परिपूर्ती/जुळी मुले
९
जुळी मुले
वाचीत होते. कुंतीने आपल्या मंत्रसामर्थ्याच्या
जोरावर यम, इंद्र वगैरे देवांकडून तीन मुलगे
मिळवले, त्याच्यापुढचा कथाभाग होता तो.
माद्री पांडूला म्हणत होती, राजा, तुला व्यंग
असले तरी मी कधी मनाचा संताप केला नाही,
पण तिला तीन मुले व्हावी आणि मला मात्र एकही
नसावे ह्याचेच मला दु:ख होते. ती तर
बोलूनचालून सवत, तिजजवळ मी ही गोष्ट कशी
काढणार? तर तूच माझ्या वतीने कुंतीजवळ
याचना कर, त्यामुळे माझी तृप्ती व तुझा लाभ
अशा दोन गोष्टी साधतील." माद्रीचे म्हणणे पटून
राजाने माद्रीसाठी कुंतीची मनधरणी केली, व
कुंतीनेही उदार होऊन कोणत्याही दैवताचे एकदा
चिंतन करावयास माद्रीस सांगितले. माद्रीने
विचार करून अश्विनीदेवांना बोलावले, व
त्यांच्याकडून तिला अत्यंत सुंदर अशा दोन
मुलांची प्राप्ती झाली. काही दिवस गेल्यावर
राजाने परत माद्रीसाठी शब्द टाकला, तेव्हा कुंती
म्हणाली, “तिला एक मंत्र दिला त्याच्या बळावर
तिने जुळे मिळविले! मी बिचारी चांगलीच
आमचे बायकांचे मेले दैवच असे! मी वेडी, माझ्या काही लक्षात आले नाही
की, द्वंद्वाचे पाचारण केले म्हणजे दोघांची प्राप्ती होते ते. राजा, आता
मुलांच्यासाठी मला भरीस घालू नको. आता एवढे माझे मागणे ऐक."
अर्थातच मुले होण्याच्या खटाटोपातून कुंतीने अंग काढून घेतले व
माद्रीलाही काही करता येणे शक्य नव्हते म्हणून पांडव पाचच राहिले. मी
हसले व म्हटले, “वा रे सवती-सवतीचे भांडण!"
पण माझ्या वाचणाऱ्या मनाच्या मागे उभे राहून, माझ्या खांद्यावरून
पुढे डोकावून, माझे दुसरे एक मन तोच मजकूर वाचीत होते. त्याचे काही
समाधान झाले नाही. वाचलेल्या प्रसंगाला 'सवतीमत्सर' अशी चिठ्ठी
चिकटवून अनुभूतीच्या कपाटात तो टाकून पुढे जावे असे त्याला वाटेना
आणि ह्या त्या आगंतुक, मला माहीत नसलेल्या, मनाच्या हेकटपणामुळे पुढे
वाचण्याकडे लक्ष लागेना, व मला पुस्तक मिटावे लागले. ते मन जुन्या
अनुभूतींच्या भूमीत पुरलेली काहीतरी गतस्मृती हुडकून काढण्यात गढले
होते. सापडले वाटते ते गतस्मृतीचे हाडूक, व त्याचबरोबर दोन्ही मनांची
जुळणी पण झाली; कारण त्याच क्षणी मी उल्हासले, पुस्तक परत उघडले.
ज्या मजकुरावर माझे दुसरे मन घोटाळत होते तो परत वाचला, “न ज्ञासिषम
अहं मूढा द्वंद्वाह्लाने फलद्वयम।" ही ती ओळ होती. माद्रीने पुत्रार्थ जुळे देव
बोलावले व ह्या युक्तीने एका आवाहनात दोन मुलांचा लाभ घेतला. मग काय
मरुदगणांचे चिंतन केले असते तर तिला एकदम अकरा मुले झाली असती?
मला आठवले की, युरोपातील काही जुनी गाणी वाचीत असता त्यात
एक अशी कथा होती की, एका व्यभिचारिणीला जुळे मूल झाले तेव्हा तिचा
व्यभिचार सिद्ध झाला असे समजून तिला व मुलांना लोकांनी ठार मारल.
त्याच्याबरोबर कित्येक वर्षे न सुटलेल्या एका कोड्याचा निकाल लागतोसे
वाटले.
रामाने सीतेला टाकले- लोकापवादावरून टाकले - ही एक अशा
घटना आहे की, त्यापुढे मान तुकवायला माझे मन कधीही तयार होत नाही.
लहानपणी मला राम ह्या व्यक्तीबद्दल द्वेष व संताप येई. स्वतःच्या
मोठेपणासाठी त्याने आपल्या बायकोचा बळी दिला असे माझे अगदी ठाम
मत असे. आमच्या शाळेत किंवा हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमात
जेवणाच्या वेळी मुली “सीताकांतस्मरण जयजयराम' म्हणतात. मला
त्यापेक्षा पार्वतीवर मनापासून प्रेम करणारा, राकट, जंगली शंकर पत्करला. लहानपणी मन कसे स्वच्छ असते! त्याची प्रवृत्तीसुद्धा कशी सरळ असते! तेव्हा मनात फक्त राग येई. मोठेपणी मन संस्कारित झालेले, फाटे फुटलेले, गढूळ झालेले- आता परित्यक्ता स्त्रियांनी आश्रमात “सीताकांतस्मरण' अशी घोषणा केली की मनात राग येऊन राहात नाही तर "खरेच, रामासारख्या माणसांमुळेच तर असले आश्रम भरतात, तेच असल्या संस्थांचे आश्रयदाते, तेव्हा त्यांचे स्मरण योग्यच आहे! असा कडू, कुटिल विचारही मनात डोकावतो. कालिदास व भवभूती वाचून रामाबद्दल वाटणारा संताप कमी झाला, पण त्याची जागा तिरस्काराने घेतली. चांगले-वाईट काय, न्याय्य-अन्याय्य काय, हे माहीत असूनही चांगल्याची व न्यायाची कास ज्याला धरता येत नाही त्याची कीव करावी का तिरस्कार करावा? सीतेलासुद्धा तसेच वाटले असले पाहिजे. नाहीतर शेवटी ती मानिनी पृथ्वीच्या पोटात जाण्याचे का पत्करती? रामाची सत्यप्रियता, चांगुलपणा, सीतेवरील प्रेम ह्यांचा सीतात्यागाशी मेळ कसा घालावयाचा? काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्र-साहित्य पत्रिके'त 'अंकुशरामायण' म्हणून बायकांचे एक गाणे त्रुटित स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. माझ्या ऐकण्यात निरनिराळ्या स्त्रियांकडून त्या गाण्यातील मधल्यामधल्या ओव्या आलेल्या होत्या. ते गाणे रचणाऱ्या बाईला वा बुवाला पण सीतारामाच्या गोष्टीचे कोडे पडलेले दिसते. पण ते मात्र अगदी निराळे कोडे, मला पडलेले नव्हे. सीता शुद्ध तर तिला दोन मुले एका वेळी झालीच कशी? ह्या कोड्यातून त्याने एक विलक्षण युक्ती योजून आपली सुटका पण करून घेतली. त्या गाण्यात खालील कथा सांगितली आहे. रामाने टाकल्यावर सीतेचा प्रतिपाळ वाल्मिकीने केला. वाल्मिकीला बायांच्या गाण्यात सर्वत्र 'तातोबा' असे नाव आढळते. ह्या तातोबाच्या आश्रमातच ती बाळंत झाली व तिला एक सुंदर मुलगा झाला, त्याचे नाव लह. एकदा सीता मुलाला पाळण्यात ठेवून नदीवर धुणे धुवावयास गेली, तेथे तिला एक माकडीण भेटली. तिने विचारले, “सीते, नदीवर काय करतेस?" सीता म्हणाली, “माझी न बाळाची धुणी धुते." माकडीण आश्चर्याचे उद्गारली, “काय? तुला अगदीच कशी माया नाही? तेथे पाळण्यात एकट्याला कोणी काही इजा केली म्हणजे? मी बघ, माझ्या पोराला कधी विसंबते का? बघ, माझ्या पाठीवर नाहीतर पोटावर त्याला
बाळगते. धन्य आहे तुम्हा माणसांची!" हे ऐकून सीता घरी गेली व बाळालाघेऊन आली. तिने बाळाला शेजारच्या एका दगडावर, आपल्यापासून
जवळच असे ठेवले व ती धुणी धुऊ लागली. सीता बाळाला घेऊन गेल्यावर
थोड्याच वेळाने रानातून कंदमुळे, फळे वगैरे घेऊन तातोबा आले.
नित्याप्रमाणे त्यांनी बाळाच्या पाळण्यात डोकावून पाहिले तो बाळ नाही!
म्हाताऱ्याला धक्काच बसला. कोणी श्वापदाने बाळाला पाळण्यातून ओढून
नेले वाटते! आता सीता परत आली आणि तिला हे कळले म्हणजे ती
आकांत करील- ती खात्रीने प्राणच टाकील- असा मनात विचार येऊन
सीतेला दु:ख नको म्हणून ऋषींनी योगबलाने गवतापासून नवा मुलगा उत्पन्न
केला व त्याला पाळण्यात घालून आंदुळत बसले. धुणी झाल्यावर कडेवर
मूल व डोक्यावर धुणी अशी सीतामाई घरी येऊन पोहोचली. पाहते तो
तातोबा पाळणा हालवीत बसले आहेत व पाळण्यात एक बाळ! तशी ती
म्हणते, “माझे बाळ माझेपाशी! तुम्ही हालविता कोणाशी?' सर्व घटनेचा
उलगडा झाल्यावर वाल्मिकीने तिला नव्या बाळाचा पण स्वीकार करावयास
सांगितले व “लह तो पोटीचा। आकोस (अंकुश) धर्माचा। सीताबाई झाला।
पवाडा तुझ्या कर्माचा।।" ह्या ओळींनी हे कथानक संपते. कवीच्या मते ह्या
विलक्षण घटनेने सीतेला दोन मुले झाली अशी वार्ता सर्वत्र पसरली व तिच्या
चारित्र्याचा डांगोरा जगभर झाला. लोकांना त्या दुसऱ्या मुलाच्या उत्पत्तीचा
खरी कथा माहीत असती तर सीतेला रामाने परत घेतली असती. सीतेच्या
शुद्धतेविषयी जशी कवीची खात्री, तशी जुळी मुले अव्यभिचारिणीला होणे
शक्य नाही हीही खात्री. बरे, दोन मुले होती अशी तर मूळ कथा! तीही खोटी
म्हणणे शक्य नाही. म्हणून उदभवलेल्या पेचातून सुटण्यासाठी त्याने वरील
युक्ती योजली.
आणि ह्या जुन्या गाण्यात व कुंतीच्या उदगारांत तर सीतात्यागाच्या
रहस्याचा उलगडा नाही ना? सीतेबद्दल लोकांत प्रवाद होता. रामाने तिला
वाल्मिकीच्या आश्रमात पोहोचवली व ती बाळंत झाल्यावर, तिला व
मुलाला वाल्मिकीने पुढे घालून आणावे व परत तिचा स्वीकार व्हावा असा
बेत झाला असावा. मुलगा चक्रवर्तिचिन्हांकित आहे, रामाचाच
असल्याबद्दल दैवी पुरावे, आकाशवाणी, सर्व काही ब्राह्मणांच्या साहाय्याने
करता येणे शक्य होते; पण दुर्दैवाने तिला जुळेच झाले! लोकभ्रमाला सीता
बळी पडली नाही. “द्वंद्वाह्लाने फलद्वयमा' हा त्या वेळचा केवळ
होते- अगदी पक्का युक्तिवाद होता. म्हणूनच तर आकाशवाणी वगैरे नेहमीच्या दैवी चमत्कारांचा उपयोग नव्हता. जेथे ज्ञान किंवा शास्त्र लंगडे पडते अशा ठिकाणी दैवी उपायांचा अवलंब केला जातो; पण ज्या वेळी एखादी गोष्ट पक्की नि:संदेह माहीत असते, तेव्हा दैवी उपायांच्या मदतीची आवश्यकता नसते. जुळे होईपर्यंत जी गोष्ट केवळ प्रवादरूपाने होती ती आता नि:संदेह सिद्ध झाली होती व त्यावर सीतेचे लोकविलक्षण भयंकर दिव्य हाच एकमेव उपाय होता. तेव्हापासून आतापर्यंत जुळी मुले म्हणजे व्यभिचाराचा पुरावा असा समज असूनही सीतेच्या शुद्धत्वाविषयी सर्व प्राचीन व अर्वाचीन कवींची खात्री आहे, अगदी जुळे झाले तरीसुद्धा खात्री आहे! मराठी कवीप्रमाणे जुळे झालेच नाही असे म्हणण्यापर्यंत कित्येकांची मजल जाते. लोकांच्या अगदी रुजून बसलेल्या समजुतीविरुद्ध घटना होऊनही सीतेने हा कौल कसा मिळविला? रामाला सीतेचा परत स्वीकार करण्याची इच्छा होती. सीतेचे तर सर्व हृदय राममयच होते. रामाच्या प्रेमाचा उपभोग परत घ्यावयास तिचेही मन आसावलेलेच होते. पण प्राप्त परिस्थितीत वसिष्ठ, अरुंधती व वाल्मिकी ह्यांच्या सांगण्यावरून रामाने तिचा स्वीकार केला असता तरी लोकप्रवादाने ताबडतोब परत उचल खाल्ली असती, व त्यांच्या सासारिक जीवनात प्रवादाचा विषार परत भिनला असता. प्राप्त परिस्थितीत पूर्वीचा प्रसन्न, आनंदमय संसार करणे अशक्य होते. हे सर्व जाणूनच सीतेने मुलांचा, प्रियकराचा, राणीपणाचा एका क्षणात त्याग केला. ह्या असामान्य त्यागानेच त्या वेळच्या शास्त्राला खोटे ठरविले, व ज्या सीतेला जिवंत राहून उजळ माथ्याने वावरता येणे शक्य नव्हते ती मृत्यूने शुद्धचरित्रा, प्रेममय, साध्वी सीता म्हणून भारतात अमर झाली.