पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/120

हे पान प्रमाणित केलेले आहे.

असले, अशुभ ग्रहांची शांती केली तर पत्र पोहोचलही!
 डॉक्टर मनमोहन सिंगांच्या जमान्यात टपालची मक्तेदारी संपली, खाजगी कंपन्यांना सरकारी टपाल हशीलाच्या वीसपंचवीस पट पैसे देऊन महत्त्वाची पत्रे लोक सोपवू लागले. टपाल खात्यानेही महत्त्वाच्या पत्रांकरिता 'स्पीड पोस्ट' काढले आणि इंग्रजी राज्याचा झेंडा मिरवणारी टपालाची पेटी आणि कचरापेटी यांत फारसा फरक राहिला नाही.
 टपाल व्यवस्था विस्कळीत असली, पत्रे मिळण्याची शाश्वती नसली तर मोठी गैरसोय होते. व्यापार, उद्योगधंदे मंदावतात, नोकरीसाठी मुलाखतीचे निमंत्रण यायला विलंब झाला की उमेदवारांच्या जिवाची केवढी घालमेल होते? प्रियजनांचे कुशल कळवणारे कार्ड आले नाही तर चिंता व्याकुळ करते. प्रेमीजनांचा पत्रव्यवहार टपाल कचेरीतून व्हायचा म्हणजे, सुखांतिका दोघांच्या म्हातारपणीच यायची! या सगळ्या गैरसोयी जीवघेण्या आहेत; पण त्यामुळे प्रत्यक्ष जीव जातो असे फारसे घडत नाही. टपालाच्या दिरंगाईमुळे प्राण गेला अशा बातम्या वाचनात येत नाही. टपाल खात्याचा गबाळपणा प्राणावर बेतत नाही.

 इंग्रजांनी सुरू केलेल्या दुसऱ्या एका व्यवस्थेबाबत मात्र असे नाही. आगगाडीतील गोंधळ प्राण घेतो. एवढेच नव्हे तर, तैमूरलंगाला लाजवील अशा कत्तली घडवून आणतो. फिरोजाबादजवळ झालेला अपघात हे त्याचे एक उदाहरण. फिरोजाबादच्या केबिनवाल्याने कालिंदी एक्स्प्रेस जाऊ दिली, त्यापुढील सिग्नलच्या आधी पहाटे तीनच्या अंधारात कालिंदीच्या वाटेत एक म्हैस आली. ती वाटेत रुळात थांबली. केबिनवाला घोरेलाल वर्मा पहाटेच्या सुमारास काय अवस्थेत असेल याची सहज कल्पना कोणालाही करता येईल. त्याच्या डोळ्यावरची, विचारावरची झापड केवळ झोपेचीच असली, त्याला कोणत्या रसायनाचे साहाय्य झाले नसेल तर मोठे आश्चर्यच म्हणायचे. "कालिंदी एव्हाना गेलीच असणार, ती सिग्नलपलीकडे गेल्याची निशाणी मिळाली नाही म्हणून काय झाले? काहीवेळा होते असे. गाडी निघून जाते, इकडे काही कळत नाही, मग फुकट स्टेशन मास्तरकडून मेमो मिळतो." असा विचारही कदाचित घोरेलालने केला असेल. मागून येणारी पुरुषोत्तम सुपर फास्ट एक्स्प्रेस ११० किलोमीटर वेगाने येणारी. तिचा खोळंबा करावे म्हटले तरी पंचाईत! निर्घोर झोपेतून उठलेल्या घोरेलालने मागच्या तुफान गाडीला मार्ग मोकळा करून दिला आणि अघोर ते घडले. पुरुषोत्तम कालिंदीस भिडला, डबे इकडे तिकडे फेकले गेले, तीस फूट उंचीवरून खाली पडले. काही डबे सरळ उभे राहिले, काही प्रचंड विद्युतदाबाच्या तारांवर

भारतासाठी । १२०