पाणी! पाणी!!/पाणी चोर
- १. पाणी - चोर
- 'अरे महादू, तू इथं?' लखुजीनं कपाळाचा घाम खांद्यावर टाकलेल्या पैरणीनं पुसत आश्चर्यानं विचारलं.
- ‘होय बाबा, मीच,' विषण्ण स्वरात महादू म्हणाला. लखुजीचा हा प्रश्न त्याला अपेक्षित होता. त्यामुळे नवल नाही वाटलं, पण खेद वाटायचा तो वाटल्यावाचून राहिला नाही.
आज वसरणीचा ऊसतोडीसाठी नंबर होता. सकाळीच साखर कारखान्याभोवती पावसाळ्यात भूपृष्ठावर छत्राचं माळ उगवून पसरावं, तशा काडाच्या झोपड्या दाटून व खेटून उभ्या होत्या; त्यातून मार्ग काढीत कंत्राटदार माने येऊन महादूला वसरणीला जाण्यासाठी तयार राहण्याची सूचना देऊन गेले. झटपट त्यानं कारखान्यात बसवलेल्या सार्वजनिक नळावर स्नान केलं, बायकोनं भाजलेला भाकरतुकडा खाल्ला. दोन दिवसांची शिदोरी बांधून घेतली व आपली दोन पोरं घेऊन तो ठरलेल्या ठिकाणी वेळेवर हजर झाला. ऊस तोडल्यावर उरलेला पाला गोळा करण्यासाठी मुलांना सोबत घेतलं होतं. जनावरांना वैरण नाही, हा चारा तरी मिळावा हा उद्देश. बायको व थोरली वयात आलेली लेक कारखान्यातच रोजंदारीवर होत्या.
वसरणीला जाणा-या ट्रकचा ड्रायव्हर उस्मान चहा-पाण्याला गेला होता. तोवर वेळ जाण्यासाठी कानावर खोचून ठेवलेली मजूर बिडी महादूनं काढली व
सदस्याच्या खिशातून माचीस काढून ती पेटवली व भसाभसा चार - दोनदा धूर ओकला. छाती गरम होताच जीवाला तरतरी वाटली.
आणि समोर लक्ष गेलं. लखुजी उभा होता. तोही ट्रकची वाट पाहात असावा. तोही ऊसतोडीला निघाला असावा.
पुढे होऊन हाक मारावी असं महादूला वाटलं, पण ओठातून शब्द उमटण्यापूर्वीच त्याचा विचार बदलला. हा आपल्याला आता तो प्रश्न नक्की विचारणार, ज्याचं उत्तर काय द्यावं हे नक्की ठरत नव्हतं. म्हणून तो चेहरा फिरवून आपल्या वसरणीला जाणा-या एमएचक्यू १२७५ या ट्रकचा उस्मान ड्रायव्हर केव्हा येतो हे पाहात स्वस्थ राहिला.
पण जरा वेळानं लखुजीचंच लक्ष गेलं, त्यानं मोठ्यानं हाक मारीत विचारलं ‘महादू, तू इथं?'
'होय बाबा, मीच.' विषण्ण स्वरात महादू उत्तरला. लखुजीचा हा प्रश्न त्याला अपेक्षित होता. त्यामुळे नवल वाटलं नाही, तरी खेद वाटल्यावाचून राहिलं नाही.
लखुजी त्याच्या जवळ येऊन सलगीची चौकशी करणार तोच उस्मान ड्रायव्हरची हाक आली, 'चलो महादू भाय, हम आ गये !'
महादूला सुटकेच्या भावनेनं हायसं वाटलं. 'लखुजी मला गेलं पाहिजे, आधीच वेळ झालाय. ऊसतोड करून उद्या परतेन सायंकाळपर्यंत वसरणीहून तेव्हा भेटू. निवांत गप्पा मारू.' आणि घाईनं त्याचा निरोप घेऊन महादू ट्रकवर चढला. पोरं व इतर मजूर आधीच बसले होते. उस्माननं वसरणीला येणारे सर्व शेतमजूर ट्रकमध्ये बसल्याची ओरडून खात्री करून घेतली व ट्रक सुरू केला.
महादू या वर्षी कारखान्यात ऊसतोडीसाठी येणार नव्हता, तर स्वतःचा ऊस कारखान्यात घालण्यासाठी ट्रकसोबत ऐटीत मिरवीत येणार होता. मागच्या वर्षी निरोप घेताना लखुजी व इतर जिवाभावाच्या मित्रांना त्यानं सांगितलं होतं, 'बाबांनो, आता आमची दैना संपली. पुढच्या वर्षी काही माझ्यावर ऊसतोड करायची पाळी येणार नाही. मी स्वतःचा ऊस घेऊन मालकाच्या ऐटीत येईन.'
त्याच्या स्वरात ठाम विश्वास होता. चेह-यावर भावी सुखी आयुष्याचं गुलजार स्वप्न होतं. तो निःशंक होता.
त्याला पुन्हा घराला कुलूप लावून बैलगाडीत कुटुंबकबिला टाकून परत कारखान्यावर यावं लागलं होतं. यापुढील सहा महिने रोज नव्या गावी ट्रकबरोबर जायचं आणि कारखान्याच्या वतीनं शेतक-यांच्या उसाची तोड करायची व उसानं भरलेल्या ट्रकसह परत यायचं. मालकीण व थोरली लेक कारखान्यात रोजंदारीवर ऊसतोड करायची, तर धाकटी दोघं त्याच्यासोबत गावोगावी भटकायची. ऊसतोडीनंतर पाला गोळा करून आणायची. जनावरं जगवली पाहिजेत. बैलांना सोन्याचा भाव आहे. त्यांच्यासाठी वैरण नाही, पैसा नाही. शेती यंदाही पिकली नाही. लावलेला ऊस जळून गेला आणि बँकेचे कर्ज बोकांडी बसलं. त्याची फेड हा दूरचा प्रश्न राहिला. आधी स्वतः व बायकामुलं, जनावरं जगवायची कशी हा प्रश्न समोर उभा राहिला आणि गेल्या बारा - पंधरा वर्षांतला ठराविक मार्गच पुन्हा आपलासा करावा लागला. कारण जगणं भाग होतं आणि त्यासाठी पोटात भाकरीचे दोन घास हवे होते. कारखान्यावर ऊसतोडीच्या मजुरीखेरीज जगण्याचा दुसरा मार्ग महादूला ज्ञात नव्हता व करता येण्यासारखा तर नव्हताच नव्हता.
एक साधं स्वप्न किती वर्षांपासून महादू पाहात होता. आपल्या गावात, तालुक्यात धरणाचं पाणी येईल व तृषित जमिनीत बागायत पीक डोलून उठेल... ऊस लावू आणि पैका ओढू... आपलं दैन्य व अभावाचं जिणं थोडंतरी सुसह्य होईल...
आजही ते स्वप्न स्वप्नच राहिलं होतं.
पण एका विषादानं मन कडवटलं होतं. आजवर आपल्या तालुक्यात पाणी असतानाही, त्याबद्दल निसर्गाला दोष देता येत होता. पण यंदा स्वप्न साकार न होऊ देणारी माणसं होती. ती कोण होती हे जेमतेम शिकलेल्या महादूला माहीत नव्हतं; पण ती बलदंड पुढारी व मस्तवाल अधिकारी मंडळी होती. हे शेतकरी असलेल्या त्याला चार लोकात ऊठबस करताना माहीत झालं होतं. पण त्यांना आपण शासन करू शकत नाही. किंबहुना त्यांच्यापर्यंत आपले हात, आपले शब्द व आक्रोश पोचणार नाही याचीही खात्री होती.
हाती होतं एकच-अख्ख्या जगावर जळफळणं आणि स्वतःवर धुमसणं... ते व्यक्त करावयाचे प्रकारही सीमित व ठराविक होते - पचापचा धुंकणं आणि सहनच झालं नाही तर पोरांना बदडून काढणं.
कावला होता. तो ट्रकच्या बाहेर पचकन थुकला आणि समोरच्या रामजीला म्हणाला, ‘बिडी असेल तर काढ बाबा, लई तलफ आलीय.'
'आपल्याला ही तलफ परवडणारी नाही महादू' रामजी म्हणाला, 'पण मी यातूनही मार्ग काढलाय त्यानं खिशातून एक मळकट पुरचुंडी काढली. ती सोडीत तो म्हणाला, 'कारखान्याच्या हफिसात साहेबलोक सिग्रेट ओढतात. त्यांची थोटकं पोरांना पाठवून मी गोळा करतो आणि तलफ आली की तीच ओढतो. चालेल तुला?'
महादूसमोर रामजीनं सोडलेली पुरचुंडी धरली होती. त्यात अर्धवट ओढलेल्या सिग्रेटचे तुकडे होते. त्याला मळमळून आलं. तो मान फिरवीत म्हणाला, 'नको मला असं काही.'
‘याचा अर्थ अजूनही माझ्याइतकी वाईट परिस्थिती तुझी झालेली नाहीय, ठीक आहे.' रामजीनं एक थोटूक पेटवत आणि धूर काढीत गप्पा मारायच्या इराद्यानं विचारलं,
'तू माण तालुक्याचा ना? कोणतं गाव तुझं?'
‘डंगीरवाडी. तिथं शेती हाय माझी. बारा एकर. पण पाणी नाही. वर्षभर पण उगवलेली बाजरी पुरत नाही. महादू पण मनातलं सांगू लागला... 'काय सांगू बाबा, आमचा तालुका लई कोरडा. हलक्या हलक्या जमिनी, पाणी कमी पडतं, बाजरीच काय ती होते. दस-यापर्यंत कसंतरी पुरतं. गावची मारुतीची जत्रा संपली की निघालोच इकडं कारखान्याला.'
‘आमच्या सांगोल्याची पण हीच परिस्थिती. आपले तालुके लागून लागूनच की, जिल्हा वेगळा असला तरी.'
'होय, मी ऐकून आहे. आमच्या इंगीरवाडीच्या पोलीस पाटलांची बहीण तुमच्या तालुक्यातच दिलीय तळणीला बघा. मी पाटलासोबत गेलो होतो एकदा.' महादूचं मन मोकळे होत होतं. तो पुढे म्हणाला,
'बहात्तरनंतर पुन्हा मागच्या वर्षीपासून दुष्काळ काटा काढतोय. गेल्या वर्षापाठोपाठ यंदापण पावसानं दगा दिला. काईसुदीक उगवून आलं नाही. दोन जनावरं
आणि शेतीला पण. त्यांना जगवलं पाहिजेच.'
‘कारखान्यात काम करताना एवढं बरं हाय-जनावरांना ऊस तोडल्यानंतरचा पाला घालता येतो.' रामजी अनुभवाचे बोल बोलला, 'मीही सर्व जनावरं घेऊन आलोय?'
‘दरवर्षीची ही पिरपिर. राम जाणे किती दिवस हे असंच चालायचं आपलं?' महादूच्या आवाजात विखार दाटून आला होता. तो रामजीला पण समजला. तो समंजसपणे म्हणाला,
‘भोग आहेत बाबा हे, कुणाला चुकलेत? आपल्या हाती काही नाही, तर मग उगीच कावून काय फायदा?'
थोडं थांबून गंभीर होत रामजी पुढे म्हणाला,
‘एक अनुभवाचं सांगू? अरे दुःख आणि काळजी तरी किती करावयाची? आता कशातच काही वाटत नाही. आला दिवस तो आपला, गेला दिवस राम भला. येणा-या दिवसाची पर्वा कशाला?'
रामजीचा तो स्थितिवादी समंजस शहाणपणा महादूला स्पर्शून गेला. त्याला वाटलं, आपणही असं बनावं म्हणजे खालीपिली त्रास नाही होणार. मन नाही कडवटणार आणि जीव नाही अस्वस्थ होणार.
ट्रक वेगानं धावत होता. त्या वेगाची लय रामजीत भिनली होती. त्याला पेंग येत होती आणि संभाषणाला त्यामुळे खीळ बसली. महादूपण विचारात गुंगला.
वसरणीला पोहोचल्यावर महादूचा विषाद चौधऱ्याची बहरलेली ऊस शेती पाहाताच पुन्हा जागृत झाला. त्याला वाटलं... ज्या असंख्य बड्या शेतक-यांनी दबाव आणून पाणी लाटलं, त्यात चौधरीपण असतील. या तालुक्यात निरेचं पाणी कालव्यान मिळतं. यंदा कधी नव्हे ते पाणी कमी पडलं. आणि आपल्या मालाला मिळणारं पाणी इथंच अडलं गेलं आणि गेलं पाव शतक त्यांनी उसातून सोन्याचा धूर काढला. त्यांच्या जळणा-या उसाला पाणी प्राधान्यानं दिलं गेलं आणि ज्या तृषार्त तालुक्यास कालव्याचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच पाणी मिळत होतं आणि त्या पाण्यावर अनेकांनी प्रथमच
पाण्याअभावी कडक उन्हानं जळून गेला.
हे असं कसं घडलं? का घडलं? राज्य सरकार आपलंच आहे, तर मग एक तालुका केवढा समृद्ध बनतो आणि दुसरा पिण्याच्या पाण्यालाही वंचित होतो. पाणी ही तर देवाची देणगी, मग एका तालुक्याला एवढं पाणी मिळतं, ज्यामुळे दुस-या तालुक्यात सर्वांची शेती करपून जावी? का? का म्हणून? त्या तालुक्याचा पाटबंधारे मंत्री आहे, तिथं साखर कारखाने आहेत, सहकारी बँकेचा राज्याचा अध्यक्षही इकड लाच आहे. म्हणून हे कट होतात. आम्हाला न्याय मग कधी मिळणार?
महादू यंत्रवत काम करीत होता. झपाझप उभे पोसलेले उसाचे दांडे आडवे होत होते. काही मजूर मोळी बांधून ट्रकमध्ये चढवत होते. दुपारी भाकरी खायला शिदोऱ्या त्यांनी सोडल्या तेव्हा निम्मा वावर साफ झाला होता.
महादूची भूक जणू आज मरून गेली होती. त्याला दोन तुकड्याहून जास्त खावंवलं नाही. तो हात धुऊन एका झाडाखाली निवांत बसला.
त्याला २६ जानेवारीचा दिवस आठवत होता. त्या दिवशी माण तालुक्यात कालव्याचे काम पूर्ण झालं होतं आणि तिथं आज धरणाचं पाणी येणार होतं. ज्या नीरा नदीनं शेजारचा तालुका समृद्ध केला होता, ती आज आपलं अमृत या तृषार्त मातीस पाजणार होती.
शुभ्र पाण्याचे लोट नाचत कालव्याद्वारे आले आणि सर्व लोकांनी आनंदाची जल्लोष केला. त्या पहिल्या पाण्याची पूजा केली, नारळ फोडला.
सर्वांच्या चेह-यावर समृद्धीची-सुखाची स्वप्नछटा तरळत होती. महादूपण त्या असंख्यांतला एक होता.
आज त्याच्या चेह-यावर पराभूत निराशा दाटून होती. त्या दिवशी फुलारून आलेले त्याचे शेतकरी बांधव आज त्याच्याप्रमाणेच हताश असणार. नव्हे, आहेतच.
आपण ज्यांना निवडून दिले ते आपले आमदार - खासदार काय करत होते, जेव्हा तालुक्याचं पाणी अलीकडेच अडवलं व चोरलं? शेतकरी संघटनेनं त्यांच्या घरावर मोर्चा नेला, त्यात महादूपण होता. पण तेव्हाही त्याला वाटत होतं- आपले
नाहीत....
किती उमेदीनं मेहनत करून आपण ऊस लावला. पाण्याचा पहिला हप्ता बंधा-यातून उसात फिरवला तेव्हा आनंद काळजात मावत नव्हता. दरवर्षी बाजरी पेरायची आणि पावसाच्या दयेवर विसंबून राहायचा आपला सदाचाच दुष्काळी तालुका. पाऊस फारच कमी व अनियमित. जे उगवून यायचं, ते खंडी दोन खंडीपण नसायचं. कसंतरी दसऱ्यापर्यंत पोट भरायचं आणि दसरा संपला आणि गावाच्या मारुतीची जत्रा आटोपली, की भ्रमंती सुरू. कारखाना सुरू होण्यापूर्वी मेंढरं घेऊन कोकणात जात असू, तर आता ऊसतोडीसाठी इकडे यावं लागतं.
या वर्षी हे दुष्टचक्र संपणार, आपणही आता ऊस मालक आहोत. या दोन एकरात ऊस पुरा वाढला की बक्कळ पैसा येईल. थोडं कर्ज फेडू आणि बायकामुलांना कपडाचोपडा करू. कणगीत शिगोशीग वर्षभर पुरेल असे धान्य भरून ठेवू.. आणि या आषाढीला पंढरीची वारी करून येऊ.
महादूच नव्हे, सबंध घर ऊस शेतीमध्ये खपत होतं. काळजीपूर्वक निगराणी अखंड होती. रोज कुठे तण वाढते, यावर घारीप्रमाणे सर्वजण नजर ठेवून होते.
त्या नजरेत अवध्या जगाचा क्रोध आणि हताशता दाटून आली, जेव्हा पाण्याची दुसरी पाळी तालुक्यात आलीच नाही. स्थानिक नेत्यांसोबत महादूही पदरमोड करून पाटबंधारे खात्याच्या ऑफिसमध्ये गेला, तेव्हा बेपर्वा उद्धट उत्तर मिळाले, ‘आम्हाला कारण माहीत नाही. वरून आदेश आला त्याप्रमाणे पाणी याच तालुक्यात दिलं गेलं. माणला उरलंच नाही.'
'पण हा तर अन्याय झाला साहेब.' महादूला राहावले नाही. उग्र स्वरात तो पुढे म्हणाला, 'आधी कबूल करूनही पाणी सोडलं नाही. आम्हा सर्वांचा ऊस जळून गेला. प्रथमच तो आम्ही लावला. त्यासाठी पाणीपट्टीकरिता बँकेचे कर्ज काढले आणि आता म्हणता, वरचा आदेश आला म्हणून पाणी माणला सोडलं नाही. आमचं केवढं नुकसान झालं माहीत आहे?'
प्रतिक्रिया. त्यावेळी महादूला वाटलं, त्याचं बखोटं पकडावं आणि गदागदा हलवावं. पण यातलं तो काही करू शकला नाही.
किती वेळ तरी तो नुसताच आतल्या आत उकळत राहिला आणि मग कंटाळून थंड झाला.
हे..हे सारं थांबलं पाहिजे. महादूच्या डोक्यात विचार येत होते... यावर्षी असं पाणी मध्येच श्रीमंत शेतकरी लाटतील, सरकारही त्यांनाच साथ देईल असं वाटलं नव्हतं. पुन्हा असं होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी भांडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे...
पण आपण एक सामान्य शेतकरी प्रपंचात आकंठ बुडालेले. या वर्षी आमदारासमोर निदर्शने केली, त्यात आपणही होतो. त्यानं काय फायदा झाला? आपल्या तालुक्यात समर्थ नेते नाहीत आणि जे आहेत ते कमअस्सल आहेत. त्यांना तालुक्याच्या विकासाची पर्वा नाही.
आपण फार हतबल आहोत... आपली ही परवड कधीच संपायची नाही, असं दिसतंय....
त्यानं एक दीर्घ निःश्वास सोडला. तो उठून उभा राहिला. एक मनसोक्त आळस दिला. इतर सर्वजण कामाला उठले होते. तोही कामाला लागला.
चारच्या सुमाराला चौधरीच्या वाड्यावरून चहा आल्याची सूचना त्यांच्या मुनिमाने दिली, तसं काम थांबलं. सर्वजण चहा घेऊ लागले. एका कपात चहा महादूपुढे आला.
त्याला क्षणार्धात काय वाटलं की... त्यानं चहा नाकारला आणि तो पुन्हा मळ्यात जाऊन कामाला लागला.
उन्मादानं त्यानं स्वतःला कामाला जुंपून घेतलं. त्याच्या अंगात कसला आवेश संचारला होता की? वेगानं तो उसाच्या दांड्यावर घाव घालीत होता आणि तोंडाने पुटपुटत होता...
पाणी - चोर आहात. आम्हाला बर्बाद केलंत तुम्ही अन् मी तुमचा चहा पिऊ? छट्, मी थुंकतो तुमच्या चहावर... तुमच्या या ऊसशेतीवर...
☐☐☐