पांडुरंगाची आरती
<poem>
आरती १
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।।
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती । दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
- संत नामदेव
आरती २
विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविधतापा । संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥
बाळपणीं नाठविले ॥ व्यर्थ तारुण्य गेलें ॥ जरा हे दु:ख मोठे ॥ पुढे ठाकुनि आले ॥ विठ्ठला. ॥ १ ॥
भक्तीचा लेश कांही ॥ सत्यमागम नाही ॥ परिणामीं काय आतां ॥ शरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ ॥
हरी हरी माझी भ्रांती ॥ म्हणुनी आलो काकूळती ॥ कृपाळुबा जगन्नाथा ॥ तारी गंगाधरसूता ॥ विठ्ठला ॥ ३ ॥
आरती ३
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |