template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).


१८
परिपूर्ती

 “आपल्या आजच्या व्याख्यात्या श्री....
ह्यांच्या कन्या आहेत..."
 माझी ओळख करून देणाऱ्या बाईंच्या
बोलण्याला सुरुवात झाली. त्यांचे बोलणे मी
अर्धवट ऐकत होते; पण मन मात्र बाईंच्या
बोलण्याने जाग्या झालेल्या स्मृती आणि कल्पना
ह्यांत गुंतले होते. “एकदा लग्न उरकून टाकले
म्हणजे जबाबदारी सुटली" असे बाबांचे बोलणे
मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून ऐकले होते.
माझा पुढे शिकण्याचा हट्ट, बाबांचा त्रागा, शेवटी
"कर, काय वाटेल ते कर" ह्या शब्दांनी मोठ्या
कष्टाने दिलेली परवानगी हे आठवले व तीच
भाषा, तेच भांडण आणि तोच शेवट दरवर्षी
परीक्षेच्या शेवटी कसा व्हायचा... हे आठवून
क्षणभर हसू आले. ते रागात आले म्हणजे अस्सल
प्राकृतात पाच-पन्नास शिव्या हासडून बोलत.
आम्ही जरा मोठी झाल्यावर तर रोज ह्या नाही त्या
गोष्टीवरून वादविवाद व शेवटी भांडण ठरलेलेच
होते. ते जितके तापट तितकी आई शांत. त्यांनी
म्हणावे, “ह्या पोरांच्या तोंडास तोंड देण्यानं
टेकीस आलो." तिने म्हणावे, “सगळी तुमच्या

वळणावर गेली आहेत," की त्यांनी चूप बसावे.
१५६ / परिपूर्ती
 

त्यांचे प्रेमातले भाषण म्हणजे असेच. मुलींना ते 'म्हैस' म्हणत व मुलांना 'बैलोबा'. आम्हाला मुले झाल्यावर ही प्रेमाची बिरुदे ते नातवंडांना लावू लागले.
 "ह्यांनी आपलं सर्व आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीकरिता वेचलं..." बाई बोलत होत्या तिकडे माझे लक्ष गेले. हे उदगार बाबांबद्दल खास नव्हते. “ह्यांनी काढलेल्या स्त्री-शिक्षण संस्था सुपरिचित आहेत.” अस्से, अस्से. आता मामंजींबद्दल बोलत आहेत वाटते. ठीक, चालू द्या. आहे अजून बराच अवकाश. मी जरा पाय लांबवले, कोचावर अंग जरा जास्त रेलले व डोळे फार वेळ न मिटण्याचा निश्चय केला. “सर्व स्त्रियांना त्यांनी आपल्या ऋणात बांधलं आहे." माझी ओळख करून देणे चालूच होते- खरंच, मामजीना मला कोणत्या ऋणात बांधले आहे? त्यांच्या मुलाची बायको म्हणून मी त्यांची ह्यापलीकडे त्यांच्या-माझ्यात काही बंधन होते का? लग्न होऊन मी घरी आले तेव्हा निदान सासरचे वडील माणूस म्हणून फक्त कर्तव्यभावना तरी होती. त्यांचीही माझ्याबद्दलची भावना अशीच असावी. मुलाला आवडली ना, मग माझे म्हणणे नाही. एका माणसासाठी सर्वस्वी अनोळखी माणसांत मी जाऊन पडले होते. ती माझ्याबद्दल साशंक होती, मी त्यांच्याबद्दल होते लौकिकात मी त्यांना व त्यांनी मला आपले म्हटले होते. पण मने मिळायची होती. त्याच्यासाठी किती तरी काळ लोटायचा होता. मला त्यांचे करायचे होते, त्यांनी माझ्या उपयोगी पडायचे होते. किती भांडणे व्हायची होती, कितीदा समजुती काढायच्या होत्या! प्रत्येक सासुरवाशीण ह्याच चक्रातून जात असणार, सासरची माणसे हीन असली तर ज्या माणसाच्या पप्रेमामुळे मुलगी घरात आली त्याचेसुद्धा प्रेम नाहीसे करून तिला निराधार करून टाकतील. पण माझ्या सासरची माणसे सुवृत्त, चारित्र्यसंपन्न अशी होती. दर भाडणातून, आयुष्यातील दर प्रसंगातून, प्रेमाची नवी-नवी बंधने निर्माण होत होती, व आज माझी मुले केवळ आईबापांच्या नाही. तर काका-काकूंच्या मामा-मामींच्या व दोन्ही आजोबा-आजींच्या प्रेमाच्या उबेत वाढत होती, मामंजी तर माझ्या घरात चालताबोलता आशीर्वाद नाहीत का?
 “कॉलेजात ते शास्त्र शिकवितात." बाईचे शब्द परत ऐकू आले. "त्यांनीही वडिलांप्रमाणे आपल्याला शिक्षणकार्याला वाहून घेतल आहे." मामजी संपून आता ह्या बाई माझ्या नवऱ्याकडे वळलेल्या दिसतात. काय

वरवरचे बोलत असतात माणसे! ह्यांना माहीत तरी आहे का ता का तो कसा आहे
परिपूर्ती / १५७
 

ते? विषयसुद्धा कोठचा शिकवतो ते धड माहीत नाही, मग बाकीचे काय सांगणार कपाळ! माझे मन परत घरगुती स्मृतींच्या जाळ्यात गुरफटले. थोरली मुले आजोबांना भिऊन असत; पण धाकटीला मात्र आजोबा म्हणजे तिची मालमत्ता वाटते जणू. आणि आजोबांनासुद्धा कितीही कामात असले तरी तिच्या आग्रही अप्पलपोट्या प्रेमापुढे हार खावी लागते. आजोबाच काय घरातील प्रत्येक माणूस सर्वस्वी तिचे पाहिजे. संध्याकाळी आम्ही जरा एकमेकांजवळ बसून बोलत असलो की, हिला ते मुळीच खपत नाही... ताबडतोब मध्ये घुसते, त्याचे तोंड आपल्या हातात धरते व सांगू लागते, "बरं का दिनू, आज कनी मला मास्तर म्हणाले..." ती मामाकडे गेली म्हणजे घरात निवांत बोलत बसता येते. पण आता अगदी दोघांच्याच अशा गोष्टी बोलाव्यात तरी कुठे लागतात? एकमेकांची मन:स्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत की, आज काही तरी बिघडले आहे म्हणून? मला लांबूनच पाहून तो नाही का विचारीत, "आज काय ग झालं आहे?" ठण...घड्याळात अर्ध्या तासाचा ठोका वाजला. ओळख करून देणाऱ्या बाईंची गडबड उडाली. “तेव्हा ह्या...ची कन्या आहेत. सुप्रसिद्ध महर्षी ह्यांच्या सूनबाई, सुप्रसिद्ध प्राध्यापक ह्यांच्या पत्नी आहेत, व स्वत:सुद्धा शिकलेल्या आहेत. मी त्यांना आता भगिनींना चार शब्द सांगण्याची विनंती करते." असे म्हणून त्या झटकन खाली बसल्या. मला थोडे हसू आले. माझ्या भटक्या मनाला आवरून माझे भाषण केले व समारंभ आटोपला.
 पण बाईंनी करून दिलेली ओळख अपूर्ण आहे व तीत काहीतरी राहिले ही हुरहूर मनाला लागली ती काही जाईना. दोन दिवसांनी मी घाईघाईने रस्त्यातून जात होते. संध्याकाळ संपत आली होती, पण रात्र अजून पडली नव्हती. रस्त्याच्या कडेने मुलांचे घोळके घराच्या दारापुढून उभे होते. चार भितीच्या कोंडवाड्यात जाण्याचा क्षण ती जरा पुढे ढकलीत होती. त्यांच्या गप्पांतील शब्द अधूनमधून माझ्या कानांवर येत होते. इतक्यात जवळच्याच एका घोळक्यातून शब्द ऐकू आले, “अरे, शू:, शूः, पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्त्याची आई बरं का..."
 ...मी थांबले. पण चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली. बाई हे सांगायच्या विसरल्या होत्या, नव्हे का? महाराष्ट्रात फिरता फिरता अशा किती गौराया
मी पाहिल्या आहेत! किती कष्ट करतात! किती
अधिकार गाजवतात! गौरीचा लाडिकपणा,
गौरीचा भोळेपणा, गौरीचा प्रेमळपणा, सगळे
त्यांच्यात दिसून येते. ती हिमालयाची मुलगी,
तर ह्या सह्याद्रीच्या माहेरवाशिणी. वन्य, राकट,
पण प्रेमळ. आपल्या तापट, रानटी भावांना
संभाळणाऱ्या, आपल्या रागीट नवऱ्यांना
ताळ्यावर आणणाऱ्या, भोळ्या सदाशिवांच्या
डोक्यावर बसलेल्या अशा पार्वत्या सर्व जातींत
सर्व महाराष्ट्रभर दिसतात. त्यांना उत्तरेकडील
सुसंस्कृत रुबाबी-नबाबी बोलणे चालणे माहीत
नसेल, त्यांच्या हास्यात नाजुकपणा नसेल,
त्यांच्या जिभेच्या रासवटपणात प्रेमाचा ओलावा
कोणाला दिसत नसेल तर ते पाहणाऱ्यांचे दुर्दैव.

देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.