परिचय/महानुभाव वाङमयाचे संशोधन

४. महानुभाव वाङ्मयाचे संशोधन


महानुभावांच्या वाङमयाचे आणि धर्म- संप्रदायाचे संशोधन आणि अभ्यास हा प्राचीन मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाचा व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. काही विद्वान अभ्यासकांनी तर महानुभाव वाङमय हा आपल्या जन्मभराच्या व्यासंग- चिंतनाचा भाग बनवलेला आहे. आदरणीय डॉ. भाऊसाहेब कोलते हे अशा संशोधकांचे ज्येष्ठ नेते मानले पाहिजेत. मी स्वतः मराठीचा व महाराष्ट्राचा अभ्यासक म्हणून हे सारे साहित्य वाचतो. व्यवसाय प्राध्यापकाचा असल्यामुळे शिकवतोही. तेराव्या शतकातील साहित्याचे ज्येष्ठ नेते म्हणून माहिमभट्ट, नरेंद्र, भास्करभट्ट इत्यादीं- वर माझे प्रेमही आहे. पण सामान्यपणे मी महानुभाव साहित्यावर कधी लिहीत नाही. एकतर प्राचीन मराठी

वाङमयाचा मी संशोधक व मीमांसक नाही. दुसरे म्हणजे मी स्वत:ला ह्या क्षेत्रात लागणारा जो किमान अधिकार त्याचा, हक्कदार समजत नाही. हा छोटासा विवेचक लेख मित्रांच्या प्रेमाखातर लिहीत आहे. मजजवळ ह्या क्षेत्रात सांगण्याजोगे काही आहे, असे वाटत नाही.
अगदी अलीकडेपर्यंत सर्वसामान्य मराठीच्या अभ्यासकाला महानुभाव वाङमयाच्या विषयी काही माहीतच नसे. संप्रदायाविषयी फक्त विकृत आणि अर्धवट माहितीच असे. हंपी- विरूपाक्षच्या शंकराचार्यांनी दिलेले अभयपत्र व्यवहारात फारसे फलदायी ठरलेले दिसत नाही. आजही परिस्थिती अशी आहे की, आपण हिंदू< आहोत असा महानुभाव संप्रदायातील अनेकांचा दावा आहे. व हा संप्रदाय अवैदिक आहे असा संशोधकाचा दावा आहे. हिंदू असण्यासाठी वैदिक असणे किती प्रमाणात आवश्यक आहे त्याची मात्र फारशी चर्चा कुणी करीत नाही. भारतीय संविधानानुसार महानुभाव हे हिंदू आहेत. कायद्याला एखादा संप्रदाय हिंदू असण्यासाठी वैदिक असण्याची आवश्यकता वाटत नाही असे, प्रथमदर्शनी तरी दिसते. पेशवाईपूर्वीच्या महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय व उरलेले हिंदू ह्यांचे परस्परसंबंध कसे होते हा मुद्दा बाजूला ठेवून दिला तरी इंपीरियल गॅझिटिअरच्या प्रथमावृत्तीला माहिती पुरविणा-या व्यक्तीचे मन स्वच्छ नव्हते इतके तात्पर्य शिल्लकच राहते. अलीकडच्या काळात विष्णुबुवा जोगांच्यापासून निंदा-नालस्तीच्या उपक्रमास प्रारंभ होतो. अशा प्रकारचे उपदव्याप कुणीही निंद्य व निषेधार्हच मानील. पण वाईटातून कधी कधी चांगले निर्माण होते असा अनुभव आहे. जोगांच्या सारख्या निंदकाचा प्रतिकार करायचा असेल तर त्याचा खरा मार्ग आपले उज्ज्वल वाङमय जनतेसमोर ठेवणे हा आहे, ह्या निर्णयावर महानुभाव महंत व मठाधिपती आले. हा कालमहिमा आहे. आपल्या उपदेशापासून सामान्य माणूस व स्त्रियाही वंचित राहू नयेत ही एक जाणीव या संप्रदायात कार्यरत होती. आपले धर्मरहस्य अश्रद्धांच्या हाती पडू नये ही दुसरी जाणीवही कार्यरत होती. पहिल्या जाणिवेतून मराठीचा अंगिकार, अभिमान व मराठी ग्रंथरचनेचा उदय होतो. दुसऱ्या जाणिवेतून सांकेतिक लिपीचा उदय होतो. इतिहास असा दिसतो की, सांकेतिक लिप्या व रचना ह्यांमुळे पंथेतरांना पंथाचे ज्ञान होऊ नये हा हेतू साध्य झाला, तरी संकेत लिपीच्या योगाने क्षेप-प्रक्षेपाला अडथळा मात्र निर्माण झाला नाही.
 महानुभाव महंतांनी आपले साहित्य जनतेसमोर ठेवण्याचा जो निर्णय घेतला तो धाडसी व क्रांतिकारक तर होताच, पण पंथाच्या भूमिकेतील मूलभूत अहिंसाधर्माशी सुसंगत होता. ज्या मंडळींच्या समोर हे वाङ्मयधन उघडे करायचे ती माणसे बुद्धीने समंजस व उदार होती व अंतःकरणाने परंपरावादी होती. ही परंपरावादी मंडळी एका मर्यादेपलीकडे निकोप मनाने महानुभाव संप्रदायाकडे पाहण्याची शक्यता कमी होती. पण बिनतक्रार हा धोका पत्करून महंतमंडळी ह्या विद्वानांकडे गेली. कधीतरी हा धोका पत्करणे भागच होते. पंथेतरांना संप्रदायाचे ज्ञान नाही म्हणून त्यांच्या मनात प्रेम नाही व ज्यांना प्रेम नाही त्यांच्याकडून पूर्ण न्याय अपेक्षिता येत नाही. तरीही ह्या मंडळींना ज्ञानाचे दरवाजे मोकळे करून दिले पाहिजेत. कारण आज ज्ञान दिले तरच उद्या नवे प्रेम निर्माण होणार हे उघडे गणित होते. आज प्रेम व विश्वास देऊन उद्याचे चाहते जिंकण्याचा हा प्रेममय मार्ग होता.
 मी काय म्हणतो ते थोडे उदाहरणाने स्पष्ट केले पाहिजे. ज्यांना महानुभाव महंतांनी विश्वासात घेतले त्यांच्यापैकी सारस्वतकार भावे हे एक जाडे विद्वान व मराठी साहित्याचा इतिहास लिहिणारे परिश्रमी गृहस्थ होते. सारस्वतकार भावे ह्यांचा हेतू महानुभाव संप्रदायाकड़े नव्याने व प्रेमाने पाहण्याचा आहे. पण ते हरपालदेव हाच चक्रधर होय असे मानतात. त्यांना पुरस्वीकाराची कल्पनाच अमान्य आहे. त्यामुळे जुना हरपाळदेवच नव्या काळात वृत्तिपालट होऊन संत झाला असे ते मानतात. महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय अप्रिय आहे, असे तर त्यांचे मत आहेच, पण ह्याबद्दल त्यांनी महानुभावांनाच दोषी गृहीत धरले आहे. ते गोविंदप्रभूचा उल्लेखसुद्धा माणूस म्हणूनच करतात. अशा प्रकारच्या पाखंडी माणसाला सर्व ग्रंथ दाखविण्यासाठी महंतांना ५० वर्षांपूर्वी मन किती उदार करावे लागले असेल ह्याची कल्पना केली म्हणजे मी ह्या संदर्भात अहिंसेचा उल्लेख का करतो हे समजू शकेल.
 क्रमाने १९२० नंतर महानुभाव साहित्य प्रकाशात येऊ लागले. पण ह्या प्रकाशनाची गती मंदच होती. माझे मामा कै. नांदापूरकर हे मराठीचे अभिमानी व महानुभाव वाङमयाचे मोठे चाहते होते. त्यांनी मायबोलींची कहाणी हे काव्यमय वाङमयेतिहासाचे पुस्तक लिहिले आहे. डॉ. नांदापूरकर अनेकदा नरेंद्राच्या काव्याचे मोठे मार्मिक रसग्रहण करीत. ते स्वतःही त्यात रंगून जात. आम्हीही रंगत असू. पण त्यांच्या कहाणीत नरेंद्रावर कहाणी नाही. मी ह्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, कहाण्या लिहितेवेळेस त्यांना नरेंद्राचे काव्य उपलब्ध नव्हते. म्हणजे नरेंद्रासारखा महाकवीसुद्धा इ. स. १९३० च्या सुमारास अभ्यासकांना दुर्लभ होता. प्रकाशनाची गती मंद असणे हे त्याचे कारण होते. संशोधकीय नियतकालिकात काय छापले आहे ह्याची वार्ता सर्वत्र पोहोचणे कठीणच असते.
 हे प्रकाशन मंदगतीने चालले तरी काही महत्त्वाचे परिणाम झालेले आहेत. मी स्वतः ह्यांतील तीन परिणाम महत्त्वाचे मानतो. पहिला परिणाम असा की, सर्वसामान्य मराठीचा नवशिक्षित अभ्यासक, महानुभावांनी केलेल्या मराठीच्या सेवेबद्दल कृतज्ञ असतो. महानुभाव वाङमयाच्या जिवंतपणामुळे व सौंदर्यामुळे तो ह्या वाङमयाच्या प्रेमात बुडालेला असतो. हजारो शहाणे समर्थक व चाहते नवमहाराष्ट्रात ह्या वाङमयप्रकाशनामुळे निर्माण झालेले आहेत. ह्या घटनेमुळे निंदकांचे कळप अतिशय रोडावलेही आणि हे कळप तुच्छही ठरले. साहित्यप्रकाशनाच्या निर्णयातून जो प्रेमलाभ ह्या संप्रदायाला उपलब्ध झाला, तो टिळक-भांडारकरांच्या समर्थन करणाऱ्या लेखांनी कधीही उपलब्ध होणे शक्य नव्हते. दुसरा परिणाम असा की, ह्या वाङमयाच्या प्रकाशनाने अभ्यासकांच्या कक्षा रुंदावल्या. त्यामुळे जैन, लिंगायत आदी संप्रदायांनी केलेल्या मराठीच्या उपासनेकडे वळण्यास प्रारंभ झाला. मराठी म्हणजे केवळ वैदिकांची नव्हे; ती महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या सर्वांची, ही जाणीव दृढ होण्यास व वाङमय समीक्षेतील सुप्त परंपरावाद वितळण्यास आरंभ झाला. तिसरा महत्त्वाचा परिणाम हा की, सांप्रदायिकांनाही अभ्यास करण्याची वेळ आली, गरज निर्माण झाली, सोयही झाली. मूठभर महंत मंडळी सोडल्यास पंथीयांना तरी पूर्वी पंथाचे ज्ञान कितीसे असणार ? धर्मजिज्ञासा निर्माण होणे, वाढणे, तिला योग्य वळण लागणे ह्यासाठीही ग्रंथ प्रकाशात असणे इष्टच असते.
 महानुभाव वाङमयाची व धर्मसंप्रदायाची ओळख करून देणे, सापडतील ते ग्रंथ छापणे या उद्योगाला ज्यांनी प्रारंभ केला ते प्राय: पंथेतर होते. ही मंडळी अनुसरण केलेली तर नव्हतीच, पण अनुसरणाची इच्छा असणारीही नव्हती. य. खु. देशपांडे, वा. ना. देशपांडे, नेने, भवाळकर, डॉ. कोलते व अलीकडे डॉ. पठाण ह्या अभ्यासकांचे स्वरूप असे आहे. ही ठळक नावे समजावयाची. ह्या अभ्यासकांची जिद्द सगळे वाङमय प्रकाशित करण्याची होती. ह्या प्रकाशनाला अडथळा येईल, असे काहीही करण्याची त्यांची इच्छा नव्हती. महानुभाव महंत परंपरेच्या वातावरणात वाढलेले होते. एकाएकी चिकित्सेचा प्रकाशझोत त्यांना मानवण्याजोगा नव्हता. चिकित्सेचे हे वैशिष्टयच आहे की, परंपरा तिच्यामुळे काही प्रमाणात हलतात, काही प्रमाणात श्रद्धांना धक्का बसतो. चिकित्सेचा हेतू उभयपक्षांनी सत्याला नम्रपणे सामोरे जाण्याचा मार्ग तयार करणे हा असतो. हेतूच्या विरुद्ध जर दुरावाच वाढू लागला तर चिकित्सेचा मूळ हेतू बाद होतो. महंतांचे मन न दुखविता चिकित्सेला आरंभ कसा करता येईल ह्याचा विचार करण्यात काही जणांचा जन्म गेलेला आहे.
 मी स्वत: महानुभाव वाङमयाच्या संशोधनात व अभ्यासात डॉ. कोलते ह्यांना सर्वांत जास्त महत्त्व व प्राधान्य देतो. भाऊसाहेब कोलते जे सांगतात ते काही डोळे मिटून आम्ही स्वीकारणार नाही. पारखूनच घेऊ. त्यांच्याही विवेचनात अशा जागा आहेत ज्यावर मतभेद होतील व व्हावेत. कारण चर्चा इष्टच असते. पण त्यामुळे कोलते ह्यांचे महत्त्व तिळमात्र उणावत नाही. पहिली गोष्ट अशी की, कोलते ह्यांनी इ.स. १९४५ मध्ये 'महानुभाव तत्त्वज्ञान आणि इ.स. १९४८ मध्ये 'महानुभावांचा आचारधर्म ' ही पुस्तके प्रकाशित केली. हे दोन्ही ग्रंथ संप्रदायाच्या आधारशिला ठरावेत इतक्या महत्त्वाचे आहेत. महानुभावाच्या तत्त्वज्ञानाचे इतके सविस्तर साधार विवेचन त्यापूर्वी अगर त्यानंतरही दुसरे कोणते नाही. दोन्ही ग्रंथांवर मान्यवर महंतांचे आशीर्वाद छापलेले आहेत. ज्यांच्या संप्रदायाचे हे आधुनिक मराठीत विवरण आहे त्यांनी नि:शंकपणे हे ग्रंथ वाचावेत व स्वतःचा धर्म समजून घ्यावा ह्यासाठी ह्याची गरज होती. कोलते ह्यांनी कुठेही स्वमतप्रतिपादन केलेले नाही. त्यांनी अतिशय काटेकोरपणे फक्त महानुभावांचे म्हणणे काय हे सांगितले व ह्या कार्यासाठी अक्षरशः हस्तलिखितांचे ढीग बारकाईने चाळले. कोलते ह्यांच्या ह्या कार्याला आता पंचवीस वर्षे उलटून गेलेली आहेत. त्यांच्या विवेचनात कुणाला भर घालता आली नाही. मतप्रदर्शन आणि चिकित्सा त्यांनी उद्याच्या मंडळींसाठी राखून ठेवली. भाऊसाहेबांच्या इतका तोल सर्वांनाच सांभाळता आलेला नाही. पण सर्वांचा प्रयत्न मात्र तो राहिला.
 महानुभाव-वाङमयाचा प्रमुख भाग मराठी साहित्याच्या पहिल्या बहरात उदयाला आलेला आहे. तेराव्या शतकातील भाषेची रूपे व समाज ह्याही दृष्टीने हे वाङमय महत्त्वाचे आहे. ह्या वाङमयाच्या बाबत सापडेल ते हस्तलिखित उचलणे आणि छापणे ह्यात इतिकर्तव्यता नव्हती. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या जास्तीत जास्त जुन्या पोथ्या गोळा करणे; पूढच्या आवृत्तीचे वेळी अधिक जूने हस्तलिखित मिळाल्यास ते स्वीकारणे; सर्व हस्तलिखितांच्या आधारे अधिकृत संहितेची निश्चिती करणे; शब्दकोश, टीपा, प्रस्तावना जोडणे ; हे कार्य दक्षतेने कोलते करीत राहिले. गोविंदप्रभुचरित्र, रुक्मिणीस्वयंवर, शिशुपालवध उद्धवगीता, वछाहरण, सैह्याद्री वर्णन स्थानपोथी इ. ग्रंथ म्हणजे ह्या परिश्रमाची जिवंत स्मारके आहेत. इतके मोठे कार्य ह्या क्षेत्रात कुणाही मोठ्या एका अभ्यासकाचे नाही. अभ्यासक्रमिक आवृत्त्या सिद्ध करण्यापेक्षा हे काम निराळे. अजून भाऊसाहेबांनी 'लीळाचरित्र' ची प्रत दिलेली नाही ही दु:खाची गोष्ट आहे. जर कोलते-संपादित लीळाचरित्र सटीप उपलब्ध झाले तर ती एक देणगी ठरेल. पंथीय मंडळींना त्यांच्याही ग्रंथांत पाठभेद, प्रक्षेप इ. बाबी आहेत; त्यांच्याही ग्रंथात बनावट भाग आहे, ह्याची जाणीव प्रयासामुळे झाली. ह्या क्षेत्रात त्यांच्या खालोखाल दुसरे नाव वा. ना. देशपांडे ह्यांचे घ्यावे लागेल. संयमाने विधायक चिकित्सा कशी करावी याचे मार्गदर्शन पंथेतरांना करण्यात व चिकित्सक अभ्यासाचे स्वागत करावे, त्यावर रुसू नये ही सवय पंथीयांना, महंतांना लावण्यात भाऊसाहेबांना खूपच परिश्रम करावे लागले आहेत.

 डॉ. कोलते ह्यांनी चिकित्सेला मोठया धीराने आरंभ केला. कोणत्याही धार्मिक वाङमयात ज्याला आपण परंपरा म्हणतो तिचे स्वरूप मोठे चमत्कारिक असते. कधी ह्या परंपरेला सत्याचा आधार असतो; कधी अज्ञान व अंधश्रद्धा द्या पलीकडे इतर कशाचा आधार नसतो. कोलते ह्यांनी चिकित्सेच्या मर्यादा निश्चित केल्या. ते पंथातील प्रमाण बाबी क्रमाने प्रस्थापित करतात आणि त्याविरुद्ध जाणाऱ्या अंधश्रद्धा अप्रमाण ठरवीत जातात. ह्या मर्यादेबाहेर कोलते चिकित्सा नेत नाहीत. परंपरा असे मानते की, भास्करभट्टाचा · शिशुपालवध' शके ११९५ चा आहे. कोलते अतिशय शांतपणे जुन्या पोथ्या गोळा करून हे दाखविणार की, जुन्या पोथ्यांच्यामध्ये ही ओवी नाही म्हणून ती प्रक्षिप्त आहे. पंथीय पुराव्याच्या आधारेच त्यांनी 'शिशुपालवधा' चा काळ शके १२३५ ठरवून दिलेला आहे. महानुभाव काव्यातील 'सातीग्रंथ' हे ज्ञानेश्वरीनंतरचे आहेत. ह्या संशोधनकार्यात महानुभाव वाङमय ज्ञानेश्वरांपूर्वीचेच आहे हा हट्ट त्यांनी धरला नाही. इतरांनाही धरू दिलेला नाही. शिशुपालवधाच्या काळाचा नागदेवाचार्याच्या निधन-शकाशी संबंध आहे.

 कोलते, वा. ना. देशपांडे ही पिढी आता अस्तंगत होत आहे. ह्या पिढीचे कार्य सदैव आदरणीय, वंदनीय राहणार आहे, ह्यात वाद नाही. पण चिकित्सेचा प्रांत इथे थांबणारा नाही. चिकित्सा नव्या युगात प्रवेश करीत आहे. ह्या नव्या पातळीवरील चिकित्सेचे एक रूप म्हणून आमचे मित्र डॉ. ढेरे ह्यांच्याकडे पाहिले पाहिजे. महानुभाव महंत व सांप्रदायिक ह्यांना आता क्षेपप्रक्षेपांच्या चर्चा व कालनिश्चितीच्या चर्चा ह्यांची सवय झालेली आहे. महानुभाव साहित्य प्रकाशात यावे म्हणून स्वेच्छेने स्वतःवर बंधने लादून घेण्याची गरज आता अभ्यासकांना उरलेली आहे, असे नव्या संशोधकांना वाटत नाही. एखादा धर्मसंप्रदायाची निंदानालस्ती करणाऱ्याविरुद्ध दृढपणे, खंबीरपणे उभे राहणे निराळी गोष्ट आहे आणि अनिर्बंध पण पुरावेशुद्ध संशोधनानेही श्रद्धेला तडाच जाणार असतो, पण दोन पातळीत फरक आहे, हे सर्वांनीच समजून घेण्याची आता गरज आहे. ख्रिश्चनांनीच त्यांच्या वाङमयाची सर्वांगीण कठोर चिकित्सा केलेली आहे. आज वैदिकांच्या वाङमयाची कठोर चिकित्सा करणारे वैदिकच आहेत. महानुभाव पंथात ही वेळ येणार आहेच. संशोधक फक्त पुराव्याच्या आधारे सत्याचा शोध घेत असतात. या वाटेने जाताना इतर कोणती संपदा उद्ध्वस्त, उजाड होईल याची चिंता संशोधकांना नसते. हया संशोधकांवर रागावण्यात अर्थ नसतो.
 हया नव्या युगात प्रवेश करताना महानुभाव अभ्यासकांना दोन भिन्न पातळीवर काम करण्यास व विवेचनाची मांडणी करण्यास सिद्ध झाले पाहिजे. एखाद्या प्रश्नासंबंधी संप्रदायाचे म्हणणे काय आहे हया बाबतीतही दक्ष असावे लागेल आणि हया प्रश्नासंबंधी चिकित्सकांचे म्हणणे काय आहे याचाही विचार करावा लागेल. सगळ्याच धर्मसंप्रदायाला हे म्हणणे लागू असते. वेद अपौरुषेय व अनादि आहेत असे वैदिक धर्माचे मत आहे. याचीही नोंद घेणं भाग आहे. वेद हे माणसांनी रचलेल्या सूक्तांचे संग्रह आहेत. ही रचना इ. स. पू. २००० ची असली तरी अनादि नव्हे. जगाच्या उत्पत्तीच्या मानाने वेद फार अलीकडचे आहेत, असे ऐतिहासिक चिकित्सकांचे मत आहे. याची नोंदही टळत नसते. क्रमाने हया चिकित्सा परंपरागत श्रद्धांच्यावर मात करतात, असा नव्या जगाचा अनुभव आहे.
 चिकित्सेच्या दिशा अनंत असतात. वर गभितार्थाचा मुद्दा आलेला आहेच. त्याला अनुसरून आपण उदाहरण म्हणून नागदेवाचार्यांचा विचार करू. भटोबास तथा नागदेवाचार्य हे महानुभाव संप्रदायाचे पहिले आचार्य. स्मृतिस्थळाप्रमाणे नाग देवाचार्यांचे आयुष्य ६६ वर्षांचे. त्यांचे निधन शके १२२४ ला झाले. हया आयुष्यापैकी चौदा वर्षे गोविंदप्रभूच्या सेवेत व सोळा वर्षे पंथप्रचारात अशी तीस वर्षे मोजून आपण मागे गेलो तर 'सर्वज्ञांचे' उत्तरापंथे प्रयाण शके ११९४. हयापूर्वी चार वर्षे अनुसरण म्हणजे शके ११९० ला. अनुसरणाच्या वेळी नागदेवांचे वय ३२ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म शके ११६२ चा. संप्रदायाला मान्य असणारीगणना हीच राहणार. इतिहासाच्या अभ्यासकाला हे पटो अगर न पटो. कारण ही कालगणना बदलायची म्हणजे स्मृती बदलायची. स्मृती बदलण्यासाठी धर्ममान्य कारण आपण कोणते देणार?
 ऐतिहासिकांनी हा काळ सतत पुढे ढकलला आहे. प्रथम त्यांनी शके १२२४ च्या ऐवजी १२२८ हा काळ दिला. चक्रधरांचे प्रयाण ११९८ मानले की पुढे तीस वर्षे जाऊन हा काळ येतो. तुळपुळे ह्यांना हा काळ शके १२३० वाटतो. पारख ह्यांनी तो शके १२३५ ठरविला. मला स्वत:ला हा काळ शके १२४० च्या जवळ जाणारा असा वाटतो. खरा महत्त्वाचा प्रश्न नागदेवाचार्यांचा निधनकाल निश्चित कसा करावा हा आहे. स्मृती क्र. ८७ प्रमाणे राज्यांतराच्या वेळी नागदेवाचार्य यात होते. त्यानंतर ते वारले. हे राज्यांतर इ. स. १३१३ चे. म्हणजे शके १२३५ चे आहे. म्हणून पारेख हा काळ शके १२३५ देतात.
 प्रत्यक्ष स्मृती क्र. ८७ असे सांगते की, राज्यांतर झाल्यानंतर सगळीकडे निर्भय झाल्यानंतर काही काळाने (केतुलीया काळा) भटोबास निंबे ह्या ठिकाणी आले व तिथे राहू लागले. ह्यानंतर बऱ्याच काळाने ते वारलेले दिसतात. स्मृती २०५ मध्ये 'निंबेया पुनर्वास' आहे. स्मृती क्र. ८५ च्या नंतरचा काळ दिसतो. म्हणन मी नागदेवाचार्यांचे निधन राज्यांतरानंतर काही वर्षे पुढे गृहीत धरणे रास्त मानतो. म्हणजेच शके १२४० च्या जवळ नेऊ इच्छितो. पण तूर्त आपण पारखी ह्यांचा काळ मान्य करून विचार करू. ह्या काळाला अनुसरून जर आपण चक्रधरांचे प्रयाण शके ११९४ मानले तर त्या वेळी नागदेव २५ वर्षांचे ठरतात. जर हे प्रयाण शके ११९६ असेल तर नागदेव २७ वर्षांचे व शके ११९८ प्रयाण मानले तर नागदेव २९ वर्षांचे ठरतात. ह्यापूर्वी चार वर्षे अनुसरण, म्हणजे अनुसरणाच्या वेळी नागदेव कमीत कमी २१ वर्षांचे व जास्तीत जास्त २५ वर्षांचे असणार म्हणन ३२ व्या वर्षी अनुसरण हा पक्ष बाधित मानणे भाग आहे. ह्या गणितात निधनसमयी भटोबासांचे वय ६६ गृहीत धरले आहे. त्यानुसार त्यांचा जन्म शके ११७१ चा येणार व धर्मप्रचाराचे कार्य २५ वर्षांचे मानावे लागणार. स्मृती २६० मधील सर्वच माहिती ह्यानुसार बदलून घ्यावी लागेल. अगर स्मृती ८७ तील माहिती बदलून राज्यांतराच्या वेळी नागदेव हयात नव्हते असे म्हणावे लागेल. पण मग अनेक स्मृतींतील अनेक माहिती बाद समजावी लागेल.
 नागदेवाचार्यांचा काळ बदलला म्हणजे वाईदेववासाचा काळ बदलतो. त्यानुसार शिशुपालवध, उद्धवगीता, वछाहरण इ. चे काळ बदलतात. शक्यता ही आहे की, भास्करभटाचे ग्रंथ शके १२४० नंतरचे असतील; राज्यांतर व निर्भय झाल्यानंतर जर नागदेव वारले असतील, तर मग संप्रदायाला कोकणात जाण्यासाठी कारण उरत नाही. 'खालसेयाची धाडी' आली तेव्हा भास्करभट आचार्य असतील तर मग अनेक अनुबंध बदलतील. आणि 'निर्भय' होईपर्यंत नागदेवाचार्य हयात असतील तर मग ग्रंथलोपाची सर्व कहाणीच क्षेपक मानावी लागेल. स्मृतिस्थळातील कथांना व स्मृतींना कालानुक्रम नाही हे यापूर्वी अनेकांनी दाखविलेले आहे. अनेक महत्त्वाच्या अज्ञात स्मृती आहेत. त्याखेरीज स्मृतिसमुच्चयात काही स्मृती आहेत. व त्यात क्षेपक भाग असण्याचा संभव पुष्कळ आहे. त्यातील माहितीही क्षेपक असण्याचा संभव आहे. स्मृतिस्थळावर अंतिम हात शके १३५२ च्या सुमारास फिरला हे मान्य केले तर मूळ घटना घडून गेल्यानंतर पाऊणशेहन अधिक वर्षे श्रद्धेची सामग्री येथे प्रविष्ट होते आहे असे दिसते.
 नागदेवाचा काळ अपरिहार्यपणे महदाइसेच्या काळावर प्रकाश टाकीत असतो. नागदेवाचार्य व महदाइसा ही चुलत भावंडे. नागदेव व त्याचे भाऊ ह्यांच्या मुंजी झाल्यानंतर लहानपणीच त्यांचे विवाह झाले. ह्याच सुमारास उमाइसा व महदाइसा यांचे विवाह झाले. ह्या विवाहाच्या वेळी नागदेवाचार्य लहान होते. म्हणजे त्यांचे वय १०-१२ वर्षांचे असावे आणि उमाईसा ही नागदेवाची धाकटी बहीण किमान ३ वर्षांनी तरी त्यांना लहान असणार. म्हणून महदाइसा सुमारे ८-९ वर्षांची ह्या वेळी असणार. महदाइसा नागदेवाचार्यांना निदान दोन वर्षांनी तरी धाकटी मानणे भाग आहे. कारण त्या वेळी लहान वयातच मुलींची लग्ने होऊन जात. परंपरेनुसार नागदेवाचार्य शके ११६२ ला जन्मले. हे गणित मनात ठेवूनच वा. ना. देशपांडे महदाइसेचा जन्म शके ११६४ सांगतात. काही जण सोयिस्करपणे पुष्कळदा काळाचे उल्लेख करतात. डॉ. तुळपुळे ह्यांनी महदाइसेचा काळ अंदाजाने शके ११५० ते १२२५ असा ठरविला आहे. हा काळ खरा मानायचा तर रूप ही नागदेवाला १२ वर्षांनी वडील मानली पाहिजे व तिचे लग्न नागदेवाच्या जन्मापूर्वी व्हायला हवे. पारखे ह्यांच्या गणनेनुसार नागदेवाचा जन्म शके १२७१ चा मानला तर महदाइसा शके १२७३ च्या सुमारास जन्मली, असे मानावे लागेल. चक्रधरस्वामींच्या प्रयाणसमयी महदाइसेचे वय २५ च्या आसपास फार तर येईल. वय वर्षे २० ते २५ महदाइसा स्वामींच्या सहवासात होती असे मानावे लागेल. चक्रधरांच्या तोंडी नेहमी 'म्हातारी ' असा उल्लेख येतो. या म्हातारीचा वयाशी संबंध नसून त्या शब्दाचा अर्थ स्त्री इतकाच घेणे भाग आहे. ह्याला अनुसरून स्वामींच्या परिवारातील अनेकांची वये गृहीत धरावी लागतील. एरव्ही नागदेवाने ज्यांना तरुण म्हणावे त्यांना पुढच्या चार-दोन वर्षांत चक्रधरांनी म्हाताऱ्या म्हणावे ह्याची संगती लागत नाही.
 महदाइसेचा उल्लेख निघालाच आहे तर हयाच ठिकाणी अजून काही गोष्टींचा उल्लेख केलेला बरा. महदाइसेने रुक्मिणीस्वयंवरे रचली किती ? धवळयांच्यामध्ये रचलेला रुक्मिणीस्वयंवराचा पूर्वार्ध शके १२०८ पूर्वीचा म्हणजे गोविंदप्रभूंनच्या निधनापूर्वीचा आहे. उत्तरार्ध ह्यानंतर दहा-बारा वर्षांनंतर म्हणजे शके १२२० च्या सुमारास इतरांच्या सहाय्याने रचला असे मानतात. व्यक्तिश: मला इतरांच्या साह्याची कल्पना स्मृतिस्थळात आलेली असली तरी पटत नाही. पण मातृकी-रुक्मिणीस्वयंवराचे काय ? असे एखादे रुक्मिणीस्वयंवर महदाइसेने रचल्याचा स्मृतिस्थळात उल्लेख नाही. केवळ स्मृतिस्थळात उल्लेख नाही इतक्यामूळे मातृकीरुक्मिणीस्वयंवराचे कर्तृत्व विवाद्य ठरते काय ? आज तरी ह्याबाबत निर्णायक असे काही सांगणे शक्य नाही. महदाइसेला ओव्या गाण्याचा नाद होता. ती ओव्यांच्या मधून कृष्णचरित्र गाई. ती सिद्ध कवियित्री होती ह्याला लीळाचरित्र व स्मृतिस्थळ दोन्ही ठिकाणी पुरावा आहे. जर हा पुरावा खरा मानला तर महदाइसेने ओव्यांच्या मधुन कृष्णचरित्र गाणे हे तर संभाव्य वाटतेच पण धवळेसुद्धा तिने वेळोवेळी रचले असावेत असे दिसते. गोविंदप्रभूच्या विवाहाच्या प्रसंगी ते गायिले असावेत इतकेच तथ्य शिल्लक राहते. महदाइसेसारख्या सिद्ध कवियित्रीला परमेश्वराचा आशीर्वाद धवळे गाण्यासाठी लागावा असे कोणते अलौकिकत्व धवळ्यात दिसत नाही. विवाहमंगल गीतांच्या साध्यासुध्या परंपरेतील ही रचना आहे.
 ह्या मातृकी-रुक्मिणीस्वयंवराला एक महत्त्व आहे. नरेंद्राच्या रुक्मिणीस्वयंवरापूर्वीसुद्धा महानुभाव संप्रदायात कृष्णचरित्र सांगितले, ऐकले जातच होते. स्वतः चक्रधरच अनेकदा कृष्णकथा सांगत असत. ह्याच्या खुणा ' लीळा चरित्रा' त आहेत. ह्या दृढ आधारावरच पुढे चक्रधरोक्त 'श्रीकृष्ण-चरित्र' हा ग्रंथ सजविला गेला आहे. वाढविला गेला आहे. माझे मित्र डॉ. ढेरे ह्यांनी ह्या चक्रधरोक्त श्रीकृष्ण-चरित्रात असणा-या रुक्मिणीस्वयंवर-कथेकडे लक्ष वेधले आणि हे दाखविले की, नरेंद्रात असणारी किन्नराची कथा सदर कृष्णचरित्रात आहे. लोकपरंपरेने कृष्णचरित्र सारखे प्रवाहित होत आले आहे. भागवतात नसणाऱ्या कितीतरी कथा अशा परंपरेत आलेल्या आहेत. शापित किन्नराची कथा अशी लोकपरंपरेने चालत आलेली कथा असावी काय ? ती चक्रधर सांगत असावेत काय ? डॉ. ढेरे यांनी प्रथम असे मत दिले की, ही किन्नरकथा चक्रधरोक्त आहे. तेथून नरेंद्राने उचलली व वाढविली. नंतर त्यांनी असे मत दिले की, मुळात चक्रधरोक्त ' श्रीकृष्णचरित्र'च उत्तरकालीन आहे. हे कृष्णचरित्र लिहिणाऱ्यांनी नरेंद्राची उचल केली. मातृकी रुक्मिणीस्वयंवर महदंबेचे काय ? ह्या प्रश्नाला महत्त्व आहे. कारण त्यात किन्नर कथेचा उल्लेख आहे. महदाइसेने जर आधार स्वीकारलेला असला तर तो चक्रधराने सांगितलेल्या कथांचा असणार हे उघड आहे. ती इतर कुणाच्या कथेचा आधार घेण्याचा संभव कमी.
 आमचे संशोधक कधीकधी गमती करतात. कै. वा. ना. देशपांडे ह्यांनी मातृकी-रुक्मिणीस्वयंवर आणि नरेंद्राचे काव्य ह्यांतील साम्यस्थळे दाखविलेली आहेत, व त्यासाठी उदाहरणे १२३३ व्या ओवीनंतरची घेतली आहेत. ८७९ ओवीनंतरची रचना नरेंद्राची नव्हे हे तर प्रसिद्धच आहे. आता तर अनेक परिपूर्ण रुक्मिणी स्वयंवरे (वेगवेगळ्या ओवीसंख्येची) डॉ. कोलते ह्यांनी उजेडात आणून, नरेंद्राचे काव्य अनेकांनी पूर्ण केले आहे, हे सत्य सिद्धच केलेले आहे. काळाच्या चर्चा, ग्रंथाचे प्रामाण्य, ग्रंथाचे परस्परसंबंध असा एक चिकित्सेचा मोठा भाग आहे. अधिक मोठेपणाने ह्या चर्चा इथून चालणार आहेत असे दिसते.
 चिकित्सेचा दुसरा प्रकार म्हणजे महत्त्वाची असणारी प्रस्तुत असणारी पण फारशी प्रसिद्ध नसणारी माहिती प्रकाशात आणणे व तिचा अनुबंध जोडणे हा होय. ह्या क्षेत्रातला अगदी छोटा मुद्दा असा आहे की, नागदेवाचार्य जर अनुसरण झाल्यानंतर काही काळ पत्नीकडे राहावयास गेले असतील व नंतर वैराग्यदेवाचा जन्म होणार असेल तर मग नागदेवाचे चक्रधरसन्निधान चार वर्षांचे राहत नाही; निदान काही महिने कमी होते. जर नरेंद्र, रसाचा प्रमुख कंद मराठी असून इतर भाषांत तिच्यातून रस गेला, असे मानीत असेल तर मग रुक्मिणी-स्वयंवर रचण्यापूर्वीच नरेंद्र संप्रदायात आलेला असणे भाग आहे. नरेंद्राच्या कवितेवरसुद्धा अभिप्राय नागदेवाचार्यांचा नाही, इतरांचा आहे, ही घटना चिंत्य आहे. पण ह्या छोटया मुद्द्यांच्यावर फार रमण्यात अर्थ नाही. ह्या क्षेत्रातील मुख्य चर्चा स्वाभाविकपणे लीळाचरित्राभोवती केंद्रित होणार आहे. आज आपणासमोर जे 'लीळाचरित्र' पीढीपाठ म्हणन आहे ते माहिमभट्टांनी जसे लिहिले तसे नाही. लीळाचरित्रात 'वासना' आहेत. त्याचप्रमाणे 'शोधणी'ही आहेत. उपलब्ध 'लीळाचरित्र' शोधणीनंतरचे आहे. त्याच्या ठळकपणे पीढीपाठ, तळेगावकर पाठ, वाईंदेशकार पाठ अशा तीन परंपरा आहेत. नेत्यांनी सापडली ती प्रत प्रमाण मानून छापून काढली. इतकी निःशंकता नव्या संशोधकांना दाखवता येणार नाही. आता नव्याने लीळाचरित्राची अधिकृत प्रमाणप्रत व शास्त्रशुद्ध प्रत तयार करण्याचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही नवी आवृत्ती आपण कशी सिद्ध करणार ? माझा या क्षेत्राचा फारसा परिचय नाही. पण माझ्या समोर ह्या नव्या आवृत्तीबाबत दोन परस्परभिन्न कल्पना आहेत. ह्या दोन्ही कल्पना ज्येष्ठ विद्वानांच्या असल्यामुळे त्या समजून घेण्याजोग्या आहेत.
 एक कल्पना डॉ. भाऊसाहेब कोलते ह्यांच्या मनात घोळते आहे. माझ्याशी बोलताना भाऊसाहेबांनी आपली कल्पना थोडक्यात मला सांगितली होती. मला समजली त्याप्रमाणे मी ती कल्पना नोंदवितो. त्यात काही चुकभूल झाल्यास ती माझी समजावी.
 भाऊसाहेब कोलते हे पीढीपाठाचे अभिमानी आहेत. ह्या अभिमानाचे कारण इतर कोणतेही नसून फक्त एकच आहे की, तळेगावकर पाठ व वाईदेशकर पाठ हे उत्तरकालीन आहेत. कोलते ह्यांनी तळेगावकरपाठ शके १३५० च्या आसपास तयार झाला, असे मत दिले आहे. वाईदेशकर पाठाची कोलते ह्यांना उपलब्ध झालेली जुनी प्रत सुमारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा वाईदेशकर पाठही जुना आहे हे उघड आहे. हा पाठही सहजच शकाच्या पंधराव्या शतकात नेऊन बसवावा लागेल. तेव्हा तीनही पाठ पुरेसे प्राचीन आहेत. कोलते ह्यांचे मत असे की, लीळाचरित्राच्या शके १५०० पूर्वीच्या उपलब्ध असणाऱ्या सर्व पोथ्या गोळा कराव्यात. ही सर्व प्राचीन हस्तलिखिते आहेत. ह्या हस्तलिखितांच्या आधारे प्रमाण प्राचीन पाठ ठरवावा. प्रक्षेपही ह्यामुळे निश्चित होतील. ह्याप्रमाणे आपण प्रमाण लीळाचरित्राच्या अधिकृत आवृतीकडे जाऊ शकतो. जास्तीत जास्त प्राचीन अशा अनेक हस्तलिखितांच्या आधारे अधिकृत पाठ निश्चित करावा हा राजमार्ग आहे, व तोच कोलते ह्यांच्या समोर आहे. तेव्हा ही भूमिका महत्त्वाची व शास्त्रशुद्ध आहे ह्यात वादच नाही.
 पण वाद निराळा आहे. कारण पीढीपाठ जुना आहे, असे पीढीपाठ मानणाऱ्यांचे म्हणणे आहे. तळेगावकर व वाईदेशकर परंपरेचे महंत आपला पाठ उत्तरकालीन व वाढविलेला आहे असे थोडेच मान्य करणार ? सर्वचजण स्वतःच्या पाठाचा अस्सलपणाच आग्रहाने सांगणार. बरे, कित्येकदा असे दिसते की, इतर पाठांतील माहिती सर्वांना स्वीकारावीच लागते. चक्रधरस्वामींचे चक्रधर हे नावच पीढीपाठाच्या आधारे आलेले नसून तळेगावकर पाठाच्या आधारे आलेले आहे. स्वामींचे चरित्र सांगताना अनेकदा वाईदेशकर पाठाचा स्वीकार करणे भाग असते. अलीकडे असेही आढळून येऊ लागले आहे की, वाईदेशकरपाठात अनेकविध प्रकारची महत्त्वाची माहिती आहे. लीळाचरित्राची जी पीढीपाठाची म्हणून हस्तलिखिते असतात त्यात पीढीपाठात प्रमाण नसणारा पुष्कळ मजकूर आढळतो. ह्यामुळे पोथ्या उत्तरकालीन असल्या तरी त्यात महत्त्वाची प्राचीन माहिती संग्रहित झालेली दिसते. प्रक्षेप व परिवर्धन म्हटले तरी त्याला काही कारणे असणारच. चक्रधरांना भेटलेली मुक्ताई योगिनीच घ्या. ही मुक्ताई योगिनी, विक्रमाची भावजय व धारानगरीच्या राणीवशातील दिसते. ही माहिती पीढीपाठात नाही. पण वाईदेशकर पाठात आहे. आणि ती माहिती प्राचीन परंपरेने आलेली व खरी माहिती दिसते. म्हणन डॉ. ढेरे ह्यांचे मत असे आहे की, परंपरांचा विचार न करता प्रतीचा विचार करावा व एकूण उपलब्ध लीळाचरित्राच्या पोथ्यांमधील एकूणएक पाठ नोंदविणारी आवृत्ती काढावी. अशा आवृत्तीशिवाय धर्मपरंपरेचा अभ्यास नेमकेपणाने करता येणार नाही, सांस्कृतिक इतिहासातील रहस्ये उलगडणार नाहीत, असे ढेरे यांना वाटते. परंपरेने वाढत जाणाऱ्या ग्रंथाच्या प्रती सिद्ध करण्यासाठी ढेरे यांची पद्धत अधिक महत्त्वाची आहे, असे मला वाटते.
 लीळाचरित्राचे स्वरूप काही प्रमाणात महाभारतासारखे समजायला हवे. महाभारताच्या उत्तरी व दक्षिणी अशा दोन प्रमुख परंपरा. तरीही तंतोतंत एकमेकाशी जुळतील अशी हस्तलिखिते फार थोडी. अशा वेळी सर्वच हस्तलिखिते, सर्व परंपरा विचारात घेणे भाग असते. प्रमाण म्हणून आपण एक पाठ मान्य करू, पण इतर सारा प्रक्षेप क्रमवार परिशिष्टात अगर तळटीपांत यायला हवाच. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीसाठी अठराव्या शतकाव्या उत्तरार्धापर्यंतची हस्तलिखिते संपादकांनी विचारात घेतलेली आहेत. ढेरे ह्यांचे हेच म्हणणे आहे. सर्व अन्याय, सर्व परंपरा विचारात घेण्याची गरज त्यांना भासते.

 अशी गरज नव्या संशोधकांना भासण्याची कारणे आहेत. कारण चिकित्सा नव्या टप्प्यावर जात आहे. जर अनेक महानुभाव ग्रंथकार, नागदेवाचा गुरुबंध म्हणून रामदेवाचा उल्लेख करू लागले व रामदेवांचा शिष्य म्हणून विवेकसिंधुकार मुकुंदमहाराजाचा उल्लेख करू लागले तर मुकुंदराजाचे गुरू रामचंद्र व नागदेवाचार्यांचे गुरुबंधू रामदेव दादोस हे एकच की काय, चक्रधर व हरिनाथ एकच की काय, असे प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. रामदेव दादोसा हे विद्यावंत व भक्त वेदांती होते काय, हा प्रश्न निर्माण होणारच. चांगदेव राऊळ, गंडमे राऊळ अशी नावे पाहिली की शैवाच्या रावळ शाखेशी संप्रदायाचा संबंध काय हा प्रश्न येणारच. कोणताही संप्रदाय हवेत अधांतरी असा नसतो. भोवतालच्या वातावरणातूनच सर्वांनीच उचल केलेली असते. तेव्हा इतर धार्मिक दर्शनांशी महानुभाव अनुबंध कोणता, हा प्रश्न निर्माण होणारच. असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. लीळाचरित्रात नसणाऱ्या बाबींचे उल्लेख जर बाइदेवबासाच्या 'पूजावसारा'त येऊ लागले तर प्रश्न निर्माण होतातच, हे प्रसंग लीळाचरित्रात का आलेले नाहीत ? लीळाचरित्रात लीळा निवडताना डोमेग्रामला प्राधान्य का आलेले नाही ? अज्ञात लीळा म्हणून ज्या सापडतात त्यांना उत्तरकालीन दंतकथाच समजायचे, की ह्यापेक्षा काही अधिक महत्त्व ह्या लीळांना आहे? गोविंदप्रभू चरित्रात चक्रधरोत्तर हकिकतींना प्राधान्य का आले ? त्या पूर्वीच्या प्रदीर्घ जीवनातील लीळांची वर्णने का नाहीत ? स्वतः गोविंदप्रभूचा संप्रदाय कोणता? ह्या साऱ्या प्रश्नांची नवे संशोधक कोणती उत्तरे देतात ते आता पाहावयाचे आहे.

 माझी अशी धारणा आहे की, ह्या सगळ्या अभ्यासात आपण वाङ्मयीन पुराव्याला फार मोठे महत्त्व देत आहोत. आणि समाजशास्त्रीय पुराव्याला अगदीच टाळून देत आहोत. समाजशास्त्रीय पुरावा गोळा करण्याची जबाबदारी एक ना एक दिवस अभ्यासकांना स्वीकारावी लागेल. कारण हा पुरावा काळजीपूर्वक गोळा केल्याशिवाय एखाद्या धर्मसंप्रदायाचा अभ्यास पूर्ण होणारच नाही. महानुभावाची सर्व धर्मक्षेत्रे, त्या ठिकाणी चालू असणारे सर्व विधी व मंत्र, दीक्षितांचे एकूण आचार, अनुयायाचे सर्व विधी, सण, कुलाचार, विवाहपद्धती, संन्यास घेण्याचा विधी, अंत्यक्रिया असा जीवनाचा एकूण धर्मसंबंध भाग तपशिलाने प्रत्यक्ष पाहणी करून नोंदवावा लागेल. जर महानुभावांचे विवाह पंथाबाहेर होत असतील तर हिंदुधर्माचा एक संप्रदाय हे त्याचे रूप सिद्ध होईल. प्रत्यक्ष व्यवहारात रोटीबेटी संबंध करावे लागतील. असा सगळा ह्या संप्रदायाचा सामाजिक इतिहास पाहावा लागेल.

 आमच्या भागात काही ब्राह्मण कुटुंबे महानुभाव संप्रदायानुयायी आहेत. ह्या कुटुंबात कुणी संन्यास घेतला तर तो महानुभाव मठात जातो. एरव्ही श्राद्ध, विवाह, नाव ठेवणे अशा संस्कार प्रसंगी सर्व विधी वैदिक पद्धतीनुसार होतात. जेवणास महानुभाव संन्यासी असतो. संस्कारप्रसंगी महानुभावसंन्यासी आवश्यक असणे एवढा भाग सोडता ही कुटुंबे वैदिकच आहेत. इतरत्र काय परिस्थिती आहे याचा शोध घ्यावा लागेल. नव्या अभ्यासाचा हाही एक महत्त्वाचा भाग राहील. सतत वाढणारा अभ्यास व चिकित्सा अंतिमतः पंथीय व पंथेतर या सर्वांनाच हिताची ठरेल असा माझा विश्वास आहे.


🙝