पाणी! पाणी!!/ बांधा
- ३. बांधा
- ती आता लख्ख जागी आहे, पण उठायला मन होत नाहीय. डोळे चुरचुरताहेत...
- काल रात्री झोप अशी लागलीच नाही. ती ग्लानी होती. डोळे जडावून विसावले होते एवढंच.
- अंग कसं जडशीळ झालंय... मनाप्रमाणे साच्या शरीरातही एक अनिच्छा, एक विमनस्कता भरून आहे...
गजराने मोठ्या प्रयासानं जडावलेले दुखरे डोळे उघडले. चांगलं फटफटून आलं होतं! आता उठायला हवं... घरचं सारं व्हायचं आहे...
आणि ते करून रोजगार हमीच्या कामावर जायचं आहे...
शरीराला आळोखेपिळोखे देत गजरा उठणार तोच हणमंताचा तिच्या शरीराभोवती हात पडला आणि झोपेतच त्यानं तिला कुशीत ओढलं... तीही तेवढ्याच सहजतेनं त्याच्या मिठीत शिरली...
खरं तर काल रात्रीला रंग कसा तो चढलाच नव्हता. तो असमाधानी, ती बेचैन. तारा न जुळलेल्या त्या खोलीत रात्रभर ती एक ठसकी वेदना घेऊन तळमळत होती, तो मात्र कूस बदलून बिनघोर झोपी गेला होता.
एक अनाम बेचैनी गजराला स्पशून गेली आणि झटक्यात तिनं तिच्याभोवती पडलेला हणमंताचा कणखर हात बाजूस सारला... आणि उठून ती खिडकीजवळ
परसदारी जर्सी गाय संथपणे रवंथ करीत होती. तिच्या पुढ्यात मागल्याच आठवड्यात तगाई म्हणून मिळालेला वनखात्याचा चिपाड झालेला शुष्क चारा होता. पहिले दोन दिवस तर गाईनं त्याला तोंडही लावलं नाही. पण भुकेपोटी आता तिनं तोही गोड मानला होता... संथपणे ती त्या वाळक्या चा-याचं रवंथ करीत उभी होती!
किती वाळली होती ही गाय ! दोन वर्षापूर्वी ती चव्हाणाच्या गोठ्याची शान होती. दररोज पाच ते सहा लिटर दूध देणारी; पण दुष्काळाच्या अस्मानी संकटाने तिची पार रया गेली होती. आता तिची सारी हाडं उठून दिसत होती... एकदम चिपाडं झाली होती...
शहरी विचंवानं नांगी मारताच वेदनेचा जाळ हावा, तशी गजरा मनोमन विव्हळून उठली. तिच्या मनात कसले कसले विचार येत होते, की त्यांच्या स्वैरपिसाट गतीचा आवेग तिला पेलवेना. एका तिरमिरीत ती पुढे झाली आणि खिडकी बंद केली. वळून भिंतीवरचा विरलेला छोटा आरसा हातात घेऊन आपलं शरीर वेगवेगळ्या कोनातून निरखू लागली...
तिच्या कानात पुन्हा एकदा हणमंताचे रात्रीचे बोल घुमू लागले, 'गजरे, काय अवस्था करून घेतलीस जरा पहा - हाडं हाडं लागताहेत नुसते ... मजा नाही येत पूर्वीसारखी... ती जर्सी गाय आणि तु दोघीपण हाडकलात...' आणि त्यानं तिला दूर सारलं होतं !
तिच्या हातून आरसा गळून पडला. फुटायचाच तो, पण खाली तिनं दूर केलेलं पांघरूण होतं, म्हणून बचावला एवढंच !
तिची नजर हणमंताकडे गेली. संथ लयीत तो घोरत होता. अंगावर फक्त लेंगा होता. त्याची उघडी, भरदार केसाळ छाती श्वासाच्या लयीनं खालीवर होत होती. त्या छातीत स्वतःचे मस्तक घुसळीत तो पुरुषी दर्प श्वासात खोलवर ओढून घेणं ही तिच्या सुखाची परमावधी होती !
पण आजचा दिवस वेगळेच रंग घेऊन आला होता. त्याचे कालचे काळजात घाव घालणारे बोल अजूनही तिच्या कानात घुमत होते. त्यामुळे त्याचं उघडं, पीळदार शरीर पाहून नेहमी रोमांचित होणारी गजरा आज कड़वटली होती.
त्याच्या लेखी तिचं वळसेदार शरीर एवढंच सत्य होतं. त्या सुडौल देहात स्त्रीत्वाची भावना असलेलं तिचं स्त्रीमन त्याला कःपदार्थ होतं !... लग्नानंतर आठ वर्षानी गजराला हे प्रकर्षानं प्रथमच जाणवत होतं. त्याच्या लेखी ती व जर्सी गाय
तिच्या मनावर मणामणाचे ओझे दाटून आले होते. जीवाच्या कराराने पाझरण्याऱ्या सीमेपर्यंत पोचलेले आपले डोळे ती कोरडे राखायचा प्रयत्न करीत होती.
कारण जो दिवस कष्ट व श्रमाची एक प्रदीर्घ वाटचाल घेऊन आला होता, त्याची सुरुवात अशी पाझरलेली गजराला परवडणारी नव्हती. चव्हाणांच्या त्या गढीसमान वाड्याची झाडलोट, अंगणसडा, सर्वांचं चहापाणी, मग भाकऱ्या थापणं... कितीतरी कामं तिला यंत्रवत गतीनं उरकायची होती. तीन वर्ष सतत दुष्काळाच्या तडाख्यानंतर वाड्यावरचा गडी व बाईमाणूस तिनंच कमी केले होते. त्यामुळे वरकडीची सारी कामे तिलाच पाहावी लागत होती. आणि हे सारं करून दोन किलोमीटरवर चालू असलेल्या रोजगार हमीअंतर्गत पाझर तलावाच्या कामाला तिला साडेआठच्या ठोक्याला हजेरी लावायची होती...
पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. अमाप पिकलेल्या उसामुळे जेव्हा वाड्यात लक्ष्मी प्रसन्नतेनं संचारत होती, तेव्हा हणमंतानं हौसेनं तिला शहरातून घड्याळ आणलं होतं - स्वयंचलित आकड्यांचं. त्याच्या जोरावर ती कामावर वक्तशीर पोचत असे. पण त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला तिची प्रचंड टिंगलही झाली होती. तो हलकट मुकादम तिला फिदीफिदी हसत म्हणायचा, 'तालेवाराची बाई तू - घड्याळ लावून कामावर येतेस! कशाला उगीच एका जीवाचा रोजगार बुडवतेस ?...'
खानदानी मराठा संस्कारात वाढलेल्या गजराला ते मनस्वी लागायचं. पण परपुरुषाशी फटकन काही बोलावं हा तिचा स्वभावच नव्हता. तेव्हापासून तिनं ते घड्याळ वापरणंच सोडून दिलं होतं! पण घरातून आठ ते आठ पाचला निघायचं, हा तिचा परिपाठ होता, ज्यायोगे ती कामावर वेळेवर पोचायची...
पण रोज सकाळी आठाकडे झुकणारे ते घड्याळाचे काटे पाहिले की, तिला वाटायचं - हे घड्याळ उचलून फेकून द्यावं. नको ती धावपळ, नको ते कामावर जाणं आणि नको ते उरस्फोडी काम... ज्यामुळे शरीर सुकत चाललेय... मांसलता कमी होत चाललीय...
‘धनी.. ते काय बोलून गेलात तुम्ही ?' तिच्या मनावर उठलेला हा दुसरा ओरखडा. 'जीव कसनुसा झाला बघा. पण तुम्हास्नी काय हो त्याचं ? आपलं पाठ फिरवून खुशाल घोरत पडल्यावर कसं कळावं ? गरीब ग्रामसेवकाची पोर असले तरी पण माहेर खानदानी आहे धनी. तिथली पण रीत हीच होती. घराबाहेर पडायचं ते
भिंतीला लगटून गजरा किंचित ओणवी आपल्याच विचारात होती - 'मी - मी घराबाहेर पडले ते व्यंकूनं - पोटच्या गोळ्यानं भुकेसाठी रडणं सुरू केलं तेव्हा - घरी दूधच काय, पण भाकरीचा तुकडाही शिल्लक नव्हता. आणि हे धनी, तुम्हाला सांगून तरी काई उपेग झाला नसता. तुम्ही इनामदारीच्या तोऱ्यात. निसर्गाची कृपा होती - ऊस शेती होती तेव्हा हा तोरा खपून गेला. पण अतिपाण्यानं जमीन खारायली - फुटली. ऊस पिकेना. आणि मग लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ, विहीर पण आटली. गतवर्षी जेमतेम हायब्रीड पदरी पडली...'
चांदण्यासारख्या दाणेदार ज्वारीची पांढरीशुभ्र भाकर खाण्यास चटावलेली जीभ हायब्रीडची काळपटलेली जाड भाकरी पाहून रसना पाझरायची विसरली. पण भुकेच्या आगीनं लोचट होऊन ती त्यालाही नंतर सरावली म्हणा ! असा हा दुष्काळाचा फटकारलेला आसूड. त्यात दुसरी विहीर खोदताना खडक लागल्यामुळे बोकांडी बसलेलं बँकेचं कर्ज. त्यांनीही ताठर धोरण स्वीकारून जमिनीचा लिलाव पुकारला वसुलीसाठी. स्त्रीधन म्हणून आलेला काळ्या आईचा पाच एकराचा तुकडा बेभाव गेला, तेव्हा गजरा ओक्साबोक्सी रडली होती - पित्याचं मायेचं पांघरूण उडालं जाऊन ती जणू उघडी पडली होती...
"धनी - या अस्मानी सुलतानीनं भल्या - भल्यांची जिरली, पण तुमचे पाय जमिनीवर कधी आलेच नाहीत. कष्ट करायची, राबायची सवयच नाही तुमास्नी. त्याची लाजबी वाटते... म्हणून मला डोईवरचा पदर न घसरणा-या गजराला ओचा मारून रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून जावं लागलं ! घरचा धनी जेव्हा घरट्यातल्या पाखरासाठी घास कमवीत नाही, तेव्हा बाईला आपली मानमर्यादा विसरून पुढे यावं लागतं... यात माझं काय चुकलं?...'
गजरा आपल्या निर्णयाबद्दल या दुख-या अवस्थेतही ठाम होती - तरीही सवाल होताच - मग हा बोल का? हा आपला बाईपणाचा अपमान का? ‘हाडंहाडं लागत आहेत - पूर्वीसारखी मजा येत नाही...'
विरलेल्या खणाची चोळी दंडाला सैलावली होती. गुलाबी हात कामानं करपले होते, घट्ट झाले होते. डौलदार बांधाही आक्रसला होता !
हे... हे बदललेलं रूप हणमंताला रुचेनासं झालं आहे !
गजरानं पुन्हा एकदा स्वतःकडे नजर टाकली...
या... या सा-याचा मला अभिमान आहे...'
आपल्याच विचारात नादावलेल्या गजराला भान आलं ते सासूच्या हाकेनं. ‘सूनबाई, उठलीस की नाही ? हा व्यंकू जागा झालाय - दूध मागतोय...'
लगबगीनं गजरा बाहेर आली आणि दैनंदिन संसाराच्या कष्टाची चक्रे फिरू लागली... घरची सारी कामं आटोपली, तरी हणमंता घोरतच पडला होता. त्याला उठवावं, त्याचं चहापाणी करून द्यावं, असं मनात आलं, पण वेळ नव्हता. आणि त्याच्याकडे पाहताना पुन्हा एकदा एक दुरावा उफाळून आला. एका झटक्यात ती बाहेर पडली आणि लगबगीनं कामाकडे चालू लागली.
पाझर तलावाचा निम्माअधिक बांध झाला होता. त्याच्याकडे पाहिलं की, गजराला अभिमान वाटायचा. जाणवायचं की, एक मजूर म्हणून याच्या उभारणीत माझेही श्रम सामील आहेत ! जेव्हा तो पूर्ण होऊन पाणी अडवला जाईल, तेव्हा या गावची बरीच जमीन बागायती होईल, विहिरींना पाणी वाढेल हळहळ एकच होती - बँकेनं लिलावात जो पाच एकराचा तुकडा विकला होता, तोही बागायत होत होता. पण आता त्याचा धनी वेगळा होता -
त्यांच्या गप्पा रंगत असताना मुकादम त्यांच्या समोरून गेला, पण त्यानं गजराकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. इतर चार बाईमाणसांप्रमाणेच ती एक... त्याच्या लुब-या नजरेचा तिला तिटकारा होता, त्यामुळे त्याचं आजचं झालेलं दुर्लक्ष तिला दिलासा देऊन गेलं.. पण ते क्षणभरच.
दुस-याच क्षणी सकाळपासून मनात उठलेल्या पिसाट विचारांना पुन्हा एकदा चालना मिळाली आणि ती मनस्वी घायाळ झाली...
हा मुकादम जेव्हा गजरा प्रथमच या कामावर आली, तेव्हा कसा डोळे फाडून फाडून आरपार पाहात होता... ती किती भेदरली होती! अशा परक्या पुरुषाच्या नजरेची तिला अजिबात सवय नव्हती. हा आपला घाटदार देह, हणमंताच्या अभिलाषेचा विषय, एका परपुरुषाच्या नजरेत वासना पेरतो व लाळ गाळायला प्रवृत्त
त्या रात्री किती वेळ तरी ती हणमंताच्या कुशीत हमसून रडत होती. 'धनी, ही काय पाळी आणली वो तुमी माझ्यावर ?'
"खरं सांगू गजरा, तुझं हे आजचं कामावर जाणं मला पसंद नव्हतं. मी तुला कालच म्हणलं होतं - ही आपली कामं नव्हेत. काही झालं तरी इनामदाराचं घराणं आपलं!'
‘ते नगा सांगू मला - घरात व्यंकू - आपलं एकुलते एक पोर भुकेनं रडतंय... त्याचं बोला...'
'मी आज - उद्या काहीतरी बंदोबस्त करतो पैशाचा - साले, सर्वजण चोर आहेत. एवढे त्यांच्यावर उपकार केले, पण वेळेला एकही मदत करीत नाही.'
'धनी, संकट का एखाद्यावर आले आहे? साऱ्यांनाच या दुष्काळाचा तडाखा बसला आहे. साऱ्यांचेच हे हाल आहेत.'
क्षणभर गजरा घुटमळली, बोलायचं धाडस होत नव्हतं. तरी पण चाचरत धीर एकवटून म्हणाली, 'जो मार्ग मी पत्करलाय, तो नाही तुम्हाला जमणार ? - जोडीनं कामावर जाऊ रोजगार हमीच्या. अनेकजण तसे येतात. रोज तीन किलो धान्य मिळेल कुपनावर - हत्याला शंभरसव्वाशे रुपये पण मिळतील...'
"काय म्हणतीस ? मी तुझ्यासंग रोजगार हमीच्या कामाला येऊ ? येडी का खुळी ? हा इनामदार , चव्हाणाच्या खानदानीचा मजूर म्हणून काम करील ? छुट्, ते शक्य नाही..'
'मी नाही जात ?' गजरा शांतपणे म्हणाली, “वेळवखत आला की मानपान बाजूस सारावा लागतो आणि कर्ज करण्यापेक्षा, उसनंपासनं घेण्यापेक्षा कष्ट करून रोजीनं दहा - बारा रुपयेच का होईना कमावणं चांगलं नाही का?”
'गजरे, एक दिवस कामावर गेलीस अन् चुरूचुरू बोलायला लागलीस ? हे तुझे भिकारडे विचार तुझ्याजवळच ठेव. मला ते पटायचे नाहीत. मी तुला कामावर जाऊ देतोय ते मोप हाय...'
आणि त्यानं हा विषय तिथंच संपवून टाकला होता.
हताश होऊन गजरा आपल्या नव-याकडे पाहात राहिली. हा पहिलाच प्रसंग होता, जेव्हा तिला आपल्या नव-याची मनस्वी चीड आली होती. 'असला कसला हो अट्टाहास?.. वेळवखत जाणता येत नाही.. घरी पोटचा पोर उपासमारीनं सुकलाय.
तिला वाटलं होतं... हणमंता आपलं ऐकेल. आपण जोडीनं कामावर जाऊ. म्हणजे मुकादमाची लुब्री नजर शांत होईल.. बिनधोकपणे काम करता येईल. पण छे... आपल्याकडे का पुरुष घरच्या बायकांचे ऐकतात... हा आपला नवरा तर शहाण्णव कुळीचा.. तो कसा ऐकेल?
आपल्या मनातले बंडखोर विचार तिला पेलवेनात. तेव्हा प्रयत्नपूर्वक ते तिला मनाआड करावे लागले होते.
पण आज तीन महिन्यानंतर पुन्हा तसेच विचार मनात येत होते आणि पुन्हा एकदा मन शिणत होते !
कामाची तपासणी करून इंजिनिअर साहेब गेले आणि कामाला सुरुवात झाली. गजराही आपल्या गँगमध्ये काम करू लागली. पुरुष - गडीमाणसं माती खोदीत होती व टोपल्यातून ती माती भरावावर स्त्री मजुरांमार्फत टाकली जात होती...
आता कामाला गती आली होती. उन्हं वाढत होती, त्याचे चटके बसत होते. अगं घामेजली होती; पण पदरानं घाम पुशीत काम अव्याहत चाललं होतं...
दुपारी जेवायची सुट्टी झाली, तेव्हा झाडाखाली आपल्या मैत्रिणीसोबत गजरानंही भाकरीची पुरचुंडी सोडत जेवायला सुरुवात केली. भरपूर घाम गाळल्यानंतर हायब्रीडची भाकरीही आताशी गोड वाटत होती !... ती खुदकन हसली.. आपण बदलत आहोत... शरीरानं आणि मनानंही. शरीरानं जास्त चिवट, अधिक कणखर. मनानं बंडखोर व विचारी.
पुन्हा एकदा ती सल ठसठसू लागली...
मुकादम आता आपल्याकडे पहिल्यासारखं अभिलाषी नजरेनं पाहात नाही. का? या प्रश्नानं ती बावरली आणि कानात त्याच वेळी हणमंताचे ते बोल घुमू लागले. आता आपण पूर्वीसारखे आकर्षक राहिलो नाहीत?... देहाची पुष्टाई व गोलाई कष्टाच्या कामानं कमी झाली आहे हे खरं.. त्यामुळे का आपलं स्त्रीत्व.. बाईपण अनाकर्षक होतं? हा पुरुषी कावा आहे.. त्यांचा विकृत ओंगळ दृष्टिकोन आहे. बाईमाणूस म्हणजे फक्त तिचं शरीर? त्यातलं मन, त्या मनाचं प्रेम .. निष्ठा काहीच नाही?
हणमंता हा आपल्या कुंकवाचा धनी. सारं काही आपण त्याला दिलं. हे शरीर तर त्याच्या हक्काचं आहे, पण हे मनही त्याला दिलं. त्याचं धन्याला काहीच अप्रुप नाही!
हे सारं हणमंताशी गजरा कधी बोलली नव्हती. का ? विचार करता तिच्या मनानं कौल दिला की, धनी हे कधी समजून घेणारच नाहीत. त्यांना फक्त देह कळतो, त्यात एक मनही असतं, हे त्यांना कधी समजून घ्यावसं वाटतंच नव्हतं !
मीच खुळी... सतत आपल्याभोवती धनी कबुतराप्रमाणे घुमायचे. माझ्या शरीराचे लाड लाड करायचे. आपण त्याला प्रेम.. प्रीती समजलो. संसार मानला. आपली ती चूक होती. तो केवळ वासनेचा उमाळा होता. शरीराची गोलाई कमी झाली, बांध्याचा उभार ढासळला आणि त्यांचं लक्षही उडालं...
गेल्या कित्येक रात्री रंगल्या नव्हत्या. प्रत्येक वेळी तो असमाधानी, ती बेचैन. त्याचं कारण हे तर नसेल...?
...दिवसभर गजरा यंत्रवत गतीनं काम करीत होती, पण मनात हे असे विचार पुन्हा पुन्हा येत होते आणि मन प्रक्षुब्ध होत होतं.
चारच्या सुमाराला मुकादमानं सांगितलं... आज मागच्या हप्त्यांचा पगार होणार आहे. साऱ्यांचे चेहरे फुलून आले. गजरालाही बरं वाटलं. कारण कालच घरातल पीठ संपलं होतं. मीठ - मिर्चीपण जेमतेम होती. बरं झालं... कुपनावर रेशन दुकानात जाऊन गहू घेता येतील व इतर सामानही उद्या बाजारात खरेदी करता येईल...
कमरेला गाठीत पैसा मारून गजरा वेगानं परतीच्या वाटेला लागली होती... घराची ओढ मनाला अधीर करीत होती... व्यंकूच्या आठवणीनं वात्सल्य उफाळून आलं होतं. हल्ली व्यंकूला जवळही घेता येत नाही वेळेअभावी...
औंदाचा मौसम जवळ येतोय. पीकपाणी ठीक झालं तर दैन्य कमी होईल. कदाचित रोजचं हे उरस्फोडी रोजगार हमीचं काम करायची पाळी येणार नाही. आराम मिळेल, हे सुकलेलं शरीर पुन्हा भरून येईल.. पुन्हा आपण हणमंताच्या प्रेमाला पात्र होऊ...
‘आईऽगं...' गजराला जोरदार ठेच लागली होती. आपल्या विचाराच्या नादात चालताना तिला भान राहिलं नव्हतं. कळवळून ती काही क्षण खाली बसला रक्ताळलेला अंगठा तिनं दाबून धरला. कळ ओसरताच पुन्हा ती उठून चालू लागली...
पण आपण पूर्वीप्रमाणे हणमंताशी समरस होऊ...?
हे तर सरळ बाजारबसवीप्रमाणे झालं! किंमत आहे ती केवळ मांसल देहाला... या मनाला काही मोल नाही?
वाडा दिसू लागताच मनातले भरकटलेले विचार मागे पडले आणि समोर खेळत असलेला व्यंकू तिला पाहताच पळत येऊन चिकटला. तिनंही त्याचा मायेनं मुका घेतला !
अंमळसा विसावा घेऊन गणरा पुन्हा घरच्या कामाला लागली. चूल पेटवून चपात्या भाजू लागली. व्यंकू समोर ताट घेऊन बसला होता. सासूलापण तिनं वाढून दिलं होतं!
हणमंता घरी नव्हता. सासूलाही बाहेर जाताना सांगून गेला नव्हता. त्या रात्री तो घरी आलाच नाही. त्यामुळे गजरालाही पोटात भुकेचा आगडोंब उसळूनही उपाशी निजावं लागलं... दिवसभराच्या कामानं शरीर मोडून आलं होतं. आदल्या रात्रीच्या जाग्रणानं आधीच डोळे चुरचुरत होते... परत आजही कितीवेळ तरी झोप आली नाही. केव्हातरी पहाटे तिचा डोळा लागला.
आणखी एक नवा दिवस... पण आज बाजाराचा दिवस म्हणून कामाला सुट्टी होती. तरी दुपारी बाजाराला जायचं होतं... प्रपंचाच्या वस्तू खरेदीला. पण रात्रभर हणमंता न आल्यामुळे गजराचं कशातच मन लागत नव्हतं !
कुठे गेला असेल बरं हणमंता?... हा प्रश्न तिला सतत सतावत होता. शेजारच्या नामदेवानं सर्वत्र पाहिलं, पण पत्ता लागला नाही. एवढं मात्र समजलं होतं की, तो साखर कारखान्याच्या गावी जाऊन दुपारी परतला होता व संध्याकाळी परत बाहेर पडला होता.
चहा झाल्यावर ती वेणीफणीला बसली, तोच आवाज आला. म्हणून तिनं डोकावून पाहिलं... दारात हणमंता उभा होता. त्याला स्वतःचा तोल सावरत नव्हता. डोळे तांबरलेले.. कपडे विस्कटलेले... गजराच्या अंगावर भीतीचा काटा सरसरून आला. ती पुढे झाली आणि तिच्या नाकात एक घाणेरडा दर्प शिरला... हा दारू पिऊन आला आहे खचितच.
'कुठे गेला होता धनी रातच्याला, सांगून पण गेला नाहीत सासूबाईनी?...'
“वेडी का खुळी तू गजरा ?' खदाखदा हसत हणमंता म्हणाला, शेवंताबायकडे जाताना का आईला सांगून जायचं असतं?"
‘धनी, हे मी काय ऐकतेय?'
‘शी... शी...! इथे मी तुमची लग्नाची बायकू जिती हाय... तरी तुम्ही बाजार हुडकता?' तिचा संताप आवरत नव्हता.
'तुझ्यासंगं मजा नाही येत... हाडहाडं लागतात. छे! बाई कशी हवी!'
संताप व कमालीच्या उद्वेगानं गजरा भणाणून गेली होती. काल दिवसभर मनात जे ठसठसत होतं, ते एवढं खरं व्हावं याची तिला खंतही वाटत होती...
यावर्षी निसर्ग मेहरबान होता. पाऊसपाणी वक्तशीर व वेळेवर झाला. पुन्हा एकदा हणमंताच्या शेतात ऊस व गहू बहरून आले...
पाझर तलावाचं काम संपलं होतं. पाऊस ओसरताच गावातच पुन्हा जमीन सपाटीकरणाचे काम निघालं. ग्रामपंचायतीनं दवंडी दिली आणि गणरा पण कामावर जायला निघाली.
‘गजरे, आता कशाला जातेस कामावर? आवंदा शेतं झकास पिकली आहेत. आता काय कमी आहे आपल्याला?'
'जरा स्पष्ट बोलू का? राग नाही ना धरणार धनी ?' गजरा धीटपणे म्हणाली, ‘कमी आहे ती माझ्यामध्ये... मी सुकलेय, नुसती हाडंहाडं लागतात ना...!"
“होय गजरे, पूर्वी तू किती छान दिसायचीस... या रोजगार हमीच्या कामानं पार रया गेली बघ तुझी.'
'म्हणूनच तुमचं बाजारबसवीकडे जाणं सुरू झालं!' गजरा धीटपणे म्हणाली, ‘मला हौस नव्हती कामावर जाण्याची. पण पोटाला फासे पडल्यावर कुणीतरी कमावून आणलं पाहिजेच की!'
"बरं ते जाऊ दे. आता सारं ठीक झालंय ना?"
'नाही धनी, ठीक झालं असेल ते तुमच्यासाठी. या गजरेसाठी नाही.'
'तुला म्हणायचं तरी काय आहे?...'
‘छे, छे ! असं कसं होईल?'
‘न व्हायला काय झालं? तुम्ही बाजारात सुख हुडकाल, हे तरी कुठं वाटलं होतं?...' गजरा म्हणाली.
‘मला कामावर गेलंच पाहिजे. कष्टाची सवय ठेवली पाहिजे. कारण मला केव्हाही घराबाहेर काढलं जाईल. या घराचा, या घरधन्याचा काही भरवसा देता येत नाही. माझा आधार तुटलाय, तेव्हा मला माझ्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. संसारात जोडीदाराला जेव्हा फक्त बाईचा देहच पाहिजे असतो, त्या बाईसाठी तो संसार कुचकामी आहे. त्यात अख्ख्या जिंदगीचा आधार शोधता येत नाही, सापडत नाही... या रोजगार हमीच्या कामानं अशा बायांना... ज्यात मी सुदिक आहे... आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद दिली आहे... मार्ग दिला आहे, तो मला सोडून चालणार नाही...'
...आणि ती कामासाठी घराबाहेर पडली.
☐☐☐
center