पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/118

हे पान प्रमाणित केलेले आहे.

देणगी मिळालेली आहे. ज्यांनी आपल्याला त्या पलीकडचेही दिसते असे आजवर म्हटले. त्यांचा दांभिकपणा समाजाच्या खालावत जाणाऱ्या परिस्थितीने उघड केला आहे.
 आपापल्या दृष्टीने आकलन करून आपले सुखसमाधान, आपल्या परिवाराचे सुखसमाधान वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न करणारे लोक, दूरदृष्टी ठेवून निश्चित स्वार्थाचा विचार करणारे लोक तो स्वार्थ साधताना एकमेकांबरोबर स्पर्धा करणारे, एकमेकांशी झगडणारे, प्रयत्न करीत असताना चुका करणारे, धडपडणारे लोकच पुढे उभे राहू लागले आहेत. जगामध्ये जर काही विकास झाला असेल तर तो केवळ, स्वार्थाने प्रेरित होऊन एकमेकांशी स्पर्धा करीत पुढे चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वसामान्यांमुळे झालेला आहे; महात्म्यांच्या आधाराशिवाय झाला आहे. हे दर्शन पुढे येणार असेल तर आपल्या सर्वांवर जबाबदारी येऊन पडते की, या विषयावर प्रकाश पाडला पाहिजे. समाजात मोठा बदल घडत आहे. दुसऱ्यांसाठी जगणारांचा नाही, तर स्वतःवर निष्ठा ठेवणाऱ्या व्यक्तींचा जमाना येत आहे. व्यक्तींचा विकास म्हणजेच समाजाचा विकास हा सिद्धांत पुढे येत आहे आणि या सिद्धांताच्या सिद्धतेसाठी कोण्या महात्म्याच्या दलालांची आवश्यकता नाही.

(२१ मार्च १९९५)

♦♦

भारतासाठी । ११८