकुल्या दाविती । क्रोधायला चित्तीं ब्रह्मदेव ॥१॥ चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहुं याचे बळ किती आहे ॥२॥ जाणोनी अंतर देव हांसतसे । सामर्थ्य पहातसे पुत्र माझा ॥३॥ तेथुनी आणावी नव्हे हें उचीत । म्हणेल किंचित पराक्रम ॥४॥ नामा म्हणे ऐसें विचारलें चित्तीं । करीत श्रीपती काय तेव्हां ॥५॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.