पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/14

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. स्वावलंबन आणि सहकाराकडे वाटचाल

 आपण शशीताईंचे स्वयंसेवी कामाचे काही अनुभव पाहिले. त्यानंतर १९७५ ते १९७७ दरम्यान त्यांनी हैदराबाद येथील H.A.S.S.S. (Hyderabad Archdiocese Social Service Society) संस्थेसोबत माता-बालक आरोग्य केंद्राच्या एका प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून काम केले. त्याअंतर्गत त्यांनी आंध्र प्रदेशांतील चार जिल्ह्यांमध्ये ७,००० गर्भवती माता आणि महिलांना आरोग्य-शिक्षण व सेवा देण्याचे बहुमोल काम केले. ह्या प्रकल्पाला कोणतेही अनुदान नव्हते. तरीही त्या प्रकल्पाच्या टीमने सेवा विकसित करून उपलब्ध करून दिल्या. त्याचा सर्व खर्च केंद्रावर येणाऱ्या महिला करत. कोणतेही काम स्वावलंबी पद्धतीने चालविण्यासाठी सेवा घेणाऱ्यांनी योग्य खर्च दिला पाहिजे हा त्यांचा सुरुवातीपासून आग्रह होता.

 शशीताई सहकारी क्षेत्रात कशा आल्यात हे सांगतात, स्वयंसेवी क्षेत्रातील सात वर्षांच्या कामाचा मी जेव्हा विचार केला तेव्हा मला अगदीच निरुपयोगी असल्यासारखं वाटायला लागलं. कारण माझ्या सात वर्षाच्या कामाचा फक्त मला फायदा झाला होता. मी जरी परिस्थिती बदलासाठी काम करत होते तरी त्या भागातली राजकीय सत्ता तसेच सामाजिक आणि आर्थिक रचना सुद्धा तशीच होती. त्यामध्ये कुठलेच लक्षणीय बदल घडले नाहीत. मी हे काम सोडून रुळलेल्या वाटेने जाण्याचा विचार करत असतानाच मी श्री. रामा रेड्डी अध्यक्ष, सहविकास (CDF) हैद्राबाद यांना भेटले. त्यांनी मला सांगितले की सहकारी संस्था या राजकीय, आर्थिक, सामाजिक बदल घडवू शकतात. तू सात वर्ष या क्षेत्रात काम केलं आहेस, तर अजून एक वर्ष काम करायला काहीच हरकत नाही. आणि वर्षाच्या शेवटी तुला असं वाटलं की सहकारामार्फत काही बदल घडू शकत नाहीत तर तू या क्षेत्रातून बाहेर पडायला मोकळी आहेस.

 १९७८ साली मी जेव्हा सहकारी संस्थांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की सहकाराची थोडीशी प्रगती सुद्धा लोकांना अस्वस्थ करते, खास करून गावातील पुढारी, सहकार खात्याचे अधिकारी आणि ज्येष्ठ राजकीय

नेत्यांना. त्यामुळे मला पटले की यशस्वी सहकारी संस्था मूलगामी परिवर्तन घडवू

१४
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन